![]() |
॥ प्राकृत सप्तशती ॥ ॥ अध्याय सहावा ॥
श्रीगणेशाय नमः ॥
शुभ निशुंभ मारिल्यावरी । देव गर्जती जयजयकारी । सुमनसंभार ते अवसरी । करिते झाले अद्भुत ॥ १ ॥ आनंदमय पाकशासन । दुंदुभीनादे भरी गगन । स्वर्गभेरी गाजती पूर्ण । नादे त्रिभुवन दुमदुमिलें ॥ २ ॥ नाना वायें मनोहर । देवीपुढे वाजती अपार । गायन करिती नारद तुंबर' । किन्नर सुस्वर आलाप करिती ॥ ३ ॥ अष्टनायिका करिती नृत्य । अष्ट दिक्पाल पुढे स्तवन करीत । अष्टभैरव वर्णित । यश तेव्हां देवीचे ॥ ४ ॥ अष्ट वसु पाहती चकित । अष्ट सिद्धि पुढें विराजत । अष्ट११ पाश विरहित । सद्गदित अष्ट भावें ॥ ५ ॥ जे अष्टधा प्रकृतिविरहित । देव तीस अष्ट भोग जाणवित । अष्टमी पर्वी अर्चित । देव सकळ मिळोनियां ॥ ६ ॥ चारी सहा अठरा जण । वर्णिती देवीचे यश पूर्ण । मरुद्गण पितृगण । स्तविती तेव्हां अंबेसी ॥ ७ ॥ एकादश रुद्र द्वादश अर्क । सिद्ध विश्वेदेव सकळिक । उपदेव कर्मज देव देख । गोंधळी नाचती अंबेच्या ॥ ८ ॥ कोट्यान्कोटी दीपिका प्रबळ । पाजळूनिया देव सकळ । देवीपुढे गोंधळ । स्वानंदाचा घालिती ॥ ९ ॥ इंद्र ब्रह्मा आदि करून । करिती तेव्हां देवीचें स्तवन । सकळ ऋषिमंडळ हात जोडुन । यश वर्णिती अंबेचे ॥ १० ॥ जय जय वो आदि कुमारीके । जय जय मूळपीठनायिके । सकळ सौभाग्यदायके । जगदंबिके मूळप्रकृती ॥ ११ ॥ जय जय भार्गवप्रिये भवानि । भयनाशके भक्तवरदायिनी । सुभद्रकारके हिमनगनंदिनि । त्रिपुरसुंदरी महामाये ॥ १२ ॥ जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके२७ । जय त्रिविधतापभयमोचके । सर्वव्यापके मृडानि ॥ १३ ॥ जय जय शिवमानस-कनलतिके । जय जय चातुर्यचंपककळिके । जय जय शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपाळके अपर्णे ॥ १४ ॥ तव मुखकमल शोभा देखोनि । विधुबिंबडंब गेले विरोनि । ब्रह्मादि देव बाळे तिन्ही । स्वानंदसदनी निजविसी ॥ १५ ॥ जीव शिव दोन्ही बाळकें । अंबे तुवां वाढविलीस कौतुकें । जीव तुझें स्वरूप नोळखे । म्हणऊनि पडिला आवर्ती ॥ १६ ॥ शिव तुझे स्मरणीं सावचित्त । म्हणवूनि तो नित्य मुक्त । ब्रह्मानंदपद हातां येत । कृपें तुझे जननिये ॥ १७ ॥ मेळऊनि पंचभूतांचा मेळ । तुवां रचिला ब्रह्मांडगोळ । इच्छा परततां तत्काळ । क्षणे निर्मूळ करीसी हे ॥ १८ ॥ अनंत बाळ आदित्य श्रेणी । तव प्रभेमाजी गेल्या लपोनि । सकळ सौभाग्य शुभ कल्याणि । रमारमण सहोदरी ॥ १९ ॥ शंबररिपुहारक३३ वल्लभे । त्र्यैलोक्यनगरारंभस्तंभे३४ । आदिमाये आत्मप्रभे । सकळारंभे मूळप्रकृती ॥ २० ॥ असो देवीचें अर्चन । करितां होय शत्रुदमन । षोडशोपचार अर्पून । ध्यान मग विलोकिलें ॥ २१ ॥ आदिमाया परात्पर३५ ज्ञानकळा । ओंकार रूपिणी वेल्हाळा । आदि पुरुषाची ज्ञानकळा । ब्रह्मांडमाळा घडामोडी ॥ २२ ॥ सतेज भगणें विलसती निराळी । तैसी मस्तकीं शोभे मुक्तजाळी । नीलोत्पलदल वर्ण वेल्हाळी । तेज दिग्मंडळीं न समाये ॥ २३ ॥ राका यामिनी रमण निष्कलंक । तैसें सर्वानंद सदन मुख । मुखावरूनि रतिनायक । कोट्यान्कोटी ओवाळिजे ॥ २४ ॥ वासरमणीस उणे आणित । तेवीं निजसुख सीस फुल झळकत । ओंकारावरी अर्ध मात्रा विराजत । चंद्ररेखा शोभे तैसी ॥ २५ ॥ बोध आनंदपूर्णपणीं । तीच ताटकें झळकती कर्णी । अंबा चिद्रत्नाची खाणी । अलंकारा शोभविते ॥ २६ ॥ कानीं मुक्तघोष डोलती । की नक्षत्रपुंज झळकती । तेणें प्रकाशली जगतीं । तटस्थ गभस्थी पहात ॥ २७ ॥ अक्षय्य कल्याण कुंकुम सुभट । तोंच भाळी रेखिला मळवट । पूर्ण कृपेचे अंजन वरिष्ठ । सोगयाचे शोभतसे ॥ २८ ॥ अद्वय बिजवरा झळके भाळीं । सुरंग दया तांबोल मुखकमळीं । पक्व बिंब रंग अधरपाळी । की प्रवालवल्लि सुकुमार ॥ २९ ॥ नासिक सरळ विराजत । चिन्मय६ मुक्त सतेज झळकत । सुमती तितीक्षा मूर्तिमंत । मुद राखडी तेवी विलसे ॥ ३० ॥ जैसी प्रयागीं त्रिवेणी । तैसीच सुरंग दिसेवेणी । कृष्ण केश ते मित्रनंदिनी । ओघ तिचा वोळखिजे५० ॥ ३१ ॥ शुभ्र पुष्पं सुवास झळकत । तो जाह्नवी ओघ निश्चित । माजी आरक्त सुमनें विराजत । सरस्वती यथार्थ तेच पैं ॥ ३२ ॥ मच्छ कच्छ जडित अलंकार । तेथें तळपती जलचर । केशाग्रभागी गुच्छ परिकर । तोच समुद्र वाटत ॥ ३३ ॥ अनंत ब्रह्मांडांची मोहनमाळ । कंठी झळकतसे विशाल । मुक्तांचे हार परम तेजाळ । भक्त सकळ जाहले । ३४ ॥ अंबेचें अंग सुनिल पर्ण । मुक्तहार दिसती नीलवर्ण । देवीच्या संगें करून । मुक्तांचे स्वरूप पालटलें ॥ ३५ ॥ मुक्तलग स्वानंदचोळी । निगमागम बाजुबंद ल्याली । हंस मयुरें वरीं रेखिली । स्वानंदमेळीं विचरती ॥ ३६ ॥ जीव शिव दोन्ही स्तन । दोही पक्षी धरिले आवरून । ज्यातील अमृत हेरंब षडानन । स्वानंदेंकरून सेविती ॥ ३७ ॥ अभंग अक्षय शाश्वत । वज्रचूडेमंडित हस्त । निजानुभव अद्भुत । विराजत दोरे पुढें ॥ ३८ ॥ विरक्ती क्षमा उपरती । भक्ती भावना शांती । दशावताराची ये स्थिती । झळकताती मुद्रिका ॥ ३९ ॥ निजधैर्य निर्वाण ज्ञान । तेंच विद्युत्पाये झळके वसन । विवेकाची शोभायमान । कांची आणि क्षुद्रघंटा ॥ ४० ॥ निरभिमान भक्त जन । तेंच पायीं झाले पैंजण । नुपुरे वाजती रुणझुण । समत्वेंचि एकसरी ॥ ४१ ॥ नाना वृत्ती कष्ट भोगनि । बहु शिणल्या विषय साधनीं । जोडवी अणवट पोल्हारे होऊनि । लागल्या चरणी एकत्वें ॥ ४२ ॥ दिव्य अंगींचा सुवास । भेदून जाय वरी आकाश । दंततेज पडतां निःशेष । पाषाण होतीं महारतें ॥ ४३ ॥ असो देवीचें अर्चन । करिती सकल देव मिळोन । यावरी अंबा सुहास्यवदन । बोलती झाली तेधवां ॥ ४४ ॥ म्हणे माझें करा औपासन । तुम्हांस मी संकटी पावेन । दुर्जन अवघे संव्हारीन । पीडाकारक सर्वहि ॥ ४५ ॥ मद्भक्तासी द्वेषितां पूर्ण । त्यास सगळेच मी ग्रासीन । माझें संकटीं करितां स्मरण । निवारीन सर्व विघ्नं ॥ ४६ ॥ माझें भजन अर्चन स्तवन । जे त्रिकाळ करिती भक्तजन । त्यालागी मी एक क्षण । न विसंबे सर्वदाही ॥ ४७ ॥ नंद यशोदेच्या उदरीं । मीच अवतरले द्वापारी । इंदिरावराची सहोदरी । मीच झाले तेधवां ॥ ४८ ॥ तेच मी विध्याद्रिवासिनी५५ । सकल दुष्टसंव्हारिणी । मातापुरी५६ भार्गवरामजननी५७ । मीच झाले निर्धार ॥ ४९ ॥ तेच मी तुळजापुरवासिनी । दाशरथी रामवरदायिनी । सप्तशृंगविलासिनी । सर्वांठायीं मीच असे ॥ ५० ॥ माझें व्रत आणि पूजन । करिती जे सदा आनंदघन । ते कृपेनें ज्यास देती वरदान । त्यास रक्षीन मी आधी ॥ ५१ ॥ जो कोणी माझा उपासक । त्यास कालत्रयीं नाहीं दुःख । सकल सभेसी मान देख । विशेष वाढेल तयाचा ॥ ५२ ॥ तो जें जें बोले वचन । तेथें रसवृत्ती मी भरीन । वाचासिद्धि होय पूर्ण । अनुष्ठाने माझिया ॥ ५३ ॥ ऐसें अंबिका बोलोन । तत्काळ पावली अंतर्धान । आश्चर्य करिती सकळ सुरगण । जयजयकारें गर्जानियां ॥ ५४ ॥ सूर्यवंशी राजा सुरथ । समाधी नामें वैश्य विख्यात । त्याप्रति सांगे ऋषि सुमेधा सत्य । देवीचे चरित्र सर्वहि ॥ ५५ ॥ अम्बिकाउदय ग्रंथ । त्रिकाळ जे पठण करित । संपत्ती संतती विद्या बहुत । होय प्राप्त तयासी ॥ ५६ ॥ सकळ गंडांतर निरसोन । आयुष्यवृद्धि होय पूर्ण । शत्रु पराजय होय जाण । आनंदघन सर्वांठायीं ॥ ५७ ॥ त्यास कोणी एक चिंता । उत्पन्न न होय तत्त्वतां । वादी विजय होय बोलतां । दिव्य कविता होय त्याची ॥ ५८ ॥ तुष्टी पुष्टी ऐश्वर्य सिद्धि । अपार यश होय धर्मवृद्धी । त्याची वंशवल्ली कधीं । न तुटेचि सर्वथा ॥ ५९ ॥ तीन संवत्सर त्रिकाळ पठण । करितां पावें राज्य छत्र पूर्ण । संवत्सरपठणे संपूर्ण । नष्टधन लाभे ॥ ६० ॥ षण्मास त्रिकाळ पढतां । हारे महारोग आणि चिंता । त्याचे वंशीं तत्त्वतां । दारिद्र्य कदा न बाधी ॥ ६१ ॥ त्रिमास वाचितां तत्काळ । शत्रु संहारती सबळ । विद्या लक्ष्मी अचल । न चळे कधी सर्वथा ॥ ६२ ॥ ग्रहपीडा न होय कधीं । निरसती सकळ आधि व्याधी । सर्व कार्य पावे सिद्धि । यथाविधि वाचितां ॥ ६३ ॥ अम्बिकाउदय पठतां । न बाधी दुःस्वप्न दुर्वार्ता । ऐसे सुमेधा ऋषि सांगतां । तटस्थ झाला सुरथ ॥ ६४ ॥ समाधी आणि सुरथ । तीन वर्षे हे व्रत आचरत । अष्टमी नवमी चतुर्दशी सत्य । पूजा करिती यथाविधी ॥ ६५ ॥ पूर्णिमा महापर्व पूर्ण । करीत ते दिवशी अर्चन । कुमारीपूजा ब्राह्मणभोजन । यथाविधि करिती ॥ ६६ ॥ अष्टाक्षरी भवानी मंत्र । जप करिती एक सहस्र । तेणें राज्य आणि छत्र । प्राप्त झालें सुरथासी ॥ ६७ ॥ सकळ धावती नृपवर । सुरथास देती करभार । देवीच्या प्रसादें समग्र । शत्रु पावले पराजय ॥ ६८ ॥ समाधी नामें वैश्य । त्यास भाग्य आलें विशेष । पावला संपत्ती निर्दोष । देवीच्या भजनें करूनिया ॥ ६९ ॥ मार्कंडेयाप्रति कमलोद्भव । कथा हे सांगे अपूर्व । सुमेधानें सुरथाप्रति सर्व । तेच कथा निरोपिली ॥ ७० ॥ ते प्राकृत भाषे समग्र । वर्णे ब्रह्मानंदे श्रीधर । ग्रंथास सप्तशती आधार । प्रमाण पूर्ण पहावें ॥ ७१ ॥ षट्शास्त्राचे जिव्हार । साही अध्याय परम सुंदर । त्रिकाळ जो पठे नर । होय साक्षात्कार त्यातें ॥ ७२ ॥ सहा अध्याय निश्चित । अम्बिकाउदय दिव्यग्रंथ । अंबे हो का तुज प्रीत्यर्थ । करी कृतार्थ भक्तांतें ॥ ७३ ॥ ब्रह्मानंद मूळपीठवासिनी । श्रीधर तान्हे लावी स्तनीं । प्रेमपान्हा पाजुनि । ब्रह्मांडाहून करी थोर ॥ ७४ ॥ जय जय प्रेमामृतसरिते । ब्रह्मानंद सद्गुणभरिते । श्रीधर नाम अभंगातें । तुवां ठेविले पूर्वीहुनी ॥ ७५ ॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये देवीपूजनदेवीस्तवनफलश्रुतिवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ |