श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
द्वितीयोऽध्यायः


कंससंकेतः आर्यानुशासनं च

वैशंपायन उवाच
सोऽज्ञापयत संरब्धः सचिवानात्मनो हि तान् ।
यत्ता भवत सर्वे वै देवक्या गर्भकृन्तने ॥ १ ॥
प्रथमादेव हन्तव्या गर्भास्ते सप्त एव हि ।
मूलादेव तु हन्तव्यः सोऽनर्थो यत्र संशयः ॥ २ ॥
देवकी च गृहे गुप्ता प्रच्छन्नैरभिरक्षिता ।
स्वैरं चरतु विश्रब्धा गर्भकाले तु रक्ष्यताम् ॥ ३ ॥
मासान् वै पुष्पमासादीन् गणयन्तु मम स्त्रियः ।
परिणामे तु गर्भस्य शेषं ज्ञास्यामहे वयम् ॥ ४ ॥
वसुदेवस्तु संरक्ष्यः स्त्रीसनाथासु भूमिषु ।
अप्रमत्तैर्मम हितै रात्रावहनि चैव हि ।
स्त्रीभिर्वर्षवरैश्चैव वक्तव्यं न तु कारणम् ॥ ५ ॥
एष मानुष्यको यत्‍नो मानुषैरेव साध्यते ।
श्रूयतां येन दैवं हि मद्विधैः प्रतिहन्यते ॥ ६ ॥
मन्त्रग्रामैः सुविहितैरौषधैश्च सुयोजितैः ।
यत्‍नेन चानुकूलेन दैवमप्यनुलोम्यते ॥ ७ ॥
वैशंपायन उवाच
एवं स यत्‍नवान् कंसो देवकीगर्भकृन्तने ।
भयेन मन्त्रयामास श्रुतार्थो नारदात् स वै ॥ ८ ॥
एवं श्रुत्वा प्रयत्‍नं वै कंसस्यारिष्टसंज्ञितम् ।
अन्तर्धानं गतो विष्णूश्चिन्तयामास वीर्यवान् ॥ ९ ॥
सप्तेमान् देवकीगर्भान् भोजपुत्रो वधिष्यति ।
अष्टमे च मया गर्भे कार्यमाधानमात्मनः ॥ १० ॥
तस्य चिन्तयतस्त्वेवं पातालमगमन्मनः ।
यत्र ते गर्भशयनाः शड्गर्भा नाम दानवाः ॥ ११ ॥
विक्रान्तवपुषो दीप्तास्तेऽमृतप्राशनोपमाः ।
अमरप्रतिमा युद्धे पुत्रा वै कालनेमिनः ॥ १२ ॥
ते ताततातं संत्यज्य हिरण्यकशिपुं पुरा ।
उपासांचक्रिरे दैत्याः पुरा लोकपितामहम् ॥ १३ ॥
तप्यमानास्तपस्तीव्रं जटामण्डलधारिणः ।
तेषां प्रीतोऽभवद् ब्रह्मा षड्गर्भाणां वरं ददौ ॥ १४ ॥
ब्रह्मोवाच
भो भो दानवशार्दूलास्तपसाहं सुतोषितः ।
ब्रूत वो यस्य यः कामस्तस्य तं तं करोम्यहम् ॥ १५ ॥
ते तु सर्वे समानार्था दैत्या ब्रह्माणमब्रुवन् ।
यदि नो भगवान् प्रीतो दीयतां नो वरो वरः ॥ १६ ॥
अवध्याः स्याम भगवन् देवतैः समहोरगैः ।
शापप्रहरणैश्चैवं स्वस्ति नोऽस्तु महर्षिभिः ॥ १७ ॥
यक्षगन्धर्वपतिभिः सिद्धचारणमानवैः ।
मा भूद् वधो नो भगवन् ददासि यदि नो वरम् ॥ १८ ॥
तानुवाच ततो ब्रह्मा सुप्रीतेनान्तरात्मना ।
भवद्भिर्यदिदं प्रोक्तं सर्वमेतद् भविष्यति ॥ १९ ॥
षड्गर्भाणां वरं दत्वा स्वयंभूस्त्रिदिवं गतः ।
ततो हिरण्यकशिपुः सरोषो वाक्यमब्रवीत् ॥ २० ॥
मामुत्सृज्य वरो यस्माद् धृतो वः पद्मसम्भवात् ।
तस्माद् वस्त्याजितः स्नेहः शत्रुभूतांस्त्यजाम्यहम् ॥ २१ ॥
षड्गर्भा इति योऽयं वः शब्दः पित्राभिवर्धितः ।
स एव वो गर्भगतान् पिता सर्वान् वधिष्यति ॥ २२ ॥
षडेव देवकीगर्भाः शड्गर्भा वै महासुराः ।
भविष्यथ ततः कंसो गर्भस्थान् वो वधिष्यति ॥ २३ ॥
वैशंपायन उवाच
जगामाथ ततो विष्णुः पातालं यत्र तेऽसुराः ।
षड्गर्भाः संयताः सन्ति जले गर्भगृहेशयाः ॥ २४ ॥
संददर्श जले सुप्तान् षड्गर्भान् गर्भसंस्थितान् ।
निद्रया कालरूपिण्या सर्वानन्तर्हितान् स वै ॥ २५ ॥
स्वप्नरूपेण तेषां वै विष्णुर्देहानथाविशत् ।
प्राणेश्वरांश्च निष्कृष्य निद्रायै प्रददौ तदा ॥ २६ ॥
तां चोवाच ततो निद्रां विष्णुः सत्यपराक्रमः ।
गच्छ निद्रे मयोत्सृष्टा देवकीभवनान्तिकम् ॥ २७ ॥
इमान् प्राणेश्वरान् गृह्य षड्गर्भान् दानवोत्तमान् ।
षड्गर्भान् देवकीगर्भे योजयस्व यथाक्रमम् ॥ २८ ॥
जातेष्वेतेषु गर्भेषु नीतेषु च यमक्षयम् ।
कंसस्य विफले यत्‍ने देवक्याः सफले श्रमे ॥ २९ ॥
प्रसादं ते करिष्यामि मत्प्रभावसमं भुवि ।
येन सर्वस्य लोकस्य देवि देवी भविष्यसि ॥ ३० ॥
सप्तमो देवकीगर्भो योंऽशः सौम्यो ममाग्रजः ।
स संक्रामयितव्यस्ते सप्तमे मासि रोहिणीम् ॥ ३१ ॥
संकर्षणात्तु गर्भस्य स तु संकर्षणो युवा ।
भविष्यत्यग्रजो भ्राता मम शीतांशुदर्शनः ॥ ३२ ॥
पतितो देवकीगर्भः सप्तमोऽयं भयादिति ।
अष्टमे मयि गर्भस्थे कंसो यत्‍नं करिष्यति ॥ ३३ ॥
या तु सा नन्दगोपस्य दयिता भुवि विश्रुता ।
यशोदा नाम भद्रं ते भार्या गोपकुलोद्वहा ॥ ३४ ॥
तस्यास्त्वं नवमो गर्भः कुलेऽस्माकं भविष्यसि ।
नवम्यामेव संजाता कृष्णपक्षस्य वै तिथौ ॥ ३५ ॥
अहं त्वभिजितो योगे निशायां यौवने स्थिते ।
अर्धरात्रे करिष्यामि गर्भमोक्षं यथासुखम् ॥ ३६ ॥
अष्टमस्य तु मासस्य जातावावां ततः समम् ।
प्राप्स्यावो गर्भव्यत्यासं प्राप्ते कंसस्य नाशने ॥ ३७ ॥
अहं यशोदां यास्यामि त्वं देवि भज देवकीम् ।
आवयोर्गर्भसंयोगे कंसो गच्छतु मूढताम् ॥ ३८ ॥
ततस्त्वां गृह्य चरणे शिलायां पातयिष्यति ।
निरस्यमाना गगने स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ३९ ॥
मच्छवीसदृशी कृष्णा संकर्षणसमानना ।
बिब्रती विपुलौ बाहू मम बाहूपमौ दिवि ॥ ४० ॥
त्रिशिखं शूलमुद्यम्य खड्गं च कनकत्सरुम् ।
पात्रीं च पूर्णां मधुना पङ्‌कजं च सुनिर्मलम् ॥ ४१ ॥
नीलकौशेयसंवीता पीतेनोत्तरवाससा ।
शशिरश्मिप्रकाशेन हारेणोरसि राजता ॥ ४२
दिव्यकुण्डलपूर्णाभ्यां श्रवणाभ्यां विभूषिता ।
चन्द्रसापत्‍नभूतेन मुखेन त्वं विराजिता ॥ ४३ ॥
मुकुटेन विचित्रेण केशबन्धेन शोभिना ।
भुजङ्‌गाभैर्भुजैर्भीमैर्भूषयन्ती दिशो दश ॥ ४४ ॥
ध्वजेन शिखिबर्हेण उच्छ्रितेन विराजिता ।
अङ्‌‌गजेन मयूराणामङ्‌‌गदेन च भास्वता ॥ ४५ ॥
कीर्णा भूतगणैर्घोरैर्मन्नियोगानुवर्तिनी ।
कौमारं व्रतमास्थाय त्रिदिवं त्वं गमिष्यसि ॥ ४६ ॥
तत्र त्वां शतदृक्छक्रो मत्प्रदिष्टेन कर्मणा ।
अभिषेकेण दिव्येन देवतैः सह योक्ष्यसे ॥ ४७ ॥
तत्रैव त्वां भगिन्यर्थे ग्रहीष्यति स वासवः ।
कुशिकस्य तु गोत्रेण कौशिकी त्वं भविष्यसि ॥ ४८ ॥
स ते विन्ध्ये नगश्रेष्ठे स्थानं दास्यति शाश्वतम् ।
ततः स्थानसहस्रैस्त्वं पृथिवीं शोभयिष्यसि ॥ ४९ ॥
त्रैलोक्यचारिणी सा त्वं भुवि सत्योपयाचना ।
चरिष्यसि महाभागे वरदा कामरूपिणी ॥ ५० ॥
तत्र शुम्भनिशुम्भौ द्वौ दानवौ नगचारिणौ ।
तौ च कृत्वा मनसि मां सानुगौ नाशयिष्यसि ॥ ५१ ॥
कृत्वानुयात्रां भूतैस्त्वं सुरामांसबलिप्रिया ।
तिथौ नवंयां पूजां त्वं प्राप्स्यसे सपशुक्रियाम् ॥ ५२ ॥
ये च त्वां मत्प्रभावज्ञाः प्रणमिष्यन्ति मानवाः ।
तेषां न दुर्लभं किंचित् पुत्रतो धनतोऽपि वा ॥ ५३ ॥
कान्तारेष्ववसन्नानां मग्नानां च महार्णवे ।
दस्युभिर्वा निरुद्धानां त्वं गतिः परमा नृणाम् ॥ ५४ ॥
त्वां तु स्तोष्यन्ति ये भक्त्या स्तवेनानेन वै शुभे ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ५५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
भारावतरणे निद्रासंविज्ञाने द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


कंसाचा संकेत व आर्येला वरदान -

वैशंपायन सांगतात:- याप्रमाणें त्या कंसाने खवळून जाऊन आपले मर्जीतले जे सचिव होते त्यांस आज्ञा केली कीं, देवकीचे गर्भ छेदून टाकण्याचे कामी कंबर बांधून तयार असा. तिचे सातही गर्भ उदरांत संभूत होतांच ठार करा. कारण, माझा समज असा आहे कीं, आठव्या गर्भापर्यंत न थांबतां या अनर्थाचें मूळ पहिल्या गर्भापासूनच छाटून राहिलें पाहिजे. यासाठीं आजपासन देवकीच्या घरांत चोरगस्तीने आटोकाट पहारा ठेवा. मात्र तो अशा खुबीनें कीं, तिला तर संशय येऊ नये. तिनें निर्भय स्वानंदांत हिंडावे फिरावे; मात्र तिचे गर्भारपणीं तिला इकडे तिकडे हालू देऊं नका. आतां गर्भारपणा ध्यानांत येण्यांसाठी असे करावें कीं, मजकडून ज्या स्त्रिया हेर असतील त्यांनीं तिची विटाळशीची पाळी चुकली कीं दिवसगणनेस आरंभ करावा. पुढें त्या हिशोबाने दहावा महिना उजाडला कीं, काय करणें तें आपण करूं. तसेंच माझे हित इच्छिणाऱ्या ज्या स्त्रिया व जे वर्षवर (नपूंसक) असतील त्यांनीं रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून जेथे मिळून स्त्रियांचा संचार आहे, अशा स्थलीं वसुदेवाचा रिघाव न होईल अशी खबरदारी ठेवावी; ( कारण तो प्रसूतिकालीं गर्भ अन्यत्र नेईल.) मात्र त्याला कारण काय तें सांगू नये. येथपर्यंतच्या ह्या गोष्टी मानवी यत्नाच्या आहेत, करितां त्या साधण्यासाठी मनुष्यांनीच तत्परता ठेवावी. आतां दैवाधीन जो भाग असेल त्याची वाट काय म्हणून कोणी शंका घेईल, तर त्याचाही उलगडा सांगतो. ऐका. दैव म्हणजे बहुधा मनुष्याचे आटोक्याबाहेरचे असा सामान्यांचा समज आहे. परंतु, अस्मादिकांच्याजवळ दैव हाणून पाद्ययाच्याही सबळ युक्त्या आहेत. सुविहित अशा मंत्रसमुच्चयानें, तसेंच निवडक औषधींनी व इतर परिस्थित्यनुकल यत्नानीं दैव देखील वळवितां येतें.

वैशंपायन सांगतातः- याप्रमाणें नारदापासून भावी उपायाची गोष्ट ऐकल्यामुळे मनांत भिऊन जाऊन तो दीर्घप्रयत्नी कंस देवकीचे गर्भ छाटून काढण्याचे कामी खलबते करूं लागला.

इकडे अखिल शक्तिमान् परमात्मा विष्णु हे ध्यानस्थ असतां कंस हा देवकीचे गर्भछेद करण्याचे कामी असे घोर उपाय योजून राहिला आहे असें त्यांचे ध्यानी येतांच, त्यांनीं आपल्याशी विचार केला कीं, 'ठीक आहे, हा भोजवंशोत्पन्न कंस देवकीचे पहिले सात गर्भ ठार करणार; ते झाले म्हणजे आठव्या वेळीं मात्र आपण स्वतः देवकीचे गर्भात जाऊन राहावयाचे.' या प्रकारचे विचारांत असतां असतांच परमात्म्याचें मन पाताळलोकाकडे गेलें. तेथें हंस, सुविक्रम, क्रोध, दमन, रिपुमर्दन व क्रोधहंता या नावांनी प्रख्यात असे षड्गर्भसंज्ञक सहा बंधु पाण्यांत दडून राहिलेले होते. हे बंधु कालनेमीचे पुत्र असन मोठे धिप्पाड, तेजस्वी, देवतुल्य व युद्धांत तर प्रतिटेवच असे होते. यांनी पूर्वी आपला आजा हिरण्यकशिपु याला न मानितां सर्व लोकांचा पितामह जो ब्रह्मदेव याची उपासना केली. डोईवर जटांचीं वेटोळी पेंडून त्यांनीं खडतर तपस्या केली; त्या योगाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्या षड्गर्भांना वर देण्यास सिद्ध झाला.

ब्रह्मदेव त्यांना म्हणाला:- हे दानवश्रेष्ठहो, तुमचे तपस्येनें मी फार संतुष्ट झालों आहें. आतां तुमच्या कोणाच्या ज्या इच्छा असतील त्या मला सांगा, आणि मी त्या पूर्ण करीन. त्या साहीजणांची इच्छा एकच असल्यानें ते सर्वच ब्रह्मदवोस म्हणाले कीं, ' हे भगवन्, आपण जर खरोखर प्रसन्न आहां तर आम्हां सर्वांना एकच पण तो मात्र शेलका वर पाहिजे आहे, तेवढा द्यावा. इतकाच कीं, आपण ज्यापक्षीं आम्हांस वर देत आहां, त्या अर्थी देव, उरग, यक्ष, गंधर्वपति, सिद्ध, चारण किंवा मनुष्य यापैकी कोणाचे हातून आमचा वध होऊं नये. त्याचप्रमाणे मोठमोठे तपोधनऋषि हे जरी हात उचलून मारणारे नाहींत तरी त्यांचे शाप हे अस्त्राहून घातक असतात, व ते त्यांचाच वर्षाव चालवितात. तर अशांच्या शापापासूनही आम्हांस बाधा होऊ नये एवढे द्या.

हें ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न अंतःकरणानें त्यांस म्हणाले कीं, तुम्ही आतां जें जें कांहीं मागितले ते तें सर्व तुमचे मनाप्रमाणें होईल, याप्रमाणे त्या षडगर्भबंधूंना वर देऊन ब्रह्मदेव स्वर्गी गेले. इकडे वरील प्रकार ऐकून हिरण्यकशिपु क्रुद्ध होऊन षडगर्भास म्हणाला कीं, मला अवगणून ज्या अर्थी ब्रह्मदेवापासून वर मिळविला त्या अर्थी तुम्ही माझे आतां शत्रूच झाला व म्हणून तुमच्यावरील माझें सर्व प्रेम उडालें आहे, व मी तुम्हांला आजपासून टाकिले आहेत, असें समजा. शिवाय ज्या तुमचे पित्यानें तुम्हांला षडगर्भा म्हणून मोठे प्रतिष्ठित नांव दिलें व तुमचे देव्हारे केलें तोच आतां तुम्ही गर्भस्थ असतांना तुम्हा सर्वांचा वध करील. गर्भाचा संभव कोठून म्हणाल तर ऐका. देवकीचे पोटीं ओळीने सहा गर्भ राहावे असा देवसंकेत आहे व तुम्हीही दैत्य सहाच आहां, म्हणून तुम्हीच देवकीच्या गर्भात जाल व तेथें असतां कंस तुम्हा सर्वांना ठार करील.

वैशंपायन म्हणतात : -हिरण्यकशिपूने असा शाप दिल्यावर ते सहाही बंधु पाताळांत जाऊन पाण्याचे पोटी लपून बसले होते. त्याच स्थळी श्रीविष्णु गेले. पाहातात तों ते साहीजण पाण्यांत दडून असून, काळझोपेने विवश होऊन घोरत पडले आहेत. तेव्हा त्या सत्यपराक्रमी विष्णूंनीं स्वप्नरूपानें त्यांचे देहांत शिरून त्यांचे जीवात्मे काढून घेतले, व ते आपल्या योगमायेचे हवाली करून तिला सांगितले की, षड्गर्भ नामक जे दानवश्रेष्ठ त्यांचे जीवात्मे आहेत. ते घेऊन तूं माझ्या आज्ञेस्तव देवकीचे गृहीं जा, आणि क्रमाक्रमानें या साहीजणांस देवकीच्या गर्भात स्थापन कर. हे उपजलेरे उपजले कीं, कंस यांना यमाचे दार दाखविल (कारण, यांना शापच तसा आहे). बरें, या योगाने देवकीचेही वांझपण फिटेल व कंसाचेही श्रम फुकट जातील. ( कारण, यांना मृत्युलोकीं मारणे म्हणजे मेले त्यांनाच मारणे आहे. ) असो; येथवर गोष्टी साधल्या म्हणजे मी माझ्या सामर्थ्याला शोभेल अशा प्रकारचा तुझ्यावर मृत्युलोकीं प्रसाद करीन व तेणेकरून, हे महामाये, तूं सर्व मत्यलोकाची देवीच होऊन राहाशील. नंतर देवकीच्या सातव्या गर्भात माझेच तेजाचा सौम्यांश राहील, व हा पुढें माझा वडील बंधु म्हणविला जाईल. यासंबंधी तुला अशी कामगिरी आहे कीं, तो गर्भावस्थेत असतांच सातवे महिन्यांत देवकीचे गर्भातून काढून रोहिणीचे गर्भात नेऊन स्थापन करावा. तूं देवकीचे गर्भातून त्यांचें संकर्षण ( ओढून किंवा काढून अन्यत्र येणें ) केल्यामुळें याचें जन्मानंतर संकर्षण हेंच नांव लोकांत पडून हा माझा वडील बंधु म्हटला जाईल, व याची मुद्राही चंद्राप्रमाणें शीतळ व मोहक होईल. या रीतीनें देवकीचे गर्भात सातव्या महिन्यांत म्हणजे योग्यकालापूर्वीच गर्भ नाहीसा झाला असतांना तो रोहिणीचे उदरांत नेऊन ठेविला आहे, हें कंसाला न कळल्यामुळे देवकीचा हा सातवा गर्भ आपले भयानेंच पतन पावला अस वाटून आठव्या वेळीं म्हणजे मीं देवकीच्या गर्भात जाऊन राहिलों असतां माझा नाश करण्याविषयी अधिकच तयारीने तो झटेल. ( त्याला फसविण्याकरितां) कंसाचा नंद नामक जो खिल्लारी त्याची यशोदा नांवाची सर्व गौळणींत मुखरण व सर्व लोकप्रसिद्ध स्त्री आहे, तिच्या पोटी तूं आमच्याच कुळांतील ( भावंडांतील) नववा गर्भ म्हणून जन्म घे. देव तुझे कल्याण करो. तेथें तुझा जन्म श्रावण वद्यांतच नवमीला होईल व मीं अष्टमीच्या रात्रीला ऐनमध्यान्हीस, म्हणजे अभिजित नामक रात्रीच्या आठव्या मुहूर्तावर, सुखानें गर्भाबाहेर येईन. याप्रमाणे आपण दोघेही गर्भाचे आठवे महिन्यांत एकेच वेळीं जन्मास येऊन कंसाचे शासन करण जरूर असल्यामुळें आपण आपल्या गर्भाची अदलाबदल करून मी यशोदेच्या गर्भात जाईन व तूं देवकीच्या गर्भात जा. आणि आपली ही जी गर्भाची उलटापालट होईल तिजसंबंधीं कंसाला भूल पाडणे हें, हे निद्रेदेवी, तुझे काम. याप्रमाणे अदलाबदल करून तूं देवकीच्या गर्भातून बाहेर येतांच कंस तुला तंगडी धरून ताडकन् शिळेवर आपटील; त्याबरोबर तूं आकाशांत जाऊन आपल्या शाश्वत पदास पोंचशील. स्वर्गात जातांना तुझ्या अंगाची कान्ति मजसारखीच श्यामल असेल, आणि तुझा चेहेरा बलरामासारखा असेल. तुझे हात माझे हातांसारखेच लांब व मोठे असतील. तुझ्या हातांत एक तीन धारांचा त्रिशूल, एक सोन्याच्या मुठीचें खड्ग, एक मद्याने भरलेलें पात्र आणि एक अत्यंत शुभ्र असें कमळ असेल. तुझ्या नेसूं निळी रेशमी साडी असून तुझे अंगावर पिवळे पांघरूण राहील, व वक्षस्थलीं चंद्रकिरणांप्रमाणें ज्यापासून प्रकाश फांकतो आहे असला हार असून तुझ्या कानांत दिव्य कुंडलें असतील. तुझे मुख तर चंद्राचे प्रतिस्पर्धि असेल व केशपाश मनोहर असून त्यास विचित्र रत्नांचा मुकुट शोभिवंत करील. तुझे बाहू मोठ्या सर्पाप्रमाणें मृदु, मांसल व भयंकर असून दाही दिशा त्यांचे तेज फाकेल शोभायमान् मयूरपिच्छांचा तुजवर ध्वज उभारिला जाऊन मयूरपिच्छांचीच तुझीं तेजस्वी बाहूभूषणें असतील, आणि तुजभोवतीं घोर अशा भूतगणांचा वेढा असन माझे आज्ञेप्रमाणे कौमारव्रत पालन करून तूं स्वर्गास जाशील. तेथें गेल्यावर सहस्त्रनेत्र इंद्र मीं सांगितलेल्या पद्धतीने तुला दिव्याभिषेक करून तुझे ठिकाणी देवत्व उत्पन्न करील; आणि तो इंद्र तेव्हांपासून तुला आपली बहीण समजून चालेल; व तूं कुशिकाचें गोत्र घेऊन कौशिकी होशील; आणि नंतर तुला तो इंद्र गिरिश्रेष्ठ जो विंध्याचल त्यावर कायमचे मुख्य स्थान देईल. मग तेथून हजारों अन्यस्थानीं तुझ्या प्रतिमा होऊन सर्व पृथ्वीला तूं शोभिवंत करिशील. हे महाभागे, तूं मन मानेल तें रूप घेऊन आणि लोकांना वरदात्री होऊन त्रैलोक्यांत संचार करिशील; आणि तुजपाशीं कोणीं कोणतीही इच्छा मनांत धरून याचना केली असतां ती अवश्य सफल होईल. त्या विंध्याचलावर फिरणारे शुंभ आणि निशुंभ असे दोन दानव आहेत. त्यांना तूं माझें मनांत ध्यान केलें असतां त्यांच्या अनुयायांसह ठार मारिशील. श्रावण वद्य नवमीचे दिवशीं लोक तुझी जत्रा भरवून तुला दारूमांसाचे बळी देतील, व पशुहत्येसह तुझी पूजा करितीलं. जे कोणी माझें सामर्थ्य ध्यानी आणुन तुला वंदन करितील त्या मनुष्यांना धनाचे किंवा पुत्राचे बाजूने कांहीं कमी पडणार नाहीं. कोणी रानावनात फसले, किंवा समुद्रांत बुडू लागले, अथवा चोरानी वाटेत अडविले तर अशा मानवांचे तूंच रक्षण करिशील. आणि, हे कल्याणि, पुढें सांगितले तुझें स्तोत्र म्हणून जे कोणी भक्तिपूर्वक स्तवन करितील अशा भक्तांना मी कधीं नाहीसा व्हावयाचा नाही व तेही मला नाहींसे होणार नाहींत.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
कंससंकेतः च आर्यानुशासनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
अध्याय दुसरा समाप्त

GO TOP