|
शुक्ल यजुर्वेद विनियोग - ज्यांत सौमिकवेदी मुख्य आहेत अशा पांचव्या अध्यायांत आतिथ्येष्टीपासून यूपनिर्माणापर्यंतचे मंत्र सांगितले. ज्यांत अग्नीषोमीय पशू मुख्य आहेत अशा या सहाव्या अध्यायांत यूपसंस्कारापासून सोमकंडनापर्यंतचे मंत्र आले आहेत. 'देवस्य त्वा' या मंत्रानें अभ्रि घेऊन यूपाच्या खडडयाच्या जागीं 'इदमहम्' या मंत्रानें रेषा ओढाव्यात. 'यवोसि' या मंत्रानें जलांत जव घालावे. 'दिवेत्वा' या मंत्रानें जलसिंचन करावे. 'शुन्धन्ताम्' या मंत्रभागानें अवशिष्ट जल खडडयांत टाकावें. 'पितृषदनमसि' या मंत्रभागानें खडडयावर दर्भ पसरावेत. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् । आ द॑दे॒ नार्यसी॒दम॒हँ रक्ष॑सां ग्री॒वा अपि॑ कृन्तामि । यवो॑ऽसि य॒वया॒स्मद् द्वेषो॑ य॒वयारा॑तीर्दि॒वे त्वा॒ऽन्तरि॑क्षाय त्वा पृथि॒व्यै त्वा॒ शुन्ध॑न्तँल्लो॒काः पि॑तृ॒षद॑नाः पितृ॒षद॑नमसि ॥ १ ॥ अर्थ - हे अभ्रे, सवित्याच्या प्रेरणेनें अश्विनी कुमाराच्या बाहूंनी व पूष्याच्या हस्तांनी मी तुझें ग्रहण करितों. तूं कर्मोपयोगी असल्यानें यजमानसंबंधी आहेस. मी या खडडयाचे जागीं रेघा ओढतों त्यायोगें राक्षसांचा कंठच्छेद करतों. हे धान्यविशेषा जवा, तूं पृथक् करणारा आहेस म्हणून आमचे शत्रू व अदान म्हणजे दान न देणें अर्थात् द्रव्य नसणें ही आमच्यापासून दूर कर. हे अग्रभागा, द्युलोकाच्या प्रीतीकरितां, हे मध्यभागा, अंतरिक्षलोकाच्या प्रीतीकरितां व हे मूलभागा, पृथ्वीलोकाच्या प्रीतीकरितां तुजवर मी जलसिंचन करतों. पितृगण ज्यांत राहतात असे लोक या जलसिंचनानें शुद्ध होवोत. हे दर्भांनो, तुमचे ठिकाणी पितर राहतात म्हणून तुम्ही पितरांचें स्थान आहां. ॥१॥ विनियोग - 'अग्रेणीः' या मंत्रभागानें प्रथम अवयव खड्डयांत ठेवावा. 'देवस्य त्वा' या मंत्रभागानें यूपाला तूप लावावें. खालींवर तूप लावलेला यूपकटक चषाल 'सुपिप्पलाभ्यः' या मंत्रभागानें यूपापुढें ठेवावा. 'द्यामग्रेण' या मंत्रभागानें यूपाला उंच धरावा. अ॒ग्रे॒णीर॑सि स्ववे॒श उ॑न्नेतॄ॒णामे॒तस्य॑ वित्ता॒दधि॑ त्वा स्थास्यति दे॒वस्त्वा॑ सवि॒ता मध्वा॑नक्तु सुपिप्प॒लाभ्य॒स्त्वौष॑धीभ्यः । द्यामग्रे॑णास्पृक्ष॒ आन्तरि॑क्षं॒ मध्ये॑नाप्राः पृथि॒वीमुप॑रेणादृँहीः ॥ २ ॥ अर्थ - हे यूपशकला, तोडलेल्या यूपाचा तूं प्रथमावयव आहेस. यूप उचलणार्या अध्वर्यूंना खडडयांत सहज शिरवितां येईल असा तूं आहेस. तूं हे जाण कीं, यूप तुझ्यावर आरोहण करणार आहे; हे यूपा, प्रकाशमान सविता मधुर अशा आज्यानें तुला मारवो. हे चषाला, सुफलयुक्त अशा व्रीह्यादि औषधींच्या उत्पत्तीकरितां तुला यूपाचे पुढें ठेवतों. हे यूप, तूं वरच्या भागानें द्युलोकाला स्पर्श करता झालास, मध्यभागानें अंतरिक्षलोकाला पूर्ण करता झालास व मूलभागानें पृथ्वीलोकाला दृढ करता झालास. ॥२॥ विनियोग - 'या ते' या मंत्रभागानें यूप खडडयांत ठेवावा. 'ब्रह्मवनि त्वा' या मंत्रभागानें चारही बाजूंनीं खडडयांत माती लोटावी. 'ब्राह्मह्ँह' या मंत्रभागानें यूपाला खडड्यांत पक्कें करावें. या ते॒ धामा॑न्यु॒श्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृङ्गा अ॒यासः॑ । अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य विष्णोः॑ पर॒मं प॒दमव॑ भारि॒ भूरि॑ । ब्र॒ह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ रायस्पोषवनि॒ पर्यू॑हामि । ब्रह्म॑ दॄँह क्ष॒त्रं॒ दृँ॒हायु॑र्दृँह प्र॒जां दृँ॑ह ॥ ३ ॥ अर्थ - हे यूप, ज्या तुझ्या स्थानांवर जाण्याची आम्ही इच्छा करतों व ज्या स्थानांवर प्रकाशमान असे सर्व किरण गेले त्याच ठिकाणीं व महात्म्यांनीं स्तुत्य व व्यापक अशा विष्णूचें सूर्यमण्डलरूपी स्थान विशेषेंकरून शोभतें. हे यूपा, तूं ब्राह्मण व क्षत्रियजातींना प्रसन्न करणारा असा आहेस; तसेंच पुत्रपौत्रादि प्रजा आणि सुवर्ण देणारा आहेस. तूं ब्राह्मणजातीला, क्षत्रियजातीला, आयुष्याला व पुत्रादिप्रजांना दृढ कर. ॥३॥ विनियोग - 'विष्णोः कर्माणि' या मंत्रभागाचें यूपस्पर्श करणार्या यजमानाकडून पठण करवावें. विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ ४ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, ज्या कर्मांच्या योगानें यज्ञाधिष्ठाता जो विष्णु त्यानें लौकिक वैदिक कर्में निर्माण केलीं त्या विष्णूचीं सृष्टिसंहारादि कर्में तुम्ही अवलोकन करा. तो विष्णु वृत्रवधादिकर्मांमध्यें इंद्राचा योग्य असा मित्र आहे. ॥४॥ विनियोग - चषालाकडे पाहणार्या यजमानाकडून 'तद्विष्णोः' हा मंत्र म्हणवावा. तद्विष्णोः॑ प॒रमं प॒दँ सदा॑ पश्यन्ति सूरयः॑ । दि॒वी॒व॒ चक्षु॒रात॑तम् ॥ ५ ॥ अर्थ - वेदान्तज्ञानी विद्वान् आकाशांत व्याप्त असें सूर्यमण्डलरूपी तें विष्णूचें श्रेष्ठ स्थान पाहतात. ॥५॥ विनियोग - त्रिगुणित केलेली तीन वाव दर्भांची दोरी घेऊन तिनें यूपाला 'परिवीः' या मंत्रभागानें तीन वेढे द्यावे. 'दिवः सूनुः' या मंत्रभागानें स्वरुनांवाचें यूपशकल दोरींत बांधावें, 'एष ते' या मंत्रानें बारावा यूप जमिनीवर नुसता ठेवावा, पुरूं नये. प॒रि॒वीर॑सि॒ परि॑ त्वा॒ दैवी॒र्विशो॑ व्ययन्तां॒ परी॒मं यज॑मानँ॒ रायो॑ मनु॒ष्या॒णाम् । दि॒वः सू॒नुर॑स्ये॒ष ते॑ पृ॒थि॒व्याँल्लो॒क आ॑र॒ण्यस्ते॑ प॒शुः ॥ ६ ॥ अर्थ - हे यूपा, तूं रज्जूनें वेष्टित झाला आहेस. देवांचे मरुद्गण तुझें वेष्टण करोत. सर्व मनुष्यांमध्यें याच यजमानाला द्रव्यें वेष्टण करोत म्हणजे यालाच द्रव्य मिळो. हे स्वरो, तूं द्युलोकाचा पुत्र आहेस. हे यूपा, या पृथ्वीवरच तुझें आश्रयस्थान आहे. रानांत असलेला पशु तुझाच आहे. ॥६॥ विनियोग - 'उपावीरसि' या मंत्रभागानें गवत घेऊन 'उपदेवान्' या मंत्रभागानें पशूला स्पर्श करावा. उ॒पा॒वीर॒स्युप॑ दे॒वान्दैवी॒र्विशः॒ प्रागु॑रु॒शिजो॒ वह्नि॑तमान् । देव॑ त्वष्ट॒र्वसु॑ रम ह॒व्या ते॑ स्वदन्ताम् ॥ ७ ॥ अर्थ - तृणा, तूं समीप गमन करणारा आहेस. देवसंबंधी पशु अग्नीष्टोमादि देवांप्रत गमन करोत. ते देव बुद्धिमान् व यजमानाला स्वर्ग देणार्यांमध्यें श्रेष्ठ आहेत. हे प्रकाशमान त्वष्टया, तूं पशुरूपी द्रव्याला आनंदित कर. हे पशो, तुझे अवयवरूपी हविर्भाग देवांना आवडोत. ॥७॥ विनियोग - द्विगुणित दोन वाव दर्भाच्या दोरीचा फास करून पशूला दोन शिंगांमध्यें उजव्या शिंगाजवळ 'ऋतस्य त्वा' या मंत्रभागानें बांधावें. रेव॑ती॒ रम॑ध्वं॒ बृह॑स्पते धा॒रया॒ वसू॑नि । ऋ॒तस्य॑ त्वा देवहविः॒ पाशे॑न॒ प्रति॑ मुञ्चामि॒ धर्षा॒ मानु॑षः ॥ ८ ॥ अर्थ - हे क्षीरादिधानयुक्त पशूंनो, तुम्ही यजमानाचे घरीं आनन्दानें रहा. हे बृहस्पते, तूं पशूंना स्थिर कर. हे देवहविर्द्रव्या पशो, तुला मी यज्ञाच्या पाशानें बांधतों. (नंतर पशु हा मारणाराचे स्वाधीन करावा) हा पशु बांधला असल्यानें मारणारा पुरुष याला मारण्यास समर्थ होवो. ॥८॥ विनियोग - 'देवास्य त्वा' या मंत्रभागानें यूपाला पशु बांधावा. 'अभ्द्यस्त्वा' या मंत्रभागानें पशूवर जलसिंचन करावें. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् । अ॒ग्नीषोमा॑भ्यां॒ जुष्टं॒ नि यु॑नज्मि । अ॒द्भ्यस्त्वौष॑धी॒भ्योऽनु॑ त्वा मा॒ता म॑न्यता॒मनु॑ पि॒ताऽनु भ्राता॒ सग॒र्भ्योऽनु॒ सखा॒ सयू॑थ्यः । अ॒ग्नीषोमा॑भ्यां त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि ॥ ९ ॥ अर्थ - हे पशो, प्रकाशक सवित्याच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हातांनीं मी अग्नीषोमांना आवडणार्या अशा तुला बांधतों. हे पशो, अग्नीषोमांना आवडणार्या तुझें जलांनीं व दर्भादिक औषधींनीं सिंचन करतों. हे पशो, प्रोक्षित व अग्नीषोमांना आवडणार्या अशा तुला पृथ्वी, द्युलोक व सोदर भ्राता व तुझ्या कळपांतील मित्र अनुमति देवोत. ॥९॥ विनियोग - 'आपां पेरुः' या मंत्रभागानें पशूच्या मुखांत प्रोक्षणी जल घालावें. 'आपो देवीः' या मंत्रभागानें पशूच्या हृदयावर जलसिंचन करावें. 'संते' इत्यादि तीन मंत्रभागांनीं जुहूनेंच पशूचे कपाळाला, खांद्यांना व मांडयांना तूप लावावें. अ॒पां पे॒रुर॒स्यापो॑ दे॒वीः स्व॑दन्तु स्वा॒त्तं चि॒त्सद्दे॑वह॒विः । सं ते॑ प्रा॒णो वार्ते॑न गच्छताँ॒ समङ्गा॑नि॒ यज॑त्रैः॒ सं य॒ज्ञप॑तिरा॒शिषा॑ ॥ १० ॥ अर्थ - हे पशो, तूं जलपानशील आहेस. (जलांचें पान करणें हा तुझा स्वभाव आहे) जलदेवता तुझें भक्षण करोत कारण कीं, त्यांनीं भक्षण केल्यानें पशुरूपी हवि देवांच्या भक्षणाला योग्य होतें. हे पशो, तुझे प्राण वायूनें, तुझीं अंसादिक आंगें यागांनीं व यजमान यज्ञफलानें युक्त होवो. ॥१०॥ विनियोग - विशसित्यानें (पशु मारणारानें) दिलेलें खड्ग हातांत घ्यावें व यूपावरून स्वरु काढून घ्यावा व त्या दोघांनाही तूप लावावें व त्यांनीं 'घृतेनाक्तौ' या मंत्रभागानें पशूच्या कपाळाला स्पर्श करावा. 'रेवति यजमाने' हा मंत्रभाग यजमानाकडून बोलवावा. 'वर्षो वर्षीयसि' या मंत्रभागानें हातांतील दोन दर्भांपैकीं एक जमिनीवर ठेवावा. 'देवेभ्यः स्वाहा' या मंत्रभागानें होम करावा. घृतेना॒क्तौ प॒शूँस्त्रा॑येथाँ॒ रेव॑ति॒ यज॑माने प्रि॒यं धा आ वि॑श । उ॒रोर॒न्तरि॑क्षात्स॒जूर्देवेन॒ वाते॑ना॒स्य ह॒विष॒स्त्मना॑ यज॒ सम॑स्य तन्वा॒ भव । वर्षो॒ वर्षी॑यसि य॒ज्ञे य॒ज्ञप॑तिं धाः॒ स्वाहा॑ दे॒वेभ्यो॑ दे॒वेभ्यः॒ स्वाहा॑ ॥ ११ ॥ अर्थ - हे स्वरुशस्त्रांनो, तुम्हांला तूप लावलें आहे. तुम्ही या पशूचें रक्षण करा. हे धनवति वाग्देवते, या यजमानाचें प्रिय कर व ज्ञानरूपानें यजमानांत प्रवेश कर. आणखी हे वाग्देवते, प्रकाशक अशा वायूंबरोबर मैत्री करून विस्तीर्ण अशा अन्तरिक्षापासून या यजमानाचें रक्षण कर. या पशूच्या शरीररूपी हविर्द्रव्यानें याग कर व त्याच्या शरीराशीं एक हो. हे वृष्टीपासून उत्पन्न होणार्या तृणा (दर्भा) या विस्तीर्णतर यज्ञामध्यें यजमानाची स्थापना कर. पूर्वीं व नंतर ज्यांचा होम होतो अशा दोन्ही प्रकारच्या देवांना हे हवि सुहुत असो. ॥११॥ विनियोग - वपा ज्यांवर शिजवितात अशा दोन काष्ठांना वपाथ्रपणी म्हणतात. त्या काष्ठांनीं पशूची दोरी द्विगुणित करून 'माहिर्भूः' या मंत्रभागानें चात्वाळांत टाकावी. प्रतिप्रस्थात्यानें गार्हपत्यापासून पशुशोधनाकरितां पत्नीला न्यावें त्यावेळीं तिनें उदककलश हस्तांत धारण करावा व तिजकडून 'नमस्त आतान' हा मंत्रभाग म्हणवावा. माहि॑र्भू॒र्मा पृदा॑कु॒र्नम॑स्त आतानान॒र्वा प्रेहि॑ । घृ॒तस्य॑ कु॒ल्या उप॑ ऋ॒तस्य॒ पथ्या॒ अनु॑ ॥ १२ ॥ अर्थ - हे रज्जो, तूं सर्पाच्या व अजगराच्या आकाराची होऊं नकोस. हे विस्तृत यज्ञा, तुला नमस्कार असो. तूं शत्रुरहित होऊन समाप्त हो व यज्ञाच्या मार्गांत पुष्कळ घृताच्या नद्या येतील त्यांमागून जा. तात्पर्य या यज्ञांत पुष्कळ घृत होमलें जातें. ॥१२॥ विनियोग - अशा रीतीनें यज्ञाची स्तुति करून जलांची स्तुति 'देवीरापः' या मंत्रानें केली आहे. देवी॑रापः शु॒द्धा वो॑ढ्वँ॒ सुप॑रिविष्टा दे॒वेषु॒ सुप॑रिविष्टा व॒यं प॑रिवे॒ष्टारो॑ भूयास्म ॥ १३ ॥ अर्थ - हे प्रकाशक जलांनो, स्वतः शुद्ध व पान्नेजनीपात्रांत असलेल्या अशा तुम्ही हा पशु देवांकडे न्यावा. आम्हीही देवशरीरांत राहिलों आहों. त्यांचे संतोषानें आम्ही त्यांना वाढणारे होऊं. ॥१३॥ विनियोग - यजमानपत्नीनें पशूचे समीप बसावें व त्याच्या मुखादि आठ अवयवांना 'वाचं ते' इत्यादि मंत्रभागांनीं जलाचा स्पर्श करावा. वाचं॑ ते शुन्धामि प्रा॒णं ते॑ शुन्धामि॒ चक्षु॑स्ते ते शुन्धामि॒ श्रोत्रं॑ ते शुन्धामि॒ नाभिं॑ ते शुन्धामि॒ मेढ्रं॑ ते शुन्धामि पा॒युं ते॑ शुन्धामि च॒रित्राँ॑स्ते शुन्धामि ॥ १४ ॥ अर्थ - हे पशो, मी तुझें वागिन्द्रिय, प्राण, चक्षु, श्रोत्र, नाभि, लिंग, गुद व चार पाय यांना व त्याचप्रमाणें सर्व अवयवांना जलानें शुद्ध करिते. ॥१४॥ विनियोग - उदकपात्रांतील अवशिष्ट जलानें यजमान व अध्वर्यु या दोघांनीं पशूच्या शिरःप्रभृति अवयवांचे 'मनस्ते' इत्यादि मंत्रभागांनीं जलानें सिंचन करावें. नंतर 'यत्ते क्रूरम्' या मंत्रभागानें अवशिष्ट अंगांचें सिंचन करावें. तसेंच 'शमहोभ्यः' या मंत्रभागानें पशूच्या जघनभागावर सिंचन करावें. नंतर पशूला उताणा करून बेंबीच्या चार अंगुलें पलीकडे 'ओषधे' या मंत्रभागानें दर्भ ठेवावा. नंतर 'स्वधिते' इत्यादि मंत्रभाग म्हणून तूप लावलेल्या खड्गाचे धारेनें दर्भासह पशूच्या पोटाची त्वचा मंत्र न म्हणतां कापावी. मन॑स्त॒ आ प्या॑यतां॒ वाक्त॒ आ प्या॑यतां प्रा॒णस्त॒ आ प्या॑यतां॒ चक्षु॑स्त॒ आ प्या॑यताँ॒ श्रोत्रं॑ त॒ आ प्या॑यताम् । यत्ते॑ क्रू॒रं यदास्थि॑तं॒ तत्त॒ आ प्या॑यतां॒ निष्ट्या॑यतां तत्ते॑ सुध्यतु॒ शमहो॑भ्यः । ओष॑धे॒ त्रायस्व॒ स्वधि॑ते॒ मैनँ॑ हिँसीः ॥ १५ ॥ अर्थ - हे पशो, तुझे मन, वाणी, प्राण, चक्षु, श्रोत्र ही सर्व शांत होवोत. आम्हीं तुला बांधून वगैरे जें क्रूर कृत्य केलें व मारणार्या पुरुषानें जें तुला कापलें वगैरे तें सर्व शांत होवो. तें सर्व यथायोग्य होवो व शुद्ध होवो. पुष्कळ दिवसपावेतों आमचें व पशूचें कल्याण होवो. हे दर्भा, पशूचें रक्षण कर. हे खड्गा, तूं याला मारू नकोस. ॥१५॥ विनियोग - पशूच्या नाभीवर ठेवलेला कापलेल्या दर्भाचा अग्रभाग डाव्या हातानें व मूलभाग उजव्या हातानें धरून त्याच्या अग्रभागाला व मुळाला 'रक्षसां' इत्यादि मंत्रभागानें पशूच्या रक्ताचा लेप करावा. 'निरस्तम्' या मंत्रभागानें नंतर तो उजव्या हातांतील दर्भ उत्करावर (उकरडयावर) टाकावा. 'इदमहं' या मंत्रभागानें त्या दर्भावर यजमानानें उभें रहावें. पशूच्या पोटांतून वपा काढून ती 'घृतेन द्यावा पृथिवी' या मंत्रभागानें वपाश्रपणीसंज्ञक काष्ठावर पसरावी; नंतर डाव्या हातांत धरलेलें दर्भाचें अग्र अध्वर्यूनें 'वायो वेः' या मंत्रभागानें आहवनीयांत टाकावें. नंतर 'अग्निराज्यस्य' या मंत्रभागानें स्रुव्यानें वपेवर तूप घालावें. नंतर वपेचा होम करून 'स्वाहाकृते' या मंत्रभागानें वपाश्रपणी काष्ठांचा आहवनीयांत होम करावा. रक्ष॑सां भा॒गो॒ऽसि॒ निर॑स्तँ॒ रक्ष॑ इ॒दम॒हँ रक्षो॒ऽभि ति॑ष्ठामी॒दम॒हँ रक्षोऽव॑ बाध इदम॒हँ रक्षो॑ऽध॒मं तमो॑ नयामि । घृ॒तेन॑ द्यावापृथिवी॒ प्रोर्णु॑वाथां॒ वायो॒ वे स्तो॒काना॑म॒ग्निराज्य॑स्य वेतु॒ स्वाहा॒ स्वाहा॑कृते ऊ॒र्ध्वन॑भसं मारु॒तं ग॑च्छतम् ॥ १६ ॥ अर्थ - हे रक्तानें माखलेल्या तृणा, तूं राक्षसांचा भाग आहेस. अध्वर्यूनें उत्करावर टाकलेले तृण राक्षसरूपी असल्यामुळें मी यजमान त्यावर पाय ठेऊन उभा राहतो; इतकेंच नव्हे तर पायाखालीं दाबून त्याचा नाश करतों. मी या राक्षसाला अत्यंत निकृष्ट अशा नरकांत पोंचवितों. हे द्यावापृथिवींनो, तुम्ही जलानें परस्परांचें आच्छादन करा. हे वायो, तूं वपेवरील थेंब जाण व पिऊन जा. आहवनीय अग्नि घृतपान करो. त्याला हें हवि सुहुत असो. स्वाहाकारानें आहुतिभावाला प्राप्त झालेल्या हे वपाश्रपणी काष्ठांनो, तुम्ही वायूमध्यें गमन करा. त्या वायूवर यज्ञ स्थित आहे व तो आकाशांत राहतो. ॥१६॥ विनियोग - यजमानपत्नीसह सर्व ऋत्विजांनीं 'इदमापः' हा मंत्रभाग म्हणून चात्वालाचे समीप शरीराचें संमार्जन करावें. इ॒दमा॑पः प्र व॑हताव॑द्यं च॑ मलं॑ च॒ यत् । यच्चा॑भिदु॒द्रोहानृ॑तं॒ यच्च॑ शे॒पे अ॑भी॒रुण॑म् । आपो॑ मा॒ तस्मा॒देन॑सः॒ पव॑मानश्च मुञ्चतु ॥ १७ ॥ अर्थ - हे जलांनो, तुम्ही पशु मारण्यानें व अशुद्ध बोलण्यानें उत्पन्न झालेलें पाप व शरीरांतील मल दूर करा. तसेंच आम्हीं खोटें बोलून लोकांचा जो द्रोह केला व अनपराध्याला वाईट बोललों, त्या पापांपासून हे जलांनो, आम्हांला दूर करा व वायुही आम्हांला त्या पापांपासून दूर करो. ॥१७॥ विनियोग - 'सं ते मनः' या मंत्रभागानें जुहूस्थ पृषदाज्यानें पशूच्या हृदयावर अभिघार करावा. नंतर मंत्र न म्हणतां त्याचा सर्व अंगावर अभिघार करावा. नंतर 'रेडसि' या मंत्रभागानें वसा ग्रहण करून तिच्यावर दोन वेळां अभिघार करून 'प्रयुतं' या मंत्रभागानें तिच्यांत तूप मिसळावें. सं ते॒ मनो॒ मन॑सा॒ सं प्रा॒णः प्रा॒णेन॑ गच्छताम् । रेड॑स्य॒ग्निष्ट्रवा॑ श्रीणा॒त्वाप॑स्त्वा॒ सम॑रिण॒न्वात॑स्य त्वा॒ ध्राज्यै॑ पू॒ष्णो रँह्या॑ ऊ॒ष्मणो॑ व्यथिष॒त् । प्रयु॑तं॒ द्वेष॑ ॥ १८ ॥ अर्थ - हे हृदया, तूं ज्या पशूचें आहेस त्याचें मन व प्राण देवाच्या मन व प्राणाशीं युक्त होवोत. हे वसे, तूं हिंसित झाल्यासारखी दिसतेस. तुला अग्नि शिजवोत व जलें वाढवोत. वायूची अंतरिक्षांत, सूर्याची द्युलोकांत गति व्हावी म्हणून त्या तुझें मी ग्रहण करतों. अन्तरिक्षरूपी उष्णता नष्ट होवो म्हणजे देवांना वसाभक्षणानें उष्णता न होवो. हे तुझ्यांत घृत मिसळल्यानें तुझ्यांतील दुष्ट पदार्थ दूर झाले. ॥१८॥ विनियोग - 'घृतं घृतपावानः' या मंत्रभागानें वसेच्या एका भागाचा होम करावा. वाजिनाचे वेळीं सांगितलें त्याप्रमाणे वसाशेषानें दिशांचा व्याघार (सिंचन) करावा. घृ॒तं घृ॑तपावानः पिबत॒ वसां॑ वसापावानः पिबता॒न्तरि॑क्षस्य ह॒विर॑सि॒ स्वाहा॑ । दिशः॑ प्र॒दिश॑ आ॒दिशो॑ वि॒दिश॑ उ॒द्दिशो॑ दि॒ग्भ्यः स्वाहा॑ ॥ १९ ॥ अर्थ - हे घृतपान करणार्या देवांनो, तुम्ही घृत प्या व वसापान करणार्यांनो, तुम्ही वसा प्या. हे वसे, तूं अंतरिक्षाचें हविर्द्रव्य आहेस. हे हविर्द्रव्य सुहुत असो. दिशा, प्रदिशा, आदिशा, विदिशा, उद्दिशा वगैरे सर्व दिशांना हें हवि सुहुत असो. ॥१९॥ विनियोग - 'ऐन्द्रः प्राणः' या मंत्रभागानें पशुरूपी हविर्द्रव्याला स्पर्श करावा. ऐ॒न्द्रः प्रा॒णो अङ्गे॑ अङ्गे॒ नि दी॑ध्यदै॒न्द्र उ॑दानो अङ्गे॑ अङ्गे॒ निधी॑तः । देव॑ त्वष्ट॒र्भूरि॑ ते॒ सँ स॑मेतु॒ सल॑क्ष्मा॒ यद्विषु॑रूपं॒ भवा॑ति । दे॒व॒त्रा यन्त॒मव॑से॒ सखा॒योऽनु॑ त्वा मा॒ता पि॒तरो॑ मदन्तु ॥ २० ॥ अर्थ - आत्मसंबंधी प्राणवायु व उदानवायु या पशूच्या सर्व अवयवांमध्यें स्थापन केला गेला आहे. हे प्रकाशक त्वष्टया, जे पशूचे अवयव पूर्वी एक होते; परंतु कापल्यानें वेगळे झाले ते तुझ्या कृपेनें पुनः चांगल्या तर्हेनें एकत्र होवोत. हे पशो, अशा रीतीनें प्राणांनीं व अवयवांनीं एकत्र होऊन देवाकडे सर्व कुलाच्या रक्षणाकरितां जाणार्या तुला तुझे मित्रभूत इतर पशु व आईबाप अनुज्ञा देवोत. ॥२०॥ विनियोग - 'समुद्रं गच्छ' वगैरे प्रत्येक मंत्रभागानें प्रतिप्रस्थात्यानें अनुयाज (होम) करावे. व प्रत्येक होमाच्या शेवटीं जलानें मुखस्पर्श करावा. नंतर 'दिवं ते' इत्यादि मंत्रभागानें स्वरूचा होम करावा. स॒मुद्रं गच्छ॒ स्वाहा॒ ऽन्तरि॑क्षं गच्छ॒ स्वाहा॑ देँ॒ मि॒त्रावरुणौ गच्छ॒ स्वाह॑ ऽहोरा॒त्रे गच्छ॒ स्वाह॑ छन्दाँ॑सि गच्छ॒ स्वाह॑ द्यावा॑पृथि॒वी गच्छ॒ स्वाह॑ य॒ज्ञं गच्छ॒ स्वाह॑ सो॑मं गच्छ॒ स्वाह॑ दि॒व्यं नभो॑ गच्छ॒ स्वाह॑ ऽग्निं वै॑श्वान॒रं गच्छ॒ स्वाह॑ मनो॑ मे॒ हार्दि यच्छ॒ दिवं॑ ते धू॒मो गच्छ॑तु॒ स्वर्ज्योतिः॑ पृथि॒वीं भस्म॒नाऽऽपृ॑ण॒ स्वाहा॑ ॥ २१ ॥ अर्थ - हे हविर्द्रव्या, तूं समुद्र, अन्तरिक्ष, सवितादेव, मित्रावरुण, अहोरात्र, छन्दस्, द्यावापृथिवी, यज्ञ, सोम, दिव्य नभ व वैश्वानर अग्नि या अकरा देवतांच्या संतोषाकरितां त्यांकडे जा. तूं सुहुत असो. हे समुद्रादि देवतांनो, माझें मन हृदयांत एकत्र करा म्हणजे निश्चयात्मक करा. हे स्वरो, तुझा धूप वृष्टीकरितां स्वर्लोकांत जावो. तुझी ज्वाला अन्तरिक्षांत जावो व तूं आपल्या भस्मानें (राखेनें) पृथिवीला पूर्ण कर; अर्थात् तुझी राख पृथिवीत जावो. तूं सुहुत असो. ॥२१॥ विनियोग - मारलेल्या पशूचें हृदयमांस ज्यांवर ठेवले होते त्याला हृदयशूल म्हणतात. तो ओल्या व कोरडया जमिनीच्या मध्यांत 'शुगसि' व 'मापो मौषधीः' या दोन मंत्रभागांनी पुरावा. तदनंतर 'धाम्नो धाम्नः' व 'सुमित्रिया नः' या दोन मंत्रभागांनीं यजमानानें व सर्व ऋत्विजांनी जलस्पर्श करावा. माऽप् मौष॑धीहिँसी॒र्धाम्नो॑ धाम्नो राँ॒स्ततो॑ नो मुञ्च । यदा॒हुर॒घ्न्या इति॒ वरु॒णेति॒ शपा॑महे ततो॑ वरुणो नो मुञ्च । सुमि॒त्रि॒या न॒ आप॒ ओष॑धयः सन्तु दुर्मित्रि॒यास्तस्मै॑ सन्तु॒ योऽस्मान्देवेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मः ॥ २२ ॥ अर्थ - हे हृदयशूला, तूं जल व ओषधींची हिंसा करूं नकोस. हे वरुणा, ज्या ज्या तुझ्या स्थानापासून आम्ही भितों त्यापासून आमचें रक्षण कर. तसेंच गाई अहिंस्य आहेत असें वेदादिकांत सांगितलें आहे. परंतु आम्हीं तर हिंसा केली तेव्हा आम्ही प्रार्थना करितों की, आम्हाला या हिंसादोषापासून मुक्त कर. जलें व ओषधि आमच्याशी चांगली मैत्री करोत. व जो आमचा द्वेष करतो व आम्ही ज्यांचा द्वेष करितों त्याच्याशी जलें व ओषधि शत्रुत्व करोत. ॥२२॥ विनियोग - तें 'हविष्मती' या मंत्रानें करावें. त्या नंतर सोमकण्डनोपयोगी 'वसतीवरी' संज्ञक जीं जलें त्यांचें ग्रहण सांगतात. अग्नीषोमीय पशूसंबंधी पूर्वोक्त कर्म संपल्यावर सूर्यास्त होण्याचे पूर्वी प्रवाहाचें पाणी भरून आणावें. या पाण्याला वसतीवरी म्हणतात. ह॒विष्म॑तीरि॒मा आपो॑ ह॒विष्माँ॒२ आ वि॑वासति । ह॒विष्मा॑न् दे॒वो अ॑ध्व॒रो ह॒विष्माँ॑ २ अस्तु॒ सूर्यः॑ ॥ २३ ॥ अर्थ - हविर्द्रव्ययुक्त यजमान हविर्द्रव्ययुक्त या वसतीवरीसंज्ञक जलाची सेवा करतो. या जलांचे योगानें प्रकाशमान यज्ञही हविर्द्रव्ययुक्त होवो. व सूर्यदेवताही यजमानाला यज्ञाचें फल देण्याकरितां हविःसंपन्न होवो. ॥२३॥ विनियोग - 'अग्नेर्वः' या मंत्रभागानें तें वसतीवरी जल नूतन गार्हपत्याच्या पश्चिमभागीं ठेवावें. नंतर तें दक्षिण दरवाजानें नेऊन उत्तरवेदीच्या दक्षिणश्रोणीवर ठेवावें. नंतर पूर्वीप्रमाणेंच 'इन्द्राग्न्योः' हा मंत्रभाग म्हणून तें जल उत्तरवेदीच्या उत्तरश्रोणीवर ठेवावे. नंतर 'विश्वेषां देवानां' या मंत्रभागानें अग्नीध्र स्थानाच्या पश्चाद्भागीं तें जल ठेवावें. अ॒ग्नेर्वोऽप॑न्नगृहस्य॒ सद॑सि सादयमीन्द्रा॒ग्न्योर्भा॑ग॒धेयी॑ स्थ मि॒त्रावरु॑णयोभाग॒धेयी॑ स्थ॒ विश्वे॑षां दे॒वानां॑ भाग॒धेयी॑ स्थ । अ॒मूर्या उप॒ सूरे॒ याभि॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह । ता नो॑ हिन्वन्त्यध्व॒रम् ॥ २४ ॥ अर्थ - हे वसतीवरी जलांनो, तुम्हाला ज्याचें घर अविनाशी आहे अशा अग्नीच्या जवळ स्थापन करतों. तुम्ही इंद्राग्नींचीं व मित्रावरुणांचीं भागरूपी आहां. तसेंच तुम्ही सर्व देवतांचीं भागरूपी आहां. जीं हीं जलें सूर्यसमीप आहेत व ज्यांचेबरोबर सूर्य गमन करतो तीं जलें आमच्या यज्ञाला संतुष्ट करोत. ॥२४॥ विनियोग - सोम घेऊन हविर्धान मण्डपांत जावें व सोम मोकळा करून त्याचा अर्धा भाग पाटयांच्या स्थूल भागावर 'हृदे त्वा' या मंत्रभागाने ठेवावा. हृ॒दे त्वा॒ मन॑से त्व दि॒वे त्वा॒ स्य्य्र्या॑य त्वा । ऊ॒र्ध्वमि॒म॑मध्व॒रं दि॒वि दे॒वेषु॒ होत्रा॑ यच्छ ॥ २५ ॥ अर्थ - हे सोमा, निश्चयात्मक बुद्धि, संकल्पविकल्पात्मक मन, द्युलोक व सूर्यादि देवतांकरितां तुला मी पाटयांवर ठेवतों. व अशा रीतीने ठेवलेल्या व कांडलेल्या हे सोमा, या यज्ञाला तूं वर कर व द्युलोकस्थ देवांचें व षट्कार करणार्या सप्तहोत्यांचें ऐक्य कर. ॥२५॥ विनियोग - नंतर 'विश्वास्त्वां' या मंत्रभागानें सोम मोकळा करून पाटयावर नीट ठेवावा, नंतर होत्यानें शस्त्र म्हटल्यावर अध्वर्यूनें 'श्रृणोत्वग्निः' या मंत्रभागानें प्रचरणीसंज्ञक स्रुचेनें आज्याचा होम करावा. सोम॑ राज॒न् विश्वा॒स्त्वं प्र॒जा उ॒पाव॑तोह॒ विश्वा॒स्त्वां प्र॒जा उ॒पाव॑रोहन्तु । शृ॒णोत्व॒ग्निः स॒मिधा॒ हवं॑ मे श्रृ॒ण्वन्त्वापो॑ धि॒षणा॑श्च दे॒वीः । श्रोता॑ ग्रावाणो वि॒दुषो॒ न य॒ज्ञँ श्रृ॒णोतु॑ दे॒वः स॑वि॒ता हवं॑ मे॒ स्वाहा॑ ॥ २६ ॥ अर्थ - हे सोमराजा, सर्व प्रजांचें आधिपत्य कर. हे सोमा, सर्व प्रजा तुला अभ्युत्थान देवोत. समित्पूर्वक आहुतीच्या योगानें अग्नि व जलें आणि प्रकाशमान बुद्धियुक्त वाणी माझें बोलावणें ऐकोत. हे कण्डनाकरितां उपस्थित झालेल्या पाषाणांनो तुम्ही, ज्ञाते विद्वान् ज्याप्रमाणें यज्ञाला जाणतात व श्रवण करतात त्याप्रमाणें तुम्ही माझें बोलावणें ऐका. तसेंच प्रकाशमान् सूर्य माझें बोलावणें ऐको. हें हवि सुहुत असो. ॥२६॥ विनियोग - नंतर जलाजवळ जाऊन त्यांत घृताचा होम करावा. दे॒वी॑रापो अपां नपा॒द्यो व॑ ऊ॒र्मिह॑वि॒ष्य॒ इन्द्रि॒यावा॑न् म॒दिन्त॑मः । तं दे॒वेभ्यो॑ देव॒त्रा द॑त्त शुक्र॒पेभ्यो॒ येषां॑ भा॒ग स्थ स्वाहा॑ ॥ २७ ॥ अर्थ - हे प्रकाशक जलांनो, तुमचा ??? संज्ञक, हविर्द्रव्य योग्य, इंद्रियतेजोवर्धक, व अत्यंत हर्षकारी असा जो देवांकडे जाणारा लाटांचा समुदाय आहे तो ज्यांचे तुम्ही अंश आहां अशा सोमपान करणार्या देवांना द्या. तुम्हांला हें हवि सुहुत असो. ॥२७॥ विनियोग - 'कार्षिरसि' या मंत्रभागानें जलांत होमलेला तुपाचा भाग मैत्रावरुण चमसानें बाजूस करावा. व 'समुद्रस्य त्वा' या मंत्रभागानें तडागांतलें जल ग्रहण करावें. तलावावरून परत आल्यावर चात्वालावर मैत्रावरुण चमसांतलें पाणी वसतीवरी जलांत 'समापहः' या मंत्रभागानें एकत्र करावें. कार्षि॑रसि समु॒द्रस्य॒ त्वा क्षि॑त्या॒ उन्न॑यामि । समापो॑ अ॒द्भिर॑ग्मत॒ समोष॑धीभि॒रोष॑धीः ॥ २८ ॥ अर्थ - हे आज्या, देवतांनीं तुझें भक्षण केलें आहे. वसतीवरीजलरूपी समुद्र घटूं नये तर वाढावा म्हणून तुझें मी ग्रहण करतों. मैत्रावरुण चमसांतलीं जलें वसतीवरी जलाशीं व मुद्गमसूरादिक औषधि व्रीहि यवादि औषधींशीं युक्त होवोत. ॥२८॥ विनियोग - 'यमग्ने' या मंत्रभागानें प्रचारणीपात्रस्थ आज्यशेषाचा होम करावा. यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु यं जु॒नाः । स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॒ स्वाहा॑ ॥ २९ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं संग्रामांत ज्या पुरुषाचें रक्षण करतोस व हविर्भाग घेण्याकरितां ज्याकडे जातोस तो तुझ्या कृपेनें चिरकालपर्यंत धनांना प्राप्त होवो. हे हवि तुला सुहुत असो. ॥२९॥ विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्रभागानें वरवंटा हातांत घ्यावा व हिंकारापर्यंत मौन धारण करावें. सोम कांडतांना उपयोगी पडणारे जें जल त्याला निग्राभ्या म्हणतात. (तीं जलें यजमानानें आपले छातीला लावावीं व 'निग्राभ्या स्थ' हा मंत्रभाग म्हणावा.) दे॒वस्य त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् । आ द॑दे॒ रावा॑ऽसि गभी॒रमि॒मम॑ध्व॒रं कृ॒धीन्द्रा॑य सु॒षूत॑मम् । उ॒त्त॒मेन॑ प॒विनोर्ज॑स्वन्तं॒ मधु॑मन्तं॒ पय॑स्वन्तं निग्रा॒भ्या॒ स्थ देव॒श्रुत॑स्त॒र्पय॑त मा॒ ॥ ३० ॥ अर्थ - हे वरवंटया, प्रकाशक सवित्याच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हस्तांनीं मी तुझें ग्रहण करतों. हे पाषाणा, तूं आहुति देणारा आहेस म्हणून या माझ्या यज्ञाला मोठा कर. वज्रसदृश अशा तुझ्या योगानें मी या यज्ञाला इन्द्राकरितां ज्यांत उत्तम प्रकारें करून सोमरस काढला जातो व जो मधुर व दुधाप्रमाणें गोड रसानें युक्त आहे असा करतों. हे जलांनो, तुम्ही अत्यंत ग्राह्य व देवलोकांत प्रसिद्ध आहांत म्हणून मला संतुष्ट करा. ॥३०॥ विनियोग - हे संक्षिप्त केलेलें वर्णन विस्तारानें करतात. मनो॑ मे तर्पयत॒ वाचं॑ मे तर्पय प्रा॒णं मे॑ तर्पयत॒ चक्षु॑र्मे तर्पयत॒ श्रोत्रं॑ मे तर्पयता॒त्मानं॑ मे तर्पयत प्र्॒जां मे॑ तर्पयत प॒शून्मे॑ तर्पयत ग॒णान्मे॑ तर्पयत ग॒णा मे॒ मा वि तृ॑षन् ॥ ३१ ॥ विनियोग - 'इन्द्राय त्वा वसुमते' इत्यादि पांच मंत्रभागांनीं पांच वेळां सोमाच्या मुष्टि पाषाणांवर कांडण्याकरितां घ्याव्या. इन्द्रा॑य त्वा॒ वसु॑मते रु॒द्रव॑त॒ इन्द्रा॑य त्वा ऽऽदि॒त्यव॑त॒ इन्द्रा॑य त्वा ऽभिमाति॒घ्ने । श्ये॒नाय॑ त्वा सोम॒भूते॒ ऽग्नये॑ त्वा रायस्पोष॒दे ॥ ३२ ॥ अर्थ - हे सोमा, (१) धनवान् व रुद्रदेवतायुक्त, (२) आदित्यदेवतायुक्त, (३) शत्रुनाशक अशा इंद्राकरितां तुझें मी ग्रहण करतों. (४) सोम हरण करणार्या श्येनपक्षीरूपी गायत्रीकरितां व (५) धनवृद्धिकारी अग्नीकरितां तुझें मी ग्रहण करतों. ॥३२॥ विनियोग - कुटतांना प्रत्येक वेळी होतृचमसांत सोमाचा रस काढून घेऊन 'प्रागपात्' इत्यादि दोन ऋचा यजमानाकडून म्हणवाव्या. प्रागपा॒गुद॑गध॒राक्स॒र्वत॑स्त्वा॒ दिश॒ आ धा॑वन्तु । अम्ब॒ निष्प॑र॒ सम॒रीर्वि॑दाम् ॥ ३६ ॥ अर्थ - हे सोमा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व अधर या सर्व दिशा आपआपल्या स्थानापासून दूर न जावोत तर एकमेकींकडे धांवत येऊन म्हणोत कीं हे माते, तूं सर्व बाजूंनीं सोमाला पूर्ण कर व नाना दिग्वासी लोक आमचा सोमसमागम जाणोत. ॥३६॥ विनियोग - सोमावर 'श्वात्रा स्थ' या मंत्रभागानें जलें टाकावीं. श्वा॒त्रा स्थ॑ वृत्र॒तुरो॒ राधो॑गूर्ता अ॒मृत॑स्य॒ पत्नीः॑ । ता दे॑वीर्देव॒त्रेमं य॒ज्ञं न॑य॒तोप॑हूताः॒ सोम॑स्य पिबत ॥ ३४ ॥ अर्थ - हे जलांनो, तुम्ही शीघ्रकार्य करणारीं, वृत्रासुराला मारणारीं व द्रव्यें देणारीं व्हा. हे प्रकाशक जलांनो, हा यज्ञ तुम्ही देवांकडे न्या व त्यांच्या आज्ञेनें सोमपान करा. ॥३४॥ विनियोग - 'मा भेः' हा मंत्रभाग उपांशु स्वरानें म्हणून सोम कुटावा. मा भे॒र्मा सं वि॑क्था॒ ऊर्जं॑ धत्स्व॒ धिष॑णे वी॒ड्वी स॒ती वी॑डयेथा॒मूर्जं॑ दधाथाम् । पा॒प्मा ह॒तो न सोम॑ ॥ ३५ ॥ अर्थ - हे सोमा, तूं भिऊं नकोस व कांपूं नकोस. देवांच्या संतोषाकरितां तुला मी कांडतों म्हणून रसधारण कर. हे द्यावापृथिवींनो, तुम्ही स्वतः दृढ आहांच तरीदेखील या उचललेल्या पाषाणापासून आपल्या शरीराला दृढ करा. व या सोमांत रस धारण करा. या वरवंटयाच्या कांडण्यानें यजमानाचें पाप नष्ट झालें, मात्र सोमाचा नाश झाला नाही. ॥३५॥ विनियोग - कुटतांना प्रत्येक वेळी होतृचमसांत सोमाचा रस काढून घेऊन 'प्रागपात्' इत्यादि दोन ऋचा यजमानाकडून म्हणवाव्या. प्रागपा॒गुद॑गध॒राक्स॒र्वत॑स्त्वा॒ दिश॒ आ धा॑वन्तु । अम्ब॒ निष्प॑र॒ सम॒रीर्वि॑दाम् ॥ ३६ ॥ अर्थ - हे सोमा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व अधर या सर्व दिशा आपआपल्या स्थानापासून दूर न जावोत तर एकमेकींकडे धांवत येऊन म्हणोत कीं हे माते, तूं सर्व बाजूंनीं सोमाला पूर्ण कर व नाना दिग्वासी लोक आमचा सोमसमागम जाणोत. ॥३६॥ विनियोग - त्वम॒ङ्ग प्रशँ॑सिषो दे॒वः श॑विष्ठ॒ मर्त्य॑म् । न त्वद॒न्यो म॑घवन्नस्ति मर्डि॒तेन्द्र॒ ब्रवी॑मि ते॒ वचः॑ ॥ ३७ ॥ अर्थ - हे अत्यंत बलवान् इन्द्रा, प्रकाशमान असा तूं 'हा यजमान चांगला आहे' अशी यजमानाची स्तुति करतोस. हे धनवान् इन्द्रा, तुझ्याशिवाय या यजमानाला सुख देणारा दुसरा कोणी नाही. म्हणून 'तूं सुख देणारा' हें तुझेंच वाक्य मी बोलतों. ॥३७॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥ |