श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकविंशोऽध्यायः


पितृकल्पः

मार्कण्डेय उवाच
श्राद्धे प्रतिष्ठितो लोकः श्राद्धे योगः प्रवर्तते ।
हन्त ते वर्तयिष्यामि श्राद्धस्य फलमुत्तमम् ॥ १ ॥
ब्रह्मदत्तेन यत्प्राप्तं सप्तजातिषु भारत ।
तत एव हि धर्मस्य बुद्धिर्निर्वर्तते शनैः ॥ २ ॥
पीडयाप्यथ धर्मस्य कृते श्राद्धे पुरानघ ।
यत् प्राप्तं ब्राह्मणैः पूर्वं तन्निबोध महामते ॥ ३ ॥
ततोऽहं तात धर्मिष्ठान् कुरुक्षेत्रे पितृव्रतान् ।
सनत्कुमारनिर्दिष्टानपश्यं सप्त वै द्विजान् ॥ ४ ॥
दिव्येन चक्षुषा तेन यानुवाच पुरा विभुः ।
वाग्दुष्टः क्रोधनो हिंस्रः पिशुनः कविरेव च ।
खसृमः पितृवर्ती च नामभिः कर्मभिस्तथा ॥ ५ ॥
कौशिकस्य सुतास्तात शिष्या गार्ग्यस्य भारत ।
पितर्युपरते सर्वे व्रतवन्तस्तदाभवन् ॥ ६ ॥
विनियोगाद् गुरोस्तस्य गां दोग्ध्रीं समकालयन् ।
समानवत्सां कपिलां सर्वे न्यायागतां तदा ॥ ७ ॥
तेषां पथि क्षुधार्तानां बाल्यान्मोहाच्च भारत ।
क्रूरा बुद्धिः समभवत् तां गां वै हिंसितुं तदा ॥ ८ ॥
तान् कविः खसृमश्चैव याचेते नेति वै तदा ।
न चाशक्यन्त ते ताभ्यां तदा वारयितुं द्विजाः ॥ ९ ॥
पितृवर्ती तु यस्तेषां नित्यं श्राद्धाह्निको द्विजः ।
स सर्वानब्रवीद् भ्रातॄन् कोपाद्धर्मे समाहितः ॥ १० ॥
यद्यवश्यं प्रहन्तव्या पितॄनुद्दिश्य साध्विमां ।
प्रकुर्वीमहि गां संयक् सर्व एव समाहितः ॥ ११ ॥
एवमेषापि गौर्धर्मं प्राप्स्यते नात्र संशयः ।
पितॄनभ्यर्च्य धर्मेण नाधर्मोऽस्मान् भविष्यति ॥ १२ ॥
तथेत्युक्त्वा च ते सर्वे प्रोक्षयित्वा च गां ततः ।
पितृभ्यः कल्पयित्वैनामुपायुञ्जन्त भारत ॥ १३ ॥
उपयुज्य च गां सर्वे गुरोस्तस्य न्यवेदयन् ।
शार्दूलेन हता धेनुर्वत्सोऽयं गृह्यतामिति ॥ १४ ॥
आर्जवात्स तु तं वत्सं प्रतिजग्राह वै द्विजः ।
मिथ्योपचर्य ते तं तु गुरुमन्यायतो द्विजाः ।
कालेन समयुज्यन्त सर्व एवायुषः क्षये ॥ १५ ॥
ते वै क्रूरतया हिंस्रा अनार्यत्वाद् गुरौ तथा ।
उग्रा हिंसाविहाराश्च सप्ताजायन्त सोदराः ॥ १६ ॥
लुब्धकस्यात्मजास्तात बलवन्तो मनस्विनः ।
पितॄनभ्यर्च्य धर्मेण प्रोक्षयित्वा च गां तदा ॥ १७ ॥
स्मृतिः प्रत्यवमर्शश्च तेषां जात्यन्तरेऽभवत् ।
जाता व्याधा दशार्णेषु सप्त धर्मविचक्षणाः ॥ १८ ॥
स्वकर्मनिरताः सर्वे लोभानृतविवर्जिताः ।
तावन्मात्रं प्रकुर्वन्ति यावता प्राणधारणम् ॥ १९ ॥
शेषं ध्यानपराः कालामनुध्यायन्ति कर्म तत् ।
नामधेयानि चाप्येषामिमान्यासन्नराधिप ॥ २० ॥
निर्वैरो निर्वृतिः शान्तो निर्मन्युः कृतिरेव च ।
वैधसो मातृवर्ती च व्याधाः परमधार्मिकाः ॥ २१ ॥
तैरेवमुषितैस्तात हिंसाधर्मरतैः सदा ।
माता च पूजिता वृद्धा पिता च परितोषितः ॥। २२ ॥
यदा माता पिता चैव संयुक्तौ कालधर्मणा ।
तदा धनूंषि ते त्यक्त्वा वने प्राणानवासृजन् ॥ २३ ॥
शुभेन कर्मणा तेन जाता जातिस्मरा मृगाः ।
त्रासानुत्पाद्य संविग्ना रम्ये कालञ्जरे गिरौ ॥ २४ ॥
उन्मुखो नित्यवित्रस्तः स्तब्धकर्णो विलोचनः ।
पण्डितो घस्मरो नादी नामतस्तेऽभवन् मृगाः ॥ २५ ॥
तमेवार्थमनुध्यायन्तो जातिस्मरणसंभवम् ।
आसन्वनचराः क्षान्ता निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥ २६ ॥
ते सर्वे शुभकर्माणः सधर्माणो वनेचराः ।
योगधर्ममनुप्राप्ता विहरन्ति स्म तत्र ह ॥ २७ ॥
जहुः प्राणान्मरुं साध्य लघ्वाहारास्तपस्विनः ।
तेषां मरुं साधयतां पदस्थानानि भारत ।
तथैवाद्यापि दृश्यन्ते गिरौ कालञ्जरे नृप ॥ २८ ॥
कर्मणा तेन ते तात शुभेनाशुभवर्जिताः ।
शुभाच्छुभतरां योनिं चक्रवाकत्वमागताः ॥ २९ ॥
शुभे देशे शरद्वीपे सप्तैवासञ्जलौकसः ।
त्यक्त्वा सहचरीधर्मं मुनयो ब्रह्मचारिणः ॥ ३० ॥
निःस्पृहो निर्ममः क्षान्तो निर्द्वन्द्वो निष्परिग्रहः ।
निर्वृत्तिर्निभृतश्चैव शकुना नामतः स्मृताः ॥ ३१ ॥
ते तत्र पक्षिणः सर्वे शकुना धर्मचारिणः ।
निराहारा जहुः प्राणांस्तपोयुक्ताः सरित्तटे ॥ ३२ ॥
अथ ते सोदरा जाता हंसा मानसचारिणः ।
जातिस्मराः सुसंयुक्ताः सप्तैव ब्रह्मचारिणः ॥ ३३ ॥
विप्रयोनौ यतो मोहान्मिथ्योपचरितो गुरुः ।
तिर्यग्योनौ ततो जाताः संसारे परिबभ्रमुः ॥ ३४ ॥
यतश्च पितृवाक्यार्थः कृतः स्वार्थे व्यवस्थितैः ।
ततो ज्ञानं च जातिं च ते हि प्रापुर्गुणोत्तराम् ॥ ३५ ॥
सुमनाः शुचिवाक्छुद्धः पञ्चमश्छिद्रदर्शनः ।
सुनेत्रश्च स्वतन्त्रश्च शकुना नामतः स्मृताः ॥ ३६ ॥
पञ्चमः पाञ्चिकस्तत्र सप्तजातिष्वजायत ।
षष्ठस्तु कण्डरीकोऽभूद् ब्रह्मदत्तस्तु सप्तमः ॥ ३७ ॥
तेषां तु तपसा तेन सप्तजातिकृतेन वै ।
योगस्य चापि निर्वृत्त्या प्रतिभानाच्च शोभनात् ॥ ३८ ॥
पूर्वजातिषु यद् ब्रह्म श्रुतं गुरुकुलेषु वै ।
तथैवावस्थिता बुद्धिः संसारेष्वपि वर्तताम् ॥ ३९ ॥
ते ब्रह्मचारिणः सर्वे विहङ्गा ब्रह्मवादिनः ।
योगधर्ममनुध्यान्तो विहरन्ति स्म तत्र ह ॥ ४० ॥
तेषां तत्र विहङ्गानां चरतां सहचारिणाम् ।
नीपानामीश्वरो राजा विभ्राजः पौरवान्वयः ॥ ४१ ॥
विभ्राजमानो वपुषा प्रभावेन समन्वितः ।
श्रीमानन्तःपुरवृतो वनं तत्प्रविवेश ह ॥ ४२ ॥
स्वतन्त्रश्च विहङ्गोऽसौ स्पृहयामास तं नृपम् ।
दृष्ट्वाऽऽयान्तं श्रियोपेतं भवेयमहमीदृशः ॥ ४३ ॥
यद्यस्ति सुकृतं किञ्चित्तपो वा नियमोऽपि वा ।
खिन्नोऽस्मि ह्युपवासेन तपसा निष्फलेन च ॥ ४४ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
पितृकल्पे एकविंशोऽध्यायः


श्राद्धमाहात्म्य -

मार्कंडेय म्हणतात - "हे भीष्मा, श्राद्धाचे माहात्म्य तुला किती म्हणून सांगू ? अरे, इहलोकी विद्या, धन, कुल, सत्पुत्र, पशु, आदिकरून जी सुखस्थितीची साधने आहेत तीं तर श्राद्ध केल्याने प्राप्त होतातच. पण, त्याहूनही अधिक जो श्रेष्ठ जो मोक्ष किंवा ब्रह्मैक्य तेही या श्राद्धविधीने प्राप्त होतें असें या श्राद्धाचें अनुपम फल आहे व तें ब्रह्मदत्ताला सात जन्मांत मिळत गेलें. त्या योगानेच त्याची बुद्धि दुर्मार्गापासून हळूहळू आपोआप परावृत्त होऊन सन्मार्गाकडे लागली व इतरांचीही लागते. याकरितां मी तुला श्राद्धाचा विधि सर्व सांगतो. हे निष्पापा, पूर्वकाली कांहीं ब्राह्मणांनी इतर धर्मविधींना धाब्यावर बसवून गोहत्यादि करून केवळ श्राद्ध मात्र केलें होतें, पण तेवढयानेच त्यांना अत्युत्तम फळ प्राप्त झाले. ते कसें, तें सर्व तुला सांगतो ऐक."

मागें भगवान् सनत्कुमार मला दिव्य दृष्टि देऊन अंतर्धान पावले, हें मीं सांगितलेंच आहे. ते गेल्यावर या दृष्टीच्या बलानें मीं सनत्कुमारांनी पूर्वी निर्दिष्ट केलेले सात ब्राह्मण कुरूक्षेत्रांत धर्मश्रद्धेनें पितृश्राद्ध करीत आहेत, असें प्रत्यक्ष पाहिले. या सातांची नांवे - वाग्दुष्ट, क्रोधन, हिंस्त्र, पिशुन, कवि, खसृम व पितृवर्ति, अशीं होतीं. व या नामांनुरूपच त्यांची कृति होती. हे सर्व कौशिक विश्‍वामित्राचे पुत्र होते, व गार्ग्यमुनीचे शिष्य होते. त्यांचा पिता विश्वामित्र त्यांना शाप देऊन वेगळा सरला, तेव्हां ते सातही बंधु गार्ग्याच्या घरीं जाऊन शिष्यवृत्ति पत्करून ब्रह्मचर्यव्रतानें राहिले.

तेथें असतां त्यांच्या गुरूची न्यायाने संपादिलेली अशी एक सुंदर दुभती एकरंगी गाय होती; तिला गुरूच्या आज्ञेवरून एक दिवस ते वनांत घेऊन चालले होते. या गाईचे वांसरूंही तिचेसारखेच एकवर्णी होतें. या धेनुवत्सांना घेऊन जात असतां वाटेत त्यांना अतिशय भूक लागली व पोरवय आणि अज्ञान यांमुळें या गाईवरच आपली भूक भागवावी, अशी दुष्टबुद्धि त्यांचे मनांत उपजली. त्यावेळीं कवी व रवसृम या दोघांनी 'असें करूं नका' म्हणून आपल्या बंधूंशी याचना केली. परंतु, ते निवृत्त होतना. त्या वेळीं त्यांतील पितृवर्ति म्हणून जो भाऊ होता, तो नित्य श्राद्ध करणारा होता. तो धर्माचे ठिकाणी स्थिरबुद्धि असल्यानें रागाने आपल्या बंधूस म्हणाला, 'बाबांनो, या सुंदर गाईला अवश्य मारावयाचीच असें ठरत असेल तर त्यांत माझी एक गोष्ट तरी लक्षपूर्वक ऐका. ती ही कीं, गाय मारणेंच तर ती पितृश्राद्धार्थ म्हणून मारावी. असें केलें असतां या गाईचाही धर्मकार्यांत विनियोग होऊन तिला सद्‍गति मिळेल व आपणही पित्रार्चन केल्यानें अधर्म केल्यासारखे होणार नाहीं.' ही त्याची मसलत सर्वांना पटली. मग त्यांनी गाईचे प्रोक्षन (वध) करून व ती पितरांना अर्पण करून मग तिजवर यथास्थित ताव मारिला. नंतर, तळिराम गार करून गुरुगृही परतले व तिचें तें वांसरूं पुढें करून गुरूला म्हणाले, "गाय वाघाने खाल्ली; वांसरूं तेवढे राहिलें आहे, हे संभाळा." गुरु बिचारा निष्कपट होता. त्याला ती गोष्ट खरी वाटली व त्याने "बरें आहे," म्हणून तो वत्स आपले ताब्यांत घेतला.

याप्रमाणें त्या सर्व ब्राह्मणांनीं आपल्या गुरूला खोटीच गोष्ट सांगून ठकविलें. पुढें ते सर्वहीजण आयुष्य संपतांच मेले. मेल्यानंतर पुढील जन्मी ते सातहीजण पूर्वजन्मींच्या क्रूर कर्मामुळे हिंस्त्र, आपल्या गुरूशीं नीचपणा केल्यामुळें उग्र व हिंसादिकर्मांत आनंद मानणारे असे होऊन पारध्याचे पोटीं जन्मास आले. ते मोठे बळकट व दिलदार होते. पूर्वजन्मीं त्यांनी पितरांचे धर्मबुद्धीनें अर्चन केलें व गोवधही पितरांचेच उद्देशानें केला होता. यामुळे त्यांस चालू जन्मांत पूर्वजन्मींची स्मृति राहिली होती. यामुळे ते जरी दशार्ण देशांत या जन्मीं व्याधासारख्या क्रूर कुलांत उत्पन्न झाले होते तरी ते मोठे धर्मनिपुण असून निर्लोभ व सत्यप्रिय होते. ज्या कुळांत आले तेथील कर्म ते करीत खरें, पण ते केवळ प्राणरक्षणापुरतेंच तेवढे केलें म्हणजे बाकीचा काल ते आत्मानुसंधानांत घालवीत असत. या जन्मीं त्यांची नांवे पुढीलप्रमाणे होतीं. ती - निर्वैर, निर्वृत्ति, शांत, निर्मन्यु, कृति, वैधस व मातृवर्ती. त्यांची कर्मे या संज्ञांनुरूपच होतीं, एकंदरींत ते व्याध होऊन परमधार्मिक होते.

जातीचे हिंसाकर्म ते करीत खरें, पण बाकीचा वेळ आपल्या वृद्ध मातापितरांचे पूजनांत व संतोषांत घालवीत. पुढें त्याची मातापितरें यथाकाल मरण पावली, त्या वेळीं त्यांनी आपल्या हातांतली शिकारीची धनुष्यें टाकून देऊन वनांतच देहत्याग केला.

पुढील जन्मी ते रम्य कालंजर पर्वतावर मृगयोनीत उत्पन्न झाले. मृगयोनींत उत्पन्न होण्याचें कारण ते व्याधयोनींत असतांना श्वापदांच्या अंतःकरणांत भय उत्पन्न करणारे कर्म करीत असल्यानें जेथे चित्तांत सदा धसधस राहील असला हळू वृत्तीचा जन्म त्यांस प्राप्त झाला. परंतु, त्यांनीं पितृपूजनादि शुभकर्में केली असल्यामुळें याही जन्मीं त्यांना पूर्वजन्माचे स्मरण होतें. या जन्मी त्या मृगांची नांवे - उन्मुख, नित्यवित्रस्तु, स्तब्धकर्ण, विलोचन, पण्डित, घस्मर व नादी, अशीं होतीं. ते जरी पशूच्या जन्मास आले होते, तथापि आपण पूर्वी कोण होतो व या नीच योनीला कां आलों, ही गोष्ट सतत त्यांच्या डोळ्यांसमोर असल्यानें ते या जन्मांत क्षमाशील, निर्वैर व निस्त्रीक होते. त्या सर्वांची राहाणी एक तर्‍हेचीच होती. ते कधीं गैरकर्म करीत नसत व केवळ योग्यांप्रमाणें अंतर्निष्ठ राहून वनांत विहार करीत. ते फक्त पोटाला अल्पसें भक्ष्य देत व पाणी मुळीच पीत नसत. या प्रकारची त्यांनीं कडक तपश्चर्या चालविली. या स्थितींत असतांना त्यांची जी पावले भुईवर उमटली, तीं, हे राजा, कालंजर गिरीवर अद्यापि तशीच्या तशींच दृष्टीस पडतात.

याप्रमाणे शुभ कर्म करीत असल्यामुळें व अशुभ कर्माचा सर्वथा त्याग केल्यानें त्यांना अधिक शुभ योनीची योग्यता प्राप्त झाली व पुढील जन्मीं ते शरद्वीप नामक शुभ देशांत सातहीजण जलांत राहाणारे चक्रवाक पक्षी झाले. चक्रवाक पक्षाची कामित्वाविषयीं मोठी ख्याति आहे. तो आपल्या मादीला सोडून क्षणभरही राहाण्याची वेळ आल्यास व्याकूळ होतो. पण हे बंधु अशा योनींत येऊनही त्यांनीं मैथुनाचा मार्ग मुळीच न पत्करिता केवळ ब्रह्मचर्यच पत्करले. ते एखाद्या ऋषीप्रमाणें आपला वेळ मननांत घालवीत. या पक्षियोनींत त्यांची नावे - निस्पृह, निर्मम, क्षांत, निर्द्वंद्व, निष्परिग्रह, निर्वृत्ति व निभृत, अशीं होतीं. ते सर्वही पक्षी मोठे शुभलक्षणी व धर्माने चालणारे होते. शेवटीं त्यांनीं आहार वर्ज करून तपाचरणाने नदीकांठीं प्राण सोडले.

पुढील योनींत ते सातहीजण मानससरोवरात फिरणारे असे हंस झाले. ते सर्वही एकाच जोडप्यांपासून झाले. त्या सर्वांनाही पूर्वस्मरण होतेंच. येथेही ते मोठे धर्मनिष्ठ व ब्रह्मचारीच होते. पूर्वी ब्राह्मणजन्मांत आपल्या प्रत्यक्ष गुरूला त्यांनीं ठकविलें असल्यामुळें त्या दोषानें ते अनेक जन्मांच्या गिर्कींत सापडून नीच योनींत उत्पन्न झाले. तसेंच त्यांनीं आपल्या पोटासाठी तर खरीच, तथापि, पितृश्राद्धाचें नांव करून हिंसा केली होती, एवढयाने त्यांना पूर्वजन्मींचे ज्ञान राहिलें व जन्मही तिर्यग्योनींतच पण एकाहून एक अधिक उंची अशा योनीत आले. या हंसयोनीत त्यांची नांवे - सुमना, शुचिवाक, शुद्ध, पंचम, छिद्रदर्शन, सुनेत्र व स्वतंत्र.

यांपैकीं पांचवा म्हणजे प्रथम जन्मीं जो कवि नामक होता, तो सातव्या जन्मांत पांचिक ही संज्ञा पावला; सहावा जो खसृम तो कण्डरीक नांवानें प्रसिद्ध झाला; व सातवा ब्रह्मदत्त या नांवानें. त्यांनीं साती जन्मांत जें तपाचरण केलें, जो योगाभ्यास केला, त्यांना कल्याणकारक अशी जी पूर्वजन्मींची स्मृति होती व अगदीं पहिल्या जन्मीं गुरुगृही त्यांनीं जें वेदाध्ययन केलें होतें त्याचा संस्कार, या सर्व संस्कारांच्या प्रभावानें ते जरी संसारांत पडले होते तरी ते सर्वही पक्षी अंतरीं ब्रह्मवेत्ते असून ब्रह्मचर्यानेंच राहात व योगस्थ वृत्तीने वनांत विहार करीत. एकदा ते सर्वही हंस जुटीने एकत्र फिरत असतां पुरुकुलोत्पन्न नीपांचा राजा बिभ्राज हा तेथें आला. हा शरीरानें मोठा शोभायमान, पराक्रमी व श्रीमंत होता. तो आपल्या स्त्रियांस बरोबर घेऊन त्या वनांत शिरला. तो राजा असल्या थाटानें व वैभवानें आलेला पाहून त्या सातांपैकीं स्वतंत्र नांवाचा जो हंस होता, त्याला आपण या राजासारखें व्हावें, अशी इच्छा उत्पन्न झाली. तो म्हणाला, "मी आजपर्यंत उपास कर करून अगदीं थकलों व इतकी तपश्चर्या केली, पण कांहीं फळ मिळाले नाहीं. तर माझ्या पदरीं तपाच्या किंवा नियमांच्या योगानें साचलेले जर कांहीं पुण्य असेल तर त्याच्या बळानें मला या राजासारखी सुखस्थिति प्राप्त व्हावी, असें मी इच्छितो."


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पितृकल्पे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP