श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय त्रेपन्नावा


अश्वत्थामा व अर्जुन यांचे अस्त्रयुद्ध


श्रीगणेशाय नम: ॥
जय जय क्षीराब्धिजाविहारा ॥ मत्स्यरूपिया वेदोद्धारा ॥
महाकपटिया शंखासुरा ॥ वधोनियां धर्म वाढविला ॥ १ ॥
मंदरगिरी धरोनि पृष्ठावरी ॥ चतुर्दश रत्‍नें काढिलीं बाहेरी ॥
कूर्मवेषां मधुकैटभारी ॥ भक्तकैवारी तूं साच ॥ २ ॥
रसातळा सष्टि जातां ॥ सकल देवीं धांवा करितां ॥
वराहवेषें तूं रमानाथा ॥ पृथ्वी दाढे धरियेली ॥ ३ ॥
स्तंभ भेदोनियां एकसरा ॥ विदारिलें महा असुरा ॥
प्रल्हादरक्षका सर्वेश्वरा ॥ नृहरिवेषधारका ॥ ४ ॥
जो दानें व्रतें तपें बळी ॥ त्यापाशीं याचक तूं वनमाळी ॥
त्रिभुवन तुवां आटिलें पायांतळीं ॥ वामनवेषें कमलेशा ॥ ५ ॥
सेवक सदन पृतना नाहीं ॥ तीन सप्तकें निर्वीर मही ॥
करून सर्वदा तूं विजयी ॥ अद्याप पाहीं नांदसी ॥ ६ ॥
वैश्रवणबंधु दशास्य ॥ तेणें बंदीं घातले त्रिदश ॥
मग त्वां धरोनि रामवेष ॥ अदितिपुत्रा सोडविलें ॥ ७ ॥
तोचि तूं आनकदुंदुभिसुत ॥ द्वारकाधीश मन्मथतात ॥
तांडव दाखवून अद्‌भुत ॥ पांडव रक्षिले निजबळें ॥ ८ ॥
कलियुगीं लोक धनांध ॥ जिहीं जवळी रक्षिले कामक्रोध ॥
तयांशीं तूं न बोलसी बौद्ध ॥ लीला अगाध दाविशी ॥ ९ ॥
पुढें म्लेंच्छ माजतील दारुण ॥ टाकिती सत्कर्मधर्म मोडून ॥
मग तूं कल्कीवेष भगवान ॥ तुरंगवहनीं प्रकटसी ॥ १० ॥
तोचि तूं सर्वेशा भीमातीरीं ॥ दोन्ही कर ठेवून कटीवरी ॥
अद्यापि नांदसी पंढरीं ॥ ब्रह्मानंदा जगद्‌गुरु ॥ ११ ॥
मागें पर्व संपलें सौप्तिक ॥ पुढें लागलेंसे ऐषिक ॥
वैशंपायन वक्ता सुरेख ॥ जनमेजयाप्रति सांगे ॥ १२ ॥
कृतवर्मा अश्वत्यामा शारद्वत ॥ हे निशीमाजी करून गेले आकांत ॥
जाहला दुर्योधनाचा देहांत ॥ गतकथार्थ इतुका हा ॥ १३ ॥
पांडवसेना मारिली समस्त ॥ धृष्टद्युम्नाचा सारथी उरला तेथ ॥
तो अट्टाहास्यें गर्जना करित ॥ गेला धांवत पांडवांपाशीं ॥ १४ ॥
म्हणे उठा उठा रे सत्वर ॥ जळो तुमचा एकांत विचार ॥
इकडे आकांत जाहला थोर ॥ कुल समग्र संहारिलें ॥ १५ ॥
कृतवर्मा कृपाचार्य द्रोणसुत ॥ तिघांनीं येऊन केला घात ॥
पंचकुमार आणि सेनानाथ ॥ धृष्टद्युम्न मारिला ॥ १६ ॥
शिखंडीआदि थोरलहान ॥ सेना टाकिली सर्व संहारून ॥
सर्व शिबिरां लाविला अग्न ॥ चतुरंगदळ संहारिलें ॥ १७ ॥
मी एकलाच चुकलों मरणा ॥ धांवलों करीत येथें गर्जना ॥
उठा उठा भीमार्जुना ॥ सर्व वंश बुडाला ॥ १८ ॥
ऐसें ऐकतां धर्म भूपाळ ॥ धबधबां पिटी वक्षःस्थळ ॥
मूर्छना येऊन तत्काळ ॥ पडूनि उठे मागुती ॥ १९ ॥
अट्टाहासें रडे भीमसेन ॥ आक्रोशें हांक फोडी अर्जुन ॥
नकुल सहदेव दोघे जण ॥ कपाळ धरणीं आपटिती ॥ २० ॥
श्रीकृष्णासहित पंडुसुत ॥ शिबिराप्रति आले धांवत ॥
तों प्रेतें होऊन समस्त ॥ पडिले आप्त पुत्र मित्र ॥ २१ ॥
नकुल घेऊनियां रथ ॥ उपलव्यासी गेला धांवत ॥
द्रौपदी सुभद्रा स्त्रिया समस्त ॥ घेऊन आला त्वरेनें ॥ २२ ॥
द्रौपदीस कळों न देतां मात ॥ रथ पवनवेगें पिटित ॥
पांचाळी सुभद्रा पुसत ॥ काय वृत्तांत सांगा आम्हां ॥ २३ ॥
येरू म्हणे चला सत्वर ॥ वर्तमान कळेल समग्र ॥
श्रीरंगभगिनी सुकुमार ॥ चिंतानळें आहाळली ॥ २४ ॥
तो शिबिराजवळ आला रथ ॥ कानीं ऐकिला एकचि आकांत ॥
समाचार कळला समस्त ॥ कीं पुत्र बंधू पडियेले ॥ २५ ॥
गडबडां लोळे याज्ञसेनी ॥ ललाट आपटी मेदिनीं ॥
मृत्तिका घेऊन घाली वदनीं ॥ भीम दृढ धरी तीतें ॥ २६ ॥
वक्षःस्थल पिटोन द्रुपदकुमारी ॥ म्हणे धर्मराया आतां राज्य करीं ॥
निर्वंश केली धरित्री ॥ करीं एकछत्री राणीव ॥ २७ ॥
प्रतिविंध्यादि पंचकुमार ॥ कोठे दाखवा माझा सौभद्र ॥
कोठे आहे तो घटोत्‍कच वीर ॥ पुत्र माझा दाखवा कां ॥ २८ ॥
कोठे धृष्टद्युम्न पाठिराखा ॥ दावा माझिया द्रुपदजनका ॥
हें दुःखरूप राज्य देखा ॥ भोगा आतां जन्मवरी ॥ २९ ॥
द्यावया आम्हां तिलांजली ॥ कोणी उरला नाहीं एक मुळीं ॥
काय पाहसी कृष्ण वनमाळी ॥ अंधार कुली पडियेला ॥ ३० ॥
पांडवांचें हृदय पाहें ॥ मज गमे वचाऐसें आहे ॥
अजुनी कां तुझ्या हृदया द्रव न ये ॥ पाहतोसि काय चहूंकडे ॥ ३१ ॥
सुभद्रा शोकें व्याकुळ ॥ म्हणे सात जण माझेबाळ ॥
त्यांत एक तरी निर्मळ ॥ वदन त्याचें पाहीन मी ॥ ३२ ॥
द्रौपदी म्हणे आपुला प्राण ॥ आतांच मी येथें त्यागीन ॥
अथवा महाविष भक्षीन ॥ घालून घेईन गळां पाश ॥ ३३ ॥
निद्रित सांडून कुमार ॥ काय करावया गेलां विचार ॥
तुमचे विचारें समग्र ॥ कुलक्षय जाहला कीं ॥ ३४ ॥
समरांगणीं पडते बाल्य ॥ तरी मज इतुका न वाटता शोक ॥
शिबिरांत कोंडून देख ॥ कैसे निद्रित मारिले ॥ ३५ ॥
धुंडाळितां हें त्रिभुवन ॥ अभिमन्यूऐसें नाहीं रत्‍न ॥
या उत्तरेचें वदन ॥ कुंकुमहीन केवि पाहूं ॥ ३६ ॥
तो अश्वत्यामा चांडाळ ॥ बाळहत्यारी परम खळ ॥
त्याचें शिर छेदून तत्काळ ॥ उठा आणा आतांचि ॥ ३७ ॥
नाही तरी जीवाशा सोडून ॥ येथेंच आम्ही देऊं प्राण ॥
ऐसें ऐकतां भीमसेन ॥ क्रोधेंकरूनि उठिला पैं ॥ ३८ ॥
भीम बैसला रथीं ॥ नकुल जाहला सारथी ॥
मग बोले कमलापती ॥ पार्थाप्रति तेधवां ॥ ३९ ॥
ब्रह्मशिरोस्त्र दारुण ॥ अश्वत्यामा देईल टाकून ॥
तेव्हां कैंचा उरेल भीमसेन ॥ भस्म होइल क्षणार्धें ॥ ४० ॥
तरी अर्जुना धाव सत्वर ॥ बैसावयानाहीं रहंवर ॥
मग श्रीकृष्णरथीं सुभद्रावर ॥ धर्मराजही बैसला ॥ ४१ ॥
धुरेवरी बैसला इंदिरावर ॥ भीमास आटोपित सत्वर ॥
परी धांवतां नाटोपे वृकोदर ॥ पवनवेगे धांवतसे ॥ ४२ ॥
तो जाह्नवीचे तीरीं ॥ व्यासदेव देखिले ते अवसरीं ॥
ऋषींची मांदी निर्धारीं ॥ भोंवती तेव्हां विराजे ॥ ४३ ॥
व्यासाचे पाठीं लपोन ॥ बैसलासे द्रोणनंदन ॥
भीमास दुरून देखोन ॥ भयभीत जाहला ॥ ४४ ॥
पाहोन भीमाचा आवेश ॥ वाटे येतो काळपुरुष ॥
भीमे हांक फोडिली विशेष ॥ तेणें ब्रह्मांड गाजविले ॥ ४५ ॥
मग क्रोधायमान गुरुपुत्र ॥ काढिलें निर्वाणींचें अस्त्र ॥
ज्याचें निवारण हरिहर ॥ विधि पुरंदर करूं न शकती ॥ ४६ ॥
तें अस्त्र द्रोणें पुत्रास दिधलें ॥ जरी बहु प्राणसंकट पडलें ॥
ते वेळे हें सोड वहिलें ॥ कार्य चिंतलें करणार ॥ ४७ ॥
तें अस्त्र द्रौणी जपोन ॥ ध्यान मंत्र न्यास करून ॥
मग दर्भशिखा घेऊन ॥ संकल्प करून सोडित ॥ ४८ ॥
म्हणे हें महाप्रलयास्त्र ॥ येणें संहारोत पांडव समग्र ॥
त्यांचे स्त्रियांचे पोटीं असेल साचार ॥ गर्भ जरी कोणीही ॥ ४९ ॥
गर्भांत असेल जरी पुरुष ॥ तोही या अस्त्रे पावेल नाश ॥
मग तो दर्भ सोडितां निःशेष ॥ चपलेऐसा चालिला ॥ ५० ॥
श्रीरंग म्हणे अर्जुनासी ॥ त्वरा करीं काय पाहसी ॥
तुम्हां पांचांसही ग्रासी ॥ ऐसें अस्त्र येतसे ॥ ५१ ॥
ब्रह्मशिरोनाम अस्त्र ॥ तूंही आतां सोडीं सत्वर ॥
तेणें चापासी लावून शर ॥ त्याच प्रकारें सोडिलें ॥ ५२ ॥
प्रलय करीत जात ते क्षणीं ॥ दोन्हीं अस्त्रें मिळालीं गगनीं ॥
त्या तेजावर्तीं शशि तरणी ॥ बुचकळ्या देऊं लागले ॥ ५३ ॥
प्रलयीच्या विजा सहस्त्र ॥ एकदांच कडकडिल्या साचार ॥
तैशी अस्त्रें मिळली एकत्र ॥ प्रलय थोर वर्तला ॥ ५४ ॥
ब्रह्मांड तडाडिलें ते कालीं ॥ नवखंडें कंपित जाहलीं ॥
समुद्राचीं उदकें तापली ॥ उकडों लागी जलचरें ॥ ५५ ॥
सप्त पातालें हडबडती ॥ भोगींद्र सोडूं पाहे क्षिती ॥
मेरु मंदार आंदोलती ॥ मुनी भाविती अंत आला ॥ ५६ ॥
व्यासदेव बोले ते समयीं ॥ अस्त्रे आवरा रे दोघेही ॥
ही मनुष्यांवरी सहसाही ॥ सोडूं नका सर्वथा ॥ ५७ ॥
पार्थ म्हणे स्वामी समर्था ॥ तुझी आज्ञा माझिया माथां ॥
महा अस्त्र क्षण न लागतां ॥ आवरोनि आच्छादिलें ॥ ५८ ॥
परी द्रोणपुत्रासी जाणा ॥ ब्रह्मास्त्र कदा आवरेना ॥
उपाय केले परी नाना ॥ आटोपेना कदाही ॥ ५९ ॥
द्रौणीं म्हणे भीमभयेंकरूनी ॥ म्यां क्रोधें सोडिलें संकल्पूनी ॥
परी हें आतां कदा माझेनी ॥ सहसाही आटोपेना कदाही ॥ ६० ॥
म्यां पापें बहुत केलीं जाणा ॥ हें अस्त्र मज आटोपेना ॥
आटोपेल एका अर्जुना ॥ पुण्यवंत म्हणोनियां ॥ ६१ ॥
तरी माझें अस्त्र अनिवार ॥ गर्भीचे आदिकरूनि समग्र ॥
उरों नेदी पांडव साचार ॥ हा निर्धार चुकेना ॥ ६२ ॥
मग बोले गोविंद ॥ उत्तरेस दिधला विप्रांनीं आशीर्वाद ॥
युद्धांतीं दिव्यपुत्र प्रसिद्ध ॥ परीक्षिति नामें होईल ॥ ६३ ॥
द्रौणी म्हणे माझें अस्त्र ॥ उपलव्यास जाईल सत्वर ॥
न लागतांही क्षणमात्र ॥ गर्भ छेदील उत्तरेचा ॥ ६४ ॥
मग बोले चक्रपाणी ॥ तूं बालहत्यारा पापखाणी ॥
तीन सहस्त्र वर्षें घोरवनीं ॥ पिशाच होऊन विचरें पैं ॥ ६५ ॥
तुज भरेल गलितकुष्ठ ॥ पूय शोणित वाहेल यथेष्ट ॥
तूं होशील कर्मभ्रष्ट ॥ एक ठाव न मिळे तूतें ॥ ६६ ॥
कोणी सत्पुरुष ब्राह्मण ॥ त्याचें तुज न होय दर्शन ॥
जैसें दीपाचे पोटीं काजळ कुलक्षण ॥ द्रोणाउदरीं तैसा तूं ॥ ६७ ॥
पांडवांस मी आहें रक्षक ॥ तूं त्यांस काय करिशी मशक ॥
घुंधुरडें कोपलें जरी निष्टंक ॥ तरी पर्वत केवि त्या गिळवे ॥ ६८ ॥
आतां छेदीन म्हणसी उत्तरेचा गर्भ ॥ तरी रक्षीन त्यास मी पद्मनाभ ॥
गोकुळ रक्षिलें स्वयंभ ॥ प्रलयशिला वर्षतां ॥ ६९ ॥
द्वादश गावे लागला अग्न ॥ म्यां गिळून रक्षिले गोकुलजन ॥
प्रर्‍हाद गांजितां दारुण ॥ म्यांच रक्षिला नानापरी ॥ ७० ॥
तो परीक्षिती रक्षीन नानापरी ॥ तरीच मी भक्तसाहाकारी ॥
साठसहस्त्र वर्षें निर्धारीं ॥ राज्य करील पुण्यपुरुष तो ॥ ७१ ॥
कृपाचार्यापासोन ॥ पावेल विद्या संपूर्ण ॥
उपजला नसतो जाण ॥ भविष्य केलें जाण हें ॥ ७२ ॥
व्यास नारद श्रीकृष्ण ॥ म्हणती मणि दे मस्तकींचा उतरून ॥
अर्जुनास येई शरण ॥ वांचवीं प्राण आपुला ॥ ७३ ॥
मग बोले गुरुनंदन ॥ तरी तो मणि माझा केवळ प्राण ॥
सर्वरक्षक बहुत गुण ॥ न वर्णवती तयाचे ॥ ७४ ॥
मणि माथांचा देतां जाण ॥ माझा शिरश्छेद केला पूर्ण ॥
मग अर्जुनासी जयकल्याण ॥ सहजचि प्राप्त जाहले ॥ ७५ ॥
मग पार्थें बाण सोडून ॥ मणि मस्तकींचा घेतला छेदून ॥
स्यमंतकमणिसमान ॥ कीं कौस्तुभ दुसरा ॥ ७६ ॥
पिशाच होऊन गुरुसुत ॥ गेला उत्तरदिशेप्रति रडत ॥
ब्रह्मराक्षस होऊन हिंडत ॥ श्रीकृष्णशापेंकरूनियां ॥ ७७ ॥
सर्वांगीं कुष्ठ गलित ॥ दुर्गंधि सुटली अरण्यांत ॥
मणि छेदिला तेथूनि स्रवत ॥ पूयशोणित सर्वदा ॥ ७८ ॥
नव्हे सत्पुरूषांचे कदा दर्शन ॥ न मिळे रहावया एक स्थान ॥
असो इकडे पंडुनंदन ॥ विजयी होऊन परतले ॥ ७९ ॥
तो दिव्य मणि घेऊनी ॥ देते जाहले याज्ञसेनी ॥
पांचही जण मिळोनी ॥ तिचें करिती समाधान ॥ ८० ॥
धनंजय म्हणे हो द्रौपदी ॥ अश्वत्याम्यास मारितों युद्धीं ॥
परी तो कदाकाळीं कुबुद्धी ॥ चाप हातीं धरीना ॥ ८१ ॥
लपाला व्यासाचे पाठीसी ॥ उभा न राहे युद्धासी ॥
मग मणि घेऊन त्यासी ॥ रमानायकें शापिलें ॥ ८२ ॥
यावरी तो द्रौपदीने मणी ॥ दिधला धर्मरायालागूनी ॥
मुकुटीं बांधिला तेच क्षणीं ॥ जैसा गगनीं चंद्रमा ॥ ८३ ॥
धर्म म्हणे जी चक्रपाणी ॥ त्र्यंबकासी बळी देऊनी ॥
रुद्र स्थापी पाकशासनी ॥ आवाहनूनि मूर्तिमंत ॥ ८४ ॥
तें रक्षण असतां महद्‌भुत ॥ कैसा प्रवेशला गुरुसुत ॥
हरि म्हणे युद्ध बहुत ॥ तेणें केलें शिवाशी ॥ ८५ ॥
करून स्तवन हवन ॥ पूर्णाहुतीचे समयीं जाण ॥
आपुलें देतो बळिदान ॥ शिव प्रसन्न जाहला. ॥ ८६ ॥
शिवें तया खड्‌ग दिधलें अद्‌भुत ॥ मग तें घेऊन गुरुसुत ॥
निजले संहारी समस्त ॥ दुष्ट कुबुद्धि दुरात्मा ॥ ८७ ॥
द्रौपदीचें समाधान ॥ करिती बहु कृष्णार्जुन ॥
म्हणती अश्वत्यामा गुरुनंदन ॥ आणि ब्राह्मण त्यावरी ॥ ८८ ॥
आणि होय चिरंजीव ॥ त्यास मारूं न शके वासव ॥
जगद्‌गुरु व्यासदेव ॥ तेणें पाठीशीं घातला ॥ ८९ ॥
हातीं न धरी धनुष्यबाण ॥ दिधलें ब्रह्मशिरोस्त्र सोडून ॥
मग मस्तकींचा मणि प्रभाघन ॥ घेतला छेदून बळेंचि ॥ ९० ॥
शिरश्छेदाहून आगळे जाण ॥ दुःख जाहलें त्यासी द्विगुण ॥
मणि काढिला तेथून ॥ पूय रक्त स्रवे सदा ॥ ९१ ॥
तरी मणि आम्हीं घेतला बले ॥ तेव्हांच त्याचें शिर छेदिलें ॥
ऐसें बोलेन ते वेळे ॥ बुझाविलें पांचाळीसी ॥ ९२ ॥
ज्ञानीं पाहे शतपत्रनेत्र ॥ तो गुरूपुत्रें सोडिलें अस्त्र ॥
तें उत्तरेचा गर्भ पवित्र ॥ छेदावया धाडिलें ॥ ९३ ॥
उपलव्याहून उत्तरा देवी ॥ आणिली होती तेथें पूर्वी ॥
परी अस्त्र शोधित उर्वी ॥ तिये जवळी पातले ॥ ९४ ॥
तंव तो जगद्व्यापक परमपुरुष ॥ जाणे मुंगीचेही मानस ॥
लीलाविग्रही आदिसर्वेश ॥ तिचे गर्भी प्रवेशला ॥ ९५ ॥
अंगुष्टमात्र पुरुष होऊन ॥ शंख चक्र गदा हातीं घेऊन ॥
किरीटकुंडलीं मंडित जाण ॥ धरिलें स्वरूप तेणेंचि ॥ ९६ ॥
उत्तरेचे गर्भांत प्रवेशून ॥ हातीं घेऊन सुदर्शन ॥
घिरटी घाली भगवान ॥ मनमोहन रूप ज्याचें ॥ ९७ ॥
तंव तो गर्भ पुण्यवंत ॥ अभिमन्यूचें दिव्यरेत ॥
आठवा मास तीस प्राप्त ॥ आनंदभरित उत्तरा ॥ ९८ ॥
गर्भातील पुरुष परम ज्ञानिया ॥ म्हणे मज अस्त्र आलें मारावया ॥
परी येथें हा कोण रक्षावया ॥ मजकारणें पातलासे ॥ ९९ ॥
जिकडे फिरे भगवंत ॥ तिकडे गर्भ पाहे परीक्षित ॥
अस्त्रभय विसरला समस्त ॥ न्याहाळीत परमपुरुषा ॥ १०० ॥
गदा हातीं घेऊन ॥ अस्त्रावरी धांवे भगवान ॥
एव अस्त्र निष्कळ करून ॥ टाकिलें वितळून श्रीहरीनें ॥ १०१ ॥
सवेंचि भगवान जाहला गुप्त ॥ गर्भ चहूंकडे न्याहाळित ॥
म्हणे मज जो होता रक्षित ॥ तो कोणीकडे पैं गेला ॥ १०२ ॥
मग उत्तरा जाहली प्रसूत ॥ बालसूर्याऐसा उपजला सुत ॥
परी बाळ परीक्षा करित ॥ वदनें न्याहाळित सर्वांचीं ॥ १०३ ॥
जो कोणी दृष्टी पडे ॥ न्याहाळून पाहे तयाकडे ॥
म्हणे माझें वारिलें सांकडें ॥ कोणीकडे आहे तो ॥ १०४ ॥
भोंवता रक्षिला निश्चित ॥ नाम ठेविलें परीक्षित ॥
जो आजानबाहु दीप्तिमंत ॥ अभिमन्यु दुसरा पैं ॥ १०५ ॥
ज्याचे जन्मकाळीं सोहळा ॥ धर्मराजें बहुत केल्या ॥
वसुधामर ते वेळां ॥ सुखी केले सर्व दानी ॥ १०६ ॥
द्रौपदी सुभद्रा येऊन ॥ बाळ पाहती आनंदघन ॥
तो बाळास नाहीं दुसरें ध्यान ॥ पाहे न्याहाळून सर्वांकडे ॥ १०७ ॥
आल्यागेल्यास परीक्षित ॥ जडला हरिरूपीं सदा हेत ॥
पांडव आश्चर्य करित ॥ म्हणती हृद्‌गत काय याचें ॥ १०८ ॥
सर्वांची हा परीक्षा करित ॥ नेणवे कोणास आहे धुंडित ॥
असो हा पुढील कथार्थ ॥ समयोचित कथियेला ॥ १०९ ॥
सिंहावलोकनेंकरून ॥ परिसा मागील कथानुसंधान ॥
धृतराष्ट गांधारी जाण ॥ शोकार्णवीं पहुडलीं ॥ ११० ॥
तेथें नानाप्रकारेकरून ॥ संजय करील समाधान ॥
ऐषिकपर्व येथून ॥ एकाच अध्यायीं संपलें ॥ १११ ॥
पुढें विशोकपर्व सुरस पूर्ण ॥ श्रवण करोत पंडितजन ॥
जें जें बोलिला वैशंपायन ॥ तेंच येथें कथियेलें ॥ ११२ ॥
दंतकथा सांडोनि सकला ॥ व्यासभारत आश्रय धरिला ॥
प्रमाण प्रणवकथा निर्मळा ॥ निरूपिल्या त्याच येथें ॥ ११३ ॥
त्यांतील कथा नाहीं सोडिली ॥ दंतकथा नाहीं दुसरी योजिली ॥
प्राकृतकवींची कांस धरिली ॥ नाहीं सहसा पाडुरंगें ॥ ११४ ॥
तो क्षणक्षणां येऊन ॥ जागे करी थापटून ॥
म्हणे श्रीधरा ऊठ करीं लेखन ॥ कर्णीं तुज सांगतों मी ॥ ११५ ॥
कैशी घेती माझी पाठी ॥ आठवूं नेदीं दुसरी गोष्टी ॥
उभा ठाकोन म्हणे उठीं ॥ व्यासभारत लिही हें ॥ ११६ ॥
सकल पाल्हाळ टाकूनी ॥ सारांश अर्थ सांगतों कानीं ॥
तोचि तूं पत्रीं लिहोनी ॥ ठेवितां मज आवडे ॥ ११७ ॥
हा वरद् ग्रंथ जाण ॥ करील बहुतांसी पुढें पावन ॥
आबाल परम अज्ञान ॥ येणेंचकरोन तरतील ॥ ११८ ॥
आदिपर्वापासोनि जाणावें ॥ ऐषिकपर्व हें बारावें ॥
पंढरीनाथे दयार्णवें ॥ अति अपूर्व कथियेलें ॥ ११९ ॥
श्रीधरवरदा दीनोद्धारा ॥ ब्रह्मानंदा परमोदारा ॥
भीमातटविहारा दिगंबरा ॥ अभंग भजन देई तुझें ॥ १२० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ ऐषिकपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेपन्नाव्यांत कथियेला ॥ १२१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे ऐषिकपर्वणि त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५३ ॥
अध्याय त्रेपन्नावा समाप्त


GO TOP