श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
त्रयोदशोऽध्यायः


त्रिशङ्कुचरितम् -

वैशम्पायन उवाच
सत्यव्रतस्तु भक्त्या च कृपया च प्रतिज्ञया ।
विश्वामित्रकलत्रं तद् बभार विनये स्थितः ॥ १ ॥
हत्वा मृगान् वराहांश्च महिषांश्च वनेचरान् ।
विश्वामित्राश्रमाभ्याशे मांसं वृक्षे बबन्ध सः ॥ २ ॥
उपांशुव्रतमास्थाय दीक्षां द्वादशवार्षिकीम् ।
पितुर्नियोगादवसत् तस्मिन्वनगते नृपे ॥ ३ ॥
अयोध्यां चैव राष्ट्रं च तथैवान्तःपुरं मुनिः ।
याज्योपाध्यायसंबन्धाद् वसिष्ठः पर्यरक्षत ॥ ४ ॥
सत्यव्रतस्तु बाल्याच्च भाविनोऽर्थस्य वा बलात् ।
वसिष्ठेऽभ्यधिकं मन्युं धारयामास वै तदा ॥ ५ ॥
पित्रा हि तं तदा राष्ट्रात् त्यज्यमानं स्वमात्मजम् ।
न वारयामास मुनिर्वसिष्ठः कारणेन ह ॥ ६ ॥
पाणिग्रहणमन्त्राणां निष्ठा स्यात् सप्तमे पदे ।
न च सत्यव्रतस्तस्य तमुपांशुमबुद्ध्यत ॥ ७ ॥
जानन्धर्मं वसिष्ठस्तु न मां त्रातीति भारत ।
सत्यव्रतस्तदा रोषं वसिष्ठे मनसाकरोत् ॥ ८ ॥
गुणबुद्ध्या तु भगवान् वसिष्ठः कृतवांस्तथा ।
न च सत्यव्रतस्तस्य तमुपांशुमबुध्यत ॥ ९ ॥
तस्मिन्नपरितोषो यः पितुरासीन्महात्मनः ।
तेन द्वादश वर्षाणि नावर्षत् पाकशासनः ॥ १० ॥
तेन त्विदानीं वहता दीक्षां तां दुर्वहां भुवि ।
कुलस्य निष्कृतिस्तात कृता सा वै भवेदिति ॥ ११ ॥
न तं वसिष्ठो भगवान् पित्रा त्यक्तं न्यवारयत् ।
अभिषेक्ष्याम्यहं पुत्रमस्येत्येवं मतिर्मुनेः ॥ १२ ॥
स तु द्वादश वर्षाणि दीक्षां तामुद्वहद् बली ।
उपांशुव्रतमास्थाय महत्सत्यव्रतो नृप ॥ १३ ॥
अविद्यमाने मांसे तु वसिष्ठस्य महात्मनः ।
सर्वकामदुघां दोग्ध्रीं ददर्श स नृपात्मजः ॥ १४ ॥
तां वै क्रोधाच्च मोहाच्च श्रमाच्चैव क्षुधार्दितः ।
दशधर्मान्गतो राजा जघान जनमेजय ॥ १५ ॥
तच्च मांसं स्वयं चैव विश्वामित्रस्य चात्मजान् ।
भोजयामास तच्छ्रुत्वा वसिष्ठोऽप्यस्य चुक्रुधे ।
क्रुद्धस्तु भ्गवान् वाक्यमिदमाह नृपात्मजम् ॥ १६ ॥
वसिष्ठ उवाच
पातयेयमहं क्रूर तव शङ्कुमसंशयम् ।
यदि ते द्वाविमौ शङ्कू न स्यातां वै कृतौ पुनः ॥ १७ ॥
पितुश्चापरितोषेण गुरोर्दोग्ध्रीवधेन च ।
अप्रोक्षितोपयोगाच्च त्रिविधस्ते व्यतिक्रमः ॥ १८ ॥
वैशंपायन उवाच
एवं त्रीण्यस्य शङ्कूनि तानि दृष्ट्वा महातपाः ।
त्रिशङ्कुरिति होवाच त्रिशङ्कुरिति स स्मृतः ॥ १९ ॥
विश्वामित्रस्तु दाराणामागतो भरणे कृते ।
स तु तस्मै वरं प्रादान्मुनिः प्रीतस्त्रिश्ङ्कवे ॥ २० ॥
छन्द्यमानो वरेणाथ वरं वव्रे नृपात्मजः ।
सशरीरो व्रजे स्वर्गमित्येवं याचितो मुनिः ॥ २१ ॥
अनावृष्टिभये तस्मिन् गते द्वादशवार्षिके ।
राज्येऽभिषिच्य पित्र्ये तु याजयामास तं मुनिः ॥ २२ ॥
मिषतां देवतानां च वसिष्ठस्य च कौशिकः ।
सशरीरं तदा तं तु दिवमारोपयत् प्रभुः ॥ २३ ॥
तस्य सत्यरथा नाम भार्या कैकेयवंशजा ।
कुमारं जनयामास हरिश्चन्द्रमकल्मषम् ॥ २४ ॥
स वै राजा हरिश्चन्द्रस्त्रैशङ्कव इति स्मृतः ।
आहर्ता राजसूयस्य स सम्राडिति विश्रुतः ॥ २५ ॥
हरिश्चन्द्रस्य पुत्रोऽभूद् रोहितो नाम वीर्यवान् ।
येनेदं रोहितपुरं कारितं राज्यसिद्धये ॥ २६ ॥
कृत्वा राज्यं स राजर्षिः पालयित्वा त्वथ प्रजाः ।
संसारासारतां ज्ञात्वा द्विजेभ्यस्तत्पुरं ददौ ॥ २७ ॥
हरितो रोहितस्याथ चञ्चुर्हारीत उच्यते ।
विजयश्च सुदेवश्च चञ्चुपुत्रौ बभूवतुः ॥ २८ ॥
जेता क्षत्रस्य सर्वस्य विजयस्तेन संस्मृतः ।
रुरुकस्तनयस्तस्य राजधर्मार्थकोविदः ॥ २९ ॥
रुरुकस्य वृकः पुत्रो वृकाद् बाहुस्तु जज्ञिवान् ।
शकैयवनकाम्बोजैः पारदैः पह्लवैः सह ॥ ३० ॥
हैहयास्तालजङ्घाश्च निरस्यन्ति स्म तं नृपम् ।
नात्यर्थं धार्मिकस्तात स हि धर्मयुगेऽभवत् । ३१ ॥
सगरस्तु सुतो बाहोर्जज्ञे सह गरेण च ।
और्वस्याश्रममागम्य भार्गवेणाभिरक्षितः । ॥ ३२ ॥
आग्नेयमस्त्रं लब्ध्वा च भार्गवात् सगरो नृपः ।
जिगाय पृथिवीं हत्वा तालजङ्घान् सहैहयान् ॥ ३३ ॥
शकानां पह्लवानां च धर्मं निरसदच्युतः ।
क्षत्रियाणां कुरुश्रेष्ठ पारदानां स धर्मवित् ॥ ३४ ॥
इति श्री महाभारते खिलेषु हरिवंशपर्वनि
त्रिशङ्कुचरितं नाम त्रयोदशोऽध्यायः


त्रिशंकुचरित्र -

वैशंपायन सांगतातः- मागील अध्यायांत सांगितल्याप्रमाणे विश्वामित्रपुत्राची विक्री बंद केल्यापासून त्या सत्यव्रतानें विश्वामित्रावरील भक्ति, त्याच्या दीन कुटूंबाबद्दल ती अनुकंपा व वसिष्ठाचा इतउत्तर शिष्य न होण्याची प्रतिज्ञा; या तीन कारणामुळे मोठ्या आस्थेने व नम्रपणाने विश्वामित्राच्या कुटुंबपोषणाचा भार आपणावर घेतला. त्यानें रानांतील हरण, डुक्कर, रेडे मारून आणावे व त्यांचें मांस विश्वामित्राची मुलेमाणसे ज्या झोपडीत रहात होतीं त्या झोपडीच्या नजीकच्या वृक्षाला टांगून ठेवावे. बाप निघून गेल्यापासन हा सत्यव्रत कोणाशी न बोलतां मनांतल्यामनांत संकल्प करून बापाचे आज्ञेप्रमाणें बारा वर्षे व्रतस्थ रानांत राहिला. या काळांत अयोध्या नगरी, त्रय्यारुणाचें राज्य व त्याच्या अंतःपुरांतील सर्व स्त्रिया यांचें रक्षण कुलोपाध्याय या नात्याने वसिष्ठ ऋषींनी केलें. पोरपणामुळे म्हणून म्हणा किंवा पुढें कांहीं गोष्ट घडून यावयाची होती तिचे बळाने म्हणा, हा सत्यव्रत वसिष्ठाचा प्रथमपासून तिटकारा करीत असे; त्यांतून बापाने त्याला रानांत हाकलून लाविते वेळीं वसिष्ठाने बापाचे निवारण केलें नाही त्यावरून तर त्याचा त्यावर विशेषच राग झाला; परंतु निवारण न करण्यांत वसिष्ठाचा कांहीं विशेष हेतु होता. तो असा कीं, सत्यव्रताने मागील अध्यायीं सांगितल्याप्रमाणें जरी दुसऱ्याची बायको हिरावून आणली होती, तरी तिचे पाणिग्रहणसमयीं सप्तपदीचे मंत्र पूर्ण होण्याचे पूर्वीच त्यानें ती हरण केली असल्यामुळें वसिष्ठांचे दृष्टीने सत्यव्रत हा परस्त्रीहरणकर्ता नसून फक्त कन्याहरणकर्ताच होता; व या कारणानें तो बारा वर्षे व्रतस्थ राहिल्यास निष्पाप होईल व नंतर त्याला घरांत परत घेता येईल. ह्या मतलबास्तव वसिष्ठ त्याचे आड आले नाहींत; परंतु वसिष्ठांचा गूढभाव सत्यव्रताचे ध्यानी न येऊन वसिष्ठ हे धर्मज्ञ असूनही आपलें परित्राण करीत नाहींत, असें भासून तो त्यांचा मनांत अधिकच राग करूं लागला. खरें पहातां भगवान् वसिष्ठांनी त्याचें कल्याण व्हावें म्हणूनच असें केलें होतें; पण हें सत्यव्रताचे ध्यानांत न आल्यामुळे तो त्यांच्यावर रागावूनच वनांत चालता झाला. मागें त्याचे वर्तनाने त्याचे पित्याचे मनांत जो असंतोष उत्पन्न झाला होता, त्या दोषाने राज्यांत बारा वषें पाऊस पडला नाहीं. रानांत गेल्यावर जें हें तीव्र व्रत सत्यव्रताने वारा वर्षेपर्यंत आचरण केलें, त्यामुळे त्याचे हातून त्याचें कुल शुद्ध होईल, ही गोष्ट वसिष्ठांचे ध्यानी आल्यामुळे व बापाने हाकलून दिल्यामुळें ते त्याच्या आड आले नाहींत; शिवाय वसिष्ठांचा हेतु असा होता कीं, कारण पडल्यास सत्यव्रताचा पुत्र आपण गादीवर बसवूं. परंत रानांत गेल्यापासून सत्यव्रताने आपल्या श्रमाने विश्वामित्र ऋषींचे दीन कुटुंब पोषण करण्याचें महद्‌व्रत एकनिष्ठेने व बिनबोभाट बारा वर्षेर्यंत चालविले.

असे चालले असतां एक दिवस सत्यव्रताला कोठेही मांस म्हणून मिळेना. इतक्यांत मनास येईल ती वस्तु देणारी कामधेनु नांवाची वसिष्ठांची गाय सत्यव्रताचे दृष्टीस पडली. आधीच तो शिकार करून थकला होता, त्यांत भुकेनेही पीडला होता; शिवाय वसिष्ठांवर त्याचा रोंख होताच; खेरीज त्याला भूलही पडली; अशा अनेक गोष्टी एकत्र होऊन त्यानें त्या कामधेनूचा वध केला. नंतर तिचे मांस त्यानें स्वतः खाले व वसिष्ठांच्या मुलासही खाऊ घातले. ही गोष्ट वसिष्ठांच्या कानी जातांच क्रुद्ध होऊन त्या राजपुत्राला म्हणाले, 'हे क्रूरा, ज्या अर्थीं पित्याचा रोष व उपाध्यायाच्या गाईचा वध असे दोन महत्‌पातकरूपी शंकू तुझ्या बोकांडी बसलेलेच आहेत, त्या अर्थी असंस्कृत मांस भक्षणरूप पातकाचा तिसराही शंकू मी तुझे बोकांडी बसवितो !
वैशंपायन सांगतातः- याप्रमाणें त्या सत्यव्रताच्या गळ्यांत अडकलेले हे तीन महापातकरूप शंकू पाहून वसिष्ठ त्याला त्रिशंकू असें म्हणाले व तेव्हांपासून त्रिशंकूच हेंच त्याचें नांव पडलें. असो; कांहीं काळाने विश्वामित्र तपश्चर्येहून परत आले, व आपल्या बायकामुलांचे उदरभरण सत्यव्रताने केलें, हे ऐकून खूष होऊन त्याला म्हणाले, तुला वाटेल तो वर माग. तेव्हां 'मी सदेह स्वर्गास जावे,' असा वर त्याने विश्वामित्राजवळ माागितला. इतक्यांत बारा वर्षाचे अवर्षण नाहीसे झाले; मग विश्वामित्रानें त्रिशंकूला त्याच्या बापाचे राज्यावर नेऊन बसविले, व त्याजकडून एक मोठा यज्ञ आरंभिला; व सर्वदेवता व वसिष्ठ पहात असतां त्यांचे समक्ष त्या समर्थ विश्वामित्राने त्रिशंकूला देहासकट स्वर्गावर चढविले. त्रिशंकूची कैकय वंशातील सत्यरथानामक स्त्री होती, तिचे पोटीं हरिश्चंद्र नांवाचा अत्यंत निष्पाप असा एक पुत्र निपजला. या हरिश्चद्राला त्रैशंकर असेही म्हणत, व याने राजसूय यज्ञ केल्यामुळें याला सम्राट् अशी पदवी मिळाली होती. हरिश्चंद्राला रोहित नांवाचा वीर्यवान् पुत्र झाला. या रोहिताने आपल्या सत्तेचा उत्कर्ष व्हावा म्हणन रोहितपुर म्हणून प्रसिद्ध नगर आहे, तें वसविले. नंतर राजर्षी राहिताने बहुत दिवस प्रजापालन करून राज्य भोगले भोगांती हा सर्व संसार असार आहे, असें त्याचे ध्यानीं येऊन त्यानें आपलें तें नगर ब्राह्मणांना देऊन टाकलें. या रोहिताला हरित नावाचा पुत्र होता. हरिताला चंचु नांवाचा पुत्र झाला. चंचूला पुढें विजय व सुदेव असे दोन पुत्र झाले. पहिल्याला विजय असें नांव पडण्याचे कारण त्यान क्षत्रियमंडळावर जय मिळविला होता. या विजयाला अर्थशास्त्र व राजनीति यांत निपुण असा रुरुक नांवाचा पुत्र होता. रुरूकाला वृक नामक पुत्र झाला. वृकाला पुढें बाहुनामक पुत्र झाला. हा बाहू तसल्या धर्मयुगांत उत्पन्न झाला असूनही फारसा धार्मिक नव्हता. यामुळे शक, यवन, कांबोज, पारद व पल्हव यांचे साह्याने हैहय व तालजंघ या क्षत्रियांनीं त्याला जिंकले. बाहूला सगरनामें पुत्र झाला. याला सगर नांव पडण्याचें कारण असें झाले कीं, तो गर म्हणजे विष यासह जन्मास आला. विषप्रयोग केला असतां हा जिंवत कसा जन्मला याचे उत्तर असे आहे कीं, त्यावेळीं याची आई भृगुकुलोत्पन्न और्वऋषि याचे आश्रमांत गेली, व त्या ऋषीच्या कृपेनें ती व तिचा गर्भ दोन्हीही सुरक्षित राहिली. याच ऋषीपासून पुढे आग्नेयास्त्र प्राप्त होऊन त्याचे बळावर सगरानें सर्व पृथ्वी जिंकली, हैहय तालजंघ यांचा विध्वंस केला; व स्वतः धर्माभिमानी व धर्मवेत्ता असल्यामुळें शुक, पल्हव व पारद यांचे धर्मांचा उच्छेद केला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
त्रिशङ्कुचरितं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
अध्याय तेरावा समाप्त

GO TOP