॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण ७ वे ॥

॥ सर्वं ब्रह्ममिति विवरण ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥



जयजया जी श्रीगुरुनाथा ॥ माझिया प्रश्नाची कथा ॥
राउळें निरूपिली समस्ता ॥ अनुक्रमें ॥ १ ॥
श्रीगुरुनाथा ! आपला जयजयकार असो. देवांनी माझ्या प्रश्नांच्या गोष्टी सर्व कांहीं अनुक्रमाने सांगितल्या. १
माया अविद्या ते आरिसे ॥ तेथें ब्रह्म प्रतिबिंबे आपैसे ॥
ते जीवेश्वर ऐसें ॥ वेदांती बोलिले ॥ २ ॥
माया अविद्या हे आरसे होत. तेथे ब्रह्म हे आपोआपच प्रतिबिंबित होते आणि वेदांतांत त्यालाच ( ब्रह्मप्रतिबिंबालाच) जीवेश्वर म्हटलेलें आहे. २
परब्रह्म स्वसंवेद्य ॥ ए जीवेश्वरां वंद्य ॥
तेथूनि उठती माया अविद्या ॥ विवर्तरुपे ॥ ३ ॥
परब्रह्म हे स्वसंवेद्य ( आपले आपल्यासच जाणलें जाणारे) आहे. जें जीवेश्वराला वंद्य आहे. तेथून माया अविद्या विवर्तरूपाने उद्‌भवतात. ३
येथें आक्षेप असे थोरु ॥ मुख्य बिंबा होई आकारु ॥
तरी प्रतिबिंबाचा ओडंबरु ॥ दिसे रसदर्पणीं ॥ ४ ॥
तेथे एक मोठी शंका अशी येते की, मुख्य बिंबाला जर आकार असेल तरच प्रतिबिंबाचा ओडंबर ह्यणजे गारुडी खेळ ( रस?) आरशांत दिसूं लागतो. ४
निराकार ब्रह्मासी ॥ प्रतिबिंबाची कुटी कायसी ॥
तरी या आक्षेपासी ॥ उत्तर दीजे स्वामियां ॥ ५ ॥
निराकार ब्रह्माला हा प्रतिबिंबाचा आळ आला कोठून ? तर स्वामींनी त्या शंकेचे समाधान करावें. ५
ऐसा शिष्याचा संदेह ॥ ऐकूनि उठिला स्नेह ॥
मग सर्वज्ञाचा राव ॥ बोले श्रीगुरुनाथ ॥ ६ ॥
हा शिष्यास पडलेला संशय ऐकून (सहजच) करुणा आली आणि मग सर्वज्ञांचे राजे श्रीगुरुनाथ बोलू लागले. ६
बिंबप्रतिबिंब न्याय ॥ तेथींचा बुझसी अभिप्राय ॥
तेवेळीं तुझा आक्षेप वाय ॥ तूंचि म्हणसी ॥ ७ ॥
तर बाबा ! बिंबप्रतिबिंबन्याय जो आहे, त्याचा भावार्थ जेव्हां तुला बरोबर कळेल तेव्हां आपली शंका व्यर्थ आहे, असे तुझे तूंच म्हणक्षील. ७
निराकार निराभासे ॥ बिंब प्रतिबिंब कायसे ॥
हें वाक्य तुझें अनारिसें ॥ केवीं म्हणावें ॥ ८ ॥
जे निराकार व निराभास, तेथे बिंबप्रतिबिब हे कशाचे ? ही तुझी शंका भलतीच कांहीतरी आहे असे कसें ह्मणावे ? ८
तथापि माया ते साभास ॥ अविद्या तेही तदंश ॥
उभयांचे लक्षण अनादृश्य ॥ नव्हे स्फूर्तिवीण ॥ ९ ॥
तथापि माया ही साभास आहे: अविद्याही सुद्धां तिचाच अंश होय. स्फूर्तीवांचून त्या उभयतांचेंही लक्षण स्पष्ट होत नाही. ९
हग आपणापें अवलोकितां ॥ ब्रह्मी स्फुरे पूर्ण अहंता ॥
म्हणूनि मायेसी साभासता ॥ असेचि कीं ॥ १० ॥
आपण कोण हे पाहूं गेलें तो ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण अहंतास्फुरण पावली. म्हणून मायेला साभासता आहेच. १०
अज्ञानपूर्वक अन्यथाज्ञान ॥ ऐसे अविद्येचें लक्षण ॥
ह्मणूनि तेही साभास खूण ॥ बोलिजे वेदांती ॥ ११ ॥
अज्ञानपूर्वक अन्यथा (विपरीत ज्ञान) ज्ञान हेच अविद्येचें लक्षण होय. म्हणून वेदांतांत तीही साभास असल्याचे सांगितले आहे. ११
पांचही दर्शनें जंबुकें ॥ वेदांतसिंहाचे हाकें ॥
ऐकूनि तम्हणती राखे ॥ भाजलों जी ॥ १२ ॥
पांचही दर्शने ही कोल्ही होत. ती वेदांतसिंहाची गर्जना ऐकून म्हणू लागली महाराज चरणी लागलो. शरणागताचे रक्षण करावे. १२
पांचही दर्शने ॥ परस्परें करिती साजणें ॥
वेदांताचेनि भ्यालेपणें ॥ ऐसें गमे ॥ १३ ॥
वेदांताच्या धाकानेंच पांचही दर्शने एकमेकांची साजिलवारकी करतात, असे वाटतें. १३
पांचही दर्शनांशी झुंजार ॥ हा वेदांतासी साए बडिवार ॥
जो एकांगवीर ॥ ख्यातिवादियां ॥ १४ ॥
पांचही दर्शनांबरोबर झुंज खेळणारा ही प्रौढी फक्त एका वेदांतालाच शोभते. मोठमोठ्या वाद खेळणारांमध्यें तर हा एकांगवीर होय. १४
ह्मणोनि वेदांतें बोलावें ॥ तेंचि साच मानावें ॥
पेर तें सोडावे ॥ पाषांडमत ॥ १५ ॥
म्हणून वेदांतांत जें सांगितलेले आहे तेच खरे मानावे. बाकीचे मत ते पांखाड मत होय. तें टाकून द्यावे. १५
वेदांताच्या एकदेशी ॥ वर्तन नैय्यायिक वैशेषिकासी ॥
तीं पूर्वपक्ष वेदांतासी ॥ म्हणूनि सांडावी ॥ १६ ॥
नैय्यायिक व वैशेषिक वेदांतानी एकच बाजू धरतात. ती वेदांताचा पूर्वपक्ष होत. म्हणून ती सोडून द्यावी. १६
वेदांताचिया पूर्व भागातें ॥ भादृ प्राभाकर बोलते ॥
चित्तशुद्धीसी हेतुरतें ॥ श्री सिद्धांत नव्हती ॥ १७ ॥
भाट्ट प्राभाक-रामध्ये वेदांताच्या पूर्वभागाचे निरूपण आहे. तें फक्त चित्तशुद्धीस कारणभूत आहे. परंतु ते कांही पर-श्रेष्ट-परब्रह्मसंबंधी सिद्धात नव्हेत. १७
वेदांगत्व प्रमाणे ॥ होती कीर ही दर्शने ॥
परी साधनेचि साध्य कवणे ॥ बोलिजेल ॥ १८ ॥
दर्शने ही खरोखरी वेदांताची प्रमाणे होत. परंतु साधनें तीच साध्य असे कोण बरे म्हणेल ? १८
जैसे बहिरंग साधन ॥ नव्हे तृप्तीसी कारण ॥
तैसें मुक्तीविषयीं अप्रमाण ॥ कर्मकांड हे ॥ १९ ॥
जसे बहिरंगसाधन बाह्योपचार हे देहाया तृप्तीला कारण होत नाहीत, तसेंच हें कर्मकांडही मुक्तीला प्रमाण म्हणतां येत नाहीं. १९
येरें दर्शने समस्तें ॥ वेदबाह्य म्हणूनि कुमते ॥
वेदार्थाचा तत्त्वार्थ वेदांतें ॥ बोलावागा ॥ २० ॥
बाकीची सर्व दर्शनें ही वेदबाह्य होत म्हणून कुमते म्हणजे ग्राह्य मते नव्हेत. अरे ! वेदांचा तत्त्वार्थ वेदांतानेंच सांगावा. २०
असो हे मायाअविद्येचें लक्षण ॥ जेथे नाही साचारपण ॥
परी साभासपणाची खूण ॥ ते अनारिसी नव्हे ॥ २१ ॥
असो. तर हें माया अविद्येचें लक्षण होय. येथें खरेपणा-शाश्वती-म्हणून नाहीच. परंतु मिथ्याभासाचें लक्षण कांही याहून वेगळें नाही २१
एक स्वरूपोन्मुख स्फुरण ॥ दुसरी ते विपरीत कल्पना जाण ॥
तरी वेद्यत्वें साभासपण ॥ ते बोलूंचि नये ॥ ।२२ ॥
एक स्वरूपोन्मुख झालेलं स्फुरण, व दुसरी ती विपरीत कल्पना हे खरे, तरी साभासपण- म्हणजे मिथ्याभास हा वेद्य म्हणजे जाणलें जाणण्यास योग्य जें परब्रह्मस्वरूप त्याचा धर्म असे मुळींच समजू नये. २२
ब्रह्म कीर निराभास ॥ परी माया अविद्या साभास ॥
म्हणूनि तेथें उठती प्रतिभास ॥ परब्रह्मींचे ॥ २३ ॥
बस हें खरोखरी निराभास आहे. परंतु माया अविद्या ह्यांस भास-आहे. म्हणून तेथे परब्रह्मींच्या प्रतिभासांची परंपरा लागते. २३
शुद्ध चैतन्येवीण ॥ नाही माया अविद्येचें स्फुरण ॥
म्हणूनि त्यासी अधिष्ठान ॥ चैतन्यचि कीं ॥ २४ ॥
शुद्धचैतन्यावांचून मायाअविद्येचें स्फुरण नाहीं. म्हणून त्यास चैतन्य हेंच अधिष्ठान आहे. २४
जेणें माया अविद्या स्फुरें ॥ तेथे चैतन्य आधीं संचरे ॥
तेणेंवीण यातें बारे ॥ कवण दाखवी पां ॥ २५ ॥
मायाअविद्येचें स्फुरण झालें की त्यांच्या आधीच तेथें चैतन्याचा प्रवेश झालेला असतो. त्याच्याशि-वाय त्यांना व्यक्त दशेस आणणारा दुसरा कोण आहे ! २५
माया अविद्येचिया अवभासा ॥ चैतन्यांश उठे सरिसा ॥
तेथें प्रतिबिंब ऐसा ॥ शब्द वोलिजे ॥ २६ ॥
माया अविद्येचा भास होतांक्षणीच चैतन्याना अंश उद्भवतो. त्यालाच बिंब अशी संज्ञा आहे. २६
घटमठा सरिसें ॥ निरालंब गगन प्रवेशे ॥
तें घटाकाश मठाकाश ऐसे ॥ नांव ठेविलें ॥ २७ ॥
घटमठांबरोबर निरालंब आकाश प्रवेश करतें त्याला घटाकाश व मठाकाश अशी नावे देतात. २७
हां गा तुझिया वासना ॥
स्फूर्तियें तत्क्षणीं अधिष्टिजे चैतन्या ॥
तैसें माया अविद्या जाणा ॥ ब्रह्म अधिष्टी ॥ २८ ॥
अरे असें पहा की, तुझ्या वासनाची स्फूर्ति होताक्षणीच चैतन्य अधिष्टित होतें, तसेंच माया अविद्या ह्यांच्याबरोबरच ब्रह्म अधिष्ठित होते असे समज. २८
माया अविद्या कीर साभास ॥
तेथे अनुभविजे ब्रह्म निराभास ॥
जेणे वसविजे वोस ॥ वासनात्मकहें ॥ २९ ॥
माया अविद्या हीं मिथ्या भास आहेत. येथ निराभास ब्रह्मा अनुभव घेतला की तेणेकरून हें जें वासनामय आहे ते सारें ओस पडते. २९
अगा परब्रह्म नव्हे तें शून्य ॥ ते जाण शुद्धचैतन्य ॥
म्हणूनि जाणती ते धन्य ॥ निराभास जरी ॥ ३० ॥
अरे ! परब्रह्म म्हणजे कांही शून्य नव्हे. तें शुद्ध चैतन्य असे समज. म्हणजे ते जरी भासरहित आहे तरी ते जाणतात ते धन्य होत. ३०
बिंबस्थानीं ब्रह्य उपमिजे ॥ प्रतिबिंब जीवेश्वर बोलिजे ॥
हा बिंब प्रतिबिंव न्याय जाणिजे ॥ वेदांतशास्त्रीं ॥ ३१ ॥
ब्रह्म हे बिंबस्थानी कल्पावे, आणि जीवेश्वर ते प्रतिबिंब समजावे. हाच वेदांत शास्त्रात बिबप्रतिबिब न्याय होय. ३१
परब्रह्मीं नाही बिंब ॥ तेथे कायसें प्रतिबिंब ॥
तथापि जो दृष्टांतडिंब ॥ बुझावया देणे ॥ ३२ ॥
परब्रह्माच्या ठिकाणी बिंबच नाही मग तेथं प्रतिबिंब कोठचें ? परंतु समजूत पटण्याकरितां बिंब हा दृष्टांत द्यावयाचा एवढेच ! ३२
जो साम्यचि परी विकळ ॥ तो दृष्टांत नव्हे निर्मल ॥
अहो प्रासाद केसा धवळ ॥ कृष्णकाग जैसा ॥ ३३ ॥
उपमा म्हणूनच दिलेली खरी परंतु ती उणाख असेल तर तो कांहीं निर्मळ दृष्टांत नव्हे. "अहो ! वाडा काय पण सफेत दिसतो आहे, की जसा कांहीं काळा कुळकुळीत कावळाच ! ३३
एवं मायीक दोष ॥ दृष्टांतासी ओळख ॥
इहीं वर्जित दूषित तें मूर्ख ॥ शास्त्रबहिर्मुख पैं ॥ ३४ ॥
एवंच दृष्टांतामध्ये मायिक दोष हा आहेच. तरी पण ते ज्यांनीं टाकले किंवा दूषित म्हटले ते ज्ञास्त्रबहिर्मुख (शास्त्रें कधीही न पाहणारे), मूर्ख होत. ३४
शास्त्रबाह्य दूषण ॥ दृष्टांतासी देती मूर्ख जन ॥
तया दृष्टांता खंडन ॥ तेणेचि न्याये ॥ ३५ ॥
मूर्खलोक दृष्टांत हे शास्त्रबाह्य म्हणून दूषण देतात. तेव्हां त्या दृष्टांताचें खंडन त्याच न्यायाने करावयाचे. (वरच्या ओवीत शास्त्रबहिर्मुख म्हटलेंच आहे.) ३५
मुख श्लेष्म्यानें जडले ॥ अस्थिमासें सकळ भरले ॥
तथापि चंद्रासी उमपिलें ॥ तें दूषण काई ॥ ३६ ॥
श्लेष्म्याने जडलेले, हाडें मांस ह्यांनी सारें भरलेलें, असे मुख असून त्याला चंद्राची उपमा दिली तर तें दूषण होते काय ? ३६
पूर्णचंद्रासी वर्तुळता ॥ आणि असे निर्मळता ॥
म्हणूनि उपमिजे वक्त्रा ॥ पूर्ण चंद्रेंसी ॥ ३७ ॥
पूर्ण चंद्राचे ठिकाणीं गोलाकार व स्वच्छ प्रकाश (तेज) हीं असतात. म्हणूनच बोलणारा पूर्ण चंद्राची उपमा देतो. ३७
अगा एकदेशी दृष्टांत ॥ दृष्टींत कीर असे वर्तत ॥
म्हणूनि शास्त्रबाह्य वितर्क ॥ तूं न करी पां ॥ ३८ ॥
अरे ! एक पक्षी दृष्टांत हें खरोखरी दृष्टींत वागत असतात. म्हणूनच तूं भलतेच शास्त्रबाह्य कुतर्क काढूं नकोस. ३८
कवण प्रमाणासी आंत ॥ शास्त्रें बोलिजे दृष्टांत ॥
ऐसी जे नेणती मात ॥ ते दूषितु काय ॥ ३९ ॥
किती प्रमाणाच्या आंत शास्त्राने दृष्टांत द्यावा, हे ज्यांना माहीत नाही, ते दूषण देणारे कसले ! ३९
कवणे भूषणें दूषणे ॥ दृष्टांतासी जो नेणे ॥
तेणेसीं बोलणे ॥ ते विडंबनाच कीं ॥ ४० ॥
दृष्टांताला भूषणें कोणती व दूषणे कोणती ? हीच ज्यांना ठाऊक नाहीत, त्यांच्याशी बोलणे म्हणजे विटंबनाच ती ! ४०
असो हे माया अविद्यासंबंधें ॥ तूंचि जीवेश्वरभेदें ॥
जाहलासी पूर्ण विनोदें ॥ विश्वाकारगा ॥ ४१ ॥
असो. ह्या मायाअविद्येसंबंधाने बाबा ! तूंच जीवेश्वर भेदाने पूर्ण गमतीखातर विश्वरूप झाला आहेस. ४१
हें तुझेचि ऐश्वर्य ॥ तें अनादि माया कार्य ॥
ते माया तूंचि हे आश्चर्य ॥ नवल तुझें ॥ ४२ ॥
हे तुझेंच ऐश्वर्य होय, ते अनादि मायेचें कार्य आहे आणि ती मायाही तूंच. हा तुझा विलक्षण चमत्कार आहे. ४२
राणे हो आपुल्या सखा ॥ तुम्हीच झालेति असखा ॥
हें तुम्हींच नोळखा ॥ यासी कवणें काय कीजे ॥ ४३ ॥
अहो ! महाराज ! आपल्या सुखासाठी तुम्हीच सर्व काही झालां आहां. हें तुमचे तुह्यांलाच समजत नाही, ह्याला कोणी काय करावे ? ४३
तुझियाचि माये गुंतले ॥ अनादिलाघव हें नाथिलें ॥
हें तुज बंधन पडले ॥ वज्ररूप ॥ ४४ ॥
तुझ्याच मायेनें गुरफटलेले हें अनादि मिंध्या लाघव ( हातचलाखी) आहे. हे बंधन तुला वज्ररूप झाले आहे. ४४
जैसे गगनीं आभाळ ॥ ना तरी तरणीं मृगजळ ॥
तैसे नाथिलें आडजाळ ॥ तुज पडिले हें ॥ ४५ ॥
आकाशांत ज्याप्रमाणें आभाळ उठावे, किंवा सूर्यप्रकाशात ज्याप्रमाणें मृगजळ भासावे, त्याचप्रमाणे तूं ह्या नसत्याच जाळ्यांत सांपडला आहेस. ४५
व्याघ्र निजच्छायेसी उफाडे ॥ जैसें भ्याड भ्याड बापुडे ॥
तैसें केलेंसे वेडें ॥ संसारे तुज ॥ ४६ ॥
वाघ खरा; पण त्यानें आपल्याच छायेला दचकून तीन ताड उडावे आणि बिचारा अगदी भेदरून जावा त्याचप्रमाणे ह्या संसाराने तुला अगदी वेडे पिसे करून सोडले आहे. ४६
तरंगाचेनि आटोपें ॥ समुद्र जरी वाशिपे ॥
नातरी शेष हा कांपे ॥ निज फूत्कारीं ॥ ४७ ॥
लाटा आटपल्याबरोबर समुद्र जसा कोरडा ठणठणीत पडावा; किंवा आपल्याच फूत्काराने शेषाला कंप सुटावा; ४७
आपुलीये हाके ॥ सिंह जैसा वचके ॥
नातरी जलधर घाई ॥ निज गर्जनें ॥ ४८ ॥
अथवा आपल्याच गर्जनेनें सिंहाला जशी धडकी भरावी; किंवा आपल्याच गडगडटानें मेघाला धाक बसावा. ४८
निजशक्तीचेनि ओडंबरें ॥ तैसा तूं भुललासी बा रे ॥
येरवीं सकलही कीर रे ॥ तूंचि ब्रह्म ॥ ४९ ॥
त्याचप्रमाणे तुझ्याच शक्तीच्या गारुडानें तुला भूल पडली आहे. बाकी पाहू गेलें तर हें सर्वही तूंच ब्रह्म आहेस. ४९.
तरंगाचेनि बडिवारें ॥ समुद्रचि कीर स्फुरे ॥
परी तरंगाचेनि आकारे ॥ समुद्रचि कीं ॥ ५० ॥
खरोखर मोठ मोठ्या लाटांनी समुद्रच उसळत असतो. परंतु लाटांचा आकारही समुद्रच असतो. ५०
तरंग आपणपें योजी ॥ तरी तोचि कीं समुद्रगाजी
म्हणूनि देहा एवढेपणाची वाजी ॥ तुज नलवी पा तूं ॥ ५१ ॥
लाट आपण होऊनच उठली तरी तो सुप्रसिद्ध समुद्रच होय. म्हणून देहाएवढेपणाचा ( मी देहच आहे असा) आरोप तूं आपणांस लावून घेऊं नको. ५१
देहाएवढेपण ॥ हें आत्मयासी बंधन ॥
ह्मणूनि बुझ परिपूर्ण ॥ परब्रह्म तूं ॥ ५२ ॥
मी देहच आहे असे मानणें हेच आत्म्याचे बंधन आहे. म्हणून तूंच परिपूर्ण ब्रह्म आहेस हे ध्यानांत आण. ५२
देहाचेनि अध्यासें ॥ आत्मया मीपणाचें पिसें ॥
लागले अनादि ऐसें ॥ त्यजूनि सांडावें ॥ ५३ ॥
देहाच्या मिथ्या आरोपाने आत्म्याला मीपणाचे वेड प्रथमच लागले आहे. म्हणून ते टाकून द्यावे. ५३
अगा सर्वही आपण व्हावे ॥ अथवा कांहींच न व्हावे ॥
कांहीच न होऊन असावे ॥ नेणूं काई जे ॥ ५४ ॥
अरे, सर्वच आपण होऊन रहावे किंवा काहीच न व्हावे. परंतु कांहींच न होऊन असावे. म्हणजे काय ते कोण जाणे ! ५४
कांहींच न व्हावया पासाव ॥ सर्वही होणे हे बरव ॥
जेथें सुखदुःखासी वेगळीव ॥ आथीचना ॥ ५५ ॥
म्हणून काहीच न होण्यापेक्षां सर्वच काही होऊन असावें ते उतम ! कारण, सुखदुःखाची भिन्नता म्हणून तेथें नसतेच. ५५
आदि अंती साळी देखिली ॥ मध्यॅ तृणाकार विस्तारिली ॥
परी साळी येणे शब्दें बोलिली ॥ विबुधजनीं ॥ ५६ ॥
आरंभी (पेरतांना) व शेवटीं (धान्य काढून झाल्यानंतर) ही साळी (एक धान्य) च पाहिली, परंतु मध्येंच (पेरल्यानंतर तृणाच्या रूपानें विस्तार पावली. परंतु शाहण्यांनी तिलाही साळी असेंच नांव दिलें. ५६
तैसें आदिअंतीं ब्रह्मचि असे ॥ मध्यें प्रपंचाकार भासे ॥
परी सर्वही ब्रह्मचि असें ॥ वेदीं बोलिजे ॥ ५७ ॥
तसेच आदि अंती ब्रह्मच आहे, परंतु मध्ये मात्र प्रपंचरूपाने भासमान झालें आहे. परंतु वेदांनी सर्वच ब्रह्म असे म्हटले आहे. ५७
जो आपण ब्रह्म झाला ॥ तो प्रपंचातें विचारूं गेला ॥
तंव ब्रह्मचि प्रपंच देखिला ॥ समूळ हा ॥ ५८ ॥
जो स्वतः ब्रह्मस्वरूपच झाला, तो प्रपंचाचा जो विचार करावयास जातो, तो समूळ प्रपंचच ब्रह्मरूप झालेला त्याच्या दृष्टीस पडला. ५८
ब्रह्मवृक्षाचे पोटीं ॥ प्रपंच फळ उठियेलें देठी ॥
तेथें ब्रह्मत्वाची तुटी ॥ कां आणावी गा ॥ ५९ ॥
ब्रह्मरूप वृक्षाचे पोटीं प्रपंचरूप फळ देठाला धरलेले माहे. मग तेथें ब्रह्मपणाची तूट काय म्हणून आणावी ? ५९
हां गा साचेविण ॥ लटिकें नाही ऐसे जाण ॥
तरी तेंचि तें शाहाणे ॥ जाणावें कीं ॥ ६० ॥
अरे ! असें पहा खोटे हे खर्‍यावांचून नाही. म्हणून शहाण्याने तेच ते असे समजावे. ६०
तत्त्वता तूं निराकार ॥ जगज्जीव ईश्वर ॥
ते तुझेचि अंकुर ॥ आनंदकंदाचे ॥ ६१ ॥
तत्त्वत: तूं निराकार आहेस. जगत्, जीव व ईश्वर हे तुझेच आनंदकंदाचे अंकूर होत. ६१
जया बीजाचा अंकुर ॥ आणि तेथून जो विस्तार ॥
सर्वही एक हा निर्धार ॥ विश्वविद तूं ॥ ६२ ॥
ज्या बीजाचा अंकूर आणि त्यापासून झालेला जो विस्तार तो सर्वही एकच, हे अगदीं निश्चित आहे. तूं सार्‍या विश्वाला जाणणारा आहेस. ६२
अहो अंगासी संलग्ने ॥ केश नखें अचेतनपणे ॥
तीं चैतन्यासी वेगळी कवणे ॥ निवडावीं पां ॥ ६३ ॥
अहो ! अंगालाच चिकटून वाढलेली केश व नखें जरी अचेतन असतात, तरी आंतील चैतन्याहून वेगळी म्हणून ती कशी बरे म्हणतां येईल ! ६३
तैसे अचेतन हे निखिल ॥ चैन्यासी नाहीं वेगळ ॥
म्हणूनि ब्रह्मचि केवळ ॥ तूंचि एक ॥ ६४ ॥
त्याचप्रमाणें हे दरोबस्त सर्व अचेतन आहे. तरी ते चैतन्याहून भिन्न नाहीं. म्हणून तूं ते एक ब्रह्मच आहेस. ६४
तंव शिष्ये विनविजे ॥ सर्व ब्रह्म श्रुती बोलिजे ॥
तरी विषयसंगें कां बुडिजे ॥ भवसागरीं ॥ ६५ ॥
तेव्हां शिष्य विनंति करूं लागला कीं 'सर्वं ब्रह्म’ असे श्रुति म्हणते. तर ह्या भवसमुद्रांत विषयसंगानें बुडावयाला कां होते ? ६५
ऐशा आक्षेपीं उत्तर ॥ बोलिजेल सुंदर ॥
ते ऐक तू चतुर ॥ जधिकारभेदे ॥ ६६ ॥
ह्या आक्षेपावर सुंदर उत्तर देण्यांत येईल. हे चतुरा ! ते तूं अधिकाराच्या पायरीप्रमाणे ऐक. ६६
अद्वैतबोधाविण ॥ विषयसंगे पडे बंधन ॥
जैसे निजसस्त्रें मरण ॥ भ्रमितासि गा ॥ ६७ ॥
अद्वैताचा बोध झाला नाही तोपर्यंत भ्रमिष्टाला जसे आपल्याच शस्त्राने मरण यावे तसेच विषयसंगानें बंधन घडावयाचेंच, ६७
जैसी पंथींची सिदोरी ॥ वेगळी विटाळे नानापरी ॥
एकत्व झालिया कुसरी ॥ काय विटाळाची ॥ ६८ ॥
जसी प्रवासातील शिदोरी वेगवेगळी असली म्हणजे ती निरनिराळ्या प्रकारे बटाळते. पांतु ती एक झाल्यावर मग विटाळाची गोष्ट कशाची ? ६८
देहादिक विषयजात ॥ ब्रह्मचि कीर समस्त ॥
तथापि त्यजिती विरक्त ॥ नेति नेति मुखें ॥ ६९ ॥
खरोखर देहादिक सर्व कांहीं विषयजात ब्रह्मरूपच आहेत, तथापि ते 'नेति नेति ' च्या द्वारानें विरक्त जन टाकून देतात. ६९
जे जे वस्तु अनात्मा ॥ ते ते त्यजावी महात्मा ॥
तरी स्वयंप्रकाशात्मा ॥ सहजचि भेटे ॥ ७० ॥
जी जी वस्तु नाशिवंत-(अनात्मा) ती ती हे महात्म्या टाकून यावी. म्हणजे स्बयंप्रकाश आत्मा सहजच भेटतो. ७०.
लवण पाणीयाचा बांध ॥ हा कीर जगीं प्रसिद्ध ॥
परी तृषार्थी सेवितां शुद्ध ॥ मरणचि कीं ॥ ७१ ॥
मीठ म्हणजे पाण्याचें बनलेले, हें तर खरोखर जगामध्ये प्रसिद्ध पाहे. परंतु तान्हेला ते सेवन करूं लागला तर त्याला शुद्ध मरणाचीच पाळी ठेवलेली. ७१
जैसे रायेणाचें भातुकें ॥ आरोगिती कौतुकें ॥
परी भीतरील कडूपण तितुकें ॥ सांडिती कीं ॥ ७२ ॥
जसे कडूवृंदावनाचें फळही मोठ्या आवडीने खातात, पण आंतला कडूभाग असेल तेवढा मात्र टाकून देतात. ७२
जें पाणियाचें लवण ॥ तृषार्थी करी सेवन ॥
तरी तृषेनिमित्त मरण ॥ न चुकेचि कीं ॥ ७३ ॥
तसेच केले म्हणजे बरे, नाहीतर मिठाचे पाणी जर तान्हेला पिलं लागला तर मरण काही चुकवावयाचें नाहीच ! ७३
जयाची तृषा वोळे ॥ उदकें सुशीतळें ॥
मग लवण अतिरसाळ ॥ जिव्हेंद्रियासी ॥ ७४ ॥
ज्याची ताहान गार पाण्यानें शमली त्याला मग मीठ हे जिभेला अतिशयच रसाळ लागतें. ७४
जे महारोगे सदोष ॥ तया मिष्टान्नचि विष ॥
तैसें भवरोगियां अशेष ॥ कुपथ्य हें ॥ ७५ ॥
महारोगाने दूषित झालेल्यांस जसें मिष्टान्न विषाप्रमाणे आहे. तसें भवरोग्यास विषयासक्त असणे हे कुपथ्य आहे. ७५
ह्मणूनि सर्वस्व सांडावें ॥ उत्तम विरक्त व्हावे ॥
ईश्वरातें धरावे ॥ अनन्यभावें ॥ ७६ ॥
ह्मणून सर्वस्व टाकून-द्यावें; उत्तम विरक्त व्हावें; आणि अनन्य भावाने ईश्वराच्या चरणी लागावे. ७६
करावा विषयाचा त्याग ॥ धरावा साधूचा संग ॥
रागद्वेषाचा प्रसंग ॥ घडूंचि न द्यावा ॥ ७७ ॥
विषयांचा त्याग करावा; साधूंची संगति घरावी; रागद्वेषाचे तर नांवच सोडून यावे. ७७
वेद शास्त्र पुराण ॥ साधुमुखें निरूपण ॥
ते करावें श्रवण ॥ विवेकदृष्टी ॥ ७८ ॥
वेद, शास्त्रें, पुराणे यांचे साधुमुखाने निरूपण विवेकपूर्वक ऐकत जावे. ७८
विवेकवित्पत्तीस कारण ॥ अन्यथा नाहीं साधन ॥
जें वेदांतश्रवण ॥ साधुमुखें ॥ ७९ ॥
विवेक हाच व्युत्पत्तीला (आत्मज्ञानविवरणाला) कारण आहे, आणि साधुमुखानें वेदांतश्रवण करण्यावांचून त्याला दुसरे साधनच नाहीं. ७९.
नित्य तो परमात्मा ॥ अनित्य प्रपंच अनात्मा ॥
विवेक बोलिजे महात्मा ॥ वेदांतशास्त्रीं ॥ ८० ॥
परमात्मा हा नित्य आहे. प्रपंच हा अनात्मा असून अनित्य आहे. हा विवेक महात्म्या वेदांतशास्त्रांत सांगितला आहे. ८०
भक्ति ज्ञान वैराग्य ॥ हे श्रवणाचे सौभाग्य ॥
भवरोगियासी आरोग्य ॥ येणेंचि कीं ॥ ८१ ॥
भक्ति, ज्ञान, आणि वैराग्य हेंच श्रवणाचें सौभाग्य होय. ह्यानेंच संसारव्याधिग्रस्तांना आरोग्य प्राप्त होतें. ८१
म्हणूनि साधूचेनि मुखे ॥ श्रवण करावे विशेषें ॥
आणि हित प्रौढी न देखे ॥ विवेकार्थी पैं ॥ ८२ ॥
म्हणून विशेषेंकरून साधूच्या मुखानेच श्रवण करावे. आणि जो विवेकार्थी असतो तो यांत अभिमान असा ठेवीत नाही. ८२
द्रव्य स्त्रीचे अभिलाषे ॥ साधू नेणों काय भुंके ॥
म्हणूनि तयाचेनि मुखें ॥ श्रवण न करावे गा ॥ ८३ ॥
ओ! द्रव्य व स्त्री यांच्या अभिलाषाने साधु कसकसा बहकूं लागेल तें सांगतां येत नाहीं. म्हणून अशांच्या मुखाने श्रवण करीत जाऊं नये हो. ८३
जया रसाची आवडी ॥ श्रोतयांचे चित्तीं जफुडी ॥
वक्ता तेंचि बडबडी ॥ अभिलाषे पैं ॥ ८४ ॥
श्रोत्याच्या चिंतांत ज्या रसाची खरोखर आवड असते तेच अभिलाषानें वक्ता बडबडत असतो. ८४
रसरंगीं बोलते ॥ अभिलाषती जे वक्ते ॥
महारसाळातें ॥ ते बहिर्मुख कीं ॥ ८५ ॥
जे आशाळभूत वक्ते रसाचा आविर्भाव आणून अत्यंत रसाळ भाषणे करतात, ते बहिर्मुख होत. ८५
श्रोतयाचे चित्त बावरे ॥ तेउतेंचि तो व्यापारे ॥
तयाचे चालणें बारे ॥ काय करावे ॥ ८६ ॥
श्रोत्याच्या चित्तवृत्ति हलून जातील एवढेच कर्तव्य तो करीत असतो. अरे बाबा ! अशांचे भाषण काय कामाचे बरे ? ८६
वैषयीक बोलते ॥ घरोघरी बोलती वृत्तें ॥
भाट नागरीक ऐसे ते ॥ ओळखावे गा ॥ ८७ ॥
विषयपर भाषणे करणारे म्हणजे घरोघरी जाऊन भाकिते सांगणारे भाट नागरिकच ते होत असें समजावे. ८७
एकाचें निरूपण ऐकिजे ॥ थितिया स्वानुभवा मुकिजे ॥
संदेहसागरीं बुडविजे ॥ ते ऐकूं नको ॥ ८८ ॥
कोणाचे निरूपण ऐकावयाला जावे तो आपण तेवढेच स्वानुभवाला मुकतो, आणि संशयसमुद्रांत बुडतो. म्हणून ते कानांवर पडूं देऊं नको. ८८
साधू होय भीडखोर ॥ तोचि तयासी अपराध थोर ॥
यथार्थ सांडूनि उच्चार ॥ जरी बोलेल तो ॥ ८९ ॥
यथार्थ बोलावयाचें ते टाकून जर भलताच उच्चार करील तर साधू भिडस्त असणें हाच त्याचा मोठा अपराध होय. ८९
रोगियासी अपम्याची चाड ॥ वरी दैव करी भीड ॥
तेथे रोगनिवृत्तीचें कोड ॥ काय करूं येईल ॥ ९० ॥
रोग्याला अपथ्याची हौस असतेच. आणखी त्यांत वैद्यही जर भीड घालूं लागला तर मग व्याधिनिवारणाचे कौतुक काय विचारावे. ९०
हाणोनि भक्ति ज्ञान विरक्ती ॥ जिये शास्त्रीं उपपादिती ॥
तिये बोलावी संतीं ॥ यथार्थ वादे ॥ ९१ ॥
म्हणून ज्या शास्त्रांमध्ये भक्ति, ज्ञान, व विरक्ति ह्यांचे प्रतिपादन केलें आहे, त्यांचेंच संतांनी यथार्थ भाषणे करून निरूपण करावे. ९१
अगा शास्त्रें अनेकें ॥ असती संदेहकारकें ॥
परी अद्वैत प्रति‌पादके ॥ ऐकावी पां ॥ ९२ ॥
अरे! संशय उत्पन्न करणारी अनेक शास्त्रे आहेत. परंतु अद्वैताचे प्रतिपादन करणारी जेवढी असतील तेवढींच आपण ऐकावी. ९२
अद्वैत शास्त्रश्रवणें ॥ इंद्रिये होती प्रवीणें ॥
तरी ज्ञानाधिकार पावणे ॥ अनायासे ॥ ९३ ॥
अद्वैत शास्त्रांच्या श्रवणाने इंद्रिये तरबेज होतात आणि मग आपोआपच ज्ञानाच्या अधिकारास पोंचतात. ९३
तत्वत: अद्वैतचि असे ॥ द्वैत नाथिलेंच आभासे ॥
तें मूढजनासी साच ऐसे ॥ वाटतसे पैं ॥ ९४ ॥
तत्वत: सारे अद्वैतच आहे. द्वैत हा नसताच भास आहे. परंतु काय पहा, ते मूढजनांना खरेच आहे असें वाटत आहे. ९४
मी अनंतु अभिन्न ॥ तो तेणेसीं मानितसे भिन्न ॥
ऐसें अज्ञानवश मूढ जन ॥ उपदेशित असे ॥ ९५ ॥
मी अनंत अभिन्न खरा, परंतु तोच त्याच्यायोगाने भिन्न मानतात. अज्ञानवश मूढजन जे आहेत ते असा उपदेश करीत सुटतात ९५,
श्वानसूकराचिया दृष्टी ॥ भिन्नपरस्परें सृष्टी ॥
परी जाणतयाची हेचि गोष्टी ॥ हा विस्मय पैं ॥ ९६ ॥
श्वान (कुत्रा) सूकर (डुक्कर) ह्यांच्या दृष्टीने (सृष्टि) परस्पर भिन्न आहे, परंतु जाणत्याचीही तीच गत पाहून विस्मय होतो. ९६
आधींची अनुचित मती ॥ तेंचि गुरु उपदेशिती ॥
उभयतांसी एकचि गति ॥ हें प्रसिद्ध कीं ॥ ९७ ॥
आधींच बुद्धि खोडसाळ असते, आणि त्याचाच उपदेश गुरु करतात, मग काय ? दोघांनाही एकच गति मिळवयाची हें उघडच आहे. ९७
तथापि पूर्वाभ्यास ॥ अन्यत्र होऊं नेदी विश्वास ॥
तरी अद्वैतीं प्रवेश ॥ तयाशी केवीं घडे ॥ ९८ ॥
मग पूर्वींचाच असा अभ्यास असला आणि इतरत्र विश्वास ठेविला नाहीं तर तेथें अद्वैताचा शिरकाव कसा व्हावा ! ९८
पूर्वाभ्यास बळें ॥ देखून याची दृष्टी मावळे ॥
ते राजपंथ सांडूनि आंधळे ॥ जाती अन्यमार्गें ॥ ९९ ॥
पाहिल्या अभ्यासाच्या योगानें डोळस असून त्याची दृष्टि नाहीशी होते. अशी मंडळी ह्मणजे राजमार्ग सोडून आडमार्गाने जाणारे आंधळेच म्हटले पाहिजेत. ९९
ह्मणूनि तयाचे अनुचिता ॥ न मानावें जाणतां ॥
पूर्वकर्में स्वतंत्रता ॥ हरितली कीं ॥ १०० ॥
म्हणून त्याच्या खोडसाळपणाकडे शहाण्याने मुळींच पाहू नये. त्याच्या पूर्वकर्मांनीच त्याची स्वतंत्रता नाहीशी केली (ह्मणजे तो पूर्ण बंधन पावला.) १००.
द्वितीयाद्‌भयं भवति ॥ ऐसी ही बृहदारण्यक श्रुती ॥
द्वैतातें असे निंदिती ॥ म्हणूनि सांडवे ते ॥ १०१ ॥
''द्वितीयाद्‌भयं भवति'' अशी बृहदारण्यक श्रुति आहे. तिने द्वैताचा धिक्कार निषेध केला आहे. म्हणून तें टाकून द्यावे. १०१
पूर्वपुण्याचेनि लवलाहें ॥ ईश्वराचेनि अनुग्रहे ॥
तुज लाधलें अकस्मात हें ॥ ब्रह्मज्ञान गा ॥ १०२ ॥
अरे पुण्याच्या जोराने, व परमेश्वराच्या कृपाप्रसादाने तुला ह्या ब्रह्मज्ञानाचा अकस्मात् लाभ घडला. १०२
कवण एक उद्यमेंविण ॥ सहसा देखे निधान ॥
तयाचे दैवास कवण ॥ हेवा करी ॥ १०३ ॥
काही एक खटपट केल्यावांचूनच अकस्मात् ठेवा हातास आला. तर त्याच्या दैवाचा हेवा कोण बरे करील. १०३
अगा तुझेनि दैवें ॥ कवणासी उपमावे ॥
हे सर्वज्ञ तें व्हावें ॥ तुजचि साजे ॥ १०४ ॥
अरे ! तुझ्या भाग्याला कशाची उपमा द्यावी. ही सर्वज्ञता प्राप्त व्हावी, हें तुलाच शाभते ! १०४
पूर्वजन्मींचा योगभ्रष्ट ॥ आतां जगीं तूंचि एकनिष्ठ ॥
योगसाम्राज्य शेष पाट ॥ तुजचि साजे ॥ १०५ ॥
पूर्व जन्मांतला तूं योगभ्रष्ट योग अर्धाच राहिलेला, आहेस. आतां जगामध्ये तूंच एक एकनिष्ठ योगरूप साम्राज्याच्या शेषाची गादी एक तुलाच शोभते. १०५
जैसा कस्तूरियेचा निकरा ॥ तेथें परिमळाचा उबारा ॥
तैसा ज्ञानी शिष्य वरा ॥ जन्मलासि तूं ॥ १०६ ॥
जसा कस्तुरीचा सडा असला की तेथें सुवासाची मजा ही असावयाचीच. त्याचप्रमाणे तूही फार उत्तम ज्ञानवंत शिष्य जन्मला आहेस. १०६
हां गा सूर्याचा प्रकाश ॥ कवणेंसी न करी सहवास ॥
परी सूर्यकांतासी बहुवस ॥ प्रकटेचि कीं ॥ १०७ ॥
अरे ! असे पहा ! सूर्यप्रकाशाचा सहवास कोणाला म्हणून नाही ? सर्वांसच आहे. परंतु तो सूर्यकांताच्या ठिकाणी फारच दिसून येतो. १०७
असो चंद्राचे अमृत कर ॥ विश्वातें निवविती कीर ॥
परी अमृताचे पाझर ॥ चंद्रकांतीचीं ॥ १०८ ॥
असो. चंद्राचे अमृतमय किरण सर्व विश्वाला गार करतात हे खरे, परंतु अमृताचे पाझर फुटतात ते चंद्रकांताच्याच ठिकाणी. १०८
श्रीगुरूचिया कृपादृष्टी ॥ तुज स्वरुपासी झाली भेटी ॥
म्हणूनि तुमी गाष्टी ॥ नवल पै ॥ १०९ ॥
श्रीगुरूंच्या कृपादृष्टीनें तुला स्वरुपाची भेट झाली. म्हणून तुझी गोष्ट मोठी विलक्षण आहे. १०९
देहादीक हा प्रपंच ॥ जीवासी मानला साच ॥
तो मुमुक्षें उंच नीच ॥ निरसावा गा ॥ ११० ॥
देहादिक हा जो प्रपंच तो जीवाला खरासा वाटतो आहे म्हणून तो मुमुक्षूने श्रेष्ट आहे की, कनिष्ठ आहे, याचा संशय फेडावा. ११०
क्षीरामध्ये गत ॥ जैसे निवडिजे घृत ॥
तैसें चैतन्य सर्वगत ॥ निवडावे पैं ॥ १११ ॥
दुधामध्ये असलेले तूप जसे घुसळून काढावे लागतें, त्याप्रमाणे सर्वगत चैतन्यही निवडून काढावे. १११
तंव शिष्यांचा राणा ॥ लागुनि श्रीगुरुचरणा ॥
मग काय विज्ञापना ॥ करिता झाला ॥ ११२ ॥
नंतर शिष्यराजानें श्रीगुरूचे पाय धरून दिनंति केली. ११२
गज कमलतंतुवे बांधला ॥ कीं वायु बचके धरिला ॥
तैसा आत्मा आवरला ॥ प्रपंचे हा ॥ ११३ ॥
कमलतंतूंनी ज्याप्रमाणे हत्तीला बांधावा, किंवा वायु बचकेत धरावा, त्याचप्रमाणें त्या प्रपंचाने आत्म्यास बंधन केले आहे. ११३
सूर्य तमातें व्याला ॥ तेणेंचि तो आवरला ॥
तैसा प्रसंग घडला ॥ आत्ययासी जी ॥ ११४ ॥
महाराज, सूर्यापासून अंधार क्षाला, आणि त्या अंधारानेच सूर्याला झाकून टाकावे, अशापैकीच ही आत्म्याची गोष्ट झाली. ११४
भिरुड लागे मणिस्तंभा ॥ कीं अग्नीसी वोळंबा ॥
तैसी आत्ययासी भांबा ॥ अज्ञानाची ॥ ११५ ॥
रत्‍नखचित खांबाला वाळवी लागली, किंवा अग्नीला ओल आलें, अशांपैकीच आत्म्याला ही अज्ञानानी भ्रांति आहे. ११५
आत्मा स्वयंप्रकाश ॥ जेणे जन होय डोळस ॥
नवा डोळयां डोळवस ॥ हें आश्चर्य जी ॥ ११६ ॥
आत्मा हा स्वयंप्रकाश आहे म्हणजे त्याच्या योगानें सर्वजन डोळस होतात. मग महाराज त्या डोळसाला डोळसपणा हें मोठेच आश्वर्य आहे. ११६
परी राउळें जें निरूपिलें ॥ ते अनुभवासी आले ॥
अज्ञान वृथाचि उठिलें ॥ नसूनि हें ॥ ११७ ॥
परंतु स्वामींनी मला सांगितलें ते प्रत्ययास उतरले हें अज्ञान खरोखर नसून मिश्याच उद्‌भवलें आहे. ११७
स्वरूपी दुश्चितपण ॥ तेंचि रूढलें अज्ञान ॥
जेणे आत्मा स्वतंत्रपण ॥ निज विसरे ॥ ११८ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी चित्त चळलें म्हणजे तोच अज्ञानाने तळ दिला म्हणून समजावे. त्याच्यामुळें आत्मा आपलें स्वतंत्रपण विसरून जातो. ११८
राज्याचेनि गाहाळें ॥ जैसा राव हारंबळे ॥
तेथें राणिवेचे सोहळे ॥ ते अन्यमुखें ॥ ११९ ॥
जसे हातचे राज्य गेलें क्षणजे राजा हाय ! हाय ! करूं लागतो, तेथें राज्यसुखाचे सोहळे ऐकावयाचे म्हणजे दुसर्‍याच्या तोंडून ! ११९
तैसें निजसुखें निवालेपणे ॥ आत्मयासी स्वयेंचि भुलणें ॥
तेणेचि अज्ञानें ॥ आवरला तो ॥ १२० ॥
त्याचप्रमाणे निजसुखाची आठवण बुजली म्हणजे आत्मा आपणच आपल्याला विसरतो, आणि त्याच अज्ञानाचे त्याला आवरण घडते. १२०
जैसें बाबुळेचें रळ ॥ उदकचि निर्मळ ॥
तेथील गोडी हिरूनि खडुळ ॥ करी तयातें ॥ १२१ ॥
जसें निर्भेळ पाणी हेच शेवाळाला मूळ आहे खरे, परंतु ते तेथची गोडी कमी करून त्या अगदी गढूळ करून सोडते, १२१
तैसी आत्मयाच्या आंगीं ॥ अज्ञानशक्ती तन्वंगी ॥
उठूनि तयातें आळंगी ॥ तो न सुटेचि जैसा ॥ १२२ ॥
त्याचप्रमाणे आत्म्याच्या अंगी अज्ञानरूप शक्ति सुंदरी उत्पन्न होऊन ती त्याला असें घट्ट आलिंगन देते की, त्यातून त्याला सुटतांच येऊ नये. १२२
तयेचेनि आलंबे ॥ तो तयासी न विसंबे ॥
आपणपें करी उभे ॥ तयेसी तो ॥ १२३ ॥
तिच्या नादानें तो तिला मुळींच विसंवत नाहीं. (ती जात असली तर) तो तिला आपण होऊनच उभी करतो. १२३
तयेच्या गुणी भुलला ॥ आपण तोचि झाला ॥
ऐसा घराचार मांडला ॥ दोघांतयां ॥ १२४ ॥
तिच्या नादानें अगदीं वेडावला, आपणही तन्मयच होऊन राहिला. असा त्या दोघांनी घराचार आरंभिला. १२४
ते सगुण वनिता ॥ तो निर्गुण भर्ता ॥
परी दोघांची एकोपजीविता ॥ नवल हें पैं ॥ १२५ ॥
ती सगुण स्त्री, व तो निर्गुण भर्ता होय. (अशी ही विजाती असतां) ती उभयतांही अगदी एकजीव झालेली आहेत हे मोठे आश्चर्य आहे १२५
ते ना तो ओळखिए ॥ येरयेरां होऊनि असिजे ॥
आतां कैसे सुटिजे ॥ आत्मयासी ॥ १२६ ॥
ती कां तो हे मुळींच ओळखता येत नाही. एकमेकांस एकमेक होऊन राहिली आहेत. आतां आत्म्याला ती कशी सुटणार ? १२६
पुरुषाचेनि संगे सुंदर ॥ जाहली ते गरोदर ॥
पंचवीस कुमर ॥ प्रसवती झाली ॥ १२७ ॥
पुरुषा (आत्मा) च्या संगाने ती सुंदरी गरोदर झाली. आणि पंचवीस पुत्र प्रसवली. १२७.
प्रकृतीया मिथ्या दृष्टी ॥ रचून विविध देहकुटी ॥
तो घररिघवणी परीपाठी ॥ करिता झाला ॥ १२८ ॥
प्रकृतीच्या मिथ्या दृष्टीखाली (नजरेखाली) नानाप्रकारच्या देहरूप झोपड्या तयार करून घरांत राहून घरचा कारभार पाहू लागली. १२८
पुत्राचेनि स्नेहे मोठे ॥ आपुले कांहींच नवटे ॥
तयेसी जें गोमटे ॥ तेंचि करी ॥ १२९ ॥
मुलांच्या ममतेने लाड कौतुक करण्यापुढे आपलें कांहीच पहात नाही. तिला जे गोड दिसेल तेच करित मुटतो. १२९
ते जेथें जेथें जाय ॥ तो तियेवीण न राहे ॥
ऐसा पुत्रकलत्राचेनि मोहे ॥ वेष्टला जी ॥ १३० ॥
ती जेथे जाईल तेथे तेथे हा तिच्या मागून जातो. तिच्यावेगळा एक पळभरही रहात नाही. अशाप्रकारे हा बायकामुलांच्या मोहपाशांत गुरफटला आहे. १३०
तयांचे भरण पोषण ॥ करितां संभवे दूषण ॥
तेणें पावे जन्ममरण ॥ नाथिलेची ॥ १३१ ॥
त्यांचे लालन पालन करतां करतां दोष उद्‌भवतात, त्यामुळे नसनेंच जन्ममरण प्राप्त होते. १३१
मग स्वर्गनरक हिंडे ॥ मागुतां गर्भवासी पडे ॥
प्रकृतिसंगें पवाडे ॥ जीवात्मयासी ॥ १३२ ॥
मग स्वर्गात व नरकांत फेरी घेऊन येतो व फिरून गर्भवासांत पडतो. अहो ! त्या प्रकृतीच्या संगाने ह्या जीवात्म्याचे असे पवाडे होतात. १३२
असतें शिवत्व गेलें ॥ नाथिलें जीवत्व आलें ॥
यापरी राणे हो बुडाले ॥ भवसागरीं ॥ १३३ ॥
असलेले शिवपण गेले आणि नसतेच जीवपण अंगास लागले. ह्याप्रमाणें महाराज ! संसारसमुद्रांत बुडावे लागले. १३३
मेलाचि मरूं न लाहे ॥ गेलाचि जाऊं न साहे ॥
जियालाचि जीऊं न लाहे ॥ कर्म कर्मवशें ॥ १३४ ॥
पूर्वकर्मांच्या योगानें असें दहोऊन जातें की मेला तरी मरता येत नाही; गेला तरी जातां येत नाही, आणि जिवंत झाला तरी जिवंत राहतां येत नाही ? १३४
ऐसा परवशता पावला ॥ दुःखानळें पोळला ॥
संसारिया झाला ॥ प्रकृतिसंगें ॥ १३५ ॥
अशाप्रकारे या प्रकृतिसंगानें हा परतंत्र झाला, दुःखाग्नीनें होरपळला, आणि संसार ह्याच्या पाठीस लागला. १३५
ऐसिया जीवाचिया कोडी ॥ असती संसारबांदवडीं ॥
त्याचिये सुटिकेची प्रौढी ॥ देवेंचि दाखवावी ॥ १३६ ॥
ह्या संसाररूप बंदिशाळेंत असे कोटीच्या कोटि जीव आडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेचा उत्तम उपाय रेवानेच दाखवावा. १३६
हा संगत्याग करावा ॥ संन्यास उपदेशावा ॥
बंधमोक्ष करावा ॥ जीवासि जी ॥ १३७ ॥
हा संग त्याग करून संन्यासाचाच उपदेश करावा, आणि जीवांस बंधनांतून मुक्त करावे. ३७
बाह्य कीर कुटुंब सांडे ॥ परी अभ्यंतरीं घराचार मांडे ॥
तरी मी संन्यासी येणे बंडें ॥ संज्ञास न घडे ॥ १३८ ॥
बाह्यकुटुंब खरोखर सोडून दिलें, परंतु अंतरांतला प्रपंच चाललाच आहे. आणि ''मी संन्यासी'' ''मी संन्यासी'' म्हणून बंड माजविले तर तो कांही संन्यास नव्हे. १३८
जेथे स्थूळ देह न संडे ॥ तेथें अंतरत्याग न घडे ॥
तो संन्यासु नावडे ॥ च्‌तुरांशीं ॥ १३९ ॥
जेथें स्थूल देह गेला नाही तेथे अंतरत्यागही होत नाहीं. तो संन्यास कांहीं शहाण्यांना रुचणारा नव्हे. १३९
बाह्यकुटुंब संहारे ॥ तयाचा स्थूळ देह मरे ॥
परी अंतरकुटुंब न संहारे ॥ विवेकाविण ॥ १४० ॥
बाह्यकुटुंब (प्रपंच) संहार पावले कीं त्वाचा स्थूल देहच पडला गम्हणावयाचा ! कारण स्थूलदेह आहे तोपर्यंत बाह्यप्रपंच आहेच. परंतु अंतर कुटुंब (अंतर प्रपंच) जे आहे ते विकावांचून नाशास जात नाही. १४०
कुटुंब किर बिघडे ॥ एतावता संन्यास घडे ॥
म्हणूनि असतांचि हें सांडे ॥ तो संन्यासी गा ॥ १४१ ॥
कुटुंब गेल्यावर खरोखर कसा तरी संन्यास घडतोच पण तो संन्यास का ? नव्हे. म्हणून सर्व कांहीं असतांनाच मनानें जो हें सर्व सोडील तोच संन्यासी होय. १४१
तरी सर्वही न्यासावे ॥ महावाक्या उपदेशावे ॥
जीवातें ब्रह्म करावे ॥ तदात्मबोधें ॥ १४२ ॥
तर सर्वांचाही (मनाने) न्यास करावा; महावाक्याचा बोध ध्यावा; आणि तदात्मबोधानें जीवाला ब्रह्म करून सोडावे. १४२
तत्त्वतः जो शिव ॥ वृथाचि झाला जीव ॥
तयासी त्याचा उगव ॥ दाखवावा ॥ १४३ ॥
तत्त्वत: जो शिव असून मिथ्याच जीवपणास आला आहे, त्याला त्याचा उगम दाखवून द्यावा. १४३
प्रपंच वैरी मारावा ॥ अथवा आपुलासा करावा ॥
सुकाळ होऊ द्यावा ॥ ब्रह्मविद्येचा ॥ १४४ ॥
प्रपंचरूप शत्रूचे निर्दाळण करावें, किंवा त्याला आपल्या कबजांत घ्यावा; आणि (मग) ब्रह्मविद्येचा सुकाळ करून सोडावा. १४४
ऐसें शिष्यें विनविलें ॥ तेथें पूर्वार्ध संपलें ॥
र्श्रामुकुंदमुनि बोले ॥ राजयोगी ॥ १४५ ॥
ह्याप्रमाणे शिष्यानें विनंती केली. श्रीमुकुंदमुनी राजयोगी म्हणतात, येथें पूर्वार्धाचा भाग संपला. १४५
प्रणवपंचीकृत्ये ॥ येथें विस्तारिली सविश्रुतें ॥
महावाक्य उपदेश ग्रंथें ॥ उत्तरार्धी ॥ १४६ ॥
प्रणवासह पंचीकरणाचा ह्या पूर्वार्धामध्यें उत्तम विस्तार केला आहे. तत्त्वमस्यादि महावाक्याचा विस्तार उत्तरार्धात केला जाईल. १४६
शंकरोक्ती वरी ॥ मी बोलिलो मराठी वैखरी ॥
म्हणूनि निर्धारावी चतुरीं ॥ शास्त्रबुद्धी १४७
श्रीशंकराच्या भाषणावर मी मराठी भाषेंत बोललो. ह्मणून शाहण्यांनी शास्त्रबुद्धीचा पडताळा पहावा. १४७
असो युक्तीचेनि प्रसंगें ॥ शास्त्रातें ह्मणती उगे ॥
तरी माझे बोल वाउगे ॥ कां होतील ॥ १४८ ॥
असो. युक्तीच्या प्रसंगांनी शास्त्रांना जर चुप बसवूं लागलें तर माझे बोल व्यर्थ कां होतील बरे? १४८
जैसें आपुलेनि पवित्रपणें ॥ लक्ष्मीसी आणिलें उणें ॥
म्हणूनि मस्तकी नारायणे ॥ तुलसी वंदिजे ॥ १४९ ॥
जशी आपल्या पवित्रपणानें लक्ष्मीलाही उणेपणा आणला म्हणून श्रीनारायणांनीं तुळशीला शिरसा वंद्य केली. १४९
विवेकसिंधुभीतरीं ॥ जो मुमुक्षु अवगाहन करी ॥
तयासी भेटे श्रीहरी ॥ साक्षात्कारें करूनी ॥ १५० ॥
त्याचप्रमाणे-! विवेकसिंधूनें शास्त्रांनाही उणेपणा आणला म्हणून- जो ह्या विवेकसिंधूमध्यें बुडी मारील, त्याला श्रीहरि साक्षात्कारेंकरून भेट देतील १५०
विवेकसिंधूचीं शब्दरत्‍नें ॥ कंठीं धरिजे प्रयत्‍नें ॥
तरी जनकाचेनि महिमानें ॥ श्लाघ्यता पावे ॥ १५१ ॥
विवेकसिंधूंतील शब्दरत्‍नें जो कोणी प्रयत्‍न करून कंठीं धारण करील त्याला जनकाच्या बरोबरीने योग्यता प्राप्त होईल. १५१
लवणसमुद्रींचीं मुक्तें ॥ भूषणें कीर होती समस्तें ॥
तरी मुक्तत्व भूषितयातें ॥ विवेकसिंधूचेनी ॥ १५२ ॥
खार्‍या समुद्रातील सर्व मुक्तें म्हणजे मोत्यें जर खरोखरी भूषण होतात; तर भूषितांना (म्हणजे या ग्रंथानें जे ज्ञानभूषित झाले आहेत त्यांना) ह्या विवेकसिंधूच्या योगानेही मुक्तत्व ( मुक्तत्व पक्षी मोत्याचें -भूषण किंवा येथे बंधनमोक्ष) प्राप्त झालेच पाहिजे. १५२
विवेकसिंधूचे पूर्वार्ध ॥ क्षीरसिंधूचेनि अगाध ॥
तेथें निर्गुण निजबोध ॥ भेटी विष्णुरूपे ॥ १५३ ॥
हे विवेकसिंधूचे पूर्वार्ध क्षीरसिंधुहूनही खोल आहे. कारण येथे विष्णुरूपाने निर्गुण निजबोधाची भेट होते.
मज श्वासनिमेषाचा श्रम ॥ तेथें कायसा या ग्रंथाचा उद्यम ॥
परी फळला मनोधर्म ॥ सदैवांचा ॥ १५४ ॥
मला हा श्रम ह्मणजे केवळ श्वासनिमेषाइतका आहे. तेथें ह्या ग्रंथाचे सायास ते काय ? परंतु हा भाग्यवंतांचा मनोधर्मच फळास आला आहे. १५४
नृसिंहाचा बल्लाळ ॥ त्याचा कुमर जयंतपाळ ॥
नेणें करविला गदारोळ ॥ ग्रंथरचनेचा ॥ १५५ ॥
नृसिंह राजाचा बल्लाळ, व बल्लाळाचा पुत्र जयंतपाळ राजा त्यानें हा ग्रंथरचनेचा गदारोळ - भीमगर्जना करविला. १५५
भगीरथाचेनि दैवयोगें ॥ विश्व सुस्नात गंगे ॥
तैसें जयंतपाळाचेनि प्रसंगे ॥ जग सुखिया होय ॥ १५६ ॥
भगीरथाच्या दैवयोगानें विश्व गंगेत न्हाले, त्याचप्रमाणे जयंतपाळाच्या-भाषण- प्रसंगाने जग सुखी झाले आहे. १५६
म्यां आपुली निजवाणी ॥ पवित्र केली इही वचनी ॥
ते प्रीति पावो पिनाकपाणी ॥ श्रीमुकुंदराज म्हणे ॥ १५७ ॥
मुकुंदराज म्हणतात, मी आपली निजवाणी ह्या वचनांनी पबिल केली. त्याच्या योगाने पिनाकपाणी शंकर संतोष पावोत. १५७
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
सर्वंब्रह्म इति विवरणं नाम सप्तमप्रकरणं समाप्तम् ॥
श्रीमत्सच्चिदानंदगुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥

GO TOP