| 
 श्रीधरस्वामीकृत पांडवप्रताप  
 अध्याय पन्नासावा  
 अनेक कौरव वीरांचा नाश   
 
श्रीगणेशाय नम: ॥ पंढरी दक्षिणद्वारका ॥ तुज आवडे रुक्मिणीनायका ॥
 सांडोनियां वैकुंठसुखा ॥ पुंडलिकालागीं आलासी ॥ १ ॥
 समचरण सम कटीं  कर ॥ उदारवदन आकर्णनेत्र ॥
 तोचि तूं ब्रह्मानंद यतींद्र ॥ भीमातीरविहारी ॥ २ ॥
 भारत हाचि इक्षुदंड ॥ रसभरित उंच उदंड ॥
 मूळापासूनि शेवटवरी गोड ॥ सज्जन सुखें सेवोत कां ॥ ३ ॥
 संस्कृतइक्षुदंडी रस गुप्त ॥ न कळें भोळियांसी अत्यंत ॥
 त्याचा प्राकृतीं रस काढोनि देत ॥ श्रीधर म्हणे भाविकां ॥ ४ ॥
 मागें संपलें कर्णपर्व ॥ आतां हें शल्यपर्व अपूर्व ॥
 एकाच अध्यायांत सर्व ॥ सुरस कथा वर्णिलीसे ॥ ५ ॥
 जनमेजयास म्हणे वैशंपायन ॥ संजयें कथिलें धृतराष्ट्रालागून ॥
 रणीं पडिला वीर कर्ण ॥ दुर्योधन शोक करी ॥ ६ ॥
 दुःखसागरीं दुर्योधन ॥ बुडाला नाठवे कांहीं स्मरण ॥
 नेत्रीं वाहे अधुजीवन ॥ कर्णा कर्णा म्हणोनियां ॥ ७ ॥
 मागें पडले भीष्म द्रोण ॥ परी न इतुका कष्टी दुर्योधन ॥
 कर्णावरी तेणें प्राण ॥ ठेविला होता सर्वस्वें ॥ ८ ॥
 शारद्वत आणि कृपीसुत ॥ शकुनि कृतवर्मा मद्रनाथ ॥
 आणीकही वीर समस्त ॥ दुर्योधनास समजाविती ॥ ९ ॥
 दुर्योधन म्हणे रे शल्या ॥ बळसमुद्रा परमकुशला ॥
 तुजविण रक्षिता आतां राहिला ॥ कोण असे आम्हांतें ॥ १० ॥
 सेनापति जैसा षडानन ॥ तैसा तूं भाससी मजलागून ॥
 यावरी तों शल्य पूर्ण ॥ पुरुषार्थ बोले आपुला ॥ ११ ॥
 मारूनियां पंडुपुत्र ॥ तुजवरी मी धरीन छत्र ॥
 माझें युद्ध विचित्र ॥ विलोकीं तूं यावरी ॥ १२ ॥
 अभिषेकून शल्य वरिष्ठ ॥ देत सेनापतित्व रणपट्ट ॥
 वस्त्रें अलंकार अतिश्रेष्ठ ॥ देता जाहला तेधवां ॥ १३ ॥
 उरली घेऊन अवघी सेना ॥ शल्य निघाला समरांगणा ॥
 लागलीं रणतुरें नाना ॥ घोषनादें गर्जती ॥ १४ ॥
 इकडेसिद्ध जाहलें पांडवदळ ॥ वाजती वाद्यांचे कल्लोळ ॥
 प्रतापतेजें दिसे सबळ ॥ सकळ वाहिनी तेधवां ॥ १५ ॥
 दहा दिवसपर्यंत ॥ भीष्में युद्ध केलें अद्भुत ॥
 द्रोणाचार्य जो गुरुनाथ ॥ पांच दिवस तेणें केलें ॥ १६ ॥
 दोन दिवस कर्णें जाण ॥ युद्ध केलें अति दारुण ॥
 एवंच जाहले सप्तदश दिन ॥ अठरावा एक उरला पैं ॥ १७ ॥
 त्यांत शल्याचा अर्धदिन ॥ अर्थ करील दुर्योधन ॥
 यावरी युद्ध संपूर्ण ॥ समाप्त मग सहजचि ॥ १८ ॥
 सुयोथन म्हणे शल्यालागून ॥ त्वां आपुले भगिनीसुत सांडून ॥
 साह्य जाहलासी आम्हांलागून ॥ तुज कल्याण हो आतां ॥ १९ ॥
 धर्मास म्हणे इंदिराजीवन ॥ तूं युद्ध करीं निर्वाण ॥
 घेई शल्याचा प्राण ॥ भरीं त्रिभुवन प्रतापें ॥ २० ॥
 दुर्योधन सांगे वीरां समस्तां ॥ शल्याची पाठी राखा रे आतां ॥
 मागें राहील त्याचे माथां ॥ पंचमहापातकें पडतील ॥ २१ ॥
 सैन्य करोनि अवघें गोळा ॥ शल्ये सर्वतोभद्रव्यूह रचिला ॥
 व्यूहद्वारीं आपण राहिला ॥ डावेकडे कृतवर्मा ॥ २२ ॥
 उजवेकडे शारद्वत ॥ पाठिराखा द्रोणसुत ॥
 दुर्योधन मध्ये विराजित ॥ कीं इंद्रजित ज्यापरी ॥ २३ ॥
 कृतवर्म्यावरी पार्थ ॥ धांवला जैसा प्रलयकृतांत ॥
 लक्षोनियां शारद्वत ॥ वृकोदर लोटला ॥ २४ ॥
 शकुनीवरी सहदेव सबळ ॥ उलूकावरी धांवला नकुळ ॥
 संजय म्हणे राया दळ ॥ आतां थोडे उरलेंसे ॥ २५ ॥
 दोन लक्ष अश्वस्वार ॥ इभ उरले दहा सहस्र ॥
 पंचदश सहस्र रहंवर ॥ पायदळ तीन कोटी ॥ २६ ॥
 आतां पांडवदळ उरलें किती ॥ तेही राया ऐक गणती ॥
 सहा सहस्र उरले रथी ॥ हस्ती उरले पांच सहस्र ॥ २७ ॥
 लक्ष अश्वस्वार उरलासे ॥ कोटी एक पायदळ दिसे ॥
 असो संग्राम अल्याचे ॥ मांडला तेव्हा रणभूमी ॥ २८ ॥
 उष्णीपकुंडलांसमवेत ॥ शिरें उडती असंख्यात ॥
 वीरपाणी चंदनचर्चित ॥ बिरुदांसहित चरण पडले ॥ २९ ॥
 पांडववीरांचा थोर मार ॥ पळों लागले कौरवभार ॥
 यावरी तों शल्य वीर ॥ धर्मावरी धांवला ॥ ३० ॥
 तों रथावरी धर्म पवित्र ॥ मस्तकीं विराजे आतपत्र ॥
 तपनपत्रें अति विचित्र ॥ मकरबिरुदें पुढती पैं ॥ ३१ ॥
 चित्रसेन कर्णसुत ॥ नकुलासवें युद्ध करी अद्भुत ॥
 तेणें करूनि पुरुषार्थ ॥ केला विरथ नकुल तेव्हां ॥ ३२ ॥
 मग नकुल पायीं धांवोन ॥ असिलता करीं घेऊन ॥
 चित्रसेनासमीप जाऊन ॥ शिर छेदिलें पुरुषार्थ ॥ ३३ ॥
 किरीटकुंडलांसमवेत ॥ कौरवदळी शिर टाकित ॥
 आणिके रथीं नकुल बैसत ॥ वीर समस्त मानवती ॥ ३४ ॥
 शूरसेन आणि सत्यसेन ॥ आले नकुलावरी धांवोन ॥
 अद्भुत युद्ध माद्रीनंदन ॥ करिता जाहला तेधवां ॥ ३५ ॥
 शूरसेन सत्यसेन लक्षून ॥ नकुलें टाकिले दिव्य बाण ॥
 दोघांचीं शिरें उडवून ॥ आकाशपंथे धाडिलीं ॥ ३६ ॥
 कृतवर्म्याची वाहिनी ॥ पार्थ संहारिली तये क्षणीं ॥
 इकडे शल्य धर्म रणांगणीं ॥ निकरेंकरूनि भिडती ॥ ३७ ॥
 तों गदा घेऊन वृकोदर ॥ शल्यावरी धांवला सत्वर ॥
 तों मद्रराजें चौदा तोमर ॥ भीमावरी भिरकाविले ॥ ३८ ॥
 अश्वांसहित स्यंदन ॥ भीमे केला रणीं चूर्ण ॥
 मग शल्य गदा घेऊन ॥ चरणचालीं धांवला ॥ ३९ ॥
 गदायुद्धाची खणखणाटी ॥ होऊं लागली अग्निवृष्टि ॥
 गदाघायें शेवटीं ॥ शल्य मूर्च्छां पावला ॥ ४० ॥
 सवेंच शल्य उठोन ॥ दुजे रथीं बैसला जाऊन ॥
 मागुती धर्माशीं दारुण ॥ युद्ध तेणें मांडिलें ॥ ४१ ॥
 शल्ये तेव्हां शतबाणीं ॥ धर्म खिळिला समरांगणीं ॥
 ऐसें विपरीत देखोनी ॥ वीर उठले अवघेचि ॥ ४२ ॥
 गदा बाण शक्ति तोमर ॥ असिलता पाश परिघ अपार ॥
 शल्यावरी सकल वीर ॥ वर्षाव करिती तेधवां ॥ ४३ ॥
 तितुक्यांचींही शस्त्रें ॥ शल्ये छेदिलीं क्षणमात्रें ॥
 कृष्णार्जुनांशीं गुरुपुत्रें ॥ युद्ध निकरें मांडिलें ॥ ४४ ॥
 संवत्सरसंख्यबाणीं ॥ पार्थास भेदिता जाहला ते क्षणीं ॥
 पुराणसंख्यमार्गणीं ॥ चक्रपाणि भेदिला ॥ ४५ ॥
 पांडवसेनेचा संहार ॥ गुरुपुत्रें केला अपार ॥
 पाडिले प्रेतांचे डोंगर ॥ मार्ग न चले रथातें ॥ ४६ ॥
 यावरी पार्थें रणरंगीं ॥ गुरुपुत्र खिळिला सर्वांगीं ॥
 पांच सहस्र वीर वेगीं ॥ विजये मारिले तेधवां ॥ ४७ ॥
 गुरुसुतें लोहमुसळ ॥ अर्जुनावरी टाकिलें तत्काळ ॥
 मग तें एकाच बाणें सबळ ॥ छेदोनियां टाकिलें ॥ ४८ ॥
 सवेंच तेणें परिघ टाकिले ॥ पार्थें तीन बाणें छेदिले ॥
 पांच बाण सवेंच काढिले ॥ विजूऐसे पार्थवीरें ॥ ४९ ॥
 सर्प शिरती वारुळांत ॥ तेविं अंगीं बाण जाहले गुप्त ॥
 मूर्च्छना येऊनि गुरुसुत ॥ ध्वजस्तंभीं टेकला ॥ ५० ॥
 इकडे शल्य निजबाणीं ॥ जर्जर केला पांडववाहिनी ॥
 कौरवसेना तये क्षणीं ॥ पार्थें तिकडे संहारी ॥ ५१ ॥
 शल्यावरी सबळ ॥ धर्में घातलें बाणजाळ ॥
 भीम सहदेव नकुळ ॥ पाठी रक्षिती धर्माची ॥ ५२ ॥
 धर्म म्हणे चक्रपाणी ॥ आजि शल्यास मारीन समरांगणीं ॥
 माझा अभिमान ये क्षणीं ॥ सिद्धि पाववीं श्रीरंगा ॥ ५३ ॥
 केशव म्हणे युधिष्ठिरा ॥ करीं आतां बहु त्वरा ॥
 आजि समग्र यशाचा तुरा ॥ तूंच पावशी निर्धारे ॥ ५४ ॥
 समरांगणीं धर्मभूपाल ॥ कौरवां दिसे केवळ काल ॥
 युधिष्ठिरें ब्रह्मांडगोल ॥ हांकेसरसा गाजविला ॥ ५५ ॥
 सिंदूरें चर्चिला नग देख ॥ आरक्त फुलला किंशुक ॥
 अनंतविजय शंख ॥ धर्मरायें त्राहाटिला ॥ ५६ ॥
 शल्याचीं चापें समरांगणीं ॥ धर्में शत छेदिलीं तये क्षणीं ॥
 बाणबाणांचे संघर्षणीं ॥ पावकज्वाला वर्षती ॥ ५७ ॥
 बाणजाळें कौरववाहिनी ॥ जर्जर केली समरांगणीं ॥
 मद्रराज सहस्रबाणीं ॥ धर्मराये विंधिला ॥ ५८ ॥
 चापें अलातचक्रापरी ॥ भ्रमती दोघांचेही हस्तांतरीं ॥
 वर्मे लक्षोनि परस्परीं ॥ बाण भेदिती रणशूर ॥ ५९ ॥
 धन्य योद्धा युधिष्ठिर॥ मानिती विमानीं सुरवर॥
 शत धनुष्यें शल्य नृपवर॥ छेदिता जाहला धर्माची ॥ ६० ॥
 धर्माचें उणें देखोन ॥ पुढें धांवला भीमसेन ॥
 बाणघातेंकरून ॥ कवच छेदिलें शल्याचें ॥ ६१ ॥
 धर्में शक्ति काढिली बाहेरी ॥ तिची प्रतिमा नाहीं दुसरी ॥
 जे धर्मराजें दिव्यमंत्री ॥ रक्षिली त्रिकाल पूजोनियां ॥ ६२ ॥
 ती काळशक्ति परम प्रबळ ॥ किंवा काळसर्पाची ते गरळ ॥
 कीं प्रलयाग्नीची कराळ ॥ मुख्य ज्याला प्रकटली ॥ ६३ ॥
 सप्तकोटि मंत्रांचें तेज ॥ जिचे ठायीं वसे सहज ॥
 घंटा पताका तेजःपुंज ॥ पाहतां सूर्य झांकोळे ॥ ६४ ॥
 दिव्य रत्नें जडितबंध ॥ ठायीं ठायीं तीस सुबद्ध ॥
 विधात्यानें कुशलत्व बहुविध ॥ करोनि शक्ति रचिली ते ॥ ६५ ॥
 ते ब्रह्मशक्ति अनिवार ॥ बाहेर काढी युधिष्ठिर ॥
 जपोनियां अथर्वणमंत्र ॥ न्यासध्यानादि सर्वही ॥ ६६ ॥
 सहस्र विजांचें तेज अद्भुत ॥ धर्में सोडिली अकस्मात ॥
 लक्षोनियां शल्याचा कंठ ॥ प्रलय करीत चालिली ॥ ६७ ॥
 ते डोळा न पाहवे शक्ती ॥ कित्येक वीर भयें पळती ॥
 कित्येक पार्थासी शरण जाती ॥ रक्षीं रक्षीं म्हणोनियां ॥ ६८ ॥
 शल्याचें हृदय लक्षित ॥ शक्ति आली अकस्मात ॥
 जैसा पर्वतीं पडे वज्राघात ॥ तैशी हृदयीं संचरली ॥ ६९ ॥
 शल्याचें हृदय फोडून निघाली ॥ ते पृथ्वीमाजी संचरली ॥
 मग पातालोदकीं विझाली ॥ जाऊनियां तेधवां ॥ ७० ॥
 कुंजरास होय पर्वतपात ॥ कीं वृक्ष उन्मूळिला अकस्मात ॥
 कीं स्वर्गींचा हुडा पडत ॥ पृथ्वीवरी जैसा कां ॥ ७१ ॥
 ऐसा शल्य पडला रणीं ॥ जयजयकारें गर्जे पांडववाहिनी ॥
 जयवाद्यांचे तये क्षणीं ॥ मंगलघोष चालले ॥ ७२ ॥
 शल्यबंधु महावीर॥ धर्मावरी धांवला सत्वर ॥
 त्याचेंही क्षणमात्रें शिर ॥ ऊर्ध्वपंथें उडविलें ॥ ७३ ॥
 कौरवदळीं हाहाकार॥ दशदिशां पळती वीर॥
 रक्तगंगेचे पूर ॥ लवणाब्धि पाहों धांवती ॥ ७४ ॥
 धर्माचें शूरत्व पूर्ण ॥ वाखणिती देव शचीरमण ॥
 भूतळींचे राजे कृष्णार्जुन ॥ म्हणती धन्य वीर हा ॥ ७५ ॥
 शल्याचें जें उरलें दळ ॥ स्वदेशा चालिले तत्काळ ॥
 दुर्योधनें राहविलें सकळ ॥ प्रार्थोनियां आदरें ॥ ७६ ॥
 तों गदा घेऊनि वृकोदर ॥ प्रलय करीत चालला थोर॥
 तेणें एकवीस सहस्र वीर॥ रणांगणीं मारिले ॥ ७७ ॥
 मकरालय जैसा विशाळ ॥ तैसें रण पाडिलें पुष्कळ ॥
 यावरी शाल्वनामा वीर सबळ ॥ म्लेंच्छपति उठावला ॥ ७८ ॥
 मग हस्तीवरी बैसोन ॥ तेणें युद्ध केलें निर्वाण ॥
 ऐरावतासमान ॥ गज तयाचा फिरतसे ॥ ७९ ॥
 पांडवसेनेचा संहार॥ म्लेंच्छें केला अपार॥
 त्यावरी धृष्टद्युम्न महावीर ॥ शर सोडीत धांवला ॥ ८० ॥
 युयुधानें शतबाणीं ॥ इभ जर्जर केला रणीं ॥
 गज बाणभयें करूनी ॥ रानोरानीं पळतसे ॥ ८१ ॥
 मग सात्यकीनें गदा घालून ॥ गज मारिला न लागतां क्षण ॥
 सवेंच बाण टाकून ॥ शिर छेदिलें शाल्वाचें ॥ ८२ ॥
 तें देखोन दुर्योधन ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥
 एक अर्जुन वेगळा करून ॥ सर्व वीर खिळियेले ॥ ८३ ॥
 दुर्योधनें शतबाण ॥ धर्मावरी टाकिले निर्वाण ॥
 दश बाणीं भीमसेन ॥ खिळिला क्रोधेंकरूनियां ॥ ८४ ॥
 मग गदा घेऊनि भीमसेन ॥ दुर्योधनावरी धांवला हांक देऊन ॥
 रथ समरीं केला चूर्ण ॥ सुयोधन पळाला ॥ ८५ ॥
 तंव द्रौपदीचे पांच सुत ॥ त्यांहीं वेढिला शारद्वत ॥
 जेवीं इंद्रियांनीं साधुसंत ॥ करिजे जैसा घाबरा ॥ ८६ ॥
 यावरी सातशत रथी जाण ॥ धर्मावरी पाठवी सुयोधन ॥
 तें देखोन पांडवसैन्य ॥ अवघेच तेव्हां उठावलें ॥ ८७ ॥
 सहा सहस्र घेऊनि स्वार॥ शकुनि धांवला कपटसागर ॥
 परी तितुक्यांचा संहार॥ पार्थ केला ते समयीं ॥ ८८ ॥
 रणांगणीं शत रथी ॥ तात्काळ मारी सुभद्रापती ॥
 दोन सहस्र स्वार शत हस्ती ॥ प्रेते करूनि पाडिले ॥ ८९ ॥
 पायदळ तीन सहस्र ॥ केला तयाचा संहार॥
 शकुनीसी लक्षोनि समोर॥ पार्थ वीर बोलतसे ॥ ९० ॥
 माझी राज्यरत्नें जिंकूनी ॥ तुंवा नेलीं कपटेंकरूनी ॥
 तुज मारून समरांगणीं ॥ आणवीन सर्वही ॥ ९१ ॥
 कौरवस्त्रिया वेगळ्या करून ॥ समस्तांसी दाखवितों यमसदन ॥
 तों सुशर्मा वर्षत बाण ॥ पार्थासमोर पातला ॥ ९२ ॥
 अष्टादश बाणेंकरूनी ॥ भेदिता जाहला पाकशासनी ॥
 तेणें सवेंच ऐंशी मार्गणीं ॥ सुशर्मा तेव्हां खिळियेला ॥ ९३ ॥
 घालोनियां बाणजाळ ॥ सहारिले सुशर्म्याचें दळ ॥
 जैसें शुष्कवन अनळ ॥ जाळोनियां भस्म करी ॥ ९४ ॥
 चार घटिकांपर्यंत ॥ युद्ध जाहले अद्भुत ॥
 मग बाण काढिला इंद्रदत्त ॥ प्रलयकृतांत जैसा कां ॥ ९५ ॥
 तों शर योजिला गुणीं ॥ ओढून लाविला दक्षिण श्रवणीं ॥
 सुशर्म्याचा कंठ लक्षूनी ॥ गगनमार्गी सोडिला ॥ ९६ ॥
 कंदुक संचरे जैसा गगनीं ॥ तैसें शिर उसळले ते क्षणीं ॥
 सुशर्मा संसारापासोनी ॥ मुक्त जाहला तेधवां ॥ ९७ ॥
 तयाचे पंचदश पुत्र ॥ जे होते पित्यासमान शूर॥
 त्यांचींही शिरें समग्र ॥ पार्थ छेदिलीं तेधवां ॥ ९८ ॥
 सुदर्शन सत्यसेन ॥ हेही कौरव दोघे जण ॥
 फाल्गुनें शिरें छेदून ॥ तत्काळ त्यांचीं टाकिलीं ॥ ९९ ॥
 उलूक शकुनीचा नंदन ॥ तों निःशंक धांवला वर्षत बाण ॥
 नकुलाशीं युद्ध दारुण ॥ केलें बहुत तेधवां ॥ १०० ॥
 मग टाकोनि निर्वाणशर ॥ उलूकाचें उडविले शिर ॥
 त्याचें दुःख शकुनि वीर॥ रोदन करीत अति शोचे ॥ १०१ ॥
 विदुराचीं वचनें मनीं ॥ आठविता जाहला शकुनि ॥
 मग सहदेवावरी खड्ग घेऊनी ॥ क्रोधेंकरून धांवला ॥ १०२ ॥
 तों सहदेवें टाकोनि बाण ॥ खड्ग पाडिलें छेदून ॥
 शकुनि गदा घेऊन ॥ धांवता जाहला तेधवां ॥ १०३ ॥
 सहदेव परम पुरुषार्थी ॥ गदा तोडून पाडिली क्षितीं ॥
 शकुनीने टाकिली शक्ती ॥ तेही केली त्रिखंड ॥ १०४ ॥
 सहदेव बोले गर्जोनी ॥ म्हणे कुटिला कपटिया शकुनी ॥
 कर्म केले जैसें मूळींहूनी ॥ त्याचें फळ भोगीं हें ॥ १०५ ॥
 माझी संपत्ति नेली हरोनी ॥ ते कपटिया सत्वर आणी ॥
 तुझे हात पाय खंडोनी ॥ टाकीन रणीं पाहें आतां ॥ १०६ ॥
 ध्वज तुरंग सारथि स्यंदन ॥ छेदून पाडी माद्रीनंदन ॥
 शकुनि खालीं उतरोन ॥ प्रास घेऊन चालिला ॥ १०७ ॥
 तों सहदेवें सोडले दोन बाण ॥ धाराग्रीं दैवत यमकृशान ॥
 दोन्ही भजा तेव्हां छेदून ॥ शकुनीच्या टाकिल्या ॥ १०८ ॥
 सवेंच दोन शर योजिले ॥ चरण तयाचे दोन्हीं खंडिले ॥
 मग सूर्यमुखबाणें ते वेळे ॥ शिर उडविलें शकुनीचें ॥ १०९ ॥
 भुजा पिटोनि गर्जे सहदेव ॥ वरून पुष्पवर्षाव करी वासव ॥
 जयवाद्यांचा घोष अपूर्व ॥ पांडवदळीं चालला ॥ ११० ॥
 तेव्हां चौघे बंधू येऊन ॥ सहदेवास देती आलिंगन ॥
 वासुदेव म्हणे धन्य ॥ कपटी शकुनि वधियेला ॥ १११ ॥
 शकुनीचे जें सैन्य उरलें ॥ तें पार्थ अवघें मारिलें  ॥
 अकरा अक्षौहिणी दळ सगळें ॥ सर्व आटलें कुरुक्षेत्रीं ॥ ११२ ॥
 जैसा तडाग भरला विशाल ॥ त्याचें चौफेरीं फुटलें जल ॥
 कीं प्राण गेलिया सकल ॥ निश्चेष्टित इंद्रियें ॥ ११३ ॥
 मनाचें ठाणें उठले निश्चिती ॥ मग तेथें कासया राहेल प्रीती ॥
 तेविं भीष्मद्रोणादि पडतां रणक्षितीं ॥ मावळलें सर्व दळ ॥ ११४ ॥
 पांडवदळही आटलें ॥ त्यामाजी जें किंचित उरलें ॥
 त्याचें गणित केलें ॥ वैशंपायनें ऐका तें ॥ ११५ ॥
 दोन सहस्र रहंवर ॥ आणि सातशे कुंजर ॥
 पांच सहस्र स्वार ॥ पायदळ सहस्र साहा ॥ ११६ ॥
 दुर्योधन ते समयीं ॥ गदा हातीं एकलीच पाहीं ॥
 संहारिले बंधू सर्वही ॥ एकही उरला नसेच ॥ ११७ ॥
 बैसावया एक वाहन ॥ एकलाच पळे दुर्योधन ॥
 मग कृष्णद्वैपायनडोह पाहोन ॥ उडी त्यांत टाकिली ॥ ११८ ॥
 विदुराचीं वचनें आठवूनी ॥ शोकें आरंबळे तये क्षणीं ॥
 आटली सर्व वाहिनी ॥ चौघे त्यांत जीवंत उरले ॥ ११९ ॥
 दुर्योधन कृतवर्मा गुरुसुत ॥ चौथा उरला शारद्वत ॥
 संजय म्हणे त्या युद्धांत ॥ मीही राया गेलों होतों ॥ १२० ॥
 मी आतांच आलों जाऊन ॥ मजवरही खड्ग घेऊन ॥
 सात्यकी आला धावोन ॥ मजलागीं वधावया ॥ १२१ ॥
 मग प्रकटले व्यासदेव ॥ त्यांहीं सोडविला माझा जीव ॥
 म्यां शस्त्र कवच टाकून सर्व ॥ कोश एक पळालों ॥ १२२ ॥
 तों म्यां दुर्योधन तेथ ॥ एकलाच देखिला रडत ॥
 मीही दुःखें दाटलों बहुत ॥ मग त्यास वृत्त पुशियेलें ॥ १२३ ॥
 कृतवर्मा शारद्वत गुरुनंदन ॥ हे गेले महावना पळोन ॥
 मग बोलिला दुर्योधन ॥ सांग जाऊन धृतराष्ट्रा ॥ १२४ ॥
 या कृद्याद्वैपायनडोहांत ॥ मी एकला असें येथें गुप्त ॥
 मज ही दशा जाहली प्राप्त ॥ पूर्वदत्त सुटेना ॥ १२५ ॥
 मग जलस्तंभन करून ॥ त्या डोहीं राहिला दुर्योधन ॥
 पुढें आलों तों तिघे जण ॥ मजला पुसों लागले ॥ १२६ ॥
 कोठे आहे रे दुर्योधन ॥ म्यां सांगितलें र्हदाचें स्थान ॥
 महादुर्धर वनीं जाण ॥ तिघे राहिले वटाखालीं ॥ १२७ ॥
 अस्तास गेला आदित्य ॥ इकडे पांडवसेना धांवत ॥
 दुर्योधनास शोधित ॥ कोठे लपाला म्हणोनियां ॥ १२८ ॥
 दुर्योधनशिबिरें निश्चितीं ॥ रिती सर्व भणभणिती ॥
 कित्येक वीरपत्न्या पळती ॥ रडत जाती रानोरानीं ॥ १२९ ॥
 कीं त्या लावण्यहरिणी ॥ प्रलाप करीत जाती काननीं ॥
 पांडवांकडे गेला म्हणोनी ॥ युयुत्सु मात्र एक उरला ॥ १३० ॥
 वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ युयुत्सु धर्मासी पुसोनियां ॥
 गजपुरा आला लवलाह्या ॥ तों विदुर तयास पुसतसे ॥ १३१ ॥
 काय वर्तला सांग समाचार ॥ म्हणे जाहला सर्व संहार ॥
 विदुर करीत हाहाकार ॥ काय उत्तर बोलिला ॥ १३२ ॥
 युयुत्सु तूं एक उरलासी ॥ यष्टी येवढी तरी अंधासी ॥
 तूं सत्वर जा धर्मापाशी ॥ तुज कोणी तरी मारील ॥ १३३ ॥
 गजपुरी हाहाकार ॥ शून्य दिसे अवघें नगर ॥
 कलाहीन राजमंदिर ॥ कळस ढासळून पडियेले ॥ १३४ ॥
 वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ येथून शल्यपर्व जाहले राया ॥
 गदापर्व येथोनियां ॥ तेही श्रवण करीं पुढें ॥ १३५ ॥
 शौनकादि महामुनी ॥ श्रवण करिती नैमिषारण्यीं ॥
 वेदव्यासप्रसादेंकरूनी ॥ सूत सांगें तयांतें ॥ १३६ ॥
 आतां ब्रह्मानंदे श्रीधर ॥ पंडितां विनवी जोडूनि कर ॥
 गदापर्व सुरस फार ॥ येथून पुढें श्रवण करा ॥ १३७ ॥
 श्रीमद्भीमातीरविहारा ॥ श्रीधरवरदा त्रिभुवनेश्वरा ॥
 श्रीब्रह्मानंदयतींद्रा ॥ बोलवीं पुढें येथोनियां ॥ १३८ ॥
 स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ शल्यपर्व व्यासभारत ॥
 त्यांतील सारांश यथार्थ ॥ पन्नासाव्यांत कथियेला ॥ १३९ ॥
 इति श्रीधरकृतपांडवप्रतापे शल्यपर्वणि पंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५० ॥
 अध्याय पन्नासावा समाप्त
 
 
 GO TOP |