श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व अष्टमोऽध्यायः
मन्वन्तरगणनायाम् -
जनमेजय उवाच
मन्वन्तरस्य सङ्ख्यानं युगानां च महामते ।
ब्रह्मणोऽह्नः प्रमाणं च वक्तुमर्हसि मे द्विज ॥ १ ॥
वैशम्पायन उवाच
अहोरात्रं भजेत् सूर्यो मानवं लौकिकं परम् ।
तामुपादाय गणनां शृणु संख्यामरिंदम ॥ २ ॥
निमेषैः पञ्चदशभिः काष्ठा त्रिंशत्तु ताः कलाः ।
त्रिंशत्कलो मुहूर्तस्तु त्रिंशता तैर्मनीषिणः ॥ ३ ॥
अहोरात्रमिति प्राहुश्चन्द्रसूर्यगतिं नृप ।
विशेषेण तु सर्वेषु अहोरात्रे च नित्यशः ॥ ४ ॥
अहोरात्राः पञ्चदश पक्ष इत्यभिशब्दितः ।
द्वौ पक्षौ तु स्मृतो मासो मासौ द्वावृतुरुच्यते ॥ ५ ॥
अब्दं द्व्ययनमुक्तं च अयनं त्वृतुभिस्त्रिभिः ।
दक्षिणं चोत्तरं चैव संख्यातत्त्वविशारदैः ॥ ६ ॥
मानेनानेन यो मासः पक्षद्वयसमन्वितः ।
पितॄणां तदहोरात्रमिति कालविदो विदुः ॥ ७ ॥
कॄष्णपक्षस्त्वहस्तेषां शुक्लपक्षस्तु शर्वरी ।
कृष्णपक्षं त्वहः श्राद्धं पितॄणां वर्तते नृप ॥ ८ ॥
मानुषेण तु मानेन यो वै संवत्सरः स्मृतः ।
देवानां तदहोरात्रं दिवा चैवोत्तरायणम् ।
दक्षिणायनं स्मृता रात्रिः प्राज्ञैस्तत्त्वार्थकोविदैः ॥ ९ ॥
दिव्यमब्दं दशगुणमहोरात्रं मनोः स्मृतम् ।
अहोरात्रं दशगुणं मानवः पक्ष उच्यते ॥ १० ॥
पक्षो दशगुणो मासो मासैर्द्वादशभिर्गुणैः ।
ऋतुर्मनूनां संप्रोक्तः प्राज्ञैस्तत्वार्थदर्शिभिः
ऋतुत्रयेण त्वयनं तद्द्वयेनैव वत्सरः ॥ ११ ॥
चत्वार्येव सहस्राणि वर्षाणां तु कृतं युगम् ।
तावच्छती भवेत् सन्ध्या सन्ध्यांशश्च तथा नृप ॥ १२ ॥
त्रीणि वर्षसहस्राणि त्रेता स्यात् परिमाणतः ।
तस्याश्च त्रिशती सन्ध्या सन्ध्यांशश्च तथाविधः ॥ १३ ॥
तथा वर्षसहस्रे द्वे द्वापरं परिकीर्तितम् ।
तस्यापि द्विशती सन्ध्या सन्ध्यांशश्च तथाविधः ॥ १४ ॥
कलिवर्षसहस्रं च संख्यातोऽत्र मनीषिभिः ।
तस्यापि शतिका सन्ध्या सन्ध्यांशश्चैव तद्विधः ॥ १५ ॥
एषा द्वादशसाहस्री युगसंख्या प्रकीर्तिता ।
दिव्येनानेन मानेन युगसंख्यां निबोध मे ॥ १६ ॥
कृतं त्रेता द्वापरं च कलिश्चैव चतुर्युगी ।
युगं तदेकसप्तत्या गणितं नृपसत्तम ॥ १७ ॥
मन्वन्तरमिति प्रोक्तं संख्यानार्थविशारदैः ।
अयनं चापि तत्प्रोक्तं द्वेऽयने दक्षिणोत्तरे ॥ १८ ॥
मनुः प्रलीयते यत्र समाप्ते चायने प्रभोः ।
ततोऽपरो मनुः कालमेतावन्तं भवत्युत ॥ १९ ॥
समतीतेषु राजेन्द्र प्रोक्तः संवत्सरः स वै ।
तदेव चायुतं प्रोक्तं मुनिना तत्त्वदर्शिना ॥ २० ॥
ब्रह्मणस्तदहः प्रोक्तं कल्पश्चेति स कथ्यते ।
सहस्रयुगपर्यन्ता या निशा प्रोच्यते बुधैः ॥ २१ ॥
निमज्जत्यप्सु यत्रोर्वी सशैलवनकानना ।
तस्मिन् युगसहस्रे तु पूर्णे भरतसत्तम ॥ २२ ॥
ब्राह्मे दिवसपर्यन्ते कल्पो निःशेष उच्यते ।
युगानि सप्ततिस्तानि साग्राणि कथितानि ते ॥ २३ ॥
कृतत्रेतानिबद्धानि मनोरन्तरमुच्यते ।
चतुर्दशैते मनवः कीर्तिताः कीर्तिवर्धनाः ॥ २४ ॥
वेदेषु सपुराणेषु सर्वेषु प्रभविष्णवः ।
प्रजानां पतयो राजन् धन्यमेषां प्रकीर्तनम् ॥ २५ ॥
मन्वन्तरेषु संहाराः संहारान्तेषु संभवाः ।
न शक्यमन्तरं तेषां वक्तुं वर्षशतैरपि ॥ २६ ॥
विसर्गस्य प्रजानां वै संहारस्य च भारत ।
मन्वन्तरेषु संहाराः श्रूयन्ते भरतर्षभ ॥ २७ ॥
सशेषास्तत्र तिष्ठन्ति देवाः सप्तर्षिभिः सह ।
तपसा ब्रह्मचर्येण श्रुतेन च समाहिताः ॥ २८ ॥
पूर्णे युगसहस्रे तु कल्पो निःशेष उच्यते ।
तत्र सर्वाणि भूतानि दग्धान्यादित्यतेजसा ॥ २९ ॥
ब्रह्माणमग्रतः कृत्वा सहादित्यगणैर्विभुम् ।
योगं योगीश्वरं देवमजं क्षेत्रज्ञमच्युतम् ।
प्रविशन्ति सुरश्रेष्ठं हरिं नारायणं प्रभुम् ॥ ३० ॥
यः स्रष्टा सर्वभूतानां कल्पान्तेषु पुनः पुनः ।
अव्यक्तः शाश्वतो देवस्तस्य सर्वमिदं जगत् ॥ ३१ ॥
तत्र संवर्तते रात्रिः सकलैकार्णवे तदा ।
नारायणो दधे निद्रां ब्राह्म्यं वर्षसहस्रकम् ॥ ३२ ॥
तावन्तमिति कालस्य रात्रिरित्यभिशब्दिता ।
निद्रायोगमनुप्राप्तो यस्यां शेते पितामहः ॥ ३३ ॥
सा च रात्रिरपक्रान्ता सहस्रयुगपर्यया ।
तदा प्रबुद्धो भगवान्ब्रह्मा लोकपितामहः ॥ ३४ ॥
पुनः सिसृक्षया युक्तः सर्गाय विदधे मनः ।
सैव स्मृतिः पुराणेयं तद्वृत्तं तद्विचेष्टितम् ॥ ३५ ॥
देवस्थानानि तान्येव केवलं च विपर्ययः ।
ततो दग्धानि भूतानि सर्वाण्यादित्यरश्मिभिः ॥ ३६ ॥
देवर्षियक्षगन्धर्वाः पिशाचोरगराक्षसाः ।
जायन्ते च पुनस्तात युगे भरतसत्तम ॥ ३७ ॥
यथर्तावृतुलिङ्गानि नानारूपाणि पर्यये ।
दृश्यन्ते तानि तान्येव तथा ब्राह्मीषु रात्रिषु ॥ ३८ ॥
निष्क्रमित्वा प्रजाकारः प्रजापतिरसंशयम् ।
ये च वै मानवा देवाः सर्वे चैव महर्षयः ॥ ३९ ॥
ते सङ्गताः शुद्धसङ्गाः शश्वद्धर्मविसर्गतः ।
न भवन्ति पुनस्तात युगे भरतसत्तम ॥ ४० ॥
तत्सर्वं क्रमयोगेन कालसंख्याविभागवित् ।
सहस्रयुगसंख्यानं कृत्वा दिवसमीश्वरः ॥ ४१ ॥
रात्रिं युगसहस्रान्तां कृत्वा च भगवान् विभुः ।
संहरत्यथ भूतानि सृजते च पुनः पुनः ॥ ४२ ॥
व्यक्ताव्यक्तो महादेवो हरिर्नारायणः प्रभुः ।
तस्य ते कीर्तयिष्यामि मनोर्वैवस्वतस्य ह ॥ ४३ ॥
विसर्गं भरतश्रेष्ठ सांप्रतस्य महाद्युते।
वृष्णिवंशप्रसङ्गेन कथ्यमानं पुरातनम् ॥ ४४ ॥
यत्रोत्पन्नो महात्मा स हरिर्वृष्णिकुले प्रभुः ।
सर्वासुरविनाशाय सर्वलोकहिताय च ॥ ४५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
मन्वन्तरगणनायामष्टमोऽध्यायः
मन्वंतरगणना -
जनमेजय म्हणतो :- हे महाबुद्धिमंता वैशंपायना, मला आपण मन्वंतरें, युगें व ब्रह्मदेवाचा देव या सर्वांच्या कालगणनेचें प्रमाण कसकसें, तें कृपा करून सांगावें.
वैशंपायन सांगतात :- हे अरिमर्दना, लौकिकांत मनुष्यांचे कालगणनेचें अत्यंत श्रेष्ठ किंवा निर्विवाद माप किंवा मान म्हटलें म्हणजे सूर्याच्या नित्य गतागतानें उत्पन्न होणारा अहोरात्रीचा काल हें होय. हेंच सुप्रसिद्ध प्रमाण घेऊन मी तुला कल्प, युग, ब्रह्मदेवाचा दिवस या सर्वांचा हिशोब सांगतों. प्रथमारंभीं कालमापनाचें अत्यंत अल्प व सर्वांत सहज माप म्हटलें म्हणजे डोळ्याचे पापणीची उघडझांप होण्याला जो काल लागतो तो होय. या कालाला शास्त्रांत निमेष असें म्हणतात. तेव्हां निमेष हे कालमापनाचें लघुतम प्रमाण आपण घेऊं. या मापानें पाहातां अशा पंधरा मापांचा म्हणजे पंधरा निमेषांचा जो काल त्याला एक काष्ठा असें म्हणतात. अशा तीस काष्ठांची एक कला होते. अशा तीस कलांचा एक मुहूर्त होतो व अशा तीस मुहूर्तांचे एक अहोरात्र होतें, असें ज्ञाते लोक मानतात. एक अहोरात्र म्हणजे चंद्रसूर्यांची दैनंदिन गतीची एक फेरी झाली. हें अहोरात्राचे कालमान विशेषतः मेरूच्या म्हणजे विषुववृत्ताच्या आसपासचे जे प्रदेश आहेत त्यांत लागू पडतें. अशीं पंधरा अहोरात्रे लोटलीं म्हणजे त्याला पक्ष म्हणतात. अशा दोन पक्षांच्या कालाला मास असें म्हणतात. असे दोन मास लोटले म्हणजे एक ऋतु होतो; तीन ऋतूंचें एक अयन होतें; व अशा दोन अयनांचें एक वर्ष होतें; आणि वर्षांतील या दोन अयनांपैकीं एकाला दक्षिणायन व दुसर्याला उत्तरायण अशी संज्ञा गणितशास्त्राचें रहस्य जाणणार्यांनी दिली आहे.
या वर दिलेल्या मानानें दोन पक्षांनीं युक्त जो एक मास म्हणजे महिना ते पितरांचें एक अहोरात्र; अथवा आपल्या माणसांचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस असें कालवेत्ते समजतात. या दोन पक्षांतील जो कृष्णपक्ष तो त्यांचा दिवस व आपला शुक्लपक्ष ती त्यांची रात्र; व म्हणूनच हे राजा, पितृश्राद्धें (महालयादि) आपल्या कृष्णपक्षांत म्हणजे पितरांच्या दिवसकाळांतच करावे लागतात. आतां वर सांगितलेल्या मनुष्यांच्या कालगणतीनें जो एक संवत्सराचा काल तेवढयानें देवांचें एक अहोरात्र होतें. पैकीं उत्तरायण तो देवांचा दिवस व दक्षिणायन ती रात्र असें कालाचें रहस्यजाणते जे ज्ञाते त्यांचें मत आहे. हें देवांच्या दिवसाचें मान सांगितलें. अशा मानानें देवांची दहा वर्षें झालीं म्हणजे मनूचें एक अहोरात्र होतें. अशीं दहा अहोरात्रें झालीं म्हणजे मनूचे मापाचा एक पक्ष झाला. असे दहा पक्ष झाले म्हणजे मनूच्या मापाचा एक मास होतो. असे बारा महिने झाले म्हणजे एक ऋतु होतो असें, तज्ञांचे मत आहे. अशा तीन ऋतूंचें एक अयन होतें व अशा दोन अयनांचा एक संवत्सर होतो. या मानाचीं चार हजार वर्षें गेलीं म्हणजे कृतयुगाचा काल पूर्ण होतो, व अशा चारशें वर्षांचा संध्याकाल होतो, व इतकींच म्हणजे चारशें वर्षें संध्यांश असतो. ही कृतयुगाची व्यवस्था झाली. त्रेतायुगाचा काल मनूच्या तीन सहस्त्रवर्षें असतो. या युगाचा संध्याकाल तीनशें वर्षेंपर्यंत व पुनः तितकीच वर्षें संध्यांश असतो. याच हिशोबानें दोन सहस्त्र वर्षांचें द्वापरयुग मानलें आहे. याचा संध्याकाल याच मानानें दोनशें वर्षांचा मानिला आहे व संध्यांश म्हणजे युगाचा अंतकाल हा ही दोनशेंच वर्षें मानिला आहे. याच हिशोबानें कलीची मर्यादा ज्ञात्यांनीं एक सहस्त्र वर्षें गणिली आहे; व याचा संधिकाल या मानाच्या शंभर वर्षांचा असतो, व तितक्याच वर्षांचा संध्यांश असतो. याप्रमाणें हीं युगें मिळून एकंदरींत बाराहजार वर्षांची गणती सांगितली आहे. आतां ह्याच दिव्य म्हणजे देवांच्या कालमापनपद्धतीच्या हिशोबानें तुला युगांचें गणित सांगतों, तें ऐक. कृत, त्रेता, द्वापर व कलि या चार युगांचें एक युग किंवा महायुग होतें. अशा एका युगाची म्हणजे महायुगाची सत्तरपटट केली असतां जो काल होतो, तेवढयाला गणितज्ञान्यांनीं मन्वंतर अशी संज्ञा दिली आहे. मागें जें अयन सांगितलें आहे तेंही याच मापाचें व अशीं अयनें दक्षिण व उत्तर मिळून दोन आहेत; व याला अयन असें माप पडण्याचें कारण, अयन या शब्दाचा मुख्यार्थ गमन किंवा गति असा आहे. यामुळें मनूचें एक अयन होणें म्हणजे मनूचा अंत किंवा लय होणें असाच आहे. एक मनु लय पावला म्हणजे दुसरा प्रकट होतो, तोही तितकाच काल राहातो. याप्रमाणें अनेक मनु लोटतात तेव्हां ब्रह्मदेवाचा एक संवत्सर होतो. आतां अनेक म्हणून जे मोघम सांगितले, त्यांचा बरोबर हिशोब दहा हजार मन्वंतरें म्हणजे एक अहोरात्र असा ज्ञात्यांनीं केला आहे. अर्थात् यांतील निम्मे काल दिवसाचा व निम्मे काल रात्रीचा. ब्रह्मदेवाचा जो दिवस म्हणून सांगितला त्यालाच कल्प अशी संज्ञा आहे. आतां सहस्त्रयुगांची जी ज्ञात्यांनीं रात्र सांगितली ती चालू झाली असतां ही पृथ्वी तिच्यावरील पर्वत, वृक्ष व अरण्यें, यांसह पाण्यांत बुडून रहाते. अशी सहस्त्र युगांची रात्र लोटली म्हणजे ब्रह्मदेवाचें एक अहोरात्र होतें व एका कल्पाचाही शेवट होतो. असल्या युगांचा समग्र इतिहास मी तुला सांगितला. प्रत्येक मन्वंतरांत मागें सांगितलेलें कृतत्रेतादि युगचतुष्क यावयाचेंच. असले हे चौदा मनु मीं तुला सांगितलें. यांच्या संकीर्तनाने यश वाढते; कारण पुराणासहित वेदांतही हे सर्व मनु मोठे समर्थ प्रजापालक झाले व यांचे कीर्तनानें धन्यता प्राप्त होते, असें सांगितलें आहे. एका मन्वंतराची अखेर येऊं लागली म्हणजे सृष्टीचा संहार होऊं लागतो व संहार पूर्ण झाला म्हणजे कांहीं कालानें पुनरुत्पत्ति चालू होते. संहार व पुन- रुत्पत्ति यांच्या मध्यें जो शांततेचा काल असतो त्यावेळीं सृष्टि ब्रह्मांत लीन असते व त्या ब्रह्माचें वर्णन मीं शंभर वर्षें मोडलीं तरी देखील माझे हातून होणें शक्य नाहीं. दर मनूला जी प्रजा म्हणजे जरायुजादि चतुर्विध सृष्टि उत्पन्न होते, तिचा संहार मन्वंतरांतच चालू असतो. मात्र त्या संहारांत त्या मन्वंतराचे रक्षक म्हणून जे देव व सप्तर्षि निर्माण केलेले असतात ते लय पावत नाहींत. ते आपल्या ब्रह्मचर्यानें, विद्वत्तेनें व तपोबलानें तसेच कायम रहातात. परंतु हजार युगें जेव्हां पुरीं होतात तेव्हां कल्पाचा निःशेष अंत होतो. या वेळीं म्हणजे कल्पांतीं चराचर सर्वभूतें द्वादश आदित्यांच्या तेजानें जळून खाक होऊन आदित्यांच्या रूपाला मिळतात, व ते आदित्य ब्रह्माला पुढें करून सर्व संहारकर्ता, शक्तिमान्, सर्वांतर्व्यापी कल्पाकल्पाला पुन्हा पुन्हा भूतसृष्टि निर्माण करणारा, अव्यक्त, सनातन व तेजोमय जो अखिलजगत्स्त्रष्टा परमात्मा नारायण त्यांत लीन होतात. नंतर सर्वत्र एकच जलमय होऊन जातें व रात्र सुरू होते. ही रात्र सुरू झाली म्हणजे हें अखिल ब्रह्मांड ब्रह्मदेवाचीं सहस्त्र वर्षेंपर्यंत नारायणाच्या उदरांत झोंप घेत स्वस्थ पडतें. हा जो निद्रेचा काल यालाच रात्री अशी संज्ञा दिली आहे. या कालीं पितामह ब्रह्मदेव योगनिद्रेंत गर्क असतात. मग अशीही सहस्त्रयुगमानाची रात्र संपली म्हणजे सर्व लोकांचे आजोबा जे भगवान् ब्रह्मदेव ते जागे होतात व पुन्हा सृष्टि करावी अशी त्यांचे मनांत इच्छा उत्पन्न होऊन ते पुन्हा सृष्टीच्या उद्योगाला लागतात. उद्योगाला लागले म्हणजे सृष्टि कोणत्या रीतीनें करावी वगैरे गोष्टींबद्दलची पूर्वकल्पांतील स्मृति त्यांना उपस्थित होते. पूर्वीं काय काय गोष्टी घडल्या, आपण सृष्टीचे कामीं कसकसा यत्न केला होता, ब्रह्मांडांतील सूर्यादिदेव व पिंडांतील किंवा प्राणि- मात्रांच्या देहांतील नेत्रादि इंद्रियगोल यांची योजना कसकशी व कोठे होती, या सर्व गोष्टींची त्याला आठवण होते, व ते पहिल्या नमुन्यावर सृष्टि रचूं लागतात. मात्र वस्तूंच्या बाह्य स्वरूपांत कधी कधी थोडा फेर दिसण्यांत येतो. सृष्टीच्या उद्योगाला ब्रह्मदेव लागला म्हणजे पूर्वीं कल्पांतीं द्वादशादित्यांच्या किरणांनी जी भूतें दग्ध झालीं होतीं म्हणून सांगितलें तीं सर्व देव, ऋषि, यक्ष, गंधर्व, पिशाच्च, उरग व राक्षस यांसह युगारंभाला जन्मास येतात. हेमंतादि सर्व ऋतूंचे शीतोष्णादि भाव त्या त्या ऋतूंत पूर्वीच्या ठरावाप्रमाणेंच पुन्हा उत्पन्न होतात, व बह्मदेंवाच्या रात्रींत म्हणजे लयकालांतही पूर्वकल्पांतील लयकालच्या स्वरूपानेंच वस्तुमात्र लीन असतें. रात्र सरली म्हणजे प्रजाकर्ता ब्रह्मदेव परमात्म्याच्या उदरांतून बाहेर येऊन वर सांगितल्याप्रमाणें सहस्त्रयुगांचा दिवस करून त्या अवकाशांत क्रमाक्रमानें पूर्ववत्, सष्टिरचना करितो; व कालाच्या संख्येचें व विभागाचें त्याला परिपूर्ण ज्ञान असल्यामुळें दिवसाची मर्यादा भरतांच सहस्त्रयुगांची रात्र निर्माण करून प्रजेचा पुन्हा संहार करतो.
रात्र संपली कीं, पुनरुत्पत्ति करतो. हा चाळा पुनःपुन्हा चालूच आहे. मात्र हे भरतश्रेष्ठा, प्रत्येक कल्पांत जे कोणी देव, मनुष्य किंवा ऋषि आपल्या शुद्धाचरणानें देहात्म- बुद्धित्यागपूर्वक सनातन ब्रह्माशीं एकभाव पावतात ते मात्र या पुनःसृष्टीच्या तडाक्यांत सांपडत नाहींत. ते कायमचे मुक्त होतात. सर्व देवाधिदेव, सर्व शक्तिमान्, सर्वात्मा हरि याचीं स्थूल आणि सूक्ष्म अशीं दोन रूपें आहेत. त्यांतील सांप्रत चालू असलेला वैवस्वत मनु हा त्याच्याच तेजाचा अंश स्थूल रूपानें प्रकट झाला असल्यामुळें व ज्या वृष्णिवंशांत सर्व असुरांचा नाश करून सर्व लोकांचे हित करण्याच्या संकल्पानें परमात्मा हरि स्वतः प्रकट झाला त्या वृष्णिकुलाची हकीकत तुझ्या प्रश्नास्तव मला सांगणें प्राप्त झालें असल्यानें व या वृष्णिकुलाची पूर्वपीठिका सांगण्याच्या संबंधांत प्रस्तुत चालू असलेल्या वैवस्वत मनूचा उल्लेख करण्याचें ओघास आल्यामुळें या वैवस्वत मनूचे वृत्त मी तुला थोडेंसें विस्तारानें सांगणार आहें.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि मन्वन्तरगणनायां अष्टमोऽध्यायः॥ ८ ॥
अध्याय आठवा समाप्त
GO TOP
|