श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
पञ्चमोऽध्यायः


पृथूपाख्यानम् -

वैशम्पायन उवाच
आसीद्धर्मस्य गोप्ता वै पूर्वमत्रिसमः प्रभुः ।
अत्रिवंशसमुत्पन्नस्त्वङ्गो नाम प्रजापतिः ॥ १ ॥
तस्य पुत्रोऽभवद् वेनो नात्यर्थं धर्मकोविदः ।
जातो मृत्युसुतायां वै सुनीथायां प्रजापतिः ॥ २ ॥
स मातामहदोषेण वेनः कालात्मजात्मजः ।
स्वधर्मं पृष्ठतः कृत्वा कामाल्लोभेष्ववर्तत ॥ ३ ॥
मर्यादां स्थापयामास धर्मोपेतां स पार्थिवः ।
वेदधर्मानतिक्रम्य सोऽधर्मनिरतोऽभवत् ॥ ४ ॥
निःस्वाध्यायवषट्कारास्तस्मिन् राजनि शासति ।
प्रवृत्तं न पपुः सोमं हुतं यज्ञेषु देवताः ॥ ५ ॥
न यष्टव्यं न होतव्यमिति तस्य प्रजापतेः ।
आसीत् प्रतिज्ञा क्रूरेयं विनाशे प्रत्युपस्थिते ॥ ६ ॥
अहमिज्यश्च यष्टा च यज्ञश्चेति कुरूद्वह ।
मयि यज्ञो विधातव्यो मयि होतव्यमित्यपि ॥ ७ ॥
तमतिक्रान्तमर्यादमाददानमसाम्प्रतम् ।
ऊचुर्महर्षयः सर्वे मरीचिप्रमुखास्तदा ॥ ८ ॥
वयं दीक्षां प्रवेक्ष्यामः संवत्सरगणान् बहून् ।
अधर्मं कुरु मा वेन नैष धर्मः सनातनः ॥ ९ ॥
निधनेऽत्र प्रसूतस्त्वं प्रजापतिरसंशयम् ।
प्रजाश्च पालयिष्येऽहमिति ते समयः कृतः ॥ १० ॥
तांस्तदा ब्रुवतः सर्वान् महर्षीनब्रवीत्तदा ।
वेनः प्रहस्य दुर्बुद्धिरिममर्थमनर्थवित् ॥ ११ ॥
वेन उवाच
स्रष्टा धर्मस्य कश्चान्यः श्रोतव्यं कस्य वै मया ।
श्रुतवीर्यतपःसत्यैर्मया वा कः समो भुवि ॥ १२ ॥
प्रभवं सर्वभूतानां धर्माणां च विशेषतः ।
सम्मूढा न विदुर्नूनं भवन्तो मामचेतसः ॥ १३ ॥
इच्छन् दहेयं पृथिवीं प्लावयेयं तथा जलैः ।
खं भुवं चैव रुन्धेयं नात्र कार्या विचारणा ॥ १४ ॥
यदा न शक्यते मोहादवलेपाच्च पार्थिवः ।
अनुनेतुं तदा वेनस्ततः क्रुद्धा महर्षयः ॥ १५ ॥
निगृह्य तं महात्मानो विस्फुरन्तं महाबलम् ।
ततोऽस्य सव्यमूरुं ते ममन्थुर्जातमन्यवः ॥ १६ ॥
तस्मिंस्तु मथ्यमाने वै राज्ञ ऊरौ प्रजज्ञिवान् ।
ह्रस्वोऽतिमात्रः पुरुषः कृष्णश्चातिबभूव ह ॥ १७ ॥
स भीतः प्राञ्जलिर्भूत्वा स्थितवाञ्जनमेजय ।
तमत्रिर्विह्वलं दृष्ट्वा निषीदेत्यब्रवीत्तदा ॥ १८ ॥
निषादवंशकर्तासौ बभूव वदतां वर ।
धीवरानसृजच्चाथ वेनकल्मषसंभवान् ॥ १९ ॥
ये चान्ये विन्ध्यनिलयास्तुषारास्तुम्बरास्तथा ।
अधर्मरुचयो ये च विद्धि तान्वेनसम्भवान् ॥ २० ॥
ततः पुनर्महात्मानः पाणिं वेनस्य दक्षिणम् ।
अरणीमिव संरब्धा ममन्थुस्ते महर्षयः ॥ २१ ॥
पृथुस्तस्मात् समुत्तस्थौ कराज्ज्वलनसंनिभः ।
दीप्यमानः स्ववपुषा साक्षादग्निरिव ज्वलन् ॥ २२ ॥
स धन्वी कवची जातः पृथुरेव महायशाः ।
आद्यमाजगवं नाम धनुर्गृह्य महारवम् ।
शरांश्च दिव्यान् रक्षार्थं कवचं च महाप्रभम् ॥ २३ ॥
तस्मिञ्जातेऽथ भूतानि सम्प्रहृष्टानि सर्वशः ।
समापेतुर्महाराज वेनश्च त्रिदिवं गतः ॥ २४ ॥
समुत्पन्नेन कौरव्य सत्पुत्रेण महात्मना ।
त्रातः स पुरुषव्याघ्र पुन्नाम्नो नरकात्तदा ॥ २५ ॥
तं समुद्राश्च नद्यश्च रत्नान्यादाय सर्वशः ।
तोयानि चाभिषेकार्थं सर्व एवोपतस्थिरे ॥ २६ ॥
पितामहश्च भगवान्देवैराङ्गिरसैः सह ।
स्थावराणि च भूतानि जङ्गमानि तथैव च ॥ २७ ॥
समागम्य तदा वैन्यमभ्यषिञ्चन्नराधिपम् ।
महता राजराज्येन प्रजापालं महाद्युतिम् ॥ २८ ॥
सोऽभिषिक्तो महातेजा विधिवद्धर्मकोविदैः ।
आदिराज्ये तदा राज्ञां पृथुर्वैन्यः प्रतापवान् ॥ २९ ॥
पित्रापरञ्जितास्तस्य प्रजास्तेनानुरञ्जिताः ।
अनुरागात् ततस्तस्य नाम राजेत्यजायत ॥ ३० ॥
आपस्तस्तम्भिरे चास्य समुद्रमभियास्यतः ।
पर्वताश्च ददुर्मार्गं ध्वजभङ्गश्च नाभवत् ॥ ३१ ॥
अकृष्टपच्या पृथिवी सिध्यन्त्यन्नानि चिन्तया ।
सर्वकामदुघा गावः पुटके पुटके मधु ॥ ३२ ॥
एतस्मिन्नेव काले तु यज्ञे पैतामहे शुभे ।
सूतः सूत्यां समुत्पन्नः सौत्येऽहनि महामतिः ॥ ३३ ॥
तस्मिन्नेव महायज्ञे जज्ञे प्राज्ञोऽथ मागधः ।
पृथोः स्तवार्थं तौ तत्र समाहूतौ सुरर्षिभिः ॥ ३४ ॥
तावूचुर्ऋषयः सर्वे स्तूयतामेष पार्थिवः ।
कर्मैस्तदनुरूपं वां पात्रं चायं नराधिपः ॥ ३५ ॥
तावूचतुस्तदा सर्वांस्तानृषीन् सूतमागधौ ।
आवां देवानृषींश्चैव प्रीणयावः स्वकर्मभिः ॥ ३६ ॥
न चास्य विद्वो वै कर्म न तथा लक्षणं यशः ।
स्तोत्रं येनास्य कुर्याव राज्ञस्तेजस्विनो द्विजाः ॥ ३७ ॥
ऋषिभिस्तौ नियुक्तौ च भविष्यैः स्तूयतामिति ।
यानि कर्माणि कृतवान् पृथुः पश्चान्महाबलः ॥ ३८ ॥
सत्यवाग् दानशीलोऽयं सत्यसन्धो नरेश्वरः ।
श्रीमाञ्जैत्रः क्षमाशीलो विक्रान्तो दुष्टशासनः ॥ ३९ ॥
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च दयावान्प्रियभाषणः ।
मान्यो मानयिता यज्वा ब्रह्मण्यः सत्यसंगरः ॥ ४० ॥
शमः शान्तश्च निरतो व्यवहारस्थितो नृपः ।
ततः प्रभृति लोकेषु स्तवेषु जनमेजय ।
आशीर्वादाः प्रयुज्यन्ते सूतमागधबन्दिभिः ॥ ४१ ॥
तयोः स्तवैस्तैः सुप्रीतः पृथुः प्रादात्प्रजेश्वरः ।
अनूपदेशं सूताय मगधान्मागधाय च ॥ ४२ ॥
तं दृष्ट्वा परमप्रीताः प्रजाः प्राहुर्महर्षयः ।
वृत्तीनामेष वो दाता भविष्यति जनेश्वरः ॥ ४३ ॥
ततो वैन्यं महाराज प्रजाः समभिदुद्रुवुः ।
त्वं नो वृत्तिं विधत्स्वेति महर्षिवचनात् तदा ॥ ४४ ॥
सोऽभिद्रुतः प्रजाभिस्तु प्रजाहितचिकीर्षया ।
धनुर्गृह्य पृषत्कांश्च पृथिवीमाद्रवद् बली ॥ ४५ ॥
ततो वैन्यभयत्रस्ता गौर्भूत्वा प्राद्रवन्मही ।
तां पृथुर्धनुरादाय द्रवन्तीमन्वधावत ॥ ४६ ॥
सा लोकान् ब्रह्मलोकादीन् गत्वा वैन्यभयात् तदा ।
प्रददर्शाग्रतो वैन्यं प्रगृहीतशरासनम् ॥ ४७ ॥
ज्वलद्भिर्निशितैर्बाणैर्दीप्ततेजसमच्युतम् ।
महायोगं महात्मानं दुर्धर्षममरैरपि ॥ ४८ ॥
अलभन्ती तु सा त्राणं वैन्यमेवान्वपद्यत ।
कृताञ्जलिपुटा भूत्वा पूज्या लोकैस्त्रिभिः सदा ॥ ४९ ॥
उवाच वैन्यं नाधर्म्यं स्त्रीवधं कर्तुमर्हसि ।
कथं धारयिता चासि प्रजा राजन् विना मया ॥ ५० ॥
मयि लोकाः स्थिता राजन् मयेदं धार्यते जगत् ।
मद्विनाशे विनश्येयुः प्रजाः पार्थिव विद्धि तत् ॥ ५१ ॥
न त्वमर्हसि मां हन्तुं श्रेयश्चेत् त्वं चिकीर्षसि ।
प्रजानां पृथिवीपाल शृणु चेदं वचो मम ॥ ५२ ॥
उपायतः समारब्धाः सर्वे सिध्यन्त्युपक्रमाः ।
उपायं पश्य येन त्वं धारयेथाः प्रजा नृप ॥ ५३ ॥
हत्वापि मां न शक्तस्त्वं प्रजा धारयितुं नृप ।
अनुभूता भविष्यामि यच्छ कोपं महाद्युते ॥ ५४ ॥
अवध्याश्च स्त्रियः प्राहुस्तिर्यग्योनिगतेष्वपि ।
सत्त्वेषु पृथिवीपाल न धर्मं त्यक्तुमर्हसि ॥ ५५ ॥
एवं बहुविधं वाक्यं श्रुत्वा राजा महामनाः ।
कोपं निगृह्य धर्मात्मा वसुधामिदमब्रवीत् ॥ ५६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पृथूपाख्याने पञ्चमोऽध्यायः


वेन राजा -

वैशंपायन सांगतात- पूर्वकाळीं अत्रि वंशांत उत्पन्न झालेला व अत्रीप्रमाणेंच पराक्रमी अंग नांवाचा प्रजापति धर्मपालक होता; याच्या पोटीं वेन नांवाचा एक पुत्र झाला. परंतु हा अत्यंत धर्मभ्रष्ट होता. याची आई सुनीथा नांवाची यमाची मुलगी होती व हा आपल्या आईच्या बापाच्या वळणावर गेल्यामुळें अर्थातच फार दुष्ट निपजला. धर्म वगैरे सर्व गुंडाळून ठेवून लोकांत मनसोक्त वागूं लागला. वेदधर्माची मर्यादा उल्लंघून अक्षयी अधर्मामध्यें स्वतः रत होऊन लोकांनाही धर्म बाह्य वर्तनाचा त्यानें सक्तीनें कित्ता घालून दिला. अर्थातच त्याच्या राजवटींत कोठें वेदाध्ययन ऐकूं येईना, कोठे वषट्‌कार कानीं पडेना, देवतांना यज्ञांत हविर्भाग किंवा सोमपान मिळेना. कारण त्याचे पुढे घडे भरावयाचे होते म्हणूनच कीं काय त्यानें आपल्या प्रजाजनांत असा कडक हुकूम फिरविला होता कीं, मला सोडून अन्य कोणाही देवतेचे उद्देशानें यज्ञ किंवा हवन करतां कामा नये; केल्यास कर्त्याला तीव्र शासन प्राप्त होईल. यज्ञस्वरूप मीच आहें; यष्टा मीच आहें; ईज्य मीच आहें. याकरितां कोणालाही यज्ञ करणें असेल तर मलाच देव मानून करावा; हवन करणें असेल तरी माझेच उद्देशानें करावें. याप्रमाणें लोकांना सांगून व आपला ज्यांवर हक्क नाहीं असले यज्ञांतील हविर्भाग मागून त्यानें जेव्हां केवळ अमर्याद अंदाधुंदी मांडिली तेव्हां मरीचिप्रभृति महर्षि म्हणाले "हे राजा, आम्हीं आतां बहुत वर्षेपर्यंत यज्ञदीक्षा घेऊन व्रतस्थ राहाणार आहोंत; करितां तुला प्रार्थना एवढीच कीं, तूं असा धर्मलंडपणा करूं नको. आपली मागून चालत आलेली रीत ही नव्हे. तू प्रजापति या संज्ञेनें या कुलांत उत्पन्न झालेला असून त्या संज्ञेला अनुरूप असें मी प्रजांचे पालन करीन, असा तूं करारही केलेला आहेस."

याप्रमाणें ते सर्व महर्षि बोलत असतां तो दुष्टबुद्धि व विपरीतार्थ करणारा वेन त्यांचा उपहास करून म्हणाला, 'ऋषीहो, तुम्ही म्हणतां कीं, धर्ममर्यादा अशी नाहीं, तशी नाहीं, तर मजविरहित धर्माचा उत्पत्तिकर्ता तरी कोण आहे व मीं ऐकावे तरी कोणाचें ? या भूतलावर मजसारखा कोण आहे ? अहो ! माझी विद्वत्ता, माझें वीर्य, माझे तप व माझी सत्यप्रीति, यांना भूलोकीं कोठें तुलना आहे काय ? मूर्खहो, तुमच्या अकला गेल्या कोठे ? मी सर्व प्राणिमात्रांचा व विशेषेंकरून सर्व धर्मांचा उगम आहें, हें तुम्हांला कसें कळत नाहीं ? माझी लहर लागेल तर ही पृथ्वी मी जाळून खाक करीन; मर्जीस आल्यास मी हिला पाण्यांत बुडवून टाकीन किंवा खुषी वाटल्यास आकाश व पृथ्वी ही दोन्ही चोंदून टाकीन. यांत काडीचा संशय बाळगू नका.'

याप्रमाणें प्रार्थना केली असतांही मोहामुळें व गर्वामुळें उन्मत्त झालेला वेन जेव्हां वाटेवर येईना, तेव्हा त्या महर्षींच्या पायांची आग मस्तकाला गेली व दर्पानें फूं फूं करीत असलेल्या त्या महाबलाढय वेनाला त्यांनीं जागच्या जागीं दडपून धरिला. रागाच्या झपाटयांत त्याच्या उजव्या मांडीचें घुसळण चालविलें. तें घुसळण चाललें असतां एक अतिशय खुजा व काळाकुटट पुरुष त्या मांडींतून निघून कांपत कांपत ऋषींपुढें हात जोडून उभा राहिला. त्याची ती विव्हल स्थिति पाह्न निषीद( खालीं बस) असें अत्रिऋषीनें त्याला सांगितलें. या शब्दावरून त्याला निषाद असें नांव पडले; व तो पुढें निषादांच्या (फासेपारध्यांच्या) कुलाचा मुख्य झाला. यानंतर वेनाच्या कल्मषापासून (काळ्याकुटट पापापासून) धीवर म्हणजे मच्छिमार कोळी उत्पन्न झाले. याशिवाय विंध्याद्रीवर राहाणारे भिल्ल, तुषार, तुंबर, वगैरे जाती व जे कोणी अधर्मप्रिय लोक ते वेनापासूनच झालेले असें समजावें. एवढें झाले तरी ऋषींचा कोप शांत होईना व मग त्यांनीं मांडी सोडून देऊन त्वेषानें वेनाच्या उजव्या हाताचें अरणीप्रमाणें घुसळण मांडिलें. तेव्हां त्या हातापासून अग्नीप्रमाणें दैदीप्यमान नव्हे, साक्षात् अग्नीच असा पृथू नांवाचा पुरुष निर्माण झाला. पृथू जो उत्पन्न झाला तोच मोठा तेजस्वी व यशस्वी असून तो आजगव नांवाचें अतिश्रेष्ठ धनुष्य, दिव्यबाण व शरीररक्षणार्थ अंगांत खेळलेलें दैदीप्यमान कवच, अशा सिद्धसामग्रीसहच उत्पन्न झाला. तो जन्मास येतांच सर्वत्र भूतमात्रांना आनंदीआनंद झाला; व त्याचा पिता वेन हा तत्काल स्वर्गास गेला. हे जनमेजया, असला दुष्ट वेन स्वर्गास कसा गेला म्हणशील तर त्याच्या पोटीं पृथूसारखा सत्पुत्र निपजल्यामुळें. कारण पुत्र या शब्दाचा अर्थ पुम् नामक नरकापासून त्रायते म्हणजे पितरांना जो राखतो तो, असा आहे; व पृथु या अर्थाला अनुरूप असा सत्पुत्र असल्यामुळें त्याच्या बळानें त्याचा पातकीही पिता स्वर्गाला गेला. असो; पृथु जन्मतांच त्याला राज्याभिषेक करण्यासाठीं चारी दिशांकडून नद्या व समुद्र आपणांजवळील रत्‍नांचा उपहार घेऊन अंगीं येऊन उभे राहिले. त्याचप्रमाणें अंगिरस-कुलोत्पन्न सर्व ऋषि व देव, तसेच स्थावर- जंगम प्राणी यांसह ब्रह्मदेवांनीं स्वत: येऊन त्या महातेजस्वी पृथूला सर्व राजांचाही राजा म्हणून प्रजापालनाचे कामीं मूर्धाभिषेक केला. याप्रमाणें मोठमोठाल्या धर्मज्ञांनी त्या वेनपुत्र पृथुची आदिराज्यावर स्थापना केली. तेव्हांपासून बापाचे कृतीनें प्रजाजन जे असंतुष्ट झाले होते ते या प्रतापी राजानें आपले अनुकूल वर्तनानें रंगवून म्हणजे खूष करून सोडले; व या त्याच्या प्रजारंजनानें लोक म्हणू लागले कीं याला राजा ही संज्ञा सर्वथा अन्वर्थक आहे. सर्व भूतें त्याच्याशीं इतक्या प्रेमानें व अनुकूलतेनें वागत कीं, तो समुद्रावरून प्रवास करूं निघाला असतां त्याला त्रास न पडावा म्हणून समुद्र आपसुख बर्फासारखा घटट होऊन त्याला मार्ग देई. त्याचप्रमाणें पर्वतही दुभंग होऊन मधून वाट देत; ध्वजा उभारलेला त्याचा रथ राना वनांतून जाऊं लागला असतां मार्गांत आलेलीं वृक्षवल्ली आपोआप वाटेवेगळीं होत. परंतु त्याच्या ध्वजेचा कधींही भंग होऊं देत नसत. नांगरल्यावांचूनच भूमी पिके. नुसत्या संकल्पानें वाटेल त्या तर्‍हेचीं अन्नें सिद्ध होऊन पुढें येत. सर्वच गाई कामधेनूच्या किंमतीच्या झाल्या. वृक्षांवरील सर्व फुलांच्या पांकळ्या मधानें थबथबत होत्या. याप्रकारें भूतमात्र स्वानंदानें पृथूचे साहाय्य करीत असतां ब्रह्मदेवांनीं सोमयज्ञ आरंभिला. त्या यज्ञांत सूतीच्या दिवशीं म्हणजे ज्या दिवशीं सोमवल्ली कुटून तिचा अंगरस काढावयाचा असतो, त्या दिवशीं सूत नांवाचा पुरुष उत्पन्न झाला; व त्याच यज्ञांत पुढें मागध नांवाचा दुसरा एक मोठा ज्ञाता पुरुष उत्पन्न झाला. त्या वेळीं देव आणि ऋषि यांनीं त्या दोघां पुरुषांना बोलावून सांगितलें कीं, बुद्धिमंतांनो, तुम्ही दुसरे कांहीं करूं नका; केवळ या पृथुराजाची स्तुति करीत रहा, व त्याच्या पुण्यकर्माचें वर्णन गा. आम्ही तुम्हांला या राजाची स्तुति गावयास सांगतों. त्या स्तुतीस हा राजा सर्वथा पात्र आहे. हें ऐकून सूत-मागध ऋषींना म्हणाले कीं, आम्ही देव आणि ऋषि यांना स्तुतीने खूष करण्यास तयार आहों. परंतु या राजाचें स्तवन कसें करावें, तें आम्हांला समजत नाही. कारण याचें लक्षण काय व यानें काय काय गोष्टी केल्या आहेत, कोणती कीर्ति मिळविली आहे, हे आम्हांला कांहींच समजत नाहीं. हे ऐकून ऋषि त्यांस म्हणाले कीं, तुमचें म्हणणें खरें आहे; तर याला अशी युक्ति करा कीं, या पृथूनें मागल्या कल्पांत जी कृत्यें केलीं होतीं तींच याही जन्मांत तो करील, असें गृहीत धरूनच तुम्हीं त्याची स्तुति करावी, असें आमचें तुम्हांस सांगणें आहे. मागील कल्पीं हा कसा होता, यानें काय केलें, त्याची माहिती आम्ही तुम्हांला देतों, ती ऐका. हा पृथू पूर्व कल्पीं मोठा बलाढ्य, सत्यवक्ता, दानशील, सत्यप्रतिज्ञ, श्रीमान्, विजयी, क्षमाशील, पराक्रमी, दुष्टांना शासन करणारा, धर्मवेत्ता, दयाशील, प्रिय भाषण करणारा, लोकमान्य, इतरांचा सत्कार करणारा, यज्ञयाग करणारा, बाह्मणप्रिय, सत्यनिष्ठ, शमी, शांत, व्यवहारदक्ष व जीव लावून आपलें कर्तव्य करणारा, असा होता.

याप्रमाणें ऋषींनी आज्ञा केल्यावरून त्या सूतमागधांनीं त्या पृथुराजाचें यथास्थित स्तोत्र केलें व त्या वेळेपासून कोणत्याही राजानें कांहीं स्तुत्य कृत्य केलें असतां सूत, मागध, बंदी, म्हणजे भाट लोक येऊन राजाचे गुण गातात व आशीर्वाद देऊन जयजयकार करितात. असो; त्या स्तुतिकुशल सूतमागधांची ती स्तुति ऐकून पृथुराजा अतिशयच खूष झाला; व त्यानें त्यांचे कामगिरीबद्दल सूताला अनूप नांवाचा देश, मगधाला मागध नांवाचा देश इनाम दिला. हें त्याचें कृत्य पाहून प्रजाजनही फार संतुष्ट झाले; व महर्षीही म्हणाले कीं, हा पृथु प्रजेला कायमचीं इनाम, वेतनें देऊन सुख देणारा होईल. ऋषींचा हा आशीर्वाद कानीं पडतांच अनेक प्रजाजन गोळा होऊन पृथूकडे आले व महर्षींच्या वचनाचा उल्लेख करून म्हणाले कीं, हे राजा, तूं आम्हांला पोटापाण्याची कायमची सोय लावण्यासाठीं कांहीं तरी इनाम, वतनें करून दे. याप्रमाणें सर्व प्रजाजनांनीं गराडा देऊन त्याला आग्रहाची विनंती केली, तेव्हां प्रजेचें चिरकल्याण करावयाचा हेतु मनांत धरून तो बलाढय पृथुराजा धनुष्यबाण घेऊन पृथ्वीच्या मागें लागला. त्याच्या पाठलागामुळें भूमी भयभीत झाली व निरुपाय झाला तेव्हां गाईचें रूप घेऊन सर्व धरणीभर सैरावैरा धांवत सुटली. पृथूही धनुष्य घेऊन तसाच तिचा पाठपुरावा घेत राहिला. अखेर त्याच्या भयानें ती ब्रह्मलोकीं गेली. पण पाहाते तों देवांनींही अजिंक्य असा मोठा बलाढय व मोठा करारी पूथुराजा, अति तीव्र व अग्नीप्रमाणें जाज्वल्य असें बाण लावलेलें धनुष्य घेऊन तेथेंही तिच्या पुढें उभाच. त्याचें तें तेज व त्याचा तो अढळ निश्चय हे पाहून पृथ्वीला असें वाटलें कीं, आतां याच्या तावडींतून आपणास अन्य कोणी सोडविणारा नाहीं. तेव्हां ती पृथ्वी स्वत: जरी त्रैलोक्याला पूज्य होती तरी आपला मोठेपणा बाजूस ठेवून हात जोडून पृथूलाच शरण येऊन म्हणाली कीं, हे राजा, तूं मला मारणार, पण स्त्रीवध हा धर्माला संमत नाहीं व तूं आपणास धर्मज्ञ म्हणवितोस त्या अर्थीं तुला हे करणें उचित नाहीं. दुसरें, मला नाहींशी करून तूं प्रजा- पालन कसें करणार ? कारण मजवरच लोक रहातात व मीच या जगताचें धारणपोषण करितें. तेव्हां माझा नाश केल्यास ज्यांचा कैवार घेऊन तूं उठला आहेस त्या प्रजांचाही सत्यानाश होईल हा उघडा हिशेब तुला कसा कळत नाहीं ? याकरितां तुला जर प्रजेच्या कल्याणाची इच्छा असेल तर माझा प्राण घेऊं नको. तूं आपल्याला प्रजेचा पालनवाला म्हणवितोस म्हणून तुला ही खरी गोष्ट समजून सांगितली, ती ऐक. बाबारे, अंगीं बळ असलें तरी सुमार न पाहता अचरटपणा केल्यानें यश येत नसतें. कोणतेही गोष्टींत सिद्धि येणें तर सोईच्या रीतीनें व विचार पाहून आरंभ करावा लागतो. तेव्हां तूं जर प्रजारक्षणार्थ हा यत्‍न चालविला आहेस तर तें कशानें साधेल हें प्रथम मनाशीं पहा. मला ठार करून तर प्रजारक्षण होणें शक्यच नाहीं. हें जर खरें तर तुझाही हेतू सिद्ध होत नाहीं आणि माझाही नाश होतो असें करण्यांत मतलब कोणता ? यापेक्षां तूं आपला क्रोध आंवरून धर आणि मी तुला अनुकूल होतें. बाबारे, मी गाय म्हणजे पशु असें तूं कदाचित् मानीत असलास तरी शास्त्रांत जो स्त्रीवधाचा निषेध सांगितला आहे तो केवळ मानवी स्त्रियांपुरता नसून पशुपक्ष्यादि नीच योनींच्या स्त्रियांपर्यंतही त्याची व्याप्ति आहे; शिवाय तूं आपणाला पृथ्वीपाल म्हणवितोस त्याअर्थी तूं धर्मोल्लंघन करूं नयेस अशी माझी विनंति आहे.

याप्रमाणें अनेक प्रकारें गोरूप पृथ्वीनें केलेला बोध ऐकून तो थोर मनाचा व धर्मनिष्ठ राजा आपला क्रोध आंवरून पृथ्वीला जें काय म्हणाला, तें पुढील अध्यायीं आहे.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पृथूपाख्याने पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
अध्याय पाचवा समाप्त

GO TOP