श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय पंचेचाळिसावा


अभिमन्यु वध


श्रीगणेशाय नम: ॥
जो सच्चिदानंद कमलापती ॥ तो जाहला पार्थाचा सारथी ॥
जो निजभक्तांचे मनोरथीं ॥ बैसोन सूत्रें हालवी ॥ १ ॥
मारोनियां भगदत्त ॥ विजय विजयी जाहला अद्‌भुत ॥
यावरी समसप्तकांकडे रथ ॥ चालविला त्वरेनें ॥ २ ॥
मिळाले त्रिगर्त समसप्तक ॥ सुशर्मा त्यांत असे मुख्य ॥
वेगळें युद्धबंड देख ॥ अनर्थकारक ओढवलें ॥ ३ ॥
युद्धास गोंविला अर्जुन ॥ इकडे काय जाहले वर्तमान ॥
चक्रव्यूह गुरु द्रोण ॥ रचिता जाहला अद्‌भुत ॥ ४ ॥
सुपर्णव्यूह पांडव रचित ॥ धर्मास अवघेचि रक्षित ॥
युद्ध मांडलें अद्‌भुत ॥ द्रोणा आणि भीमाशीं ॥ ५ ॥
नकुल सहदेव पांचाळ ॥ अवघे युद्ध करिती तुंबळ ॥
परी चक्रव्यूह भेदावया बळ ॥ कोणासही दिसेना ॥ ६ ॥
धर्म म्हणे असता पार्थ ॥ तरी हा व्यूह भेदिता निश्चित ॥
तों पुढें येऊनि सुभद्रासुत ॥ अभिमन्यू विनवीतसे ॥ ७ ॥
ताता मज आज्ञा द्याल जरी ॥ तरी हा व्यूह भेदीन निर्धारीं ॥
धर्म म्हणे ते अवसरीं ॥ तूं बाळक सुकुमार ॥ ८ ॥
मग बोले पार्थनंदन ॥ आम्हां क्षत्रियांचें रण तेंचि धन ॥
ताता तुमचे दयेकरून ॥ व्यूह फोडून जाईन मी ॥ ९ ॥
परम सुंदर सुभद्रासुत ॥ रूपाशीं तुळितां उणा मन्यथ ॥
दुसरा कृष्णचि मूर्तिमंत ॥ विराटजामात तो होय ॥ १० ॥
घनश्यामवर्ण राजीवनयन ॥ आजानुबाहु सुहास्यवदन ॥
जो पांडवांस प्राणांहून ॥ आवडता पांचांसही ॥ ११ ॥
ऐसा तों उत्तरावर॥ रथावरी चढला सत्वर॥
उदयाद्रीवरी दिनकर ॥ तैसा सुंदर दिसतसे ॥ १२ ॥
केला धर्मास नमस्कार॥ युद्धा निघाला पार्थकुमार ॥
तों एकशत राजपुत्र ॥ व्यूह पूर्ण रक्षिती ॥ १३ ॥
व्यूह भेदीत जाय सौभद्र ॥ दहा सहस्र मारिले कुंजर ॥
एक अयुत महावीर ॥ अश्वांसहित पाडिले ॥ १४ ॥
एक अयुत महारथी ॥ तत्काळ पाडी उत्तरापती ॥
जेथें शंभर राजपुत्र रक्षिती ॥ त्या स्थळासी पातला ॥ १५ ॥
दळासमवेत राजकुमार॥ एकल्यावरी सोडिती शरा ॥
परी तों आनकदुंदुभीकन्याकुमारा ॥ तितुके तोडी क्षणमात्रें ॥ १६ ॥
तितुक्यांचेंही बाणजाळ ॥ एका शरें छेदी सुभद्राबाळ ॥
जैसें उगवतां सूर्यमंडळ ॥ भगणें सर्व लोपती ॥ १७ ॥
एक उठतां विनायक ॥ असंख्य संहारी दंदशूक ॥
कीं सुटतां चंडवात देख ॥ जलदजाल वितुळे पैं ॥ १८ ॥
कीं विष्णुनामेंकरून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥
कीं चेततां कृशान ॥ असंख्य वनें दग्ध होती ॥ १९ ॥
कीं मुढाचें वाग्जाळ समस्त ॥ एकाच शब्दे खंडी पंडित ॥
एक सिंह गज बहुत ॥ पडती गतप्राण होउनी ॥ २० ॥
हृदयीं प्रकटतां बोध ॥ सहपरिवारें पळती काम क्रोध ॥
कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद विरघळती ॥ २१ ॥
तैसा एकलाचि धनंजयकुमार ॥ परी सैन्य केलें अवघें जर्जर ॥
कोणी वरी उचलितांच कर ॥ शस्त्रासहित भुजा छेदी ॥ २२ ॥
दुर्योधनपुत्र जो लक्ष्मण ॥ त्याशीं युद्ध केलें निर्वाण ॥
घेतला तत्काळ त्याचा प्राण॥ शिर उडवून पाडिलें ॥ २३ ॥
पृथक्‌ पृथक्‌ युद्ध केलें ॥ शतही राजपुत्र पाडिले ॥
अष्ट कौरव मारिले ॥ सुयोधनाचे बंधू पैं ॥ २४ ॥
बाण सोडित धांवला कर्ण ॥ तों दों बाणीं भेदिले त्याचे कर्ण ॥
अंग टाकून भानुनंदन ॥ पळता जाहला एकीकडे ॥ २५ ॥
दश बाणीं सुयोधन खिळिला ॥ द्रोण पंचबाणीं विंधिला ॥
जयद्रथ पळविला ॥ एकाच बाणेंकरूनी ॥ २६ ॥
अश्वत्यामा कृपाचार्य ॥ हेही पळती गतवीर्य ॥
देखोन अभिमन्यूचें शौर्य ॥ द्रोण मस्तक डोलवी ॥ २७ ॥
पूर्ण होय हा प्रत्यर्जुन ॥ ऐसें बोले गुरु द्रोण ॥
तों क्रोधें संतप्त दुर्योधन ॥ आचार्याप्रति बोलत ॥ २८ ॥
जैसा मदें मातला सूकर ॥ जिव्हेनें चोखितां छेदी जिव्हाग्र ॥
तैसा तूं आमुचा हितकर॥ पाहसी क्षुद्र सर्वदा ॥ २९ ॥
माझा प्रियपुत्र लक्ष्मण ॥ येणें मारिला न लागतां क्षण ॥
अजूनि काय पाहतां निर्वाण ॥ घ्यावा प्राण आजि याचा ॥ ३० ॥
व्यूहीं सांपडला पार्थकुमार ॥ तों सहाजण महावीर ॥
सोडिते जहाले निर्वाण शर ॥ एकलिया बालकावरी ॥ ३१ ॥
सुकुमार तो सौभद्र ॥ एकल्या हाणिती महावीर ॥
चहूंकडे पाहे तों सुंदर ॥ आपुलें कोणी दिसेना ॥ ३२ ॥
असता जरी पिता अर्जुन ॥ तरी साह्य करिता येथें पूर्ण ॥
जयद्रथ असे व्यूहद्वार धरून ॥ शिववरद तों नाटोपे ॥ ३३ ॥
आकांत झाला पांडवदळीं ॥ जवळी नाहीं पार्थ वनमाळी ॥
व्यूह फोडी ऐसा बळी ॥ कोणी नाहीं पांडवांत ॥ ३४ ॥
युद्ध करितां अभिमन्य ॥ कर्णें सोडिले निर्वाण बाण ॥
हातींचे धनुष्य तोडून ॥ बाणभाता छेदिला ॥ ३५ ॥
सारथी घोडे ते वेळे ॥ द्रोणाचार्यें मारिले ॥
मग अभिमन्यूनें खड्‍ग घेतलें ॥ रथावरून उतरला ॥ ३६ ॥
जैशी वीज लवून जाये ॥ तैसा अभिमन्यू तळपताहे ॥
तों दुर्योधनें लवलाहें ॥ खड्‌ग छेदिली हातींचें ॥ ३७ ॥
मग गदा घेऊन पार्थसुत ॥ अमित वीरांतें पाडित ॥
तों दुःशासनें त्वरित ॥ गदा छेदिली हातींची ॥ ३८ ॥
मग घेतलें रथचक्र ॥ तळपतसे सुभद्राकुमार ॥
जैसा श्रीकृष्ण चक्रधर॥ तैसा वीर दिसतसे ॥ ३९ ॥
कर्ण द्रोण दुर्योधन ॥ सोडिती बाणापाठीं बाण ॥
हातींचें रथचक्र जाण ॥ अश्वत्याम्यानें छेदिलें ॥ ४० ॥
तों दुःशासनपुत्र दौःशासनी ॥ वेगें आला गदा घेउनी ॥
अभिमन्यूनें तये क्षणीं ॥ गदा घेतली दुसरी ॥ ४१ ॥
दोघीं गदायुद्ध मांडिलें ॥ सकलीं बाणजाळ घातलें ॥
दौःशासनीस केलें ॥ अभिमन्यूनें मूर्च्छित ॥ ४२ ॥
सवेंचि दुःशासनसुतें ॥ हाणीतलें अभिमन्यूते ॥
दोघेही पावले मूर्च्छेतें ॥ गदाघातें एकमेकां ॥ ४३ ॥
मूर्च्छा सांवरोन दौःशासनी ॥ वेगें आला गदा घेउनी ॥
विकल सौभद्र पडला रणीं ॥ त्याचे मस्तकीं घातली ॥ ४४ ॥
तेणें चूर्ण जाहलें शिर ॥ पडला पडला पार्थकुमारा ॥
तों आकाशवाणी वदे उत्तर ॥ धर्मयुद्ध नव्हे हें ॥ ४५ ॥
सकळ दळभार एकवटला ॥ भोंवता पहावया पाळा पडला ॥
त्यांत जयद्रथें हाणीतला ॥ अभिमन्यू लातेनें ॥ ४६ ॥
द्रोणें धिक्कारिलें जयद्रथा ॥ दुर्जना वीरास हाणिसी लत्ता ॥
त्या अभिममूनें बाण सोडितां ॥ पळालासी त्वरेनें ॥ ४७ ॥
कौरव गेले समस्त ॥ अभिमन्यू घायें विलपत ॥
श्रीहरीचें नाम स्मरत ॥ वाट पाहत पार्थाची ॥ ४८ ॥
पांडवदळीं आकांत दारुण ॥ धर्मराज करी रोदन ॥
आतां येईल अर्जुन ॥ त्यास वदन काय दाखवूं ॥ ४९ ॥
दिवस गेला अस्तमानासी ॥ वधोन येता समसप्तकांसी ॥
अपशकुन पार्थासी ॥ मार्गीं येतां बहुत होती ॥ ५० ॥
धर्माजवळी आला अर्जुन ॥ अवघे बैसले अधोवदन ॥
पार्थ पुसे कोठें अभिमन्य ॥ कां उत्साह मंदिरीं दिसेना ॥ ५१ ॥
धर्म बैसला अधोवदन ॥ कां मौन धरी हो भीमसेन ॥
म्हणती संसारमाया त्यागून ॥ अभिमन्यु गेला स्वर्गातें ॥ ५२ ॥
रथाखालीं पडला अर्जुन ॥ पुत्रशोकें करी रोदन ॥
मग श्रीकृष्णें सांवरून ॥ सावध केलें पार्थातें ॥ ५३ ॥
अर्जुन अवघ्यांस धिक्कारित ॥ जळो जळो रे तुमचा पुरुषार्थ ॥
इतुके असतां माझा सुत ॥ कां पाठविला संग्रामा ॥ ५४ ॥
अहो धर्म भीम माद्रीसुत ॥ धिक्‌ जळो तुमचा पुरुषार्थ ॥
हे विराट पांचाळ भूभुज समस्त ॥ धिक्‌ जीवित हिंडतां ॥ ५५ ॥
उपलव्यनगराहूनी ॥ उत्तरा सुभद्रा द्रौपदी धांवोनी ॥
येत्या जाहल्या तेच क्षणीं ॥ हृदय पिटिती अतिदुखें ॥ ५६ ॥
सुभद्रेनें आपुलें शरीर ॥ पृथ्वीवरी टाकिलें न धरवे धीर ॥
माझा अभिमन्यु सुकुमार ॥ दाखवा एकदा पाहीन मी ॥ ५७ ॥
हे अभिमन्यो कमललोचना ॥ हे सौभद्रा चंद्रवदना ॥
हे कोमलांगा मृदुभाषणा ॥ येवोनियां मज भेटें ॥ ५८ ॥
हे बाळा घनश्यामवर्णा ॥ हे अभिमन्यो प्रत्यर्जुना ॥
महावीरा सुहास्यवदना ॥ ये धांवोन मज भेटे ॥ ५९ ॥
हे मातुललक्षणा आकर्णनेत्रा ॥ हे आजानुबाहू कोमलगात्रा ॥
हे यादवपांडवप्रियकरा ॥ वीरा उदारा धांवें कां ॥ ६० ॥
द्रौपदी म्हणे अभिमन्या ॥ हे वत्सा सद्‌गुणनिधाना ॥
तरुण तुझी बा अंगना ॥ उत्तरा आतां करील काय ॥ ६१ ॥
हे किशोरी परमोदारा ॥ समरधीरा प्रतापशूरा ॥
पांडवकुलदीपा सुंदरा ॥ केली त्वरा सर्वांआधीं ॥ ६२ ॥
सुभद्रा द्रौपदी शोक करित ॥ उत्तरेच्या गळां मिठी घालित ॥
तें देखोन पार्थ रमाकांत ॥ शोकार्णवीं बुडाले ॥ ६३ ॥
संसारमाया परम दुस्तर ॥ जो जगद्‌गुरू जगदुद्धार ॥
त्यासही दाटला गहिवर ॥ सुभद्रादेवी देखोनी ॥ ६४ ॥
पूर्णब्रह्म सनातन ॥ मायातीत शुद्ध चैतन्य ॥
परी समयाचा अभिप्राय पूर्ण ॥ नारायण दावितसे ॥ ६५ ॥
बोले सुभद्रा वेल्हाळ ॥ सांपडला व्यूहामाजी बाळ ॥
इतुके वीर असतां सबळ ॥ पाठी कोणी न राखेचि ॥ ६६ ॥
विकल पडतां माझा किशोर ॥ जयद्रथें दिला लत्ताप्रहार ॥
धिक्‌ गांडीव धिक्‌ तूणीर ॥ धिक्‌ यदुवीर पार्थ पैं ॥ ६७ ॥
यांही वेगळा अपरिमित ॥ धर्माचे शोकास नाहीं अंत ॥
तों व्यास आणि ब्रह्मसुत ॥ नारदस्वामी प्रकटले ॥ ६८ ॥
सर्वांचेंही समाधान ॥ करीत सत्यवतीहृदयरत्‍न ॥
म्हणे सुभद्रे तूं सुजाण ॥ भगिनी होशी हरीची ॥ ६९ ॥
वीरपत्‍नी वीरजननी ॥ वीरकुमारी यदुवीरभगिनी ॥
अभिमन्यु पडला समरांगणीं ॥ शोक न करीं तयाचा ॥ ७० ॥
व्रतें तपें तीर्थें करिती ॥ जे योगयागादि दानें देती ॥
त्याहूनि या वीरा उत्तम गती ॥ वेदशास्त्रीं बोलिलीसे ॥ ७१ ॥
विधियुक्त कोटी गोदान ॥ पर्वतातुल्य दिलें सुवर्ण ॥
समरी वीर त्यजितां प्राण ॥ गति त्याहून तयासी ॥ ७२ ॥
प्रयागीं आजन्म स्नाना ॥ करिती कुंभिनीप्रदक्षिणा ॥
समरीं वीर त्यजितां प्राणा ॥ गति त्याहून तयासी ॥ ७३ ॥
ऐका धर्मभीमार्जुना ॥ शोक करितां कोण्या कारणा ॥
हे अवघी ब्रह्मांडरचना ॥ लया जाईल कल्पांतीं ॥ ७४ ॥
आकारा आले जे जे पदार्थ ॥ तितुके मायामय नाशवंत ॥
मिथ्या माया स्वप्नवत ॥ दीर्घदृष्टी विचारा ॥ ७५ ॥
शुक्तिकेवरी दिसे रजत ॥ स्थाणु असतां तस्कर दिसत ॥
दोर असतां भुजंग भासत ॥ मिथ्याभूत सर्वही ॥ ७६ ॥
बहुतीं भोगिली हे जगती ॥ तितुकेही गेले मृत्युपंथीं ॥
आतां आहेत पुढें होती ॥ सर्वही जाती चूकेना ॥ ७७ ॥
गृह धन सुत वल्लभा ॥ दास दासी स्वजन प्रभा ॥
भास्कराची जलांत शोभा ॥ मिथ्यामय लटकीच ॥ ७८ ॥
संसार हा दीर्घस्वप्न ॥ व्यर्थ मी माझें म्हणोन ॥
सावध व्हा उघडा नयन ॥ निजमानसीं विचारा ॥ ७९ ॥
असो व्यासें सांगून बहुत कथा ॥ सावधान केलें कुंतीसुतां ॥
नारद आणि श्रीशुकपिता ॥ अंतर्धान पावले ॥ ८० ॥
मग सुभद्रेस म्हणे पार्थ ॥ उद्यांच वधीन जयद्रथ ॥
कौरवदळ समस्त ॥ तृणवत्‌ सर्व जाळीन मी ॥ ८१ ॥
हें जरी नव्हे माझेनी ॥ तरी व्यर्थ प्रसवली पृथा जननी ॥
डाग लागला कुरुवंशालागोनी ॥ कृष्णदास्य वृथा गेलें ॥ ८२ ॥
कोठे पडला रणीं बाळ ॥ तों पहावया पार्थ घननीळ ॥
निघते जाहले तत्काळ ॥ निशीमाजी तेधवां ॥ ८३ ॥
रथ वेगें चालविला ॥ चंद्रज्योतीच्या प्रकाश पडला ॥
रण शोध निघाला ॥ पार्थवीर तेधवां ॥ ८४ ॥
अभिमन्युनें रण पाडिलें देखोन ॥ आश्चर्य करिती कृष्णार्जुन ॥
बहुत केलें रणशोधन ॥ परी बाळ कोठे न सांपडे ॥ ८५ ॥
तों मंजुळ श्रीहरीचें स्मरण ॥ ऐकता जाहला अर्जुन ॥
हे जगन्निवास मनमोहन ॥ मधुसूदना श्रीहरे ॥ ८६ ॥
कृष्णा गोविंदा नारायणा ॥ अच्युता अनंता जगज्जीवना ॥
रमारमणा आनंदघना ॥ जनार्दना सर्वेशा ॥ ८७ ॥
क्षीरसागरविहारा ॥ शेषशायी विश्वंभरा ॥
भक्तविसांविया श्रीधरा ॥ करुणाकरा धावे कां ॥ ८८ ॥
ऐसे अभिमन्यूचे शब्द कोमळ ॥ अर्जुने ओळखिले तत्काळ ॥
रथारूढ पार्थ घननीळ ॥ आले जवळ धांवोनी ॥ ८९ ॥
अभिमन्यूनें नेत्र उघडिले ॥ पार्थें अंग धरणीस घातलें ॥
अभिमन्यूस पोटाशीं धरिलें ॥ पार्थ मांडिलें शोकातें ॥ ९० ॥
अरे माझिया सुकुमारा ॥ बाळा अभिमन्या सुंदरा ॥
मजवांचून राजकुमारा ॥ कां आलासी रणभूमी ॥ ९१ ॥
अभिमन्यू स्मरत नामावळी ॥ जवळी आले कृष्ण वनमाळी ॥
उकसाबुकसीं ते वेळीं ॥ पार्थ वीर स्फुंदत ॥ ९२ ॥
पार्थाचिया कानीं ॥ हळूच अभिमन्यू बोले वाणी ॥
मी पडिलों घोररणीं ॥ याचा खेद मज नाहीं ॥ ९३ ॥
मी निश्चेष्टित पडिलों येथें ॥ मज लत्ताप्रहार केला जयद्रथें ॥
तेणें सर्वांग तिडकतें ॥ माझे कांहीं न चालेचि ॥ ९४ ॥
ऐसें ऐकून वचन ॥ संबोखूनि बोले अर्जुन ॥
तुझें उसणें मी घेईन ॥ कांहीं खेद न आठवीं ॥ ९५ ॥
बा रे सुकुमारा परियेसीं ॥ उद्यां जरी न मारीन जयद्रथासी ॥
तरी अग्निकाष्ठें भक्षीन निश्चयेंशी ॥ तुझीच आण अभिमन्या ॥ ९६ ॥
न्यहाळित श्रीकृष्णवदन ॥ मुखें करीत हरिस्मरण ॥
अभिमन्यूनें सोडिला प्राण ॥ कृष्ण आपण पहातसे ॥ ९७ ॥
अंतरीं हरीचें ध्यान ॥ वदनीं करीत नामस्मरण ॥
हरिपद अभिमन्य ॥ पावला पूर्ण निर्धारे ॥ ९८ ॥
असो श्रीकृष्णें पार्थ संबोखिला ॥ रथीं बैसवून शिबिरास नेला ॥
निद्रा न ये अवघ्या दळाला ॥ चिंताग्नींत पडियेलें ॥ ९९ ॥
पार्थ प्रतिज्ञा केली दुर्धर॥ ते सिद्धी पाववील यादवेंद्र ॥
आपुले शिबिराप्रति श्रीधर॥ जाता जाहला तेधवां ॥ १०० ॥
पार्थप्रतिज्ञा चित्तीं देखा ॥ निद्रा न ये विश्वव्यापका ॥
तों श्रीकृष्ण परमसखा ॥ दारुकाप्रति बोलत ॥ १०१ ॥
उदयीक निर्वाण पण ॥ कैसा सिद्धीस नेईल अर्जुन ॥
धनंजय केवळ माझा प्राण ॥ मज त्याविण न गमेचि ॥ १०२ ॥
दारुका ऐक एक वचन ॥ उद्यां सिद्ध करीं माझा स्यंदन ॥
घोडे चार जुंपून ॥ शैव्यसुग्रीवादि श्रृंगारी ॥ १०३ ॥
सतेज आयुधें परम ॥ शंख चक्र गदा पद्य ॥
वरी ठेवूनि उत्तमोत्तम ॥ सिद्ध स्यंदन असो दे ॥ १०४ ॥
पार्थास जाहलिया विपरीत ॥ तुज मी दावीन संकेत ॥
मनोवेगें आणीं रथ ॥ बैसावयासी मज तेव्हां ॥ १०५ ॥
सोडोनियां सुदर्शन ॥ संहारीन कौरव दुर्जन ॥
ऐसें सांगोन जगन्मोहन ॥ पार्थाजवळी पातला ॥ १०६ ॥
केशवासी म्हणे पार्थ ॥ म्यां जी केली दृढ शपथ ॥
ती तुजविण समर्थ ॥ सिद्धीस कोण पावविता ॥ १०७ ॥
भक्तकैवारिया माधवा ॥ पण आतां सिद्धीस न्यावा ॥
दीनबंधो करुणार्णवा ॥ ब्रीद आपुलें सांभाळी ॥ १०८ ॥
द्विजेंद्रवहना क्षीराब्धिनिकेतना ॥ गरुडध्वजा दुर्जनवनदहना ॥
वाढविलें आम्हां जगज्जीवना ॥ मधुसूदना लाज राखीं ॥ १०९ ॥
अद्यापि काष्ठ न बुडवी जीवन ॥ आपण वाढविले हा अभिमान ॥
पांडवपालक हें ब्रीद संपूर्ण ॥ ब्रह्मांडोदरीं गाजतसे ॥ ११० ॥
काष्ठें कोरीत भ्रमर ॥ परी कमल न फोडी अणुमात्र ॥
आम्हां रक्षिता मुरहर ॥ त्याचपरी सर्वस्वें तूं ॥ १११ ॥
मागील उपकार आठवितां ॥ पृथ्वी न पुरे यश लिहितां ॥
विश्वव्यापका अच्युता॥ ऋणाइता आमुच्या पैं ॥ ११२ ॥
यावरी उठोन प्रातःकालीं ॥ स्नानादि सत्कर्में सारिलीं ॥
दोन्ही दळें सिद्ध जाहलीं ॥ घाई लागली वाद्यांची ॥ ११३ ॥
धर्में येऊन त्वरितगतीं ॥ मन्मथतात स्तविला प्रीतीं ॥
अर्जुनास धरोनियां हातीं ॥ श्रीकृष्णकरीं दिधला ॥ ११४ ॥
जयवेद बुडाला कौरवसागरीं ॥ तों काढीं मत्स्यरूपिया श्रीहरी ॥
शंखासुर हे पूतनारी ॥ जयद्रथ मारीं कां ॥ ११५ ॥
पांडवलज्‍जा हे कुंभिनी ॥ बुडते सांवरीं पृष्ठी देऊनी ॥
कूर्मदृष्टि करूनी ॥ विलोकीं आज बालकांतें ॥ ११६ ॥
असो दशावतारलीळा ॥ एथें दाखवीं घननीळा ॥
जनकजननी गोपाळा ॥ तूंच आमुची सर्वस्वें ॥ ११७ ॥
धर्में हृदयीं धरिला अर्जुन ॥ म्हणे लवकर येई विजयी होऊन ॥
कृष्णार्जुन धर्मासी नमून ॥ रथावरी बैसले ॥ ११८ ॥
ते वेळे पार्थक्रोधाग्नी ॥ न मायेच ब्रह्मांडभुवनीं ॥
जैसा ऊर्मिलानाथ पैं पडतां रणीं ॥ भूमिजावर संतापला ॥ ११९ ॥
अर्जुने केली दृढ शपथ ॥ जयद्रथ मनीं भयभीत ॥
दुर्योधनास निरोप मागत ॥ मी करितों आतां देशत्याग ॥ १२० ॥
द्रोण म्हणे व्यूह करून ॥ तुज आम्ही रक्षितों पूर्ण ॥
मग सहा गावे लंबायमान ॥ शकटव्यूह रचियेला ॥ १२१ ॥
शकटव्यूहाचें मध्यकमळ ॥ त्यामाजी जें केशरस्थळ ॥
भ्रमरप्राय जयद्रथ केवळ ॥ संकोचून बैसला ॥ १२२ ॥
इकडे रण माजलें अपार ॥ पुढें आला पार्थ वीर॥
लागला वाद्यांचा गजर ॥ भूगोल तेणें कांपतसे ॥ १२३ ॥
ध्वजीं जनकजाशोकहरण ॥ सत्राणें केलें घोर गर्जन ॥
आरोळ्या पिटिती दारुण ॥ भोंवतीं भूतें तेधवा ॥ १२४ ॥
पांचजन्य देवदत्त ॥ उभयकृष्ण वाजवित ॥
घडघडला विजयरथ ॥ दोन्ही दळे विलोकिती ॥ १२५ ॥
अर्जुनास म्हणे मनमोहन ॥ तूं आधीं सोडीं सवेग बाण ॥
मग मी धांवडितों स्यंदन ॥ पुढें कोण जात पाहूं ॥ १२६ ॥
धनंजयें सोडिला शर ॥ रथ धांवडी यादवेंद्र ॥
बाण टाकून रहंवर ॥ गेला पुढें चपलत्वें ॥ १२७ ॥
कौरवभार फोडून रथ ॥ मनोवेगें माघारा येत ॥
तों रथापुढें अकस्मात ॥ बाण येऊन पडियेला॥ १२८ ॥
पार्थ ओळखिला आपला बाण ॥ म्हणे हे जगन्निवास भक्तरक्षण ॥
अश्वामाजी वेग पूर्ण ॥ ऐसा कैंचा परमात्मया ॥ १२९ ॥
त्या तुरंगांचा अंतरात्मा ॥ तूं जाहलास मेघश्यामा ॥
भक्तकामकल्पद्रुमा ॥ तुझा महिमा कोण जाणे ॥ १३० ॥
पार्थास म्हणे इंदिरावर ॥ आज ऐसाच चालवीन रहंवर ॥
छेदीं तूं जयद्रथाचें शिर ॥ विजयध्वज उभारीं ॥ १३१ ॥
द्रौपदी सुभद्रा उत्तरा ॥ यांस सुख देईं महावीरा ॥
निर्दोष यशाचा तुरा ॥ खोंवीं मुकुटीं आजि पां ॥ १३२ ॥
व्यूह पाहे अर्जुन ॥ तंव द्वारीं उभा असे गुरु द्रोण ॥
पार्थ टाकिला दंडवत बाण ॥ सव्य घालून चालिला ॥ १३३ ॥
महावीरांस ऐसें वाटत ॥ पार्थ नव्हे हा आला कृतांत ॥
अवघे म्हणती मांडला अंत ॥ सेना तत्त्वतां उरेना ॥ १३४ ॥
तों पुढें धांवला दुःशासन ॥ वर्षता जाहला अमित बाण ॥
गजभार चालती दारुण ॥ महागिरिवर ज्यापरी ॥ १३५ ॥
सव्यसाची नामाभिधान ॥ दोन्ही हातांचें समसंधान ॥
अलातचक्रवत सायकासन ॥ ओढितेवेळीं दिसतसे ॥ १३६ ॥
विद्युल्लतेऐसे दिव्य शर ॥ अंगीं रुपताती अपार ॥
केला दुःशासन जर्जर ॥ पळे सत्वर एकीकडे ॥ १३७ ॥
एक एक शर दारुण ॥ घेत पांचसातांचा प्राण ॥
गजकलेवरें फोडून ॥ पर्वतप्राय पाडिलीं ॥ १३८ ॥
तों तेथें वर्षत शर ॥ आचार्य आला समोर॥
नमून बोले महावीर॥ मी तुझा पुत्र गुरुवर्या ॥ १३९ ॥
मज आशीर्वाद देई ये अवसरीं ॥ प्रतिज्ञा माझी करीं खरी ॥
युद्धलाघव क्षणभरी ॥ द्रोणास तेथें दाखविलें ॥ १४० ॥
द्रोणास म्हणे पार्थ वीर॥ तुम्हां आम्हां नाहीं वैर॥
मग प्रदक्षिणा करून सत्वर ॥ करीत संहार चालिला ॥ १४१ ॥
देशोदेशींचे नृपवर॥ एकदांच धांवती समग्र ॥
सोडिती बाणांचा पूर॥ अर्जुनावरी एकलिया ॥ १४२ ॥
सर्वांचेही शर तोडून ॥ शरीं खिळिले राव संपूर्ण ॥
जैसा मेघमंडप देखोन ॥ पिच्छें शिखी पसरिती ॥ १४३ ॥
कृतवर्मा धांवला समोर॥ सोडीत शरापाठीं शरा ॥
चतुराचे मुखांतून सत्वर ॥ शब्द जैसे निघती पैं ॥ १४४ ॥
कृतवर्म्याचें हृदय लक्षून ॥ पार्थ सोडिले पांच बाण ॥
कीं पंचसौदामिनी येऊन ॥ हृदयामाजी संचरल्या ॥ १४५ ॥
तेव्हां कृतवर्मा मूर्छा येऊन ॥ ध्वजस्तंभीं टेकला जाण ॥
सूतें काढूनियां स्यंदन ॥ नेला तेव्हां एकीकडे ॥ १४६ ॥
पार्थाचे पाठीराखे तिघेजण ॥ आले दळासह धांवोन ॥
सात्यकी आणि युधामन्य ॥ उत्तमौजा तिसरा पैं ॥ १४७ ॥
रणीं राखिती जे पाठी ॥ तेच मित्र धन्य ये सृष्टीं ॥
त्यांस देखोनि जगजेठी ॥ हृदयामाजी संतोषे ॥ १४८ ॥
श्रुतायुध जो वरुणपुत्र ॥ कौरवांचा परम मित्र ॥
तों रथारूढ सत्वर ॥ बाण सोडीत धांवला ॥ १४९ ॥
त्यास प्रसन्न होऊन वरुण ॥ अस्त्रें शस्त्रें देत संपूर्ण ॥
आणि एक गदा देऊन निर्वाण ॥ पुत्राप्रति बोलिला ॥ १५० ॥
शस्त्रधर जो परम योद्धा ॥ त्यावरीच सोडीं हे गदा ॥
निशस्त्रियावरी हे कदा ॥ सहसाही सोडूं नये ॥ १५१ ॥
यद्यपि सोडिशील जाण ॥ तरी परतोन घेईल तुझा प्राण ॥
तों श्रुतायुध बाणेंकरून ॥ समरीं खिळिला धनंजयें ॥ १५२ ॥
पार्थाचे रथीं वैकुंठपती ॥ रथ चालवीत पवनगती ॥
श्रुतायुध कोपोनि चित्तीं ॥ गदा प्रेरिली हरीवरी ॥ १५३ ॥
ती विजेऐसी गदा आली ॥ जनार्दनाचे हृदयीं आदळली ॥
सच्चिदानंदी मूर्ति सावळी ॥ नाहीं ढळली रथावरूनी ॥ १५४ ॥
ते वरुणगदा परम दारुण ॥ मेरुमंदार करील चूर्ण ॥
जो षड्‌विकाररहित भगवान ॥ तेणेंचि हृदयीं सोशिली ते ॥ १५५ ॥
परी निःशस्त्र कंसांतक जाण ॥ गदा फिरली मनोवेगेंकरून ॥
श्रुतायुधाचे हृदयीं भरोन ॥ घेतला प्राण तयाचा ॥ १५६ ॥
उभयदळीं आश्चर्य जाहलें ॥ म्हणती हें अद्‌भुत वर्तलें ॥
आपुलें आपण शस्त्र परतलें ॥ कोणी हातीं न धरितां ॥ १५७ ॥
मग जे भोजपुत्र सुदक्षिण ॥ श्रुतायु अच्युतायु तिघेजण ॥
अपार म्लेंच्छभार घेऊन ॥ विजयावरी धांवले ॥ १५८ ॥
तितुक्यांचींही शिरें ॥ पार्थें छेदिलीं क्षणमात्रें ॥
तें देखोनि प्रज्ञाचक्षूचे ज्येष्ठपुत्रें ॥ द्रोणाप्रति म्हणितलें ॥ १५९ ॥
कीं आजि रक्षावा जयद्रथ ॥ वासरमणि पावतां अस्त ॥
अग्निकाष्ठें भक्षील पार्थ ॥ टळेल अनर्थ इतुकेनि ॥ १६० ॥
मग द्रोण म्हणे व्यूहद्वार ॥ मी रक्षितों दृढ साचार॥
तुम्हीं मिळून समस्त वीर ॥ जयद्रथ रक्षावा ॥ १६१ ॥
तों इकडे विंदानुविंद दोघेजण ॥ अवंतीदेशींचे राजे दारुण ॥
धनंजयें सोडून बाण ॥ शिरें त्यांचीं छेदिलीं ॥ १६२ ॥
शिवदत्त कवच अभेद्य जाणा ॥ द्रोणें लेवविलें दुर्योधना ॥
ज्यावरी शस्त्र रुपेना ॥ कोणाचेंही कल्पांतीं ॥ १६३ ॥
त्या कवचबळेंकरून ॥ युद्ध करी दुर्योधन ॥
पार्थें टाकिले निर्वाणबाण ॥ परी कवच न भेदे ॥ १६४ ॥
जो मधुमुरविनाशक पूर्ण ॥ तों युक्ति सांगे पार्थालागून ॥
कीं हस्त आणि चरण॥ उघडे बाणीं खिळी ते ॥ १६५ ॥
मग चरण आणि मणगटें दोनीं ॥ पार्थें फोडिलीं तीक्ष्ण बाणीं ॥
त्याच भयेंकरूनी ॥ दुर्योधन पळाला ॥ १६६ ॥
इकडे धर्म भीम सहदेव नकुळ ॥ पांचाळीचे पांचही बाळ ॥
द्रोणावरी बाणजाळ ॥ घालिते जाहले तेधवां ॥ १६७ ॥
सोडून सात्यकीनें शर ॥ मारिला व्याघ्रदंत महावीर॥
अलंबुष नामा असुर॥ घटोत्‍कचें संहारिला ॥ १६८ ॥
रुक्मिणीहृदयीचें जें रत्‍न ॥ तों धर्मास रक्षी प्रद्युम्न ॥
जलसंध गजारूढ होऊन ॥ सात्यकीशीं युद्ध करी ॥ १६९ ॥
परम लाघवी सात्यकी वीर॥ परी जलसंधें आटिलें दळ अपार ॥
मग सोडून निर्वाण शरा ॥ छेदिलें शिर जलसंधाचें ॥ १७० ॥
तयाचे कैवारें भूरिश्रवा ॥ सात्यकीवरी धांवला जेव्हां ॥
कर्ण आणि भीम तेव्हां ॥ सीमेरहित भीडती ॥ १७१ ॥
भूरिश्रव्याचें शिर तेथें ॥ सात्यकीनें उडविलें पुरुषार्थें ॥
चिंतासागरीं अंधसुतें ॥ पेणें केलें तेधवां ॥ १७२ ॥
पार्थें वीर संहारिले अपार॥ वेग करीं म्हणे सर्वेश्वर॥
दिवस आला दोन प्रहर॥ तृषाक्रांत वारू जाहले ॥ १७३ ॥
धनंजय जाहला तृषाक्रांत ॥ अश्वही विकळ जाहले बहुत ॥
कौरव देखोन म्हणत ॥ इतुक्यांत पार्थ जिंकावा ॥ १७४ ॥
अर्जुने बाण धाडोनि पाताळा ॥ काढिलें भोगावतीच्या जळा ॥
अक्षोभ सरोवर भरला ॥ भोंवते वृक्ष विराजती ॥ १७५ ॥
विशाळ सरोवर शीतळ जळ ॥ तीरीं विराजती मराळ ॥
सुवर्णकमलावरी अलिकुल ॥ रुंजी सदा घालिती ॥ १७६ ॥
कौरवदळ विस्मित पाहत ॥ म्हणती धन्य धन्य वीर पार्थ ॥
अर्जुन उदक सेवित ॥ घोडे सोडीत श्रीकृष्ण ॥ १७७ ॥
मग वारूंचे वाग्दोरे ॥ हातीं धरिले रमावरे ॥
सच्चिदानंद सर्वेश्वरें ॥ चाबूक माथां खोविला ॥ १७८ ॥
हयमुखींची लाळ ॥ स्वकरें धूत तमालनीळ ॥
अंगींचे बाण उपटून सकळ ॥ हस्त फिरवी परमात्मा ॥ १७९ ॥
जो हस्त फिरावया माथां ॥ इच्छिती शिव पुरंदर विधाता ॥
तों हस्त हयांसी लागतां ॥ क्षतें सर्व बुजालीं ॥ १८० ॥
अश्वांचे अंगींचा कंडू सकळ ॥ नखेंकरून निववी गोपाळ ॥
अंजलि भरून सलिळ ॥ वेळोवेळां वरी घाली ॥ १८१ ॥
सुरंग होतांच चंचळ ॥ हो हो म्हणे वैकुंठपाळ ॥
त्रिभुवन विस्मित सकळ ॥ पांडवभाग्य वर्णिती ॥ १८२ ॥
इतुक्यांत कौरव बाणजाळ ॥ विजयावरी घालिती सकळ ॥
पार्थास म्हणे घननीळ ॥ बाणजाळ छेदीं हें ॥ १८३ ॥
रथाखालीं उभा अर्जुन ॥ गांडीवचाप चढवून ॥
अपार सोडून मार्गण ॥ बाणजाळ छेदिलें ॥ १८४ ॥
अश्व धुवोन जगजीवन ॥ रथीं योजी न लागतां क्षण ॥
अर्जुनास हात देऊन ॥ रथावरी आरूढविला ॥ १८५ ॥
बाप बाप बोलोन तेव्हां ॥ थापटी तुरंगांच्या ग्रीवा ॥
सादर होऊन मधवा ॥ विलोकित प्रेमभरें ॥ १८६ ॥
माझा पुत्र सभाग्य परम ॥ नीचकर्में करी पुरुषोत्तम ॥
आनंदाश्रू उत्तम ॥ शक्राचे नयनीं लोटले ॥ १८७ ॥
घोडे धुऊन आणिले ॥ स्यंदनीं जे वेळे जुंपिले ॥
सरोवर तत्काळ आटलें ॥ युद्ध मांडलें पुढती पैं ॥ १८८ ॥
उभयकृष्ण एके रथीं ॥ पवनवेंगे वारू जाती ॥
कौरवदळींचे सारथी ॥ विलोकिती कौतुकें ॥ १८९ ॥
सव्यसाची क्रोधायमान ॥ वामसव्य समसंधान ॥
पार्था त्वरा करीं म्हणोन ॥ खगकेतन बोलतसे ॥ १९० ॥
सहा गावे व्यूह रचिला ॥ जिंकितां तिसरा प्रहर जाहला ॥
प्रहर एक दिवस उरला ॥ कृष्ण विचारी मानसीं ॥ १९१ ॥
कीं दिवस उरला किंचित ॥ असाध्य आतां जयद्रथ ॥
प्राण त्यजील माझा पार्थ ॥ मग दीनानाथ काय करी ॥ १९२ ॥
सुदर्शन आड घातलें ॥ दिनकरास लपविलें ॥
अर्जुनास तें न कळे ॥ वीरश्रियेचेनि माजें ॥ १९३ ॥
घे घे म्हणे अर्जुन ॥ मग बोले जगज्जीवन ॥
सरले सरले दिनमान ॥ आलें रे मरण तुजलागीं ॥ १९४ ॥
अर्जुनें सूर्याकडे पाहिलें ॥ तों सूर्यबिंब मावळलें ॥
गांडीव हातींचें ठेविलें ॥ कुंड रचिलें तेधवां ॥ १९५ ॥
अग्निकाष्ठें भक्षावया अर्जुन ॥ सिद्ध जाहला जाणोन ॥
धर्म भीम सकल सैन्य ॥ शोक करिती तेधवां ॥ १९६ ॥
कौरवांस हर्ष थोर ॥ कीं अनायासें मरतो पार्थ वीर॥
मग पहावया समग्र ॥ पांडव कौरव पैं आले ॥ १९७ ॥
कुंडीं धडाडिला तेव्हां अग्नी ॥ अर्जुन आला स्नान करोनी ॥
मग श्रीकृष्णास नमोनी ॥ तीन केल्या प्रदक्षिणा ॥ १९८ ॥
पहावया आले समस्त॥ चोरून पाहे जयद्रथ ॥
तें देखोन श्रीकृष्णनाथ ॥ काय बोलत पार्थासी ॥ १९९ ॥
स्त्री भ्रतारासवें जाय ॥ तैसा अग्निप्रवेश न करिसी काय ॥
आपुलें धनुष्यबाण लवलाहें ॥ समागमें घेईं कां ॥ २०० ॥
धनुष्यास बाण चढवून ॥ कुंडास करीं प्रदक्षिणा ॥
मग तैसेंच करी श्वेतवाहन ॥ कौरव सर्व पाहती ॥ २०१ ॥
चोरून पाहे जयद्रथ ॥ तें देखोन कौरव समस्त ॥
म्हणती तुजसाठीं हा होतो अनर्थ ॥ तूं कां येथें आलासी ॥ २०२ ॥
जयद्रथ म्हणे बरें जाहले ॥ अर्जुनास तों मरण आलें ॥
आतां पांडव एकेच वेळे ॥ उद्यां सर्व जिंकीन ॥ २०३ ॥
इकडे प्रदक्षिणा करी अर्जुन ॥ धनुष्य ओढून आकर्ण ॥
तों हळूच कानीं सांगे जगज्जीवन ॥ पैल जयद्रथ पाहें पां ॥ २०४ ॥
इतुक्यांत काढिलें सुदर्शन ॥ तों अर्धघटिका दिवस पूर्ण ॥
पार्था हा सूर्य तों जयद्रथ दुर्जन ॥ सोडीं बाण वेगें पैं ॥ २०५ ॥
ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ निमेष न लागतां गेला बाण ॥
जयद्रथाचें शिर छेदून ॥ आकाशपंथे उडविलें ॥ २०६ ॥
ज्याचे हस्तीं हें पडेल शिरा ॥ त्यास तत्काल मृत्यु साचार॥
अर्जुनास म्हणे सर्वेश्वर ॥ शिर वेगें उडवीं पां ॥ २०७ ॥
सिंधुराज जयद्रथाचा पिता ॥ पश्चिमसमुद्रीं तप करीत होता ॥
संध्यावंदनीं अर्ध्य देतां ॥ शिर पडलें तया हातीं ॥ २०८ ॥
तेणें हातींचें टाकिलें शिर ॥ तों तेथेंच मृत्यु पावला नृपवर ॥
सूत्रधारी तों यदुवीर ॥ नाना कौतुक दावीतसे ॥ २०९ ॥
दिनमणि पावतां अस्त ॥ इतक्यांत मारिला जयद्रथ ॥
विजयवाद्यें वाजवित ॥ पार्थ तेव्हां परतला ॥ २१० ॥
दुर्धर पण साधिला देख ॥ कौरवांसी दिलें महादुःख ॥
शोकें विव्हळ सकळिक ॥ भ्रमले विवेक समजेना ॥ २११ ॥
दुःशीला दुर्योधनाची भगिनी ॥ ते जयद्रथाची होय गृहिणी ॥
गांधारी धृतराष्ट्र ऐकोनीं ॥ जामातदुःखे विव्हळती ॥ २१२ ॥
धर्मास सांगती दूत ॥ कीं रणीं मारून जयद्रथ ॥
पैल कपिवरध्वज झळकत ॥ शिबिराप्रति येतसे ॥ २१३ ॥
विजयवाद्यांचे गजर ॥ पांडवदळी होती अपार॥
पुष्पवृष्टि वारंवार॥ पुरंदर करीतसे ॥ २१४ ॥
रथाखालीं उतरतां कृष्णार्जुन ॥ धर्मराज पुढें येऊन ॥
श्रीरंगाचे चरणीं नमन ॥ करून स्तवन करीतसे ॥ २१५ ॥
म्हणे कुंतीउदरीं नूतन ॥ आजि जन्मला हा अर्जुन ॥
जनक जननी बंधु स्वजन ॥ तुजविण कोण श्रीहरि॥ २१६ ॥
कृतांताचे मुखांतून ॥ आजि त्वां पार्थ काढिला ओढून ॥
सर्वांगाची छाया करून ॥ प्रल्हाद जैसा रक्षिला ॥ २१७ ॥
विजयास विजयी करून॥ हरि त्वांच दिधला आणून ॥
थोरपणा सकल सांडून ॥ घोडे आजी धूतले ॥ २१८ ॥
यदुकुलकमलविकासभास्करा ॥ पद्मजातजनका पद्माक्षीवरा ॥
पद्मनाभा पद्मधरा ॥ नाहीं उपकार मिति तुझ्या ॥ २१९ ॥
हे जगज्जनका विश्वसंभूत ॥ समरभूमीसी होसी सूत ॥
आणि होऊनि आमुचा दूत ॥ शिष्टाई करूं गेलासी ॥ २२० ॥
पांडवकुलपालका पांडुरंगा ॥ ब्रह्मानंदा न विटें अभंगा ॥
श्रीधरहृदयाब्जभृंगा ॥ उभा अव्यंगा विटेवरी ॥ २२१ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोणपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ पंचेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २२२ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे द्रोणपर्वणि पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४५ ॥
अध्याय पंचेचाळिसावा समाप्त


GO TOP