श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एक्कावन्नावा


भीम आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध


श्रीगणेशाय नम: ॥
श्रीपांडुरंगा पंढरीशा ॥ पांडवपालका पुराणपुरुषा ॥
पद्मजजनका पयोब्धिवासा ॥ पंकजनेत्रा परात्परा ॥ १ ॥
तुझें चरित्र जें वर्णिलें ॥ तें पूर्वाध्यायीं शल्यपर्व संपलें ॥
येथून गदापर्व कथियेलें ॥ वैशंपायनें जनमेजया ॥ २ ॥
धृतराष्ट्र म्हणे संजयाप्रती ॥ दुर्योधनास पांडव हुडकिती ॥
मज खेद वाटतो चित्तीं ॥ पुढील कथी वर्तमान ॥ ३ ॥
संजय म्हणे पांडवसेना ॥ चहूंकडे शोधितसे दुर्योधना ॥
शिबिरे सदनें पाहती नाना ॥ चहूंकडूनियां सर्वही ॥ ४ ॥
तो कृतवर्मा कृपीसुत ॥ कृपीबंधु तिजा सत्य ॥
तेही दुर्योधना शोधित ॥ र्‍हदाजवळी पातले ॥ ५ ॥
म्हणती बाहेर येईं दुर्योधना ॥ युद्ध करून मारूं पृतना ॥
अथवा जाऊं सायुज्यसदनां ॥ समरांगणीं झुंजोनियां ॥ ६ ॥
आंतून दुर्योधन बोलत ॥ मी श्रमलों असें रे अत्यंत ॥
उदयीक युद्ध करूं यथार्थ ॥ जिंकू सत्य पंडुसुतां ॥ ७ ॥
तो भीमाचे पारधी जाण ॥ जात होते श्वापदें मारून ॥
तिहीं ते शब्द ऐकून ॥ जाऊन भीमा सांगितलें ॥ ८ ॥
कीं द्वैपायनडोहामधून ॥ तिघांशीं बोलला सुयोधन ॥
ऐसें पांडवीं ऐकोन ॥ पारध्यांस दिधलीं धनवस्त्रें ॥ ९ ॥
पांच पांडव आणि केशव ॥ उरली पृतना धांवे सर्व ॥
धुष्टद्युम्न सात्यकी प्रतिपांडव ॥ नंदन द्रौपदीचे धांवती ॥ १० ॥
तंव ते तिघे जण रथी ॥ पळोन गेले वनाप्रती ॥
पांडव ह्रदासमीप येती ॥ परि तो गुप्त न बोले ॥ ११ ॥
स्वगदा जवळी घेऊन ॥ जळीं निजला सुयोधन ॥
पांडवांस म्हणे मधुसूदन ॥ कपट पहा कैसें याचें ॥ १२ ॥
मग धर्म बोले ते समयीं ॥ दुर्योधना तूं बाहेर येई ॥
आतां लपोन व्यर्थ कायी ॥ डाग लागेल क्षत्रियधर्मा ॥ १३ ॥
एवढा तुझा अभिमान ॥ आजि कोठे टाकिला नेऊन ॥
युद्ध करीं बाहेर येऊन ॥ समरांगण गाजवीं ॥ १४ ॥
काय करिसी वांचोन ॥ राज्य अथवा स्वर्गभुवन ॥
एक घे साधून जळामधून ॥ बाहेर लवकर येईं तूं ॥ १५ ॥
दुर्योधन म्हणे मी विरथ ॥ श्रमलों एकला आहें येथ ॥
मग म्हणे तो पंडुसुत ॥ आम्ही बहुत श्रमलों आहों ॥ १६ ॥
दुर्योधन म्हणे माझी पृतना ॥ आटून गेली स्वर्गभुवना ॥
धर्मा मी जाईन वना ॥ तूं राज्य करीं आपुलें ॥ १७ ॥
धर्म म्हणे तुवां जे दिधली ॥ ते मी उर्वी नेघें कदाकाळीं ॥
पूर्वीं आम्हीं मागितली ॥ परी त्वां गोष्टी ऐकिली नाहीं ॥ १८ ॥
देवाधिदेव नारायण ॥ शिष्टाई करूं आला जाण ॥
तूं बोलिलासी काय वचन ॥ मनामाजी आठवीं तें ॥ १९ ॥
सुईच्या अग्री मृत्तिका जाण ॥ इतुकी मी नेदीं युद्धाविण ॥
तरी बाहेर येई माजवीं रण ॥ दोहोंतून एक साधीं पां ॥ २० ॥
तुवां घालूनि विष घोर ॥ मारीत होतासी वृकोदर ॥
अग्नि लावूनि लाक्षामंदिर ॥ दग्ध केलें आम्हांतें ॥ २१ ॥
दुःशासनें द्रौपदीचे केश ॥ धरून आणिली सभेस ॥
करूनियां कपटपाश ॥ राज्य माझें हरियेलें ॥ २२ ॥
रात्रीं घाला घालावया ॥ आलासी आम्हां मारावया ॥
असो किती म्हणूनियां ॥ अन्याय तुझे सांगावे ॥ २३ ॥
तरी ये तूं आतां झडकरी ॥ समयीं धर्मयुद्ध करीं ॥
सुयोधन म्हणे निघतां बाहेरी ॥ अवघे मिळून माराल ॥ २४ ॥
धर्मा तुझ्या वचनेंकरून ॥ मी आतां बाहेर येईन ॥
परि माझें अधमांग लक्षून ॥ कदा ताडण न कीजे ॥ २५ ॥
धर्म म्हणे तूं ये झडकरी ॥ मानेल तैसेंच युद्ध करीं ॥
आम्हीही पांच निर्धारीं ॥ एकेक जाण युद्ध करूं ॥ २६ ॥
वाद्यें न वाजवू रणीं ॥ हांक न फोडू कोणी ॥
भोवते उगेच उभे राहूनी ॥ आम्ही सर्व युद्ध पाहूं ॥ २७ ॥
भीम म्हणे मी तूं दोघे जण ॥ युद्ध करूं समरीं निर्वाण ॥
मग भुजंग निघे वारुळांतून ॥ तेविं सुयोधन निघाला ॥ २८ ॥
क्रोधें नेत्र रक्तांबर ॥ दिसे खवळला जैसा व्याघ्र ॥
इंद्राहातीं जैसें वज्र ॥ तैसी गदा करीं झळके ॥ २९ ॥
धृष्टद्युम्न सात्यकी बळी ॥ हस्तावरी हस्त हाणिती ते वेळीं ॥
गदगदां हांसती सकळी ॥ देखोन बोले सुयोधन ॥ ३० ॥
हांसतां बहुत मिळोन ॥ परि गदाघायें चूर्ण करीन ॥
व्याघ्रांच्या चेष्टा करून ॥ वृषभ कैसा वांचेल ॥ ३१ ॥
एक एक उठोन ॥ करा मजशी युद्धकंदन ॥
धर्मा तूं धर्मपरायण ॥ साक्ष होईं या गोष्टी ॥ ३२ ॥
एकावरी बहुत जण ॥ न उठावे हा धर्म पूर्ण ॥
पार्थ म्हणे तरी अभिमन्य ॥ कैसा मारिला समरांगणीं ॥ ३३ ॥
आतां तूं सांगसी स्वधर्म ॥ ते वेळे कां रे केला अधर्म ॥
मग बोले राजा धर्म ॥ बांधीं वीरगुंठी सांवरूनि ॥ ३४ ॥
तूं पांचांत एकास मारीं ॥ तुज हें राज्य देऊं निर्धारीं ॥
ऐकतां रागावला कंसारी ॥ भीम अंतरीं दचकला ॥ ३५ ॥
श्रीरंग म्हणे ते वेळे ॥ नेमवचन काय केलें ॥
तुवां पूर्वी ऐसेंच बुडविलें ॥ द्यूतप्रसंगीं खेळोनियां ॥ ३६ ॥
न करितां प्रधानांशीं विचार ॥ नृपें न बोलावें उत्तर ॥
तेणें एकास जरी मारिलें सत्वर ॥ तरी मग राज्य द्यावें कीं ॥ ३७ ॥
आपणास नाहीं बुद्धि साचार ॥ दुसरियास न पुसे विचार ॥
तरी तो अनर्थीं पडेल निर्धार ॥ यांत संदेह नसेचि ॥ ३८ ॥
भीम बळेंच आहे सबळ ॥ दुर्योधन बळकट विशेष कुशळ ॥
कैसी संपादेल वेळ ॥ मज हे चिंता जाळीतसे ॥ ३९ ॥
भीम म्हणे कंसांतका ॥ तूं असतां आम्हां पाठिराखा ॥
या दुर्योधना मशका ॥ क्षण न लागे जिंकावया ॥ ४० ॥
भीम गदा घेऊनि उठिला ॥ हाके ब्रह्मकटाह गाजविला ॥
दुर्योधन सरसावला ॥ जरासंधासारिखाचि ॥ ४१ ॥
वृकोदर म्हणे ते वेळीं ॥ शकुनीच्या बोलें कर्में केलीं ॥
तीं दुःखफळें सकळीं ॥ भोगीं आतां पापिया ॥ ४२ ॥
भीष्म द्रोण कर्ण वीर ॥ रणपंडित जैसे दिनकर ॥
ते तुवां मारविले समग्र ॥ तूंच एकटा राहसी ॥ ४३ ॥
दुर्योधन म्हणे वल्गना ॥ किती करिसी भीमसेना ॥
जीवनाविण मेघगर्जना ॥ व्यर्थ जैसी गडगडी ॥ ४४ ॥
आजि तुझा घेईन प्राण ॥ गजपुरींचें राज्य पावेन ॥
तों बळिराम तीर्थें करून ॥ तेथें आला अकस्मात ॥ ४५ ॥
सर्वीं केलें त्यासी नमन ॥ बाविसां दिवसां आला परतोन ॥
परि युद्धाचा अठरावा दिन ॥ निश्चय पूर्ण जाणावा ॥ ४६ ॥
भीमसेन दुर्योधन ॥ बळिरामाचे शिष्य जाण ॥
रेवतीवराचे वंदिती चरण ॥ प्रार्थून युद्ध पहा म्हणती ॥ ४७ ॥
बळिभद्र म्हणे ऐका मात ॥ स्यमंतपंचक थोर तीर्थ ॥
युद्ध करितां मोक्ष प्राप्त ॥ चला तेथे अवघेही ॥ ४८ ॥
मग सर्वही उठोन ॥ आले स्यमंतपचकतीर्थालागून ॥
युद्धा सरसावले दोघे जण ॥ देवगण विलोकिती ॥ ४९ ॥
सिंहावरी सिंह जैसा ॥ वृकोदराचा चपेट तैसा ॥
हाका फोडिती तेणें आकाशा ॥ कंप वाटे सुटला पैं ॥ ५० ॥
पूर्वी जरासंध भीमसेन ॥ कीं सुंदोपसुंद दोघे जण ॥
कीं वाली आणि सूर्यनंदन ॥ तैसे दोघे भिडती ॥ ५१ ॥
कीं मेरु आणि विंध्याचल ॥ तैसे दोघे दिसती सबल ॥
हांकेसरसा ब्रह्मांडगोल ॥ डोलूं लागला तेधवां ॥ ५२ ॥
धर्मास म्हणे दुर्योधन ॥ तुम्हीं युद्ध पहावें सर्व बैसोन ॥
अवघे अवश्य ह्मणोन ॥ धरणीवरी बैसले ॥ ५३ ॥
भयें कांपतसे क्षिती ॥ पाताळीं भोगींद्र दचकला चित्तीं ॥
कूर्म वराह कांपती ॥ रिचवती भगणें तेव्हां ॥ ५४ ॥
काननी श्वापदांचे पाळे ॥ स्थानें सोडून पळू लागले ॥
पर्वतशिखरें त्या वेळे ॥ कोसळती उर्वीवरी ॥ ५५ ॥
सप्तसमुद्र उचंबळती ॥ मेरुमंदार आदळती ॥
असो भीमसेनें चित्तीं ॥ पूर्वदुःखें आठविलीं ॥ ५६ ॥
करकरां खाऊनियां दांत ॥ म्हणे कैसें जाळिलें जोहरांत ॥
विष घालूनियां गंगेत ॥ बुडविलें मजलागून ॥ ५७ ॥
द्रौपदी सभेस आणून ॥ अंक दाखविला उघडा करून ॥
ते मांडी आजि मी चूर्ण ॥ करीन हे समरांगणीं ॥ ५८ ॥
गौर्गौः म्हणोनी वचन ॥ बोलिलासी कीं दुर्गावरून ॥
षंढतीळ पंडुनंदन ॥ म्हणोनियां बोलिलासी ॥ ५९ ॥
रात्रीं नसतां सिद्ध अन्न ॥ तुवां पाठविला अत्रिनंदन ॥
ताट ढकलून जगज्जीवन ॥ आला धांवोन तेधवां ॥ ६० ॥
सुयोधन अन्यायी थोर ॥ ठाव नाहीं द्यावया उत्तर ॥
म्हणे भीमा तुझें आजि कलेवर ॥ प्राणाविरहित करीन मी ॥ ६१ ॥
तो भीमे गदाघायीं ॥ दुर्योधन ताडिला हृदयीं ॥
तंव तेणें लवलाहीं ॥ भीम वर्मी ताडिला ॥ ६२ ॥
कुंकुमें माखले अचल ॥ कीं पळस फुलले बहुसाल ॥
तैसे अशुद्धें दोघे बंबाळ ॥ आरक्तवर्ण दिसती पैं ॥ ६३ ॥
नाना मंडले दाविती ॥ स्थिरक चमक नाना गती ॥
चक्राकार फेरे फिरती ॥ पाहों न शकती बैसकार ॥ ६४ ॥
एक दक्षिणेकडे दाविती ॥ एक उत्तरपदें चालती ॥
पूर्वपश्चिमें गिरक्या देती ॥ हाणिती मर्में पाहोनियां ॥ ६५ ॥
गदेशीं गदा झगटती ॥ महाज्वाला तेथें उमटती ॥
दोघेही मागें न सरती ॥ भय चित्तीं नच वाटे ॥ ६६ ॥
मांडीखुटीं येऊन ॥ सवेंच घेती उर्ध्व उड्डाण ॥
एकमेकांच्या घायेंकरून ॥ मूर्च्छना येऊन पडताती ॥ ६७ ॥
भीम उठे मूर्च्छा सांवरून ॥ पाहे दुर्योधन विलोकून ॥
तंव तो व्याकुळ देखोन ॥ उभा राहिला क्षणभरी ॥ ६८ ॥
सवेंच उठोन दुर्योधन ॥ मागुती प्रवर्ते युद्धालागून ॥
जगदीश्वरासी म्हणे अर्जुन ॥ युद्ध दारुण परम हें ॥ ६९ ॥
जय कोणास असे प्राप्त ॥ हें मज न कळेचि निश्चित ॥
हरि म्हणे हा मायिक नष्ट धूर्त ॥ मायेनेंचि मारावा ॥ ७० ॥
शठाप्रति शठपण ॥ करून घ्यावा याचा प्राण ॥
भीमास हरि दाखवी खूण ॥ मांडीवरी हाणोनियां ॥ ७१ ॥
मैत्रेयाचा शाप दारुण ॥ मांडीवरी गदाघाय पडोन ॥
शेवटीं तूं जाशील मरून ॥ जाणे मधुसूदन वर्म हें ॥ ७२ ॥
द्रौपदीचाही शाप पूर्ण ॥ भीमाचें तेंच नेमवचन ॥
त्याहीवरी पाप दारुण ॥ दुर्योधन आचरला ॥ ७३ ॥
एरव्हीं दुर्योधन योद्धा कुशळ ॥ कुलिशाऐसी गदा सबळ ॥
समरांगणीं आला काळ ॥ त्यासही हारी आणील तो ॥ ७४ ॥
असो दोघांशीं युद्ध होत ॥ सकल वीर भोवते पहात ॥
नाना मंडले उड्डाणें घेत ॥ हांका फोडिती अनिवार ॥ ७५ ॥
उफराटी उडी घेत दुर्योधन ॥ ते वेळे वरते जाहले चरण ॥
तो भीमे गदा उचलून ॥ वामांकावरी घातली ॥ ७६ ॥
पक्वफळ होय चूर्ण ॥ तैसी मांडी गेली विदारून ॥
वृक्ष पडे उन्मळून ॥ तैसा भूमीवरी पडियेला ॥ ७७ ॥
जाहले नाना उत्पात ॥ गगनीं उठिले त्रिविध केत ॥
धरा जाहली कंपित ॥ मेघ वर्षत रक्त तेव्हां ॥ ७८ ॥
सुमनवृष्टि भीमावरी ॥ निर्जर करिती ते अवसरीं ॥
असो दुर्योधनाचा मुकुट झडकरी ॥ भीम हाणी लातेनें ॥ ७९ ॥
शिरावरी पाय देऊन ॥ रगडूनियां केलें चूर्ण ॥
आम्हांस षंढतीळ जाण ॥ बोलिलास कैसा तूं ॥ ८० ॥
धर्म म्हणे त्वां भीमा पाहीं ॥ अनुचित कर्म केलें ये समयीं ॥
हें सर्वरायां मानलें नाहीं ॥ मागें पुढें निंदिती तुज ॥ ८१ ॥
अकरा अक्षौहिणी दळाचा पति ॥ छत्रधर दुर्योधन नृपति ॥
अहा कर्मा कैसी गति ॥ पडिला क्षितीं मूर्च्छित ॥ ८२ ॥
अजातशत्रु धर्मराव खरा ॥ नयनीं वाहती अश्रुधारा ॥
म्हणे दुर्योधना कौरवेश्वरा ॥ कैसें प्राक्तन तुझें हें ॥ ८३ ॥
खेद न धरीं हृदयकमलीं ॥ तुझी क्रिया तुजशीं फळली ॥
तुझ्या स्त्रिया रडतील सकली ॥ तें मी श्रवणीं केविं ऐकूं ॥ ८४ ॥
तों क्रोधयुक्त बोले बळिराम ॥ भीमा धिक्‌ धिक्‌ तुझा पराक्रम ॥
अधमांग न ताडावे हा नेम ॥ त्यावरी हें कर्म विशेष केलें ॥ ८५ ॥
पृथ्वीपति सुयोधन वीर ॥ त्याचें लत्तेनें मर्दिलें शिर ॥
क्रोधें उचलून मुसळ नांगर ॥ बळिभद्र ऊठला पैं ॥ ८६ ॥
मग धांवोनि चक्रपाणी ॥ मिठी घातली मागून जघनीं ॥
समाधान तये क्षणीं ॥ करीत ज्येष्ठ बंधूचें ॥ ८७ ॥
तुम्हीं आम्हीं धरिला अवतार ॥ कीं हरावया पृथ्वीचा भार ॥
त्यांची पाठी राखावी साचार ॥ पितृभगिनीसुत हे कीं ॥ ८८ ॥
त्यासी शाप होता पहिला ॥ तो त्याचा त्यास फळास आला ॥
आणि कलियुगाचा आरंभ जाहला ॥ स्वधर्म चालिला बुडत पैं ॥ ८९ ॥
भीमापासून पडिलें अंतरं ॥ आतां धर्माकडे पाहून साचार ॥
क्षमा करावी हा निर्धार ॥ नाहीं विचार दुसरा ॥ ९० ॥
रथीं बैसोन रेवतीवर ॥ द्वारकेस गेला सत्वर ॥
मग धर्माचें समाधान श्रीधर ॥ नानापरी करीतसे ॥ ९१ ॥
असो जयवाद्यांची घाई ॥ एकचि लागली ते समयीं ॥
सिंहनादें ते सर्वही ॥ वीर गर्जती आनंदें ॥ ९२ ॥
सर्व राजे मिळोन ॥ करिती भीमाचें स्तवन ॥
धर्मद्वेषी दुर्योधन ॥ बरा मारिला चांडाल ॥ ९३ ॥
कृष्णाकडे दुर्योधन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥
म्हणे तुवां कंसाचा प्राण ॥ कपटेंकरून घेतला ॥ ९४ ॥
तुवांच हें सर्व करविलें ॥ कपटें राजे मारविले ॥
जरासंधास वधविलें ॥ कपटबुद्धि करूनियां ॥ ९५ ॥
आणीकही कालयवन ॥ गोवळया मारविलासी कपटेंकरून ॥
धर्ममुखें असत्य बोलवून ॥ घेतलासी प्राण द्रोणाचा ॥ ९६ ॥
शिखंडी तुवां पुढें घालून ॥ व्यसनीं पाडिला गंगानंदन ॥
चक्र काढावया गुंतला कर्ण ॥ त्याचाही प्राण घेतला तुवां ॥ ९७ ॥
माझा कर्ण वीर एकला ॥ त्रैलोक्यास जो आगळा ॥
काळरूप तूं गोवळा ॥ तुवाच गिळिला समरांगणीं ॥ ९८ ॥
धर्मयुद्ध तुम्हीं केलें नाहीं ॥ कपटेंच मारविले सर्वही ॥
हरि म्हणे आलों जे समयीं ॥ मानिली नाहीं शिष्टाई कां ॥ ९९ ॥
तुवां जे अन्याय केले बहुत ॥ तोच आजि फळा आले समस्त ॥
केशीं धरूनि ओढीत ॥ माझी बहीण सभे नेली ॥ १०० ॥
तुम्ही कपटी चांडाल दुर्जन ॥ तुमचें ऐसेंच करावें हनन ॥
मीं अवतार धरिला पूर्ण ॥ याच कार्यालागून ॥ १०१ ॥
श्लोक-परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ॥
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
टीका-नानाप्रकारेंकरून ॥ मारावे अवघे दुर्जन ॥
सद्भक्तांचें प्रतिपालन ॥ करावयालागीं पैं ॥ १०२ ॥
उतरावया धराभार ॥ मी अवतरलों सर्वेश्वर ॥
रामावतारीं रजनीचर ॥ पूर्वीच म्यां मारियेले ॥ १०३ ॥
नाना अवतार धरून ॥ केलें दुष्टांचें निर्दलन ॥
हिरण्यकशिपु मर्दून ॥ प्रर्‍हाद म्यां रक्षियेला ॥ १०४ ॥
वेदतुल्य वडिलांचें वचन ॥ तें तुज वाटलें विषासमान ॥
गुरुद्रोह केला दारुण ॥ त्याचें फळ भोगीं हें ॥ १०५ ॥
सर्षपबीज पेरिलें बहुत ॥ तरी गोधूम कैसे होती प्राप्त ॥
दुष्ट कर्म जे आचरत ॥ ते परलोक केवि पावती ॥ १०६ ॥
असो श्रीरंगाचें स्तवन ॥ पांडव करिती कर जोडून ॥
तूं अनंतब्रह्मांडनायक मनमोहन ॥ भक्तजनांस रक्षिसी ॥ १०७ ॥
पांडवपालक गोविंद ॥ हें त्रिभुवनीं गर्जें ब्रीद ॥
तैसाच करून घोष विशद ॥ दुंदुभि तेव्हां ठोकिल्या ॥ १०८ ॥
तरी यावरी पीतवसना ॥ ब्रह्मांडनायका जगन्मोहना ॥
नीलोत्पलदलवर्णा ॥ शिबिराप्रति चला आतां ॥ १०९ ॥
दुर्योधनाची शिबिरे ओस ॥ जडितस्तंभावरी रत्‍नकळस ॥
कनकवर्ण दिसती राजस ॥ अति उदास भणभणित पैं ॥ ११० ॥
कर्ण द्रोण गंगासुत ॥ यांचींही शिबिरे भणभणित ॥
एवं ओसचि समस्त ॥ नाहीं रक्षक कोणीही ॥ १११ ॥
दिव्यास्तरणें मृदुमवाळ ॥ ओठांगणें गादिया तेजाळ ॥
कोशसदनें विशाळ ॥ भणभणित पडियेलीं ॥ ११२ ॥
गांडीवास गवसणी ॥ घाली तेव्हां पाकशासनी ॥
तूणीर ठेविला आटोपूनी ॥ जो कल्पांतींही सरेना ॥ ११३ ॥
कोणी सेवक उरले किंचित ॥ ते धर्मास जाहले शरणागत ॥
म्हणती कौरवीं पाळिले आजपर्यंत ॥ यावरीं धर्मा रक्षीं तूं ॥ ११४ ॥
असो जयवाद्यें वाजवित ॥ स्वस्थला गेले पंडुसुत ॥
अर्जुनाचा विजयरथ ॥ जगन्निवासें सोडिला ॥ ११५ ॥
उभयकृष्ण उतरले सवेग ॥ तत्‍क्षणीं सोडिले नसतां तुरंग ॥
अंजनीहृदयारविंदभृंग ॥ पुसोन गेला सेतुबंधा ॥ ११६ ॥
खालीं उतरतां भगवान ॥ धडधडां जळाला स्यंदन ॥
जळावया काय कारण ॥ जनमेजय पुसतसे ॥ ११७ ॥
मग बोले वैशंपायन ॥ द्रोण कर्ण गंगानंदन ॥
यांहीं अस्त्रें सोडिलीं दारुण ॥ पार्थप्राणहरणार्थ जी ॥ ११८ ॥
परि श्रीरंग आणि मारुती ॥ अर्पिते जाहले निजशक्ती ॥
जी ब्रह्मांड जाळू शकती ॥ होतीं सभोवती तळपत ॥ ११९ ॥
तीं कार्य सरलिया समग्र ॥ रिता देखोनि रहंवर ॥
प्रलयाग्नितुल्य सत्वर ॥ चहूंकडून धावली ॥ १२० ॥
धडधडां जळाला रथ ॥ पांच पांडव आश्चर्य करित ॥
धर्म भीम आणि पार्थ ॥ श्रीवल्लभासी पुसती पैं ॥ १२१ ॥
कां जळला स्वामी स्यंदन ॥ हास्यमुखें बोले राजीवनयन ॥
अर्जुनाचा घ्यावया प्राण ॥ अस्त्रदेवता जपत होत्या ॥ १२२ ॥
कार्य सरल्यावरी समग्र ॥ आम्ही उतरलों हरिहर ॥
तो रागें अस्त्रे धांवलीं समग्र ॥ रहंवर त्यांहीं जाळिला ॥ १२३ ॥
गांडीव चाप अक्षय तूणीर ॥ पार्थ काढिलीं होती अगोदर ॥
तेवढीं उरलीं निर्धार ॥ कृष्णेच्छेंकरूनियां ॥ १२४ ॥
एवं सर्व जगज्जीवनें रक्षिलें ॥ हें पांडवांस पूर्ण कळों आलें ॥
अभिमान सर्वांचे गळाले ॥ अहंकर्तव्यपणाचे ॥ १२५ ॥
सूत्रधार तो सर्वेश्वर ॥ हें प्रत्यय आलें समग्र ॥
मग कृष्णस्तवन अपार ॥ करिते जाहले सप्रेम ॥ १२६ ॥
आदिपुरुषा परात्परा ॥ सत्यज्ञाना अगोचरा ॥
सर्वरक्षका त्रिभुवनेश्वरा ॥ वेदशास्त्रां अगम्य तूं ॥ १२७ ॥
अनंत जन्मे तप केलें ॥ तें एकदांच फळा आलें ॥
सोयरा होऊन ये वेळे ॥ सोय आमुची रक्षिली ॥ १२८ ॥
करूनियां पुण्याच्या राशी ॥ बहुत दिवस भाकें गोविलासी ॥
नीचकर्म हृषीकेशी ॥ सारथ्य तुवां अवलंबिलें ॥ १२९ ॥
तुझिया उपकारांचें ऋण ॥ आम्ही कोणे काळीं होऊं उत्तीर्ण ॥
पृथ्वीचें पत्र करून जाण ॥ लिहितां गुण न सरती ॥ १३० ॥
ऐशी श्रीकृष्णलीला अगाध ॥ पांडव वर्णितां होती सद्‌गद ॥
मग त्यांसी हृदयीं धरून मुकुंद ॥ समाधान करी त्यांचें ॥ १३१ ॥
असो पांडव यावरी ॥ राहिले दुर्योधनाचे शिबिरीं ॥
सर्व संपत्ति निर्धारीं ॥ घेते जाहले आनंदें ॥ १३२ ॥
यावरी तो जगन्निवास ॥ जाता जाहला हस्तिनापुरास ॥
रथीं बैसोन परमपुरुष ॥ धृतराष्ट्रास भेटला ॥ १३३ ॥
गांधारीस बोलावून ॥ करी उभयतांचें समाधान ॥
बहुत शास्त्रपद्धति सांगोन ॥ मन त्यांचें मोहीतसे ॥ १३४ ॥
पुढील टाकून कार्यभाग ॥ कां तेथें गेला श्रीरंग ॥
तरी गांधारी पतिव्रता अभंग ॥ शाप देईल पांडवां ॥ १३५ ॥
जाळोनियां करील भक्ष्य ॥ हें जाणोन भक्तमनोभिराम ॥
तिचें समाधान परम ॥ नानाप्रकारें करीतसे ॥ १३६ ॥
एक मुहूर्तपर्यंत जाणा ॥ गांधारीस आली दुःखमूर्च्छना ॥
मग सावध होऊन तया क्षणा ॥ पुत्रदुःखें आरंबळे ॥ १३७ ॥
श्रीहरि म्हणे गांधारी ॥ मी शिष्टाईस आलों ते अवसरीं ॥
दुर्योधनाशी शिकविलें नानापरी ॥ परी तो नायके कोणाचें ॥ १३८ ॥
मैत्रेय विदुर सत्यवतीनंदन ॥ शारद्वत आणि भीष्म द्रोण ॥
बहुतांचें नायकिलें वचन ॥ तरी पांडवांवरी बोल नाहीं ॥ १३९ ॥
आतां तुम्हीं एक ऐकावे ॥ पांडव आपुले पुत्र म्हणावे ॥
तुम्हां दोघांचे कणवेचे ॥ धर्म शोक करी बहु ॥ १४० ॥
अंबे सौबली तूं पतिव्रता पूर्ण ॥ पूर्वी बोलली होतीस वचन ॥
जेथें धर्म तेथें जय कल्याण ॥ तें वचन खरें जाहलें ॥ १४१ ॥
तो जगद्‌गुरू पराशरसुत ॥ प्रकटला तेव्हां अकस्मात ॥
तयांचें समाधान करीत ॥ म्हणे पांडव सुत तुमचेची ॥ १४२ ॥
श्रीकृष्ण तयांप्रति पुसोन ॥ वेगें चालिला पिटीत स्यंदन ॥
अनर्थ करील द्रोणनंदन ॥ म्हणून जात त्वरेनें ॥ १४३ ॥
आला देखोन जगजीवन ॥ आनंदले पंडुनंदन ॥
श्रीरंगें अवघें वर्तमान ॥ जाहले तितुकें कथियेलें ॥ १४४ ॥
इकडे राजा दुर्योधन ॥ धुळींत लोळे दीनवदन ॥
केश विखुरले चहूंकडून ॥ ते स्वहस्तें आकर्षित ॥ १४५ ॥
श्वासोच्छास टाकून बोलत ॥ हे अवस्था कीं मज प्राप्त ॥
तो संजय आला तेथ ॥ खेदें स्फुंदत उभा पुढें ॥ १४६ ॥
दुर्योधन बोले दीनवदन ॥ माझी मायबापें वृद्ध पूर्ण ॥
कोणास जातील शरण ॥ आम्हांस पाळा म्हणोनियां ॥ १४७ ॥
पडिला माझा लक्ष्मण ॥ माझी स्त्री न ठेवी कदा प्राण ॥
अरे संजया तूं सांगें जाऊन ॥ गुरुसुतादि तिघांतें ॥ १४८ ॥
मग संजयें जाऊन वनांत ॥ तिघांसी केलें सर्व श्रुत ॥
मग कृतवर्मा कृपीसुत ॥ आले धांवत बैसोन रथीं ॥ १४९ ॥
तो दुर्योधन पडला रणमंडळीं ॥ मुखीं सर्वांगी माखली धुळी ॥
गदाघायें तळमळी ॥ हुंकारे बळी क्षणक्षणी ॥ १५० ॥
जें दुर्योधनाचें कपाळ ॥ केशरकस्तुरीनें शोभे विशाळ ॥
तेथें पार्थाचे सायक सबळ ॥ बैसोन रक्त वाहतसे ॥ १५१ ॥
जो कुसुमशेजे अरुवारी ॥ भ्रमरमंचकीं पहुडे मंदिरीं ॥
तो गदाघायें धरित्रीवरी ॥ कैसा लोळत पडिला हो ॥ १५२ ॥
जो अकरा अक्षौहिणी दळाचा नाथ ॥ त्याभोवती भूतें बैसली समस्त ॥
मासवांटणी करित ॥ पाहे तटस्थ उगाची ॥ १५३ ॥
कीटक मक्षिका बहु तोडिती ॥ हात हालवावयासी नाहीं शक्ती ॥
अहारे कर्माची कैसी गती ॥ पुढतपुढती बोलतसे ॥ १५४ ॥
तो तिघे जवळी येऊन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रोदन ॥
म्हणती दुर्योधना तूं निधान ॥ चालिलासी यावरी ॥ १५५ ॥
लक्ष्मी हे परम चंचल ॥ मरीचिजलन्याय सकल ॥
क्षणक्षणा फिरे काल ॥ कैसा येईल न कळे केव्हां ॥ १५६ ॥
तंव तो दुर्योधन बोलत ॥ तुम्हीं पराक्रम केले अद्‌भुत ॥
आम्ही जाहलों दैवहत ॥ ऐकोन बोलत अश्वत्यामा ॥ १५७ ॥
हात चोळून सत्वर ॥ दशनी रगडिले अधर ॥
माझी शपथ निर्धार ॥ यावरी परिस राया तूं ॥ १५८ ॥
पांडव आणि पांचाळ ॥ यांचीं शिरें आणितों नलगे वेळ ॥
हें आतांच न करीं तत्काळ ॥ तरी मी द्रोणज कदा नव्हें ॥ १५९ ॥
दुर्योधन मनीं हर्षला ॥ उदकाचा घट आणविला ॥
अश्वत्यामा अभिषेकिला ॥ सेनापति म्हणूनियां ॥ १६० ॥
मग दुर्योधनाची घेऊन आज्ञा ॥ तिघे गेले पुढती वना ॥
वटवृक्षातळीं जाणा ॥ जाऊनियां राहिले ॥ १६१ ॥
आतां यावरी गुरुसुत ॥ पांडवशिबिरांत करील अनर्थ ॥
रात्रीं जाऊन अकस्मात ॥ प्राण घेईल बहुतांचे ॥ १६२ ॥
एकेच अध्यायीं जाण ॥ गदापर्व संपलें संपूर्ण ॥
पुढें सौप्तिक पर्व गहन ॥ रसाळ आतां परिसिजे ॥ १६३ ॥
पांडुरंग ब्रह्मानंद ॥ जो साधुहृदयारविंदमिलिंद ॥
श्रीधरवरद प्रसिद्ध ॥ घोष गाजे बहुत पैं ॥ १६४ ॥
पुढें सौप्तिकपर्व परमपावन ॥ श्रीधरमुख निमित्त करून ॥
बोलेल कैसें रुक्मिणीरमण ॥ ब्रह्मानंदें परिसा तें ॥ १६५ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ गदापर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकावन्नाव्यांत कथियेला ॥ १६६ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे गदापर्वणि एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५१ ॥
अध्याय एक्कावन्नावा समाप्त


GO TOP