श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बावन्नावा


पांडवपुत्रांचा अश्वत्थाम्याकडून वध


श्रीगणेशाय नम: ॥
मागें गदापर्व संपलें देख ॥ पुढें आरंभिले सौप्तिक ॥
वैशंपायन वक्ता सुरेख ॥ जनमेजयाप्रति सांगे ॥ १ ॥
सबळ गदाघायेकरून ॥ आरंबळे दुर्योधन ॥
सिद्ध जाहले जावया प्राण ॥ परी आंगवण न सोडी ॥ २ ॥
एकादश अक्षौहिणी दळ संहारिलें ॥ त्यांत तिघे जण उरले ॥
कृतवर्मा कृपाचार्य वहिले ॥ आणि तिसरा अश्वत्यामा ॥ ३ ॥
सेनापतित्व गुरुसुता ॥ दुर्योधन जाहला देता ॥
शपथ करोनि तत्त्वतां ॥ तिघे वीर निघाले ॥ ४ ॥
इतुका जाहला गतकथार्थ ॥ पुढें सावध ऐकोत पंडित ॥
कर्णपिता पावला अस्त ॥ अंधार घोर पडियेला ॥ ५ ॥
पांडवसेनेसमीप जाण ॥ तिघे स्वरूपे येऊन ॥
जैसें धनाढ्याचें लक्षोनि सदन ॥ तस्करे पाळती पाहती ॥ ६ ॥
तो वीरांचा होतसे गजर ॥ जयवाद्यांचा नाद थोर ॥
फेरे घेती घरटीकार ॥ दीपिका अपार न गणवती ॥ ७ ॥
लाग न चले तेथें कांहीं ॥ तिघें निघाले लवलाहीं ॥
न्यग्रोधतळीं ते समयीं ॥ रथ सोडिला क्षणभरी ॥ ८ ॥
अंतरीं चिंतेनें कष्टी बहुत ॥ सुयोधनाचें दुःखें आरंबळत ॥
क्षतें पडलीं तेणें समस्त ॥ गात्रें तिडका हाणिती ॥ ९ ॥
उतरोन गेला रणमद ॥ पराजयाचा परम खेद ॥
म्हणती पांडवांचा अपराध ॥ ब्रह्मांडांत न समाये ॥ १० ॥
तीं वटवृक्ष जैसा पर्वत ॥ सहस्त्र शाखांनीं मंडित ॥
त्याखालीं तिघे जण चिंताक्रांत ॥ श्वासोच्छ्वास टाकिती ॥ ११ ॥
संध्या करून क्षितीवरी ॥ तिघे निजले शेजारीं ॥
दुःखनिद्रा ते अवसरीं ॥ दोघां जणां लागली ॥ १२ ॥
कृतवर्मा आणि गौतमीनंदन ॥ निद्रार्णवीं जाहले निमग्न ॥
परि कृपीसुत दुखेंकरून ॥ आरंबळत न ये निद्रा ॥ १३ ॥
महासर्प जैसा धुसधुशित ॥ तेविं वेळोवेळां श्वास टाकित ॥
घोर निशा होतां प्राप्त ॥ श्वापदे पक्षी बाहती ॥ १४ ॥
पिगळियांचे किलकिलाट ॥ शिवा तेथें भुंकती सैराट ॥
उलूकांचे शब्द अचाट ॥ भूतांचे थाट हिंडती ॥ १५ ॥
निधानें फिरावया निघती ॥ क्षणक्षणां प्रकाश दाविती ॥
येऊं येऊं ऐसें पुसती ॥ सभाग्याचे सदनास ॥ १६ ॥
बाहेर निघाले महाफणी ॥ मस्तकीं झळकती दिव्यमणी ॥
यक्ष पिशाच राक्षसिणी ॥ सैरावैरा हिंडती ॥ १७ ॥
मिठ्या घालूनियां रीस ॥ वृक्षीं बैसले सावकाश ॥
जाह्नवीजळावरून प्राणेश ॥ सुशीतळ येतसे ॥ १८ ॥
ऐशी ते निशा काळी ॥ कीं काळपुरूषाची कांबळी ॥
कीं काजळाची उटी घेतली ॥ पृथ्वी आणि आकाशें ॥ १९ ॥
असो जागा तेथें द्रोणसुत ॥ तो त्या वटवृक्षावरी निद्रित ॥
सहस्त्र काग कुटुंबांसहित ॥ सुखेंकरोनि राहती ॥ २० ॥
तंव तेथें आला दिवाभीत ॥ परमविशाल अति उन्मत्त ॥
वृक्षावरी वेगें चढत ॥ तस्करगतीनें तेधवां ॥ २१ ॥
उलूकें ख्याति केली ते क्षणीं ॥ सहस्त्र कागांच्या माना मोडूनी ॥
वृक्षातळी टाकूनी ॥ गेला निघूनी क्षणार्धें ॥ २२ ॥
द्रौणी तटस्थ पाहे ते वेळां ॥ म्हणे एकें उलूकें सर्व संहार केला ॥
हा आम्हांस गुरु जाहला ॥ दीक्षा आतां हेचि घेऊं ॥ २३ ॥
त्या दोघांस जागेकरून ॥ म्हणे उठा न लावावा क्षण ॥
उलूकगुरू येऊन ॥ दीक्षा आम्हांस दिधली ॥ २४ ॥
पांचाळ आणि पंडुकुमार ॥ यांचा ऐसाच करीन संहार ॥
चला नका करूं उशीर ॥ संहारून येऊं त्यांसी ॥ २५ ॥
मग म्हणे शारद्वत ॥ न कळत केवि करावा घात ॥
क्षत्रियधर्म येथ ॥ कोठे उरेल सांग पां ॥ २६ ॥
गुरुसुत म्हणे ते वेळां ॥ तिहीं धर्म कोठे सांभाळिला ॥
या ऐशा दुष्टां सकलां ॥ गुप्तरूपें मारीन मी ॥ २७ ॥
कृतवर्मा म्हणे निश्चित ॥ लोक हांसतील समस्त ॥
गुरुपुत्र दुष्ट यथार्थ ॥ केला घात निद्रितांचा ॥ २८ ॥
अश्वत्यामा म्हणे हे बोल ॥ तुमचे वाटती विषतुल्य ॥
पूर्वीच म्यां निश्चय अढळ ॥ केला तो तुम्ही जाणतां ॥ २९ ॥
पांचाळ पांडव मारिल्याविण साच ॥ न काढीं कदा आंगीचे कवच ॥
दुर्योधनाचे प्राण पांच ॥ तळमळत पाहिले कीं ॥ ३० ॥
पृथ्वीपति दुर्योधन वीर ॥ त्याचे मस्तकींचा दिव्यकोटीर ॥
भीमे हाणोनि लत्ताप्रहार ॥ कैसा चूर्ण पैं केला ॥ ३१ ॥
त्याचे मस्तकीं पद देऊन ॥ मर्दन तेणें केला चूर्ण ॥
मांड्यावर गदा हाणून ॥ अधर्में कैसें मारिलें ॥ ३२ ॥
परमक्रोधें गुरुसुत ॥ कडकडां दांत खात ॥
म्हणे तुम्ही सर्व बैसा येथ ॥ एकलाचि तेथें जातो मी ॥ ३३ ॥
मग रथारूढ होऊन ॥ वेगें चालिला गुरुनंदन ॥
मग तेही दोघे जण ॥ सवेंच जाते जाहले ॥ ३४ ॥
मनास मागें टाकून ॥ शिबिराजवळी आले जाण ॥
काळरूपी तिघे जण ॥ उभे ठाकले तेधवां ॥ ३५ ॥
सकल सेना निद्रित ॥ कोणी जागे नाहीं तेथ ॥
तो पार्थें बळी देऊन त्वरित ॥ महारुद्र स्थापिला असे ॥ ३६ ॥
स्वरूप परम भयंकर ॥ कृतांताऐसें पसरिलें वक्त्र ॥
केसर ऊर्ध्व पिंगट शरीर ॥ भस्म चर्चिलें सर्वांगीं ॥ ३७ ॥
सिंदूरगंगा वाहत ॥ तैसी जिव्हा लळलळित ॥
त्रिशूलादि आयुधें समस्त ॥ भयंकर झळकती ॥ ३८ ॥
विश्व ग्रासील संपूर्ण ॥ ऐसें पसरिलें तेणें वदन ॥
तें महद्‌भुत देखोन ॥ अश्वत्यामा दचकला ॥ ३९ ॥
म्हणे हें तो आलें थोर विघ्न ॥ महद्‌भुत अत्यंत दारुण ॥
मग सोडिता जाहला बाण ॥ अति तीक्ष्ण तेजाळ ॥ ४० ॥
ज्या बाणघायेंकरून ॥ महानग होतील चूर्ण ॥
तो शर न लागतां क्षण ॥ मुख पसरोन गिळीतसे ॥ ४१ ॥
तो शरनदीचे महापूर ॥ गिळिता जाहला श्रीशंकर ॥
मग तूणीर सरला समग्र ॥ गुरुपुत्र तटस्थ राहे ॥ ४२ ॥
शक्ति टाकिली दारुण ॥ तीही चूर्ण केली चावून ॥
गदा दिधली भिरकावून ॥ तीही गिळिली तेधवां ॥ ४३ ॥
खड्‌ग हाणिलें सुभट ॥ तेंही दंतानें केलें पिष्ट ॥
गुरूपुत्र परम धीट ॥ नाना शस्त्रें वर्षतसे ॥ ४४ ॥
द्रौणीचे पाठीशीं भयभीत ॥ कृतवर्मा आणि शारद्वत ॥
अश्वत्यामा चिंताक्रांत ॥ म्हणे हें भूत केविं आवरे ॥ ४५ ॥
म्यां अधर्म मांडिला दारुण ॥ म्हणोन हें प्रकटले विघ्न ॥
मज वारीत होता गौतमनंदन ॥ परी म्यां तें ऐकिलें नाहीं ॥ ४६ ॥
मग अद्‌भुत शिवस्तवन ॥ करिता जाहला गुरुनंदन ॥
म्हणे हे काळरूप विशालवदन ॥ कालात्मया कालरूपा ॥ ४७ ॥
हे भवभवांतका भवानीवरा ॥ भाललोचना भस्मासुरहरा ॥
भस्मोद्धूलना भयंकरा ॥ भद्रकारक पशुपते ॥ ४८ ॥
त्रिगुणातीता त्र्यंबका ॥ त्रिशूलधरणा त्रिपुरांतका ॥
त्रिदोषरहिता त्रितापमोचका ॥ कृपा करीं ये वेळे ॥ ४९ ॥
कामांतका कामरहिता ॥ काकोलधरा क्षयवर्जिता ॥
दक्षमखविध्वंसका अपरिमिता ॥ गजास्यजनका गजारे ॥ ५० ॥
यक्षाधिपमित्रा मृडानीशा ॥ मृत्यंजया श्मशानवासा ॥
वामदेवा विरूपाक्षा ॥ अंधकप्राणमोचक तूं ॥ ५१ ॥
भूताधिपति विश्वेश्वरा ॥ विश्वपालका महापापहरा ॥
अनादिसिद्धा दुष्टसंहारा ॥ विश्वव्यापका जगद्‌गुरो ॥ ५२ ॥
ऐसें करूनियां स्तवन ॥ मग वेदिका त्यापुढें निर्मून ॥
करिता जाहला हवन ॥ महारुद्रप्रीत्यर्थ ॥ ५३ ॥
तो भूतांचे अपार पाळे ॥ भयंकररूपें मुखें विशाळें ॥
हांका देती पसरती आवाळें ॥ चाटिती त्यांकडे पहावेना ॥ ५४ ॥
गुरुसुत टाकी आहुती ॥ म्हणे जय जय शंकरा उमापती ॥
आतां या वेदीमध्ये पूर्णाहुती ॥ माझी टाकितों भक्षीं कां ॥ ५५ ॥
सरसावला गुरुनंदन ॥ उडी टाकितो हें जाणोन ॥
प्रकटला तेथें उमारमण ॥ पंचवदन दशभुज जो ॥ ५६ ॥
म्हणे माग मी जाहलों प्रसन्न ॥ यावरी बोले गुरुनंदन ॥
म्यां जें आरंभिलें कारण ॥ सिद्धि पाववीं समस्त ॥ ५७ ॥
यावरी बोले कैलासपती ॥ सिद्धीस पावेल धरिलें चित्तीं ॥
दिव्यखड्‌ग दिधलें हातीं ॥ कृतांतजिव्हेसारिखें ॥ ५८ ॥
मग पाय वंदून सत्वर ॥ पुढें गेले तिघे तस्कर ॥
शारद्वत कृतवर्मा द्वार ॥ रक्षिती तेव्हां सादरें ॥ ५९ ॥
गुरुसुत म्हणे अवधारा ॥ जो बाहेर निघेल त्यास मारा ॥
पाहूं नका लहान थोरा ॥ संकट संहारा सर्वही ॥ ६० ॥
जैशी धर्मधेनुकंठावरी ॥ बळें बैसतां वक्रसुरी ॥
सगट मोकळी होय धरित्री ॥ तेचि परी करा तुम्ही ॥ ६१ ॥
ऐसें त्यांप्रति सांगोन ॥ आंत प्रवेशला द्रोणनंदन ॥
जैसा मूषकबिळीं अहि दारुण ॥ धुसधुशित संचरला ॥ ६२ ॥
कीं कुरंग निद्रित असतां ॥ तेथें व्याघ्र आला अवचितां ॥
कीं शुष्कतृण पर्वता ॥ ज्वालामाली जाळित ॥ ६३ ॥
अवीचे कोठारा जेविं देख ॥ विभांडित निघे वृक ॥
तैसा तो गुरूसुत देख ॥ आधी शोधित धृष्टद्युम्ना ॥ ६४ ॥
ज्या शिबिरीं होता धृष्टद्युम्न ॥ तेथेंच गेला गुरुनंदन ॥
लत्ताप्रहार हाणोन ॥ केशीं धरोन जागा करी ॥ ६५ ॥
घाबरा पाहे द्रुपदसुत ॥ तो काळरूप द्रौणी दिसत ॥
आपुलें गळां पाश घालित ॥ येरू येत काकुळती ॥ ६६ ॥
म्हणे हे आचार्यपुत्रा अवधारीं ॥ मज आतां शस्त्रानें मारीं ॥
आपदा करूं नको ये अवसरीं ॥ बोले यावरी गुरुसुत ॥ ६७ ॥
तूं गुरुहत्या केली पापमती ॥ तुज कैंची अधमा सुगती ॥
धृष्टद्युम्नाच्या युवती ॥ जाग्या जाहल्या तेधवां ॥ ६८ ॥
सेवक समस्त पळती ॥ नितंबिनी वक्षःस्थळें बडवती ॥
गळां पाश घालून क्षितीं ॥ मारोनियां टाकिला ॥ ६९ ॥
ऐसें घोर कर्म करून ॥ तेथून निघाला गुरुनंदन ॥
धृष्टद्युम्न स्त्रिया मिळोन ॥ महाशब्द गाजविती ॥ ७० ॥
लोक जागे जाहले समस्त ॥ द्रौणी धृष्टद्युम्नाच्या रथीं बैसत ॥
मग उत्तमौजास मारिलें तेथ ॥ क्षणमात्र न लागतां ॥ ७१ ॥
युधामन्यु धांवला तेथ ॥ गदाघायें तयास हाणित ॥
येरें खड्‌ग काढूनि शिवदत्त ॥ क्षणें तयास मारिले ॥ ७२ ॥
आणीक निजले होते पांचाळ ॥ ते तेथेंच मारिले तत्काळ ॥
खड्‌गधारा तेजाळ ॥ पाये उरी न उरेची ॥ ७३ ॥
हत्ती घोडे पायदळ ॥ संहारीत जाय सकळ ॥
सहस्रावधि वीर सबळ ॥ संहारीत तेधवां ॥ ७४ ॥
जैसा कृषिकार करी सवंगण ॥ तैशी शिरें टाकिलीं छेदून ॥
तो द्रौपदीचे पंचनंदन ॥ शस्त्रें घेऊन भांडती ॥ ७५ ॥
प्रतिविंध्य श्रुतसोम ॥ श्रुतकर्मा शतानीक नाम ॥
श्रुतसेन पांचवा परम ॥ युद्ध करिती तेधवां ॥ ७६ ॥
शिखंडी उठला तिकडून ॥ तेणें युद्ध केलें एक क्षण ॥
परी तो काळ गुरुनंदन ॥ त्यावरी हाणी शिवखड्‌ग ॥ ७७ ॥
शिखंडीचें शिरकमळ ॥ खड्‌गें छेदिलें तत्काळ ॥
तरी पांचही ते द्रौपदीचे बाळ ॥ अनिवारपणें भांडती ॥ ७८ ॥
ते प्रतिपांडव घेऊनि पाश ॥ युद्ध करिती आसमास ॥
सकल शस्त्रें तो तामस ॥ छेदिता जाहला एकदांचि ॥ ७९ ॥
रथांचीं चाकें घेऊन ॥ टाकिती द्रौपदीचे नंदन ॥
आणीक शस्त्रें दारुण ॥ वर्षते जाहले अपार ॥ ८० ॥
परी तो काळरूप द्रौणी ॥ पांचही मारिले तये क्षणीं ॥
शिरें टाकिलीं छेदूनी ॥ नालविरहित जेविं कमळे ॥ ८१ ॥
सोमवंशींचे राजे पवित्र ॥ विराटाचे कित्येक पुत्र ॥
एवं मारिले सर्वत्र ॥ कोणी उरला नाहींच ॥ ८२ ॥
पांडवांचे अवघे रक्षक ॥ नानापरीचे सेवक ॥
कोणी उरला नाहीं हाक ॥ फोडावयाकारणें ॥ ८३ ॥
निजल्या ठायीं मारिले फार ॥ तो मोकळे सुटले कुंजर ॥
रगडीत चालिले जीवमात्र ॥ तुरंग हिंसत धांवती ॥ ८४ ॥
प्रेतें पडलीं अपार ॥ भूतावळी धांवल्या समग्र ॥
मांस ग्रासिती सत्वर ॥ मिटक्या देती भक्षितां ॥ ८५ ॥
मनुष्याची काढूनि आंतें ॥ आग्रहें देती एकमेकांतें ॥
आनंदेकरूनियां तेथें ॥ हांका देती एकदाचि ॥ ८६ ॥
इकडे कुंजर मातले बहुत ॥ शिबिरे मोडूनि जीव रगडित ॥
शुंडेनें स्यंदन भिरकावित ॥ कित्येक चूर्ण होती घाये ॥ ८७ ॥
कज्जलें ब्रह्मांडगोल चर्चिला ॥ तैसा घोर अंधार पडला ॥
त्यांत सवेग वायु सुटला ॥ धुरळा निबिड न गणावे ॥ ८८ ॥
कित्येक उरले निश्चितीं ॥ ते आपणांतें आपण मारिती ॥
पुत्रास पिते नोळखती ॥ हाणोनि पाडिती पृथ्वीवरी ॥ ८९ ॥
कोणी शिबिराबाहेर निघत ॥ तो कृतवर्मा आणि शारद्वत ॥
शस्त्रघायें संहारित ॥ जाहला अंत सर्वांचा ॥ ९० ॥
मग शिबिरासी लाविला अग्न ॥ उजेडें मारिले अवघे जण ॥
रक्तनिम्नगा भरून ॥ लवणाब्धि पाहों धांवती ॥ ९१ ॥
प्रेतें पडलीं बहुत ॥ धरणी रिती न दिसे तेथ ॥
एक म्हणती येथ ॥ राक्षस येऊन पडियेले ॥ ९२ ॥
भूतें झोटिंग धांवती ॥ रक्त मज्ज मांस भक्षिती ॥
एकमेकांचे हातींचें घेती ॥ हिरोनियां विनोदें ॥ ९३ ॥
पांडव नव्हते ते स्थळी ॥ अगाध जाणोनि वनमाळी ॥
कटकाबाहेर एकांतस्थळीं ॥ शिबिर एक दिधलें होतें ॥ ९४ ॥
तेथें पांडव सात्यकी श्रीकृष्ण ॥ विचारी बैसले सातही जण ॥
कीं ते सप्त ऋषि निर्वाण ॥ एकांतीं गुहेंत बैसले ॥ ९५ ॥
लीलाविग्रही श्रीधर ॥ तोच अवघें नाचवी सूत्र ॥
एवं वांचले पंडुपुत्र ॥ वरकड संहार जाहला ॥ ९६ ॥
सात अक्षौहिणी संपूर्ण दळ ॥ संहारोनि गेलें सकळ ॥
आपणासहित सात निर्मळ ॥ उरवूनियां ठेविले ॥ ९७ ॥
असो इकडे तिघे जण ॥ एकत्र होऊन गेले निघोन ॥
स्यंदनावरी बैसोन ॥ पवनवेगें चालिले ॥ ९८ ॥
केलीं कर्में तीं निश्चितीं ॥ एकमेकांप्रति सांगती ॥
इकडे दुर्योधन पापमती ॥ कासावीस होतसे ॥ ९९ ॥
हात पाय असे आखुंडित ॥ परी प्राण न जाय त्वरित ॥
तो तिघे पातले अकस्मात ॥ रक्तचर्चित सर्वांगीं ॥ १०० ॥
शिबिरांत नसता पंडुनंदन ॥ निजलियांस आले मारून ॥
जैसें शून्यघरीं वाण ॥ नेऊनियां दिधलें ॥ १०१ ॥
असो दुर्योधन त्यांस देखत ॥ जाहला परम हर्षयुक्त ॥
तिघे वृत्तांत सांगत ॥ संहारिले सर्वही ॥ १०२ ॥
एक पांडव वेगळे करूनी ॥ उरला नाहीं तेथें कोणी ॥
सात्यकी कृष्ण पांडव कोणत्या स्थानीं ॥ पळून गेले कळेना ॥ १०३ ॥
शोधिलीं सर्वही स्थानें ॥ परी ते काढून नेले श्रीकृष्णें ॥
सांपडते तरी तत्‍क्षणें ॥ मारूनियां टाकितों ॥ १०४ ॥
दुर्योधन पहुडला क्षितितलीं ॥ जवळी गदा विशाल पडली ॥
जैशी कां सेजे पहुडली ॥ पट्टराणी प्रीतीनें ॥ १०५ ॥
त्यांकडे पाहे दुर्योधन ॥ म्हणे मी आतां मोडीन प्राण ॥
माझें जालें समाधान ॥ उत्तम कार्य तुम्हीं केलें ॥ १०६ ॥
तो ते तिघे जण म्हणती ॥ धन्य तूं दुर्योधना या क्षिती ॥
पांडव परम पापमती ॥ तुज अधर्में मारिलें ॥ १०७ ॥
तूं जातोस स्वर्गसदना ॥ तुझें वियोगदुःख सोसवेना ॥
आम्हांस पृथ्वी ठाव देईना ॥ यावरी ऐसें वाटतें ॥ १०८ ॥
आम्हीं पाप केलें दारुण ॥ निजलियां आलों मारून ॥
पांडवभयानें रान ॥ आम्हीं कोणतें घ्यावें आज ॥ १०९ ॥
तूं जाशील स्वर्गाप्रती ॥ तुज भीष्म द्रोण कर्ण भेटती ॥
आम्हीं सर्व मारिले ही ख्याती ॥ सांग त्यां प्रती तत्त्वता ॥ ११० ॥
त्यांचेचे अवघे उरले सात ॥ आम्ही उरलो तीन येथ ॥
दुर्योधन म्हणे मनोरथ ॥ माझे पूर्ण तुम्हीं केले ॥ १११ ॥
यावरी तिघे काय बोलिले ॥ आमच्या कष्टांचें सार्थक न झालें ॥
जरी तूं वांचतास ये वेळे ॥ तरी सर्व बरें होतें ॥ ११२ ॥
तिघांचे नेत्रीं अवधारा ॥ सुटल्या तेव्हां अश्रुधारा ॥
अहा दुर्योधना नृपवरा ॥ जाशी आम्हां टाकूनियां ॥ ११३ ॥
ऐसें बोलती तिघे जण ॥ तो सुयोधनें वटारिले नयन ॥
हुंकारूनि सोडिला प्राण ॥ हरिस्मरण कैंचें त्यासी ॥ ११४ ॥
त्रिभुवनींचा मत्सर ॥ करून घडिला तो एकत्र ॥
कृष्णद्वेषी दुराचार ॥ त्याचे मुखीं नाम कैंचें ॥ ११५ ॥
संजय म्हणे कुरुनाथा ॥ मी सर्व पाहोन आलों आतां ॥
तुमची क्रिया तत्त्वतां ॥ तुम्हांसीच फळा आली ॥ ११६ ॥
सौप्तिकपर्व समाप्त ॥ एकाच अध्यायांत जाहलें येथ ॥
पुढें ऐषिकपर्व पंडित ॥ श्रवण करीत आदरें ॥ ११७ ॥
ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ श्रीधरवरद अत्यद्‌भुत ॥
तो जें जें कर्णी सांगत ॥ तेंचि येथें लिहिलें असे ॥ ११८ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सौप्तिकपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बावन्नाव्यांत कथियेला ॥ ११९ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे सौप्तिकपर्वणि द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५२ ॥
अध्याय बावन्नावा समाप्त


GO TOP