श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सत्तावन्नावा


भीष्मांचा धर्मराजाला उपदेश


श्रीगणेशाय नम: ॥
यावरी तो गंगानंदन ॥ सकल योगियांमाजी मुकुटरत्‍न ॥
धर्मास जवळी बोलावून ॥ करी अवघ्राण मस्तक ॥ १ ॥
शिरीं ठेवूनियां हात ॥ म्हणे सखया न ठेवीं हेत ॥
अवघे मज पुसें शास्त्रार्थ ॥ पुरवीन प्रश्न तुझे पैं ॥ २ ॥
यावरी तो युधिष्ठिर ॥ जो शांतीचें पूर्ण सरोवर ॥
म्हणे जनकजनका सत्वर ॥ राजधर्म सांगें कां ॥ ३ ॥
अंकुशे वळिजे इभजाती ॥ तैशी बोलें नृपनीती ॥
यावरी तो सत्त्वमूर्ती ॥ भीष्मदेव बोलतसे ॥ ४ ॥
चार आश्रम चार वर्ण ॥ ऐका आतां सावधान ॥
म्हणे धर्मा करीं श्रवण ॥ राजनीति अगोदर ॥ ५ ॥
राजा जो पुण्यपरायण ॥ तेणें करावें देवब्राह्मणपूजन ॥
शिवविष्णुस्वरूप पूर्ण ॥ तेच प्रतिमा धरामर ॥ ६ ॥
देखतां द्यावें अभ्युत्थान ॥ बोलावें परम मृदु वचन ॥
अतिनम्रता धरून ॥ चरण त्यांचे वंदावे ॥ ७ ॥
ब्राह्मणापासून यद्यपि अन्याय ॥ घडे जरी पाहिला स्वयें ॥
तरी दंड न करावा निश्चयें ॥ कालत्रयीं जाण पां ॥ ८ ॥
त्यासी दंड हाचि तत्त्वतां ॥ गौरव न करावा पाहतां ॥
मित्रदंड हाचि पंडुसुता ॥ भाषण तयाशीं न करावें ॥ ९ ॥
नारीदंड हाचि देख ॥ शयन करावें आपण पृथक ॥
ऐशी जाहलिया अटक ॥ होय प्राणांत स्त्रियेसी ॥ १० ॥
जाईल तरी जावो प्राण ॥ ब्रह्मद्वेष न करावा जाण ॥
करूनियां विष भक्षण ॥ प्रचीत कोणीं पहावी ॥ ११ ॥
महासर्प उसां घेऊन निजला ॥ पुन: तो कोणीं जागा देखिला ॥
तैसा ब्रह्मद्वेषें कल्याण पावला ॥ नाहीं ऐकिला त्रिभुवनीं ॥ १२ ॥
मुमुक्ष भक्त साधु संत ॥ हे प्राणाहून मानावे अत्यंत ॥
समरीं सुद्धा येईल आप्त ॥ तरी अवश्य त्याशीं झुंजावे ॥ १३ ॥
तेथें पिता हो पुत्र बंधु ॥ त्याचा रणीं घडलिया वधु ॥
त्यास कदा दोषशब्दु ॥ शास्त्र न ठेवी सर्वथा ॥ १४ ॥
रायें सदा करणें क्षमा ॥ तेंही कदा नये कामा ॥
बहु तीव्रता धर्मा ॥ तीही सर्वथा योग्य नव्हे ॥ १५ ॥
तरी देव ब्राह्मण साधु संत ॥ यांशीं क्षमा धरावी अत्यंत ॥
अत्यंत निर्दय असत्य ॥ त्यांशीं तीव्रता धरावी ॥ १६ ॥
खळासी करितां दंड ॥ जैसा वैवस्वत प्रचंड ॥
मतवादियांचें बंड ॥ निरसावया बृहस्पति ॥ १७ ॥
जैशी गर्भिणी गर्भ रक्षित ॥ तैसा प्रजा पाळी समस्त ॥
सुखसार घ्यावया यथार्थ ॥ दुःख सहसा न द्यावें ॥ १८ ॥
वृक्षाचे घ्यावें सुमन ॥ परि न उपडिजे मूळाहून ॥
अथवा शाखाही तोडून ॥ दुःख तयासी न दीजे ॥ १९ ॥
वस्त्रालंकारमंडित ॥ निर्भय प्रजा विचरत ॥
प्रजेचें द्रव्य असे बहुत ॥ नृपें तिकडे न पहावें ॥ २० ॥
राजयाचें अंतःकरण ॥ असावें मृदु नवनीताहून ॥
परि बाह्मवृत्ति व्याघ्र जाण ॥ ग्रासील काय सर्वांसी ॥ २१ ॥
अंतरीं निववावां क्रोध ॥ बाहेर दिसावा जातवेद ॥
प्रपंच परमार्थ विशद ॥ दोन्ही पक्ष चालवावे ॥ २२ ॥
दोहों पक्षांचे बळेंकरूनी ॥ अंडज संचरे जेविं गगनीं ॥
तैसें प्रपंचपरमार्थी राजांनीं ॥ समानबुद्धि वर्तावें ॥ २३ ॥
प्राणिमात्रास देख ॥ राजाचा असावा धाक ॥
शांति क्षमा सौम्यता अधिक ॥ ब्राह्मणांलागीं असावी ॥ २४ ॥
खळांस राजा दिसतां शांत ॥ अवज्ञा करितील समस्त ॥
जैसा करीन देखोनि शांत ॥ गजाकर्षक वरी चढे ॥ २५ ॥
एवढी थोर इभजाती ॥ अंकुशें आकर्षून हिंडविती ॥
सौम्य देखोनि नृपती ॥ अन्यायें वर्तती जन मग ॥ २६ ॥
परम उन्मत्त क्षुद्र ॥ धर्मवाटा पाडणार ॥
प्रतिवर्षी नृपें साचार ॥ धन त्यांचें हिरावें ॥ २७ ॥
गुह्यगोष्टी जे अत्यंत ॥ प्रकट न व्हावी जनांत ॥
वित्त मंत्र औषध गुप्त ॥ बहुतकरूनि रक्षावें ॥ २८ ॥
राजयांची करिती चेष्टा ॥ उणी करूं इच्छिती प्रतिष्ठा ॥
राजपदवी करणी अचाटा ॥ आपुले ठायीं दाविती ॥ २९ ॥
करावें दुष्टांसी शासन ॥ प्रीतीं करावें साधूंचे पालन ॥
गुणी भेटलिया सद्‌गुण ॥ त्याचा सादर परिसिजे॥ ३० ॥
कुटिल कपटी ओळखावे ॥ त्यांसी एकदां सांगोनि पाहावे ॥
नायकती तरी चालवावें ॥ ग्रामांतून बाहेरी ॥ ३१ ॥
ज्ञानहीन आपण देख ॥ शिष्य करूं धांवे मूर्ख ॥
आचारहीन जो दांभिक ॥ त्यास दृष्टीं न आणावें ॥ ३२ ॥
जे मातृपितृभजन ॥ पुत्र न करिती ते दुर्जन ॥
शिष्य न करिती गुरुभजन ॥ नृपें तयांसी दंडावें ॥ ३३ ॥
प्रजेसी करिती नित्य रंजन ॥ त्यांचेंच नाम राजा जाण ॥
लोकांस शिकवावे सत्कारून ॥ हरिगुरुभजन करिजे सदा ॥ ३४ ॥
पुराणश्रवण हरिकीर्तन ॥ अग्निसेवा सात्विक जाण ॥
अन्नोदक अतिथिपूजन ॥ हरिस्मरण सर्वदा ॥ ३५ ॥
द्रव्यवंतें घालावे अन्नसत्र ॥ वापी कूप तडाग पवित्र ॥
करावीं उद्यानें अपार ॥ उत्तम वृक्षारोपण ॥ ३६ ॥
राये आपुला कोश ॥ वर्धमान करावा विशेष ॥
द्रव्यव्यय नित्य आसमास ॥ दृष्टीं पाहोन लिहिजे पत्रीं ॥ ३७ ॥
आज द्रव्य वेंचलें किती ॥ हें नित्य विचारावे नृपती ॥
तीन प्रहर होय रात्री ॥ नृपें करावें जागरण ॥ ३८ ॥
विद्यावंत परी दुर्जन ॥ करी कापट्य जारण मारण ॥
तो बाहेर गांवांतून ॥ नृपें सत्वर दवडावा ॥ ३९ ॥
विचार न करितां राया ॥ न करावी कांहींएक क्रिया ॥
आदिअंत पाहोनियां ॥ कर्तव्य शुद्ध करावें ॥ ४० ॥
कोण काळ काय मित्र ॥ जोडी थोडी शत्रु फार ॥
या गोष्टींचा विचार ॥ नृपें करावा क्षणक्षणां ॥ ४१ ॥
शास्त्रप्रमाण समयोचित ॥ वाक्य दावी जो पंडित ॥
तो पाळावा कुटुंबासहित ॥ द्रव्य बहुत देऊनियां ॥ ४२ ॥
प्रजा वैभवें विचरती ॥ सुखें मार्गें येत जाती ॥
तस्कर वनांत न वसती ॥ ऐसी रीति रायें कीजे ॥ ४३ ॥
नगर होय अथवा कांतार ॥ रात्रींत न हिंडावे तस्कर ॥
कुडें कपट करणार ॥ नगरामाजी नसावे ॥ ४४ ॥
साधु भक्त ब्राह्मण ॥ नित्य चिंतिती करिती कल्याण ॥
राजास आयुष्य प्रजा संपूर्ण ॥ चिंतिती ऐसें वर्तावें ॥ ४५ ॥
उत्तम मंदिरे बांधोन ॥ ब्राह्मणांस द्यावीं दान ॥
विप्राचें घर घेतां हिरोन ॥ ऐश्वर्य आयुष्य नाश होय ॥ ४६ ॥
संतांचें मन रक्षावें ॥ त्यांस गांवांतून जाऊं न द्यावें ॥
चिंता दुःख त्यांचें हरावें ॥ बहुत घ्यावे आशीर्वाद ॥ ४७ ॥
रायें नित्य सभेस बैसून ॥ पुसावें राज्यांतील वर्तमान ॥
कोणास दुःख देतो कोण ॥ मनासी सर्व आणावें ॥ ४८ ॥
आपणाशी दावून आप्तपण ॥ शत्रुस सांगे वर्तमान ॥
तो आधीं नगरांतून ॥ नृपें बाहेर घालावा ॥ ४९ ॥
मैत्र मुखावरी स्तुति करती ॥ परी घरा जाऊन काय बोलती ॥
तें कर्णी ऐकोन भूपतीं ॥ तैसें त्यांसी वाढविजे ॥ ५० ॥
परम नीच बोलती पैशून्य ॥ सूक्ष्म दोष दाविती थोर करून ॥
तयांस सभेचें स्थान ॥ यावयालागीं वर्जावें ॥ ५१ ॥
सूक्ष्म दोष अन्याय ऐकोन ॥ रायें तेथें न घालावे मन ॥
त्यांस एकांतीं सांगावें पाठवून ॥ पुण्यपंथें वर्तत जा ॥ ५२ ॥
परराज्य घ्यावया त्वरित ॥ रायासी असावा बहु स्वार्थ ॥
शत्रु दुर्बळ हो निश्चित ॥ भरंवसा कदा न धरावा ॥ ५३ ॥
रायासी एकचि प्रधान ॥ हेंही अनर्थकारक जाण ॥
तरी अमात्य असावे चौघे जण ॥ जाणती जे अंतर रायाचें ॥ ५४ ॥
बहुत असतां दळ जवळी ॥ पुढें उडी न घालावी भूपाळी ॥
पडती कलेवरें ज्यांचीं रणमंडळीं ॥ कुटुंबें त्यांचीं प्रतिपाळावीं ॥ ५५ ॥
राजे आणावे जिंकोन ॥ पुन: सोडावे आपुलेसे करून ॥
ते करभार देती आणून ॥ न मागतां आपणचि ॥ ५६ ॥
राजयांनीं आपुली मंदिरे ॥ एकांतस्थळीं बांधावीं सुंदरें ॥
कित्येक राखावीं गुप्तद्वारें ॥ कोणास कळों न द्यावीं तीं ॥ ५७ ॥
शय्याद्वारींचे रक्षक ॥ बहुत असावे विश्वासुक ॥
उदक देणार हडपी देख ॥ स्नेहाळ बहुत असावे ॥ ५८ ॥
पाककर्ते आणि चिकित्सक ॥ अंगमर्दक आणि नापिक्त ॥
सर्वदा पृष्टरक्षक ॥ स्नेहाळ बहुत असावे ॥ ५९ ॥
उन्मत्त गज उन्मत्त तुरंग ॥ यांसी शिक्षा करावी सांग ॥
नृपें आरूढावें त्यांवरी मग ॥ न पडे व्यंग मग कांहीं ॥ ६० ॥
उत्तम तैल सुवास वस्त ॥ वस्त्रें पाठविती द्वेषी गुप्त ॥
विचार पाहून निश्चित ॥ मग नृपें अंगीकारावीं तीं ॥ ६१ ॥
परम सुजाण चतुर ॥ त्यांस न द्यावा अधम व्यापार ॥
सचिवपदवीवरी वृषलीपुत्र ॥ सहसाही न ठेवावा ॥ ६२ ॥
विद्यावंताचा अपमान ॥ कदाही न करावा जाण ॥
ते आणिके देशीं जाऊन ॥ दीर्घ निंदा करितील ॥ ६३ ॥
त्यांस देशावर देऊन प्रीतीं ॥ बोळवावे नृपें निगुती ॥
याचकांची आशा पुरतां निश्चितीं ॥ करिती स्तुति स्थलांतरीं ॥ ६४ ॥
सभास्थानीं दुर्जन तत्त्वतां ॥ येऊं न द्यावे नृपनाथा ॥
दुर्जनाचा विचार न पाहतां ॥ परकार्य निवटावें ॥ ६५ ॥
तृप्त नव्हे उदर ॥ परी मूषक तोडिती दिव्यवस्त्र ॥
तैसा दुर्जन कातर ॥ महत्कार्य विध्वंसी ॥ ६६ ॥
दुर्जनाचा सहवास ॥ संकटीं लोटी सज्जनास ॥
जेविं घटिका प्राशी जीवनास ॥ ताडण त्रास सोशीतसे ॥ ६७ ॥
वंशचाप सद्‌गुणसहित ॥ विराजे कोटिद्वयसंयुक्त ॥
परी तें पहा गर्वरहित ॥ कैसें लवत ओढितां ॥ ६८ ॥
लक्ष साधून परिकर ॥ गर्वे न लवेचि अणुमात्र ॥
धन्य वंशज साचार ॥ सभाग्य आणि नम्र पैं ॥ ६९ ॥
मी एक सर्वज्ञ पृथ्वीपती ॥ हा गर्व न धरावा चित्तीं ॥
मग लक्ष्मी माझी हे संपत्ती ॥ हें वाचेप्रति नाणावें ॥ ७० ॥
लक्ष्मीपति नारायण ॥ तीस आपली म्हणतां दूषण ॥
सर्वकर्ता जगज्जीवन ॥ वारंवार स्मरावा ॥ ७१ ॥
नेत्रवक्त्रांचे विकार ॥ त्यावरून समजावें कुटिलांचें अंतर ॥
जार तस्कर चहाडखोरा ॥ चिन्हें तत्काळ दाविती ॥ ७२ ॥
त्यजीं दुर्जनसंसर्ग ॥ साधुसंगीं धरीं अनुराग ॥
पुण्यक्रिया शुद्धमार्ग ॥ लक्षोनियां जाइजे ॥ ७३ ॥
नित्यानित्यविचारश्रवण ॥ साधुमुखें करावें अनुदिन ॥
स्मरणें ध्यानें मधुसूदन ॥ आपणाधीन करावा ॥ ७४ ॥
वाणी असावी सुरस मधुरा ॥ ललना पतिव्रता आणि सुंदर ॥
ऐश्वर्य आणि औदार्य फार ॥ तरीच सफल जीवित पैं ॥ ७५ ॥
लाभ फार अल्प प्रयत्‍न ॥ तेथें राये घालावे मन ॥
ब्राह्मणांच्या अक्षता घेऊन ॥ शिरीं नित्य वंदाव्या ॥ ७६ ॥
परांची दुःखवेदना ॥ राये बरवी आणावी मना ॥
दुर्बळास देऊन धना ॥ वर्धमान करावा ॥ ७७ ॥
देवालये होतां जीर्ण ॥ पुन: करावीं नूतन ॥
धर्मशाळा मठ गुहा करून ॥ श्रीपादासी देइजे ॥ ७८ ॥
पुस्तकांचें करावें संरक्षण ॥ विद्येचे करावें उद्धरण ॥
धनधान्य गोधन आपण ॥ दृष्टीं विलोकावे ॥ ७९ ॥
चंद्रकळा बिजेपासून ॥ दिवसेंदिवस होय वर्धमान ॥
तैशी बुद्धि वाढे विशेष पूर्ण ॥ राजनीति मनीं धरितां ॥ ८० ॥
सेवकाचें वेतन ॥ पावतें करावें संपूर्ण ॥
अद्‌भुत कार्य येतां दिसून ॥ द्यावें वेतन वेगळें ॥ ८१ ॥
ब्राह्मणा जाहलें बहुत ऋण ॥ गेला तरुण जाया टाकून ॥
राये करून ऋणमोचन ॥ दोघें एकत्र करावीं ॥ ८२ ॥
बहुत भोजन बहुत निद्रा ॥ कदाही नसावी नरेंद्रा ॥
नित्य नैमित्तिक कर्में उदास ॥ यथासांग आचरावीं ॥ ८३ ॥
ऐसी राजनीति विचार ॥ निरूपित स्वर्धुनीकुमार ॥
श्रवण करी युधिष्ठिर ॥ ऋषिरायांसमवेत ॥ ८४ ॥
यावरी कथिले आपद्धर्म ॥ सांगीतले दानधर्म सुगम ॥
राजधर्म उत्तम ॥ तोच आधीं कथियेला ॥ ८५ ॥
चौथा सांगितला मोक्षधर्म ॥ जें अद्वैतज्ञान निःसीम ॥
अनुशासनपर्व उत्तम ॥ त्याचेंच अंग जाणिजे ॥ ८६ ॥
राजधर्म आपद्धर्म ॥ दानधर्म मोक्षधर्म ॥
अनुशासनासहित उत्तम ॥ शांतिपर्व एकचि ॥ ८७ ॥
पंचदशसहस्त्र श्लोक ॥ बोलिला व्यास पुण्यश्लोक ॥
समुद्रतुल्य ग्रंथ सुरेख ॥ टीका न करवे सर्वथा ॥ ८८ ॥
हा पांडवप्रताप ग्रंथ ॥ वदवीतसे पंढरीनाथ ॥
पाल्हाळ टाकून समस्त ॥ कथा मथित धरियेली ॥ ८९ ॥
कथा राहिली नाहीं किंचित ॥ विस्तार धरिला नाहीं बहुत ॥
शांतिपर्वपर्यंत ॥ कथा रसाळ कथियेली ॥ ९० ॥
असो शांतिपर्वी मथितार्थ ॥ चार्‍ही धर्म कथिले यथार्थ ॥
तो उत्तरायण जाहलें प्राप्त ॥ परम पुण्यपावन जें ॥ ९१ ॥
धृतराष्ट्रही आला तेथ ॥ विदुर कृपाचार्य धांवले त्वरित ॥
राजे आणि ऋषिमेळा बहुत ॥ पूर्वींच आला श्रवणासी ॥ ९२ ॥
भीष्ममुखें अद्‌भुत ज्ञान ॥ ऐकतो तोषले मुनिजन ॥
द्वारकानाथ विश्वंभर पूर्ण ॥ तोही जवळी बैसला ॥ ९३ ॥
व्यासनारदादि मुनी ॥ बैसले जवळी येऊनी ॥
छप्पन्नकोटी वृष्णी ॥ भीष्मदर्शना पातले ॥ ९४ ॥
अंतकाळीं भीष्माचें शरीर ॥ दिव्यरूप जाहले साचार ॥
घाय बुजाले समग्र ॥ निघाले शर सर्वांगाचे ॥ ९५ ॥
शुद्ध अष्टमी माघमास ॥ मध्याह्नीं आला चंडांश ॥
भीष्में पुसोन सर्वांस ॥ श्रीकृष्णस्वरूप न्याहाळिलें ॥ ९६ ॥
किरीटकुंडलमंडित वदन ॥ चतुर्भुज इंदिरामनमोहन ॥
तीन वेळ चरणापासून ध्यान ॥ न्याहाळिलें आवडीनें ॥ ९७ ॥
बाहेर देखिला मूर्तिमंत ॥ तैसाच रेखिला हृदयांत ॥
पाहोन स्थळ निवांत ॥ दीप जैसा रक्षिजे ॥ ९८ ॥
सहस्रनामेंकरून ॥ केलें श्रीरंगाचें स्तवन ॥
मग महावाक्य चिंतून ॥ योगधारणा अवलंबिली ॥ ९९ ॥
आकर्षून सर्व प्राण ॥ दशमद्वारं ऊर्ध्व भेदून ॥
दिव्यज्योति निघोन ॥ ब्रह्मानंदीं समरसली ॥ १०० ॥
जळ मिळालें जीवनीं ॥ कीं नाद विराला गगनीं ॥
तैसा गंगानंदन ते क्षणीं ॥ तदाकार जाहला ॥ १०१ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनें वर्षती वृंदारक समग्र ॥
दुंदुभिनाद अपार ॥ सुरेंद्र करवी तेधवां ॥ १०२ ॥
देवव्रताची स्तुती ॥ वारंवार कधी करिती ॥
आद्यंत भीष्माची रीती ॥ श्रीरंग वर्णी वारंवार ॥ १०३ ॥
पांडवांचे नेत्रीं अवधारा ॥ लोटल्या तेव्हां विमलांबुधारा ॥
धर्म म्हणे श्रीकरधरा ॥ तूं आणि भीष्म एकचि ॥ १०४ ॥
येवढें कथून अद्‌भुत ज्ञान ॥ तुझे स्वरूपीं जाहला निमग्न ॥
मग बोले मनमोहन ॥ उत्तरकार्य संपादीं ॥ १०५ ॥
मग मलयागर कृष्णागर ॥ चंदनकाष्ठें आणोनि अपार ॥
कस्तुरी केशर कपूर ॥ यांचे संभार रचियेले ॥ १०६ ॥
भागीरथीत नेऊन ॥ भीष्मास घातलें शुद्ध स्नान ॥
दिव्यगंधेंकरून ॥ शरीर आधीं चर्चिलें ॥ १०७ ॥
दिव्यवस्त्रें नेसविलीं ते अवसरीं ॥ चिता रचिली स्वर्धुनीतीरीं ॥
शुभच्छत्र सतेज वरी ॥ वृकोदरें धरियेलें ॥ १०८ ॥
मकरबिरुदे राजचिन्हें आणून ॥ समस्त उभीं करिती जाण ॥
पार्थ पादुका घेऊन ॥ विलोकित वदन भीष्माचे ॥ १०९ ॥
होय वाद्यांचा गजर ॥ सुरेंद्र वर्षे सुमनभार ॥
चितेवरी भीष्माचे कलेवर ॥ युधिष्ठिरें पहुडविलें ॥ ११० ॥
उभय चामरे घेऊन ॥ वरी वारिती माद्रीनंदन ॥
कुंती द्रौपदी येऊन ॥ गंगात्मज विलोकिती ॥ १११ ॥
अपार रचून कर्पूर ॥ झांकिलें तेव्हां कलेवर ॥
धर्में लाविला वैश्वानर ॥ यथाविधि करूनियां ॥ ११२ ॥
यावरी उत्तरक्रिया समस्त ॥ यथासांग धर्म करित ॥
त्रयोदश दिवसपर्यंत ॥ जान्हवीतीरीं राहिले ॥ ११३ ॥
करून धर्में अपार दान ॥ तोषविला गंगानंदन ॥
यावरी करीत भीष्माचे स्तवन ॥ ऋषी गेले स्वस्थाना ॥ ११४ ॥
श्रीरंगासहित पांडव ॥ हस्तनापुरास आले सर्व ॥
धर्मन्यायें धर्मराव ॥ राज्य करिता जाहला ॥ ११५ ॥
शांतिपर्व झालें हें अगाध ॥ येथून पुढें अश्वमेध ॥
तें श्रीधरवरद ब्रह्मानंद ॥ पांडुरंग बोलवील पैं ॥ ११६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ शांतिपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्तावन्नाव्यांत कथियेला ॥ ११७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे शांतिपर्वणि सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५७ ॥
अध्याय सत्तावन्नावा समाप्त


GO TOP