॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ प्राकृत सप्तशती ॥
[ अर्थात - अम्बिका उदय ]

॥ अध्याय चवथा ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजगदंबायै नमः ।
वेदमाता ज्ञानकळा । जे रची अनंत ब्रह्माण्डमाला ।
जिने आदिपुरुष जागविला । लीलें आणिला सगुणत्वा ॥ १ ॥
निज भक्तासी रक्षावया । अवतरली ही आदिमाया ।
शुंभ निशुंभ वधावया । हिमाद्रितनया जाहली ॥ २ ॥
मागें धूम्राक्ष पाडिला रणीं । ते शुंभ निशुंभ ऐकतां श्रवणीं ।
मग चण्ड मुण्ड ते क्षणीं । सैन्यासहित पाठविले ॥ ३ ॥
वस्त्राभरणीं गौरविले । काळे बोलाऊ धाडिले ।
चतुरंग दळ निघालें । अत्यद्भुत ते समयीं ॥ ४ ॥
पदाती दल पुढे चालिलें । त्यामागें तुरंगलोटले ।
पाठीसी मदोन्मत्त चौताळले । पर्वताकार ते समयीं ॥ ५ ॥
त्या मागें रथाचे थाट । चालतां पर्वत होती पिष्ट ।
दैत्य निघाले अचाट । नाना विकट रूपाचे ॥ ६ ॥
एक अश्वमुखे दुर्धर । एक गजमुखे बल अपार ।
एक खरमुखे थोर । शब्द करीत धांवती ॥ ७ ॥
एक बोकडाऐसे वदन । एक वृषभमुखे बल गहन ।
एक सिंहवदन गगन । हांकेसरसी गाजविती ॥ ८ ॥
मांजरमुखे कित्येक । व्याघ्रमुखे निघती देख ।
मर्कटमुखे फोडिती हांक । महिषवदन बहुतचि ॥ ९ ॥
वृकमुखे श्वानमुखे । एक काजल' पर्वतासारिखे ।
भाली सिंदूर भ्यासूर देखे । कंप सुटे पाहतां ॥ १० ॥
बाहेर दाढा निघाल्या शुभ्र । हांके गाजविती अम्बर ।
देवीसमीप आले भार । वातवेगें करूनिया ॥ ११ ॥
मिसळली दोन्ही दळें । असंभाव्य रण मांडलें ।
असंख्य शक्ति ते वेळे । उठावल्या एकदाची ॥ १२ ॥
लोटला सकळ देव मेळा । अति कोल्हाळ तेव्हां गाजला ।
वाटे कल्पान्त जाहला । डळमळिला भूगोल ॥ १३ ॥
चपला जैशा झळकती । तैशा असिलता तळपती ।
परस्परे बाण सोडिती । जैशा वर्षती मेघधारा ॥ १४ ॥
मोडले दैत्यांचे भार । एक पळती सांडून समर ।
एक विवरीं लपती अपार । सागरी बुडती अति भयें ॥ १५ ॥
उणे देखोन चंडमुंड । पुढे धाविले ते प्रचंड ।
शरांची वाकडी उदंड । पाडिते जाहले तेधवां ॥ १६ ॥
ऐसे तेव्हां देखोनिया । सरसावली आदि माया ।
मृगेंद्रावरी बैसोनिया । प्रलय हांक फोडिली ॥ १७ ॥
धनुष्य वोढिलें सबळ । छेदिले दैत्यांचे बाणजाल ।
जैसे उगवतां सूर्यमंडळ । भगणे सर्व झाकोळती ॥ १८ ॥
की एक उठता विनायक । असंख्य संहारती दंदशुक ।
की सुटतां चंडवात । जलदजाल वितळे ॥ १९ ॥
एक विष्णु नामेंकरून । असंख्य दुरितें जाती जळोन ।
की चेततां अति कृशान । असंख्य वनें दग्ध होतीं ॥ २० ॥
की मूर्खाचे वाग्जाळ समस्त । एकाच वचनें उडवी पंडित ।
की एक सिंहनादे गज बहुत । पडती गतप्राण होऊनिया ॥ २१ ॥
हृदयीं प्रगटतां बोध । सहपरिवारे पळती कामक्रोध ।
की प्रत्यया येतां ब्रह्मानंद । क्षुद्रानंद विरती ॥ २२ ॥
अंबिका सोडी एक शर । त्यापासाव निघती अपार ।
जैसा एकुलता एक पुत्र । संतती वाढे बहु त्याची ॥ २३ ॥
जैसा तैलबिन्दु जळी पडतां । पसरे चहूकडे तत्त्वतां ।
की सत्पात्री दान देता । कीर्ति प्रगटे सर्वत्र ॥ २४ ॥
की कुलवंतास उपकार करितां । ते यश प्रगटे न सांगतां ।
तैसा एक बाण सोडितां । पसरती शर चहुकडें ॥ २५ ॥
चण्ड मुण्ड सोडिती शर । प्रलयविजेऐसे अनिवार ।
मोडती तेव्हां देवांचे भार । प्रेजें अपार पडियेलीं ॥ २६ ॥
इंद्रे अमृत शिंपूनि । कुण– उठवी ते क्षणीं ।
असो देवीची अगाध करणी । खिळिले बाणी दैत्य सर्व ॥ २७ ॥
असंभाव्य देवीचे बाण । सुटती वेगे चापापासुन ।
जैसे चतुराच्या मुखांतुन । शब्द निघती अपार ॥ २८ ॥
की रथक्रमवर्गक्रमेकरून । पंडित करिती वेदाध्ययन ।
तैसी चपळत्वे करून । शर सोडी आदिशक्ति ॥ २९ ॥
की मेघीहून अवधारा । अपार पडती तोयधारा ।
की ओंकारापासूनि अपार । ध्वनि जैसे निघती ॥ ३० ॥
की मूलमायेपासून एकसरे । असंख्य जीव सृष्टि उभारे ।
की चपळ लेखकापासाव एकसरे । असंख्य अक्षरें उमटतीं ॥ ३१ ॥
तैसी चण्डी चपळ जाणा । सोडिती झाली चण्डबाणा१७ ।
चण्डमुण्डाची बहुत सेना । संहारोन पडियेली ॥ ३२ ॥
चण्ड क्रोधावला अद्भुत । अस्त्रं तेणें सोडिलीं बहुत ।
जातवेदास्त्र१८ प्रेरित । शक्ती सोडीत पर्जन्य बहु ॥ ३३ ॥
चण्डे प्रेरिला चण्डवात । शक्ती प्रेरी सवेचि पर्वत ।
दैत्य वज्रास्त्र सोडित । माया प्रेरित माहेश्वर९ ॥ ३४ ॥
दैत्य दावित युद्ध गति । परि त्या देवीपुढे न चलती ।
त्रिशूल घेऊन महाशक्ति । चण्डावरी लोटली हो ॥ ३५ ॥
जैशी प्रलय चपळा पूर्ण । पर्वती पडे कडकडून ।
तैसें त्रिशूलेंकरून । हृदय चंडाचे विदारिलें ॥ ३६ ॥
असिलतेने छेदिलें शिर । पडिला पडिला चंडवीर ।
देव करिती जयजयकार । अम्बा विजयी म्हणऊनि ॥ ३७ ॥
येरीकडे मुंडे पर्वत । शक्तिवरी टाकिले बहुत ।
महामाया बाणीं चूर्ण करित । एवं पिष्टवत जयापरी ॥ ३८ ॥
असो देवीने घेऊनि मुसळ । मुंडाचे मुंड फोडिलें तत्काळ ।
जैसें विदारे पक्व फळ । तैसा असुर पडियेला ॥ ३९ ॥
ऐसा मारिला मुंड असुर । देव वर्षती पुष्प संभार ।
कळला शुंभ निशुंभा समाचार । केला संव्हार शक्तीनें ॥ ४० ॥
शुभ निशुंभ शोक करिती । म्हणती काळाची विपरीत गती ।
स्त्रीच्या हातें दैत्य पडती । महायोद्धे बळार्णव ॥ ४१ ॥
जंबुकीं मारिले पंचानन । मत्स्ये की गिळिला प्रळय पवन ।
मुंगीनें मेरु उचलोन । दाढेखाली रगडिला ॥ ४२ ॥
मग रक्तबीज दैत्य । त्यास गौरविले अद्भुत ।
नाना वर्णाचे अपरिमित । दानव वीर निघाले ॥ ४३ ॥
एक सिंदूर वर्ण दैत्य । एक जैसे काजल पर्वत ।
एकाचे अद्भुत । केश लांब रुळताती ॥ ४४ ॥
एक भोरे पिंगट वर्ण । एक निर्नासिक विक्राळ वदन ।
एक चरण त्रिचरण । संख्येरहित निघाले ॥ ४५ ॥
नवकोटी निघाले असुर । मुख्य रक्तबीज साचार ।
रणभूमीसी सत्वर । येतां झाला ते काळीं ॥ ४६ ॥
इकडे अंबेच्या दळीं । औट२० कोटी भूतावळी ।
नवकोटी चामुंडा सकळी । चौसष्ट कोटी योगिनी ॥ ४७ ॥
वेताल भैरव अपार । तेहतीस कोटी देवभार ।
दिवट्या घेऊन समग्र । गोंधळ घालिती अंबेपुढे ॥ ४८ ॥
दैत्यांचे काढून कोथळ । तेच चंडकेकरून२१ विशाल ।
रंगी नाचती वेताल । दिवट्या करीं झळकती ॥ ४९ ॥
तंत वितंत घन सुस्वर । चतुर्विध वाद्यांचे गजर ।
दुंदुभी वाजवी पुरंदर । नादे धराधर थरकतसे ॥ ५० ॥
तो लोटले दैत्यांचे भार । मांडलें युद्धाचें घनचक्र ।
शक्ती उठावल्या समग्र । प्रलयहांक फोडितचि ॥ ५१ ॥
देव तेव्हां आपल्या शक्ती । प्रगट समरंगणा पाठविती ।
विष्णुमाया त्वरित गति । गरूडारूढ निघाली ॥ ५२ ॥
शंखचक्रादि आयुधे घेऊनि । निघाली वेगें विष्णुरूपिणी ।
वृषभारूढ़ रुद्रायणी । दशभुज सायुधा ॥ ५३ ॥
ऐरावतारूढ इंद्रायणी । निघाली वज्र हाती घेऊनि ।
हंसारूढ कामिनी । ब्रह्मशक्ति चालली ॥ ५४ ॥
मयूरारूढ षडाननी२४ । सिंहारूढ गजवदनी२५ ।
रथारूढ आदित्यनंदिनी२६ । शक्ती वेगें धाविली ॥ ५५ ॥
मेषारूढ २७ अग्निरूपिणी । एवं सकल शक्ती धावोनि ।
अद्भुत युद्धे समरंगणीं । करित्या झाल्या तेधवां ॥ ५६ ॥
रक्तबीजाचे दळ अपार । शक्तींनी२८ संहारिलें समग्र ।
मग रक्तबीज सत्वर । वर्षत उठला शस्त्रास्त्रीं ॥ ५७ ॥
अंबेनें सोडिले शर । भेदिलें रक्तबीजाचे शरीर ।
रक्तधारा सुटल्या अपार । परि नवल थोर वर्तले ॥ ५८ ॥
जितुका रक्तबिंदु पडत । तितुके रक्तबीज होती अद्भुत ।
त्याचे अंगी बाण रुतत । रक्तोद्भुत होती बहु ॥ ५९ ॥
एक पळ न भरतां जाण । कोटीच्याकोटी झाले निर्माण ।
सकल देवांसहित सहस्रनयन । चिंतार्णवी पडियेला ॥ ६० ॥
पृथ्वीभरी रक्तबीज झाले । शस्त्र लागत होती आगळे ।
मग महामाया ते वेळे । काय बोलत शक्तीप्रती ॥ ६१ ॥
वरिच्यावरी धरून रक्त । पान करा गे तुम्ही समस्त ।
मग क्षोभिल्या शक्ती अनन्त । संहारीत चालिल्या ॥ ६२ ॥
वरिच्यावरी छेदिती शिर । करपात्रीं धरिती रुधिर ।
प्राशन करिती अपार । गिळिती शरीरें सवेचि ॥ ६३ ॥
दैत्य शरीराचे कुटके२१ करिती । गटगटा गिळून रक्त प्राशिती ।
एक क्षणामाजी जगती । निष्कंटक केली हो ॥ ६४ ॥
जैसा उगवता वासरमणि३२ । एकही नक्षत्र न दिसे नयनीं ।
तैसे रक्तबीज संव्हारोनि । विजयी भवानी जाहली ॥ ६५ ॥
रणीं न दिसे एक प्रेत । रणभैरव चहूंकडे धावत ।
एकाचे हातीं एक वोढित । अस्थीहि तेथ न उरेचि ॥ ६६ ॥
झोटिंग३३ रणी आरडत । सव्यापसव्ये चौताळत ।
म्हणती क्षुधेनें व्यापिले बहुत । एकहि प्रेत नाढळे ॥ ६७ ॥
मुख्य रक्तबीज जो उरला । तो देवीनें उभाच रणीं चिरला ।
वरिच्यावरी गिळिला । रक्त खाले न पडतां ॥ ६८ ॥
ऐसा रक्तबीज सैन्यासमवेत । देवीनें ग्रासिला क्षणांत ।
जैसा शिखी३४ पेटता अद्भुत । वन समस्त दग्ध होय ॥ ६९ ॥
उदो उदो म्हणऊन । गोंधळ घालिती भूतगण ।
म्हणती अंबे शुंभ निशुंभ मारुन । सैन्यासमवेत टाकी का ॥ ७० ॥
अंबिकाउदय ग्रंथ थोर । पुढे शुंभनिशुंभाचे युद्ध अपार ।
ब्रह्मानंदे श्रीधर । अभंग साचार वर्णिल ते ॥ ७१ ॥
इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये
चंडमुंडरक्तबीजहननं नाम चतुर्थोऽध्यायः ॥
॥श्रीजगदंबार्पणमस्तु ॥


GO TOP