श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकादशोऽध्यायः


धुन्धुवधः -

जनमेजय उवाच
कथं बहुयुगे काले समतीते द्विजोत्तम ।
न जरा रेवतीं प्राप्ता रैवतं च ककुद्मिनम् ॥ १ ॥
मेरुं गतस्य वा तस्य शर्यातेः संततिः कथम् ।
स्थिता पृथिव्यामद्यापि श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ २ ॥
वैशम्पायन उवाच
न जरा क्षुत्पिपासे वा न मृत्युर्भरतर्षभ ।
ऋतुचक्रं न भवति ब्रह्मलोके सदानघ ॥ ३ ॥
ककुद्मिनस्तु तं लोकं रैवतस्य गतस्य ह ।
हता पुण्यजनैस्तात राक्षसैः सा कुशस्थली ॥ ४ ॥
तस्य भ्रातृशतं चासीद्धार्मिकस्य महात्मनः ।
तद्वध्यमानं रक्षोभिर्दिशः प्राद्रवदच्युतम् ॥ ५ ॥
विद्रुतस्य तु राजेन्द्र तस्य भ्रातृशतस्य वै ।
तेषां तु ते भयाक्रान्ताः क्षत्रियास्तत्र तत्र ह ॥ ६ ॥
अन्ववायस्तु सुमहांस्तत्र तत्र विशाम्पते ।
येषामेते महाराज शर्याता इति विश्रुताः ॥ ७ ॥
क्षत्रिया भरतश्रेष्ठ दिक्षु सर्वासु धार्मिकाः ।
सर्वशः पर्वतगणान्प्रविष्टाः कुरुननदन॥ ८ ॥
नाभागारिष्टपुत्रौ द्वौ वैश्यौ ब्राह्मणतां गतौ ।
करूषस्य तु कारूषाः क्षत्रिया युद्धदुर्मदाः ॥ ९ ॥
प्रांशोरेकोऽभवत्पुत्रः प्रजातिरिति नः श्रुतम् ।
पृषध्रो हिंसयित्वा तु गुरोर्गां जनमेजय । १० ॥
शापाच्छूद्रत्वमापन्नो नवैते परिकीर्तिताः ।
वैवस्वतस्य तनया मनोर्वै भरतर्षभ ॥ ११ ॥
क्षुवतश्च मनोस्तात इक्ष्वाकुरभवत् सुतः ।
तस्य पुत्रशतं त्वासीदिक्ष्वाकोर्भूरिदक्षिणम् ॥ १२ ॥
तेषां विकुक्षिर्ज्येष्ठस्तु विकुक्षित्वादयोधताम् ।
प्राप्तः परमधर्मज्ञः सोऽयोध्याधिपतिः प्रभुः ॥ १३ ॥
शकुनिप्रमुखास्तस्य पुत्राः पञ्चाशदुत्तमाः ।
उत्तरापथदेशस्था रक्षितारो महीपते । १४ ॥
चत्वारिंशदथाष्टौ च दक्षिणस्यां तथा दिशि ।
शशादप्रमुखाश्चान्ये रक्षितारो विशाम्पते । १५ ॥
इक्ष्वाकुस्तु विकुक्षिं वै अष्टकायामथादिशत् ।
मांसमानय श्राद्धार्थं मृगान् हत्वा महाबल ॥ १६ ॥
श्राद्धकर्मणि चोद्दिष्टमकृते श्राद्धकर्मणि ।
भक्षयित्वा शशं तात शशादो मृगयां गतः ॥ १७ ॥
इक्ष्वाकुणा परित्यक्तो वसिष्ठवचनात् प्रभुः ।
इक्ष्वाकौ संस्थिते तात शशादः पुरमावसत् ॥ १८ ॥
शशादस्य तु दायादः ककुत्स्थो नाम वीर्यवान् ।
इन्द्रस्य वृषभूतस्य ककुत्स्थोऽजयतासुरान् ॥ १९ ॥
पूर्वं देवासुरे युद्धे ककुत्स्थस्तेन हि स्मृतः ।
अनेनास्तु ककुत्स्थस्य पृथुरानेनसः स्मृतः ॥ २० ॥
विष्टराश्वः पृथोः पुत्रस्तस्मादार्द्रस्त्वजायत ।
आर्द्रस्य युवनाश्वस्तु श्रावस्तस्य तु चात्मजः ॥ २१ ॥
जज्ञे श्रावस्तको राजा श्रावस्ती येन निर्मिता ।
श्रावस्तस्य तु दायादो बृहदश्वो महयशाः ॥ २२ ॥
कुवलाश्वः सुतस्तस्य राजा परमधार्मिकः ।
यः स धुन्धुवधाद् राजा धुन्धुमारत्वमागतः ॥ २३ ॥
जनमेजय उवाच
धुन्धोर्वधमहं ब्रह्मञ्श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ।
यदर्थं कुवलाश्वः सन् धुन्धुमारत्वमागतः ॥ २४ ॥
वैशम्पायन उवाच
कुवलाश्वस्य पुत्राणां शतमुत्तमधन्विनाम् ।
सर्वे विद्यासु निष्णाता बलवन्तो दुरासदाः ॥ २५ ॥
बभूवुर्धार्मिकाः सर्वे यज्वानो भूरिदक्षिणाः ।
कुवलाश्वं सुतं राज्ये बृहदश्वो न्ययोजयत् ॥ २६ ॥
पुत्रसङ्क्रामितश्रीस्तु वनं राजा समाविशत् ।
तमुत्तङ्कोऽथ विप्रर्षिः प्रयान्तं प्रत्यवारयत् ॥ २७ ॥
उत्तङ्क उवाच
भवता रक्षणं कार्यं तत्तावत्कर्तुमर्हसि ।
निरुद्विग्नस्तपश्चर्तुं न हि शक्नोषि पार्थिव ॥ २८ ॥
त्वया हि पृथिवी राजन् रक्ष्यमाणा महात्मना ।
भविष्यति निरुद्विग्ना नारण्यं गन्तुमर्हसि ॥ २९ ॥
पालने हि महान् धर्मः प्रजानामिह दृश्यते ।
न तथा दृश्यतेऽरण्ये मा तेऽभूद् बुद्धिरीदृशी ॥ ३० ॥
ईदृशो न हि राजेन्द्र धर्मः क्वचन दृश्यते ।
प्रजानां पालने यो वै पुरा राजर्षिभिः कृतः ।
रक्षितव्याः प्रजा राज्ञा तास्त्वं रक्षितुमर्हसि ॥ ३१ ॥
ममाश्रमसमीपे हि समेषु मरुधन्वसु ।
समुद्रो वालुकापूर्ण उज्जानक इति श्रुतः ।
देवतानामवध्यश्च महाकायो महाबलः ॥ ३२ ॥
अन्तर्भूमिगतस्तत्र वालुकान्तर्हितो महान् ।
राक्षसस्य मधोः पुत्रो धुन्धुनामा महासुरः ।
शेते लोकविनाशाय तप आस्थाय दारुणम् ॥ ३३ ॥
संवत्सरस्य पर्यन्ते स निश्वासं प्रमुञ्चति ।
यदा तदा भूश्चलति सशैलवनकानना ॥ ३४ ॥
तस्य निःश्वासवातेन रज उद्धूयते महत् ।
आदित्यपथमावृत्य सप्ताहं भूमिकम्पनम् ॥ ३५ ॥
सविस्फुलिङ्गं साङ्गारं सधूममतिदारुणम् ।
तेन तात न शक्नोमि तस्मिन्स्थातुं स्वकाश्रमे ॥ ३६ ॥
तं मारय महाकायं लोकानां हितकाम्यया ।
लोकाः स्वस्था भवन्त्यद्य तस्मिन् विनिहतेऽसुरे ॥ ३७ ॥
त्वं हि तस्य वधायैकः समर्थः पृथिवीपते ।
विष्णुना च वरो दत्तो मह्यं पूर्वयुगेऽनघ ॥ ३८ ॥
यस्त्वं महासुरं रौद्रं हनिष्यसि महाबलम् ।
तस्य त्वं वरदानेन तेज आप्याययिष्यसि ॥ ३९ ॥
न हि धुन्धुर्महातेजास्तेजसाल्पेन शक्यते ।
निर्दग्धुं पृथिवीपाल स हि वर्षशतैरपि ।
वीर्यं हि सुमहत् तस्य देवैरपि दुरासदम् ॥ ४० ॥
स एवमुक्तो राजर्षिरुत्तङ्केन महात्मना ।
कुवलाश्वं सुतं प्रादात्तस्मै धुन्धुनिवारणे ॥ ४१ ॥
बृहदश्व उवाच
भगवन्न्यस्तशस्त्रोऽहमयं तु तनयो मम ।
भविष्यति द्विजश्रेष्ठ धुन्धुमारो न संशयः ॥ ४२ ॥
स तं व्यादिश्य तनयं राजर्षिर्धुन्धुमारणे ।
जगाम पर्वतायैव तपसे संशितव्रतः ॥ ४३ ॥
वैशम्पायन उवाच
कुवलाश्वस्तु पुत्राणां शतेन सह पार्थिवः ।
प्रायादुत्तङ्कसहितो धुन्धोस्तस्य विनिग्रहे ॥ ४४ ॥
तमाविशत्तदा विष्णुर्भगवांस्तेजसा प्रभुः ।
उत्तङ्कस्य नियोगाद् वै लोकस्य हितकाम्यया ॥ ४५ ॥
तस्मिन् प्रयाते दुर्धर्षे दिवि शब्दो महानभूत् ।
एष श्रीमानवध्योऽद्य धुन्धुमारो भविष्यति ॥ ४६ ॥
दिव्यैर्माल्यैश्च तं देवाः समन्तात् समवाकिरन् ।
देवदुन्दुभयश्चापि प्रणेदुर्भरतर्षभ ॥ ४७ ॥
स गत्वा जयतां श्रेष्ठस्तनयैः सह वीर्यवान् ।
समुद्रं खानयामास वालुकार्णवमव्ययम् । ४८ ॥
नारायणेन कौरव्य तेजसाऽऽप्यायितः स वै ।
बभूव स महातेजाः भूयो बलसमन्वितः ॥ ४९ ॥
तस्य पुत्रैः खनद्भिस्तु वालुकान्तर्हितस्तदा ।
धुन्धुरासादितो राजन् दिशमावृत्य पश्चिमाम् ॥ ५० ॥
मुखजेनाग्निना क्रोधाल्लोकानुद्वर्तयन्निव ।
वारि सुस्राव वेगेन महोदधिरिवोदये ॥ ५१ ॥
सोमस्य भरतश्रेष्ठ धारोर्मिकलिलं महत् ।
तस्य पुत्रशतं दग्धं त्रिभिरूनं तु रक्षसा ॥ ५२ ॥
ततः स राजा कौरव्य राक्षसं तं महाबलम् ।
आससाद महातेजा धुन्धुं धुन्धुनिबर्हणः ॥ ५३ ॥
तस्य वारिमयं वेगमापीय स नराधिपः ।
योगी योगेन वह्निं च शमयामास वारिणा ॥ ५४ ॥
निहत्य तं महाकायं बलेनोदकराक्षसम् ।
उत्तङ्कं दर्शयामास कृतकर्मा नराधिपः ॥ ५५ ॥
उत्तङ्कस्तु वरं प्रादात् तस्मै राज्ञे महात्मने ।
ददौ तस्याक्षयं वित्तं शत्रुभिश्चापराजयम् ॥ ५६ ॥
धर्मे रतिं च सततं स्वर्गवासं तथाक्षयम् ।
पुत्राणां चाक्षयाँल्लोकान् स्वर्गे ये रक्षसा हताः ॥ ५७ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि धुन्धुवधे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


धुंधुवधवर्णन -

जनमेजय विचारतो - हे द्विजश्रेष्ठा, आतां आपण सांगितलें कीं, रैवत राजा ब्रह्मलोकाहून परत आला तों मानवांची युगेंच्या युगें लोटलीं, पण तो तरुणच्या तरूण परत आला. बरें, त्याची कन्या रेवती ही तेथें आल्यावर त्यानें बलरामास दिली; तेव्हां तीही तरूणच होती, हें उघडच झालें. तर मी असें विचारतों कीं, इतकीं युगें लोटलीं तरी रेवती किंवा तिचा बाप रैवत यांपैकीं कोणालाच वार्धक्य कसें आलें नाहीं? शिवाय संसार टाकून जर शर्यातीचा प्रपौत्र रैवत मेरूपृष्ठावर तपश्चर्येला गेला तर त्याची संतति अजून पृथ्वीवर चालू आहे हा चमत्कार काय, हें मला सर्व कृपा करून सांगावे.

वैशंपायन सांगतात - बा जनमेनया, त्या ब्रह्मलोकांत तहान, भूक, वार्धक्य अथवा मृत्यु कांहींच नाहींत. इतकेंच नव्हे परंतु तेथें निरनिराळे ऋतुदेखील नाहींत. (सर्वदा वसंतच असतो.) यामुळें, हीं दोघें तेथें गेलीं त्या वेळीं ज्या अवस्थेंत होतीं त्याच अवस्थेंत उघडच तीं परत आली. असो; ककुद्मी रैवत हा ब्रह्मलोकाला गेला, तेव्हां त्याच्या पश्चात त्याची राजधानी जी कुशस्थली तिच्यावर राक्षस व पिशाच्च यांनीं हल्ला करून तिचा नाश मांडिला. त्यावेळीं त्या धार्मिक ककुद्मीचे मागें शंभर बंधु त्या नगरींत होते. ते राक्षसांच्या त्रासानें जीव घेऊन धडपणीं बारावाटा पळाले. ते ज्या ज्या मुलखाला पळून गेले, त्या त्या मुलखांतील जे जे धर्मभोळे क्षत्रिय राजे होते ते ते त्यांना पाहून भयभीत झाले व आपली जागा सोडून पळाले व ठिकठिकाणीं पर्वताचा आश्रय धरून राहिले. मग त्यांच्या जागीं घुसलेले हे शंभर बंधु तेथेंच स्वस्थपणें नांदूं लागले; व त्या त्या जागीं त्यांचा मोठा वंशविस्तार झाला; आणि शार्यात नांवानें जे सुप्रसिद्ध योद्धे ऐकूं येतात ते सर्व त्यांचीच संतति. असो; मनूचा जो नाभागादिष्ट म्हणून पुत्र सांगितला त्याला दोन पुत्र ( आईच्या जातीमुळें) वैश्य झाले; परंतु पुढें तपोबलानें ते ब्राह्मण्य पावले. करूषाला कारूष नांवाचे मोठे रणमस्त क्षत्रिय पुत्र झाले. आम्हीं असें ऐकतो कीं, प्रांशूला प्रजापति नामक एकच पुत्र होता, व पृषध्रानें आपल्या गुरूची गाय मारिली त्या पातकानें तो क्षत्रिय असतां शूद्रत्वाला पावला. हे भरतश्रेष्ठा जनमेजया, याप्रमाणें वैवस्वत मनूचे नऊ पुत्रांचा वृत्तांत तुला सांगितला. त्याला इक्ष्वाकु म्हणून जा पुत्र झाला त्याचे उत्पत्तीची कथा अशी आहें - मनूला एकवार शिंक आली व त्या शिंकेबरोबर हा पुत्र उभा राहिला व त्याला इक्ष्वाकु असें नांव दिलें. या इक्ष्वाकूला पुढें शंभर पुत्र झाले. हे सर्वही मोठे दानशूर होते. यांचा वडीलभाऊ विकुक्षी नांवाचा होता. याचे विकुक्षित्वामुळें ( ढेर- पोटामुळें) हा लढण्याला निरुपयोगी होता; व त्या कारणानें लढाईवर न जातां अयोध्येचे राज्यच करीत राहिला. हा मोठा धर्मज्ञ असून याला शकुनिप्रभृति बहुत पुत्र झाले. हे सर्व राजे झाले. त्यांपैकीं पन्नास उत्तरापथ देशाचें रक्षणकर्ते निघाले, व चाळीस आणि आठ यांनीं दक्षिण दिशा राखिली. या अठ्ठेचाळिसांना रक्षणाचे कामीं विकुक्षि ऊर्फ शशाद याचीही मदत असे. हे जनमेजया, तूं म्हणशील कीं, विकुक्षीला शशाद हें नांव कुठून आलें, तर ऐक. एकदा इक्ष्वाकूचे घरीं अष्टका नांवाचें श्राद्ध होतें. या दिवशीं इक्ष्वाकूनें आपला पुत्र विकुक्षी याला सांगितलें कीं, तूं चांगला बलाढय आहेस तर रानांत जा आणि चांगली शिकार करून आजच्या श्राद्धासाठीं बरेंचसें मृगमांस घेऊन ये. पित्याचे आज्ञेप्रमाणें रानांत जाऊन विकुक्षीनें पुष्कळशी शिकार मारिली. परंतु, ती तशीच घरीं घेऊन येण्याच्या पूर्वी शिकारीच्या श्रमानें त्याला अतिशय क्षुधा लागून त्यापैकीं त्यानें एक शश ( ससा) तेथेंच खाल्ला. नंतर तें मांस घेऊन तो घरीं आला व बापापुढें तें त्यानें ठेविलें. परंतु, जवळ कुलगुरू त्रिकालज्ञ वसिष्ठमुनि होते, त्यांनीं सांगितले कीं, मांस उच्छिष्ट आहे, हें श्राद्धाचे उपयोगीं नाहीं. त्यावरून प्रश्न करितां विकुक्षीनें खरी हकीकत सांगितली व त्यानें ससा खाल्ला म्हणून त्याला त्या वेळेपासून शशाद असें नांव पडलें; व त्याच्या अपराधाबद्दल पित्यानें त्याला राज्यांतून काढून लाविलें. तो बहुतकाळ तसाच परागंदा होता. पुढें त्याच्या बापाचें म्हणजे इक्ष्वाकूचें जेव्हां देहावसान झालें तेव्हां तो स्वनगरास परत येऊन तेथील राजा झाला. या शशादाला पुढें ककुत्स्थ नांवाचा मोठा वीर्यशाली पुत्र झाला. याला ककुत्स्थ हें नांव पडण्याचें कारण असें झालें कीं, पूर्वीं देव व असुर यांचें युद्ध चाललें असतां देवांनीं याला आपल्या साह्यार्थ बोलाविले. तेव्हां तो म्हणाला कीं, मी इंद्राचे पाठीवर बसून युद्ध करीन. ही गोष्ट तुम्हांला कबूल असेल तर मी साह्यास येतों. देवांनीं निरुपायास्तव इंद्राला कबूल करविलें. त्या वेळीं इंद्रानें मोठया वृषभाचें रूप घेतलें. मग हा शशाद पुत्र त्या वृषभाच्या ककुद् म्हणजे वशिंडावर बसला. त्या वेळेपासून त्याला ककुत्स्थ असें नांव पडलें. या ककुत्स्थाला पुढें अनेना नांवाचा मुलगा झाला. अनेनाला पृथु नावांचा मुलगा झाला. या पृथूचा पुढें विष्टराश्व, विष्टराश्वाचा आर्द्र, आर्द्राचा युवनाश्व, व युवनाश्वाचा पुत्र श्रावस्त हा झाला. श्रावस्ती नामक जी प्रसिद्धपुरी ती याच राजानें बस विली. या श्रावस्ताला बृहदश्व नांवाचा मोठा लौकिकवान् पुत्र झाला. या बृहदश्वाला कुवलाश्व नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला. या कुवलाश्वानें धुंधु नांवाच्या बलाढय राक्षसाला मारिलें, त्यामुळें त्याचें धुंधुमार असें नांव पडलें.

जनमेजय म्हणतो - ब्रह्मन्, कुवलाश्वाला ज्याच्या वधामुळें धुंधुमार असें नांव पडलें त्या धुंधु राक्षसाच्या वधाचें सर्व वृत्त ऐकावें, असें मनांत आहे.

वैशंपायन सांगतात - कुवलाश्वाला धनुर्विद्येंत अत्यंत निपुण, मोठे बलाढय, अजिंक्य, दानशूर, यागकर्ते व धार्मिक असे शंभर पुत्र झाले. मुलाला मुलगे झाले असें पाहून राजा बृहदश्व कुवलाश्वावर राज्यकारभार सोंपवून आपण तपस्येसाठीं वनांत जावयास निघाला. तो तिकडे चालला असतां उत्तंक नांवाचा विप्रर्षि त्याला आडवा आला. उत्तंक म्हणाला कीं, हे राजा, तूं जातीचा क्षत्रिय, प्रजारक्षण करणें हेंच तुझें मुख्य कर्तव्य; ही कर्तव्यचिंता एकीकडे झुगारून देऊन तपाला निघून जाणें हें तुला न्यायाने करितां येणार नाहीं. घराबाहेर पडल्यानें तूं कदाचित् एकटा निश्चिंत होशील, परंतु तुजसारखा समर्थ पालक नाहींसा झाल्यामुळें शेंकडों प्रजा चिंताक्रांत होतील. याकरितां तूं अरण्यांत न जातां परत चल आणि प्रजांचें रक्षण कर. माझ्या आश्रमानजीक जो सपाट वैराण मुलूख आहे, तेथें कसलीही वस्ती नसून समुद्रांतील वाळूनें तो केवळ भरून गेला आहे. त्या वाळुकेच्या पोटांत जमिनीखालीं मधुराक्षसाचा पुत्र एक धुंधु नांवाचा मोठा विशाळ व बलाढय आणि देवतांनाही अवध्य असा भयंकर राक्षस दडी देऊन राहिला आहे, व लोकांचा संहार करण्याची आपल्या अंगीं शक्ति यावी या उद्देशानें तो संवत्सराच्या अखेरीस एकदां सुस्कारा टाकतो, पण त्या सुस्कार्‍याबरोबर पृष्ठावरील पर्वत, झाडें व अरण्यें यांसह सर्व पृथ्वी हादरून जाते, व त्याचे उच्छ्वासाबरोबर धुळीचे जे प्रचंड लोळ उडतात, त्यांनीं आकाशांतील सूर्याचा रस्ता आंखला जातो; त्याच्या उच्छ्वासाबरोबर भूमींतून धूर, ठिणग्या व निखारे यांचे सारखे फवारे वर उडत राहून सहा दिवसपर्यत भूकंप सुरू असतो, व या अनर्थामुळें, हे प्रजापालका, त्याच्या जवळच असलेल्या माझ्या आश्रमांत मला वस्ती करणें कठीण झालें आहे; तर त्या अगडबंब राक्षसाला जनहितबुद्धीनें तूं मार, म्हणजे सर्व लोक निर्भय व स्वस्थ होतील. या दुर्घट कर्माला; हे राजा, तूंच एक समर्थ दिसतो आहेस, व या कामीं तुला उपयोगीं पडेल असा श्री विष्णूनें मला पूर्वयुगांत एक वर देऊन ठेविला आहे; तो असा कीं, "तूं ज्या कोणाकडून या महाबलाढय भयंकर राक्षसाला मारविशील त्या पुरुषाचें माझ्या या वरसामर्थ्यामुळें तुझे शब्दांनीं तेज अतिशय वाढेल." असें मला श्री विष्णूंनी सांगितलें आहे, व त्यांच्या वचनाचा विनियोग मी तुझे ठिकाणीं करणार आहें; कारण, हे पृथ्वीपाला, हा धुंधु म्हणजे सामान्य नव्हे. त्याची ताकद अशी कांहीं अचाट आहे कीं, देवांचाही शक तेथें चालत नाहीं, व त्याचें तेजही फार असल्यानें सामान्य तेजाचा मनुष्य शेकडों वर्षें झटला तरी देखील त्याचा उच्छेद व्हावयाचा नाहीं, करितां तूं एवढें काम कर.

बृहदश्व म्हणाला - आपली आज्ञा मला अमान्य नाहीं. परंतु मीं संकल्पपूर्वक शस्त्र खालीं ठेविलें असल्यामुळें मला तें परत घेतां येत नाहीं. तथापि आपल्या कार्यार्थ हा माझा पुत्र कुवलाश्व याला आज्ञा देतों व माझी खात्री आहे कीं, हा आपल्या हेतूप्रमाणें त्या धुंधुचा वध करील. असें म्हणून धुंधुच्या वधाविषयीं आपल्या पुत्राला आज्ञा देऊन तो दृढनिश्चयी राजर्षि तपश्चर्येसाठीं पर्वतावरच निघून गेला. इकडे आपले शंभर पुत्र बरोबर घेऊन कुवलाश्व उत्तंकासहित धुंधूच्या मुसक्या आवळण्यासाठीं गेला. तो धुंधुवधाला प्रवृत्त होणार असें पाहतांच उत्तंकाचे शब्दावरून जनहितास्तव परमात्मा भगवान् विष्णु यांनीं आपलें तेज त्या कुवलाश्वाचे ठिकाणीं घातले. तें अजिंक्य तेज कुवलाश्वाचे देहांत शिरतांच आकाशांत मोठा गजर झाला कीं, हा श्रीमान् कुवलाश्व अवध्य झाला आहे. आज हा धुंधूला खास ठार मारील. असें म्हणून देवांनीं सर्वभर दिव्य-पुष्पांची त्याजवर वृष्टि केली व आकाशांत देवांचे नगारेही आनंदानें झडू लागले. मग आपल्या सर्व पुत्रांसह समुद्रभागीं जाऊन जो भाग कायमचा वाळुकेनें आच्छादून गेला होता तो त्या वीर्यवान् राजानें सर्व खणून काढविला. हे कौरवेश्वरा, तो कुवलाश्व जातीचाच बलाढय व तेजस्वी होता. तशांत साक्षात् नारायणाच्या तेजःप्रवेशानें त्याला अधिकच पुष्टि आली, मग त्याचें सामर्थ्य काय विचारावे? त्याचे आज्ञेनें त्याचे पुत्र तें वाळवंट खणीत चालले असतां पश्चिम दिशेला झाकून राहिलेला तो जगड्‍वाळ धुंधु राक्षस त्यांना आढळला. ते त्याच्या नजीक ठेपतांच त्यानें सहज अंग हालविलें त्याबरोबर तळांतील समुद्राचें पाणी उसळून चंद्रोदयाबरोबर भरतीचा समुद्र ज्या वेगानें धावतो त्या वेगानें बाहेर धाऊं लागलें; व तोंडांतून त्यानें क्रोधानें जे आगीचे भपकारे सोडिले त्यांबरोबर तो जगताची राख करितो असें वाटलें. निदान त्या खणणार्‍या शंभर राजपुत्रांपैकी तीन वजा करून बाकीचे सत्याण्णव तेथल्या तेथेंच जळून गेले. हे कौरवेश्वरा, पुत्रांची ती दशा पाहातांच आतां आपण स्वतःच सरसावले पाहिजे असें मनांत आणून त्या महातेजस्वी राजानें त्या महाबलाढय धुंधूला गांठलें; अंगीं योगसामर्थ्य उत्कट असल्यानें तो राक्षस जें झपाटयानें पाणी वर उसळवीत होता तें सर्व त्या कुवलाश्वानें पिऊन शोषून टाकिलें. व जल आणि योगसामर्थ्य यांच्या साहाय्यानें राक्षसाच्या तोंडांतून उठणारा अग्नि विझवून टाकिला. नंतर प्रत्यक्ष गांठ घालून आपल्या आंगचे ताकतीनें त्यानें त्या धडेल पाणराक्षसाला ठार करून आपण सांगितलेली कामगिरी मीं बजाविली अशा आशयाचा उत्तंकाला इषारा केला. त्याच्या त्या कर्तबगारीनें प्रसन्न होऊन उत्तंकानें त्याला वर दिला कीं, हे महात्म्या राजा, तुझे घरीं अखंड लक्ष्मी नांदेल; शत्रूकडून तुझा केव्हांही पराजय होणार नाहीं; धर्मावर तुझें प्रेम राहून अंतीं तुला कायमचा स्वर्गवास मिळेल. शिवाय जे तुझे पुत्र या कामीं राक्षसाने मारिले आहेत त्यांनाही स्वर्गलोकांत कायमची वस्ती मिळेल.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
धुन्धुवधे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
अध्याय अकरावा समाप्त

GO TOP