श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
पञ्चविंशोऽध्यायः


अक्रूरागमनम्

वैशंपायन उवाच
अथास्तं गच्छति तद मन्दरश्मौ दिवाकरे ।
संध्यारक्ततले व्योम्नि शशाङ्‌‌‍के पाण्डुमण्डले ॥ १ ॥
नीडस्थेषु विहङ्‌‌‍गेषु सत्सु प्रादुष्कृताग्निषु ।
ईषत्तमःसंवृत्तासु दिक्षु सर्वासु सर्वशः ॥ २ ॥
घोषवासिषु सुप्तेशु वाशन्तीषु शिवासु च ।
नक्तंचरेषु हृष्टेषु पिशिताशनकाङ्‌‌‍क्षिषु ॥ ३ ॥
शक्रगोपाह्वयामोदे प्रदोषेऽभ्यासतस्करे ।
संध्यामयीमिव गुहं सम्प्रतिष्ठे दिवाकरे ॥ ४ ॥
अधिश्रयणवेलायां प्राप्तायां गृहमेधिनाम् ।
वन्यैर्वैखानसैर्मन्त्रैर्हूयमाने हुताशने ॥ ५ ॥
उपावृत्तासु वै गोषु दुह्यमानासु च व्रजे ।
असकृद्‌व्याहरन्तीषु बद्धवत्सासु धेनुषु ॥ ६ ॥
प्रकीर्णदामनीकेषु गास्तथैवाह्वयत्सु च ।
सनिनादेषु गोपेषु काल्यमाने च गोधने ॥ ७ ॥
करीषेषु प्रकॢप्तेषु दीप्यमानेषु सर्वशः ।
काष्ठभारानतस्कन्धैर्गोपैरभ्यागतैस्तथा ॥ ८ ॥
किञ्चिदभ्युद्यते सोमे मन्दरश्मौ विराजति ।
ईषद्‌विगाहमानायां रजन्यां दिवसे गते ॥ ९ ॥
प्राप्ते दिनव्युपरमे प्रवृत्ते क्षणदामुखे ।
भास्करे तेजसि गते सौम्ये तेजस्युपस्थिते ॥ १० ॥
अग्निहोत्राकुले काले सौम्येन्दौ समुपस्थिते ।
अग्नीषोमात्मके संधौ वर्तमाने जगन्मये ॥ ११ ॥
पश्चिमेनाग्निदीप्तेन पूर्वेणोत्पलवर्चसा ।
दग्धाद्रिसदृशे व्योम्नि किञ्चित्तारागणाकुले ॥ १२ ॥
वयोभिर्वासमुशतां बन्धुभिश्च समागमम् ।
शंसद्भिः स्यन्दनेनाशु प्राप्तो दानपतिर्व्रजम् ॥ १३ ॥
प्रविशन्नेव पप्रच्छ सान्निध्यं केशवस्य सः ।
रौहिणेयस्य चाक्रूरो नन्दगोपस्य चासकृत् ॥ १४ ॥
स नन्दगोपस्य गृहं वासाय विबुधोपमः ।
अवतीर्य ततो यानात्प्रविवेश महाबलः ॥ १५ ॥
हर्षपूर्णेन वक्त्रेण साश्रुनेत्रेण चैव हि ।
प्रविशन्नेव च द्वारि ददर्शादोहने गवाम् ॥ १६ ॥
वत्समध्ये स्थितं कृष्णं सवत्समिव गोवृषम् ।
स तं हर्षपरीतेन वचसागद्‌गदेन वै ॥ १७ ॥
एहि केशव तातेति प्रव्याहरत धर्मवित् ।
उत्तानशायिनं दृष्ट्‍वा पुनर्दृष्ट्‍वा श्रिया वृतम् ॥ १८ ॥
अव्यक्तयौवनं कृष्णमक्रूरः प्रशशंस ह ।
अयं स पुण्डरीकाक्षः सिम्हशार्दूलविक्रमः ॥ १९ ॥
संपूर्णजलमेघाभः पर्वतप्रवराकृतिः ।
मृधेष्वधर्षणीयेन सश्रीवत्सेन वक्षसा ।
द्विषन्निधनदक्षाभ्यां भुजाभ्यां साधु भूषितः ॥ २० ॥
मूर्तिमान्स रहस्यात्मा जगतोऽग्र्यस्य भाजनम् ।
गोपवेषधरो विष्णुरुदग्राग्र्यतनूरुहः ॥ २१ ॥
किरीटलाञ्छनेनापि शिरसा छत्रवर्चसा ।
कुण्डलोत्तमयोग्याभ्यां श्रवणाभ्यां विभूषितः ॥ २२ ॥
हारार्हेण च पीनेन सुविस्तीर्णेन वक्षसा ।
द्वाभ्यां भुजाभ्यां वृत्ताभ्यां दीर्घाभ्यामुपशोभितः ॥ २३ ॥
स्त्रीसहस्रोपचर्येण वपुषा मन्मथाधिना ।
पीते वसानो वसने सोऽयं विष्णुः सनातनः ॥ २४ ॥
धरण्याश्रयभूताभ्यां चरणाभ्यामरिन्दमः ।
त्रैलोक्याक्रान्तिभूताभ्यां भुवि पद्भ्यां व्यवस्थितः ॥ २५ ॥
रुचिराग्रकरश्चास्य चक्राङ्‌‌‍कित इवेक्षते ।
द्वितीय उद्यतश्चापि गदासंयोगमिच्छति ॥ २६ ॥
अवतीर्णो भवायेह प्रथमं पदमात्मनः ।
शोभतेऽद्य भुवि श्रेष्ठस्त्रिदशानो धुरन्धरः ॥ २७ ॥
अयं भविष्ये कथितो भविष्यकुशलैर्नरैः ।
गोपालो यादवं वंशं क्षीणं विस्तारयिष्यति ॥ २८ ॥
तेजसा यादवाश्चास्य शतशोऽथ सहस्रशः ।
वंशमापूरयिष्यन्ति ह्योघा इव महार्णवम् ॥ २९ ॥
अस्येदं शासने सर्वं जगत्स्थास्यति शाश्वतम् ।
निहतामित्रसामन्तं स्फीतं कृतयुगे तथा ॥ ३० ॥
अयमास्थाय वसुधां स्थापयित्वा जगद्वशे ।
राज्ञां भविष्यत्युपरि न च राजा भविष्यति ॥ ३१ ॥
नूनं त्रिभिः क्रमैर्जित्वा यथानेन प्रभुः कृतः ।
पुरा पुरन्दरो राजा देवतानां त्रिविष्टपे ॥ ३२ ॥
तथैव वसुधां जित्वा जितपूर्वां त्रिभिः क्रमैः ।
स्थापयिष्यति राजानमुग्रसेनं न संशयः ॥ ३३ ॥
प्रसृष्टवैरगाधोऽयं प्रश्नैश्च बहुभिः श्रुतः ।
ब्राह्मणैर्ब्रह्मवादैश्च पुराणोऽयं हि गीयते ॥ ३४ ॥
स्पृहणीयो हि लोकस्य भविष्यति च केशवः ।
तथा ह्यस्योत्थिता बुद्धिर्मानुष्यमुपजीवितुम् ॥ ३५ ॥
अहं त्वस्याद्य वसतिं पूजयिष्ये यथाविधि ।
विष्णुत्वं मनसा चैव पूजयिष्यामि मन्त्रवत् ॥ ३६ ॥
यच्च ज्ञातिपरिज्ञानं प्रादुर्भावश्च वै नृषु ।
अमानुषं वेद्मि चैनं ये चान्ये दिव्यचक्षुषः ॥ ३७ ॥
सोऽहं कृष्णेन वै रात्रौ संमन्त्र्य विदितात्मना ।
सहानेन गमिष्यामि सव्रजो यदि मंस्यते ॥ ३८ ॥
एवं बहुविधं कृष्णं दृष्ट्‍वा हेत्वर्थकारणैः ।
विवेश नन्दगोपस्य कृष्णेन सह संसदम् ॥ ३९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि अक्रूरागमने पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥


अक्रूरागमन -

वैशंपायन सांगतातः---इकडे कंसाची आज्ञा घेऊन अक्रूर श्रीकृष्णाला आणण्याकरिता मथुरेहून निघाला, तो वाटेंत संध्याकाळ झाली. किरणांची प्रखरता कमी होऊन भगवान् सहस्ररश्मी अस्तास गेला. नभोमंडल संध्यारागाने तांबडें लाल झाले. चंद्रबिंब फिकट फिकट दिसावयास लागले. पक्षी आपआपल्या घरट्यांत जाऊन बसले. अग्निहोत्री लोकांनी आपले अग्नि प्रज्वलित केले. सर्व दिशा किंचित् अंधकारानें व्याप्त झाल्या. गौळवाड्यातील लहान मुलांची निजानीज झाली. भालू ओरडूं लागल्या. मांस भक्षणासाठी जिभा चाटणाऱ्या नक्तंचर प्राण्यांना रात्र पडल्यामुळे मोठा आनंद झाला. दिवसभर उन्हांत तापलेल्या इंद्र-गोपांना रात्र आली तेव्हां साहजिकच आनंद वाटला. प्रदोषकाळ आलासा पाहातांच विद्यार्थ्यांनीही वेदाध्ययन बंद ठेविलें. प्रदोष आलासा पाहून रविराजाने संध्यारूपी अंधाऱ्या गुहेमध्ये जणूं दडी मारली आहे की काय असे वाटले, गृहस्थांची अधिश्रयणाची (होमाचे दूध अग्नीवर ठेवण्याची ) वेळ झाली. वानप्रस्थाश्रमी जन नीवारादि धान्यांनी मंत्रोक्त हवन करं लागले. वनामध्ये चरावयास सोडलेल्या गाई आपआपल्या गोठ्यांत नुकत्याच परत येऊ लागल्या होत्या, त्यांचे गवळी लोक दूध काढूं लागले. ज्या गाईची वासरे बांधून ठेवलेली होती, त्या एकसारख्या हंबरूं लागल्या. कांहीं गवळी हातांत दावी धरून मोठमोठ्याने गाईना हाका मारीत होते. काही जण गाईना बांधण्यासाठी दाव्यापाशीं नेत होते. काहीं गोप खांद्यावर घेतलेल्या भल्या मोठ्या लांकडांच्या मोळ्यांमुळे लवत, कांपत नुकतेच घरी परत आले होते, ते गोठ्यामध्ये जिकडे तिकडे गोमयाचा चूर पेटवू लागले. हलके हलके चंद्रप्रकाश चांगला दिसू लागून रजनीनाथ आपल्या शीतल किरणांनी आकाशामध्ये झळकू लागला. दिवस पार नाहीसा होऊन हलके हलके थोडथोडी रात्र पडू लागली. दिवस संपल्यामुळे सूर्यप्रकाश अगदी नाहीसा झाला होता. रातीला नुकतीच सुरवात होऊन चंद्राचे तेज चमकू लागले होते. त्या वेळी अग्निहोत्र्यांचे हवन कडाक्याने सुरू झाले. व चंद्रमा दुसऱ्या दिवशी असलेल्या मृगशीर्ष नक्षत्रांवर प्राप्त झाला. रात्र (विशेषतः रात्रीचे अग्रमुख ) अग्नि व सोम यांचे योगानें प्रकाशित होते. म्हणून त्या वेळी भोक्तृभोग्यात्मक अखिल जगत्, अग्नीषोमात्मक रात्रीच्या पहिल्या प्रहराचा अनुभव घेत होते; असे म्हणण्यास हरकत नाही, त्याचप्रमाणे त्या वेळी आकाशामध्ये थोड्याशा तारका कोठे कोठे मधून मधून चमकत होत्या. पश्चिमेच्या बाजूला नभोमंडळ अशीप्रमाणे शोभत होते व पूर्वेकडे त्याचा रंग रक्तकमलाप्रमाणे दिसत होता. त्यामुळे, सर्व आकाश जणू काय एखाद्या पेटलेल्या पर्वताप्रमाणे भास लागले. इतक्यांत, परगांवीं दूर गेलेले प्रियजन आपल्या आप्तेष्टांस भेटणार असे सुचविणारे पक्षी व्रजामध्ये जाऊ लागले. त्यांचे बरोबर दानपति अक्रूर हा शीघ्रगामी रथामध्ये बसून गर्दीगर्दीने वजाप्रत प्राप्त झाला. अक्रूर व्रजांत येऊन ठेपतांच, ' श्रीकृष्ण कोठे आहे ? रोहिणीचा पुत्र बलराम कोठें रहातो ! नंद काय करीत आहे ?' इत्यादि प्रश्न तो एक सारखा गोकुळवासी जनांना करूं लागला. देवाप्रमाणे महासमर्थ असलेला तो अक्रूर नंदाच्या गृहासमीप येतां क्षणींच, रथांतून खाली उतरला आणि निवास करण्याच्या उद्देशाने त्याने नंदाच्या वाड्यांत प्रवेश केला, आपणांला आज कृष्णदर्शन होणार म्हणून अक्रूराला अत्यंत हर्ष होऊन त्याचे मुख प्रफुल्ल झाले होते व नेत्रांतून आनंदाश्रु चालले होते. नंदाच्या घरामध्ये प्रवेश करतांना, दारांतच गाई, दोहन चालले होते, त्या ठिकाणी वासरांमध्ये श्रीकृष्ण बसलेला होता; तो अक्रूराच्या दृष्टीस पडला, सभोंवतीं वासरे असून मध्ये एखादा वृषभ असावा, त्याप्रमाणे श्रीकृष्ण शोभत होता. त्याला पाहून धर्मवेत्ता अक्रूर हर्षयुक्त व सददित वाणीने म्हणाला' "बा केशवा, बाळा इकडे येरे." जगताचा संहार झाल्यानंतर श्रीकृष्णपरमात्मा वटपत्रावर पाठ टेकून शयन करितो. नंतर दुष्टांचा संहार करण्याकरितां, त्रैलोक्य आक्रमण करण्याच्या शक्तीने युक्त होऊन तोच वामन रूपाने अवतीर्ण होतो. त्या परमात्म्याचें तें पौगण्डरूप पाहून अक्रूराने स्तवन करण्यास आरंभ केला. " देवा, तूं सिव्ह व व्याघ्र यांच्याप्रमाणे पराक्रमी आहेस. तुझी कांति जलपूर्ण मेघासारखी आहे. हिमाचलाप्रमाणे तुझी आकृति आहे. तुझें वक्षःस्थळ श्रीवत्मचिन्हाने युक्त असल्याकारणाने संग्रामांत तुझ्या वक्षःस्थलावर प्रहार करण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. शत्रूचा निःपात करण्याला, तुझ्या भुजा पूर्णपणे समर्थ आहेत. उपनिषदांमध्ये ज्या पुरुपाचे वर्णन केले आहे, व जगतामध्ये जो अग्रपूजेच्या मानाला योग्य आहे, तो पुरुष तूंच. भक्तांचे दर्शन होतांच ज्याच्या अंगावर रोमांच उभे रहातात, तो कमललोचन श्रीविष्णु प्रत्यक्ष तूंच आहेस. केवळ भक्तांना तारण्याकरितां तूं सांप्रत गोपरूपाने अवतीर्ण झाला आहेस. तुझ्या मस्तकावर छत्राप्रमाणे किरीट शोभत असून कर्णीमध्ये उत्तम व योग्य अशी कुंडलें झळकत आहेत. तुझे वक्षःस्थळ पुष्ट व प्रशस्त असून हार धारण करण्यास अत्यंत युक्त आहे. दीर्घ व वाटोळ्या दोन भुजांनी तूं फार शोभिवंत दिसत आहेस. तुझ्या शरीरामध्ये नुकतेंच मदनाचें ठाणे बसत असून सहस्रावधि स्त्रिया तुझी सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत. तूं दोन पीत वस्त्रे परिधान केली आहेस. खरोखर, तूं सनातन विष्णूचाच अवतार आहेस यांत शंका नाही. पूर्वी प्रलयकाली वटपत्रावर शयन करून हे अरिंदमा, तूंच आपल्या पायांचा आधार देऊन पृथ्वीचे रक्षण केले. पुढे वामन अवताराचे वेळी आपल्या पावलांनी तूं त्रैलोक्य व्यापून टाकलेंस व तोच तूं सांप्रत कृष्ण. रूपाने अवतरला आहेस. तुझा उजवा हात सुंदर असून चक्रचिन्हाने युक्त आहे. तसेच दुसरा वर उचललेला डावा हातही गदेच्या संयोगाची इच्छा करीत आहे असे वाटते. हे त्रिदशधुरंघरा कृष्णा, तूं सांप्रत जगाच्या कल्याणासाठी भूलोकीं अवतीर्ण झाला आहेस; तुझें हल्लींचे स्वरूप खरोखर अत्यंत मनोहर दिसत आहे. हे श्रीकृष्णा, तूं क्षीण झालेल्या यादववंशाचा विस्तार करशील, असें भविष्यवादी ज्योतिषांनी पूर्वीच वर्तवून ठेविलें आहे. उदकाचे प्रवाह सर्व बाजूंनी येऊन ज्याप्रमाणे महासागर भरून टाकतात, त्याप्रमाणे तूं आपल्या तेजानें सहस्रावधि यादव उत्पन्न करून यदुवंशाचा उद्धार करशील. हे अखिल जगत् चिरकाल तुझ्या शासनांत राहील. सर्व शत्रूचे निर्दलन होऊन कृतयुगाप्रमाणे हे विश्व सुखाने नांदेल. सर्व जगताला आपल्या मुठीत ठेवून तूं सर्व राजांच्या वर होशील. परंतु तूं मात्र राज्यपदाचा स्वीकार करणार नाहीस. पूर्वी तीन पावलांनीं त्रैलोक्य जिंकून ज्याप्रमाणे तुं इंद्राची राज्यपदावर स्थापना केलीस, त्याप्रमाणे एकवार जिंकलेलें त्रैलोक्य पुनः तसेच जिंकून तूं उग्रसेनाला फिरून राज्यपद प्राप्त करून देशील यांत शंका नाही. तूं उत्पन्न झालेल्या वैराचा शेवट करतोस. प्रश्नोपनिषदांत तुझेच स्तवन केले असून ब्रह्मवादी ब्राह्मण तुझेच चरित्र गातात. पुराणांतरी देखील तुझेंच गायन केलेले आहे. मानवांचा उद्धार करण्याकरितां, मनुष्यरूपाने ज्या अर्थी तूं अवतीर्ण होण्याचे मनांत आणिलेले दिसत आहे, त्या अर्थी हे केशवा, तुझें चरित्र अत्यंत स्पृहणीय होईल असे वाटते. असो. आज मी तुझी यथाविधि पूजा करीन; तूं प्रत्यक्ष विष्णु आहेस, म्हणून मी तुझी मंत्रोक्त मानसपूजा करीन. मी व दुसरे जे दिव्यदृष्टि पुरुष आहेत, त्यांनी तूं अमानुष आहेस हे ओळखले आहे. तसेंच तुझी जात व तूं मनुष्यावतार घेण्याचे कारणही आम्ही जाणतो." ... पुढे अक्रूर आपल्या मनाशी म्हणाला, " आज रात्रीं शहाण्या कृष्णाशी खलबत करून त्याची संमति मिळाली तर सर्व व्रज बरोबर घेऊन मी येथून मथुरेला प्रयाण करीन." याप्रमाणे पुष्कळ प्रकारे सारासार विचार केल्यानंतर, कृष्णाला बरोबर घेऊन अक्रूर नंदाने बोलावलेल्या सभेत गेला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि अक्रूरागमने पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
अध्याय पंचविसावा समाप्त

GO TOP