श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व द्वितीयोऽध्यायः
दक्षोत्पत्तिकथनम् -
वैशम्पायन उवाच -
स सृष्टासु प्रजास्वेवमापवो वै प्रजापतिः ।
लेभे वै पुरुषः पत्नीं शतरूपामयोनिजाम् ॥ १ ॥
आपवस्य महिम्ना तु दिवमावृत्य तिष्ठतः ।
धर्मेणैव महाराज शतरूपा व्यजायत ॥ २ ॥
सा तु वर्षायुतं तप्त्वा तपः परमदुश्चरम् ।
भर्तारं दीप्ततपसं पुरुषं प्रत्यपद्यत ॥ ३ ॥
स वै स्वायम्भुवस्तात पुरुषो मनुरुच्यते ।
तस्यैकसप्ततियुगं मन्वन्तरमिहोच्यते ॥ ४ ॥
वैराजात् पुरुषाद् वीरं शतरूपा व्यजायत ।
प्रियव्रतोत्तानपादौ वीरात्काम्या व्यजायत ॥ ५ ॥
काम्या नाम महाबाहो कर्दमस्य प्रजापतेः ।
काम्यापुत्रास्तु चत्वारः सम्राट् कुक्षिर्विराट् प्रभुः ।
प्रियव्रतं समासाद्य पतिं सा सुषुवे सुतान् ॥ ६ ॥
उत्तानपादं जग्राह पुत्रमत्रिः प्रजापतिः ।
उत्तानपादाच्चतुरः सूनृताजनयत् सुतान् ॥ ७ ॥
धर्मस्य कन्या सुश्रोणी सूनृता नाम विश्रुता ।
उत्पन्ना वाजिमेधेन ध्रुवस्य जननी शुभा ॥ ८ ॥
ध्रुवं च कीर्तिमन्तं च शिवं शान्तमयस्पतिम् ।
उत्तानपादोऽजनयत् सूनृतायां प्रजापतिः ॥ ९ ॥
ध्रुवो वर्षसहस्राणि त्रीणि दिव्यानि भारत ।
तपस्तेपे महाराज प्रार्थयन् सुमहद् यशः ॥ १० ॥
तस्मै ब्रह्मा ददौ प्रीतः स्थानमप्रतिमं भुवि ।
अचलं चैव पुरतः सप्तर्षीणां प्रजापतिः ॥ ११ ॥
तस्यातिमात्रामृद्धिं च महिमानं निरीक्ष्य च ।
देवासुराणामाचार्यः श्लोकमप्युशना जगौ ॥ १२ ॥
अहोऽस्य तपसो वीर्यमहो श्रुतमहो बलम् ।
यदेनं पुरतः कृत्वा ध्रुवं सप्तर्षयः स्थिताः ॥ १३ ॥
तस्माच्छ्लिष्टिं च भव्यं च ध्रुवाच्छम्भुर्व्यजायत ।
श्लिष्टेराधत्त सुच्छाया पञ्च पुत्रानकल्मषान् ॥ १४ ॥
रिपुं रिपुञ्जयं पुण्यं वृकलं वृकतेजसम् ।
रिपोराधत्त बृहती चाक्षुषं सर्वतेजसम् ॥ १५ ॥
अजीजनत् पुष्करिण्यां वीरण्यां चाक्षुषो मनुम् ।
प्रजापतेरात्मजायामरण्यस्य महात्मनः ॥ १६ ॥
मनोरजायन्त दश नड्वलायां महौजसः ।
कन्यायामभवञ्छ्रेष्ठा वैराजस्य प्रजापतेः ॥ १७ ॥
ऊरुः पुरुः शतद्युम्नस्तपस्वी सत्यवान्कविः ।
अग्निष्टुदतिरात्रश्च सुद्युम्नश्चेति ते नव ॥ १८ ॥
अभिमन्युश्च दशमो नड्वलायाः सुताः स्मृताः ।
ऊरोरजनयत् पुत्रान् षडाग्नेयी महाप्रभान् ।
अङ्गं सुमनसं ख्यातिं क्रतुमङ्गिरसं गयम् ॥ १९ ॥
अङ्गात् सुनीथापत्यं वै वेनमेकमजायत ।
अपचारात् तु वेनस्य प्रकोपः सुमहानभूत् ॥ २० ॥
प्रजार्थमृषयो यस्य ममन्थुर्दक्षिणं करम् ।
वेनस्य पाणौ मथिते बभूव मुनिभिः पृथुः ॥ २१ ॥
तं दृष्ट्वा ऋषयः प्राहुरेष वै मुदिताः प्रजाः ।
करिष्यति महातेजा यशश्च प्राप्स्यते महत् ॥ २२ ॥
स धन्वी कवची खड्गी तेजसा निर्दहन्निव ।
पृथुर्वैन्यस्तदा चेमां ररक्ष क्षत्रपूर्वजः ॥ २३ ॥
राजसूयाभिषिक्तानामाद्यः स वसुधाधिपः ।
तस्माच्चैव समुत्पन्नौ निपुणौ सूतमागधौ ॥ २४ ॥
तेनेयं गौर्महाराज दुग्धा सस्यानि भारत ।
प्रजानां वृत्तिकामेन देवैः सर्षिगणैः सह ॥ २५ ॥
पितृभिर्दानवैश्चैव गन्धर्वैः साप्सरोगणैः ।
सर्पैः पुण्यजनैश्चैव वीरुद्भिः पर्वतैस्तथा ॥ २६ ॥
तेषु तेषु च पात्रेषु दुह्यमाना वसुन्धरा ।
प्रादाद्यथेप्सितं क्षीरं तेन प्राणानधारयन् ॥ २७ ॥
पृथुपुत्रौ तु धर्मज्ञौ जज्ञातेऽन्तर्द्धिपालितौ ।
शिखण्डिनी हविर्धानमन्तर्धानाद् व्यजायत ॥ २८ ॥
हविर्धानात् षडाग्नेयी धिषणाजनयत् सुतान् ।
प्राचीनबर्हिषं शुक्लं गयं कृष्णं व्रजाजिनौ ॥ २९ ॥
प्राचीनबर्हिर्भगवान् महानासीत् प्रजापतिः ।
हविर्धानान्महाराज येन संवर्द्धिताः प्रजाः ॥ ३० ॥
प्राचीनाग्राः कुशास्तस्य पृथिव्यां जनमेजय ।
प्राचीनबर्हिर्भगवान् पृथिवीतलचारिणः ॥ ३१ ॥
समुद्रतनयायां तु कृतदारोऽभवत् प्रभुः ।
महतस्तपसः पारे सवर्णायां महीपतिः ॥ ३२ ॥
सवर्णाऽऽधत्त सामुद्री दश प्राचीनबर्हिषः ।
सर्वे प्रचेतसो नाम धनुर्वेदस्य पारगाः ॥ ३३ ॥
अपृथग्धर्मचरणास्तेऽतप्यन्त महत्तपः ।
दशवर्षसहस्राणि समुद्रसलिलेशयाः ॥ ३४ ॥
तपश्चरत्सु पृथिवीं प्रचेतस्सु महीरुहाः ।
अरक्ष्यमाणामावव्रुर्बभूवाथ प्रजाक्षयः ॥ ३५ ॥
नाशकन्मारुतो वातुं वृतं खमभवद् द्रुमैः ।
दशवर्षसहस्राणि न शेकुश्चेष्टितुं प्रजाः ॥ ३६ ॥
तदुपसृत्य तपसा युक्ताः सर्वे प्रचेतसः ।
मुखेभ्यो वायुमग्निं च तेऽससृजञ्जातमन्यवः ॥ ३७ ॥
उन्मूलानथ तान् कृत्वा वृक्षान् वायुरशोषयत् ।
तानग्निरदहद्घोरं एवमासीद् द्रुमक्षयः ॥ ३८ ॥
द्रुमक्षयमथो बुद्ध्वा किञ्चिच्छिष्टेषु शाखिषु ।
उपगम्याब्रवीदेतान् राजा सोमः प्रजापतीन् ॥ ३९ ॥
कोपं यच्छत राजानः सर्वे प्राचीनबर्हिषः ।
वृक्षशून्या कृता पृथ्वी शाम्येतामग्निमारुतौ ॥ ४० ॥
रत्नभूता च कन्येयं वृक्षाणां वरवर्णिनी ।
भविष्यं जानता तत्त्वं धृता गर्भेण वै मया ॥ ४१ ॥
मारिषा नाम कन्येयं वृक्षाणामिति निर्मिता ।
भार्या वोऽस्तु महाभागाः सोमवंशविवर्द्धिनी ॥ ४२ ॥
युष्माकं तेजसोऽर्द्धेन मम चार्द्धेन तेजसः ।
अस्यामुत्पत्स्यते पुत्रो दक्षो नाम प्रजापतिः ॥ ४३ ॥
य इमां दग्धभूयिष्ठां युष्मत्तेजोमयेन वै ।
अग्निनाग्निसमो भूयः प्रजाः संवर्धयिष्यति ॥ ४४ ॥
ततः सोमस्य वचनाज्जगृहुस्ते प्रचेतसः ।
संहृत्य कोपं वृक्षेभ्यः पत्नीं धर्मेण मारिषाम् ॥ ४५ ॥
मारिषायां ततस्ते वै मनसा गर्भमादधुः ।
दशभ्यस्तु प्रचेतोभ्यो मारिषायां प्रजापतिः ।
दक्षो जज्ञे महातेजाः सोमस्यांशेन भारत ॥ ४६ ॥
पुत्रानुत्पादयामास सोमवंशविवर्धनान् ।
अचरांश्च चरांश्चैव द्विपदोऽथ चतुष्पदः ।
स दृष्ट्वा मनसा दक्षः पश्चादप्यसृजत् स्त्रियः ॥ ४७ ॥
ददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश ।
शिष्टाः सोमाय राज्ञेऽथ नक्षत्राख्या ददौ प्रभुः ॥ ४८ ॥
तासु देवाः खगा नागा गावो दितिजदानवाः ।
गन्धर्वाप्सरसश्चैव जज्ञिरेऽन्याश्च जातयः ॥ ४९ ॥
ततः प्रभृति राजेन्द्राः प्रजा मैथुनसम्भवाः ।
सङ्कल्पाद् दर्शनात् स्पर्शात् पूर्वेषां सृष्टिरुच्यते ॥ ५० ॥
जनमेजय उवाच
देवानां दानवानां च गन्धर्वोरगरक्षसाम् ।
सम्भवः कथितः पूर्वं दक्षस्य च महात्मनः ॥ ५१ ॥
अङ्गुष्ठाद् ब्रह्मणो जातो दक्षः प्रोक्तस्त्वयानघ ।
वामाङ्गुष्ठात् तथा चैव तस्य पत्नी व्यजायत ॥ ५२ ॥
कथं प्राचेतसत्वं स पुनर्लेभे महातपाः ।
एतन्मे संशयं विप्र सम्यगाख्यातुमर्हसि ।
दौहित्रश्चैव सोमस्य कथं श्वशुरतां गतः ॥ ५३ ॥
वैशम्पायन उवाच
उत्पत्तिश्च निरोधश्च नित्यौ भूतेषु पार्थिव ।
ऋषयोऽत्र न मुह्यन्ति विद्वांसश्चैव ये जनाः ॥ ५४ ॥
युगे युगे भवन्त्येते सर्वे दक्षादयो नृप ।
पुनश्चैव निरुध्यन्ते विद्वांस्तत्र न मुह्यति ॥ ५५ ॥
ज्यैष्ठ्यं कानिष्ठ्यमप्येषां पूर्वं नासीज्जनाधिप ।
तप एव गरीयोऽभूत् प्रभावश्चैव कारणम् ॥ ५६ ॥
इमां विसृष्टिं दक्षस्य यो विद्यात् सचराचराम् ।
प्रजावानापदुत्तीर्णः स्वर्गलोके महीयते ॥ ५७ ॥
इति श्रीमहाभारते खिलेशु हरिवंशपर्वणि
प्रजासर्गे दक्षोत्पत्तिकथने द्वितीयोऽध्यायः
दक्षोत्पत्तिकथन -
वैशंपायन सांगतात; - याप्रमाणें प्रजा उत्पन्न केल्यावर त्या वसिष्ठ प्रजापतीला अयोनिसंभव अशी शतरूपा नामक स्त्री प्राप्त झाली. जनमेजया, हिला अयोनिसंभव म्हणण्याचें कारण ही स्वतेजानें स्वर्गालाही व्यापून राहाणारा जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या योगप्रभावापासूनच उत्पन्न झाली होती. हिनें आपल्या उत्पत्तीबरोबर प्रथमत: अयुत वर्षेपर्यंत परम दुश्चर अशी तपश्चर्या केली, व नंतर आपणास संतति व्हावी अशी जेव्हां तिला उत्कंठा झाली, तेव्हां ती महातेजस्वी जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या सन्निध त्याला आपला पति मानून जाऊन राहिली.
हे जनमेजया, हा जो पुरुष याला स्वायंभुव मनु असें म्हणतात, व याचा काल एकाहत्तर युगें असतो. या वसिष्ठप्रजापतीपासून शतरूपेला वीर नामक पुत्र झाला. या वीराला कर्दम प्रजापतीची मुलगी काम्या नांवाची पत्नीत्वानें प्राप्त झाली. तिजपासून त्याला प्रियव्रत, व उत्तानपाद असे दोन पुत्र झाले. पुढें या कन्येला सम्राट, कुक्षि, विराट व प्रभु असे चार पुत्र झाले. हे पुत्र तिला पतीपासून झाले. अत्रि नामक प्रजापतीनें वसिष्ठाच्या दोन पुत्रांपैकीं उत्तानपाद हा दत्तक घेतला. त्या घरीं उत्तानपादाला सूनृता नामक स्त्रीपासून चार पुत्र झाले. ही सूनृता म्हणजे धर्मप्रजापति यानें अश्वमेध केला असतां जी अति सुंदर कन्या निर्माण झाली तीच. हीच प्रसिद्ध भक्त ध्रुव याची माता होय. उत्तानपादाला सूनृतेपासून जे चार पुत्र झाले म्हणून सांगितले त्यांचीं नावें - ध्रुव, कीर्तिमान्, आयुष्मान् आणि वसु हीं होत. या शेवटल्या दोहोंच्या ऐवजीं कोठें कोठें शिव आणि आयस्वती अशींहि नांवें आढळतात. सूनृतेच्या ठिकाणीं उत्तानपादानें ध्रुव नामक जो पुत्र उत्पन्न केला म्हणून सांगितलें त्यानें तीन सहस्र दिव्य वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्येचा हेतु ब्रह्मप्राप्ति हा होता. असो; त्याच्या तपश्चर्येनें ब्रह्मदेव प्रसन्न होऊन, भूतलावर ज्याला उपमा नाहीं असें अढळस्थान सप्तऋषींच्या अग्रभागीं त्यानें त्याला दिलें. या तपाचे योगानें ध्रुवाची अतिशय वाढलेली कीर्ति व समृद्धि पाहून देव आणि असुर यांना मान्य जे शुक्राचार्य यांनींही उद्गार काढिले कीं, 'काय हो या ध्रुवाच्या तपाचा प्रभाव ? कोण तरी याचें तेज कीं सप्तर्षींना देखील याला आपला अग्रेसर पत्करून राहावें लागलें.' या ध्रुवाला श्लिष्टि, भव्य व शंभु असे तीन पुत्र झाले. यांपैकी श्लिष्टीला सुच्छाया नामक स्त्रीचे ठिकाणीं निर्मळ असे पांच पुत्र झाले. त्यांचीं नांवें:- रिपु, रिपुंजय, पुण्य, वृकल व वृकतेजस् हीं होत. यांतील रिपूला बृहतीनामक पत्नीचे ठिकाणीं अत्यंत तेजस्वी चाक्षुष नामक पुत्र झाला. चाक्षुषाला वीरणप्रजापतीची कन्या पुष्करिणी नांवाची स्त्री मिळाली. हिचे ठायीं चाक्षुषानें मनुसंज्ञक पुत्र उत्पन्न केला. या मनूनें अरण्य प्रजापतीच्या नड्वला नामक कन्येचे ठायीं दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवें: ऊरु, पुरु, शतद्युम्न, तपस्वी, सत्यवान्, कवि, अग्निष्टुत्, अतिरात्र, वसुद्युम्न हीं नऊ; व दहाव्याचें अभिमन्यु. यांपैकीं ऊरूला आग्नेयी नामक स्त्रीचे ठिकाणीं अंग, सुमनस्, ख्याति, क्रतु, अंगिरस व गय असे सहा पुत्र झाले. यांपैकीं अंगाला सुनीथेपासून वेन नांवाचा एकच पुत्र झाला. हा वेन फार दुराचारी निघाल्यामुळें ऋषिजन फार क्षुब्ध झाले व त्यांनीं पुढील संततीसाठीं वेनाच्या उजव्या हाताचें मंथन केलें. त्या मंथनापासून पृथुनामक पुत्र उत्पन्न झाला. त्याला पाहतांच ऋषिजनांना फार आनंद होऊन ते म्हणाले, हा महातेजस्वी राजा आपल्या प्रजेला फार आनंद देईल व याचें यश फार वाढेल. ऋषींच्या या भाकिताप्रमाणे पृथु हा उपजतच धनुष्य, खड्ग व कवच धारणकर्ता असून तेजानें जाळतो कीं काय इतका उग्र असे. हा वैन्य पुत्र पृथु सर्व क्षत्रिय जातीचा प्रथम पुरुष असून राजसूय यज्ञाचे पायीं ज्यांना अभिषेक केला अशा भूमिपालांतही प्रथमच होय. यानें वेनाच्या दुराचारानें गांजलेल्या पृथ्वीचें रक्षण केलें. या पृथूमुळें राजयश गाण्यांत निपुण जे सूत मागध ते अस्तित्वांत आले. हे जनमेजया, आपल्या प्रजेला उपजीविकेला विपुल धान्य मिळावें म्हणून यानें देव, ऋषि, पितर, दानव, गंधर्व, अप्सरांसहित सर्प यक्ष, वल्ली व पर्वत यांच्या साह्यानें पृथ्वीपासून धान्य रूपाने दुध काढलें. पृथ्वीनेंही ठिकठिकाणीं धान्यरूपी प्रचुर दुग्ध दिल्यामुळे प्रजाजनांचें अक्लेश प्राणधारण झालें. या पृथूला अंतर्धि व पालित असे दोन धर्मज्ञ पुत्र झाले. पैकीं अंतर्धीला शिखंडिनीपासून हविर्धान नामक पुत्र झाला. हविर्धानाला धिषणा नामक अग्निकन्येपासून सहा पुत्र झाले. त्यांचीं नावे - प्राचीनबर्हि, शुक्ल, गय, कृष्ण, व्रज व अजिन. यांपैकीं प्राचीनबर्हि हा हविर्धानाचे पोटीं- मोठाच पराक्रमी पुत्र निपजला. कारण त्यानें प्रजावृद्धि फारच केली.
हे जनमेजया, या प्रजापतीला प्राचीनबर्हि असें नांव पडण्याचें कारण असें होतें कीं, याचे यज्ञभूमीचे ठायीं जे बर्हि म्हणजे दर्भ वाढले होते त्या सर्वांचीं अग्रें प्राची म्हणजे पूर्वदिशेकडे होतीं; व हे दर्भ इतके वाढले होते कीं, त्यांनीं सर्व पृथ्वीचें पृष्ठ आच्छादून गेलें. ह्या प्राचीनबर्हीनें प्रथम दीर्घकालपर्यंत अतिशय मोठे तप करून नंतर सवर्णा नामक समुद्रकन्येला आपली पत्नी केली. या सवर्णा नामक समुद्रकन्येला या प्राचीनबर्हीपासून दहा मुलगे झाले. हे सर्वही धनुर्विद्येंत मोठे निपुण असून त्या सर्वांनाही प्रचेतस् हेंच नांव होतें. तसेंच या दाही जणांचे आचारविचार एक जातीचेच असल्यामुळें त्या सर्वांनीच समुद्राच्या पाण्यांत राहून दहा सहस्र वर्षेंपर्यत मोठे कडक तपाचरण केले.
हे सर्व प्रचेतस् बंधू तपाचरणांत गुंतले असतां पृथ्वीवर कोणी देखरेख करणारा नाहींसा झाल्यामुळे सर्व पृथ्वीवर वृक्ष इतके माजले कीं सर्वच जंगलमय होऊन जाऊन धान्यादिक पिकेनासें झाले. आणि सर्वत्र आकाश अत्युचवृक्षांनी व्यापून गेल्यामुळे वार्याला राहाण्यास रीघ नाहीशी होऊन प्राण कोंडल्यामुळे प्रजा पटापट मरूं लागली; व दहा सहस्र वर्षेंपर्यत व प्रजेचे सर्व व्यापारच बंद पडल्या सारखे झाले. नंतर तपानें पूर्ण झालेले असे सर्व प्रचेते तप पुरें करून पृथ्वीवर आले व पृथ्वीची अवस्था पाहून त्यांना अत्यंत क्रोध आला. मग त्यांनीं आपले मुखापासून रागाचे आवेशांत वायु व अग्नि निर्माण केले. पैकीं वायूनें ते वाढलेले सर्व वृक्ष उलथून पाडून शुष्क करून टाकले. व अग्नीनें ते जाळून खाक केले. या रीतीनें वृक्षांचा बहुतेक फन्ना झाला. या प्रकारचा हा वृक्षक्षय चाललेला पाहून वृक्षांचा राजा जो सोमप्रजापति तो आतां कांहीं थोडेच वृक्ष राहिले आहेत असे पाहून, त्या प्रचेत्यांकडे आला व म्हणाला, ' हे प्राचीनबर्हीच्या पुत्रांनो आता आपला क्रोध आंवरा; या अग्निवायूंनीं पृथ्वी बहुतेक वृक्षशून्य करून टाकली आहे, करितां आतां हे अग्नि व वायु शांत होऊं द्या; व पुढील भविष्य मला कळत असल्यामुळें मी ही रत्नासारखी दिव्य व अतिसुंदर अशी ही मारिषा नांवाची वृक्षकन्या माझे गर्भांत धारण करून ठेविली होती. ही मी तुम्हांला देतो; हिला तुम्ही आपली बायको करा, व हिजपासून सोमवंशाचा विस्तार होऊं द्या. या कन्येच्या ठिकाणीं अर्धे माझे व अर्धें तुमचे अशीं तेजें मिळून दक्ष नांवाचा अग्नितुल्य तेजस्वी पुत्र होईल व तुमच्या तपस्तेजानें बहुतेक जळून गेलेल्या या पृथ्वीला पुन्हा संजीवन करून प्रजावृद्धि करील.
सोमाची ही प्रार्थना ऐकून त्या प्रचेत्यांनीं वृक्षांवरील आपला राग आंवरून ती वृक्षकन्या मारिषा हिशीं धर्मविधीनें लग्न लावलें. नंतर दाही प्रचेत्यांनीं मिळून त्या मारिषेच्या ठिकाणीं आपल्या मनोबलानें गर्भ स्थापित केला. याच गर्भाचे ठिकाणीं सोमानेंही आपल्या तेजाचा अंश घातला. मग या उभय तेजांच्या संयोगानें दक्षप्रजापति नांवाचा महातेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. यानें सोम वंशाची वृद्धि करण्यासाठीं नाना जातींची अनेक सृष्टि निर्माण केली. त्यानें केवळ संकल्पमात्रानें अनेक स्थावर वस्तु, जंगमवस्तु, द्विपाद व चतुष्पाद ही निर्माण केले व नंतर मनोबलानेंच त्या त्या जातीच्या स्त्रियाही निर्माण केल्या. या स्त्रियांपैकी त्यानें दहाजणी धर्मऋषींना दिल्या; तेरा कश्यपाला दिल्या व उरल्या सार्या नक्षत्र नांवाच्या त्या सोमराजाला दिल्या. या कन्यांपासून देव, खग, नाग, गाई, दैत्य, दानव, गंधर्व, अप्सरा व अन्यही ानेक जाति निर्माण झाल्या; व ह्या वेळेपासून हे राजा, स्त्रीपुरुषांच्या मैथुनसंबंधापासून प्रजा उत्पन्न झाली. या वेळेपूर्वीची सृष्टि मात्र संकल्पापासून, दृष्टीपासून किंवा स्पर्शापासून उत्पन्न झालेली असे.
जनमेजय विचारतो - आपण देव, दानव, गंधर्व, उरग, राक्षस, तसाच महात्मा दक्ष याची ही उत्पत्ति यापूर्वीच सांगितली. त्या वेळीं आपण असें सांगितलें कीं, दक्ष हा ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून निर्माण झाला. तशीच त्याची स्त्री ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगठ्यापासून झाली. असें असून आतां आपण प्रचेत्यांपासून दक्ष झाला असेंही सांगतां, यामुळें मला मोठा घोटाळा पडला आहे. तरी हे ब्राह्मणश्रेष्ठा, ह्या माझ्या संशयाचा आपण उलगडा केला पाहिजे. दुसराही एक संशय आहे. तो असा कीं, हा दक्ष जर सोमानें स्वगर्भी धरलेल्या मारिषेचे ठिकाणीं निर्माण झाला म्हणजे अर्थातच सोमाचा हा दुहितृपुत्र किंवा नातू होता, तर त्या दक्षानेंच आपल्या नक्षत्र संज्ञक कन्या आपला आजा जो सोम त्याला देऊन त्याचा हा सासरा झाला या घोटाळ्याला काय म्हणावें ?
वैशंपायन उत्तर करितात - हे राजा, अलीकडल्या नियमांप्रमाणें पाहातां तुझ्या शंका यथार्थ आहेत. कारण, सांप्रत उत्पत्तीचा नियम म्हटला म्हणजे पश्वादिक ज्या तिर्यक्योनि आहेत, त्यांत प्रजोत्पादनाचे कामीं सहज प्रवृत्तीपलीकडे दुसरा निर्बंध नाहीं. परंतु मनुष्यांमध्ये सपिंडांतील मुलगीचे ठिकाणीं उत्पत्ति करूं नये; असा शास्त्राचा निरोध आहे, व हा सदैव कायम राहावा हें इष्टच आहे. तथापि सृष्टीच्या आरंभीं जे ऋषि व ज्ञाते होऊन गेले त्यावेळीं त्यांना होईल तिकडून प्रजेची उत्पत्ति वाढविणें हीच गोष्ट मुख्य साध्य असल्यामुळें, प्रजा पुष्कळ वाढल्यानंतर ती अतिशय फाजील होऊं नये, या उद्देशाने मन्वादिकांनी घातलेले जे सपिंड्यादि कृत्रिम प्रतिबंध ते त्यावेळीं नव्हते. व यामुळेंच ही गोष्ट वेडेपणाची किंवा चुकीची होती असा ऋषि किंवा ज्ञाते लोक तरी त्यांवर आरोप करीत नाहींत. हे राजा, हे दक्षादिक सारे दर युगारंभीं नवीन निर्माण होऊन अशीच प्रजा वाढवीत सुटतात व पुढें प्रजा अनावर वाढली म्हणजे तिला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियम केले जातात. याप्रमाणें या नियमांतलें रहस्य ज्ञात्याला ठाऊक असल्यामुळें तो त्याला भुलत नाहीं. त्याचप्रमाणें, हे राजा, सृष्टीच्या आरंभीं आरंभीं वडील धाकुट्पणाचा नियम हल्लींप्रमाणें वयावर अवलंबून नव्हता. जो तपानें किंवा प्रभावानें अधीक तोच वडील असा तेव्हांचा नियम असे.
असो; दक्षाचीही वर सांगितलेली चराचर सृष्टि कशी झाली हें जो जाणतो त्याचीं या लोकीं संकटें दूर होऊन त्याला पुष्कळ संतति होईल व स्वर्गलोकी त्याचा बहुत गौरव होईल.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि दक्षोत्पत्तिकथने द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
अध्याय दुसरा समाप्त
GO TOP
|