॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ प्राकृत सप्तशती ॥
[ अर्थात - अम्बिका उदय ]

॥ अध्याय पाचवा ॥

श्रीगणेशाय नमः ॥
त्रिपुरसुंदरी' त्रिभुवन जननी । दोषत्रयसंहारके त्रितापशमनी' ।
त्रिकाल' जे सादर तुझे भजनीं । देहत्रयरहित ते ॥ १ ॥
त्रय अवस्था निरसुन । त्रय' अभिमान गाळुन ।
त्रय स्थानें वोलांडून । त्रिगुणातीत ते होती ॥ २ ॥
त्रय मात्रातीत वेगळे । त्रिविधा मुक्ती निरसुन आगळे ।
त्रिपदातीत ते झाले । कालत्रय विरहित ॥ ३ ॥
त्रिविध भोगाहून पर । वेदत्रयाहून निर्विकार ।
भुवनत्रय स्वामिनी साचार । तुझें स्वरूप वेगळे ॥ ४ ॥
असो रक्तबीज संव्हारून । अंबा विजयी स्वानंदघन ।
विबुध' ब्रह्मानन्हें-करून । यश वर्णिती अंबेचें ॥ ५ ॥
कळला शुंभ निशुंभास समाचार । रक्तबीज संव्हारिला समग्र ।
क्रोधावले दोघे असुर । सैन्य सत्वर सिद्ध केलें ॥ ६ ॥
संग्राम संकेत भेरी । परम धडकल्या ते अवसरी ।
शुंभ निशुंभ सहपरिवारी । युद्धालागीं निघाले ॥ ७ ॥
सकल प्रधान सहकुमर । श्रोणितपुरीचा सर्व दलभार ।
निघता झाला अपार । सेना समुद्र ते काळीं ॥ ८ ॥
श्रोणितपुरींची महाद्वारें । तेव्हां उघडली एकसरे ।
दळ चालिले गजरे थोरे । जेवीं प्रलयीं फुटले समुद्र ॥ ९ ॥
पायदल चालिले अपार । पर्वतासमान प्रचंड वीर ।
कासा घातल्या विचित्र । अभेट कवचे आणि बीटें ॥ १० ॥
आपादमस्तकपर्यंत । खेटके विशाल झळकत ।
असिलता कुत शक्ती बहुत । शूल तोमर' आयुधे ॥ ११ ॥
लोहार्गला खड्गे मुद्गल । कोयीते कातिया गदा विशाळ ।
फरश यमदंष्ट्रा भिंडमाळ । घेऊन चपळ धावती ॥ १२ ॥
त्यांचे पाठीमागे विचित्र । लोटले तुरंगमांचे भार ।
की ते अश्वरत्नांचे भांडार । एकसरे उघडिले ॥ १३ ॥
असंख्य श्यामकर्ण सुंदर । पुंछ पिवळे आरक्त खुर ।
डोळे ताम्रवर्ण सुंदर । तिहीं लोकी गति जयाची ॥ १४ ॥
सूर्यरथींचा चिंतामणि । त्याचे वेगें क्रमिती अवनी ।
एक निळे पिवळे दिसत गगनीं । प्रतिशब्द उठत ॥ १५ ॥
एक पाखे१३ परम चपल । एक माणिका ऐसे तेजाळ ।
सावळे निळे चंचळ । चांदणे पडे अंगतेजें ॥ १६ ॥
एक सिंहमुख सुंदर । एक चकोर चंद्रवर्ण सुकुमार ।
क्षीरकेशर कुंकुम सुंदर । वर्णाचे एक धावती ॥ १७ ॥
जांबुळे सुवर्ण वर्ण चपळ । हे जंबुद्वीपी निपजती सकळ ।
श्वेतद्वीपीचे श्वेत ढवल । शशिवर्ण हांसले ॥ १८ ॥
क्रौंचद्वीपीचे चित्रविचित्र । शाकद्वीपीचे वेग अपार ।
शाल्मलीद्वीपीचे सुकुमार । कुचद्वीपीचे सबल पै ॥ १९ ॥
पुष्करीचे श्यामकर्ण । ते उदकावरी जाती जेवीं पवन ।
जबडा रुंद आखुड मान । ते बदक श्यामवर्ण निघाले ॥ २० ॥
रणांगणीं परम धीर । ते अरबी वारु सुंदर ।
कंचीचे चपल सुकुमार । समरी धीर न धरी तो ॥ २१ ॥
खगेश्वरासमान गति । पक्षांचे अंतरिक्षी उडती ।
खुणाविता प्रवेशती । परदळी पवनासम ॥ २२ ॥
जैसी कां अलातचक्रं१९ । तैसे राऊत२० फिरीत त्वरे ।
असिलता२१ झळकती येकसरे । की प्रलय२ चपला२३ ज्यापरी ॥ २३ ॥
अश्व खड्ग क्षत्री२४ पूर्ण । तिहीचे व्हावें एक मन ।
शुंभ निशुंभ तैसेच पूर्ण । असंख्य वारु चालिले ॥ २४ ॥
असि२५ पंजरी२६ पाखरिले बहुत । अलंकार घातले रत्नखचित ।
विशाल मुक्त घोष झळकत । नाचत समरभूमीसी ॥ २५ ॥
नुपुरें गर्जती चरणीं । पुढील खुर न लावती अवनीं ।
रत्नखचित मोहळी२७ वनीं२८ । झळकती चपळेसमान ॥ २६ ॥
वज्रकवचे२९ लेऊनि बळवंत । वरी आरूढले राऊत ।
त्याचे पाठीमागें मदोन्मत्त । गजभार कीकाटती ॥ २७ ॥
जैसे ऐरावतीचे सुतः । चपळ श्वेत आणि चौदंत ।
झुली घातल्या रत्नखचित । पृष्ठोदरी आवळिले ॥ २८ ॥
वरी रत्नजडित चवर डोल । ध्वज भेदिती वरीं निराळ ।
घंटा वाजवी सबळ । चामरें थोर रुळती ॥ २९ ॥
वरी गज आकर्षक बैसले । सुपर्ण चंचुवत अंकुश घेतले ।
संकेत दाविता चपळ बळे । पर चमूंत मिसळता ॥ ३० ॥
त्याचे पाठीमागे दिव्य रथ । चपळेऐसी चक्रे झळकत ।
वरी ध्वज गगन चुंबित । नाना वर्ण तळपती ॥ ३१ ॥
धनुष्य शक्ती नाना शस्त्रे । रथावरी रचिले अपारे ।
कुशल सूत बैसले धुरे । वागदोरे धरूनिया ॥ ३२ ॥
शशिवदना भेरी धडकती । वाटे नादे उलेल जगती ।
शंख वाजता दुमदुमती । दिशांची उदरे तेधवा ॥ ३३ ॥
ढोलगी डबीडी करताल । त्यांत सनया गर्जती विशाल ।
श्रृंगे बुरुंगे काहाल । दौंडगी दुटाल वाजती ॥ ३४ ॥
असो शुंभ निशुंभ रणनोवरे । रणमंडपा चालले गजरे ।
मुक्तीनवरी वरतील निधरि । देवीच्या हस्ते करूनियां ॥ ३५ ॥
मनोवेगे भार लोटले । शक्तिदळासी येऊन संघटले ।
तों मायाचक्र सरसावलें । मिसळले युद्धालागीं ॥ ३६ ॥
त्रिदशासमवेत शचिनाथ । रणी मिसळला अकस्मात ।
तो रणधुमाळी गाजली तेथ । डळमळित ऊर्वी तेव्हां ॥ ३७ ॥
रथासी रथ संघटती । गजासी गज झगटती ।
उसणे घाई वीर भीडती । पूर धावती अशुद्धाचे ॥ ३८ ॥
पर्वतासमान दैत्य थोर । विक्राळ तोंडे भाळी सिंदुर ।
बाबर झोटी दाढा शुभ्र । जिव्हा आरक्त लळलळती ॥ ३९ ॥
खदिरांगार धगधगित । तैसे नेत्र त्याचे आरक्त ।
मद्यपाने झाले उन्मत्त । शस्त्रे घेऊनि मिसळती ॥ ४० ॥
देवांचे करूनि पुतळे । घातले चरणीचिये रुळे ।
हांका देती परम बळें । एकदाचि सर्वही ॥ ४१ ॥
कृतांतवत् धावती असुर । टाकिती पाषाण पर्वत अपार ।
देवांचे अस्थिपंजर । चूर होती लागतां ॥ ४२ ॥
दैत्य उठावले बळें । तोडिती देवांची कंठनाळे ।
किंवा उसळती नारीकेळे । कोटिच्या कोटी आकाशीं ॥ ४३ ॥
जैशी इक्षुदंडाची खंडे । एकदाचि पडती प्रचंडे ।
तैसी पाणिचरणाची कांडे । दैत्यहस्ते उसळती ॥ ४४ ॥
खेटकाआड दैत्य दडती । कुंत शक्तीने बळें खोंचिती ।
सुरदळे विदारोन पडती । ठाई ठाईं असंख्ये ॥ ४५ ॥
दैत्यांचा अनिवार मार । देवदळ मोडले समग्र ।
देवीचे पाठीसी दडती सुर । रक्षी अंबे म्हणऊनिया ॥ ४६ ॥
सिंहारूढ आदिभवानी । जैसी प्रलये वीज पडे अवनीं ।
तैसी दैत्यभारांत येऊनि । महामाया संचरली ॥ ४७ ॥
अनंत शक्ति खड्गे घेऊनि । देवी सरीशा लोटल्या रणीं ।
जैसा वणवा पेटला वनीं । तैसे दैत्य संहारिले ॥ ४८ ॥
की जलदजाल अपार । विध्वंसी जैसा चंड समीर ।
तैसे संहारिले दैत्यभार । शुभ निशुंभ विलोकिती ॥ ४९ ॥
रथ लोटोन दोघेजण । देवीसमोर वर्षती बाण ।
ते वरीच्या वरीं तोडून । क्षणमात्रे टाकी अंबा ॥ ५० ॥
निशुंभे मंत्र जपोन । शक्तीदळावरी सोडी सर्पबाण ।
देवीनें न लागतां क्षण । गरुड सोडिले अपार ॥ ५१ ॥
सर्प संहारोन समस्त । सुपर्ण झाले सवेच गुप्त ।
तारकासुर अकस्मात । निशुंभे तेव्हां प्रेरिले ॥ ५२ ॥
तों स्वामी कार्तिक ते वेळे । अंबेनें अपार सोडिलें ।
दैत्यें विघ्नास्त्र प्रेरिलें । देवीने सोडिलें हेरंब६७ बहु ॥ ५३ ॥
दैत्ये सोडिला सरितापति । देवी प्रेरी वरी अगस्ती ।
रोगास्त्र निश्चिती । दैत्य सोडी तेधवां ॥ ५४ ॥
त्यावरी औषधास्त्र । अंबा प्रेरी सत्वर ।
येरे दोष सोडिले अपार । प्रेरिले नामास्त्र देवीनें ॥ ५५ ॥
दैत्यें बहुत उपाय केले । परि ते सर्वहि निर्फळ जाले ।
जैसें मूढाचें वाग्जाळ न चलें । पंडितापुढे सर्वथा ॥ ५६ ॥
सर्वांस जाळी अग्न । परि मेघापुढे होय क्षीण ।
विश्वाला जाची मीनकेतन । परि शिवापुढें न चले ते ॥ ५७ ॥
सर्वांत श्रेष्ठ वारण । परि सिंहदर्शनं पावे मरण ।
असो देवीनें शर सोडून । रथ छेदला निशुंभाचा ॥ ५८ ॥
अश्वध्वजासहित स्यंदन । देवीनें केला रणीं चूर्ण ।
मग निशुंभ खड्ग घेऊन । देवीवरी चौताळला ॥ ५९ ॥
जैशी क्षणप्रभा तळपत । तैसा अंबेभोवता चौताळत २ ।
दिव्य चक्र अकस्मात । देवीने तेव्हां प्रेरिलें ॥ ६० ॥
तेणें छेदिले कंठनाळ । नखें खुडिजे जेवीं कमळ ।
गगनीं उसळलें तत्काळ । अंबेने झेलिलें वरच्यावरी ॥ ६१ ॥
पायाखाले घालुन । देवीने केले तत्काळ चूर्ण ।
ऐसा निशुंभ पडिला देखोन । शुंभे मांडिले शोकाते ॥ ६२ ॥
भूमीवरी टाकिलें शरीर । म्हणे गेला गेला निशंभ वीर ।
दिशाशून्य यावरी समग्र । पाठीराखा नसे कोणी ॥ ६३ ॥
मग दैत्य वीर येऊन । तयासी बसविती उठवून ।
निर्भर्त्सती अवघे जन । वेळ कोण पाहे येथें ॥ ६४ ॥
घे शस्त्र धरी आगवण । बंधुचा सूड घेई पूर्ण ।
यावरी शंभ हांक देऊन । देवीसमोर लोटला ॥ ६५ ॥
शुभ म्हणे ये क्षणीं । तुवा गे बंधु माझा पाडिला रणीं ।
आजी तुज जिंकोन समरंगणीं । स्त्री करीन बळेचि ॥ ६६ ॥
तूं मज घाली लौकरी माळ । नातरी छेदीन तुझे शिरकमळ ।
यावरी ते वेल्हाळ । प्रतिउत्तर देत काय ॥ ६७ ॥
तूं केळवलासी रणनोवरा । तुज अवदशा वरील पामरा ।
तुझ्या आंतड्याचे पोवतें सत्वर । गळा तुझ्या घालीन ॥ ६८ ॥
रण तळवट ८ बोहले८ । त्रिशूलघाये ९ बासिंगे ९ नेमिले ।
आरक्त शोणीत° तैलें । अभ्यंग तुज करीन ॥ ६९ ॥
वानिश्चय तो केला । आयुष्यसीमा अंतरपट धरिला ।
बाणधारा अक्षता सबला । पडतील आतां तुजवरी ॥ ७० ॥
यमपुरीपर्यंत । तुझी वरात मिरवेल सत्य ।
वहाडिणी तुझे मांस रक्त । जेवितील योगिणिया ॥ ७१ ॥
तुझ्या स्त्रिया शंख करिती । तीच वायें तुजभोवतीं ।
पुढती जागा नव्हे निश्चिती । रणमंचकी पहुडे कां ॥ ७२ ॥
ऐसें वचन ऐकतां तीक्ष्ण । शुंभ तेव्हां वर्षे बाण ।
बहुत युद्धे झाली दारुण । परी ते शक्ती नाटोपे ॥ ७३ ॥
देवीने बाण सोडूनि अद्भुत । पिष्ट केला शुंभाचा रथ ।
मग खड्ग घेऊनि अकस्मात । देवीवरी लोटला ॥ ७४ ॥
जैसी लवे विद्युल्लता । तैसा तळपे देवीभोवतां ।
मग अर्ध चंद्र बाणें तत्त्वतां । खड्ग देवीनें छेदिलें ॥ ७५ ॥
मग घेऊनि वृक्ष पाषाण । देवीवरी देत भिरकाऊन ।
ते अंबिका न लागतां क्षण । छेदूनि पाडी एकीकडे ॥ ७६ ॥
अनिवार देवीचे शर । साहो न शकेचि तो असुर ।
जैसा पिच्छे पसरी मयूर । तैसा बाणी खीळिला ॥ ७७ ॥
मग आकाशी उडाला अकस्मात । देवीवरी टाकी पर्वत ।
देवीने फोडूनि पिष्टवत । करूनि पाडी एकीकडे ॥ ७८ ॥
जैसी कडकडी प्रलयचपला । तैसी अंबा गेली नभमंडळा ।
असंभाव्य ते वेळां । युद्धे झाली अंतराळीं ॥ ७९ ॥
देखोन तो युद्धकल्लोळ । देव विमानें पळविती सकळ ।
वाटे मांडला प्रलयकाळ । दिग्गज कांपती चळचळा ॥ ८ ॥
मरण विसरोन पतंग । अग्निवरीं पडे सवेग ।
तैसा घेऊनि कटीचे खड्ग । देवीवरी कोसळला ॥ ८१ ॥
तो देवीनें अकस्मात । दृढ झोटीं धरिला दैत्य ।
फिरविला अलातचक्रवत । भूतळी त्वरित आपटिला ॥ ८२ ॥
सवेंचि दिव्य त्रिशूलें । उदर शुंभाचे विदारिलें ।
शरीर पायाखाली रगडिलें । प्राण गेले निघोनिया ॥ ८३ ॥
तों धाविल्या भूतावळी । सकळ रण भक्षिलें ते वेळीं ।
तृप्त होऊन गोंधळी । नाचती तेव्हां अंबेपुढे ॥ ८४ ॥
भूतावळी तृप्त होऊन । उरले असंभाव्य रण ।
मग पक्षी श्वापदें येऊन । भक्षिती तेव्हां तृप्तीवरी ॥ ८५ ॥
आदिपुरुष ब्रह्मानंद देखा । त्याची ज्ञानकळा ते हे अंबिका ।
जे अज्ञानतिमिरछेदकदीपिका । दैत्य वधावया अवतरली ॥ ८६ ॥
श्रीधर म्हणे जननीये । उचलूनि मज घेई कडिये ।
संतसभेस घेऊनि जाये । तेणे होय ब्रह्मानंद ॥ ८७ ॥
अम्बिकाउदय दिव्य ग्रन्थ । पञ्चमोध्याय संपला येथ ।
पुढे देव अद्भुत । स्तवन करिती षष्टमाध्यायी ॥ ८८ ॥
इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये
शुम्भनिशुम्भमर्दनं नाम पंचमोध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥


GO TOP