श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बत्तिसावा


पांडवांचा अज्ञातवास


श्रीगणेशाय नम: ॥
जो जगद्‌गुरू आदिपुरुष ॥ आदिमायेचा भर्ता ईश ॥
ब्रह्मा विष्णू महेश ॥ बाळकें पोटीं निर्मिलीं ॥ १ ॥
सात्विक राजस तामस ॥ सृष्टिरचना करविली विशेष ॥
चौर्‍यायशीं लक्ष योनी बहुवस ॥ जीव भोगिती निजकर्में ॥ २ ॥
पडला अज्ञानांधकार बहुत ॥ न दिसे कांहीं वस्तुजात ॥
अडखळोन क्षणक्षणां पडत ॥ गर्भगर्तेंत जीव हे ॥ ३ ॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे थोर हिंडती तस्कर ॥
पुण्यधन सर्वत्र ॥ हिरोन नेती क्षणार्धे ॥ ४ ॥
ऐसें निबिड तम जाणोन ॥ तों सत्यवतीहृदयरत्‍न ॥
उगवला सूर्यनारायण ॥ वेदव्यास महाराज ॥ ५ ॥
निगमकला जाहला विकास ॥ प्राणी प्रवर्तले सत्कर्मास ॥
सत्क्रियाराहटी निर्दोष ॥ आचरोनि यश पावती ॥ ६ ॥
कृपाळु तों वेदव्यास ॥ तारावया जडजीवांस ॥
भारत निर्मिलें सप्तम रस ॥ कीं पंचम वेद सुरस हा ॥ ७ ॥
व्यासशिष्य वैशंपायन ॥ जैसा देवगुरु परम निपुण ॥
विराटपर्व दिव्य निरूपण ॥ जनमेजयाप्रति सांगे ॥ ८ ॥
मागें संपलें अरण्यपर्व ॥ जेथिंच्या रचना सुरस अपूर्व ॥
येथूनि आतां विराटपर्व ॥ यशदायक परिसिजे ॥ ९ ॥
जनमेजय म्हणे वैशंपायना ॥ चातुर्यसिंधो गुणसंपन्ना ॥
विराटनगरीं पंडुनंदनां ॥ वास जाहला कोणेपरी ॥ १० ॥
दुर्योधन दुर्जन बहुवस ॥ कैसा केला अज्ञातवास ॥
द्रौपदी सती निर्दोष ॥ गुप्त कैसी राहिली ॥ ११ ॥
वैशंपायन म्हणे नृपती ॥ तुझा पिता परीक्षिती ॥
त्याचा पितामह निश्चिती ॥ पंडुपुत्र महाराज ॥ १२ ॥
अरण्यपर्व संपलें विशेष ॥ तेथें कथा कथिली सुरस ॥
यमें धरून मृगवेष ॥ अरणीपात्रें पळविली ॥ १३ ॥
पुढें वटवृक्षीं राहून ॥ पांडवांस जाहला प्रसन्न ॥
अरणीपात्रें देऊन ॥ वरप्रदान दिधलें ॥ १४ ॥
तयावरी पांचही जण ॥ आश्रमा आले पंडुनंदन ॥
जाहलें जें वर्तमान ॥ सकल ब्राह्मणां निवेदिलें ॥ १५ ॥
अजातशत्रु धर्मनृपति ॥ बोलता जाहला बंधूंप्रती ॥
अरण्यवास सत्संगती ॥ द्वादश वर्षें जाहली ॥ १६ ॥
आतां अज्ञातवास पूर्ण ॥ त्रयोदश वर्ष परम कठिण ॥
नाम रूप पालटून ॥ कोठें क्रमावें सांगा पां ॥ १७ ॥
बहुत देश निगूढ स्थाने ॥ गुप्त विवरें रमणीय वने॥
कीं पांचालविराटादि सदनें ॥ गुप्तरुपें सेवावीं ॥ १८ ॥
मग म्हणे वीर पार्थ ॥ देश राजे आहेत बहुत ॥
परी अज्ञातवासा प्रस्तुत ॥ विराटगृहीं जाइजे ॥ १९ ॥
नामें रूपें पालटून ॥ परगृहीं राहणें कठिण ॥
धर्मात्मा तूं धर्मपरायण ॥ कोणे रीतीं राहसी ॥ २० ॥
धर्म म्हणे पार्था ऐक ॥ मी आत्मनाम ठेवीन कंक ॥
अक्षकर्मीं निपुण देख ॥ सभासद होईन मी ॥ २१ ॥
द्यूतकर्मी परम निपुण ॥ दंतपाश करीं धरून ॥
स्वगुणें विराट मोहीन ॥ नानायुक्तीं खेळोनियां ॥ २२ ॥
यावरी भीम बोले अपूर्व ॥ मी म्हणवीन तेथें बल्लव ॥
सूपशास्त्रीं प्रवीण सर्व ॥ षड्‌रसान्नें निर्मीन मी ॥ २३ ॥
चतुर्विधान्नें निर्मीन ॥ ज्यांचे सुवासें संपूर्ण ॥
लाळ घोंटिती देवगण ॥ वसंत भुलोन जातसे ॥ २४ ॥
गज वृषभ मल्ल दारुण ॥ यांशीं बळें झोंबी घेईन ॥
विराटाप्रति संतोषवीन ॥ स्वगुणेंकरून धर्मराया ॥ २५ ॥
यावरी बोले पार्थ वीर ॥ शक्रगृहीं होतों पाच संवत्सर ॥
तेथें उर्वशी परम चतुर ॥ भोगकामा पातली ॥ २६ ॥
तीस भोग नेदीं म्हणोन ॥ वदली ते शापवचन ॥
एक संवत्सर संपूर्ण ॥ नपुंसकत्व पावसी ॥ २७ ॥
तरी मी बृहन्नटा नाम धरून ॥ अंतःपुरामाजी राहीन ॥
स्त्रीवेष अवलंबून ॥ मोहीन जाण सुदेष्णा ॥ २८ ॥
नृत्यगीतभेद शिकवून ॥ सकल स्त्रिया करीन प्रवीण ॥
आपुलें स्वरूप नाम खूण ॥ अणुमात्र न कथीं मी ॥ २९ ॥
यावरी नकुल बोले कौतुक ॥ नाम सांगेन मी ग्रंथिक ॥
अश्वपरीक्षा शिक्षा अनेक ॥ करूनि नृप तोषवीन ॥ ३० ॥
अश्वव्यथा अंतर्लक्षणें ॥ सर्व चातुर्य मी जाणें ॥
सहदेव यावरी म्हणे ॥ तंतिपाल नाम माझें ॥ ३१ ॥
गायी वृषभ महिषी ॥ यांची परीक्षा मी जाणें कैशी ॥
वर्षती जेणें दुग्धराशी ॥ ते मजपाशीं विद्या असे ॥ ३२ ॥
द्रौपदी म्हणे मी पुरंधी ॥ नाम सांगेन सैरंध्री ॥
सुदेष्णेपाशीं अहोरात्रीं ॥ सेवा करीन आदरें ॥ ३३ ॥
धर्म म्हणे मी तेथ ॥ म्हणवीन पांडवांचा सभासद ॥
कौंतेय जाहले गुप्त ॥ म्हणोनि आलों तुजपाशी ॥ ३४ ॥
मग बोले भीमसेन ॥ धर्माचा स्वयंपाकी म्हणवीन ॥
अर्जुन म्हणे स्त्रीवेष धरून ॥ सखी म्हणवीन द्रौपदीची ॥ ३५ ॥
नकुल म्हणे ते वेळा ॥ धर्मरायाच्या अश्वशाळा ॥
त्यांवर होतो नृपाळा ॥ आलो असे तुजपाशी ॥ ३६ ॥
सहदेव म्हणे जाण ॥ विराटाशी बोलेन वचन ॥
मी पांडवखिल्लारी पूर्ण ॥ सेवा करीन तुजपाशी ॥ ३७ ॥
द्रौपदी म्हणे सुदेष्णेपाशीं ॥ म्हणवीन द्रौपदीची दासी ॥
गुप्त जाहले पांडव वनवासीं ॥ जाहली गति ऐसी आम्हां ॥ ३८ ॥
ऐसा करूनि विचार ॥ धौम्यास म्हणे युधिष्ठिर ॥
अरणीपात्रें अग्निहोत्र ॥ घेऊन जावें तुम्हीं आतां ॥ ३९ ॥
पांचालपुरा जाऊन ॥ रहावें अग्निशुश्रूषा करून ॥
द्वारकेस इंद्रसेन ॥ रथ आमुचे नेईल ॥ ४० ॥
सर्वही बोला वचन ॥ पांडव गेले आम्हां टाकून ॥
कोणे स्थळी राहिले जाऊन ॥ हें न कळे सर्वथा ॥ ४१ ॥
यावरी महाराज धौम्य ॥ धर्मासी बोले सप्रेम ॥
नित्य प्रवासकष्ट परम ॥ त्याहून श्रम परगृहीं ॥ ४२ ॥
राजगृहीं राहणें कठिण ॥ बहुत न करावें संघट्टण ॥
जैशी अग्निसेवा दुरून ॥ याजक करिती सप्रेम ॥ ४३ ॥
पांच जण मिळून ॥ द्रौपदीस करा जतन ॥
समयोचित बोला वचन ॥ जेणें समाधान रायाचें ॥ ४४ ॥
वेदांचें अंतर पाहतां सम्यक ॥ फुटती जैसे शास्त्रांचे तर्क ॥
तेविं रायाचें चित्त पाहोनि देख ॥ कार्यभाग करावा ॥ ४५ ॥
न बैसावें रायासन्मुख ॥ पाठीं न बैसावें देख ॥
बहुतांसमीप निःशंक ॥ न बैसावें संघट्टणीं ॥ ४६ ॥
बहुत दूर जाऊनी ॥ न बैसावें रायापासूनी ॥
क्षणक्षणां न लागावें कानीं ॥ मंत्री मनीं विटतील ॥ ४७ ॥
वाम अथवा सव्य पाहूनी ॥ अंतरे बैसावें जाऊनी ॥
राजा वश म्हणोनी ॥ भलती गोष्ट न सांगावी ॥ ४८ ॥
नृप सर्प कृशान ॥ हे मित्र म्हणों नये जाण ॥
राव जाहला जरी प्रसन्न ॥ तेंही सुख न मानावें ॥ ४९ ॥
राये दिधलीं वस्त्रें भूषणें ॥ तींच रायादेखतां लेणें ॥
आणिकाचीं न मिरवणें ॥ स्तुति न करणें इतरांची ॥ ५० ॥
तांबूलचर्वण बहुभाषण ॥ क्षणक्षणां न थुंकावें उठोन ॥
मर्यादेनें बैसावें आटोपून ॥ वीरासन न घालावे ॥ ५१ ॥
बहुत न घ्यावा आहार ॥ वायु आकर्षावा समग्र ॥
राजगृहीं निरंतर ॥ कदा वास न करावा ॥ ५२ ॥
राजपर्यंक राजासन ॥ गज तुरंग सुखासन ॥
तेथें न करावें आरोहण ॥ मर्यादा पूर्ण धरावी ॥ ५३ ॥
अंतःपुरीं एकांतीं ॥ बैसले असतो नृपती ॥
आपण प्रियकर निश्चितीं ॥ म्हणोन तेथें न रिघावें ॥ ५४ ॥
रायासी न होतां श्रवण ॥ राजस्त्रियेचें आज्ञावचन ॥
कदा न मानावें जाण ॥ युक्त बोलोनि सारावें ॥ ५५ ॥
राजस्त्रियेशीं मैत्री ॥ कदा न करावी चतुरीं ॥
स्त्रियांचे एकांतविचारीं ॥ सर्वथाही न बैसावें ॥ ५६ ॥
मी विद्यावंत चतुर ॥ ऐसें न बोलावें वारंवार ॥
प्रत्युत्तर देऊन न्याहार ॥ राजवस्तु न पहावी ॥ ५७ ॥
बहु भाषण बहु हास्य ॥ कदा न करावें विशेष ॥
ग्रामनिंदा परदोष ॥ राजश्रवणीं न घालावे ॥ ५८ ॥
राव वस्त्रें भूषणें लेत ॥ तीं आपण न लेइजे निश्चित ॥
राजा असे व्यथाभूत ॥ आपण औषध न द्यावें ॥ ५९ ॥
रायासमोर करिती स्तुती ॥ इतर स्थलीं निंदा वदती ॥
तें तत्काळ कळे नृपती ॥ मग पावती अपमान ॥ ६० ॥
एव सर्वार्थीं सुजाण ॥ पांडव तुम्ही पांचही निपुण ॥
अज्ञातवास करून ॥ मग सवेंच प्रकटावें ॥ ६१ ॥
हें धौम्य बोलोन सत्वरा ॥ तों गेला पांचालनगरा ॥
इंद्रसेन रथ घेऊन सत्वरा ॥ द्वारकेप्रति पावला ॥ ६२ ॥
आश्रमीं होतें जें समस्त ॥ तें ब्राह्मणां वांटिती पंडुसुत ॥
रात्रीं विप्र जाहले निद्रित ॥ सहाही जाती ते वेळां ॥ ६३ ॥
निघोन जाती पंचप्राण ॥ कदा नव्हती दृश्यमान ॥
तैसे पांडव निघाले तेथून ॥ कोणासही न कळतां ॥ ६४ ॥
धनुष्य घेऊन महामती ॥ तूणीर पृष्ठासी आकर्षिती ॥
गोधांगुळें घालिती हस्तीं ॥ अंगत्राणें बांधिलीं ॥ ६५ ॥
कालिंदी ओलांडूनि त्वरें ॥ निघते जाहले दक्षिणतीरें ॥
आडवाटे गिरिकंदरें ॥ ओलांडिती रात्रींत ॥ ६६ ॥
चरणचालीं त्वरें जाती ॥ आपुलें राष्ट्र चुकविती ॥
पांचालदेश निश्चिती ॥ वामहस्तें टाकिला ॥ ६७ ॥
दशार्णदेश टाकून ॥ शूरसेनदेश चुकवून ॥
दक्षिणदिशे पाहोन ॥ अपार मार्ग क्रमियेला ॥ ६८ ॥
दिसती पांचही विवर्ण ॥ रूपें गेलीं पालटून ॥
जैसे शशिचंडकिरण ॥ अभ्रपटलें झांकले ॥ ६९ ॥
चिखल माखला अनर्घ्यरत्‍नी ॥ कीं मराळ घोळले धुळींनीं ॥
तेविं तीं सहाही निघोनी ॥ जाती त्वरेनें रजनींत ॥ ७० ॥
जिच्या स्वरूपावरूनी ॥ सुरललना टाकिजे ओवाळूनी ॥
ते द्रुपदराजनंदिनी ॥ चरणचालीं श्रमली हो ॥ ७१ ॥
म्हणे पांचही तुम्ही सुकुमार ॥ चरणीं चालतां श्रमलां फार ॥
माझेनें न चालवे पदमात्र ॥ प्राणसंकट जाहले ॥ ७२ ॥
जेविं शुंडादंडेंकरून ॥ कमल उचली वारण ॥
तैसें द्रौपदीस स्कंधीं घेऊन ॥ भीम वीर चालिला ॥ ७३ ॥
विराटनगराजवळी ॥ पांडव आले ते वेळीं ॥
विशाल शमीवृक्षातळी ॥ स्थिरावले नावेक ॥ ७४ ॥
शमीस प्रदक्षिणा करून ॥ करिते जाहले तिचें स्तवन ॥
तुज वंदून रघुनंदन ॥ गेला रावण वधावया ॥ ७५ ॥
म्हणती शस्त्रें घेऊनि करीं ॥ कैसें प्रवेशावें नगरीं ॥
लोक तर्क करितील परोपरी ॥ मात देशांतरा जाईल ॥ ७६ ॥
गांडीव चाप विशाळ ॥ कल्पांतविजेहूनि तेजाळ ॥
कीं उगवलें सूर्यमंडळ ॥ तैशी प्रभा तयाची ॥ ७७ ॥
मग पांच चापें पंच तूणीर ॥ तृणपर्णीं गुंडूनि सत्वर ॥
शमीवरी नकुल वीर ॥ ठेवी दृढ आकर्षूनि ॥ ७८ ॥
वर्षतांही फार घन ॥ न भिजे अणुप्रमाण ॥
त्या भोवतें श्मशान ॥ भयंकर पहा हो ॥ ७९ ॥
पडिलें होतें स्त्रियेचें प्रेत ॥ तें पांडव वृक्षासी बांधित ॥
भयानक फार दिसत ॥ नये तेथें अन्य कोणी ॥ ८० ॥
तों उगवला प्रभाकर ॥ गोरक्षक विलोकितीदूर ॥
जे रक्षणार गायींचे भार ॥ कौतुक पाहती दुरूनी ॥ ८१ ॥
पांडव चालिले तेथून ॥ पुसती गोरक्षक त्यांलागून ॥
प्रेत कां बांधिलें नेऊन ॥ भीम वचन बोलत ॥ ८२ ॥
आमुचा कुलधर्म दुर्धर ॥ वृक्षीं बांधावें कलेवर ॥
तेथें कोणी जातां सत्वर ॥ जळोन मरेल क्षणार्धें ॥ ८३ ॥
असो पांडव चालिले तेथून ॥ ओळखावी अंतर्खूण ॥
नामें ठेविलीं पालटून ॥ नूतनचि दूसरीं ॥ ८४ ॥
जय जयंत विजय ॥ जयत्सेन जयद्‌बल पाहें ॥
मालिनी हें नाम निश्चयें ॥ द्रौपदीस ठेविलें ॥ ८५ ॥
नगरांत प्रवेशले पंडुनंदन ॥ तों देखिलें दुर्गास्थान ॥
धर्मराज करी स्तवन ॥ जगदंबेचे तेधवां ॥ ८६ ॥
जय जय दुर्गे भुवनेश्वरी ॥ यशोदागर्भसंभवकुमारी ॥
इंदिरारमणसहोदरी ॥ नारायणि चंडिकेंबिके ॥ ८७ ॥
जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी ॥ मूलस्फूर्ति प्रणवरूपिणी ॥
ब्रह्मानंदपददायिनी ॥ चिद्विलासिनी अंबिके तूं ॥ ८८ ॥
जय जय धराधरकुमारी ॥ सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी ॥
हेरंबजननी अंतरीं ॥ प्रवेशे तूं आमुचे ॥ ८९ ॥
भक्तहृदयारविंदभ्रमरी ॥ तुझे कृपाबळें निर्धारीं ॥
अतिमूढ निगमार्थ विवरी ॥ काव्यरचना करी अद्‌भुत ॥ ९० ॥
तुझिये कृपावलोकनेंकरून ॥ गर्भांधासी येतील नयन ॥
पांगुळ करील गमन ॥ दूरपंथें जाऊनी ॥ ९१ ॥
जन्मादारभ्य जो मुका ॥ होय वाचस्पतिसमान बोलका ॥
तूं स्वानदसरोवरमराळिका ॥ होशी भाविकां सुप्रसत्र ॥ ९२ ॥
ब्रह्मानंदे आदिजननी ॥ तव कृपेची नौका करूनी ॥
दुस्तर भवसिंध उल्लंघूनी ॥ निवृत्तितटा जाइजे ॥ ९३ ॥
जय जय आदिकुमारिके ॥ जय जय मूलपीठनायिके ॥
सकलसौभाग्यदायिके ॥ जगदंबिके मूलप्रकृतिये ॥ ९४ ॥
जय जय भार्गवप्रिय भवानी ॥ भयनाशके भक्तवरदायिनी ॥
सुभद्राकारिके हिमनगनंदिनी ॥ त्रिपुरसुंदरी महामाये ॥ ९५ ॥
जय जय आनंदकासारमराळिके ॥ पद्मनयने दुरितवनपावके ॥
त्रिविधतापभवमोचके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥ ९६ ॥
शिवमानसकनकलतिके ॥ जय चातुर्यचंपककलिके ॥
शुंभनिशुंभदैत्यांतके ॥ निजजनपालके अपर्णें ॥ ९७ ॥
तव मुखकमलशोभा देखोनी ॥ इंदुबिंब गेलें विरोनी ॥
ब्रह्मादिदेव बाळे तान्हीं ॥ स्वानंदसदनीं निजविसी ॥ ९८ ॥
जीव शिव दोन्ही बाळकें ॥ अंबे त्वां निर्मिलीं कौतुकें ॥
स्वरूप तुझें जीव नोळखे ॥ म्हणोनि पडला आवर्तीं ॥ ९९ ॥
शिव तुझे स्मरणीं सावचित्त ॥ म्हणोनि तों नित्यमुक्त ॥
स्वानंदपद हाता येत ॥ तुझे कृपेनें जननिये ॥ १०० ॥
मेळवून पंचभूतांचा मेळ ॥ त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ॥
इच्छा परततां तत्काळ ॥ क्षणें निर्मूल करिसी तूं ॥ १०१ ॥
अनंत बालादित्यश्रेणी ॥ तव प्रभेमाजी गेल्या लपोनी ॥
सकलसौभाग्यशुभकल्याणी ॥ रमारमणवरप्रदे ॥ १०२ ॥
जय शंबररिपुहरवल्लभे ॥ त्रैलोक्य नगरारंभस्तंभे ॥
आदिमाये आत्मप्रभे ॥ सकलारंभे मूलप्रकृती ॥ १०३ ॥
जय करुणामृतसरिते ॥ भक्तपालके गुणभरिते ॥
अनंतब्रह्मांडफलांकिते ॥ आदिमाये अन्नपूर्णे ॥ १०४ ॥
तूं सच्चिदानंदप्रणवरूपिणी ॥ सकलचराचरव्यापिनी ॥
सर्गस्थित्यंतकारिणी ॥ भवमोचनी ब्रह्मानंदे ॥ १०५ ॥
ऐकून धर्माचें स्तवन ॥ दुर्गा जाहली प्रसन्न ॥
म्हणे तुमचे शत्रू संहारीन ॥ राज्यीं स्थापीन धर्मांतें ॥ १०६ ॥
तुम्ही वास करा येथ ॥ प्रकटों नेदीं जनांत ॥
शत्रू क्षय पावती समस्त ॥ सुख अद्‌भुत तुम्हां होय ॥ १०७ ॥
त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण ॥ तें जे त्रिकाल करिती पठन ॥
त्यांचे सर्व काम पुरवीन ॥ सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥ १०८ ॥
मग त्यांतून युधिष्ठिर एकला ॥ विराटसभेप्रति चालिला ॥
वस्त्रांत गुंडाळून ते वेळां ॥ अक्ष घेतले कक्षेसी ॥ १०९ ॥
अक्ष वैडूर्यसदृश तेजाळ ॥ वरी सुवर्णबिंदु सुढाळ ॥
कुरुवंशज नृपाळ ॥ विप्रवेषें चालिला ॥ ११० ॥
विराटें देखिलें दुरून ॥ जेविं मूर्तिमंत चंडकिरण ॥
शीतळ जैसा रोहिणीरमण ॥ कीं शचीवर उतरला ॥ १११ ॥
सकल पृथ्वीचा करभार ॥ घेणार वाटे राजेश्वर ॥
तंव तों येऊन सभेसमोर ॥ आशीर्वाद देत रायातें ॥ ११२ ॥
विराट बोले स्वस्तिवचन ॥ भस्में आच्छादिला हुताशन ॥
तैसा विप्रवेष घेऊन ॥ केविं येथें आलासी ॥ ११३ ॥
धर्म म्हणे आम्ही ब्राह्मण ॥ स्वेच्छे करूं पृथ्वीभ्रमण ॥
अक्षज्ञानीं मी निपुण ॥ सभासद धर्माचा ॥ ११४ ॥
पांडवीं केला वनवास ॥ नेणों कोठें जाहले अदृश्य ॥
ठाव नाहीं आम्हांस ॥ म्हणोनि आलों तुजपाशी ॥ ११५ ॥
माझें नाव कंक जाण ॥ पीडलों दरिद्रेंकरून ॥
धर्में आमुचें पालन ॥ केलें बहुत राजेंद्रा ॥ ११६ ॥
विराट म्हणे मी तूतें प्रसन्न ॥ सर्व राज्य तुजअधीन ॥
तूं सांगसी तें ऐकेन ॥ मजलागीं माग कांहीं ॥ ११७ ॥
धर्म म्हणे ते अवसरीं ॥ खेळतो जरी मज आली हारी ॥
केले पणाचें द्रव्य निर्धारीं ॥ मजपाशीं न मागावें ॥ ११८ ॥
म्यां जिंकिलें स्वभावें ॥ तरी पणाचें द्रव्य मज द्यावें ॥
विराट म्हणे अवश्य घ्यावें ॥ भाऊ दिधली तैशीच ॥ ११९ ॥
राव म्हणे कंकाप्रती ॥ जे तुझे आज्ञेंत न वर्तती ॥
त्यांस दंड करीन निश्चिती ॥ सत्य वचन जाण हें ॥ १२० ॥
तुझे आज्ञेंत न वर्तती जे ब्राह्मण ॥ त्यांस बाहेर घालवीन ॥
उरले क्षत्रिय वैश्य जाण ॥ जरी तुझें वचन मोडिती ॥ १२१ ॥
तत्काल त्यांस वधीन ॥ तुझें स्वरूप मजसमान ॥
मग वस्त्रें भूषणें देऊन ॥ राये जवळी बैसविला ॥ १२२ ॥
यावरी दुर्गेस नमून ॥ भीम चालिला वेष पालटून ॥
विराटें दूर देखोन ॥ तटस्थ जाहला पाहतां ॥ १२३ ॥
दिसे पुरूषार्थी बलवंत ॥ भुजाबळे लोटील पर्वत ॥
सिंह शार्दूल धरूनि जित ॥ एके दावणी बांधील ॥ १२४ ॥
आजानुबाहु अतिविशाळ ॥ वृषभाक्ष आरक्त तेजाळ ॥
हांकें गाजवी ब्रह्मांडगोळ ॥ तैसा सबळ दिसतसे ॥ १२५ ॥
भीम हनुमंत रेवतीरमण ॥ तैसा दिसे बलसंपन्न ॥
पृथ्वीच्या रायां आकर्षण ॥ क्षणमात्रें करील वाटतें ॥ १२६ ॥
लाटणी आणि दर्वीपार्क ॥ हातीं धरिले सरळ सुरेख ॥
कृष्णवसनवेष्टित देख ॥ येतां सन्मुख देखिला ॥ १२७ ॥
सेवकां सांगे नृपवर ॥ कोण कोठील घ्या समाचार ॥
दूत धांवती सत्वर ॥ पुसती वृत्तांत तयासी ॥ १२८ ॥
तों म्हणे मी सूपशास्त्रीं निपुण ॥ बल्लव माझें नाभाभिधान ॥
सेवक सांगती विराटा येऊन ॥ तों तोही समीप पातला ॥ १२९ ॥
राव पुसे त्यालागून ॥ दिससी जेविं विधूमाग्न ॥
उर्वीचें राज्य संपूर्ण ॥ भोगावया योग्य दिससी तूं ॥ १३० ॥
तों बोले वृकोदर ॥ मी धर्मरायाचा किंकर ॥
स्वयंपाकी परम चतुर ॥ शाका उत्तम करूं जाणें ॥ १३१ ॥
माझ्या हातींचें भोजन ॥ राजा धर्म करी जाण ॥
पांडवीं सेविलें कानन ॥ आलों शरण तुजलागीं ॥ १३२ ॥
आणीक ऐक नृपती ॥ सिंह शार्दूल मत्तहस्ती ॥
महामल्ल भद्रजाती ॥ त्यांशीं झोंबी घेईन मी ॥ १३३ ॥
जो कोणास अनिवार ॥ त्यासी क्षणांत करीन जर्जर ॥
संतोषोनि नृपवर ॥ वस्त्राभरणें गौरवी ॥ १३४ ॥
स्वयंपाकी जे सर्व ॥ त्यांत श्रेष्ठ केला बल्लव ॥
यावरी वेष पालटून अपूर्व ॥ सैरंध्री वेगें पातली ॥ १३५ ॥
जी सकल स्त्रियांची स्वामिणी ॥ नीलपयोधरतनूची भगिनी ॥
ती केश मोकळे करूनी ॥ सव्यहस्तें आवरित ॥ १३६ ॥
एक वस्त्र नेसली मलिन ॥ चालली राजगृहालागून ॥
धांवती नागरिक जन ॥ स्वरूप तिचें पहावया ॥ १३७ ॥
सभोंवता चार कोश ॥ फांके अंगींचा सुवास ॥
इंद्रनीलकुलप्रभेस ॥ उणें आणी निजवर्णें ॥ १३८ ॥
जिचें वदन पाहतां सुंदर ॥ नृत्य करी पुढें पंचशर ॥
ती नेसली मलिन वस्त्र ॥ सैरंध्रीवेष धरियेला ॥ १३९ ॥
जेथें सुदेष्‍णा पट्टराणी ॥ तिकडे जात याज्ञसेनी ॥
मागें धांवती जनश्रेणी ॥ धणी न पुरे पाहतां ॥ १४० ॥
गोपुरावरी राजपत्‍नी ॥ क्षुद्रद्वारें पाहे नयनीं ॥
तों हातीं धरूनि फणी ॥ लावण्यखाणी येतसे ॥ १४१ ॥
पुढें दासी पाठवून ॥ जवळी आणिली बोलावून ॥
सकल पृथ्वीची स्वामीण ॥ तीस कोण म्हणून पुसतसे ॥ १४२ ॥
ती म्हणे मी सैरंध्री ॥ पांडवांची जे पुरंध्री ॥
दुपदराजकुमारी ॥ तिची सखी जवळील मी ॥ १४३ ॥
कमलोद्भवतात परमात्मा ॥ त्याची ललना जे सत्यभामा ॥
तिचा स्नेह बहुत आम्हां- ॥ वर होता जाण पां ॥ १४४ ॥
तीस मी वारंवार ॥ देत असें बहुत श्रृंगार ॥
तें देखोन यादवेंद्र ॥ तिशीं बहु प्रीति करी ॥ १४५ ॥
सुमनांचे अलंकार ॥ पुष्यवस्त्रें सुकुमार ॥
चंदन लेववूं जाणें विचित्र ॥ अंजनप्रकार नेत्रींचा ॥ १४६ ॥
मज मागूनि सत्यभामेपाशीं ॥ पांचाळी ठेवी आपणापाशीं ॥
तीस श्रृंगारीं अहर्निशीं ॥ तेथें विवशीं आड आली ॥ १४७ ॥
द्यूतीं हारवून पण ॥ पांडवीं सेविलें कानन ॥
या संवत्सरांत गुप्त होऊन ॥ कोठें गेले कळेना ॥ १४८ ॥
मी होऊनि अनाथ ॥ तुझे पायांपाशीं आलें त्वरित ॥
मग सुदेष्णा बोलत ॥ एवढें स्वरूप अद्‌भुत तुझें ॥ १४९ ॥
मज वाटे मानसीं ॥ देवांगना तुझ्या दासी ॥
समुद्रवलयांकित पृथ्वीसी ॥ स्वामीण मज वाटतसे ॥ १५० ॥
तूं सहज बोलतां वदनीं ॥ द्विज झळकती महामणी ॥
तुज मी ठेवितें सदनीं ॥ परी मनीं भीतसें ॥ १५१ ॥
विराट जाईल भुलोन ॥ तूं घालिसी त्याजवर मन ॥
मग मीं द्यावा प्राण ॥ न चले अन्य उपाय ॥ १५२ ॥
याविषयीं देशील भाषं ॥ तरी तुज पाळोन अवश्य ॥
सैरंध्री म्हणे परिस ॥ वृत्तांत माझा तूं माये ॥ १५३ ॥
पांच गंधर्व माझे पती ॥ ते अंतरिक्षीं विचरती ॥
मज कोणी अभिलाषी पापमती ॥ त्यासी मारितील क्षणार्धें ॥ १५४ ॥
मज पाहे जो विषम ॥ तों तत्काळ होईल भस्म ॥
दीपकलिकेप्रति क्षेम ॥ पतंग देऊं शकेना ॥ १५५ ॥
मी गेलिया प्राण ॥ न करीं कोणाचें चरणक्षालन ॥
अंगमर्दन उच्छिष्टभोजन ॥ सर्वथाही घडेना ॥ १५६ ॥
सहवासें बहुत ॥ कळेल माझा वृत्तांत ॥
पंच गंधर्व समस्त ॥ राहतीमाझे अंतरिक्ष ॥ १५७ ॥
गंधर्वपांच वेगळे करून ॥ पुरूष मज पित्यासमान ॥
तरुण ते बंधूसमान ॥ बाळकें जाण धाकुटे ॥ १५८ ॥
सुदेष्णा म्हणे यावरी ॥ अवश्य राहीं माझे मंदिरीं ॥
इकडे देवीस नमून झडकरी ॥ वेष पालटी अर्जुन ॥ १५९ ॥
षंडपण अवलंबूनी ॥ स्त्रीवेष धरी ते क्षणीं ॥
केश आकर्षून वेणी ॥ लघु कर्णीं कुंडलें ॥ १६० ॥
तों अकस्मात सभेसमोर ॥ देखे विराट नृपवर ॥
म्हणे स्त्रीवेष धरून इंद्र ॥ वाटे मज उतरला ॥ १६१ ॥
रमावर कीं उमावर ॥ तेणें स्त्रीवेष धरिला सुंदर ॥
सन्मुख देखे नुपवरा ॥ विचारीत तयातें ॥ १६२ ॥
नांव काय तूं कोण ॥ सांगें सर्व वर्तमान ॥
श्रीकृष्णसखा तो कृष्ण ॥ म्हणे नाम बृहन्नटा ॥ १६३ ॥
धर्मरायाचे घरीं ॥ मी होतें अंतःपुरीं ॥
नृत्य गायन कलाकुसरी ॥ शिकवीं नारींस सर्वही ॥ १६४ ॥
पांडव गुप्त जाहले वनांतरीं ॥ राहों इच्छीं तुमचे घरीं ॥
विराट म्हणे उत्तरा कुमारी ॥ आणीक नारी असती पैं ॥ १६५ ॥
गायन नृत्य कलाकुसरी ॥ शिकवीं राहें अंतःपुरीं ॥
गौरवून ते अवसरीं ॥ निजमंदिरीं ठेविलें ॥ १६६ ॥
सहदेव देवीस नमून ॥ निघे वेष पालटून ॥
विराटें सन्मुख देखोन ॥ तन्मय होऊन पुसतसे ॥ १६७ ॥
जैसा सुधापानी निर्जर ॥ तैसें तुझें स्वरूप सुंदर ॥
नाम सांगें पवित्र ॥ होतास कोठें आजवरी ॥ १६८ ॥
तो बोले ते अवसरीं ॥ मी धर्माचा खिल्लारी ॥
गोवृषभपरीक्षा करीं ॥ नाम तरी तंतिपाल ॥ १६९ ॥
दुग्धें स्रवती गायी महिषी ॥ ही विद्या असे मजपाशीं ॥
शिक्षा लावीन वृषभांसी ॥ रथालागीं जुंपावया ॥ १७० ॥
खडाण गायी दुभवीन ॥ वाझेंस वत्सें करवीन ॥
अंतर्व्यथा औषध पूर्ण ॥ सर्व जाणें पशूंचें ॥ १७१ ॥
पूर्वसमुद्रापासूनि थोर ॥ मर्यादा पश्चिमसागर ॥
एवढें थोर खिल्लार ॥ धर्मात्मया धर्माचें ॥ १७२ ॥
द्यूतें हारविला पण ॥ कौरवीं घेतलें हिरोन ॥
गुप्त जाहले पंडुनंदन ॥ म्हणोन आलों तुजपाशीं ॥ १७३ ॥
मग वेतन करून पुष्कळ ॥ खिल्लारी ठेविला तंतिपाळ ॥
मग वेष पालटून नकुळ ॥ देवीस नमून निघाला ॥ १७४ ॥
विराट सभेसमोर येत ॥ अश्वशाला विलोकित ॥
विराटें देखिला अकस्मात ॥ म्हणे हा येथें कोण आला ॥ १७५ ॥
त्यास पाचारी राव ॥ पुसता जाहला नांव ॥
म्हणे तूं नव्हेस मानव ॥ प्रत्यक्ष देव भाससी ॥ १७६ ॥
तों म्हणे राया परियेसीं ॥ होतों धर्माचे अश्वशाळेसी ॥
ग्रंथिक नाम निश्चयेशी ॥ जाण राया सुजाणा ॥ १७७ ॥
घोडा तों श्यामकर्ण ॥ पुच्छ पिंवळें अंग शुभ्रवर्ण ॥
प्रवालमण्यासमान ॥ चार्‍ही खुर जयाचे ॥ १७८ ॥
आरक्तरेखानयन ॥ श्यामवर्ण श्यामकर्ण ॥
दांडी अयाळ जैसें सुवर्ण ॥ गति ज्याची तिहीं लोकीं ॥ १७९ ॥
क्षीरसागराहूनि निघाले ॥ कीं चंद्रकिरणें घडिले ॥
सूर्यलोकाहून उतरले ॥ कीं धुतले जाह्नवींत ॥ १८० ॥
शुद्ध रजताचे धवल ॥ कीं नवनीताचे गोल ॥
ते श्यामकर्ण बहुसाल ॥ पाळिले म्यां धर्माचे ॥ १८१ ॥
सप्तद्वीपींचे तुरंग भले ॥ नवखंडींचे तेजागळे ॥
छप्पन्न देशींचे वेगळे ॥ लक्षणें मीं सर्व जाणें ॥ १८२ ॥
बहात्तर खोडी तत्त्वतां ॥ जाणें तुरंगांच्या सर्व व्यथा ॥
औषथप्रकार नृपनाथा ॥ सर्व ठाउके मजलागीं ॥ १८३ ॥
संतोषोनि नृपनाथ ॥ वेतन केलें बहुत ॥
अश्वशाळे ठेवित ॥ ग्रंथिक परम निपुण तों ॥ १८४ ॥
पणाचें द्रव्य अपार ॥ कंकास देत नृपवर ॥
चौघां बंधूंतें युधिष्ठिर ॥ वाटून देत गुप्तरूपें ॥ १८५ ॥
भक्ष्य भोज्य षड्रसान्नें ॥ भीम देत चौघांकारणें ॥
अंतरीं वर्तती ऐकपणें ॥ बाहेर ओळख न देती ॥ १८६ ॥
ऐसे लोटले चार मास ॥ विराटघरीं बहु संतोष ॥
एकदा मल्ल बहुवस ॥ देशोदेशींचे पातले ॥ १८७ ॥
त्यांत मुख्य जीमूतमल्ल ॥ तेणें झोंबी घेऊनि सकळ ॥
सहस्त्र एक सबळ ॥ मल्ल जिंकिले विराटसभे ॥ १८८ ॥
जीमूतें मर्दिलें सकळ मल्ला ॥ राये बल्लव बोलाविला ॥
तों क्षण न लागतां आला ॥ हांकें भरिला मंडप ॥ १८९ ॥
देखोन जीमूतवारण ॥ बल्लव धांवे पंचानन ॥
हस्तें हस्त धरून ॥ झडती घेती परस्परें ॥ १९० ॥
वर्मकळा दडपिती सकळ ॥ हाके गाजविती ब्रह्मांडगोळ ॥
चार घटिका तुंबळ ॥ मल्लयुद्ध जाहलें ॥ १९१ ॥
भीमे जीमूत चरणीं धरिला ॥ शतवेळां भोवंडिला ॥
आपटूनि मारिला ॥ प्राणा मुकला तत्काळ ॥ १९२ ॥
संतोषोनि विराटराव ॥ बल्लवास देत बहुत गौरव ॥
स्त्रिया विलोकिती सर्व ॥ बल अद्‌भुत तयाचें ॥ १९३ ॥
सिंह व्याघ भद्रजाती ॥ आणून बल्लवाशीं भिडविती ॥
त्यांस आपटूनि क्षितीं ॥ मारूनि टाकी क्षणमात्रें ॥ १९४ ॥
यावरी एकांतीं राव बैसत ॥ नारींचें नृत्य गायन समस्त ॥
बृहन्नटा कौशल्य दावित ॥ विद्या कैशी शिकविली ते ॥ १९५ ॥
लास्य आणि तांडव ॥ दाविती नृत्याचे भाव ॥
भावगायन ऐकतां अपूर्व ॥ शक्र तटस्थ होय पैं ॥ १९६ ॥
राग उपराग भार्यांसहित ॥ मूर्छनांही शरीर कंपित ॥
जें गायन ऐकतां तटस्थ ॥ शेष आणि शशिमृग ॥ १९७ ॥
राव ऐकतां तोषला फार ॥ बृहन्नटा गौरविली अपार ॥
वस्त्रें आणि अलंकार ॥ अमोलिक दिधलीं पैं ॥ १९८ ॥
यावरी अश्व आणून समस्त ॥ ग्रंथिक परीक्षा दावित ॥
पाहतां तुरंगमाचें नृत्य ॥ लोक तटस्थ जाहले ॥ १९९ ॥
वन सांडूनि मागें ॥ तुरंग पळवी वेगें ॥
चक्राकार वामसव्यभागें ॥ फेरितां दृष्टि ठरेना ॥ २०० ॥
संतोषोनि भूपालक ॥ गौरविला तों ग्रंथिक ॥
खिल्लारांचे कौतुक ॥ तंतिपाळें दाखविलें ॥ २०१ ॥
म्हैसे वृषभ समस्त ॥ रायापुढें झुंजवित ॥
वस्त्रें भूषणें बहुत ॥ राव देत तंतिपाळा ॥ २०२ ॥
पांचालीस तें देखोन समस्त ॥ मनांत वाटे खेद बहुत ॥
हा हा कर्म कैसें पंडुसुत ॥ सेवा करिती परगृहीं ॥ २०३ ॥
पृथ्वीचे राजे शरण ॥ ज्यांपुढें उभे कर जोडून ॥
ते येथें सेवक होऊन ॥ नीच कर्म आरंभिती ॥ २०४ ॥
ऐसें क्रमितां पांडवांस ॥ पूर्ण झाले दहा मास ॥
द्रौपदी निशिदिवस ॥ सुदेष्णेतें श्रृंगारी ॥ २०५ ॥
सुदेष्णेचा बंधु कीचक ॥ महाचांडाल हिंसक ॥
तों सेनापति देख ॥ विराटें करून ठेविला ॥ २०६ ॥
सुदेष्णेच्या गृहांत ॥ कीचक आला अकस्मात ॥
पांचालीसी पाहून काममोहित ॥ भगिनीतें विचारी ॥ २०७ ॥
कोण हे सुंदर नारी ॥ मज वाटे प्रमदांत ईश्वरी ॥
लक्ष्मी किंवा गौरी ॥ कीं शारदेची उपमा जे ॥ २०८ ॥
सुदेष्णेस म्हणे ते क्षणीं ॥ हे करीं माझी राणी ॥
इच्या स्वरूपावरूनी ॥ ओवाळीन प्राण हे ॥ २०९ ॥
सेवेयोग्य सुंदरी ॥ हे नव्हे निर्धारीं ॥
पांचालराजकुमारी ॥ गेली झडकरी स्वस्थाना ॥ २१० ॥
मग द्रौपदीचे मंदिरांत ॥ कीचक येऊनि बोलत ॥
हें वैभव तुझें समस्त ॥ मी दास होईन तुझा ॥ २११ ॥
तूं इंदिरेची प्रतिमा ॥ रंभा उर्वशी तिलोत्तमा ॥
तुझ्या दासी आम्हां ॥ ऐसें वाटे अंतरीं ॥ २१२ ॥
कामानळें तापलों थोर ॥ तव समागमें सुरतसागर ॥
मेघ वर्षे शिरीं धार ॥ मी शीतळ होईन ॥ २१३ ॥
मृगांकवदने कुरंगनेत्री ॥ तुज न विसंबें अहोरात्रीं ॥
सकल स्त्रिया निर्धारीं ॥ तुझ्या दासी म्हणवीन ॥ २१४ ॥
माझ्या स्त्रिया तुझ्या दासी ॥ करीन जाण लावण्यराशी ॥
जिंकून सकल रायांसी ॥ पुढें उभे करीन ॥ २१५ ॥
तूं सौंदर्यजाळें पसरून ॥ माझा धरिला मानसमीन ॥
तुझे मुखकमलीं माझें मन ॥ मिलिंद होऊनि गुंजत ॥ २१६ ॥
तूं चातुर्यसरोवरमराळिका ॥ कीं लावण्यचंपककलिका ॥
सकलकामिनींची नायिका ॥ अभय देई मजलागीं ॥ २१७ ॥
यावरी पंडुराजस्नुषा ॥ तीक्ष्ण गोष्टी बोलेल कैशा ॥
स्वस्थ करूनि मानसा ॥ पंडितीं श्रवण करावें ॥ २१८ ॥
पांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व परमाद्‌भुत ॥
ग्रंथकर्ता सत्यवतीसुत ॥ लेखक जाहला गजानन ॥ २१९ ॥
पुढिले अध्यायीं सुंदर ॥ रस उचंबळेल अपार ॥
श्रीधरमुखें रुक्मिणीवर ॥ ब्रह्मानंदें बोलवील ॥ २२० ॥
सुरस पांडवपताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बत्तिसाव्यांत कथियेला ॥ २२१ ॥
स्वस्ति श्रीपांडव्रपताप ग्रंथ ॥ विराटपर्वटीका श्रीधरकृत ॥
पांडव विराटगृहीं जात ॥ कीचकभाषण द्रौपदीशीं ॥ २२२ ॥
ति श्रीधरकृतपांडवप्रतापे विराटपर्वणि द्वात्रिंशोऽध्यायः ॥ ३२ ॥
अध्याय बत्तिसावा समाप्त



GO TOP