श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सत्तेचाळीसावा


शल्य कर्णाचा सारथी झाला


श्रीगणेशाय नम: ॥
जनमेजयास म्हणे वैशंपायन ॥ परंधाम पावला गुरुद्रोण ॥
एथून कर्णपर्व संपूर्ण ॥ स्वस्थचित्तें ऐका पां ॥ १ ॥
शारद्वत दुर्योधन कर्ण ॥ अश्वत्यामा जो गुरुनंदन ॥
त्याचिया शिबिराप्रति जाऊन ॥ समाधान करिती तेव्हां ॥ २ ॥
प्राणाविणशरीर ॥ कीं फलाविण तरुवर ॥
तैशी द्रोणाविण सेना समग्र ॥ शून्यवत्‌ दिसतसे ॥ ३ ॥
सकलसेना भयभीत ॥ म्हणती आतां आला अंत ॥
शस्त्रें हातींचीं गळाली समस्त ॥ नक्षत्रे पडती ज्यापरी ॥ ४ ॥
दुर्योधन म्हणे कर्णवीरा॥ बालमित्रा प्रीतिपात्रा ॥
तुझिया बळें उदारा ॥ न गणीं मी इंद्रासी ॥ ५ ॥
भीष्म आणि गुरु द्रोण ॥ यांचें पांडवांकडे मन ॥
गंगानंदनें दश दिन ॥ युद्ध उगेंच लांबविले ॥ ६ ॥
पांच दिवस द्रोणें पाहें ॥ युद्ध करोनि केलें काय ॥
दोघांनींही आमुचा जय ॥ इच्छिला नाहीं तत्त्वतां ॥ ७ ॥
ते परम कपटी कृतघ्न ॥ तरीच पावले अपयश मरण ॥
कर्णा तूं आमुचा प्राण ॥ सेना रक्षीं यावरी ॥ ८ ॥
पुरुषांमाजी तूं महाव्याघ्र ॥ तुजपुढे कायसे पंडुपुत्र ॥
सुवर्णकुंभीं भरोनि नीर ॥ दुर्योधनें आणविलें ॥ ९ ॥
अभिषेक करून प्रीतीं ॥ कर्ण केला सेनापती ॥
वस्त्रें भूषणें अश्व हस्ती ॥ दुर्योधनें दिधले ॥ १० ॥
अरिष्टनाशक दानें ॥ बहुत दिधलीं दुर्योधनें ॥
ओवाळून वस्तु निंबलोणें ॥ नीच याचकां देतसे ॥ ११ ॥
पार्थास म्हणे विश्वकर्ता ॥ यावरी तूं आराधीं सविता ॥
सूर्यास शरण जाई आतां ॥ सकल विघ्नें नासती ॥ १२ ॥
मग आदित्यहृदय जपोन ॥ करी तृचाकल्प अर्घ्यदान ॥
सूर्य करोनि सुप्रसन्न॥ युद्धास अर्जुन निघाला ॥ १३ ॥
विजयरथारूढ होय पार्थ ॥ रणतुरें वाजलीं अद्‌भुत ॥
कौरवांसहित हिरण्यगर्भसुत ॥ रथारूढ जाहला ॥ १४ ॥
मकरव्यूह ते वेळां ॥ दिनमणिसुतें रचियेला ॥
पांडवीं व्यूह आकारिला ॥ अर्धचंद्रवत्‌ तेधवां ॥ १५ ॥
दाटलीं जैशीं खगमंडलें ॥ तैसें पांडवसैन्य उठावले ॥
परी दृष्टीं न धरी ते वेळे ॥ सवितात्मज सहसाही ॥ १६ ॥
इकडे पार्थास धर्मनृपती ॥ गौरवीत परमप्रीतीं ॥
म्हणे आजि कर्णाप्रती ॥ वधून विजयी होई तूं ॥ १७ ॥
रणपंडिता सद्‌गुणालया ॥ यशस्वी असोत तुझिया बाह्या ॥
प्रेमें हृदयीं आलिंगोनिया ॥ म्हणे काया अक्षय्य असो ॥ १८ ॥
जगद्‌वंद्य जो विश्वकर्ता ॥ त्याचे करीं धर्म देत पार्था ॥
म्हणे तूंचि माता तूंचि पिता ॥ बहुत आतां काय बोलूं ॥ १९ ॥
रुक्मिणीहृदयाब्जमिलिंद ॥ जो पूर्णब्रह्म सच्चिदानंद ॥
तों म्हणे आजि कर्णवध ॥ किरीटिहस्तें करवीन पैं ॥ २० ॥
वाद्यें धडकलीं प्रबळ ॥ गजर जाहला परमतुंबळ ॥
एकवटलें चतुरंग दळ ॥ परमावेशे भिडति ॥ २१ ॥
पक्षी उडती वृक्षावरूनी ॥ तैशी शिरें उसळती गगनीं ॥
कीं ते कंदुक खेळती रणीं ॥ कौरव पांडव आवेशें ॥ २२ ॥
जैसे पंचफणी पादोदर ॥ तैसे वीरांचे पडले कर ॥
मुकुट पडिले अपार ॥ वीरवर्यांचे झळकती ॥ २३ ॥
कबंधें उठोन शीघ्रगती ॥ नाचोन टाळिया वाजविती ॥
आम्ही मुक्त झालों धारातीर्थी ॥ परमगति पावलों ॥ २४ ॥
समर टाकून जे भ्याड पळती ॥ त्यांसी देखोन शिरें हांसती ॥
आम्ही रणशूर पावलों गती ॥ म्हणोन नाचती आनंदें ॥ २५ ॥
ऊर्ध्वपंथें शिरें जाती ॥ सवेंच माघारी कां फिरती ॥
तरी नाशिवंत स्वर्ग निश्चिती ॥ क्षणिक वस्ती काय ते ॥ २६ ॥
पार्थरथीं वैकुंठनाथ ॥ या देखतां आम्ही जाहलों मुक्त ॥
नलगे स्वर्ग नाशिवंत ॥ शिरें परतती म्हणोनियां ॥ २७ ॥
ऐरावतासमान हस्ती ॥ हिरे पाच जडले दांतीं ॥
मुक्तजाळिया वरी मिरवती ॥ समीरगति धांवे रणीं ॥ २८ ॥
तया द्वीपावरी कवच लेवून ॥ बैसोन धांवला भीमसेन ॥
तों क्षेमधृति कौरवांकडून ॥ तोही गजारूढ पातला ॥ २९ ॥
सिंहनादें दोघे गर्जती ॥ अलातचक्रवत इभ फेरिती ॥
परस्परें बाण सोडिती ॥ चापें तोडिती लक्षोनियां ॥ ३० ॥
शास्त्रसंख्य तोमर॥ क्षेमधृतिनें सोडिले अनिवार॥
हृदयीं ताडिला द्वितीयपुत्र ॥ पृथादेवीचा तेधवां ॥ ३१ ॥
भीमे नूतन चाप घेऊनी ॥ हृदयीं ताडिला विशतिबाणीं ॥
सर्वेच गदाघायेंकरूनी ॥ इथ रणीं संहारिला ॥ ३२ ॥
क्षेमधृति असिलतां घेऊन ॥ भीमावरी पडिला येऊन ॥
मग भीमे गदाघायेंकरून ॥ केला चूर्ण समरांगणीं ॥ ३३ ॥
कौरवदळीं हाहाकार ॥ पुढें धांवला मरीचिकुमार ॥
त्यावरी सोडीत शर ॥ नकुल वीर लोटला ॥ ३४ ॥
भीम आणि गुरुनंदन ॥ विंदानुविंद दोघे जण ॥
हे दुर्योधनाचे बंधू जाण ॥ तयांवर सात्यकी धांवला ॥ ३५ ॥
श्रुतकर्मा आणि चित्रसेन ॥ धर्मराज आणि सूयोधन ॥
समसप्तकांवरी अर्जुन ॥ कृतवर्मा आणि शिखंडी ॥ ३६ ॥
शल्य श्रुतकीर्ति दोघे जण ॥ सहदेव आणि दुःशासन ॥
कैकेयराज आणि धृष्टद्युम्न ॥ परम आवेशें भिडती ॥ ३७ ॥
विंदानुविदांचीं शिरें ॥ पाडिलीं तेव्हां सात्यकीवीरें ॥
युद्ध होत असे अतिगजरें ॥ उर्वीतळ डळमळी ॥ ३८ ॥
इकडे श्रुतकर्मा चित्रसेन ॥ दोघीं बाणीं भरलें गगन ॥
चापें आणि स्यंदन ॥ छेदिते जाहले परस्परें ॥ ३९ ॥
श्रुतकर्मा द्रौपदीपुत्र ॥ तेणें कर्म केलें विचित्र ॥
चित्रसेनाचें शिर ॥ दिव्यबाणें उडविलें ॥ ४० ॥
श्रुतकर्मा महावीर ॥ बाणें कौरव केले जर्जर ॥
मस्तक डोलविती उपवर ॥ सव्यतर्जनी उचलोनी ॥ ४१ ॥
श्रुतकीर्ति द्रौपदीकुमार ॥ तेणें मारिला अभिसार ॥
प्रतिविंध्यवीरे त्रिवीर ॥ क्षण न लागतो वधियेला ॥ ४२ ॥
तंव कौरव अवघे वळंघले ॥ प्रतिविंध्यावरी कोसळले ॥
नाना शस्त्रें अस्त्रे वर्षले ॥ एकदांच चहूंकडोनी ॥ ४३ ॥
तों द्रौपदीचा ज्येष्ठनंदन ॥ जो जाहला धर्मापासून ॥
तेणें स्वप्रतापेंकरून ॥ शस्त्रें छेदिलीं अवघ्यांचीं ॥ ४४ ॥
महावीरांचे भार॥ तेणें बाणीं केले जर्जर॥
पाठ देऊन धार्तराष्ट्र पैं ॥ पळते जाहले तयापुढें ॥ ४५ ॥
इकडे गुरुसुतावरी भीमसेन ॥ घालिता जाहला असंख्य बाण ॥
सहस्र शरीं आचार्यनंदन ॥ आच्छादित भीमातें ॥ ४६ ॥
गिरिवरी पडे जलधर॥ तैसे भीम न गणी त्याचे शर ॥
सिंहनादें कुंतीपुत्र ॥ भरी अंबर तेधवां ॥ ४७ ॥
पांचशत बाणेंकरून ॥ भीमे खिळिला गुरुनंदन ॥
तोडोनि टाकिला स्यंदन ॥ तुरंगसूतांसमवेत ॥ ४८ ॥
मग चरणचाली गुरुसुत ॥ वृकोदराचा रथ छेदित ॥
दोघे सिंहनादें गर्जत ॥ देव कांपती विमानीं ॥ ४९ ॥
गदाघाये दोघे जण ॥ चरणचाली करिती भांडण ॥
दोन्हीं दळीचे वीर पाहोन ॥ धन्य युद्ध वानिती ॥ ५० ॥
नानागति मंडले करून ॥ स्थिर चमक बैसका उड्डाण ॥
गदा झगडतां उसळे अग्न ॥ दळे पोळून पळताती ॥ ५१ ॥
गदाघायीं दोघांस तये क्षणां॥ येती जाहली महामूर्च्छना ॥
रथ आणोनि दोघां जणां ॥ नेते जाहले दोहींकडे ॥ ५२ ॥
यावरी तों सुभद्राकांत ॥ वेगें धावला बाण वर्षत ॥
कौरवदळीं आकांत ॥ शिरें अपार छेदिलीं ॥ ५३ ॥
जेवि नालरहित कमले ॥ तैसे शिरांचे भार पडले ॥
रथाचे अंक छेदिले ॥ सहस्रावधि तेधवां ॥ ५४ ॥
सहस्रवीर रणपंडित ॥ नांवाजिक अतिबळवंत ॥
त्यातुल्य एक सुभद्राकांत ॥ बोले गणित वैशंपायन ॥ ५५ ॥
पुष्पवर्षाव सतेज ॥ वारंवार करी विबुधराज ॥
तें न साहोनि द्रोणतनुज ॥ वर्षत बाण धांवला ॥ ५६ ॥
शतबाणीं अभिमन्युतात ॥ खिळिता जाहला कृपीसुत॥
सहस्रबाणीं पार्थ ॥ विंधिता जाहला तयातें ॥ ५७ ॥
त्याचें भूमंडल लक्षोन ॥ पार्थें एक सोडिला बाण ॥
तों गुरुसुताचे कपाळीं जाऊन ॥ पूर्ण भेदून गुप्त जाहला ॥ ५८ ॥
अनेक शरीं भेदलें क्षेत्र ॥ मयुराऐसादिसे गुरुपुत्र ॥
यावरी कौरव सर्वत्र ॥ केले जर्जर बाणघायें ॥ ५९ ॥
पदक्रमीं वर्णक्रमीं जाणा ॥ पंडिताची जेविं चाले रसना ॥
तयापरी पार्थवीर जाणा ॥ सोडी बाण चपलत्वें ॥ ६० ॥
उभयहस्तांचें समसंधान ॥ केव्हां काढी न कळे मार्गण ॥
विद्युल्लतेऐसें सायकासन ॥ झळके कानाडी ओढितां ॥ ६१ ॥
असो बाणजाळीं जर्जर॥ पार्थ केला गुरुपुत्र ॥
मग अंग काढून तों महावीर॥ कर्णदळीं प्रवेशला ॥ ६२ ॥
तों गजारूढ सत्वर॥ भगदत्ताचा बंधु दंडधार ॥
पार्थावरी सोडीत शर ॥ अत्यावेशें धांविन्नला ॥ ६३ ॥
शत शत बाण टाकोनी॥ उभयकृष्ण भेदिले रणीं ॥
समरभूमीसी घटिका दोनी॥ महावीर भिडला तो ॥ ६४ ॥
मग पार्थ टाकोनि शर ॥ दंडधाराचें उडविलें शिर ॥
उग्रायुध महावीर॥ तोही तैसाच धांवला ॥ ६५ ॥
श्रीकृष्ण म्हणे पार्थ वीरेशा ॥ क्रीडसी काय बाळाऐसा ॥
आतां कर्ण वधिसी कैसा ॥ त्वरा करीं युद्धाची ॥ ६६ ॥
उग्रायुधाचें शिर जाण ॥ अर्जुने छेदिलें न लागतां क्षण ॥
येरीकडे मेघपति अंग दारुण ॥ नकुलें रणीं संहारिले ॥ ६७ ॥
नकुलावरी दुःशासन॥ धांवला तेव्हां वर्षत बाण ॥
सहस्र सायक टाकून ॥ समरीं दुर्जन खिळियेला॥ ६८ ॥
दुःशासन विकल रथीं ॥ देखोन रथ फिरवी सारथी ॥
मग तों नकुल सुमती ॥ कर्णाप्रति बोलत ॥ ६९ ॥
हा अनर्थ व्हावया मूळ ॥ अरे कर्णा तूंच केवळ ॥
षंढतीळ जैसे अरण्यातील ॥ आम्हांस नांव ठेविलें त्वां ॥ ७० ॥
आम्ही षंढ कीं रणशूर ॥ समरीं मनास आणीं बर ॥
कर्ण म्हणे नकुला समोर॥ युद्ध करीं पाहूं कैसें ॥ ७१ ॥
मग कर्णे परम कोपोनी ॥ नकुल विधिला सत्तर बाणीं ॥
तेणें ऐशीं सायकेंकरोनी ॥ सूर्यसुत भेदिला ॥ ७२ ॥
कर्णाचा परमप्रताप ॥ छेदिलें नकुलाचे चाप ॥
शत बाणीं कवच देदीप्य ॥ सवेंच छेदोनि पाडिलें ॥ ७३ ॥
नकुलें टाकोनि सत्तर बाण ॥ कर्णाचें छेदिलें बाणासन ॥
सवेंच तेणें नूतन ॥ चाप घेतलें हस्तकीं ॥ ७४ ॥
मग तीनशत बाणीं ॥ नकुल विंधिला तये क्षणीं ॥
रथ टाकिला तोडूनी ॥ सारथि अश्व छेदिले ॥ ७५ ॥
नकुलें परिघ टाकिला ॥ तों कर्णे मध्येंच चूर्ण केला ॥
मग माद्रीसुत निघाला ॥ समर सोडूनि तेधवां ॥ ७६ ॥
तों कर्णे धांवोनि ते वेळां ॥ चाप घातलें नकुलाचे गळां ॥
मग म्हणे रे बाळा ॥ कैसें आतां करिशील ॥ ७७ ॥
मग कुंतीचें वचन आठवून ॥ नकुल दिधला सोडून ॥
म्हणे मजसमोर आजपासून ॥ समरीं सर्वथा येऊं नको ॥ ७८ ॥
वीर आपणासमान पाहोन ॥ त्वां करावें युद्धकंदन ॥
सुईचे रंध्राएवढें वदन ॥ त्यांत पर्वत केवि मावे ॥ ७९ ॥
कल्पांतवीज धांवोनी ॥ शलभ केवि गिळील वदनीं ॥
लवणनौका सिंधुजीवनी ॥ केवि तरोनि जाईल ॥ ८० ॥
कर्ण म्हणे हांसोनी ॥ लपे पार्थाआड जाऊनी ॥
परमलज्जित होऊनी ॥ नकुल पायीं परतला ॥ ८१ ॥
मग पांचालावरी कर्ण ॥ तेव्हां वर्षत बाण ॥
युयुत्सु आणि उलूक जाण ॥ युद्ध दारुण करिते जाहले ॥ ८२ ॥
कर्णें घालितां बाणजाळ ॥ पळाले पांचाळाचे दळ ॥
हें देखोनि प्रतापशीळ ॥ हरिवरध्वज धांवला ॥ ८३ ॥
कौरवदळ महामार्गणी ॥ पार्थें मारिलें तये क्षणीं ॥
संश्रुताचें शिर उडवूनी ॥ आकाशपंथे धाडिलें ॥ ८४ ॥
सत्यसेन धावला तये क्षणीं ॥ लोहतोमर हातीं घेऊनी ॥
हृदयीं ताडिला चक्रपाणी ॥ रथासमीप येऊनियां ॥ ८५ ॥
तेणें मूर्च्छा आली त्वरे ॥ गळाले हातींचे वाग्दोरे ॥
ऐसें देखोनि पार्थवीरें ॥ शर सोडिला शशिमुख ॥ ८६ ॥
सत्यसेनाचें शिर उडविलें ॥ कौरवसेनेंत पाडिलें ॥
सुशर्म्यासी खिळिलें ॥ वक्षस्थळीं सप्त शरीं ॥ ८७ ॥
सावध होऊनि कमलावरें ॥ सांवरोन धरिले वाग्दोरे ॥
मग लक्षवधि शिरें ॥ पार्थें पाडिलीं परवीरांचीं ॥ ८८ ॥
मांसकर्दमीं तत्त्वतां ॥ चक्रे न ढळती अश्वी ओढितां ॥
गजाश्वकलेवरें पाहतां ॥ पर्वतप्राय पडियेलीं ॥ ८९ ॥
रथास न चले वाट ॥ अरिभार पळती अचाट ॥
कुंडलांसहित अपार मुकुट ॥ रणांगणीं पडियेले ॥ ९० ॥
कित्येक रिते रथ ओडूनी ॥ अश्व हिंडती रणांगणीं ॥
मोकळे कुंजर उचलोनी ॥ भिरकावती रथांतें ॥ ९१ ॥
तों रथारूढ दुर्योधन ॥ आला पार्थावरी धांवोन ॥
सोडिता जाहला शत बाण ॥ कृष्णार्जुन लक्षोनियां ॥ ९२ ॥
पार्थ सोडोनियां शर ॥ छेदिलें मस्तकींचें आतपत्र ॥
सारथि रहंवर चाप तूणीर ॥ पाडिले तेव्हां पुरुषार्थे ॥ ९३ ॥
मग एक निर्वाणींचा बाण ॥ पार्थें दिधला सोडून ॥
तों सातां ठायीं छेदून ॥ कृपीसुतें पाडिला ॥ ९४ ॥
ऐसें युद्ध होतां घोरांदर ॥ तों अस्तास गेला सहस्रकर ॥
वाद्यें वाजवित वीर ॥ शिबिरांत गेले आपुलिया ॥ ९५ ॥
कौरवदळींचे वीर बहुत ॥ वानिती पांडवांचा पुरूषार्थ ॥
कर्णपराक्रम अद्‌भुत ॥ दुर्योधन वानीतसे ॥ ९६ ॥
कर्ण म्हणे रे दुर्योधना ॥ उद्यां वधीन मी अर्जुना ॥
तरीच पाहीन तुझिया वदना ॥ नाहीं तरी भेटी हेचि ॥ ९७ ॥
भार्गवचाप आहे मजजवळी ॥ तरी वासवी शक्ति वेचून गेली ॥
मज चिंता थोर लागली ॥ ते बाहेर दावितां नये ॥ ९८ ॥
भुजंगाचे पाडिले दांत ॥ महाव्याघ्राचे तोडिले हात ॥
कीं आडांत पडला मृगनाथं ॥ तेविं सत्यमज जाहले ॥ ९९ ॥
त्याचे रथावरी हरिहर ॥ विजय रथ चाप तूणीर ॥
मज सारथि नाहीं चतुर ॥ तरी एक करीं सुयोधना ॥ १०० ॥
अश्वहृदय संपूर्ण ॥ शल्य किंवा जाणे कृष्ण ॥
धनुर्धर मी एक किंवा अर्जुन ॥ तिसरा नाहीं या वेळे ॥ १०१ ॥
शल्य सारथि होईल जरी ॥ तरी उद्यांच मारीन पार्थ समरीं ॥
यावरी शल्याचिया शिबिरीं ॥ दुर्योधन येता जाहला ॥ १०२ ॥
बहुत करोनियां स्तुति ॥ म्हणे मज तूं प्रसन्न होई नृपति ॥
होई कर्णाचा सारथि ॥ एक दिवस महावीरा ॥ १०३ ॥
ऐसा ऐकतां बोल ॥ कोपारूढ जाहला शल्य ॥
म्हणे कर्ण सूतपुत्र मशक केवळ ॥ मी भूपाल मद्रदेशींचा ॥ १०४ ॥
मी एकलाच युद्ध करीन ॥ पांडवदळ संहारीन ॥
त्वां मांडिला माझा अपमान ॥ तरी मी जाईन स्वदेशा ॥ १०५ ॥
मी राजपुत्र छत्रपती ॥ पृथ्वी घालीन हे पालथी ॥
किरातपुत्र कर्ण म्हणती ॥ मी सारथि त्यास कैसा ॥ १०६ ॥
मग नम्रता धरून ॥ बहुत विनवी दुर्योधन ॥
तुजहूनि थोर नव्हे कर्ण ॥ हें संपूर्ण मी जाणें ॥ १०७ ॥
मज देई जीवदान ॥ पाहें सारथि जाहला श्रीकृष्ण ॥
त्रिपुरवधीं चतुरानन ॥ सारथि जाहला शिवाचा ॥ १०८ ॥
तूं कृष्णाहूनि थोर ॥ ऐकतां तोषला शल्य वीर ॥
म्हणे सारथि होतों निर्धार ॥ कर्णाचा मी यावरी ॥ १०९ ॥
परी मी जें बोलेन स्वभावें ॥ तें कर्णें उगेंच सोसावे ॥
तेणें अधिक मज न बोलावें ॥ दुर्योधन अवश्य म्हणे ॥ ११० ॥
मज अधिक बोलतां कर्ण ॥ मी जाईन रथ सोडून ॥
त्यास नाटोपे अर्जुन ॥ हें मी पूर्ण जाणतसें ॥ १११ ॥
तथापि तेणें मारिला अर्जुन ॥ तरी कृष्ण घेईल सुदर्शन ॥
तुम्हांस टाकील संहारून ॥ क्षणमात्र न लागतां ॥ ११२ ॥
यावरी बोले सुयोधन ॥ तूं कर्णास टाकिसी निर्भर्त्सून ॥
परि ऐसा धनुर्वेदपरायण ॥ कुंभिनीवरी असेना ॥ ११३ ॥
घटोत्कचाची माया ॥ ब्रह्मादिकांसी नये आया ॥
तों वासवी शक्ति टाकोनियां ॥ क्षणमात्रें मारिला ॥ ११४ ॥
जेणें जर्जर केला भीमसेन ॥ नकुलाचें गळां चाप घालून ॥
मागुती देऊन जीवदान ॥ सोडिला बाळ म्हणोनियां ॥ ११५ ॥
शल्य म्हणे मी जें बोलेन ॥ तें कर्णे करावें सहन ॥
मनास येईल तेव्हां जाईन ॥ नसें आधीन कोणाचे ॥ ११६ ॥
मग कर्णाचे गळां धांवोन ॥ दुर्योधन प्रीतीनें मिठी घालून ॥
म्हणे अर्जुनास वधून ॥ विजयी होऊन येई कां ॥ ११७ ॥
यावरी बोले तरणिकुमार ॥ शल्य सारथि दुष्ट फार ॥
वैरियांस वारंवार ॥ वर्णोनि आम्हां निर्भर्त्सितो ॥ ११८ ॥
गांधार म्हणे शल्यालागून ॥ जैसा धनंजयास रक्षी कृष्ण ॥
तैसा तूं रक्षीं आतां कर्ण ॥ दुष्टवचन बोलों नको ॥ ११९ ॥
असो सूर्यास नमून ते अवसरीं ॥ रथावरी चढला भास्करी ॥
माद्रीबंधु झडकरी ॥ धुरेसी सारथि जाहला ॥ १२० ॥
इंद्राचे रथीं मातली सतेज ॥ कीं मित्ररथीं सुपर्णाग्रज ॥
तैसा रथ चालवी मद्रराज ॥ जेविं जहाज समुद्री ॥ १२१ ॥
शंभुसारथि स्वयंभू जाण ॥ तैसा चातुर्यें चालवी स्यंदन ॥
उदयाचलावरी सहस्रकिरण ॥ तैसा कर्णरथीं तों दिसे ॥ १२२ ॥
धनुष्य टणत्कारिलें तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघुकिंकिणी ॥
तों वाद्यनादें धरणी ॥ डळमळू लागली तेधवां ॥ १२३ ॥
कर्ण म्हणे प्रेरीं स्यंदन ॥ आजि अर्जुनास मी मारीन ॥
शल्य म्हणे बोलसी वचन ॥ तितुकें निष्फळ सर्वही ॥ १२४ ॥
पार्थ आणि वृकोदर ॥ इहीं पराक्रम केला थोर ॥
तों मनांत आठवी वारंवार ॥ वृथा वचन बोलूं नको ॥ १२५ ॥
एकें सुखी केला पावक ॥ एकें मारिले शत कीचक ॥
गोग्रहणीं वस्त्रें हरी सुभद्रानायक ॥ भीमें बक मर्दिला ॥ १२६ ॥
पार्थ निवातकवच मारिले रणीं ॥ भीमे हिडिंब किर्मीर टाकिले मर्दूनी ॥
त्यांसी तूं जिंकीन म्हणसी रणीं ॥ व्यर्थ वल्गना तुझी हे ॥ १२७ ॥
जो न देखसी वानरध्वज ॥ भीमे जो आपटिले नाहीं गज ॥
तोंवरीच तुझें तेज ॥ शब्दबळ जाण पां ॥ १२८ ॥
कर्ण म्हणे व्यर्थ काय बोलोन ॥ आतां दावितों करणी करून ॥
अकाळीं मेघ करी गर्जन ॥ तैसें भाषण कासया ॥ १२९ ॥
वाद्यगजरें कौरवभार ॥ उभे कर्णाचे पाठीशीं सादर॥
जैसे यजमानाभोंवते आश्रित विप्र ॥ मिळती भाग्य देखूनि ॥ १३० ॥
तों जाहला अपशकुन ॥ घोडे पडले अडखळोन ॥
गृधीं शिरें आणोन ॥ रथापुढें टाकिलीं ॥ १३१ ॥
तों धूमकेतु शिखाकेत ॥ गगनीं उदेले अद्‌भुत ॥
ते अपशकुन न गणी सूर्यसुत ॥ वीरश्रीमदेंकरूनियां ॥ १३२ ॥
कर्ण बोले पुरुषार्थ ॥ आजि रणीं मारीन पार्थ ॥
कीं भीष्म द्रोण मेले तों पंथ ॥ मीही जाईन लक्षोनि ॥ १३३ ॥
शल्य म्हणे मनोरथ ॥ जैसे दरिद्रियाचे सर्व व्यर्थ ॥
तैसें तूं चिंतिसी मनांत ॥ ते सिद्धि न पावे तत्त्वतां ॥ १३४ ॥
तडाग आणि सागर॥ कीं रंक आणि देवेंद्र ॥
झोटिंग आणि उमावर ॥ समान कैसे होती पां ॥ १३५ ॥
तरणि आणि उडुगण ॥ अलिका आणि सहस्रवदन ॥
परिस आणि पाषाण ॥ कैसे समान होती पां ॥ १३६ ॥
खद्योत आणि चंद्र ॥ राक्षस आणि रामचंद्र ॥
कंस आणि कमलावर ॥ कैसे समान होती पां ॥ १३७ ॥
वेदांती आणि चार्वाक ॥ मीमांसक आणि कौलिक ॥
काग आणि खगपालक॥ कैसे समान होती पां ॥ १३८ ॥
तैसा राधेय आणि धनंजय ॥ युद्धीं कैसा समान होय ॥
तुझा पराक्रम कथिला जाय ॥ कौरव भोवते मिळवूनि ॥ १३९ ॥
द्रौपदीस नेतां जयद्रथें ॥ पांच पाट काढिले पार्थें ॥
कौरव गंधर्वी नेतां ऊर्ध्वपंथें ॥ पार्थें पुरुषार्थ सोडविले ॥ १४० ॥
कौरव बांधितां आकर्षोन ॥ तूं पळालासी घेतलें रान ॥
आतां म्हणसी जिंकीन अर्जुन ॥ व्यर्थ वल्गना हे तुझी ॥ १४१ ॥
ऐसें माद्रीचा सहोदर॥ बोलतां संतप्त सूर्यकुमार ॥
परि न बोले निष्टुर उत्तर ॥ कार्यावर दृष्टि देऊनियां ॥ १४२ ॥
कर्ण म्हणे जो कोणी ॥ अर्जुन मज दाखवील रणीं ॥
त्यास शतग्राम देऊनि ये क्षणीं ॥ गौरवीन अधिक मानें ॥ १४३ ॥
हस्ती भरोन सुवर्ण ॥ पांचशतें तुरंग देईन ॥
कोणी मज दाखवा रे अर्जुन ॥ घेईन प्राण तयाचा ॥ १४४ ॥
शल्य म्हणे इतुकें देशी ॥ अपात्रीं कां दान करिसी ॥
तेंचि देई ब्राह्मणांसी ॥ पार्थ देखसी त्वरित तूं ॥ १४५ ॥
तूं बोलसी जी जी वचनें ॥ तीं जैसीं वंध्यावल्लीची सुमनें ॥
आत खोटें असोनि नाणें ॥ वरी सुवर्णे झांकिलें ॥ १४६ ॥
जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचे शीतलपण ॥
कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥ १४७ ॥
कीं पारध्याचें गायन ॥ कीं दांभिकाचें वरिवरि भजन ॥
कीं धनलुब्धकाचें तत्त्वज्ञान ॥ परधनाचे हरणार्थ ॥ १४८ ॥
वरिवरि सुंदर वृंदावन ॥ कीं बकाची शांति गहन ॥
कीं वेश्येचे मुखमंडन ॥ कामिकमनोहरणार्थ ॥ १४९ ॥
साधुवेष घेऊनि शुद्ध ॥ यात्रेस आले जैसे मैंद ॥
कीं वाटपाडे निर्जनीं सिद्ध॥ होऊनियां बैसले ॥ १५० ॥
कोल्हाटियाचें शूरत्व जाण ॥ अजाकंठीं जैसे स्तन ॥
कीं विगतधवेचें नवयौवन ॥ किंवा ज्ञान दांभिकाचें ॥ १५१ ॥
कीं जन्मांधाचे विशाल नेत्र ॥ कीं मद्यपियाचें अपवित्र पात्र ॥
अदात्याचें उंच मंदिर॥ व्यर्थ काय जाळावें ॥ १५२ ॥
कीं जाराचा व्यर्थ आचार॥ कीं मूर्खाचे पांडित्य थोर॥
तैसे तुझे बोल समग्र ॥ व्यर्थ वल्गना सर्वही ॥ १५३ ॥
जैसा बाळ मागे शशी ॥ परी तों कैसा येईल हातासी ॥
जेविं शशक भावी मानसीं ॥ क्षणें सिंहासी जिंकीन ॥ १५४ ॥
कर्ण म्हणे तूं आमुचा मित्र ॥ शब्दशस्त्रे कां छेदिसी गात्र ॥
माझा पराक्रम विचित्र ॥ रणीं आतां देखसी तूं ॥ १५५ ॥
मजपाशीं निर्वाणशर ॥ एक आहे जैसा सतेज मित्र ॥
किरीटी अथवा यादवेंद्र ॥ घेईल प्राण एकाचा ॥ १५६ ॥
कृष्णार्जुनांचां घेईन प्राण ॥ मग शल्या तुझाही वध करीन ॥
तूं पापदेशीं जाहलासी निर्माण ॥ तेथींचे गुण तुझे हे ॥ १५७ ॥
ज्या देशींच्या नितंबिनी ॥ महापापिष्ठा व्यभिचारिणी ॥
पाहात असतां भ्रतार नयनीं ॥ जारकर्म करिती ज्या ॥ १५८ ॥
मद्यपानी पिशिताशन ॥ शौचहीन क्रियाहीन ॥
जेथिंच्या स्त्रिया मत्त होऊन ॥ पुरूषालागीं झोंबती ॥ १५९ ॥
त्या देशीं तूं मित्रघ्न ॥ शल्या जाहलासी निर्माण ॥
जेथें वरारोहा भ्रतारालागून ॥ विष घालून मारिती ॥ १६० ॥
शल्य म्हणे कर्णास ॥ तूं कौरवबळें माजलास ॥
तुज एक गोष्ट सांगतो मानस ॥ स्वस्थ करोनि ऐक ते ॥ १६१ ॥
समुद्रतीरीं एक वैश्य थोर ॥ त्याचीं बाळे सुकुमार ॥
नित्य अन्ने भक्षितां परिकर ॥ उच्छिष्ट समग्र टाकिती ॥ १६२ ॥
तों एक काग येऊन तेथ ॥ उच्छिष्ट भक्षोन जाहला मस्त ॥
कुमार त्यास दाटोनि घालित ॥ कौतुकेंकरोनि सर्वदा ॥ १६३ ॥
मग तों मुलांस म्हणे वायस ॥ मी जाहलों आतां राजहंस ॥
क्षणें जिंकीन रमेश ॥ वाहनालागी निर्धारे ॥ १६४ ॥
तों तेथें आले मराळ ॥ तयांप्रति बोलती बाळ ॥
तुम्हीं उडाल काय सबळ ॥ आमुच्याकागाबरोबरी ॥ १६५ ॥
गदगदां हांसती राजहंस ॥ तों तेथें पातला वायस ॥
गर्वे न लेखी कोणास ॥ मग मराळ बोलती॥ १६६ ॥
आमुचे उड्डाण साचार॥ त्यांत आहेत शत प्रकार॥
ते तुज आम्ही न पुसों समग्र ॥ परि समुद्र उडों चला ॥ १६७ ॥
कागें धरिला अभिमान ॥ हंसांसंगें चालिला उडोन ॥
भयेंकरोनि तों दुर्जन ॥ कासावीस जाहला ॥ १६८ ॥
भ्रमोनि काग अंतराळीं ॥ पडला तेव्हां समुद्रजळीं ॥
मराळ म्हणती ते वेळीं ॥ पावलासी पतन कां ॥ १६९ ॥
काग न सोडी अभिमान ॥ म्हणे खोल पाहतों किती जीवन ॥
सवेंच मस्त्य शोधून ॥ पाहतों मी समुद्रजळीं ॥ १७० ॥
रत्‍नें किती आहेत यांत ॥ आतां घेतों तोही अंत ॥
पाणी गोड कीं क्षार अत्यंत ॥ चाखोनियां पाहतों ॥ १७१ ॥
सवेंच म्हणे करितों स्नान ॥ येतो गगनमंडल उडोन ॥
तों कासावीस जाहले पंचप्राण ॥ भोवंडी नयन मूर्च्छेनें ॥ १७२ ॥
मग म्हणे हंसांलागोन ॥ मज द्या आतां जीवदान ॥
मग हंसीं पृष्ठावरी घेऊन ॥ पूर्वस्थळीं ठेविला॥ १७३ ॥
तैसाच तू कर्णा साचार ॥ तरेन म्हणसी सेनासागर ॥
गोग्रहणी एकला पार्थ वीर ॥ न धरवेच धीर तुमचेनें ॥ १७४ ॥
कागें वांचविला आपुला प्राण ॥ तैसा तूं पार्थास जाई शरण ॥
व्यर्थ धरूनियां अभिमान ॥ यमसदना कां जाशी ॥ १७५ ॥
कर्ण म्हणे मी बलक्षीण ॥ कित्येक गोष्टींनीं जाहलों जाण ॥
वासवी गेली वेचून ॥ कवचकुंडलें शक्रें नेलीं ॥ १७६ ॥
इंद्रे केलें बलक्षीण ॥ चहूंकडून पडलें न्यून ॥
शेवटीं विद्या होईल क्षीण ॥ गुरुभार्गवें शापिलें ॥ १७७ ॥
मृगयेसी गेलों वनाप्रती ॥ तेथें एका ऋषीची गाय होती ॥
म्यां न कळत अवचितीं ॥ बाण टाकोन मारिली ॥ १७८ ॥
त्या ऋषीनें येऊनि त्वरें ॥ मज ताडिलें शापशस्त्रें ॥
म्यां त्याचे पाय धरोनि आदरें ॥ बहुत प्रकारें प्रार्थिला ॥ १७९ ॥
देत होतों सहस्रगोदानें ॥ शतहस्ती भरोन सोनें ॥
परी न घेतलें ब्राह्मणानें ॥ दिला दारुण शाप मज ॥ १८० ॥
कीं प्राणांतसमयी रणीं ॥ रथचक्रें गिळील धरणी॥
परमसंकटीं पडोनी ॥ टाकशील देहातें ॥ १८१ ॥
माझा शाप अन्यथा ॥ हरिहरांस नव्हे तत्त्वतां ॥
ते मजवरी पडली गोहत्या ॥ मग प्रायश्चित्त घेतलें ॥ १८२ ॥
इतुक्या प्रकारें जाहलों क्षीण ॥ तरी झुंजेन मी रणीं निर्वाण ॥
शल्या तूं मजलागोन ॥ भेडसावू नको सर्वथा ॥ १८३ ॥
म्यां तुझें सोशिलें बहुत ॥ आतां उगाच चालवीं रथ ॥
सर्वांस अजिंक्य सांगसी पार्थ ॥ परी कर्णापुढें न चाले तें ॥ १८४ ॥
सर्वांस जिंकी मीनकेतन ॥ परी शिवापुढे जाहला क्षीण ॥
काननें जाळी बहु कृशान ॥ परी बलक्षीण मेघापुढें ॥ १८५ ॥
सर्वांत श्रेष्ठ जरी वारण ॥ परी पंचाननापुढे सोडी प्राण ॥
समुद्र गर्वे करी गर्जन ॥ परी क्षीण अगस्त्यापुढें ॥ १८६ ॥
वज्र धाकुटें परि फोडी पर्वत ॥ सूर्य लहान परि पृथ्वी प्रकाशित ॥
बळीचें बलदर्पसामर्थ्य ॥ वामनें क्षणांत क्षीण केलें ॥ १८७ ॥
तैसें अर्जुनाचे सामर्थ्य ॥ मजपुढें न चाले यथार्थ ॥
शल्या प्रबुद्ध जाहलासी बहुत॥ परी शतमूर्ख अत्यंत तूं ॥ १८८ ॥
तूं व्यर्थ प्रबुद्ध होऊन ॥ बुद्धिहीन बालकासमान ॥
कोणास काय बोलावें वचन ॥ हें तुज न कळे शतमूर्खा ॥ १८९ ॥
ज्यास शब्दोपशब्दीं नाहीं ज्ञान ॥ तोचि बाळ परम अज्ञान ॥
मज वाटे तूं वांचून ॥ भूमिभार जाहलासी ॥ १९० ॥
तुझें म्यां सोशिलें बहुत ॥ आतां चालवीं उगाच रथ ॥
तों तिकडे सेनापति द्रुपदसुत ॥ तेणें व्यूह रचियेला ॥ १९१ ॥
कौरवीं व्यूह रचिला ते वेळीं ॥ वाद्यें वाजती उभयदळीं ॥
मग कर्णे हाक दिधली ॥ पाचारिलें कृष्णार्जुनां ॥ १९२ ॥
माध्यान्हीं मधुमासीं चंडकिरण ॥ तैसा रथीं देदीप्यमान कर्ण ॥
तें धर्मराज विलोकून ॥ इंदिरावराप्रति बोलत ॥ १९३ ॥
सत्यप्रतिज्ञा कृतदृढा ॥ वेदशास्त्रां परमगूढा ॥
द्वारकापुरसुहाडा ॥ विजय आपुला सांभाळीं ॥ १९४ ॥
आजि वीरश्रीचा कल्लोळ ॥ रण माजेल तुंबळ ॥
कर्णाचा उत्कर्ष प्रबळ ॥ ब्रह्मांडामाजी न समाये ॥ १९५ ॥
इकडे शल्य म्हणे रे कर्णा ॥ तूं पुसत होतास अर्जुना ॥
पाहें उघडोनि नयनां ॥ कृतांताऐसा येतसे ॥ १९६ ॥
जैसा प्रलयकालींचा ज्वालामाली ॥ तैसा रथीं जाज्वल्य वनमाळी ॥
जो इच्छामात्रे जाळी ॥ ब्रह्मांडरचना क्षणांत ॥ १९७ ॥
पाहें रे तों श्वेतवाहन ॥ घेऊं इच्छितो तुझा प्राण ॥
तुज जाहले अपशकुन ॥ जीवास नाशक होत जे ॥ १९८ ॥
जैसें कालकूट उसळले ॥ तैसें पांडवदळ उचंबळले ॥
हे सकलरायांचे ध्वज रेखिले ॥ तडित्प्राय पालविती ॥ १९९ ॥
ज्याचिया रथावरी हरिहर॥ गांडीव चाप अक्षय्य तूणीर ॥
कर्णा तुझेनें न धरवे धीर॥ हें मज पूर्ण समजले ॥ २०० ॥
ऐशी कर्णाची तेजोहानी ॥ शल्य करीत क्षणक्षणी ॥
पूर्वी धर्में प्रार्थिला म्हणोनी ॥ हिरमोड करीतसे ॥ २०१ ॥
पांडवकौरवसेना ॥ याच दोन्ही गंगायमुना ॥
प्रवाह गुप्त न दिसे कोणा ॥ सरस्वती तिजी तेचि पैं ॥ २०२ ॥
हा वीरांतकप्रयाग निश्चितीं ॥ एथें रणशूर ज्ञानी मुक्त होती ॥
पुढें प्रयागमाधव रथीं ॥ धनंजयाचे वाहातसे ॥ २०३ ॥
अद्‌भुत माजेल वीररस ॥ युद्ध होईल कर्णार्जुनांस ॥
जें ऐकता महत्पापास ॥ संहार होय तत्काळ ॥ २०४ ॥
धन्य धन्य पांडववीर ॥ ज्यांचा सारथि इंदिरावर ॥
तों हा कटी ठेवून कर ॥ पंढरीसी उभा असे ॥ २०५ ॥
पांडवपालका पंढरीशा ॥ श्रीमद्भीमातीरविलासा ॥
ब्रह्मानंदा अविनाशा ॥ श्रीधरवरदा अभंगा ॥ २०६ ॥
प्राकृतभाषा हे साचार ॥ परी अर्थसंग्रहभांडार ॥
ब्रह्मानंदें श्रीधर ॥ निरभिमानें पाहत ॥ २०७ ॥
दुजियाची कविता देखतां ॥ द्वेष उपजे ज्याचिया चित्ता ॥
तों शतमूर्ख जाणिजे तत्त्वतां ॥ नव्हे पंडित विवेकी तों ॥ २०८ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्णपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्तेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २०९ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे कर्णपर्वणि सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४७ ॥
अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त


GO TOP