॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ प्राकृत सप्तशती ॥
[ अर्थात - अम्बिका उदय ]

॥ अध्याय पहिला ॥

अध्याय पहिला ॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरवे नमः ॥
जय जय जगदंबे भवानि । मूलस्फूर्ति प्रणवरूपिणि ।
ब्रह्मानंदपददायिनि । चिद्विलासिनि अंबिके ॥ १ ॥
जय जय धराधर कुमारि । सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरि ।
हेरंबजननि अंतरीं । ग्रंथारंभी प्रवेशे तूं ॥ २ ॥
भक्तहृदयारविंदभ्रमरि । तुझिया कृपाबळे निर्धारीं ।
अतिमूर्ख तो निगमार्थ विवरी । काव्यरचना करी अद्भुत ॥ ३ ॥
तुझिया अपांगपातें करून । जन्मांधासही येती नयन ।
पांगुळ पवनाहून । करी गमन त्वरेने ॥ ४ ॥
जन्मादारभ्य जो का मुका । होय वाचस्पतिसम बोलका ।
स्वानंदसरोवरमराळिका । होसी भाविका प्रसन्न ॥ ५ ॥
ब्रह्मानंदे तूं आदिजननी । तव कृपेची नौका करूनी ।
दुस्तर भवसिंधु लंघुनी । निवृत्तितटाप्रती नेई ॥ ६ ॥
श्रीधर शिशु तान्हे । अंबे वोसंगा घेई कृपेनें ।
निजात्मबोधदुग्धपानें । तृप्त करी जननीये ॥ ७ ॥
अंबे तुझे अगाध गुण । न कळे कैसें करावें वर्णन ।
अर्कास अी सुमन । वाहता काय श्लाघ्यता ॥ ८ ॥
ऐसें स्तवन ऐकतां वेल्हाळा । हृदयीं प्रगटली ज्ञानकळा ।
सुरस कथारस आगळा । बोलवी मज ऐका ते ॥ ९ ॥
ग्रंथा नाम अम्बिकाउदय । सप्तशती ग्रंथान्वय ।
बोलिला तो ऋषिवर्य । मार्कण्डेय पुराणी हे ॥ १० ॥
कमलोद्भवाप्रति अद्भुत । मुनि मार्कण्डेय पुसत ।
देवीचे कैसे अवतार निश्चित । काय वृत्त तियेचें ॥ ११ ॥
ते अम्बा त्रिभुवनजननी । कैसे दैत्य मारिले रणीं ।
यावरी कमलासन ते क्षणीं । बोलता झाला ऐका ते ॥ १२ ॥
पूर्वी सूर्यवंशी राजा सुरथ । त्यास अवदशा झाली प्राप्त ।
शत्रु मिळोन समस्त । राज्य त्याचें हरतलें ॥ १३ ॥
ईश्वर झाल्या पाठीमोरा । नसती विघ्नं येती घरा ।
महारत्नें होतीं गारा । कोणी न पुसे तयाते ॥ १४ ॥
आपुलें द्रव्य लोकावरीं । तें बुडोन जाय न लभे करीं ।
ज्याचे द्यावें ते द्वारीं । बैसती आण घालूनियां ॥ १५ ॥
वैरियाकरी सांपडे वर्म । अवदशा येऊन बुडे धर्म ।
विशेष वाढे क्रोध काम । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ १६ ॥
आपुले जे कां शत्रु पूर्ण । त्यास आपण गांजिलें दारुण ।
अडल्या धरणे त्याचे चरण । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ १७ ॥
लाभाकारणें निघे उदिमास । तो हानीच होय दिवसेदिवस ।
पूज्यस्थानी अपमान विशेष । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ १८ ॥
सुहृद आप्त द्वेष करिती । नसते वेव्हार येऊन पडती ।
सदा तळमळ वाटे चित्तीं । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ १९ ॥
आपुली राज्यसंपत्ति स्त्रीधन । शत्रु भोगी पाहे आपण ।
शरीर पीडे व्याधीविण । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ २० ॥
विद्या बहुत जवळी असे । परी कोणीच तयासी न पुसे ।
बोलो जातां मति भ्रंसे । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ २१ ॥
ठेविला ठेवा न सांपडे । नसती व्याधी अंगी जडे ।
सदा भय वाटे चहंकडे । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ २२ ॥
वृद्धपणीं ये दरिद्र । स्त्री मृत्यु पावे गेले नेत्र ।
उपेक्षिती हेळसिती पत्र । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ २३ ॥
असो सुरथ राजा अरण्यांत । परमक्लेशी चिन्ताक्रान्त ।
दीनवदन हिंडे अनाथ । नाहीं अंत शोकातें ॥ २४ ॥
दश दिशा उदास दिसती । एकला वनीं हिंडे नृपति ।
तो समाधी नामे निश्चिती । वैश्य एक भेटला ॥ २५ ॥
तोही तैसाच भाग्यहीन । हिंडे वनीं दीन वदन ।
दोघेही एक होऊन । ऋषिआश्रमाप्रती गेले ॥ २६ ॥
तो समाधी आणि सुरथ । ऋषिप्रति साष्टांग नमित ।
सांगती आपला वृत्तान्त । गत कथार्थ झाला जो ॥ २७ ॥
ऐसे ऐकोनि ऋषी समस्त । परम क्लेशी राव सुरथ ।
त्यामाजी ऋषी सुमेधा सत्य । काय बोलत रायाप्रति ॥ २८ ॥
ऐक सुरथा सावधान । तूं करी अंबिकेचे आराधन ।
भजन पूजन अर्चन । व्रताचरण आचरे ॥ २९ ॥
सुरथ होय सप्रेम । म्हणे सांग तें शक्तिमहात्म्य ।
यावरी सुमेधा मुनिसत्तम । सुरथाप्रति बोलतसे ॥ ३० ॥
बा रे अष्टमी नवमी चतर्दशी । या पर्वी पूजावें अम्बेसी ।
अष्टभुजासहित ध्यानासी । आणावी ते महामाया ॥ ३१ ॥
गदा वज्र खड्ग त्रिशूल । चक्र बाण धनुष्य कमल ।
ऐसी अष्टभुजासहित वेल्हाळ । हृदयदेऊळी पूजावी ॥ ३२ ॥
हेचि उदेली द्वापारी । इन्दिरावराची सहोदरी ।
नन्दयशोदेचे उदरीं । आदिमाया अवतरली हे ॥ ३३ ॥
श्रावण वद्य अष्टमीसी । श्रीकृष्ण अवतार ते दिवसीं ।
दुसरे दिनी नवमीसी । भवानीसी अर्ची राया ॥ ३४ ॥
असो हे आतां आदिमाता । इची ऐक समूळ कथा ।
क्षीरसागरी कमलोद्भवजनिता । निद्रिस्त होता बहु दिन ॥ ३५ ॥
अष्टादश दिव्य युगेवरी । विष्णु निद्रिस्त क्षीरसागरी ।
कर्णी अंगोली घालून मुरारी । कर्णशोधन करितसे ॥ ३६ ॥
कर्णांतुनी निघाला मळ । त्याचे दैत्य दोघे सबळ ।
झाले मधुकैटभ विशाळ । मंदराचळ तैसे उभे ॥ ३७ ॥
तो नाभिकमळांत कोमळ । देखती चतुर्मुख दिव्य बाळ ।
त्यावरी धावले ते सबळ । महाकाळ जयापरी ॥ ३८ ॥
तो कमलनालामाजीं तत्त्वता । जाऊन लपाला विधाता ।
हरिमाया गुणभरिता । करिता झाला स्तवन तिचे ॥ ३९ ॥
जय जय महामाये भगवति । प्रणवरूपिणि आदिशक्ति ।
लौकरी जागवी वो श्रीपती । मज त्रासिती दैत्य दोघे ॥ ४० ॥
लक्षार्ध योजने प्रमाण । पहुडला शेषशायी भगवान ।
सच्चिदानन्द तनु सगुण । लीला' °विग्रही परमात्मा ॥ ४१ ॥
आदिमाया त्रिजगज्जननी । तिनें जागा केला चक्रपाणी ।
नेत्र उघडून कैवल्यदानी । विलोकित दैत्याकडे ॥ ४२ ॥
क्रोधायमान तमाळनिळ । भ्रमंडळ भ्रमवी तात्काळ ।
निघाला तेजकल्लोळ । हरिमाया अद्भुत ते ॥ ४३ ॥
तिचे देखता दिव्य रूप सुन्दर । मोहित झाले दोघे असुर ।
हिरोन घ्यावी सुकुमार । युद्धे करून यासी ॥ ४४ ॥
तो क्षीराब्धिशायी भगवन्त । दिव्य सहस्र वरुषेपर्यन्त ।
युद्ध झाले अद्भुत । दुर्धर दैत्य नाटोपती ॥ ४५ ॥
दैत्यास म्हणे नारायण । तुम्हास झालो मी प्रसन्न ।
मागा आजि वरदान । यांवरी दोघे जण बोलती ॥ ४६ ॥
आदिमायेनें केले भ्रमित । ते मधुकैटभ उन्मत्त ।
म्हणती तूच मागे यथार्थ । याचक होऊन आम्हापुढें ॥ ४७ ॥
मग बोले पाक्षिरमण । तरी द्यावे तुमचें प्राणदान ।
तो दैत्य दोघे जण । घूर्णितलोचन बोलती ॥ ४८ ॥
म्हणती चहूंकडे हे जीवन । उदकाविरहित जे स्थान ।
ते स्थळी घे आमुचे प्राण । तुज दान दिले आम्ही ॥ ४९ ॥
मग मांडीवरी दोघे धरिले । भगवंते विदारून मारिले ।
मांस मेद खाली टाकिले । त्याची झाली मेदिनी हे ॥ ५० ॥
अनंत ब्रह्माण्डनायक । त्याची लीला परम अतळ ।
तो कमलांतून कमलोद्भव देख । बाहेर येता झाला ॥ ५१ ॥
दैत्य वधिले जाणोन । सुखावला कमलासन ।
करित अद्भुत स्तवन । आदिपुरुषाचे ते वेळे ॥ ५२ ॥
पुराणपुरुषा नारायणा । भक्तवल्लभा जगन्मोहना ।
मायाचक्रचालका निरंजना । निष्कळ निर्गुणा निरुपाधिका ॥ ५३ ॥
नमो अनन्त ब्रह्माण्ड नायका । हे दयार्णव विश्वव्यापका ।
वैकुण्ठपुरपते भवमोचका । मम जनका श्रीवल्लभा ॥ ५४ ॥
हे हरे जगदंकुरकन्दा । साधुहृदयारविन्दमिलिन्दा ६ ।
निजजनचातकजलदा । ब्रह्मानन्दा परात्परा ॥ ५५ ॥
कमलोद्भवजनका कमलनयना । कमलनाभा कमलशयना ।
कमलनायका कमलवदना । कमलसदना कमलप्रिया ॥ ५६ ॥
जय हरि विश्वपालना । विश्वव्यापका विश्वरक्षणा ।
विश्वमतिचालका विश्वजीवना । विश्वकारणा विश्वेशा ॥ ५७ ॥
जय विबुधललाटपटलेखना । सनकसनन्दनमनरंजना ।
दानवकुलनिकृतना । भवभंजना भवहृदया ॥ ५८ ॥
तमवारण छेदक पंचानना । नमो पापारण्य कुठारतीक्ष्णा ।
त्रिविध ताप दाहशमना । अनन्तशयना अनन्ता ॥ ५९ ॥
ऐसें स्तविता कमलजात । कमलावर तोषला अत्यंत ।
सुहासवदनें बोलत । विधातयाप्रति ते वेळे ॥ ६० ॥
हरि म्हणे कमलासना । तूं करी आतां सृष्टिरचना ।
मग परमेष्ठी लागे चरणा । शिरी आज्ञा वंदित ॥ ६१ ॥
आदिमाया प्रगटली । ते ब्रह्मदेवें प्रीति पूजिली ।
मग सृष्टि अवघी घडली । तिच्या वरदे करूनिया ॥ ६२ ॥
असो लोकपिता जलजासन२२ । तोही करी अंबेचे अर्चन ।
सुमेधा ऋषी परम सज्ञान । सुरथ रायाप्रति सांगे ॥ ६३ ॥
अंबिका उदय नामे ग्रंथ । मार्कंडेय पुराणीचे संमत ।
ब्रह्मानंदे अद्भुत । श्रीधर वर्णित लीला त्याची ॥ ६४ ॥
इति श्रीमार्कंडेयपुराणे सुमेधासुरथसंवादे अंबिकाउदये
मधुकैटभमर्दनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥


GO TOP