श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकपञ्चाशत्तमोऽध्यायः


विष्णुदेवसंवादः

वैशंपायन उवाच
तच्छ्रुत्वा विष्णुगदितं ब्रह्मा लोकपितामहः ।
उवाच परमं वाक्यं हितं सर्वदिवौकसाम् ॥ १ ॥
नास्ति किंचिद्‌ भयं विष्णो सुराणामसुरान्तक ।
येषां भवानभयदः कर्णधारो रणे रणे ॥ २ ॥
शक्रे जयति देवेशे त्वयि चासुरसूदने ।
धर्मे प्रयतमानानां मानवानां कुतो भयम् ॥ ३ ॥
सत्ये धर्मे च निरतान् मानवान् विगतज्वरान् ।
नाकाले धर्मिणो मृत्युः शक्नोति प्रसमीक्षितुम् ॥ ४ ॥
मानवानां च पतयः पार्थिवाश्च परस्परम् ।
षद्‌भागमुपभुञ्जाना न भयं कुर्वते मिथः ॥ ५ ॥
ते प्रजानां शुभकराः करदैरविगर्हिताः ।
सुकरैर्विप्रयुक्तर्थाः कोशमापूरयन्त्युत ॥ ६ ॥
स्फीताञ्जनपदान् सर्वान् पालयन्तः क्षमापराः ।
अतीक्ष्णदण्डांश्चतुरो वर्णाञ्जुगुपुरञ्जसा ॥ ७ ॥
नोद्वेजनीया भूतानां सचिवैः साधुपूजिताः ।
चतुरङ्‌गबलैर्गुप्ताः षड्गुणानुपयुञ्जते ॥ ८ ॥
धनुर्वेदपराः सर्वे सर्वे वेदेषु निष्ठिताः ॥
यजन्ते च यथाकालं यज्ञैर्विपुलदक्षिणैः ॥ ९ ॥
वेदानधीत्य दीक्षाभिर्महर्षीन् ब्रह्मचर्यया ।
श्राद्धैश्च मेध्यैः शतशस्तर्पयन्ति पितामहान् ॥ १० ॥
नैषामविदितं किञ्चित् त्रिविधं भुवि दृश्यते ।
वैदिकं लौकिकं चैव धर्मशास्त्रोक्तमेव च ॥ ११ ॥
ते परावरदृष्टार्था महर्षिसमतेजसः ।
भूयः कृतयुगं कर्तुमुत्सहन्ते नराधिपाः ॥ १२ ॥
तेषामेव प्रभावेण शिवं वर्षति वासवः ।
यथार्थं च ववुर्वाता विरजस्का दिशो दश ॥ १३ ॥
निरुत्पाता च वसुधा सुप्रचाराश्च खे ग्रहाः ।
चन्द्रमाश्च सनक्षत्रः सौम्यं चरति योगतः ॥ १४ ॥
अनुलोमकरः सूर्यस्त्वयने द्वे चचार ह ।
हव्यैश्च विविधैस्तृप्तः शुभगन्धो हुताशनः ॥ १५ ॥
एवं संयक् प्रवृत्तेषु विवृद्धेषु मखादिषु ।
तर्पयत्सु महीं कृत्स्नां नृणां कालभयं कुतः ॥ १६ ॥
तेषां ज्वलितकीर्तीनामन्योन्यवशवर्तिनाम् ।
राज्ञां बलैर्बलवतां पीड्यते वसुधातलम् ॥ १७ ॥
सेयं भारपरिश्रान्ता पीड्यमाना नराधिपैः ।
पृथिवी समनुप्राप्ता नौरिवासन्नविप्लवा ॥ १८ ॥
युगान्तसदृशै रूपैः शैलोच्चलितबन्धना ।
जलोत्पीडाकुला स्वेदं धारयन्ती मुहुर्मुहुः ॥ १९ ॥
क्षत्रियाणां वपुर्भिश्च तेजसा च बलेन च ।
नृणां च राष्ट्रैर्विस्तीर्णैः श्राम्यतीव वसुन्धरा ॥ २० ॥
पुरे पुरे नरपतिः कोटिसंख्यैर्बलैर्वृतः ।
राश्ट्रे राष्ट्रे च बहवो ग्रामाः शतसहस्रशः ॥ २१ ॥
भूमिपानां सहस्रैश्च तेषां च बलिनां बलैः ।
ग्रामायुताढ्यै राष्ट्रैश्च भूमिर्निर्विवरा कृता ॥ २२ ॥
सेयं निरामयं कृत्वा निश्चेष्टा कालमग्रतः ।
प्राप्ता ममालयं विष्णो भवांश्चास्याः परा गतिः ॥ २३ ॥
कर्मभूमिर्मनुष्याणां भूमिरेषा व्यथां गता ।
यथा न सीदेत् तत् कार्यं जगत्येषा हि शाश्वती ॥ २४ ॥
अस्या हि पीडने दोषो महान् स्यान्मधुसूदन ।
क्रियालोपश्च लोकानां पीडितं च जगद्‌भवेत् ॥ २५ ॥
श्राम्यते व्यक्तमेवेयं पार्थिवौघप्रपीडिता ।
सहजां या क्षमाम् त्यक्त्वा चलत्वमचला गता ॥ २६ ॥
तदस्याः श्रुतवन्तः स्म तच्चापि भवता श्रुतम् ।
भारावतरणार्थं हि मन्त्रयाम सह त्वया ॥ २७ ॥
सत्पथे हि स्थिताः सर्वे राजानो राष्ट्रवर्धनाः ।
नराणां च त्रयो वर्णा ब्राह्मणाननुयायिनः ॥ २८ ॥
सर्वं सत्यपरं वाक्यं वर्णा धर्मपरास्तथा ।
सर्वे वेदपरा विप्राः सर्वे विप्रपरा नराः ॥ २९ ॥
एवं जगति वर्तन्ते मनुष्या धर्मकारणात् ।
यथा धर्मवधो न स्यात् तथा मन्त्रः प्रवर्त्यताम् ॥ ३० ॥
सतां गतिरियं नान्या धर्मश्चास्याः सुसाधनम् ।
राज्ञां चैव वधः कार्यो धरण्या भारनिर्णये ॥ ३१ ॥
तदागच्छ महाभाग सह वै मन्त्रकारणात् ।
व्रजामो मेरुशिखरं पुरस्कृत्य वसुंधराम् ॥ ३२ ॥
एतावदुक्त्वा राजेन्द्र ब्रह्मा लोकपितामहः ।
पृथिव्या स विश्वात्मा विरराम महाद्युतिः ॥ ३३ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
भारावतरणे एकपञ्चाशत्तमोऽध्यायः


श्रीविष्णू व देवमंडळी यांचा संवाद -

वैशंपायन सांगतात : - गताध्यायीं सांगितलेले विष्णूचे भाषण ऐकून सर्व लोकांचा पितामह ब्रह्मदेव निखिल स्वर्गवासी लोकांना परम हितावह वाक्य बोलला कीं, हे असुरांतका विष्णो, ज्या अर्थी कोणतेंही युद्ध उपस्थित झालें असतां तुजसारखा नावाडी रणरूप नदीतून देवांना निर्धोकपणे पार पाडण्यास सदा उभा आहे त्या अर्थी देवमंडळीला कशाचे भय असणार ? याप्रमाणे शत्रूचा नि:पात करण्याला तुजसारखा समर्थ सिद्ध असतां व देवांचें आधिपत्य इंद्राकडे असतां धर्माने चालणाऱ्या मनुष्यांना तरी भयाची कोठेंही जागा नाही. यामुळे सर्व मनुष्यें निर्भयपणें धर्मानें व सत्यानें वागू लागल्यामुळें असल्या धार्मिक प्रजेकडे अकाल मृत्यु नुसती दृष्टि टाकण्याला देखील समर्थ नाहीं.

ही प्रजाजनांची स्थिति झाली. आतां राजांची राजे लोकही प्रजेपासून धर्मशास्त्रानें सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाचा सहावाच भाग घेत असल्यामुळें सर्वत्र संतोष राहून राजास परस्परांपासूनही भय वाटत नाहीं. याप्रमाणे कर देणारे लोकाचे शिव्याशाप न घेता राजेलोक योग्य करांनीं आपले कोश भरीत असून प्रजेच्या हितासाठी सतत झटत असल्यामुळें त्यांच्या सत्तेखालील सर्वही वसतीचा प्रांत भरभराटींत आहे. प्रजांना अपराधाबद्दल दंड करणें तोही फार कडक न करितां त्या वर क्षमा-दृष्टि ठेवून ब्राह्मणादि चतुर्वर्णाचें राजेलोक यथान्याय पालन करीत आहेत. एवंच, राजांपासून कोणाही प्राण्यांना त्रास होत नसून त्यांचे सचिवही त्यांना योग्य मान देत असून चतुरंग सैन्याची आपणापाशीं योग्य बळकटी ठेवून संधिविग्रह इत्यादि जे सहा प्रकारचे राजनीतीचे उपाय सांगितले आहेत, त्या उपायांना धरून राजेलोक चालले आहेत. सर्वही धनुर्वेदात निष्णात असून वैदिक धर्माचे अभिमानी आहेत. यज्ञाला योग्य काल येतांच यज्ञ करून ते विपुल दक्षिणा वाटतात. स्वतः वेदाध्ययन करून महर्षींचा संतोष करितात. त्याचप्रमाणें यज्ञदीक्षा व नियमादि ग्रहण करून सर्व देवतामय जें परब्रह्म त्याचें तर्पण करितात, व पवित्र अशा अनेक श्राद्ध-क्रियांनी पितरांचेंही संतर्पण करितात. हे राजेलोक इतके चतुर आहेत कीं, त्यांना विदित नाहीं अशी वेदांत, लौकिकांत किंवा धर्मशास्त्रांत कोणतीही गोष्ट नाहीं. इतकेंच नव्हे, तर हे राजे ब्रह्मर्षींप्रमाणें तेजस्वी असून त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार झाला आहे व यामुळें पुनः कृतयुगाचा प्रचार करण्याच्या ते उमेदींत आहेत. या राजांच्याच पुण्यबलाने इंद्र सुखावह अशी पर्जन्यवृष्टि करीत असतो. सर्व दिशांनी धुलिरहित यथाकाल अनुकूल वायु वहात असतात. पृथ्वीवर कोणत्याही तऱ्हेचे उत्पात ( धरणीकंपादि ) होत नाहींत. आकाशांत सर्व ग्रह आपआपल्या मार्गाने सुरळीत चालतात. चंद्रमाही आपल्या सत्तावीस नक्षत्रांशीं यथाकाल संगत होऊन शांतपणे फिरत असतो. सूर्य हा दक्षिण व उत्तर ही दोन अयने क्रमून यथाक्रम वसंतादि ऋतु वर्तवीत असतो. हुताशन अग्नि हा नानाप्रकारच्या हवनीय द्रव्यांनी संतुष्ट होऊन सुगंधोद्गार टाकीत असतो. याप्रमाणे सर्व राजेलोक नीतीनें चालत असून व यज्ञयागादि वाढत्या प्रमाणावर राहून सर्व पृथ्वी संतुष्ट स्थितीत असतांना मनुष्यांना यमाची भीति कशाला पडेल? ( येथपर्यंत सर्व ठीक आहे; परंतु्, या शांततेच्या व भरभराटीच्या स्थितीचा एक प्रतिकूल परिणाम असा झाला आहे कीं,) हे उज्जल कीर्तीचे व एकमेकांच्या सलोख्याने चालणारे राजेलोक आपल्या पदरीं फार मोठी सैन्ये बाळगून आहेत; आणि या सैन्यांच्या योगाने वसुधेला पीडा होत आहे. ती इतकी कीं, ही बिचारी पृथ्वी राजांच्या या सैन्यांच्या भाराने अगदीं टेंकीस येऊन बुडूं पाहाणाऱ्या नावेप्रमाणे डबघाईस आली आहे. हे कल्पांत अग्नीप्रमाणे जाज्वल्य राजे तिला इतकी पीडा देत आहेत कीं, तिला समुद्रात स्थिर ठेविणारें जें तिजवरील पर्वतांचे दडपण हें दूर होऊन तिच्यांतून सर्वत्र पाण्याचे फवारे उडू लागले आहेत आणि त्या योगानें बापडी क्षणोक्षणीं घामाघूम होत आहे. एतावता, या क्षत्रियमंडळीच्या शरीरांनी, तेजाने, बलानें व मनुष्यांच्या अवाढव्य वस्तीने ही वसुंधरा अगदीं थकून गेली आहे. प्रत्येक राजधानींत, प्रत्येक राजा कोटि कोटि सेना बाळगून आहे. प्रत्येकाच्या राज्यात हजारों लाखों वसतीचे गांव आहेत. राजेही हजारों आहेत. असल्या या असंख्य बलाढ्य राजांनीं, त्यांच्या कोटीसंख्य सैन्यांनी व ज्यात लाखों गांव आहेत अशा अनेक राष्ट्रांनीं ही भूमी इतकी व्यापून गेली आहे कीं, तिच्यावर रिकामी जागाच नाहीं. बरें,या संख्येतून् कोणी कमी होतील तर कोठेही रोगराई नाहीं.

अर्थात् काळाला उपास पडत आहेत व धरित्रीची पाठ मोडावयास झाली आहे. ती इतकी, की, ती बहुतेक निश्चेष्ट होण्याच्या बेतांत आहे. हे विष्णो, याप्रमाणे हिची संकटमय स्थिति झाल्यानें ही उपाशीं मरणाऱ्या काळाला आपल्या बरोबर घेऊन बिचारी माझ्या घरीं आली. पण माझ्याने तिचें संकट निवारण होईना म्हणून मी तिला आपल्याकडे घेऊन आलों. आतां आपण हिचा पल्ला पोंचवून द्या. ही भूमी म्हणजे मनुष्यांच्या व्यवहाराचा सर्वस्वी आधार आणि अशीला ही दशा प्राप्त व्हावी हें बरें नव्हे. यासाठी जिकडून ही चिरडली न जातां शाश्वत आधारभूत राहील अशी कांहीं युक्ति करावी. हे मधुसूदना, या धरणीमातेला पीडा होऊं देणें हे मोठेंच दोषावह आहे. तसें झाल्याने एकतर लोकांचा क्रियालोप होतो व हिलाही पीडा होते. आणि आजकाल मी म्हणतों त्याप्रमाणें या राजांच्या गर्दींमुळे हिला अत्यंत पीडा होत आहे. ही गोष्ट ही, अचला म्हणजे चलन न पावणारी व क्षमा म्हणजे सहन-समर्थ अशी नांवें यथार्थ धारण करणारी असता आज आपलें स्थान सोडून ( चलन पावून ) व तिचे अंगची ती उपजत क्षमा गमवून व्याकूळ स्थितींत येथें आली, यावरूनच स्पष्ट होत आहे. हिची दुःखाची कहाणी मीं स्वतःही ऐकून घेतलीच आहे व आपल्याही कानी घातली आहे. तिच्या सांगण्याचा सारांश इतकाच कीं, तिजवरील हा भार कमी झाला पाहिजे. तर तो कोणते रीतीनें करावयाचा त्याची, हे विष्णो, आपण सर्वजण मिळून वाटाघाट करूं.

हें. काम मोठेंच विचाराचें येऊन पडलें आहे. कारण, सर्वही राजे सन्मार्गानें चालत असून आपआपल्या राज्याची भरभराट क्‌रीत आहेत. प्रजाजनांत इतर तिन्ही वर्ण, बाह्मणांच्या धोरणांनी चालत आहेत. खोटा शब्द म्हणून कोठे ऐकू येत नाहीं. सर्वही वर्ण आपआपल्या धर्माने चालत आहेत. सर्व ब्राह्मण वेदरत आहेत, व इतर सारे अशा ब्राह्मणांच्या कच्छपीं आहेत. एवंच, भूतलावर सर्वही मनुष्यें आपआपल्या परी धर्माला धरून चाललीं आहेत. तेव्हां अशांची धर्महानी होतां कामा नये आणि आपलें इष्टकार्य तर साधेल अशी तोड काढिली पाहिजे. कारण, ही धरणी हा सज्जनांचा आधार आहे. अतएव, हिला संकटांत ठेवून उपयोग नाहीं, आणि हिला सुखी करणें याला धर्मरक्षणासारखा दुसरा मार्ग नाहीं, ( अर्थात् धर्महानी होता कामा नये. ) असा सर्वपरी पेंच आहे. त्यास आमच्या मतें या धरणीचा भार दूर, करण्याकरितां राजांचा वध करावा असें आहे. यासाठीं, हे महाभागा, आपण या वसुंधरेला पुढें घेऊन या कामी पक्कें खलबत करण्यासाठी चला मेरूच्या शिखरावर जाऊं.

हे जनमेजया, याप्रमाणे बोलून विश्वात्मा ब्रह्मदेव धरणीसह( उत्तराची वाट पाहात) गप्प बसला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
विष्णु देव संवादः नाम एकपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५१ ॥
अध्याय एकावन्नावा समाप्त

GO TOP