॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥
॥ विवेकसिंधु ॥
उत्तरार्ध
॥ प्रकरण २ रे ॥
॥ लिंगदेह निरसन ॥
॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीगणेशयनम: ॥ श्रीमत्सच्चिदानंतगुरवे नमः ॥ |
श्रीगणेशायनमः - |
तंव शिष्यशिरोमणि बोलिले ॥ वंदूनि श्रीगुरुचीं पाऊलें ॥ जें स्थूलदेह बंधन तोडिले ॥ निकियापरी ॥ १ ॥ |
श्रीगणेशाय नमः- नंतर श्रीगुरूंचे पाय नमून शिष्यशिरोमणि म्हणाले की, ह्या जडदेहाचें बंधन उत्तम प्रकारे तोडल्यासारखे झाले. १ |
स्थूलदेह बंदिशाळेपासूनि सुटलों ॥ देहादिप्रपंचसाक्षित्व पावलो ॥ आतां कृतार्थ झालो ॥ श्रीचरणप्रसादे ॥ २ ॥ |
ह्या जडदेहाच्या बंदिशाळेंतून सुटलो. देहादि प्रपंचाच्या साक्षित्वास पोचलो. महाराज ! श्रीच्या चरणाच्या प्रसादेंकरून आतां कृतार्थ झालो. २ |
तंव बोले गुरुनाथ ॥ जंव नव्हसी नलिंगदेहातीत ॥ तंव न चुके संसृतिपंथ ॥ कदाचि पै गा ॥ ३ ॥ |
तेव्हां श्रीरगुरुनाथ म्हणाले की, जोपर्यंत तूं लिंग देहातीत - कर्मवासनेहून वेगळा - झाला नाहीस तोपर्यंत संसारमार्गांतून कधीच सुटका नाही. ३ |
जेव लिंगदेह आवरण असे ॥ तंव स्वस्वरूप न प्रकाशे ॥ नाथिलें अहंतेचें पिसें ॥ चैतन्यासी ॥ ४ ॥ |
जोपर्यंत लिगदेहाचे आवरण आहे, तोपर्यंत स्वस्वरूपाचा बोध व्हावयाचा नाही. शुद्ध चैतन्याला अहंतेचे नसतेंच वेड लागलें आहे. ४ |
घटावच्छिन्न घटाकाश ॥ घटासरिसें हिंडे दाही दिशा ॥ तेवीं आत्मा यातायाती गर्भवास ॥ पावे लिंग देहासवें ॥ ५ ॥ |
घरांत व्यापून राहिलेले घटाकाश घटाबरोबर दाहिदिशांस फिरते, त्याचप्रमाणे लिंगदेहाबरोबर आत्माही गर्भवासांच्या यातायातींत पडत असतो. ५ |
जेविं सविता जळीं बिंबत ॥ तरंगे चांचल्य दशे पावत ॥ तेवीं आत्मा असे सुखदुःख भोगित ॥ लिंगदेहवशें ॥ ६ ॥ |
ज्याप्रमाणें पाण्यांतील सूर्यबिंब लाटांबरोबर चांचल्याच्या अवस्थेला पोंचते ( हालूं लागते), त्याचप्रमाणे आत्माही लिंगदेहाच्या संगतीने सुखदुःखे भोगीत असतो. ६ |
अग्नि लोहाचे संसर्ग जैसा ॥ घणाचे घाईं पिटे तैसा ॥ आत्मा जन्ममरण पावे आपैसा ॥ आवर्त लिंग देही ॥ ७ ॥ |
अग्नि हा जसा लोखंडाच्या संसर्गाने घणाच्या घावांखाली पिटला जातो, तसाच लिंगदेहाने वेष्टिलेला आत्माही आपोआप जन्ममरणादि पावत असतो. ७ |
शुभाशुभ कर्मीं वेष्टित ॥ चौऱ्यायशीं लक्ष योनी भ्रमत ॥ जंव न होसी लिंगदेहातीत ॥ तंव मोक्ष कैंचा ॥ ८ ॥ |
शुभ व अशुभ कर्मांनी वेष्टिलेला चौर्यांशी लक्ष योनींचे फेरे फिरत असलेला जो तूं, त्या तुला लिंगदेहाहून वेगळा झाला नाहीस तोपर्यंत मोक्ष कोठून प्राप्त होणार ! ८ |
तरी ते लिंग देह म्हणसी कैसें ॥ तुज पूर्वीं निरोपिले जैसें ॥ तयाचे निरासें प्रकाशे ॥ स्वस्वरूप ॥ ९ ॥ |
आतां तो लिंगदेह कसा आहे म्हणशील तर तुला पूर्वी सांगितला आहे तसाच तो आहे. त्याचा निरास झाला की, स्वस्वरूप प्रकाशमान झालेंच ! ९ |
जो सूक्ष्म भूतांचा ॥ पंचविसां कळांचा ॥ वासनामय जीवाचा ॥ लिंगदेह ॥ १० ॥ |
जो सूक्ष भूतांचा, पंचवीस कळांचा बनलेला, वासनामय, तोच जीवाचा लिंगदेह होय. १० |
निर्विकल्प प्रथम स्फुरण ॥ जें मागा निरूपिलें अंतःकरण ॥ तेंचि जरी तूं तत्साक्षी कवण ॥ तुजवाचूंनियां ॥ ११ ॥ |
पहिलें निर्विकल्प स्फुरण तेंच अंतःकरण म्हणून जें मागे सांगितले तेंच जर तूं असशील तर तुझ्यावांचून त्याचा साक्षी कोण बरें असावा ! ११ |
संकल्पविकल्पांसी आपणयातें ॥ करणें नाहीं निरुतें ॥ तद्रूप मनातें जाणतें ॥ तेंचि तूं कैसेनी ॥ १२ ॥ |
संकल्प विकल्प कांहीं आपणच आपल्याला करीत नाहीत, तर त्यांचें रूप मनाला समजते. तेव्हां तेंच तूं कसें होशील; १२ |
निश्चय न करी निश्चयानें ॥ आत्मा प्रकाशी तयातें ॥ तद्रूप दृश्य जाणे बुद्धीतें ॥ ते बुद्धि तूं कैसेनी ॥ १३ ॥ |
निश्चय कांहीं निश्चयाला करीत नाहीं. तर आत्मा हा त्याला प्रकाश देणारा आहे. आणि त्याचें रूप जें दृश्य तें बुद्धीला कळते. ती बुद्धि तूं कसा बरें होशील ! १३ |
बुद्धीच आत्मा मानित ॥ उठिलें तें बौद्धमत ॥ ते बुद्धि साक्षित्वें निर्जित ॥ केली तुवांची ॥ १४ ॥ |
बुद्धीलाच आत्मा मानणारे तें बौद्धमत अस्तित्वांत आले आहे. तें बुद्धिसाक्षित्वानें तूंच चीत केलेस. १ ४ |
पूर्चानुभूताचें अनुसंधान ॥ तें चित्ताचें चेतव्य लक्षण ॥ चित्तातें चेतवितो कवण ॥ तुजवांचूनिया ॥ १५ ॥ |
पूर्वी जें कायअनुभवलें असेल त्याचें अनुसंधान तेंच चित्ताचे चेतव्य लक्षण होय. त्या चित्ताला चेतविणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे बरें ? १५ |
देहाकारें आपणातें ऐसें मानिन ॥अभिमानलक्षणे अहंकार उठवित ॥ तयांन असूनि तयातें जाणत ॥ तेचि तूं केवीं होसी ॥ १६ ॥ |
देहरूपानें आपणच तो मानणें हीअभिमानाचीं लक्षणे अहंकार उत्पन्न करतो. त्यांत असून त्याला जाणणारा जो तूं तो तोच कसा होशील ? १६. |
अहं सुखी अहं दुःखी येणें आकारे ॥ अहंता लक्षण वृत्ति स्फुरे ॥ तैसे विकार तुझेनि आधारें ॥ उठती जडती देहग्रंथी ॥ १७ ॥ |
'मी सुखी' 'मी दुःखी' ह्या रूपाने अहंतेच्या लक्षणांची वृत्ति स्फुरण पावते आणि तसेच तुझ्या आश्रयाने विकार उद्भवतात व ह्या देहरूप बंधाला खिळून राहतात. १७ |
उत्पत्तिकाळीं उत्पत्तीतें ॥ आभासकारळीं आभासातें ॥ विनाशकाळीं विनाशातें ॥ जाणता तो तूं वेगळाचि ॥ १८ ॥ |
उत्पत्तिकालांत उत्पत्ति, आभासकाळी (स्थितिकाळी) आभास (स्थिति) आणि नाशकालीं नाश जाणणारा तो तूं वेगळाच आहेस. १८ |
जैसा पुष्पींचा परिमळ ॥ पुष्पीं असूनि पुष्पा वेगळ ॥ अहंकृतिसाक्षी आत्मा निर्मळ ॥ तैसा जाणावा ॥ १९ ॥ |
ज्याप्रमाणें फुलांतील सुवास फुलांत असून फुलाहून वेगळा आहे, असे दिसून येतें. त्याचप्रमाणे अहंकाराचा निर्मळ आत्मा हा साक्षी आहे, असें समजावे. १९ |
अहंकारातें आत्मत्वे मानिनु ॥ उठिला जो नैय्यायिक सिद्धांतु ॥ तयातें साक्षित्वेंचि तूं ॥ जाणतोसि ॥ २० ॥ |
अहंकार हाच आत्मा मानणारा नैय्यायिकांचा सिद्धांत उद्भवला आहे. त्याला तर तूं साक्षित्वानेच जाणतोस. २० |
कवण ऐसें म्हणेल ॥ अहंकारे आत्मा प्रकाशेल ॥ तरी दृश्याने द्रष्ट्यातें जाणिजेल ॥ हे केविं घडे ॥ २१ ॥ |
(आतां) कोणी असे म्हणतील की, अहंकारानें आत्मा प्रकाशतो ! (आत्म्याचा बोध होतो.) तर दृश्याने द्रष्ट्याला जाणलें, असें कसें होईल ? २१ |
एवं अंतःकरणपंचकाचे द्रष्टे ॥ तत्साक्षित्वेंचि भेटे ॥ तें आत्मस्वरूप नेटें बोटें ॥ तेंचि तें तूं ॥ २२ ॥ |
एवंच अतःकरणपंचकाचें द्रष्टें जें आत्मस्वरूप ते त्याच्या साक्षित्वानेच भेट देतें तेंच तूं निश्चकरून आहेस. २२ |
प्राण असतां देहासि जिणें ॥ कां तेणेंचि वीण मरणें ॥ म्हणूनि प्राणचि आत्मा बोलणें ॥ मूढजनासी ॥ २३ ॥ |
प्राण असे तोपर्यंतच देह जिवंत आहे, तो गेला कीं तेंच त्याचें मरण होय. म्हणून प्राण हाच आत्मा असें मूर्ख लोकांस वाटत असते. २३ |
आत्मा माणाचा द्रष्टा ॥ तो प्राण आत्मा मानिती निकटा ॥ तयाचा थोर वाटे वोखटा ॥ योगियांसी ॥ २४ ॥ |
आत्मा हा ( खरोखर) प्राणाचा द्रष्टा आहे. पण (इतर लक) प्राण व आत्मा अगदी एक आहे, असे मानतात. तथापि योग्यांना मात्र त्याची (प्राणाची) तितकीशी मानब्बरी वाटत नाही. २४ |
जरी प्राणचि आत्मा म्हणणें ॥ तरी सुषुप्त्यवस्थेंत यासी कां नाहीं जाणणे ॥ चोरीं चोरितां वस्त्रें भूषणें ॥ कां नेणेचि तो ॥ २५ ॥ |
प्राणालाच जर आत्मा म्हणावयाचें तर झोपेमध्यें त्याला ज्ञान कां असूं नये ? त्यावेळी चोरांनी दागदागिने व कपडेलत्ते चोरून नेले तर ते त्याला मुळीच कळत नाही, असे कां ? २५ |
जागृती आणि स्वप्नदशें ॥ प्राण जाणता ऐसे दिसे ॥ परी आपणया आपण न प्रकाशे ॥ अवस्थात्रयीं ॥ २६ ॥ |
जागेपणी आणि स्वप्नांत प्राण हा जाणता आहे असे वाटतें. परंतु तिन्ही अवस्थांमध्यें प्राण हा आपण होऊनच कांही आपणाला प्रकाशित करू शकत नाही. २६ |
मी असें पिंगले कां इडे ॥ ऐसें आपणयातें नेणे फुडे ॥ म्हणूनि प्राणचि आत्मा न घडे ॥ निभ्रांत पैं ॥ २७ ॥ |
मी पिंगला नाडीच्या ठिकाणी आहे कां इडेच्या ठिकाणी आहें, हें त्याला स्वतःला कांहीं खरोखर कळत नाही. म्हणून प्राण हाच आत्मा निःसंशय नव्हे. २७ |
अपानासी अधोगती ॥ उदानासी कंठीं स्थिती ॥ समानासी नाभ्कमळीं वस्ती ॥ तेथूनि पसरे सर्व संधी ॥ २८ ॥ |
अपान हा अधोभागी असतो; उदान हा कंठामध्यें असतो; आणि समानाचे वास्तव्य नाभिकमळी असून तेथून तो सर्व संधीत पसरतो. २८ |
व्यान सर्वांगी व्यापक ॥ आत्मा पंचप्राणांसी प्रकाशक ॥ म्हणूनि अवस्थात्रयीं तूचि एक ॥ प्राणसाक्षी ॥ २९ ॥ |
व्यान हा सर्वांग व्यापून असतो. आणि आत्मा हा पंचप्राणांनाही प्रकाश देणारा आहे. म्हणून तिन्ही अवस्थांमध्ये तूंच एक प्राणाचा साक्षी आहेस. २९ |
एवं प्राणपंचकातें जाणता ॥ तूं प्राणपंचक नव्हेसी सर्वथा ॥ म्हणूनि असो हें आतां ॥ इंद्रियेंही नव्हेसी ॥ ३० ॥ |
एवंच तूं प्राणपंचकास जाणणारा आहेस. तें प्राणपंचक मात्र तूं बिलकूल नव्हेस. आतां हे असो. म्हणून तूं इंद्रियेंही नव्हेस. ३० |
शब्दोन्मुख अंतःकरणवृत्ती ॥ तें श्रोत्रेंद्रिय तुजचि आहे प्रतीती ॥ श्रोत्र द्रष्टा हे स्थिती ॥ केवीं घडे ॥ ३१ ॥ |
शब्दाकडे वळलेली जी अंतःकरणाची वृत्ति ते श्रोत्रेंद्रिय होय. त्याचा तुझा तुलाच अनुभव आहे. तेव्हां श्रोत्र हाच द्रष्टा ही गोष्ट कशी होईल ? ३१ |
स्पर्शाचे ग्रहणीं उन्मुख ॥ तेंचि मन त्वगिंद्रिय वोळख ॥ तें दृश्य तूं दृष्टा देख ॥ एक कैसेनि होसी ॥ ३२ ॥ |
स्पर्शग्रहणाकडे वळलेली जी मनोवृत्ति तेच त्वगिंद्रिय हे ध्यानांत आण. ते दृश्य आणि तूं द्रष्टा होस. मग दोन्ही एक कशी होतील ? ३२ |
रूपातें निवडिती ॥ जे चक्षु बुद्धीची वृत्ती ॥ तयातें जाणे ते ज्ञप्ती ॥ ते तूं चक्षु इंद्रिय कैसेनी ॥३३ |
रूपाची शहानिशा करणारे जें चक्षू ती बुद्धीशी वृत्ति होय. त्यांना जाणणारी ज्ञानकळा होय. तेव्हां ते चक्षु इंद्रिय तूं कसे होशील ३३ |
जिव्हेंद्रियाची वृत्ती ॥ जे षड्रसातें चाखिती ॥ तयेसी साक्षीभूत संविती ॥ तें रसनेंद्रिय नव्हसी तूं ॥ ३४ ॥ |
षड्रसांना चाखणारी जी जिव्हेंद्रियाची वृत्ति तिला ज्ञान हे साक्षीभूत असते. तेव्हां तें रसनेंद्रियही तूं नव्हेस. ३४ |
अहंकाराची वृत्ति विशेष ॥ जो गंधग्रहणोन्मुख ॥ तया घ्राणेंद्रियाचा अवभासक ॥ तूं घ्राणेंद्रिय कैसेनी ॥ ३५ ॥ |
वास घेण्याकडे वळलेली जी अहंकाराची विशेष प्रकारची वृत्ति ते घाणेंद्रिय होय. त्याचा अवभासक-प्रकाशक तो तूं होस. तेव्हां घाणेद्रिंय तें तूं कसा होशील ? ३५ |
शब्द स्पर्श रूप रस गंध ॥ यांसी जाणता तूं चैतन्य शुद्ध ॥ हें विषयपंचक जड तूं शुद्धबुद्ध ॥ विषयातीत ॥ ३६ ॥ |
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्यास जाणणारे शुद्ध चैतन्य तू होस. विषयपंचक हें जड आहे, आणि तूं शुद्ध बुद्ध (पूर्णज्ञानी) व विषयांहून निराळा आहेस. ३६ |
शब्दांतें बोलूं पाहत ॥ जो अंतःकरणाचा वृत्तांत ॥ या क्रियात्मक वाचे आणित ॥ तूं द्रष्टेपणेंची ॥ ३७ ॥ |
अंतःकरणातील जी गोष्ट शब्द उच्चारूं पाहते, त्या क्रियात्मक वाचेला तूंच द्रष्टेपणाने उदयास आणतोस. ३७ |
ते वदनीं स्तुती करी ॥ मग बोले मातृकाक्षरीं ॥ हे तुज दृश्य वैखरी । द्रष्टेपणेंची ॥ ३८ ॥ |
ती तें।डानें स्तुति करते. मग मात्रा व अक्षरे यांहीकरून बोलूं लागते. ती वैखरी तुला द्रष्टेपणानेच दृश्य झालेली असते. ३८ |
वैखरी निरास प्रसंगे ॥ मध्यमाही निरसावी लागे ॥ ते उद्भवे बुद्धिचेनि संगे ॥ नादरूप ॥ ३९ ॥ |
वैखरीचा निवास करतेवेळी मध्यमेचाही निरास करावा लागतो. ती बुद्धीच्या योगाने नादरूपानें प्रगट होते ३९. |
मनाचेनि आकरें ॥ ध्वनिरुप पश्यंती स्फुरे ॥ पाहातां तत्वनिर्धारें ॥ तिये वेगळाचि तूं ॥ ४० ॥ |
मनाच्या रूपानें ध्वनिरूप पश्यंती (वाणीचा दुसरा प्रकार) स्फुरण पावते. तत्वनिश्चयेंकरून पाहूं गेले तर तूं तिच्याहूनही वेगळाच आहेस ४० |
जीवात्मयाचें प्रथम स्फुरण ॥ तें परेवाचेचें लक्षण ॥ निरूपिले जें अंतःकरण ॥ तेचि ते जाणावी ॥ ४१ ॥ |
जीवात्म्याचे पहिलें स्फुरण तें परावाचेचें लक्षण होय. मागें अंतःकरण म्हणून जें सांगितले तेंच ते समजावें. ४१ |
ऐसा चतुर्विध वाचतें देखता ॥ तूं वाचा नव्हेसी सर्वथा ॥ तीतेंही प्रकाशिता ॥ तूंचि एक ॥ ४२ ॥ |
असा ह्या चारी वाणींचा विचार केला क्षणजे तूं वाचा तर बिलकुल नव्हेस. पण तूंच केवळ तिचाही प्रकाशकच आहेस. ४२ |
मनाचा वृत्त्यंकुर ॥ करूं पाहे स्पर्शविषय व्यापार ॥ तया पाणींद्रियाचा दातार ॥ ते तूं केवी होसी ॥ ४३ ॥ |
मनोवृत्तीचा जो अंकुर स्पर्शविषय व्यापार करावयास पाहतो त्या हस्तादि अवयवांचा दाता तूंच आहेस. तेव्हां तेच तूं कसे होशील ? ४३ |
द्धिवृत्तीचाचा फांटा ॥ धावो पाहे रूपाचा वांटा ॥ तया पदेद्रियांचा द्रष्टा ॥ नया वेगळाचे तूं ॥ ४४ ॥ |
बुद्धीच्या वृत्तीची एक शाखा ररूपाच्या वाटेकडे धावावयास पाहते, त्या पद इंद्रियाचा द्रष्टा तूं असून त्याहून वेगळाच आहेस. ४४ |
चित्ताचा वृत्त्यंकुर ॥ करूं पाहे रतिविषय व्यापार ॥ नया शिश्नेंद्रियाचा द्रष्टा निर्विकार ॥ तो तूं वेगळाची ॥४५॥ |
चित्तवृत्तीचा जो अंकुर रनिविषयव्यापार करूं पाहतो, त्या शिश्नेंद्रियाचा तूं द्रष्टा असून निर्विकार व वेगळाच आहेस. ४५ गे |
अहंकाराचा वृत्तिविभाग ॥ करूं पाहे मळोत्सर्ग ॥ तया पायुरिंद्रियाचा साक्षी निःसंग ॥ तद्विलक्षण तूं ॥ ४६ ॥ |
अहंकाराची एक वृत्ति मलोत्सर्ग करूं पाहते, त्या पायुइंद्रियाचा तूं निःसंग साक्षी असून त्याहून अगदी भिन्न आहेस. ४६ |
ऐसे अवयव पंचवीस ॥ लिंगदेहाचे साभास ॥ ने दृश्य तूं द्रष्टा निराभास ॥ वस्तु लिंगदेहातीत ॥ ४७॥ |
अशाप्रकारें लिंगदेहाचे पंचवीस अवयव असून ते साभास आहेत. तै दृश्य होत. तूं द्रष्टा असून निराभास आहेस. तूं लिंगदेहाहून पलीकडची वस्तु आहेस. ४७ |
स्वप्नावस्थेंचें लक्षण ॥ ऐक तुज सांगेन ॥ जेणें बुझसी वेगळेपण ॥ स्वस्वरूपाचें ॥ ४८ ॥ |
आता तुला स्वप्नदशेचें लक्षण सांगतां तें ऐक. तेणेंकरून स्वस्वरूपाचें वेगळेपण तुझ्या ध्यानांत येईल. ४८ |
जागृती दशें मनें भोगिले ॥ ने विषय जड सरले ॥ परी अध्यासरूप ठसावले ॥ ते स्वप्न बोलिजे ॥ ४९ ॥ |
जागेपणी जे मनाने भोगले ते जड विषय नाहींसे होतात खरे, परंतु भासरूपानें जो मनावर ठसा बसला तेंच स्वप्न होय. ४९ |
द्रष्ट्या दृश्याचा अध्यासू ॥ साचाचि सारिखा आभासु ॥ फुल सरे परी उरे वासु ॥ दाहाळिये जेवी ॥ ५० ॥ |
द्रष्ट्याला दृश्याचा भास म्हणजे खर्याप्रमाणेच भ्रम होतो. फूल जातें पण फांदीला जसा त्याचा वास उरतो. ५० |
कां कापूर करंडाचा वेचें ॥ परंतु तेथील वास न वेचें ॥ ऐसें स्वप्नावस्थेचें ॥ जाणिजे सुख ॥ ५१ ॥ |
किंवा करंड्यांतला कापूर जातो पण त्याचा वास जसा जात नाही, अशाच पैकी स्वप्नदशेतील सुख आहे, असे समज. ५१ |
निद्राकाळीं बुद्धीचा माथां ॥ बैसे जागृतीचा उलथा ॥ ते वासनामय स्वप्नावस्था ॥ तुज दृश्य पैं ॥ ५२ ॥ |
झोपेंत असतांना बुद्धीच्या डोकीवर जागृतीचा लहानसा टोला बसतो, तीच वासनामय स्वप्नदशा होय. ती तुला दृश्य आहेच. ५२ |
जरी लिंग देह नव्हसी ॥ तरी स्वप्नावस्था केवीं होसी ॥ तियेतेंही प्रकाशितोसी ॥ निजमकाशें ॥ ५३ ॥ |
तूं लिंगदेहच जर मुळीं नव्हेस, तर तूं स्वप्नदशा कोठून असणार ? तूं निजप्रकाशानें तिचाही प्रकाशक आहेस. ५३ |
लिंगदेह स्वप्नावस्था ॥ यादोहींचा अभिमानी तैजस भोक्ता ॥ तया सात्विक अहंकाराते जाणता ॥ तया वेगळाच तूं ॥ ५४ ॥ |
लिंगदेह आणि स्वप्नावस्था ह्या दोहोंचा अभिमानी व भोक्ता तैजस होय. त्या सात्विक अहंकाराला तूं जाणणारा व त्याहून अगदी वेगळाच आहेस. ५४ |
कंठस्थान भोग प्रविविक्त ॥ या दोहोंसी तूं व्यतिरिक्त ॥ या सत्वकार्या पंचविधातीत ॥ तत्साक्षित्वेंची ॥ ५५ ॥ |
कंठस्थान व प्रविविक्त म्हणजे सूक्ष्म भोग ह्या दोहोंहूनही तूं व्यतिरिक्त म्हणजे वेगळा आहेस. हे जे सत्त्वाचे पंचविध कार्य त्याहून तूं त्याच्या साक्षित्वानेच वेगळा आहेस. ५५ |
जैसा कां प्रसिद्ध दाहक ॥ लोहीं असूनि लोइप्रकाशक ॥ तैसा तूं लिंगदेहा आभासक ॥ निजप्रकाशें ॥ ५६ ॥ |
जसा प्रसिद्ध अग्नि हा लोखंडांत असून लोखंडाचा प्रकाशक आहे, तसाच तूंही निजप्रकाशानें लिंगदेहाचा प्रकाशक आहेस. ५६ |
चुंबकसन्निधानमात्रें ॥ लोह भ्रमतसे विचित्रें ॥ तैसा तूं आकर्तेन स्वतंत्रे ॥ चेष्टे जड लिंगदेह ॥ ५७॥ |
लोहचुंबकाच्या सान्निध्याने - लोहचुंबक जवळ येतांच लोह असें विलक्षण रातीने हवे तिकडे फिरू लागतें, तसाच अकर्ता व स्वतंत्र असा जो तूं, त्या तुझ्यामुळे जड व लिंगदेहही हवा तसा फिरत असतो. ५७ |
श्रवणीं शब्द ऐकणें ॥ त्वचेसी स्पर्श घेणें ॥ नेत्रीं रूपातें देखणे ॥ तुझेनि परी तुज नाहीं ॥ ५८ ॥ |
कानांनी शब्द ऐकणे, त्वचेने स्पर्श समजणे, डोळ्यांनी रूप पाहणे हे तुझ्यामुळे होते खरे पण ते तुला मात्र लागू नाही. ५८ |
जिव्हें रसातें चाखणे ॥ घाणें परिमळ घेणें ॥ तुझेनि परी तुज नाहीं करणें ॥ इंद्रियव्यापार ॥ ५९ ॥ |
जिभेने रुचि घेणे, नाकानें वास घेणे, हे सगळे तुझ्यामुळे होते खरे, परंतु तुला मात्र इंद्रियाचे व्यापार नाहींत. ५९ |
वाचेसी बोलणे ॥ हातांसी देणे वणे ॥ पायांसी चालणें ॥ होय तुझेनी ॥ ६०॥ |
वीनें बोलणें, हाताने देणें व घेणें, पायांनी चालणें, सारें तुझ्यामुळेच ! ६० |
शिश्नासी रति सुख भोगणे॥ पायूसी मलोत्सर्ग करणें ॥ तूं अकर्ता व्यापारे येणें ॥ केवीं लिंपसी ॥ ६१ ॥ |
शिश्नाने रतिसुख भोगणें, पायूने मलोत्सर्ग करणे, तूं अकर्ता आहेस, तेव्हां अशा व्यापारांनी तुला आत्म्याला मळ कसा लागणार ६१ |
मनासी मंतव्य ॥ बुद्धीसी बोद्धव्य ॥ अहंतेसी अहंतव्य ॥ अकर्तेन तुवांची ॥ ६२ ॥ |
मनाला मनपणा, बुद्धीला बुद्धित्व, अहंतेला अहंकृति, ही तूं जो अकर्ता त्या तुझ्यामुळेच आहेत. ६२ |
चेतव्य चित्ताचें ॥ निर्विकल्प स्फुरण अंतःकरणाचें ॥ हे सन्निधान फल आत्मयाचें ॥ परी तो अतीत ॥ ६३ ॥ |
चित्ताचा चित्तपणा, अंतःकरणाचे निर्विकल्प स्फुरण हे आत्म्याच्या सान्निध्याचे फळ आहे. पण तो मात्र वेगळा आहे. ६३ |
जंव तुज नाहीं स्वरूपाचा निर्धार ॥ तंव आपण पा कल्पिसी इंद्रियव्यापार ॥ शुभाशुभ कर्मीं वेष्टिला संसार ॥ तुज नाथिलाची ॥ ६४ ॥ |
जोपर्यंत स्वरूपाचा निश्चय तुला झाला नाहीं, तोपर्यंत तूं आपण होऊनच इंद्रियांचा व्यापार कल्पित आहेस, आणि शुभ व अशुभ कर्मांनी व्यापिलेला हा नसताच संसार तुझ्या मागें लागला आहे. ६४ |
आतां तुवां द्रष्टेन आपणपें जाणितलें ॥ तंव देहद्वय निरसलें ॥ वेद्यत्व विद्यामय देखिलें ॥ म्हणवोनीची ॥ ६५ ॥ |
आतां तूं द्रष्टेपणाने आपणाला जाणलेस, तेव्हां उभय देहांचा निरास झाला आणि म्हणूनच ज्ञेय म्हणून जें आहे त अविद्यामय (आभासमात्र) आहे असे अनुभवास आलें. ६५ |
अविद्येसी असतां अनादित्व ॥ पूर्वींच इयेसी मिथ्यात्व ॥ तत्कार्य देहद्वया अनित्यत्व ॥ ते सांगावेंचि नलगे ॥ ६६ ॥ |
अविद्या ही अनादि आहे, आणि ती मुळचीच मिथ्या आहे. तेव्हां तिचे कार्य जे हे उभय देह त्यांना अनित्यपणा असणार हे सांगावयाला नकोच ! ६६ |
स्वप्नेंद्रियाचेनि द्वारें ॥ जीवीं पुण्यपाप विस्तारे ॥ तयासी प्रबोधेंचि प्रायश्चित्त वारे ॥ येरे काज नाहीं ॥ ६७ ॥ |
स्वप्नेंद्रियांच्या द्वारानें जीवाच्या ठायीं जें पापपुण्य फैलावते त्याला हे पहा ! जागृति हेंच प्रायश्चित्त. दुसऱ्याचे कारण नाहीं. ६७ |
तैसें देहद्वयाचें निमित्तें ॥ करमें घडती सदसतें ॥ ती जळवी समस्तें ॥ तत्साक्षित्वेंची ॥ ६८ ॥ |
त्याचप्रमाणे उभय देहांच्या निमित्तानें बरी वाईट कर्में घडत असतात, ती सर्व त्यांच्या साक्षित्वानेच भस्म होऊन जातात. ६८ |
आतां असो हा युक्तिप्रसंग ॥ जाहुलिया लिंगदेहाचा भंग ॥ चुके स्वर्गेनरकाचा मार्ग ॥ स्वभावेंची ॥ ६९ ॥ |
आता हा युक्तिवाद पुरे. लिंगदेहाचा नाश झाला म्हणजे आपोआपच स्वर्गाची व नरकाची वाट खुंटते ६९ |
देहद्वयाचा द्रष्टा ॥ नवचे शुभाशुभ कर्माचिया वाटा ॥ मपीन विलक्षण साक्षी सुभटा ॥ तूतें म्हणिपे ॥ ७० ॥ |
उभय देहांचा द्रष्टा, शुभ व अशुभ कर्मांच्या वाटेलाही न जाणारा असून हे उत्तम पुरुषा ! तुला विलक्षण ( भिन्नलक्षण वेगळा) व साक्षी म्हटले पाहिजे. ७० |
यापरी लिंगदेह निरासु ॥ झालिया चुके गर्भवासु ॥ आत्मा भेटे स्वयंप्रकाशु ॥ म्हणे मुकुंदराजु ॥ ७१ ॥ |
मुकुंदराज म्हणतात - ह्याप्रमाणे लिंगदेहाचा नाश झाला म्हणजे गर्भवास टळतो आणि स्वयंप्रकाश आत्म्याची भेट होते. ७१ |
इति श्रीमद्विवेकसिंधौ उत्तरार्धे संहारक्रमे गुरुशिष्यसंवादे लिंगदेहनिरसनं नाम द्वितीयप्रकरणं समाप्तम् ॥ |
GO TOP
|