श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय तेहतिसावा


दुष्ट कीचकाचा वध


श्रीगणेशाय नम: ॥
अग्निसंभूत याज्ञसेनी ॥ जी साक्षात्‌ अवतरली भवानी ॥
कीचक बोलिला पापखाणी ॥ प्रतिवचन त्यास देत ॥ १ ॥
मी कदा तुज योग्य नाहीं ॥ पडूं नको व्यर्थं प्रवाहीं ॥
परदाराभिलाषें पाहीं ॥ प्राणें जाशी दुरात्म्या ॥ २ ॥
परांगना परधन ॥ येथें रमे ज्याचें मन ॥
तों सर्वांचा द्वेषी पूर्ण ॥ आलें मरण जवळी त्या ॥ ३ ॥
मी दासी नव्हें निर्धार ॥ माझे पंच गंधर्व भ्रतार ॥
माझा अभिलाष धरी जो पामर ॥ त्यास ते मारिती क्षणार्धे ॥ ४ ॥
टाकूनियां स्वधर्मपथ ॥ आडमार्गें चालसी यथार्थ ॥
तरी समीप आला अनर्थ ॥ कीचका तुज निर्धारे ॥ ५ ॥
ज्या गोष्टीने अनर्थ थोर ॥ होय स्वकुलाचा संहार ॥
ऐशिया विचारीं चतुर ॥ सहसाही न प्रवर्तती ॥ ६ ॥
समर्थाशी विरोध करिती ॥ आपुलें कल्याण चिंतिती ॥
ते अपायनदींत बुडती ॥ न काढी कोणी तयांतें ॥ ७ ॥
याकरितां विचार करीं ॥ परतोन जाई स्वमंदिरीं ॥
तों सूतपुत्र यावरी ॥ कीचक बोले दुरात्मा ॥ ८ ॥
मी खवळलिया जाण ॥ नाटोपें कोणा प्रलयाग्न ॥
सकल राजे मजअधीन ॥ मी करीन तेंच होय ॥ ९ ॥
विराटही मजअधीन ॥ माझेनें त्यासी राज्यासन ॥
एकशत पांच पूर्ण ॥ बंधु माझे पाठिराखे ॥ १० ॥
भीम आणि हनुमंत ॥ मी जिंकीन एके क्षणांत ॥
तुझे पंच गंधर्व दावीं त्वरित ॥ मारून टाकीन क्षणार्धें ॥ ११ ॥
द्रौपदी म्हणे सिंहकन्यका ॥ कैशी प्राप्त होईल जंबुका ॥
राजहंसविभाग देखा ॥ काग कैसा नेईल ॥ १२ ॥
दीपास आलिंगितां पतंग ॥ तत्काल होय प्राणभंग ॥
मज स्पर्शतां सवेग ॥ तेचि गति तुज साच ॥ १३ ॥
माझा करितां अभिलाष ॥ होईल तुझा प्राणनाश ॥
शाहणा होई जाई घरास ॥ उभा न राहें क्षणभरी ॥ १४ ॥
गंगा पूरें भरतां तुंबळ ॥ परपारा केविं जाय बाळ ॥
गगनींचें सूर्यमंडळ ॥ मानवाहातीं न चढेचि ॥ १५ ॥
रत्‍नराशि पडली थोर ॥ म्हणोनि भरी खदिरांगार ॥
कीं हा नीलरत्‍नांचा हार ॥ म्हणोनि विखार धंरू नको ॥ १६ ॥
महाविष भक्षून ॥ प्रचीत पहावया इच्छी कोण ॥
ब्रह्मद्रोहेंकरून ॥ कोण कल्याण पावला ॥ १७ ॥
माझा अभिलाष धरितां चित्तीं ॥ तेचि होईल तुज गती ॥
ऐसें ऐकतां तों मंदमती ॥ सुदेष्णेच्या गृहा गेला ॥ १८ ॥
तिला म्हणे सैरंध्रीसी ॥ बोधून पाठवीं मजपाशीं ॥
नाहीं तरी मी प्राणासी ॥ त्यागीन आतां जाण पां ॥ १९ ॥
मग सुदेष्णा बोले वचन ॥ मी तिजहातीं पाठवित्यें अन्न ॥
तूं तिजला आकळून ॥ बळेंचि भोगीं कीचका ॥ २० ॥
कीचक गेला मंदिरासी ॥ सवेंच प्राप्त जाहली निशी ॥
बोलावून सैरंध्रीसी ॥ म्हणे अन्न नेईं कीचका ॥ २१ ॥
कीचकास हें अन्न देई ॥ सुरा उत्तम घेऊन येई ॥
येरी म्हणे सहसाही ॥ मी न जाई त्या स्थाना ॥ २२ ॥
महादुरात्मा कीचक ॥ मी न पाहें त्याचें मुख ॥
मज स्पर्शतां तों मूर्ख ॥ भस्म होईल जाण पां ॥ २३ ॥
अतिसहवासेंकरून ॥ माझें ठाउकें आहे तुज लक्षण ॥
आणिका हातीं दे पाठवून ॥ मजकारणें योग्य नव्हे ॥ २४ ॥
येरी म्हणे मी पाठविल्यावरी ॥ तों सहसा तुज कांहीं न करी ॥
परम खेद मानून सैरंध्री ॥ निघत अन्न घेउनी ॥ २५ ॥
नयनीं वाहती अधुधारा ॥ हंसगती जात पांडवदारा ॥
म्हणे श्रीकृष्णा यादवेंद्रा ॥ परम संकटीं रक्षीं तूं ॥ २६ ॥
मी सत्य पतिव्रता पूर्ण ॥ श्रीकृष्णभजनीं असेल मन ॥
तरी त्याची शक्ति होउनि क्षीण ॥ मज दुर्जन नातळे ॥ २७ ॥
वाटेनें जातां सत्वर ॥ द्रौपदी वदे सूर्यस्तोत्र ॥
म्हणे हे भास्कर दिनकर ॥ रक्षी मज तूं आतां ॥ २८ ॥
सकलनेत्रप्रकाशका ॥ अंबरचूडामणे त्रैलोक्यदीपका ॥
दिनकरा तरणी तमांतका ॥ सर्वव्यापका दिनमणे ॥ २९ ॥
जाणोनि द्रौपदीचे मानस ॥ सूर्ये पाठविला एक राक्षस ॥
तों रक्षित द्रौपदीस ॥ गुसरूपें चालिला ॥ ३० ॥
द्रौपदी येतो कीचक ॥ उभा ठाकला हास्यमुख ॥
म्हणे हें भाग्य तुझें सकळिक ॥ होई स्वामिणी सर्वस्वें ॥ ३१ ॥
येरी म्हणे उत्तम सुरा ॥ सुदेष्णेनें मागितली सत्वरा ॥
कीचक म्हणे त्या अवसरा ॥ आणिका हातीं पाठवितों ॥ ३२ ॥
ऐसें बोलून सव्यहस्तीं ॥ धरिली द्रौपदी महासती ॥
म्हणे भुललास पापमती ॥ व्यभिचारिणी मी नव्हें ॥ ३३ ॥
द्रौपदीनें आसुडिला हस्त ॥ करें लोटिला कीचक तेथ ॥
रक्षकराक्षसें अकस्मात ॥ पाडिला गुप्त धरेवरी ॥ ३४ ॥
वृक्ष उन्मळोनि पडिला ॥ तैसा उताणा आपटला ॥
तेथून धांवत द्रुपदबाळा ॥ राजसभेसी यातली ॥ ३५ ॥
राजा आणि कंक ॥ बैसले प्रधान सभानायक ॥
तंव मागून कीचक ॥ धांवत सभे पातला ॥ ३६ ॥
केशीं धरून उन्मत्त ॥ दौपदीस मारिली लात ॥
तों राक्षस होता जो गुप्त ॥ तेणें कीचक धुमसिला ॥ ३७ ॥
गुसरूपें लत्ताप्रहार ॥ कीचकास दिधले अपार ॥
भूमीवरी पाडिला दुराचार ॥ भोंवंडी नेत्र मूर्छेनें ॥ ३८ ॥
तेव्हां सभेस होता वुकोदर ॥ रागें दशनी रगडिला अधर ॥
खदिरांगारासम केले नेत्र ॥ भोंवयां गांठी घातली ॥ ३९ ॥
उठोनियां भीमसेन ॥ कीचकाचा घेऊं पाहे प्राण ॥
तों धर्में भ्रूसंकेत दावून ॥ म्हणे नव्हे वेळ ही ॥ ४० ॥
दिवस उरले किंचित ॥ प्रकट होईल लोकांत ॥
ऐसें जाणोनि स्वस्थ ॥ भीम बैसला उगाचि ॥ ४१ ॥
अंकुशें आकर्षिला वारण ॥ कीं उदकें शांतविजे हुताशन ॥
कीं महाभुजंग बळेंकरून ॥ आकर्षी जैसा मंत्रवादी ॥ ४२ ॥
अन्योक्तीने धर्म बोलत ॥ इंधन होईल तुज बहुत ॥
वृक्ष तोडूं पाहसी येथ ॥ नव्हे उचित ये स्थळीं ॥ ४३ ॥
तरी एकीकडे जाऊन ॥ करीं सावकाश वृक्षखंडन ॥
चितेमाजी घालून ॥ भस्म करीं मनेच्छा ॥ ४४ ॥
उत्तम वृक्ष रखूनी ॥ कंटकतरु तोडावे मुळींहूनी ॥
वृश्चिक निघतां सदनीं ॥ पादरक्षेनें ताडिजे ॥ ४५ ॥
दृष्टीं पडतां दंदशूक ॥ आधीं ठेचावे त्याचें मुख ॥
रक्षावे जीव सात्विक ॥ सांगणें बहुत नलगेची ॥ ४६ ॥
इकडे द्रुपदराजकुमारी ॥ नेत्रीं अश्रू येती खेद करी ॥
माझे गंधर्व असतां अंबरीं ॥ सूतपुत्रें मज मारिलें ॥ ४७ ॥
पंच गंधर्व महामती ॥ काय हें निर्वाण पाहती ॥
त्यांच्या क्रोधाची शांती ॥ कैसी जाहली एकसरें ॥ ४८ ॥
काय जाहला त्यांचा पुरुषार्थ ॥ न जाणती एवढा अनर्थ ॥
राया तूं कैसा आहेस पहात ॥ अद्‌भुत अन्याया या वेळे ॥ ४९ ॥
न्यायान्यायनिवाडा न करी ॥ तरी तों राजा नव्हे निर्धारीं ॥
विराटा तुझे सभेभीतरीं ॥ धर्म नाहींच वाटतें ॥ ५० ॥
तुम्ही म्हणविता सभासद ॥ दृष्टीं देखतां हा अनर्थ ॥
लोक द्रौपदीस स्तवित ॥ म्हणती सत्य बोलतेसी ॥ ५१ ॥
कीचक परम चांडाळ ॥ हा राज्य बुडवील सकळ ॥
याचे भिडेनें भूपाळ ॥ सर्वथा कांहीं बोलेना ॥ ५२ ॥
येणें वासना धरिली विपरीत ॥ तरी जवळी यास आला मृत्य ॥
ऐसें सरस्वती भविष्य सांगत ॥ जनमुखेंकरूनियां ॥ ५३ ॥
कंक म्हणे सैरंध्रीप्रती ॥ पंच गंधर्व तुझे पती ॥
संकटीं मोठे पडिले असती ॥ यास्तव न येती धांवोनि ॥ ५४ ॥
न्याय अन्याय निर्धार ॥ अवलोकित जगदीश्वर ॥
कर्ता हर्ता सूत्रधार ॥ तों करील साच तेंचि ॥ ५५ ॥
ईश्वर आहे जयवंत ॥ तों क्षणांत करील विपरीत ॥
तूं मदिराप्रति जाईं त्वरित ॥ सुदेष्णेपाशीं सांग हें ॥ ५६ ॥
विपरीत कर्माची गती ॥ समर्थ महाव्यसनीं पडती ॥
न्याय अन्याय न लक्षिती ॥ विपरीत गति कालाची ॥ ५७ ॥
तुझे पतींचा कोण समय ॥ हें तूं सैरंध्री नेणसी काय ॥
कालप्रतीक्षा करिती पाहें ॥ वरारोहे गंधर्व तुझे ॥ ५८ ॥
तूं रडतेस दुःखेंकरून ॥ तेणें मत्स्यराज्यांत होईल विघ्न ॥
असो सैरंध्री तेधून ॥ मदिराप्रति प्रवेशली ॥ ५९ ॥
मुक्तकेशा आरक्तनेत्री ॥ श्वासोच्छास टाकी वक्त्रीं ॥
सुदेष्णा म्हणे चारुगात्री ॥ कां रडसी वरारोहे ॥ ६० ॥
सैरंध्री सांगे वर्तमान ॥ सुदेष्णा म्हणे ऐक वचन ॥
कीचकास मी दंड करीन ॥ न धरीं अन्य मनीं तूं ॥ ६१ ॥
द्रौपदी म्हणे त्यास मारणार ॥ वेगळेच असती साचार ॥
अर्कसुताचें पहावया मंदिर ॥ जाईल क्षण न लागतां ॥ ६२ ॥
मग द्रुपदबाळा गृहीं जाऊन ॥ करिती जाहली सचैल स्वान ॥
चांडाळ स्पर्शला म्हणोन ॥ श्रीकृष्णनामजप करी ॥ ६३ ॥
सर्व प्रायश्चित्तांस कारण ॥ श्रीहरीचे नामस्मरण ॥
यावरी रजनींत उठोन ॥ द्रौपदी जाय गुप्तरूपें ॥ ६४ ॥
जे प्रत्यक्ष भवानी ॥ कीचकवध इच्छी मनीं ॥
भीमाजवळी येऊनी ॥ एकांतीं सांगे निजगुज ॥ ६५ ॥
झोंप लागली तुम्हां कैशी ॥ ऊठ महावीरा काय पाहसी ॥
माझी दुर्दशा सभेसी ॥ केली कैसी दुर्जनें ॥ ६६ ॥
कष्ट भोगिले अमित ॥ सर्वांस कारण कपटद्यूत ॥
खेळून राज्य हरविलें समस्त ॥ म्हणोन कंक सेवा करी ॥ ६७ ॥
व्यास नारदादि विदुर ॥ यांहीं शिकविले बहु प्रकार ॥
ते अवघे विसरोनि युधिष्ठिर ॥ द्यूत खेळोनि बुडविलें ॥ ६८ ॥
पृथ्वीचे राजे कर जोडून ॥ धर्माचें करिती स्तवन ॥
तों पराचें भक्षून अन्न ॥ अतिदीन दिसताहे ॥ ६९ ॥
हरिश्चंद्र पृथ्वीपति सत्य ॥ परी डोंबाघरीं सेवा करित ॥
तैसाच धर्म खेळोन द्यूत ॥ सेवा येथें करीतसे ॥ ७० ॥
जो धर्म मयसभेसी ॥ बैसे वेष्टितमहर्षी ॥
गजस्कंधी बैसोनि जयापाशीं ॥ भाट वर्णिती पृथ्वीचे ॥ ७१ ॥
दहा सहस्त्र संन्यासी ॥ सुखें राहिले धर्मापाशीं ॥
धर्माश्रयें महर्षी ॥ कुटुंबांसह राहिले ॥ ७२ ॥
सदा घरीं अन्नसत्र ॥ लक्षावधि जेविती विप्र ॥
ज्या अन्नसुवासें अमर ॥ लाळ घोंटिती जेवावया ॥ ७३ ॥
तोच हा धर्म येथ ॥ कंका कंका ये त्वरित ॥
म्हणोनि विराटराव बोलावित ॥ खेळो द्यूत पोटभरी ॥ ७४ ॥
केरळदेशींचा नृपती ॥ राजसूययज्ञीं आला भेटीप्रती ॥
रत्‍नजडित उपानह हातीं ॥ आणोनि पुढें ठेविल्या ॥ ७५ ॥
एकीं हिर्‍यांच्या पादुका आणोनी ॥ स्वहस्तें लेवविल्या धर्मचरणीं ॥
तों धर्मराज परसदनीं ॥ पाहतें मी दीनाऐसा ॥ ७६ ॥
तैसाच तूं महाराज भीम ॥ अंतकाहून थोर पराक्रम ॥
हिडिंब बक अधम ॥ न लागतां क्षण मर्दिले ॥ ७७ ॥
पर्वत भुजाबळें लोटोनी ॥ समान करिशील हे धरणी ॥
तों तूं विराटाचे सदनी ॥ स्वयंपाकी जाहलासी ॥ ७८ ॥
ऐसा तूं महामती ॥ तुज सभेस नेऊन भ्याडविती ॥
सकल स्त्रिया हांसती ॥ मी खेद चित्तीं पावत्ये ॥ ७९ ॥
खांडववन देऊन सत्वर ॥ तृप्त केला वैश्वानर ॥
शरपंथें निर्जर ॥ केले जर्जर समरांगणीं ॥ ८० ॥
तों हा बृहत्रटा होऊन ॥ स्त्रियांस शिकवी नर्तन ॥
गोधन अश्वपालन ॥ नकुल सहदेव करिताती ॥ ८१ ॥
श्रीरंगाची मी भगिनी ॥ पांचालनृपतीची प्रियनंदिनी ॥
पांडवसिंहांची पत्‍नी ॥ स्नुषा पंडुनुपाची ॥ ८२ ॥
ते मी विराटसभेंत ॥ कीचकाची साहिली लात ॥
माझा न जाहला देहपात ॥ कासया व्यर्थ वांचलें ॥ ८३ ॥
विलाप करितां द्रुपदपुत्री ॥ अश्रू आले भीमाचे नेत्रीं ॥
म्हणे चतुर्वक्त्रा संसारीं ॥ व्यर्थ कासया घातलें ॥ ८४ ॥
जळो माझ्या भुजांचे बळ ॥ जळो गदा गांडीव सबळ ॥
ईश्वरी क्षोभचि केवळ ॥ आम्हांवरी जाहला ॥ ८५ ॥
ईश्वर जाहलिया पाठिमोरा ॥ नसतीं विघ्ने येती घरा ॥
महारत्‍ने होती गारा ॥ कोणी पुसेना तयांतें ॥ ८६ ॥
आपुलें द्रव्य लोकांवरी ॥ बुडोन जाय न लाभे करीं ॥
ज्याचें घ्यावें तों द्वारीं ॥ बैसे आण घालोनि ॥ ८७ ॥
वैरियांकरीं सांपडे वर्म ॥ अवदशेनें बुडे धर्म ॥
विशेष वाढे क्रोध काम ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ८८ ॥
आपुले जे कां शत्रू पूर्ण ॥ ज्यांस आपण गांजिलें दारुण ॥
अडल्या धरणें त्यांचे चरण ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ८९ ॥
लाभाकारणें निघे उदिमास ॥ तों हानीच होय दिवसेंदिवस ॥
पूज्यस्थानीं अपमान विशेष ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ९० ॥
सुहृद आप्त द्वेष करिती ॥ नसते व्यवहार येऊन पडती ॥
सदा तळमळ वाटे चित्तीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ९१ ॥
आपुलें राज्य संपत्ति धन ॥ शत्रु भोगूं पाहे आपण ॥
शरीर पीडे व्याधीविण ॥ तरी क्षोभ देवाचा ॥ ९२ ॥
विद्या जवळ बहुत असे ॥ परी तया कोणी न पुसे ॥
बोलों जातां मति भ्रंशे ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥ ९३ ॥
वृद्धपणीं ये दरिद्र ॥ स्त्री मृत्यु पावे जाती नेत्र ॥
हेळसिती सुना पुत्र ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥ ९४ ॥
असो द्रौपदीस म्हणे भीमसेन ॥ कीचकास आजचि मारीन ॥
मृद्‌घटवत्‌ करीन चूर्ण ॥ पाहें आतां मृगाक्षी ॥ ९५ ॥
तुज तेव्हां मारिली लात ॥ तेव्हांच करितों निःपात ॥
परि धर्में दाविला भ्रूसंकेत ॥ प्रकट होऊं म्हणोनी ॥ ९६ ॥
कौरवीं राज्य हारिलें समस्त ॥ तें दुःख वाटे किंचित ॥
परी तुज कीचकें मारिली लात ॥ तेणें हृदय उन्मळतें ॥ ९७ ॥
हे नीलोत्पलदलवर्णे ॥ हरिमध्ये सुहास्यवदने ॥
पंचदशदिन कुरंगनयने ॥ आतां उरले असती पैं ॥ ९८ ॥
खेद न करीं सहसाही ॥ द्रौपदी भीमें धरली हदयीं ॥
तिचे नेत्रोदकें ते समयीं ॥ अंग भिजले भीमाचें ॥ ९९ ॥
भीम म्हणे न करीं शोक ॥ क्षणांत मारितों कीचक ॥
चित्रशाळा सुरेख ॥ रात्रीं शून्य असते पैं ॥ १०० ॥
मी तये शाळेत जाऊन ॥ गुप्तरूपें करितों शयन ॥
कीचकास सांग जाऊन ॥ चित्रशाळे येइजे ॥ १०१ ॥
तुझा माझा समागम ॥ तेथें होईल मोठा संभ्रम ॥
जाण माझा हाच नेम ॥ एकटा येई अंधारीं ॥ १०२ ॥
ऐकोन भीमाचें वचन ॥ द्रौपदी बोले हास्यवदन ॥
तुम्हीं आधीं सत्वर जाऊन ॥ तेथें शयन करावें ॥ १०३ ॥
मग उठून लावण्यसुंदरी ॥ सहज आलीं बाहेरी ॥
तों कीचक ते अवसरीं ॥ सन्मुख येऊन बोलत ॥ १०४ ॥
म्हणे मजपासून अंतर ॥ सैरंध्री पडलें साचार ॥
तुज म्यां केला लत्ताप्रहार ॥ अपराध क्षमा करीं पैं ॥ १०५ ॥
मी तुझा शरणागत पाहीं ॥ एकदां अंगसंग तुझा देई ॥
हें राज्य माझेंच सर्वही ॥ विराट काय मशक पैं ॥ १०६ ॥
कौरव आणि पांडव ॥ क्षण न लागतां मारीन सर्व ॥
हस्तनापुरींची राणीव ॥ तुजसहित करीन मी ॥ १०७ ॥
द्रौपदी म्हणे कीचकास ॥ तूं कळों नेदीं कोणास ॥
रावराणिवेस रहस्य ॥ कळों नेदीं तत्वतां ॥ १०८ ॥
अंधारांत येईं गुप्त ॥ गंधर्वांस न कळवी मात ॥
मी जाऊन चित्रशाळेंत ॥ निद्रा करितें अंधारीं ॥ १०९ ॥
तूं न धरीं दुजयाची चाड ॥ तेथें तुझें पुरेल कोड ॥
भोगिशी सुख उदंड ॥ सांडोन भीड सर्वही ॥ ११० ॥
तों सैरंध्रीशीं एकांत ॥ कीचकें मांडिलासे बहुत ॥
हें जाणोन विराटें त्वरित ॥ कीचकास बोलाविले ॥ १११ ॥
कीचक जाऊन करी वंदन ॥ म्हणे बोलाविलें कोण कारण ॥
विराट म्हणे अपशकुन ॥ नगरीं बहुत होताती ॥ ११२ ॥
दुष्टस्वप्न देखती नरनारी ॥ शिवा बोभाती अहोरात्रीं ॥
दिवसा दुर्गभिंतीवरी ॥ शब्द करिती दिवाभीतें ॥ ११३ ॥
धरणी क्षणक्षणां कांपत ॥ निद्रित नारी ओसणत ॥
अहाहा झाला थोर घात ॥ प्रेतें पसरलीं चहूंकडे ॥ ११४ ॥
तुज शनैश्चर जन्मस्थ ॥ मज बारावा कठिण बहुत ॥
तुज अथवा मज मृत्य ॥ सांगती पंडित जाणते ॥ ११५ ॥
तुज मागणें हेंचि यथार्थ ॥ सोडीं सैरंध्रीची मात ॥
तिचे पांच गंधर्व गुप्त ॥ करितील घात क्षणार्धें ॥ ११६ ॥
तरी सैरंध्रीशीं एकांत ॥ करितां होईल तुझा घात ॥
माझें वचन यथार्थ ॥ कीचका मानीं एवढें ॥ ११७ ॥
हे केवळ आहे कृत्या ॥ कलहकल्लोलघोरसरिता ॥
शक्रारिजनकें नेतां सीता ॥ पावला घाता समूल ॥ ११८ ॥
कीचक म्हणे रावणें ॥ दश मस्तक दिले सीतेकारणें ॥
मी सैरंध्रीस एक देणें ॥ परम उचित हें असे ॥ ११९ ॥
जाईल तरी जाओ प्राण ॥ परि मी न सोडीं तिजलागून ॥
तिचें माझें वचन ॥ एकांतीं दृढ जाहलें ॥ १२० ॥
विराट म्हणे तूं कामातुर ॥ भय लजा सोडिली समग्र ॥
यावरी कीचक सत्वर ॥ निजमंदिराप्रति गेला ॥ १२१ ॥
यावरी तों श्रृंगार ॥ अवघा वेळ करी पामर ॥
दिव्य वस्त्रें दिव्यालंकार ॥ सुगंधे शरीर चचिंलें ॥ १२२ ॥
मरण जवळी आलें असे ॥ बहुत सुंदर कीचक दिसे ॥
जातेसमयीं प्रकाशे ॥ दीप जैसा बहुतचि ॥ १२३ ॥
कीचक उतावीळ मनीं ॥ तेव्हां प्राप्त होईल रजनी ॥
म्हणे नष्टा वासरमणी ॥ अस्ताचला न जासी ॥ १२४ ॥
श्रृंगार करितां बहुवस ॥ सहजचि मावळला दिवस ॥
मध्यरात्र होतां तामस ॥ एकलाचि चालिला ॥ १२५ ॥
इकडे चित्रशाळेंत ॥ भीमसेन निजलासे गुप्त ॥
कीचकाची वाट पाहत ॥ तंव तों तेथें पातला ॥ १२६ ॥
शून्य अवघें नर्तनागार ॥ पडला असे अंधकार ॥
हळू हळू कीचक पामर ॥ चांचपीत जवळी आला ॥ १२७ ॥
कीचक कामें व्यापला जाण ॥ क्रोधें संतप्त भीमसेन ॥
कौंतेय तों केवळ पंचाननॅ ॥ कीचक वारण तेथें आला ॥ १२८ ॥
कीचक बोले मंजुळ ॥ सैरंध्री तूं धन्य वेल्हाळ ॥
तुजलागीं मी उताविळ ॥ सर्व सांडोन पातलों ॥ १२९ ॥
दास दासी बहुत मंदिरे ॥ तुजला सिद्धकेलीं सुकुमारे ॥
दिव्यालंकार दिव्य चीरे ॥ सिद्धकरून ठेविलीं ॥ १३० ॥
प्रथम देईं येथें भोग ॥ मग मंदिरा जाऊं सवेग ॥
तूं मज वरिलिया मग ॥ भय नसे कोणाचें ॥ १३१ ॥
तुझे पंच गंधर्वांचा निःपात ॥ करून टाकीन क्षणांत ॥
म्यां श्रृंगार केला बहुत ॥ अंधारांत दिसेना ॥ १३२ ॥
माझें सौंदर्य देखोन ॥ सकल स्त्रिया करिती स्तवन ॥
तूं न बोलसी एकही वचन ॥ कठिण मन कैसें तुझें ॥ १३३ ॥
तूं न बोलसी जरी वचन ॥ तरी मी देईन आपुला प्राण ॥
हें शरीर ओवाळून ॥ तुजवरून टाकीन मी ॥ १३४ ॥
मग हळूच बोले भीमसेन ॥ जवळी येई दे आलिंगन ॥
कीचक तें ऐकोन ॥ अंग स्पर्शत हळूहळू ॥ १३५ ॥
भीमे धरिला तयाचा हस्त ॥ भूमीवरी बळें आपटित ॥
कीचक म्हणे सैरंध्री घात ॥ करूं इच्छिसी माझा तूं ॥ १३६ ॥
भीम म्हणे तत्काळ ॥ घे संधीचे भोगफळ ॥
कीचक म्हणे हा पुरुष सबळ ॥ गंधर्वचि पातला ॥ १३७ ॥
मग मल्लयुद्ध अद्‌भुत ॥ जाहलें दोन घटिका तेथ ॥
पर्वत पर्वतावरी आदळत ॥ तैसे ताडिती एकमेकां ॥ १३८ ॥
करचरण मोडूं पाहती ॥ मुष्टिप्रहार निष्टुर देती ॥
पृष्ठभागीं गुडघे हाणिती ॥ मोडूं इच्छिती मध्यभाग ॥ १३९ ॥
सुग्रीव आणि वाली ॥ तैसे भिडती तये वेळीं ॥
कीचकही परम बळी ॥ हिडिंबबकांसारिखा ॥ १४० ॥
मग भीमे बळेंकरून ॥ भूमीवरी पालथा पाडून ॥
ग्रीवा चरण धरून ॥ मध्यभागीं मोडिला ॥ १४१ ॥
कीचकें घोर घोष करून ॥ तत्काल तेथें सोडिला प्राण ॥
भीमे करचरण मोडून ॥ पोटांत त्याच्या खोंविले ॥ १४२ ॥
शिर मोडून ते अवसरीं ॥ तेंही खोंविलें तयाचे उदरीं ॥
ज्वाला करून झडकरी ॥ पांचाळीस दावित ॥ १४३ ॥
मग भीम गेला तेथून ॥ चित्रशाळेबाहेर येऊन ॥
रक्षकांप्रति वचन ॥ सैरंध्री तेव्हां बोलत ॥ १४४ ॥
म्हणे उठा उठा सकळिक ॥ गंधर्वीं मारिला कीचक ॥
चुडिया घेऊनि सवेग ॥ पाहते जाहले तेधवां ॥ १४५ ॥
तों देखिली मांसाची मोट ॥ सेवकीं नगरांत केला बोभाट ॥
एकशत पांच सदट ॥ बंधू धांवले कीचकाचे ॥ १४६ ॥
कीचकाकारणें रडती समग्र ॥ जाहला एकचि हाहाकार ॥
विराट सुदेष्णा सत्वर ॥ गजबजून धांवलीं ॥ १४७ ॥
कीचकस्त्रिया बहुत ॥ धांवती महाशब्द करित ॥
सैरंध्रीपायीं यथार्थ ॥ कीचक मारिला गंधर्वी ॥ १४८ ॥
तों स्तंभाआड सैरंध्री ॥ कीचकीं देखिली ते अवसरीं ॥
केशी धरोनि झडकरी ॥ ओढिली बळें तेधवां ॥ १४९ ॥
म्हणती इच्या पायीं मृत्य ॥ कीचकास जाहला सत्य ॥
तरी हीस घालावे अग्नींत ॥ कीचकाचे समागमे ॥ १५० ॥
ऐसें बोलून समस्त ॥ द्रौपदी आणि कीचकप्रेत ॥
दोघांसही उचलूनि त्वरित ॥ नेते जाहले चिताभूमीं ॥ १५१ ॥
द्रौपदी आक्रोशें रडत ॥ घाबरी चहूंकडे पाहत ॥
म्हणे हे कृष्ण द्वारकानाथ ॥ कोठें गेलास या वेळे ॥ १५२ ॥
जय जयंत विजय ॥ जयत्सेन जयद्‌बल हो आर्य ॥
धांवा वेगें पाहतां काय ॥ मला नेलें कीचकांनीं ॥ १५३ ॥
तुम्ही पांच असतां शिरीं ॥ गांजिलें मज सूतपुत्रीं ॥
ते करुणाशब्द श्रोत्रीं ॥ बल्लवें ऐकिले तेधवां ॥ १५४ ॥
इतक्यांत रूप पालटोन ॥ गेला नगरदुर्ग उडून ॥
चिताभूमि ओलांडून ॥ हाके गगन गाजविलें ॥ १५५ ॥
महाविटप वृक्ष ते वेळां ॥ भीमें उपटून करीं घेतला ॥
कीं कालदंड उभारिला ॥ संहारावया विश्वातें ॥ १५६ ॥
भीमाचे अंगवातेंकरून ॥ महावृक्ष पडती उन्मळोन ॥
पक्ष्यांऐसे उडोन ॥ गगनीं गेले तेधवां ॥ १५७ ॥
तेणें उचंबळले समुद्रजल ॥ हेलावला ब्रह्मांडगोल ॥
पाताळी फणिपालँ ॥ म्हणती कल्पांत मांडला ॥ १५८ ॥
अचाट भीमाची आरोळी ॥ बैसली मेघांची दातखिळी ॥
तों कीचकीं चिता पाजळिली ॥ ज्वालामार्ली चेतविला ॥ १५९ ॥
तों कीचकीं देखिला दुरोन ॥ येत महावृक्ष घेऊन ॥
म्हणती आला रे धांवोन ॥ सैरंध्रीचा गंधर्व ॥ १६० ॥
एक म्हणती उचला सैरंध्री ॥ वेगें टाका अग्नीमाझारी ॥
अवघे कीचक दुराचारी ॥ ओढिती तेव्हां तियेतें ॥ १६१ ॥
एक म्हणती टाका उचलून ॥ गंधर्व काय करील येऊन ॥
तों प्रलयहांक मारून ॥ भीमसेन पातला ॥ १६२ ॥
देखतां भीम भयानक ॥ पळों लागले सर्व कीचक ॥
तों वृक्षघायें सकळिक ॥ एकदांच संहारिले ॥ १६३ ॥
मृत्तिकेचे घट फुटले ॥ कीं मत्कुण एकदांच रगडिले ॥
एकशत पांच आगळे ॥ संहारिले क्षणार्धें ॥ १६४ ॥
द्रौपदीस म्हणे वृकोदर ॥ तूं नगरांत जाई सत्वर ॥
मग तेथूनि कुंतीकुमार ॥ गु्प्तरूपें चालिला ॥ १६५ ॥
नगरदुर्ग उडोन ॥ स्वस्थानीं बैसला जाऊन ॥
पूर्वस्वरूप धरून ॥ बाहेर येऊन पुसतसे ॥ १६६ ॥
म्हणे वर्तमान काय जाहलें ॥ कोणीं हे कीचक मारिले ॥
तों सैरंध्री ते वेळे ॥ स्वस्थानासी पातली ॥ १६७ ॥
रायास सांगती दूत ॥ कीचक मारिले समस्त ॥
सैरंध्री आली घरांत ॥ भयभीत नगर जाहले ॥ १६८ ॥
हे कैंची आणून ठेविली ॥ इशीं कोणीं न करावी बोली ॥
इची दृष्टि नव्हे भली ॥ संहारील सकल जनांतें ॥ १६९ ॥
इकडे रायें सेवक धाडून ॥ अवघे कीचक एकत्र करून ॥
एके चितेंत घालून ॥ केले दहन एकदांची ॥ १७० ॥
क्रियाकर्म समस्त ॥ राये करविलें यथोक्त ॥
विराट येऊन मंदिरांत ॥ सुदेष्णेप्रति सांगतसे ॥ १७१ ॥
सैरंध्रीस निरोप देई ॥ इचें काम नसेच कांहीं ॥
हे कोठील कैंची काई ॥ कलहकारिणी ठेविली ॥ १७२ ॥
हे असतो येथें साचार ॥ न राहेच आमुचें नगर ॥
नगरलोक नारी नर ॥ इचें नाम घेऊं भिती ॥ १७३ ॥
इकडे श्रीरंगाची भगिनी ॥ सचैल स्नान करी ते क्षणीं ॥
स्वस्थ मानस करूनी ॥ ध्यान धरी श्रीहरीचें ॥ १७४ ॥
जपे श्रीकृष्णनाममाला ॥ शीतळ जाहली द्रुपदबाळा ॥
पंचगंधर्वांचें ते वेळां ॥ स्तवन करी द्रौपदी ॥ १७५ ॥
मग अंतर्गहीं जाऊन ॥ घेत बृहन्नटेचे दर्शन ॥
सकल राजकुमारी येऊन ॥ म्हणती धन्य सैरंध्री ॥ १७६ ॥
कीचकांहातींची सुटोन ॥ माये आलीस परतोन ॥
बृहन्नटा बोले हांसोन ॥ थोर कल्याण जाहलें ॥ १७७ ॥
बृहन्नटेस म्हणे सैरंध्री ॥ शिकवूनियां राजकुमारी ॥
सुखी आहेस अंतःपुरीं ॥ चिंता सर्व सोडोनियां ॥ १७८ ॥
सुदेष्णा म्हणे सैरंध्रीबाई ॥ तूं आतांच येथून जाईं ॥
पुरुषमात्र सर्वही ॥ भिती तुज देखतां ॥ १७९ ॥
सैरंध्री म्हणे तेरा दिवस ॥ क्षमा कीजे आम्हांस ॥
माझे भ्रतार पांच पुरुष ॥ कल्याण तुमचें चिंतिती ॥ १८० ॥
तुम्हांवर उपकार करून ॥ मग आम्ही जाऊं येथून ॥
स्वस्थ करोनियां मन ॥ सुखें तुम्हीं असावें ॥ १८१ ॥
कीचक मारिले सकळी ॥ हे देशोदेशीं मात गेली ॥
इकडे दुर्योधनें ते वेळीं ॥ हेर धाडिले पृथ्वींत ॥ १८२ ॥
म्हणे अवनी धुंडावी सकळ ॥ पर्वत वन कठिनस्थळ ॥
पांडव धुंडोनि एक वेळ ॥ ओळखोनि सोडावे ॥ १८३ ॥
सप्तद्वीपें नवखंडें ॥ छ्प्पन्न देश पाहोनि निवाडें ॥
कठिण विवरे पर्वतकडे ॥ शोधून दूत परतती ॥ १८४ ॥
सुयोधनास सांगती हेर ॥ माग न लागे अणुमात्र ॥
शोधिलें पांचालनगर ॥ धौम्य पुरोहित तेथें असे ॥ १८५ ॥
पांडवांचे पांच पुत्र पाहीं ॥ ते आहेत पांचालगृहीं ॥
सुभद्रा सौभद्र सर्वही ॥ द्वारकेस आहेत ॥ १८६ ॥
पांडवांचा समाचार ॥ कोठें न लागे अणुमात्र ॥
परि विराटनगरीं थोर ॥ अद्‌भुत एक वर्तलें ॥ १८७ ॥
एकशत पांच आगळे ॥ कीचक गंधर्वी मारिले ॥
ऐसें ऐकतां ते वेळे ॥ मन दचकलें दुर्योधनाचे ॥ १८८ ॥
अंग जाहलें सत्त्वहीन ॥ तंव बोलिला वीर कर्ण ॥
दुसरे हेर पाठवून ॥ समाचार आणावा ॥ १८९ ॥
गंधर्व कोठील कोण ॥ कीचक मारिले काय कारण ॥
जीमूतमल्ल टाकिला मारून ॥ तों कोण ओळखावा ॥ १९० ॥
पाणवठां समाचार ॥ कळे ग्रामांतील समग्र ॥
एक म्हणती निर्धार ॥ पांडव नाशातें पावले ॥ १९१ ॥
तों द्रोण सांगे पंडुनंदन ॥ श्रीकृष्णभक्तिपरायण ॥
संकट किंवा मरण ॥ कल्पांतींही न पावती ॥ १९२ ॥
भीष्म म्हणे धर्मराज ॥ सोमवंशविजयध्वज ॥
अजातशत्रु तेजःपुंज ॥ जयवंत सर्वां ठायीं ॥ १९३ ॥
जेथें वसत असेल धर्म ॥ धर्म तेथें आनंद परम ॥
आनंद तेथें आराम ॥ पावती जन सर्वही ॥ १९४ ॥
जन तेथें जगदीश्वर ॥ जगदीश्वर तेथें भक्त समग्र ॥
भक्त तेथें परमानंद थोर ॥ वसतसे नेमेंशीं ॥ १९५ ॥
आनंद तेथें विचार ॥ विचार तेथें सच्छास्त्र ॥
सच्छास्त्र तेथें समग्र ॥ संतमंडळी असेल ॥ १९६ ॥
संत तेथें अद्वयसुख ॥ सुख तेथें दया अधिक ॥
दया असे तेथे देख ॥ समाधान वसतसे ॥ १९७ ॥
समाधान तेथे निजबोध ॥ बोध तेथे अभेद ॥
अभेद तेथे ब्रह्मानंद ॥ निजखूण जाणिजे ॥ १९८ ॥
गंगातनय वरिष्ठ ॥ जो विवेकरत्‍नांचा मुकुट ॥
कीं स्वानंदाचा लोट ॥ सोमवंशी लोटला ॥ १९९ ॥
पांडवांचें निवासस्थळ ॥ तीं लक्षणें वर्णीत निर्मळ ॥
दुर्योधन दुष्ट केवळ ॥ ऐकेन तटस्थ राहिला ॥ २०० ॥
आतां रसाळ कथा पूर्ण ॥ दक्षिण उत्तर गोग्रहण ॥
तों सुरस रस गहन ॥ कर्णपात्रीं घेइंजे ॥ २०१ ॥
पांडवपालका पांडुरंगा ॥ पुंडलीकहृदयारविंदभॄंगा ॥
ब्रह्मानंदा निःसंगा ॥ अजा अव्यया जगद्‌गुरो ॥ २०२ ॥
श्रीनिवासा श्रीधरवरदा ॥ ब्रह्मांडनायका ब्रह्मानंदा ॥
सुहास्यवदना स्वानंदकंदा ॥ सुरस कथा वदवीं पुढें ॥ २०३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ तेहतिसाव्यांत कथियेला ॥ २०४ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे विराटपर्वणि त्रयस्त्रिंशोऽध्याय ॥ ३३ ॥
अध्याय तेहतिसावा समाप्तGO TOP