श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय एकोणसाठावा
नीलध्वज व सुधन्वा यांच्याशी युद्ध
श्रीगणेशाय नम: ॥
पूर्वाध्यायींचें अनुसंधान ॥ धर्में सोडिला श्यामकर्ण ॥
पाठीशीं रक्षितसे अर्जुन ॥ सकलरायांसमवेत ॥ १ ॥
वृषकेत मदन मेघवर्ण ॥ यौवनाश्व सुवेग गहन ॥
अनुशाल्व वीर अपार सैन्य ॥ श्यामकर्ण रक्षिती ॥ २ ॥
दक्षिणदिशे घोडा चालिला ॥ माहिष्मतीनगरा आला ॥
नीलध्वज राजा तेजागळा ॥ पुरुषार्थी आणि पुण्यशील ॥ ३ ॥
त्याचा पुत्र नामें प्रवीर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥
मदनमंजरी स्त्री सुकुमार ॥ तीसमवेत वनीं क्रीडे ॥ ४ ॥
तो तेणें देखिला श्यामकर्ण ॥ पत्र वाचू लागला धरून ॥
सोमवंशी विजयध्वज पूर्ण ॥ पंडुराज प्रतापी ॥ ५ ॥
त्याचा पुत्र धर्मराजेंद्र ॥ साह्य श्रीरंग जगदुद्धार ॥
तेणें श्यामकर्ण सोडिला सत्वर ॥ पृथ्वीतळ जिंकावया ॥ ६ ॥
घोडा रक्षितो सुभद्रानाथ ॥ जो गांडीवधर्ता रणपंडित ॥
जो बळें सबळ नृपनाथ ॥ तेणें वारू धरावा हा ॥ ७ ॥
पत्र वाचून प्रवीर ॥ स्त्रिया गांवांत पाठविल्या समग्र ॥
सैन्य आणविलें अपार ॥ धांवला समोर युद्धातें ॥ ८ ॥
घोडा पाठविला गांवांत ॥ ऐसें देखून कर्णसुत ॥
निजदळाशीं बाण वर्षत ॥ प्रवीरावरी धावला ॥ ९ ॥
शतबाण टाकिले ॥ ते प्रवीरें वरच्यावरी छेदिलें ॥
कर्णजावरी प्रेरिले ॥ शतबाण तेही ॥ १० ॥
कर्णकुमारें छेदून ॥ दुजे सत्तरबाण सोडून ॥
हृदयीं भेदिला नीलध्वजनंदन ॥ हाके गगन गाजविलें ॥ ११ ॥
तो तीन अक्षौहिणी दळासहिता ॥ नीलध्वज रणपंडित ॥
तयावरी धावला वीर पार्थ ॥ संग्राम अद्भुत मांडला ॥ १२ ॥
मांडले युद्धाचें घनचक्र ॥ उभयसेनेचा होत संहार ॥
तो नीलध्वजाचा जामात वैश्वानर ॥ सेना जाळित पाडवांची ॥ १३ ॥
अग्नि नीलध्वजाचा जामात ॥ ही कथा आहे सभापर्वांत ॥
मागेंच वर्णिली समस्त ॥ पुनःपुनः कासया ते ॥ १४ ॥
असो वरुणास्त्र सोडी अर्जुन ॥ परी सहसा नाटोपे अग्न ॥
मग अग्निनारायणाचें स्तवन ॥ पार्थें केलें तेधवां ॥ १५ ॥
शुचिर्भूत होऊन पार्थ ॥ अग्नीपुढें कर जोडित ॥
म्हणे हे द्विमूर्धान समहस्त ॥ त्रिचरणा अवधारीं ॥ १६ ॥
विश्वपालका कृशाना ॥ चत्वारिश्रृंगा सप्तजिव्हाधारणा ॥
स्त्रिया स्वाहास्वधारमणा ॥ मेषवाहना अवधारीं ॥ १७ ॥
तुजचि करावया तृप्त ॥ अश्वमेध मांडिला अद्भुत ॥
तुज म्यां खांडववन दिधलें यथार्थ ॥ प्राणमित्र म्हणोनियां ॥ १८ ॥
मग प्रसन्न जाहला अग्न ॥ म्हणे अर्जुना ऐक वचन ॥
कृष्णस्वरूप परिपूर्ण ॥ कळलें नाहीं तुम्हांतें ॥ १९ ॥
पूर्ण ब्रह्मानंद हृषीकेश ॥ तो घरीं तुमचे रात्रंदिवस ॥
तो असतो तुम्हांस दोष ॥ कालत्रयीं न लागती ॥ २० ॥
सर्वेश्वर साह्य श्रीरंग ॥ तुम्हीं कासया मांडिला याग ॥
सकल दोषां हो भंग ॥ ज्याचें नाम मुखीं गातां ॥ २१ ॥
असो अग्नि होऊन कृपाळ ॥ उठविलें पार्थांचे सर्व दळ ॥
मग श्वशुराप्रति तत्काळ ॥ जाऊन बोलता जाहला ॥ २२ ॥
म्हणे हा कृष्णप्रिय कृष्ण ॥ याशीं तूं सख्य करीं प्रीतींकरून ॥
तो स्वधेची माता ज्वाला दारुण ॥ नीलध्वजाप्रति बोले ॥ २३ ॥
मैत्री करूं नको युद्ध करीं ॥ पांडव तो मारीं पुरुषार्थें समरीं ॥
मग नीलध्वज परिवारीं ॥ पार्थावरी लोटला ॥ २४ ॥
तो अनिवार पार्थाचें तेज ॥ रणीहून पळविला नीलध्वज ॥
म्हणे स्त्रीबुद्धीनें काज ॥ सिद्धी न पावे सर्वथा ॥ २५ ॥
अपार धन आणि श्यामकर्ण ॥ घेऊन भेटला अर्जुनास येऊन ॥
सवें आपण अपार सैन्य ॥ साह्य चालिला तेधवां ॥ २६ ॥
मग ते ज्वाला रुसोन ॥ गेली बंधूकडे निघोन ॥
उल्मुक नाम त्यालागून ॥ वर्तमान सांगतसे ॥ २७ ॥
म्हणे माझा भ्रतार आणि नंदन ॥ पार्थ नेले पुढें घालून ॥
उल्मुक म्हणे माझेन ॥ युद्ध पार्थाशी न करवे ॥ २८ ॥
मग ती ज्वाला तेथून ॥ चालिली भागीरथी ओलांडून ॥
म्हणे इचा विटाळ न व्हावा पूर्ण ॥ महापापीण गंगा हे ॥ २९ ॥
भागीरथी म्हणे तियेसी ॥ कां हो ज्वाळे मज निंदिसी ॥
म्हणे सात बाळे तुवां परियेसीं ॥ निर्दयें जाण मारिलीं ॥ ३० ॥
तुझ्या भीष्माचा मारक पार्थ ॥ तो हा जातो पृथ्वी जिंकित ॥
यावरी गंगा शाप देत ॥ आठवूनि देवव्रता ॥ ३१ ॥
या षण्मासांत साचार ॥ रणीं पडेल पार्थाचें शिर ॥
मग ते ज्वाला होऊन शर ॥ बभ्रुवाहनाजवळी गेली ॥ ३२ ॥
शररूप धरून सत्य ॥ त्याच्या भातां राहिली गुप्त ॥
इकडे श्यामकर्णास रक्षित ॥ जात पार्थ दळेंशीं ॥ ३३ ॥
पुढें चंडशिला देखोन सुरंग ॥ तिशीं श्यामकर्ण घांसी अंग ॥
तो तेथेंच जडला सवेग ॥ हालेना ऐसा जाहला ॥ ३४ ॥
न सुटे कदा श्यामकर्ण ॥ आश्चर्य करीत अर्जुन ॥
तेथें सौभरीचा आश्रम देखोन ॥ त्यास नमून पुसतसे ॥ ३५ ॥
सौभरी बोले हांसोन ॥ म्हणे पांडव तुम्ही परम अज्ञान ॥
पूर्णब्रह्म घरीं श्रीकृष्ण ॥ संशय अजून न जाय ॥ ३६ ॥
संशयें व्यापिलें तुमचें चित्त ॥ अश्वमेध मांडिला व्यर्थ ॥
ज्या श्रीकृष्णाचे घेतो चरणतीर्थ ॥ कोटी यागांचें फळ होय ॥ ३७ ॥
तुज गीता उपदेशिली ॥ ते नाहींच तुला सफळ जाहली ॥
अरे हरिध्यान करा सकळी ॥ पापा होळी होय तेणें ॥ ३८ ॥
ज्ञानाहून ध्यान विशेष ॥ गीतेत बोलला द्वारकाधीश ॥
त्यास टाकून देशोदेश ॥ अश्वापाठीं हिंडतां ॥ ३९ ॥
प्रत्यक्ष टाकून श्रीहरी ॥ हिंडतां घेऊन चतुष्पद हरी ॥
जो पूर्णब्रह्म निर्विकारी ॥ त्याचें स्वरूप नोळखा ॥ ४० ॥
सांडोनियां दिव्य हिरा ॥ कां वेंचितां अरण्यगारा ॥
जो अनादि परात्पर सोयरा ॥ त्याचें स्वरूप नोळखाचि ॥ ४१ ॥
चंद्र सूर्य आणि अग्न ॥ ज्याच्या तेजांत होती निमग्न ॥
तो तुमचा सारथि जाहला सगुण ॥ त्याचें स्वरूप नोळखा ॥ ४२ ॥
असो हरिमाया परम गूढ ॥ तेणें तुम्ही सर्व जाहलेति मूढ ॥
आतां श्यामकर्ण शिळेसी जडला दृढ ॥ वर्तमान तें ऐका ॥ ४३ ॥
उद्दालकाची स्त्री दारुण ॥ सांगे तें न ऐकेचि वचन ॥
शुभ सांगतां अशुभ करून ॥ क्षणामाजी टाकित ॥ ४४ ॥
नको म्हणावें तें हटेंच करी ॥ शिणवी त्यासी दुराचारी ॥
तो कौंडिन्यऋषि निर्धारीं ॥ आश्रमा पातला तयाच्या ॥ ४५ ॥
म्हणे कां तुझें शरीर कृश जाहले ॥ तेणें सर्व वर्तमान सांगितलें ॥
तो म्हणे विपरीत बोले ॥ करावें तें न करीं म्हणे ॥ ४६ ॥
मग त्याप्रमाणें तो वर्तत ॥ करावें तें नको म्हणत ॥
तो पिंडप्रदान करून यथार्थ ॥ विसरूनियां बोलिला ॥ ४७ ॥
म्हणे पिंड गंगेत टाकावे वहिले ॥ तिणें उकिरड्यात नेऊन टाकिले ॥
मग उद्दालकें शापिलें ॥ चंडशिला तूं होय ॥ ४८ ॥
मग तिणें धरून चरण ॥ म्हणे बोलें उश्शापवचन ॥
तो म्हणे अर्जुनहस्तेंकरून ॥ उद्धरून जाशील तूं ॥ ४९ ॥
असो तेथें जाऊन पार्थ ॥ शिळेसी लावितांचि हस्त ॥
सत्वर होऊन पूर्ववत ॥ पतिदर्शना सिद्ध जाहली ॥ ५० ॥
पुढें घोडा चालिला सत्वर ॥ तो देखिलें चंपकापुर ॥
तेथें हंसध्वज राजेंद्र ॥ महा उदार वैष्णव तो ॥ ५१ ॥
म्हणे या प्रसंगेंकरून ॥ होईल श्रीरंगाचें दर्शन ॥
हंसध्वज घेऊनि सैन्य ॥ नगराबाहेर निघाला ॥ ५२ ॥
सत्तर सहस्त्र भद्रजाती ॥ ज्याच्या सैन्यामाजी चालती ॥
रथस्वारां नाहीं गणती ॥ एकपत्नीव्रती तो ॥ ५३ ॥
एकपत्नीव्रत धीर ॥ तेच ठेविले सेवक शूर ॥
धन देतसे अपार ॥ चंपकापुर सुखी सदा ॥ ५४ ॥
विदूरथ विरथ चंद्रसेन ॥ सुदर्शन सुधन्वा पंच नंदन ॥
रायें नगरातें धेंडा पिटोन ॥ श्रुत केलें सर्वांसी ॥ ५५ ॥
आजि कोणी पुरुषवीर ॥ नगरांत न रहावा साचार ॥
श्रीकृष्णदर्शना सत्वर ॥ बाहेर निघा रे त्वरेनें ॥ ५६ ॥
पुत्र बंधु हो आस ॥ जो आजि राहील नगरांत ॥
त्यासी तैलकटाह करून तप्त ॥ आंत घालीन निर्धारे ॥ ५७ ॥
समस्त बाहेर आले वीर ॥ परी सुधन्वा राजपुत्र ॥
त्याची स्त्री परम सुंदर ॥ तिणें सुधन्वा गुणे मोहिला ॥ ५८ ॥
म्हणे आजि चतुर्थदिवस ॥ टाकून जातां लागेल दोष ॥
बालहत्या पातक विशेष ॥ जाणोनि आजि राहावें ॥ ५९ ॥
उदरीं होईल जलद ॥ तेणेंच वंश पावन शुद्ध ॥
ऐसा प्रभावतीनें करूनि बोध ॥ सुधन्वा वीर राहविला ॥ ६० ॥
ऋतु देऊन प्रातःकाळी ॥ सुधन्वा आला पित्याजवळी ॥
नमन करीत ते वेळीं ॥ देखतां राव कोपला ॥ ६१ ॥
म्हणे यास घालावे कढईंत ॥ आज्ञा भंगी तो नव्हे सुत ॥
शंख लिखित पुरोहित ॥ घेऊन जाती सुधन्व्यासी ॥ ६२ ॥
राव संगे परिवार देत ॥ यास उचलून टाका रे कढईत ॥
प्रधान पाहती तटस्थ ॥ न चले वचनार्थ कोणाचा ॥ ६३ ॥
कढईजवळी स्वरें नेती ॥ सुधन्वा मग विचारी चित्तीं ॥
कोणास आतां स्मरावे अंतीं ॥ एका श्रीपतीवांचोनियां ॥ ६४ ॥
कृष्णा गोविंदा माधवा ॥ अच्युता नारायणा केशवा ॥
मुकुंदा श्रीधरा कमलाधवा ॥ पांडवजनप्रतिपालका ॥ ६५ ॥
जय जय जगदुद्धरणा ॥ द्रौपदीलज्जारक्षका पीतवसना ॥
पंचशरजनका पंचवदना ॥ प्रिय अत्यंत होसी तूं ॥ ६६ ॥
मधुकैटभारी मुरमर्दना ॥ पद्मजजनका पद्यलोचना ॥
क्षीराब्धिवासा जगन्मोहना ॥ धांव त्वरें ये वेळीं ॥ ६७ ॥
समरांगणीं देईन प्राण ॥ परी हरि नको हें दुर्मरण ॥
दावाग्नींत रक्षिले गोपाल गोधन ॥ मजलागून रक्षीं तैसा ॥ ६८ ॥
सेवकीं उचलूनि त्वरित ॥ सुधन्वा टाकिला कढईआंत ॥
येरू स्मरण तैसेंच करित ॥ वैकुंठनाथ काय करी ॥ ६९ ॥
जैसें स्वजनांचें मानस निर्मळ ॥ तैसें तैल जाहलें शीतळ ॥
त्रिविध ताप क्लेशजाळ ॥ नामस्मरणें दूर होती ॥ ७० ॥
जैसें सलिलीं कमल टवटवित ॥ तैसा कढईमाजी बैसला निवांत ॥
सहस्रनामें अनुक्रमें पढत ॥ भगवंताचीं स्वानंदें ॥ ७१ ॥
भोवते जन जे पाहती ॥ नयनीं प्रेमाश्रु त्याचे लोटती ॥
तंव हंसध्वज नृपती ॥ पहावया धांवला ॥ ७२ ॥
तो तप्ततैलामाजी तेव्हां ॥ आनंदमय देखिला सुधन्वा ॥
अच्युता जनार्दना माधवा ॥ नामावळी गातसे ॥ ७३ ॥
सर्व जनांचे नेत्रीं अवधारा ॥ प्रेमें सुटल्या विमलांबुधारा ॥
शंख लिखित म्हणती राजेश्वरा ॥ कपट कीं सत्य पाहावें ॥ ७४ ॥
नारळ आत टाकिले ॥ दोन भाग होऊन उसळले ॥
दोघांचे कपाळी दोन शकलें ॥ पाषाणाऐसीं बैसली ॥ ७५ ॥
कढईतून तैल उसळले ॥ शंखलिखितांचें अंग भाजले ॥
दोघे अनुतापें तापले ॥ म्हणती घडले दोष आम्हां ॥ ७६ ॥
भगवद्भक्तांचा महिमा अपार ॥ नेणोंचि आम्ही पामर ॥
म्हणती तैलकढईंत साचार ॥ उडी आम्ही घालूं आतां ॥ ७७ ॥
मग सुधन्वा धांवोन ॥ करी तयांचें समाधान ॥
हंसध्वज सप्रेम होऊन ॥ पुत्रालागीं आलिंगी ॥ ७८ ॥
म्हणे धन्य तुझेनि हा वंश ॥ विष्णुभक्त तूं निर्दोष ॥
यावरी सेना सांवरून आसमास ॥ रथारूढ जाहला ॥ ७९ ॥
पितयास नमून ते वेळां ॥ सुधन्वा दळभारेंशी धांवला ॥
भूगोल तेव्हां डळमळिला ॥ दोन्हीं दळें मिळालीं ॥ ८० ॥
सुधन्वा आणि सुरथ ॥ युद्ध करिती तेव्हां अद्भुत ॥
तिकडून पार्थ वृषकेत ॥ प्रद्युम्न सात्यकी धांवले ॥ ८१ ॥
यौवनाश्व सुवेगवीरा ॥ अनुशाल्व नीलध्वज प्रवीर ॥
चपलेऐसा कर्णकुमार ॥ त्यांतून पुढें धावला ॥ ८२ ॥
सुधन्वा पुसे वृषकेतालागून ॥ तूं वीर आहेस कोणाचा कोण ॥
येरू म्हणे धीरवीर उदार कर्ण ॥ त्याचा पुत्र मी आहें ॥ ८३ ॥
मग दोघांमध्ये अपार ॥ मांडलें युद्धाचें घनचक्र ॥
तो लाघवी कर्णकुमार ॥ विद्या अपार तयाची ॥ ८४ ॥
सव्यतर्जनी हालवून जाणा ॥ वीर समस्त डोलविती माना ॥
मग सुधन्वावृषकेतबाणां ॥ पांडवसेना खिळियेली ॥ ८५ ॥
कर्णपुत्राचा रथ ॥ आकाशपंथें तेव्हां उडवित ॥
येरू परतोन सवेंच येत ॥ उसणें घेत आपुलें ॥ ८६ ॥
सुधन्व्याचा स्यंदन ॥ उडवी आकाशीं जैसें तृण ॥
तो प्रद्युम्नें सोडून बाण ॥ रथ छेदिला सुधन्व्याचा ॥ ८७ ॥
तेही रुक्मिणीपुत्राचा स्यंदन ॥ रणीं केला छिन्नभिन्न ॥
हृदयीं भेदिले पंचबाण ॥ मूर्च्छेनें व्यापिला तेधवां ॥ ८८ ॥
कृतवर्मा युद्ध करी ॥ तोही मूर्च्छित पडिला समरीं ॥
अनुशाल्व धावला याउपरी ॥ निर्वाणबाण वर्षत ॥ ८९ ॥
तोही सुधन्व्यानें शरीं खिळिला ॥ अनुशाल्व ध्वजस्तंभीं टेकला ॥
देखोन सात्यकी धांवला ॥ तोही पाडिला मूर्च्छागत ॥ ९० ॥
मग धांवला सुभद्रावरा ॥ देखोनि हांसे हंसध्वजपुत्र ॥
म्हणे कृष्णबळें अपार ॥ युद्ध केलें पूर्वीं तुवां ॥ ९१ ॥
आजि सारथि नाहीं हृषीकेशी ॥ तरी युद्ध करीं आतां मजशीं ॥
तुझी धनुर्विद्या कैशी ॥ पाहूं जुनाट झुंजारा ॥ ९२ ॥
अर्जुनें टाकिले शत फार ॥ सुधन्व्यानें सोडिले सहस्त्र ॥
लक्षबाण सुभद्रावर ॥ प्रेरिता जाहला तयावरी ॥ ९३ ॥
येरें टाकिले दशलक्ष पाठीं ॥ पार्थ टाकिले सवेंच कोटी ॥
न मावती आकाशाचे पोटीं ॥ वरी मंडप जाहला ॥ ९४ ॥
पार्थ टाकिलें अग्न्यस्त्र ॥ येरें सोडिलें जलदास्त्र ॥
सुधन्व्यानें वातास्त्र ॥ सवेच प्रेरिलें तेधवां ॥ ९५ ॥
पार्थ टाकिलें पर्वतास्त्र ॥ येरें सोडिलें वज्रास्त्र ॥
त्याणें अर्जुनाचा रथ ॥ केला चूर्ण समरांगणीं ॥ ९६ ॥
सुधन्वा म्हणे करीं हरिस्मरण ॥ घरी सांडूनियां भगवान ॥
नाहीं तो दोष कल्पून ॥ अश्वमेध मांडिला ॥ ९७ ॥
ऐसें बोलोन सत्वर ॥ उडविलें सारथ्याचें शिर ॥
घाबरा जाहला सुभद्रावर ॥ म्हणे कैसें करूं आतां ॥ ९८ ॥
म्हणे धावे मित्रकरवसना ॥ नीलगात्रा शतपत्रनयना ॥
क्षीराब्धिजावरा सहस्त्रवदना ॥ संकट पडलें धावे का ॥ ९९ ॥
रजनीअंतीं उगवे रविचक्र ॥ तैसा रथीं बैसला श्रीधर ॥
आनंदला पंडुपुत्र ॥ पाय धरी सप्रेम ॥ १०० ॥
सुधन्वा आपुलिया रथावरून ॥ श्रीरंगास नमी प्रेमेंकरून ॥
म्हणे स्वामी आलास धांवोन ॥ निजजन रक्षावया ॥ १०१ ॥
सुधन्वा म्हणे अर्जुना ॥ आतां करीं एक प्रतिज्ञा ॥
मग तो पाकशासनी ते क्षणां ॥ काय वचन बोलत ॥ १०२ ॥
तीन बाणांचा नेम साचार ॥ सुधन्व्या तुझें उडवीन शिर ॥
हें नव्हे तरी पितृगण समग्र ॥ अधःपतन पावती ॥ १०३ ॥
सुधन्वा म्हणे तुझे तीन बाण ॥ जरी मी न टाकीं खंडून ॥
तरी मी नरकास जाईन ॥ जगन्मोहना पाहें तूं ॥ १०४ ॥
जगदात्म्या कंसारी ॥ ठेवणें रक्षिजे नानापरी ॥
तैसें पार्थास जतन करीं ॥ समरीं उरी नुरेचि ॥ १०५ ॥
मग तो सुधन्वा रणपंडित ॥ शतबाणी विंधिला पार्थ ॥
शतशरी मनदतात ॥ परमपुरुषार्थें भेदिला ॥ १०६ ॥
कृष्णार्जुनांसहित रथ ॥ तेणें उडविला अकस्मात ॥
वातचक्रीं भोंवत भोंवत ॥ एक योजनावरी पडियेला ॥ १०७ ॥
मग श्रीकृष्ण म्हणे अर्जुना ॥ कासया केली रे व्यर्थ प्रतिज्ञा ॥
जयद्रथीं नेमवचना ॥ संकट मज घातलें ॥ १०८ ॥
अर्जुन म्हणे वनमाळी ॥ तानयास रक्षिसी माउली ॥
तुझिया स्नेहाची शीतळ साउली ॥ खालीं आम्ही सुखरूप ॥ १०९ ॥
श्रीकृष्ण म्हणे रथावरी भार ॥ पार्था मी घालितों अपार ॥
परी तो सुधन्वा महावीर ॥ उडवी क्षण न लागतां ॥ ११० ॥
हे वीर समस्त एकपत्नीव्रती ॥ पार्था तुम्ही आम्ही भोगिल्या बहुत युवती ॥
तो सत्यवादी भक्त निश्चितीं ॥ म्हणोनि यश येत तया ॥ १११ ॥
मग श्रीकृष्णें रथ लोटिला ॥ सुधन्व्यासमोर उभा केला ॥
अर्जुने पहिला शर सोडिला ॥ दृढसंकल्प करूनियां ॥ ११२ ॥
गोवर्धन उचलून सबळ ॥ गोकुळ रक्षित तमालनीळ ॥
त्या पुण्येंकरून तत्काळ ॥ शिर तुटो सुधन्व्याचें ॥ ११३ ॥
ऐसें म्हणोनि सोडिला बाण ॥ सुधन्व्यानें छेदिला न लागतां क्षण ॥
आश्चर्य करी अर्जुन ॥ दुसरा मार्गण लाविला ॥ ११४ ॥
परशुरामावतारी दुष्ट मारून ॥ उर्वी ब्राह्मणा दिधली दान ॥
त्या पुण्येकरून ॥ शिर तुटो सुधन्व्याचें ॥ ११५ ॥
प्रलयचपलेऐसा बाण ॥ पार्थ सोडिला चापापासून ॥
तोही तोडिला न लागतां क्षण ॥ हंसध्वज पाहतसे ॥ ११६ ॥
विजयी जाणोनि निजसुत ॥ हंसध्वज जयवाद्यें वाजवित ॥
तिसरा बाण घेत पार्थ ॥ अति समर्थ तेजस्वी ॥ ११७ ॥
पृथ्वी तेज वायु अंबर ॥ यांचें सत्व या शरीं समग्र ॥
ब्रह्मा विण महेश्वर ॥ सामर्थ्येशीं तेथें असती ॥ ११८ ॥
रामावतारीं एकपत्नीव्रत ॥ श्रीरंगा तुवां केलें बहुत ॥
त्याच पुण्ये अकस्मात ॥ शिर उडो तयाचें ॥ ११९ ॥
आजि मी यासी न मारीं जरी ॥ शिवविष्णुप्रतिमा फोडिल्या तरी ॥
सुधन्वा म्हणे श्रीहरी ॥ पार्थासी रक्षीं बहु आतां ॥ १२० ॥
अर्जुने सोडिला शर ॥ क्षणें छेदी हंसध्वजकुमार ॥
अर्ध पडिला पृथ्वीवरी साचार ॥ अर्ध अनिवार नाटोपे ॥ १२१ ॥
बहुत बाणीं छेदितां ॥ नाटोपेचि तो तत्त्वतां ॥
कंठीं बैसला तो अवचितां ॥ शिर उडविलें सुधन्व्याचें ॥ १२२ ॥
शिर करी कृष्णस्मरण ॥ पडलें हरिचरणांजवळी येऊन ॥
श्रीरंगे तें उचलून ॥ हृदयीं धरिलें आवडीं ॥ १२३ ॥
मुखांतूनि अंतर्ज्योति निघाली ॥ ते श्रीकृष्णमुखीं प्रवेशली ॥
लवणाची पुतळी विराली ॥ समुद्रामाजी जैशी कां ॥ १२४ ॥
हरीने शिर ते वेळे ॥ हंसध्वजावरी भिरकाविलें ॥
तें हंसध्वजें उचलिलें ॥ आरंभिलें शोकातें ॥ १२५ ॥
मुखावरी ठेवी मुख ॥ हंसध्वज करी शोक ॥
म्हणे सुपुत्रा तूं कुलोद्धारक ॥ रणपंडित पुरुषार्थी ॥ १२६ ॥
तूं एकपत्नीव्रती पूर्ण ॥ विष्णुभक्त पुण्यपावन ॥
तुज म्यां कढईंत उचलून ॥ नेणोनियां टाकिलें ॥ १२७ ॥
तोच राग धरूनि मनीं ॥ बा रे काय जातोसी रुसोनी ॥
सखया तुज न जाळीच अग्नी ॥ महावैष्णव जाणोनियां ॥ १२८ ॥
श्रीकृष्णामुखीं तुझी ज्योती ॥ शिरोन तुटली कीं पुनरावृत्ती ॥
ऐसा पुत्र त्रिजगतीं ॥ नाहीं कोणासी जाहला ॥ १२९ ॥
अहा गेलें पुत्ररत्न ॥ अहा हरविलें म्यां निधान ॥
ऐसा निढळ बडवून ॥ शोक करी हंसध्वज ॥ १३० ॥
ऐसा पुत्र सुलक्षण ॥ मज अभाग्यासी जिरे कोठून ॥
महावीर कृष्णार्जुन ॥ जेणें समरीं जर्जर केले ॥ १३१ ॥
श्रीकृष्ण सोडून वहिलें ॥ कां शिर मजपाशीं आलें ॥
हंसध्वजें माघारें टाकिलें ॥ येऊनि पडिलें हरीजवळी ॥ १३२ ॥
मग श्रीरंगें भिरकाविलें गगनीं ॥ तें रुद्रगणीं नेले उचलुनी ॥
मुंडमाळेंत नेउनी ॥ सदाशिवाचे ओविलें ॥ १३३ ॥
यावरी बाण वर्षत ॥ धांवला हो वीर सुरथ ॥
म्हणे कृष्णा आजि रक्षी पार्थ ॥ बहुत प्रकारेकरूनीयां ॥ १३४ ॥
पार्थासी म्हणे द्वारकानाथ ॥ आतां प्रलय करील हा सुरथ ॥
अर्जुन म्हणे रणीं कृतांत ॥ तुझ्या बळें जिंकू आम्ही ॥ १३५ ॥
प्रद्युम्नास म्हणे हरी ॥ तूं आतां सुरथाशीं युद्ध करीं ॥
मग पार्थाचा रथ मुरारी ॥ तीन योजनें दूरी नेत ॥ १३६ ॥
सूरथें युद्ध केलें अद्भुत ॥ समरीं जिंकिला वीर मन्मथ ॥
पाडूनियां मूर्च्छागत ॥ सर्व दळ संहारिलें ॥ १३७ ॥
जेथें होते कृष्णार्जुन ॥ तेथें उभा ठाकला येऊन ॥
बाणीं आच्छादिला स्यंदन ॥ कुंतीनंदन आवेशला ॥ १३८ ॥
छेदूनि सुरथाचा रथ ॥ क्षण न लागतां मारिला सूत ॥
सवेंच तेणें रथासहित पार्थ ॥ गगनमंडळीं उडविला ॥ १३९ ॥
कृष्ण आणि अंजनीकुमार ॥ रथावरी घालिती भार ॥
परी तो सुरथ वीर ॥ उडवी क्षण न लागतां ॥ १४० ॥
मग धांवोनि वीर सुरथ ॥ उचलिला हातें पार्थाचा रथ ॥
म्हणे टाकू समुद्रांत ॥ किंवा गजपुरा पाठवूं ॥ १४१ ॥
मग पंचबाणी सुरथ ॥ पार्थें हृदयीं ताडिला अकस्मात ॥
मूर्च्छना आली ते सांवरित ॥ गेला आपुल्या रहंवरीं ॥ १४२ ॥
सुरथ म्हणे पार्था ॥ प्रतिज्ञा करीं कांहीं आतां ॥
येरू म्हणे तत्त्वतां ॥ शिर तुझें उडवीन ॥ १४३ ॥
अष्टोत्तरशत रथ ॥ सुरथाचे छेदी वीर पार्थ ॥
मग सुरथाचा वामहस्त ॥ छेदोनियां पाडिला ॥ १४४ ॥
मग गदा घेऊनि सव्यहस्तीं ॥ मारिले पार्थाचे सहस्त्र हस्ती ॥
गदाघायें जगत्पती ॥ रथावरी चढोन ताडिला ॥ १४५ ॥
मग छेदिला सव्य हस्त ॥ दोन्हीं पाये दळ संहारित ॥
पाय छेदिले मग गडगडींत ॥ धडें विदारित वीरांचीं ॥ १४६ ॥
सवेंचि शिर उडविलें ॥ पार्थाचे कपाळीं आदळलें ॥
मूर्च्छा येऊन ते वेळे ॥ रथाखालीं पडियेला ॥ १४७ ॥
मूर्च्छा सांवरूनि पार्थ ॥ रथावरी वेगें चढत ॥
मग सुरथाचें शिर मदनतात ॥ तेव्हां देत गरुडापाशीं ॥ १४८ ॥
म्हणे प्रयागीं नेऊन सत्वर ॥ टाकीं हें सुरथाचें शिर ॥
जाह्नवींत अस्थि पडतां साचार ॥ स्वर्गी वास कल्पवरी ॥ १४९ ॥
मग तें शिर नेऊन ॥ प्रयागी टाकिता जाहला सुपर्ण ॥
तें नंदीनें उचलून ॥ शिवमाळेंत ओविलें ॥ १५० ॥
यावरी तो हंसध्वज ॥ युद्धा उठावला तेजःपुंज ॥
मग त्यावरी गरुडध्वज ॥ काय करिता जाहला ॥ १५१ ॥
रथाखालीं उतरोन ॥ चालिला चारी भुजा पसरून ॥
म्हणे सखया दे आलिंगन ॥ हंसध्वजा मम प्रिया ॥ १५२ ॥
हंसध्वज प्रेमेंकरून ॥ धांवोन धरी श्रीकृष्णचरण ॥
श्रीरंगें हृदयीं धरून ॥ समाधान करीतसे ॥ १५३ ॥
पुत्रशोक न करीं नृपति ॥ हंसध्वज पणे जगत्पति ॥
तुज देखतां जाहली तृप्ति ॥ न करीं खंती कांहींएक ॥ १५४ ॥
परिवारासमवेत कृष्णार्जुन ॥ हंसध्वजें राहविले पंचदिन ॥
श्यामकर्ण दिधला आणून ॥ साह्य आपण चालिला ॥ १५५ ॥
मग सर्व रायांस पुसोन ॥ गजपुरासी गेला रुक्मिणीरमण ॥
यावरी पुढें चालला श्यामकर्ण ॥ वीर संपूर्ण रक्षिती ॥ १५६ ॥
वारू होऊनि तृषाक्रांत ॥ मार्गी सरोवरीं जीवन प्राशित ॥
घोडा व्याघ्र जाहला अकस्मात ॥ आश्चर्य पार्थ करीतसे ॥ १५७ ॥
तेथें एक होता ऋषी ॥ तो सांगता जाहला पार्थासी ॥
म्हणे अकृतनामा तापसी ॥ येथें तप करित होता ॥ १५८ ॥
तो स्नान करितां पुण्यशील ॥ जलग्रहें ओढिला तत्काळ ॥
तेणें शापून तो कुटिल ॥ भस्म केला क्षणार्धे ॥ १५१ ॥
ऋषीनें शापिलें सरोवर ॥ जीवन प्राशितां होईल व्याघ्र ॥
मग हरिस्मरण पार्थवीर ॥ करितां विघ्न निरसलें ॥ १६० ॥
पूर्ववत जाहला श्यामकर्ण ॥ आणीक एके सरोवरीं जलप्राशन ॥
करितां घोडी जाहली जाण ॥ तेंही कारण ऐक पां ॥ १६१ ॥
तेथें पूर्वी तप करीत भवानी ॥ म्हणे येथें पुरुष येतो कोणी ॥
तत्काल होईल कामिनी ॥ अश्व म्हणोनि अश्विनी जाहला ॥ १६२ ॥
तेथें अर्जुने केलें शक्तिस्तवन ॥ पूर्ववत जाहला श्यामकर्ण ॥
पुढें जातां गहन ॥ स्त्रीराज्य देखिलें ॥ १६३ ॥
तेथें मुख्य स्त्री प्रमिला ॥ तिणें तो अश्वोत्तम धरिला ॥
बाहेर निघाला स्त्रियांचा मेळा ॥ नाना वहनीं आरूढोनि ॥ १६४ ॥
शस्त्रास्त्र कवचयुक्त ॥ पांच लक्ष स्त्रिया निघत ॥
पार्थाशीं प्रमिला बोलत ॥ करीं युद्ध आम्हांशीं ॥ १६५ ॥
कठिण लोहमुख बाण ॥ दुजे नयनकटाक्ष शर तीक्ष्ण ॥
पार्थें सोडितां मार्गण ॥ तो वाणी जाहली आकाशीं ॥ १६६ ॥
स्त्रियांस मारूं नये समरीं ॥ तरी तूं आतां ईस वरीं ॥
मग प्रमिलेनें ते अवसरीं ॥ माळ घातली पार्थातें ॥ १६७ ॥
पार्थ म्हणे मी व्रतस्थ ॥ तूं हस्तनापुरा जाई त्वरित ॥
मग लक्षस्त्रियांसहित ॥ प्रमिला गेली धर्म दर्शना ॥ १६८ ॥
राज्यांतील द्रव्य अपार ॥ हस्तनापूरा पाठविले समग्र ॥
पुढें छप्पन्न देशींचे नृपवर ॥ जिंकित पार्थ जातसे ॥ १६९ ॥
पुढे भीषणनामा असुर ॥ तीन कोटी सेना भयंकर ॥
त्याचा उपाध्याय दुराचार ॥ मेदू नाम तयाचें ॥ १७० ॥
नरांचीं आतडी वळून त्वरित ॥ केलें त्यांचें यज्ञोपवीत ॥
रक्ते राबिलीं वस्त्रें नेसत ॥ सिंदूर चर्चिला भाळीं ज्याचे ॥ १७१ ॥
तेणें घोडा धरून ॥ भीषणास भेटला जाऊन ॥
म्हणे तुझा पिता बक जाण ॥ पार्थाग्रजें मारिला ॥ १७२ ॥
तरी या पार्थासी मारूनि एधवां ॥ नरमेध अगत्य करावा ॥
दशग्रीवें हा याग बरवा ॥ पूर्वी केला होता पैं ॥ १७३ ॥
मग तो मेदू पुरोहित ॥ यज्ञमंडप सिद्ध करित ॥
म्हणे युद्धा जावें तुम्हीं समस्त ॥ जीवंत पार्थ धरूनि आणा ॥ १७४ ॥
तो एक राक्षसी पर्वतावरी चढोन ॥ पार्थचमू पाहे न्याहाळून ॥
तो ध्वजीं देखिला वायुनंदन ॥ राक्षसमर्दनकर्ता जो ॥ १७५ ॥
दोहीं हस्तीं शंख करित ॥ म्हणे पळा रे पळा असुर हो समस्त ॥
लंका जाळिली तो कृतांत ॥ वायुसुत आला असे ॥ १७६ ॥
तो एक असुरी बोलत ॥ कायसा काढिला तो हनुमंत ॥
आतां माझिया स्तनभारेंचि समस्त ॥ कटक बुडवीन पार्थाचे ॥ १७७ ॥
माझे स्तन म्यां टाकिले पाठीवरून ॥ मागें लोळत एक योजन ॥
दुजी म्हणे लंबायमान ॥ पांच योजनें माझे असती ॥ १७८ ॥
ऐशिया राक्षसी बहुत ॥ धांवल्या तेव्हां कुच भवंडित ॥
दळ आटिलें असंख्यात ॥ असुरी भिडती तीन कोटी ॥ १७९ ॥
पार्थासी म्हणे भीषण ॥ क्षणांत गजपुरी मी घेईन ॥
भीमाचें रक्त मी प्राशीन ॥ घेतों सूड पितयाचा ॥ १८० ॥
अनिवार राक्षसींचा मार ॥ देखोनि कोपला रुद्रावतार ॥
भारे बांधूनि असुरी समग्र ॥ आपटून मारिल्या ॥ १८१ ॥
यावरी असुरसंहार ॥ करीत वेगें राघवकिंकर ॥
भीषणरूपें धरी अपार ॥ वृक व्याघ्र सर्पादि ॥ १८२ ॥
मग तो कापट्यसागर ॥ माया एक निर्मून सत्वर ॥
होऊनि बैसला मुनीश्वर ॥ शिष्य वेद पढताती ॥ १८३ ॥
भोंवतें उद्यान परिकर ॥ सरोवरें भरलीं अपार ॥
रचिले समिधांचे भार ॥ अग्निहोत्रमंडप तेथें ॥ १८४ ॥
जैसा कक्षेस घालून पाश ॥ मैंद बैसे मार्गीं छायेस ॥
कीं वायस जाहला राजहंस ॥ चुना अंगास माखूनियां ॥ १८५ ॥
पार्थाशीं बोले मधुर ॥ आम्ही अग्निहोत्री येथें विप्र ॥
आम्हांसी पीडिती असुर ॥ दरिद्रें बहुत गांजियेलें ॥ १८६ ॥
आतां आम्हां भल्या ब्राह्मणां ॥ काय देतो जी गुरुदक्षिणा ॥
कापट्य कळलें अर्जुना ॥ चापावरी बाण योजिला ॥ १८७ ॥
भीषणाचें छेदिलें शिर ॥ शिष्य पळों लागले असुर ॥
पुच्छें झोडूनियां वायुकुमर ॥ धुमसूनियां मारिले ॥ १८८ ॥
कित्येक गांवांत गेले पळोन ॥ पुच्छें समग्र आणिले शोधून ॥
भारे समस्तांचे बांधोन ॥ आपटूनि मारिले ॥ १८९ ॥
मेदू उपाध्याय पळोन ॥ गेला यज्ञमंडप टाकून ॥
पार्थ तें नगर लुटून ॥ अपार संपत्ति भरियेली ॥ १९० ॥
यावरी तो श्यामकर्ण ॥ चालिला मणिपुराचा मार्ग लक्षून ॥
तेथें राज्य करी बभ्रुवाहन ॥ जो कां नंदन पार्थाचा ॥ १९१ ॥
तो आतां घोडा धरून ॥ अपार तेथें माजवील रण ॥
ते रसाळ कथा गहन ॥ श्रवण करोत पंडित ॥ १९२ ॥
जैमिनि सांगे जनमेजया ॥ पुढें कथा सुरस राया ॥
महापातकें जाती विलया ॥ क्षुद्रें अथवा प्रकीर्णें ॥ १९३ ॥
श्रीब्रह्मानंदा अव्यंगा ॥ श्रीधरवरदा पांडुरंगा ॥
रुक्मिणीहृदयारविंदभृंगा ॥ कथा रसिक बोलवीं ॥ १९४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेधपर्व जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणसाठाव्यांत कथियेला ॥ १९५ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि एकोनषष्टितमोऽध्यायः ॥ ५९ ॥
अध्याय एकोणसाठावा समाप्त
GO TOP
|