![]() |
॥ प्राकृत सप्तशती ॥ ॥ अध्याय दुसरा ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीअंबिकायै नमः ॥
सुमेधा म्हणे राया सुरथा । पुढे ऐक देवीची कथा । श्रवणें निरसे भवव्यथा । संताप चिंता नव्हे कधी ॥ १ ॥ महिषासुर दैत्य दुर्धर । त्यावरी झाला अत्यंत क्रूर । दैत्यचक्रे अपार । मेळविली पराक्रमें ॥ २ ॥ पर्वताकार त्याचे शरीर । म्हणवी दैत्यकुळामाजी इंद्र । म्हैशाचे स्वरूप दुर्धर । युद्धसमयीं धरितसे ॥ ३ ॥ नाना रूपें धरी असुर । परम दुरात्मा कापट्यसागर । तेणें पराक्रमें थोर । त्रिभुवन जिंकिलें ॥ ४ ॥ सुरासहित सुरेश । आपुली पदें टाकून वोस । गिरिकंदरी बहु दिवस । गुप्तरूपें राहती ॥ ५ ॥ महिषासुर सबल दैत्य । इंद्रपदी ठाणे घालित । त्रिभुवन चळचळा कांपत । भये करून तयाच्या ॥ ६ ॥ इकडे त्रिदश दशाहीन । वनीं हिंडती दीन वदन । मग सुरांसहित सहस्रनयन । वैकुंठपीठाप्रति | गेला ॥ ७ ॥ अद्भुत स्तवन ते वेळें । इंद्रादिदेव करिते झाले । इंदिरावरा धाव ये वेळे । दैत्ये गांजिलें आम्हासी ॥ ८ ॥ जय हरी कमलपत्राक्षा । हे असुरांतका सर्वसाक्षा । मखपालका निर्विकल्पवृक्षा' । कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥ ९ ॥ जय जय हरे वेदोद्धारका । कमठस्वरूपा सृष्टिपालका । नमो सकळ दैत्यांतका । वराहवेषा दीनबंधो ॥ १० ॥ नमो हिरण्यकश्यप मर्दना । नमो त्रिविक्रमा बलिबंधना । नमो ब्राह्मणकुलपालना । भृगुकुलावतंसा ॥ ११ ॥ नमो पौलस्तिकुल-विपिनदहना । मीनकेतनारिहृदयजीवना । नमो चतुर्दशलोकपालना । आनंदसदना अनामा ॥ १२ ॥ ऐकोनिया अगाध स्तवन । परम तोषला पद्याक्षिरमण । तत्काळ देवीमुखांतून । दिव्य रूपें प्रगटली ॥ १३ ॥ सर्व देवांचे अंश घेऊन । केलें देवीचे स्वरूप निर्माण । तिच्या वदनी रमा रमण । कालाग्नी रुद्र राहिला ॥ १४ ॥ सकल देव केश होऊन । अंगीं वर्तती दैदीप्यमान । कराग्र झाला चंडकिरण । वायु श्रवणस्थानी राहे ॥ १५ ॥ नयनामाजीं राहिला अग्न । चंद्रे दिधलें नवयौवन । यम दंष्ट्रा तीक्ष्ण । दैदीप्यमान जाहला ॥ १६ ॥ बाहूच्या ठायीं बल अद्भुत । स्वयें राहिला वैकुंठनाथ । वक्षःस्थळ जाहला शचिकांत । वरुण कंठ होत पै ॥ १७ ॥ नाभीस राहिला कमळासन । नासिकी अश्विनौदेव दोघे जण । एवं सर्व देव मिळोन । वोतली एक आदिमाया ॥ १८ ॥ रुद्रे दिधला त्रिशूळ । विष्णु देत चक्र तेजाळ । इंद्रे दिधलें मुद्गल१३ । वज्र रूप तेजस्वी ॥ १९ ॥ चंद्र देत खेटक । वरुणे पाणीपात्र सुरेख । घोर गर्जना बलाहक १४ । देता झाला ते वेळे ॥ २० ॥ विधीने दिधलें धनुष्य । बाण देत चंडांश१५ । हाती खड्ग विशेष । यम देत तेजस्वी ॥ २१ ॥ मृगेंद्र जाहला वहन । देवी निघाली दैदीप्यमान । तेहतीस कोटी देव संपूर्ण । भार पाठीसी निघाले ॥ २२ ॥ ऐरावतारूढ इंद्र । खगेंद्रावरी श्रीधर । वृषभारूढ महारुद्र । निजभारेसी शोभतसे ॥ २३ ॥ हंसारूढ कमलासन । मयूरावरी षडानन । वीरभद्रादि गजवदन । निजभारेसी शोभती ॥ २४ ॥ लोटले देखोन देवभार । दळे सिद्ध करी महिषासुर । लागले वाद्यांचे गजर । गर्जती असुर सिंहनादें ॥ २५ ॥ चतुरंग दल अद्भुत । बळे पृथ्वी उलथो पहात । मेरुप्रदेशी असंख्यात । दैत्यचक्रं मिळालीं ॥ २६ ॥ उचंबळती सप्तसमुद्र । ऊर्वी मंडळ कांपे थरथर । शेष वराह दिग्गज थोर । हडबडले ते काळीं ॥ २७ ॥ देव दैत्यांचा वाद्यध्वनि । तो नाद न माये गगनीं । मिसळल्या पृतना दोन्ही । एके ठायीं ते वेळें ॥ २८ ॥ संग्रामाची झुंज लागली । रथासी रथ झगटले ते वेळीं । गजासी गज कुंभस्थळी । आदळती परस्परे ॥ २९ ॥ स्वारावरी लोटले स्वार । पायदळ मिसळलें समग्र । परस्परे करिती संहार । रण दुर्धर माजलें ॥ ३० ॥ पक्षी उडती वृक्षावरुनी । तैसीं शिरे उसळतीं गगनीं । करचरण पडती मेदिनीं । संख्येरहित तेधवां ॥ ३१ ॥ अशुद्धाचे चालले पूर । आसुरीं सुर लोटिले समग्र । झाला एकचि हाहा:कार । पळती सुर त्रासूनिया ॥ ३२ ॥ ते वेळी देवीचे स्मरण । सकळ देव करिती गर्जून । आदिजननी हा समय कठिण । उदय तुझा करी आतां ॥ ३३ ॥ उदय उदय बोलती समस्त । तो अंबा प्रगटली अकस्मात । तेज न माये दिक्चक्रांत । उजळत ब्रह्मांड ॥ ३४ ॥ त्या तेजामाजीं निश्चिती । चंद्रसूर्य उचंबळती । अष्टभजा प्रगटली शक्ति । शस्त्रे तळपतीं चपळेऐसीं ॥ ३५ ॥ शस्त्रास्त्रे वरुष भवानी । जाती दैत्यचक्रं संहारूनि । शिरांचे चेंडू ते क्षणीं । गगनमार्गे उसळती हो ॥ ३६ ॥ दैत्यकलेवर विदारोन । शक्ति करी शोणितपान । कोट्यावधी दैत्य उचलोन । गिळिले तत्काळ चंडीनें ॥ ३७ ॥ तो कृतांताऐसी हाक देऊनि । महिषासुर धाविला ते क्षणीं । धनुष्यबाण घेऊनि । महामाया चालिली ॥ ३८ ॥ महापर्वत विशाळ । तैसा महिषासुर दिसे सबळ । भयाभीत देव सकळ । स्तवन करिती अंबेचे ॥ ३९ ॥ रक्षी रक्षी आदिमाये । भवभयमोचके कनकवलये । दैत्य संहारी लवलाहे । करी निर्भय भक्तांसी ॥ ४० ॥ असो देवी देत हुंकार । तेणें उडो पाहे अवनीअंबर । होत दैत्यांचा संहार । पडती गतप्राण होऊनि ॥ ४१ ॥ तो बाहुक दैत्य दुर्धर । तो धाविला देवीसमोर । तेणें युद्ध केलें अपार । देखता सुरवर भयाभीत ॥ ४२ ॥ देवीने धावोन सत्वर । केसी धरिला बाहुकवीर । असिलतेनें छेदिलें शिर । त्रिशूळे शरीर विदारिलें ॥ ४३ ॥ तो महिषासुर क्रोधे धावत । खुरांनी पीठ करी पर्वत । सप्तपाताळे दणदणित । भोगीनाथ भ्रमित झाला ॥ ४४ ॥ द्वादश योजनें प्रमाण । एकैक शृंग लंबायमान । विशाल शरीर गर्ने दारुण । काळही ऐकोन दचके पै ॥ ४५ ॥ धडक हाणोन कनकाद्रि । वाटे टाकील समुद्रीं । की खुरांनी हे धरित्री । करील वाटे पिष्टवत ॥ ४६ ॥ कपाळी चर्चिला सिंदुर । अग्निकुंडाऐसे नेत्र । हाका देता लोक समग्र । चतुर्दश कापती ॥ ४७ ॥ शृंगांनी पर्वत कोलित । ऊर्ध्व जाती कंदुकवत२१ । देवांची विमानें भंगत । भयाभीत सुर पळती ॥ ४८ ॥ ते वेळे पर्वताचा पर्जन्य । देवांवरी पाडी शृंगें कोलुन । विशाल मुख पसरून । अट्टहासे गर्जतसे ॥ ४९ ॥ भयाभीत देव पळती । देवीचे पाठीसी सर्व दडती । नक्षत्रे भूमीवरी रिचवती । गर्जनेसरिसी दैत्याच्या ॥ ५० ॥ देवी म्हणे महिषासुरा । क्षणभरी गर्ने तूं पामरा । तुझा मृत्यु अविचारा । जवळी आला यावरी ॥ ५१ ॥ मग मधुपान करूनि लवलाह्या । बावरली ते महामाया । महिषासुर सरसावोनिया । देवींवरी धाविला ॥ ५२ ॥ देवी म्हणे संघटोन मजसी । तूं जय कैसा पावसी । जैसा शशक शार्दूलासी । झोंबी घ्यावयासी पातला ॥ ५३ ॥ सुपर्णावरी धावे अळिका । की मातंगावरी गोवत्स देखा । की बळे धाविली पिपीलिका । कनकाचळ उचलावया ॥ ५४ ॥ ऊर्णानाभी भावी मनी । स्वतंतुसूत्रं झाकी मेदिनी । वृश्चिक नांगी उभारुनि । ताडीन म्हणे खदिरांगारा ॥ ५५ ॥ मृगेंद्रास गिळीन म्हणे बस्त । मक्षिका भूगोल उचलू पाहात । प्रलयानल धगधगित । पतंग धावे ग्रासावया ॥ ५६ ॥ की तृणाचा पुतळा । धरू धाविला वडवानळा । वृषभ बहुत माजला । खोचु३१ धाविला ऐरावतातें ॥ ५७ ॥ मशक३२ भावी मानसी । पर्वत घालीन दाढेसी । तैसा तूं असुरा मजसी । संघटो पहासी पामरा ॥ ५८ ॥ महिषासुर म्हणे ते वेळें । तूं स्त्री होऊन बोलसी आगळें । या देवांदेखता सगळे । तुज गिळितो पाहे पां ॥ ५९ ॥ ऐसे बोलोन महिषासुर । हाके गर्जवित अंबर । देवीने बाण अपार । तयावरीं सोडिले ॥ ६० ॥ शिंगें कोलून पर्वत । देवीवरी असंख्य टाकित । अंबेने फोडून समस्त । एवं पिष्टवत केलें ॥ ६१ ॥ जैशा प्रलय चपळा कडकडती । तैसे बाण सोडितसे शक्ति । असुराचे अंगीं खोचती । परी तो न गणी सर्वथा ॥ ६२ ॥ पुष्पवृष्टि करितां मदोन्मत्त । न मानीच सुख किंचित । की घन वर्षता पर्वत । दुःख न मानी कदाही ॥ ६३ ॥ असो महिषासुर तत्त्वतां । तळपतसे देवीभोवता । देवांचे भार देखता । वितळोन पळती चहूंकडे ॥ ६४ ॥ महाव्याघ्र देखतां समोर । पळती जैसे अजाचे भार । तैसे भयाभीत सुरवर । वळसा थोर होतसे ॥ ६५ ॥ प्रळयाग्नीची कराळ ज्वाळा । तैसी देवी धाविली ते वेळा । चक्र सोडिलें अवलीळा । खुर चारी तोडिले ॥ ६६ ॥ महिषासुर एक मुहूर्त । महा कपटिया झाला गुप्त । नाना रूपें धरित । सिंह व्याघ्र सादि ॥ ६७ ॥ क्षणभरी होय नर । सवेंचि होय पर्वताकार । मग जपोन कापट्य मंत्र । अपार रूपें धरिली तेणें ॥ ६८ ॥ कोट्यान्कोटी महिषे । धावती देवीवरी एकसरिसे । भूमंडळ डळमळितसे । कांपतसे गगनवरी ॥ ६९ ॥ पाताळ कूर्म वराह उरगनाथ । मोह पावले झाले भ्रमित । गिरीकंदरी देव समस्त । भयें करूनि लपताती ॥ ७० ॥ अपार देखोन महिषासुर । देवीने निजबाणी सत्वर । वेगें स्थापून ब्रह्मास्त्र । दैदीप्यमान सोडिले ॥ ७१ ॥ जैसा उगवता वासरमणीं । भगणासहित निरसे यामिनी । की ज्ञानोदयीं संहारोनि । जाये जैसे मोहपटल ॥ ७२ ॥ तैसे मायावी महिषासुर । देवीने दग्ध केले समग्र । जैसें नामस्मरणे अपार । दोषपर्वत भस्म होती ॥ ७३ ॥ मुख्य महिषासुर उरला । त्यावरी देवी धावे ते वेळां । जैसी महाप्रळयीची चपळा । कडकडून पडे पर्वतीं ॥ ७४ ॥ की अंडजपति उडोन सत्वर । अकस्मात धरी पादोदर । तैसा अंबेनें महिषासुर । झोटी दृढ धरियेला ॥ ७५ ॥ त्रिशूळ घालून सत्वर । विदारिलें त्याचे उदर । जैसा नृसिंहरूपे इंदिरावर । हिरण्यकश्यपा विदारी ॥ ७६ ॥ असिलता सत्वर काढूनि । दैत्याचे शिर छेदिले ते क्षणीं । कलेवर रगडूनि । पायातळी घातलें ॥ ७७ ॥ सकल देव विनविती ते समयीं । अंबे यास न सोडी सहसाही । याचे कलेवर टाकितां लवलाही । मागुती हा उठेल ॥ ७८ ॥ अहो ती अंबा ज्ञानकला । मोह महिषासुर रगडिला । अद्याप पायातळी धरिला । कीर्ति गाती पुराणें ॥ ७९ ॥ असो क्षय पावतां महिषासुर । पळो लागले दैत्यभार । एक होऊन दिगंबर । लटिकेच विरक्त जाहले ॥ ८ ॥ देवी आम्हांस न सोडी । म्हणऊनि दैत्य तातडी । स्त्रीवेष धरूनि नेसती लुगडी । बोडिती दाढी आणि मिशा ॥ ८१ ॥ आम्ही पुरुष न हो निश्चिती । देवीपुढे करुणा भाकिती । एक संन्यासी होऊन बैसती । एक धरिती मोहन४४ ॥ ८२ ॥ एक चौंडक घेऊनि तत्काळ । देवीपुढे घालिती गोंधळ । एक शस्त्रे टाकूनि सकळ । देवीयादर्शन पैं घेती ॥ ८३ ॥ एक रोगिष्ट होऊनि । लटिकेच कुंथत पडती मेदिनीं । एक वृद्ध दशा धरूनि । लटिकेच खोकत बैसले ॥ ८४ ॥ असो ते महिषासुर मर्दुनी । विजयी झाली आदिभवानी । सकळ देवी जोडून पाणि । स्तविली तेव्हां महामाया ॥ ८५ ॥ जय जय करुणामृतसरिते । निजभक्तपालके गुणभरिते । अनंतब्रह्माण्डफलांकिते । आदिमाये जगदंबे ॥ ८६ ॥ सच्चिदानंदे प्रणवरूपिणी । चराचर सकळ व्यापिनी । सर्गस्थित्यंतकारिणी । भयमोचिनी ब्रह्मानंदे ॥ ८७ ॥ श्रीधर तुझें तान्हें होय । घेई कडेवरी जननीये । स्वानंदपालखी निजवी स्वयें । हल्लर गाये प्रेमाचे ॥ ८८ ॥ ग्रंथा नाम अंबिका उदय । ज्यामाजी अंबेचा उदय निश्चये । पुढें अद्भुत कथा आहे । श्रोती होईजे सादर ॥ ८९ ॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये महिषासुरमर्दनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ |