श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व षष्ठोऽध्यायः
पृथूपाख्यानम् -
पृथुरुवाच
एकस्यार्थाय यो हन्यादात्मनो वा परस्य वा ।
बहून् वै प्राणिनो लोके भवेत् तस्येह पातकम् ॥ १ ॥
सुखमेधन्ति बहवो यस्मिंस्तु निहतेऽशुभे ।
तस्मिन् नास्ति हते भद्रे पातकं चोपपातकम् ॥ २ ॥
एकस्मिन् यत्र निधनं प्रापिते दुष्टकारिणि ।
बहूनां भवति क्षेमं तत्र पुण्यप्रदो वधः ॥ ३ ॥
सोऽहं प्रजानिमित्तं त्वां हनिष्यामि वसुंधरे ।
यदि मे वचनां नाद्य करिष्यसि जगद्धितम् ॥ ४ ॥
त्वां निहत्याद्य बाणेन मच्छासनपराङ् मुखीम् ।
आत्मानं प्रथयित्वाहं प्रजा धारयिता चिरम् ॥ ५ ॥
सा त्वं शासनमास्थाय मम धर्मभृतां वरे ।
सञ्जीवय प्रजाः सर्वाः समर्था ह्यसि धारणे ॥ ६ ॥
दुहितृत्वं च मे गच्छ तत एनमहं शरम् ।
नियच्छेयं त्वद्वधार्थमुद्यतं घोरदर्शनम् ॥ ७ ॥
पृथिव्युवाच
सर्वमेतदहं वीर विधास्यामि न संशयः ।
उपायतः समारब्धाः सर्वे सिद्ध्यन्त्युपक्रमाः ॥ ८ ॥
उपायं पश्य येन त्वं धारयेथाः प्रजा इमाः ।
वत्सं तु मम सम्पश्य क्षरेयं येन वत्सला ॥ ९ ॥
समां च कुरु सर्वत्र मां त्वं धर्मभृतां वर ।
यथा विस्पन्दमानं मे क्षीरं सर्वत्र भावयेत् ॥ १० ॥
वैशम्पायन उवाच
तत उत्सारयामास शैलाञ्छतसहस्रशः ।
धनुष्कोट्या तदा वैन्यस्तेन शैला विवर्धिताः ॥ ११ ॥
इत्थं वैन्यस्तदा राजा महीं चक्रे समां ततः ।
मन्वन्तरेष्वतीतेषु विषमासीद् वसुन्धरा ॥ १२ ॥
स्वभावेनाभवन् ह्यस्याः समानि विषमाणि च ।
चाक्षुषस्यान्तरे पूर्वमासीदेवं तदा किल ॥ १३ ॥
न हि पूर्वविसर्गे वै विषमे पृथिवीतले ।
प्रविभागः पुराणां च ग्रामाणां वा तदाभवत् ॥ १४ ॥
न सस्यानि न गोरक्षा न कृषिर्न वणिक्पथः ।
नैव सत्यानृतं तत्र न लोभो न च मत्सरः ॥ १५ ॥
वैवस्वतेऽन्तरे चास्मिन् साम्प्रतं समुपस्थिते ।
वैन्यात्प्रभृति राजेन्द्र सर्वस्यैतस्य सम्भवः ॥ १६ ॥
यत्र यत्र समं त्वस्या भूमेरासीदिहानघ ।
तत्र तत्र प्रजाः सर्वाः संवासं समरोचयन् ॥ १७ ॥
आहारः फलमूलानि प्रजानामभवत् तदा ।
कृच्छ्रेण महता युक्त इत्येवमनुशुश्रुम ॥ १८ ॥
सङ्कल्पयित्वा वत्सं तु मनुं स्वायम्भुवं प्रभुम् ।
स्वपाणौ पुरुषश्रेष्ठ दुदोह पृथिवीं ततः ।
सस्यजातानि सर्वाणि पृथुर्वैन्यः प्रतापवान् ॥ १९ ॥
तेनान्नेन प्रजास्तात वर्तन्तेऽद्यापि नित्यशः ।
ऋषिभिः श्रूयते चापि पुनर्दुग्धा वसुंधरा ॥ २० ॥
वत्सः सोमोऽभवत्तेषां दोग्धा चाङ्गिरसः सुतः ।
बृहस्पतिर्महातेजाः पात्रं छन्दांसि भारत ।
क्षीरमासीदनुपमं तपो ब्रह्म च शाश्वतम् ॥ २१ ॥
पुनर्देवगणैः सर्वैः पुरन्दरपुरोगमैः ।
काञ्चनं पात्रमादाय दुग्धेयं श्रूयते मही ॥ २२ ॥
वत्सस्तु मघवानासीद् दोग्धा च सविता प्रभुः ।
क्षीरमूर्जस्करं चैव वर्तन्ते येन देवताः ॥ २३ ॥
पितॄभिः श्रूयते चापि पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
राजतं पात्रमादाय स्वधाममितविक्रमैः ॥ २४ ॥
यमो वैवस्वरस्तेषामासीद् वत्सः प्रतापवान् ।
अन्तकश्चाभवद् दोग्धा कालो लोकप्रकालनः ॥ २५ ॥
नागैश्च श्रूयते दुग्ध्दा वत्सं कृत्वा तु तक्षकम् ।
अलाबुं पात्रमादाय विषं क्षीरं नरोत्तम ॥ २६ ॥
तेषामैरावतो दोग्धा धृतराष्ट्रः प्रतापवान् ।
नागानां भरतश्रेष्ठ सर्पाणां च महीपते ॥ २७ ॥
तेनैव वर्तयन्त्युग्रा महाकाया विषोल्बणाः ।
तदाहारास्तदाचारास्तद्वीर्यास्तदुपाश्रयाः ॥ २८ ॥
असुरैः श्रूयते चापि पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
आयसं पात्रमादाय मायां शत्रुनिबर्हिणीम् ॥ २९ ॥
विरोचनस्तु प्राह्रादिर्वत्सस्तेषामभूत् तदा ।
ऋत्विग्द्विमूर्द्धा दैत्यानां मधुर्दोग्धा महाबलः ॥ ३० ॥
तयैते माययाद्यापि सर्वे मायाविनोऽसुराः ।
वर्तयन्त्यमितप्रज्ञास्तदेषाममितं बलम् ॥ ३१ ॥
यक्षैश्च श्रूयते तात पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
आमपात्रे महाराज पुरान्तर्द्धानमक्षयम् ॥ ३२ ॥
वत्सं वैश्रवणं कृत्वा यक्षैः पुण्यजनैस्तदा ।
दोग्धा रजतनाभस्तु पिता मणिवरस्य यः ॥ ३३ ॥
यक्षानुजो महातेजास्त्रिशीर्षाः सुमहातपाः ।
तेन ते वर्तयन्तीति परमर्षिरुवाच ह ॥ ३४ ॥
राक्षसैश्च पिशाचैश्च पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
शावं कपालमादाय प्रजा भोक्तुं नरर्षभ ॥ ३५ ॥
दोग्धा रजतनाभस्तु तेषामासीत्कुरूद्वह ।
वत्सः सुमाली कौरव्यः क्षीरं रुधिरमेव च ॥ ३६ ॥
तेन क्षीरेण यक्षाश्च राक्षसाश्चामरोपमाः ।
वर्तयन्ति पिशाचाश्च भूतसङ्घास्तथैव च ॥ ३७ ॥
पद्मपात्रे पुनर्दुग्धा गन्धर्वैः साप्सरोगणैः ।
वत्सं चित्ररथं कृत्वा शुचीन् गन्धान् नरर्षभ ॥ ३८ ॥
तेषां च सुरुचिस्त्वासीद् दोग्धा भरतसत्तम ।
गन्धर्वराजोऽतिबलो महात्मा सूर्यसन्निभः ॥ ३९ ॥
शैलैश्च श्रूयते राजन् पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
औषधीर्वै मूर्तिमती रत्नानि विविधानि च ॥ ४० ॥
वत्सस्तु हिमवानासीन्मेरुर्दोग्धा महागिरिः ।
पात्रं तु शैलमेवासीत् तेन शैला विवर्धिताः ॥ ४१ ॥
वीरुद्भिः श्रूयते राजन् पुनर्दुग्धा वसुन्धरा ।
पालाशं पात्रमादाय दग्धच्छिन्नप्ररोहणम् ॥ ४२ ॥
दुदोह पुष्पितः सालो वत्सः प्लक्षोऽभवत्तदा ।
सेयं धात्री विधात्री च पावनी च वसुन्धरा ॥ ४३ ॥
चराचरस्य सर्वस्य प्रतिष्ठा योनिरेव च ।
सर्वकामदुघा दोग्ध्री सर्वसस्यप्ररोहिणी ॥ ४४ ॥
आसीदियं समुद्रान्ता मेदिनीति परिश्रुता ।
मधुकैटभयोः कृत्स्ना मेदसाभिपरिप्लुता ।
तेनेयं मेदिनी देवी प्रोच्यते ब्रह्मवादिभिः ॥ ४५ ॥
ततोऽभ्युपगमाद् राज्ञः पृथोर्वैन्यस्य भारत ।
दुहितृत्वमनुप्राप्ता देवी पृथ्वीति चोच्यते ।
पृथुना प्रविभक्ता च शोधिता च वसुन्धरा ॥ ४६ ॥
सस्याकरवती स्फीता पुरपत्तनमालिनी ।
एवंप्रभावो वैन्यः स राजासीद्राजसत्तमः ॥ ४७ ॥
नमस्यश्चैव पूज्यश्च भूतग्रामैर्न संशयः ।
ब्राह्मणैश्च महाभागैर्वेदवेदाङ्गपारगैः ॥ ४८ ॥
पृथुरेव नमस्कार्यो ब्रह्मयोनिः सनातनः ।
पार्थिवैश्च महाभागैः पार्थिवत्वमभीप्सुभिः ॥ ४९ ॥
आदिराजो नमस्कार्यः पृथुर्वैन्यः प्रतापवान् ।
योधैरपि च विक्रान्तैः प्राप्तुकामैर्जयं युधि ।
पृथुरेव नमस्कार्यो योधानां प्रथमो नृपः ॥ ५० ॥
यो हि योद्धा रणं याति कीर्तयित्वा पृथुं नृपम्
स घोररूपान् संग्रामान् क्षमी तरति कीर्तिमान् ॥ ५१ ॥
वैश्यैरपि च वित्ताढ्यैः पण्यवृत्तिमनुष्ठितैः।
पृथुरेव नमस्कार्यो वृत्तिदाता महायशाः ॥ ५२ ॥
तथैव शूद्रैः शुचिभिस्त्रिवर्णपरिचारिभिः ।
आदिराजो नमस्कार्यः श्रेयः परमभीप्सुभिः ॥ ५३ ॥
एते वत्सविशेषाश्च दोग्धारः क्षीरमेव च ।
पात्राणि च मयोक्तानि किं भूयो वर्णयामि ते ॥ ५४ ॥
य इदं शृणुयान्नित्यं पृथोश्चरितमादितः ।
पुत्रपौत्रसमायुक्तो मोदते सुचिरं भुवि ॥ ५५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पृथूपाख्याने षष्ठोऽध्यायः
पृथ्वीदोहन -
पृथु म्हणतो - हे धरित्रि, तूं अधर्म होईल म्हणून मला सांगतेस, पण माझी समजूत या कामीं काय आहे, ती मी तुला सांगतों, ऐक. जो कोणी केवळ एका व्यक्तीच्या हितासाठीं - मग ती व्यक्ति तो स्वत: आपण असो किंवा अन्य कोणी असो - अनेक लोकांचा जीव घेईल त्याला पातक किंवा अधर्म लागेल. परंतु हे कल्याणि, ज्या एका दुष्टाला मारल्यानें अनेक जीव सुखासमाधानानें नांदूं लागतील अशाचा वध करण्यापासून बारीक मोठें कसलेंच पातक लागत नाही; उलट दुष्टाच्या वधानें जर अनेक लोक सुखी होतील, तर असल्याच्या वधांत पुण्यसंग्रह आहे, असें मी समजतों; व याच न्यायानें मी माझ्या हजारों हजार प्रजांच्या कल्याणासाठीं तुला मारावयासच प्रवृत्त झालों आहें. मी केवळ माझ्या प्रजेच्या हितासाठीं जी गोष्ट करावयास तुला सांगेन ती न ऐकून जर तूं माझे आज्ञेला पराङ्मुख होशील तर तुला बाणानें अशीच ठार करीन. तूं मेल्यावर माझ्या प्रजा कोठें राहातील, हे तुला गूढ पडलें आहे, पण त्याचेंही उत्तर तुला सांगतो. मीच स्वतः तुझ्याऐवजीं सर्वभर विस्तीर्ण होऊन माझ्या अंगावर प्रजेचें धारण करीन. ती भ्रांति तुला नको. तेव्हां तुझ्या धमकीला मी कांहीं भीत नाहीं; पण तूंही ज्या अर्थीं आपणास धर्मज्ञ म्हणवितेस त्या अर्थी मी तुला आज्ञा करितों, ती ऐक; व माझ्या प्रजेला उत्तम प्रकारें जीवन दे. हें काम करण्याला तूं समर्थही आहेस, म्हणून माझी आज्ञा अस्थानीं नाहीं. तुझ्या वधार्थ धनुष्याला लावलेला हा माझा उग्र बाण मी परत घ्यावा असें तुझें म्हणणें आहे तर तूं माझी कन्या होऊन माझे आज्ञेंत वाग म्हणजे मी हाच बाण आटपून ठेवितों.
पृथ्वी म्हणते - तूं सांगतोस त्या सर्व गोष्टी, हे वीरा, मी करीन, याबद्दल खातरी असूं दे. परंतु तूं कोणते युक्तीनें या प्रजांचे धारण करूं शकशील ती तोड काढ. शिवाय माझें दोहन करावयाचें म्हणतोस तर वत्साशिवाय मला पान्हा सोडतां येणार नाहीं, म्हणून दोहनकालीं तूं वत्स कोण लावणार तीही योजना कर. कारण मीं पूर्वीं सांगितलेंच आहे कीं, कोणतीही गोष्ट करणे तर तिच्या सिद्धीचे योग्य उपाय प्रथम योजून मग आरंभ करावा, मग यश हटकून येतें. असो; तूं मजवर भरंवसा टाकिला आहेस, त्याअर्थी, हे धार्मिकश्रेष्ठा, मीच तुला एक युक्ति सांगतें. ती ही कीं, तूं माझा पृष्ठभाग सम-विषम आहे तो सर्वत्र पाणसळींत येईल असा समतल तल कर म्हणजे मास्या ओंटींतून दूध गळलें असतां तें भूमीच्या सर्व भागांकडे सारखे पोंचेल.
वैशंपायन सांगतात - पृथ्वीचें तें वचन ऐकून वेनपुत्र पृथुराजानें आपल्या धनुष्याचे अग्रानें भडाभड भूमीवरील उंचवटे उडवून एकावर एक रचले. त्यामुळें कांहीं टेकडयांचे डोंगर झाले; व या युक्तीनें बाकीची पृथ्वी समतल झाली. यापूर्वींच्या मन्वंतरांत म्हणजे चाक्षुष मन्वंतराच्या अखेरपर्यंत भूमि ही मूळ सृष्टिधर्माने जशी होती तशीच विषम म्हणजे ठिकठिकाणीं उंचसखल अशी होती, (अर्थातच पाणी सर्वत्र पसरूं न शकल्यामुळें पिकाऊपणाही यथातथाच असणार.) व या तिच्या विषमपणामुळेंच हल्लींच्यासारखीच शिस्तवार गांवांची किंवा शहरांची रचना पूर्वकल्पांत नव्हती. धान्यही पुरेसें नव्हतें. गुरचरणही तितपतच, शेतीही बेताचीच व व्यापारी दळण- वळणही कृताकृतच असे. खर्याखोटयाचा विचार तितपतच होता. बरें, मनष्याचे ठिकाणीं लोभ किंवा मत्सरही नव्हता. हे जनमेजया, परंतु सांप्रत हा वैवस्वत मनु लागल्यापासून व त्यांतही विशेषत: या पृथूची कारकीर्द सुरूं झाल्यापासून वर सांगितलेल्या सर्व गोष्टी अस्तित्वांत आल्या; कारण मधील उंचवटे काढून या पृथूनें जेव्हां कोसोगणित एकजात ताटासारखी सपाट जमीन केली त्या वेळीं प्रजाजनांना आपण एकाच ठिकाणीं जमून एकवट वसति करावी, अशी सहजच बुद्धि उत्पन्न झाली; व तिचे योगानें समूहचे समूह एकत्र होऊन लहानमोठे ग्राम, शहरें, नगरें, ही वसलीं. पृथूचे पूर्वीं प्रजा कोठें रानांतील कंदमूलफलांवर कसाबसा गुजारा करी, असें आमचे ऐकिवांत आहे. परंतु पृथूनें स्वायंभुव मनूला वत्स कल्पून खुद्द आपले हातानें पृथ्वीची धार काढली व त्या योगानें पृथ्वीवर धान्यच धान्य पिकूं लागले; तें इतकें कीं, अजून देखील प्रजा आला तो दिवस याच अन्नावर निर्वाह करते.
मी असें ऐकितों कीं, यानंतर ऋषींनींही एकदां या वसुंधरेचे दोहन केलें, त्यावेळीं सोमाला त्यांनीं वत्स केला व अंगिरस पुत्र जो बृहस्पति तो दोग्धा झाला. दूध काढण्याचें पात्र छंद म्हणजे वेद होते, व अशा रीतीनें जें दूध प्राप्त झालें तें केवळ अनुपमच होतें. तें कोणतें म्हणाल तर तप व शाश्वत ब्रह्म यांची प्राप्ति. त्यावर सर्व देवांनीं पुरंदर इंद्राला पुढें करून सोन्याचें भांडें घेऊन पुनरपि या महीचें दूध काढले. त्यावेळीं इंद्र हा वत्स होता व शक्तिमान् सविता हा दूध पिळणारा होता. यावेळीं निघालेलें दूध फारच जोरकस होतें व त्यावरच देव अद्यापि जगले आहेत.
तें दूध म्हणजे देवांचें अमृत होय. यापुढें अमित पराक्रमी जे पितर यांनीं रुप्याचें भांडें घेऊन या वसुंधरेपासून स्वधारूप दूध काढलें. यावेळीं सूर्यपुत्र प्रतापी यम हा वत्स होता व सर्व लोकांचा संहारकर्ता जो काल तो दूध काढणारा होता. यानंतर, मी असें ऐकितो कीं, तक्षकाला वत्स करून व पांढर्या भोपळ्याचें भांडें करून नागांनीं व सर्पांनी विषरूपी दूध काढिलें. यावेळीं ऐरावतकुलोत्पन्न प्रतापी धृतराष्ट्र हा दोग्धा होता. यावेळीं निघालेल्या दुधाच्या म्हणजे विषाच्या बळावरच हे नाग व सर्प इतकाले लठठ पोसले आहेत व इतके भयंकर व उग्र झाले आहेत. यांचें अन्नही विष, यांचें वर्तनही विषारी, यांचें वीर्यही विषारी व विषाचेच बळावर ते जगतात. यापुढें असुरांनीं या वसुंधरेचे दोहन केलें असें ऐकितों. त्यावेळीं त्यांनीं लोहमय पात्र घेतलें होतें व शत्रूंचा विध्वंस करणारी जी माया ( कपटविद्या) हेंच दूध त्यांनीं काढिलें. यावेळीं प्रर्हादपुत्र विरोचन हा त्यांचा वत्स होता व दैत्यांचा महाबलाढय ऋत्विज दोन डोक्यांचा जो मधु तो दोहनकर्ता होता. ते या मायेच्या बळावरच अद्यापिही मोठे ठकबाज, अतिबलाढय व अगाध चतुराईनें युक्त असे आहेत. वत्सा जनमेजया, पक्षांनींही या वसुंधरेचें दूध काढिलें, त्या वेळचे भांडें कच्च्या मातीचें होतें व दुसर्याचे शरीरांत दडून बसणें म्हणजे परकायाप्रवेशादि गुप्त विद्या हेंच दूध त्यांनीं काढिलें. त्यावेळीं वैश्रवण हा वत्स होता व मणिवराचा पिता जो रजतनाभ तो दोहक होता. हा रजतनाभ मोठा तेजस्वी तीन डोक्यांचा होता. यावेळीं संपादन केलेली जी ही अंतर्धानविद्या तिचे बळावर अद्यापिही यक्ष चालले आहेत. नंतर पिशाच्च व राक्षस यांनींही या पृथ्वीचें दूध काढिलें. त्यांचा हेतू आपल्या संततीचा संतोष करणें हा होता. यावेळीं प्रेताचे कपालास्थि हेंच पात्र होतें. दूध काढणारा रजतर्नोभच होता; वत्स सुमालि होता, व रक्त हेंच दूध होतें. या दुधाचे बळावर .अद्यापि यक्ष, राक्षस, पिशाच्च, व इतर भूतें देवांप्रमाणेंच चैनींत थाटांत राहातात. यापुढें अप्सरांचे ताफे बरोबर घेऊन गंधर्वांनी कमलपत्रांत हिचें दूध काढिलें. त्यावेळीं चित्ररथगंधर्व हा वत्स होता, व नानाप्रकारचे मधुर सुगंध हेंच दूध काढलें. सूर्याप्रमाणें तेजस्वी, अपरिमित बलवान् महात्मा जो गंधर्वराज सुरुचि तो त्यांचा दोहनकर्ता होता. यासाठीं पर्वतांनी हिचें दूध काढिलें. ते दूध कोणतें म्हणाल तर मूर्तिमान् औषधि व नानाविध रत्नें हेंच होय. यावेळीं हिमवान् हा वत्स होता. महागिरी मेरू हा दोहनकर्ता होता. त्यांचें पात्र शिलामयच होतें व या दोहनामुळें पर्वत अधिकच वाढले. हे राजा, असें ऐकितों कीं, याउत्तर वेलींनी हिचें दूध काढिलें, त्या वेळीं पानांचेंच पात्र होतें; व दूध जें काढलें तें हेंच कीं, कोणतीही वल्ली जळली किंवा कापली असतां पुन्हा अंकुरित होण्याची तिचे ठिकाणीं शक्ति रहाणें. या वेळीं फुलांनीं भरलेला सालवृक्ष हा दोहन-कर्ता असून प्लक्ष वृक्ष हा वत्स होता.
याप्रमाणे ही वसुंधरा या चराचर भूतांची धारणकर्ती, पोषणकर्ती, पावनकर्ती, आधार किंवा आश्रय, रत्नादिकांचें उत्पत्ति- स्थान, कामधेनूप्रमाणें सर्व इच्छा पुरविणारी व सर्व प्रकारचें धान्य पिकविणारी अशी आहे. हिचा परिघ म्हणजे समुद्र होय. हिला मेदिनी असेंही एक सुप्रसिद्ध नांव आहे. हें नांव पडण्याचें कारण असें सांगतात की, मधु-कैटभ नांवाचे अतिबलाढय असे दोन दैत्य होते. त्यांचा मेद म्हणजे पोटांतील चर्बी यानें ही भरून गेली म्हणून ज्ञाते पुरुष तेव्हांपासून हिला मेदिनी असें म्हणू लागले; व पृथु राजाजवळ केलेल्या कराराप्रमाणें या भूमीनें ज्यावेळीं त्याचें कन्यात्व पत्करिलें त्या वेळेपासून हिला पृथ्वी असें म्हणूं लागले.
असो; पृथूनें याप्रमाणें ही पृथ्वी साफ करून तिचे भाग पाडल्या दिवसापासून तिच्यावर शेंकडों हजारों शहरनगरांच्या मालिकांच्या मालिका बसल्या. धान्य तर अमोज उत्पन्न होऊं लागलें, व सर्वत्र आनंदानें ती फुलून गेली. हे जनमेजया, तो राजश्रेष्ठ पृथु असा असामान्य पराक्रमी होता. प्राणिमात्रानें याला नमस्कार करून याची पूजा केलीच पाहिजे. परंतु मोठमोठाले वेदवेदांगवेत्ते महाभाग जे ब्राह्मण यांनीं देखील याला नमस्कार केला पाहिजे; कारण हा विष्णुरूपच होय. ज्यांना ज्यांना आपली गादी कायम राहावी, अशी इच्छा असेल त्यांनीं देखील या प्रतापी पृथूला नमस्कार केलाच पाहिजे. कारण या भूमंडलावरील सर्व राजांत पहिला राजा तो होय. ज्या शूर योद्ध्यांना आपल्याला युद्धांत जय व्हावा अशी इच्छा असेल त्यांनीं देखील पृथूचेंच वंदन केलें पाहिजे. कारण योद्ध्यांतील देखील हा राजा पहिलाच योद्धा होता. हे राजा, या पृथूचें यश इतकें उज्ज्वल आहे कीं, जो कोणी योद्धा या पृथु राजाचें नाम- संकीर्तन करून रणास जाईल तो कसलाही घोर संग्राम असला तरी त्यांतून सुखरूप पार पडून नांवलौकिकांस चढेल. वाणिज्यावर उपजीविका करणारे जे मोठमोठे धनाढय वैश्य लोक असतील त्यांनीं देखील पृथूच्याच पायां पडावे. कारण पूथु हा महायशस्वी असून प्राणिमात्राला उपजीविकेचें साधन त्यानेंच दिलें आहे; त्याप्रमाणें वरील तीन वर्णांची सेवा करणें हाच ज्यांचा धर्म आहे व आपलें अत्युत्कृष्ट कल्याण व्हावें अशी ज्यांची इच्छा आहे, जशा शुद्ध शूद्रांनीं देखील यालाच दंडवत घालावे.
असो; या निरनिराळ्या दोहन-समयीं जे जे दोग्धे, जीं जीं दुग्धें व जीं जीं पात्रें होतीं तीं ही सर्व मीं तुला सांगितली. आतां याहून आणखी मीं तुला काय सांगावें? जो कोणी हें पृथूचें चरित्र नित्य आरंभापासून श्रवण करील तो या भूमीवर मुलानातवंडांसह दीर्घकाल आनंदांत राहील.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पृथूपाख्याने षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
अध्याय सहावा समाप्त
GO TOP
|