श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
सप्तत्रिंशोऽध्यायः


बभ्रुवंशवर्णनम्

वैशम्पायन उवाच
सत्त्वतात्सत्त्वसंपन्नान् कौशल्या सुषुवे सुतान् ।
भजिनं भजमानं च दिव्यं देवावृधं नृपम् ॥ १ ॥
अन्धकं च महाबाहुं वृष्णिं च यदुनन्दनम् ।
तेषां विसर्गाश्चत्वारो विस्तरेणेह ताञ्छृणु ॥ २ ॥
भजमानस्य सृञ्जय्यौ बाह्यकाथोपबाह्यका ।
आस्तां भार्ये तयोस्तस्माज्जज्ञिरे बहवः सुताः ॥ ३ ॥
कृमिश्च क्रमणश्चैव धृष्टः शूरः पुरंजयः ।
एते बाह्यकसृञ्जय्यां भजमानाद्विजज्ञिरे ॥ ४ ॥
अयुताजित्सहस्राजिच्छताजिच्चाथ दाशकः ।
उपबाह्यकसृञ्जय्यां भजमानाद्विजज्ञिरे ॥ ५ ॥
यज्वा देववृधो राजा चचार विपुलं तपः ।
पुत्रः सर्वगुणोपेतो मम स्यादिति निश्चितः ॥ ६ ॥
संयुज्यात्मनमेवं तु पर्णशाया जलं स्पृशन् ।
सदोपस्पृशतस्तस्य चकार प्रियमापगा ॥ ७ ॥
चिन्तयाभिपरीता सा जगामैकाभिनिश्चयम् ।
कल्याणत्वान्नरपतेस्तस्य सा निम्नगोत्तमा ॥ ८ ॥
नाध्यगच्छत तां नारीं यस्यामेवंविधः सुतः ।
जायेत् तस्मात् स्वयं हन्त भवाम्यस्य सहव्रता ॥ ९ ॥
अथ भूत्वा कुमारी सा बिभ्रती परमं वपुः ।
वरयामास नृपतिं तामियेष च स प्रभुः ॥ १० ॥
तस्यामाधत्त गर्भं च तेजस्विनमुदारधीः ।
अथ सा दशमे मासि सुषुवे सरितां वरा ॥ ११ ॥
पुत्रं सर्वगुणोपेतं बभ्रुं देवावृधान्नृपात् ।
अत्र वंशे पुराणज्ञा गायन्तीति परिश्रुतम् ॥ १२ ॥
गुणान् देवावृधस्याथ कीर्तयन्तो महात्मनः ।
यथैवाग्रे समं दूरात् पश्याम च तथान्तिके ॥ १३ ॥
बभ्रुः श्रेष्ठो मनुष्याणां देवैर्देवावृधः समः ।
षष्टिश्च षट्च पुरुषाः सहस्राणि च सप्त च ॥ १४ ॥
एतेऽमृतत्वं संप्राप्ता बभ्रुर्देवावृधावपि ।
यज्वा दानपतिर्विद्वान् ब्रह्मण्यः सुधृढायुधः ॥ १५ ॥
कीर्तिमांश्च महातेजाः सात्त्वतानां महावरः ।
तस्यान्ववायः सुमहान् भोजा ये मार्तिकावताः ॥ १६ ॥
अन्धकात् काश्यदुहिता चतुरोऽलभदात्मजान् । ॥
कुकुरं भजमानं च शमिं कम्बलबर्हिषम् ॥ १७ ॥
कुकुरस्य सुतो धृष्णुर्धृष्णोस्तु तनयस्तथा ।
कपोतरोमा तस्याथ तैत्तिरिस्तनयोऽभवत् ॥ १८ ॥
जज्ञे पुनर्वसुस्तस्मादभिजित् तु पुनर्वसोः ।
तस्य वै पुत्रमिथुनं बभूवाभिजितः किल ॥ १९ ॥
आहुकश्चाहुकी चैव ख्यातौ ख्यातिमतां वरौ ।
इमां चोदाहरन्त्यत्र गाथां प्रति तमाहुकम् ॥ २० ॥
श्वेतेन परिवारेण किशोरप्रतिमो महान् ।
अशीतिचर्मणा युक्तः स नृपः प्रथमं व्रजेत् ॥ २१ ॥
नापुत्रवान् नाशतदो नासहस्रशतायुषः ।
नाशुद्धकर्मा नायज्वा यो भोजमभितो व्रजेत् ॥ २२ ॥
पूर्वस्यां दिशि नागानां भोजस्येत्यनुमोदनम् ।
सोपासङ्गानुकर्षाणां ध्वजिनां सवरूथिनाम् ॥ २३ ॥
रथानां मेघघोषाणां सहस्राणि दशैव तु ।
रूप्यकाञ्चनकक्षाणां सहस्राणि दशापि च ॥ २४ ॥
तावन्त्येव सहस्राणि उत्तरस्यां तथा दिशि ।
आ भूमिपालान् भोजाः स्वानुत्तिष्ठन्किङ्किणीकिणः ॥ २५ ॥
आहुकीं चाप्यवन्तिभ्यः स्वसारं ददुरन्धकाः ।
आहुकस्य तु काश्यायां द्वौ पुत्रौ संबभूवतुः ॥ २६ ॥
देवकश्चोग्रसेनश्च देवपुत्रसमावुभौ ।
देवकस्याभवन्पुत्राश्चत्वारस्त्रिदशोपमाः ॥ २७ ॥
देववानुपदेवश्च सुदेवो देवरक्षितः ।
कुमार्यः सप्त चास्यासन् वसुदेवाय ता ददौ ॥ २८ ॥
देवकी शन्तिदेवा च सुदेवा देवरक्षिता ।
वृकदेव्युपदेवी च सुनासी चैव सप्तमी ॥ २९ ॥
नवोग्रसेनस्य सुतास्तेषां कंसस्तु पूर्वजः ।
न्यग्रोधश्च सुनामा च कङ्कः शङ्कुः सुभूमिपः ॥ ३० ॥
राष्ट्रपालोऽथ सुतनुरनाधृष्टिश्च पुष्टिमान् ।
तेषां स्वसारः पञ्चाऽऽसन् कंसा कंसवती तथा ॥ ३१ ॥
सुतनू राष्ट्रपाली च कङ्का चैव वराङ्गना ।
उग्रसेनः सहापत्यो व्याख्यातः कुकुरोद्भवः ॥ ३२ ॥
कुकुराणामिमं वंशं धारयन्नमितौजसाम् ।
आत्मनो विपुलं वंशं प्रजावानाप्नुयान्नरः ॥ ३३ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
हरिवंशपर्वणि सप्तत्रिंशोऽध्यायः


बभ्रुवंशवर्णन -

वैशंपायन सांगतात - सत्वसंपन्न जो सत्वत त्यापासून कौशल्येनें (सत्वताची स्त्री) ज्या पुत्रांस जन्म दिला त्यांचीं नांवें - भजी, भजमान, दिव्यदेवावृध, महाबाहु अंधक व यदुकुलानंद वृष्णि. यांपैकीं चौघांचा वंश विस्तारानें सांगतों तो ऐक. भजमानाला बाह्यका व उपबाह्यका या नांवाच्या दोन स्त्रिया होत्या. या सृंजयाच्या मुली होत्या. यांपासून भजमानाला अनेक पुत्र झाले. त्यांतील जी पहिली म्हणजे बाह्यक सृंजया तिजपासून कृमि, क्रमण, धृष्ट, शूर व पुरंजय, हे झाले; व दुसरी जी उपबाह्य सृंजया तिजपासून अयुताजित, सहस्राजित, शताजित व दाशक हे झाले. आतां देवावृधाचा वंश - हा राजा मोठा यज्ञकर्ता होता. शिवाय आपणांस सर्वगुणोपेत पुत्र व्हावा असा दृढ हेतु मनांत धरून यानें फारच मोठे तप केलें. त्यानें मनःसंयम करून समाधीचा अभ्यास केला. तपश्चर्येच्या कालांत तो पर्णाशा नामक नदीचें स्नान, आचमन वगैरे करीत असे. त्याच्या त्या (भक्तिपुरसर) सतत स्पर्शानें ती नदी प्रसन्न होऊन त्याचे कल्याणाविषयीं उद्युक्त झाली; व राजाचें इष्ट कोणत्या रीतीनें सिद्ध करितां येईल याचा विचार करीत असतां राजाला ज्या प्रकारचा पुत्र पाहिजे होता त्या प्रकारचा पुत्र जिचे ठायीं उत्पन्न होऊं शकेल अशी एकही स्त्री तिला आढळेना. त्या वेळीं तिनें निश्चय केला कीं, आतां आपणच स्त्री-रूप घेऊन याची सहचारिणी व्हावें. असा संकल्प होतांच ती अतिशय सुंदर असें रूप धारण करून कुमारीरूपानें जन्मास आली. तिनें देवावृध राजाला वरिलें व त्या राजाचेंही तिजवर मन गेलेंच होतें. लौकरच त्या उदार बुद्धीच्या राजानें तिचे ठिकाणीं तेजस्वी असा गर्भ स्थापिला. दहाव्या महिन्यांत ती सरिच्छ्रेष्ठा, बभ्रुनामक सर्वगुणसंपन्न पुत्राला जन्म देती झाली. या वंशाचें वर्णन करणारे कांहीं पुराणज्ञ महात्मे देवावृधाचे पुढीलप्रमाणें गुण वर्णन करितांना आम्हीं ऐकलें आहे. ते म्हणत, "देवावृध हा तर देवांच्या तोडीचाच आहे; व त्याचा पुत्र बभ्रु हाही सर्व मनुष्यांत श्रेष्ठ आहे. याचें योगसामर्थ्य इतकें विलक्षण आहे कीं, हा आमचे समोर आसपास किंवा दूर कोठेंही पाहावा तरी सारखाच दिसतो. या बापलेकांनीं रणांत मारिल्यामुळें सात हजार सहासष्ट वीर मुक्तीस गेले आहेत. हा बभ्रु मोठा यज्ञकर्ता, दानशौण्ड, विद्वान्, ब्रह्मज्ञ, दृढायुध, कीर्तिमान् व महातेजस्वी असून सात्वतांच्या वंशांत महाप्रसिद्ध आहे. इत्यादि." या बभ्रूचे विस्तीर्ण वंशांत मार्तिकावत नांवाचे सुप्रसिद्ध भोज राजे झाले.

सत्वताचा पुत्र जो अंधक त्याजपासून दृढाश्व राजाच्या मुलीला चार पुत्र झाले. त्यांचीं नांवें - कुकुर, भजमान, शमि व कंबलबर्हिष. पैकीं कुकुराला धृष्णु हा पुत्र झाला. धृष्णूपासून कपोतरोमा. त्याला पुढें तैत्तिरि. तैत्तिरीचा पुनर्वसु. पुनर्वसूचा अभिजित. अभिजिताला आहुक हा पुत्र व आहुकी या नांवानें प्रसिद्ध असलेली कन्या हीं झालीं. हीं नांवलौकिकवानांत मोठीं श्रेष्ठ होतीं. यांपैकीं आहुकाला उद्देशून पुराणज्ञ लोक पुढील अर्थाची गाथा गातात. "हा आहुक राजा आपले भोंवतीं श्वेतवर्णाचा किंवा शुद्ध मनाचा परिवार घेऊन व ऐशीं भाते किंवा ढाली बरोबर घेऊन देवांनीं रक्षित होत्साता एखाद्या उत्साहसंपन्न तरुण अश्वाप्रमाणें बाहेर स्वारीला निघत असतो." या आहुकाचे भोंवतीं जी मंडळी असते तींत ज्यानें यज्ञ केला नाहीं, ज्याचें आचरण शुद्ध नाहीं, ज्याला सहस्रवर्षे आयुष्य नाहीं, ज्यानें शेंकडों मुद्रा (नाणें) दान केलें नाहीं, व ज्याला पुत्र नाहीं असा एकही मनुष्य नसे. आहुकाच्या आज्ञेबरोबर दहा हजार हत्ती, ज्यांना लगाम व पट्टे बांधले आहेत असे, त्याचप्रमाणें मेघांप्रमाणें घडघडणारे, आंतून सोन्यारुप्यानें मढविलेले व वर बुरखा चढवून ध्वजा उभारलेले असे दहा सहस्त्र रथ, पूर्व दिशेला जातात; व तितकेच हत्ती आणि रथ उत्तरेच्या दिशेला धांवतात. या प्रकारची तयारी घेऊन तो आहुक राजा आसपासच्या सर्व राजांना जिंकून आपले जे जात-बंधु भोज त्यांना घंटा बांधिलेल्या रथांत घालून मोठया थाटानें मार्गांतून मिरवीत जात असे. अंधकांनीं आहुकाची बहिण जी आहुकी ती अवंति-राजाला दिली; व स्वतः आहुकानें काशीराजाची कन्या केली, तिचे ठिकाणीं त्याला दोन पुत्र झाले; त्यांचीं नांवें - देवक आणि उग्रसेन. हे दोघेही देवकुमारांसारखे तेजस्वी होते. देवकाला पुढें देवतुल्य चार पुत्र झाले. त्यांचीं नांवें - देववान, उपदेव, सुदेव व देवरक्षित. यांखेरीज त्याला मुली झाल्या. त्या सातीही त्यानें एकटया वसुदेवालाच दिल्या. त्यांचीं नांवें - देवकी, शांतिदेवा, सुदेवा, देवरक्षिता, वृकदेवी, उपदेवी व सातवी सुनाम्नी.

आतां उग्रसेनाची संतति - उग्रसेनाला नऊ मुलगे होते. त्यांत कंस हा वडील; त्याचे खालीं न्यग्रोध, सुनामा, कंक, राजा शङ्क, राष्ट्रपाल, सुतनु, अनाधृष्टि व पुष्टिमान असे आठ. या भावांना पांचजणी बहिणी होत्या. त्यांचीं नांवें - कंसा, कंसवती, सुतनू, राष्ट्रपाली व कंका; ही फारच सुंदर होती. (हे राजा) कुकुरापासून झालेल्या उग्रसेनाच्या संततीचें वर्णन हें मीं तुला सांगितले. हे कुकुरकुलोत्पन्न राजे अमित तेजस्वी होते, यांचें वंशवर्णन जो कोणी ऐकेल त्याला विपुल संतति होऊन त्याचा वंश ठीक चालेल.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
बभ्रुवंशवर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥ ३७ ॥
अध्याय सदतिसावा समाप्त

GO TOP