॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

उत्तरार्ध

॥ प्रकरण २ रे ॥


॥ कारणदेह निरसन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥



देहद्वयातें देखतां ॥ देहद्वय नव्हसी सर्वथा ॥
नेणें तुझे निरसले तत्त्वतां ॥ विपरीतज्ञान ॥ १ ॥
दोन्ही देह पाहूं गेले असतां दोन्ही देह तूं मुळीच नव्हेस. तेणेंकरून तुझें विपरीत ज्ञान (भ्रम) तत्वतः नाहीसे झालें. १
जें देहद्वयाने व्याले ॥ देहद्वय मी ऐसें जेणे भुलविले ॥
तें अन्यथाज्ञान निरसले ॥ विलक्षण साक्षित्वें ॥ २ ॥
जें दोन्ही देहांना प्रसवलें, आणि तें मी असे ज्याने बेड लावलें, तें विपरीत ज्ञान विलक्षण (वेगळेंच) साक्षित्वाने नाश पावले. २
निरसलें अन्यथाज्ञान ॥ तेथींचे निरसले नव गुण ॥
तेंचि कैसे कवण ॥ सांगिजेल ॥ ३ ॥
विपरीत ज्ञान नाश पावलें म्हणजे तेथले नऊही गुण नाश पावले. आतां ते नऊ गुणच कोणकोणते व कसे ते सांगण्यांत येईल. ३
बुद्धि सुख दुःख प्रयत्न ॥ इच्छा द्वेष संस्कारण ॥
पुण्य पाप हे नव गुण ॥ बोलिजेती ॥ ४ ॥
बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा, द्वेष, संस्कार पुण्य व पाप ह्यांना नऊ गुण असे म्हणतात. ४
यांचा विनाश हाचि मोक्ष ॥ ऐसा वैसेषिकांचा पक्ष ॥
परी अज्ञान निरासेंवीण नव्हे अपरोक्ष॥ आत्मसाक्षात्कार ॥ ५ ॥
ह्यांचा नाश तोच मोक्ष, असा वैशेशिकांचा पक्ष आहे. परंतु अज्ञानाचा नाश झाल्यावांचून अपरोक्ष आत्मसात्क्षाकार होत नाही. ५
आत्मयासी देहद्वयबंधन ॥ तया अज्ञानचि मूळकारण ॥
म्हणूनि अज्ञाननिवृत्तीविण ॥ मोक्ष कैंचा ॥ ६ ॥
आत्म्याला दोन्ही देहांचे बंधन असून त्याला मूळकारण अज्ञान हेंच आहे.म्हणून अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय मोक्ष कोठून आणावा. ६
जंव अज्ञान न फिटे ॥ तंव संसार निःशेष न तुटे ॥
विपरीतज्ञानाचा कोंब फुटे ॥ मागुता म्हणुनी ॥ ७ ॥
जोपर्यंत अज्ञान नाहीसें झालें नाहीं तोपर्यंत संसार अगदीं सुटला असे होत नाहीं. कारण, विपरीत ज्ञानाचा फिरून तेथें अंकुर फुटतो. ७
तया आत्मयाचें अज्ञान ॥ फिटावया नाहीं साधन ॥
एक स्वस्वरूपपरिज्ञाना ॥ वांचूनियां ॥ ८ ॥
त्या आत्म्याचे अज्ञान नाहींसें व्हावयाला एका स्वस्वरूपाच्या ज्ञानावांचून दुसरे साधन नाहीं. ८
जेणें स्वरूपज्ञान न प्रकाशे ॥ तेंचि अज्ञान जाणिजे कसें ॥
ऐसें म्हणसी तरी पुसों प्रसंगवशें ॥ तें सांग पा तूं ॥ ९ ॥
ज्याने स्वस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश पडत नाही तेंच अज्ञान हें कसें समजावें ? असे म्हणशील तर ओघानुसार मी एक तुला विचारतो तें सांग पाहूं ? ९
देहद्वयासी विलक्षण ॥ तो तूं सांगपा आपण कवण ॥
जो स्थूलसूक्ष्मप्रपंचाचा जाण ॥ तूंचि एक ॥ १० ॥
दोन्ही देहांहून भिन्न, स्थूल व सूक्ष्म प्रपंच जाणणारा जो तूंच एक, तो तूं स्वतः कोण तें आधी सांग पाहूं ? १०
देहद्वयातीत मी हे जाणिव ॥ ते तुझिया प्रकाशाची वाटिव ॥
तरी अमुकाचि मी स्वयमेव ॥ तो सांग कवण तूं ॥ ११ ॥
दोन्ही देहांहून भिन्न तो मी हें नुसतें जाणीव झाले, तो तुझ्या प्रकाशाचाच अंश होय. तथापि अमकाच तो खुद्द मी, तो तूं कोण, तें मला सांग. ११
ऐसें बोलिले श्रीगुरुनाथ ॥ तंव शिष्य झाला विचारस्थित ॥
म्हणे देहद्वयातीत ॥ तो मी कवण ॥ ११ ॥
असें जेव्हा श्रीगुरूनाथ म्हणाले तेव्हां शिष्य विचारांत गढून गेला. आणि म्हणूं लागला 'दोन्ही देहाहून भिन्न, असा मी कोण बरें ?' १२.
मी पृथ्वी ना जळ ॥ नेत्र ना अनिळ ॥
आकाश जें निर्मळ ॥ तेंही मी नव्हे ॥ १३ ॥
मी पृथ्वी नव्हे की पाणी नव्हे; तेज नव्हें की वायु नव्हें बरे निर्मळ असें जें आकाश तें म्हणावे तर तेंही मी नव्हे. १३
या स्थूल्लभूतांचे अंश ॥ निरूपिले जे दृश्य पंचवीस ॥
ते मी नव्हे अस्थिमास ॥ रक्त भूतिक ॥ १४ ॥
ह्या जड भूतांचे जे दृश्य पंचवीस अंश सांगण्यांत आले ते किंवा रक्तापासून झालेलें अग्नि मांस तेंही मी नव्हें. १४
सूक्ष्मभूताचें दलवाडें ॥ जेणे लिंगदेह अन्यथा घडे ॥
ने मी नव्हें फुडें ॥ तो मी कवण ॥ १५ ॥
ज्या सूक्ष्म भूतांच्या समुदायानें मिथ्याभूत लिंगदेह झाला तो भूतसमुदाय तर मी उघड उघड नव्हें. तर असा मी कोण ? १५
नव्हें मी पंचप्राण ॥ जे मज दृश्यमान ॥
विषयपंचक तें अन्य ॥ मजचि पासाव ॥ १६ ॥
मी पंचप्राण नव्हे. तसेंच दूसरें विषयपंचक तेंही मला दृश्य असून माझ्याचमुळें आहे. १६
ज्ञानेंद्रियपंचक मज दृश्य ॥ कर्मेंद्रिये नव्हे मी अवश्य ॥
अंतःकरणपंचक तें प्रकाश्य ॥ मी प्रकाशक ॥ १७ ॥
ज्ञानेंद्रियपंचक तर मला दृश्य आहे; कर्मेंद्रियें तर मी खास नव्हे; व अंतःकरणपंचक तें प्रकाशलें जाणारें आणि मी प्रकाशक आहें. १७
मन मनाचा व्यापार ॥ बुद्धिबुद्धीचा निर्धार ॥
चित्त चित्ताचा विचार ॥ तो मी नव्हें ॥ १८ ॥
मन व मनाचा व्यापार, बुद्धि व बुद्धीचा निश्चय, चित्त व चित्ताचा विचार, तो कांहीं मी नव्हे. १८
नव्हें मी अहंकार ॥ आणि अहंतेचा व्यापर ॥
तयाचाही ज्ञातार ॥ तो मी वेगळाची ॥ १९ ॥
मी अहंकार नव्हे आणि अहंतेचा व्यापारही नव्हे. तर त्यांनाही जाणणरा असा मी वेगळाच आहें. १९
स्थूलदेहाची साकारता ॥ लिंगदेहाची सत्ता ॥
या दोहोंतें मी जाणता ॥ नव्हे मी विपरीतज्ञान ॥ २० ॥
जड देहाचा साकारपणा आणि लिंगदेहाची सत्ता ह्या दोहोंनाही मी जाणणारा आहे. मी विपरीत ज्ञान नव्हे. २०
मी साकार ना साभास ॥ देहद्वयाचा द्रष्टा मी उदास ॥
तो मी कवण हा नाहीं प्रकाश ॥ माझा मजची ॥ २१ ॥
मी साकार नव्हे कीं साभास नव्हे. दोन्ही देहांचा मी द्रष्टा असून उदास (केवळ तटस्थ, अलिप्त) आहे. असा मी कोण ह्याचा माझा मलाच बोध होत नाहीं. २१
ऐसें शिष्ये विचारिलें ॥ मग श्रीगुरूतें विनविलें ॥
जी मजचि मीं चोरिलें ॥ ते प्रकाशिजे स्वामी ॥ २२ ॥
असा विचार करून शिष्याने श्रीगुरूंना विनंति केली कीं; स्वामी महाराज ! माझें मलाच मी बोरले आहे, त्याचा मला बोध करून द्यावा. २२
या सर्वांतें जाणें ॥ तो मी आपणयानतें नेणें ॥
तो मातें मज भेटवणे ॥ श्रीगुरुराया ॥ २३ ॥
ह्या सर्वांना मी जाणतो खरा, पण तोच मी माझा मलाच ठाऊक नाही. तर हे श्रगुरुराया त्या मला माझीच भेट करून द्यावी. २३
आतां श्रीगुरुनाथ केले ॥ तुवां आपुलें देहद्वय जाणितलें ॥
परी अज्ञान नाहीं निरसले ॥ आत्मविषयींचे ॥ २४ ॥
तेव्हां श्रीगुरुनाथ क्षणाले "बाबा ! तूं आपलें देहद्वय जाणलेंस खरे, परंतु तुझे आत्मविषयक अज्ञान कांहीं अद्याप नाश पावले नाही. २४
तूं आपणयातें जाणतचि नेणसी ॥ हेंचि लक्षण अज्ञानासी ॥
नाथिलें अज्ञान कां वाहतोसी ॥ निज मस्तकीं ॥ २५ ॥
तूं आपल्याला जाणत असूनच जाणत नाहीस, हेंच अज्ञानाचे लक्षण आहे. अरे ! हें नसतेंच अज्ञान आपल्या माथी कां वाहात बसला आहेस ! २५
मी नेणें आपणातें ॥ आहेसि त्या अज्ञानातें जाणतें ॥
म्हणूनि अज्ञानासी अधिष्ठान निरुतें ॥ जाणपणचि ॥ २६ ॥
मी स्वतःला कांहीं जाणत नाही. पण तें तूं अज्ञानाला जाणणारें आहेस. म्हणून अज्ञानाला जाणतेपणा हाच खरोखर अधिष्ठान आहे. २१
अज्ञानासी अधिष्ठान ॥ तूंचि प्रत्यक् चैतन्य ॥
अपरोक्षासी आश्रय अचेतन ॥ ऐसें बोलोंच नये ॥ २७ ॥
तूं प्रत्यक् चैतन्य तोच खरोखर अज्ञानाला अधिष्ठान आहेस. जड हें अपरोक्षाला आश्रय झालें आहे अशी गोष्टच काढू नये. २७
साचा रज्जू आश्रय सर्पासी ॥ परी लटिका सर्प आश्रय नव्हे रज्जूसी ॥
मिथ्याभूत अज्ञान तुज रूपासी ॥ आश्रय केवीं घडे ॥ २८ ॥
रज्जु (दोरी) सर्पाला खरोखर आश्रय आहे. परंतु खोटा सर्प मात्र रज्जूला आश्रय नव्हे. तसेच मिथ्याभूत अज्ञान तुला स्वरूपाला-आश्रय कसें होईल. २८
मी आपणयातें नेणे ॥ ऐसें अज्ञानासीं नाहीं म्हणणें ॥
म्हणूनि सत्यरूपा तुज धरणें ॥ अज्ञानासी पैं ॥ २९ ॥
मी मला ठाऊक नाहीं, असें कांही अज्ञानाला म्हणतां येणार नाहीं म्हणून सत्यरूप जो तूं त्या तुझ्याच ठिकाणी अज्ञान आहे म्हटले पाहिजे. २९
सांडूनि स्थूळ सूक्ष्म प्रपंचातें ॥ पाहूं गेलासी निःप्रपंच द्रष्ट्याते ॥
तंव वर्णव्यक्तिरहित निरालंबाते ॥ पाहतां भांबावलासी ॥ ३० ॥
स्थूल व सूक्ष्म प्रपंच टाकून प्रपंचरहित द्रष्ट्याला जेव्हां शोधू लागलास तेव्हां वर्णव्यक्तिरहित निरालंब स्वरूप पाहतांना गोंधळलास. ३१
येरव्हीं कीर तूं तेथेंचि अससी ॥ नाथिलें अज्ञान जाणतचि कवळसी ॥
जें कां मी नेणें ऐसें जाणतोसी ॥ तो तूं सांग कवण ॥ ३१ ॥
बाकी तूंखरोखर तेथेंच आहेस. कळत असतांनाच नसतें अज्ञान घेऊन बसला आहेस. मला कळत नाही असे जें तूं जाणतोस तो तूं कोण हें सांग ? ३०
जैसे उदक बाबुळीतें व्यालें ॥ परी तयातेंचि कवळिले ॥
तैसें अज्ञानें आवरिलें ॥ तुझें निजस्वरूप ॥ ३२ ॥
पाण्यानें शेवाळाला जन्म दिला खरा, पण त्यानें त्यालाच झाकून टाकले. त्याचप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाला अज्ञानानें झाकून टाकले आहे. ३२
स्थूळसूक्ष्मदेहद्वयातें ॥ आणि विपरीत ज्ञानातें ॥
अज्ञानचि प्रसवलें तयातें ॥ म्हणूनि कारण बोलिजे ॥ ३३ ॥
स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही देहांना आणि विपरीत ज्ञानाला अज्ञानच प्रसवलेलें आहे. म्हणून त्याला 'कारण' असें नांव आहे. ३३
जें अज्ञान तुझें कारण देह ॥ तें तूं नव्हसी निःसंदेह ॥
तूं अज्ञानसाक्षी विदेह ॥ परमस्वरूप ॥ ३४ ॥
अज्ञान जें आहे तें तुझा कारणदेह आहे. तेव्हा तें तूं निःसंशय नव्हेस. तूं अज्ञानाचा साक्षी व विदेह (देहरहित) परमस्वरूप आहेस. ३४
मी आपणयातें नेणें म्हणत ॥ त्या नेणण्यातें अससी जाणत ॥
म्हणूनि द्रष्टा अज्ञानासी अतीत ॥ तूंचि निभ्रांत पैं ॥ ३५॥
मी स्वतःला जाणत नाहीं झणणारा, त्या न जाणण्याला जाणणारा तूं आहेस. म्हणून अज्ञानाहून वेगळा खचित तूंच आहेस. ३५
या नेणें ऐसें वायांचि मानिसी ॥ जें कां मी नेणें ऐसें जाणत कवळलासी ॥
नरी जाणणेंचि तूं होसी॥ नेणणें मिथ्यारूप ॥ ३६ ॥
मी जाणत नाही असें उगाच झणतोस. कारण, ही जाणत नाही असें म्हणणारा तूं झाकून गेला आहेस. तर जाणणें हेंच तूं आहेस. न जाणणें हे मिथ्याभूत आहे. ३६
जाणणें तें ज्ञान ॥ नेणणें तें अज्ञान ॥
ज्ञानाचे तूं लेसी अलंकरण ॥ मिथ्या अज्ञानाचें ॥ ३७ ॥
जाणणें तें ज्ञान व न जाणणे ते अज्ञान होय. ज्ञानाच्या तुलनेला अज्ञानाचे अलंकार मिथ्या होत. ३७
असो हें अज्ञान नव्हे सत्य ॥ तरी विपरीतज्ञान अशेष अनित्य ॥
तत्कार्य देहद्वय मिथ्याभूत ॥ सर्वथैव गा ॥ ३८ ॥
असो. तर हें अज्ञान कांहीं सत्य नव्हे. विपरीत ज्ञान तर मुळीं झाडून सारे अशाश्वत. आणि त्याचे कार्य जें दोन्ही देह तेही सर्वस्वी मिथ्याच ! ३८
तुझें कारण देह अज्ञान ॥ तेथें सुषुप्तीचें अधिष्ठान ॥
तेचि सुषुप्ती किं लक्षण ॥ तें आइक पां तूं ॥ ३९ ॥
तुझा कारण देह अज्ञान, त्याला सुषुप्ति हें अधिष्ठान आहे. आतां त्या सुषुप्तीचे लक्षण कोणतें तें ऐक. ३९
जागृती आणि स्वप्नदशे ॥ भोगिलें इंद्रियव्यापाराचेनि अध्यासें ॥
वेधिलें मन अज्ञानीं उपसंहारतसे ॥ ते सुषुप्ती बोलिजे ॥ ४० ॥
जागेपणीं आणि स्वप्न-अवस्थेंत भोगलेल्या इंद्रियव्यापाराच्या मिथ्याभासानें वेधून गेलेले मन अज्ञानामध्यें लय पावते त्यालाच सुषुप्ति (झोंप) असे म्हणतात. ४०
दशेंसहित इंद्रियासी ॥ आणि अंतःकरण चतुष्टयासी ॥
विपरीतज्ञानें लीन होय माजीं अज्ञानासी ॥ ते सुषुप्ती जाण ॥ ४१ ॥
दहाही इंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टय ह्यांसहवर्तमान विपरीत ज्ञान हें अज्ञानामध्यें लीन होते. तीच सुषुप्ती हे ध्यानांत ठेव. ४१
सुषुप्तीमाजी असोनि सुषुप्तीतें ॥ तूं जाणत आहेसी तये नेणिवेतें ॥
प्रबोधें सांगतोसी तयातें ॥ तत्साक्षित्वेंची ॥ ४२ ॥
झोपेत असून झोंपेला - त्या नेणिवाला - तूं जागत असतोस. आणि जागृतीनंतर तें तूं त्याच्या साक्षित्वानेंच सांगत असतोस. ४२
म्हणोनि सुषुप्ती ना तुज ॥ तियेतें जाणणे आपणया वेगळे बुझ ॥
अवस्थात्रय बुद्धीसी सहज ॥ तूं तया वेगळाची ॥ ४३ ॥
म्हणून तुला सुषुप्ती नाही. तिला जाणणारा तूं स्वत: वेगळा आहेस, हें ध्यानांत आण. तिन्ही अवस्थांत बुद्धीला सहज - (इच्छामात्रेंकरून) आहेत. तूं त्याहून वेगळाच आहेस. ४३
कारण देह सुषुप्त्यवस्था ॥ या दोहोंचा जो अभिमान धरिता ॥
तया प्राज्ञ अहंकरातें जाणता ॥ तो तूं वेगळाची ॥ ४४ ॥
कारणदेह सुषुप्तिदशा या दोहोंचाही अभिमानी जो प्राज्ञ अहंकार त्यास जाणणारा तूं वेगळाच आहेस. ४४
प्राज्ञ आनंदभोग हृदयस्थान ॥ याचें तुज आहे ज्ञान ॥
हे पंचविध तमोगुण ॥ तो तूं आत्मा कैसेनी ॥ ४५ ॥
प्राज्ञ, आनंद भोग व हृदयस्थान ह्याचें तुला ज्ञान आहे. हे पंचविध तमोगुण होत. तूं आत्मा तें कसें होशील ? ४५
एवं स्थूल लिंग कारण यांतें ॥ जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थात्रयातें ॥
विश्व तैजस प्राज्ञ अभिमानत्रयातें ॥ जाणता आत्मा तूं ॥ ४६ ॥
एवंच स्थूल, लिंग व कारण ह्या तिन्ही देहांना; जागृती, स्वप्न, व सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थांना, विश्व, तैनस, आणि प्राज्ञ हे तीन जे अभिमानी त्यांना जाणणारा तूं आत्मा आहेस. ४६
स्थूल प्रविविक्त आनंद भोगत्रयातें ॥ नयन हृदय कंठ स्थानत्रयातें ॥
सत्व-रज तो गुणत्रयातें ॥ जाणता आत्मा तूं ॥ ४७ ॥
स्थूल, प्रविविक्त, व आनंद ह्या तिन्ही भोगांना; नयन, हृदय, व कंठ ह्या तिन्ही स्थानांना; सत्व, रज, आणि तम ह्या तिन्ही गुणांना जाणणारा तूंच आत्मा आहेस. ४७
अविद्येचिया गुणत्रयाचें ॥ दळवाडें निरूपिलें प्रपंचाचें ॥
तूं द्रष्टा अशेषाचें ॥ म्हणूनि आश्रयसाक्षी ॥ ४८ ॥
अविद्येच्या तिन्ही गुणांचे - अर्थात् प्रपंचाचे समुदाय सांगितले, तूं ह्या सर्वांचा द्रष्टा आहेस. म्हणून सर्वांचा आश्रय व साक्षी आहेस. ४८
अविद्येचिया गुणत्रयाची ॥ उभवणी उभवली प्रपंचाची ॥
हें नेणिजे तंव कांहींची ॥ संसृती न चुके ॥ ४९ ॥
अविद्येच्या तीन गुणांनीच प्रपंचाची उभारणी झाली. ह्याचे ज्ञान झालें नाहीं तोपर्यंत संसार मुळींच सुटणें नाही. ४९
आतां तुझें मलिनत्व फिटलें ॥ शुद्ध आत्मत्व लाधलें ॥
गुणत्रय बंधन चुकलें ॥ आश्रय साक्षीचें ॥ ५० ॥
आतां तुझा मळ धुवून गेला; तुला शुद्ध आत्म्याचा लाभ झाला; आणि तूं जो आश्रय व साक्षी, त्याचें त्रिगुणात्मक बंधन नाश पावले. ५०
हें सर्व न होनी सर्वांतें ॥ निराकार निराभासातें जाणतें ॥
त्या निरालंबा आपणयातें ॥श्रीमुकुंद म्हणे बुझलासि तूं ॥ ५१ ॥
श्रीमुकुंदराज म्हणतात - अवघ्या निराकार निराभास स्वरूपाला हें कांहींच असत नाहीं. अशा त्या निरालंब (सर्वतंत्रस्वतंत्र) अशा आपणाला तूं जाणलेस. ५१
इतिश्रीमद्‌विवेकसिंधौ संहारक्रमे गुरुशिष्यसंवादे
कारणदेहनिरसनं नाम तृतीयप्रकरणं समाप्तम्

GO TOP