श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय अठ्ठावन्नावा
धर्मराजाचा अश्वमेध यज्ञ
श्रीगणेशाय नम: ॥
जय जय ब्रह्मानंदा यादवेंद्रा ॥ श्रीपांडुरंगनगरविहारा ॥
श्रीविठ्ठला रुक्मिणीवरा ॥ निर्विकार निर्द्वंद्वा ॥ १ ॥
सच्चिदानंदतनु सगुणा ॥ षड्गुणैश्वर्यसंपन्ना ॥
परमपुरुषा मधुसूदना ॥ आनंदघना जगद्गुरो ॥ २ ॥
मागें संपलें शांतिपर्व ॥ पुढें अश्वमेध अति अपूर्व ॥
व्यासशिष्य जैमिनिकृत सर्व ॥ रस सुरस बोलिला ॥ ३ ॥
जैमिनीनें केलें भारत ॥ व्यासें शापिलें तें समस्त ॥
अश्वमेध रसिक सत्य ॥ म्हणोनि वंद्य केला हा ॥ ४ ॥
रणीं पडले जे सर्व ॥ त्यांचा करूनियां आठव ॥
शोक करी धर्मराव ॥ म्हणे हें दैव कायसें ॥ ५ ॥
सर्वांमाजी निश्चितीं ॥ लागली कर्णाची फार खंती ॥
नेत्रांचे अश्रु न सांवरती ॥ म्हणे तपासी जाईन मी ॥ ६ ॥
तंव तेथें अकस्मात ॥ पातला सत्यवतीसुत ॥
पूजा करोनि समस्त ॥ धर्म दुःख सांगतसे ॥ ७ ॥
म्हणे स्थिरता नसे मना ॥ राज्य द्या तुम्ही भीमसेना ॥
मी जाईन तपोवना ॥ दुराचरण केलें म्यां ॥ ८ ॥
व्यास म्हणे ते अवसरीं ॥ धर्मा तूं अश्वमेध करीं ॥
पितृगण सर्व परत्रीं ॥ परम सुख पावतील ॥ ९ ॥
धर्म म्हणे नाहीं द्रव्यार्थ ॥ पृथ्वीचे राजे मारिले समस्त ॥
त्यांचे पुत्र बाळ अमित ॥ त्यांसी मागतां नये आतां ॥ १० ॥
पापद्रव्य घेऊनियां ॥ मग याग करावा कासया ॥
जैशी यात्रा नागवूनियां ॥ अन्नसत्र घातलें ॥ ११ ॥
गाई मारूनियां वाहाणा ॥ करोनि दिधल्या ब्राह्मणा ॥
कीं मोडूनियां सदना ॥ मंडप अंगणीं घातला ॥ १२ ॥
देवळांचे पाडून शिखर ॥ भोंवतें घातलें आवार ॥
कीं नेसावयाचें सोडूनि वस्त्र ॥ शिरीं जैसें गुंडाळिलें ॥ १३ ॥
तैसें प्रजांस पीडून ॥ व्यर्थ काय याग करून ॥
यावरी पराशरनंदन ॥ बोलता जाहला धर्मासी ॥ १४ ॥
पूर्वी मरुत्तराजा विख्यात ॥ तेणें याग केला अद्भुत ॥
विप्रांसी दक्षिणा अमित ॥ न नेववे ऐशी दिधली ॥ १५ ॥
मग कंटाळून विप्र ॥ द्रव्य टाकिलें अपार ॥
तें वित्त आणावें समग्र ॥ मग युधिष्ठिर बोलतसे ॥ १६ ॥
म्हणे तें द्रव्य आणितां जाण ॥ हांसती पृथ्वीचे ब्राह्मण ॥
व्यास म्हणे बहुत कठिण ॥ अश्वमेध असे धर्मा ॥ १७ ॥
वीससहस्त्र ब्राह्मणां ॥ आधीं घालावे अनुष्टाना ॥
आरंभीं काय द्यावी दक्षिणा ॥ तेंही ऐक अनुक्रमें ॥ १८ ॥
एकेकास सव्वामण सोनें ॥ एक पायली दिव्य रत्नें ॥
एक घोडा एक गज त्यांकारणें ॥ वस्त्रालंकारें देइजे ॥ १९ ॥
आपण वर्षपर्यंत ॥ असावें बहु व्रतस्थ ॥
भोग भोगावे समस्त ॥ परी स्त्री वर्ज करावी ॥ २० ॥
एकशयनीं निजावें तत्त्वतां ॥ परी संग न करावा सर्वथा ॥
ऐसें व्रत हें नृपनाथा ॥ आचरतां बहु कठिण ॥ २१ ॥
अश्व पाहिजे श्यामकर्ण ॥ मूत्र पुरीष करी जेथें जाण ॥
सहासहस्त्र गोदान ॥ विधियुक्त तेथें करावीं ॥ २२ ॥
धर्म म्हणे परम कठिण ॥ सर्व चमू गेली आटोन ॥
मग म्हणे पराशरनंदन ॥ साह्य श्रीकृष्ण तुज आहे ॥ २३ ॥
भद्रावती नगरीं जाण ॥ यौवनाश्व राजा बळगहन ॥
त्याचे घरीं श्यामकर्ण ॥ सुलक्षण बहु असे ॥ २४ ॥
दहा अक्षौहिणी सेना रक्षित ॥ वायूस नव्हे प्रवेश तेथ ॥
तो अश्व आणाल अकस्मात ॥ तरीच कार्यार्थ सर्व साधेल ॥ २५ ॥
भीम म्हणे मी आणीन ॥ तों बोले वृषकेत कर्णनंदन ॥
मी समागमे येईन ॥ विभांडीन सर्व सेना ॥ २६ ॥
काळास मारीन समरांगणीं ॥ पालथी घालीन हे कुंभिनी ॥
मेरु मंदार फोडूनी ॥ स्वर्ग पाडीन खालता ॥ २७ ॥
धर्म भीमांस म्हणे तत्त्वतां ॥ अश्वमेध आरंभावा आतां ॥
मी उतराई होईन तत्त्वतां ॥ वडिलांचें कांहींएक ॥ २८ ॥
ऐसें बोलतो वृषकेत पूर्ण ॥ धर्मभीमांस आठवला कर्ण ॥
मग वृषकेतास हृदयीं धरून ॥ धर्मराव शोक करी ॥ २९ ॥
षोडश वर्षांचा वृषकेत ॥ तेजें केवळ दुजा आदित्य ॥
धर्म म्हणे बा रे तुझा तात ॥ आम्हीं मारिला समरांगणीं ॥ ३० ॥
वृषकेत म्हणे जो धर्मद्वेष करी ॥ जो दुष्टांचा साहाकारी ॥
बरा मारिला तो समरीं ॥ हरिप्रियद्वेषिया तो ॥ ३१ ॥
क्षत्रिय होता सबळ ॥ परि अकीर्तीनें भरिले भूमंडळ ॥
तरी तो डाग काढीन समूळ ॥ श्यामकर्ण आणीन मी ॥ ३२ ॥
ऐकोनि वृषकेताचें वचन ॥ हृदयीं धरी तया भीमसेन ॥
तो घटोत्कचपुत्र मेघवर्ण ॥ येऊनियां बोलतसे ॥ ३३ ॥
म्हणे मी आणि वृषकेत ॥ गगनपंथें जाऊन अकस्मात ॥
श्यामकर्ण आणू त्वरित ॥ पाहा पुरुषार्थ बाळकांचा ॥ ३४ ॥
दोघे म्हणती भीमासी ॥ तुम्हीं असावें आमुचे पाठीशीं ॥
धर्म म्हणे हृषीकेशी ॥ आलियाविण हें कार्य नोहे ॥ ३५ ॥
मग धर्में करितांच ध्यान ॥ तत्काळ प्रकटला भगवान ॥
नमूनि श्रीरंगाचे चरण ॥ पूजा करी आदरें ॥ ३६ ॥
जय जय यदुकुलदिनेशा ॥ निजभक्तरक्षका द्वारकानिवासा ॥
कैवल्यदायका परमपुरूषा ॥ भक्तवत्सला जगद्गुरो ॥ ३७ ॥
तुवां जे उपकार केले जगज्जीवना ॥ न वर्णवती सहस्रवदना ॥
धर्म म्हणे रुक्मिणीरमणा ॥ वेदपुराणां वंद्य तूं ॥ ३८ ॥
म्हणे व्यासदेव येथें आले ॥ अश्वमेध करा इतुकें सांगीतलें ॥
यावरी पद्यनाभ बोले ॥ कठिण कार्य धर्मा हें ॥ ३९ ॥
कित्येक राजे बळवंत ॥ युद्धास आले नाहीं येथ ॥
कौरवपांडवसेना समस्त ॥ नाहीं दृष्टींत धरिली तिहीं ॥ ४० ॥
घोडा कैंचा श्यामकर्ण ॥ मग धर्मराज बोले वचन ॥
यौवनाश्वाचे घरीं जाण ॥ वारू असे सुलक्षण ॥ ४१ ॥
प्रतिज्ञा बोलतो भीमसेन ॥ क्षणांत वारू मी आणीन ॥
विश्वव्यापक मनमोहन ॥ विनोदेंकरून हांसत ॥ ४२ ॥
भीमाची बुद्धि साचार ॥ जड असे बहु आहार ॥
तूं नायकें याचा विचार ॥ स्थूलोदर अत्यंत हा ॥ ४३ ॥
श्वशुरगहीं करणार वास ॥ ज्यास निद्रा रात्रंदिवस ॥
शिळे अन्न भक्षी सावकाश ॥ बुद्धि त्यास असेना ॥ ४४ ॥
हांसोन बोले वृकोदर ॥ हरि तुजइतुकें कोण खाणार ॥
गोकुळी चोरी केली फार ॥ पूतना शोषिली दुग्धमिषें ॥ ४५ ॥
तुझें पोट थोर अत्यंत ॥ मातेसी विश्व दाखविलें मुखांत ॥
द्वादश गावे अग्नि अद्भुत ॥ तुवां गिळिला स्थूलोदरा ॥ ४६ ॥
शेवटीं ब्रह्मांड गिळिशी समग्र ॥ तरी भूक न जाय साचार ॥
विश्व तुझे उदरांत सर्वत्र ॥ स्थूलोदर तूंचि पैं ॥ ४७ ॥
श्वशुरगृहीं सावकाश ॥ क्षीराब्धींत करिसी वास ॥
आस्वलीं स्त्री केली निःशेष ॥ नानावेषधारका ॥ ४८ ॥
तूं मासा कांसव डुकर ॥ तूं नरसिंह पोट फाडणार ॥
बलीचे गृही तूंचि भीक मागणार ॥ छेदिलेंसी शिर मातेचें ॥ ४९ ॥
स्त्री नेली तुझी वनीं चोरे ॥ गोकुळी उपजतां राखिलीं गुरे ॥
स्त्रीचे बुद्धीनें वर्तसी खरें ॥ पारिजातकहरणवेळे ॥ ५० ॥
तूंचि आमुची सोय राखणार ॥ परात्पर सोयरा साचार ॥
तुझ्या बळें कौरवचमूसागर ॥ अगस्ति होऊन प्राशिला आम्हीं ॥ ५१ ॥
आतां यावरी अश्वमेध ॥ सिद्धीस पावविसी तूं ब्रह्मानंद ॥
आमुचे कष्ट नाना खेद ॥ तुवां सोशिले निजांगें ॥ ५२ ॥
सबळ काष्ठ भ्रमर कोरी ॥ परी कमल रक्षी नानापरी ॥
तैसी प्रीति भक्तांवरी ॥ माउली होऊन रक्षिसी त्यां ॥ ५३ ॥
तिळमात्र पाषाण ॥ जळी न तरे जाय बुडोन ॥
परी जळ काष्ठ तारी पूर्ण ॥ आपण वाढविलें म्हणोनियां ॥ ५४ ॥
त्या काष्ठांच्या नौका होती ॥ स्वसंगें तारिती आणिकांप्रती ॥
हा जीवनीं अभिमान निश्चितीं ॥ विश्वव्यापका जगजीवना ॥ ५५ ॥
तैसें तुवांचि वाढविलें आम्हां ॥ आतां काय बुडविशी पुरुषोत्तमा ॥
यज्ञ करून मेघश्यामा ॥ तुजचि शेवटीं अर्पावा ॥ ५६ ॥
असो यावरी प्रातःकालीं ॥ नमून धर्म वनमाली ॥
तिघे सिद्ध जाहले ते कालीं ॥ वृषकेत भीम मेघवर्ण ॥ ५७ ॥
कुंती द्रौपदी सुभद्रेस पुसोन ॥ पायीं चालले तिघे जण ॥
गिरिकंदरें ओलांडून ॥ पवनवेगें जाती पैं ॥ ५८ ॥
भद्रावतीस पातले तिघे जण ॥ ग्रामाचे पाठीसी पर्वत चढोन ॥
गुप्तरूपें करून ॥ विलोकिती नगरातें ॥ ५९ ॥
अयोध्या कीं द्वारका सुंदर ॥ तैसेंच दिसे भद्रावती नगर ॥
तेथींचि रचना पाहतां सुर नर ॥ परम सौख्य मानिती ॥ ६० ॥
असो ते तिघे लपोन ॥ पाहती नगरांत विलोकून ॥
तो जल पाजावया श्यामकर्ण ॥ बाहेर काढिला यौवनाश्वें ॥ ६१ ॥
घोडा रक्षति दहासहस्त्र दळ ॥ वाद्यें वाजों लागलीं तुंबळ ॥
गजांचा थाट सबळ ॥ वारू रक्षिती सभोंवते ॥ ६२ ॥
व्यूह रचिलासे बळकट ॥ वायूस तेथें न फुटे वाट ॥
केशरें चर्चिलासे सुभट ॥ वस्त्राभरणीं पूजिलासे ॥ ६३ ॥
वारूपुढें धूप जळत ॥ नृत्यांगना बहु नाचत ॥
तो मेघवर्णे अकस्मात ॥ उडी त्यांत घातली ॥ ६४ ॥
निमिष न लागतां श्यामकर्ण ॥ गगनमार्गे नेला उचलोन ॥
जैशी चपळा रूप दाखवून ॥ गुप्त होय अंतरिक्षी ॥ ६५ ॥
शरीरांतून जाय प्राण ॥ जवळियासी नव्हे दृश्यमान ॥
तैसा मेघवर्णे श्यामकर्ण ॥ नेला सर्वां न कळतां ॥ ६६ ॥
जाहला एकचि हाहाकार ॥ अष्टदिशांनीं धांवती दळभार ॥
मग तो कर्णपुत्र महावीर ॥ वर्षत शर पुढें आला ॥ ६७ ॥
वय लहान अति सुंदर ॥ जैसा केवळ रघुवीर ॥
सिंहनादें गर्जोन समग्र ॥ केले भार उभे तेथें ॥ ६८ ॥
वारू धरिला तो मी येथें असें ॥ कां रे धांवतां वेडियांऐसे ॥
युद्ध करा पाहों कैसें ॥ शूरत्व तुमचें यावरी ॥ ६९ ॥
ऐसें बोलोन वृषकेतें ॥ दळ जर्जर केलें शरपंथें ॥
जैसें सुटतां चंडवाते ॥ जलदजाल विध्वंसिजे ॥ ७० ॥
कित्येक कृष्णनामेंकरून ॥ दोष जाती दग्ध होऊन ॥
कीं प्रकटतां दिव्यज्ञान ॥ मायाआवरण निरसे जेविं ॥ ७१ ॥
तैसा तो वीर प्रतिकर्ण ॥ असंख्य दळ टाकी संहारून ॥
यौवनाश्व आश्चर्य करी पूर्ण ॥ म्हणे तिघे जण दिसती हे ॥ ७२ ॥
एकें धरिला श्यामकर्ण ॥ एकें दळ टाकिलें संहारून ॥
एक उगाच पाहे दुरोन ॥ भीमसेनासम दिसे ॥ ७३ ॥
ऐसें देखतां यौवनाश्व ॥ तो बोहरी केली सेनेस ॥
पाहों आला अमरेश ॥ युद्ध कोण करीतसे हा ॥ ७४ ॥
देखून वृषकेताचें युद्ध ॥ सूर्यास वाटला परमानंद ॥
इंद्रादि वृंदारकवृंद ॥ आश्चर्य करिती युद्धाचें ॥ ७५ ॥
म्हणती हें बाळक कोमळ ॥ युद्ध माजविलें परम तुंबळ ॥
अमर्याद पाडिलें दळ ॥ रक्तापगा वाहविल्या ॥ ७६ ॥
शस्त्र उचलतां कोणी ॥ ते भज टाकिले छेदूनी ॥
यावरी यौवनाश्व क्रोधेंकरूनी ॥ समोर युद्धास पातला ॥ ७७ ॥
तो भीम धांवला त्वरित ॥ देखोनी बोले वृषकेत ॥
सेना वधू माझी निश्चित ॥ इयेसी स्पर्श न करावा ॥ ७८ ॥
इजपासाव यशनामा अद्भुत ॥ होईल पाहा आतां सुत ॥
तो तुम्हांस भेटवीन त्वरित ॥ खेळवा मग महासुखें ॥ ७९ ॥
बाणमुखेकरून ॥ तीस होतें चुंबन ॥
ध्वज झळकती कनकवर्ण ॥ तोचि पल्लव तियेचा ॥ ८० ॥
हे युद्धसुरतीं न तगे जाण ॥ पळेल धैर्यवस्त्र टाकून ॥
इचे स्तन दोन्ही प्रधान ॥ रगडीन पहा यावरी ॥ ८१ ॥
श्रृंगारून आली बहुत ॥ परी उठोन पळेल क्षणांत ॥
ऐसें ऐकोनि घटोत्कचतात ॥ उगाच राहिला ते वेळीं ॥ ८२ ॥
यावरी तो कर्णकुमार ॥ रणमदें जाहला कामातुर ॥
सेनावधू केली जर्जर ॥ युद्धसुरतीं तगेना ॥ ८३ ॥
पितामह सूर्यनारायण ॥ वृषकेतु करी तयाचें स्तवन ॥
म्हणे जनकजनका तुजविण ॥ यश कोण देईल येथें ॥ ८४ ॥
ऐसा तो वीर वृषकेत ॥ सेनेमाजी एकला तळपत ॥
परी कोणास नाटोपे तेथ ॥ विद्युल्लतेसारिखा ॥ ८५ ॥
यौवनाश्व म्हणे बाळा अवधारीं ॥ रथ देतों बैसोन युद्ध करीं ॥
तूं नाम गोत्र पिता यावरी ॥ सांग वंश कोण तो ॥ ८६ ॥
मग बोले वृषकेत ॥ मी प्रतिपांडव विख्यात ॥
कुंतीउदरीं माझा तात ॥ सूर्यवीर्ये जन्मला ॥ ८७ ॥
पांडव चुलते विख्यात ॥ पांडवकुलवर्धन मी वृषकेत ॥
परी तूं युद्ध सोडून मात ॥ काय व्यर्थ पूससी ॥ ८८ ॥
अश्वमेधास नेतों श्यामकर्ण ॥ तुझा नलगे मजला स्यंदन ॥
तूं वृद्ध मी बाळक जाण ॥ युद्ध करीं पाहूं आतां ॥ ८९ ॥
आम्हीं आहों कृष्णोपासक ॥ पाहा समरीं आजि कोतुक ॥
मग संहारिलें सर्व कटक ॥ आपणास सायक न लागतां ॥ ९० ॥
यौवनाश्व सोडी बाण ॥ ते वृषकेत टाकी छेदून ॥
जैशी पाखंडियाचीं वचनें जाण ॥ पंडित खंडी एका शब्दें ॥ ९१ ॥
अवघें कटक बाणीं ॥ वृषकेतें खिळिलें ते क्षणीं ॥
यौवनाश्वाचा रथ रणीं ॥ छेदोनि ध्वज पाडिला ॥ ९२ ॥
मग यौवनाश्व आणिके रथीं ॥ बैसोनि शर सोडी त्वरितगतीं ॥
असंख्य शस्त्रें टाकून कर्णजाप्रती ॥ खिळिलें तेणें समरांगणीं ॥ ९३ ॥
क्षणैक मूर्च्छा येऊन ॥ खालीं पडला कर्णनंदन ॥
मग उठिला भीमसेन ॥ म्हणे सुनेस शिक्षा करूं ॥ ९४ ॥
वीज पडे अकस्मात ॥ ऐसा धांवला वायुसुत ॥
पळतो गज पायीं धरित ॥ ते आपटी आणिकावरी ॥ ९५ ॥
गदाघायेकरून जाण ॥ दळ टाकिलें संहारून ॥
तो यौवनाश्वाचा नंदन ॥ सुवेग धांवला भीमावरी ॥ ९६ ॥
तेही गदा घेतली ॥ युद्ध करिती महाबळी ॥
चार घटिका ते काळीं ॥ गदायुद्ध माजलें ॥ ९७ ॥
भीम गज भिरकावित ॥ तेच परतोन सुवेग टाकित ॥
इकडे सावध होऊन वृषकेत ॥ यौवनाश्वाशीं युद्ध करी ॥ ९८ ॥
कर्णनंदनें अनिवार ॥ यौवनाश्व केला जर्जर ॥
मूर्च्छा येऊन तो उपवर ॥ ध्वजस्तंभीं टेकला ॥ ९९ ॥
त्याचे रथावरी चढोन ॥ जवळी गेला कर्णनंदन ॥
त्या रायावरी पदरेंकरून ॥ वारा घाली वृषकेत ॥ १०० ॥
नवस करी वृषकेत ॥ म्हणे श्रीकृष्ण धांव पाव त्वरित ॥
पुण्यवंत हा नृपनाथ ॥ वांचो एकदां ये वेळे ॥ १०१ ॥
यौवनाश्व पाहे सावध होऊन ॥ तो जवळी देखे कर्णनंदन ॥
मग तेणें बाहू पसरून ॥ हृदयीं दृढ आलिंगिला ॥ १०२ ॥
त्यावरी राजा धांवोन ॥ दृढ आलिंगिला भीमसेन ॥
भेटला मेघवर्ण येऊन ॥ श्यामकर्णासमवेत ॥ १०३ ॥
यौवनाश्वें आपली कन्या निश्चितीं ॥ लावण्यगंगा नाम प्रभावती ॥
वृषकेतास दिधली प्रीतीं ॥ चारी दिवस संपादिले ॥ १०४ ॥
आणोन संपत्ति अपार ॥ पूजिला मेघवर्ण वृकोदर ॥
आंदणाने दिधलें दळभार ॥ सिद्ध करून चालिला स्वयें ॥ १०५ ॥
साह्य चालिला उपवर ॥ सवें कुटुंब घेतलें समग्र ॥
सहस्त्रस्तंभांचें शिबिरे ॥ राहावया घेत समागमें ॥ १०६ ॥
देवसेन प्रधानासहित ॥ गजपुरा चालिला नृपनाथ ॥
बंधूंसमवेत धर्म येत ॥ यौवनाश्वासी सामोरा ॥ १०७ ॥
अगोदरचि मनमोहन ॥ गेला होता द्वारकेलागून ॥
असो धर्मरायें देखिला श्यामकर्ण ॥ भीमे वर्तमान सांगितलें ॥ १०८ ॥
मग धर्म धांवोनि त्वरित ॥ डोळा आणिले अश्रुपात ॥
वृषकेतास हृदयीं धरित ॥ कर्णबंधु आठवूनि ॥ १०९ ॥
भीम म्हणे राया धर्मा ॥ कीजे केली युद्धीं सीमा ॥
तो यौवनाश्व धरोनि प्रेमा ॥ पांडवांसी आलिंगी ॥ ११० ॥
असो सुमुहूर्त काढिला पूर्ण ॥ चैत्रमासीं पौर्णिमेस जाण ॥
पृथ्वीवरी श्यामकर्ण ॥ सोडावा हा निश्चय जाहला ॥ १११ ॥
यावरी धर्म म्हणे भीमसेना ॥ तूं वेगें जाऊन द्वारकाभवना ॥
सहकुटुंब जगन्मोहना ॥ घेऊन येई यागासी ॥ ११२ ॥
वसुदेव रेवतीरमण ॥ उद्धव अक्रूर उग्रसेन ॥
छप्पन्न कोटी यादव संपूर्ण ॥ कुटुंबासहित आणावे ॥ ११३ ॥
षोडशसहस्त्र कामिनी ॥ रुक्मिणी मुख्य विश्वजननी ॥
एवं भीमा अवघ्यांस आणीं ॥ रक्षण ठेवणें द्वारके ॥ ११४ ॥
आला द्वारके भीमसेन ॥ प्रवेशला श्रीकृष्णभवन ॥
तो अंतरगृहीं जगज्जीवन ॥ भोजनास बैसला ॥ ११५ ॥
चौसष्ट वाट्या झळकत ताट ॥ देवकी माय स्वयें वाढित ॥
मुख्य नायिका चवरे ढाळित ॥ रुक्मिणी दावी पदार्थ कृष्णा ॥ ११६ ॥
यशोदा जे नंदराणी ॥ तेही होती द्वारकाभुवनीं ॥
ते नानापदार्थ भोजनीं ॥ आणोनियां पुरवित ॥ ११७ ॥
बाहेर बैसला वृकोदर ॥ विनोदें बोलत सर्वेश्वर ॥
म्हणे आला तो स्थूलोदर ॥ तो येथें येऊं देऊं नका ॥ ११८ ॥
गर्जोनि बोले वृकोदर ॥ काय तुझें पिकले नाहीं राष्ट्र ॥
किंवा दुष्काळ पडला अपार ॥ पोट तुझें भरेना ॥ ११९ ॥
मजला टाकून बाहेरी ॥ तूं जेवितोसी गृहांतरी ॥
भुरके तरी हळू मारीं ॥ लोक नगरीं दचकती ॥ १२० ॥
फेण्या पापड मोडिशी क्षणोक्षणीं ॥ ते मज ऐकों येताती श्रवणी ॥
गोकुळी ताक कण्या खाऊनी ॥ उच्छिष्ट भक्षिसी गोवळ्यांचे ॥ १२१ ॥
दधि दुग्ध धृत लोणी ॥ तुवा भक्षिलें चोरूनी ॥
जेवून लौकर चक्रपाणि ॥ बाहेर न येशी अजूनि कां ॥ १२२ ॥
सुईचे वेजाहून ॥ तुझा गळा आहे बहु लहान ॥
मुसळ गळां टोचून ॥ थोर न केला सुइणीनें ॥ १२३ ॥
त्या सुइणीनें छेदावें नासिक ॥ तुझा गळा कां केला बारिक ॥
कीं माझे गदेनें तरी देख ॥ कंठ तुझा थोर करूं ॥ १२४ ॥
कीं बलभद्राचा नांगर सदट ॥ तेणें तुझा गळा करूं नीट ॥
तो न बोले वैकुंठपीठ ॥ म्हणे काय घास अडकला ॥ १२५ ॥
गदा घालोनि मानेवरी ॥ घांस काढू काय बाहेरी ॥
पर्वतासह धरित्री ॥ गिळिशी मज वाटतें ॥ १२६ ॥
मी दुरूनि आलों बहुवस ॥ माझाही करिशील काय ग्रास ॥
एकदा चाल गजपुरास ॥ याचें उसणें घेईन मी ॥ १२७ ॥
मज येथें गिळिशी श्रीपति ॥ तरी सुभद्रा द्रौपदी हांसती ॥
तुज राक्षस नांव ठेविती ॥ न म्हणती देव कोणीही ॥ १२८ ॥
मग श्रीकृष्ण म्हणे भीमसेना ॥ आतां येई करीं भोजना ॥
भीम म्हणे मी आतां येईना ॥ गिळिशी मज मी काय करूं ॥ १२९ ॥
गदगदां हांसे चक्रपाणी ॥ खरकटीं उरलीं धुवोनी ॥
तीं उगीच खाई येऊनी ॥ आलास कोठून वर्हाडिया ॥ १३० ॥
मग बाहेरी येऊनि मोक्षदानी ॥ भीम नेला अंतरसदनीं ॥
वृकोदर बोले हासोनी ॥ आंत नेऊन गिळिसी काय ॥ १३१ ॥
द्वादश गावे अग्न ॥ तुवां गिळिला मुख पसरून ॥
पूतना मारिली शोधून ॥ तुझें भय मज वाटतसे ॥ १३२ ॥
एवढा अश्वमेध होऊं दे वनमाळी ॥ मग तूं सगळा मज गिळीं ॥
ऐसा विनोद ऐकोन ते वेळीं ॥ हांसती सकळ अष्टनायिका ॥ १३३ ॥
मग भीमास विस्तारोनन ताट ॥ भोजन दिधलें यथेष्ट ॥
विनोदे बोले वैकुंठपीठ ॥ फुटेल पोट पुरे करीं ॥ १३४ ॥
भीम म्हणे तूं बाहेर जाई आतां ॥ मज तूं गिळिशील अवचितां ॥
आमुचें कुळ त्वां आटिलें अच्युता ॥ आम्हांहीभोंवता लागलासी ॥ १३५ ॥
भोजन करूनि भीमसेन ॥ श्रीरंगाचे धरी दृढ चरण ॥
म्हणे निघा सर्व कुटुंब घेऊन ॥ धर्मराज वाट पाहे ॥ १३६ ॥
तो गमनसंकेतभेरी ॥ ठोकिल्या दूतीं ते अवसरीं ॥
तत वितंत घनसुस्वरीं ॥ वाद्यें वाजलीं चतुर्विध ॥ १३७ ॥
आपले कुटुंबासहित सर्व ॥ छप्पन्न कोटी निघाले यादव ॥
षोडशसहस्त्र पाहावया उत्साह ॥ कृष्णललना निघाल्या ॥ १३८ ॥
सोळासहस्त्र अष्टोत्तरशता ॥ वहनारूढ तेव्हां निघत ॥
ज्यांच्या वहनांपुढें धांवत ॥ सहस्त्रावधि वेत्रपाणी ॥ १३९ ॥
एकलक्ष साठसहस्त्र ॥ सर्व निघाले कृष्णकुमार ॥
तितुक्यांच्या स्त्रिया समग्र ॥ वहनारूढ निघाल्या ॥ १४० ॥
धर्मास अर्पावया अहेर ॥ वीससहस्त्र मत्त कुंजर ॥
द्रव्य वस्त्रें अलंकार ॥ भरोनियां घेतले ॥ १४१ ॥
कित्येक देशींचे भूभुज ॥ सवें निघाले तेजःपुंज ॥
असंख्य त्यांचे झळकती ध्वज ॥ विद्युल्लतेसारिखे ॥ १४२ ॥
द्वारकेत होते ऋषींचे भार ॥ वहनीं बैसवूनि समग्र ॥
संगे घेऊन श्रीधर ॥ गजरें भार चालिले ॥ १४३ ॥
निजरथीं वैकुंठनाथ ॥ गरुडध्वज प्रतापार्क बैसत ॥
श्रुति माथा खालीं करूनि पाहत ॥ स्वरूप त्याचें वर्णितां ॥ १४४ ॥
श्रीकृष्णाभोंवतीं दाटी अपार ॥ त्रिकाल दर्शना टपती सुरवर ॥
त्यांच्या माथां उडती वेत्र ॥ तेथें पाड काय इतरांचा ॥ १४५ ॥
एकलक्ष साठसहस्त्र कुमार ॥ पौत्रं कन्या संतति अपार ॥
एककोटी साचार ॥ कृष्णसंतति जाणिजे ॥ १४६ ॥
सवें निघाले बाजार ॥ अष्टादश जाती उदीम करणार ॥
बंदिजन गर्जती अपार ॥ गजारूढ होऊनियां ॥ १४७ ॥
वसुदेव बलराम उग्रसेन ॥ मागें द्वारकेस ठेविले रक्षण ॥
निजभारेंसीं रुक्मिणीरमण ॥ कुंजरपुरा चालिले ॥ १४८ ॥
तो पद्मनाभें पद्मिनी ॥ सरोवरीं देखिल्या ते क्षणीं ॥
रुक्मिणीप्रति कैवल्यदानी ॥ सुहास्यवदनें बोलत ॥ १४९ ॥
अहो पद्याक्षिया पद्मिनी ॥ तमहारक भ्रतार टाकूनी ॥
भ्रमराहातीं दिनरजनीं ॥ शरीर कैशा भोगविती ॥ १५० ॥
यावरी मृगशावाक्षी बोलत ॥ मिलिंदबालकास स्तन देत ॥
रात्रीं वश जाहल्या आदित्य ॥ न पाहे सत्य करस्पर्शे ॥ १५१ ॥
मग मिलिंदबाळे घेऊनी ॥ निद्रित जाहल्या पद्मिनी ॥
हरि म्हणे कंपित क्षणोक्षणीं ॥ होती केवि सांग पां ॥ १५२ ॥
भ्रतारवियोगें सत्य ॥ क्षणक्षणां होती कंपित ॥
धर्मसंतान भ्रमर गुप्त ॥ स्तनीं लावून झांकिले ॥ १५३ ॥
ऐकोन रुक्मिणीचें वचन ॥ परम संतोषला मधुसूदन ॥
हृदयीं तियेस आलिंगून ॥ समाधान करी तिचें ॥ १५४ ॥
धर्मास जाणविती दूत ॥ समीप आले द्वारकानाथ ॥
यौवनाश्वासहित कुंतीसुत ॥ सामोरा येत हरीतें ॥ १५५ ॥
मिरवत श्यामकर्ण आणिला ॥ श्रीहरीलागीं दाखविला ॥
द्रौपदी सुभद्रादि स्त्रिया सकळा ॥ सामोर्या येती रुक्मिणीतें ॥ १५६ ॥
नमन आलिंगन देख ॥ परस्परें देती सुख ॥
षोडशसहस्त्र कामिनींसी हरिख ॥ द्रौपदीस भेटतां ॥ १५७ ॥
सत्यभामा पांचाळीस भेटोन ॥ पुसतसे एकांतीं नेऊन ॥
पांच जणही पंडुनंदन ॥ वश तुज सर्वदा ॥ १५८ ॥
यावरी मनमोहन हृषीकेश ॥ तोही तुवां केला वश ॥
सर्वदा हृदयीं धरित्येस ॥ रात्रंदिवस न विसंबसी ॥ १५९ ॥
आम्ही षोडशसहस्त्र कामिनी ॥ आमुच्याने वश नव्हे चक्रपाणी ॥
तूं एकली होऊनी ॥ मोहन सर्वांसीं घातलें ॥ १६० ॥
तरी तें वशीकरण सकळी ॥ मज तूं शिकवीं पांचाळी ॥
यावरी ते चातुर्यसरोवरमराळी ॥ प्रत्युत्तर काय देत ॥ १६१ ॥
तुझें निर्मळ नाहीं अंतर ॥ वाढविशी सवतीमत्सर ॥
परमात्मा पूर्ण श्रीधर ॥ त्याशीं भेद करिशी तूं ॥ १६२ ॥
षड्विकाररहित आदिपुरूष ॥ त्यासी तूं भाविसी गे मनुष्य ॥
जो अतर्क्य वेदशास्त्रांस ॥ त्याचें दान तुवां केलें ॥ १६३ ॥
दीनदयाळ माझा बंधु ॥ कौरवसभेसी पडला दुष्ट संबंधु ॥
वस्त्रांचे पर्वत कृपासिंधु ॥ मज पुरविता जाहला ॥ १६४ ॥
रुक्मिणी केवळ ज्ञानकळा ॥ जे प्रणवरूपिणी वेल्हाळा ॥
तिशीं तुवां मत्सर मांडिला ॥ महिमा अपार नेणोनि ॥ १६५ ॥
नारद वेडा म्हणोन ॥ परतोन तुज दिधला श्रीकृष्ण ॥
तूं अभाविक सदा मलिन ॥ तुजला वश कोण होय ॥ १६६ ॥
अंतरीं निर्मळ भाविक जाण ॥ त्यासी वश होईल त्रिभुवन ॥
अभाविकां स्वप्नीही पूर्ण ॥ सुख नाहीं तत्त्वतां ॥ १६७ ॥
ऐसें बोलतां पांचाळी ॥ सत्यभामा उगी राहिली ॥
यावरी रति उखादि सकळी ॥ वंदिती येऊन द्रौपदीतें ॥ १६८ ॥
देवकी यशोदा सकळ ॥ रुक्मिणीआदि कृष्णस्त्रिया वेल्हाळ ॥
तिहीं श्यामकर्ण तत्काळ ॥ पहावया आणविला ॥ १६९ ॥
पूजोन वंदिती श्यामकर्ण ॥ तंव उदेलें महाविघ्न ॥
शाल्वबंधु अनुशाल्व जाण ॥ तेणें धाडी घातली ॥ १७० ॥
पात्यास पातें न लागतो जाण ॥ इतुक्यांत नेला श्यामकर्ण ॥
दळभार सिद्ध करून ॥ उभा ठाकला संग्रामा ॥ १७१ ॥
स्वसैन्यासी करी आता ॥ जो न धरील मेघश्यामा ॥
त्यास दंडीन हे प्रतिज्ञा ॥ कदा जगज्जीवन न सोडावा ॥ १७२ ॥
इकडे पांडवदळीं जगज्जीवन ॥ तेणें भारेंशीं प्रेरिला मदन ॥
म्हणे घेऊन येईं श्यामकर्ण ॥ अनुशाल्वासमवेत ॥ १७३ ॥
वृषभभारे सन्मुख देखोन ॥ विचार न करी पंचानन ॥
तैसा श्रीकृष्णनंदन ॥ निजभारेंशी धावला ॥ १७४ ॥
अनुशाल्व आणि मन्मथ ॥ युद्ध करिती तेव्हां अद्भुत ॥
परस्पर वर्में बोलत ॥ बाण सोडीत आवेशें ॥ १७५ ॥
युद्ध जाहले अत्यंत ॥ रुक्मिणीतनय पडला मूर्च्छित ॥
युद्धांतून परतविला रथ ॥ सैन्य पळत मदनाचें ॥ १७६ ॥
मदनाचा पराजय देखोन ॥ लज्जित जाहला जगज्जीवन ॥
धिक्कारिला मीनकेतन ॥ म्हणे वांचून व्यर्थ तूं ॥ १७७ ॥
काळें वदन घेऊन ॥ राहें काननामाजी जाऊन ॥
अनुशाल्वानें तुझा प्राण ॥ कां न घेतला रणामाजी ॥ १७८ ॥
भीम म्हणे हृषीकेशी ॥ कां बोलसी व्यर्थ मदनासी ॥
काळयवनापुढें पळालासी ॥ लपालासी विवरांत ॥ १७९ ॥
मग गदा घेऊन वृकोदर ॥ करी अनुशाल्वदळाचा संहार ॥
पाडिलें दळ अपार ॥ रक्तगंगा धांवती ॥ १८० ॥
कृतांतापरी हांक देत ॥ रथारूढ धांवला वृषकेत ॥
भीमासी म्हणे हो हो तात ॥ माझा वचनार्थ ऐकावा ॥ १८१ ॥
सेना हें फळ निश्चित ॥ लेकराने केलें हस्तगत ॥
तें वडिलीं घ्यावें हें उचित ॥ भीम बोलत तयासी ॥ १८२ ॥
सेनाफळ कठिण निश्चितीं ॥ मऊ करून देतों तव हातीं ॥
असो वृकोदरें बहुहस्ती ॥ संहारिले तेधवां ॥ १८३ ॥
अनुशाल्वानें बाणें अद्भुत ॥ भीम पाडिला मूर्च्छागत ॥
मग रथारूढ मदनतात ॥ शर वर्षत धाविन्नला ॥ १८४ ॥
अनुशाल्व म्हणे ते अवसरीं ॥ माझा शाल्व बंधु निर्धारीं ॥
कृष्णा त्वां मारिला समरीं ॥ त्याचें उसणें घे आतां ॥ १८५ ॥
मग बोले मदनतात ॥ तुझी वल्गना सर्व व्यर्थ ॥
एके लेंकराहातीं क्षणांत ॥ तुज धरून नेईन मी ॥ १८६ ॥
मग यावरी युद्ध तुंबळ ॥ करीत तेव्हां वैकुंठपाळ ॥
तंव तो वीर प्रतापी सबळ ॥ कृष्णदळभार संहारी ॥ १८७ ॥
बाण अनुशाल्वाचे अद्भुत ॥ श्रीकृष्ण पडला मूर्च्छित ॥
भीमे शिबिराप्रति त्वरित ॥ मदनतात नेला तेव्हां ॥ १८८ ॥
मूर्च्छा हरलिया समस्त ॥ सत्यभामा मग हांसत ॥
मदनासी हिणाविलें बहुत ॥ तुम्ही कां हो पळोन आलो ॥ १८९ ॥
मग मागुती जगज्जीवन ॥ रणास गेला परतोन ॥
तो वृषकेत झुंजतसे निर्वाण ॥ सुरवर गगनीं पाहती ॥ १९० ॥
वृषकेतचा स्यंदन ॥ अनुशाल्वें केला रणीं चूर्ण ॥
यावरी तो कर्णनंदन ॥ विजेऐसा धांवला ॥ १९१ ॥
त्याचिया रथावरी चढोन ॥ अनुशाल्वास चरणीं धरून ॥
शतवेळां भोवंडून ॥ धरणीवरी आपटिला ॥ १९२ ॥
तैसाच ओढीत ते वेळां ॥ श्रीरंगाजवळी आणिला ॥
पांचही पांडव निजडोळा ॥ आश्चर्य पाहती कर्णजाचें ॥ १९३ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ हरीनें हृदयीं आलिंगिला कर्णकुमार ॥
सावध जाहला अनुशाल्व वीर ॥ स्तवन करी वृषकेताचें ॥ १९४ ॥
म्हणे वृषकेता तूं धन्य ॥ मज भेटविला जगज्जीवन ॥
मग अनुशाल्वास पंडुनदन ॥ प्रीतींकरून भेटले ॥ १९५ ॥
अनुशाल्वास हृदयीं धरून ॥ प्रीतीनें बोले जगन्मोहन ॥
आतां धर्मास साह्य होऊन ॥ अश्वमेध सिद्धीस नेईं ॥ १९६ ॥
तिकडे मदनें दळ संहारून ॥ घेऊन आला श्यामकर्ण ॥
मग सर्वही मिळोन ॥ गजपुरांत प्रवेशती ॥ १९७ ॥
जयवाद्यें वाजवित ॥ आनंद न माय त्रिभुवनांत ॥
नाना उपचार पुरवित ॥ सर्वही नृपां धर्मराव ॥ १९८ ॥
पूर्वी सत्यवतीहृदयरत्न ॥ जो प्रकार गेला सांगोन ॥
चैत्रीपौर्णिमा पाहोन ॥ श्यामकर्ण सोडिती ॥ १९९ ॥
असिपत्रव्रत तेथून ॥ धर्मरायें अंगीकारून ॥
सर्वही भोग त्यागून ॥ स्त्रीसमागम सोडिला ॥ २०० ॥
वीससहस्त्र ब्राह्मण ॥ पूर्वसंकेतें दक्षिणा देऊन ॥
पूजोनियां श्यामकर्ण ॥ आरंभिला दिग्विजय ॥ २०१ ॥
सर्वरायांसहित पार्थ ॥ धर्मास नमून निघे त्वरित ॥
युधिष्ठिर आशीर्वाद देत ॥ यशवंत होई सदा ॥ २०२ ॥
पार्था ऐक एक वचन ॥ पूर्वी राजे मारिले जाण ॥
त्यांचे बाळ जाहले राव नूतन ॥ त्यांवरी दया करीं बहु ॥ २०३ ॥
ते सांपडले जरी समरीं ॥ पार्था त्यांस कदा न मारीं ॥
अवश्य म्हणोन झडकरी ॥ निघता जाहला अर्जुन ॥ २०४ ॥
कुंती गांधारी धृतराष्ट्र ॥ यांस नमून पार्थवीरा ॥
साष्टांगें नमिला यादवेंद्र ॥ म्हणे आज्ञा देई आतां ॥ २०५ ॥
कुंती म्हणे पार्था ॥ बहुत सांभाळी वृषकेता ॥
सद्गदित माता पृथा ॥ कर्णवीरा आठवूनि ॥ २०६ ॥
मागुती बोलेवचन ॥ बाळ जतनकरीं मेघवर्ण ॥
कृष्णपुत्र प्रद्युम्न ॥ तोही रक्षावा समरांगणीं ॥ २०७ ॥
चौघे पांडव आणि मुरारी ॥ राहते जाहले हस्तनापुरीं ॥
यावरी भार चालिला गजपुरीं ॥ श्यामकर्णामागुती ॥ २०८ ॥
यावरी पुढें कथा सुरस ॥ जैमिनी सांगे जनमेजयास ॥
प्राकृतभाषेंत पंढरीश ॥ बोलवील ऐका ते ॥ २०९ ॥
श्रीपांडुरंगपुरविहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥
श्रीधरवरदा निर्विकारा ॥ जगदुद्धारा अभंगा ॥ २१० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेधपर्व जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठावन्नाव्यांत कथियेला ॥ २११ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि अष्टपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५८ ॥
अध्याय अठ्ठावन्नावा समाप्त
GO TOP
|