|
शुक्ल यजुर्वेद विनियोग - सहाव्या अध्यायांत यूपसंस्कारापासून सोमकण्डनापर्यंतचे मंत्र सांगितले. सातव्या अध्यायांत सोमपात्रांच्या ग्रहणाचे मंत्र सांगतात. 'वाचस्पतये देवो देवेभ्यः च मधुमतीः' या तीन मंत्रांनीं उपांशुपात्र ग्रहण करावें. वा॒चस्प॑त॑ये पवस्व॒ वृष्णो॑ अँ॒शुभ्यां॒ गभ॑स्तिपूतः । दे॒वो दे॒वेभ्यः॑ पवस्व॒ येषां॑ भा॒गोऽसि॑ ॥ १ ॥ अर्थ - हे सोमा, वृष्टि करणार्या आपल्या अंशूंनीं व हस्तांनीं पवित्र झालेला असा तूं प्राणाकारणें गमन कर. हे सोमा, तूं देवस्वरूपी होऊन ज्याचा तूं भाग आहेस अशा देवाकडे जा. ॥१॥ विनियोग - स्वीकृत अंशु 'यत्ते' या मंत्रभागानें सोमावर स्थापन करावें. 'स्वाहा' असें उच्चारून 'उर्वन्तरिक्षं' या मंत्रभागानें बाहेर पडावें. मधु॑मतिर्न॒ इष॑स्कृधि॒ यत्ते॑ सोमा॒दा॑भ्यं॒ नाम॒ जागृ॑वि॒ तस्मै॑ ते सोम॒ सोमा॑य॒ स्वाहा॒ स्वाहो॒र्वन्तरि॑क्ष॒मन्वे॑मि॒ ॥ २ ॥ अर्थ - हे सोमा, तूं आमच्या अन्नांना रसवान् कर. हे सोमा, ज्या तुझें सोम असें अहिंस्य व जागरणशील नांव आहे त्या तुला हें हवि सुहुत असो. विस्तीर्ण अशा अन्तरिक्षांत मी गमन करतों. तुला हें हवि सुहुत असो. ॥२॥ विनियोग - 'स्वांकृतः' या मंत्रभागानें होम करून पात्र धुवावें. 'देवेभ्यस्त्वा' या मंत्रभागानें सोमरसानें माखलेला हात उताणा करून धुवावा. शत्रुवधाची इच्छा असल्यास वस्त्र वगैरेवर पडलेल्या सोमभागाचा होम करावा. 'प्राणाय त्वा' या मंत्रभागानें पूर्वस्थलींच उपांशुपात्राचें स्थापन करावें. ज्यानें सोमाचा रस काढला तो दगड हातानें धुवून उत्तराभिमुख सोमपात्राचे समीप ठेवावा. स्वाङ्कृ॑तोऽसि॒ विश्वे॑भ्य इन्द्रि॒येभ्यो॑ दि॒व्येभ्यः॒ पार्थि॑वेभ्यो॒ मन॑स्त्वाष्टु॒ स्वाहा॑ त्वा सुभव॒ सूर्या॑य दे॒वेभ्य॑स्त्वा मरीचि॒पेभ्यो॒ देवाँ॑शो॒ यस्मै॒ त्वेडे॒ तत्स॒त्यमु॑परि॒प्रुता॑ भ॒ङ्गेन॑ ह॒तोऽसौ फट् प्रा॒णाय॑ त्वा व्या॒नाय॑ त्वा ॥ ३ ॥ अर्थ - हे प्राणारूपी उपांशुपात्रा, तूं सर्व इंद्रिये, सर्व देव व पृथ्वीस्थ सर्व प्राण्यांपासून स्वतः उत्पन्न झालें आहेस. स्वयंसिद्ध अशा तुला प्रजापति व्याप्त करो. हे उत्तमजन्मवान् पात्रा, सूर्याकरितां तुझा मी स्वाहाकारानें होम करतों. हे हातावर असलेल्या सोमलेपा, मरीचिपालक देवांकरितां मी तुला धुतों. हें सोमांशो, ज्याकरितां मी तुझी प्रार्थना करतों तें वधकर्म सत्यस्वरूपी होवो. त्या उपमर्दानें हा माझा देवदत्तादिसंज्ञक शत्रु मरून विगलित होवो. हे उपांशुपात्रा, प्राणदेवतेच्या संतोषाकरितां तुझें मी स्थापन करतों. हे उपांशुसवना, व्यानदेवतेच्या संतोषाकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३॥ विनियोग - सूर्योदयानन्तर अन्तर्यामपात्राचें ग्रहण करावें. उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒न्तर्य॑च्छ मघवन् पा॒हि सोम॑म् । उ॒रु॒ष्य राय॒ एषो यजस्व ॥ ४ ॥ अर्थ - हे सोमरसा, मी उपयामपात्रानें तुझें ग्रहण केलें आहे. हे धनवान् इंद्रा, त्या रसाला तूं पात्रांत नियमित कर व सोमाचें आणि धनाचें रक्षण कर. आणि सर्व अन्नें दे. ॥४॥ विनियोग - अ॒न्तस्ते॒ द्यावा॑पृथि॒वी द॑धाम्य॒न्तर्द॑धाम्यु॒र्वन्तरि॑क्षम् । स॒जूर्दे॒वेभि॒रव॑रैः॒ परै॑श्चान्तर्या॒मे म॑घवन् मादयस्व ॥ ५ ॥ अर्थ - हे अन्तर्यामा, प्राणरूपापन्न अशा तुझ्या शरीरामध्यें मी द्यावापृथिवींना स्थापन करतों. व विस्तीर्ण असें अन्तरिक्ष द्यावापृथिवींच्यामध्यें स्थापन करतों. हे धनवान् इंद्रा, पृथिवीस्थ व द्युलोकस्थ देवांशी स्नेहयुक्त असा होऊन तूं अन्तर्यामपात्रांमध्यें आनंदानें रहा ॥५॥ विनियोग - 'स्वांकृतः' या मंत्रभागानें सगळ्या सोमरसाचा उभें राहून होम करावा. 'देवेभ्यस्त्वा' या मंत्रभागानें हात धुवावा. 'उदानाय त्वा' या मंत्रभागानें पात्र स्थापन करावें. स्वाङ्कृ॑तोऽसि॒ विश्वे॑भ्य इन्द्रि॒येभ्यो॑ दि॒व्येभ्यः॒ पार्थि॑वेभ्यो॒ मन॑स्त्वाष्टु॒ स्वाहा॑ त्वा सुभव॒ सूर्या॑य दे॒वेभ्य॑स्त्वा मरीचि॒षेभ्य॑ उदा॒नाय॑ त्वा ॥ ६ ॥ अर्थ - हे सोमा, तूं सर्व इंद्रिये, सर्व देव व पृथिवीस्थ सर्व प्राण्यांपासून स्वतः उत्पन्न झालास. स्वयंसिद्ध अशा तुला प्रजापति व्याप्त करो. हे उत्तम जन्म असलेल्या सूर्याकरितां स्वाहाकारानें तुझा मी होम करतों. मरीचिपालक देवाकरितां तुझा मी होम करतों. हे पात्रा, उदानदेवतेच्या संतोषाकरितां मी तुझें स्थापन करतों. ॥६॥ विनियोग - 'आवायो' या मंत्रानें ऐन्द्रवायव पात्राचें ग्रहण करावें. आ वा॑यो भूष॒ शुचिपा॒ उप॑ नः स॒हस्रां॑ ते नि॒युतो॑ विश्ववार । उपो॑ ते॒ अन्धो॒ मद्य॑मयामि॒ यस्य॑ देव दधि॒षे पू॑र्व॒पेयं॑ वा॒यवे॑ त्वा ॥ ७ ॥ अर्थ - हे पवित्र अशा सोमाचें प्रथम पान करणार्या वायो, सर्वव्यापका, तुझे हजारों मृग वाहन आहेत, त्यांवर बसून तूं आमचे जवळ ये. महोत्पादक सोमरूपी अन्न मी तुजकडे पोंचवितों. हे प्रकाशमान वायो, त्या सोमाच्या प्रथम वषट्काररूपी पानाचा तूं धारक आहेस. हे सोमरसा, वायुदेवतेकरितां तुझें मी ग्रहण करतों. ॥७॥ विनियोग - 'इन्द्रवायू' या मंत्रानें पुनः ऐन्द्रवायवसंज्ञक पात्राचें ग्रहण करावें. पात्राच्या बाहेर आलेला सोम पुसून 'एष ते योनिः' या मंत्रभागानें पात्र स्थापन करावें. इन्द्र॑वायू इ॒मे सु॒ता उप॒ प्रयो॑भि॒राग॑तम् । इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि वा॒यव॑ इन्द्रवा॒युभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनिः॑ स॒जोषो॑भ्यां त्वा ॥ ८ ॥ अर्थ - हे इन्द्रवायूंनो, तुमच्याकरितां आम्हीं सोमरसाचें कण्डन केलें. सोमदेव तुमची इच्छा करितात म्हणून तुम्ही सोमरूपी अन्नासह या. हे सोमरसा, वायुदेवतेच्या संतोषाकरितां तुझें मी उपयामसंज्ञक पात्रानें ग्रहण केलें आहे. हे सोमपात्रा, हें तुझें स्थान आहे म्हणून स्नेही अशा इन्द्रवायूंच्या संतोषाकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥८॥ विनियोग - 'आयं वाम्' या मंत्रानें मैत्रावरुण पात्राचें ग्रहण करावें. अ॒यं वां॑ मित्रावरुणाभ्यां सु॒तः सोम॑ ऋतावृधा । ममेदि॒हत्वा श्रु॑तँ॒ हव॑म् । उ॒प॒या॒मगृ॑हिइतोऽसि मि॒त्रा वरु॑णाभ्यां त्वा ॥ ९ ॥ अर्थ - हे यज्ञ वाढविणार्या मित्रावरुणांनो, तुमच्याकरितां मीं सोमरसाचें कंडन केलें. इतर यजमानाचें न ऐकतां माझेंच बोलावणें तुम्ही ऐका. हे सोमरसा, मित्रावरुण देवतांच्या संतोषाकरितां मित्रावरुणसंज्ञक पात्रानें तुझें मी ग्रहण करतों. ॥९॥ विनियोग - मैत्रावरुण पात्रावर दोन दर्भ ठेवावे व 'राया वयं' या मंत्रभागानें सोमरसांत दूध मिसळावें. रा॒या व॒यँ स॑स॒वाँसो॑ मदेम ह॒व्येन॑ दे॒वा यव॑सेन॒ गावः॑ । तां धे॒नुं मि॑त्रावरुणा यु॒वं नो॑ वि॒श्वाहा॑ धत्त॒मन॑पस्फुरन्तीमे॒ष ते॒ योनि॑रृता॒युभ्यां॑ त्वा ॥ १० ॥ अर्थ - देवांना जसा हविर्द्रव्याचे योगानें आनंद होतो व पशूंना जसा तृणानें आनंद होतो तशी जी गाय घरांत असल्यानें आम्ही आनंदी होऊं तें गोरूपी धन हे मित्रावरुणांनो, आम्हांला सर्वदा द्या. ती गाय दुसर्याकडे न जाणारी अशी असो. हे पात्रा, हें तुझें स्थान आहे. यज्ञाची इच्छा करणार्या मित्रावरुणांकरिता तुला या स्थानीं मी ठेवतों. ॥१०॥ विनियोग - यजमानानें स्पर्श केल्यावर 'या वां' या मंत्रानें आ????पात्राचें ग्रहण करावें. 'एष ते' या मंत्रभागानें पात्र स्थापन करावें. या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती । तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम् । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒श्विभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॒र्माध्वी॑भ्यां त्वा ॥ ११ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, तुमची जी मधुब्राह्मणयुक्त, सत्यप्रिय व प्रकाशक वाणी आहे, तिचेयोगें आमचा यज्ञ संपन्न करा. हे सोमरसा, उपयामपात्रानें तुझें ग्रहण झालें आहे. तुझें मी अश्विनीकुमारांकरितां ग्रहण करितों. हे पात्रा, हें तुझें स्थान आहे यावर मी तुझें मधुब्राह्मणाचें अध्ययन करणार्या अश्विनीकुमारांकरितां स्थापन करतों. ॥११॥ विनियोग - 'तं प्रत्नथा' या मंत्रभागानें शुक्रपात्राचें ग्रहण करावें. नंतर अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता या दोघांनीं शुक्रामंथि या पात्राचें ग्रहण करून पुढील अनुष्ठान करावें. दोन प्रोक्षित व दोन अप्रोक्षित असे यूपशकल दोघांनीं घ्यावे व प्रोक्षित शकलांनीं पात्रें झांकून अप्रोक्षित शकलानें अपमार्जन करावें. नंतर 'देवस्त्वा' या मंत्रभागानें अध्वर्यु व प्रतिप्रस्थात्यांनीं हविर्धानमण्डपांतून बाहेर पडावें. तदनंतर त्या दोघांनीं वेदीच्या पश्चाद्भागीं जाऊन उत्तरवेदी श्रोणीवर 'अना????' या मंत्रभागानें अध्वर्यूनें शुक्रपात्राचें व प्रतिप्रस्थात्यानें मंथिपात्राचें स्थापन करावें. तं प्र॒त्नथा॑ पू॒र्वथा॑ वि॒श्वथे॒मथा॑ ज्ये॒ष्ठता॑तिं बहि॒षदँ॑ स्व॒र्विद॑म् । प्र॒ती॒ची॒नं वृ॒जनं॑ दोहसे॒ धुनि॑मां॒शु जय॑न्त॒मनु॒ यासु॒ वर्ध॑से । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ शण्डा॑य त्वै॒ष ते॒ योनि॑र्वी॒रतां॑ पा॒ह्यप॑मृष्टः॒ शण्डो॑ दे॒वास्त्वा॑ शुक्र॒पाः प्रण॑य॒न्त्वना॑धृष्टाऽसि ॥ १२ ॥ अर्थ - हे इन्द्रा, तूं पुनः पुनः सोमपान करून ज्या यज्ञांत वाढतोस व अत्यंत प्राचीन भृग्वादिक, साध्वादिक ऋषि व सर्व ऋषिपुत्र यांचेप्रमाणें हल्लींच्या यजमानांना यज्ञफल देतोस त्या तुझी आम्ही स्तुति करतों. तूं उत्तमप्रकारे कीर्तिसंपन्न, यज्ञांत राहणारा, द्युलोकाप्रत जाणणारा, माझे सन्मुख असणारा, शत्रूंना कापविणारा व जिंकण्यास योग्य अशा वस्तूंना जिंकणारा आहेस. हे सोमरसा, शुक्रपुत्र शण्डसंज्ञक राक्षसाकरितां तुझें उपयामपात्रानें ग्रहण केलें आहे. हे पात्रा, हें तुझें स्थान आहें. तूं यजमानाच्या शूरत्वाचें रक्षण कर. शुक्रपुत्र शण्डनामक असूर दूर केला गेला. हे शुक्रपात्रा, तुझ्यांत असलेला सोमरस पिणारे देव तुला यज्ञस्थानाप्रत नेवोत. हे उत्तरवेदिश्रोणे, तूं अहिंसित आहेस. ॥१२॥ विनियोग - 'सुवीरः' या मंत्रभागानें अध्वर्यूनें यूपदक्षिणभागीं गमन करावें. अध्वर्युप्रतिप्रस्थात्यांनीं अरत्निसंधान करावें. अध्वर्यूनें अप्रोक्षित अशा यूपशकलाला टाकावें. नंतर अध्वर्यूनें प्रोक्षित यूपशकल आहवनीयांत टाकावें. सुवीरो॑ वी॒रान् प्र॑ज॒नय॒न् परी॑ह्य॒भि रा॒यस्पोषे॑ण॒ यज॑मानम् । सञ्ज॒ग्मा॒नो दि॒वा पृ॑थि॒व्या शु॒क्रः शु॒क्रशो॑चिषा॒ निर॑स्तः॒ शण्डः॑ शु॒क्रस्या॑धि॒ष्ठान॑मसि ॥ १३ ॥ अर्थ - हे शुक्रग्रहा, तूं वीर्यवान् होऊन यजमानाच्या बलशौर्यांना उत्पन्न करून धनवृद्धीकरितां यजमानाकडे ये. द्युलोक व पृथ्वीलोकाशीं युक्त होणारें हें शुक्रपात्र शुद्ध प्रकाशानें यूपाला धारण करते. शुक्रपुत्र शण्डनामक असुर यज्ञांतून निरस्त केला. हे यूपशकला, तूं शुक्रपात्राचें अधिष्ठान आहेस. ॥१३॥ विनियोग - यजमानानें 'अच्छिन्नस्य' इत्यादि मंत्रभागाचा जप करावा. नंतर अध्वर्युप्रतिप्रस्थात्यांनीं यूपाच्या दोन्ही बाजूंना उभें रहावें व पश्चिमेस तोंड करून शुक्र व मंथींचा होम करावा. अच्छि॑न्नस्य ते देव सोम सु॒वीर्य॑स्य रा॒यस्पोष॑स्य ददि॒तारः॑ स्याम । सा प्र॑थ॒मा सँस्कृ॑तिर्वि॒श्ववा॑रा॒ स प्र॑थ॒मो वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ॥ १४ ॥ अर्थ - हे प्रकाशमान सोमा, आम्ही अखण्डित आणि उत्तम सामर्थ्ययुक्त अशा तुझें व द्रव्यवृद्धीचें प्रदान करणारे होऊं. ऋत्विज् व अनृत्विज् या सर्वांना स्पृहणीय व मुख्य असा सोमाचा संस्कार ज्या इंद्राकरितां केला जातो, त्याचेच वरुण, अग्नि, मित्र वगैरे सर्व मुख्य असे सेवक आहेत. ॥१४॥ विनियोग - 'तृप्यन्तु' या मंत्रभागाचा यजमानानें जप करावा. अध्वर्यूनें 'अयाऽग्नीत्' हा मंत्रभाग म्हणून होत्याजवळ पश्चिमाभिमुख असें उभें रहावें. स प्र॑थ॒मो बृ॒हस्पति॑श्चिकि॒त्वाँस्तस्मा॒ इन्द्रा॑य सु॒तमा जु॑होत॒ स्वाहा॑ । तृ॒म्पन्तु॒ होत्रा॒ मध्वो॒ याः स्वि॑ष्टा॒ याः सुप्री॑ताः॒ सुहु॑ता॒ यत्स्वाहा ऽया॑ड॒ग्नीत् ॥ १५ ॥ अर्थ - तो प्रसिद्ध व बुद्धिमान् बृहस्पति ज्या इंद्राचा मुख्य मंत्री आहे त्याच इंद्राकरितां हे ऋत्विजांनो, तुम्हीं कांडलेल्या सोमाचा (सोमरसाचा) होम करा. मधुरस्वादयुक्त सोमप्रिय याज्यामंत्र सोमाचे योगानें अत्यंत प्रसन्न झाले म्हणूनच होमामध्यें त्याच मंत्रांचा विनियोग केला आहे. अग्नीध्रानें याग केला. ॥१५॥ विनियोग - 'अयं वेनः' या मंत्रभागानें मंथिपात्राचें ग्रहण करावें. अ॒यं वे॒नश्चो॑दय॒त्पृश्नि॑गर्भा॒ ज्योति॑र्जरायू॒ रज॑सो वि॒माने॑ । इ॒मम॒पाँ स॑ङ्ग॒मे सूर्य॑स्य॒ शिशुं॒ न विप्रा॑ म॒तिभी॑ रिहन्ति । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ मर्का॑य त्वा ॥ १६ ॥ अर्थ - (प्रथम अधिदैवरूपानें सोमाची स्तुति) हा सुंदर चंद्र ग्रीष्मऋतूचे शेवटीं द्युलोकांतील जलांची वृष्टि करतो. त्या चंद्राचें विद्युद्रूपी गर्भवेष्टण आहे. (आतां अधियज्ञस्वरूपानें सोमाची स्तुति) एखाद्या वस्तूच्या प्राप्तीकरितां लोक ज्याप्रमाणें ती वस्तु धारण करणार्या मुलाची स्तुति करतात त्याप्रमाणें सूर्य व जलें यांचे संगमाकरितां म्हणजे वृष्टिरूपी गर्भाकरितां बुद्धिमान् ब्राह्मण या सोमाची स्तोत्रशस्त्रांनीं मनःपूर्वक स्तुति करतात. अशा हे सोमा, उपयामपात्रांत शुक्रपुत्र जो मर्कासुर त्याकरितां तुझें मी ग्रहण करतों. ॥१६॥ विनियोग - या मंथपात्रांतील सोमांत 'मनो न येषु' या मंत्रभागानें सातू मिसळावे. नंतर प्रतिप्रस्थात्यानें 'अपमृष्टो मर्कः' या मंत्रभागानें प्रोक्षित यूपशकल मंथिपात्रावर झांकण घालावें व अप्रोक्षित शकलानें तें पात्र धुवावें. नंतर 'देवास्त्वा' या मंत्रभागाचा उच्चार करून प्रतिप्रस्थात्यानें हविर्धान मण्डपांतून बाहेर पडावें. मनो॒ न येषु॒ हव॑नेषु ति॒ग्मं विपः॒ शच्या॑ वनु॒थो द्रव॑न्ता । आ यः शर्या॑भिस्तुविनृ॒म्णो अ॒स्याश्री॑णीता॒दिशं॒ गभ॑स्तावे॒ष ते॒ योनिः॑ प्र॒जाः पा॒ह्यप॑मृष्टो॒ मर्को॑ दे॒वस्त्वा॑ मन्थि॒पाः प्र ण॑य॒न्त्वना॑धृष्टासि ॥ १७ ॥ अर्थ - हवनकर्माकरितां संचार करणारे विद्वान् अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे दोघे ऋत्विज् मोठया उत्साहानें यज्ञकर्मनिमित्त शुक्र व मंथिपात्रांना व्याप्त करते झाले. या दोघांपैकीं अध्वर्यूनें हातांत असलेल्या मंथिपात्रांतील सोमांत प्रत्येक दिशेंत म्हणजे सर्वभागांत सातूचें मिश्रण केलें, जो अध्वर्यू मोठया दक्षिणेनें युक्त आहे. हे मंथिपात्रा, हें तुझें स्थान आहे. या ठिकाणीं राहून यजमानाच्या प्रजांचें पालन कर. मर्क नांवाचा राक्षस दूर केला गेला. हे मंथिपात्रा, तुला पान करणारे देव तुला यागस्थानीं नेवोत. तूं अहिंसित आहेस. ॥१७॥ विनियोग - 'सुप्रजा' हा मंत्रभाग म्हणून प्रतिप्रस्थात्यानें यज्ञस्तंभाच्या उत्तरभागीं जावें. यूपाच्या पश्चिम दिशेकडे 'संज्जग्मानः' या मंत्रभागानें अरत्निसंधान करावें. नंतर प्रतिप्रस्थात्यानें 'निरस्तो मर्कः' असें म्हणून अप्रोक्षित यूपशकल टाकून द्यावें व 'मन्थिन' हा मंत्रभाग म्हणून प्रोक्षित यूपशकल आहवनीयांत होमावें. सु॒प्र॑जाः प्र॒जाः प्र॑ज॒नय॒न् परी॑ह्य॒भि रा॒यस्पोषे॑ण यज॑मानम् । स॒ञ्ज॒ग्मा॒नो दि॒वा पृ॑थि॒व्या म॒न्थी म॒न्थिशो॑चिषा॒ निर॑स्तो॒ मर्को॑ म॒न्थिनो॑ऽधि॒ष्ठान॑मसि ॥ १८ ॥ अर्थ - हे मंथिपात्रा, उत्तम प्रजाविशिष्ट असा तूं यजमानाला प्रजायुक्त करण्याकरितां धनवृद्धियुक्त होत्साता त्याचेकडे ये. द्युलोक व पृथ्वीलोकाशीं युक्त होणारें हें मंथिपात्र आपल्याच प्रकाशानें यूपाला धारण करतें. मर्क नांवाच्या राक्षसाचा निरास झाला. हे यूपशकला, तूं मंथिपात्राचें अधिष्ठान आहेस. ॥१८॥ विनियोग - दोन धारा गळतात अशा स्थितींत 'ये देवासः' या मंत्रभागानें आग्रयण पात्राचें ग्रहण करावें. ये दे॑वासो दि॒व्येका॑दश॒ स्थ पृ॑थि॒व्यामधेका॑दश॒ स्थ । अ॒प्सुक्षितो॑ महि॒नैका॑दश॒ स्थ ते दे॑वासो य॒ज्ञमि॒मं जु॑षध्वम् ॥ १९ ॥ अर्थ - हे देवांनो, तुम्ही आपआपल्या ऐश्वर्यानें द्युलोकांत, पृथ्वीवर व अन्तरिक्षांत एकादश संख्याक आहांत. या तीनही स्थानांतून येऊन आमच्या यज्ञार्ह अशा आग्रयणपात्राचें सेवन करा. ॥१९॥ विनियोग - 'उपयामगृहीतोऽसि' हा मंत्रही आग्रयणपात्रग्रहणांतच विनियुक्त आहे. उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि स्वा॒ग्रयणः । पा॒हि य॒ज्ञं पा॒हि य॒ज्ञप॒तिं विष्णु॒स्त्वामि॑न्द्रियेण॑ पातु॒ विष्णुं॒ त्वं पा॑ह्य॒भि सव॑नानि पाहि ॥ २० ॥ अर्थ - हे आग्रयणा, तूं उपयामपात्रांत गृहीत आहेस. तुझें नांव आग्रयण असून तूं श्रेष्ठता प्राप्त करून देणारा आहेस, असा तूं यज्ञाचें व यजमानाचें रक्षण कर. यज्ञाधिष्ठाता विष्णु स्वसामर्थ्यानें तुझें रक्षण करो व तूंही तशा त्या विष्णूचें रक्षण कर व प्रातरादि सवनांचेंही सर्वप्रकारानें रक्षण कर. ॥२०॥ विनियोग - हिंकारत्रयाचा उच्चार करून 'सोमः पवते' या मंत्राचा जप करावा. 'एष ते' या मंत्रानें आग्रयणपात्राचें स्थापन करावें. सोमः॑ पवते सोमः॑ पवते॒ऽस्मै ब्रह्म॑णे॒ऽस्मै क्ष॒त्राया॒स्मै सु॑न्व॒ते यज॑मानाय पवत इ॒ष ऊ॒र्जे प॑वते॒ऽद्भ्य ओष॑धीभ्यः पवते॒ द्यावा॑पृथि॒वीभ्यां॑ पवते सुभू॒ताय॑ पवते॑ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ ए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यः॑ ॥ २१ ॥ अर्थ - ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या संतोषाकरितां व सोमरस काढणार्या या यजमानाच्या इच्छा पूर्ण करण्याकरितां तसेंच अन्न, वृष्टि व औषधि यांच्या सिद्धीकरितां आणि द्यावापृथिवीकरितां तसेंच सर्वच गोष्टी चांगल्या करण्याकरितां सोम आपल्या यज्ञकर्मांत पुनः पुनः प्रवृत्त होतो. हें आग्रयणपात्रा, अशा तुला मी सर्व देवांकरितां ग्रहण करतों. हे पात्रा, हें तुझें स्थान आहे, त्यावर सर्व देवांच्या संतोषाकरितां तुला मी ठेवतों. ॥२१॥ विनियोग - त्या हविर्भागाचें ग्रहण करावें. 'उपयामगृहीतोऽसि' या मंत्रानें उक्थपात्र ग्रहण करावें. उक्थांतील सोमाचे प्रशास्तृ, ब्राह्मणाच्छंसि व अच्छावाक या तिघांच्या होमाकरितां 'देवभ्यस्वां' या मंत्रभागानें तीन विभाग करून ??????? उ॒प॒या॒गृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा बृ॒हद्व॑ते॒ वय॑स्वत उक्था॒व्यं॒ गृह्णामि । यत्त॑ इन्द्र बृ॒हद्वय॒स्तस्मै॑ त्वा॒ विष्ण्॑वे त्वै॒ष ते॒ योनि॑रु॒क्थेभ्य॑स्त्वा दे॒वेभ्य॑स्त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णामि ॥ २२ ॥ अर्थ - हे सोमा, तूं उपयामपात्रानें गृहीत आहेस. हे उक्थपात्रा, इंद्राकरितां स्तुतिशस्त्रांच्या संरक्षक अशा तुझें मी ग्रहण करतों. तो इंद्र बृहत्सोमप्रिय व सोमरूपी अन्नानें युक्त आहे. हे इन्द्रा, जें तुझें मोठें सोमरूपी अन्न आहे त्याचे पानाकरितां मी तुझी प्रार्थना करतों. हे सोमा, विष्णुदेवतेकरितां तुझें मी ग्रहण करतों. हे पात्रा, हें तुझें स्थान आहे. ???देवतेकरितां तुझें मी ग्रहण करतो. हे सोमा, देवसंरक्षक अशा तुझें मी देव?????? निर्विघ्न यज्ञसमाप्तीपर्यंत धारण करतों. ॥२२॥ विनियोग - प्रशास्तृ, ब्राह्मणाच्छंसि व अच्छावाक यांच्याकरितां 'इंद्राग्निभ्यां त्वा', इंद्रावरुणाभ्यां त्वा', 'मित्रावरुणाभ्यां त्वा' या मंत्रांनीं पात्रग्रहण करावें. मि॒त्रावरु॑णाभ्यां त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मीन्द्रा॑य त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मीन्द्राग्निभ्यां॑ त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मीन्द्रावरु॑णाभ्यां त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मीन्द्राबृहस्पति॑भ्यां त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मीइन्द्राविष्णुभ्यां त्वा देवा॒व्यं॒ य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णा॒मी ॥ २३ ॥ अर्थ - हे सोमा, देवांना संतुष्ट करणार्या अशा तुझें मी यज्ञाची निर्विघ्न समाप्ति व्हावी म्हणून मित्रावरुण, इंद्र, इंद्राग्नि, इंद्रावरुण, इन्द्राबृहस्पति, इन्द्राविष्णु या देवतांकरितां ग्रहण करतों. ॥२३॥ विनियोग - 'मूर्धानं दिवः' या मंत्रभागानें ध्रुवपात्राचें ग्रहण करावें. मूर्धानं दिवो अरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जातमग्निम् । कविँ सम्राजमतिथिं जनानामासन्ना पात्रं जनयन्त देवाः ॥ २४ ॥ अर्थ - देवांनीं अग्नि उत्पन्न केला तो द्युलोकाच्या शिरोभागीं सूर्यरूपानें प्रकाशणारा, पृथ्वीवर केव्हांही शांत न होतां सर्वदा राहणारा, सर्व प्राण्यांचें हित करणारा, यज्ञाचे निमित्तानें अरणींतून उत्पन्न झालेला, भूतकालीन सर्व जाणणारा, ऐश्वर्ययुक्त, यजमानांकडून अतिथीप्रमाणें पूज्य, व चमसपात्राच्या मुखांत राहणारा असा आहे. ॥२४॥ विनियोग - 'उपयामगृहीतोऽसि' या मंत्राचाही विनियोग ध्रुवपात्र ग्रहणांतच आहे. 'ध्रुवं ध्रुवेण' या मंत्रानें ध्रुवपात्रांतील सर्व सोम होतृचमसांत ओतावा. उपयामगृहीतोऽसि ध्रुवोऽसि श्रुवक्षितिर्ध्रुवाणा ध्रुवतमोऽच्युतानामच्युतक्षित्तम एष ते योनिर्वैश्वानराय त्वा । ध्रुवं ध्रुवेण मनसा वाचा सोममव नयामि । अथा न इन्द्र इद्विशोऽसपत्नाः समनसस्करत् ॥ २५ ॥ अर्थ - हे सोम, तूं उपयामपात्रांत गृहीत असून ध्रुवसंज्ञक आहेस. तुझा निवास निश्चित असून आदित्यस्थाली वगैरे जीं निश्चित व क्षरणरहित पात्रें आहेत, त्यापेक्षां तूं निश्चित व क्षरणरहित आहेस. हे पात्रा, हें तुझें स्थान आहे त्यावर वैश्वानरदेवतेच्या संतोषाकरितां तुझें मी स्थापन करतों. मी एकाग्रमनानें व वाणीनें ध्रुवपात्रांतील सोम होतृचमसांत ओततों. इन्द्रच आमच्या प्रजांना शत्रुरहित व धैर्यसंपन्न करो. ॥२५॥ विनियोग - सोम कांडतांना व पात्रांत भरून घेतांना कांहीं सोमाचे थेंब जमिनीवर पडतात ते भरून घेणें शक्य नाहीं. तज्जन्य दोषनिरासाकरितां 'यस्त' या मंत्रभागानें घृताहुतींनीं होम करावा. एक दर्भ चात्वालांत टाकावा. यस्ते॑ द्र॒प्स स्कन्द॑ति॒ यस्ते॑ अँ॒शुर्ग्राव॑च्युतो धि॒षण॑रु॒पस्था॑त् । अ॒ध्व॒र्योर्वा॒ परि॑ वा॒ यः प॒वित्रा॒त्तं ते॑ जुहोमि॒ मन॑सा वष॑ट्कृतँ॒स्वाहा॑ दे॒वाना॑मु॒त्क्रम॑णमसि ॥ २६ ॥ अर्थ - हे सोमा, तुझ्या रसाचे थेंब व कांहीं भाग वरवंटयावरून अगर वरवंटा व पाटा या दोघांवरून, अध्वर्यूच्या हातून व पवित्रापासून अगर कशामुळें तरी जमिनीवर पडतो. त्या तुझ्या मनःसंकल्पित भागाचा मी स्वाहाकारानें होम करतों. हे चात्वाला, तूं देवांचें स्वर्गगमनस्थान आहेस. म्हणजे देव तुझ्यावरून स्वर्गावर जातात. ॥२६॥ विनियोग - 'प्राणाय मे' इत्यादि अवकाशसंज्ञक मंत्र यजमानांकडून म्हणवावे. प्रा॒णाय॑ मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व व्या॒नाय॑ मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्वोदा॒नाय॑ मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व वा॒चे मे॑ वर्चो॒दा वर्च॑से पवस्व॒ क्रतू॒दक्षा॑घ्यां मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व॒ श्रोत्रा॑य मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व॒ चक्षु॑र्भ्यां मे वर्चो॒दा वर्च॑से पवेथाम् ॥ २७ ॥ अर्थ - हे उपांशुपात्रा, तूं स्वभावतःच तेज देणारें आहेस म्हणून माझ्या प्राणवायूला, हे उपांशुसवना सर्वशरीरगत व्यानवायूला, हे अन्तर्यामपात्रा कण्ठगतवायूला, हे ऐन्द्रवायवपात्रा वागिन्द्रियाला, हे मैत्रावरुणपात्रा इच्छा व समृद्धि यांना, हे आश्विनपात्रा श्रोत्रेन्द्रियाला व हे तेजस्वी शुक्रामन्थि पात्रांनो माझ्या चक्षुरिन्द्रियाला तेजस्वी करण्याकरितां तुम्ही प्रवृत्त व्हा. ॥२७॥ विनियोग - आ॒त्मने॑ मे वर्चो॒दा वर्च॑से पव॒स्वौज॑से मे वर्चो॒दा वर्च॑से पव॒स्वायु॑षे मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व॒ विश्वाभ्यो॑ वर्चो॒दसौ॒ वर्च॑से पवेथाम् ॥ २८ ॥ अर्थ - हें तेज देणार्या आग्रयणपात्रा, माझ्या जीवाला तेज देण्याकरितां, हे उक्थपात्रा सर्वेंन्द्रियसामर्थ्य देण्याकरितां, हे ध्रुवपात्रा, निर्दोष आयुष्यरूपी तेज देण्याकरितां, हे पूतभृत् व आहवनीयांनो, तेज देणारे तुम्ही सर्व माझ्या प्रजांना तेज देण्याकरितां कर्मांत प्रवृत्त व्हा. ॥२८॥ विनियोग - 'कोऽसि' या मंत्रभागानें द्रोणकलशाकडे पहावें. भूर्भुस्वः हा मंत्रभाग यजमानानें जपावा. को॑ऽसि कत॒मो॒ऽसि॒ कस्या॑सि॒ को नामा॑सि । यस्य॑ ते॒ नामाम॑न्महि॒ यं त्वा॒ सोमे॒नाती॑तृपाम । भूभुवः॒ स्वः॒ सुप्र॒जाः प्र॒जाभिः॑ स्याँ सु॒वीरो॑ वी॒रैः सु॒पोषः॒ पोषैः॑ ॥ २९ ॥ अर्थ - हे द्रोणकलशा, तूं प्रजापतिरूपी आहेस. तुझें रूप अतिशयेंकरून प्रजापतिसदृश आहे. तूं प्रजापतिसंबंधीं आहेस व तुझें नांवही प्रजापति हें आहे. ज्या तुझें नांव आम्ही जाणतों व सोमरसानें तुला संतुष्ट करतों अशा तूं आमच्या इच्छा पूर्ण कराव्या. हे अग्निवायुसूर्यांनो, मी उत्तम प्रजांनीं, चांगल्या पुत्रांनीं व धनवृद्धीनें युक्त होईन. ॥२९॥ विनियोग - अध्वर्यु व प्रतिप्रस्थात्यांनीं बारा ऋतुग्रहांचें ग्रहण करावें. या मंत्रांतील पहिला मंत्रभाग अध्वर्यूचा आहे व दुसरा प्रतिप्रस्थात्याचा आहे. इच्छा असल्यास तेराव्या पात्राचें ग्रहण करावें. उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ मध॑वे त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ माध॑वाय त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ शु॒क्राय॑ त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ शुच॑ये त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ नभ॑से त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ नभ॒स्याय॒ त्वोपया॒मगृ॑हीतोऽसी॒षे त्वोपया॒मगृ॑हीतोऽस्यू॒र्जे त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ सह॑से त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ सह॒स्या॒य त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ तप॑से त्वोपया॒मगृ॑हीतोऽसि॒ तप॒स्या॒य त्वोपया॒मगृ॑हीतोऽस्यँहसस्प॒तये त्वा ॥ ३० ॥ अर्थ - हे ऋतुपात्रा, तूं उपयामसंज्ञक पात्रांत गृहीत आहेस. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन या द्वादश मास देवतांकरितां तुझें मीं ग्रहण केलें आहे. तसेंच हे पात्रा, सूर्याच्या गतिक्रमानें येणार्या अधिकमासाचे देवतेकरितां तुझें मी ग्रहण केलें आहे. ॥३०॥ विनियोग - प्रतिप्रस्थात्यानें ऐन्द्राग्नसंज्ञक पात्राचें ग्रहण करावें. इन्द्रा॑ग्नी॒ आ ग॑तँ सु॒तं गी॒र्भिर्नभो॒ व॑रेण्यम् । अ॒स्य पा॑तं धि॒येषि॒ता उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्राग्निभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॑रिन्द्रा॒ग्निभ्यां॑ त्वा ॥ ३१ ॥ विनियोग - आ घा॒ ये अ॒ग्निमि॑न्ध॒ते स्तृ॒णन्ति॑ ब॒हिरा॑नु॒षक् । येषा॒मिन्द्रो॒ युवा॒ सखा॑ । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्यग्नी॒न्द्राभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॑रग्नी॒न्द्राभ्यां॑ त्वा ॥ ३२ ॥ अर्थ - जे यजमान इष्टिपशुयाग वगैरे करून अग्नीला प्रदीप्त करतात व क्रमेंकरून दर्भ पसरतात व तरुण म्हणजे जरा मृत्युरहित असा इंद्र ज्यांचा मित्र आहे त्यांच्या यज्ञांत हे सोमा, तुझा मीं उपयामपात्रांत अग्नींद्र देवतांकरितां स्वीकार केला आहे. हे सोमा, हें तुझें स्थान आहे त्यावर अग्नींद्रदेवतेकरितां मी तुझें स्थापन करतों. ॥३२॥ विनियोग - 'मरुत्वन्तं' या मंत्रभागानें द्वितीय मरुत्वतीय पात्राचें ग्रहण करावें. 'मरुत?????' या मंत्रभागानें तृतीय मरुत्वतीय पात्राचें ग्रहण करावें. म॒रुत्व॑न्त्वं वृष॒भं वा॑वृधा॒नमक॑वारिं दि॒व्यँ शा॒समिन्द्र॑म् । वि॒श्वा॒साहमव॑से॒ नूत॑नायो॒ग्रँ स॑हो॒दामि॒ह तँ हु॑वेम । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑त ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसी मरुतां॒ त्वौज॑से ॥ ३६ ॥ अर्थ - या यज्ञांत आम्ही इंद्राचें आव्हान करतों. तो इंद्र मरुद्गणांनींयुक्त, जलाची वृष्टि करणारा, इच्छा वाढविणारा, वाईट शत्रूंनीं रहित, द्युलोकस्थ, दुष्टांचा नाशक, विश्वपालनासमर्थ, स्वधर्मभ्रष्ट अशा सर्व जगाचा पराजय करणारा, या यजमानाच्या रक्षणांकरितां वज्र धारण करणारा, व बल देणारा असा आहे. हे सोमा, देवसहित इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे तुझें स्थान आहे त्यावर देवसहित इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. हे तृतीय मरुत्वतीय गृहा, देवांना बळ प्राप्त व्हावें म्हणून तुझें मी उपयामपात्रानें ग्रहण करतों. ॥३६॥ विनियोग - विश्वे॑ देवास॒ आ ग॑त शृणु॒ता म॒ इ॒मँ हव॑म् । एदं ब॒हिर्निषी॑दत । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ ए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑ब्यस्त्वा दे॒वेभः॑ ॥ ३४ ॥ अर्थ - हे विश्वेदेवांनो, आमच्या यज्ञांत या व आमचें आव्हान ऐका आणि या दर्भावर बसा. हे सोमा, तुझें मी विश्वेदेवांकरितां उपयामपात्रांत ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे. यावर विश्वेदेवांकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३४॥ विनियोग - येथें प्रातःसवनगृह पूर्ण झालें. यापुढें माध्यंदिन सवनगृह सांगतात. 'इन्द्र मरुत्व' या मंत्रभागानें प्रथम मरुत्वतीय ग्रहाचें ग्रहण करावें. इन्द्र॑ मरुत्व इ॒ह पा॑हि सोमं॒ यथा॑ शार्या॒ते अपि॑ब सु॒तस्य॑ । तव॒ प्रणी॑ती॒ तव॑ शूर॒ शर्म॒न्ना वि॑वासन्ति क॒वयः॑ सुय॒ज्ञाः ।उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑त ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते ॥ ३५ ॥ अर्थ - हे देवसहित इंद्रा, जसें तूं शर्यातीच्या यज्ञांत कांडलेल्या सोमरसाचें पान केलेंस त्याप्रमाणें आमच्या यज्ञांत सोमपान कर. हे शूर इन्द्रा, तुझ्या आज्ञेनें उत्तम यज्ञ करणारे व भूतवस्तूचें ज्ञान असलेले ऋषि सुखप्राप्तीकरितां यज्ञगृहांत तुझी सेवा करतात. हे सोम, देवांसहित इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे त्यावर देवसहित इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३५॥ विनियोग - 'मरुत्वन्तं' या मंत्रभागानें द्वितीय मरुत्वतीय पात्राचें ग्रहण करावें. 'मरुत?????' या मंत्रभागानें तृतीय मरुत्वतीय पात्राचें ग्रहण करावें. म॒रुत्व॑न्त्वं वृष॒भं वा॑वृधा॒नमक॑वारिं दि॒व्यँ शा॒समिन्द्र॑म् । वि॒श्वा॒साहमव॑से॒ नूत॑नायो॒ग्रँ स॑हो॒दामि॒ह तँ हु॑वेम । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑त ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसी मरुतां॒ त्वौज॑से ॥ ३६ ॥ अर्थ - या यज्ञांत आम्ही इंद्राचें आव्हान करतों. तो इंद्र मरुद्गणांनींयुक्त, जलाची वृष्टि करणारा, इच्छा वाढविणारा, वाईट शत्रूंनीं रहित, द्युलोकस्थ, दुष्टांचा नाशक, विश्वपालनासमर्थ, स्वधर्मभ्रष्ट अशा सर्व जगाचा पराजय करणारा, या यजमानाच्या रक्षणांकरितां वज्र धारण करणारा, व बल देणारा असा आहे. हे सोमा, देवसहित इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे तुझें स्थान आहे त्यावर देवसहित इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. हे तृतीय मरुत्वतीय गृहा, देवांना बळ प्राप्त व्हावें म्हणून तुझें मी उपयामपात्रानें ग्रहण करतों. ॥३६॥ विनियोग - 'सजोषा इन्द्रः' व 'मरुत्वां२ ॥ इन्द्रा' या दोन्ही ऋचा मरुत्वतीय पात्रग्रहणांत विनियुक्त आहेत. स॒जोषा॑ इन्द्र॒ सग॑णो म॒रुद्भिः॒ सोमं॑ पिब वृत्र॒हा शू॑र वि॒द्वान् । ज॒हि शत्रूँ२रप॒ मृधो॑ नुद॒स्वाथाभ॑यं कृणुहि वि॒श्वतो॑ नः । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑त ए॒ष ते॒ होनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते ॥ ३७ ॥ अर्थ - हे शूर इंद्रा, तूं सोमपान कर. तूं प्रीतिसंपन्न, सपरिवार, वृत्रासुराचा नाशक व सूज्ञ असा आहेस म्हणून सोमपान कर व वृत्रादि राक्षसांना मार. व राहिलेले शत्रु संग्रामांत पळवून लाव. नंतर आम्हांला सर्व बाजूंनीं निर्भय कर. हे सोमा, देवसहित इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें मी ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे त्यावर देवसहित इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३७॥ विनियोग - म॒रुत्वाँ॑२ इन्द्र वृ॒षभो रणा॑य॒ पिबा॒ सोम॑मनुष्व॒धं मदा॑य । आ सि॑ञ्चस्व ज॒ठरे॒ मध्व॑ ऊ॒र्मिं त्वँ राजा॑ऽसि॒ प्रति॑पत्सु॒ताना॑म् । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑त ए॒ष ते॒ होनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते ॥ ३८ ॥ अर्थ - हे इंद्रा, मदाकरितां (तृप्तीकरितां) व संग्रामाकरितां तूं पुरोडाशादि स्वधान्त कर्मांनीं युक्त अशा सोमरसाचें पान कर. तूं देवांनीं युक्त, जलवृष्टि करणारा असा आहेस. हे इंद्रा, मधुररस युक्त सोमाचे तरंग तूं पोटांत सांठव. हे इंद्रा, प्रतिपदादि तिथींस कांडलेल्या सोमरसाचा तूं अधिपति आहेस. हे सोमा, देवसहित इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें मी ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे त्यावर देवसहित इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३८॥ विनियोग - 'महां २॥ इन्द्रः' या मंत्रभागानें माहेन्द्र ग्रहाचें ग्रहण करावें. म॒हाँ२ इन्द्रो॑ नृ॒वदा च॑र्षणि॒प्रा उ॒त द्वि॒बहा॑ अमि॒नः सहो॑भिः । अ॒स्म॒द्र्य॒ग्वावृधे वी॒र्या॒यो॒रुः पृ॒थुः सुकृ॑तः क॒र्तृभि॑र्भृत् । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसी महे॒न्द्राय॑ त्वै॒ष ते॒ योनि॑र्महे॒न्द्राय॑ त्वा ॥ ३९ ॥ अर्थ - इंद्र वीर कर्माकरितां वृद्धिंगत होतो. तो इंद्र मोठा पराक्रमी, एखादा मनुष्य सेवकांच्या इच्छा पूर्ण करतो त्याप्रमाणें इच्छा पूर्ण करणारा, प्रकृति व विकृति या दोन्ही यागांत वृद्धि पावणारा, निरुपम बलवान्, बलानें अनुपहिंसित, आमच्या संमुख असा आहे. वाढणारा असा तो इंद्र यश व बलानें विस्तृत व यजमानांकडून उत्तम रीतीनें पूजित असा होवो. हे ग्रहा, उपयामसंज्ञक पात्रानें तूं महेन्द्र देवतेकरितां गृहित आहेस. हें तुझें स्थान आहे, त्यावर महेन्द्र देवतेकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३९॥ विनियोग - ????? म॒हाँ२ इन्द्रो॒ य ओज॑सा प॒र्जन्यो॑ वृष्टि॒माँ२ इ॑व । स्तोमै॑र्व॒त्सस्य॑ वावृधे । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसी महे॒न्द्राय॑ त्वैष ते॒ योनि॑र्महे॒न्द्राय॑ त्वा ॥ ४० ॥ अर्थ - महातेजानें युक्त, व मेघाप्रमाणें वृष्टि करणारा जो इंद्र, वत्साप्रमाणें असलेल्या या यजमानाच्या स्तोत्रानें वाढतो, हे ग्रहा, त्या महेंद्र देवतेकरितां उपयामसंज्ञक पात्रानें तुझें ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे, त्यावर महेंद्र देवतेकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥४०॥ विनियोग - वस्त्रबद्ध सुवर्ण जुहूंत ठेवून चतुर्गृहीत आज्यानें शालाद्वार्य अग्नींत होम करावा. उदु॒ त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑ । दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्यँ॒ स्वाहा॑ ॥ ४१ ॥ अर्थ - किरणें, प्रसिद्ध अशा ज्ञानी सूर्यदेवाला विश्वाच्या अवलोकनाकरितां धारण करतात. हें हवि सूर्यदेवाला सुहुत असो. ॥४१॥ विनियोग - 'चित्रं देवानाम्' या मंत्रभागानें पूर्वोक्त अग्नींत दुसर्या आहुतीचा होम करावा. चि॒त्रं दे॒वाना॒मुदगा॒दनी॑कं॒ चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरुणस्या॒ग्नेः । आप्रा॒ द्यावा॑पृथि॒वी अ॑न्तरिक्षँ॒ सूर्य॑ आ॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च॒ स्वाहा॑ ॥ ४२ ॥ अर्थ - आश्चर्याची गोष्ट - सूर्य उदय पावतो व उदय झाल्याबरोबर रात्रिगत अंधकाराचा नाश करतो. तो सूर्यकिरणांचा आश्रयभूत, मित्र, वरुण व अग्नींचा प्रकाशक असा आहे. त्याचा उदय झाल्याबरोबर त्यानें आपल्या तेजानें द्युलोक, पृथिवीलोक व अन्तरिक्ष लोकांना पूर्ण केलें. तो सूर्य स्थावर-जंगमात्मक वस्तूंचा अन्तर्यामी आत्मा आहे. त्याला हें हवि सुहुत असो. ॥४२॥ विनियोग - 'अग्ने नय' 'अयं नः' या दोन मंत्रांनीं आग्निघ्रीय अग्नींत होम करावा. अग्ने न॑य सुपथा॑ राये अस्मान्विश्वानि देव वयुना॑नि विद्वान् । यूओध्यस्मज्जु॑हुराणमेनो भूयि॑ष्ठां ते नम॑ उक्तिं विधेम ॥ ४३ ॥ अर्थ - सर्व ज्ञानांनी युक्त असलेल्या हे प्रकाशक अग्ने, यज्ञफलप्राप्तीकरितां आम्हांला चांगल्या मार्गानें ने. इष्टकर्मप्रतिबन्धक असें आमचें कर्म दूर कर. आम्ही पुष्कळ नमस्कारात्मक वाक्यें बोलूं. म्हणजे तुला नमस्कार असो असें पुष्कळ वेळां उच्चारूं व तुला नमस्कार करूं. तुला हे हवि सुहुत असो. ॥४३॥ विनियोग - अ॒यं नो॑ अ॒ग्निर्वरि॑वस्कृणोत्व॒यं मृधः॑ पु॒र ए॑तु प्रभि॒न्दन् । अ॒यं वाजा॑ञ्जयतु॒ वाज॑साताव॒यँ शत्रू॑ञ्जयतु॒ जर्हृ॑षाणः॒ स्वाहा॑ ॥ ४४ ॥ अर्थ - हा अग्नि आम्हांला द्रव्य देवो व हाच संग्रामांचा नाश करून पुढें जावो. हाच अग्नि अन्नदानाच्या निमित्तानें शत्रूंचीं अन्नें आम्हांला भक्षणाकरितां देवो. म्हणून अत्यंत आनंदित होणारा हा अग्नि आमच्या शत्रूंना जिंको. हे अग्ने, तुला हें हवि सुहुत असो. ॥४४॥ विनियोग - 'रूपेण वः' या मंत्रभागानें यजमानानें दक्षिणारूपी गाईंचें अभिमंत्रण करावें, नंतर यजमानानें सदोमण्डपांत जावें व तेथें असलेल्या ऋत्विजांकडे “यतःस्व” या मंत्रभागानें पहावें. रू॒पेण॑ वो रू॒पम॒भ्यागां॑ तु॒थो वो॑ वि॒श्ववे॑दा॒ वि भ॑जतु । ऋ॒तस्य॑ प॒था प्रेत च॒न्द्रद॑क्षिणा॒ वि स्वः॒ पश्य॒ व्यन्तरि॑क्षं॒ यत॑स्व सद॒स्यैः॒ ॥ ४५ ॥ अर्थ - हे दक्षिणारूपी गाईंनो, मी आपल्या स्वरूपानें तुमच्या स्वरूपाला प्राप्त झालों आहें. ब्रह्मरूपी सर्वज्ञ प्रजापति ऋत्विजांत योग्य रीतीनें तुमची वांटणी करो. सुवर्णरूपी दक्षिणा घेऊन तुम्ही यज्ञाच्या मार्गानें गमन करा. दक्षिणांनो, तुमच्या साहाय्यानें मी देवयानमार्ग व पितृयानमार्गाचें अवलोकन करीन. हे दक्षिणे, ऋत्विजांना धन पुरून उरेल असा तूं यत्न कर. ॥४५॥ विनियोग - 'ब्राह्मणमद्य' या मंत्रभागानें यजमानानें अग्नीघ्राकडे जावें व त्याजवळ बसून 'अस्मद्राता' या मंत्रभागानें त्याला सुवर्ण द्यावें. ब्रा॒ह्म॒णम॒द्य वि॑देयं पितृ॒मन्तं॑ पैतृम॒त्यमृषि॑मार्षे॒यँ सु॒धातु॑दक्षिणम् । अ॒स्मद्रा॑ता देव॒त्रा ग॑च्छत प्रदा॒तार॒मा वि॑शत ॥ ४६ ॥ अर्थ - मी आज उत्तम पित्यापासून जन्मलेला, ज्याचे पितामहादिपूर्वज जगन्मान्य आहेत असा, मंत्रव्याख्याता, व ऋषिश्रेष्ठ व सुवर्णदक्षिणायुक्त अशा ब्राह्मणाला प्राप्त करीन. हे दक्षिणांनो, आम्हीं दिल्यावर तुम्ही देवांकडे जा व त्यांची तृप्ति करून यज्ञफल देण्याकरितां पुनः यजमानाकडे या. ॥४६॥ विनियोग - अध्वर्यु व प्रतिप्रस्थात्यांनीं 'अग्नये त्वा' या मंत्रभागानें सुवर्णाचा, 'रुद्राय त्वा' या मंत्रभागानें गाईंचा, 'बृहस्पतये त्वा' या मंत्रभागानें वस्त्राचा व 'यमाय त्वा' या मंत्रभागानें अश्वाचा प्रतिग्रह करावा. अ॒ग्नये॑ त्वा॒ मह्यं॒ वरु॑णो ददातु॒ सो॒ऽनृत॒त्त्वम॑शी॒यायु॑र्दा॒त्र ए॑धि॒ मयो॒ मह्यं॑ प्रतिग्रही॒त्रे रु॒द्राय॑ त्वा॒ मह्यं॒ वरु॑णो ददातु॒ सो॒ऽमृत॒त्त्वम॑शीय प्रा॒णो दा॒त्र ए॑धि॒ वयो॒ मह्यं॑ प्रतिग्ही॒त्रे बृह॒स्पत॑ये त्वा॒ मह्यं॒ वरु॑णो ददातु॒ सो॒ऽनृत॒त्त्वम॑शीय॒ त्वग्दा॒त्र ए॑धि॒ मयो॒ मह्यं॑ प्रतिग्रहि॒त्रे य॒माय॑ त्वा॒ मह्यं॒ वरु॑णो ददातु॒ सो॒ऽनृत॒त्त्वम॑शीय॒ हयो॑ दा॒त्र ए॑धि॒ वय्॒ओ मह्यं॑ प्रतिग्रहि॒त्रे ॥ ४७ ॥ अर्थ - हे हिरण्या, वरुणानें अग्निरूपी अशा मजकारणें तुझें दान द्यावें. मी अमृत प्राप्त करीन. तूं दात्याचें आयुष्य व प्रतिग्रहीत्याचें सुख वाढव. हे गाई, वरुणानें रुद्ररूपी अशा मजकारणें तुझें दान द्यावें. मी अमृत प्राप्त करीन. तूं या दात्याचें (यजमानाचे) प्राणांची आणि प्रतिग्रहीता जो मी त्याच्या अन्नाची वृद्धि कर. हे वस्त्रा, वरुणानें बृहस्पतिरूपी अशा मजकारणें तुझें दान द्यावें. मी अमृत प्राप्त करीन. तूं या दात्या यजमानाच्या त्वगिन्द्रियकांतीची व प्रतिग्रहीत्या माझे सुखाची वृद्धि कर. हे अश्वा, वरुणानें यमरूपी अशा मजकारणें तुझें दान द्यावें. मी अमृत प्राप्त करीन. तूं दात्या यजमानाकरितां संततिरूपानें वाढ व प्रतिग्रहीत्या अशा मला अन्न दे. ॥४७॥ विनियोग - 'कोऽदात्' या मंत्रभागानें मंथौदन वगैरेंचा प्रतिग्रह करावा. को॑ऽदा॒त्कस्मा॑ अदा॒त्कामो॑ऽदा॒त्कामा॑यादात् । कामो॑ दा॒ता कामः॑ प्रतिग्रही॒ता कामै॒तत्ते॑ ॥ ४८ ॥ अर्थ - कोणी दान दिले ? व कोणाला दिले ? (कोणीं प्रतिग्रह घेतला ?) कामानें दान दिलें व कामाला दिलें. (कामानें प्रतिग्रह घेतला.) (तूं दाता नाहींस व मी प्रतिग्रहीता नाही. तर) कामच दाता व प्रतिग्रहीता आहे. हे कामा, हें द्रव्य तुझेंच आहे. ॥४८॥ ॥ सप्तमोऽध्यायः ॥ |