श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय छप्पन्नावा


पांडवांना राज्याभिषेक


श्रीगणेशाय नम: ॥
अद्‌भुत भारतकथेचा महिमा ॥ देऊं गोदावरीची उपमा ॥
स्नान करितां कर्माकर्मा- ॥ पासूनि मुक्त होइजे ॥ १ ॥
उभयलोकींची इच्छा अधिक ॥ हींच तटाकें जेथ सुरेख ॥
मनोरम स्वच्छ प्रवाह देख ॥ उचंबळत ब्रह्मानंदे ॥ २ ॥
कृष्णकथामृतजीवन ॥ प्रेमळ तेथें जलचरें पूर्ण ॥
देव गंधर्व मुनिजन ॥ तीरीं सघन तरू हेचि ॥ ३ ॥
अनेक चरित्रे तत्वतां ॥ त्याच येथें मिळाल्या सरिता ॥
भक्ति ज्ञान वैराग्यता ॥ ऊर्मी तेथें विलसती ॥ ४ ॥
बोध चालिला अद्‌भुत ॥ फोडूनियां पापपर्वत ॥
अष्टादश पर्वमुखें मिळत ॥ भक्तहृदयसागरीं ॥ ५ ॥
त्रिविध तापे जे तापले ॥ तीर्थव्रतें करितां जे भागले ॥
ते तेथें स्नान करितां निवाले ॥ नाहीं परतले संसारा ॥ ६ ॥
या गंगेत करितां स्नान ॥ अंगीं संचरे भक्तिज्ञान ॥
सकळ चातुर्य तर्क येऊन ॥ पायां लागती आदरें ॥ ७ ॥
असो स्त्रीपर्व मागें संपलें ॥ पुढें शांतिपर्व सर्वागळें ॥
जनमेजयाप्रति स्वानंदमेळें ॥ वैशंपायन सांगत ॥ ८ ॥
स्त्रीपर्व संपतां मागें पूर्ण ॥ समस्तांची उत्तरक्रिया करून ॥
बंधूंसहित धर्म जगज्जीवन ॥ निजशिबिराप्रति पावले ॥ ९ ॥
यावरी गंगातटीं कुंतीसहित ॥ धर्मराज राहे एक मासपर्यंत ॥
तो ऋषिचक्र मिळोन समस्त ॥ धर्मास भेटों पातले ॥ १० ॥
विश्वामित्र असित कण्व ॥ दुर्वास भृगु अंगिरा वामदेव ॥
कश्यप अत्रि वसिष्ठ महानुभाव ॥ नारद आणि जमदग्नि ॥ ११ ॥
भारद्वाज आणि गौतम ॥ पराशर बादरायण शुक परम ॥
विभांडक अगस्ति देवल उत्तम ॥ रुचिक गाधि आर्ष्टिषेण पैं ॥ १२ ॥
याज्ञवल्क्य धौम्य गार्ग्य ॥ श्रृंगी वाल्मीक मातंग ॥
व्याघ्रपाद हरींद्र गर्ग ॥ चंद्रात्रि भरत ब्रह्मनिष्ठ ॥ १३ ॥
राक्षायण रुक्षायण ऋभुक्षायण ॥ सांख्यायन शाकलायन सावर्ण्य ॥
पंचशिख पौलस्ति पुरूघन ॥ विश्रवा आणि तृणबिंदु ॥ १४ ॥
अरुणि उपमन्यु देवर्षि उत्तंक ॥ जरत्‍कारु कौंडिण्य आस्तिक सम्यक ॥
च्यवन गाल्व शमीक सोमक ॥ याच उपयाज भार्गव पैं ॥ १५ ॥
सुमेधा हरिमेध श्वेत मुद्‌गल ॥ उद्दालक शांडिल्यकेतु कपिल ॥
अष्टवक्र शौनक सुयज्ञ कहोळ ॥ शक्ति उग्रश्रवा भेषजी पैं ॥ १६ ॥
एककत द्विकत त्रिकत ॥ कर्दम संदीपन कक्षीवंत ॥
मुकंडु मार्कंडेय गंधमादन उतथ्य ॥ शतानंद दीर्घतमा ॥ १७ ॥
कवि वाचस्पति कच शरभंग ॥ शंख पैल दंडी सुतीक्ष्ण गौरांग ॥
मंदकर्णि मयंक मंदपाल जीर्णांग ॥ प्रमादी रुरु कृष्णांक तो ॥ १८ ॥
सोमश्रवा दधीचि पुंडरीश पुंडलीक ॥ बकदाल्भ्य भृशुंडी लोमहर्ष उत्तंक ॥
मांडव्य श्रुतकीर्ति सारस्वत जाबालक ॥ बाष्कल वैद्यपान दीर्घबाहु ॥ १९ ॥
वत्स श्रीवत्स सनत्सुजात दृढविचार ॥ ऊर्ध्वरेता सुश्रवा अवत्सर ॥
अंबरीष अजमीढ आंगिरस थोर ॥ औदालिक आश्वलायन ॥ २० ॥
औशिज औदुंबरी अग्निवेष ॥ कुशिक कंटक कौतक ॥
औदवाहन काश्यपि कथकात्म और्वास ॥ कालाफ कुकुर करिण पैं ॥ २१ ॥
कांकायन कामुकायन कौमुद गौपायन ॥ काप्य कुशिज वेद और्जायन ॥
कौमंडल क्रौंच गोवर्धन ॥ ऋतु भोगील गविष्टिषेण पैं ॥ २२ ॥
गवाक्ष गुरवी गोमती गौठण ॥ गौर्मुख गोपाळ गोकर्ण ॥
गौरिविंद गौण गार्गायन ॥ गंध सुकीर्ण चंड पैं ॥ २३ ॥
घटजानु जंघिक जंघाल जातूकर्ण ॥ जयन्त जह्वट जरठ देवर दमन ॥
तंतु तापस देवशर्मा भानु जाण ॥ श्रीदेव सौभरि धर्म धनंजय ॥ २४ ॥
धवल धन्वंतरि निदाघ दंबत्रिवंत ॥ नैधुव पौरोग भोगवृत्त ॥
पिंगल पोंड्र पौल पर्णदंत ॥ पौराणिक पोतिमाष पैं ॥ २५ ॥
बृहद्‌बल बौधायन ॥ वातांबु वणिक भवबुद्ध पूर्ण ॥
सौज्य ऊर्ध्वमुख कृतद्रोण ॥ बाभ्रव्य गंधमादन पैं ॥ २६ ॥
पर्वत लिखित मसभलोकी गौरशिर ॥ हरिष्मा चंडकौशिक विमित स्कंद घटोदर ॥
विशाख माध्यंदिन कालांतक वैश्वानर ॥ स्थाणु विश्वत पें महाशिरा ॥ २७ ॥
मेघवास इंद्रतपन ॥ त्वष्टा मरीचि सर्वांतक कक्षीवान ॥
देवहोत्र सविता प्रचेता मदन ॥ मैत्रेय धर्म अचळ पैं ॥ २८ ॥
विदग्ध ऋभु सुरत्‍नदास ॥ मैत्रेय आर्तभाग विकुंठ विशेष ॥
वैराज विधूम अविनाश ॥ कूर्म नैमित्य नैय्यायिक ॥ २९ ॥
ब्रह्मानंदें विनवी श्रीधर ॥ धर्माभोंवते क्रषीश्वर ॥
मिळाले तेव्हां अपार ॥ नांवें त्यांचीं वर्णिली ॥ ३० ॥
ते वसुधामर प्रतिआदित्य ॥ नेमनियमसाधनयुक्त ॥
शम दम अंगीं विराजित ॥ शांत दांत सर्वदा ॥ ३१ ॥
मग सर्वही ऋषी पूजून ॥ धर्मराज करी स्तवन ॥
म्हणे तुमची सेवा करून ॥ सुखें राहीन वनामध्यें ॥ ३२ ॥
मज दुःख बहु मनांत ॥ कुलक्षय केला समस्त ॥
कुंतीनें कर्ण आपुला सुत ॥ मज कळों दिला नाहीं कीं ॥ ३३ ॥
जो महाराज कर्ण उदार ॥ परोपकारी सत्त्वधीर ॥
कवचकुंडलें देऊनि पुरंदर ॥ तोषविला निजधैर्यें ॥ ३४ ॥
जो कां निधडा सूर्यभक्त ॥ एकदा रण माजलें अद्‌भुत ॥
व्हावा कर्णाचा प्राणांत ॥ ऐसा समय पातला ॥ ३५ ॥
ते वेळे येऊनि ब्राह्मण ॥ घरचा घोडा मागे दान ॥
सारथ्यास म्हणे कर्ण ॥ देई सोडूनि आतांचि ॥ ३६ ॥
सूत म्हणे विजयी होई ॥ मग अवघेचि घोडे दान देई ॥
कर्ण म्हणे भरंवसा नाहीं ॥ शरीर आहे क्षणभंगुर ॥ ३७ ॥
तत्काळचि घोडा सोडून ॥ रणीं ब्राह्मणासि दिधला दान ॥
ऐसा उदार हें त्रिभुवन ॥ शोधितांही न सांपडे ॥ ३८ ॥
गाई ब्राह्मणांसी दिधली दान ॥ परी क्षणक्षणां ते परतोन ॥
कळपांत येई पळोन ॥ बहुत ब्राह्मण शिणला ॥ ३९ ॥
कर्णाजवळी येऊन ॥ गार्‍हाणें सांगे ब्राह्मण ॥
धेनु सत्वर ये परतोन ॥ कळपाविण न राहे ॥ ४० ॥
कर्णें उदक सोडिलें पाहीं ॥ पन्नाससहस्त्र माझ्या गाई ॥
तुम्हां दिधल्या सर्वही ॥ वस्त्राभरणांसमवेत ॥ ४१ ॥
पन्नाससहस्त्र गोधन ॥ त्रिकाल करावें त्यांचें दोहन ॥
त्या कामधेनूसमान ॥ इच्छिलेसमयीं दुग्ध देती ॥ ४२ ॥
रत्‍नजडित श्रृंगें पाहीं ॥ रजतखुर झळकती पायीं ॥
एकवर्ण कपिला सर्वही ॥ सौंदर्य अति शोभतसे ॥ ४३ ॥
चहूं चरणीं सुवर्णवाळे ॥ चालतो गर्जती खळाळें ॥
ज्या डावरिया बुजरिया कदाकाळें ॥ सर्वथाही न राहती ॥ ४४ ॥
मारूं नेणती कदा लात ॥ पन्नाससहस्त्र गाई समस्त ॥
ब्राह्मणालागीं उदार देत ॥ माझा ज्येष्ठ कर्ण बंधु ॥ ४५ ॥
एकदां पर्जन्य लागला बहुत ॥ ब्राह्मणाची स्त्री जाहली प्रसूत ॥
शेकावयासी काष्ठें किंचित ॥ सहसा त्यातें न मिळती ॥ ४६ ॥
कर्णाजवळी आला ब्राह्मण ॥ सांगे सर्व वर्तमान ॥
रत्नजडित मंचक फोडून ॥ दिला धाडून ब्राह्मणाघरीं ॥ ४७ ॥
रत्‍नें निघालीं अमोलिक ॥ तींही त्यास दिधलीं सकळिक ॥
ऐसा उदार दाता देख ॥ भुवनत्रयीं असेना ॥ ४८ ॥
ब्राह्मण मागे तेल येऊन ॥ कर्णें वाटी दिधली उचलून ॥
ज्यावरी रत्‍नें चंद्रासमान ॥ त्रिभुवनाचे मोलाचीं ॥ ४९ ॥
कामधेनु सुरतरु चिंतामणी ॥ हींच रत्‍नें जडलीं वर तिन्ही ॥
ऐशी ते वाटी उचलोनी ॥ दिधली दान उदारें ॥ ५० ॥
सहज प्रत्यहीं जो कर्ण ॥ देता दहासहस्त्र गोदान ॥
कर्णासारिखा शूर कोण ॥ समरधीर रणपंडित ॥ ५१ ॥
अर्जुन वेगळा करूनी ॥ आम्हां चौघां मारिता रणीं ॥
परी कुंतीनें त्याची भाकच घेऊनी ॥ आम्हां चौघां वांचविलें ॥ ५२ ॥
कर्णें आम्हांसी जिंकून ॥ कुंतीचें वचन आठवून ॥
जा म्हणून सोडून ॥ स्नेहेंकरून दिधलें ॥ ५३ ॥
कर्णासारिखा नेम ॥ कोण चालवील उत्तम ॥
कौरवांचा रक्षक परम ॥ शेवटवरी जाहला ॥ ५४ ॥
श्रीकृष्ण आणि कुंती बोधून ॥ आणीत होतीं आम्हांकडे कर्ण ॥
परी तो कृतघ्नताभयेंकरून ॥ कौरवांसी सोडीना ॥ ५५ ॥
सहा जणीं मिळोनी ॥ कर्णवीर मारिला रणीं ॥
एक इंद्र दुजा आंजनी ॥ चक्रपाणी तिसरा ॥ ५६ ॥
चवथा परशुराम गुरु देख ॥ त्याचा शाप जाहला बाधक ॥
पृथ्वीनें रथचक्र सुरेख ॥ देहांतसमयीं गिळियेलें ॥ ५७ ॥
सहावा शल्य सारथि जाणा ॥ तेजोंभंग करी क्षणक्षणां ॥
एव सहा जणीं मिळोनि कर्णा ॥ समरांगणीं मारिलें ॥ ५८ ॥
कुंतीनें केला थोर घात ॥ मज कृष्णानेंही केलें नाहीं श्रुत ॥
मी कर्णांस होतों शरणागत ॥ प्रार्थून आणितों नानापरी ॥ ५९ ॥
त्यावरी छत्र धरूनि देखा ॥ मस्तकीं वंदितों त्याच्या पादुका ॥
कर्ण होता पाठिराखा ॥ तरी त्रिभुवन जिंकितों मी ॥ ६० ॥
कर्ण मज पंडू समान ॥ म्हणे अहा कर्ण गुणनिधान ॥
अहा बहुती मारिले मिळोन ॥ तुझे गुण किती आठवूं ॥ ६१ ॥
द्रोणलोभ पार्थावरी बहुवस ॥ म्हणवूनि ब्रह्मास्त्र न दिलें कर्णास ॥
शरणागत झाला भार्गवास ॥ तेणेंही त्यास शापिलें ॥ ६२ ॥
अर्जुनास म्हणे नृपती ॥ मी जाईन वनाप्रती ॥
जळो हें राज्य जळो जगती ॥ जळो निश्चितीं क्षात्रधर्म ॥ ६३ ॥
आठवूनि कर्णाचे स्वरूप गुण ॥ धर्म करी दीर्घ रुदन ॥
मग बहुत ऋषी मिळोन ॥ नीति सांगती धर्मातें ॥ ६४ ॥
परी धर्म नायके तत्त्वतां ॥ म्हणे मी वन सेवीन आतां ॥
मग व्यास म्हणे रे गुणवंता ॥ भीष्माकडे तूं जावें ॥ ६५ ॥
तो संशय वारील निःशेष ॥ त्याचेवरी ठेवीं विश्वास ॥
महायोग्य दयावंत पुरुष ॥ तो चंडांशु दुसरा ॥ ६६ ॥
कवि गुरु परशुधर ॥ वसिष्ठ मार्कंडेय पुरंदर ॥
यांपासून विद्या अपार ॥ गंगाकुमार शिकला ॥ ६७ ॥
जो जितेंद्रिय न्यायवंत ॥ भक्त सर्वज्ञ योगी विरक्त ॥
मग बोले द्वारकानाथ ॥ व्यासवचनीं चित्त देई ॥ ६८ ॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ चार्‍ही वर्ण अठरा ज्ञाती ॥
सर्वांचे मनीं हेचि प्रीती ॥ कीं तुवां राज्यीं बैसावें ॥ ६९ ॥
अंगीकारूनि राज्यासना ॥ मग जाई भीष्मदर्शना ॥
तो नीति सांगेल ती मना ॥ आणीं सर्वज्ञा आदरें ॥ ७० ॥
मग तो धर्मराज उठिला ॥ सवेंचि निघाला ऋषींचा मेळा ॥
जैसा नक्षत्रीं वेष्टिला ॥ अत्रिपुत्र निराळीं ॥ ७१ ॥
धृतराष्ट्रही ते अवसरीं ॥ धर्मस्नेह जाणोनि अंतरीं ॥
गंगातीरीं मासभरी ॥ येऊनि राहिला होता पैं ॥ ७२ ॥
धृतराष्ट्रासहित युधिष्ठिर ॥ गजपुरा निघाला सत्वर ॥
सवें ऋषींचे भार ॥ वहनारूढ चालिले ॥ ७३ ॥
रथीं बैसला धर्म नृपती ॥ भीम पुढें जाहला सारथी ॥
छत्र धरी सुभद्रापती ॥ चामरे वारिती माद्रीसुत ॥ ७४ ॥
समस्तांस आनंद बहुत ॥ युयुत्सु पाठीमागे राहत ॥
सात्यकी आणि मदनतात ॥ एके रथीं बैसती ॥ ७५ ॥
धृतराष्ट्र बैसला नरयानीं ॥ गांधारी कुंती याज्ञसेनी ॥
उत्तरा सुभद्रा सुखासनी ॥ बसत्या जाहल्या तेधवां ॥ ७६ ॥
चतुर्विध वाद्यें वाजती ॥ बंदीजन पुढें वाखाणिती ॥
नगरजन मंदिरे श्रृंगारिती ॥ कुंकुमें रेखिती सर्व वाटा ॥ ७७ ॥
कस्तुरीचंदनांचे निवाडे ॥ बिदीवरते घातले सडे ॥
तोरणें पताका चहूंकडे ॥ हेंही सांकडें नसे कोणा ॥ ७८ ॥
नगरदेवतांचें प्रीतीकरून ॥ धर्मराजें करविलें पूजन ॥
त्रिकाल नैवेद्य रात्रंदिन ॥ दीप तेथें लाविले ॥ ७९ ॥
कुंभ भरून सुवासिनी ॥ समोर आलिया तये क्षणीं ॥
गजपुरींच्या नितंबिनी ॥ ओंवाळिती धर्मातें ॥ ८० ॥
रत्‍नदीप घेऊन हातीं ॥ लक्षानुलक्ष मार्गीं युवती ॥
श्रीरंगासहित ओंवाळिती ॥ पंचपांडवां ते समयीं ॥ ८१ ॥
चोवीस योजनें विस्तार ॥ विस्तीर्ण वसले हस्तिनापुर ॥
भोंवता परिघ दुस्तर ॥ माजी जलचरें पोहती ॥ ८२ ॥
दुर्गाभोंवते गगनचुंबित ॥ ऋक्षें वरी जडलीं दिसत ॥
उल्हाटयंत्रें वरी शोभत ॥ शस्त्रजुंबाडे ठायीं ठायीं ॥ ८३ ॥
आळोआळीं सुंदर मंदिरे ॥ मंदिरांमंदिरांप्रति दामोदरे ॥
दामोदरांप्रति एकसरें ॥ रत्‍नकळस झळकती ॥ ८४ ॥
पांडव पहावया ते क्षणीं ॥ जाहली लोकांची मंडपघसणी दे ॥
नगरद्वारीं गजवदन पूजूनी ॥ गजपुरांत गेले पांडव ॥ ८५ ॥
गोपुरावरती गेले चढोनी ॥ ओंवाळिती कित्येक कामिनी ॥
दृष्टीं देखोनि याज्ञसेनी ॥ नितंबिनी बोलती ॥ ८६ ॥
मृगशावाक्षी लावण्यखाणी ॥ धन्य तूं पद्यजातजनकभगिनी ॥
वनीं कष्टलीस याज्ञसेनी ॥ आजि नयनीं देखिली ॥ ८७ ॥
धन्य आमुचे नयन ॥ जननी देखिली परतोन ॥
सत्य सत्याचे ठायीं पूर्ण ॥ आलें जाण साच हें ॥ ८८ ॥
सकळ पौरजन प्रजा येऊन ॥ करिती धर्माचें प्रीतीनें स्तवन ॥
नाना उपायनें आणून ॥ धर्मापुढें ठेविती ॥ ८९ ॥
कलापात्रें नाना कळा ॥ तेव्हां दाविती धर्मभूपाळा ॥
सकल प्रजा नारी विप्र ते वेळां ॥ देती आशीर्वाद पांडवां ॥ ९० ॥
चिरंजीव होऊनी ॥ चिरकाल भोगा हे मेदिनी ॥
असो नगरलोकांस ते क्षणीं ॥ वस्त्रें भूषणें देत धर्म ॥ ९१ ॥
व्यासादिक मुनी ॥ आले नरयानीं बैसोनी ॥
त्यांसमवेत सदनीं ॥ धर्मराज प्रवेशला ॥ ९२ ॥
आधीं धौम्याची पूजा करून ॥ गौरविले सकल ब्राह्मण ॥
गोभूरत्‍नदानें संपूर्ण ॥ विधियुक्त दिधलीं ॥ ९३ ॥
जें जें याचकीं इच्छिलें ॥ तें तें धर्में दशगुणें पुरविलें ॥
दरिद्री नाम घ्यावया उरले ॥ कोणी नाहीं सर्वथा ॥ ९४ ॥
जयवाद्यांचा एकचि घोष ॥ राजमंदिरीं चढविले कळस ॥
रत्‍नजडित आसमास ॥ तेज झळके भूमंडळी ॥ ९५ ॥
देशोदेशींचे राजकुमार ॥ नूतन छत्रें नूतन दळभार ॥
करभार घेऊनि युधिष्ठिर ॥ पहावया येती त्वरेनें ॥ ९६ ॥
चहूं वेदींचे ब्राह्मण ॥ चतुर्दशविद्यापरायण ॥
चौसष्टकलांमाजी प्रवीण ॥ नामें मागेंच वर्णिली ॥ ९७ ॥
सकल ऋषी धर्मास विनविती ॥ नृपा तूं संशय न धरीं चित्तीं ॥
राज्य करीं न्यायनीती ॥ तुझेनि जगती सुखरूप ॥ ९८ ॥
नाना इतिहास शास्त्ररीत ॥ धर्मासी सांगती ऋषी बहुत ॥
आज्ञा करी द्वारकानाथ ॥ बैस सत्वर सिंहासनीं ॥ ९९ ॥
मग सकळांच्या वचनास मान ॥ देत कुंतीचा ज्येष्ठनंदन ॥
तो तेथें करावया विघ्न ॥ राक्षस एक पातला ॥ १०० ॥
त्याचें नांव चार्वाक जाण ॥ तो त्रिदंडी संन्यासी होऊन ॥
धर्मसभेसी येऊन ॥ कपटवचनें बोलत ॥ १०१ ॥
तो दुर्योधनाचा मित्र ॥ कापट्यराशि अपवित्र ॥
मायावेष धरूनि दुराचार ॥ विक्षेप घालूं पातला ॥ १०२ ॥
जेविं चुना माखूनि वायस ॥ बळेच जाहला राजहंस ॥
कीं मैंदें धरिला साधुवेष ॥ कक्षे पाश घेऊनियां ॥ १०३ ॥
असो तो वेषधारी येऊन ॥ धर्मास बोले कठोर वचन ॥
म्हणे धिक्‌ तुझें जिणें जावो जळोन ॥ कुलघातक्या पापिया ॥ १०४ ॥
सर्व ब्राह्मणांचा पक्ष जाण ॥ मीच बोलतों तुज वचन ॥
तुवां गुरुहत्या केली पूर्ण ॥ महाराज द्रोण मारविला ॥ १०५ ॥
बंधु पुत्र पापखाणी ॥ तुवां मारविले रणांगणीं ॥
कोण्या तोंडें सिंहासनीं ॥ बैसतोस कुलघातक्या ॥ १०६ ॥
धर्म म्हणे परिव्राजका ॥ म्यां धर्मन्यायें युद्ध केलें देखा ॥
तूं आपुली वचनें जेविं अग्निशिखा ॥ तैसी मज स्पर्शविलीं ॥ १०७ ॥
ज्ञानदृष्टीनें पाहती ऋषीश्वर ॥ तंव तो चार्वाकनामें असुर ॥
दुर्योधनमित्र अपवित्र ॥ कापट्यवेष समजला ॥ १०८ ॥
त्यासी निर्भर्त्सिती ब्राह्मण ॥ परी न राहे बोलतां वचन ॥
कदा न जाय सभेंतून ॥ मग द्विजजन क्षोभले ॥ १०९ ॥
शाप देऊनि तात्कालिक ॥ तेथेंचि भस्म केला चार्वाक ॥
जैसा विरूपाक्षें पुष्पचाप देख ॥ भस्म केला दृष्टीनें ॥ ११० ॥
मग बोले कंदर्पतात ॥ म्हणे धन्य तुमचें सामर्थ्य ॥
रजनीचर परम पतित ॥ बरा भस्म केला तुम्हीं ॥ १११ ॥
या चार्वाकानें पूर्वी जाण ॥ प्रसन्न केला कमलासन ॥
म्हणे मज सर्वांपासून ॥ जय देई विधात्या ॥ ११२ ॥
ब्रह्मा म्हणे बाह्मण ॥ तुज भस्म करितील शापून ॥
पांडवगृहीं अन्योन्य ॥ बोलतां जाण तत्त्वतां ॥ ११३ ॥
अशास्त्र बोलतां जाण ॥ त्याचें आयुष्य होय क्षीण ॥
ब्रह्महत्येचें दारुण ॥ पातक माथां तयाच्या ॥ ११४ ॥
वेद शास्त्र पुराण ॥ सर्व माझें चरित्र पूर्ण ॥
तेथें ठेवितां दूषण ॥ चार्वाकाऐसें होईल ॥ ११५ ॥
असो धर्म आरूढला सिंहासनीं ॥ सोमकांताची चवई मांडोनी ॥
त्यावरी बैसला कैवल्यदानी ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥ ११६ ॥
धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती ॥ विदुर युयुत्सु ते सुमती ॥
सात्यकी सर्व नूतन नृपती ॥ धर्मास वेष्टून बैसले ॥ ११७ ॥
न कळतां धर्मरायासी ॥ अष्टादश धान्यराशी ॥
शस्त्र वस्त्र रत्‍नधनासी ॥ ठायीं ठायीं ठेविलें ॥ ११८ ॥
धर्मास म्हणे जगन्नाथ ॥ सखया नेत्र झांकून त्वरित ॥
राशीवरी ठेवीं हात ॥ शुभाशुभ शकुन पाहों ॥ ११९ ॥
मग धर्मरायाचा हात ॥ धनधान्यराशीवरी पडत ॥
जयजयकार करिती समस्त ॥ म्हणती भद्र पुढें असे ॥ १२० ॥
पिंपळ शमी पलाश ॥ यांच्या समिधा आणिल्या बहुवस ॥
पंचपल्लव सप्तमृत्तिका विशेष ॥ पंचामृतें सिद्ध केलीं ॥ १२१ ॥
रत्‍नजडित केला कलश सज ॥ अभिषेकावया धर्मराज ॥
नूतन सिंहासन तेजःपुंज ॥ श्वेत छत्र श्वेत चामरें ॥ १२२ ॥
शुभ्र तुरंग शुभ्र गज ॥ मुक्तमाळा शुभ्र सतेज ॥
चतुःसमुद्रांचें उदक सहज ॥ आणविलें अभिषेका ॥ १२३ ॥
दिव्यकुंभीं स्वर्धुनीजीवन ॥ शुद्ध ठेविलेंसे भरून ॥
सतेज लाजा करून ॥ अक्षता समीप ठेविल्या ॥ १२४ ॥
अर्धांगीं द्रौपदी बैसवून ॥ धर्मराज केलें हवन ॥
वेदघोषे गर्जती ऋषिजन ॥ न पडे न्यून कांहींएक ॥ १२५ ॥
पुण्याहवाचन करून ॥ मग मांडिलें अभिषेचन ॥
श्रीकृष्णें स्वयें शंख घेऊन ॥ अभिषेकिला धर्मराज ॥ १२६ ॥
चौघे बंधू आणि धृतराष्ट्र ॥ यांहीं अभिषेकिला युधिष्ठिर ॥
यावरी नृप ऋषीश्वर ॥ अभिषेकिती अनुक्रमें ॥ १२७ ॥
सर्व प्रजा मिळोन ॥ हर्षें करिती अभिषेचन ॥
वस्त्रें अलंकार अपार धन ॥ आणिती मिति त्या नाहीं ॥ १२८ ॥
समर्पूनि वस्त्रें अलंकार ॥ जगस्थापकावरी धरिलें छत्र ॥
मकरबिरुदे मेघडंबर ॥ मित्रपवित्रपंखे विंजती ॥ १२९ ॥
सकल राजे उठोन ॥ धर्मद्रौपदीस अक्षता लावून ॥
अपार करभार समर्पून ॥ करिती नमन उठोनियां ॥ १३० ॥
धर्म सांगे सर्व जनां ॥ पाळा धृतराष्ट्राची आज्ञा ॥
मग युवराज्य दिधलें भीमसेना ॥ आणीक कांहीं अमात्य स्थापिले ॥ १३१ ॥
समस्त सेवकां पहिलियाहून ॥ वेतन केलें दशगुण ॥
प्रजा मनीं संतोषोन ॥ देती धन तितुकेंच घ्यावें ॥ १३२ ॥
शत्रुमर्दन सेनानाथ ॥ केला सुभद्रावर बलाद्भुत ॥
प्रजांचें हित अंतर्गत ॥ नकुलसहदेवें सांगावें ॥ १३३ ॥
विदुरज्ञानें युयुत्सवें ॥ सर्व राज्यहित विलोकावें ॥
राजगुरुत्व अवघें ॥ कृपाचार्या समर्पिती ॥ १३४ ॥
आल्या ब्राह्मणांचा सन्मान ॥ धर्मास भेटवावा आणून ॥
हें धौम्य उपाध्यायाधीन ॥ कृष्णाज्ञेनें धर्म करी ॥ १३५ ॥
सर्वांस अधिकारवस्त्रें ॥ दिधलीं धर्मराजें पवित्रे ॥
समस्त ब्राह्मण धनसंभारें ॥ युधिष्ठिरें तोषविले ॥ १३६ ॥
तिन्ही वर्ण प्रजा समस्त ॥ त्यांस वस्त्रें अलंकार देत ॥
असंतुष्ट नाहीं तेथ ॥ कोणी एक उरलाचि पैं ॥ १३७ ॥
प्रतिदिवशीं दान नेम ॥ धृतराष्ट्राहाती करवी उत्तम ॥
स्वर्गवासियांचीं धर्म ॥ श्राद्धें करवी यथाविधि ॥ १३८ ॥
अग्निहोत्रादि सत्कर्म ॥ षोडशदानें असंभ्रमें ॥
नित्यनैमित्तिकें नेमे ॥ धर्मराज आचरे ॥ १३९ ॥
कित्येक मित्र राजे पडिले रणीं ॥ ज्यांसी पुत्र पौत्र नाहीं कोणी ॥
त्यांचीं श्राद्धें करूनी ॥ धर्म गोदान देववित ॥ १४० ॥
ज्यांचे भ्रतार पडिले रणीं ॥ धर्में त्यांसी बोलावूनी ॥
म्हणे मी तुमचा आहें ऋणी ॥ यावज्जन्मपर्यंत ॥ १४१ ॥
धनधान्य वस्तु पाहीं ॥ सर्व पुरवी त्यांचे गृहीं ॥
कोणता पदार्थ न्यून नाहीं ॥ न मागतां पाठवित ॥ १४२ ॥
धर्म सर्वांचें अंतरंग जाणत ॥ आशीर्वाद सर्वांचा घेत ॥
वृद्धसंन्यासी दहा सहस्त्र तेथ ॥ धर्माश्रयें राहती ॥ १४३ ॥
जेविले कोटी ब्राह्मण ॥ एके यतीस देतां भोजन ॥
दोहोंचे पुण्य समान ॥ शास्त्रप्रमाण मर्यादा ॥ १४४ ॥
ऐसे दहासहस्त्र संन्यासी ॥ धर्म त्रिकाळ भजे त्यांसी ॥
लक्ष ब्राह्मण कुटुंबासी ॥ धर्में आवडीं स्थापिलें ॥ १४५ ॥
राज्य करी यथाविध ॥ परी कृष्णभजनीं सदा सावध ॥
हरिपदांबुजी मिलिंद ॥ पंचपांडव सर्वदा ॥ १४६ ॥
धर्माची आज्ञा घेऊनी ॥ राजे ऋषी पावले स्वस्थानीं ॥
चौघां बंधूंप्रति प्रियवाणी ॥ धर्मराज बोलतसे ॥ १४७ ॥
तुम्ही पावलां श्रम बहुत ॥ अज्ञातवास वनवास भोगित ॥
युद्ध करून अडत ॥ शत्रु रणीं विभांडिले ॥ १४८ ॥
तरी आतां सर्वसुख भोगा ॥ सर्वकाळ भजा श्रीरंगा ॥
न्यून पडले तें तें सांगा ॥ सर्व प्रजाचें मजलागीं ॥ १४९ ॥
दुर्योधनाचे जें सदन ॥ तेथें राहिला भीमसेन ॥
पंडुगृहीं धर्म आपण ॥ यथासुखें विराजित ॥ १५० ॥
धृतराष्ट्राचे आज्ञेंकरून सत्य ॥ पांच पांडव सदा वर्तत ॥
दुःशासनसदनीं पार्थ ॥ राहता जाहला तेधवां ॥ १५१ ॥
कर्णाचें गृह दिधलें नकुला ॥ शकुनिगृहीं सहदेव शोभला ॥
अर्जुनापाशी श्रीरंग राहिला ॥ महिमा गाइला वेदीं ज्याचा ॥ १५२ ॥
सात्यकी वीर पाहें ॥ तोही पार्थगृहीं सदा राहे ॥
न्यून पदार्थ कांहीं नोहे ॥ सदाकाळ वेचितां ॥ १५३ ॥
अष्ट महासिद्धि नवनिधि ॥ कृष्णकृपें सर्व समृद्धि ॥
अष्टभोग यथाविधि ॥ भोगिती प्रीतीं यथान्यायें ॥ १५४ ॥
यथाकाळीं वन वर्षत ॥ कोणासी मरण नाहीं नगरांत ॥
आधिव्याधी जन रहित ॥ स्वप्नी दुःख नेणती ॥ १५५ ॥
धौम्याचे गृही समृद्धि सर्व ॥ पुरवीत सदा धर्मराव ॥
विदुरगृहीं संपत्ति अभिनव ॥ धर्मराज पुरवीतसे ॥ १५६ ॥
धूतराष्ट्रगांधारिचे मन ॥ क्षणोक्षणीं रक्षी पंडुनंदन ॥
सुभद्रे उत्तरेचें मन ॥ तोषवीत धर्मराव ॥ १५७ ॥
द्रौपदीचे मनोरंजन ॥ करी कुंतीचें समाधान ॥
सकल प्रजा चार्‍ही वर्ण ॥ सुखरूप सर्वांविषयी ॥ १५८ ॥
तो नयन झाकूनि रमानाथ ॥ उगाच बैसला ध्यानस्थ ॥
जैसा दीप निर्वात- ॥ स्थळी अभंग ठेविला ॥ १५९ ॥
धर्म म्हणे हृषीकेशी ॥ काय आठवलें मानसीं ॥
मज सांगा तें निश्चयेंसीं ॥ क्षीराब्धिहृदयविलासा ॥ १६० ॥
श्रीकृष्ण बोले सद्‌गदित ॥ प्राण माझा जाह्नवीसुत ॥
शरपंजरी पहुडला तो समर्थ ॥ ध्यान स्तवन करीत माझें ॥ १६१ ॥
तयाकडे आजि माझें मन ॥ क्षणोक्षणीं जातें धांवोन ॥
ज्याणें तेवीस दिवस युद्ध करून ॥ भार्गवराम जिकिला ॥ १६२ ॥
जेणें स्वसत्ताबळें पूर्वी ॥ पालाणिली सकळ उर्वी ॥
ऋषि देव नर सर्वीं ॥ ज्याचे पाय वंदिले ॥ १६३ ॥
परद्रव्य जैसें तृण ॥ परनारी मातेसमान ॥
चार्‍ही वेदशास्त्रीं निपुण ॥ करतलामलक पुराणें ॥ १६४ ॥
चौदा विद्या चौसष्ट कळा ॥ भीष्माच्या दासी सकळा ॥
तरी त्या भीष्माप्रति ये वेळां ॥ जाऊं चला युधिष्ठिरा ॥ १६५ ॥
राजधर्म आपद्धर्म ॥ मोक्षधर्म दानधर्म ॥
त्याच्या मुखें होय ज्ञान परम ॥ श्रवण करीं रे सर्वदा ॥ १६६ ॥
धर्म म्हणे माझें मानस ॥ हेंचि चिंती रात्रंदिवस ॥
तूं स्वामी वैकुठविलास ॥ अंतकाळी भेटे त्यासी ॥ १६७ ॥
मग श्रीकृष्ण आणि पांडव ॥ स्यंदनारूढ जाहले सर्व ॥
आणीकही संत महानुभाव ॥ भीष्मदर्शना निघाले ॥ १६८ ॥
जैसा किरणचक्रीं विराजे मित्र ॥ तैसा शरपंजरीं दिसे गंगापुत्र ॥
भोंवते व्यास नारदादि ऋषीश्वर ॥ वसिष्ठादिक बैसले ॥ १६९ ॥
भीष्में देखिला जगन्निवास ॥ म्हणे हे परात्पर परमपुरुष ॥
सर्वव्यापक तूं जगन्निवास ॥ मण्यामाजी सूत्र जैसें कां ॥ १७० ॥
मग सहस्रनामेंकरून ॥ भीष्में केलें अपार स्तवन ॥
हे वेदोद्धारक जगजीवन ॥ कमठवेषधारका ॥ १७१ ॥
नमो तुज वराहवेषा ॥ नमो प्रल्हादवरदा सर्वेशा ॥
वामनरूपा कमलेशा ॥ परमपुरुषा जगद्‌गुरो ॥ १७२ ॥
भार्गववेषा मधुकैटभारी ॥ सर्व निःक्षत्रिय केली धरित्री ॥
असुरांतका रावणारी ॥ कालियमर्दना श्रीरंगा ॥ १७३ ॥
त्रिलोकींचें ज्ञान ॥ भीष्माचे हृदयीं घाली जगज्जीवन ॥
सकळिकें केलें आदरें पूजन ॥ देवव्रताचें तेधवां ॥ १७४ ॥
आणीकही वीर बहुत ॥ यात्रा आली पहावया गंगासुत ॥
सकळ वाहनाखालीं उतरत ॥ भीष्मास दूरी देखोनि ॥ १७५ ॥
मग प्रदक्षिणा नमन करून ॥ भोंवते शोभती अवघे जण ॥
जैसें मानससरोवर वेष्टून ॥ राजहंस बैसती पैं ॥ १७६ ॥
भीष्मास म्हणे मनमोहन ॥ सावधान आहे कीं तुझें मन ॥
शरघातें शरीर जाण ॥ व्यथा पावत नाहीं कीं ॥ १७७ ॥
तूं ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी ॥ वर्तसी सुंदरस्त्रियांमाझारीं ॥
देव न पावती तुझी सरी ॥ मनोजय केला त्वां ॥ १७८ ॥
तूं विरक्त भक्त ज्ञानी ॥ तुजविण थोर नसे कोणी ॥
तरी धर्माचा शोक ये क्षणीं ॥ दूर करीं देवव्रता ॥ १७९ ॥
सर्व धर्माचें निरूपण ॥ यास सांगें तूं स्वमुखेंकरून ॥
भीष्म म्हणे तूं सर्वज्ञ ॥ वेदरूप वेदज्ञ तूं ॥ १८० ॥
माझें शरीर जर्जर ॥ शरघायें जाहले चूर ॥
देहांतसमय आतां सत्वर ॥ वाचा विवळ जातसे ॥ १८१ ॥
तरी तूंच करीं दिव्य निरूपण ॥ तूं षड्‌गुणैश्वर्यपूर्ण ॥
तुजहून मी काय सर्वज्ञ ॥ भक्तवत्सला स्नेहाळा ॥ १८२ ॥
भणंगापुढें क्षीरसागर ॥ सुधा लागली म्हणे फार ॥
वाचस्पति विचार ॥ बोल म्हणे मूढातें ॥ १८३ ॥
याचकांकडे राजा मागे दान ॥ चातकास घन म्हणे द्या जीवन ॥
तूं पूर्णब्रह्म सनातन ॥ मज ज्ञान वद म्हणशी ॥ १८४ ॥
हरि म्हणे दुर्धर धनुर्धरा ॥ सर्वज्ञानी गंगाकुमारा ॥
देवव्रता योगेश्वरा ॥ मी वर तुज देतों पैं ॥ १८५ ॥
क्षधा तृषा व्यथा ॥ तुज न बाधती तत्त्वतां ॥
शरपंजरशेज पाहतां ॥ सुमनाऐशी तुज होय ॥ १८६ ॥
षड्रिपुरहित तूं साचार ॥ सत्त्वरजतमातीत तूं निर्धार ॥
अवस्थात्रयातीत निर्विकार ॥ त्रिदोषरहित शरीर हो ॥ १८७ ॥
भीष्मावरी सुमनें सुरेख ॥ वरून वर्षती वृंदारक ॥
यावरी तो गंगात्मज देख ॥ नीतिशास्त्रें वदेल पैं ॥ १८८ ॥
धर्मराज भयभीत ॥ पुसावया नव्हे शक्त ॥
आपण अन्याय केले बहुत ॥ म्हणोन पुढें न येचि ॥ १८९ ॥
श्रीनिवास म्हणे गंगाकुमारा ॥ जवळी बोलावीं युधिष्ठिरा ॥
शंका वाटते त्याच्या अंतरा ॥ अन्यायी आपण म्हणोनियां ॥ १९० ॥
भीष्म म्हणे समरभूमीस ॥ युद्ध करितां नाहीं दोष ॥
तेथें हत्या कोणाची कोणास ॥ बाधक न होय सर्वथा ॥ १९१ ॥
भीष्म म्हणे धर्मराजा ॥ सोमवंशविजयध्वजा ॥
जवळ बैसें सुतेजा ॥ शंका मनीं न धरावी ॥ १९२ ॥
मग धर्मराज करून नमन ॥ जवळी बैसला कर सोडून ॥
सकल ऋषिमंडळ पावन ॥ ऐकावया सरसावलें ॥ १९३ ॥
यादव पांडव ऐकती ॥ प्रजाजन बहुत बैसती ॥
यावरी भीष्म बोलेल कोणे रीतीं ॥ तेंच पंडितीं परिसावें ॥ १९४ ॥
श्रीधरवरदा रुक्मिणीवरा ॥ ब्रह्मानंदा विश्वंभरा ॥
भीमातीरवासा दिगंबरा ॥ पुढें रचना बोलें कैसी ॥ १९५ ॥
तूं जें सांगशी मम श्रोत्रीं ॥ तेंच लिहितों कागदपत्रीं ॥
तुझ्या वचनाशिवाय अन्य वक्त्रीं ॥ नाहीं लिहीत पांडुरंगा ॥ १९६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ शांतिपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ छप्पन्नाव्यांत कथियेला ॥ १९७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे शांतिपर्वणि षट्पंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५६ ॥
अध्याय छपन्नावा समाप्त


GO TOP