श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय अठ्ठेचाळीसावा
भीमाने दुःशासनाला ठार मारले
श्रीगणेशाय नम: ॥
कर्णपर्व ऐकतां कर्णी ॥ कर्ण तृप्त होती तेच क्षणीं ॥
ज्याची कीर्ति वर्णिती व्याकरणी ॥ व्यास वैशंपायनादिक ॥ १ ॥
सावधान उर्वीपती ॥ तुझिया पूर्वजांची अगाध कीर्ती ॥
कर्ण आणि सुभद्रापती ॥ रणांगणीं उभे तेव्हां ॥ २ ॥
तों समसप्तकीं मिळोन ॥ पाचारिला वीर अर्जुन ॥
कृष्णवर्त्मा जाळी कानन ॥ संहारीत उठे तैसा ॥ ३ ॥
जैसा सघन वर्षे घन ॥ तैसे पार्थ सोडी मार्गण ॥
अपार शिरें छेदून ॥ राशी पाडिल्या समरांगणीं ॥ ४ ॥
समसप्तक टाकिती शर ॥ अपारछेदी पार्थ वीर ॥
इकडे धर्मावरी सूर्यपुत्र ॥ बाण वर्षत धांवला ॥ ५ ॥
अचूक धर्माचें संधान ॥ विजेऐसे सोडी बाण ॥
परी सकल वीरांचीं कवचें पूर्ण ॥ छेदी कर्ण समरांगणीं ॥ ६ ॥
रणतूर्ये वाजती अपार ॥ प्रलयहांक देती असुर ॥
जैसा मध्याह्नींचा भास्कर ॥ कर्ण वीर दिसे तैसा ॥ ७ ॥
न्याहाळिता कर्णाचे वदन ॥ पाहूं न शकती भयेकरून ॥
धृष्टद्युम्नाचें सैन्य ॥ अपार कर्णे पाडिलें ॥ ८ ॥
देशोदेशींचे राजे जाणा ॥ शरीं खिळिल्या त्यांच्या पृतना ॥
तों सुषेण वृषसेन त्या क्षणां ॥ पुत्र कर्णाचे धांवले ॥ ९ ॥
पितया देखतां दोघां जणी ॥ ख्याति केली रणांगणीं ॥
संहारिती बहुत वाहिनी ॥ तटस्थ नयनीं वीर पाहती ॥ १० ॥
तों कर्णाचा तृतीय पुत्र ॥ ज्याचें नाम भानुदेव पवित्र ॥
तेणें सप्त बाणीं वृकोदर ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥ ११ ॥
भीमे टाकूनि निर्वाणशर ॥ उडविलें भानुदेवाचें शिर ॥
मग वृकोदरें अपार ॥ कौरवसेना पाडिली ॥ १२ ॥
कृतवर्मा आणि शारद्वत ॥ दोघे धांवले रणपंडित ॥
नकुलसहदेवांवरी बाण वर्षत ॥ सुषेण रागें ऊठला ॥ १३ ॥
बाण सोडून बहुत ॥ तेणें खिळिले माद्रीसुत ॥
तों सात्यकीनें छेदून रथ ॥ केला विरथ सुषेण तों ॥ १४ ॥
शरीं मूर्च्छित पाडिला धरणीं ॥ मग दुःशासनें नेला रथीं घालूनी ॥
इकडे द्रौपदीच्या पंचनंदनीं ॥ ख्याति केली कर्णापुढें ॥ १५ ॥
टाकून बाण पांचशत ॥ समरीं भेदिला सूर्यसुत ॥
शत बाणीं धर्म नृपनाथ ॥ भेदिता जाहला कर्णातें ॥ १६ ॥
त्र्यहात्तर बाण टाकून ॥ भेदिता जाहला धृष्टद्युम्न ॥
ऐशीं बाणीं दारुण ॥ सात्यकी वीर भेदिला ॥ १७ ॥
शत शत बाणीं तितुके वीर ॥ कर्णे केले समरीं जर्जर ॥
हस्तलाघव केलें थोर ॥ सूर्यपुत्रें तेधवां ॥ १८ ॥
कर्णाचा थोर प्रताप ॥ घातला बाणांचा मंडप ॥
तीनशें रथी करूनि प्रताप ॥ तरणिसुतें संहारिले ॥ १९ ॥
धर्मराज जर्जर ते क्षणीं ॥ कर्णें केला समरांगणीं ॥
तेव्हां सर्व वीर मिळोनी ॥ रक्षिते जाहले धर्मास ॥ २० ॥
कर्णाचें हस्तलावव थोर ॥ कोणासहालवूं नेदी कर ॥
शस्त्रांसहित सत्वर ॥ भुजा उडवी तेधवां ॥ २१ ॥
दहा बाण टाकून ॥ धर्में भेदिला हृदयीं कर्ण ॥
मग बोले तयासी वचन ॥ ऐक दुर्जना राधेया ॥ २२ ॥
पार्थाशी झुंजेन समरीं ॥ ऐसी हांव धरितोसी अंतरीं ॥
कनक कांसें समसरी ॥ कैसें पावेल सांग पां ॥ २३ ॥
रात्रि आणि दिवस ॥ वैनतेय आणि वायस ॥
शृगाल आणि सिंहास ॥ सरी कैसी होईल पैं ॥ २४ ॥
सुधनिक आणि दरिद्र ॥ रावण आणि रामचंद्र ॥
तैसा कर्ण आणि सुभद्रावर ॥ समान कैसे होतील पैं ॥ २५ ॥
आनकदुंदुभिहृदयरत्न ॥ पद्मजजनक पद्माक्षीजीवन ॥
तों सारथी ज्याचा जगन्मोहन ॥ त्याशीं स्पर्धा करिसी तूं ॥ २६ ॥
ऐशा रीतीं धर्म बोलोन ॥ काळदंडाऐसे सोडी बाण ॥
जर्जर केला मित्रनंदन ॥ चाप बाण गळाले ॥ २७ ॥
विकल पडिला वीर कर्ण ॥ धर्म उगाच न सोडी बाण ॥
कौरवदळ संपूर्ण ॥ हडबडिलें ते काळीं ॥ २८ ॥
पांडवदळीं आनंद परम ॥ वर्णिती धर्माचा पराक्रम ॥
तंव तों कर्ण वीरोत्तम ॥ सावध जाहला तेधवां ॥ २९ ॥
प्रलयीं खवळे कृतांत ॥ तैसा राधेय बाण वर्षत ॥
एकषष्टि बाणीं कुंतीसुत ॥ समरीं ताडिला पराक्रमें ॥ ३० ॥
सवेंच सोडून तीक्ष्ण बाण ॥ छेदिलें धर्माचें सायकासन ॥
युधिष्ठिरें शक्ति तीक्ष्ण ॥ सोडिली तेव्हां कर्णावरी ॥ ३१ ॥
गभस्तिसुतें सप्त बाणीं ॥ शक्ति छेदून पाडिली धरणीं ॥
चार तोमर ते क्षणीं ॥ धर्मे टाकिले कर्णावरी ॥ ३२ ॥
हृदयीं एकदुजा शिरीं ॥ दोन बैसले दोहों भुजांवरी ॥
सवेंच तों वीर भास्करी ॥ उसणें घेता जाहला ॥ ३३ ॥
दिव्य शर सोडून ते काळीं ॥ धर्माचा मुकुट पाडिला तळीं ॥
तेव्हां एकचि हांक गाजली ॥ धर्म मारिला म्हणूनियां ॥ ३४ ॥
छेदिला ध्वज मारिला सुत ॥ तिलप्राय केला धर्मरथ ॥
धर्म आणिके रथीं बैसत ॥ परतोन जात तेधवां ॥ ३५ ॥
धर्में पाठीं दिली जाणोन ॥ वायुवेगें धांवला कर्ण ॥
धर्मासी आडवा येऊन ॥ रथाशीं रथ झगटविला ॥ ३६ ॥
आपलिया रथावरून ॥ धर्मरथीं चढला कर्ण ॥
दोन्हीं भुजा आकर्षून ॥ धर्माच्या तेव्हां धरियेल्या ॥ ३७ ॥
तों धांवला शल्य वीर ॥ म्हणे कर्णा ऐक विचार ॥
छत्रपति जो नृपवर ॥ त्यास सर्वथा धरू नये ॥ ३८ ॥
तों आठवलें कुंतीचें वचन ॥ एक वेगळा करून अर्जुन ॥
चौघांचे रक्षावे प्राण ॥ समरांगणीं सांपडल्या ॥ ३९ ॥
कर्ण म्हणे धर्मालागून ॥ तुवां करावे महायज्ञ ॥
किंवा करावें वेदाध्ययन ॥ अनुष्ठान अति नेमे ॥ ४० ॥
आपला प्रताप पुरुषार्थ ॥ कोणाशीं करूं नको व्यर्थ ॥
तुज मीं सोडिलें आजि जीवंत ॥ जाई शिबिरा त्वरेनें ॥ ४१ ॥
त्रुटि न वाजे इतक्यांत ॥ कर्ण प्रवेशला निजदळांत ॥
धर्मराज परम लज्जित ॥ आज्ञापित निजवीरां ॥ ४२ ॥
म्हणे सर्वही वीर मिळोन ॥ रणीं आजि मारा कर्ण ॥
तों द्रौपदीचे पंचनंदन ॥ वर्षत बाण ऊठले ॥ ४३ ॥
दळासहित द्रौपदीचा बंधूं ॥ धांवला वेगें प्रतापसिंधू ॥
कर्णाचा इच्छून वधू ॥ विराटदळें धांवती ॥ ४४ ॥
दोन्हीं दळे मिसळली रणीं ॥ वीरां होत झोडधरणी ॥
कंदुकाऐशीं गगनीं ॥ शिरें तेधवां उसळती ॥ ४५ ॥
आकांत मांडला दोन्हीं दळी ॥ कोल्हाळ न समाये गगनमंडळीं ॥
उर्वीतळ डळमळी ॥ ग्रीवा डोलवी भोगींद्र ॥ ४६ ॥
प्रतिशब्द उठे निराळी ॥ ऐशी भीमे हांक गाजविली ॥
विद्युल्लतेऐसा ते वेळीं ॥ कौरवदळीं प्रवेशला ॥ ४७ ॥
कुंजर ताडी कुंजरें ॥ रहंवर ताडी गदाप्रहारें॥
तुरंग पळतां धांवोन स्वरें ॥ चरणीं धरून आपटित ॥ ४८ ॥
तों शल्यास म्हणे कर्ण ॥ भीमाकडे चालवीं स्यंदन ॥
इकडे स्ववीरांस भीमसेन ॥ म्हणे रक्षा धर्म आतां ॥ ४९ ॥
धर्मराजाऐसें निधान ॥ नेत होता धरून कर्ण ॥
आतां तरी जपून ॥ धर्मराज रक्षावा ॥ ५० ॥
शल्य म्हणे कर्णालागून ॥ आजि काळरूप दिसे भीमसेन ॥
किंवा पेटला प्रलयकृशान ॥ वीरकानन जाळील तों ॥ ५१ ॥
अनिवार भीमाचा मार ॥ येणें कीचक मारिले समग्र ॥
तैसे हिडिंब बक किर्मीर ॥ आपटूनियां मारिले ॥ ५२ ॥
कर्णे सोडून शत बाण ॥ वक्ष:स्थलीं ताडिला भीमसेन ॥
येरें शतबाणी नंदन ॥ तरणीचा तेव्हां ताडिला॥ ५३ ॥
सवेंच सोडून एक बाण ॥ तोडिलें हातींचें सायकासन ॥
मूर्च्छना येऊन कर्ण ॥ ध्वजस्तंभीं टेकला ॥ ५४ ॥
पांडवदळी जयजयकार ॥ कौरवदळ उठावलें समग्र ॥
त्यांत युयुत्सु धार्तराष्ट्र ॥ भीमे रणीं संहारिला ॥ ५५ ॥
सवेच पराक्रमें वृकोदरें ॥ छेदिलीं पांच कौरवांचीं शिरें ॥
हें देखोनियां अर्कपुत्रें ॥ केलें धांवणें तेधवां ॥ ५६ ॥
कर्णानें एकशत बाणीं ॥ भीम भेदिला समरांगणीं ॥
शतचूर्ण स्यंदन करूनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥ ५७ ॥
गदाघायें वृकोदर ॥ कर्णाचा रथ करी चुर ॥
सातशतें कुंजर ॥ संहारिले कौरवांचे ॥ ५८ ॥
पांचशतें महारथीं ॥ भीमे मारिले रणपंथीं ॥
समरीं वीर न ठरती ॥ भार पळती कौरवांचे ॥ ५९ ॥
दहासहस्र महावीर॥ अश्वांसहित केला संहार॥
पायदळ शतसहस्र ॥ संहारिलें तेधवां ॥ ६० ॥
सहासहस्र सेना तत्त्वतां ॥ शकुनीची पाठविली मृत्युपंथा ॥
यमदंष्ट्रवर्धिनी पाहतां ॥ रक्तनिम्न्गा चालिली ॥ ६१ ॥
समसप्तकांशीं फाल्गुन ॥ तिकडे युद्ध करी निर्वाण ॥
तंव ते दांडगे अवघे जण ॥ रथ वेढिती पार्थाचा ॥ ६२ ॥
नानाशस्त्रांचे मार ॥ करिती तेव्हां अनिवार॥
मग हनुमंतें पुच्छ थोर॥ पसरोनियां बांधिले ॥ ६३ ॥
समसप्तकांचे भार ते क्षणीं ॥ बांधोनि कपि फिरवी गगनीं ॥
मग आपटिले धरणीं ॥ मृद्घटवत चूर्ण होती ॥ ६४ ॥
एकाचे मोडिले चरण ॥ एकाचे तोडिले नासिककर्ण ॥
एकाच्या ग्रीवा पिळून ॥ गगनपंथें भिरकावी ॥ ६५ ॥
अनिवार देखोन पुच्छमार ॥ दशदिशां पळती ते वीर॥
तों पुढें पुच्छ शेषाकार ॥ आडवे येत तिकडूनी ॥ ६६ ॥
एक उडती गगनीं ॥ तों पुच्छ येई वळते वरूनी ॥
लपतां गिरिकंदरीं जाऊनी ॥ पुच्छ येऊनि मारित ॥ ६७ ॥
तों पार्थें घातलें सर्पास्त्र ॥ नागपाशें बांधिले समग्र ॥
रथ टाकूनिया पळतीवीर ॥ हाहाकार जाहला ॥ ६८ ॥
तो तिकडून सुशर्मा महावीर॥ तेणे सोडीले सुपर्णास्त्र ॥
सर्प पळाले समग्र ॥ देखोन नरवीर कोपला ॥ ६९ ॥
जैसा प्रदीप्त ज्वालामाली ॥ तैसा किरीटी दिसे ते काळीं ॥
दहा सहस्र वीर बळी ॥ शिरें छेदून पाडिले ॥ ७० ॥
चवदा सहस्र रथी ॥ रणीं पाडी सुभद्रापती ॥
तीन सहस्र हस्ती ॥ विदारून पाडिले ॥ ७१ ॥
इकडे द्रुपदपुत्र सुकेत ॥ कृपाचार्याशीं युद्ध करित ॥
तंव तों महावीर शारद्वत ॥ असंख्यात शर सोडी ॥ ७२ ॥
अर्धचंद्रमुख सोडून शर ॥ छेदिलें सुकेताचें शिर ॥
परमप्रतापी गौतमपुत्र ॥ रणपंडित निपुण तों ॥ ७३ ॥
इकडे दुर्योधन धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती निकरेंकरून ॥
परस्परें भेदून बाण ॥ मयूराऐसे दिसती पैं ॥ ७४ ॥
दुर्योधनाचा स्यंदन ॥ धृष्टद्युम्ने केला चूर्ण ॥
चरणींच पळे दुर्योधन ॥ पांडवदळ हांसतसे ॥ ७५ ॥
तों दुर्योधनबंधु दंडधार ॥ तेणें आपुलिया रथीं सत्वर ॥
बैसबून दुर्योधन उपवर ॥ नेला अन्यत्र तेधवां ॥ ७६ ॥
उणें देखोनि सूर्यसुत ॥ कोपला जैसा प्रलयकृतांत ॥
बाणधारीं अमित ॥ पांडवसेना संहारिली ॥ ७७ ॥
विद्युल्लता पडे धरणीवरी ॥ तैसे बाण खोचती शरीरीं ॥
पांडवदळ ते अवसरीं ॥ पळों लागलें दश दिशां ॥ ७८ ॥
धर्म आला कर्णासमोर ॥ सोडीत सहस्रांचे सहस्र शर ॥
परी तोही कर्णें जर्जर ॥ करूनियां पराभविला ॥ ७९ ॥
सेना सोडून ते क्षणीं ॥ कोस एक टाकून मेदिनी ॥
कर्णभये जाऊनी ॥ धर्मराज स्थिरावला ॥ ८० ॥
कर्ण नव्हे हा प्रलयाग्न ॥ जाळिलें पांडवदळकानन ॥
तें दुर्योधनें देखोन ॥ गौरवीत कर्णातें ॥ ८१ ॥
म्हणे कर्णा वीरा ये समयीं ॥ तुझा मी उतराई होऊं कायी ॥
पांडव मारिल्या सर्वही ॥ हें राज्य तुझेंचि असे ॥ ८२ ॥
दुर्योधनाशी शपत ॥ बोलता जाहला आचार्यसुत ॥
धृष्टद्युम्नें माझा तात ॥ असतां ध्यानस्थ मारिला ॥ ८३ ॥
हेंचि आतां प्रतिज्ञावचन ॥ धृष्टद्युम्नास मारिल्याविण ॥
अंगींचें कवच जाण ॥ न काढीं हें यावरी ॥ ८४ ॥
हें जरी न करवे माझेन ॥ तरी ब्रह्महत्या गोहनन ॥
मातापितागुरुवध जाण ॥ हें पाप माझे मस्तकीं ॥ ८५ ॥
पार्थ म्हणे श्रीकरधरा ॥ सतेजरविकरवरांबरा ॥
तिकडे कर्णे जगदुद्धारा ॥ प्रलय केला वाटतें ॥ ८६ ॥
अहो ते गरुडजावळीचे तुरंग ॥ श्रीरंगें धांवडिले सवेग ॥
अंजनीहृदयारविंदभृंग ॥ गगन गाजवी बुभुःकारें ॥ ८७ ॥
दिव्य रथ कनकमंडित ॥ ध्वज झळके गगनचुंबित ॥
मनोवेगे आला पार्थ ॥ तों धर्म तेथें दिसेना ॥ ८८ ॥
समस्तांचे ध्वज रथ सतेज ॥ परी कोठे न दिसे धर्मराज ॥
बंधूकारणें तों तेजःपुंज ॥ परम घाबरा जाहला ॥ ८९ ॥
मग शिबिराप्रति धांवोन ॥ येते जाहले कृष्णार्जुन ॥
तों तेथें धर्मराज देखोन ॥ परम संतोष पावले ॥ ९० ॥
कर्णे त्रासिला युधिष्ठिर॥ तेणें त्याचें संतप्त शरीर ॥
उभयकृष्ण देखोन उत्तर॥ बोलता जाहला तेधवां ॥ ९१ ॥
म्हणे हे पार्था सुगुणा ॥ मम हृदयानंदवर्धना ॥
मारूनियां दुष्टकर्णा ॥ आलासी काय सांग तूं ॥ ९२ ॥
हे श्रीरंगा यादवेंद्रा ॥ मम हृदयारविंदभ्रमरा ॥
रुक्मिणीचित्तपंकजरविकरा ॥ कर्ण मारिला कीं नाहीं ॥ ९३ ॥
मज तेणें जर्जर केलें रणीं ॥ मुकुट फोडून पाडिला धरणीं ॥
तों तुम्हीं कर्ण मारिला रणीं ॥ तेणेंकरून मी संतोषें ॥ ९४ ॥
कर्ण नव्हे तों केवळ कृतांत ॥ पराक्रमें जेविं पुरुहूत ॥
तेजें प्रत्यक्ष आदित्य ॥ कीं वैवस्वत दूसरा ॥ ९५ ॥
भार्गव किंवा भूमिजारमण ॥ तैसा रणपंडित परमप्रवीण ॥
जो आम्हांस मानी तृणासमान ॥ मारिला कैसा सांग तों ॥ ९६ ॥
तुम्ही षंढतीळ म्हणोन ॥ बोलिला जो आम्हां वचन ॥
तों तुम्हीं आजि वधिला कर्ण ॥ थोर केला पुरुषार्थ ॥ ९७ ॥
मग अर्जुन बोले वचन ॥ समसप्तकांस संहारून ॥
सैन्यांत आलों धांवोन ॥ तों स्यंदन तुझा दिसेना ॥ ९८ ॥
पहावया तव मुखचंद्र ॥ माझे नेत्र जाहले चकोर ॥
कर्णे आजि प्रलय थोर ॥ रणांगणीं केला असे ॥ ९९ ॥
सातशत रथी भले ॥ कर्णे आमुचे रणीं मारिले ॥
आतां आज्ञा देई ये वेळे ॥ जाऊन मारीन कर्णातें ॥ १०० ॥
धर्म बोले दुःखेंकरून ॥ अजून वांचला आहे कर्ण ॥
माझें हृदय जळतसे पूर्ण ॥ वर्षें घन पार्था तूं ॥ १०१ ॥
मज लागली चिंताव्याधी ॥ तूं देई सत्वर औषधी ॥
अरे हा कर्ण परम दुर्बुद्धी ॥ द्रौपदीस येणें गांजिलें ॥ १०२ ॥
द्रौपदीऐसें थोर निधान ॥ गांजिलें येणें सभेत नेऊन ॥
तुझें प्रतिज्ञावचन ॥ गेलें जळोन मज वाटे ॥ १०३ ॥
वृथा शिणविली माता पृथा ॥ तुझी विद्या गेली सर्वथा ॥
तुझें सामर्थ्य पार्था ॥ कोणें नेले हिरूनी ॥ १०४ ॥
आम्हांस कैंचे राजविलास ॥ आमचे कपाळीं वनवास ॥
गांडीव देई श्रीकृष्णास ॥ तूं सारथी होई आतां ॥ १०५ ॥
धिक् तूणीर धिक् गांडीव शर ॥ धिक् ध्वज धिक् रहंवर ॥
गांडीवनिंदा ऐकतां सुभद्रावर ॥ प्रलयाग्नीऐसा क्षोभला ॥ १०६ ॥
शस्त्र घेऊनि झडकरी ॥ धर्मावरी धावला ते अवसरीं ॥
श्रीरंग धावूनिया आवरी ॥ हृदयीं धरी पार्थातें ॥ १०७ ॥
जो पंडुनृपसमान धर्मराज ॥ जो सोमवंशविजयध्वज ॥
तों तपस्व्यांमाजी तेजःपुंज ॥ सागर पूर्ण सत्याचा ॥ १०८ ॥
जो दयाकाशींचा रोहिणीपती ॥ जो सत्यवचनी केवळ गभस्ती ॥
जो क्षमेचा निश्चिती ॥ कनकाचलचि केवळ ॥ १०९ ॥
अजातशत्रु समानस्थिती ॥ त्याचा वध इच्छिसी चित्तीं ॥
ब्रह्मांडभरी अपकीर्ती ॥ तुझी होईल जाण पां ॥ ११० ॥
मरीचिजलवत् संसार ॥ यांत जे सद्विवेकी नर ॥
सत्कीर्ति ठेवूनि अपार ॥ पावती परत्र सुकृती ते ॥ १११ ॥
पार्थ म्हणे गांडीव दे सत्वर ॥ ऐसें केवि बोलिला युधिष्ठिर ॥
हा शब्द ऐकतांचि शिर ॥ तयाचें म्यां छेदावें ॥ ११२ ॥
माझा नेम तरी ऐसा ॥ आतां बुद्धि सांग तूं कमलेशा ॥
ब्रह्मानंदा हृषीकेशा ॥ तुझी आता प्रमाण ॥ ११३ ॥
यावरी बोले जगन्मोहन ॥ वडिलांस शब्द बोलतां कठिण ॥
तरी वधाहून श्रेष्ठ पूर्ण ॥ विद्वजन बोलती ॥ ११४ ॥
ऐसें बोलतो श्रीरंग ॥ पार्थास प्राप्त जाहला अनुराग ॥
मग श्रीकृष्णें तों कृष्ण सवेग ॥ धर्मरायास भेटविला ॥ ११५ ॥
अजातशत्रूचे चरण ॥ साष्टांगें नमित अर्जुन ॥
आपला अपराध आठवून ॥ उकसाबुकसीं स्फुंदतसे ॥ ११६ ॥
पार्थ तेव्हां बोले सद्गद ॥ जळो जळो हा पापी क्रोध ॥
क्रोध नव्हे हा प्रमाद ॥ केला होता आजि म्यां ॥ ११७ ॥
क्रोधें उत्यन्न होय आधी ॥ कोठेच प्रकटती महाव्याधी ॥
परम सज्ञान जो सुबुद्धी ॥ क्रोधें होय तृणवत् ॥ ११८ ॥
परम सद्विवेकी पंडित ॥ क्रोधें होय पिशाचवत् ॥
भूतसंचार निश्चित ॥ क्रोधचि ऐसे जाणावें ॥ ११९ ॥
असो युधिष्ठिरें उचलून ॥ हृदयीं आलिंगिला अर्जुन ॥
म्हणे विजया विजयी होई पूर्ण ॥ कर्णाप्रति वधूनियां ॥ १२० ॥
धर्म म्हणे जी वनमाळी ॥ तूं आमची कामधेनु माउली ॥
आपलें वत्स सांभाळी ॥ वेळोवेळी काय सांगों ॥ १२१ ॥
मग बोले वैकुंठनाथ ॥ आजि कर्णास वधील पार्थ ॥
संदेह न धरावा मनांत ॥ पाहें तेथें येऊनियां ॥ १२२ ॥
पार्थ म्हणे ते अवसरीं ॥ जरी आजि कर्णास न वधीन समरीं ॥
तरी मातेचे उदरीं ॥ व्यर्थ जन्मा मी आलों ॥ १२३ ॥
हें जरी नव्हे यथार्थ ॥ तरी कृष्णदास्य गेलें व्यर्थ ॥
सोमवंशालागीं सत्य ॥ डागचि मग लागला ॥ १२४ ॥
जरी आजि न वधीन कर्ण ॥ तरी मातापितागुरुहनन ॥
माझिया माथां तें पाप पूर्ण ॥ मग वदन काय दावूं ॥ १२५ ॥
माझी प्रतिज्ञा समस्त ॥ सिद्धीस नेईल द्वारकानाथ ॥
जयद्रथवधीं पण यथार्थ ॥ कोणे केला तयाविण॥ १२६ ॥
असो आज्ञा घेऊन कृष्णार्जुन ॥ मनोवेगें सोडिला स्यंदन ॥
दोन्हीं दळांमध्यें येऊन ॥ उभे ठाकले चपलत्वें ॥ १२७ ॥
जैसा माध्यान्हीं आदित्य ॥ तैसा दिसे सकलां विजयरथ॥
वाद्यघाई लागली बहुत ॥ धाकें कांपत भूगोल ॥ १२८ ॥
वाटे मेदिनी गेली रसातळा ॥ आकाशमंडप तुटोनि पडिला ॥
शेष कूर्म ते वेळां ॥ भूभार सोडूं इच्छिती ॥ १२९ ॥
तेथींचिया वाद्यगजरें ॥ पावकाअंगीं भरलें शाहारें ॥
सप्तसमुद्रींचीं नीरें॥ तप्त जाहलीं तेधवां ॥ १३० ॥
इकडे भीम कौरवभारी ॥ संचरोन सेना संहारी ॥
इभ पळतां पायीं धरी ॥ धरेवरी आपटित ॥ १३१ ॥
रथावरी रथ आपटित ॥ द्वीपावरी द्वीप आदळित ॥
तुरंगही स्वारांसहित ॥ असंख्यात मारिले ॥ १३२ ॥
मग सर्व कौरवीं मिळोन ॥ वेढिला तेव्हां भीमसेन ॥
कीं बहुत जंबुकीं जाण॥ व्याघ्र जैसा वेढिला ॥ १३३ ॥
मग गदाघायें भीमसेन॥ सकल सैन्य करी चूर्ण ॥
करेंचि कुणपें उचलोन ॥ वाहिनी पाडिली अपार॥ १३४ ॥
लोहार्गला लंबायमान ॥ तैसे हस्तिदंत घेतले उपडोन ॥
वीर पाडिले झोडून ॥ अशुद्धेंकरून डवरला ॥ १३५ ॥
जैसा सिंदूरें घवघवीत पार्वतीकुमार ॥ तैसा आरक्त दिसे वृकोदर ॥
कीं तों रणभैरव दुर्धर॥ चवताळत चहूंकडे ॥ १३६ ॥
शकुनीचें सर्व दळ ॥ दंतघायें झोडिले सबळ ॥
कीं वीर साळी गदा मुसळ ॥ घेऊनियां कांडीतसे ॥ १३७ ॥
स्थूलदेह हा कोंडा केवळ ॥ लिंगशरीर सडिले तांदुळ ॥
उद्धरोन जाती तत्काळ ॥ भीमहस्तेंकरूनियां ॥ १३८ ॥
कीं रणमंडल हें होमकुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वलित प्रचंड ॥
कौरव बस्त उदंड ॥ आहुतिमाजी पडताती ॥ १३९ ॥
द्वारावतीची कृष्णभवानी ॥ पांडवांची हे कुलस्वामिणी ॥
ते अर्जुनाचे रथी येऊनी ॥ कालरूपिणी बैसली ॥ १४० ॥
असो भीमे समरांगणीं ॥ मूर्च्छित पाडिला कपटी शकुनी ॥
तों दुर्योधनें उचलोनी ॥ नेला घालूनि रथावरी ॥ १४१ ॥
कौरवदळ आटिलें भीमसेनें ॥ पांडवदळी प्रलय केला कर्णॆं ॥
मग पार्थ श्रीरंगास म्हणे ॥ रथ सत्वर धांवडीं ॥ १४२ ॥
पार्थचापाचा सुटला बाण ॥ त्याहून पुढें धांवे स्यंदन ॥
शल्य म्हणे कर्णा अर्जुन ॥ तुज लक्षून येत त्वरें ॥ १४३ ॥
आतां आपली विद्या सर्वही ॥ आठवीं तूं ये समयीं ॥
दुर्योधनादि कौरवही ॥ पाठी रक्षिती कर्णाची॥ १४४ ॥
तों पार्थवीरें ते क्षणीं ॥ गांडीव टणत्कारिलें रणीं ॥
तेव्हां अवघ्या लघुकिंकिणी ॥ झणत्कारिल्या एकदांचि ॥ १४५ ॥
गांडीव ओढितां सत्वरा ॥ एकसरें वाजलें करकरां ॥
तेव्हां नक्षत्रे रिचवलीं एकसरां ॥ सीमा समुद्रें ओलांडिली ॥ १४६ ॥
प्रलयचपलेऐसा रथ ॥ दिव्य कळस वरी झळकत ॥
मुक्तजाळिया मिरवत ॥ लावण्य अद्भुत न वर्णवे ॥ १४७ ॥
तों मागें टाकून मारुतगती ॥ पुढें धांवले नव्वद रथी ॥
अष्टदिशांनीं पार्थाप्रती ॥ विंधिते जाहले तेधवां ॥ १४८ ॥
पूर्ण चारघटिकापर्यंत ॥ युद्ध जाहले अत्यद्भुत ॥
पार्थ प्रतापी रणपंडित ॥ केला निःपात तितुक्यांचा॥ १४९ ॥
तों हस्तीवरी बैसवून ॥ दुर्योधनें म्लेंच्छ तेरा जण ॥
पार्थाचे पाठीमागून ॥ पाठविले मारावया ॥ १५० ॥
पुढेही वीर मारिती बाण ॥ मागूनि मारिती त्रयोदश यवन ॥
विजय धनुर्विद्येंत निपुण ॥ लाघव दाखवी ऐका तें ॥ १५१ ॥
पुढें पाहोन करी संधान ॥ मागें न पाहतां सोडी बाण ॥
गजांसहित तेरा जण ॥ यवन वधून टाकिले ॥ १५२ ॥
न पाहतां मारिले सर्व ॥ पाहून धनुर्विद्येचें लाघव ॥
तर्जनी शिर वासव ॥ डोलवून धन्य म्हणे ॥ १५३ ॥
कर्णाचे पाठीशीं लवलाहें ॥ कौरव दडती पार्थभयें ॥
दुःशासन ते वेळीं पाहें ॥ भीमावरी धांविन्नला ॥ १५४ ॥
पांचशत सोडून शर ॥ विकळ पाडिला वृकोदर ॥
सारथि आणि रहंवर ॥ चूर्ण केला दुःशासनें ॥ १५५ ॥
हृदय भीमाचें लक्षून ॥ आणीक सोडिले नऊ बाण ॥
मग वृकोदर सावधान ॥ होऊन शक्ति भिरकावी ॥ १५६ ॥
ते महाशक्ति दुःशासन ॥ क्षण न लागतां टाकी तोडून ॥
यावरी धर्मानुज गहन ॥ कर्म करिता जाहला ॥ १५७ ॥
खदिरांगार धगधगित ॥ तैसे केले नयन आरक्त ॥
करकरां खाऊनियां दांत ॥ काय बोलत तेधवां ॥ १५८ ॥
आजि सर्व वीरांदेखतां जाण ॥ तुझें वक्ष:स्थल फोडून ॥
करीन मी रक्तपान ॥ तरीच नंदन पंडूचा ॥ १५९ ॥
मग महाशक्ति ते वेळीं ॥ दुःशासनें वेगें प्रेरिली ॥
भीमे धरून अंतराळीं ॥ पिष्ट केली मोडूनियां ॥ १६० ॥
दहा लोहतोमर जाण ॥ सवेंच प्रेरी दुःशासन ॥
ते भीमाचे हृदयीं येऊन ॥ आदळती वज्रप्राय ॥ १६१ ॥
प्रलयीं क्षोभे कृतांत ॥ तैसा भीमसेन धांवत ॥
कीं वीज पडे अकस्मात ॥ दुःशासनावरी तेविं आला ॥ १६२ ॥
घोडे सारथी स्यंदन ॥ गदाघायें केले चूर्ण ॥
चरणचाली दुःशासन ॥ भिडत तेव्हां भीमाशी ॥ १६३ ॥
अलातचक्रवत भ्रमोनी ॥ दुःशासनाचे मस्तकीं ते क्षणीं ॥
गदा घातली उचलोनी ॥ वज्र जैसें पर्वंतीं ॥ १६४ ॥
कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैसी भीमे दिधली हांक ॥
दोन्हीं दळे मूर्च्छित देख ॥ हांकेसरशी जाहलीं ॥ १६५ ॥
घोर मूर्च्छना येऊन ॥ भूमीवरी पडिला दुःशासन ॥
त्याचिया उरावरी गदा ठेवून ॥ उभा राहिला वृकोदर ॥ १६६ ॥
सावध व्हावा म्हणोन ॥ वारा घाली भीमसेन ॥
तंव तेणें उघडिले नयन ॥ भीमाकडे पहातसे ॥ १६७ ॥
मग त्याच्या उरावरी चरण ॥ देऊन पुसे भीमसेन ॥
म्हणे द्रौपदीचे कचग्रहण ॥ कोण्या हस्ते केलें तुवां ॥ १६८ ॥
वीरगुंठीं अवभृथस्वानीं ॥ बांधी स्वहस्तें पांचालनंदिनी ॥
ते तुवां हस्तीं धरोनी ॥ नेली सभेस विटंबावया ॥ १६९ ॥
येरू म्हणे वामहस्तेंकरून ॥ केलें द्रौपदीचे कचग्रहण ॥
मग भीमे तीच भुजा धरून ॥ मूळापासून उपडिली ॥ १७० ॥
तेच भुजेने वारंवार॥ वक्षःस्थळी ताडी तों दुराचार॥
मग असिलता काढून सत्वर॥ छेदी शिर तयाचें ॥ १७१ ॥
तेथूनि निघालें उष्ण रक्त ॥ तें भीमसेन क्रोधें प्राशित ॥
सर्वांगास उटी लावित ॥ दिसे आरक्त भयानक ॥ १७२ ॥
म्हणती हा केवल कृतांत ॥ मनुष्याचे रक्त प्राशित ॥
उरलें दळ ग्रासील समस्त ॥ न उरे येथें काहीं आतां ॥ १७३ ॥
जैसें यागांतीं सोमपान ॥ तैसें रक्त प्राशी भीमसेन ॥
दोन्हीं दळें कंपायमान ॥ भीमसेन देखतां ॥ १७४ ॥
भीमाचें भयानक वदन ॥ न शकती पाहूं विलोकून ॥
शस्त्रें हातींची सोडून ॥ वीर पळती दश दिशां ॥ १७५ ॥
हांक फोडिती वीर सकळ ॥ म्हणती पळा रे पळा आला काळ ॥
कीं हा राक्षस सबळ ॥ घटश्रोत्र दुसरा पैं ॥ १७६ ॥
दुःशासनाचा प्राण ॥ गेला न लागतां एक क्षण ॥
तयाप्रति भीमसेन ॥ पुन: बोलत सक्रोधें ॥ १७७ ॥
म्हणे गौगौः या वचना ॥ आठवीं आतां दुःशासना॥
षंढतिल आम्हां पांचां जणां ॥ बोलिलास आठवीं तें ॥ १७८ ॥
लाक्षासदनीं लाविला अग्न ॥ कां रे विष घातलें मजलागून ॥
घोषयात्रेचें मिष करून ॥ दरवडा घालूं आलां तुम्ही ॥ १७९ ॥
पद्मजातजनकाची भगिनी ॥ तिची वस्त्रें फेडिली सभास्थानीं ॥
वनवास अज्ञातवास करूनी ॥ आजि तुज साधिलें पां ॥ १८० ॥
हांक फोडून म्हणे भीमसेन ॥ हे पार्था हे पीतवसन ॥
आज मी तृप्त जाहलों संपूर्ण ॥ प्रतिज्ञा सत्य जाहली ॥ १८१ ॥
आतां दुर्योधनाचे शिर ॥ पाये मर्दीन मी साचार॥
जैसा मुखीं ताडिजे पादोदर ॥ सबळ पाषाण घेऊनी ॥ १८२ ॥
कीं उपानहघायें देख ॥ ताडिजे जैसा वृश्चिक ॥
तैसा सुयोधनाचा मस्तक ॥ चूर्ण करीन यावरी ॥ १८३ ॥
इकडे धृतराषट्राचा नंदन ॥ ज्याचें नाम चित्रसेन ॥
सात्यकीनें त्याचा प्राण ॥ तत्क्षणींच घेतला॥ १८४ ॥
असो दुःशासनाचा घेतला प्राण ॥ स्थंदनारूढ जाहला भीमसेन ॥
घेऊनियां धनुष्यबाण ॥ ख्याति केली समरांगणीं ॥ १८५ ॥
आणीक दुर्योधनबंधू दहा जण ॥ त्यांचीं शिरें छेदिलीं न लागतां क्षण ॥
कौरवदळीं आकांत दारुण ॥ हाहाकार प्रवर्तला ॥ १८६ ॥
कर्णाप्रति शल्य म्हणत ॥ पाहें कौरवभार पळत ॥
पहा भीमे केला पुरुषार्थ ॥ कैसा आकांत ओढवला ॥ १८७ ॥
समरीं सोडूनियां धीर॥ पहा हे पळताती नृपवर॥
हा दुर्योधन भयातुर ॥ दिसतो कैसा अवलोकीं ॥ १८८ ॥
तुज वधू पाहे तों पार्थ वीर॥ कर्णा तूं धरीं बरवा धीर॥
इकडे गदा खांदा घेऊन वृकोदर ॥ रणरंगीं नाचतसे ॥ १८९ ॥
द्रौपदी भवानी यथार्थ ॥ दुःशासन हा मातला बस्त ॥
तिच्या उद्देशें मारून स्वस्थ ॥ मन केलें तियेचें ॥ १९० ॥
गदा हाच पोत पाजळून ॥ दुःशासनरक्त तैल घालून ॥
दिवटा जाहला भीमसेन ॥ गोंधळ घाली रणमंडपी ॥ १९१ ॥
कर्णपुत्र वृषसेन ॥ धांवला वेगें वर्षत बाण ॥
सहस्रबाणीं अर्जुन ॥ भेदिला तेणें तेधवां ॥ १९२ ॥
पार्थास म्हणे तमालनीळ ॥ पहा युद्ध करितो कर्णाचा बाळ ॥
शरजाळीं पांडवदळ ॥ झांकिलें तेणें प्रतापें ॥ १९३ ॥
तों प्रतापी कर्णनंदन ॥ श्रीकृष्णावरी द्वादश बाण ॥
सप्तबाणीं भीमसेन ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥ १९४ ॥
नकुलावरी बाण दश ॥ सहदेवावरी टाकिले वीस ॥
धन्य बाळ योद्धा राजस ॥ दोन्हीं दळे मानवती ॥ १९५ ॥
असो पार्थ सोडून दिव्य शर ॥ छेदिलें कर्णपुत्राचें शिर ॥
कौरवदळीं हाहाकार॥ दुःख अपार न सांगवे ॥ १९६ ॥
ऐसें देखोन कर्णवीर ॥ कोपला जैसा प्रलयरुद्र ॥
पार्थावरी सोडीत शर ॥ चपलेऐसा धांवला ॥ १९७ ॥
रुक्मिणीहृदयाब्जमिलिंद ॥ म्हणे पार्था होई सावध ॥
महाप्रलयीं पेटे जातवेद ॥ कर्ण तैसा दिसतसे ॥ १९८ ॥
पहा कर्णाच्या भयेकरूनी ॥ पळे पांचाळविराटवाहिनी ॥
कर्णापुढें समरांगणीं ॥ काळ धीर धरीना ॥ १९९ ॥
तरी तूं महावीर रणपंडित ॥ तुझी विद्या जे कां अद्भुत ॥
ते सतेज आहे कीं समस्त ॥ इंद्रशिवदत्त जे कां पैं ॥ २०० ॥
यावरी बोले सुभद्रावर ॥ दारुकयंत्री सूत्रधार॥
त्याचे आधीने बाहुलीं समग्र ॥ यादवेंद्रा तैसा तूं॥ २०१ ॥
कमलायतना कमललोचना ॥ कमलनाभा कमलशयना ॥
कमलप्रिया कमलवदना ॥ कर्ता कारण सर्व तूंचि ॥ २०२ ॥
त्रैलोक्यनगरारंभस्तंभा ॥ या विश्वाची तूंचि शोभा ॥
मन्मथजनका रुक्मिणीवल्लभा ॥ ब्रह्मानंदा जगद्गुरो ॥ २०३ ॥
पांडवकैवारिया मधुसूदना ॥ तुझें राज्य तुझी सेना ॥
पराजय जगन्मोहना ॥ तुझी रचना सांभाळीं तू ॥ २०४ ॥
मी एक योद्धा रणपंडित ॥ ऐसें जेव्हां धरीन मनांत ॥
तेव्हां तूं आम्हांस कैंचा प्रास ॥ क्षीराब्धिहृदयविलासा ॥ २०५ ॥
वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ फाल्गुनें ऐसें बोलूनियां ॥
गांडीवचाप ओढोनियां ॥ टणत्कारिलें समरांगणीं ॥ २०६ ॥
ये प्रसंगीं कर्णास मुक्ति ॥ कृष्णार्जुनांस जयप्राप्ति ॥
तें सादर परिसावें श्रोतीं ॥ सावधान होऊनियां ॥ २०७ ॥
ब्रह्मानंदा जगदुद्धारा॥ श्रीपांडुरंगनगरविहारा ॥
पांडवपालका श्रीधरवरा ॥ अत्युदारा जगद्गुरो ॥ २०८ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्णपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २०९ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे कर्णपर्वणि अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४८ ॥
अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त
GO TOP
|