॥ श्रीधरस्वामी कृत - प्राकृत सप्तशती ॥


॥ श्रीहरिः शरणम् ॥

प्रकाशकांचे मनोगत

संत कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी आपल्या रसाळ, ओघवत्या परंतु सुबोध, सोप्या भाषा शैलीने अठरापगड जातीतील आबालवृद्धांची मने जिंकून त्यांना धर्मप्रवृत्त व सात्त्विक बनवले आहे. श्रीधरस्वामींच्या या गुणवैशिष्ट्यामुळे दोन अडीचशेहे वर्षांपूर्वीचे त्यांचे धार्मिक ग्रंथ आज एकविसाव्या इलेक्ट्रॉनिक शतकात देखील धार्मिक, भाविकच काय, पण केवळ विज्ञाननिष्ठ सुकृती विद्वानांना देखील तितकेच प्रिय वाटतात. त्यांच्या 'हरिविजय', 'रामविजय' यांसारख्या धार्मिक ग्रंथांनी वाचकप्रियतेचा उच्चांक मोडला असे म्हणावेसे वाटते. विशेषतः त्यांचा 'शिवलीलामृत' हा ग्रंथ आज कोट्यवधी भाविकांच्या दैनंदिन पठणात तर आहेच, पण देवपूजेसमवेत हा ग्रंथ रोजच्या पूजेत देखील ठेवला गेला आहे. 'महाराष्ट्र सारस्वत' या ग्रंथात कै. वि. ल. भावे यांनी असे लिहून ठेवले आहे की, श्रीधरांच्या गोड वाणीची माधुरी ज्यांनी मुळीच चाखली नाही असा अभागी महाराष्ट्रात सापडणार नाही. त्रितापाने होरपळलेल्या आर्ताचे मनरंजन करून त्यांचे मन परमेश्वराकडे वळवणारा, सर्वांच्या संकटकाळातला आधार असा श्रीधरस्वामींसारखा दुसरा ग्रंथकार नाही.

अशा सिद्धहस्त ग्रंथकाराकडून 'अम्बिका-उदय' सारखा देवी उपासकांना अत्यंत उपयोगी व सहजपणे, पण अत्यंत उच्च प्रकारची फलप्राप्ती करून देणारा ग्रंथ निर्माण व्हावा ही जगदंबेचीच योजना होती. परंतु सुमारे ५० वर्षापूर्वी हा ग्रंथ प्रकाशित होऊन देखील 'शिवलीलामृता' सारखा या ग्रंथाचा प्रसार फारसा झाला नाही. अर्थात ही देखील जगदंबेचीच इच्छा. लोक जेव्हा अत्यंत हवालदील होतात, तेव्हा त्यातून मुक्ततेचा उपाय योग्य वेळीच त्यांना उपलब्ध व्हावा अशी त्या आदिशक्तीची योजना असावी.

मूळ संस्कृत 'श्रीदुर्गासप्तशती' या पोथीचे शास्त्रोक्त विधीपूर्वक पाठ करणारे असंख्य साधक अखिल भारतात आहेत. अनेकांना त्याचा उत्तम अनुभव देखील आलेला आहे. सप्तशती पाठाच्या वेगवेगळ्या अनेक परंपरा आहेत. त्या त्या परंपरेनुसार पाठ करून त्याची फळे अनेकांनी प्राप्त करून घेतली आहेत. परंतु अशी असंख्य मंडळी आहेत की, ज्यांना संस्कृतचा अजिबात गंधही नाही किंवा संस्कृत पोथीच्या पाठाचे जे नियम आहेत ते यथासांग पाळणे जमत नाही. अशा भक्तासाठी, साधकासाठी 'अम्बिका-उदय' हा मराठी ग्रंथ लिहून श्रीधरस्वामींनी अनंत उपकार केले आहेत, यात शंकाच नाही. हा ग्रंथ प्रथम माझ्या पहाण्यात आला त्यावेळी त्या ग्रंथातील प्रचंड मुद्रण दोष पाहून मी हवालदिल झालो. शिवाय त्यावेळी मी संस्कृत दुर्गासप्तशती पाठाच्या एवढ्या मोहात पडलो होतो की, या प्राकृत ग्रंथाकडे मी दुर्लक्षच केले. तरीसुद्धा या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनी मला या ग्रंथाची महती सांगून पाठ करण्यास प्रवृत्त केले. त्याप्रमाणे मी पाठ केले व अद्वितीय असे अनुभव मला आले. या पोथीतील मनोवेधक, चटकदार भाषाशैलीने मला गुंगवून टाकले. मुद्रण दोष असून देखील मी पाठ करीत राहिलो. या ग्रंथाच्या उपासना पाठाचा परिणाम म्हणूनच की काय, माझी एका सिद्ध पुरुषाशी गाठ पडली. त्यांचे, मला मुद्रणदोष काढून टाकण्यास व कठीण शब्दांचे अर्थ उलगडण्यास खूपच साहाय्य झाले. आज हा महापुरुष एकांतात असून त्यांची भेट व दर्शन दुर्लभ झाले आहे. परंतु त्यांचे उपकार व्यक्त करण्यास माझ्याजवळ शब्दच नाहीत.

त्याचप्रमाणे माझे मित्र श्री. दिनकर खंडेराव देशपांडे, डहाणूकर कॉलनी, ४ थी गल्ली, सुरभारती बंगला (संस्कृत तज्ज्ञ व संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक) यांचे देखील कठीण शब्दांचे अर्थ उलगडण्यास प्रचंड साहाय्य झाले. त्यांना देखील उपकार मानलेले आवडणार नाहीत, म्हणून मौन पत्करतो.

संस्कृत सप्तशतीप्रमाणे या पोथीच्या पाठाला तसे कडक नियम नाहीत. कवच, अर्गला, कीलक, नवार्णजप, रात्रीसूक्त असे पूर्वपंचांग व देवीसूक्त, नवार्णजप, व तीन रहस्ये असे उत्तर पंचांग अशी उपाधीही नाही. फक्त एका आसनावर, एकाच जागी, एकाच वेळी याचे पाठ करावेत. अत्यंत भक्तीने, समर्पण भावनेने पाठ करावेत एवढाच नियम आहे.GO TOP