॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ प्राकृत सप्तशती ॥
[ अर्थात - अम्बिका उदय ]

॥ अध्याय तिसरा ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीअंबिकायै नमः ॥
जय जय वो ब्रह्मानंदे । परम उदारे अनादि सिद्धे ।
चरित्रे तुझी अगाधे । वर्णिता भागे सहस्रमुख ॥ १ ॥
श्रोती परिसिजे सादर । दितीचे पोटी दोघे कुमर ।
आवळे जावळे परिकर । हिरण्याक्ष हिरण्यकश्यप ॥ २ ॥
आधी उपजे तो धाकटा केवळ । मागून उपजे तो वडिल ।
हे जय विजय द्वारपाल । शापे असुर जाहले ॥ ३ ॥
अहो ते कश्यपसुत दोघे जण । हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दारुण ।
घोर तप आचरोन । अपारमण तोषविला ॥ ४ ॥
शिववरदे झाले उन्मत्त । हिरण्याक्ष बळे अद्भुत ।
पृथ्वी काखेस घालून समस्त । पळत होता रसातळा ॥ ५ ॥
पृथ्वी उचलिता सत्वर । एकचि झाला हाहा:कार ।
वराहरूपे श्रीकरधर । युद्धे करितां जाहला ॥ ६ ॥
दिव्य सहस्र वरुषे । युद्ध केले पुराण पुरुष ।
हिरण्याक्ष मारून आवेशे । धरा धरिली दंतावरी ॥ ७ ॥
प्रल्हादाकारणे स्तंभांत । प्रगटला नरहरी अद्भुत ।
हिरण्यकश्यपाचा अंत । करूनि भक्त रक्षिला ॥ ८ ॥
असो हा आतां गत कथार्थ । पुढे ऐका अंबिकाचरित ।
हिरण्याक्षाचे दोघे सुत । शुंभनिशुंभ सबल पै ॥ ९ ॥
तिही तप करूनि अद्भुत । प्रसन्न केला हेरंबतात ।
त्रिभुवन पीडिलें बहुत । सुर समस्त त्रासिले ॥ १० ॥
पुरुष मात्र जितुका पाही । त्यांच्या हातें त्यांस मरण नाहीं ।
देवी स्थानें सोडिलीं सकळही । ठाव न दिसे लपावया ॥ ११ ॥
हिमाचळी देव गुप्त । जयप्राप्तीसी तप करीत ।
मंत्र जपध्यान विधियुक्त । देवीचे देव आचरती ॥ १२ ॥
स्वयें हिमाचल आपण । देवीचें करी आराधन ।
दिव्य सहस्रवरुषा प्रसन्न । अपर्णा देवी जाहली ॥ १३ ॥
सकल देव आणि हिमपर्वत । दुर्गेचें तेव्हां स्तवन करीत ।
गाहाणे सांगती समस्त । शुंभनिशुंभाचे ते वेळें ॥ १४ ॥
भयनाशक भक्तवरदायिनी । भवछेदके भवमानउल्हासिनी ।
तुजवांचूनि त्रिभुवनीं । रक्षिता कोणी असेना ॥ १५ ॥
तो भवानीच्या मुखांतून । कालिका निघाली श्यामवर्ण ।
की ते इंदिरापतीची बहिण । हिमनगकुमारी जाहली ॥ १६ ॥
असो ती आदिकुमारी । तीस न विसंबे कदा हिमाद्री ।
कडिये खांदा अहोरात्रीं । खेळवित तियेते ॥ १७ ॥
हिमाचलाचे घरीं देव । विलोकिती कन्येचे लाघव ।
अद्भुत स्वरूपाची ठेव । ब्रह्मादिका वर्णवेना ॥ १८ ॥
ते आदिमाता भवानी । दैत्यवधा प्रगटली विश्वमोहिनी ।
जिचिया स्वरूपावरूनि । ब्रह्मांडचि ओवाळिजे ॥ १९ ॥
जे आदिपुरुषाची मूळध्वनि । वेदमाता प्रणवरूपिणी ।
अनंत शक्तीची स्वामिनी । वेदपुराणी वंद्य जे ॥ २० ॥
विधिपुरंदरादि दिनमणि । गर्भी पाळिलीं बाळें तीन्ही ।
दंत तेज झळकता मेदिनी । महामणि पाषाण होती ॥ २१ ॥
कोट्यान्कोटी मीनकेतन । सांडणे होते नखावरून ।
अंगींचा सुवास संपूर्ण । ब्रह्माण्ड फोडून वरी जाये ॥ २२ ॥
सहज बोलता क्षितीं । वाटे रत्नरासी विखरती ।
पदमुद्रा जेथें उमटती । कमलें उगवतीं दिव्य तेथें ॥ २३ ॥
त्या सुवासास वेधोन वसंत । सर्भोवता गडबडा लोळत ।
कैवल्यकनकलता अद्भुत । भक्त रक्षावया अवतरली ॥ २४ ॥
लावण्यामृत सरिता । ऐसी दुजी नाहीं तत्त्वतां ।
एकदा नारदे ते देखितां । आदिमाता वंदिली ॥ २५ ॥
पुढील भविष्य जाणोन । वेगें निघाला ब्रह्मनंदन ।
शुंभनिशुंभाप्रति जाऊन । काय सांगता जाहला ॥ २६ ॥
म्हणे तुम्हा योग्य स्त्री सुंदरी । आहे हिमाचलाची कुमारी ।
जिचिया लावण्यास निर्धारी । त्रिभुवनीं नसे उपमा ॥ २७ ॥
या ब्रह्माण्डमंडपात पाहतां । ऐसी दुजी नाहीं तत्त्वतां ।
रंभा ऊर्वशी देवकान्ता । दास्यत्व करिती तियेचे ॥ २८ ॥
सुंदर स्त्रीविण संसार । जैसें दीपेविण मंदिर ।
की रविशशिविण अम्बर । कळाहीन जेवी दिसे ॥ २९ ॥
दैत्ये पाठवूनि निर्धारी । जरी आणाल हिमनगकुमारी ।
तरीच पुरुषार्थी महीवरी । मग मी तुम्हांस म्हणेन ॥ ३० ॥
ऐसी तेथें कळि लावून । गेला वेगें ब्रह्मनन्दन ।
दैत्यास अवस्था पूर्ण । तिच्या स्वरूपाची लागली ॥ ३१ ॥
गळी गोविला मीन । की फांसी सांपडला हरिण ।
तैसे दैत्य दारुण । पंचशरें भेदिले ॥ ३२ ॥
मग सुग्रीव नामें दैत्य । त्यास शुंभनिशुंभ सांगत ।
तुवा जाऊनिया तेथ । महिमा आमुचा वर्णिजे ॥ ३३ ॥
देव पळविले समस्त । तीस सांग आमुचा पुरुषार्थ ।
सकळांची वैभवे हार्ते यथार्थ । आम्हीच एक त्रिभुवनीं ॥ ३४ ॥
ते जरी न गणी आम्हांसी । तरी बळेच आणावी भीड कायसी ।
यावरी प्रतिउत्तर त्यासी । सुग्रीव देता झाला ॥ ३५ ॥
बळे आणितां तीलागुन । पुढें न दिसे क्षेम कल्याण ।
दिसतो अनर्थ दारुण । विचारूनि पहा तुम्ही ॥ ३६ ॥
श्रावणारी स्नुषेचें हरण । बळें करितां द्विपंचवदन ।
कोण ते पावला कल्याण । विचारूनि पहा तुम्ही ॥ ३७ ॥
जे गोष्टीनें होय अनर्थ । आणि स्वकुलाचा होय घात ।
ऐसिये कुबुद्धीस पंडित । वश्य नव्हे कालत्रयीं ॥ ३८ ॥
टाकुनिया शुद्ध पंथ । आडमार्गे जो गमन करित ।
त्यास अपाय येतील यथार्थ । त्यास संदेह नसेचि ॥ ३९ ॥
वेदशास्त्रीं जें अनुचित । तेथें बळेच घाली चित्त ।
तेणें आपला आपण केला घात । यास संदेह नसेचि ॥ ४० ॥
परसतीचा अभिलाष । महापुरुषास ठेवणे दोष ।
बलवंतेसि बांधणे कास । मग अनर्थास काय उणें ॥ ४१ ॥
महासर्प उसा घेऊनि । केवीं निजेल सुखशयनीं ।
बळेच गृहास लाविला अग्नी । मग अनर्थास काय उणें ॥ ४२ ॥
परद्रव्याचा अभिलाष । जाणोन प्राशन करणे विष ।
करितां परनिंदा परद्वेष । मग अनर्थास काय उणें ॥ ४३ ॥
सुग्रीव बोलिला नीती बहुत । परी ते नायकती उन्मत्त ।
जैसा वेदार्थ करितां पंडित । ते शतमूर्खासि न मने जेवीं ॥ ४४ ॥
कमलसुवास परम सुंदर । परि तो काय घेऊ जाणें द१र१४ ।
मुक्ताफलाचा आहार । बक काय घेऊ जाणे ॥ ४५ ॥
कस्तुरी अत्यन्त सुवास । परि ते घेऊ काय जाणे वायस ।
तत्त्वविचार मद्यपियास । काय व्यर्थ सांगोनिया ॥ ४६ ॥
जन्मान्धापुढे नेऊन । व्यर्थ काय रत्ने ठेऊन ।
की उत्तम सुस्वर गायन । बधिरापुढें व्यर्थ केलें ॥ ४७ ॥
पतिव्रतेचे धर्म सकळ । जारणीस काय सांगून फळ ।
धर्मशास्त्र श्रवण रसाळ । वाटपाड्यास१६ कायसे ॥ ४८ ॥
नित्य दुग्धे नाहला वायस । परि तो कदा नव्हे राजहंस ।
दुधामाजी कोळसा बहु दिवस । घासितां उजळ नव्हेचि ॥ ४९ ॥
सिकता१७ शिजविली बहुकाळ । परी ते कदा नव्हे मवाळ ।
परिस नेऊन अमौल्य । खापरासी घासला ॥ ५० ॥
निर्बला हाती दिधलें शस्त्र । की बोरीवरीं घातलें वस्त्र ।
की अत्यंत जो दिव्यमंत्र । अपवित्रास सांगितला ॥ ५१ ॥
दूध उकरडा वोतिलें । की मसणी मंडप दिधले ।
कस्तुरीने लिंपिलें । टोणगीयाचे अंग व्यर्थ ॥ ५२ ॥
षोडशोपचारी पूजिलें प्रेत । तें जैसें गेलें व्यर्थ ।
तैसे ते बोधिले उन्मत्त । परी सर्वथा नायकती ॥ ५३ ॥
शुंभ निशुंभ क्रोधे बोलती । तूं काय आम्हांसी सांगसी नीति ।
मृगेंद्रास सांगावया रीति । जंबुक जैसा पातला ॥ ५४ ॥
बृहस्पतीसी मुका जाण । शिकवू आला शब्दज्ञान ।
मूढा तेथवरी तूं जाऊन । बोधून आणि तियेसी ॥ ५५ ॥
सुग्रीव तेथून निघाला । क्षण न लागता आला हिमाचला ।
राजमंदिर प्रवेशला । तो ते श्यामला देखिली ॥ ५६ ॥
देवी पुसे वृत्तांत । कोठूनि आलासी कोणाचा दूत ।
येरें सर्वहि केलें श्रुत । वर्तमान शुंभाचें ॥ ५७ ॥
शुभ निशुंभ बळवंत । देवदर्पहरणकुशल बहुत ।
सकलकलाप्रविण बुद्धिवंत । वरी तूं सत्य तयासी ॥ ५८ ॥
ऐकोन तयाचे वचन । देवी बोले सुहास्यवदन ।
शुंभनिशुंभाचे जाण । आलें मरण जवळी पैं ॥ ५९ ॥
सुग्रीव म्हणे ते येऊन । तुज बळेंच नेतील उचलोन ।
देवी म्हणे न लागतां क्षण । संहारीन तयासी ॥ ६० ॥
मजसी भिडो पाहती देख । जैसे महेशापुढें मशक ।
वडवानलापुढे काक । भस्म होतील निरि ॥ ६१ ॥
इंद्रापुढे जैसे रंक । की ज्ञानियापुढे महामूर्ख ।
की केसरीपुढे जंबुक । सूर्यापुढे खद्योत पैं ॥ ६२ ॥
की दीपापुढे पतंग । की खगेन्द्रासमोर उरग ।
की राजहंसापुढे काग । कळाहीन अपवित्र ॥ ६३ ॥
की नामापुढे पाप देख । की वेदान्तापुढे चार्वाक ।
की शिवासमोर मशक । मीनकेतन जेवी दिसे ॥ ६४ ॥
पंडितापुढे अजापालक । की श्रोत्रियापुढे हिंसक ।
की वासुकीसमोर मूषक । लक्षण पाहूं पातला ॥ ६५ ॥
अग्नीपुढे जैसें तृण । की ज्ञानापुढे अज्ञान ।
की महावातापुढे जाण । जलदजाल जैसे कां ॥ ६६ ॥
तैसे शुंभ निशुंभ देख । मजसी भिडो पाहती शतमूर्ख ।
ऐसे ऐकितां तो वार्तिक २९ । सुग्रीव बहुत क्षोभला ॥ ६७ ॥
म्हणे शुंभ निशुंभ महाबळी । ज्यासी त्रिभुवन कापे चळी ।
तूं स्त्री होऊन हातोफळी३० । त्यासी म्हणसी माजवीन ॥ ६८ ॥
न लागतां एक क्षण । मी तुज नेईन उचलोन ।
परी मी शिष्टाई करूं आलो जाण । सौम्योपचारें करूनिया ॥ ६९ ॥
देवी म्हणे रे मशका । बहुत बडबडसी कीटका ।
मजसि भिडतां शतमूर्खा । भस्म होसील निर्धार ॥ ७० ॥
खद्योत३१ आपुलें तेज पूर्ण । दावी चंडांशालागुन२२ ।
की मृगेन्द्रापुढे येऊन । माजरि उड्डाण मांडिले ॥ ७१ ॥
की सज्ञान पंडितापुढे । बोलावया आली महामूढें ।
की जंबुक आपुले पवाडे । व्याघ्रापुढे दावित ॥ ७२ ॥
की रास ब्रीदें बांधोन । नारदापुढे मांडिलें गायन ।
की मूषक बहुत मिळोन । वासुकीसी धरू आले ॥ ७३ ॥
जाय रे सुग्रीवा येच क्षणीं । त्या दोघांसी युद्धास आणी ।
म्हणावे मज तुम्ही जिंका समरंगणीं । मग मी तुम्हांसी वरीन ॥ ७४ ॥
सांग जाऊन दोघाजणा । सत्वर यावें सहितपृतना ।
सुग्रीव जाऊन त्याच क्षणा । शुंभ निशुंभाप्रति सांगे ॥ ७५ ॥
म्हणे प्रलयमेघांतील चपला । तैसी ती दिसे जाज्वल्य अबला ।
तिचा प्रताप दिसे आगळा । ब्रह्माण्डमाला घडामोडी ॥ ७६ ॥
ते गर्वे न लेखीच कोणा । म्हणते समरी जिंकील आपणा ।
तोच वर होईल जाणा । करा सेना सिद्ध वेगीं ॥ ७७ ॥
सुग्रीव म्हणे स्वरूप अद्भुत । या ब्रह्माण्डमंडपांत ।
ऐसे स्वरूप सौंदर्य निश्चित । दुसरे न दिसे शोधिता ॥ ७८ ॥
रंभा ऊर्वशी विलासिनी । कुरवंडी करावी नखावरूनि ।
शंबरारिकान्ता इन्द्राणी । दासी गमती तियेच्या ॥ ७९ ॥
जैसा घनःश्याम इन्दिराकान्त । तैसीच ते श्यामला अद्भुत ।
आकर्णनेत्र विकासित । मुखमृगांक न वर्णवे ॥ ८० ॥
मुखीं झळकती दंतपंक्ती । बोलतां जिकडे पडे दीप्ति ।
पाषाण ते हिरे होती । रत्ने विखरती बोलतां ॥ ८१ ॥
तिचे अंगीचा सुवास । भेदूनि जाय महदाकाश ।
वाटे इनेच भुलविला आदिपुरुष । आपुल्या स्वरूप-विलासे ॥ ८२ ॥
पाय ठेविता धरणी । पदमुद्रा उमटती जे स्थानीं ।
वसंत तेथ येऊनि । लोळे भुलोन सुवासा ॥ ८३ ॥
चंद्र सूर्याच्या गाळूनि ज्योती । तैसी कर्णी ताटकें तळपती ।
मुक्त घोष१ ढाळ देती । कृत्तिकापुंज जैसे कां ॥ ८४ ॥
आकर्णपर्यन्त विशाल नयन । माजी विलसे सोगयाचे अंजन ।
कपाळी मृगमद रेखिला पूर्ण । वरी बिजवरा झळकतसे ॥ ८५ ॥
शीत दाहकत्व सांडूनि । शशांक आणि वासरमणि७ ।
सदा विलसताती दोन्ही । मुक्ते गगनीं भगणे जेवीं ॥ ८६ ॥
विद्युत्प्राये दिव्य अंबर । मुक्तलग चोळी शोभे विचित्र ।
वरी एकावली मुक्ताहार । पदकी अपार तेज फांकें ॥ ८७ ॥
दशांगुली मुद्रिका यंत्राकार । वज्रचूडमंडित कर ।
कटिकांचीवरी हिरे थोर । जैसे दिनकर जडियेले ॥ ८८ ॥
वाकी नूपुरें दिव्य चरणीं । रुणझुणती चालतां धरणी ।
जिचिया स्वरुपावरुनि । कोटी अनंग५४ वोवाळिजे ॥ ८९ ॥
ऐसें स्वरूप वर्णितां जाणा । शुंभास आली काममूर्च्छना ।
सावध होऊन म्हणे ऐसी ललना । मज कैसी प्राप्त होईल? ॥ ९० ॥
मग धूम्रनाम दैत्य सबळ । सवें रुद्राक्षौणी५५ दिधलें दल ।
रणतुरे वाजती विशाल । पृथ्वीमंडळ डळमळिलें ॥ ९१ ॥
दळभारेसी ते वेळां । हिमाचलाजवळी आला ।
तो इकडे सकळ देव मेळा । एकवटला मायेपासी ॥ ९२ ॥
अष्टभुजा आदिभवानी । निघे मृगेंद्रावरी बैसोनि ।
सवे चौसष्टी कोटी योगिनी । इच्छामात्र प्रगटल्या ॥ ९३ ॥
अनंत शक्तींची स्वामिनी । असंख्य देवी मिळाल्या ते क्षणीं ।
नवकोटी कात्यायनी । चौसष्ट कोटी चामुंडा ॥ ९४ ॥
औट कोटी भूतावळी । घेऊन चालली भद्रकाली ।
ज्वाला वेताळ महांकाळी । असंख्यात प्रगटले ॥ ९५ ॥
ब्रह्मादिदेव शचीवर । पाठीसी चालिले करून भार ।
होत वाद्यांचा गजर । धराधर डळमळिला ॥ ९६ ॥
दोन्हीं दळे एकवटलीं । संग्रामाची झुंज लागली ।
कोट्यान्कोटी ते काळीं । प्रेजें पडिली दैत्यांची ॥ ९७ ॥
ऐसे देखून धूम्रलोचन । पुढे वेगें लोटिला स्यंदन५६ ।
देवीसमोर येऊन । बोले तीक्ष्ण ते वेळें ॥ ९८ ॥
म्हणे गे न लगतां एक क्षण । नेईन निशुंभापासी धरून ।
निशुंभावेगळा वर आन । नाहीं तुज तत्त्वतां ॥ ९९ ॥
देवी म्हणे ते वेळीं । सन्निपात होय मरणकाळीं ।
तैसी करिसी आचागळी । महामलिना पामरा ॥ १०० ॥
ऐसें वचन तीक्ष्ण । ऐकतां कोपला धूम्रलोचन ।
वर्षा लागला प्रलयबाण । देवीवरी तेधवा ॥ १०१ ॥
जो जो येत त्याचा बाण । देवी टाकी पिष्ट करून ।
जैसे मूढाचे वाग्जाल पूर्ण । चतुर उच्छेदी एकदाची ॥ १०२ ॥
एक दिवस संपूर्ण । युद्ध करी धूम्रलोचन ।
मग देवीने अर्धचंद्रबाण । धनुष्यावरीं योजिला ॥ १०३ ॥
वृक्षाग्रीचे लथूनि फल । झेपावे जैसा पक्षी चपळ ।
तैसे धूम्राक्षाचें शिरकमळ । उडविलें क्षण न लगता ॥ १०४ ॥
धूम्राक्षाची सेना सकळी । अनंत शक्तींनी संहारिली ।
शुंभ निशुंभाजवळी आली । घायाळे तेव्हां पळतची ॥ १०५ ॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । आता वीर रस माजेल अपार ।
तो अम्बिकाउदय परिकर । श्रोती सादर परिसिजे ॥ १०६ ॥
इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये
धूम्रलोचनहननं नाम तृतीयोऽध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥


GO TOP