श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सेहेचाळिसावा


द्रोणाचार्यांचा वध


श्रीगणेशाय नम: ॥

रणीं पडला जयद्रथ ॥ पांडवदळ आनंदभरित ॥
संजयाप्रति अंबिकासुत ॥ पुसता जाहला तेधवां ॥ १ ॥
संजया मज सांग निश्चय ॥ कोणीकडे ये संपूर्ण जय ॥
माझ्या पुत्रांचें कैसें होय ॥ चिंता बहुत मजलागीं ॥ २ ॥
येरू म्हणे ऐकें साचार॥ ब्राह्मण तेथें आचार॥
पंडित तेथें विचार॥ सर्वदाही वसतसे ॥ ३ ॥
मित्र तेथें प्रकाश ॥ सुख तेथें उल्हास ॥
गुरु तेथें सद्विद्या विशेष ॥ मान जैसा वसतसे ॥ ४ ॥
भक्ति तेथें प्रेम ॥ औदार्य तेथें धर्म ॥
ज्ञान तेथें निःसीम ॥ शांतिसुख वसतसे ॥ ५ ॥
शांति तेथें दया वसे ॥ दया तेथें क्षमा असे ॥
क्षमा तेथें विलसे ॥ निजबोध सर्वदा ॥ ६ ॥
बोध तेथें आनंद ॥ आनंद तेथें ब्रह्मानंद ॥
तों ब्रह्मानंदचि गोविंद ॥ पार्थरथीं सर्वदा ॥ ७ ॥
तों पार्थ आणि जगत्पती ॥ ज्याचे दळी विराजती ॥
तरी जय तिकडेच नृपती ॥ काय पुससी वेळोवेळां ॥ ८ ॥
पुढें ऐक समरवृत्तांत ॥ सुद्धा निघाला शारद्वत ॥
तों तिकडून अभिमन्युतात ॥ अत्यावेशें धांवला ॥ ९ ॥
परस्परें शर मारित ॥ युद्ध जाहले अत्यद्‌भुत ॥
वर्मीं बाण बैसले बहुत ॥ मूर्च्छा येत कृपाचार्या ॥ १० ॥
कृपाचार्य पडला म्हणोनी ॥ चमूमाजी उठला ध्वनी ॥
सारथी रथ काढूनी ॥ नेता जाहला एकीकडे ॥ ११ ॥
धनंजय तेव्हां सद्‌गद होऊन ॥ जाहलें युद्ध अत्यद्‌भुत पूर्ण ॥
म्हणे जळो हा क्षत्रियधर्म हीन ॥ काय करूं गोविंदा ॥ १२ ॥
जो माता पिता गुरु परम ॥ ज्याची सेवा करावी उत्तम ॥
ज्याच्या पादुका शिरीं धरिजे सप्रेम ॥ त्याशीं युद्ध करणें पडे ॥ १३ ॥
निर्वाणास्त्र कपटभावें ॥ गुरुवरी सहसा न टाकावे ॥
कृपाचार्य कृपालुवें ॥ सांगितलेंसे पूर्वी मज ॥ १४ ॥
माता क्रोधावली पूर्ण ॥ देत जरी गालिप्रदान ॥
तरी पुत्रास व्हावें मरण ॥ सहसाही कल्पीना ॥ १५ ॥
तैसे शारद्वत आणि द्रोण ॥ मजवरी प्रेरिती जरी बाण ॥
तरी जावा माझा प्राण ॥ सहसा मनीं नसे त्यांचे ॥ १६ ॥
जळो हा दुर्योधन चांडाळ ॥ याच्या पायी आटलें कुळ ॥
असो ऐसा बीभत्सु व्याकुळ ॥ आचार्यस्नेहें जाहला ॥ १७ ॥
तों रथारूढ सूर्यनंदन ॥ येत वेगें पवनाहून ॥
श्रीकृष्णासी म्हणे अर्जुन ॥ रथ प्रेरीं कर्णाकडे ॥ १८ ॥
तंव तों भक्तकाजकैवारी ॥ म्हणे कर्ण जातो सात्यकीवरी ॥
तूं त्यास युद्धा न पाचारीं ॥ आजिचा दिन तत्त्वतां ॥ १९ ॥
त्यापाशीं आहे वासवी शक्ती ॥ ते तुजवरी टाकील अवचितीं ॥
त्या शक्तीचें भय अहोरातीं ॥ माझे चित्तीं वसतसे ॥ २० ॥
त्या शक्तीसी निवारतां पाहीं ॥ ऐसा पुरुष जाहलाचि नाहीं ॥
ते तुजवरी घालीन लवलाहीं ॥ हे उत्कंठा सदा कर्णाची ॥ २१ ॥
तरी ते शक्ति आजि रात्रीं ॥ टाकील एका महावीरावरी ॥
मग तूं त्याशीं युद्ध करीं ॥ निर्भय समरीं मनेच्छें ॥ २२ ॥
इकडे सात्यकीशीं भास्करी ॥ युद्ध करीत घटिका चारी ॥
परस्परीं तीक्ष्ण शरीं ॥ खिळिलीं अंगें उभयांचीं ॥ २३ ॥
आदित्यात्मजें सोडून बाण ॥ छेदिला सात्यकीचा स्यंदन ॥
सारथी तुरंग मारून ॥ विरथ केला तेधवां ॥ २४ ॥
ऐसें देखोन जगदीश्वर॥ दारुकासहित आपुला रहंवर ॥
ध्वजीं ज्याचिया खगवर ॥ सात्यकीप्रति देतसे ॥ २५ ॥
सात्यकी बसून तये रथीं ॥ युद्ध करितां सर्व पाहती ॥
कर्णाचा रथ आणि सारथी ॥ समरांगणीं चूर्ण केला ॥ २६ ॥
यावरी तों भास्करी ॥ आणिके रथीं आरोहण करी ॥
बाणजाळ ते अवसरीं ॥ सात्यकीवरी घालित ॥ २७ ॥
मित्रपुत्र महारथी ॥ सात्यकी खिळिला शरपंथीं ॥
तों युधामन्यु द्रुपदनृपती ॥ उत्तमौजा धावला ॥ २८ ॥
शर सोडित अपार॥ सर्वांगीं खिळिला रविपुत्र ॥
दिसे जैसा मयूर ॥ पिच्छे पसरी स्वइच्छें ॥ २९ ॥
द्रुपदें छेदून रथ ॥ राधेय केला समरीं विरथ ॥
उणें देखोन कौरव समस्त ॥ एकदांचि धांवले ॥ ३० ॥
परम बालमित्र कर्ण ॥ दुर्योधनास आवडे प्राणांहून ॥
यालागीं स्वरें हात देऊन ॥ आपले रथी बैसविला ॥ ३१ ॥
सात्यकी महाराज यादववीर ॥ कौरव बाणीं केले जर्जर ॥
दारुकें फेरिला रहंवरा ॥ कुलालचक्रासारिखा ॥ ३२ ॥
प्रज्ञाचक्षूस संजय बोलत ॥ भीमे तुझे एकतीस सुत ॥
मारिले जाण आजपर्यंत ॥ पुढेही अनर्थ दिसतसे ॥ ३३ ॥
सात्यकीनें महावीर॥ समरांगणीं मारिले अपार ॥
भीमास म्हणे अर्कपुत्र ॥ बालयुद्ध काय करिशी ॥ ३४ ॥
अस्त्रविद्या आतां कांहीं ॥ तुजपाशी रे दिसत नाहीं ॥
अर्जुन म्हणे ते समयीं ॥ सूतपुत्रा ऐक तूं ॥ ३५ ॥
सात्यकीनें तुज केलें विरथ ॥ तूं म्हणविसी रणपंडित ॥
गर्व धरिला आहेस बहुत ॥ परी तुज मी सत्य मारीन ॥ ३६ ॥
तूं आपले भोग भोगून ॥ येई सकल मित्रांसी पुसोन ॥
मागें कांहीं इच्छा ठेवून ॥ आतां येऊं नको रे ॥ ३७ ॥
तुज मी रणीं मारीन सत्य ॥ म्हणोन गांडीवा घाली हात ॥
कर्ण म्हणे बोलसी बहुत ॥ गर्व अंगीं धरूनियां ॥ ३८ ॥
काय बोलोन बहुत वाणी ॥ रणीं करून दावीन करणी ॥
चिंतार्णवी कौरववाहिर्नीं ॥ पडली तेव्हां जाण पां ॥ ३९ ॥
म्हणती पडले वीर सकल ॥ उरले ते दिसती निर्बल ॥
रोगिष्ठाऐसें विकल ॥ दळ सकल दिसतसे ॥ ४० ॥
दुर्योधन बोले संतप्त ॥ इतुके असतां रणपंडित ॥
रक्षिला नाहीं जयद्रथ ॥ केला घात शत्रूंनी ॥ ४१ ॥
परम संतप्त कौरवेश्वर ॥ जैसा कपाळशूळें तळमळे व्याघ्र ॥
कीं उदरशूळीं पादोदर॥ आरंबळत जैसा कां ॥ ४२ ॥
वणव्यांत अहाळला अजगर ॥ कीं महाकूपीं पडला मृगेंद्र ॥
तैसा दुःखी दुर्योधन सत्वर॥ द्रोणाप्रति बोलतसे ॥ ४३ ॥
पहा कैसें कर्म प्रबळ ॥ सात अक्षौहिणी आटिलें दळ ॥
एकतीस बंधू सबळ ॥ मृत्युनगरा बोळविले ॥ ४४ ॥
अहो यावरी गुरुवर्या ॥ पृथ्वी ठाव नेदी मज लपावया ॥
तरी मी आतां युद्ध करूनियां ॥ मारीन किंवा मरेन ॥ ४५ ॥
तुझी कृपा पार्थावरी फार॥ वरिवरि युद्ध करिशी समोर ॥
जैसा कमळी बसे भ्रमर ॥ परी केसर तुटों नेदी ॥ ४६ ॥
तरी तूं गुरु आम्हांसी ॥ मृत्युरूप वाटतोसी ॥
द्रोण म्हणे कां विंधितोसी ॥ वाग्बाणें व्यर्थ तूं ॥ ४७ ॥
पार्थाशीं भिडे समरांगणीं ॥ ऐसी कोण प्रसवली जननी ॥
कपटद्यूत खेळोनी ॥ तुम्हीं त्यांसी जिंकिलें ॥ ४८ ॥
ते सत्यधर्मे निश्चिती ॥ समरीं तुम्हांस जिंकिती ॥
सभेस तुम्ही आणून द्रौपदी सती ॥ गांजिली कैशी अधर्में ॥ ४९ ॥
तीस साह्य जगन्निवास ॥ वस्त्रें पुरविली आसमास ॥
पांडव धाडिले वनवासास ॥ बहुत श्रेष्ठी वर्जितां ॥ ५० ॥
द्रौपदीचे समाधान ॥ करितां बोलिला जगन्मोहन ॥
कीं कौरव मिळोनि जाण ॥ गांजिली पूर्ण देवकीच ॥ ५१ ॥
त्याचें फळ हेंचि जाण ॥ पांडवांस साह्म होऊन ॥
कौरवकुल संहारीन ॥ प्रतिज्ञा केली श्रीधरे ॥ ५२ ॥
पार्थ तों केवळ वासव ॥ साह्य हे माधव उमाधव ॥
त्याशीं समरांगणीं धरी हांव ॥ ऐसा पुरुष कोण आहे ॥ ५३ ॥
भगवद्भक्तांशीं करिती द्वेष ॥ त्यांस निर्दाळी हृषीकेश ॥
तुज आम्हीं शिकविलें बहुवस ॥ नायकसी सर्वथा ॥ ५४ ॥
तुझ्या दोषेकरून ॥ आम्ही समस्त गेलो बुडोन ॥
शिष्याचें पाप दारुण ॥ मस्तकीं बैसे गुरूच्या ॥ ५५ ॥
मैत्रेय विदुर व्यासऋषी ॥ इहीं तुज शिकविलें बहुवसीं ॥
परि तूं मतिमंदा नायकिलेंसी ॥ आतां रडतोसी कासया ॥ ५६ ॥
तरी आतां प्रतिज्ञा हेच ॥ आंगींचें मी न काढीं कवच ॥
सर्वांसी जिंकीन एक मीच ॥ किंवा परंधाम पावेन पैं ॥ ५७ ॥
यावरी तों कौरवनायक ॥ करी कर्णाजवळी परम शोक ॥
म्हणे गुरूचें मन अधिक ॥ पार्थाकडे असे पां ॥ ५८ ॥
व्यूहद्वारीं वाट देऊन ॥ येणेंचि प्रेरिला अर्जुन ॥
येणेंचि जयद्रथ राहवून ॥ घेतला प्राण तयाचा ॥ ५९ ॥
कर्ण म्हणे निर्धारीं ॥ गुरूनिंदा तूं सहसा न करीं ॥
धनंजय नाटोपे समरीं ॥ इंद्रादिकां सहसाही ॥ ६० ॥
ज्याच्या रथावरी हरिहर ॥ विजय चाप विजय तूणीर ॥
समरीं विजय रहंवर ॥ न ढळे अणुमात्र माघारां ॥ ६१ ॥
गुरूनिंदा करितां पाहें ॥ तत्काल होय कुलक्षय ॥
तूं आचार्याचें हृदय ॥ दुःखी सहसा करूं नको ॥ ६२ ॥
स्वकर्मचि मुख्य प्रधान ॥ आमुचें रुद्राक्षौहिणी दळ दारुण ॥
त्यांची ऋषिअक्षौहिणी चमू संपूर्ण ॥ परी जय जाण त्यांजकडे ॥ ६३ ॥
आम्ही तुझ्या स्नेहेंकरून ॥ समरांगणीं वेंचूं प्राण ॥
परी जिकडे आहे रुक्मिणीजीवन ॥ शेवटीं जय तिकडेचि ॥ ६४ ॥
असो यावरी रणतूर्यांची घाई ॥ दोन्ही दळीं गाजतसे ते समयीं ॥
दुर्योधन लवलाहीं ॥ रथारूढ जाहला ॥ ६५ ॥
अपार सोडिले बाण ॥ द्विरद विध्वंसी कमलवन ॥
तैसें पांडवदळ संपूर्ण ॥ विध्वंसिलें दुर्योधनें ॥ ६६ ॥
तीक्ष्ण वर्षें बाणजाळ ॥ पुत्रासहित पळविला पांचाळ ॥
कुंतीचा तृतीय पुत्र सबळ ॥ शतबाणीं विंधिला ॥ ६७ ॥
सत्तर बाणीं सबळ ॥ विधिला सहदेव नकुळ ॥
धर्मावरीहि तेजाळ ॥ ऐंशी बाण घातले ॥ ६८ ॥
नव्वद बाणेंकरून ॥ सात्यकी विंधी सुयोधन ॥
विराटावरी क्रोधेंकरून ॥ पन्नास बाण घातले ॥ ६९ ॥
द्रुपद धृष्टद्युम्न ते वेळे ॥ साठ बाणीं खिळियेले ॥
अवघें दळ जर्जर केलें ॥ दुर्योधनें तेधवां ॥ ७० ॥
कर्णपिता अस्ताचलीं ॥ मावळता रजनी प्रवर्तली ॥
युद्धाची झडी लागली ॥ अधिकाधिक तेधवां ॥ ७१ ॥
वायुसंगें चेतला कृशान ॥ तैसा खवळला भीमसेन ॥
बहु सोडूनि मार्गण ॥ कौरवसैन्य खिळियेलें ॥ ७२ ॥
दुर्योधनाचे बंधू तिघे जण ॥ दीर्घबाहु दुर्मद दुष्कर्ण ॥
त्यांचीं शिरें बाणेंकरून ॥ भीमसेनें उडविलीं ॥ ७३ ॥
भीमावरी एक शक्ती ॥ कर्णें प्रेरिली शीघ्रगतीं ॥
येतां देखोनि हस्तीं ॥ भीमें धरिली पराक्रमें ॥ ७४ ॥
मग ती तेणें स्वबळेंकरूनी ॥ कर्णावरी दिधली झोंकूनी ॥
ते शकुनीवरी जाऊनी ॥ पडावी जों अकस्मात ॥ ७५ ॥
तों कर्णे शर सोडूनि निवाडें ॥ शक्ति पाडिली एकीकडे ॥
यावरी चपला अकस्मात पडे ॥ तैसा आचार्य धावला ॥ ७६ ॥
सात्यकी सोडी सायक ॥ परी तों द्रोण प्रतापार्क ॥
तूळराशीस जाळी पावक ॥ तैसें सैन्य संहारित ॥ ७७ ॥
तेव्हां शिरांच्या लाखोल्या ॥ गुरूनें भूलिंगासी समर्पिल्या ॥
एकचि आकांत वर्तला ॥ पांडवदळी तेधवां ॥ ७८ ॥
तों समसप्तकांस पराभवून ॥ अकस्मात आला अर्जुन ॥
जैसा संकटीं धांवे भगवान ॥ भक्तालागीं एकाएकीं ॥ ७९ ॥
जैसा प्रभंजन जलदजाळ ॥ पुरुषार्थें विदारी तत्काळ ॥
तैसें कौरवांचें दळ ॥ केलें विकळ शरपंथें ॥ ८० ॥
प्रकटला केवळ कृतांत ॥ तैसा पुढें आला वृकोदरसुत ॥
अष्टचक्र जयाचा रथ ॥ किंवा पर्वत दुसरा पैं ॥ ८१ ॥
जो घटोत्कच भयानकवदन ॥ आरक्तध्वज गृधचिन्ह ॥
त्याची गर्जना ऐकून ॥ कौरवदळ दचकलें ॥ ८२ ॥
एक म्हणती आला काळ ॥ ग्रासील हा अवघें दळ ॥
सवें राक्षससेना प्रबळ ॥ भयानक न लक्षवे ॥ ८३ ॥
घटोत्कच सोडी जे शर ॥ ते चपलेसमान अनिवार ॥
वल्मीकांत संचरती विखार ॥ वीरांअंगीं तेविं रुतती ॥ ८४ ॥
ऐसें देखोनि अद्‌भुत ॥ त्यावरी धांवला गुरुसुत ॥
तीक्ष्णसायक एक शत ॥ घटोत्कचावरी टाकिले ॥ ८५ ॥
कुंजरावरी सुमनभार ॥ तैसे न गणी तों तीक्ष्ण शर ॥
मग हे गुरूपुत्रा धरीं धीर ॥ म्हणोनि हांक फोडिली ॥ ८६ ॥
कालदंडवत सत्तर बाणीं ॥ भीमात्मजें खिळिला द्रौणी ॥
तों घटोत्कचपुत्र ते क्षणीं ॥ अंजनपर्वा धांवला ॥ ८७ ॥
चक्रें सोडी अनिवार ॥ निवटीत कौरवांचे भार ॥
मिळोन सर्व कौरववीर ॥ वर्षत शर सूटले ॥ ८८ ॥
दुर्योधन कर्ण द्रौणी ॥ शरीं राक्षस खिळिले ते क्षणीं ॥
असुर वर्षत वृक्षपाषाणीं ॥ कौरव बाणीं उडविती ॥ ८९ ॥
कर्णे अद्‌भुत सोडोनि शर ॥ छेदिलें अंजनपर्व्याचें शिर ॥
कौरवदळी आनंद थोर ॥ कीं महावीर पडियेला ॥ ९० ॥
देखोन पुत्राचें मरण ॥ घटोत्‍कच खवळला दारुण ॥
पर्वत वृक्ष उपटून ॥ अरिसेनेवरी वर्षतसे ॥ ९१ ॥
साठसहस्र दळ घेऊनी ॥ पांडवांवरी धांवला शकुनी ॥
दोन्ही दळे मिसळली ते क्षणीं ॥ झोडधरणी होतसे ॥ ९२ ॥
होत युद्धाचें घनचक्र ॥ गुरुसुतें प्रेरिलें अग्न्यस्त्र ॥
असुर जाळिले अपार ॥ प्रलय थोर वर्तला ॥ ९३ ॥
अनिवार ते रजनीचर ॥ वर्षती शिळा आणि तरुवर ॥
घटोत्‍कचें शक्ति तीच ॥ द्रौणीवरी भिरकावली ॥ ९४ ॥
ते शक्ती परम अचाट ॥ सबळघंटा बांधल्या आठ ॥
करीत प्रलयबोभाट ॥ अश्वत्थाम्यावरी आली ॥ ९५ ॥
परमपराक्रमी वीर द्रौणी ॥ शक्ती धरिली करेंकरूनी ॥
घटोत्कचावरी परतोनी ॥ टाकिली तेव्हां अतिबळें ॥ ९६ ॥
घटोत्कचाचा महारथ ॥ शक्तीने जाळिला क्षणांत ॥
मग आणिके रथीं भीमसुत ॥ आरूढत सवेंचि ॥ ९७ ॥
परमपुरूषार्थी गुरुपुत्र ॥ द्वयदळीं वर्णिती चरित्र ॥
रथ जाळूनि शक्ती अनिवार ॥ पृथ्वीगर्भीं प्रवेशली ॥ ९८ ॥
सुरथ आणि शत्रुंजय ॥ द्रुपदाचे पुत्र पाहें ॥
गुरुपुत्रापुढें येऊनि लवलाहें ॥ युद्ध करिती अपार ॥ ९९ ॥
गुरुपुत्रानें दोन बाणीं ॥ दोघांची शिरें उडविलीं गगनीं ॥
कुंतिभोजाचे दशपुत्र रणीं ॥ प्रेते करूनि टाकिले ॥ १०० ॥
भूरिश्रवपिता अद्‌भुत ॥ नाम जयाचें सोमदत्त ॥
तों महावीर रणपंडित ॥ मारी बहु पांचाळसेना ॥ १०१ ॥
तों सात्यकीनें समरांगणीं ॥ त्याचें शिर उडविलें गगनीं ॥
भीमे चौघे पुत्र रणीं ॥ शकुनीचे संहारिले ॥ १०२ ॥
तों बाल्हीकें निजशरेंकरून ॥ रणीं खिळिला भीमसेन ॥
जैसा मयुर वेष्टित पिच्छेंकरून ॥ तैसा भीम शोभतसे ॥ १०३ ॥
भीमें गदा भोवंडूनी ॥ बाल्हीक मारिला समरांगणीं ॥
दुर्योधनाचे बंधू ते क्षणीं ॥ दहा जण वधियेले ॥ १०४ ॥
त्यावरी घालूनि गदाघात ॥ मारिले कर्णाचे चौघे सुत ॥
देशोदेशींचे राजे बहुत ॥ धर्मराजें आटिले ॥ १०५ ॥
परमपुरुषार्थी युधिष्ठिर ॥ मारीत उठिला अनिवार ॥
सहस्रांचे सहस्र वीर ॥ शत्रू आटिले रणांगणीं ॥ १०६ ॥
धर्माचा पराक्रम देखोन ॥ आचार्य धांवला वर्षत बाण ॥
दहासहस्र बाण सोडून ॥ धर्म भेदिला हृदयावरी ॥ १०७ ॥
साठ बाणें द्रोण समरीं ॥ धर्में खिळिला ते अवसरीं ॥
धर्माचा रथ सारथी झडकरी ॥ चूर्ण केला आचार्य ॥ १०८ ॥
तीस बाणीं तत्काळ ॥ धर्म रणीं केला विकळ ॥
नकुल रथीं वाहून तत्काळ ॥ नेता जाहला तेधवां ॥ १०९ ॥
दुर्योधन म्हणे कर्णवीरा ॥ रणपंडिता समरधीरा ॥
माझे मनोरथ चतुरा ॥ करिशील पूर्ण केव्हां तूं ॥ ११० ॥
अर्कज म्हणे ऐक नृपती ॥ आतां सोडीन वासवी शक्ती ॥
रणांगणीं सुभद्रापती ॥ पहुडवीन निश्चयें ॥ १११ ॥
मग बोले शारद्वत ॥ वल्गना कां करिसी व्यर्थ ॥
जो देखिला नाहीं वीर पार्थ ॥ कपिवरध्वज श्रेष्ठ तों ॥ ११२ ॥
निवातकवच योद्धा अभिनव ॥ त्याचा पार्थें पुशिला ठाव ॥
व्योमकेश आणि वासव ॥ समरांगणीं तोषविले ॥ ११३ ॥
गोग्रहणी तुमची गती ॥ कैशी केली आठवा चित्तीं ॥
स्वाहास्वधेचा जो पती ॥ आरोग्य केला पुरुषार्थ ॥ ११४ ॥
ऐकता कोपला वीर कर्ण ॥ शारद्‌वतासी बोले तीक्ष्ण ॥
मला वाटतें जिव्हा छेदून ॥ तुझी टाकावी ब्राह्मणा ॥ ११५ ॥
तूं आणि गुरु द्रोण ॥ पार्थाचे कैवारी केवळ पूर्ण ॥
तों द्रौणी खड्‌ग घेऊन ॥ कर्णावरी धांवला ॥ ११६ ॥
म्हणे अकाली मेघ गडगडत ॥ बिंदु न टाकी अवनीं व्यर्थ ॥
तैसी बडबड एथ ॥ मूर्खा तुझी जाण पां ॥ ११७ ॥
कपिवरध्वजसिंहापुढें ॥ तूं जंबूक कायसें बापुडें ॥
आचार्यनिंदा करिशी तोंडें ॥ करीन खंडे तुझीं आतां ॥ ११८ ॥
गुरूनिंदा करिसी जाण ॥ तरी निकट आलें तुज मरण ॥
आतांच तुझें शिर छेदीन ॥ म्हणोन शस्त्र उचलिलें ॥ ११९ ॥
शस्त्रें घेऊनि भानुसुत ॥ क्रोधें त्यावरी लोटों पाहत ॥
दुर्योधन आणि शारद्वत ॥ निवारिती दोघां जणां ॥ १२० ॥
दोघांस म्हणे दुर्योधन ॥ काल कैसा पहा विलोकून ॥
रणीं आटले थोरलहान ॥ व्यर्थ भांडण करितां कां ॥ १२१ ॥
असो त्यावरी युद्ध मांडलें सबळ ॥ उठले वीर पांचाळ ॥
त्यांवरी सूर्यपुत्र केवळ काळ ॥ संहारित उठिला ॥ १२२ ॥
सहस्रवीरांचीं शीर्षें ॥ करणे छेदिलीं अत्यावेशें ॥
देखतां दुर्योधन संतोषे ॥ बोले कर्ण धन्य पूर्ण ॥ १२३ ॥
कर्णाऐसा रणपंडित ॥ ऐशास निंदितो गुरुसुत ॥
असो भानुजें वीर बहुत ॥ समरभूमी पहुडविले ॥ १२४ ॥
कर्णाचा पुरुषार्थ थोर ॥ देखोन गर्जती कौरव वीर ॥
तें ऐकोन किरीटी यदुवीर ॥ मनोवेगें धांविन्निले ॥ १२५ ॥
कर्णासमोर अकस्मात ॥ उभा केला विजयरथ ॥
पार्थें बाण टाकून तीनशत ॥ सूर्यसुत खिळियेला ॥ १२६ ॥
चाप आणि बाणभाता ॥ घोडे सारथी आणि रथा ॥
विजय छेदी क्षण न लागतां ॥ धन्य पार्थ वीर म्हणती ॥ १२७ ॥
कर्ण विरथ उभा जगतीं ॥ मग गौतमसुतें बैसविला रथीं ॥
वरकड दळभार पळती ॥ पार्थभयेंकरूनियां ॥ १२८ ॥
ऐसें देखोन सुयोधन ॥ म्हणे मी आजि झुंजेन निर्वाण ॥
मग गुरुपुत्र गौतमनंदन ॥ निवारिती दुर्योधना ॥ १२९ ॥
समीप असतां दळें अपारें ॥ उडी न घालावी कदा नृपवरें ॥
दुर्योधन म्हणे निर्धरें ॥ मंदभाग्य सत्य मी ॥ १३० ॥
तुम्ही मंद मंद युद्ध करितां ॥ जरी मनीं धराल तत्त्वतां ॥
तरी निःपांडवी पृथ्वी आतां ॥ क्षण न लागतां कराल ॥ १३१ ॥
कृपीपुत्र म्हणे ते अवसरीं ॥ आमचें युद्ध पाहें यावरी ॥
वीज संचरे उद्यानांतरीं ॥ तैसा वेगें धाविन्नला ॥ १३२ ॥
चापमेघापासून ॥ वर्षत शरांचा दाट घन ॥
पळविले पांडवसैन्य ॥ दशदिशां ते वेळे ॥ १३३ ॥
तें देखोनि धृष्टद्युम्न ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥
म्हणे रे गुरुपुत्रा तूं ब्राह्मण ॥ परम अधम जाण पां ॥ १३४ ॥
सांडून याग अनुष्ठान तप ॥ राजहिंसा करितां हें पाप ॥
तूं आणि तुझा बाप ॥ परम अधम निर्धारे ॥ १३५ ॥
तुझिया पितयाचा प्राण ॥ मीच घेईन सत्यवचन ॥
मग यावरी धृष्टद्युम्न ॥ वर्षें पर्जन्य शरांचा ॥ १३६ ॥
पार्थ टाकूनि बाणजाळ ॥ भूभुज पळविले सबळ ॥
किंशुक फुलती सकळ ॥ तैसे वीर दिसती पैं ॥ १३७ ॥
रात्रीं युद्ध होत घोरांदरं ॥ सुगंधस्नेह परम सुंदर॥
त्याच्या दीपिका अपार ॥ दोन्ही दळीं पाजळिल्या ॥ १३८ ॥
लक्षानुलक्ष चंद्रज्योती ॥ लावितां उजळली सर्व जगती ॥
कर्पूरदीपिकांची दीप्ती ॥ गगनामाजी न समाये ॥ १३९ ॥
रथ इभ स्वारांप्रती ॥ पांच पांच दीपिका प्रकाशती ॥
सुवर्णकवचें झळकती ॥ चपलेऐसीं तेजाळ ॥ १४० ॥
अलंकारमुकुटांची प्रभा ॥ तेणें आणिली दशदिशां शोभा ॥
वस्तें आणि चापें नभा ॥ उजळिती स्वतेजें ॥ १४१ ॥
ध्वज झळकती अपार॥ रात्रींचें युद्ध घोरांदर ॥
द्रोणाचे पाठीशीं कौरववीर ॥ लक्षून बळ असती पैं ॥ १४२ ॥
रथांशीं रथ दाटले ॥ गजांशीं गज संघट्टले ॥
स्वारांशीं स्वार भेटले ॥ हांकें भरलें ब्रह्मांड ॥ १४३ ॥
तंत वितंत घन सुस्वर॥ चतुर्विध वाद्यांचे होती गजर॥
कृतवर्मा आणि युधिष्ठिर॥ परमावेशें भिडती ॥ १४४ ॥
शारद्वतसुत अर्जुन ॥ द्रोण विराट दोघे जण ॥
माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा आचार्य शोभतसे ॥ १४५ ॥
तों भीमें दिधली आरोळी ॥ जेणें कृतांतही कांपे चळीं ॥
गदा घेऊनि महाबळी ॥ गजभारीं संचरला ॥ १४६ ॥
सहस्रांचे सहस्र भद्रजाती ॥ भीमे बळें आपटिले क्षितीं ॥
भिरकावितां गगनपंथीं ॥ वायुचक्रीं पडिले ते ॥ १४७ ॥
अद्याप भोंवती नभोमंडलीं ॥ कित्येक पडले समुद्रजलीं ॥
लंकादुर्गी आदळलीं ॥ गजकलेवरें कित्येक ॥ १४८ ॥
चर्या पडती ढांसळोन ॥ आश्चर्य करी बिभीषण ॥
मग कुरुक्षेत्रास आला धांवोन ॥ भारती युद्ध पहावया ॥ १४९ ॥
गजावरी गज घालोन ॥ रणीं मारी भीमसेन ॥
वीरांसहित अश्व उचलून ॥ आपटीत भूमीवरी ॥ १५० ॥
रथावरी घालूनि रथ ॥ शतांचीं शतें चूर्ण करित ॥
ऐसा प्रलय अद्‌भुत ॥ भीमें केला कौरवदळी ॥ १५१ ॥
रथावरून सहदेव चपळ ॥ कर्णावरी सोडी शरजाळ ॥
आदित्यात्मजें तत्काळ ॥ रथ सारथी छेदिला ॥ १५२ ॥
विरथ होतां माद्रीसुत ॥ असिलता घेऊनि धांवत ॥
तीही छेदिली अकस्मात ॥ रवितनुजें तेधवां ॥ १५३ ॥
मग धांवे गदा घेऊनी ॥ तेही छेदिली ते क्षणीं ॥
सवेंचि शक्ति घेत बळेंकरूनी ॥ तेही तोडिली येतयेतां ॥ १५४ ॥
मग घेऊनि रथांग सत्वर ॥ तळपतसे माद्रीकुमार ॥
राधेयें तें टाकूनि शर ॥ छेदून पाडिलें एकीकडे ॥ १५५ ॥
मग मृतगजकलेवरें ॥ उचलून टाकिलीं माद्रीपुत्रें ॥
यावरी कर्ण हास्यवक्त्रें ॥ सर्वही छेदी क्षणार्धें ॥ १५६ ॥
तेव्हां कृपाकौतुकेंकरून ॥ उदार कर्ण बोले वचन ॥
रणपंडित जे महादारुण ॥ त्यांशीं युद्ध करूं नको ॥ १५७ ॥
समवय समविद्या पाहोन ॥ युद्ध करावें तुवां जाण ॥
जंबूक सिंहावरी न्याय चढोन ॥ तैसा मजपुढें येऊं नको ॥ १५८ ॥
आतां पळोन जाईं पार्थाआड ॥ न धरीं युद्धाची कदा चाड ॥
माझा कोप गगनाहूनि वाड ॥ त्या वरचढ होऊं नको ॥ १५९ ॥
सहदेव नेदी प्रतिवचन ॥ गेला पांचालरथीं बैसोन ॥
इकडे विराट शल्य दोघे जण ॥ महायुद्धासी प्रवर्तले ॥ १६० ॥
विराटबंधु शतानीक वीर ॥ शल्यें त्याचें छेदिलें शिर ॥
त्यावरी मत्स्यरायें अपार॥ बाणजाळ घातलें ॥ १६१ ॥
सहस्र बाणीं अचाट ॥ शल्यें खिळिला विराट ॥
सकल चमूचा केला आट ॥ अतिसंकट ओढवलें ॥ १६२ ॥
हें देखोन पंडुपुत्र ॥ धावले शल्यावरी सत्वर॥
बाणेंकरूनि जर्जर ॥ पराभविला तेधवां ॥ १६३ ॥
यावरी धनुर्वेदपरायण ॥ तों पुढें धावला गुरु द्रोण ॥
पांडवदळ कंपायमान ॥ पाहोन संधान तयाचें ॥ १६४ ॥
टाकिला बाण न जाय व्यर्थ ॥ महाझुंजार रणपंडित ॥
हें पाहोन विराट धांवत ॥ निजदळाशीं तेधवां ॥ १६५ ॥
विराटाचे पुत्र जाण ॥ सुबाहु बलबाहु वीरसेन ॥
मणिमंत आणि सुकर्ण ॥ त्याहीपुढे धांविन्नले ॥ १६६ ॥
विराट माघारां घालून ॥ युद्ध केलें तिहीं निर्वाण ॥
सर्वांगीं विधिला द्रोण ॥ अवघे जण पाहती ॥ १६७ ॥
द्रोणाचार्य प्रचंड वीर॥ टाकिले पांच निर्वाण शर ॥
पाचाची शिरें सत्वर ॥ आकाशमार्गी उडविलीं ॥ १६८ ॥
ऐसें देखतां विराटनृप ॥ पुढें धांवत नावरे कोप ॥
बाण मोडीत अमूप ॥ भारद्वाज लक्षूनियां ॥ १६९ ॥
तुरंग सारथी स्यंदन ॥ विराटें बाणीं केले चूर्ण ॥
सहस्रबाणांहींकरून ॥ खिळिला द्रोण सर्वांगीं ॥ १७० ॥
आणिके रथीं द्रोण बैसत ॥ क्षोभला जैसा प्रलयकृतांत ॥
चपलेऐसा बाण सोडित ॥ अंगीं भेदत विराटाचे ॥ १७१ ॥
चाप सारथी स्यंदन ॥ समरीं आचार्य केले चूर्ण ॥
मग काढूनि निर्वाणबाण ॥ चापावरी योजिला ॥ १७२ ॥
उदयाचलावरी जैसा मित्र ॥ तैसा बाण दिसे परम तीव्र ॥
चापापासूनि सुटतो सत्वर॥ मोह पावती दोन्हीं दळे ॥ १७३ ॥
विराटाचें कंठनाळ ॥ छेदून उडविलें तत्काळ ॥
पांडवदळीं कोल्हाळ ॥ हाहाकार जाहला ॥ १७४ ॥
समसप्तकांकडे अर्जुन ॥ युद्ध करीतसे निर्वाण ॥
इकडे चौघे बंधू धावोन ॥ द्रोणावरी चालिले ॥ १७५ ॥
द्रुपदराज सहपरिवारे ॥ लोटला त्याहीपुढे त्वरें॥
चंद्रज्योति दीपिका एकसरें ॥ पाजळून धांवती ॥ १७६ ॥
द्रुपद म्हणे द्रोणालागून ॥ तुवां सांडून तपानुष्ठान ॥
दुष्टांसी साह्य होऊन ॥ राजहिंसा करितोसी ॥ १७७ ॥
तुज मज पूर्वीचे वैर ॥ परधर्म आचरसी अधर्म विप्र ॥
आजि तुझें छेदीन शिर ॥ समरांगणीं जाण पां ॥ १७८ ॥
द्रोण म्हणे रे मशका ॥ ब्रह्मद्वेषिया परमनिंदका ॥
पार्थाहातीं कीटका ॥ तुज बांधोनि आणविलें ॥ १७९ ॥
गुरुद्रोही तूं दुष्ट पूर्ण ॥ तुझें न पहावें कदा वदन ॥
आतां सांभाळीं आले बाण ॥ तुझे प्राणहर्तें जे ॥ १८० ॥
त्यावरी दहा शरीं ॥ द्रुपद खिळिला हृदयावरी ॥
येरें शत बाण झडकरी ॥ द्रोणावरी सोडिले ॥ १८१ ॥
बाण टाकितां परस्परीं ॥ शरमंडप दाटला अंबरीं ॥
अस्त्रे सोडिलीं समरीं ॥ रामरावणांसमान ॥ १८२ ॥
परस्परें तोडिती स्यंदन ॥ सवेंचि आणविती नूतन ॥
यावरी आचार्य एक बाण ॥ भार्गवदत्त काढिला ॥ १८३ ॥
जैशी प्रलयींची चपला ॥ तैसा बाण वेगें सुटला ॥
द्रुपदाचा कंठ छेदिला ॥ कमलन्यायें अकस्मात ॥ १८४ ॥
पांडवदळीं हाहाकार॥ कौरवांकडे वाद्यांचा गजर ॥
म्हणती धन्य धन्य आचार्य वीर॥ केला संहार पांडवांचा ॥ १८५ ॥
दाटली शर्वरी तमें घोर॥ होतसे युद्धाचें घनचक्र ॥
पांडवदळें समग्र ॥ पळता देखिलीं घटोत्कचें ॥ १८६ ॥
मग समस्तांसी धीर देऊन ॥ दळे परतविलीं संपूर्ण ॥
अष्टचक्र त्याचा स्यंदन ॥ पुढें लोटिला तेधवां ॥ १८७ ॥
पूर्वी अतिकाय इंद्रजित ॥ तैसा योद्धा तों भीमसेनसुत ॥
राक्षसदळ अत्यद्‌भुत ॥ घेऊनिया लोटला ॥ १८८ ॥
घालूनियां वायुअस्त्र ॥ दीपिका परदळींच्या समग्र ॥
विझवूनियां तीक्ष्ण शरा ॥ सोडिता जाहला तेधवां ॥ १८९ ॥
विजाऐसे दिव्यबाण ॥ असंख्य देतसे सोडोन ॥
पर्वत आणि पाषाण ॥ यांचा पर्जन्य पडतसे ॥ १९० ॥
पर्वतशिलांचे तळीं जाण ॥ महावीर होती चूर्ण ॥
जैसे मृद्‌धट जाती फुटोन ॥ अकस्मात आदळतां ॥ १९१ ॥
मायावी युद्ध परमघोर ॥ दशदिशांनीं येती शर ॥
शक्ती सुटती अपार ॥ तैसेच तोमर न गणवती ॥ १९२ ॥
द्रोण कर्ण आणि कृपीसुत ॥ कौरवही शरीं खिळिले समस्त ॥
परस्परें हांका फोडित ॥ न चाले बळ कोणाचें ॥ १९३ ॥
प्रलय वर्तलासे थोर ॥ कौरवदळीं हाहाकार ॥
गदाचक्रांचे भार ॥ आकाशांतूनि रिचवती ॥ १९४ ॥
वृक्ष पाषाण पर्वत ॥ राक्षस टाकिती असंख्यात ॥
कौरवदळ भयें पळत ॥ दशदिशांनीं नाटोपे ॥ १९५ ॥
अकस्मात शस्त्रें येती ॥ महावीरांचे अंगीं खोचती ॥
तेव्हां दुर्योधन कर्णाप्रती ॥ दीनवदनें बोलतसे ॥ १९६ ॥
घटोत्कचाची माया दारुण ॥ आलें सर्वांसी आतां मरण ॥
या वेळेस राख आमुचा प्राण ॥ वासवी सोडीं याजवरी ॥ १९७ ॥
कर्ण म्हणे तये वेळीं ॥ ते म्यां अर्जुनाकरितां ठेविली ॥
प्राणांबरोबरी रक्षिली ॥ आजवरी शक्ति ते ॥ १९८ ॥
दुर्योधन म्हणे तरी प्राणांत ॥ आतांच ओढवला कीं त्वरित ॥
कर्णास विनविती समस्त ॥ टाकीं शक्ति याजवरी ॥ १९९ ॥
मग दीपिकांचे भंबाळ ॥ कौरवीं पाजळिले तत्काळ ॥
घटोत्कचावरी दानशीळ ॥ भास्करपुत्र धांवला ॥ २०० ॥
हरिमाया परमगहन ॥ हें कर्तृत्व त्याचेंचि पूर्ण ॥
रक्षावया पार्थाचा प्राण ॥ चरित्र जाण केलें हें ॥ २०१ ॥
शर टाकूनि अमित ॥ असुरांचीं शस्त्रे निवारित ॥
मग जे इंद्रशक्ति अद्‌भुत ॥ गवसणी तिची फाडिली ॥ २०२ ॥
उगवले सहस्र वासरमणी ॥ तेविं प्रकाश पडला धरणीं ॥
दोन्ही दळांवरी तये क्षणीं ॥ प्रभा पसरली अद्‌भुत ॥ २०३ ॥
ते कृतांतजिव्हाच तेजाळ ॥ कीं यमदंष्ट्रा अति विशाळ ॥
कीं दावाग्नीची तीक्ष्ण ज्वाळ ॥ किंवा गरळ काळसर्पाची ॥ २०४ ॥
ते महाप्रलयींची सौदामिनी ॥ कीं काळपुरुषाची ज्येष्ठभगिनी ॥
कीं सकलविद्या गाळोनी ॥ एकरूपिणी ओतिली ॥ २०५ ॥
सप्तकोटि महामंत्र पाहीं ॥ त्यांचें सामर्थ्य या शक्तीचे ठायीं ॥
शक्र प्रसन्न होऊनि एके समयीं ॥ कर्णाप्रति दिधली तेणें ॥ २०६ ॥
न्यासमंत्र कर्णे जपोन ॥ केलें शक्तीचें पूजन ॥
मग दोन्ही हस्तीं धरून ॥ घटोत्कचावरी सोडिली ॥ २०७ ॥
चतुरानन आणि हरिहर ॥ यांस जे शक्ति अनिवार ॥
ते कडकडली परम तीव्र ॥ पळविती सुरवर विमानें ॥ २०८ ॥
सहस्रचपला कडकडत ॥ तैसी चालली प्रलय करित ॥
ब्रह्मांड अवघें उजळत ॥ जाहला आकांत दोन्ही दळी ॥ २०९ ॥
पृथ्वीतल डळमळी ॥ मेदिनीवसन भयें खळबळी ॥
जलचर वनचर ते वेळीं ॥ गतप्राण जाहले ॥ २१० ॥
दोन्ही दळीचे वीर ॥ पळती घेतलें गिरिकंदर ॥
अधीरांचे प्राण समग्र ॥ एकवटोनि पडियेले ॥ २११ ॥
असो शक्ति कडकडोनि ते समयीं ॥ भरली घटोत्कचाचे हृदयीं ॥
गवाक्ष पाडूनि लवलाहीं ॥ षड्‌दल भेदून गेली ते ॥ २१२ ॥
महावृक्ष उन्मळला ॥ कीं गजास पर्वतपात जाहला ॥
कीं मेरूचा कडा कोसळला ॥ तैसा पडला घटोत्‍कच ॥ २१३ ॥
मग कर्ण आणि द्रोण ॥ इहीं बाणजाळ घालून ॥
राक्षससेना जाळून ॥ तृणप्राय टाकिली ॥ २१४ ॥
कौरव परम आनंदती ॥ जयवाद्यें वाजविती ॥
शोकसमुद्रीं केली वस्ती ॥ पंडुपुत्रीं तेधवां ॥ २१५ ॥
प्रलयगजर ऐकोन ॥ आले कृष्णार्जुन धांवोन ॥
तों विराट पांचाळ भीमनंदन ॥ महावीर पडियेले ॥ २१६ ॥
कालरूप समरांगणीं ॥ द्रोण उभा देखती नयनीं ॥
यावरी विश्वचालक चक्रपाणी ॥ काय करिता जाहला ॥ २१७ ॥
म्हणे रे रजनी उरली किंचित ॥ जयवाद्यें वाजवा बहुत ॥
रणीं पडला द्रोणसुत ॥ म्हणोनि गजर करा बहु ॥ २१८ ॥
धर्मास म्हणे जगज्जीवन ॥ तुज पुसेल येऊनि द्रोण ॥
तूं इतुकें बोलें वचन ॥ अश्वत्थामा पडियेला ॥ २१९ ॥
मग म्हणे पंडुनंदन ॥ जन्मादारभ्य असत्यवचन ॥
मी बोललों नाहीं जाण ॥ जळो भाषण असत्य तें ॥ २२० ॥
कृष्ण म्हणे सर्वांचें कल्याण ॥ होय तें असत्य बोलावें वचन ॥
हिंसक शोधित आला गोधन ॥ तरी काय सत्य बोलावें ॥ २२१ ॥
वाटपाडे पुसती तांतडी ॥ ये वाटे गेले काय कापडी ॥
तेथें असत्य बोलतां जोडी ॥ होय द्विगुण सत्याची ॥ २२२ ॥
नरो वा कुंजरो वा म्हणोन ॥ इतुकें तरी बोलें वचन ॥
या शब्दे कार्य साधोन ॥ बहुत येतें आमुचें पैं ॥ २२३ ॥
कां बोलवितो हें जगज्जीवन ॥ धर्मास न कळे वर्तमान ॥
श्रीकृष्णाचे भिडेकरून ॥ अवश्य म्हणे तेधवां ॥ २२४ ॥
आधींच रात्रींचा अवसर ॥ जाहला वाद्यांचा गजर ॥
हांका फोडिती वीर ॥ अश्वत्यामा पडियेला ॥ २२५ ॥
तें द्रोणे ऐकोन कर्णीं ॥ परम दचकला अंतःकरणीं ॥
म्हणे चिरंजीव द्रौणी ॥ केवि मरण पावला ॥ २२६ ॥
दोन्ही दळीं गाजली मात ॥ पडिला पडिला गुरुसुत ॥
द्रोण म्हणे हा वृत्तांत ॥ धर्मासी सत्य पुसावा ॥ २२७ ॥
तों आहे सत्यसागर ॥ मग द्रोणें प्रेरिला रहंवर ॥
पांडवदळ भयातुर ॥ म्हणती द्रोण कां आला ॥ २२८ ॥
रथाजवळी आला रथ ॥ धर्मराज नमन करित ॥
गुरू म्हणे बोलें सत्य ॥ अश्वत्यामा पडियेला ॥ २२९ ॥
कृष्णें करविला वाद्यांचा गजर ॥ त्यांत धर्म बोलिला हें उत्तर ॥
नरो वा कुंजरो वा साचार ॥ एक जण पडियेला ॥ २३० ॥
वाद्यगजर तत्क्षणीं ॥ नरो वा इतुकें पडिलें कानीं ॥
पुत्र सत्य पडिला मानूनी ॥ द्रोण परतला तेधवां ॥ २३१ ॥
जाऊनियां आपुले दळी ॥ रथावरच ते वेळीं ॥
धनुष्यबाण ठेवूनि महाबळी ॥ दृढासन घातलें ॥ २३२ ॥
चान्ही वेद मुखोद्‌गत ॥ सर्वशास्त्रीं पारंगत ॥
अष्टादश पुराणें समस्त ॥ दशग्रंथ करतलामल ॥ २३३ ॥
चौदा विद्या चौसष्ट कला ॥ जाणे सकल मंत्रमाळा ॥
अस्त्रशस्त्रें अत्यागळा ॥ धनुर्वेदीं निपुण जो ॥ २३४ ॥
भूत भविष्य वर्तमान ॥ जाणोन झांकिले आचार्य नयन ॥
ज्ञानदृष्टींकरूनि संपूर्ण ॥ विलोकित ब्रह्मांड हें ॥ २३५ ॥
म्हणे अश्वत्यामा मरोन ॥ राहिला कोणे लोकीं जाऊन ॥
विचार करितां जाण ॥ तों अपूर्व वर्तलें ॥ २३६ ॥
ध्यानांतरींच जाण ॥ पक्ष्यांचे रूप धरून ॥
सप्तर्षि भेटले येऊन ॥ ब्रह्मनंदन नारदादि ॥ २३७ ॥
विश्वामित्र पिता भारद्वाज पुण्यरूप ॥ जमदग्नि गौतम अत्रि दिव्यरूप ॥
वसिष्ठ आणि सातवा कश्यप ॥ नारदस्वामी वेगळा ॥ २३८ ॥
म्हणती द्रोणा सावधान ॥ पहा एका दुष्टसंगावांचून ॥
राजहिंसा करावया कारण ॥ कांहीच नाहीं विचारीं ॥ २३९ ॥
कैंची कांता कैंचा पुत्र ॥ मृगजलन्यायें संसार विचित्र ॥
कौरव पांडव सेना समग्र ॥ स्वप्नवत्‌ आभास! हा ॥ २४० ॥
सोडीं आतां मायिक कर्मा ॥ चाल जाऊं परंधामा ॥
स्वरूपीं पावें विश्रामा ॥ नामानामातीत जें ॥ २४१ ॥
कन्यापुत्रगृहदारीं ॥ स्वप्नीं नांदत मस्करी ॥
जागा होऊन विचारीं ॥ मिथ्या सर्व जाहलें ॥ २४२ ॥
तैसें करितां आत्मचिंतन ॥ नानापरींचे दोष दारुण ॥
सर्व जाती भस्म होऊन ॥ अग्निसंगें तृण जैसें ॥ २४३ ॥
ऐसें ऋषिवर बोधून ॥ तत्काल पावले अंतर्धान ॥
द्रोणें प्राणापान आकर्षून ॥ इंद्रियमार्ग निरोधिला ॥ २४४ ॥
सांडोनि माया मोह द्वंद्व ॥ आचार्य जाहला ब्रह्मानंद ॥
दूरी गेला सर्व खेद ॥ भेदाभेद विराले ॥ २४५ ॥
कौरव पांडव समस्त ॥ आचार्यमूर्ति विलोकित ॥
निजधामा गेला गुरुसुत ॥ हें तों समजलें समस्तां ॥ २४६ ॥
तों पितयाचें वैर आठवून ॥ परम दुष्ट धृष्टद्युम्न ॥
धांवला असिलता घेऊन ॥ शिर छेदिलें द्रोणाचें ॥ २४७ ॥
संपूर्ण जाहले पांच दिवस ॥ उदय पावला चंडांश ॥
तों धृष्टद्युम्ने विशेष ॥ विपरीत कर्म केलें हें ॥ २४८ ॥
त्रुटि न वाजतां शिर छेदून ॥ गेला परतोन धृष्टद्युम्न ॥
आचार्य पावला स्वर्गभवन ॥ हांक तेव्हां गाजली ॥ २४९ ॥
दोन्ही दळीं हाहाकार ॥ अश्रुधारा टाकी युधिष्ठिर ॥
धरणीवरी लोटिलें शरीर ॥ पार्थवीरे तेधवां ॥ २५० ॥
सहदेव नकुल भीमसेन ॥ आठवूनि आचार्याचे गुण ॥
शोकार्णवी जाहले निमग्न ॥ म्हणती धन्य द्रोण गुरु ॥ २५१ ॥
बालपणापासोनि चरित्र ॥ पार्थ आठविलें विचित्र ॥
आठवून गुरूचे उपकार ॥ खेद अपार करीतसे ॥ २५२ ॥
पार्थ बैसला उठोन ॥ म्हणे धृष्टद्युम्नचें शिर छेदीन ॥
तों सात्यकी शस्त्र घेऊन ॥ पांचालावरी चौताळला ॥ २५३ ॥
म्हणे गुरुद्रोही तूं चांडाल साचार ॥ तुझें आतांच छेदितों शिर ॥
मग सात्यकी यादववीर ॥ भीमसेनें आटोपिला ॥ २५४ ॥
अर्जुनास म्हणे श्रीपती ॥ होणार तें न चुके कल्पांतीं ॥
आचार्य पावला स्वरूपस्थिती ॥ स्थूल देह त्यजूनियां ॥ २५५ ॥
प्रेतशिर टाकिलें छेदूनी ॥ हा पुरुषार्थ कोण मानी ॥
तेणें द्रुपद मारिला रणीं ॥ तें धृष्टद्युम्ना न मानलें ॥ २५६ ॥
पित्याचा सूड घेऊन ॥ तेणें पुरुषार्थ दाविला पूर्ण ॥
शून्यघरीं नेऊन वाण ॥ व्यर्थ जैसें ठेविलें ॥ २५७ ॥
योगबळेकरून ॥ आचार्य सोडिला निजप्राण ॥
एरवीं त्याशीं समरांगण ॥ काळही करूं शकेना ॥ २५८ ॥
ऐसें बोलतां मन्मथतात ॥ उगेच राहिले सात्यकी पार्थ ॥
तों अश्वत्थामा पिटीत रथ ॥ पितयाजवळी पातला ॥ २५९ ॥
आचार्य गेला निजधामा ॥ धरणीवरी पडला अश्वत्थामा ॥
संसारमायामोहप्रेमा ॥ झळंबळला ते काळीं ॥ २६० ॥
कर्ण दुर्योधन शारद्वत ॥ शांतविती तेव्हां गुरुसुत ॥
म्हणती रडसी काय ऊठ त्वरित ॥ सूड घेई पितयाचा ॥ २६१ ॥
मग तों अश्वत्यामा वीर ॥ रथारूढ जाहला सत्वर ॥
पाठीशीं सकल कौरवभार ॥ युद्ध घोर मांडलें ॥ २६२ ॥
जैसा कल्पांतीं त्रिनेत्र ॥ तैसाचि दिसे द्रोणपुत्र ॥
पांडवसेना समग्र ॥ शरधारीं खिळियेली ॥ २६३ ॥
द्रोणपुत्राचा थोर मार ॥ कोणीही साहो न शकती समोर॥
मग तों कपिध्वज सोडीत शर ॥ परम आवेशें धावला ॥ २६४ ॥
बाणजाळ घालूनि बहुत ॥ समरी खिळिला गुरुसुत ॥
चाप सारथी तूणीर रथ ॥ छेदूनियां पाडिला ॥ २६५ ॥
पराभव पावला गुरुसुत ॥ युद्ध टाकूनि गेला त्वरित ॥
सरस्वतीतीरी बैसत ॥ दृढ आसन घालूनियां ॥ २६६ ॥
पांडवरहित करावी धरणी ॥ ऐसें तप मांडिलें ते क्षणीं ॥
तों वेदव्यास घेऊनी ॥ उभा ठाकला त्यापुढें ॥ २६७ ॥
म्हणे नर आणि नारायण ॥ ते हे अवतरले कृष्णार्जुन ॥
तूं तप व्यर्थ काय करून ॥ सिद्धि न पावे सर्वथा ॥ २६८ ॥
युद्ध सोडूनियां येथ ॥ तूं बैसलास तप करित ॥
तरी वीर हांसतील समस्त ॥ लाज गेली जन्मवरी ॥ २६९ ॥
म्हणतील हा अधीर विप्र सत्य ॥ पितयाचा सूड न घेववे बलहत ॥
म्हणोन बैसला तप करित ॥ द्रौणी यथार्थ म्हणे तेव्हां ॥ २७० ॥
मग स्थंदनारूढ होऊन ॥ सेनेंत मिसळला येऊन ॥
द्रोणपर्व संपलें येथून ॥ कर्णपर्व पुढें असे ॥ २७१ ॥
द्रोणपर्व करितां श्रवण ॥ एकशत यज्ञांचें श्रेय संपूर्ण ॥
ऐकतां विजय कल्याण ॥ होय क्षालन महादोषां ॥ २७२ ॥
रसाळ कथा व्यासभारत ॥ लेखक जाहला गौरीसुत ॥
परम विशाल अत्यद्‌भुत ॥ नाटोपेच आकळितां ॥ २७३ ॥
कथा न तुटतां सत्य ॥ त्यांतील सारांश जो रसभरित ॥
तोचि लिहिला असे येथ ॥ पंढरीनाथप्रसादें ॥ २७४ ॥
भीमातीर दिगंबर॥ ब्रह्मानंद अत्युदार ॥
श्रीधरवरद निर्विकार ॥ अभंग साचार न विटे ॥ २७५ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोणपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ शेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २७६ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे द्रोणपर्वणि षट्‌चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥
अध्याय सेहेचाळिसावा समाप्त


GO TOP