॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

उत्तरार्ध

॥ प्रकरण १ ले ॥

॥ स्थूलदेह निरसन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥



श्रीगणेशयनम: ॥ श्रीमत्सच्चिदानंतगुरवे नमः ॥ श्रीगणेशायनमः -
सांगितले ग्रंथाचे पूर्वार्ध ॥ जो अर्थ पाहता महाअगाध ॥
जेथें निरुपिले विशुद्ध ॥ ब्रह्मचि विश्वाकारे ॥ १ ॥
आतापर्यंत ग्रंथाचे पूर्वार्ध सांगितले. तेथचा अर्थ पाहू गेलें तर फारच खोल. कारण तेथे विश्वाच्या रूपानें परमपवित्र अशा ब्रह्माचेच निरुपण केले आहे. १
बोलिले प्रपंचरचन ॥ ते उकललीयाचिण ॥
न पविजे परम निर्वाण ॥ केवळ ब्रह्म जें ॥ २ ॥
तेथे जी प्रपंचरचना सांगितली, ती उकलल्यावाचून केवळ ब्रह्म असे जे परम निर्वाण ते प्राप्त व्हावयाचें नाही. २
आतां म्हणो उत्तरार्ध ॥ विवेकसिंधूचे प्रसिद्ध ॥
सांगिजेल तरी सावध ॥ करी अंतःकरण ॥ ३॥
आतां विवेकसिंधूचा प्रतिद्ध उत्तरार्ध सांगावयाचा तो सांगण्यांत येईल. तर चित्त सावधान करावे. ३
वेदांतशास्त्र त्रिपदाव्याख्यान ॥ महावाक्यविवरण ॥
श्रीमुकुंदमुनीकरण ॥ विवेकसिधु ॥ ४ ॥
श्रीमुकुंदमुनीकृत वेदांतशात्रांतील-तत्, तम्, असि ह्या तीन्न पदांवरील व्याख्यान, व महावाक्याचें विवरण ज्यांत आहे तो हा विवेकसिंधु होय. ४
जो श्रद्धापूर्वक ऐकता ॥ निःशेष फिटे भवव्यथा ॥
आणि मुक्ती सायुज्यता ॥ पाविजे रोकडी ॥ ५ ॥
हा श्रद्धापूर्वक ऐकला असतां संसारव्याधीचें अगदी निर्मूलन होतें, आणि मूर्तिमंत सायुज्यमुक्ति हातास येते. ५
जेथे महावाक्याचा विचार ॥ बोलिजेल स्वरूपाचा निर्धार ॥
प्रपंचाचा उपसंहार ॥ जेथे अत्यंतिकृ ॥ ६ ॥
येथें महावाक्यांचा विचार आणि स्वरूपाचा निश्चय सांगण्यांत येईल. येथें प्रपंचाचे त र अगदी परिपूर्ण निरसन केले आहे. ६
तेंचि विषदामहावाक्य ॥ जेणे जीवेश्वराचे ऐक्य ॥
तया पदत्रयाची व्याख्य ॥ आतां निरूपिनेल ॥ ७ ॥
जेणेंकरून जीवाचे व ईश्वराचे ऐक्य घडते तेचच पदत्रय व तेंच महावाक्य होय. त्या पदत्रयाची व्याख्या आतां सांगण्यांत येईल ७
तत्पदार्थ तो परमात्मा ॥ त्वंपदार्थ जीवात्मा ॥
उभयांसी तदात्मा ॥ बोलिजे असिपदी ॥ ८ ॥
तर तत्पदार्थ तो परमात्मा व त्वंपदार्थ जीवात्मा होय. आणि ह्या उभयतांनाही असिपदाच्या ठिकाणी तदात्मा असें म्हणतात. ८
तोचि तत्पदार्थ द्विविध ॥ शबल आणि शुद्ध ॥
त्वंपदार्थ तोही तथाविध ॥ शबलशुद्धभेदें ॥ ९ ॥
तोच तत्पदार्थ दोन प्रकारचा आहे,. एक शबल आणि दुसरा शुद्ध. त्याचप्रमाणे शबल व शुद्ध ह्याच भेदांनी त्वं पदार्थही दोन प्रकारचा आहे. ९
जेथे मायाशक्तिचक्रांचा अंगीकार ॥ जो करी सृष्ट्यादिव्यापार ॥
तो परमात्मा सर्वेश्वर ॥ शबल तत्पदार्थ ॥ १० ॥
जेथें मायारूप शक्तिचक्राचा अंगीकार केला आहे. जो सृष्टि आदिकरून व्यापार करतो तो परमात्मा सर्वेश्वर शबल तत्पदार्थ होय. १०
मायोपाधीसी वेगळ ॥ निःप्रपंच निर्मळ ॥
तें परब्रह्म केवळ॥ शुद्ध तत्पदार्थ ॥ ११ ॥
मायोपाधिरहित, प्रपंचाहून वेगळे, अत्यंत निर्मळ असे जें केवळ परब्रह्म तो शुद्ध तत्पदार्थ होय. ११
शरीरत्रयासी वर्तत ॥ अविद्या काम कर्मे वेष्टित ॥
जें चैतन्य तापत्रयें संतप्त ॥ तो शबल त्वंपदार्थ ॥ १२ ॥
देहत्रयानें असणारे अविद्या, वासना व कर्मे ह्यांनी वेढलेले, त्रिविधतापानें ताप पावलेले, जे चैतन्य तो शबल त्वंपदार्थ होय. १२
देहत्रयासी अतीत ॥ अविद्याकामकर्मे विनिर्मुक्त ॥
जें प्रत्यक् चैतन्य तत्वता ॥ तो शुद्ध त्वंपदार्थ ॥ १३ ॥
देहत्रयांहून निराळें, अविद्या, वासना, कर्में ह्यापासून मुक्त असें जे तत्त्वतःच प्रत्यक् चैतन्य तो शुद्ध त्वंपदार्थ होय. १३
शबल तो वाच्य बोलिजे ॥ शुद्धतो लक्ष्य म्हणिजे ॥
दोहींचा शबलांश सांडिजे ॥।घेइजे शुद्ध ॥ १४॥
शबल तो वाच्य होय. शुद्धाला लक्ष्य म्हणतात. ह्या दोहोंपेकी शबलांश तेवढा टाकून द्यावा. आणि शुद्ध तेवढा घ्यावा. १४
जो शुद्ध तत्पदार्थ॥ तोंचि शुद्ध त्वंदार्थ ॥
उभयांचे ऐक्यीं परमार्थ॥ होय असिपदी ॥ १५ ॥
जो शुद्ध तत्पदार्थ तोच शुद्ध त्वंपदार्थ होय. उभयतांच्या ऐक्यानें असिपदाच्या ठिकाणी परमार्थ होतो. ( परम अर्थ-तीन्ही पदांच्या अर्थाचा शेवट-.परब्रह्म होतो.) १५
एवं तत्त्वं पदार्थ शोधितां ॥ शिद्धचि जीवेश्वरासी ऐक्यता ॥
घटमठ भंगे केवळता ॥ जैसी गगनासी ॥ १६ ॥
अशाप्रकारे त्वपदार्थाचे शोधन केले असतां जीवेश्वराचे ऐक्य सिद्धच आहे. घटमठ नाहीसे झाले म्हणजे केवळ आकाशच राहते, तसेच हें होय. १६
येथ वाक्यार्थ नसे संसर्ग ॥ विशिष्ट न म्हणिजे चांग ॥
अखंड वाक्यार्थाचा संसर्ग ॥ बोलिजे महावाक्यें ॥ १७ ॥
येथे वाक्यार्थ ( महावाक्याचा अर्थ) म्हणजे नुसता संबंध नव्हे. किंवा विशेष प्रकारचा अथवा चांगला संबंध असेंही म्हणावयाचे नाही. तर येथे महावाक्यानें वाक्यार्थाचा अखंड संबंध असे समजावे. १७
वाक्यार्थाची अखंडता ॥ तेचि ब्रह्मी एकरसता ॥
एवं महावाक्यर्थतत्वता ॥ तुज निरूपिला ॥ १८ ॥
वाक्यार्थाचा अखंडपणा तेच ब्रह्मामध्ये एकरस-लीन (पूर्ण लीन) होणे होय. असो, अशाप्रकारे महाक्याचा अर्थ तुला तत्त्वत: निरूपण केला. १८
हे अखंड कडसिता ॥ तोचि बुझ गा तत्वता ॥
जो त्दंपदार्थाचे तत्वता ॥ जाणे परिशोधन ॥ १९ ॥
ह्या अखंडाचा विचार करणारा तोच तूं तत्त्वतः लक्षांत आण. तोच तत्त्वतः त्वंपदार्थाचें परिशोधन म्हणजे विचार जाणतो. १९
तत्त्वंपदार्थाचे शोधन ॥ तेथील विस्तारविवरण ॥
सांगिजेल तरी मन ॥ एकाप्र कीजे ॥ २० ॥
आता तत्त्वंपदार्थाचे विस्तारपूर्वक विवरण करण्यांत येईल, तर मन एकाग्र करावे. २०
तत्पदार्थ तो आत्माराम ॥ तो शोधितां न लगे श्रम ॥
म्हणोनि आधी शोधन क्रम ॥ ऐक त्वंपदार्थाचा ॥ २१ ॥
तत्पदार्थ तो आत्माराम होय. त्याचा विचार करावयाला फारसे श्रम नकोत. म्हणून आधी त्वंपदाचा विचार ऐक. २१
जीव अज्ञाने भ्रमला ॥ लिंगशरीरे बांधला ॥
स्थूलदेह आपण झाला ॥ पराधीन ॥ २२ ॥
जीव अज्ञानाने भ्रम पावला, लिंगशरीरानें बद्ध झाला आणि स्थूलदेहाप्रत येऊन पराधीन होऊन बसला. २२
तया अधिकारिया जीवातें ॥ गुरू म्हणती शिष्याते ॥
स्थूल देह नव्हसी ऐसें आपणातें ॥ जाण स्वानुभवें ॥ २३ ॥
त्या अधिकारी जीवाला-शिष्याला गुरू म्हणाले तूं स्थूल देह नव्हेस अशी तूं आपली स्वानुभवानें खात्री करून घे. २३
स्थूल देहाते देखता ॥ तो तूं नव्हेसी सर्वथा ॥
जसा घटातें पाहता ॥ चक्षू घट कैसेनी ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे घटाला पाहणारा चक्षू कांही घट होत नाही. तसाच जड देहाला पाहणारा तूं बिलकुल तो देह नव्हेस. २४
द्रष्टा दृश्याचा जाण ॥ तो तयापासूनि विलक्षण ॥
हे प्रसिद्ध उपपत्ती नेणे कवण ॥ स्वानुभवें ॥ २५ ॥
दृश्याचा द्रष्टा असतो तो त्याच्या (दृश्याहून) लक्षणांनी भिन्न असतो. ही प्रसिद्ध उपपत्ति स्वानुभवाने कोणास बरें समजत नाही. २५.
तूं ऐसें म्हणसी ॥ चक्षूपासूनि भिन्नत्व घटासी ॥
हैं द्रष्टादृश्याचे वैलक्षण्य चित्तासी ॥ मनीं प्रत्यक्ष सिद्ध ॥ २६ ॥
तूं चक्षूहून घट हा भिन्न आहे असे म्हटलेस म्हणजे द्रष्टादृश्याचा जो भिन्नपणा चित्तास भासला तो मनामध्ये प्रत्यक्ष सिद्धच आहे, असे समजावे. २६
आत्मा तंव देहावेगळा न दिसे ॥ तरी तो विलक्षण कैसा असे ॥
हें बुझ हां आपैसे ॥ दृष्टांतमुखें ॥ २७ ॥
आत्मा तर दहावेगळा दिसत नाही, मग तो भिन्न कसा ? हें तूं दृष्टांतद्वारा आपोआप समजून घे. २७
काष्ठीं असतां दाहक ॥ दृश्य काष्ठा जेवीं प्रकाशक ॥
काष्ठ व्याप्य तो व्यापक ॥ म्हणोनि विलक्षण जाणपां ॥ २८ ॥
काष्ठाच्या ठिकाणी अग्नि असतां तो जसा काष्ठाचा प्रकाशक असतो. म्हणजे काष्ठ हे व्याप्य व अग्नि व्यापक असतो, हे ध्यानांत आण. २८
तेवीं दृश्यदेहामाजी असतां ॥ द्रष्ट्या आत्मया विलक्षणता ॥
हे स्वानुभवे बुझतां ॥ सायास न लगे ॥ २९ ॥
तसाच दृश्यदेहामध्यें असतांना, द्रष्टा आत्मा हाही भिन्न लक्षण आहे, हे तुला स्वानुभवाने समजून घ्यावयास फारसे प्रयास नकोत. २९.
देह तंव साकार ॥ नेथें असती षड्विकार ॥
आत्मस्वरूप निर्विकार ॥ के देह कैसेनी ॥ ३० ॥
देहाला तर आकार आहे आणि तेथे षड्विकारही आहेत. आत्मस्वरूप निर्विकार आहे. मग तो देह कसा होणार. ३०
निद्रा मरणावस्था ॥ देह कांहीं जरी जाणता ॥
तरी आत्मा म्हणों येता ॥ कांहीं एक ॥ ३१ ॥
निद्रा मरण वगैरे अवस्थांपैकी देहाने जर कांहीं जाणले असतें तर त्याला कांहीं तरी आत्मा म्हणतां आले असतें. ३१
निद्रामरणातें जाणत ॥ आत्मा स्वयंबोधें असें वर्तत ॥
म्हणूनि देही असूनि देहातीत ॥ नो जाणावा ॥ ३२ ॥
निद्रा व मरण हें जाणणारा आत्मा स्वयंबोधानेच वर्ततो आहे. म्हणून तो देहांत असून देहाहून निराळा आहे असे समज. ३२
जन्म काळीं जन्मातें ॥ स्थितिकाळीं स्थितीनें ॥
मरणकाळी मरणाते ॥ जडदेह केवि जाणे ॥ ३३ ॥
जन्मकाळी जन्म, स्थिति काळी स्थिति, व मरणकाळीं मरण ह्या जड देहाला कसे समजणार ? ३३
दृश्यासि द्रष्टेपण ॥ द्रष्ट्यासी दृश्य कैसेनि होणें ॥
म्हणूनि देहचि आत्मा बोलणे ॥ सांडी भ्रांति ॥ ३४ ॥
दृश्याला द्रष्टेपणा द्रष्ट्याचे दृश्य कसें बरें होणार ! म्हणूनदेह हाच आत्मा मानणें हा जो भ्रम तो टाकून दे. ३४
स्थूळासी आत्मत्वेंमानित ॥ उठिला जो चार्वाक सिद्धांत ॥
तयाची प्रचीती निभ्रांत ॥ तुवां जिंकिलेसी ॥ ३५ ॥
जडालाच आत्मा मानणारा जो चार्वाकाचा सिद्धांत प्रकट झाला आहे, तो तूं स्वानुभवेंकरून निःसंशयपणें हाणून पाडलास. ३५
देहचि आत्मा बोलती ॥ प्रत्यक्षासी प्रमाण मानिती ॥
मरणचि मोक्ष म्हणती ॥हीन विवेकी ॥ ३६ ॥
विवेकशून्य जे आहेत ते देह हाच आत्मा म्हणतात; प्रत्यक्षालाच प्रमाण समजतात; आणि मरण तोच मोक्ष असें मानतात ३६ .
वेद शास्रें पुराणें ॥ जे न मानिती प्रमाणें ॥
तया धीट पाषांडियांची उक्ती कवणे ॥ साच मानावी ॥ ३७ ॥
वेद, शास्त्रे, पुराणें यांस जे प्रमाण मान त नाहीत ते धीट पाखंडी होत. त्यांची बोलणी कोणी जमेस धरावी ! ३७
स्थू देह जरी आत्मा ॥ तरी देह व्हावा ऐसें कवणे केले कर्मा ॥
देहपातानंनर सुखदुःख धर्मा ॥ भोगितो कवण ॥ ३८॥
जड देह हाच जर आत्मा, तर देह व्हावा हे कर्म कोणी केलें म्हणावयाचे आणि मग देहावसन झाल्यानंतर सुखदुःख तरी कोण भोगतो समजावयाचें ! ३८
म्हणूनि आत्मया न लावी पिसें देहाचे ॥ तरी स्थूलदेह कवण दळवाडियाचे ॥
ते पंचीकृत पंचभूतांचे ॥ ऐसें जाण तूं ॥ ३९ ॥
म्हणून आत्म्याला तूं देहाचे वेड लाऊं नकोस. तर मग जड देह हा काय काय मिळून झाला ? तर तो पंच भूतांच्या पंचिकरणाने झाला असें समज. ३९
तींपंचीकृत पंचभूते कैसीं ॥ तुज सृष्टिक्रमी निरूपिली जैसी ॥
जयाचे पंचवीस अंशांसी ॥ देह ऐसें नांव झाले ॥ ४० ॥
आतां तीं पंचीकृत पंचभूते कशी आहेत म्हणशील तर सृष्टिक्रमाच्या प्रकरणात सांगितली आहेत तींच. त्यांच्या पंचवीस अंशांना देह ही संज्ञा आली. ४०
नी तंव पंचभूतें जडें ॥ तदंश आत्मा हें सर्वथा न घडे ॥
तयाचा देह हे दलवाडें ॥ तो आत्मा कैसेनि ॥ ४१ ॥
ती पंचभुतें तर जड होत. त्यांचाच अंश आत्मा हें कधीही होणे नाही. आणि त्याच अंशापासून देह हे स्थूलरूप झालें आहे, तर तोच आत्मा कसा होईल ! ४१
हा पिंड विचारितां ॥ आत्मा नव्हे सर्वथा ॥
तेथींची जागृती अवस्था ॥ तो आत्मा केसेनी ॥ ४२ ॥
ह्या पिंडाचा विचार केला असता तो आत्मा मुळींच नव्हे. जागृति ही तेथील अवस्था होय. तेव्हां तो आत्मा कसा होणार ! ४२
देहाभिमान पुरस्करें ॥ ज्ञानेंद्रियाचेनि द्वारें ॥
बुद्धीसी बाह्यविषयाचे ज्ञान स्फुरे ॥ ते जागृती जाणावी ॥ ४३ ॥
देहाभिमानपूर्वक ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने बुद्धीला बाह्यविषयाच्या ज्ञानाचे स्फुरण होत असते तीच जागृति होय. ४३
स्थूल देह जागृती अवस्था ॥ या दोहींचा अभिमानी विश्व विचारिता ॥
आत्मा नव्हे येथें उपपत्ती अनंता ॥ असती वेदांतशास्त्रीं ॥ ४४ ॥
जड देह आणि जागृती अवस्था या दोहोंचा अभिमानी विचार करूं गेलें तर विश्व हा आहे. आत्मा कांही नव्हे, अशाविषयी वेदांतशास्त्रात अनंत आहेत. ४४
स्थूल देहू जागृती विश्व ॥ हा रजोगुणाचा प्रपंच तुज दृश्य ॥
नेत्रस्थान स्थूलभोग हें अदृश्य ॥ केवीं होसी ॥ ४५ ॥
जड देह, जागृति. आणि विश्व हा जो रजोगुणात्मक प्रपंच तो तुला दृश्य होय. आणि नेत्रस्थान, स्थूलभोग हे अदृश्य होय. तेव्हा तें तूं कसे असशील ! ४५
या स्थूल प्रपंचातें ॥ तूं जाणत अससी निरुतें ॥
म्हणूनि अवलंबन साक्षी तूतें ॥ बोलिजे वेदांती ॥ ४६ ॥
ह्या स्थूलप्रपंचाला तूं निश्चयानें जाणत आहेस, म्हणून वेदांताच्या भाषेत तूं अवलंबन साक्षी होस. ४६
एक तत्त्व व्यापक म्हणती ॥ देहामध्यें एकस्थानीं लक्षित्व्व् ॥
तें एक कांहींच नेणती ॥ खंडज्ञानिये ॥ ४७ ॥
कोणी कोणी तत्त्व व्यापक आहे म्हणतात; देहामधील एकाच स्थानावर लक्ष्य लावतात; त्यांना एक असें कांहींच कळत नाही. तै खंडज्ञानी होत. ४७
गुह्यस्थानीं आधार कमळ ॥ तें रक्तवर्ण चतुर्दळ ॥
वंशंषंसं वर्णीं अतिसोज्ज्वळ ॥ एक चिंतिती ॥ ४८॥
गुह्यस्थानी 'आधार' नांवाचें कमळ आहे; ते रक्तवर्ण असून चतुर्दळ-चार पाकळ्यांचे आहे; आणि वं शं षं सं ह्या वर्णानी तें अत्यंत सोज्वळ-प्रकाशवान आहे. त्याचेंच कोणी चिंतन करतात. ४८
लिंगस्थानीं स्वाधिष्ठान ॥ तें षट्दळ पीतवर्ण ॥
बंभंमंयंरलं अक्षरीं भूशुद्धींत जाण ॥ एक ध्याती ॥ ४९ ॥
लिंगस्थानी ’अधिष्ठान’ नांवाचे कमळ आहे. ते षड्दळ म्हणजे सहा पाकळ्यांचे असून पीतवर्ण आहे. बं भं मं यं रं लं ह्या अक्षरांनी ते युक्त आहे. कोणी कोणी स्थानमात्राना निश्चय करून त्याचेच ध्यान करतात. ४९
नाभिस्थानीं मणिपूर कमळ ॥ तें नीलवर्ण दशदळ ॥
डंपासूनि फांकित दे मोक्षफळ ॥एक चिंतिती ॥ ५० ॥
नाभिस्थानी (बेंबीच्या जागी) ' मणिपुर ' नांवाचे कमळ आहे. व तें नीलवार्ग ( निळे) असून त्यास दशदळें म्हणजे दहा पाकळ्या आहेत. तथ डं पासून फं पर्यंत अक्षरें असून ते मोक्षफळ देणार आहे, म्हणून कोणी कोणी त्याचेंच चिंतन करतात. ५०
हृदयीं अनाहत कमळ ॥ तें अग्निवर्ण द्वादशदळ ॥
कंपासूनि ठंबीजीं करी झळाळ ॥ प्रतिपत्रीं ॥ ५१ ॥
हृदयामध्ये 'अनाहत ' नामक कमल आहे. तें वर्णाने अग्नीसारखें असून बारा पाकळ्यांचे आहे. कं पासून ठं पर्यंत तेथें बीजाक्षरें प्रत्येक दलावर प्रकाशमान झालेली असतात. ५१
कंठी जाणिजे विशुद्ध चक्र ॥ तें षोडश दळ अतिशुभ्र ॥
तेथें प्रतिपत्रीं षोडश स्वर ॥ अकारादिक ॥ ५२ ॥
कंठामध्यें जे चक्र आहे तें ' विशुद्ध ' समजावे तें सोळा पाकळ्यांचें अत्यंत शुभ्र असें आहे. तेथें अकारादि सोळा स्वर प्रत्येक पत्रावर झळकत असतात. ५२
भ्रूमध्यें अग्नि कमळ ॥ तें विद्युद्‌वर्ण द्विदळ ॥
तेथें हं क्षं बीजी अंकित दे मोक्षफळ ॥ एक म्हणती ॥ ५३ ॥
भुवयांच्या मध्यभागी 'अग्नि ' म्हणून कमळ आहे. त्याला दोन पाकळ्या असून तें विद्युतू (वीज) वर्ण आहे. तेथें हं क्षं ही बीज चिन्हे (वर्ण) असून ते मोक्षफळदातें आहे, असेंही कोणी कोणी म्हणतात. ५३
सबिंदू मातृकाक्षरीं अंकितें ॥ ऐसिया षट्चक्रें मिरवतें ॥
तेंचि परमतत्त्व वोलती ते ॥ हीनविवेकी ॥ ५४ ॥
ह्या बिंदुसहवर्तमान मात्राक्षरांनीं युक्त अशा षट्चक्रांनी ( कमळांनी) शोभणारें तेंच तें परमतत्त्व होयअसे म्हणणारे ते विवेकहीन मूर्ख होत. ५४
षट्चक्रांवरतें ॥ सहस्रदळां आतौतें ॥
नानावर्ण प्रकाशातें ॥ एक चिंतिती ॥ ५५ ॥
ह्या षट्चक्रांच्याही वर एक 'सहस्रार' म्हणून एक हजार पाकळ्यांचे कमळ आहे. त्या मध्येंच कोणी कोणी निराळ्या वर्णाच्या प्रकाशाचें चिंतन करितात. ५५
सप्तचक्राचें अंतराळ ॥ तेंचि परमतत्त्व निर्मळ ॥
ऐसें बोलती बरळ ॥ ने ज्ञानहीन ॥ ६६ ॥
सप्तचक्रांचे अंतराळ -आकाश- तेंच निर्मळ परम तत्व होय,:असें कांहींजण बडबडतात, पण त ज्ञानशून्य होत. ५६
एक आधारीं बंद घालिती ॥ प्रसुप्त कुंडलिनीतें पवनें चेतविती ॥
षट्चक्रें भेदूनि नेती ॥ ब्रह्मरंध्रासी ॥ ५७ ॥
कोणी कोणी अंधारांत कोंडून घेतात आणि प्राणायामानें निजलेल्या कुंडलिनीला जागृत करतात व षटचक्रे भेटून ब्रह्मरंध्राला नेऊन पोहोंचवितात.५७
तेथें अनाहत ध्वनीचेनि विकशें ॥ चित्त महाशून्यीं समरसे ॥
तेथें परमकळा प्रकाशे ॥ स्वयंज्योति ॥ ५८ ॥
तथे 'अनाहत' नांवाचा ध्वनि प्रगट होतो व चित्त महाशून्यामध्ये समरस पावते (पूर्ण लीन होते-मिळृन जातें.) तेथे परमकळा-स्वयंज्योति प्रकाशमान होते .५८
एक मनपवनाचा ग्रास करिती ॥ ते तितकेनीच आनंदें स्फुंजती ॥
परी शुद्धी नेणती ॥ परतत्त्वाची ॥ ५९ ॥
कोणी कोणी मनाचा व वायूचाच ग्रास करतात, आणि त्व् तेवढ्यानेंच आनंदाने स्फुंजू लागतात. परंतु त्यांना परतत्त्वाची शुद्धीच राहात नाही. ५९
तूं उड्डियान ना जालंधरू ॥ कावरु ना सूक्ष्म विवरू ॥
पूर्णगिरि ना ब्रह्मरंध्रू ॥ नव्हेसि तूं ॥ ६० ॥
तूं उडियान नव्हेस कीं जालंधर नव्हेस; कावर नव्हेस की सूक्ष्म विवर म्हणतात तेही नव्हेस; तूं पूर्णगिरि किंवा ब्रह्मरंध्रही नव्हेस. ६०
तूं मेरू ना त्रिकुट ॥ भ्रमरगुंफा ना गोल्हाट ॥
तीन ग्रंथी ना श्रीहट ॥ कैसेनि तूं ॥ ६१ ॥
तूं मेरू नव्हेस कीं त्रिकूटही नव्हेस; भ्रमरगुंफा नव्हेस की गोल्हाट नव्हेस; तीन ग्रंथि नव्हेस की श्रीहटही नव्हेस. तीं तूं कशी बरें होशील ? ६१
तूं भाटि ना ताळी ॥ उन्मनी ना आगियाळी ॥
नाद बिंदू रोळीं ॥ नव्हेसि तूं ॥ ६२ ॥
तूं भाटि नव्हेस की ताळीही नव्हेस; तूं उन्मनी नव्हेस की आगियाळीही नव्हेस; किंवा नादबिंदूच्या रोळांतही तूं नाहीस. ६२
तूं रेचक ना पूरक ॥ कुंभक ना त्राहाटक ॥
ययांसी तूं प्रवर्तक ॥ तरी तेचि तूं कैसेनी ॥ ६३ ॥
तूं रेचक नव्हेस की पूरक नव्हेस; कुंभक नव्हेस की त्राहाटक नव्हेस. उलट, तूं तर ह्यांचा प्रवर्तक आहेस. मग तेच तूं कसा बरे होशील ? ६३
तूं मंत्र ना अनुष्ठान ॥ धारणा ना ध्यान ॥
समाधी ना आसन ॥ हेही तूं नव्हसी ॥६४॥
तूं मंत्रही नव्हेस की अनुष्ठानही नव्हेस; धारणा नव्हेस की ध्यानही नव्हेस; समाधि किंवा आसन ह्यांपैकी तूं नव्हेस. ६४
देहाचे स्थान मान ॥ तें सकळही खंडज्ञान ॥
या दृश्याचें जरी तुज ज्ञान ॥ तरी तेंचि तूं केवी होसी ॥ ६५ ॥
हे देहाचे स्थानमान हे सारेच खंडज्ञान होय. ह्या दृश्याचे जर तुला ज्ञान आहे तर तेंच तूं कसें होशील ? ६५
जेथे देहचि अनित्य ॥ तेथींचे लय लक्ष्य केवी सत्य ॥
झरीन सकळही मिथ्यात्व ॥ खंडज्ञान ॥ ६६ ॥
मुळी देहच जेथे अनित्य आहे, तेथचा लय व लक्ष्य सत्य कसें मानावे ? म्हणून सर्वच मिथ्या भास खंडज्ञान होय. ६६
जें जें मने जाणिजे ॥ तें दृश्य आत्मा केवीं होईजे ॥
हें सकळही सांडूनि स्वयें अनुभविजे ॥ परमत्त्व ॥ ६७ ॥
जें जें मनाने जाणले जाते ते ते सारे दृश्य होय. तेव्हां तें आत्मा कसें होईल ? तेव्हां हे सर्वही टाकून देऊन आपण होऊन त्या परमतत्त्वाचा अनुभव घ्यावा. ६७
देहादिप्रपंचानि साक्षित्वे ॥ सांडूनि देहसंबंधी सकळ तत्त्वें ॥
सुखिया होई स्वप्रकाशत्वे ॥ स्वस्वरूपी ॥ ६८ ॥
देहादि प्रपंचाच्या साक्षित्वाने देहसंबंधी तत्वे टाकून देऊन स्वात्मबोधाने स्वस्वरूपी सुखी होऊन रहा. ६८
तुझे स्वरूप नीर्वीकार ॥ तेथें नाही देहाचे षड्विकार ॥
आणि वर्णाश्रम कुळाचार ॥ तो केदी कल्पावा ॥ ६९ ॥
तुझें स्वरूप निर्विकार आहे तेथे देहाचे षड्विकार नाहीत मग वर्णाश्रम कुळाचार वगैरेंचे नांव तेथें कसें काढावे ? ६९
ऐसें निरर्थकरूप जाणूनी ॥ सत्य वोलिलो वचनीं ॥
चित्त देईजे मुनिजनीं ॥ श्रीमुकुंदराज म्हणे ॥ ७० ॥
श्रीमुकुंदराज म्हणतात--- अशाप्रकारें हे निरर्थकच आहे हे जाणून सत्य तेच शब्द बोललो. तर मुनिजनांनी इकडे चित्त द्यावे. ७०
इति श्रीमद्‌विवेकसिधौ संहारक्रमे गुरुशिष्यसंवादे
स्थूलदेहनिरसनं नाम प्रथमप्रकरणं समाप्तम् ॥

GO TOP