|
॥ श्रीशिवलीलामृत ॥ ॥ अध्याय दुसरा ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति सर्वकल्याण । नाना संकटे विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयी ॥ १ ॥ संकेते अथवा हास्येकरून । भलत्या मिसे घडो शिवस्मरण । न कळता परिसासी लोह जाण । संघटता सुवर्ण करी की ॥ २ ॥ न कळता प्राशिले अमृत । परी अमर करी की यथार्थ । औषधी नेणता भक्षीत । परी रोग सत्य हरी की ॥ ३ ॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणता बाळक अकस्मात । अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी की ॥ ४ ॥ तैसे न कळता घडे शिवस्मरण । परी सकळ दोषा होय दहन । अथवा विनोदेकरोन । शिवस्मरण घडो का ॥ ५ ॥ हे का व्यर्थ हाका फोडिती । शिव शिव नामे आरडती । अरे का हे उगे न राहती । हरहर ध्या गर्जती वेळोवेळा ॥ ६ ॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझे उठविले कपाळ । शिव शिव म्हणता वेळोवेळ । काय येते यांच्या हाता ॥ ७ ॥ ऐसी हेळणा करी क्षणोक्षणी । परी उमावल्लभनाम ये वदनी । पुत्रकन्यानामेकरूनी । शिवस्मरण घडो का ॥ ८ ॥ महाप्रीतीने करिता शिवस्मरण । आदरे करिता शिवध्यान । शिवस्वरूप मानूनि ब्राह्मण । संतर्पण करी सदा ॥ ९ ॥ ऐसी शिवी आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री । उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥ १० ॥ ते दिवशी बिल्वदळे घेऊन । यथासांग घडले शिवार्चन । तरी सहस्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊनी जाईल ॥ ११ ॥ नित्य बिल्वदळे शिवासी वाहत । त्याएवढा नाही पुण्यवंत । तो तरेल हे नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शने बहुत तरती ॥ १२ ॥ प्रातःकाळी घेता शिवदर्शन । यामिनीचे पाप जाय जळोन । पूर्वजन्मीचे दोष गहन । माध्यान्ही दर्शन घेता नुरती ॥ १३ ॥ सायंकाळी शिव पाहता सप्रेम । सप्तजन्मीचे पाप होय भस्म । शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥ १४ ॥ कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण । इतुकेही पर्वकाळ ओवाळून । शिवरात्रीवरूनि टाकावे ॥ १५ ॥ शिवरात्रि आधीच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाही ॥ १६ ॥ वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताती ॥ १७ ॥ यदर्थी सुरस कथा बहुत । शौनकादिका सांगे सूत । ती श्रोती ऐकावी सावचित्त । अत्यादरेकरोनिया ॥ १८ ॥ तरी मासामाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष । त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्र जाणिजे ॥ १९ ॥ विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षिघातक परमनिषिद्ध । महानिर्दय हिंसक निषाद । केले । अपराध बहु तेणे ॥ २० ॥ धनुष्यबाण घेऊनि करी । पारधीस चालिला दुराचारी । पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥ २१ ॥ करी गोधांगुलित्राण । आणिकही हाती शस्त्रसामग्री घेऊन । काननी जाता शिवस्थान । शोभायमान देखिले ॥ २२ ॥ तव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूकडून । शिवमंदिर शृंगारून । शोभा आणिली कैलासींची ॥ २३ ॥ शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान । गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥ २४ ॥ मध्ये मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग । अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषे ॥ २५ ॥ एक टाळ मृदुंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन । श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दे घोष करिती ॥ २६ ॥ नाना परिमळद्रव्यसुवास । तेणे दशदिशा दुमदुमल्या विशेष । लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥ २७ ॥ शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरी । एवं चतुर्विध वाद्ये नानापरी । भक्त वाजविती आनंदे ॥ २८ ॥ तो तेथे व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा । एक मुहूर्त उभा ठाकला । हासत बोलिला विनोदे ॥ २९ ॥ हे मूर्ख अवघे जन । येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन । आत दगड बाहेर पाषाण । देवपण येथे कैचे ॥ ३० ॥ उत्तम अन्न सांडून । व्यर्थ का करिती उपोषण । ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥ ३१ ॥ लोक नामे गर्जती वारंवार । आपणही विनोदे म्हणे शिव हरहर । सहज सव्य घालोनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥ ३२ ॥ वाचेसी लागला तोचि बेध । विनोदे बोले शिव शिव शब्द । नामप्रतापे दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥ ३३ ॥ घोरांदर सेवता वन । नाढळतीच जीव लघुदारुण । तो वरुणदिग्वधूचे सदन । वासरमणि प्रवेशला ॥ ३४ ॥ निशा प्रवर्तली सबळ । की ब्रह्मांडकरंडा भरले काजळ । की विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥ ३५ ॥ विगतधवा जेवी कामिनी । तेवी न शोभे कदा यामिनी । जरी मंडित दिसे उडुगणी । परी पतिहीन रजनी ते ॥ ३६ ॥ जैसा पंडित गेलिया सभेतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान । जेवी अस्ता जाता सहस्रकिरण । उडुगणे मागे झळकती ॥ ३७ ॥ असो ऐशी निशा दाटली सुबुद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद । तो एक सरोवर अगाध । दृष्टी देखिले शोधिता ॥ ३८ ॥ अनेक संपत्ति सभाग्यसदनी । तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी । तटी बिल्ववृक्ष गगनी । शोभायमान पसरला ॥ ३९ ॥ योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन । तेवी बिल्वडहाळिया गगनींहून । भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥ ४० ॥ त्यात तम दाटले दारुण । माजी बैसला व्याध जाऊन । शरासनी शर लावून । कानाडी ओढोनि सावज लक्षी ॥ ४१ ॥ दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत । ती दक्षिण हस्ते खुडोनि टाकीत । तो तेथे पद्मजहस्ते स्थापित । शिवलिंग दिव्य होते ॥ ४२ ॥ त्यावरी बिल्वदळे पडत । तेणे संतोषला अपर्णानाथ । व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करिता अनायासे ॥ ४३ ॥ वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळा । पापक्षय होत चाळिला । पूजन स्मरण सर्व घडले ॥ ४४ ॥ एक याम झालिया रजनी । तो जलपानालागी एक हरिणी । आली तेथे ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥ ४५ ॥ व्याध तिने लक्षिला दुरून । कृतान्तवत परम दारुण । आकर्ण ओढिला बाण । देखोनिया हरिणी बोलतसे ॥ ४६ ॥ म्हणे महापुरुषा अन्यायाविण । का मजवरी लाविला बाण । मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवा न करावा ॥ ४७ ॥ उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधिता दोष तुज दारुण । एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥ ४८ ॥ शत बस्त वधिता एक । वृषभहत्येचे पातक । शत वृषभ तै गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥ ४९ ॥ शत गोहत्यांचे पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण । शत ब्रह्महत्यांचे पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥ ५० ॥ शत स्त्रियांहून अधिक । एक गुरुहत्येचे पातक । त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिण वधिलिया ॥ ५१ ॥ तरी अन्याय नसता ये अवसरी । मज मारिसी का वनांतरी । व्याध म्हणे कुटुंब घरी । उपवासी वाट पहात ॥ ५२ ॥ मीही आजि निराहार । अन्न नाहीच अणुमात्र । परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥ ५३ ॥ मज आश्चर्य वाटते पोटी । नराऐशा सांगसी गोष्टी । तुज देखोनिया दृष्टी । दया हृदयी उपजतसे ॥ ५४ ॥ पूर्वी तू होतीस कोण । तुज एवढे ज्ञान कोठून । तू विशाळनेत्री रूपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥ ५५ ॥ मृगी म्हणे ते अवसरी । पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी । चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी । महाप्रयत्ने करूनिया ॥ ५६ ॥ त्यामाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर । नाना तपे आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हाते ॥ ५७ ॥ म्या नयनकटाक्षजाळे पसरून । बांधिले निर्जरांचे मनमीन । माझिया अंगसुवासा वेधून । मुनिभ्रमर धावती ॥ ५८ ॥ माझे गायन ऐकावया सुरंग । सुधापानी धावती कुरंग । मी भोगी स्वर्गींचे दिव्य भोग । स्वरूपे न मानी कोणासी ॥ ५९ ॥ मद अंगी चढला बहुत । शिवभजन टाकिले समस्त । शिवरात्रा सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिले म्या ॥ ६० ॥ सोडोनिया सुधापान । करू लागले मद्यप्राशन । हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतले त्यासी ॥ ६१ ॥ ऐसा लोटला काळ अपार । मृगयेस गेला तो असुर । त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजनविसरले ॥ ६२ ॥ मनास ऐसे वाटले पूर्ण । असुर गेला मृगयेलागोन । इतक्यात घ्यावे शिवदर्शन । म्हणोनि गेले कैलासा ॥ ६३ ॥ मज देखता हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥ ६४ ॥ तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवे हरिणी । हिरण्य असुर माझिये भजनी । असावध सर्वदा ॥ ६५ ॥ तोही मृग होऊनि सत्य । तुम्हासीच होईल रत । ऐक व्याधा सावचित्त । मग म्या शिव प्रार्थिला ॥ ६६ ॥ हे पंचवदना विरूपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा । दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देई आम्हाते ॥ ६७ ॥ भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल । द्वादश वर्षे भरतां तात्काळ । पावाल माझिया पदाते ॥ ६८ ॥ मग आम्ही मृगयोनी । जन्मलो ये कर्मअवनी । तरी मी गर्भिणी आहे हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥ ६९ ॥ तरी मी आपुल्या स्वस्थळी जावोन । सत्वर येते गर्भ ठेऊन मग तू सुखे घेई प्राण । सत्य वचन हे माझे ॥ ७० ॥ ऐसी मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत । तू गोड बोलसी यथार्थ । परी विश्वास मज न वाटे ॥ ७१ ॥ नानापरी असत्य बोलोन । करावे शरीराचे संरक्षण । हे प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तू शपथ वदे आता ॥ ७२ ॥ महत्पापे उच्चारून । शपथ वदे यथार्थ पूर्ण । यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ॥ ७३ ॥ ब्राह्मणकुळी उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्ययन । सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझे शिरी पातक ते ॥ ७४ ॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन । एक दानासी करिती । विघ्न । गुरुनिंदाश्रवण एक करिती ॥ ७५ ॥ रमावर-उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा । दान दिधले जे ब्रह्मवृंदा । हिरोनि घेती माघारे ॥ ७६ ॥ एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रे पहाती द्वैत निर्मिती । नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपला सांडूनिया ॥ ७७ ॥ देवालयामाजी जाउनी । हरिकथापुराणश्रवणी । जै बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥ ७८ ॥ जे देवळात करिती स्त्रीसंभोग । की स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग । ते नपुंसक होवोनि अभाग्य । उपजती या जन्मी ॥ ७९ ॥ वर्मकर्मे निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत । शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धार ॥ ८० ॥ अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्ते गंडमाळा होती । परक्षेत्रीच्या गाई वळोनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मी ॥ ८१ ॥ जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण । वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥ ८२ ॥ स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरित । धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मी ॥ ८३ ॥ पुरुष कुरूप म्हणोनिया त्यागिती । त्या या जन्मी बालविधवा होती । तेथेही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥ ८४ ॥ ज्या भ्रतारासी निर्भर्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती । सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ॥ ८५ ॥ सेवकापासून सेवा घेऊन । त्याचे न दे जो वेतन । तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारी हिंडतसे ॥ ८६ ॥ स्त्री-पुरुष गुज बोलता । जो जाऊनि ऐके तत्त्वता । त्याची स्त्री दुरावे हिंडता । अन्न न मिळे तयाते ॥ ८७ ॥ जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच्च होती । यती उपवासे पीडिती । त्यांते दुष्काळ जन्मवरी ॥ ८८ ॥ स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी । पूर्वज रुधिरी पडती पतनी । त्या गृही देव-पितृगण न येती ॥ ८९ ॥ जे देवाच्या दीपाचे तेल नेती । ते या जन्मी निपुत्रिक होती । ज्या रांधिता अन्न चोरोनि भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मी ॥ ९० ॥ ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रस पक्वान्न । त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशे ॥ ९१ ॥ जो माता-पित्यांसी शिणवीत । तो ये जन्मी मर्कट होत । सासू-श्वशुरा स्नुषा गांजीत । तरी बालक न वांचे तियेचे ॥ ९२ ॥ मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन । तरी ही महत्पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत ॥ ९३ ॥ हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार । ऐसी शपथ ऐकता निर्धार । व्याध शंकला मानसी ॥ ९४ ॥ म्हणे पतिव्रते जाई आता । सत्वर येई निशा सरता । हरिणी म्हणे शिवपदासी तत्त्वता । पुण्यवंता जाशील ॥ ९५ ॥ उदकपान करोनि वेगी । निजाश्रमा गेली ते कुरंगी । इकडे व्याध दक्षिणभागी । टाकी बिल्वदळे खुडोनिया ॥ ९६ ॥ दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवे मानूनी । अर्धपाप जळाले मुळीहूनी । सप्तजन्मीचे तेधवा ॥ ९७ ॥ नामी आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण । मृगीमुखे ऐकिले निरूपण । सहज जागरण घडले तया ॥ ९८ ॥ तो दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथे तृषाकांत । व्याधे बाण ओढिता त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥ ९९ ॥ म्हणे व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥ १०० ॥ व्याध आश्चर्य करी मनात । म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित । धन्य तुमचे जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाऊका ॥ १ ॥ वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार । गुरुनिंदक मद्यपानी दुराचार । ती पापे समग्र मस्तकी माझ्या ॥ २ ॥ महाक्षत्रिय आपण म्हणवीत । समरांगणी मागे पळत । वृत्ति हरी सीमा लोटीत । ग्रंथ निंदीत महापुरुषांचे ॥ ३ ॥ वेदशास्त्रांची निंदा करी । संतभक्तांसी द्वेष धरी । हरि-हर चरित्रे अव्हेरी । माझे शिरी ती पापे ॥ ४ ॥ धन धान्य असोनि पाही । पतीलागी शिणवी म्हणे नाही । पति सांडोनि निजे परगृही । ती पापे माझिया माथा ॥ ५ ॥ पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता । त्यासी व्यर्थचि गांजिती जे न पाहता । ते कुरूप होती तत्त्वता । हिंडता भिक्षा न मिळेचि ॥ ६ ॥ बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मी मत्स्य होती । गुरुचे उणे जे पाहती । त्यांची संपत्ति दग्ध होय ॥ ७ ॥ जे मार्गस्थांची वस्त्र हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रे पांघरती । आम्ही तपस्वी म्हणोनिया अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥ ८ ॥ दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मी होय मगरी । जो कन्याविक्रय करी । हिंसकयोनी निपजे तो ॥ ९ ॥ स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजीत । त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरी न सुटे ॥ ११० ॥ ब्राह्मण करी रसविक्रय । घेता देता मद्यपी होय । जो ब्रह्मवृंदा श्री अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥ ११ ॥ एके उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला । तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्मे जाणिजे ॥ १२ ॥ विप्र श्राद्धी जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनी । तो श्वानसूकरयोनी । उपजेल निःसंशये ॥ १३ ॥ व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन । पूर्वज नरकी पावती पतन । असत्य साक्ष देताचि ॥ १४ ॥ दोघी स्त्रिया करोन । एकीचेच राखी जो मन । तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरी ॥ १५ ॥ पूर्वजन्मी कोंडी उदक । त्याचा मळमूत्रनिरोधदेख । करिता साधुनिंदा आवश्यक । सत्वरदंत भग्न होती ॥ १६ ॥ देवालयी करी भोजन । तरी ये जन्मी होय क्षीण । पृथ्वीपतीची निंदा करिता जाण । उदरी मंदाग्नि होय पै ॥ १७ ॥ ग्रहणसमयी करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण । परबाळे विकी परदेशी नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥ १८ ॥ जी स्त्री करीगर्भपात । ती उपजे वंध्या होऊन । देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥ १९ ॥ अपराधाविण स्त्रीसी गांजिता हे । त्याचे ये जन्मी एक अंग जाये । ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधी ॥ १२० ॥ गुरु संत माता पिता । त्यांसी जो होय निर्भत्सिता । तरी वाचा जाय तत्त्वता । अडखळे बोलता क्षणाक्षणा ॥ २१ ॥ जो ब्राह्मणांसी दंड मारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरी । जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥ २२ ॥ देवद्वारीचे तरुवर । अश्वत्थादि वृक्ष साचार । तोडिता पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥ २३ ॥ जो सूतकअन्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत । आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥ २४ ॥ ब्राह्मणाचे ऋण न देता । तरी बाळपणी मृत्यु पावे पिता । जलवृक्षछाया मोडिता । तरी एकही स्थळ न मिळे त्याते ॥ २५ ॥ ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदा दान । तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरी ॥ २६ ॥ जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रयाचे लग्न मोडीत । तरी स्त्रीस सल राहे पोटात । वंध्या निश्चित संसारी ॥ २७ ॥ जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन । जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मी ॥ २८ ॥ जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश । एकास भजे निंदी सर्व देवां । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥ २९ ॥ जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कशा नारी । वृषभ श्री वधिता निर्धारी । शतमूर्ख पुत्र होंय त्यासी ॥ १३० ॥ उदकतृणेविण पशु मारीत । तरी मुक्याच प्रजा होती समस्त । जो प्रतिव्रतेसी भोगू इच्छित । तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥ ३१ ॥ जो पारधी बहुं जीव संहारी । तो फेपरा होय संसारी । गुरूचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजताचि मृत्यु पावे ॥ ३२ ॥ नित्य अथवा रविवारी मुते रवीसमोर । त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र । जे मृत बाळासाठी रुदती निर्धार । त्यास हासता निपुत्रिक होय ॥ ३३ ॥ हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वरी येते पतीस भोग देऊन । न ये तरी ही पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत पै ॥ ३४ ॥ व्याध मनात शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान । सत्वर येई गृहास जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळी ॥ ३५ ॥ जलपान करोनि वेगी । आश्रमा गेली ते कुरंगी । तो मृगराज तेच प्रसंगी । जलपानार्थ पातला ॥ ३६ ॥ व्याधे ओढिला बाण । तो मृग बोले दीनवदन । म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यासी पुसोन येतो मी ॥ ३७ ॥ शपथ ऐके त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त । तो कथारंग मोडिता निर्वंश होत । ते पाप सत्य मम माथा ॥ ३८ ॥ ब्रह्मकर्म वेदोक्त । शूद्र निजांगे आचरत । तो अधम नरकी पडत । परधर्म आचरता ॥ ३९ ॥ तीर्थयात्रेसी विघ्ने करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी । तरी सर्वांगी व्रण अघोरी । नरकी पडे कल्पपर्यंत ॥ १४० ॥ शास्त्रकोशी नाही प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून । हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचे न वादे ॥ ४१ ॥ हरिदिनी शिवदिनी उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण । तरी हस्तपाद क्षीण । होती त्याचे निर्धारि ॥ ४२ ॥ एक शिवहरिप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्ता विघ्ने करिती । एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकी होती कीटक ते ॥ ४३ ॥ मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे । गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणी विचरे तो ॥ ४४ ॥ विप्र आहार बहुत जेविती । त्यांस जो हासे दुर्मती । त्याचे मुखी अरोचकरोग निश्चिती । न सोडिती जन्मवरी ॥ ४५ ॥ एक गोविक्रय करिती । एक कन्याविक्रय अर्जिती । ते नर मार्जार मस्त होती । बाळे भक्षिती । आपुली ॥ ४६ ॥ जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी। प्रमेहरोग होय त्यासी। की खडा गुह्यात दाटत ॥४७॥ प्रासादभंग लिंगभंग करी। देवांची उपकरणे अलंकार चोरी । देवप्रतिष्ठा अव्हेरी। पंडुरोग होय तेथे ॥४८॥ एक मित्रद्रोह विश्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरूसी संकटी पाडिती। ब्रह्मवध गोवध न वारिती। अंगी सामर्थ्य असोनिया ॥४९॥ ब्राह्मण बैसवोनि बाहेरी। उत्तमान्न जेविती गृहांतरी। सोयर्यांची प्रार्थना करी। संग्रहणी पोटशूळ होती तया ॥ १५० ॥ एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती। एक ब्राह्मणांची सदने जाळिती। एक दीनासी मार्गी नागविती। एक संतांचा करिती अपमान ॥ ५१ ॥ एक करिती गुरुछळण। एक म्हणती पाहो याचे लक्षण । नाना दोष आरोपिती अज्ञान। त्यांचे संतान न वाढे ॥ ५२ ॥ जो सदा पितृद्वेष करी। जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी। शिवकीर्तन ऐकता ध्या त्रासे अंतरी। तरी पितृवीर्य नव्हे तो ॥ ५३ ॥ शिवकीर्तनी नव्हे सादर। तरी कर्णमूळरोग निर्धार । नसत्याच गोष्टी जल्पे अपार। तो दर्दुर होय निर्धारे ॥ ५४ ॥ शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथे शयन करिता सर्प होय दारुण । एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥ ५५ ॥ एका देवार्चनी वीट येत। ब्राह्मण पूजावया कंटाळत। तीर्थप्रसाद अव्हेरीत। त्याच्या आखुडती अंगशिरा ॥ ५६ ॥ मृग म्हणे ऐसी पापे अपार। मम मस्तकी होईल परम भार। मग पारधी म्हणे सत्वर। जाई स्वस्थाना मृगवर्या ॥ ५७ ॥ व्याध शिवनामे गर्जे ते क्षणी। कंठ सद्गदित अश्रू नयनी। मागुती बिल्वदळे खुडोनी। शिवावरी टाकीतसे ॥ ५८ ॥ चौप्रहरांच्या पूजा चारी। संपूर्ण झाल्या शिवजागरी। सप्तजन्मीची पापे निर्धारी। मुळीहूनी भस्म झाली ॥ ५९ ॥ तो पूर्वदिशा मुख प्रक्षाळीत। सुपर्णाग्रज उदय पावत। आरक्तवर्ण शोभा दिसत। तेचि कुंकुम प्राचीचे ॥ १६० ॥ तो तिसरी मृगी आली अकस्मात। व्याध देखिला कृतान्तवत। म्हणे मारू नको मज यथार्थ। बाळासी स्तन देऊन येते मी ॥ ६१ ॥ व्याध अत्यंत हर्षभरित। म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ । तो ऐकावया म्हणत। शपथ करूनि जाय तू ॥ ६२ ॥ यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक। जो तृणदाहक ग्रामदाहक। गोब्राह्मणांचे कोंडी उदक। क्षयरोग त्यासी न सोडी ॥ ६३ ॥ ब्राह्मणांची सदने हरिती देख। त्यांचे पूर्वज रौरवी पडती निःशंक। मातृ-पुत्रा विघडती एक। स्त्रीपुरुषा विघड पाडिती ॥ ६४ ॥ देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान । निंदिती बोलती कठोर वचन । यम करचरण छेदी तयांचे ॥ ६५ ॥ परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख । साधुसन्मानाने मानी दु:ख । त्यास नेत्ररोगतिडका न सोडिती ॥ ६६ ॥ पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती । अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्चित श्येनपक्षी ॥ ६७ ॥ भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखी दुर्गंधी घाणित । जो माता-पितयांसी ताडित । लुला होत यालागी ॥ ६८ ॥ जो अत्यंत कृपण । धन न वेची अणुप्रमाण । तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथे ॥ ६९ ॥ भिक्षेसी यतीश्वर आला । तो जेणे रिता दवडिला । शिव त्यावरी जाण कोपला । संतति संपत्ति दग्ध होय ॥ ७० ॥ ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी । त्याहूनिया दुराचारी । दुसरा कोणी नसेचि ॥ ७१ ॥ ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्गद बोले वचन । स्वस्थळा जाई जलपान करोन । बाळांसी स्तन देऊन येई ॥ ७२ ॥ ऐसे ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करूनिया । बाळे स्तनी लावूनिया । तृप्त केली तियेने ॥ ७३ ॥ वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवित । मृगराज म्हणे आता त्वरित । जाऊ चला व्याधापासी ॥ ७४ ॥ मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासी आली लवलाही । मृग म्हणे ते समयी । आधी मज वधी पारधिया ॥ ७५ ॥ मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्ही जाऊ पतीच्या आधी । पाडसे म्हणती त्रिशुद्धी । आम्हासी वधी पारधिया ॥ ७६ ॥ त्यांची वचने ऐकता ते क्षणी । व्याध सद्गद झाला मनी । अश्रुधारा लोटल्या ला नयनी । लागे चरणी तयांच्या ॥ ७७ ॥ म्हणे धन्य जिणे माझे झाले । तुमचेनि मुखे निरूपण ऐकिले । बहुता जन्मींचे पाप जळाले । पावन केले शरीर ॥ ७८ ॥ माता पिता गुरु देव । तुम्हीच आता माझे सर्व । कैचा संसार मिथ्या वाव । पुत्रकलत्र सर्व लटके ॥ ७९ ॥ व्याध बोले प्रेमेकरून । आतां कधी मी शिवपद पावेन । तो अकस्मात आले विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥ १८० ॥ पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसले महाराज । अद्भुत तयांचे तेज । दिक्चक्रामाजी न समाये ॥ ८१ ॥ दिव्य वाद्ये वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर । दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वये वर्षती ॥ ८२ ॥ मृगे पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखे म्हणे जय जय शिव हर हर । तो शरीरभाव पालटला ॥ ८३ ॥ परिसी झगडता लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन । शिवगणी बहुत प्रार्थुन । दिव्य विमानी बैसविला ॥ ८४ ॥ मृगे पावली दिव्य शरीर । तीही विमानी आरूढली समग्र । व्याधाची स्तुती वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥ ८५ ॥ व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगे राहती । अद्यापि गगनी झळकती । जन पाहतीला सर्व डोळा ॥ ८६ ॥ सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणी । ते सज्जन ऐकोत दिनरजनी । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ ८७ ॥ धन्य ते शिवरात्रिव्रत । श्रवणे पातक दग्ध होत । जे हे पठण करिती सावचित । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥ ८८ ॥ सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत अ शिवलीलामृत । निंदक असुर कुतर्की बहुत । त्यास प्राप्त कैचे हे ॥ ८९ ॥ कैलासनाथ ब्रह्मानंद । तयाचे पदकल्हार सुगंध । तेथे श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामे ॥ १९० ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥ १९१ ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
मृगव्याधाची कथा, शिवरात्रीमाहात्म्य
श्री गणेशाय नमः ! जेथे शंकराचे नेहमी स्मरण असते तेथे काही कमी पडत नाही, सर्व सुखे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारे कल्याण होते. संकटे टळतात, दारुण विघ्नेही बाधत नाहीत, शिवस्मरण करणार्याला मुक्तीही मिळते ! परिसाला लोखंड लागले तर लोखंडाचे सोने होते ना, तसेच शिवस्मरण केले तर जिवाचे कल्याण होते. मग शंकराचे नाम कोणत्याही निमित्ताने घडले, हसता हसता घडले किंवा संकेताने घडले तरी चालेल ! संकेताने म्हणजे कसे ? शिव म्हणा किंवा पार्वतीपती म्हणा, गणेशपिता म्हणा किंवा कैलासनाथ म्हणा, हिमनगजामात म्हणा नाहीतर त्र्यंबक, चंद्रमौली, असे म्हणा ! शिव प्रसन्न होणारच. अहो, हे अमृत आहे असे माहीत नसताही अमृत प्राशन केले तरी ते तुम्हाला अमर करणारच ! औषधाचे नाव माहीत नाही तरी ते सेवन केले, तर ते आपला गुण दाखविणारच ! रोग जाणारच ! गवताच्या गंजीवर लहान अजाण बालकाने अग्नी टाकला तरी तो गवताचे भस्म करून टाकणारच ! अगदी तसेच, अजाणताही जरी शिवस्मरण घडले, किंवा विनोदाने जरी ते घडले तरी ते सर्व दोष भस्मसात् करील यात शंका नाही. उदाहरणच देऊ या. शिवनामाचे भजन करणारे भक्त आहेत, त्यांच्या भजनाचा गजर मोठा होत आहे. तो ऐकून कोणीतरी चिडतो आणि म्हणतो, "हे लोक उगीच का हाका फोडतात ? शिव शंभो ! म्हणून मोठमोठ्याने का ओरडतात ? वारंवार हर ! हर ! असे गर्जत आहेत ! हे गप्प का बसत नाहीत ? शिवनामाचा केवढा कोलाहल करतात ! माझे तर अगदी डोके उठले ! वारंवार शिवशंकरा म्हणून टाहो फोडतात ! यांच्या हाती काय लागते कोण जाणे !" तो असे अवहेलना करून म्हणत असला तरी त्यातही त्याच्या मुखी शिवनाम येतेच. असे झाले तरी त्याचे कल्याण होते. कोणी मुलाचे नाव शंकर, सदाशिव इत्यादी ठेवतो, आणि त्याला नावाने हाक मारतो तेव्हा शंकराचे नामच येते ना ! त्यानेही भक्ताचे कल्याण होते ! तर मग शंकराचे नाव प्रेमभराने घेतले, त्याचेच अत्यंत आदराने ध्यान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजनादी देऊन संतुष्ट केले, तर केवढे मोठे पुण्य जोडेल बरे ? आपल्या मनात शंकरासंबंधी अशी आवड हवी. शिवरात्रीला उपोषण करावे, रात्रीस जागरण करावे. फार मोठे पाप दूर होईल ! शिवरात्रीला जर बेलाची पाने वाहून शंकराची पूजा केली, दर्शन घेतले, तर हजारो जन्मांतील पाप नष्ट होईल. जो शंकराला नेहमी बेल वाहतो, त्याच्याएवढा पुण्यवंत दुसरा कोणी नाही ! तो तरेल यात काहीच नवल नाही. त्याची थोरवी तर एवढी आहे की त्याच्या दर्शनाने लोकांचा उद्धार होईल. शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते, आणि भर मध्यान्ही शिवदर्शन घेतले तर पूर्वजन्मींचे दोष, मग ते कितीही मोठे असोत, ते नष्ट होतील. संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर सात जन्मांचे पाप नष्ट होईल. शिवरात्रीचे माहात्म्य काय वर्णावे ? शेषालाही ते वर्णन करता येणार नाही. शिवरात्रीवरून इतर सर्व पर्वकाळ ओवाळून टाकावेत. कपिलाषष्ठी, संक्रांत, ग्रहण, तसेच महोदय व अर्थोदय (महोदय - माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयी अमावास्यारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा शेवट असा योग. अर्धोदय- रविवारी सूर्योदयी अमावास्येचा प्रथम भाग श्रवणाचा मध्यभाग व व्यतिपाताचा अखेरचा भाग, असा योग.), गजच्छायापर्व इत्यादी पुण्यपर्वणीचे सर्व दिवस, माहात्म्याच्या बाबतीत शिवरात्रीपेक्षा कमीच ठरतात. आधी शिवरात्रीचा पर्वकाळच अतिशय पवित्र असतो. त्यातही जर उपोषण केले, जागरण केले, शिवपूजन केले, तर अपार पुण्य लाभते. शिवरात्रीचे व्रत मोठमोठे ऋषी करतात. विश्वामित्र, वसिष्ठ ऋषी, तसेच गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर, आणि देवगण सारेच शिवरात्रीचे पर्व मानतात. याविषयी सूताने शौनक आदींना एक सुरस कथा सांगितली होती तीच आता श्रोत्यांनी आदराने श्रवण करावी. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री होय. मृगव्याधाची कथा सूत कथा सांगत होते. ते म्हणाले - "श्रोते हो ! विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे पारधी राहात असे. तो पशूची व पक्ष्यांची शिकार करी. तो फार निर्दय होता. पशुहिंसा करताना त्याला मुळीच दयामाया वाटत नसे. त्याने प्राण्यांची वध करण्याचे पाप पुष्कळ वेळा केले होते. असा तो पारधी एक दिवस शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने धनुष्य व भाता घेतला होता. काखेत त्याने फास व जाळे घेतले होते. त्याने हाताला चामड्याचे कवच धारण केले होते. तो इतरही काही शस्त्रे घेऊन रानात जात असता त्याला वनातील एक शिवमंदिर दिसले. योगायोगाने तो शिवरात्रीचा दिवस होता. पर्वकाळ होता. श्रद्धेने कितीतरी यात्रेकरू शंकराच्या मंदिरात दर्शनाला येत होते. मोठी यात्राच भरली होती. लोकांनी शिवमंदिर खूप सजविले होते. कैलासाइतके धवलवर्णाचे ते देवालय जणू चांदीचे बनविले आहे, असे शोभत होते. वर आकाशाला भिडणारा ध्वज होता. देवालयाचे अनेक कळस तळपत होते. देवालयात जे शिवलिंग होते ते मणिमय होते. अनेक भक्त सांगोपांग पूजा करीत होते. काहींनी संततधार धरली होती आणि रुद्राध्यायाचा घोष चालला होता. कोणी टाळ आणि मृदंग घेऊन प्रेमाने भजन कीर्तन करीत होते तर काही टाळ्या वाजवून नामघोष करीत होते. हर, हर, शंभो ! असा ध्वनी उठत होता. शंकराला आवडणारी फुले व बेल कोणी वाहात होते, कोणी अनेक सुवासिक द्रव्ये योजून सर्व वातावरण सुगंधी करीत होते. सर्वत्र दीप लावले होते. कोठे शंखघोष चालला होता. घंटानाद चालला होता. भेरी वाजत होत्या. त्यांचा पडसाद गगनात उमटत होता. भक्त वाद्ये वाजवीत होते आणि दर्शनासाठी देवालयात लोकांची रीघ लागली होती. तो व्याध तेथे पोहोचला. सर्व सोहळा तो डोळे भरून पाहू लागला. तिथेच थोडा वेळ थबकला. ते सर्व भक्त बेभान होऊन शिव शिव म्हणत होते. ते सर्व पाहून त्याला हसू आले. तो टवाळी करीत मनाशी म्हणाला, "हे लोक किती मूर्ख आहेत ! इथे धन फुकट कशाला घालवतात ? देवळात तो एक दगड आहे आणि बाहेरही दगडच आहे; इथे देवपणा कुठला ? उत्तम अन्न खावे ते न खाता हे लोक उपोषण का करतात ?" असे म्हणून तो तेथून वळला आणि रानात जायला निघाला. लोक "हर हर" अशी गर्जना करीत होते. त्यांना वेडावण्यासाठी तोही शिव हर शिव हर ! असे म्हणत गेला. तो चेष्टेनेच तसे म्हणत होता. योगायोगाने तो त्या शिवमंदिराला वळसा घालून गेला ती प्रदक्षिणा झाली. अरण्यात गेला तरी त्या पारध्याच्या मनात शिव हर असे शब्द रेंगाळत होते. तो अभावितपणे तेच नाम गुणगुणत होता. आणि त्या नामजपाचा प्रभाव असा की त्याची पापे नष्ट होत चालली. रानात तो खूप फिरला परंतु त्याला एकाही पशूची शिकार मिळाली नाही. सूर्य अस्ताला चालला. काळोख पसरू लागला. जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले होते, किंवा रात्रीने काळी घोंगडी पांघरली होती. त्या रात्री चंद्र नव्हता त्यामुळे रात्रीचा भयाणपणा वाढत होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र विधवा स्त्रीसारखी उदास वाटत होती. सूर्य निघून गेल्यामुळे ज्या सभेतून पंडित निघून जातो व मूर्ख लोक नंतर बडबडत बसतात, त्या सभेसारखी ती रात्र केवळ चांदण्यांच्या प्रकाशामुळे भासत होती. इतका वेळ तो पारधी बिचारा उपाशीच राहिला होता. त्याला हिंडता हिंडता एक सरोवर दिसले. त्यात चांदण्यांचे प्रतिबिंब पडले होते. अंधुक प्रकाशात कुमुदे दिसत होती. त्याच्या काठी एक बेलाचे झाड दिसले. त्याच्या फांद्या भूमीपर्यंत वाकल्या होत्या. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी खाली येतात तशा त्या वाटत होत्या. तो पारधी त्या फांद्यांच्या आधाराने झाडावर चढून बसला. आता रात्री कोणीतरी पशू सरोवरावर पाणी पिण्यास येईल म्हणून तो धनुष्यावर बाण लावून अगदी स्तब्ध बसला. मध्येच तो धनुष्यबाण झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवी. जवळचीच पाने उजव्या हाताने खुडून खाली टाकी. आश्चर्य असे की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावरच ती बेलाची पाने सहज पडत होती ! त्यामुळे श्रीशंकर प्रसन्न झाला. अशा प्रकारे व्याधाला त्या दिवशी उपोषण घडले, जागरण घडले, त्याच्या मुखी शिव शिव असे नाव, सवयीने येत राहिलेल्यामुळे शिवजप होत होता आणि बेलाची पानेही शिवलिंगावर वाहिली गेली. यामुळे त्याची पापे नष्ट होत चालली ! पुढे काय झाले ! एक हरिणी त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी त्या प्रहररात्रीस आली. ती गर्भिणी होती. तिची कांती मोठी तेजस्वी होती. येता येता तिने दुरूनच तो भयंकर व्याध पाहिला. तो तिला यमासारखा वाटला. हरिणीला पाहताच व्याधाने धनुष्यावर बाण चढवून तिच्यावर नेम धरला. तेव्हा ती हरिणी घाबरून बोलू लागली. "हे महापुरुषा ! मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस ? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस. माझा गर्भ अज्ञान निष्पाप आहे. तोही मरेल. तुला फार पाप लागेल ! अरे, कितीतरी इतर पशू मारण्याने जेवढे पाप लागते तेवढे पाप एक हरिणीचे पिलू मारून लागते ! ही पापे कशी आहेत पहा - शंभर बोकड मारणे हे एक बैल मारण्यासारखे आहे, शंभर बैलांची हत्या म्हणजे एक गायीची हत्या, आणि शंभर गायींची हत्या म्हणजे एका ब्राह्मणवधाइतकी असते. एका स्त्रीचा वध करणे हे तर शंभर ब्राह्मणांचा वध करण्यासारखे आहे. गुरूची हत्या शत स्त्रीहत्येइतकी भयंकर आणि एका गर्भिणीचा वध करणे हे तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे." असे न्यायाचे बोलणे करून ती हरिणी म्हणाली,"माझा अन्याय काहीही नाही, तरी तू मला का बरे मारतोस ?" पारधी म्हणाला, "मी शिकार नेली तर माझ्या घरातल्या लोकांचे पोट भरेल. माझे कुटुंब घरी माझी वाट पाहात असेल. मीही दिवसभर उपाशी आहे. पोटात कणभर सुद्धा अन्न गेलेले नाही. पण तू हरिणी असून एवढ्या शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस ? मला मोठे आश्चर्य वाटते ! तू माणसाच्या भाषेत कशी बोलतेस ? तुझ्याकडे पाहता पाहता मला तुझी दया येऊ लागली आहे. तू पूर्वजन्मी कोण होतीस ? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले ? तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस. मला तुझा पूर्व इतिहास सांग. हरिणी आपली कथा सांगते. हरिणी म्हणाली, "देव व दानव यांनी क्षीरसागराचे मंथन करून चौदा रत्ने काढली. त्यात ज्या अनेक अप्सरा निघाल्या त्यांपैकी रंभा नांवाची, अप्सरा मी होते. मला पाहून देवांना सुद्धा मोह पडे. अपार तप करून तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे. माझे नेत्रकटाक्ष हेच जाळे. त्या जाळ्यात देवांची मने हेच मासे पटकन सापडत असत. मुनी हेच भ्रमर, माझ्या तनूच्या सुगंधाने ते वेडे होऊन माझ्या मागे धावत. माझे गायन इतके रंगत असे की देवरूपी मृग त्याने मुग्ध होऊन धावत येत. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे व सौंदर्यात माझी बरोबरी कोणीही करू शकत नसे. मी फार गर्विष्ठ झाले होते, त्यामुळे मी शंकराची भक्ती सोडून दिली. सोमवार, प्रदोष, शिवरात्र, सारे काही सोडले. शंकराची पूजाअर्चाही मी करीनाशी झाले. चांगले अमृत सोडून मी मद्य सेवन करू लागले. माझी मतीच पालटली. देव मला आवडेनात. हिरण्य नावाचा एक असुर होता. त्याच्याजवळ जाऊन मी राहिले. पुष्कळ काळ लोटला.त्या दुष्ट राक्षसाच्या संगतीने मी भजन पूजनही सोडून दिले. एक दिवस हिरण्य एकटाच शिकारीला गेला होता. कुठून मला सुचले कोण जाणे, पण कैलासावर जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले. मी कैलासावर गेले. शिवदर्शन करावे अशी इच्छा होती, पण मला पाहताच शंकराला फार क्रोध आला. तो म्हणाला, "पापिणी ! जा ! मृत्युलोकात हरिणीच्या जन्मास जा ! तुझ्या सख्या आहेत त्या दोघी तुझ्या बरोबरच हरिणी होतील. तो हिरण्य राक्षस तर माझी मुळीच भक्ती करीत नाही. तोही हरीण होईल व तुमच्याशीच राहील." हे व्याधा, त्यावेळी मला फार वाईट वाटले. मी शंकराची प्रार्थना केली. "हे पंचवदना ! हे विरूपाक्षा ! हे सत् चित् आनंद, स्वरूपा ! तू सर्व कर्मांचा साक्षी आहेस. तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केलास. तू सर्वसाक्षी आहेस ! ही फार कठोर शिक्षा देऊ नकोस ! उ:शाप दे. काही तरी उपायांनी आमची शपातून मुक्तता व्हावी !" व्याधा ! मी काकुळतीने प्रार्थना केली ती ऐकून तो दयाळू भोळा चक्रवर्ती मनाने द्रवला. त्याने उःशाप दिला. "तुम्ही बारा वर्षे शाप भोगाल आणि मग माझ्या पदाला याल." त्यानंतर मी व माझ्या दोन्ही सखी मृगीच्या जन्मास आलो. तो असुरही मृग झाला. तोच माझा पती. व्याधा ! मी गर्भिणी आहे. माझा प्रसूतीसमय जवळ आला आहे. काय करावे ! मी या कर्मभूमीस जन्माला आले आहे ! तू मला आता मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. बाळाला जन्म देते. बाळाला घरीच ठेवते व परत येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी हरकत नाही. हे मी खरे खरे बोलते. विश्वास ठेव." ती हरिणी असे म्हणाली, आणि तो व्याध चकित झाला. तो म्हणाला, "तू बोलतेस फार गोड ! पण माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही. आपल्या जिवाचे कसेही करून, खोटेही बोलून रक्षण करावे, हा प्राणिमात्रांचा स्वभावच असतो. तेवढे सर्वांना कळते. तू शपथ घे. मग माझा विश्वास बसेल." त्यावर हरिणी म्हणाली, "मी जर खोटे बोलत असेन तर मला अनेक मोठी पापे लागतील. संध्या न करणारा, वेदशास्त्राचे अध्ययन न करणारा, सत्य न बोलणारा, शुचित्व न पाळणारा ब्राह्मण जसा पापी होतो, तशी मी पापी होईन. वेदांची विक्री करणारे, कृतघ्न, दुसर्याला पीडा करणारे, भक्ती न आवडणारे, यांचे पाप मला लागेल. दान देणार्यास विघ्न करणारे, गुरूची निंदा श्रवण करणारे, विष्णू व शंकर यांची निंदा करणारे, ब्राह्मणांना दिलेले दान परत घेणारे, यांचे पाप मला लागेल. यतीची निंदा करणारे, शास्त्राच्या आधाराने कलह करणारे, अनेक भ्रष्ट मार्ग आचरण करणारे, आपला धर्म सोडून देणारे, यांचे पाप मला लागेल. व्याधा ! लोक किती पापे करतात व त्यांना कशी फळे मिळतात ते मला माहीत आहे ! मग मी खोटे कसे बोलेन ? पापे व त्यांचे परिणाम व्याधा ! ऐक ! कीर्तनात जे तांबूल भक्षण करून बसतात त्यांना कोड येते. जे मंदिरासारख्या पवित्र स्थानी विषयोपभोग घेतात किंवा जे पतिपत्नीचा वियोग घडवून आणतात, ते नपुंसक म्हणून जन्माला येतात. लोकांची वर्मे काढून निंदा करतात ते कावळ्याच्या जन्माला जातात, आणि घाण खातात. स्वत:जवळ विद्या असूनही जो शिष्यांना सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्म पावतो. जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात, त्यांना गंडमाळा होतात. दुसर्याच्या क्षेत्रातील गाई पळवून आणणारे पुढच्या जन्मात अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला छळतो तो साप किंवा वाघ म्हणून जन्मतो. जो साधूचा छळ करतो त्याचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया हट्टाने व्रते करतात पण आपल्या पतीला फसवितात, धनधान्य असूनही त्याला खायला देत नाहीत, त्या स्त्रिया वटवाघळाच्या जन्माला जातात. आपला पुरुष कुरूप आहे म्हणून जर स्त्रिया त्याला टाकतील तर पुढच्या जन्मी त्या बालविधवा होतील. तेथेही त्या जारकर्म करतील तर पुढील जन्मी वेश्या होतील. ज्या पतीची निंदा करतात त्या दासी किंवा कुलटा स्त्रीच्या जन्माला जातात. जे नोकर स्वामीचा द्रोह करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात. सेवकाकडून सेवा करून घेऊन जो त्याला वेतन देत नाही तो पुढे भिकारी होऊन दारोदारी हिंडतो. जो पतिपत्नींचे गुप्त बोलणे लपून ऐकतो त्याची स्त्री प्रवासात हरवते आणि त्याचीही अन्नान्न दशा होते. जे जारणमरण प्रयोग करतात ते मरणानंतर भूतप्रेत, पिशाच्च यांच्या जन्माला जातात. जे यतीला मुद्दाम उपवासी ठेवून त्रास देतात त्यांना जन्मभर दुष्काळाला तोंड द्यावे लागते. जी स्त्री रजस्वला असून घरात सर्वत्र वावरते, अलग राहात नाही, तिचे पूर्वज नरकात रक्तामध्ये खितपत पडतात आणि तिच्या घरी देव व पितर येत नाहीत. देवासमोर लावलेल्या दिव्यातले तेलही काही लोक चोरतात, ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात ! स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया चोरून अन्न खातात त्या मांजरीच्या जन्माला जातात. ब्राह्मणाला कदन्न खायला घालतात आणि स्वत:मात्र उत्तम अन्न खातात, त्या स्त्रियांचा गर्भपात होतो. जो आपल्या आईवडिलांना श्रम करायला लावतो तो पुढील जन्मी माकड होतो. जी सून आपल्या सासूला व सासर्याला छळते तिची मुले वाचत नाहीत." हरिणी पुढे म्हणाली, "व्याधा मी जर परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसोत ! आणि मी जर खोटे बोलत असेन तर मी शिवपूजेचा अपहार केला असे होईल. हीच माझी शपथ !" व्याध म्हणाला, "बरे आहे, तू एवढी शपथ घेतेस, तर घरी जाऊन ये. रात्र संपेल त्या आधी परत ये." हरिणी म्हणाली, "व्याधा ! तू हे पुण्य केलेस ! तू पुढे शिवपदास जाशील !" नंतर ती हरिणी पाणी पिऊन तिच्या कुटुंबाच्या स्थानी गेली. इकडे बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा सवयीने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. ती खाली शिवलिंगावर पडत होती. दोन प्रहर रात्र गेली. त्याने ही बिल्वदलांनी केलेली पूजा शंकराला मान्य झाली. व्याधाची सात जन्मांची पापे नष्ट झाली. त्यावेळी सहज म्हणून जे शिवनाम व्याध म्हणत होता, त्याच नामाची त्याला गोडी लागली. त्याने हरिणीच्या मुखाने पापफलाचे निरूपण ऐकले होते. आणि त्याला शिवरात्रीस जागरणही घडले होते. त्यावेळी दुसरी हरिणी अकस्मात् त्या ठिकाणी आली. तिलाही तहान लागली होती. दुसर्या हरिणीची कथा ती सरोवराजवळ जात होती. व्याधाला वाटले, 'बरी शिकार मिळाली. त्याने धनुष्यावर बाण लावून नेम धरला. ते पाहून हरिणी रडू लागली. "दया कर ! मला जाऊ दे ! मला पतीशी मीलन हवे आहे. अशा स्थितीत मला मारू नकोस. मी परत येते. पतीला सुखी करून येते. नक्की येते. आत्ता जाऊ दे." व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "खरोखर तुलाही सर्व शास्त्र अवगत असणार ! धन्य आहेस ! तू शपथेवर परत येणार असे सांग आणि जा." ती दुसरी हरिणी म्हणाली, "कितीतरी पापे लोकांकडून घडत असतात. मी खोटे बोलत असेन तर ती पापे मला लागोत. विहिरी, तळी, देवळे इत्यादींचा विध्वंस करणारा, गुरूची निंदा करणारा, मद्यपान करणारा, दुराचारी, यांची पापे मला लागोत. रणातून पळून जाणारा क्षत्रिय, लोकांचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, महान् लोकांच्या ग्रंथांची निंदा करणारा, वेदशास्त्रांची निंदा करणारा, संत व भक्त यांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकर यांच्या चरित्रांची निंदा करणारा, यांची पापे मला लागोत. घरात अन्न असून पतीला ते न देणारी, पतीला सोडून दुसर्याच्या घरी झोपणारी, ह्यांची पापे मला लागोत. आपला मुलगा व सून सन्मार्गाने चालली असता, त्यांना व्यर्थ छळणारे सासरे व सासू यांना कुरूपपणा येतो व भिक्षाही मिळत नाही त्यामुळे ते भिकारी होतात. जे भाऊ आपसात वैर करतात त्यांना मत्स्याचा जन्म येतो. गुरूचे दोष पाहतात त्यांची संपत्ती जळून जाते. जे वाटसरूंची वस्त्रे हिरावून नेतात त्यांना प्रेतांवरील वस्त्र वापरावी लागतात. आम्ही तपस्वी आहोत असे सांगून जे अनाचार करतात ते सुरवंटाच्या जन्मास जातात. जी दासी धन्याची सेवा करीत नाही तिला सुसरीचा जन्म येतो. जो पैसे घेऊन कन्या विकतो तो हिंस्र पशूच्या जन्मास जातो. मी जर खोटे बोलले तर मला यांचे पातक लागो. जी स्त्री पतिसेवा करते तिला व्यर्थ छळणारे लोक कुळाचा नाश ओढवून घेतात. ब्राह्मणांनी रसायने विकली तर त्यांना दारूची सवय लागते व त्यांच्याकडून रस घेणार्यांनाही तशीच दारूची सवय लागते. जो ब्राह्मणांचा अपमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो. केलेले उपकार न स्मरणारा जंत, कीटक होतो. श्राद्धाचे जेवण करून जो ब्राह्मण नंतर स्त्रीशी संबंध ठेवतो तो कुत्रा किंवा डुक्कर यांच्या जन्माला जातो. जो सभेत खोटी साक्ष देतो, त्याचे पूर्वज नरकात पडतात. जो दोन स्त्रियांशी विवाह करतो, त्यातील एकीचेच मन राखतो, त्याला कुत्र्याच्या शरीरावरील गोचिडीचा जन्म येतो. जो लोकांना मिळणारे पाणी बंद करतो त्याला पुढील जन्मी मलमूत्र अवरोध होतो. जो साधूची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो देवळात जेवतो तो पुढील जन्मी दुर्बल होतो. जो राजाची निंदा करतो त्याचे पचन बिघडून जाते. जो ग्रहणकाळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग जडतो. जो मुले पळवून परदेशात विकतो त्याला कोड उठते. जी स्त्री गर्भपात करते ती वांझ होते. जो देऊळ पाडतो त्याची हाडे मोडतात. जो अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतो त्याला या जन्मी अर्धागवायू होतो. जो ब्राह्मणांचे अन्न पळवितो त्याचा वंश वाढत नाही. गुरू, संत, माता व पिता यांची निंदा करणारा तोतरा बनतो. जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी होऊन अंगातून कळा येतात. देवालयासमोरचे पिंपळ आदी वृक्ष जो तोडतो तो पांगळा होतो. जो सुतकी माणसाकडे अन्न घेतो त्याच्या उदरात अनेक रोग होतात. जो एकट्यानेच सुगंधी द्रव्ये वापरतो पण दुसर्याला देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मी दुर्गंधी येते. जो ब्राह्मणाचे धन घेऊन ते परत करीत नाही, त्याचा पुढील जन्मी पिता लवकर मरण पावतो. जो झाडे तोडतो व सावली नाहीशी करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही. जो कोणी ब्राह्मणांना आशा लावून फसवितो, तो पुढील जन्मी दारोदार भिक्षा मागत हिंडतो. जी स्वत:च्या मुलाचा द्वेष करते व दरिद्री माणसाचे लग्न मोडते, ती स्त्री या जन्मी वंध्या होते. या सर्वांना जे पाप लागते ते, मी जर खोटे बोलत असेन तर मला लागेल. जो ब्राह्मणांना बंदीत टाकतो त्याला नरकात यमाकडून सांडसाने भाजले जाते ! जो पवित्र ग्रंथ श्रवण करीत नाही त्याला बहिरेपणा येतो. जो आपल्या आईवडिलांना त्रास देतो त्याचे कार्य कधीही सिद्धीस जात नाही. जो एकाच देवाची भक्ती करतो आणि इतर देवांची भक्ती करत नाही, त्यांची निंदा करतो, त्याला पुढील जन्मी एकच पुत्र होतो. जो गाईचा वध करतो त्याची पुढील जन्मी स्त्री कर्कशा होते. बैलाला मारतो त्याचा पुत्र मूर्ख होतो. पशूना चारापाणी न देता जो उपाशी मारतो त्याची मुले मुकी निपजतात. जो पतिव्रता परनारीची अभिलाषा धरतो, त्याला कुरूप व कर्कश स्त्री मिळते. जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार होतो. जो गुरूचा त्याग करतो तो पुढील जन्मी उपजताच मरतो. जो सूर्याकडे तोंड करून रोज किंवा रविवारी मूत्र विसर्जन करतो त्याचे दात पडतात व अकाली केस पिकतात. पुत्रशोक करणार्यांस हसणारे लोक निपुत्रिक होतात. या सर्वांची पापे, मी जर खोटे बोलत असेन तर मला भोगावी लागतील. मी नक्की परत येईन. मला जाऊ दे." व्याध म्हणाला, "तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे. तू सत्याला स्मरून जा आणि परत ये." तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. ती जाते तोच एक मृग तेथे पाणी पिण्यासाठी आला. आता तरी आपण हा मृग मारू असे वाटून व्याधाने बाणाने नेम धरला. तो हरीणही मानवी वाणीने बोलू लागला, "हे व्याधा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व सांत्वन करून येतो." व्याधाला वाटले, "हा खरे कशावरून बोलतो ? याने शपथ घेऊन सांगितले तर मानावे.' तो मृगाला तसे म्हणाला. मृग म्हणाला - मृगाने सांगितलेले ज्ञान "व्याधा, मी शपथ घेऊन सांगतो की मी परत येईन. हरिकीर्तनाचा बेरंग करणारांचा निर्वंश होतो. मी जर खोटे बोलत असेन तर मला त्यांचे पाप लागेल. लोक आणखीही कित्येक पापे करतात. शूद्राने वेदोक्त कर्म केल्यास त्याला नरकात जावे लागते. तीर्थयात्रेत बाधा आणणे, वाटसरूंना लुटणे, वस्त्र व द्रव्य चोरणे, या कृत्यांमुळे सर्वांगी फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण न मानता निंदापूर्ण व कूट कविता करतो व विप्रांना सन्मानार्थ मिळालेल्या वस्तू हरण करतो, अशा लोकांची मुले मरतात. एकादशी व शिवरात्र या दिवशी जे उपवास करीत नाहीत व द्वादशीला पारणे करीत नाहीत त्यांचे हातपाय गळतात. कोणी देवमूर्ती फोडतात, कोणी भगवद्भक्तांना विघ्ने करतात, कोणी शिवाचा महिमा कमी करतात, हे लोक कीटकाच्या जन्माला जातात. मातेचा द्रोह करणार्याला व्याधी जडतात, पित्याचा द्रोह करणारा पिशाच होतो, गुरुद्रोह करणारा अपघाताने मरतो आणि प्रेत व भुते त्याला घेरून छळतात. ब्राह्मणांना अति आहाराबद्दल हसतात त्यांच्या तोंडाची चव जाते. गायी व कन्या विकणार्यांना मांजराचा जन्म येतो, व ते स्वत:ची पिले भक्षण करतात. कन्या, भगिनी व पतिव्रता यांच्याबद्दल अभिलाषा बाळगणारे असतात त्यांना प्रमेह, मुतखडा असे रोग होतात. जो देऊळ मोडतो, शिवलिंग फोडतो, देवाची उपकरणी, भूषणे इत्यादी चोरतो, देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्यांचा मान ठेवीत नाही, त्याला पंडुरोग होतो. अशा प्रकारच्या पापांचे फळ मला लागो. मित्रद्रोही, विश्वासघातकी, गुरूला संकटात घालणे, मातृपितृहत्या करणे, अंगी सामर्थ्य असूनही गाई - ब्राह्मणांचा वध न थांबविणे, ब्राह्मणाला बाहेर उपाशी ठेवून घरात सोयर्यांसह उत्तम अन्न भक्षण करणे, अशा लोकांना संग्रहणी व पोटशूळ होतो. कोणी पंचयज्ञ करीत नाहीत, ब्राह्मणांची घरे जाळतात, कोणी गुरूची कपटाने परीक्षा करण्यासाठी प्रश्न विचारतात, अशा लोकांची मुले वाढत नाहीत. जो पित्याचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, शिवकीर्तन ज्याला ऐकायला नकोसे वाटते, त्याला अपत्यप्राप्ती होत नाही; कर्णव्याधी होते. जो अतिशय वायफळ गप्पा मारतो त्याला बेडकाचा जन्म येतो. कोणी शिवकीर्तन किंवा पुराणश्रवणाच्या वेळी झोपतात, ते सर्पयोनीत जातात, जे अति वादविवाद करतात ते पिशाचयोनीत जातात, कोणाला देवपूजेचा कंटाळा असतो, तीर्थप्रसादाचा अपमान करतात, ब्राह्मणांना पूज्य मानीत नाहीत, त्यांना अर्धांगवायू होतो, त्यांच्या हातापायांच्या शिरा आखडतात. अशा लोकांची पापे मला लागतील.' मृगाने एवढ्या शपथा घातल्यावर व्याधाने त्याला जाऊ दिले. व्याधाच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली ! तो प्रेमाने बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. रात्रीच्या चारी प्रहरांत त्याच्याकडून शिवपूजा घडली. त्यामुळे त्याची पापे नष्ट झाली. पूर्व दिशा उजळू लागली. अरुणोदय झाला, त्यामागोमाग सूर्य उदय पावला. सर्वत्र प्रकाश पसरला. पूर्व दिशेने सूर्यरूपी कुंकू भाळी धरले ! त्यावेळी तिथे आणखी एक हरिणी आली. व्याधाने तिच्यावर बाण रोखला व तो सोडणार तोच ती म्हणाली, "मला मारू नको, मी माझ्या बाळाला स्तनपान करवून येते." हरिणीने सांगितलेले ज्ञान व्याधाला आनंद झाला. ही हरिणी आता कोणता शास्त्रार्थ सांगते तो ऐकावा, म्हणून त्याने तिला शपथ घेण्यास सांगितले. हरिणी म्हणाली, "मी जर दिलेले वचन पाळणार नाही तर अनेक पापे मला लागतील. कोणी गवताच्या गंजी जाळतो, कोणी गावांना आगी लावतात, कोणी गाईंना, ब्राह्मणांना पाणी देत नाहीत, त्यांना क्षयरोग होतो, जे विप्रांची घरे हरण करून स्वत:च घेतात, त्यांचे पूर्वज नरकात पडतात. कोणी माता व पुत्र यांत, कोणी स्त्रीपुरुष यांत भांडणे लावतात, देवाब्राह्मणांना मान देत नाहीत, त्यांची कठोर वचनांनी निंदा करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो. ज्याच्या मनात दुसर्याची वस्तू चोरण्याचा विचारच नेहमी घोळत असतो, साधूंचा सन्मान झालेला पाहून ज्याला वाईट वाटते, त्याला नेत्ररोग होतात. पुस्तकांची चोरी करणारे मुके होतात, रत्नचोर आंधळे होतात, गर्विष्ठ रेड्याच्या जन्माला जातात, पारधी ससाण्याच्या जन्माला जातात, भक्तनिंदकांच्या मुखाला दुर्गंधी येते, जो मातापित्यांना ताडण करतो तो लुळा होतो. जो कंजूष असतो त्याला पुढचा जन्म महाभुजंगाचा येतो. यती भिक्षा मागायला आला असता जो त्याला रिक्त हस्ते परत पाठवतो, त्यावर शंकराचा कोप होतो व त्याची संतती-संपत्ती दग्ध होते. जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला जो उठवून घालवून देतो, त्यापेक्षा मोठा पापी कोणीच नाही. व्याधा ! मी जर खोटे वचन देईन तर या सर्वांची पापे मला लागतील." मृगीचे बोलणे ऐकून व्याध भरल्या मनाने म्हणाला, "तू बाळाला स्तनपान देण्यासाठी जा, मग ये." ती मृगी जल प्राशन करून परत गेली. पुढे असे झाले की पहिल्या हरिणीची प्रसूती झाली, तिने पाडसाला जन्म दिला. दुसर्या हरिणीने पतीला संतुष्ट केले. मृग म्हणाला, "आपण व्याधाकडे लवकर जाऊ या." मग हरीण, हरिणी, पाडस सर्वजण व्याधाजवळ परत आली. आणि जो तो पारध्याला म्हणू लागला, "मी मरणाला तयार आहे. मला आधी मार." मृग म्हणाला, "माझा प्राण आधी घे." मृगी म्हणाली, "आम्ही पतीच्या आधी मरू म्हणजे आम्हाला सद्गती लाभेल." पाडसे म्हणाली, "आम्हालाच आधी मार." सर्वांचा उद्धार झाला ! व्याध गहिवरला. त्याला अश्रू आवरेनात. तो एकदम त्या हरिणांना वंदन करून म्हणाला, "अहाहा, माझे जीवन धन्य झाले. तुमच्या तोंडून मी निरूपण ऐकले. त्यामुळे माझे सर्व पाप नष्ट झाले. माझे मन व शरीरही पावन झाले. आता तुम्हीच माझे गुरू, माता, पिता, देव ! संसार, पुत्र, स्त्री, हे सर्वच मला व्यर्थ वाटत आहे. आता मी केव्हा एकदा मुक्त होईन व शिवपद प्राप्त करीन ? तो असे गहिवरून बोलत होता तोच तेथे एक दिव्य विमान आले. त्यावर शंकराचे गण बसले होते. त्यांना पाच मुखे होती, दहा भुजा होत्या, व्याघ्रांबर धारण केलेले असे ते गण फार तेजस्वी दिसत होते. किन्नर वाद्ये वाजवीत होते. विद्याधर आलाप काढीत गात होते. देव पुष्पवर्षाव करीत होते. आणि व्याधासह सर्व हरिणांची शरीरे एकदम दिव्य दिसू लागली ! व्याध पंचमुख दशभुज झाला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची प्रार्थना केली. मृगही दिव्य रूप धारण करून विमानात चढले. देव व्याधाची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला व मृग, मृगी व पाडसे दिव्य तारकांच्या रूपांनी गगनात विराजू लागले. ती नक्षत्रे अजूनही आकाशात दिसतात. श्रीधर कवी म्हणतो, "व्यासांनी लिंगपुराणात जी कथा रसपूर्ण भाषेत वर्णन केली आहे, ती मी मराठीत वर्णन केली आहे. ब्रह्मानंदयुक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावी. शिवरात्रीचे व्रत करणारे व ही कथा ऐकणारे यांचे पाप जळून जाते, ते लोक पुण्यवंतच ! शिवलीलारूपी हे अमृत, श्रोतेरूपी देवांनी प्राशन करावे. जे निंदक, कुतर्की, असुरी वृत्तीचे असतात, त्यांना हे पुण्य कसे मिळणार ! ब्रह्मानंद गुरू हेच कैलासनाथ ! त्यांचे चरण हेच कमळ होय. आणि मी श्रीधर कवी म्हणजे तेथे रमलेला भ्रमर शिवनामाचे गुंजन करीत आहे." "स्कंदपुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत हा ग्रंथ महान आहे. त्याचा हा द्वितीय अध्याय गोड आहे. संतांनी त्याचे अखंड श्रवण करावे हीच प्रार्थना." ॥ श्रीसांबसदाशिवार्पणस्तु॥ |