॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ शिवलीलामृत ॥

॥ अध्याय पहिला ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगुरुभ्यो नमः । श्रीसांबसदाशिवाय नमः ।
ॐ नमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता ।
पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्‌गुरो ॥ १ ॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा ।
मायाचक्रचालका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥
जय जय विरूपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ।
विश्वंभरा कर्ममोचकगहना । मनोजदहना मनमोहन जो ॥ ३ ॥
भक्तवल्लभ तू हिमनगजामात । भाललोचन नीलग्रीव उमानाथ ।
मस्तकी स्वर्धुनी विराजित । जातिसुमनहारवत जी ॥ ४ ॥
पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक । यक्षपतिमित्र प्रतापार्क ।
दक्षमखविध्वंसक मृगांक । निष्कलंक तव मस्तकीं ॥ ५ ॥
विशाळभाळ कर्पूरगौरवर्ण । काकोलभक्षक निजभक्तरक्षणा ।
विश्चसाक्षी भस्मलेपन । भयमोचन भवहारक जो ॥ ६ ॥
जो सर्गस्थित्यंतकारण । त्रिशूलपाणी शार्दूलचर्मवसन ।
स्कंदतात सुहास्यवदन । मायाविपिनदहन जो ॥ ७ ॥
जो सच्चिदानंद निर्मळ । शिवशांत ज्ञानघन अचळ ।
जो भानुकोटितेज अढळ । सर्वकाळ व्यापक जो ॥ ८ ॥
सकलकलिमलदहन कल्मषमोचन । अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ।
पद्यजतातमनरंजन । जननमरणनाशक जो ॥ ९ ॥
कमलोद्धव कमलावर । दशशतमुरव दशशतकर ।
दशशतनेत्र सुर भूसुर । अहोरात्र ध्याती जया ॥ १० ॥
भव भवांतक भवानीवर । श्मशानवासी गिरां अगोचर ।
जो स्वर्धुनीतीरविहार । विश्वेश्वर काशीराज जो ॥ ११ ॥
व्योमहरण व्यालभूषण । जो गजदमन अंधकमर्दन ।
ॐकार महाबलेश्वर आनंदघन । मदगर्वभंजन अज्ञ अजित जो ॥ १२ ॥
अमितगर्भ निगमागमनुत । जो दिगंबर अवयवरहित ।
उज्जयिनीमहाकाळ काळातीत । स्मरणे कृतांतभय नाशी ॥ १३ ॥
दुरितकाननवैश्वानर । जो निजजनचित्तचकोरचंद्र ।
वेणुनृपवरमहत्पापहर । घृष्णेश्वर सनातन जो ॥ १४ ॥
जो उमाहृदयपंजरकीर । जो निजजनहदयाब्जभ्रमर ।
जो सोमनाथ शशिशेखर । सौराष्ट्रदेशविहारी जो ॥ १५ ॥
कैरवलोचन करुणासमुद्र । रुद्राक्षभूषण रुद्रावतार ।
भीम भयानक भीमाशंकर । तपा पार नाही ज्याच्या ॥ १६ ॥
नागदमन नागभूषण । नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ।
ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण । नागाननजनक जो ॥ १७ ॥
वृत्रारिशत्रुजनकवरदायक । बाणवलभ पंचबाणांतक ।
भवरोगवैद्य त्रिपुरहारक । वैजनाथ अत्यद्‌भुत जो ॥ १८ ॥
त्रिनयन त्रिगुणातीत । त्रितापशमन त्रिविधभेदरहित ।
त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत । करुणाकर बलाहक जो ॥ १९ ॥
कामसिंधुरविदारक कंठीरव । जगदानंदकंद कृपार्णव ।
हिमनगवासी हैमतीधव । हिमकेदार अभिनव जो ॥ २० ॥
पंचमुकुट मायामलहरण । निशिदिन गाती आम्‍नाय गुण ।
नाही जया आदि मध्य अवसान । मल्लिकार्जुन श्रीशैलवासी ॥ २१ ॥
जो शक्रारिजनकांतकप्रियकर । भूजासंतापहरण जोडोनि कर ।
जेथे तिष्ठत अहोरात्र । रामेश्वर जगद्‌गुरू ॥ २२ ॥
ऐसिया शिवा सर्वोत्तमा । अजा अजित ब्रह्मानंदधामा ।
तुझा वर्णावया महिमा । निगमागमां अतर्क्य ॥ २३ ॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । तव गुणार्णव अगाध थोर ।
तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार । न पावती पार तत्त्वता ॥ २४ ॥
कनकाद्रिसहित मेदिनीचे वजन । करावया ताजवा आणू कोठून ।
व्योम साठवे संपूर्ण । ऐसे साठवण कोठून आणू ॥ २५ ॥
मेदिनीवसनाचे जळ आणि सिकता । कोणत्या मापे मोजू आता ।
प्रकाशावया आदित्या । दीप सरता केवी होय ॥ २६ ॥
धरित्रीचे करूनि पत्र । कुधर कज्जल जलधि मषीपात्र ।
सुरद्रुम लेखणी विचित्र । करूनि लिहित कंजकन्या ॥ २७ ॥
तेहि तेथे राहिली तटस्थ । तरी आता केवी करू ग्रंथ ।
जरी तू मनी धरिसी यथार्थ । तरी काय एक न होय ॥ २८ ॥
द्वितीयेचा किशोर इंदु । त्यासी जीर्ण दशी वाहाती दीनबंधू ।
तैसे तुझे गुण करुणासिंधु । वर्णीतसे अल्पमती ॥ २९ ॥
सत्यवतीहृदयरत्‍नमराळ । भेदीत गेला तव गुणनिराळ ।
अंत न कळेचि समूळ । तोही तटस्थ राहिला ॥ ३० ॥
तेथे मी मंदमति किंकर । केवी क्रमू शके महिमांबर ।
परी आत्मसार्थक करावया साचार । तव गुणार्णवी मीन झालो ॥ ३१ ॥
ऐसे शब्द ऐकता साचार । तोषला दाक्षायणीवर ।
म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर । आरंभी रस भरीन मी ॥ ३२ ॥
जैसा धरूनि शिशूचा हात । अक्षरे लिहवी पंडित ।
तैसे तव मुखे मम गुण समस्त । सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३ ॥
श्रोती व्हावे सावधचित्त । स्कंदपुराणी बोलिला श्रीशुकतात ।
अगाध शिवलीलामृत ग्रंथ । ब्रह्मोत्तरखंड जे ॥ ३४ ॥
नैमिषारण्यी शौनकादिक सुमती । सूताप्रती प्रश्न करिती ।
तू चिदाकाशींचा रोहिणीपती । करी तृप्ति श्रवणचकोरा ॥ ३५ ॥
तुवा बहुत पुराणे सुरस । श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ।
अगाध महिमा आसमास । दशावतार वर्णिले ॥ ३६ ॥
भारत रामायण भागवत । ऐकता श्रवण झाले तृप्त ।
परी शिवलीलामृत अद्‌भुत । श्रवणद्वारे प्राशन करू ॥ ३७ ॥
यावरी वेदव्यासशिष्य सूत । म्हणे ऐका आता देऊनि चित्त ।
शिवचरित्र परमाद्‌भुत । श्रवणे पातकपर्वत जळती ॥ ३८ ॥
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार । संतति संपत्ति ज्ञानविचार ।
श्रवणमात्रे देणार । श्रीशंकर निजांगे ॥ ३९ ॥
सकळ तीर्थव्रतांचे फळ । महामखांचे श्रेय केवळ ।
देणार शिवचरित्र निर्मळ । श्रवणे कलिमल नासती ॥ ४० ॥
सकल यज्ञांमाजी जपयज्ञ थोर । म्हणाल जपावा कोणता मंत्र ।
तरी मंत्रराज शिवषडक्षर । बीजसहित जपावा ॥ ४१ ॥
दुजा मंत्र शिवपंचाक्षर । दोहींचे फळ एकचि साचार ।
उतरी संसारार्णव पार । ब्रह्माविसुरऋषी हाचि जपती ॥ ४२ ॥
दारिद्र्य दु:ख भय शोक । काम क्रोध द्वंद्व पातक ।
इतुक्यांसही संहारक । शिवतारक मंत्र जो ॥ ४३ ॥
तुष्टिपुष्टिधृतिकारण । मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ।
कर्ता मंत्रराज संपूर्ण । अगाध महिमा न वर्णवे ॥ ४४ ॥
नवग्रहांत वासरमणि थोर । तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर ।
कमलोद्धव कमलावर । अहोरात्र हाचि जपती ॥ ४५ ॥
शास्त्रांमाजी वेदान्त । तीर्थांमाजी प्रयाग अद्‌भुत ।
महाश्मशान क्षेत्रांत । मंत्रराज तैसा हा ॥ ४६ ॥
शस्त्रांमाजी पाशुपत । देवांमाजी कैलासनाथ ।
कनकाद्रि जैसा पर्वतांत । मंत्र पंचाक्षरी तेवी हा ॥ ४७ ॥
केवळ परमतत्त्व चिन्मात्र । परब्रह्म हेचि तारक मंत्र ।
तीर्थव्रतांचे संभार । ओवाळूनि टाकावे ॥ ४८ ॥
हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी । कैवल्यमार्गींचा प्रकाशतरणी ।
अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी । सनकादिक ज्ञानी हाचि जपती ॥ ४९ ॥
स्त्री शूद्र आदिकरूनी । हाचि जप मुख्य वर्णी ।
गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी । दिवसरजनी जपावा ॥ ५० ॥
जागृती स्वप्नी येता जाता । उभे असता निद्रा करिता ।
कार्या जाता बोलता भांडता । सर्वदाही जपावा ॥ ५१ ॥
शिवमंत्रध्वनिपंचानन । कर्णी आकर्णिता दोषवारण ।
उभेचि सांडिती प्राण । न लागता क्षण भस्म होती ॥ ५२ ॥
न्यास मातृकाविधि आसन । नलगे जपावा प्रीतीकरून ।
शिव शिव उच्चारिता पूर्ण । शंकर येऊनि पुढे उभा ॥ ५३ ॥
अखंड जपती जे हा मंत्र । त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र ।
आपुल्या अंगाची साउली करी पंचवक्त्र । अहोरात्र रक्षी तया ॥ ५४ ॥
मंत्रजपकांलागुनी । शिव म्हणे मी तुमचा ऋणी ।
परी तो मंत्र गुरुमुखेकरूनी । घेइंजे आधी विधीने ॥ ५५ ॥
गुरु करावा मुख्य वर्ण । भक्ति वैराग्य दिव्यज्ञान ।
सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण । या चिन्हेकरून मंडित जो ॥ ५६ ॥
मितभाषणी शांत दांत । अंगी अमानित्व अदंभित्व ।
अहिंसक अतिविरक्त । तोचि गुरू करावा ॥ ५७ ॥
वर्णानां ब्राह्मणो गुरुः । हा वेदवचने निर्धारू ।
हा त्यापासोनि मंत्रोच्चारू । करोनि घ्यावा प्रीतीने ॥ ५८ ॥
जरी आपणासी ठावुका मंत्र । तरी गुरुमुरखे घ्यावा निर्धार ।
उगाचि जपे तो अविचार । तरी निष्फळ जाणिजे ॥ ५९ ॥
कामक्रोधमदयुक्त । जे का प्राणी गुरूविरहित ।
त्यांनी ज्ञान कथिले बहुत । परी त्यांचे मुख न पहावे ॥ ६० ॥
वेदशास्त्रे शोधून । जरी झाले अपरोक्षज्ञान ।
करी संतांशी चर्चा पूर्ण । तरी गुरुविण तरेना ॥ ६१ ॥
एक म्हणती स्वप्नी आम्हांते । मंत्र सांगितला भगवंते ।
आदरे सांगे लोकांते । परी तो गुरुविण तरेना ॥ ६२ ॥
प्रत्यक्ष येऊनिया देव । सांगितला जरी गुह्यभाव ।
तरी तो न तरेचि स्वयमेव । गुरूसी शरण न रिघता ॥ ६३ ॥
मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र । जपे तो भ्रष्ट अपवित्र ।
वराविण वऱ्हाडी समग्र । काय व्यर्थ मिळोनी ॥ ६४ ॥
तो वाचक झाला बहुवस । परी त्याचे न चुकती गर्भवास ।
म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस । शरण जावे निधरि ॥ ६५ ॥
जरी गुरु केला भलता एक । परी पूर्वसांप्रदाय नसे ठाऊक ।
जैसे गर्भांधास सम्यक । वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ॥ ६६ ॥
असो त्या मंत्राचे पुरश्चरण । उत्तम क्षेत्री करावे पूर्ण ।
काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य । गोकर्णक्षेत्र आदिकरूनी ॥ ६७ ॥
शिवविष्णुक्षेत्र सुगम । पवित्र स्थळी जपावा सप्रेम ।
तरी येचिविषयी पुरातन उत्तम। कथा सांगेन ते ऐका ॥ ६८ ॥
श्रवणी पठणी निदिध्यास । आदरे धरावा दिवसेंदिवस ।
अनुमोदन देता कथेस । सर्व पापास क्षय होय ॥ ६९ ॥
श्रवण मनन निजध्यास । धरिता साक्षात्कार पापास क्षय होय सरस ।
ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस । श्रवणे पावन सर्व होती ॥ ७० ॥
तरी मथुरानाम नगर । यादववंशी परम पवित्र ।
दाशार्हनामे राजेंद्र । अति उदार सुलक्षणी ॥ ७१ ॥
सर्व राजे देती करभार । कर जोडोनि नमिती वारंवार ।
त्यांच्या मुकुटरत्‍नकिरणें साचार । प्रपदे ज्याची उजळली ॥ ७२ ॥
मुकुटघर्षणे करूनी । किरणे पडली दिसती चरणी ।
जेणे सत्तावसन पसरूनी । पालाणिली कुंभिनी हे ॥ ७३ ॥
उभारिला यशोध्यज । जेवीं शरत्काळींचा द्विजराज ।
सकल प्रजा आणि द्विज । चिंतिती कल्याण जयाचे ॥ ७४ ॥
> जैसा शुद्धद्वितीयेचा हिमांश । तेवी ऐश्वर्य चढे विशेष ।
जो दुर्बुद्धिदासीस । स्पर्श न करी कालत्रयी ॥ ७५ ॥
सद्‍बुद्धिधर्मपत्‍नीसी रत । स्वरूपाशी तुळिजे रमानाथ ।
दानशस्त्रे समस्त । याचकांचे दारिद्र्य निवटिले ॥ ७६ ॥
भूभुजांवरी जामदग्न्य । समरांगणी जेवी प्रळयाग्न ।
ठाण न चळे रणीहून । कुठारघाये भूरुह जैसा ॥ ७७ ॥
चतुर्दश विद्या चौसष्टी कळा । आकळी जेवी करतळीचा आंवळा ।
जेणे दानमेघें निवटिला । दारिद्र्यधुरोळा याचकांचा ॥ ७८ ॥
बोलणे अति मधुर । मेघ गर्जे जेवी गंभीर ।
प्रजाजनांचे चित्तमयूर । नृत्य करिती स्वानंदे ॥ ७९ ॥
ज्याचा सेनासिंधू देखोनि अद्‌भुत । जलसिंधु होय भयभीत ।
निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य । वचन तेवी न चळेचि ॥ ८० ॥
त्याची कांता रूपवती सती । काशीराजकुमारी नाम कलावती ।
जिचे स्वरूप वर्णी सरस्वती । विश्ववदनेकरूनिया ॥ ८१ ॥
जे लावण्यसागरीची लहरी । खंजनाक्षी बिंबाधरी ।
खभाषिणी पिकस्वरी । हंसगमना हरिमध्या ॥ ८२ ॥
शशिवदना भुजंगवेणी । अलंकारा शोभा जिची तनु आणी ।
दशन झळकती जेवी हिरेखाणी । बोलता सदनी प्रकाश पडे ॥ ८३ ॥
सकलकलानिपुण । यालागी कलावती नाम पूर्ण ।
जे सौंदर्यवैरागरींचे रत्न । जे निधान चातुर्यभूमीचे ॥ ८४ ॥
आंगींचा सुवास न माये सदनात । जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ ।
नेत्रमिलिंद रुंजी घालित । धणी पाहता न पुरेचि ॥ ८५ ॥
नूतन आणिली पर्णून । मनसिजे आकर्षिले रायाचे मन ।
बोलावू पाठविले प्रीतीकरून । परी ते न येचि प्रार्थिता ॥ ८६ ॥
स्वरूपशृंगारजाळे पसरोन । आकर्षिला नृपमानसमीन ।
यालागी दाशार्हराजा उठोन । आपणचि गेला तिजपाशी ॥ ८७ ॥
म्हणे शृंगारवल्ली शुभांगी । मम तनुवृक्षासी आलिंगी ।
उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी । अल्यानंदे सर्वांदेखता ॥ ८८ ॥
तव ते शृंगारसरोवरमराळी । बोले सुहास्यवदना वेल्हाळी ।
म्हणे म्या उपासिला शशिमौळी । सर्वकाळ व्रतस्थ असे ॥ ८९ ॥
जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत । गर्भिणी किंवा ऋतुस्नात ।
अमुक्त अथवा व्रतस्थ । वृद्ध अशक्त न भोगावी ॥ ९० ॥
स्त्रीपुरुषे हर्षयुक्त । असावी तरुण रूपवंत ।
अष्टभोगेकरोनि युक्त । चिंताग्रस्त नसावी ॥ ९१ ॥
पर्वकाळ व्रतदिन निरसून । उत्तमकाळी षडूस अन्न भक्षून ।
मग ललना भोगावी प्रीतीकरून । राजलक्षण सत्य हे ॥ ९२ ॥
राव काममदे मत्त प्रचंड । रतिभरे पसरोनि दोर्दंड ।
आलिंगन देता बळे प्रचंड । शरीर त्याचे पोळले ॥ ९३ ॥
लोहार्गला तप्त अत्यंत । तैसी कलावतीची तनु पोळत ।
तूप वेगळा होऊनि पुसत । कैसा वृत्तान्त सांग हा ॥ ९४ ॥
शृंगारसदनविलासिनी । मम हृदयानंदवर्धिनी ।
सकळ संशय टाकुनी । मुळींहुनि गोष्टी सांग ॥ ९५ ॥
म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस । क्रोधे भरो नेदी मानस ।
माझा गुरु स्वामी दुर्वास । अनुसूयात्मज महाराज ॥ ९६ ॥
त्या गुरूने परम पवित्र । मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र ।
तो जपता अहोरात्र । परम पावन पुनीत मी ॥ ९७ ॥
ममांग शीतळ अत्यंत । तव कलेवर पापसंयुक्त ।
अगम्यागमन केले विचाररहित । अभक्ष्य तितुके भक्षिले ॥ ९८ ॥
मज श्रीगुरुदयेकरोन । राजेंद्रा आहे त्रिकाळज्ञान ।
तुज जप तप शिवार्चन । घडले नाही सर्वथा ॥ ९९ ॥
घडले नाही गुरुसेवन । पुढे राज्यांती नरक दारुण ।
ऐकता राव अनुतापेकरून । सद्‌गदित जाहला ॥ १०० ॥
म्हणे कलावती गुणगंभीरे । तो शिवमंत्र मज देई आदरे ।
ज्याचेनि जपे सर्वत्रे । महत्पापे भस्म होती ॥ १ ॥
ती म्हणे हे भूभुजेंद्र । मज सांगावया नाही अधिकार ।
मी वल्लभा तू प्राणेश्वर । गुरु निर्धारा तू माझा ॥ २ ॥
तरी यादवकुळी गुरु वरिष्ठ । गर्गमुनि महाराज श्रेष्ठ ।
जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट । विद्या वरिष्ठ तयाची ॥ ३ ॥
जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी । तैसाच महाराज गर्गमुनी ।
त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी । शिवदीक्षा घेइंजे ॥ ४ ॥
मग कलावतीसहित भूपाळ । गर्गाश्रमी पातला तत्काळ ।
साष्टांग नमूनि करकमळ । जोडोनि उभा ठाकला ॥ ५ ॥
अष्टभावे दाटूनि हृदयी । म्हणे शिवदीक्षा मज देई ।
म्हणूनि पुढती लागे पायी । मिती नाही भावार्थ ॥ ६ ॥
यावरी तो गर्गमुनी । कृतान्तभगिनीतीरा येऊनी ।
पुण्यवृक्षातळी बैसोनी । स्नान करवी यमुनेचे ॥ ७ ॥
उभयतांनी करूनी स्नान । यथासांग केले शिवपूजन ।
यावरी दिव्य रत्ने आणून । अभिषेक केला गुरूसी ॥ ८ ॥
दिव्याभरणे दिव्य वस्त्रे । गुरु पूजिला नृपे आदरे ।
गुरुदक्षिणेसी भांडारे । दाशार्हराये समर्पिली ॥ ९ ॥
तनुमनधनेंसी उदार । गर्गचरणी लागे नृपवर ।
असोनि गुरूसी वंचिती जे पामर । ते दारुण निरय भोगिती ॥ ११० ॥
श्रीगुरूचे घरी आपदा । आपण भोगी सर्व संपदा ।
कैचे ज्ञान त्या मतिमंदा । गुरु ब्रह्मानंदा न भजे जो ॥ १११ ॥
एक म्हणती तनु मन धन । नाशिवंत गुरूसी काय अर्पून ।
परम चांडाळ त्याचे शठज्ञान । कदा बदन न पहावे ॥ ११२ ॥
धिक् विद्या धिक् ज्ञान । धिक् वैराग्य धिक् साधन ।
चतुर्वेद शास्त्रे आला पढून । धिक् पठण तयाचे ॥ ११३ ॥
जैसा खरपृष्ठीवरी चंदन । षड्‍रसी दर्वी व्यर्थ फिरून ।
जेवी मापे तंदुल मोजून । इकडून तिकडे टाकिती ॥ ११४ ॥
घाणा इक्षुरस गाळी । इतर सेविती रस नव्हाळी ।
की पात्रात शर्करा साठविली । परी गोडी न कळे तया ॥ ११५ ॥
असो ते अभाविक खळ । तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ।
षोडशोपचारे निर्मळ । केले पूजन गुरूचे ॥ ११६ ॥
उभा ठाकला कर जोडून । मग तो गर्गे हृदयी धरून ।
मस्तकी हस्त ठेवून । शिवपंचाक्षर मंत्र सांगे ॥ ११७ ॥
हृदयआकाश भुवनी । उगवला निजबोधतरणी ।
अज्ञानतम तेचि क्षणी । निरसूनि नवल जाहले ॥ ११८ ॥
अडत मंत्राचे महिमान । रायाचिया शरीरामधून ।
कोट्यवधि काक निघोन । पळते झाले तेधवा ॥ ११९ ॥
कितीएकांचे पक्ष जळाले । चरफडतचि बाहेर आले ।
अवघेचि भस्म होऊनी गेले । संख्या नाही तयांते ॥ १२० ॥
जैसा किंचित पडता कृशान । दग्ध होय कंटकवन ।
तैसे काक गेले जळोन । देखोनि राव नवल करी ॥ १२१ ॥
गुरूसी नमोनि पुसे नृप । काक कैचे निघाले अमूप ।
माझे झाले दिव्य रूप । निर्जरांहूनि आगळे ॥ १२२ ॥
गुरु म्हणे ऐक साक्षेपे । अनंत जन्मींची महापापे ।
बाहेर निघाली काकरूपे । शिवमंत्रप्रतापे भस्म झाली ॥ १२३ ॥
निष्पाप झाला नृपवर । गुरूस्तवन करी वारंवार ।
धन्य पंचाक्षरी मंत्र । तू धन्य गुरु पंचाक्षरी ॥ १२४ ॥
पंचभूतांची झाडणी करून । सावध केले मजलागून ।
चारी देह निरसून । केले पावन गुरुराया ॥ १२५ ॥
पंचवीस तत्त्वांचा मेळ । त्यांत सापडलो बहुत काळ ।
क्रोधमहिषासुर सबळ । कामवेताळ घुसधुसी ॥ १२६ ॥
आशा मनशा तृष्णा कल्पना । भ्रांति भूली इच्छा वासना ।
या जखिणी यक्षिणी नाना । विटंबीत मज होत्या ॥ १२७ ॥
ऐसा हा अवघा मायामेळ । तुवा निरसिला तात्काळ ।
धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ । गुरु दयाळ धन्य तू ॥ १२८ ॥
सहस्रजन्मपर्यंत । मज ज्ञान झाले समस्त ।
पापे जळाली असंख्यात । काकरूपे देखिली म्या ॥ १२९ ॥
सुबर्णस्तेय अभक्ष्यभक्षक । सुरापान गुरुतल्पक ।
परदारागमन गुरुनिंदक । ऐसी नाना महत्पापे ॥ १३० ॥
गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक । स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ।
परनिंदा पशुहिंसक । वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥ १३१ ॥
मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्वद्रोही वेदद्रोही ।
प्रासादभेद लिंगभेद पाही । पंक्तीभेद हरिहरभेद ॥ १३२ ॥
ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक । पाखांडमति मिथ्यावादक ।
भेदबुद्धि भष्टमार्गस्थापक । स्त्रीलंपट दुराचारी ॥ १३३ ॥
कृतघ्न परद्रव्यापहारक । कर्मश्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ।
बकध्यानी गुरुछळक । मातृहतक पितुहत्या ॥ १३४ ॥
दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न । दीनहत्यारी पाहती पैशून्य ।
तृणदाहक पीडिती सज्जन । गोत्रवध भगिनीविध ॥ १३५ ॥
कन्याविक्रय गोविक्रय । हयविक्रय रसविक्रय ।
ग्रामदाहक आत्महत्या पाहे । भ्रूणहत्या महापापे ॥ १३६ ॥
ही महापापे सांगितली । क्षुद्रपापे नाही गणिली ।
इतुकी काकरूपे निघाली । भस्म झाली प्रत्यक्ष ॥ १३७ ॥
काही गाठी पुण्य होते परम । म्हणोनि नरदेह पावलो उत्तम ।
गुरुप्रतापे तरलो निःसीम । काय महिमा बोलू आता ॥ १३८ ॥
गुरूस्तवन करूनि अपार । ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ।
सवे कलावती परम चतुर । केला उद्धार रायाचा ॥ १३९ ॥
जपता शिवमंत्र निर्मळ । राज्य वर्धमान झाले सकळ ।
अवर्षणदोष दुष्काळ । देशातूनि पळाले ॥ १४० ॥
वैधव्य रोग आणि आणि मृत्य । नाहीच कोठे देशात ।
आलिंगिता कलावतीसी नृपनाथ । शशीऐसी शीतळ वाटे ॥ १४१ ॥
शिवभजनी लाविलें सकळ जन । घरोघरी होत शिवकीर्तन ।
रुद्राभिषेक शिवपूजन । ब्राह्मणभोजन यथविधि ॥ १४२ ॥
दाशार्हरायाचे आख्यान । जे लिहिती ऐकती करिती पठण ।
प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण । अनुमोदन देती जे ॥ १४३ ॥
सुफळ त्यांचा संसार । त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर ।
धन्य धन्य तेचि नर । शिवमहिमा वर्णिती जे ॥ १४४ ॥
पुढे कथा सुरस सार । अमृताहूनि रसिक फार ।
ऐकोत पंडित चतुर । गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥ १४५ ॥
पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी । श्रीधरमुख निमित्त करूनि ।
तोचि बोलवीत विचारोनी । पहावे मनी निधरि ॥ १४६ ॥
श्रीधरवरद पांडुरंग । तेणे शिरी धरिले शिवलिंग ।
पूर्ण ब्रह्मानंद अभंग । नव्हे विरंग कालत्रयी ॥ १४७ ॥
शिवलीलामृत ग्रथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । प्रथमाध्याय गोड ॥ १४८ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


ज्योतिर्लिंगवर्णन, शिवमहिमा, मंत्रमहिमा, दाशार्हराजाची कथा, त्याचा उद्धार

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वतीला नमस्कार असो, श्रीगुरूंना नमस्कार असो ! अंबेसह विराजमान अशा श्रीसदाशिवाला नमस्कार असो ! हे शिवा ! तुझा पार कोणालाच कळत नाही, तू सर्वांचा आद्य आहेस, तू अनादि आहेस ! तू मायेच्या पलीकडील आहेस. ब्रह्मानंदाचे पूर्णत्व म्हणजे तूच ! तू शाश्वत म्हणजेच अविनाशी आहेस. तू हेरंबाचा पिता आहेस, तू जगाचा गुरू आहेस ! हे शंकरा ! तुझे स्वरूप ज्योतिरूप म्हणजे अग्नीसारखे दिव्य आहे. तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस. तुझा आरंभ केव्हा कोठे आहे ते कळत नाही, तू स्वतः च स्वयंभू आहेस, आणि तू नित्य आनंदरूपी वनात विहरत असतोस. तू उत्पत्ति - स्थिति - लयात्मक असे हे मायेचे चक्र चालवितोस, तू अविनाशी आहेस, आणि अनंत शरीररूपी वेष धारण करणारा तू या जगाचा खरा पालनकर्ता आहेस !

ज्योतिर्लिंगांचे स्तवन

हे शंकरा ! तुझा जय असो ! तृतीय नेत्राने युक्त असा तू विरूपाक्ष म्हटला जातोस आणि तुला पाच मुखे आहेत. सर्व सृष्टीच्या व जीवांच्या कर्मांचा तूच अध्यक्ष आहेस, आणि केवळ शुद्ध चेतन असे तुझे स्वरूप आहे. हे शंकरा, तू सर्व विश्वात भरून राहिला आहेस आणि तू कोणत्या प्रकारे जीवांना कर्मबंधनातून सोडवितोस, ते कळत नाही, ते गहन असे तुझे कृपारहस्य आहे. हे शंकरा, मनातच जन्म पावून मनाला मोहित करणारा जो मदन त्याला तू दग्ध करणारा आहेस. हे शंकरा, तू भक्तांना प्रिय आहेस व भक्तांवर तुझेही प्रेम असते. तू हिमालयाचा जामात असून तुझ्या भालप्रदेशी नेत्र आहे. हलाहल विष - पान केल्याने तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे. तू उमेचा पती आहेस, तुझ्या जटाजूटांत स्वर्गातील मंदाकिनी नदी विराजत आहे, ती तर शुभ्रपणाने जाईच्या फुलांच्या माळेसारखी शोभून दिसते. हे शंकरा, गरुडवाहन असा जो विष्णू त्याचा तू अत्यंत आवडता असून त्रिपुररूपी असुराचा तूच अंत केलास, अर्थात् त्रिलोकीत असणाऱ्या चराचर सृष्टीतील कशाचाही मोह तुला नाही. यक्षांचा राजा जो कुबेर तो तुझा मित्र आहे आणि प्रतापाने तू सूर्यासमान आहेस. हे शंकरा ! तू दक्षाचा यज्ञ विध्वंसून टाकलास, आणि मृगचिन्ह धारण करणारा चंद्र तुझ्या भालप्रदेशी शोभायमान आहे. हे शिवा ! तुझा भालप्रदेश विशाल असून तुझी कांती तर कापरासारखी शुभ्र आहे. तू विष प्राशन करून सर्व भक्तांचे व जगाचे रक्षण केलेस. सर्व विश्वातील घडामोडी तुझ्या समक्षच होतात, अर्थात तू दुर्लक्ष करशील असे काहीच नाही, म्हणून तुला सर्वसाक्षी म्हणतात. तू सर्वांगी भस्मलेपन करतोस ! सर्वांना तू भयमुक्त करणारा आहेस, आणि त्यांची संसारापासून मुक्ती करणारा तूच आहेस. हे शंकरा ! विश्वाची उत्पत्ति, स्थिति व अंत याला कारण तूच आहेस. तू हातात त्रिशूल धारण करतोस, आणि तू सिंहाचे चर्म वेढून घेतले आहेस. हे शंकरा, तू देव - सेनापती स्कंद याचा पिता ! तुझ्या वदनावर नेहमी सुंदर हास्य विलसत असते. तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्नीच आहेस. तूच सत्, चित व आनंद असे विविध ब्रह्म असून तू मलरहित आहेस. जगाचे कल्याण करणारा म्हणून तू शिव, तुझे चित्त पूर्ण शांत असते म्हणून तू शांत, आणि ज्ञानाचे सघन रूप म्हणून ज्ञानघन असा तू कधीच विचलित न होणारे 'अचल' तत्त्व आहेस. तुझे तेज कोट्यवधी सूर्याएवढे आहे आणि ते कधी ढळत नाही, कमी होत नाही. तू सर्व काळी सर्व काही व्यापलेले आहे. हे शंकरा, कलियुगातील जो पापमल त्याचे दहन करणारा तू कल्मष म्हणजे दोष, डाग, लांछन, यातून भक्तांना सोडवतोस. तू अनंत ब्रह्मांडांचा नायक म्हणजे त्यांचा चालक आहेस, आणि जगाचा रक्षक आहेस. पद्यातून उत्पन्न झालेल्या, अर्थात कमलोत्पत्ती ब्रह्मदेव, याच्या पित्याचे म्हणजे विष्णूचे मन तुझ्या ठायी रमते. आणि जीवांना जन्ममरणातून मोक्ष तूच देतोस. हे शंकरा, तुझे अहोरात्र ध्यान करणारे देव म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्रार्जुन, इंद्र, सर्व देव आणि ब्राह्मण - हे सर्व तुझे नित्य ध्यान करतात. तू भव म्हणजे खरी सृष्टी आहेस, आणि प्राण्यांच्या संसारातील यातनांचा अंत करणारा आहेस. पार्वतीचा तू पती आणि स्मशानात अर्थात 'शून्य' स्थानी तू निवास करणारा आहेस. वैखरी वाणीच्या शक्तीच्या पलीकडे तू आहेस. स्वर्गनदी गंगा होऊन अवनीतलावर आली असता तू तिच्या तीरी विश्वेरनाथ - काशीपुरीचा नाथ - म्हणून विहार करतोस, अर्थात ते तुझे प्रिय स्थान आहे. काशी हे तुझे स्थान असून तू महत् तत्सवाचाही विलय करणारा, सर्पभूषणे धारण करणारा, गजासुराचा व मदनाचा गर्व नष्ट करणारा असा तू आनंदघन ॐकार अमलेश्वर आहेस. तू मद व गर्व नष्ट करणारा, जन्मरहित व अपराजित आहेस. तू उज्जयिनी येथे कालातीत महाकाल म्हणून राहतोस, तू अमित सृष्टीचा प्रारंभ - गर्भ असून वेद व शास्त्रे ही तुला नमन करतात. तुला कोठेही खंड नाही, अवयव नाहीत, तू पूर्ण असल्यामुळे तुला आवरण असे नाही, अर्थात् दिशा हेच तुझे वस्त्र आहे. तू स्मरणमात्रे भयाचा नाश करतोस, अर्थात नमः शिवाय म्हणणारा भक्त निर्भय होतो. तूच भक्तांच्या हृदयरूपी चकोराला चंद्राप्रमाणे प्रिय आहेस. तू वेणू राजाचे महान पाप हरण करणारा सनातन घृषेश्वर आहेस. हे शंकरा, तू असा शुक आहेस की ज्याला उमेचे हृदय हाच एक पिंजरा आवडतो, अर्थात् उमेच्या मनात तुझेच नित्य ध्यान चाललेले असते. तू भक्तहृदयरूपी कमळात मुग्ध होऊन राहणारा भ्रमर आहेस. हे भाळी शशिकला धारण करणाऱ्या शंकरा, असा तू सौराष्ट्र देशात सोमनाथ नावाने विराजत आहेस.

हे शंकरा, भीमाशंकर म्हणूनही तू विराजमान असून ते तुझे रूप भयानक असूनही खरोखरी तू करुणेचा सागर आहेस, तुझे नेत्र कमळासारखे आहेत, आणि रुद्राचा तो अवतार तूच आहेस व रुद्राक्षांचे भूषण तू धारण करतोस. तुझे तप महान आहे.

नागनाथ नामाने तू ज्योतिर्लिग स्वरूपात राहतोस, तो तू नागांना अंकित करणारा, नागभूषण धारण करणारा, तुझी कुंडले नागेंद्राची व तुझे वस्त्रही गजाचे आहे. तू नागांचे रक्षण करणारा व गजमुख गणपतीचा पिता आहेस. वृत्राचा शत्रू जो इंद्र, त्याचाही पराभव करणाऱ्या मेघनादाचा पिता रावण, त्याला तू वर दिलास, तू बाणासुराला प्रिय आहेस, तू पंचबाण मिरविणाऱ्या मदनाचा अंत केलास, भवरूपी रोगावर औषध देणारा तूच वैद्य आहेस, त्रिपुरासुराचा नाश करणारा अतिशय अद्‌भुत असा वैद्यनाथ तूच आहेस.

हे त्रिनयना, तिन्ही गुणांच्या पलीकडे तू असून त्रिविध तापांचे शमन तूच करतोस, तू तीन प्रकारच्या भेदांपलीकडचा आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा त्र्यंबक तूच आहेस. तू करुणेचा सागर आहेस, करुणेचा मेघच आहेस. कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह, कृपेचा सागर, आणि जगाच्या आनंदाचा मूळ कंद म्हणजे संचय तूच आहेस. तू हिमालयात निवास करतोस व हिमवताच्या कन्येचा पती आहेस. हिमकेदार नावाने तू नित्य अभिनव रूपात दिसतोस. तू पाच मुकुट धारण करतोस, मायेचे मालिन्य तूच हरण करतोस, वेद तुझे गुण रात्रंदिवस गातात. तुला आदि, मध्य, व अंत काहीच नाही. असा तू श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने राहतोस. तू इंद्रशत्रु मेघनादाच्या पित्याला, रावणाला मारणाऱ्या रामाला प्रिय असून, तुझ्या समोर अहोरात्र हात जोडून हनुमान उभा आहे. असा तू रामेश्वर नावाने जगताचा गुरू म्हणून विराजत आहेस.

शिवमहिमा

अशा सर्वोत्तमा शंकरा ! हे अजन्मा, अजिता, ब्रह्मानंदाच्या परमनिधाना, तुझी थोरवी वर्णन करणे वेदशास्त्रांसही अशक्य आहे. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर कवी असे नम्रपणे म्हणतो की तुझ्या गुणांचा सागर अगाध व अपार आहे, तेथे बुद्धी, तर्क व चित्त हे पोहून पोहून किती पोहणार ? तुझा पार लागणारच नाही त्यांना. सुवर्णपर्वतासह पृथ्वीचे वजन करायला तराजू कोठून आणू ? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू ? समुद्राचे पाणी व वाळूचे कण किती मोजू ? कोणत्या मापाने मोजू ? सूर्य पाहण्यासाठी दिवा कोणता आणू ? पृथ्वीची पाटी करून पर्वताच्या काजळाने समुद्राच्या दौतीत शाई बनविली व तीत कल्पवृक्षाची लेखणी बुडवून साक्षात् सरस्वती जरी लिहू लागली तरी तुझा महिमा लिहिणे तिला शक्य झाले नाही. तिथे मी बिचारा ग्रंथरचना कशी करू ? परंतु, जर तूच मनात आणलेस व मजवर कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे ?

ग्रंथप्रयोजन

द्वितीयेच्या इवल्याशा चंद्रकोरीला लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात त्याप्रमाणे हे करुणासिंधो ! मी अल्पमतीने तुझे गुण गात आहे. सत्यवतीचा प्रिय पुत्र वेदव्यास तुझे महिमारूप आकाश भेदन करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला अंत न कळल्यामुळे तोही तटस्थ राहिला. तिथे मी मंदबुद्धीचा पामर, तुझ्या थोरवीच्या आकाशात संचार तरी कसा करणार ? परंतु तुझ्या गुणांच्या सागरात मी मासा होऊन सुखाने पूर्ण शरण येऊन विहार करीत आहे ते माझ्या जिवाचे सार्थक व्हावे म्हणून !

शिवाचा आदेश

श्रीधर कवीचे असे बोलणे ऐकून दक्षकन्येचा पती श्रीशंकर संतुष्ट झाला आणि म्हणाला - "तू शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. मी त्यात रसपरिपोष करीन. ज्याप्रमाणे पंडित हा मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवितो त्याप्रमाणे मी तुझ्या मुखाने माझे सर्व गुण वदवीन.

श्रोत्यांनी आता लक्ष द्यावे. व्यासांनी स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंड नावाचा जो भाग आहे त्यात शिवलीला वर्णन केली असून तोच शिवलीलामृत नावाचा ग्रंथ होय.

नैमिषारण्यात अनेक मठ आहेत. त्या अरण्यात अनेक ऋषी तप करीत होते. तेथे शौनक व इतरांनी सूताला प्रश्र विचारला - तू कोण ? आमच्या 'चित्' आकाशात तू चंद्रासमान आहेस ! आता आमचे कर्णरूपी चकोर तृप्त कर. तू अनेक पुराणे वर्णन केली, विष्णूच्या अवतारांची महती सांगितलीस. दशावतार वर्णिलेस, भारत, भागवत आदी ग्रंथ ऐकून आमचे कान तृप्त झाले, आता अजून असा शिवलीलामृत ग्रंथ श्रवण करावा असा आमचा मानस आहे.

शिवमंत्राचे श्रेष्ठत्व

तेव्हा व्यासांचा शिष्य सूत्र म्हणाला - "आता चित्त देऊन ऐका, परम आश्चर्यकारक शिवचरित्र ऐका. पाप पर्वताएवढे असले तरी या श्रवणाने जळून जाईल. श्रीशंकर या श्रवणाने तुम्हाला सर्व काही देईल, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, ज्ञान आणि विवेक हे सर्व देईल. शिवचरित्र म्हणजे सर्व तीर्थयात्रांची फलश्रुती आहे, महान यज्ञाचे पुण्य याच्या श्रवणाने मिळते, कलिमल नष्ट होतो. सर्व यज्ञांत जपयज्ञ श्रेष्ठ आहे, आणि सर्व नामजपांत शिवमंत्र श्रेष्ठ आहे तो म्हणजे 'ॐ नमः शिवाय' हा सहा अक्षरांचा मंत्र ! नमः शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तेवढाच फलदायी आहे. तो संसाररूपी सागरातून तारून नेणारा आहे. ब्रह्मदेव, इतर सर्व देवता व ऋषी शिवमंत्राचाच जप करीत असतात.

दारिद्र्य नष्ट होते, दु: ख दूर होते, भव व शोक नाहीसे होतात, काम, क्रोध, भेदभाव आणि पातके यांचा नाश होतो तो या शिवमंत्रामुळेच. ह्या मंत्राने संतोष होतो, पोषण होते, धेर्य येते, यानेच रुषींचे व देवांचे कल्याण होते, याचा महिमा अवर्णनीय आहे. नऊ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, तसा नमःशिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र सर्व मंत्रांत श्रेष्ठ आहे. ब्रह्मा व विष्णू याचाच जप करतात. सहा शास्त्रांत वेदान्त श्रेष्ठ, तीर्थांत प्रयाग श्रेष्ठ, आणि क्षेत्रांत काशीक्षेत्र श्रेष्ठ, तसा सर्व मंत्रांत हा मंत्र श्रेष्ठ आहे. शस्त्रांमध्ये पाशुपतास्त्र, देवांमध्ये कैलासपती शंकर, पर्वतांत जसा मेरुपर्वत, तसा हा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रांत श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्त्व आहे. हा तारकमंत्र म्हणजे परब्रह्मच आहे, यावरून सारी तीर्थे ओवाळून टाकावीत ! आत्मप्राप्ती हेच ज्या खाणीतील रत्न अशी खाण म्हणजे हा मंत्र ! कैवल्याच्या मार्गावर प्रकाश पाडणारा सूर्य म्हणजे हा मंत्र ! हा ब्रह्मस्वरूप अग्नी अविद्यारूपी अरण्याचे दहन करतो.

सनक आदिकरून जे खरे ज्ञानी आहेत ते हाच मंत्र जपतात. या मंत्राचा जप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी, कोणीही करावा, त्याला प्रतिबंध नाही. जागृतीत तर याचा जप करावाच, पण स्वप्नातही याचा जप घडावा. याचा जप करण्यासाठी बसलेच पाहिजे असे नाही. येता, जाता, कार्य करता करता, निजताना, बोलताना, एवढेच काय, कोणाशी भांडण करायचे असेल व त्यावेळी स्मरण राहिले तरी नमःशिवाय मंत्र स्फुरत राहू द्यावा ! याचा जप करण्यास काळवेळाचे बंधन नाही.

पाच अक्षरांचा हा जय म्हणजे पंचानन - अर्थात् सिंह आहे. त्याची गर्जना कानी पडताच, दोषरूपी हत्ती तत्काळ निष्प्राण होतात, त्यांचे भस्म होऊन जाते. या मंत्राला न्यास नकोत, मातृकान्यास नकोत, विशिष्ट आसनही नको. प्रेमाने हा म्हणावा, "शिव ! शिव ! "असे प्रेमाने स्मरण करताच शंकर समोर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात, त्यांचे रक्षण जिनेत्र शंकर स्वत: करतो, स्वतःच्या शरीराची सावली घालून भक्ताचे अहोरात्र रक्षण करतो. जे नमःशिवाय हा मंत्र जपतात त्यांना शंकर म्हणतो की "भक्तांनो, मी तुमचा ऋणी आहे ! "पण या मंत्राचे ग्रहण गुरुमुखाने विधिपूर्वक करावे !

गुरूमहिमा

गुरू ब्राह्मण असावा, त्याच्या अंगी दैवी गुण असावेत, वैराग्य, भक्ती, दिव्य ज्ञान असावे. तो सर्व काही तारतम्याने जाणणारा, उदार, दयावंत असावा. तो शांत स्वभावाचा, इंद्रियवृत्ती ताब्यात ठेवणारा, मितभाषण करणारा असावा. तो मानाला हपापलेला नसावा. दांभिक नसावा, तो अहिंसक व विरक्त असावा. सर्व वर्णीयांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे असे जे वचन आहे ते लक्षात घेऊन गुरुमंत्राचा उच्चार ऐकावा तो अशा श्रेष्ठ गुरूकडूनच. नमःशिवाय हा मंत्र स्वतःला माहीत आहे, म्हणून त्याचा जप आपला आपण करायला लागू नवे. गुरुमुखाने घ्यावा. उगाच जप केला तर तो निष्कळ होईल.

जो कामी, क्रोधी, मदोन्मत्त आहे, ज्याच्यावर गुरुकृपा नाही, अशा माणसाने जरी कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचे तोंड सुद्धा पाहू नये ! अहो ! वेद आणि शास्त्रांचा खोल अभ्यास करून कितीही ब्रह्मज्ञान झाले आणि विद्वान व संत यांच्याशी कितीही चर्चा केली तरी सद्‌गुरूविना तो मनुष्य संसारातून तरून जात नाही. कोणी कोणी लोकांना मोठ्या प्रौढीने सांगतात की "अहो ! मला भगवंताने स्वप्नात मंत्र दिला !" पण प्रत्यक्ष गुरू केल्याशिवाय ते तरून जाणार नाहीत. देवाने प्रत्यक्ष येऊन जरी आत्मरहस्य सांगितले तरी मनुष्य गुरूला स्वत: शरण गेला नाही तर तो भवसागर तरून जाणार नाही ! उपनयन झाल्याशिवायच जो गायत्री मंत्राचा जप करतो तो भ्रष्ट होय. तो मंत्र व जप करणारा - दोघे अपवित्रच. लग्नात सारे वऱ्हाडी जमले पण खुद्द वर आलाच नाही तर त्यांचा जसा उपयोग नसतो, तसाच हा प्रकार ! एखाद्याने खूप ग्रंथ वाचले, तरी त्याचा जन्ममरणाचा त्रास काही चुकणार नाही. म्हणून मुमुक्षूने संप्रदायपरंपरेतील श्रेष्ठ गुरूला शरण जावे. उगाच भलत्या सलत्या मनुष्याकडून मंत्र घेऊ नये, पूर्वसंप्रदाय ज्ञात नाही अशाला गुरू करू नये, जन्मांधाला जसे रंगाचे ज्ञान नसते तसा तो गुरू असतो.

मंत्रपुरश्चरण व कथेचा उपोद्घात

या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्रात - अर्थात् काशीमध्ये, कुरुक्षेत्रात, नैमिषारण्यात, गोकर्ण क्षेत्रात किंवा अशाच पवित्र स्थानी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे. या मंत्राचे श्रवण व पठण करण्यात नित्य मग्न असावे, त्याचा निदिध्यास असावा. शिवमहिम्याची कथा श्रवण करण्यात आस्था ठेवावी. सर्व पापे क्षीण होतील. शिवमंत्राच्या श्रवणपठणाने त्याचा साक्षात्कार होईल. ब्रह्महत्या करणारा, वाटमारी, तामसी माणूस, सर्वही याच्या श्रवणाने पवित्र होतात. शिवमहिमा सांगणारी पुरातन अशी एक कथा मी सांगतो ती आता श्रवण करा !

दाशार्ह राजाची कथा - त्याचे सद्‌गुण

मथुरा नगरीत परम पवित्र अशा यादव वंशात दाशार्ह नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुलक्षणी होता, उदार होता. अनेक राजे त्याची सत्ता मानीत. त्याला वंदन करीत. त्यांच्या मुकुटांतील रत्‍नांचा प्रकाश या राजाच्या पायाच्या नखांवर पडे ! त्या राजाने पृथ्वीवर आपल्या सत्तेचे पांघरूण घातले होते ! ती त्यामुळे सुरक्षित होती. त्याच्या कीर्तीची धवल पताका शरद् ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे शोभत होती, अर्थात् त्याची सत्कीर्ती निर्दोष होती. सर्व प्रजानन व ब्रह्मवृंद या राजाचे शुभचिंतन करीत असत. शुक्लपक्षातील चंद्र जसा द्वितीयेपासून दिवसेंदिवस वाढत जातो तसे त्याचे यश वाढत होते. दुर्बुद्धी त्याला कधी होत नसे ! सद्‌बुद्धिरूपी धर्मपत्नीवर त्याचे प्रेम होते, आणि दुर्बुद्धी दासीकडे तो ढुंकूनही पाहात नसे. तो विष्णूसारखा सुंदर होता, आणि दानरूपी शस्त्राने प्रजाजनांचे दारिद्य त्याने नष्ट केले होते. क्षत्रियांना परशुराम जसा जिंकीत असे तसा हा दाशार्ह राजा रणात शत्रूंना जिंकीत असे. त्यावेळी प्रलयाग्नीसारखा तो भयंकर वाटत असे. कुर्‍हाडीचा घाव घालू गेले तरी वृक्ष जसा स्थिर राहतो, पळून जात नाही, तसाच हा राजा रणांगणात निर्भयपणे उभा राहात असे. चौदा विद्या व चौसष्ट कला त्याला अवगत होत्या. दानरूपी मेघाने धनवर्षाव करून त्याने याचकांचे दारिद्र्य हीच धूळ भूमिगत केली होती. हा राजा बोलू लागला की मेघगंभीर ध्वनी होई त्यामुळे प्रजाजनांची चित्तेंही मयूराप्रमाणे आनंदाने नाचत असत. या राजाच्या सेनेकडे पाहून सागरही भयभीत होई. त्याचे वचन ध्रुवतार्‍यासारखे स्थिर, अढळ असे.

दाशार्हपत्नी कलावती

अशा त्या दाशार्ह राजाची पत्नी कलावती फार सुंदर होती. काशीच्या राजाची ती कन्या. तिचे सौंदर्य अप्रतिम होते. सरस्वतीलाही त्या सौंदर्याचे वर्णन करायला आवडत असे ! लावण्यरूपी सागरावरील ती जणू एक लाट होती. तिचे नेत्र सुंदर, ओठ सुंदर ! वदन चंद्रासारखे, भाषण मृदुमधुर ! स्वर कोकिळासारखा. तिची चाल हंसासारखी डौलदार होती व कंबर सिंहाच्या कमरेसारखी लहान होती. वेणी पाहून वाटे की हा मोठा काळा भुजंग तर नव्हे ? तिच्या सौंदर्याने अलंकारांनाच जास्त शोभा येत असे ! तिचे दात हिर्‍यासारखे चमकत असत; त्यामुळे ती बोलू लागली की भोवती मंद प्रकाश पडे. ती सर्व कला जाणणारी होती, त्यामुळे तिचे कलावती नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतले जणू सर्वश्रेष्ठ रत्न अशी ती राणी, चतुर व सूज्ञ होती. तिच्या तनूला उत्तम सुगंध येत असे. राजाचे मन भ्रमर होऊन तिच्या मुखरूपी कमळाने आकृष्ट होत असे व तिच्याकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. एकदा राजाचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने तिला जवळ बोलावले, पण ती आली नाही. ती रूपवती होती, त्या सौंदर्याने राजा, जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. ती आली नाही तेव्हा राजाच उठून तिच्या महालात गेला. तिने राजाला पाहिले पण तिचे मन प्रसन्न झाले नाही. राजा तर तिला आलिंगन देण्यास आतुर झाला होता. तो तिचा अनुनय करू लागला - "प्रिये कलावती ! शृंगारलतिके ! ये, मला आलिंगन दे. तुझे सर्व शरीर किती शुभलक्षणी आहे ! माझ्याजवळ ये ! आपले मीलन घडू दे. आपल्याला जो पुत्र होईल तो उत्तम होईल. मला नाराज करू नकोस."

"राजन् ! आपण धीर धरा !" राणी गंभीरपणातच स्मित करून म्हणाली, "आता मला स्पर्शही करू नका !"

तो म्हणाला, "का बरे ? मी तुला प्रिय नाही का ?"

राणी म्हणाली - "नाथ, आपण मला प्रिय आहात म्हणूनच सांगते, की मला यावेळी स्पर्श करू नका ! कारण मी शशिशेखर शिवाचे व्रत करीत आहे. अशा वेळी मी आपल्याला साथ देऊ शकत नाही."

राजा म्हणाला - " मी तर इथे व्याकुळ झालो आहे !"

राणी म्हणाली - "जी स्त्री रोगी असेल, गर्भवती असेल, ऋतुमती असेल, उपाशी असेल, व्रतस्थ, किंवा वृद्ध अथवा अशक्त असेल तरी मीलनाला योग्य नसते. मीलनाच्या वेळी स्त्री- पुरुष तरुण, रूपवान, सुखी, संतोषी असावे. चिंताग्रस्त नसावे. पर्वकाळ नसावा, व्रताचा दिवस नसावा. उत्तम काळी, उत्तम भोजन करून, विश्रांती घेऊन मगच स्त्रीशी शयन करावे. राजन्, आपण मला स्थर्श करू नये, शपथ आहे ! "

राणीचे बोलणे मनावर न घेता राजा पुढे झाला, तो कामवासनेने अंध झाला होता. त्याने कलावतीला एकदम दृढ आलिंगन दिले ! तो काय ! कलावतीला स्पर्श होताच राजाचे अंग पोळले ! राजा एकदम बाजूला झाला आणि म्हणाला - "राणी ! माझे अंग असे का भाजले ? कारण काव आहे ?"

राणी म्हणाली - "नाथ, आपण रागावू नवे. माझे गुरू दुर्वास ऋषी, यांनी मला नमःशिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा मी अहोरात्र जप करते. त्यामुळे माझे शरीर पवित्र झाले आहे. माझे शरीर तापलेले नाही ! ते तर अत्यंत शीतल आहे. आपलेच शरीर अपवित्र असेल, कारण आपण व्रते पाळली नसतील, आणि आचरण शुद्ध ठेवलेले नसेल. अभक्ष्य पदार्थ भक्षण केले असतील ! मला गुरुकृपेने अंतर्ज्ञान आहे. आपण जप, तप, शंकराची पूजा यातले काहीही केलेले नाही; गुरूंची सेवा घडलेली नाही, पुढे आपल्याला दारुण नरकयातना भोगाव्या लागतील ! सावध व्हा ! आत्ताच काही साधन करा. "

राजाला फार वाईट वाटले. त्याला दु:खाने बोलवेना ! त्याचा कंठ दाटून आला ! तो राणीला म्हणाला - "खरोखर, मोठाच प्रमाद मजकडून घडला आहे. कलावती ! तू फार सदगुणी आहेस. मलाही त्या शिवमंत्राचा उपदेश कर. त्याचा जप केला की मोठी पापे भस्म होऊन जातील ! "

राणी म्हणाली - "मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. मी आपली पत्‍नी. आपण माझे पती. शास्त्राप्रमाणे माझे आपण गुरू ! मी आपली गुरू होऊ शकत नाही. आपण यादव कुळाचे मुख्य गुरू जे गर्गमुनी आहेत, त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. ते ज्ञानी जनांमध्ये श्रेष्ठ आहेत. वसिष्ठ, वामदेव यांसारखेच ते थोर ज्ञानी ऋषी आहेत. आपले तेच गुरू होतील. "

राजाला आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशी राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. मुनींना त्याने साष्टांग नमस्कार केला. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याने नम्रपणे विनंती केली - "मुनिश्रेष्ठा ! मी तुम्हाला शरण आलो आहे. मला शिवदीक्षा द्यावी. मजवर अनुग्रह करावा. "

गर्गमुनींना त्याची करुणा आली. ते राजाला नदीच्या तीरावर घेऊन गेले. त्याला यमुनेत स्नान करण्यास सांगितले. नंतर एका मोठ्या वृक्षाच्या तळी स्वतःही स्नानोत्तर त्याच्यासह बसले. नंतर राजाकडून त्यांनी शंकराची पूजा करून घेतली. राजाने गर्गमुनींचीही पूजा केली. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून भांडारातून द्रव्यसंभार दिला. त्याने गर्गमुनींचे पाय धरले; म्हणाला - "गुरुश्रेष्ठा ! मी तुम्हाला तनमनधनाने शरण आहे. मला उपदेश करावा. "

खरोखर जे गुरूला शरण जातात ते धन्य ! पण जे गुरूची वंचना करतात ते पामर पुढे घोर नरकयातना भोगतात. आपल्या गुरूच्या घरी संकटे आलेली असताना, स्वतः जो सुखविलासात दंग असतो त्याला ज्ञान कोठून प्राप्त होणार ? जो साक्षात् ब्रह्मानंद असा गुरू आहे त्याची भक्ती करीत नाही तो मतिमंदच ! कोणी कोणी लबाडीने म्हणतात, तन काय, धन काय, मन काय, सारेच नाशिवंत आहे. ते गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ ? पण असे तर्कट करणाऱ्याचे ज्ञान शठाचे ज्ञान असते. त्याचे तोंडही पाहू नवे. त्याचे ज्ञान, त्याची विद्या, त्याचे वैराग्य, त्याची साधना, सारे काही व्यर्थ ! धिक्कार असो त्याचा ! तो जरी चार वेद आणि सहा शास्त्रे पढला तरी त्याला काही अर्थ नाही. गाढवाने पाठीवर चंदनाचा भार वाहाचा, तसा तो भार ! षड्‍रस अन्नात पळी बुडाली तरी तिला त्या अन्नाची काव चव ? इतर लोक अन्न आवडीने खातात पण पळी तशीच राहते. तांदूळ मापात भरून इकडून तिकडे टाकतात, पण माप तांदूळ खात नाही तशी त्यांची विद्या म्हणजे केवळ ओझे वाहणे. रसाचे गुऱ्हाळ असते तेथे घाणा काही रस पीत नाही. लोक रस चाखतात. पात्रात साखर ठेवली तर पात्राला तिची चव ती काय ? तसे गुरूची वंचना करणारे लोक विद्येचा केवळ भार वाहणारे असतात, ते भाविक नव्हेत, ते दुर्जनच जाणावेत.

पण दाशार्ह राजा तसा नव्हता. तो श्रद्धाळू, भाविक होता. त्याने गुरूचे षोडशोपचारांनी पूजन केले आणि त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला षडाक्षरी मंत्र ॐनमःशिवाय ह्याचा उपदेश केला ! आणि त्यावेळी एक मोठे आश्चर्थ घडले !

राजाच्या शरीरातून शेकडो कावळ्यांच्या रूपाने मोठमोठी पापे निघून गेली ! शिवनाम राजाच्या कानी पडले मात्र ! त्याची आग सहन न होऊन पाप पळाले. कित्येक कावळ्यांचे पंख जळले, कित्येक तर बाहेर पडता पडता भस्मसात् झाले. शुष्क काटेरी झाडांचे वन जसे अग्नीत जळून जाते तसे पाप जळून गेले. राजा आश्चर्याने पाहतच राहिला ! त्याने स्वतःच्या देहाकडे पाहिले, तो देहही देवासारखा दिव्य झाला ! राजा गुरूना म्हणाला - "हे हो काय ! एवढे कावळे माझ्या शरीरात कसे काय होते ? आणि आता मी असा दिव्य देही कसा झालो ?

गर्ग म्हणाले - "राजा, शिवनामाच्या प्रभावाने पाप दूर निघून गेले. ते पक्षीरूपाने गेले असे दृश्य तुला दिसले कारण तुला बोध व्हावा अशी माझी इच्छा होती. राजा ! अनेक जन्मातील पापे नष्ट होऊन तू आता निष्पाप झाला आहेस. "

त्यावेळी राजाचे मन सर्व पाशांतून मुक्त झाले. त्याने. वारंवार गुरुस्तवन करण्यास प्रारंभ केला. "गुरुमहाराज ! मी आज धन्य झालो ! तुम्ही माझे अज्ञान दूर केलेत. पंचमहाभूते वेगळी केलीत, चारी देहांचा म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय व विज्ञानमय शरीरांचा निरास केलात !

मी पंचवीस तत्त्वांचा मेळ जो देह, त्यात सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करीत होता. कामरूपी वेताळ मला घुसळून काढीत होता; आशा, कृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, भ्रांती, विस्मृती, या साऱ्या जखिणी तर माझी विटंबना करीत होत्या. हा सगळा मायेचा पसारा ! पण त्याचा तुम्ही क्षणार्धात निचरा केलात ! तुम्ही किती दयाळू आहात ! धन्य झालो मी ! तुमच्या कृपेने मला पूर्वजन्मांचेही स्मरण झाले आहे. किती तरी पापे काकरूपाने माझ्या शरीरातून निघून गेली ! हे गुरुश्रेष्ठा ! अनंत पूर्वजन्मांत मी कधी सुवर्ण चोरले होते ! मी कधी अभक्ष्य भक्षण केले होते, मद्यपान केले होते, अयोग्य स्त्रीगमन केले होते ! गुरूची निंदा केली होती ! कितीतरी हत्या केल्या ! गाईची हत्या, ब्राह्मणाची हत्या, स्त्रीची हत्या, पशुहत्या, बालहत्या ! परनिंदा केली, भक्तांना छळले, धर्माचा लोप केला ! मी सर्वांशी द्रोह केला ! मित्राचा, गुरूचा, वेदांचा, सर्व विश्वाचा द्रोह केला. मी देवळे भग्न केली, कोणाला छळून नपुंसकही केले ! अन्नदान करताना कमीजास्त पंक्तिभेद केला ! एवढेच काय, श्रीशंकर व श्रीविष्णू यांतही भेदभाव मानला.

मी दुसऱ्यांचे ज्ञान माझे म्हणून मिरवले, ग्रंथांचीही चोरी केली, पक्ष्यांना ठार मारले, मिथ्या वाद केला ! पाखंडमते मांडली ! दुसऱ्यांत व माझ्यात भेदभाव मनात धरला, स्वतःला गर्वाने मोठा समजलो पण भ्रष्ट अशा साधनमार्गाचा पुरस्कार केला. मी स्त्रीलंपट होतो, दुराचारी होतो. केलेल्या उपकाराचे स्मरण न ठेवता मी कृतघ्नपणा केला. दुसऱ्याच्या धनाचा अपहार केला. मी कर्मभ्रष्ट होतो ! मी तीर्थांची निंदा केली ! मी धार्मिकतेचा आव आणून स्वार्थावर दृष्टी ठेवली. मी गुरूला छळले ! काही जन्मांत तर मी आईबापांनाही जिवे मारले ! दुबळ्या लोकांना मारले, दीनांना मारले, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष भगिनीचाही वध केला ! कन्या, गाई, घोडे, रस, दूध इत्यादी गोष्टींचा विक्रय केला, गावेच्या गावे जाळली ! कधी तर आत्मघातही केला. एवढी महापापे मी कित्येक जन्मांतरी केली आणि क्षुद्र पापांची तर गणतीच नाही.

हे गुरुश्रेष्ठा ! शिवनामाच्या प्रभावाने एवढी सर्व पापे मला सोडून गेली व मी शुद्ध झालो. मी काही पुण्यही केले म्हणून मला नरदेह मिळाला, राजपद मिळाले आणि भाग्य थोर म्हणून गुरुकृपा झाली व माझा उद्धार झाला. आता मी गुरुप्रतापाने भवसागर तरलोच ! "

असे म्हणून व गर्गमुनींची वारंवार स्तुती करून राजा त्यांना वंदन करून मधुरा नगरीस परत गेला. राणी कलावतीने याप्रमाणे चातुर्याने राजाचा उद्धार केला.

राजा शिवमंत्राचा नित्य जप करू लागला. त्याचे राज्य वाढले. राज्यात अवर्षण कधीच नव्हते. वैधव्य आणि रोगांनी मृत्यू नाही असे झाले. त्याने कलावतीबरोबर आनंदाने, सुखाने राज्य केले. राजाने आपल्या प्रजाजनांसही शंकराची भक्ती व उपासना करण्यास प्रोत्साहन दिले. रुद्राभिषेक करविले, अन्नदाने, ब्राह्मणभोजने करविली आणि सर्वत्र शिवभक्तीचा प्रचार केला.

हे दाशार्ह राजाचे आख्यान जे लिहितील, ऐकतील, आणि याच्या पठणादिकांना प्रोत्साहन देतील, त्यांचा संसारही सफल होईल, त्यांचे रक्षण स्वत: शंकरच करील, आणि जे लोक शिवमहिमा वर्णन करतील त्यांचे जीवन धन्य होईल.

यापुढे तर अमृतापेक्षा गोड अशी कथा आहे. पंडित, चतुर व प्रेमळ गुरुभक्त असे श्रोते ती कथा श्रवण करोत. शूलपाणी शंकर हा पूर्ण ब्रह्मानंदरूप असून श्रीधर कवीच्या मुखाने तोच सर्व कथा वदवून घेत आहे यात संशय नाही. स्वतः पांडुरंगाच्या मुकुटाच्या ठिकाणी शिवाची पिंडी आहे ! पूर्ण अशा ब्रह्मानंदाचा कधी बेरंग होत नाही की तो कधी भंगही पावत नाही !

स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत हा भाग प्रेमळ सज्जनांनी नित्य श्रवण करावा अशी विनंती आहे.
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


GO TOP