| 
 
 श्रीहरिवंशपुराण  हरिवंश पर्व
 विंशोऽध्यायः
 
 पूजनीयोपाख्यानम् -  
मार्कण्डेय उवाच  तस्मिन्नन्तर्हिते देवे वचनात्तस्य वै प्रभोः ।
 चक्षुर्दिव्यं सविज्ञानं प्रादुरासीत् तदा मम ।  १ ॥
 ततोऽहं तानपश्यं वै ब्राह्मणान् कौशिकात्मजान् ।
 आपगेय कुरुक्षेत्रे यानुवाच विभुर्मम ॥  २ ॥
 ब्रह्मदत्तोऽभवद् राजा यस्तेषां सप्तमो द्विजः ।
 पितृवर्तीति विख्यातो नाम्ना शीलेन कर्मणा ॥  ३ ॥
 शुकस्य कन्या कृत्वी तं जनयामास पार्थिवम् ।
 अणुहात् पार्थिवश्रेष्ठात् काम्पिल्ये नगरोत्तमे ॥  ४ ॥
 भीष्म उवाच
 यथोवाच महाभागो मार्कण्डेयो महातपाः ।
 तस्य वंशमहं राजन् कीर्तयिष्यामि तच्छृणु ॥  ५ ॥
 युधिष्ठिर उवाच
 अणुहः कस्य वै पुत्रः कस्मिन् काले बभूव ह ।
 राजा धर्मभृतां श्रेष्ठो यस्य पुत्रो महायशाः ॥  ६ ॥
 ब्रह्मदत्तो नरपतिः किंवीर्यः स बभूव ह ।
 कथं च सप्तमस्तेषां स बभूव नराधिपः ॥  ७ ॥
 न ह्यल्पवीर्याय शुको भगवाँल्लोकपूजितः ।
 कन्यां प्रादद्याद् योगात्मा कृत्वीं कीर्तिमतीं प्रभुः ॥ ८ ॥
 एतदिच्छाम्यहं श्रोतुं विस्तरेण महाद्युते ।
 ब्रह्मदत्तस्य चरितं तद् भवान् वक्तुमर्हति ॥  ९ ॥
 यथा च वर्तमानास्ते संसारे च द्विजातयः ।
 मार्कण्डेयेन कथितास्तद् भवान् प्रब्रवीतु मे ॥  १० ॥
 भीष्म उवाच
 प्रतीपस्य तु राजर्षेस्तुल्यकालो नराधिप ।
 पितामहस्य मे राजन् बभूवेति मया श्रुतम् ॥  ११ ॥
 ब्रह्मदत्तो महाभागो योगी राजर्षिसत्तमः ।
 रुतज्ञः सर्वभूतानां सर्वभूतहिते रतः ॥  १२ ॥
 सखाऽऽस गालवो यस्य योगाचार्यो महायशाः ।
 शिक्षामुत्पाद्य तपसा क्रमो येन प्रवर्तितः।
 कण्डरीकश्च योगात्मा तस्यैव सचिवो महान् ॥  १३ ॥
 जात्यन्तरेषु सर्वेषु सखायः सर्व एव ते ।
 सप्तजातिषु सप्तैव बभूवुरमितौजसः ।
 यथोवाच महाभागो मार्कण्डेयो महातपाः ॥  १४ ॥
 तस्य वंशमहं राजन् कीर्तयिष्यामि तच्छृणु ।
 ब्रह्मदत्तस्य पौराणां पौरवस्य महात्मनः ॥  १५ ॥
 बृहत्क्षत्रस्य दायादः सुहोत्रो नाम धार्मिकः ।
 सुहोत्रस्यापि दायादो हस्ती नाम बभूव ह ॥  १६ ॥
 तेनेदं निर्मितं पूर्वं हस्तिनापुरमुत्तमम् ।
 हस्तिनश्चापि दायादास्त्रयः परमधार्मिकाः ॥  १७ ॥
 अजमीढो द्विमीढश्च पुरुमीढस्तथैव च ।
 अजमीढस्य धूमिन्यां जज्ञे बृहदिषुर्नृप ।
 बृहद्धनुर्बृहदिषोः पुत्रस्तस्य महायशाः ॥  १८ ॥
 बृहद्धर्मेति विख्यातो राजा परमधार्मिकः ।
 सत्यजित् तनयस्तस्य विश्वजित्तस्य चात्मजः ॥  १९ ॥
 पुत्रो विश्वजितश्चापि सेनजित् पृथिवीपतिः ।
 पुत्राः सेनजितश्चासंश्चत्वारो लोकविश्रुताः ॥  २० ॥
 रुचिरः श्वेतकेतुश्च महिम्नारस्तथैव च ।
 वत्सश्चावन्तको राजा यस्यैते परिवत्सकाः ॥  २१ ॥
 रुचिरस्य तु दायादः पृथुसेनो महायशाः ।
 पृथुसेनस्य पारस्तु पारान्नीपस्तु जज्ञिवान् ॥  २२ ॥
 नीपस्यैकशतं तात पुत्राणाममितौजसाम् ।
 महारथानां राजेन्द्र शूराणां बाहुशालिनाम् ।
 नीपा इति समाख्याता राजानः सर्व एव ते ॥  २३ ॥
 तेषां वंशकरो राजा नीपानां किर्तिवर्धनः ।
 कांपिल्ये समरो नाम सचेष्टसमरोऽभवत् ॥  २४ ॥
 समरस्य परः पारः सदश्व इति ते त्रयः ।
 पुत्राः परमधर्मज्ञाः परपुत्रः पृथुर्बभौ ॥  २५ ॥
 पृथोस्तु सुकृतो नाम सुकृतेनेह कर्मणा ।
 जज्ञे सर्वगुणोपेतो विभ्राजस्तस्य चात्मजः ॥  २६ ॥
 विभ्राजस्य तु पुत्रोऽभूदणुहो नाम पार्थिवः ।
 बभौ शुकस्य जामाता कृत्वीभर्ता महायशाः ॥  २७ ॥
 पुत्रोऽणुहस्य राजर्षिर्ब्रह्मदत्तोऽभवत् प्रभुः ।
 योगात्मा तस्य तनयो विष्वक्सेनः परंतपः ॥  २८ ॥
 विभ्राजः पुनरायातः स्वकृतेनेह कर्मणा ।
 ब्रह्मदत्तस्य पुत्रोऽन्यः सर्वसेन इति श्रुतः ॥  २९ ॥
 चक्षुषी त्यस्य निर्भिन्ने पक्षिण्या पूजनीयया ।
 सुचिरोषितया राजन् ब्रह्मदत्तस्य वेश्मनि ॥  ३० ॥
 अथास्य पुत्रस्त्वपरो ब्रह्मदत्तस्य जज्ञिवान् ।
 विष्वक्सेन इति ख्यातो महाबलपराक्रमः ॥  ३१ ॥
 विष्वक्सेनस्य पुत्रोऽभूद् दण्डसेनो महीपतिः ।
 भल्लाटोऽस्य कुमारोऽभूद् राधेयेन हतः पुरा ॥  ३२ ॥
 दण्डसेनात्मजः शूरो महात्मा कुलवर्धनः ।
 भल्लाटपुत्रो दुर्बुद्धिरभवच्च युधिष्ठिर ॥  ३३ ॥
 स तेषामभवद् राजा नीपानामन्तकृन्नृप ।
 उग्रायुधेन यस्यार्थे सर्वे नीपा विनाशिताः ॥  ३४ ॥
 उग्रायुधो मदोत्सिक्तो मया विनिहतो युधि ।
 दर्पान्वितो दर्परुचिः सततं चानये रतः ॥  ३५ ॥
 युधिष्ठिर उवाच
 ऊग्रायुधः कस्य सुतः कस्मिन् वंशेऽथ जज्ञिवान् ।
 किमर्थं चैव भवता निहतस्तद् ब्रवीहि मे ॥  ३६ ॥
 भीष्म उवाच
 अजमीढस्य दायादो विद्वान् राजा यविनरः ।
 धृतिमांस्तस्य पुत्रस्तु तस्य सत्यधृतिः सुतः ॥  ३७ ॥
 जज्ञे सत्यधृतेः पुत्रो धृढनेमिः प्रतापवान् ।
 धृढनेमिसुतश्चापि सुधर्मा नाम पार्थिवः ॥  ३८ ॥
 आसीत् सुधर्मणः पुत्रः सार्वभौमः प्रजेश्वरः ।
 सार्वभौम इति ख्यातः पृथिव्यामेकराड् विभुः ॥  ३९ ॥
 तस्यान्ववाये महति महान् पौरवनन्दन ।
 महतश्चापि पुत्रस्तु राजा रुक्मरथः स्मृतः ॥  ४० ॥
 पुत्रो रुक्मरथस्यापि सुपार्श्वो नाम पार्थिवः ।
 सुपार्श्वतनयश्चापि सुमतिर्नाम धार्मिकः ॥  ४१ ॥
 सुमतेरपि धर्मात्मा सन्नतिर्नाम वीर्यवान् ।
 तस्य वै सन्नतेः पुत्रः कृतो नाम महाबलः ॥  ४२ ॥
 शिष्यो हिरण्यनाभस्य कौशलस्य महात्मनः ।
 चतुर्विंशतिधा तेन सप्राच्याः सामसंहिताः ॥  ४३ ॥
 स्मृतास्ते प्राच्यसामानः कार्तयो नाम सामगाः ।
 कार्तिरुग्रायुधः सोऽथ वीरः पौरवनन्दनः ॥  ४४ ॥
 बभूव येन विक्रम्य पृषतस्य पितामहः ।
 नीपो नाम महतेजाः पाञ्चालाधिपतिर्हतः ॥  ४५ ॥
 उग्रायुधस्य दायादः क्षेम्यो नाम महायशाः ।
 क्षेम्यात्सुवीरो नृपतिः सुवीरात् तु नृपञ्जयः ॥  ४६ ॥
 नृपञ्जयाद्बहुरथ इत्येते पौरवाः स्मृताः ।
 स चाप्युग्रायुधस्तात दुर्बुद्धिरभवत् तदा ॥  ४७  ॥
 प्रवृद्धचक्रो बलवान् नीपान्तकरणो महान् ।
 स दर्पपूर्णो हत्वाऽऽजौ नीपानन्यांश्च पार्थिवान् ॥  ४८ ॥
 पितर्युपरते मह्यं श्रावयामास किल्बिषम् ।
 माममात्यैः परिवृतं शयानं धरणीतले ॥  ४९ ॥
 उग्रायुधस्य राजेन्द्र दूतोऽभ्येत्य वचोऽब्रवीत् ।
 अद्य त्वं जननीं भीष्म गन्धकालीं यशस्विनीम् ।
 स्त्रीरत्नं मम भार्यार्थे प्रयच्छ कुरुपुङ्गव ॥  ५० ॥
 एवं राज्यं च ते स्फीतं धनानि च न संशयः ।
 प्रदास्यामि यथाकाममहं वै रत्नभाग् भुवि ॥ ५१ ॥
 मम प्रज्वलितं चक्रं निशम्येदं सुदुर्जयम् ।
 शत्रवो विद्रवन्त्याजौ दर्शनादेव भारत ॥  ५२ ॥
 राष्ट्रस्येच्छसि चेत् स्वस्ति प्राणानां वा कुलस्य वा ।
 शासने मम तिष्ठस्व न हि ते शान्तिरन्यथा ॥  ५३  ॥
 अधः प्रस्तारशयने शयानस्तेन चोदितः ।
 दूतान्तर्हितमेतद् वै वाक्यमग्निशिखोपमम् ॥  ५४ ॥
 ततोऽहं तस्य दुर्बुद्धेर्विज्ञाय मतमच्युत ।
 आज्ञापयं वै संग्रामे सेनाध्यक्षांश्च सर्वशः ॥  ५५ ॥
 विचित्रवीर्यं बालं च मदुपाश्रयमेव च ।
 दृष्ट्वा क्रोधपरीतात्मा युद्धायैव मनो दधे ॥  ५६ ॥
 निगृहीतस्तदाहं तैः सचिवैर्मन्त्रकोविदैः ।
 ऋत्विग्भिर्वेदकल्पैश्च सुहृद्भिश्चार्थदर्शिभिः ॥  ५७ ॥
 स्निग्धैश्च शास्त्रविद्भिश्च संयुगस्य निवर्तने ।
 कारणं श्रावितश्चास्मि युक्तरूपं तदानघ ॥  ५८ ॥
 मन्त्रिण ऊचुः
 प्रवृत्तचक्रः पापोऽसौ त्वं चाशौचगतः प्रभो ।
 न चैष प्रथमः कल्पो युद्धं नाम कदाचन ॥  ५९ ॥
 ते वयं सामपूर्वं वै दानं भेदं तथैव च ।
 प्रयोक्ष्यामस्ततः शुद्धो दैवतान्यभिवाद्य च ॥  ६० ॥
 कृतस्वस्त्ययनो विप्रैर्हुवह्नीन् सम्पूज्य च द्विजान् ।
 ब्राह्मणैरभ्यनुज्ञातः प्रयास्यसि जयाय वै ॥  ६१ ॥
 अस्त्राणि च प्रयोज्यानि न प्रवेश्यश्च सङ्गरः ।
 आशौचे वर्तमाने तु वृद्धानामिति शासनम् ॥  ६२ ॥
 सामदानादिभिः पूर्णमपि भेदेन वा ततः ।
 तां हनिष्यसि विक्रम्य शम्बरं मघवानिव ॥  ६३ ॥
 प्राज्ञानां वचनं काले वृद्धानां च विशेषतः ।
 श्रोतव्यमिति तच्छ्रुत्वा निवृत्तोऽस्मि नराधिप ॥  ६४ ॥
 ततस्तैः संक्रमः सर्वः प्रयुक्तः शास्त्रकोविदैः ।
 तस्मिन् काले कुरुश्रेष्ठ कर्म चारब्धमुत्तमम् ॥  ६५ ॥
 स सामादिभिरेवादावुपायैः प्राज्ञचिन्तितैः
 अनुनीयमानो दुर्बुद्धिरनुनेतुं न शक्यते ॥  ६६ ॥
 प्रवृत्तं तस्य तच्चक्रमधर्मनिरतस्य वै ।
 परदाराभिलाषेण सद्यस्तात निवर्तितम् ॥  ६७ ॥
 न त्वहं तस्य जाने तन्निवृत्तं चक्रमुत्तमम् ।
 हतं स्वकर्मणा तं तु पूर्वं सद्भिश्च निन्दितम्॥  ६८ ॥
 कृतशौचः शरी चापी रथी निष्क्रम्य वै पुरात् ।
 कृतस्वस्त्ययनो विप्रैः प्रायोधयमहं रिपुम् ॥  ६९ ॥
 ततः संसर्गमागम्य बलेनास्त्रबलेन च ।
 त्र्यहमुन्मत्तवद् युद्धं देवासुरमिवाभवत् ॥  ७० ॥
 स मयास्त्रप्रतापेन निर्दग्धो रणमूर्धनि ।
 
 
पपाटाभिमुखः शूरस्त्यक्त्वा प्राणानरिन्दम ॥  ७१ ॥  एतस्मिन्नन्तरे तात काम्पिल्ये पृषतोऽभ्ययात् ।
 हते नीपेश्वरे चैव हते चोग्रायुधे नृपे ॥ ७२ ॥
 आहिच्छत्रं स्वकं राज्यं पित्र्यं प्राप महाद्युतिः ।
 द्रुपदस्य पिता राजन् ममैवानुमते तदा ॥  ७३ ॥
 ततोऽर्जुनेन तरसा निर्जित्य द्रुपदं रणे ।
 आहिच्छत्रं सकाम्पिल्यं द्रोणायाथापवर्जितम् ॥  ७४ ॥
 प्रतिगृह्य ततो द्रोण उभयं जयतां वरः ।
 काम्पिल्यं द्रुपदायैव प्रायच्छद् विदितं तव ॥  ७५ ॥
 एष ते द्रुपदस्यादौ ब्रह्मदत्तस्य चैव ह ।
 वंशः कार्त्स्येन वै प्रोक्तो नीपस्योग्रायुधस्य च ॥  ७६ ॥
 युधिष्ठिर उवाच
 किमर्थं ब्रह्मदत्तस्य पूजनीया शकुन्तिका ।
 अन्धं चकार गाङ्गेय ज्येष्ठं पुत्रं पुरा विभो ॥  ७७ ॥
 चिरोषिता गृहे चापि किमर्थं चैव यस्य सा ।
 चकार विप्रियमिदं तस्य राज्ञो महात्मनः ॥  ७८ ॥
 पूजनीया चकारासौ किं सख्यं तेन चैव ह ।
 एतन्मे संशयं छिन्धि सर्वमुक्त्वा यथातथम् ॥  ७९  ॥
 भीष्म उवाच
 शृणु सर्वं महाराज यथावृत्तमभूत् पुरा ।
 ब्रह्मदत्तस्य भवने तन्निबोध युधिष्ठिर ॥  ८० ॥
 काचिच्छकुन्तिका राजन् ब्रह्मदत्तस्य वै सखी ।
 शितिपक्षा शोणशिराः शितिपृष्ठा शितोदरी ॥  ८१ ॥
 सखी सा ब्रह्मदत्तस्य सुदृढं बद्धसौहृदा ।
 तस्याः कुलायमभवद् गेहे तस्य नरोत्तम ॥  ८२ ॥
 सा सदाहनि निर्गत्य तस्य राज्ञो गृहोत्तमात् ।
 चचाराम्भोधितीरेषु पल्वलेषु सरस्सु च ॥  ८३ ॥
 नदीपर्वतकुञ्जेषु वनेषूपवनेषु च ।
 प्रफुल्लेषु तडागेषु कल्हारेषु सुगन्धिषु ॥  ८४ ॥
 कुमुदोत्पलकिञ्जल्कसुरभीकृतवायुषु ।
 हंससारसघुष्टेषु कारण्डवरुतेषु च ॥  ८५ ॥
 चरित्वा तेषु सा राजन् निशि काम्पिल्यमागमत् ।
 नृपतेर्भवनं प्राप्य ब्रह्मदत्तस्य धीमतः ॥  ८६ ॥
 राज्ञा तेन सदा राजन् कथायोगं चकार सा ।
 आश्चर्याणि च दृष्टानि यानि वृत्तानि कानिचित् ॥  ८७ ॥
 चरित्वा विविधान् देशान् कथयामास सा निशि ।
 कदाचित् तस्य नृपतेर्ब्रह्मदत्तस्य कौरव ॥  ८८ ॥
 पुत्रोऽभूद् राजशार्दूल सर्वसेनेति विश्रुतः ।
 पूजनीयाथ सा तस्मिन् प्रासूताण्डमथापि च ॥  ८९  ॥
 तस्मिन् नीडे पुरा ह्येकं तत्किल प्रास्फुटत् तदा ।
 स्फुटितो मांसपिण्डस्तु बाहुपादास्यसंयुतः ॥  ९० ॥
 बभ्रुवक्त्रश्चक्षुर्हीनो बभूव पृथिवीपते ।
 चक्षुष्मानप्यभूत् पश्चादीषत्पक्षोत्थितश्च ह ॥  ९१ ॥
 अथ सा पूजनीया वै राजपुत्रस्वपुत्रयोः ।
 तुल्यस्नेहात् प्रीतिमती दिवसे दिवसेऽभवत् ॥  ९२ ॥
 आजहार सदा सायं चञ्च्वामृतफलद्वयम् ।
 अमृतास्वादसदृशं सर्वसेनतनूजयोः ॥  ९३ ॥
 स बालो ब्रह्मदत्तस्य पूजनीयासुतश्च ह ।
 ते फले भक्षयित्वा च पृथुकौ प्रीतमानसौ ॥  ९४ ॥
 अभूतां नित्यमेवेह खादेतां तौ च ते फले ।
 तस्यां गतायामथ च पूजन्यां वै सदाहनि ॥  ९५ ॥
 शिशुना चटकेनाथ धात्री तं तु शिशुं नृप ।
 तेन प्रक्रीडयामास ब्रह्मदत्तात्मजं सदा ॥  ९६ ॥
 नीडात् तमाकृष्य तदा पूजनीयाकृतात् ततः ।
 क्रीडता राजपुत्रेण कदाचिच्चटकः स तु ॥  ९७ ॥
 निगृहीतः कन्धरायां शिशुना दृढमुष्टिना ।
 दुर्भङ्गमुष्टिना राजन्नसून् सद्यस्त्वजीजहत् ॥  ९८ ॥
 तं तु पञ्चत्वमापन्नं व्यात्तास्यं बालघातितम् ।
 कथंचिन्मोचितं दृष्त्वा नृपतिर्दुःखितोऽभवत्  ९९ ॥
 धात्रीं तस्य जगर्हे तां तदाऽश्रुपरमो नृपः ।
 तस्थौ शोकान्वितो राजञ्छोचंस्तं चटकं तदा ॥  १०० ॥
 पूजनीयापि तत्काले गृहीत्वा तु फलद्वयम् ।
 ब्रह्मदत्तस्य भवनमाजगाम वनेचरी ॥  १०१ ॥
 अथापश्यत् तमागम्य गृहे तस्मिन् नराधिप ।
 पञ्चभूतपरित्यक्तं शोच्यं तं स्वतनूद्भवम् ॥  १०२ ॥
 मुमोह दृष्ट्वा तं पुत्रं पुन्ः संज्ञामथालभत् ।
 लब्धसंज्ञा च ष्आ राजन्विललाप तपस्विनी ॥  १०३ ॥
 पूजनीयोवाच
 न तु त्वमागतां पुत्र वाशन्तीं परिसर्पसि ।
 कुर्वंश्चाटुसहस्राणि अव्यक्तकलया गिरा ॥  १०४ ॥
 व्यादितास्यः क्षुधार्तश्च पीतेनास्येन पुत्रक ।
 शोणेन तालुना पुत्र कथमद्य न सर्पसि ॥  १०५ ॥
 पक्षाभ्यां त्वां परिष्वज्य ननु वाशामि चाप्यहम् ।
 चिचीकूचीति वाशन्तं त्वामद्य न शृणोमि किम् ॥  १०६ ॥
 मनोरथो यस्तु मम पश्येयं पुत्रकं कदा ।
 व्यात्तास्यं वारि याचन्तं स्फुरत्पक्षं ममाग्रतः ॥  १०७ ॥
 स मे मनोरथो भग्नस्त्वयिं पञ्चत्वमागते ।
 विलप्यैवं बहुविधं राजानमथ साब्रवीत् ॥  १०८ ॥
 ननु मूर्धाभिषिक्तस्त्वं धर्मं वेत्सि सनातनम् ।
 अद्य कस्मान्मम सुतं धात्र्या घातितवानसि ॥  १०९ ॥
 तव पुत्रेण चाकृष्य क्षत्रियाधम शंस मे ।
 न च नूनं श्रुता तेऽभूदियदियमाङ्गीरसी श्रुतिः ॥  ११० ॥
 शरणागतः क्षुधार्तश्च शत्रुभिश्चाभ्युपद्रुतः
 चिरोषितश्च स्वगृहे पातव्यः सर्वदा भवेत् ॥  १११ ॥
 अपालयन्नरो याति कुंभीपाकमसंशयम् ।
 कथमस्य हविर्देवा गृह्णन्ति पितरः स्वधाम् ॥  ११२ ॥
 एवमुक्त्वा महाराज दशधर्मगता सती ।
 शोकार्ता तस्य बालस्य चक्षुंषी निर्बिभेद सा ॥ ११३ ॥
 कराभ्यां राजपुत्रस्य ततस्तच्चक्षुरस्फुटत् ।
 कृत्वा चान्धं नृपसुतमुत्पपात ततोऽम्बरम् ॥  ११४ ॥
 अथ राजा सुतं दॄष्ट्वा पूजनीयामुवाच ह ।
 विशोका भव कल्याणि कृतं ते भीरु शोभनम् ॥  ११५ ॥
 गतशोका निवर्तस्व अजर्यं सख्यमस्तु ते ।
 पुरेव वस भद्रं ते निवर्तस्व रमस्व च ॥  ११६ ॥
 पुत्रपीडोद्भवश्चापि न कोपः परमस्त्वयि ।
 ममास्ति सखि भद्रं ते कर्तव्यं च कृतं त्वया ॥  ११७ ॥
 पूजनीयोवाच
 आत्मौपम्येन जानामि पुत्रस्नेहं तवाप्यहम् ।
 न चाहं वस्तुमिच्छामि तव पुत्रमचक्षुषम् ।
 कृत्वा वै राजशार्दूल त्वद्गृहे कृतकिल्बिषा ॥  ११८ ॥
 गाथाश्चाप्युशनो गीता इमाः शृणु मयेरिताः ।
 कुमित्रं च कुदेशं च कुराजानं कुसौहृदम् ।
 कुपुत्रं च कुभार्यां च दूरतः परिवर्जयेत् ॥  ११९ ॥
 कुमित्रे सौहृदं नास्ति कुभार्यायां कुतो रतिः ।
 कुतः पिण्डः कुपुत्रे वै नास्ति सत्यं कुराजनि ॥  १२० ॥
 कुसौहृदे क्व विश्वासः कुदेशे न तु जीव्यते ।
 कुराजनि भयं नित्यं कुपुत्रे सर्वतोऽसुखम् ॥  १२१ ॥
 अपकारिणि विस्रंभं यः करोति नराधमः ।
 अनाथो दुर्बलो यद्वन्न चिरं स तु जीवति ॥  १२२ ॥
 न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत् ।
 विश्वासाद् भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति ॥  १२३ ॥
 राजसेविषु विश्वासं गर्भसंकरितेषु च ।
 यः करोति नरो मूढो न चिरं स तु जीवति ॥  १२४ ॥
 अप्युन्नतिं प्राप्य नरः प्रावारः कीटको यथा ।
 स विनश्यत्यसंदेहमाहैवमुशना नृप ॥  १२५ ॥
 अपि मार्दवभावेन गात्रं संलीय बुद्धिमान् ।
 अरिं नाशयते नित्यं यथा वल्लिर्महाद्रुमम् ॥  १२६ ॥
 मृदुरार्द्रः कृशो भूत्वा शनैः संलीयते रिपुः ।
 वल्मीक इव वृक्षस्य पश्चान्मूलानि कृन्तति ॥  १२७ ॥
 अद्रोहसमयं कृत्वा मुनीनामग्रतो हरिः ।
 जघान नमुचिं पश्चादपां फेनेन पार्थिव ॥  १२८ ॥
 सुप्तं मत्तं प्रमत्तं व घातयन्ति रिपुं नराः ।
 विषेण व्ह्निना वाऽपि शस्त्रेणाप्यथ मायया ॥  १२९ ॥
 न च शेषं प्रकुर्वन्ति पुनर्वैरभयान्नराः ।
 घातयन्ति समूलं हि श्रुत्वेमामुपमां नृप ॥  १३० ॥
 शत्रुशेषमृणाच्छेषं शेषमग्नेश्च भूमिप ।
 पुनर्वर्धेत सम्भूय तस्माच्छेषं न शेषयेत् ॥  १३१ ॥
 हसते जल्पते वैरी एकपात्रे भुनक्ति च ।
 एकासनं चारोहति स्मरते तच्च किल्बिषम् ॥  १३२ ॥
 कृत्वा सम्बन्धकं चापि विश्वसेच्छत्रुणा न हि ।
 पुलोमानं जघानाजौ जामाता सञ्शतक्रतुः ॥  ३३ ॥
 निधाय मनसा वैरं प्रियं वक्तीह यो नरः ।
 उपसर्पेन्न तं प्राज्ञः कुरङ्ग इव लुब्धकम् ॥  १३४ ॥
 न चासन्ने निवस्तव्यं सवैरे वर्धिते रिपौ ।
 पातयेत्तं समूलं हि नदीरय इव द्रुमम् ॥  १३५ ॥
 अमित्रादुन्नतिं प्राप्य नोन्नतोऽस्मीति विश्वसेत् ।
 तस्मात्प्राप्योन्नतिं नश्येत् प्रावार इव कीटकः ॥  १३६ ॥
 इत्येता ह्युशनोगीता गाथा धार्या विपश्चिता ।
 कुर्वता चात्मरक्षां वै नरेण पृथिवीपते ॥  १३७ ॥
 मया सकिल्बिषं तुभ्यं प्रयुक्तमतिदारुणम् ।
 पुत्रमन्धं प्रकुर्वन्त्या तस्मान्नो विश्वसे त्वयि ॥  १३८ ॥
 एवमुक्त्वा प्रदुद्राव तदाऽकाशं पतङ्गिनी ।
 इत्येतत्ते मयाख्यातं पुराभूतमिदं नृप ॥  १३९ ॥
 ब्रह्मदत्तस्य राजेन्द्र यद्वृत्तं पूजनीयया ।
 श्राद्धं च पृच्छसे यन्मां युधिष्ठिर महामते ॥  १४० ॥
 अतस्ते वर्तयिष्येऽहमितिहासं पुरातनम् ।
 गीतं सनत्कुमारेण मार्कण्डेयाय पृच्छते ॥  १४१ ॥
 श्राद्धस्य फलमुद्दिश्य नियतं सुकृतस्य च ।
 तन्निबोध महाराज सप्तजातिषु भारत ॥  १४२ ॥
 सगालवस्य चरितं कण्डरीकस्य चैव हि ।
 ब्रह्मदत्ततृतीयानां योगिनां ब्रह्मचारिणाम् ॥  १४३ ॥
 इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
 पूजनीयोपाख्याने चटकाख्यानं नाम विंशोऽध्यायः
 
 
 
 चटकोपाख्यान  - 
मार्कंडेय म्हणतात - हे भीष्मा, आतां सांगितल्याप्रमाणें सनत्कुमार देव अंतर्धान पावल्यावर त्यांच्या वचनप्रभावानें दिव्यदृष्टि व विज्ञान ही तत्काल माझे ठायीं प्रकट झाली; व त्यांच्या योगाने, हे गांगेया, सनत्कुमारांनीं कुरुक्षेत्रांत कौशिक कुलात जे सात पुत्र आले म्हणून मला सांगितलें होतें ते मला प्रत्यक्ष दिसू लागले. या साताभावांपैकीं ब्रह्मदत्त नांवाचा जो सातवा भाऊ होता तो राजा झाला. याचा स्वभाव व आचरण यांवरून हा ब्रह्मदत्त पितृवर्ती या नांवानें विशेष प्रख्यात होता. हा कांपिल्य नामक श्रेष्ठ नगरींत राहाणारा जो पृथ्वीपति अणुह त्यापासून त्याची स्त्री जी शुककन्या कृत्वी तिचे ठायीं जन्मला.  
 भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, महातपस्वी महाभाग मार्कंडेय यांनीं या अणुह राजाची वंशावळ मला जशी सांगितली तशीच ती मी तुला सांगतो ऐक.
 
 युधिष्ठिर म्हणतो - ताता, आपण एकुण वंशावळ सांगणारच आहांत, पण प्रथम विशेषतः अणुह राजा, हा कोणाचा पुत्र होता, हा कोणत्या काळी होता, व राजा ब्रह्मदत्तासारखा महायशस्वी व धर्मनिष्ठ पुत्र ज्याचे पोटीं जन्मला त्याची वीर्यवत्ता तरी कसल्या प्रकारची होती व त्या सात भावांपैकी ब्रह्मदत्त हा कनिष्ठ असून राजा कां व कसा झाला, हें मला सांगावे. या ब्रह्मदत्ताचे चरित्र मी जें विशेष विस्तारानें ऐकू इच्छितों याचे कारण, हे द्युतिमंता, असें आहे कीं, भगवान् शुकासारखा लोकपूज्य ऋषि आपली कृत्वी नामक कीर्तिमान् कन्या भलत्याच पोंचट माणसाला देणार नाहीं. अर्थात् तो तसाच कांहीं वीर्यवान असला पाहिजे. याकरितां आपण त्याचें वृत्त मला सांगा. शिवाय त्याचे ते मार्कंडेयांनीं सांगितलेले बाकीचे भाऊ संसारांत कसे वागत होते, तें मला सांगा.
 
 भीष्म म्हणतात - हे धर्मा, माझा आजा जो राजर्षि प्रतीप त्याचा हा ब्रह्मदत्त राजा समकालीन होता, असें माझे ऐकिवात आहे. हा मोठा भाग्यवान योगी, प्राणिमात्राचें कल्याण करण्यांत तत्पर व प्राणिमात्राची भाषा जाणणारा होता; व ज्याने तपोबलाने शिक्षानामक वेदांग निर्माण करून संहितेचा पदपाठ व एकंदर वेदांगांचा क्रम प्रचारांत आणिला; व योग शिकविण्यांत अत्यंत निपुण असल्यानें ज्याला योगाचार्य अशी संज्ञा आहे तो गालव ऋषि याचा मित्र होता; व योगिश्रेष्ठ कंडरीक हा त्याचा सचिव होता. महाभाग मार्कंडेय ऋषींच्या सांगण्याप्रमाणें पाहातां ब्रह्मदत्तादि सातही बंधु पूर्वजन्मी निरनिराळ्या जातींत जन्मले असून परस्पर अत्यंत प्रेमळ मित्र होते; व अखेर या जन्मी ते सहोदरच झाले. हे राजा युधिष्ठिरा, पुरुकुलोत्पन्न जो महात्मा ब्रह्मदत्त त्याच्या अति जुनाट वंशाचा वृत्तांत मी तुला सांगतो, तो ऐक. पुरुकुलांत बृहत्क्षत्र नांवाचा जो राजा झाला त्याला सुहोत्र नामक परम धार्मिक पुत्र झाला. त्या सुहोत्राला हस्ति नामक पुत्र होता. प्रसिद्ध जें हस्तिनापुर (हल्लींची दिल्ली) हें प्रथम यानेच वसविले. या हस्तीला अजमीढ, द्विजमीढ व पुरुमीढ असे तीन पुत्र होते. पैकी अजमीढाला धूमिनी नामक स्त्रीचे ठिकाणी बृहदिषु हा पुत्र झाला. हे राजा, या बृहदिषूचे पोटीं महायशस्वी बृहद्धनु हा पुत्र झाला. हा मोठा धार्मिक असल्यामुळे याला बृहद्धर्मा असें म्हणत. याला पुढे सत्यजित हा झाला. त्याचा विश्वजित, विश्वजिताचा पुढें राजा सेनजित झाला. या सेनजिताला लोकविख्यात असे चार पुत्र झाले. यांचीं नांवे - रुचिर, श्वेतकेतु, महिम्नार व वत्स. यांपैकी वत्स हा अवंतीचा राजा होता; व रुचिराला पृथुसेन नांवाचा महायशस्वी पुत्र होता. पृथुसेनापासून पार झाला. पारापासून नीप. नीपाला मात्र अत्यंत तेजस्वी, शूर व बाहुशाली असे महारथि शंभर पुत्र होते; व हे सर्वही राजे झाले; व या सर्वांनाही नीपच म्हणत. या नीपांचा वंश वाढविणारा समर नांवाचा जो पुत्र तो कांपिल्य नगरींत राहात असे व याला नांवाप्रमाणेंच समराची फार आवड असे. या समराला पर, पार व सदश्व असे तीन मोठे धर्मज्ञ पुत्र होते. पैकी पराला पृथु नांवाचा पुत्र झाला. पृथुला सुकृत नामक पुत्र झाला व तो आपल्या सदाचरणानें सर्वगुणसंपन्न झाला. याला पुढें विभ्राज झाला. विभ्राजाचा पुत्र कृत्वीचा नवरा व शुक्राचार्याचा जावई जो सुप्रसिद्ध अणुह तो होय. अणुहाचा पुत्र बलवान राजर्षी ब्रह्मदत्त हा झाला. त्याला योगनिष्ठ व शत्रुमर्दन असा विश्वक्सेन नामक पुत्र झाला. हा जो विश्वक्सेन हा खरें पाहाता ब्रह्मदत्ताचा पूर्वज म्हणजे आजा जो विभ्राज तोच कांहीं कर्मगतीने ब्रह्मदत्ताचे पोटीं पुनः जन्मास आला होता. ब्रह्मदत्ताला याशिवाय सर्वसेन या नांवाचा पुत्र होता. ब्रह्मदत्ताचे घरांत बहुत कालपर्यंत पूजनी या नांवाची एक चिमणी राहात असे. तिने या सर्वसेनाचे डोळे फोडले. आतां या ब्रह्मदत्ताचा विश्वक्सेन म्हणून जो वर महापराक्रमी पुत्र सांगितला, त्याला राजा दंडसेन नामक पुत्र झाला. या दंडसेनाला भल्लाटसंज्ञक पुत्र होता, याला कर्णानें युद्धांत मारिलें आहे. हा भल्लाट मोठा शूर व वंशोद्धार करणारा होता. मात्र याचे पोटी जो पुत्र आला तो मोठा वाईट निपजला. कारण, याच्या एकटयाच्या दुष्कृतीमुळे उग्रायुधराजानें मागें सांगितलेले जे याचे नीपसंज्ञक पूर्वज त्यांच्या एकंदर वंशविस्ताराचा पूर्ण उच्छेद करून टाकिला. एवंच, हा दुर्बुद्धि मोठा कुलांगार निपजला. नीपांचा नायनाट करणार्या त्या उग्रायुधाला जेव्हां अत्यंत गर्व झाला व मोठी घमेंड चढली त्या वेळेस, हे युधिष्ठिरा, मीं त्याला युद्धांत चीत केला.
 
 धर्मराज म्हणतो - महाराज, हा उग्रायुध कोणाचा पुत्र, कोणच्या कुळांत जन्मला व आपण त्याला युद्धांत काय म्हणून मारिले, हें सर्व मला सांगा.
 
 भीष्म सांगतात - बाबारे, मागें जो अजमीढ राजा सांगितला, त्याला यवीनर नांवाचा एक विद्वान पुत्र होता; यवीनराचे पोटीं धृतिमान झाला; धृतिमानाचा पुत्र सत्यधृति, सत्यधृतीचे उदरी प्रतापशाली दृढनेमी हा जन्मला. पुढें राजा सुधर्मा हा दृढनेमीचा पुत्र झाला. सुधर्म्याला पुढें सार्वभौम राजा हा पुत्र झाला. याला सार्वभौम म्हणण्याचें कारण खरोखरच तो सर्व पृथ्वीचा मालक झाला होता. याच्या सुप्रसिद्ध वंशांत पुढें पौरवांना आनंद देणारा महान नांवाचा राजा झाला; पुढें महानाला रुक्मरथ झाला, असे लिहिले आहे. रुक्मरथाचा पुत्र सुपार्श्व, सुपार्श्वाचा पुत्र सुमति हा मोठा धार्मिक होता. सुमतीला सन्नति नांवाचा मोठा वीर्यवान पुत्र झाला. याचा पुढें मोठा बलाढय कृत नांवाचा पुत्र झाला. हा कृत कौशल देशांतील इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा जो महात्मा हिरण्यनाभ त्याचा शिष्य होता. याने सामवेदाची संहिता चोवीस निरनिराळ्या रीतींनी गाण्याची पद्धत काढिली, व यामुळें याच्या पद्धतीप्रमाणें जे साम पढणारे आहेत त्यांना कार्तय (कृताचे अनुयायी) असें म्हणतात, व त्या सामांना प्राच्यसाम असें म्हणतात. या कृताला पुरुकुलांतील मोठा पराक्रमी असा वर सांगितलेला उग्रायुध हा झाला. याच्या पराक्रमाने पृषत राजाचा आजा जो पांचालाधिपति राजा नीप हा गतप्राण झाला. या उग्रायुधाला क्षेम्य नांवाचा मोठा लौकिकवान पुत्र झाला. क्षेम्याला पुढें सुवीर, सुवीराला पुढें नृपंजय व नृपंजयाला बहुरथ. हे सर्व राजे पुरुकुलोत्पन्न होत. असो; हा उग्रायुध जेव्हां अति माजला, तेव्हां त्याला वाईट वाईट बुद्धि सुचू लागली; त्यानें आपले सैन्य वाढवून नीप-कुलाचा व इतर अनेक राजांचा धुव्वा उडविला; इतकेंच करून न थांबता आमचे बाबा वारल्यावर त्यानें मस्तींत येऊन मला एक फारच वाईट गोष्ट ऐकविली; तो वृत्तांत असा: मी बाबा मेल्यावर एक दिवस माझे सोबत्यांना भोवताली घेऊन सहज धरणीवर निजलों असतां एकाएकीं या उग्रायुधाचा दूत आंत येऊन त्यानें आपल्या धन्याचा निरोप मला कळविला; तो हा -
 
 "हे भीष्मा, तुझा बाप मेला आहे, तुझी आई जी गंधकाली (सत्यवती) हिचा रूपाविषयी मोठा लौकिक आहे. स्त्रियांमध्यें ती केवळ रत्नच आहे. तेव्हां अशीला आपली भार्या करावी अशी अस्मादिकांची तबियत लागली आहे. तरी, हे कुरुश्रेष्ठा, तुमच्या आईला या कामासाठीं मजकडे पाठवून द्यावी. असें सांगण्याचा माझा हक्क काय म्हणशील तर आजकाल या धरणीतलावर जी जी रत्ने म्हणून आहेत त्यांचा वाटेकरी मीच आहे; करितां हें स्त्रीरत्नही मलाच योग्य आहे. इतकी माझी मागणी तूं मान्य केलीस म्हणजे तुला कांहीं कमी नाहीं. तूं ढेकर देशील इतकी पुष्कळ दौलत व वाटेल तितके विस्तीर्ण राज्य ही मी तुला खुषीनें देईन, ही खात्री ठेव. मला आजकाल दुर्घट असें कांहींच नाहीं. माझ्या हातीं जे हे प्रज्वलित चक्र आहे हें इतकें अजिंक्य आहे कीं, रणांगणीं तें दृष्टीस पडतांच शत्रू सैरावैरा पळूं लागतात, ही गोष्ट तूं ध्यानांत घे; आणि तुझें राष्ट्र, तुझे प्राण व तुझे कुल ही सुरक्षित राहावी अशी जर तुझी इच्छा असेल तर मुकाटयाने माझ्या आज्ञेत तूं वाग; असें न करशील तर तुला शांति म्हणून कशी ती मिळूं देणार नाही."
 
 हे धर्मा, मी भूमीवर दर्भासनावर लटकलों असतां त्या उग्रायुधानें आपल्या त्या दूताला मध्ये करून अग्नीच्या ज्वालेप्रमाणें तीव्र असे हे शब्द माझ्या कानी पाडिले. हे धर्मनिष्ठा, त्या वेळीं मीं त्या नीचाचा अभिप्राय काय तो ध्यानी आणून युद्धार्थ सज्ज होण्याविषयी माझ्या सर्व सेनाधीशांना आज्ञा केली. मला इतक्या चिडीला येण्याला असें कारण झालें कीं, माझ्या मातेचा पुत्र जो विचित्रवीर्य तो अद्यापि केवळ लहान असून सर्वथा माझ्या आश्रयावर अवलंबून होता. त्याकडे पाहून मला त्या हलकटाचा (उग्रायुधाचा) इतका संताप आला कीं, युद्ध करून त्याची हाडे मोडावी, यापलीकडे मला दुसरी कोणतीही गोष्ट सुचेना. परंतु, त्या वेळीं माझे भोंवतीं सल्लामसलतींत कुशल असे माझे सचिव बसले होते, तसेच साक्षात वेदस्वरूप असे माझे ऋत्विज बसले होते, व माझें खरें हित कशात आहे तें जाणणारे माझे जिव्हाळ्याचे स्नेही बसले होते. त्या सर्वांनी मला युद्धापासून निवृत्त होण्याविषयीचा आग्रह केला. ते सर्वच शास्त्रज्ञ असून माझ्या प्रेमातले असल्यानें मला त्यांचें ऐकावे लागलें. शिवाय त्यांनीं आपल्या म्हणण्याला सयुक्तिक कारणें काय तीही मला ऐकविली. माझे मंत्री म्हणाले, हा पापी उग्रायुध सैन्य घेऊन ठेपला, ही गोष्ट खरी; आपण अजून वडिलांचे सुतकांतच आहां, मोकळे झाला नाहीं. शिवाय घे म्हणल्या युद्धाला उठणे ही राजकारणी पुरुषांच्या दृष्टीने कांहीं अव्वलप्रत मसलत नव्हे. साम, दान, भेद, इत्यादि युद्धेतर सौम्य उपाय आहेत ते आम्ही प्रथम चालवून पाहातो. तोपर्यंत आपणही सुतक फिटून शुद्ध व्हाल. मग देवतांना वंदन करून, स्वस्तिवाचन करून, ब्राह्मणांकडून अग्नीत होम देऊन, ब्राह्मणांची पूजा करून व त्यांची आज्ञा संपादून आपण विजयार्थ बाहेर पडावे. कारण, जोंपर्यत कोणाही राजाला अशौच आहे तोपर्यंत त्यानें रणात शिरू नये किंवा अस्त्रप्रयोगही करूं नये, अशी वृद्धांची आज्ञा आहे. आमच्या मते आपण प्रथम सामानें किंवा दानानेच त्याला गप्प कराल. तितकेच न साधलें तर भेदाने, आणि हे सारेच उपाय हुकले तर पराक्रम करून मारणे हेही आपणाला कठीण नाहीं. इंद्राने शंबराला ज्याप्रमाणें तेव्हांच चिरडून टाकले त्याप्रमाणें आपणही यास केव्हांच चिरडाल. त्याची कथा काय !
 
 भीष्म म्हणाले - राजा युधिष्ठिरा, असें आहे कीं, आणीबाणीचे प्रसंगीं विशेष जाणत्या लोकांचा व त्यातूनही वयोवृद्धांचा उपदेश ऐकावा. तेव्हां हें तत्त्व ध्यानांत आणून मीं माझ्या मंत्र्यांचे सांगीप्रमाणें युद्धाचा विचार तूर्त सोडून दिला. माझे मंत्री राजकार्यकुशलच होते. त्यांनीं तत्काल उत्तम उत्तम उपाय चालू केले. प्रथम शहाण्या शहाण्यांच्या विचारास आलें त्या त्या रीतींनी साम, दाम, इत्यादिकांचीं बोलणी लावून त्या उग्रायुधाला वाटेवर आणण्याचा उपाय केला. परंतु, खराखुराच नीचबुद्धि तो ! तो असल्या उपायांनी कशाचा वळणावर येणार ? त्यानें कांहीं न ऐकता घमेंडींतच आपल्या हातांत असलेले सुदर्शनासारखे तें जाज्वल्य चक्र आम्हांवर फेकले. परंतु, चमत्कार काय सांगावा कीं, तें तत्काल परत फिरले. कारण, त्या पातक्यानें दुसर्याची स्त्री हरण करण्यासारख्या नीच हेतूनें तें सोडले असतां, तें चालावे कसें ? बाकी त्याचें तें चक्र त्यानें गुरूनें सांगितलेली मर्यादा सोडून जेव्हां भलत्याच कामी सोडलें तेव्हांच तें फुकट गेलें, असें मी समजून चुकलो होतों. तसेंच भल्याभल्यांनीं त्या दुष्टाची त्याच्या या कृतीबद्दल निंदा केली असल्यामुळें तो आपले कर्मानेंच मेला आहे, हेंही मी समजून होतों. तथापि, लोकाचाराप्रमाणें माझें सुतक फिटल्यावर मीं विप्रांकडून आशीर्वाद संपादून धनुष्यबाण घेऊन रथांत बसून शहराबाहेर पडून शत्रूंशी भिडलों. नंतर हातझोंबीला येऊन एखाद्या बेहोष झालेल्या माणसाप्रमाणें शत्रूचा व माझा सतत तीन दिवस अंगबल व अस्त्रबल यांचा झगडा सुरू राहिला. तो इतका भयंकर कीं, त्याला एक देवासुरांचेच युद्धाची उपमा योग्य. अखेरीस मीं माझ्या अस्त्रतेजानें अगदीं भाजून काढिला, तेव्हां, हे धर्मा, तो इतका शूर खरा, तथापि, प्राण सोडून माझ्या समोरच तेथल्यातेथेच रणांगणांत पडला. इतक्या अवकाशांत म्हणजे नीप राजा व हा उग्रायुध हे नाहींसे होत आहेत तो पृषत राजा हा कांपिल्य नगरीला येऊन पोंचला; व त्यानें आपलें वडिलार्जित जें अहिछत्र नगरीचें आसपासचें राज्य ते सर्व काबीज केलें. हा पृषत म्हणजे द्रुपदाचा बाप. हा तेव्हां माझ्या तंत्रानें वागत असे. याचे हें राज्य पुढें अर्थातच द्रुपदाकडे आलें. परंतु कांहीं कालाने अर्जुनानें बाहुबलाने द्रुपदाला रणांत जिंकून कांपिल्य नगरीसकट तो सर्व अहिछत्र प्रांत द्रोणाला अर्पण केला. विजयी द्रोणांनी शिष्याच्या त्या देणगीचा सादर स्वीकार तर केलाच; पण, त्यांतून कांपिल्यनगरी त्यानें द्रुपदाला परत दिली, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. हे धर्मा, याप्रमाणे मी तुला ब्रह्मदत्त, द्रुपद व वीर उग्रायुध यांच्या वंशांची सविस्तर हकीकत सांगितली.
 
 धर्मराजा विचारतो, 'हे गांगेया; तुम्ही पूजनीया म्हणून जी पक्षिणी सांगितली ती बहुत दिवस ब्रह्मदत्ताच्या घरांत राहात असून असल्या थोर राजाच्या ज्येष्ठ पुत्राचे डोळे फोडून त्याला आंधळे करणें असलें वाईट काम तिने कशासाठी केलें ? तसेंच पांखराचा तो एवढा स्नेह राजाशी कसा पडावा, हेंही मला एक गूढच आहे. तेव्हां या कामीं सर्व कच्ची हकीकत सांगून आपण माझा संशय दूर करा.
 
 भीष्म म्हणतात - ठीक आहे. यासंबंधात ब्रह्मदत्ताचे घरीं कोणकोणत्या गोष्टी कसकशा घडल्या, तें सर्व मी तुला सांगतों तें ऐक. हे राजा, ब्रह्मदत्ताच्या घरांत एक चिमणी बहुत दिवस घरटे करून होती. ही चिमणी मोठी देखणी होती; हिचे पंख शुभ्र असून हिचे डोके लाल होतें व पाठ आणि पोट यांचा रंग कबरा होता. हिची आणि ब्रह्मदत्ताची फारच गट्टी जमली. ती इतकी कीं, ती त्याची एकजातीची प्रियसखीच म्हणावी. राजवाडयासारख्या उत्तम स्थळीं तिनें घरटें केलें होतें. तेथून ती रोज दिवसास बाहेर जाऊन समुद्रतीर, डबकी, सरोवरे, नद्या, पर्वत, लताकुंज, बनें, बागा, कल्हारपुष्पांच्या सुवासाने भरून गेलेले, प्रसन्न दिसणारे, कमोद, कमळें इत्यादिकाचें पराग उडून ज्यांचे आसपासची हवा सुगंधमय झाली आहे, व जेथे कारंडव पक्षी ओरडत आहेत व हंस आणि पाणबदकें यांचे शब्द चालू आहेत अशा तलावांचे कांठीं चरून फिरून रात्र पडण्याचे वेळेस कांपिल्य नगरींत ज्ञात्या ब्रह्मदत्त राजाच्या राजमंदिरास परत येई. आल्यावर रात्री मग स्वस्थपणीं आपण दिवसास फिरावयास गेलेल्या नानास्थलीं ज्या ज्या आश्चर्यकारक वस्तु पाहिल्या असतील किंवा गोष्टी अवलोकनांत आल्या असतील त्यासंबंधी ही चिमणूबाई राजाशी चटामटा गोष्टी करीत बसे. असा क्रम चालला असतां त्या ब्रह्मदत्त राजाला, हे राजव्याघ्रा, एक पुत्र झाला.
 
 याचे नांव सर्वसेन असें ठेविले होतें. याच सुमारास त्या पूजनीयेनेंही एक अंडे घातले व तत्पूर्वी तिने आपल्या कोठ्यांत एक घालून ठेविले होतें, तें या वेळीं फुटले. फुटताच त्यांतून एक मांसाचा लोळा बाहेर आला. या लोळ्याला हात, पाय व चोंच इतके अवयव आले होते. चोंचीचा वर्ण पिंगट होता. अजून डोळे नव्हते (उघडले नव्हते), मग पुढें कांहीं दिवसांनीं त्याला डोळे आले व नंतर थोडया थोडया पांखरडया फुटूं लागल्या. राजपुत्रही दिवसेंदिवस वाढू लागला. चिमणीही आपलें पिलू व राजाचा पुत्र यांवर सारखीच प्रीति करूं लागली. रोज संध्याकाळीं चरून परत येतांना ती आपला पुत्र व राजपुत्र ह्यासाठी म्हणून दोन अमृततुल्य मधुर फळें चोंचींत धरून घेऊन येत असे. तीं फळें खाऊन दोघेही छोकरे खूष होऊन जात. त्या पोरांना तीं फळें खाण्याची चटकच लागून गेली. चिमणी बाहेर उडून गेली म्हणजे राजपुत्राची जी दाई असे ती त्या चिमणीच्या पिलाला बाहेर घेऊन राजपुत्राला त्याशीं खेळवीत असे. एक दिवस दाईच्या नजरेआड राजपुत्रानें खेळ खेळतां तें चिमणीचें पिल्लू मानेला बळकट आंवळून धरिलें. राजपुत्राची चिकाटी मोटी बळकट, कांहीं केल्या सुटेना. मोठया मुष्किलीने त्याची ती मूठ उकलावी लागली. बाकी उकलून कांहीं फळ झालें नाहीं. चिमणीच्या पोरानें अगोदरच प्राण सोडले होते, मग तें आ वासून व गतप्राण होऊन पडलेलें चिमणीचें पोर पाहून राजाला फार दुःख झालें. विशेषतः आपल्या मुलाचे हातून असली गोष्ट झाली, हें ध्यानांत येऊन त्यानें ढळढळ अश्रू ढाळिले; व जिच्या उपेक्षेमुळें राजपुत्राचे हातून असलें कृत्य झालें त्या दाईची त्यानें यथास्थितच खरड काढिली. तथापि झाली गोष्ट ती झालीच. राजा त्या दिवशीं सायंकाळपर्यंत त्या पोराबद्दल विलाप करीतच राहिला. इतक्यांत ती बिचारी चिमणी रानभर फिरून नित्याप्रमाणें दोन फळें घेऊन ब्रह्मदत्ताचे घरीं आली. घरीं येऊन पाहाते तों आपला पोटचा गोळा पंचमहाभूतांनी सोडल्यामुळें (मेल्यामुळें) मोठया शोचनीय स्थितींत पडला आहे. त्याला पाहातांच प्रथम तिला मूर्च्छा आली. नंतर कांहीं वेळाने शुद्धीवर आल्यावर बापडी अतीच विलाप करूं लागली. ती म्हणाली, 'बाळ, कायरे हें ! मी आज बाहेरून आलें व तुला साद घातली तथापि तूं आपल्या गोड व अस्फुट वाणीनें लाडके लाडके चिंव चिंव शब्द करीत करीत मजभोंवतीं रांगत रांगत कसा रे येत नाहीस ? रोजचा पाठ म्हटला म्हणजे मी घरीं येतें आहें तें तुला भूक लागली असल्यामुळें तूं आपलें तें पिंवळें पिंवळें चंचुपुट आतील लांल टाळे दृष्टीस पडे इतकें ताणून भक्ष्यग्रहणार्थ मजपाशीं यावयाचा, परंतु, आज इतका वेळ जाऊनही कसा येईनास ? मी रोज बाहेरून आलें म्हणजे तूं चिंवचिंव करीत मजकडे आलास म्हणजे तुला पंखांखाली घेऊन मी प्रेमभराने ओरडत असें, पण आज मुळीं तुझें तें गोड चिंवचिंवणेंच ऐकूं येत नाहीं, हें काय ? बाळ रे, आज मी रानांतून परत निघालें तेव्हां मला आशा वाटत होती कीं, मी येतें तो आपले पंख हालवीत आपलें तोंड उघडून "आई मला तहान लागली पाणी दे" म्हणून तूं मजपुढें येशील; परंतु, ती माझी आशा सर्वथा विफल झाली. कारण, तूं मुळीच रस्ता धरिलास ! आतां काय करूं ?"
 
 याप्रमाणें बहुत प्रकारे विलाप करून ती राजाला म्हणाली, "हे राजा, तूं यथाशास्त्र अभिषेक करून गादीवर आलेला राजा आहेस, कोणीतरी नव्हेस. अर्थात तुला आपल्या सनातन धर्माची चांगलीच माहिती असली पाहिजे, असें असून आपल्या दाईच्या हातीं माझ्या पोराचा घात करविलास हें काय ? तुझ्या पोरटयाने माझें लेकरू मान मुरगळून मारिलें. ही गोष्ट हे क्षत्रियाधमा, तुझ्या घरांत संभवली कशी, हें मला नीट सांग. तूं एवढा मोठा शहाणा म्हणवितोस तर "शरण आलेला, भुकेलेला, शत्रूंनी वेढलेला व बहुत दिवस आपल्या घरीं राहिलेला अशांचे रक्षणच केलें पाहिजे; जे न करितील ते निःसंशय कुंभिपाक नरकाला जातील." अशा अर्थाची जी अंगिरसाची श्रुति आहे ती तुझ्या कानी नाहीं काय ? अरे, असल्यांची उपेक्षा करणारे अधमाचे हातून देवांनी हविर्भाग कसा घ्यावा, किंवा पितरांनी स्वधाकार तरी कसा घ्यावा ?"
 
 हे राजा, याप्रमाणें राजाशी बोलून ती चिमणी अतिशोकानें केवळ अविचारी बनली; व त्या तडाक्यांत तिने त्या अल्पवयी राजकुमाराचे डोळे आपल्या पायाच्या नख्यांनी ओरबाडिले. पुढें ते डोळे फुटले. याप्रमाणे राजपुत्राला आंधळा करून ही चिमणी आकाशांत उडून जाऊं लागली. इतक्यांत राजानें आपल्या पुत्राची झालेली स्थिति पाहून तिला म्हटलें कीं, "हे कल्याणि, माझ्या पुत्राचे तूं डोळे फोडलेस, फार चांगले केलेंस, आतां भिऊं नको. आतां तर तुझें दुःख दूर झाले ना ? मग आतां कां येथून जातेस ? जाऊं नको. तुझे मन शांत झालें; तर आतां परत फीर. आपली मैत्री पूर्वी होती तशीच चालूं दे, तिचा नाश होऊं देऊं नको; पूर्वी जशी होतीस तशीच सुखानें माझे घरांत रहा. चल परत फीर, आणि चैनींत अस. माझ्या पोराला तूं क्लेश दिलेस म्हणून माझा काही तुझ्यावर राग नाहीं. तूं माझी मैत्रीण आहेस. देव तुझे कल्याण करो. तूं माझ्या पोराचे डोळे फोडलेस खरे, पण त्यांत जें ओघाला आलें तेंच तूं केलेस; त्यांत तुझ्याकडे काय दोष ?
 
 पूजनीया म्हणाली - "हे राजसिंहा, तूं जरी किती शांतीच्या गोष्टी सांगितल्यास तरी आपलेवरून जग ओळखावे, अशी म्हण आहे, त्याप्रमाणे मला नुकताच पुत्रशोकाचा अनुभव आला आहे, त्यावरून तुझ्या प्रिय पुत्राच्या स्थितीबद्दल तुला किती दुःख होत असेल, याची कल्पना मला तूं न सांगतांही पुरापूर आहे. याकरितां तुझ्या पुत्राचे डोळे फोडण्यासारखें दुष्कृत्य करून पुन्हा मी तुझ्याच घरांत दृष्टीसमोर राहावें, ही गोष्ट मला संमत नाहीं, शिवाय मी जें म्हणतें या म्हणण्याला शुक्राचार्यांच्या नीतींतील वचनांचा आधार आहे. तीं वचने मी म्हणून दाखवितें तीं ऐक. ती अशीं -
 
 १. कुमित्र, कुदेश, कुराजा, कुमैत्री, कुपुत्र व कुभार्या यांस दुरूनच टाळावी. कारण, कुमित्राचे ठिकाणीं खरा स्नेह होत नाही; कुभार्येचे ठिकाणीं सुखभोग होत नाहीं; कुपुत्राचे हातून पिंड मिळत नाहीं; कुराजाच्या अमलांत सत्याला थारा नाहीसा होतो. जेथे खोटया माणसाशीं स्नेह आहे तेथें खर्या विश्वासाला आधार नसतो; कुदेशांत उपजीविकेची मारामार पडते; राजा दुष्ट असला म्हणजे प्रजेच्या जीवाला सदा धाकधूक असते; व पोटचा पोर व वाईट निघाला म्हणजे आई बापांना सर्व बाजूंनीच सुखाचा अभाव होतो.
 
 २. जो नीच मनुष्य आपल्यावर उपकार करणार्याही मनुष्यावर एखाद्या अनाथ दुबळ्याप्रमाणें भार टाकतो, त्याचा लौकरच नाश होतो.
 
 ३. ज्याचा आपल्या ठिकाणी विश्वास नाहीं त्यावर मुळीच विश्वास ठेवू नये; व ज्याचा विश्वास आहे अशांवर तरी फाजील विश्वास टाकूं नये. कारण, प्रसंगवशात विश्वासू माणसालाच दगा करण्याची बुद्धि झाली तर तो आपणांस मुळापाळांसकट उखडून काढील.
 
 ४. जो मूर्ख मनुष्य राजाचे सेवक किंवा ज्याचे बीजाविषयीं घोंटाळा आहे, असल्या जातीवर विश्वास ठेवून वागतो त्याचा जीव धोक्यांत आहे, असें समजावे.
 
 ५. मी राजाचे मर्जीतला आहें, मला कसलें भय आहे, असें कोणीही मानू नये. कारण राजेसाहेबांची मर्जी खप्पा होऊन मनुष्य मुंगळ्यासारखा केव्हां चिरडला जाईल याचा कांहीं विश्वास नसतो.
 
 ६. शहाण्या मनुष्याची गोष्ट अशी आहे कीं, ज्याप्रमाणें एखादी कोमल अल्पवल्ली एखाद्या महावृक्षाच्या कवेंत राहूनच त्याला पाडिते, त्याप्रमाणें तो वरून नरमपणा दाखवून व अंग चोरून वागूनच शत्रूला पालथा पाडतो.
 
 ७. ज्याप्रमाणें मुंग्यांचे वारूळ प्रथम झाडाचे बुडांत उत्पन्न होतें, तेव्हां तें मऊ, ओलें व अल्प असतें, परंतु पुढें त्या वृक्षाची मुळें खाऊन टाकिते; त्याप्रमाणे लबाड शत्रु प्रथम बाह्यांगीं मोठा दुर्बळ, मृदु व आर्द्र (स्नेहल) असा दिसून हळूहळू आपल्या पोटांत शिरतो आणि अखेरीस आपला घात करितो. हे राजा, राजकीय विषयांत भले भले दगलबाजी करितात. यांचें प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंद्राचे. यानें मुनींच्या समक्ष मी तुझा नाश करीत नाहीं, असा नमूचीला विश्वास देऊन अखेर पाण्याच्या फेसाखाली आपलें वज्र दडवून त्याला नुसते फेंसानें ठार केले.
 
 सारांश, वैरी म्हटला म्हणजे तो, मनुष्य निद्रिस्त आहे हें पाहात नाहीं. तो निशेंत आहे किंवा गैरसावध आहे, हें पाहात नाहीं; आणि वाटेल त्या उपायांनी - विषप्रयोगानें म्हणा, आग घालून म्हणा, किंवा साधल्यास शस्त्रानें किंवा ठकबाजीनें - त्याचा घात करितो, व त्याची मुळी शिल्लक राहिल्यास अंकुरित होऊन पुन्हा आपणांस त्रास देईल, यास्तव त्याचा उच्छेद करतो, काहीही शिल्लक उरूं देत नाही. कारण, शत्रुशेष, ऋणशेष व अग्निशेष ही पुनरपि वाढतात. यास्तव शहाण्याने तीं शिल्लक ठेवूं नयेत, हा दाखला त्यांचे ध्यानांत असतो. लबाड शत्रु आपले बरोबर हंसतो, अघळपघळ बोलतो, एका बैठकीवर बसतो व एका ताटांत जेवतो देखील. पण हें सर्व करितांना त्याची पापबुद्धि कायम असते. एकदा शत्रुत्व उत्पन्न झालें म्हणजे मग तो शत्रु आपला शरीरसंबंधी असला तरीही त्यावर विसंबू नये. कारण, इंद्राने लढाईत प्रत्यक्ष आपला सासरा म्हणजे बायकोचा बाप जो पुलोमा त्याला ठार केलें.
 
 मनांत वैरभाव ठेवून जो मनुष्य वरवर गोड बोलतो त्याच्याजवळ जाणें म्हणजे हरिणानें फांसेपारध्याजवळ जाण्यापैकींच आहे. ज्याच्या मनांत आपल्याविषयीं काळें आलें असल्या बलाढय शत्रूच्या आश्रयाला कधीही राहू नये. कारण, नदीचा वेगवान ओघ कांठाच्या वृक्षाला ज्याप्रमाणें खणून काढितो, त्याप्रमाणें तो आपला नाश करितो. शत्रूपासून जरी आपण उदयांस आलों असलो तरी त्यावर भरंवसा ठेवूं नये. कारण, ज्याप्रमाणें एखादा किडा पंख फुटल्याच्या आनंदाने वर उडी मारावयास जातो, परंतु इतक्यांत पक्ष्यांची नजर त्याजवर जाऊन ते त्याला ठार मारतात, त्याप्रमाणें अवस्था होते.
 
 याप्रमाणे शुक्राचार्यांनी आपल्या नीतीत ही जी अनेक बोध-वाक्यें लिहिली आहेत, ती, हे भूपाला, ज्या सुज्ञ पुरुषाला आपण सुरक्षित नांदावे अशी इच्छा असेल त्यानें मनांत धरावी. मी तर तुझ्या साक्षात पुत्राचे डोळे फोडण्यासारखें अतिदारुण पाप केलें आहे, तेव्हां आतां तुझ्यावर विश्वास ठेवून तूं म्हणतोस तसें तुझ्या घरांत स्वस्थ राहाणे माझ्या हातून होणार नाहीं." असें म्हणून ती चिमणी आकाशांत उडून गेली.
 
 भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, राजा ब्रह्मदत्त व पूजनिया चिमणी यांचा घडलेला वृत्तांत मीं तुला सांगितला. आतां तुला श्राद्धाची माहिती पाहिजे आहे तर तिजसाठीं पूर्वी सनत्कुमारांनी मार्कंडेयाचे प्रश्नावरून त्याला एक जुनाट इतिहास सांगितला होता, तो मी तुला सांगतो. आपले हातून पुण्य घडावे व आपणांस श्राद्धाचे फल मिळावें, अशा उद्देशाने वागणारे योगनिष्ठ ब्रह्मचारी जे गालव, कंडरीक व ब्रह्मदत्त, या तिघांचे सातवे जन्मांत हा इतिहास घडलेला आहे.
 
 
 इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पूजनीयोपाख्याने  चटकोपाख्यानं नाम विंशोऽध्यायः  ॥ २० ॥
 अध्याय विसावा समाप्त
 GO TOP 
 
 |