|
॥ श्रीशिवलीलामृत ॥ ॥ अध्याय तिसरा ॥
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव मंगलधामा । निजजनहृदयआरामा । चराचरफलांकितद्रुमा । नामाअनामातीत तू ॥ १ ॥ इंदिरावरभगिनीनीमनरंजना । षडास्यजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंद भाललोचना । भवभंजना त्रिपुरांतका ॥ २ ॥ हे शिवसद्योजात वामघोरा । तत्पुरुषा ईशान ईश्वरा। अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ३ ॥ गंगाधरा भोगिभूषणा । सर्वव्यापका अंधकमर्दना । परमातेता निरंजना । गुणत्रयविरहित तू ॥ ४ ॥ हे पयःफेनधवल जगज्जीवन । द्वितीयाध्यायीं कृपाकरून । अगाध सुरस आख्यान । शिवरात्रीमहिमा वर्णविला ॥ ५ ॥ यावरी कैसी कथेची रचना । वदवीं पंचमुकुट पंचानना । शौनकादिकां मुनिजनां । सूत सांगे नैमिष्यारण्यीं ॥ ६ ॥ इक्ष्वाकुवंशी महाराज । मित्रसहनामें भूभुज । वेदशास्त्रसण्पन्न सतेज । दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥ ७ ॥ पृतनावसनेंकरून । घातलें उर्वीस पालाण । प्रतापसूर्य उगवला पूर्ण । शत्रुभणें मावळलीं ॥ ८ ॥ तो एकदा मृगयाव्याजेंकरून । निघाला धुरंधर चमू घेऊन । फ़्होरांदर प्रवेश्ला विपिन । तों सावजें चहूकडून उठलीं ॥ ९ ॥ व्याघ्र वृक रीस वनकेसरी । मृग मृगी वनगौ वानर वानरी । शशकजंबुकांच्या हारी । संहारीत नृपवर ॥ १० ॥ चातक मयूर बदक । कस्तुरीकुरंग जवादिबिडालक । नकुल राजहंस चक्रवाक । पक्षी श्वापदे धावती ॥ ११ ॥ नृपे मारिले जीव बहुवस । त्यात एक मारिला राक्षस । महाभयानक तामस । गतप्राण होऊनि पडियेला ॥ १२ ॥ त्याचा बंधु परम दारुण । तो लक्षिता झाला दुरोन । मनी कापट्य कल्पून । म्हणे सूड घेईन बंधूचा ॥ १३ ॥ मित्रसह पातला स्वनगरास । असुरे धरिला मानववेष । कृष्णवसनवेष्टित विशेष । दर्वी स्कंधी घेऊनिया ॥ १४ ॥ नृपासी भेटला येऊन । म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण । अन्न शाका सुवास करीन । देखोन सुर नर भूलती ॥ १५ ॥ राये ठेविला पाकसदनी । त्यावरी पितृतिथी लक्षुनी । गुरु वसिष्ठ घरालागुनी । नृपश्रेष्ठे आणिला ॥ १६ ॥ भोजना आला अब्जजनंदन । तो राक्षसे कापट्य स्मरून । शाकांत नरमांस शिजवून । ऋषीस आणून वाढिले ॥ १७ ॥ त्रिकाळज्ञानी वसिष्ठमुनी । सकळ ऋषींमाजी शिरोमणी । कापट्य सकळ जाणुनी । मित्रसह शापिला ॥ १८ ॥ म्हणे तू वनी होई राक्षस । जेथे आहार न मिळे निःशेष । मी ब्राह्मण मज नरमांस । वाढिले कैसे पापिया ॥ १९ ॥ राव म्हणे मी नेणे सर्वथा । बोलावा सूपशास्त्री जाणता । तव तो पळाला क्षण न लागता । गुप्तरूपे वना आपुल्या ॥ २० ॥ राव कोपला दारुण । मज शापिले काय कारण । मीही तुज शापीन म्हणोन । उदक करी घेतले ॥ २१ ॥ तव रायाची पट्टराणी । मदयंती नामे पुण्यखाणी । रूपे केवळ लावण्यहरिणी । चातुर्य उपमे जेवी शारदा ॥ २२ ॥ मदयंती म्हणे राया । दूरदृष्टी पाहे विचारूनिया । शिष्ये गुरूसी शापावया । अधिकार नाही सर्वथा ॥ २३ ॥ गुरूसी शाप देता निर्धारी । आपण नरक भोगावे कल्पवरी । राव म्हणे चतुर सुंदरी । बोललीस साच ते ॥ २४ ॥ म्हणे हे उदक खाली टाकू जरी । तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री । मग आपुल्याच प्रपदांवरी । जल टाकी मित्रसह ॥ २५ ॥ तो जानूपर्यंत चरण । दग्ध झाले कृष्णवर्ण । कुष्ठ भरला मग तेथून । कल्माषपाद नाम त्याचे ॥ २६ ॥ वसिष्ठे जाणोनि वृत्तान्त । रायासी उ:शाप देत । म्हणे द्वादशवर्षी होशील मुक्त । येसी स्वस्थाना आपुल्या ॥ २७ ॥ गुरू पावला अंतर्धान । मग कल्माषपाद राक्षस होऊन । क्षुधाक्रांत निशिदिन । वनी भक्षी जीव सर्व ॥ २८ ॥ परम भयानक असुर । विशाळ देह कपाळी शेंदुर । विक्राळ वदन बाहेर शुभ्र । दंतदाढा वाढलिया ॥ २९ ॥ जीव भक्षिले आसमास । वनी हिंडता तो राक्षस । एक ब्राह्मणकुमर डोळस । द्वादशवर्षी देखिला ॥ ३० ॥ सवे त्याची ललना चिमणी । दोघे क्रीडती कौतुके वनी । तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरूनी । भक्षावया सिद्ध झाला ॥ ३१ ॥ तव त्याची वधू काकुळती येत । अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत । गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य । माझा कांत मारू नको ॥ ३२ ॥ गडबडा लोळे सुंदरी । करुणा भाकी पदर पसरी । सवेचि जाऊनि चरण धरी । सोडी झडकरी पति माझा ॥ ३३ ॥ पतीस भक्षू नको राजेंद्रा । महत्पाप घेऊ नको एकसरा । स्वर्गमार्ग तरी चतुरा । कैसा पावसी अंतकाळी ॥ ३४ ॥ ऐसी करुणा भाकिता कामिनी । निर्दये भक्षिला तेच क्षणी । अस्थिपंजर टाकुनी । तियेपुढे दीधला ॥ ३५ ॥ तव ती दुःखेकरोनी । आक्रोशे कपाळ पिटी धरणी । मृत्तिका घेवोनि घाली वदनी । कोण वनी सावरी तीते ॥ ३६ ॥ मग तिने शाप दिधला रायाते । जो अलोट विधिहरिहरांते । म्हणे मदयंतीसंगसुरते । प्राण जाईल तेचि क्षणी ॥ ३७ ॥ कोणे एके स्त्रीचा संगसोहळा । तुज न घडो रे चांडाळा । ऐसा शाप वदोनि ते वेळा । केल्या गोळा अस्थी पतीच्या ॥ ३८ ॥ तत्काळ प्रवेशली अग्नी । इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनि । राव स्वनगरा येऊनी । वर्तमान सांगे स्त्रियेसी । ॥ ३९ ॥ येरी कपाळ पिटी आक्रोशेकरोन । म्हणे झाले वंशखंडन । पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून । प्राण आपुला रक्षी का ॥ ४० ॥ अनिवार अत्यंत मन । न करी कोणे स्त्रियेसी संभाषण । खदिरांगाराची सेज आजपासून । झाली तुजलागी जाण पा ॥ ४१ ॥ परम तळमळी राजेंद्र । जैसा सापळा कोंडिला व्याघ्र । की त महाभुजंगाचे दंत समग्र । पाडोनि गारुडी दीन करी ॥ ४२ ॥ की नासिकी वेसण घालून । महावृषभ करिती दीन । की बनी निरंकुश वारण । धरून क्षीण करिती मग ॥ ४३ ॥ तैसा कल्माषपाद भूप । होऊनि राहिला दीनरूप । पुढे प्रकाशावया कुळदीप । आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥ ४४ ॥ तेथींचे पाहोनि प्रमाण । वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन । अमोघ वीर्य पडता पूर्ण । दिव्य पुत्र जाहला ॥ ४५ ॥ तेणे पुढे वंश चालिला । असो तो राव मृगयेस निघाला । यथारण्य तथा गृह वाटे नृपाला । भोग त्यजिले सर्वही ॥ ४६ ॥ मनात मनोजविकार उठत । विवेकांकुशे कामइभ आवरीत । म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य । ते कर्म सहसा न करावे ॥ ४७ ॥ आपुली कर्मगति गहन । प्राक्तन विचित्र दारुण । देवावरी काय बोल ठेवून । भोगिल्यावीण न सुटेचि ॥ ४८ ॥ ऐसा राव उदासयुक्त । वनी हिंडता मागे पहात । तो पिशाच भयानक अत्यंत । रायापाठी उभे सदा ॥ ४९ ॥ दंपत्ये पूर्वी मारिली । ती ब्रह्महत्या पाठीसी लागली । राजा तीर्थे हिंडता सकळी । परी कदाकाळी न सोडी ॥ ५० ॥ न सोडी स्वप्नी जागृतीत । महाविक्राळ दात करकरा खात । राये व्रते केली त बहुत । दान देत बहुसाल ॥ ५१ ॥ ऐसा हिंडता राव भागला । मिथुलानगरासमीप आला । वनश्री देखता आनंदला । परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥ ५२ ॥ वृक्ष लागले बहुत । आम्रवृक्ष फळभारे डोलत । पोफळी रातांजन विराजित । केळी नारळी खर्जुरिया ॥ ५३ ॥ चंपक जाई जुई मालती । मोगरे पुन्नागराज शेवंती । मलयागर कृष्णागर जाती । जपा करवीर कोविदार ॥ ५४ ॥ वड पिंपळ औदुंबर । पारिजातक बकुल देवदार । कपित्थ बिल्व अंजिर । अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥ ५५ ॥ ऐसिया वनामाजी नृपती । क्षण एक पावला विश्रांती । परी ते पाठीसी पापमती । ब्रह्महत्या उभी असे ॥ ५६ ॥ तो उगवला भाग्यवासरमणी । की निधान जोडे रंकालागुनी । की क्षुधितापुढे उचंबळोनी । क्षीराब्धि जैसा पातला ॥ ५७ ॥ की मरतियाच्या मुखात । अकस्मात घातले अमृत । की चिंताग्रस्तासी प्राप्त । चिंतामणी जाहला ॥ ५८ ॥ तैसा तापसियांमाजी मुकुटमणी । शिष्यमांदी सवें घेऊनी । महाराज तपस्वी गौतममुनी । तये स्थानी पातला ॥ ५९ ॥ राये घातले लोटांगण । दाटला अष्टभावेकरून । उभा ठाकला कर जोडून । करी स्तवन प्रीतीने ॥ ६० ॥ सहज होता संतदर्शन । पापे संहारती संपूर्ण । तू विलोकिसी जरी कृपा करून । तरी रंक सहस्रनयन होय ॥ ६१ ॥ यावरी तो महाराज गौतम । कल्माषपादा पुसे कुशलक्षेम । राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम । सुखेकरून नांदती की ॥ ६२ ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । स्वधर्म आचरती की समग्र । पशु सेवक पुत्र कलत्र । समस्त सुखरूप आहेत की ॥ ६३ ॥ राव म्हणे आपुले कृपेकरून । समस्त आहेत क्षेमकल्याण । परंतु आलासी वाटते दुरून । आनंदघन दिसतोसी ॥ ६४ ॥ तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर । ब्रह्महत्या दूर होईल समग्र । मग पूर्वकर्म आपुले दुस्तर । ऋषीप्रती निवेदिले ॥ ६५ ॥ गौतम म्हणे परम पवित्र । भूकैलास गोकर्णक्षेत्र । तेथूनि मी आलो अपार । महिमा तेथींचा न वर्णवे ॥ ६६ ॥ ॐकाररूपे कैलासनाथ । भवानीसहित तेथे नांदत । सुर असुर किन्नर सेवीत । अर्धमात्रापीठ जे ॥ ६७ ॥ त्या गोकर्णींचे शिवदर्शन । ब्रह्मादिकां दुर्लभ जाण । तेथे इंदिरेसहित जनार्दन । तप गहन आचरत ॥ ६८ ॥ कोटिसूर्यांची प्रभा । मृडानीसहित शिव उभा । कैवल्यगर्भाचा पूर्ण गाभा । तेथींची शोभा ने वर्णवे ॥ ६९ ॥ इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र । तेथेचि वसती अहोरात्र । जेथींचे पाषाण तरुवर । समग्र निर्जर अवतरले ॥ ७० ॥ सत्यवतीहृदयरत्न । जेथे करी अनुष्ठान । वसिष्ठ भृगु जामदग्न्य । गोकर्णक्षेत्री सदा वसती ॥ ७१ ॥ पहावया मृडानीनायक । मंडपघसणी होतसे देख । नारद तुंबरु गायक । जेथे गाती शिवलीला ॥ ७२ ॥ गोकर्णाभोवते समग्र । उभे अखंड देवांचे भार । मुखे गर्जती शिव हर हर । आनंद थोर होतसे ॥ ७३ ॥ ऋषि करिती वेदघोष । अष्टनायिकांचे नृत्य विशेष । किन्नर गंधर्व गायक सुरस । तोषविती महेशाते ॥ ७४ ॥ ते अति उत्तम स्थान । तेजोमय प्रकाश गहन । नाना वृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ॥ ७५ ॥ शुभ्र सिंहासन लेखलखित । चारी द्वारे मणिमयखचित । ऐरावतारूढ अमरनाथ । पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥ ७६ ॥ दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन । पश्चिमेसी वारुणीरमण । उत्तरेसी वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ॥ ७७ ॥ कर्पूरगौर भवानीसहित । घवघवीत तेजे विराजित । भूकैलास साक्षात । माहेर संत-साधकांचे ॥ ७८ ॥ त्या मूर्तीचे करावे ध्यान । त्याभोवते महासिद्धीचे पूजन । त्याभोवते कात्यायनीआवरण । अष्टभैरव पूजिजे ॥ ७९ ॥ द्वादश मित्र एकादश रुद्र । तेथेचि वसती अहोरात्र । अष्टवसु दिक्पाळ समग्र । जोडोनि कर उभे तेथे ॥ ८० ॥ अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी । अखंड आराधिती पिनाकपाणी । रायासी म्हणे गौतममुनी । मीही वसतो सदा तेथे ॥ ८१ ॥ वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण । तप आचरला निर्वाण । गोकर्णी एक दिन । होय प्रसन्न सदाशिव ॥ ८२ ॥ अमावास्या संक्रांति सोमवार । प्रदोष पर्वकाळ शिववास । समुद्रस्नान करिता समग्र । फळ होय सकळ तीर्थांचे ॥ ८३ ॥ रावण कुंभकर्ण बिभीषण । याही पूर्वी केले लेथे अनुष्ठान । ते निर्वाणलिंग दशानने जाण । कैलासाहूनि आणिले ॥ ८४ ॥ गणेशे स्थापिले ते लिंग । ऋषी म्हणती सूताते कथा सांग । ऐकावया लीला सुरंग । श्रवण वाट पाहती ॥ ८५ ॥ यावरी सूत वक्ता निपुण । रावणमातेसी कैकसी अभिधान । ती नित्य लिंगपूजनाविण जाण । उदक प्राशन न करीच ॥ ८६ ॥ पंचधान्यांचे पिष्ट करून । लिंग करी कामना धरोन । व्हावे रावणाचे कल्याण । जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥ ८७ ॥ शक्रे तिचे लिंग नेऊन । समुद्री टाकिले द्वेषे करून । त्यालागी रात्रंदिन । रावणमाता अन्न न घे ॥ ८८ ॥ रावण म्हणे मातेलागून । मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन । कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपे ॥ ८९ ॥ तप आचरला दारुण । जो चतुःषष्टिकलाप्रवीण । जेणे वेदांची खंडे करून । सारासार निवडिले ॥ ९० ॥ चतुर्दशविद्यापारंगत । शिवासी आवडे अत्यंत । दशमुखे गायन अद्भुत । केले त्याणे स्वामीपुढे ॥ ९१ ॥ आपुले शिर छेदून स्वहस्ते । शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त । दशमुख गात प्रेमभरित । उमानाथ संतोषे जेणे ॥ ९२ ॥ राग उपराग भार्यांसहित । मूर्च्छना शरीर कंपित । सप्तस्वर ताल संगीत । शास्त्रप्रमाण गातसे ॥ ९३ ॥ गद्यपद्यरचना नाना कळा । गीत प्रबंध अखंड नाममाळा । गाता प्रीतीने शिवलीला । शंभु तोषला अद्भुत ॥ ९४ ॥ म्हणे प्रसन्न झालो दशमुखा । इच्छित माग तुज प्रिय जे का । दशकद्वयनयन म्हणे कामांतका । आत्मलिंग मज देई ॥ ९५ ॥ या त्रिभुवनात जे सुंदर । ऐसी ललना देई सुकुमार । ऐकून संतोषला कर्पूरगौर । भोळा उदार चक्रवर्ती ॥ ९६ ॥ कोटि चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण । ऐसे लिंग काढिले हृदयातून । की ब्रह्मानंदरस मुरोन । दिव्य लिंग ओतिलें ॥ ९७ ॥ सहस्र बालसूर्य न पावती सरी । ऐसी प्रभा पडली दशदिशांतरी । दिधले रावणाचे करी । जे अतर्क्य ब्रह्मादिका ॥ ९८ ॥ जे मुनिजनांचे ध्येय ध्यान । जे सनकादिकांचे देवतार्चन । वेद शास्त्र पुराण । दिव्य लिंग वर्णिती ॥ ९९ ॥ जे त्रिगुणातीत परब्रह्म । जे अज अजित अनाम । सच्चिदानंद निर्वाणधाम । योगी आराम पावती जेथे ॥ १०० ॥ अनंत ब्रह्मांडे विचित्रे । जेणे रचिली इच्छामात्रे । ज्याकारणे भांडती वेदशास्त्रे । ते दिव्य लिंग पुरातन ॥ १ ॥ ते लिंग रावणे हाती घेऊन । म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन । लावण्यसागरींचे निधान । त्रिभुवनसुंदर ललना दे ॥ २ ॥ जी अपर्णेची अपर प्रतिमा । ऐसी देई मज सर्वोत्तमा । सच्चिदानंद पूर्णब्रह्मा । नामाअनामातीत तू ॥ ३ ॥ शिव म्हणे इची प्रतिमा विशेष । निर्मू न शके विधीश । भोळा चक्रवर्ती महेश । म्हणे हेचि नेई अपर्णा तू ॥ ४ ॥ रावणे श्री अवश्य म्हणोनी । स्कंधी घेतली स्कंदजननी । दिव्यलिंग हाती घेऊनी । लंकानाथ चालिला ॥ ५ ॥ दक्षिणपंथे जाता सत्वर । गजबजिले सकळ सुरवर । गजानन स्कंद वीरभद्र । नंदिकेश्वर तळमळती ॥ ६ ॥ म्हणती हे सदाशिव त्रिनयन । हे कैसे तुझे उदारपण । भवानी बैसलासी देऊन । पंचवदन हासतसे ॥ ७ ॥ म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ । तो धावेल आता स्नेहभरित । इकडे भवानी स्तवन करीत । हे पद्मजतात धाव वेगी ॥ ८ ॥ वारिजनयना इंदिरावरा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा । हे नीलपयोधरगात्रा । धाव वेगी सोडवी मज ॥ ९ ॥ हे मधुकैटभनरकमुरभंजना । हे दशावतारधरा पीतवसना । हे मदनांतकमानसरंजना । हे जनार्दना जगद्गुरू ॥ ११० ॥ हे कोटिमनोजतात श्रीधर । असुरमर्दन परम उदार । ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर । विप्ररूपे आडवा आला ॥ ११ ॥ म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना । कोठे मिळविली ऐसी ललना । दशमुख म्हणे हे अपर्णा । सदाशिवे दीधली ॥ १२ ॥ विप्र म्हणे खाली उतरून । न्याहाळूनि पाहे इचे वदन । रावण पाहे तव ते कुलक्षण । अत्यंत कुरूप देखिली ॥ १३ ॥ भुवयास आंठी अमंगळ पूर्ण । वृद्ध गाल बैसले दंतहीन । गदगदा विप्र हासे देखून । टाकोनि रावण चालिला ॥ १४ ॥ मग रमाधवे तये स्थळी । स्थापिली माता भद्रकाळी । इकडे असुर शिवाजवळी । म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ॥ १५ ॥ शिव म्हणे सत्य वचन । ते तुज नाटोपे कौटाळीण । अनंत ब्रह्मांडे दावून । सवेचि लपवील तत्त्वता ॥ १६ ॥ मग श्रीधरे आंगीची मळी काढून । स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न । मयासुराचे उदरी जाण । उत्पन्न झाली तेच पै ॥ १७ ॥ तिच्या स्वरूपाची प्रति । नाही नाही त्रिजगती । आंगीच्या सुवासे धावती । काद्रवेयचक्रे प्रीतीने ॥ १८ ॥ तिचे नाम मंदोदरी । तिची प्रतिमा नाही उर्वीवरी । विंशतिनेत्राचे चत्वरी । पट्टमहिषी पतिव्रता ॥ १९ ॥ मयासुर करील कन्यादान । वरी एक शक्ति देईल आंदण । सप्तकोटी मंत्रांचे गहन । सामर्थ्य असे जियेमाजी ॥ १२० ॥ ते निर्वाणसांगातीण शक्ती । तुज प्राप्त होईल लंकापती । महाशत्रूवरी निर्वाणी ती । प्रेरावी त्वा सत्य पै ॥ २१ ॥ ऐसे ऐकताचि रावण । परतला लिंग घेऊन । पूर्वस्थळासी आला जाण । तो गजानन गाई राखी ॥ २२ ॥ गजाननाचे स्तवन । देव करिती कर जोडून । म्हणती दिव्य लिंग सोडवून । स्थापी अक्षयी गणपती ॥ २३ ॥ ऐसा देवी प्रार्थिला एकदंत । तव रावणासी मूत्र लागले बहुत । पुढे पाऊल न घालवत । चरफडीत मूत्रभरे ॥ २४ ॥ भूमीवरी लिंग न ठेवावे । ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे । हाती घेऊनि लघुशंकेस बैसावे । हेही कर्म अनुचित ॥ २५ ॥ तव तो सिद्धीबुद्धींचा दाता । विप्रवेषे गाई राखिता । त्यासी लंकानाथ म्हणे तत्त्वता । लिंग हाती धरी हे ॥ २६ ॥ विप्र म्हणे लंकापती । माझ्या गाई रानोरानी पळती । तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती । लागेल हे न कळे मज ॥ २७ ॥ रावण म्हणे न लगता क्षण । येतो मूत्रशंका करून । विप्र म्हणे तीन वेळा बाहीन । न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥ २८ ॥ अवश्य म्हणे लंकापती । लिंग देत विप्राच्या हाती । दूर जाऊन एकांतक्षिती । लघुशंकेस बैसला ॥ २९ ॥ अगाध गजमुखाचे चरित्र । जो साक्षात् अवतरला इंदिरावर । शिवउपासना करावया पवित्र । झाला पुत्र शंभूचा ॥ १३० ॥ असो रावणासी मूत्राचे पूर । लोटले न सांवरती अनिवार । एक घटिका लोटता इभवक्त्र । हाक फोडी गर्जोनी ॥ ३१ ॥ माझ्या गाई गेल्या दूरी । हे आपुले लिंग घेई करी । रावण न बोलेचि निर्धारी । हस्तसंकेते थांब म्हणे ॥ ३२ ॥ दुसरी घटिका झाली पूर्ण । हाक फोडी गजानन । एवं घटिका झाल्या तीन । कदापि रावण न उठेचि ॥ ३३ ॥ जैसे पाखंडियाचे कुमत । न सरेचि वारिता पंडित । तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य । पुनः एकदंत हाक फोडी ॥ ३४ ॥ राक्षसा आपुले लिंग सांभाळी । म्हणोनि ठेविले भूमंडळी । अक्षय स्थापिले कदाकाळी । ब्रह्मादिका उपटेना ॥ ३५ ॥ पृथ्वीसहित अभंग । एकचि झाले दिव्य लिंग । रावण धावे सवेग । अशौच अपवित्र क्रोधभरे ॥ ३६ ॥ लिंग उपटता डळमळी कुंभिनी । महाबळे दशमुख पाहे उपटोनी । परी न उपटे तयालागुनी । अखंड अभंग जाहले ॥ ३७ ॥ गुप्त जाहला गजानन । गाई पृथ्वीत जाती लपोन । रावणे एक गाईचा कर्ण । धांवोनिया धरियेला ॥ ३८ ॥ तोही न उपटे तयालागून । मग तेथेच केले लिंगपूजन । गोकर्ण-महाबळेश्वर तेथून । नाम जाण पडियेले ॥ ३९ ॥ रावणमाता तेथे येऊन । ते नित्य करी शिवपूजन । आदिलिंग हे जाणोन । करिती अर्चन सुरऋषी ॥ १४० ॥ रावण कुंभकर्ण बिभीषण । तेथेच करिती अनुष्ठान । त्याच्या बळेकरून । देव जिंकले रावणे ॥ ४१ ॥ मयासुर मंदोदरी आणि शक्ती । देता झाला रावणाप्रती । लक्ष पुत्र नातू गणती । सवा लक्ष जयाचे ॥ ४२ ॥ इंद्रजिताऐसा पुत्र । अष्टादशाक्षौहिणी सेनाभार । जेथीच्या अनुष्ठाने अपार । रावण पावला संपत्ती ॥ ४३ ॥ गौतम म्हणे राजोत्तमा । ऐसा गोकर्णीचा थोर महिमा । वर्णू न शके मघवा ब्रह्मा । येणे आम्हा तेथूनि जाहले ॥ ४४ ॥ मिथुलेश्वराच्या यागाकारणे । आम्ही येत असता त्वरेने । अद्भुत एक वर्तले तुजकारणे । कथा तेचि सांगतो ॥ ४५ ॥ एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखाली आम्ही बैसलो सकळ । तो एक चांडाळीण अमंगळ । अति अपवित्र देखिली ॥ ४६ ॥ सर्वरोगवेष्टित पूर्ण । जन्मांध गलितकुष्ठ भरले जाण । किडे पडले सर्वांगी व्रण । दुर्गंधी उठली चहूकडे ॥ ४७ ॥ रक्तपिती भरोन । हस्तपाद बोटे गेली झडोन । परम कुश्चित कुलक्षण । कैचे अन्न उदक तियेते ॥ ४८ ॥ दंतहीन कर्णहीन । गर्भाच तियेचे गेले लोचन । कर्ण नासिक झडोन । किडे पडले बुचबुचित ॥ ४९ ॥ अंगींचे चर्म गेले झडोन । वस्त्र पडले गळोन । धुळीत लोळे चांडाळीण । पाप पूर्वीचे भोगीत ॥ १५० ॥ तिचा मरणकाळ जवळी आला जाण । वरते पाहिले आम्ही विलोकून । तो शिवे धाडिले दिव्य विमान । तियेलागी न्यावया ॥ ५१ ॥ दशभुज पंचवदन । शिवदूत बैसले चौघेजण । कोटिसूर्यतेज विराजमान । प्रभा शशीसमान एकाची ॥ ५२ ॥ कोणी अग्नितेजे विराजत । भालचंद्र शोभिवंत । दिव्य विमान लखलखीत । वाद्ये वाजती चतुर्विध ॥ ५३ ॥ अष्टनायिका नृत्य करिती । किन्नर से गंधर्व शिवलीला गाती । गौतम म्हणे ऐक नृपती । मग तयाप्रती पूसिले ॥ ५४ ॥ हे दिव्य विमान घेऊन । कोणाचे करू जाता उद्धरण । ते म्हणती तिया चांडाळिणीलागून । शिवे आणू पाठविले निजपदा ॥ ५५ ॥ मग म्या तयांसी पुसिले । इणे पूर्वी काय तप केले । मग ते शिवदूत बोलिले । पूर्वजन्मीचा वृत्तांत ॥ ५६ ॥ पूर्वी केकयनामा ब्राह्मण । त्याची कन्या सुमित्रा जाण । आपुल्या सौंदर्य गर्वेकरून कोणासही मानीना ॥ ५७ ॥ ही बाळपणी विधवा झाली । तारुण्यमदे स्वधर्म विसरली । जारकर्म करू लागली । बापे शिकविल्या नायके ॥ ५८ ॥ तो हे जाहली गरोदर । लोक निंदा करिती समग्र । मग बापे केश धरूनि सत्वर । बाहेर घातले इयेसी ॥ ५९ ॥ मग ही हिंडता देशांतर । कोणीएक सभाग्य शूद्र । त्याणे इते स्त्री करूनि सत्वर । समग्र द्रव्य ओपिले ॥ ६० ॥ तेथे अपत्ये झाली बहुत । ही अत्यंत मद्यमांसी रत । पुष्ट जाहली बहुत । घूर्णित लोचन उघडीना ॥ ६१ ॥ शूद्र घेवोनि दासीदास । गेला क्षेत्री कृषिकर्मास । हे क्षुधित आठवूनि मांसास । शस्त्र घेवोनि चालिली ॥ ६२ ॥ मद्ये माजली नुघडी लोचन । हा बस्तचि आहे म्हणोन । गोवत्साचे कंठी जाण । पापिणी सुरी घालीतसे ॥ ६३ ॥ ते अट्टाहासे ओरडत । गाई त हंबरोनि अनर्थ करीत । इणे कंठ छेदोनि गृहात । वत्स नेले त्वरेने ॥ ६४ ॥ डोळे उघडूनि पाहे पापिणी । मग गोवत्स ओळखिले ते क्षणी । तेव्हा तिणे शिव अ शिव उच्चारूनी । म्हणे करणी न कळता केली ॥ ६५ ॥ मग अर्ध वत्समांस भक्षून । उरले टाकी बाहेर नेऊन । लोकांत उठविले पूर्ण । गोवत्स मारिले व्याघ्राने ॥ ६६ ॥ त्यावरी ही काळे मृत्यु पावत । तो येऊनिया यमदूत । इयेस नेले मारीत । बहुत जाचिती निर्दयपणे ॥ ६७ ॥ कुंभीपाकी घालिती । असिपत्रवनी हिंडविती । तप्तभूमीवरी लोळविती । स्तंभ कवटाळविती तप्त जे-का ॥ ६८ ॥ चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन । इचे काही आहे की नाही पुण्य । ते म्हणती शिवनाम उच्चारून । गोवत्सवध इणे केला ॥ ६९ ॥ मग यमे दिधले लोटून । चांडाळयोनीत पावली जनन । गर्भांध कुश्चळ कुलक्षण । विष्ठामूत्रे भरली सदा ॥ १७० ॥ श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण । तव मायबापे गेली मरोन । मग ही हाती काठी घेऊन । गांवोगांवी हिंडतसे ॥ ७१ ॥ तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून । गोकर्णक्षेत्राप्रती संपूर्ण । यात्रा चालली घोष गहन । नानाविध वाद्यांचा होतसे ॥ ७२ ॥ शिवनामाचा घोष अपार । शिवभक्त करिती वारंवार । त्यांच्यासंगे ही दुराचार । चांडाळीही चालिली ॥ ७३ ॥ गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी । पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी । म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी । बहुत पापिणी मी आहे ॥ ७४ ॥ हाका फोडीत हात पसरून । तो ध्या प्रदक्षिणा करिती भक्तजन । एके बिल्वपत्र नेऊन । तिचे हाती घातले ॥ ७५ ॥ ते त्रिदळ चांचपोन पाहत । मुखी घालावयाची नाही वस्त । म्हणोनि रागे भिरकावीत । ते पडत शिवलिंगावरी ॥ ७६ ॥ शिवरात्रीस उपोषण । बिल्वदळे घडले शिवपूजन । शिवभक्तांसवे जागरण । घडले संपूर्ण चांडाळीस ॥ ७७ ॥ शिवनामे गर्जती जन । हेही करीत तसेचि स्मरण । ती ही वडाखाली येऊन । पडली आहे चांडाळी ॥ ७८ ॥ ऐसा तिचा पूर्ववृत्तांत । शिवगणी सांगितला समस्त । मग ती दिव्य देह पावोनि बैसत । शिवविमानी तेधवा ॥ ७९ ॥ आपुले पूर्वकर्म आठवून । करू लागली शिवस्मरण । मग शिवगणी नेऊन । शिवपदी स्थापिली ॥ १८० ॥ गौतम म्हणे ऐक राया सादर । तू गोकर्णाप्रती जाई सत्वर । शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर । त्रिदळेकरूनि अर्ची का ॥ ८१ ॥ ऐसे बोलोनि गौतममुनी । गेला जनकाच्या यागालागुनी । कल्माषपाद तेच क्षणी । गोकर्णक्षेत्री पातला ॥ ८२ ॥ शिवरात्रीस दिव्य लिंग । मित्रसहराये पूजिले सांग । अंतरी सप्रेम अनुराग । उमारंग संतोषला ॥ ८३ ॥ ब्रह्महत्येचे पातक विशेष । जाऊनि राव झाला निर्दोष । तो कैलासाहूनि आदिपुरुष । पाठवीत दिव्य विमान ॥ ८४ ॥ विमानी बैसले शिवगण । परम तेजस्वी देदीप्यमान । अनंत विजांचे रस पिळोन । मूर्ति ओतिल्या वाटते ॥ ८५ ॥ अनंत वाद्ये गर्जती एक वेळा । तेणे रंगसुरंग दाटला । दिव्य सुमनांच्या माळा । वर्षती वरून वृंदारक ॥ ८६ ॥ मित्रसह दिव्य देह पावोन । झाला दशभुज पंचानन । इंदचंद्रादिपदे ओलांडून । नेला मिरवत शिवपदा ॥ ८७ ॥ सरूपता मुक्ति पावोन । शिवरूपी मिळाला आनंदघन । धन्य शिवरात्रिव्रत पावन । धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥ ८८ ॥ गौतमऋषि परम धन्य । तेणे इतिहास सांगितला पावन । धन्य श्रोते तुम्ही सज्जन । श्रवणी सादर बैसला ॥ ८९ ॥ मानससरोवरवेष्टित । मराळ जैसे विराजित । की निधानाभोवते समस्त । साधक जैसे बैसती ॥ १९० ॥ तरी पंडित तुम्ही चतुर । तुमचे अवधान दिव्यालंकार । देवोनि गौरवा श्रीधर । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ ९१ ॥ श्रीमद्भीमातटविलासा । ब्रह्मानंदा आदिपुरुषा । श्रीधरवरदा कैलासविलासा । कथारस वदवी पुढे ॥ ९२ ॥ श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सजन अखंड । तृतीयाध्याय गोड हा ॥ १९३ ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
कल्माषपाद कथा, गोकर्ण-माहात्म्य, चाण्डाल स्त्रीचा उद्धार
श्रीगणेशाय नमः ! हे मंगलधामा शिवा, तुझा जय असो. तू स्वत:च्या भक्तांच्या हृदयाला आनंद देतोस. तू असा वृक्ष आहेस की ज्याला चराचर जग हेच फळ आले आहे. तू नामापलीकडे तसेच अनाम ह्या लक्षणापलीकडे आहेस. लक्ष्मीपती विष्णूची भगिनी हीच पार्वती, तिच्या मनाला तू आनंद देतोस. षडाननाचा तू पिता आहेस व मीनध्वज जो मदन त्याला दग्ध करणाराही आहेस. तूच ब्रह्मानंद आहेस. तुझ्या भालप्रदेशी तिसरा नेत्र आहे. संसाराचे भय तू नष्ट करतोस. त्रिपुरासुराचा तूच अंत केलास. हे शिवा, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान, ईश्वर, अशी तुझी नामे आहेत, तू अर्धनर व अर्धनारी या प्रकारे नटून सृष्टीत सर्वत्र राहतोस. गिरिजा जी पार्वती तिचे मन तुझ्या ठिकाणी रमते. तू कैलास गिरीचा ईश्वर आहेस. तू शीर्षी गंगा धारण करतोस, नागरूपी भूषण तू घालतोस, तू सर्वव्यापीच आहेस. मन मोहित करून आंधळे करणाऱ्या मदनाचा तू पराभव केलास. तू अत्यंत अतीत म्हणजे सर्वापलीकडचा असून मलरहित अर्थात निरंजन आहेस. सत्त्व, रजस् व तमस् हे तिन्ही गुण तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. तू दुधाच्या फेसाप्रमाणे धवल आहेस व जगाला जीवन देणारा तू आहेस. द्वितीय अध्यायात तू मजकडून शिवरात्रीचा महिमा वर्णन करविलास. आता मी कथेची रचना कशी करू ? हे पंचमुकुटा व पंचवदना, तू मला प्रेरणा दे, कृपा कर. +
सूत नैमिषारण्यात शौनक इत्यादी मुनींना कथा सांगत होता, ती कथा आता शिवकृपेने मी वर्णन करतो.
मित्रसह कल्माषपाद झाला इक्ष्वाकूंच्या कुळात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो भूलोकीचा जणू इंद्रच असा शोभत होता. त्याला वेद व शास्त्रे यांचे ज्ञान होते. तो मोठा तेजस्वी होता. आपल्या विशाल सैन्यरूपी वस्त्राने त्याने पृथ्वीला आवरणच घातले होते. तो प्रतापरूपी सूर्य होता त्यामुळे शत्रुरूपी नक्षत्रे दिसेनाशी झाली होती. एकदा तो शिकारीसाठी मोठे सैन्य घेऊन घोर अरण्यात शिरला. सैन्याच्या गडबडीमुळे श्वापदे आपल्या जागा सोडून इतस्तत: पळू लागली. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरीण, हरिणी, वनगाई, वानर, ससे, कोल्हे, असे कितीतरी पशू धावत सुटले. चातक, बदके, मोर, कस्तुरीमृग, रानमांजरे, मुंगसे, हंस, चक्रवाक असे पशुपक्षी कोलाहल करीत धावले व उडू लागले. राजाने कित्येक प्राण्यांची शिकार केली. त्यात त्याने एक राक्षसही मारला. तो महाभयंकर राक्षस गतप्राण होऊन पडला तेव्हा त्याच्या भावाने दुरून ते पाहिले आणि त्याने निर्धार केला, 'मी याचा सूड घेईन. कपटाने या राजाचा घात करीन.' राजा मृगया करून सैन्यासह नगरास परत गेला. इकडे बंधूच्या मृत्यूने शोकाकुल अशा त्या राक्षसाने मायेने मानवरूप धारण केले. त्याने आचाऱ्याप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारी पळी, झारे वगैरे सामुग्री घेतली व मलिन वस्त्र धारण केली. आता तो कामाच्या शोधात असलेला खरोखरीचा आचारी दिसत होता. त्याने नगरात जाऊन प्रयत्न करून राजाची भेट मिळविली. आपल्या पाककलेची त्याने स्वत:च प्रशंसा केली. त्याच्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला सेवेत घेतले. चांगले पदार्थ बनवून त्याने राजाचे मन प्रसन्न करून घेतले. काही दिवसांनी श्राद्धाची तिथी जवळ आली. राजाने आपले राजपुरोहित वसिष्ठ यांना आदराने त्या दिवशी प्रासादात बोलाविले. ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ हे श्राद्धाच्या भोजनासाठी आले. त्यावेळी राक्षसाने गुप्तपणे नरमांस आणले होते ते भाजीत मिसळून पात्रात वाढले. वसिष्ठ अंतर्ज्ञानी होते. त्यांनी नरमांस ओळखले व राजाने आचाऱ्याच्या रूपात राक्षसच नेमला कसा आणि एवढे कृत्य करण्यास वाव दिला कसा, याचे त्यांना वैषम्य वाटले. त्यांनी राजाला शाप दिला, ''मित्रसह राजा ! तू मज ब्राह्मणाला नरमांस कसे काय खाऊ घातलेस ? जा, अरण्यात राक्षस होऊन रहा. तिथे तुला काहीही खायला मिळणार नाही !'' राजा म्हणाला, "यात माझा काही दोष नाही, आचाऱ्याने काहीतरी कपट केले असणार ! मी त्याला बोलावतो." त्याने स्वयंपाक्याला बोलावले तेव्हा तो पळून गेला आहे असे त्याला कळले. हा आपला दोष नसून रागाच्या भरात वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला याचाच राजाला संताप आला. त्याने वसिष्ठांना उलट शाप देण्यासाठी जल घेतले ! त्यावेळी त्या मित्रसह राजाची पत्नी मदयन्ती नावाची, तेथे होती. ती पतिव्रता, ज्ञानी व चतुर होती. तिने राजाला अडविले. 'नाथ ! थांबा, जरा विचार करा, गुरूला शाप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही. तुम्ही शाप दिलात तर तुम्हाला एक कल्पपर्यंत नरकात खितपत पडावे लागेल !" राजा थांबला. हातातले जल तसेच राहिले. तो म्हणाला, "तू हे सत्य बोललीस. मला वाचविलेस. आता हे शापजल कोठे टाकू ? भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल आणि धान्यही उपजणार नाही. मी हे माझ्याच पावलांवर टाकतो." असे म्हणून राजाने ते पाणी आपल्या पावलांवर टाकले. त्यावेळी त्याचे दोन्ही पाय गडघ्यापर्यंत काळे पडले. त्या पायांवर कोडही उठले ! राजाला त्यामुळे पुढे कल्माषपाद असे नाव पडले. वसिष्ठांना सर्व खरा प्रकार लक्षात आला. त्यांनी राजाला उ:शाप दिला. "तू बारा वर्षांनी राक्षसयोनीतून मुक्त होऊन परत राजा होशील !" वसिष्ठ तेथून निघून गेले. राजाचे रूप पालटले. तो भयानक राक्षस झाला. त्याचे पाय जळून काळे पडलेले होते. तो घोर रानात गेला. रात्रंदिवस तो भुकेने व्याकुळ असे. तो पशू व पक्षी मारून खात असे पण त्याची भूक भागत नसे. त्याचा देह अजस्त्र होता. तोंड पसरट, दात बाहेर वाढलेले, केस अस्ताव्यस्त, कपाळावर शेंदूर माखलेला, डोळे भयानक ! तो अशा प्रकारे घोर रानात वावरत असता काही वर्षे लोटली. एकदा त्याला त्या अरण्यातून एक तरुण ब्राह्मणपुत्र आपल्या सुकुमार पत्नीसह जात असता दिसला. राजा पाहात असता ते दांपत्य थांबले. परस्परांवरील प्रेमाने तो तरुण व त्याची पत्नी मीलनोत्स्तुक झाली होती. तोच राजा राक्षसरूपात त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने त्या तरुणाला भक्षण करण्यासाठी पकडले. त्यावेळी त्या तरुणाची पत्नी म्हणाली, "अरे राक्षसा, तू मूळचा राजा, आता शापाने कल्माषपाद राक्षस झालास. तू आणखी हे ब्रह्महत्येचे घोर पातक करू नको." पण राजाने तिचे काहीही न ऐकता, तो तरुण ओरडत असताही त्याला ठार मारले व मांस खाऊन हाडे तेथेच टाकली ! तेव्हा ती स्त्री दुःखाने आक्रोश करू लागली. कपाळ जमिनीवर आपटून तोंडात माती घालून रडू लागली. तिने शोक व संताप यांनी व्याकुळ होऊन कल्माषपादाला शाप दिला, "तू शापमुक्त झालास तरी सुद्धा तुझी पत्नी मदयंती हिचा संग तू करू शकणार नाहीस. तसे करायला जाशील तर तत्काळ मरून पडशील. तू माझा व माझ्या पतीचा संग होण्याप्रसंगी त्याला भक्षण केलेस ना ! तुला कोणत्याही स्त्रीशी संग ठेवता येणार नाही !" असा शाप देऊन तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि तिथेच अग्नी प्रदीप्त करून त्या अस्थींसह तिने स्वत:ला जाळून घेतले ! राजा स्तंभित झाला ! आणखी एक शाप त्याच्या माथी बसला ! कालांतराने बारा वर्षे पूर्ण झाली. राक्षसदेह जाऊन राजाला स्वत:चे रूप पुन्हा प्राप्त झाले. तो नगरात आला. मदयंतीला त्याने शापाचा वृत्तांत सांगितला. त्यामुळे तिला फार वाईट वाटले. ती म्हणाली, "हाय रे देवा ! आपला निर्वंशच झाला ! काय हे दुर्दैव !" राजाला ती म्हणाली, "नाथ ! आता यापुढे ब्रह्मचर्य पालन करून जीव जगवा. मन हे फार अनावर असते ! तुम्ही कोणत्याही स्त्रीशी संभाषण सुद्धा करू नका ! आजपासून अग्नीवर निजल्याप्रमाणे खडतर व्रत धरावे लागेल !" राजाला बारा वर्षांनी आपली प्रिय पत्नी मदयंती हिचा सहवास लाभणार होता, तो त्या स्त्रीच्या शापाने त्याच्या संसारसुखाची होळी झाली. तो तळमळत होता. वाघाला सापळ्यात पकडावे तसे त्याला झाले होते. नागाचे दात पाडून गारुड्याने त्याला दीन करून टाकावे तसा राजा दीन झाला होता. मदोन्मत्त बैल किंवा हत्ती, वेसण किंवा अंकुश यांनी बद्ध करावा तसा राजा झाला होता. आपला वंश कसा वाढेल याचा तो विचार करू लागला. गुरूकडून नियोगपद्धतीने आपल्या पत्नीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करण्यास संकटकाळी धर्माने अपवाद म्हणून मुभा ठेवलेली आहे, असे त्याला समजले. तेव्हा वसिष्ठांनाच त्याने विनंती करून मदयंतीला पुत्रसंतानाची प्राप्ती केली. स्वतः राजा अरण्यात गेला. त्याने महत्प्रयासाने आपले मन ताब्यात ठेवले. ज्यामुळे आपण मरण पावू व आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य करायचेच नाही असा निर्धार त्याने केला होता. "आपली कर्मगती गहन आहे. भोक्तृत्व भोगल्याशिवाय संपणार नाही ! देवाला दोष देण्यात काय अर्थ," असा विचार करून तो अत्यंत उदास होऊन रानात हिंडत होता. तेव्हा आपल्या पाठीशी भयानक पिशाच सतत उभे आहे असे त्याला दिसून आले. त्याने जो ब्राह्मण पूर्वी मारला होता आणि त्याच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले होते, ती ब्रह्महत्या पिशाचरूपाने त्याच्या मागे लागली होती. तो जागा असो, झोपलेला असो, त्याचा पिच्छा ती सोडीना ! कटकटा दात खात ती त्याला भेडसावीत होती. त्या राजाने अनेक दाने, व्रते, तीर्थे यांचे उपाय केले परंतु काही उपयोग झाला नाही. राजा हिंडता हिंडता मिथिला नगरीजवळ आला. नगरीच्या आसमंतात रम्य वनश्री होती. तेथे अगणित तर्हेतर्हेचे वृक्ष होते. ते पाहता पाहता राजाच्या मनाला आनंद झाला. त्याने तेथे थोडी विश्रांती घेतली पण ब्रह्महत्या त्याच्या मनाला छळीतच होती. परंतु त्या वनात गौतम मुनी आले आणि राजाची दुर्दैवाची रात्र संपून जणू भाग्यरूपी सूर्य उगवला. मरणोन्मुख माणसाला अमृत मिळावे, भुकेलेल्या माणसाला दुधाचा समुद्र मिळावा, चिंताग्रस्ताला चिंतामणी मिळावा, गरिबाला गुप्त धन सापडावे, तसे राजाचे भाग्य उजळले. गौतम मनी हे शिष्यांसह तेथे आले. राजाने त्यांच्यापुढे लोटांगण घातले. त्याचे हृदय भक्तीने व आर्ततेने भरून आले. तो मुनींची स्तुती करू लागला. "हे मुनिश्रेष्ठा ! संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापे नष्ट होतात. तुम्ही जर कृपादृष्टीने मजकडे पाहाल तर दरिद्री माणूस इंद्रही होईल ! कृपा करा ! मला माझ्या आपत्तीतून सोडवा !" मुनींनी राजाला त्याचे कुशल विचारले. "तुझे राज्य कसे आहे ? राष्ट्रातील मंत्री व प्रधान कसे आहेत ? प्रजा सुखी आहे ना ? चारी वर्णांचे लोक स्वधर्माचे आचरण करीत आहेत ना ? पशू, सेवक, कलत्र व पुत्र कुशल आहेत ना ?" राजा म्हणाला, "मुनिराज ! आपल्या कृपेने सर्व क्षेम आहेत. आपण फार दुरून आलेले दिसता. आपल्या ठिकाणी आनंद भरून राहिला आहे ! आपल्या दर्शनाने माझे ब्रह्महत्यारूपी पाप दूर होईल अशी आशा मला वाटू लागली आहे !" ऋषींनी सर्व वृत्तांत राजाला विचारला. तेव्हा राजाने आपले पूर्वकर्म मुनींना सांगितले. गोकर्ण माहात्म्य गौतम ऋषी म्हणाले, "मी गोकर्ण क्षेत्रातुन इथे आलो. ते क्षेत्र फार पवित्र असे शंकराचे स्थान आहे. पृथ्वीवरील दुसरे कैलासच आहे ते. त्याचा महिमा पूर्ण वर्णन करता येत नाही. कैलासनाथ तेथे ॐकाररूपाने भवानीसह विराजमान आहेत. त्या अर्धमात्रारूप पीठाची देव व किन्नर नित्य सेवा करीत असतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. लक्ष्मीसह विष्णू तेथे तप करीत असतो. मृडानीसहित शिव तेथे आहे. तेथील शोभा कोटी सूर्यांप्रमाणे आहे. तो कैवल्याचा गर्भच आहे. इंद्रासह सनकादिक तेथे नित्य असतात. देव तेथे पाषाणांची रूप घेऊन राहतात. व्यास तेथे अनुष्ठान करतात. वसिष्ठ, भृगु व जामदग्न्य (परशुराम) तेथे असतात. नारद व तुंबरू तेथे गायन करीत असतात. देवांची तेथे शिवदर्शनासाठी गर्दी होते. ते देव "शिव हर ! शिव हर !" असा नामाचा गजर करीत असतात. ऋषी वेदघोष करतात, अष्टनायिका नृत्य करतात, गंधर्व गायनाने महेशाला तोषवीत असतात. ते स्थानच अति उत्तम आहे, तेजोमय आहे, गूढरम्य आहे, वृक्षराजींनी सुशोभित केलेले आहे. शुभ्र लखलखीत असे सिंहासन तेथे आहे. मंदिराची चारी द्वारे रत्नखचित आहेत. पूर्वद्वारी इंद्र ऐरावतावर आरूढ झालेला असा आहे. दक्षिण द्वारी यम, पश्चिमेस वरुण व उत्तरेच्या द्वारावर कुबेर उभा आहे. तो तर शंकराचा परम मित्र आहे. कर्पूरगौर शिव तेथे भवानीसहित विराजत आहे. संतसाधकांचे ते स्थान म्हणजे माहेरच आहे. त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्याच्या भोवती महासिद्धींचे पूजन करावे, त्यांच्या भोवती आवरण -देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी. बारा आदित्य, अकरा रुद्र, अष्ट वसू व सर्व दिक्पाल तेथे नित्य हात जोडून उभे असतात. आठही सिद्धी व नवविधी तेथे पिनाकपाणि शंकराला वंदन करून आराधना करीत असतात. मीही बहधा तेथेच राहतो. इतर क्षेत्रांत लाखो वर्षे तप केले व गोकर्ण क्षेत्रात एक दिवस तप केले तर योग्यता सारखीच. अमावास्या, सोमवार, पर्वकाळ, प्रदोष या समयी तेथे स्नान केले तर सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लागते. पूर्वी रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी शिवाची आराधना केली. रावणाने कैलासाहून जे निर्वाणलिंग आणले तेच इथे आहे. त्या शिवलिंगाची स्थापना गणपतीने केली आहे." गौतम मुनी असे मित्रसह राजाला सांगत होते, असे श्रोत्यांना सूत म्हणाला तेव्हा श्रोत्यांनी त्याला विनंती केली, "महाराज ! गोकर्ण क्षेत्रात शिवलिंगाची स्थापना केव्हा कोणी केली ? ती कथा आधी सांगावी. मित्रसह राजाची कथा त्यानंतर सांगावी." तेव्हा सूत गोष्ट सांगू लागला. गोकर्ण-लिंगाची स्थापना रावणाची माता केकसी ही शंकराची भक्त होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा करी व मगच उदक प्राशन करी. अर्थात् ती मोठी व्रती होती. पंचधान्याचे पीठ करून ती शिवलिंग तयार करी. रावणाचे कल्याण व्हावे ही कामना मनात धरून, त्याच्या जयाची इच्छा करून ती पूजा करीत असे. इंद्राने रावणाचा उत्कर्ष होऊ नये या हेतूने ते शिवलिंग कपटाने समुद्रात फेकून दिले त्यामुळे केकसी निराश झाली. ती अन्नपाणी घेईना. रावण मातृभक्त होता. तो तिला म्हणाला, "कैलासावर जाऊन प्रत्यक्ष शंकराकडून मी आत्मस्वरूप लिंग प्राप्त करून ते तुला पूजेसाठी आणून देतो." त्याप्रमाणे रावण कैलासावर गेला. तेथे त्याने दीर्घ तप केले. त्याने वेदांचे सार -ज्ञान मिळविले. चौसष्ट कला प्राप्त केल्या व त्यांनी शिवाची आराधना केली. अत्यंत अद्भुत असे गायन करून त्याने शंकराला संतुष्ट केले. स्वत:च्या हातांनी त्याने आपले मस्तक तोडले. शिरा काढून त्यांच्या तारा बनविल्या. वाद्याला त्या तारा लावून छेडल्या. सुस्वर गायन केले. राग, रागिण्या, उपराग गायिले. मूर्छना, कंपन, आदियुक्त सप्त-स्वर-तालाने बद्ध असे स्वर्गीय संगीत गायिले. गद्य पद्य रचना, स्तोत्रे, रचून नाना प्रकारे म्हटली. शंकराचे नाम अखंड घेतले. त्याच्या उत्कट भावनेने व तपाने शिव संतुष्ट झाला; प्रसन्न झाला. रावणाला दर्शन देऊन म्हणाला, "रावणा, मी प्रसन्न झालो आहे. तू कोणती इच्छा धरून तप केलेस ? तुला काय हवे ते माग." रावण म्हणाला, "आत्मरूपी लिंग मला द्यावे. आणि मला त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी स्त्री द्यावी." तो भोळा उदार शंकर, तो कर्पूरगौर शिव ! त्याने आपल्या हृदयातून अत्यंत तेजस्वी असे दिव्य लिंग काढून ते रावणाला दिले ! सहस्र बालरवींसारखे ते तेजस्वी लिंग देवांनाही दुर्लभ होते. ते मुनिजनांचे ध्येयनिधान ! सनकादिकांचे परम दैवत ! वेद, शास्त्रे व पुराणे त्याची महती वर्णन करतात ! ते त्रिगुणातीत परब्रह्मच दिव्य आकार धारण केलेले होते ! ते अज, अजित, अनाम, आत्मरूप, सच्चिदानंदरूप, निर्वाणाचेही निजधाम, योग्यांचे विश्रामस्थान ! ज्या शिवाने अनंत विचित्र अशी ब्रह्मांडे रचली व संहारिली त्याने हे निजरूपच रावणाच्या हाती दिले ! रावणाने त्या लिंगाचा स्वीकार केला. शिवाला वंदन करून तो म्हणाला, "त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी ललना मला द्यावी ! अपर्णेचीच जणू दुसरी प्रतिमा अशी स्त्री मला दे ! तू सच्चिदानंद, पूर्णब्रह्म आहेस ! नाम व नामरहित यापलीकडे आहेस !" शंकर म्हणाला, "अपर्णेसारखी सुंदर स्त्री विधात्यालाही दुसरी निर्माण करता येणार नाही. तेव्हा तू हिलाच घेऊन जा." रावणाला आनंद झाला ! भोळा शंकर भक्ताला आपली पत्नीही देण्यास तयार झाला ! रावणाने पार्वतीला खांद्यावर घेतले. शंभूची लीला अतर्क्य आहे हे जाणून पार्वती कौतुकाने, रावणाबरोबर जाण्यास तयार झाली. रावणाने हातात आत्मरूप शिवलिंग घेतले व तो पार्वतीला घेऊन निघाला, तो दक्षिणेस चालला ! " त्यावेळी सर्व देव गडबडून गेले. वीरभद्र, गणेश, षडानन, नंदी, हळहळू लागले. ते शंकराला म्हणू लागले, "हे त्रिनयना ! हे कसले तुमचे औदार्य ! प्रत्यक्ष भवानी भक्ताला देऊन टाकलीत !" शंकर हसून म्हणाला, "काही चिंता करू नका. वैकुंठीचा राणा तिचा भाऊ आहे, तो तिचा कैवार घेण्यासाठी धावत येईल पहा !" गणेशादिक मूक राहिले ! रावणाच्या खांद्यावर बसून पार्वती मनोमन विष्णूचा धावा करू लागली. "हे कमलज - तात ! लवकर धाव ! हे इंदिरावरा, हे कमलनयना, निगम व आगम यांना वंदनीय अशा विष्णो ! हे सुहास्यवदना ! नीलमेघासारखी कांती असलेल्या, पीतांबरधारी नारायणा ! मला सोडव. तू मधु, कैटभ, नरक व मुर राक्षसांचा वध केलास ! तू भक्तरक्षणासाठी दहा अवतार धारण केलेस ! मदनांतक जे माझे पती, त्यांच्या मनाला तू आनंद देतोस ! हे जनार्दना, हे जगदगुरो ! हे प्रद्युम्नतात ! श्रीधरा ! असुरमर्दना ! परम उदारा ! धाव, वेगाने धाव व मला सोडव !" पार्वतीची हाक विष्णूने ऐकली. त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो रावणाच्या मार्गात येऊन उभा राहिला. रावण समोर आला. ब्राह्मणाला पाहून थांबला. ब्राह्मण म्हणाला, "धन्य दशवदना ! अरे वा ! ही ललना कोठे मिळाली तुला ?" रावण म्हणाला, "मला ही सदाशिवाने दिली ! साक्षात् अपर्णा आहे !" ब्राह्मण म्हणाला, "अरे, तू फसलास ! ही किती कुरूप स्त्री आहे बघ तरी !" रावणाने पार्वतीला खाली उतरवून तिच्याकडे पाहिले तो काय ! कैलासावर सुंदर दिसलेली अपर्णा ती हीच का ? कारण ही स्त्री तर अतिशय कुरूप दिसत होती ! म्हातारी, गाल बसलेले, दात पडलेले, भिवयांना आठ्या, मुख अमंगळ ! तिच्याकडे पाहताच रावणाला फार वाईट वाटले तो ब्राह्मण रावणाच्या फसगतीने खदखदा हसू लागला. तेव्हा रावणाने ती स्त्री तेथेच सोडून दिली आणि तो परत शंकराकडे गेला. "शंकरा ! मला अमंगळ अशी स्त्री तू का दिलीस ?" शंकर हसून म्हणाला, "वाटलेच होते मला ! अरे, अपर्णा मोठी मायावी आहे ! ती तुला सांभाळता आली नाही ना ! ती अनंत ब्रह्मांडाचे भास समोर दाखवील आणि लगेच अदृश्य करील ! तिच्या करणीचा थांग कुणालाही लागलेला नाही अजून ! काय झाले ?" रावण म्हणाला, "माझ्या खांद्यावर म्हातारी, कुरूप, घाणेरडी बाई दिसली ! मी तिला टाकून दिली !" शिव म्हणाला, "रावणा ! तुला जी अपर्णेइतकी सुंदर स्त्री हवी ती विष्णूच निर्माण करू शकेल आणि मयासुराची कन्या म्हणून ती तशी त्रिभुवनसुंदरी जन्माला येणारच आहे. ती विष्णूचीच कृपा आहे. त्याने आपल्या चैतन्यरूप शरीरापासूनच तिची निर्मिती केली आहे. ती तुझी पत्नी होईल." रावण तेथून निघाला. त्यातल्या त्यात त्याने समाधान मानून घेतले. शिवलिंग हाती घेऊन तो निघाला. इकडे ब्राह्मणरूप विष्णूने अपर्णेच्या त्या विचित्र रूपातच तिची शक्तिपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली व तो निघून गेला. रावणाला शंकराने सांगितले होते, "मयासुराला "मंदोदरी" नावाची कन्या होईल. ती परमश्रेष्ठ पतिव्रता होईल. ती तुझी पट्टराणी होईल. मयासुर जेव्हा कन्यादान करील तेव्हा तुला एक महाशक्ती देईल. सात कोटी मंत्रांचे सामर्थ्य त्या शक्तीत असेल. ती शक्ती तुझ्या मोठ्यात मोठ्या शत्रूवर तू मार. तुला यश मिळेल." हे सर्व शब्द मनात घोळवीत रावण हातात शिवलिंग घेऊन चालला होता. पुन्हा पूर्वीच्याच मार्गाने चालत असता त्याला एक गुराखी मुलगा गाई हाकीत चाललेला दिसला. रावणाला माहीत नव्हते, पण गणेशानेच गुराख्याचे रूप घेतले होते. देवांनी त्याला विनंती केली होती, "असुरांच्या हाती ते शिवलिंग जात आहे, तू ते सोडवून आण. काहीतरी युक्ती कर." म्हणूनच गणेश तेथे आला होता. रावणाला त्यावेळी दैवी मायेने लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. त्याला त्रास होऊ लागला. एकही पाऊल पुढे टाकवेना. तो शिवलिंग घेऊन चालला होता. ते कोठे ठेवावे ? जमिनीवर ठेवणे तर योग्य नव्हते. हातात घेऊनच मूत्रविसर्जन करणे तर अनुचितच ! काय करावे सुचेना. त्याच वेळी तो गुराखी रावणाला दिसला. त्याने लगेच त्याला हाक मारली. तो गुराखी ब्राह्मण जातीचाच दिसत होता. "हे मुला ! हे पवित्र लिंग तू जरा वेळ हातात धरून थांब. मला लघुशंकेला जायचे आहे. मी लगेच येतो." गुराखी म्हणाला, "लवकर या हं ! माझ्या गाई कुठेतरी भरकटतील, मला जास्त वेळ थांबता यायचे नाही. मी थोड्या वेळाने एकदा हाक मारीन. नंतर दोन वेळा हाक मारीन. तेवढ्या वेळात तुम्ही आला नाहीत तर मी लिंग जमिनीवर ठेवीन आणि निघून जाईन." "बरे आहे" असे म्हणून रावणाने शिवलिंग त्या गुराख्याच्या हाती दिले. तो दूर एका बाजूस गेला व लघुशंकेला बसला. इकडे गणेशाने अद्भुत माया रचली. रावणाची लघुशंका संपता संपेना ! कितीतरी वेळ झाला ! थोड्याच वेळात येतो असे त्याने म्हटले होते पण त्याला खूप वेळ लागला. गणेशाने हाक मारली. रावणाने हात हलवून थांब म्हणून खूण केली. आणखी घटकाभराने गणेशाने पुन्हा हाक मारली, "अहो, झाले की नाही अजून ?" रावणाने पुन्हा हाताने थांब" अशी खूण केली. पुन्हा जरा वेळाने तिसरी हाक मारली तरी रावण उठेना ! शेवटी आणखी एकदा हाक मारून गणेश ओरडून म्हणाला, "आता तुझे शिवलिंग तू सांभाळ ! हे मी भूमीवर ठेवले !" असे म्हणून गणेशाने ते शिवलिंग खाली ठेवले ते अगदी दृढ बसले. पृथ्वीशी एकजीव झाले. रावण तसाच उठला व अपवित्र स्थितीतच रागारागाने धावत आला. गणेश गाईंच्या मागेमागे धावत एकदम दूर जात गुप्त झाला. रावणाने पाठलाग केला. गाई जमिनीत गुप्त होत होत्या. त्यातील एका गाईचा कान तेवढा आता वर दिसत होता. तोच त्याने पकडून गाईला वर ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ! रावणाने ते शिवलिंग उपटून काढण्याची खूप खटपट केली पण ते मुळीच हलले नाही ! तेव्हा रावणाने तेथे स्वतः शंकराची पूजा केली. ते महाबल नावाने प्रख्यात लिंग असून गोकर्ण महाबलेश्वर नावाने ते क्षेत्र प्रसिद्धीस आले. रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी तेथेच शिवाची आराधना केली. रावणाला मयासुराने आपली कन्या मंदोदरी दिली व एक अमोघ शक्तीही दिली. रावणाचा वंश खूप वाढला. मेघनाद या त्याच्या मुलाने इंद्रालाही जिंकले म्हणून त्याला इंद्रजित् हे नाव पडले. रावणाला अनेक पुत्र व नातू होते. त्याचे सैन्य अठरा अक्षौहिणी होते. रावणाने सर्व देवांवर विजय मिळविला !" गौतमांनी मित्रसह राजाला पुढे म्हटले, "त्या गोकर्ण क्षेत्राहूनच आम्ही आलो आहोत. मिथिलाधिपती यज्ञ करीत आहे म्हणून आम्ही येथे आलो आहोत." सूत अशी कथा सांगून पुढे म्हणाला, गौतमांनी मित्रसह राजाला आणखी एक कथा सांगितली, ती ऐका. चांडाल स्त्रीचा उद्धार गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले, "आम्ही येताना मार्गात एक चाण्डाल जातीची स्त्री पाहिली. ती कुष्ठरोगाने भरलेली होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी व्रण होते. त्यांना दुर्गंध फार होता. हातापायाची बोटे झडली होती. तिला अन्नपाणीही घेता येत नव्हते. तिचे दात पडलेले, कान बहिरे, जन्मतःच अंध ! नाक गळून गेलेले ! कातडी झडून गेलेली ! ती धुळीत लोळत पडली होती. ती पूर्वजन्मीचे पाप भोगीत होती ! तिचा मरणसमय आला होता. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक विमान खाली उतरताना दिसले. ते विमान फारच देदीप्यमान होते ! त्या विमानात चार शिवदूत बसले होते. त्यांना प्रत्येकी पाच मुखे व दहा हात होते. एक सूर्यासारखा तेजस्वी तर दुसरा चंद्रासारखा ! कोणी अग्नीसारखा तर चौथा भाळी चंद्र असलेला ! त्या विमानात दिव्यांगना गायन व नृत्य करीत होत्या. गंधर्व शंकराचा महिमा गात होते. आम्हाला मोठे नवल वाटले कारण ते विमान त्या चाण्डाल स्त्रीला शिवलोकात नेण्यासाठी आले होते. शिवदतांना आम्ही विचारले तेव्हा हे कळले ! आम्ही विचारले, "एवढ्या दुर्दशेत असलेल्या या स्त्रीला आपण कोणत्या पुण्याईने शिवलोकात नेता ?" तेव्हा एक शिवदूत तिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगू लागला. चाण्डाल स्त्रीचा इतिहास ही चाण्डाल स्त्री पूर्वजन्मीची कैकय नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. ती खूप सुंदर होती. तिला सौंदर्याचा फार गर्व होता. ती बालपणीच विधवा झाली होती. तारुण्याच्या मदाने ती वाममार्गाला लागली. ती पुरुषांशी संबंध ठेवू लागली. तिच्या पित्याने तिला खूप समजावले, शिक्षाही केली, पण ती सुधारली नाही. तिला व्यभिचारातून गर्भ राहिला. लोक तिची निंदा करू लागले. पित्याने तिला घराबाहेर घालवून दिले. ती तो देश सोडून गेली. अनाथ हिंडू लागली. योगायोगाने एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. तिला आता खूप श्रीमंती आली. तिला त्या पतीपासून पुष्कळ मुले झाली. शूद्राच्या घरी मद्यमांसाला तोटा नव्हता. तीही यथेच्छ मांस खाई, मद्य पिऊन तंद्रीत राही. अशा प्रकारे तिचा निषिद्ध आहार विहाराने संसार चालला असता, तिचा पती एकदा शेतावर गेला होता त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती अर्धवट तंद्रीत उठली. बकरा मारण्यासाठी तिने सुरी घेतली. तिने चुकून एक गोवत्सच मारला. अंधारात व तंद्रीत तिला नीट दिसलेच नाही ! वासरू ओरडू लागले. गाय मोठमोठ्याने हंबरू लागली ! पण तिने वासराची मान कापली आणि ते ती घरात घेऊन गेली. घरात गेल्यावर तिच्या लक्षात आले की आपण वासरूच मारले ! तेव्हा एकदम ती उद्गारली, "शिव शिव ! काय केले मी हे !" जरी ती वाईट कर्म करणारी झाली होती तरी गोवध करू नये इतका संस्कार तिच्या मनावर होताच. अजाणता गोवध झाला याचे तिला फार वाईट वाटले. तरी भुकेचा विजय झाला ! तिने अर्धे वासरू कापून शिजविले. त्यातले मांस खाल्ले. अर्धे प्रेत बाहेर टाकून दिले. लोकांत तिने ओरडा केला की "रात्री वाघाने वासरू मारले !" कालांतराने सुमित्रा मरण पावली. यमदूतांनी तिला मारीत मारीत यमलोकात नेले. तिला तरवारींच्या धारांवरून चालविले. कुंभीपाक नरकात टाकले. तप्त भूमीवर निजविले ! तप्त स्तंभाला बांधले ! तिचे कर्म काय आहे, पाप किती, पुण्य किती, असे यमाने विचारले तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, "हिने चुकून गाईचे वासरू मारले, पण "शिव शिव !" असे म्हणून तिने थोडा पश्चात्ताप केला. तरी नंतर ते मांस खाल्ले व वाघाने वासरू मारले असा बोभाटा केला !" यमाने त्यानंतर तिला चाण्डाल स्त्रीच्या जन्माला घातले. ती जन्मांध आहे, कुलक्षणी आहे. कुत्र्याने उष्टावलेले अन्न कसेबसे खाऊन दिवस काढीत होती. तिची आई व बाप मरून गेले. हातात काठी घेऊन ही गावोगाव भीक मागत हिंडत होती. शिवरात्रीचा दिवस होता. गोकर्णाला यात्रेकरू चालले होते. वाद्ये वाजत होती. लोक "शंभो शिव हर !" असा नामघोष करीत चालले होते. ही काठी टेकीत टेकीत, भिक्षा मागत त्याच मार्गाने चालली होती. भद्रकालीचे मंदिर गोकर्ण क्षेत्रातच आहे. त्या देवळाजवळ ही मार्गात बसून भीक मागू लागली. ""बाबा ! मला भूक लागली ! दया करा ! मी पापिणी आहे ! मला अन्न द्या. माझा उद्धार करा !" लोकांना तिची दया येई. पण जवळही कोणी फिरकत नसे. एका शिवभक्ताने मात्र तिच्या हातात बेलाचे पान ठेवले. तिने खाद्य वस्तू म्हणून ते तोंडाशी नेले आणि पान आहे, असे कळताच रागाने ते भिरकावून दिले. ते वाऱ्यावर एकदम उडाले व शंकराच्या पिंडीवर पडले ! शिवरात्रीस तिला उपवास, यात्रा व बिल्वदलाने शिवपूजन असे घडले ! शिवभक्तांच्या संगतीत जागरण घडले. या स्त्रीने शिवनाम ऐकले व तेच ती मनात घोळवीत राहिली. या पुण्यामुळे तिची पापे नष्ट झाली. आम्ही तिला शिवलोकात नेणार आहोत. पहा ! आता त्या रोगट देहाचा त्याग करून ती दिव्य-देही होईल." तेव्हा आमच्या देखत तिला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि विमानात बसून ती शिवलोकी गेली." एवढी कथा सांगून सूत म्हणाला - गौतम ऋषींनी चांडाल स्त्रीची कथा मित्रसह राजाला सांगितली आणि म्हटले, "राजा ! तू गोकर्ण क्षेत्रास जा. शिवरात्रीला श्रीशंकर पार्वतीची बेलाच्या पर्णांनी पूजा कर. त्याने तू ब्रह्महत्येतून व शापातून मुक्त होशील." राजाने पुन्हा गौतम मुनींना दंडवत् प्रणाम केला. तो त्यांच्या आशीर्वादाने धन्य झाला. मुनी मिथिला नगरीकडे आपल्या शिष्यांसमवेत गेले आणि राजा गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राकडे निघाला. मित्रसह राजाचा उद्धार त्या मित्रसह राजाने शिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्रात अत्यंत भक्तिभावाने उपोषण करून उमामहेश्वराची पूजा केली. तेव्हा त्याच्या मागे लागलेले ब्राह्मणयुग्म हत्येचे पातक नष्ट झाले. तो शापमुक्त झाला. आता त्याला संसाराचीही गोडी राहिली नाही. त्याला शिवलोकात नेण्यासाठी विमान आले. तेजस्वी असे शिवगण त्या विमानात बसले हाते. देवांनी राजावर सुगंधी पुष्पांच्या मालांचा वर्षाव केला ! दिव्य नाद होऊ लागला. राजाला नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला; त्याला पाच मुखे व दहा हात आले ! तो शिवस्वरूप झाला व शिवलोकात विराजमान झाला. सूत शौनकादिकांना म्हणाले - "शिवरात्रीचे व्रत, गोकर्ण क्षेत्र, गौतम मुनी, मित्रसह राजा यांचे हे पुण्यप्रद कथानक आपण श्रवण केलेत ! तुम्ही धन्य आहात !" श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतो - "हंस जसे मानस सरोवरात विराजतात, किंवा दैवतासभोवार जसे साधक शोभतात, तसे तुम्ही श्रोते शोभता. तुम्ही चतुर पंडित आहात. तुमचे अवधान हेच अलंकार देऊन मज श्रीधराला गौरव द्या. हे भीमातटविलासा आदिपुरुषा, ब्रह्मानंदा ! हे कैलासनाथा, मजकडून पुढील कथा वर्णन करून घे !" ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥ |