श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय चौतिसावा


कौरवांनी विराटाची नेली गुरे पळवून नेली


श्रीगणेशाय नम: ॥
सुयोधन म्हणे शारद्वत ॥ आतां येथूनि युद्ध झालें प्राप्त ॥
पांडव प्रकटतील यथार्थ ॥ अज्ञातदिवस सरले कीं ॥ १ ॥
पांडव केवळ कृशान ॥ आच्छादिले अज्ञातभस्मेंकरून ॥
प्रदीप्त होतील येथून ॥ प्रकाश पूर्ण पडेल ॥ २ ॥
सकल राजे मित्र आप्त ॥ साम दाम भेद बहुत ॥
करून आणावे समस्त ॥ दळ अद्‌भुत करावें ॥ ३ ॥
यावरी त्रिगर्तराज तेथ ॥ वीर सुशर्मा बोलत ॥
आमचें राष्ट्र समस्त ॥ कीचकीं पूर्ण विध्वंसिलें ॥ ४ ॥
ते गंधर्वीं मारिले समस्त ॥ विराट जाहला बलहत ॥
तरी गोग्रहण करूनि येथ ॥ समस्तही आणावें ॥ ५ ॥
विराट आहे बलक्षीण ॥ इतक्यांत राष्ट्र घ्यावें संपूर्ण ॥
मग बोले सुयोधन ॥ वर्तमान जाहले तें ॥ ६ ॥
गुप्त हेरीं वर्तमान सांगितलें ॥ गंधर्वी कीचक मारिले ॥
तेव्हांच मज ऐसें गमले ॥ पांडवचि तत्त्वतां ॥ ७ ॥
धर्म जेथें राहत ॥ भीष्में चिन्हे वर्णिली समस्त ॥
तितुकीं वैराटीं आहेत ॥ कौंतेय तेथें असती पैं ॥ ८ ॥
तेथें असतील पंडुनंदन ॥ तरी त्यांचे दिवस अपूर्ण ॥
आम्ही ओळखों तेव्हांच खूण ॥ पुढती वन सेविती ॥ ९ ॥
अथवा मारून पांडव ॥ हरावें मत्स्यराजवैभव ॥
तेथें गेलिया सर्व ॥ वर्तमान कळेल ॥ १० ॥
पांडव दीन कोशहीन ॥ मित्रहीन नसे सैन्य ॥
ते मारावे अथवा वन ॥ सेवावया धाडावे ॥ ११ ॥
दोन भाग करावी पृतना ॥ सुशर्मा वीर श्रेष्ठ जाणा ॥
तीस सहस्त्र घेऊनि सेना ॥ दक्षिणेकडे चालिला ॥ १२ ॥
आम्ही सर्वही मिळून ॥ करूं उत्तरेसी गोग्रहण ॥
आज्ञा देतां दुर्योधन ॥ भेरी सघन ठोकिल्या ॥ १३ ॥
वाद्यें लागलीं तुंबळ ॥ मिळालें चतुरंग दळ ॥
कृष्णसप्तमी सबळ ॥ सुशर्मा पुढें धांवला ॥ १४ ॥
विराटक्षेत्राची दक्षिण ॥ धांवले आग्नेय कोणाकडून ॥
अष्टमीसी कौरव संपूर्ण ॥ उत्तरेकडे धांवले ॥ १५ ॥
विराट विचार करित ॥ तंव दक्षिणेचे गोप धांवत ॥
आले म्हणती समस्त ॥ गायी नेल्या त्रिगर्तीं ॥ १६ ॥
गजबजली विराटनगरी ॥ ठोकिल्या संग्रामसंकेतभेरी ॥
निजदळाशीं बाहेरी ॥ मत्स्यराज निघाला ॥ १७ ॥
राजबंधु मानिला शतानीक ॥ निजदळाशीं धांवत देख ॥
मदिराक्षनामा वीरनायक ॥ स्वसेनेशीं निघाला ॥ १८ ॥
कंक बल्लव ग्रंथिक ॥ तंतिपाळ चौथा देख ॥
यांस संगे घेत नृपनायक ॥ रथ पृथक् पृथक् देऊनी ॥ १९ ॥
शस्त्रें वस्त्रें देऊन ॥ गौरविले चौघे जण ॥
विराटाचे पाठीशीं जाण ॥ पंडुनंदन चालिले ॥ २० ॥
लागले वाद्यांचे कल्लोळ ॥ दणाणिलें उर्वीमंडळ ॥
परमवेगें चतुरंग दळ ॥ परसैन्याशीं मिळालें ॥ २१ ॥
पायदळावरी पायदळ ॥ लोटले तेव्हां तुंबळ ॥
स्वारांशी स्वार सकळ ॥ एकसरे मिसळले ॥ २२ ॥
रथियावरी रथी ॥ देहाशा सोडून झगडती ॥
दंतींशी झगटले दंती ॥ रगडिती दंताघातें ॥ २३ ॥
माजलें परम रणमंडळ ॥ धुळीने पूर्ण जाहलें निराळ ॥
युद्धभूमि तेथें सकळ ॥ रक्तें आरक्त जाहली ॥ २४ ॥
धांवती रुधिराचे पाट ॥ पुसती महानदीची वाट ॥
बाणमंडप अचाट ॥ अंतरिक्षीं जाहला ॥ २५ ॥
रक्तमेघें भूमि भिजत ॥ धुरळा जाहला समस्त शांत ॥
परस्पर बाण झगटत ॥ तेथें वर्षत ज्वालामाली ॥ २६ ॥
शतानीक धांवला ॥ परदळांत मिसळला ॥
चार सहस्त्र ते वेळां ॥ महावीर पाडिले ॥ २७ ॥
तों मदिराक्ष धांवत ॥ चपलेऐसा तळपत ॥
महावीर शतांचे शत ॥ प्रेते केलीं तेधवां ॥ २८ ॥
अलातचक्राचिये परी ॥ दोघे तळपती परचक्रीं ॥
मत्स्यराजें ते अवसरीं ॥ रथी मारिले पांच शत ॥ २९ ॥
आठ सहस्त्र पाडिले वीर ॥ तों सुशर्मा धांवला सत्वर ॥
हांकें गाजविलें अंबर ॥ मत्स्यराव पाचारिला ॥ ३० ॥
सुशर्म्यानें दश बाण ॥ सोडिले विराटासी लक्षून ॥
अर्धशत शरेंकरून ॥ सुशर्माराव विंधिला ॥ ३१ ॥
युद्ध मांडिलें तुंबळ ॥ तों मावळलें सूर्यमंडळ ॥
तमें दाटलें भूमंडळ ॥ कीं कृष्णकंबळ पसरलें ॥ ३२ ॥
आकाश माखलें काजळे ॥ ऐसें समस्तांस वाटलें ॥
क्षणैक युद्ध बळावलें ॥ तों उदेलें चंद्रबिंब ॥ ३३ ॥
बोधे निरसे अज्ञान ॥ तैसें तम गेलें निघोन ॥
सुशर्मा वीर बलवान ॥ विराटसैन्य मारिलें ॥ ३४ ॥
विराटाचे पाठिराखे बहुत ॥ बाणघायें केले प्रेत ॥
मग रथाखालीं उतरत ॥ सुशर्मा गदा घेउनी ॥ ३५ ॥
रथावरी चढोन ॥ विराटास हातीं धरून ॥
सुशर्मा गेला घेऊन ॥ क्षणमात्र न लागतां ॥ ३६ ॥
घालूनियां रथावरी ॥ सुशर्मा परतला झडकरी ॥
विराटसैन्य ते अवसरीं ॥ चौपारीं फुटियेलें ॥ ३७ ॥
धर्म म्हणे भीमा अवधारीं ॥ आम्हीं राहिलों याचे मंदिरीं ॥
उपकार फेडीं झडकरीं ॥ सोडवीं राजा विराट ॥ ३८ ॥
कृतांतकिंकाळीसमान ॥ भीम धांवत हांक देऊन ॥
आलों रे आलों ऐसें गर्जोन ॥ तरु उपडून धाविन्नला ॥ ३९ ॥
भीमास म्हणे धर्मनृपाळ ॥ वृक्ष नुपडीं विशाळ ॥
ओळखती दुष्ट सकळ ॥ पांडव हेच म्हणोनि ॥ ४० ॥
मनुष्यासारिखें युद्ध करीं ॥ विराट सोडवीं झडकरी ॥
भीम बैसोन रथावरी ॥ धनुष्य घेऊनि धांवला ॥ ४१ ॥
भीमाचे पाठिराखे अभिनव ॥ धांवले नकुल सहदेव ॥
कृतांतही युद्धीं हांव ॥ ज्याशीं धरूं शकेना ॥ ४२ ॥
भीमे फोडिली महाहांक ॥ म्हणे उभा रे उभा नावेक ॥
मजशीं युद्ध करीं क्षणैक ॥ पळों नको पुढारां ॥ ४३ ॥
मग सुशर्मा होऊन भयभीत ॥ भीमाकडे माघारां पाहत ॥
म्हणे हा आला कृतांत ॥ अकस्मात कोण कैंचा ॥ ४४ ॥
भीमाचे बाण अनिवार ॥ सात सहस्त्र पाडिले वीर ॥
सात शतें महाशूर ॥ नकुळें रणीं पहुडविले ॥ ४५ ॥
सहदेवें तीन शत ॥ वीर पाडिले तेव्हां क्षणांत ॥
धर्म रथारूढ धांवत ॥ अमित बाण सोडितसो ॥ ४६ ॥
सुशर्मा प्रचंड वीर ॥ त्यासी न गणीच युधिष्ठिर ॥
जैसे मूढाचे शब्द अपार ॥ पंडित न गणती सहसाही ॥ ४७ ॥
धर्में सोडोनियां बाणा ॥ सारथी मारिला न लागतां क्षण ॥
विराट रथाखालीं उतरोन ॥ गदा घेऊन धावला ॥ ४८ ॥
सुशर्म्याची गदा घेऊन ॥ त्यावरीच घातली उचलोन ॥
त्रिगर्त रथ सांडून ॥ पळता जाहला तेधवां ॥ ४९ ॥
तों भीम धांवला वेगेंशी ॥ सुशर्मा धरिला दृढ केशीं ॥
जेविं महाव्याघ्राचे कवेसी ॥ जंबुक पळतां सांपडला ॥ ५० ॥
सुशर्मा पाडून भूमीवरी ॥ भीमे ताडिला लत्ताप्रहारीं ॥
उरलें सैन्य झडकरी ॥ पळू लागले शत्रूचें ॥ ५१ ॥
नकुळसहदेवीं ते वेळां ॥ गायी गांवांकडे परतविल्या ॥
जयवाद्यांचा लागला ॥ घोष तेव्हां तुंबळ ॥ ५२ ॥
तुरंगग गज महारथ ॥ विराटें लुटिले समस्त ॥
भीमें सुशर्म्यास त्वरित ॥ धर्माजवळी आणिला ॥ ५३ ॥
धुळीनें वदन भरलें ॥ सर्वांगीं रुधिर सुटलें ॥
विराट धर्म ते वेळे ॥ विलोकिती कौतुकें ॥ ५४ ॥
धर्म म्हणे हा नराधम ॥ कुटिलांमाजी श्रेष्ठ परम ॥
याचें वाचेसीं न घ्यावें नामा ॥ सोड जाऊं दे येथोनि ॥ ५५ ॥
सुशर्म्यासी म्हणे भीमसेन ॥ मी दास ऐसें बोलें वचन ॥
नाहीं तरी तोंड फोडीन ॥ बंदीं घालीन बांधोनी ॥ ५६ ॥
कंका आणि विराटभूपाला ॥ नमस्कार घालीं खला कुटिला ॥
मग सुशर्मा ते वेळां ॥ म्हणे मी दास शरणागत ॥ ५७ ॥
कंकविराटांसी करितां नमन ॥ भीमे तत्काल दिधला सोडून ॥
शेषरजनी तेथेंच क्रमून ॥ शिबिरें देऊन राहिले ॥ ५८ ॥
यावरी चौघे पंडुनंदन ॥ विराटे जवळ बैसवून ॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ पूजिता जाहला चौघांसी ॥ ५९ ॥
म्हणे अपयशसमुद्रामाजी जाण ॥ यश गेलें होतें बुडोन ॥
तें मजसहित काढून ॥ विजयध्वज उभारिला ॥ ६० ॥
न माय ब्रह्मांडामाजी ॥ एवढा उपकार केला आजी ॥
मज तुम्हीं स्थापिलें राज्यीं ॥ जन्मवरी विसरेना ॥ ६१ ॥
एकें केला उपकार ॥ जीवदान दिधलें थोर ॥
त्यास जो नाठवी पामर ॥ अंधतमी बुडेल तों ॥ ६२ ॥
जन्मवरी तुम्हांस जाण ॥ प्राणाहूनि विशेष पाळीना ॥
आपली कन्या देऊन ॥ सेवा करीन तुमची मी ॥ ६३ ॥
मज गमतें ऐसें साचार ॥ कीं तुम्ही ईश्वरावतार ॥
मी तुम्हांवरी धरीन छत्र ॥ अहोरात्र न विसंबें ॥ ६४ ॥
धर्म म्हणे सर्व पावलें ॥ तुझ्या वचनें मन संतोषले ॥
राय सुटलास या वेळे ॥ इतुकेन आम्ही कृतकृत्य ॥ ६५ ॥
धर्म सांगे राजसेवकांस ॥ गांवांत गाजवा ऐसा घोष ॥
कीं विराटें जिंकून सुशर्म्यास ॥ पुढती सोडून दिधलें ॥ ६६ ॥
तों अष्टमीचे दिवशीं साचार ॥ धांवले कौरवांचे भार ॥
उत्तरेच्या गायी समग्र ॥ साठसहस्त्र वळियेल्या ॥ ६७ ॥
गंगात्मज भारद्वाजसुत ॥ गौतमतनय गुरुपुत्र अद्‌भुत ॥
आदित्यात्यज अंधपुत्र विख्यात ॥ शतबंधूंशी धावला ॥ ६८ ॥
भीष्म पितृव्य बाल्हिक ॥ भूरिश्रवा सौबलादिक ॥
जयद्रथादि वीरनायक ॥ निजभारांशी धांवले ॥ ६९ ॥
विराटाचे पशूपाल ॥ त्यांहातीं गायी वळिल्या सकळ ॥
मुख्य गोपाधिप होता चपला ॥ रथारूढ पळाला ॥ ७० ॥
आला धांवत नगरांत ॥ उत्तर होता अंतःपुरांत ॥
तयापाशीं येऊन सांगता ॥ गायी समस्त वळियेल्या ॥ ७१ ॥
आले कौरवांचे भार ॥ जे कृतांतासही अनिवार ॥
महाराज तूं राजपुत्र ॥ ख्याति लावीं समस्तां ॥ ७२ ॥
क्षणक्षणां सभेत ॥ पिता तुझा तुज वर्णित ॥
आजि तें करून सत्य ॥ दावीं वेगें नरोत्तमा ॥ ७३ ॥
पुरुषार्थ करूनि या समयीं ॥ सोडवीं साठसहस्त्र गायी ॥
वाट पाहती वत्सें गृहीं ॥ धावे लवलाहीं वीरेशा ॥ ७४ ॥
उत्तर म्हणे ते समयीं ॥ मजयोग्य सारथी नाहीं ॥
भीष्मद्रोणादिक सर्वही ॥ क्षण न लागतां जिंकीन ॥ ७५ ॥
दुर्योधन दुःशासन ॥ अश्वत्यामा गौतम कर्ण ॥
शकुनि जयद्रथ दारुण ॥ विभांडीन क्षणार्धे ॥ ७६ ॥
माझा देखतां पुरुषार्थ ॥ म्हणतील साक्षात्‌ हा पार्थ ॥
ऐकतो सैरंध्री हांसत ॥ मग बोलत उत्तरासी ॥ ७७ ॥
पार्थाचा सारथी तत्त्वतां ॥ बृहन्नटा पूर्वी होता ॥
तरी त्यास प्रार्थन आतां ॥ समागमें नेइजे ॥ ७८ ॥
उत्तरेसी पाठवून ॥ आर्णी येथें बोलावून ॥
पार्थें जाळिलें खांडववन ॥ तेव्हां सारथी हाचि होता ॥ ७९ ॥
मग उत्तर म्हणे उत्तरेसी ॥ जाऊन सांग वृहन्नटेसी ॥
येरी निघाली वेगेंशीं ॥ हंसगती चमकत ॥ ८० ॥
कमलनयना बिंबाधरी ॥ कंबुकंठीपे सुहास्यवक्त्री ॥
हरिमध्या शुभगात्री ॥ अंजने नेत्रीं सोगयाचें ॥ ८१ ॥
सर्वालंकारीं मंडित ॥ विद्युल्लतेऐशी चमकत ॥
नयनकटाक्षें मन्मथ ॥ मुलवोनि सोडी क्षणार्धें ॥ ८२ ॥
असो वृहन्नटेस प्रार्थन उत्तरा ॥ उत्तरापाशीं आणी सत्त्वरा ॥
रथ सिद्ध केला तये अवसरां ॥ सालंकार शस्त्रास्त्रीं ॥ ८३ ॥
बृहन्नटा बोले उत्तर ॥ नितंबिनींमाजी मी चतुर ॥
नृत्य गायन जाणें समग्र ॥ अद्यापि समर न देखिलें ॥ ८४ ॥
उत्तर म्हणे आग्रह न धरीं ॥ बैसे वेगें रथावरी ॥
गायी घेउनि जाती वैरी ॥ गजपुरासी त्वरेनें ॥ ८५ ॥
सेनेसहित मत्स्यनृपवर ॥ दक्षिणेस गेला बलसागरा ॥
बोलतो जाहला बहु उशीर ॥ त्वरा करीं बृहन्नटे ॥ ८६ ॥
कवच घालीं हें अंगीं ॥ स्वहस्तें देत उत्तर वेगीं ॥
बृहन्नटा म्हणे लगबगीं ॥ कैसें ल्यावें कळेना ॥ ८७ ॥
गदगदां हांसती कुमारी ॥ कैसी धीर धरशील समरीं ॥
कवच ल्यावें कोणेपरी ॥ तुज आधीं समजेना ॥ ८८ ॥
ऐसें लाघव दावूनि पार्थ ॥ कवच लेवून शस्त्रें बांधित ॥
माथां केश मागें रुळत ॥ भुजंगाऐशी त्रिवेणी ॥ ८९ ॥
दोघे बैसले रथावरी ॥ हळू हळू जात नगराबाहेरी ॥
बृहन्नटेसी हांसती नारी ॥ चढून गोपुरी विलोकिती ॥ ९० ॥
नगराबाहेर श्मशान ॥ उजवे घालोन नेत स्यंदन ॥
मग पार्थ सांवरून ॥ वाग्दोरे दृढ धरियेले ॥ ९१ ॥
चापापासून सुटला बाण ॥ तैसा नेत त्वरें स्यंदन ॥
तों कौरवभार दुरून ॥ उत्तरें दृष्टीं देखिला ॥ ९२ ॥
प्रलयीं विजा झळकत ॥ तैसे ध्वज देखिले तळपत ॥
रणसागरींचीं जहाजे रथ ॥ तैसे विशाल दिसती पैं ॥ ९३ ॥
हिणाविती भगणांस ॥ तेविं झळकती रथांचे कळस ॥
उदय पावला बालदिनेश ॥ तैशीं चापे तळपती ॥ ९४ ॥
जैसे ऐरावताचे सुत ॥ तैसे वारण चौदंत ॥
वरी पाखरा रत्‍नजडित ॥ भयानक गर्जती ॥ ९५ ॥
तुरंग उच्चैःश्रव्यासमान ॥ वेगें जैसा प्रभंजन ॥
हिंसतां गर्जविती गगन ॥ रलालंकारें शोभती ॥ ९६ ॥
धडकती वाद्यांचे गजरा ॥ ऐकतां मेघ भयातुर ॥
दिग्गज कांपती समग्र ॥ सांडू पाहती अवनीतें ॥ ९७ ॥
ऐसें असंभाव्य सैन्य देखत ॥ उत्तर थरथरां कांपत ॥
म्हणे बृहन्नटे परतवीं रथा ॥ माझेनें हें देखवेना ॥ ९८ ॥
हें दळ उचंबळले अचाट ॥ कीं उसळले काळकूट ॥
हे सेना नव्हे स्पष्ट ॥ कृतांतें सुख पसरिलें ॥ ९९ ॥
उचंबळले मेघडंबरा ॥ तैसे दिसती हे वीरभार ॥
मज देखतां न धरवे धीर ॥ प्राण जाईल वाटतें ॥ १०० ॥
मग हांसोन बोले पार्थ ॥ तूं क्षत्रिय न होसी यथार्थ ॥
तुज लागलें नाहीं एक क्षत ॥ तों भयभीत जाहलासी ॥ १०१ ॥
तुझा होता बहुत भ्रम ॥ जळो तुझा क्षात्रधर्म ॥
अधमाहूनि अधम ॥ मत्स्योदरी आलासी ॥ १०२ ॥
उत्तर म्हणे नगरांत ॥ मज नेऊनि घालवीं त्वरित ॥
जाऊं दे गायी समस्त ॥ मिळती बहुत वांचलिया ॥ १०३ ॥
मज पाहवेना पुढें ॥ रथ मुरडीं ग्रामाकडे ॥
माझें वदन जाहलें कोरडे ॥ नेत्र भोंवती गरगरां ॥ १०४ ॥
ऐसें बोलून तांतडी ॥ रथाखालीं घातली उडी ॥
पळत वेगें आडाआडी ॥ आली हुडहुडी हिंवाची ॥ १०५ ॥
मागें पाहे कुंतीकुमार ॥ तों रथावरी नाहीं उत्तर ॥
नगरमार्गें पळे सत्वर ॥ मागें पुढें न पाहे ॥ १०६ ॥
शत्रू समोर पाहतां दृष्टीं ॥ त्यांस न दाखवावी कदा पाठी ॥
पुढें पाहोन वीर किरीटी ॥ माघारां धांवे त्वरेनें ॥ १०७ ॥
प्रभंजनगतीनें वेगेंशीं ॥ पळता उत्तर धरिला केशीं ॥
ओढून आणिला रथापाशीं ॥ उचलून वरी घातला ॥ १०८ ॥
उत्तरास धरू गेला अर्जुन ॥ तें द्रोणें लक्षिलें दुरून ॥
म्हणे हा पार्थ कुंतीनंदन ॥ स्वीवेषें अवगला ॥ १०९ ॥
भीष्मासी म्हणे भारद्वाज ॥ जो पद्यजजातोद्भवात्मज ॥
त्याचा तनुज हा तेजःपुंज ॥ ओळखों येतसे तूं ओळखीं ॥ ११० ॥
इकडे उत्तर पदर पसरून ॥ किरीटीस मागे जीवदान ॥
म्हणे माझे धनकोश तुज देईन ॥ सोडीं मज जाऊं दे ॥ १११ ॥
मत्स्यरायास सांगोना ॥ राज्य समस्त तुज देववीन ॥
आम्ही वांचलिया गोधन ॥ बहुसाल मेळवूं ॥ ११२ ॥
अर्जुन म्हणे धरीं धीर ॥ पैल शमीवरी चढें सत्वर ॥
माझें धनुष्य आणि तूणीर ॥ देई मज खालतें ॥ ११३ ॥
येरू म्हणे माझें धनुष्य घेऊन ॥ करीं कां येथें युद्धकंदन ॥
हांसोन बोले अर्जुन ॥ हीं मानवी चापें कायशीं ॥ ११४ ॥
तें अग्नीने दिधलें चाप ॥ त्रिभुुवनांत त्याचा प्रताप ॥
ज्याचा गुण ओढितां कंप ॥ सुटे सकल वीरांतें ॥ ११५ ॥
उत्तर म्हणे बांधलें प्रेत ॥ मी कैसा जाऊं सांग तेथ ॥
पार्थ म्हणे भय नाहीं किंचित ॥ मग तों चढत तेधवां ॥ ११६ ॥
वेष्टनें काढून सत्वर ॥ पाहता जाहला उत्तर ॥
तों प्रचंड सर्प भयंकर ॥ तैशी चापें दिसताती ॥ ११७ ॥
वैराटी म्हणे माझेन ॥ स्पर्श न करवे येथें पूर्ण ॥
पांचही चापे पूर्ण ॥ शेषाकार दिसती ॥ ११८ ॥
त्यांत हें मुख्य रुंद सुबद्ध ॥ वरी रत्‍नजडित कंकर प्रसिद्ध ॥
हें मस्तकीं रेखिलें प्रसिद्ध ॥ शातकुंभबिंदू वरी ॥ ११९ ॥
तैसाच प्रचंड अक्षय तूणीर ॥ सांग हें कोणाचें साचार ॥
कौतेय म्हणे पार्थवीरा ॥ त्याचें चाप जाण हें ॥ १२० ॥
देव समस्त जिंकोन ॥ अग्नीस दिधलें खांडववन ॥
हातीं धरी चतुरानन ॥ पांच सहस्त्र वर्षें हें ॥ १२१ ॥
पांचशत संवत्सर ॥ दक्ष धरी हें साचार ॥
तितुकींच वर्षें निर्धार ॥ शक्रवरुणीं धरियेलें ॥ १२२ ॥
पंचवीस वर्षेंपर्यंत ॥ हातीं धरी तों वीर पार्थ ॥
तैशीच चौघां बंधूंची अद्‌भुत ॥ चापें यशवंत असती पैं ॥ १२३ ॥
मग ऐकोनि बोले उत्तर ॥ तों कोठें सांग पार्थवीरा ॥
नकुल सहदेव वृकोदर ॥ धर्म द्रौपदी सांग कोठें ॥ १२४ ॥
मग ईषद्धास्य करून ॥ म्हणे बापा मीच अर्जुन ॥
कीचक मारिले तों भीमसेन ॥ कंक जाण धर्मराज ॥ १२५ ॥
ग्रंथिक आणि तंतिपाल ॥ ते माद्रीपुत्र सहदेव नकुल ॥
सैरंध्री द्रौपदी निर्मल ॥ कीचकप्राणहत्री जे ॥ १२६ ॥
उत्तर बोले प्रेमें ॥ सांग अर्जुनाची दश नामें ॥
त्या नामांचा अर्थ नेमें ॥ सांग करून उघडा पैं ॥ १२७ ॥
अर्जुन फाल्गुन जिष्णु तीन ॥ किरीटी बीभत्सु श्वेतवाहन ॥
सव्यसाची विजय कृष्ण ॥ धनंजय हीं दशनामें ॥ १२८ ॥
शुद्धवर्ण नव्हे विवर्ण ॥ म्हणोनि नाम अर्जुन ॥
पूर्वाफाल्गुनिका नक्षत्र पूर्ण ॥ उत्तराफल्गुनिकादुसरें ॥ १२९ ॥
दोहोंचे संधीत जन्मलों जाण ॥ म्हणोनि नाम फाल्गुन ॥
जिंकील इंद्रादि देवगण ॥ जिष्णु नाम या हेतु ॥ १३० ॥
इंद्रे दिधला किरीट ॥ किरीटी नामाचा बोभाट ॥
युद्धीं बीभत्स दिसें अचाट ॥ बीभत्स नाम या हेतु ॥ १३१ ॥
श्वेत हय श्वेत रथ जाण ॥ म्हणोनि नाम श्वेतवाहन ॥
उभयहस्तें समसंधान ॥ सव्यसाची या हेतू ॥ १३२ ॥
सर्वदाही प्राप्त जय ॥ म्हणोनि नाम विजय ॥
आतां कृष्ण नाम पंडुराय ॥ ठेवीत जाण या हेतू ॥ १३३ ॥
श्रीकृष्ण गायी गोपाळ ॥ मृत्तिकेच्या मूर्ती करूनि निर्मळ ॥
बालपणीं खेळे खेळ ॥ कृष्णलीला सर्वदा ॥ १३४ ॥
श्रीकृष्णसखा म्हणोन ॥ पंडूनें ठेविलें नाम कृष्ण ॥
राजे जिंकून घेतलें धन ॥ धनंजय नाम या हेतू ॥ १३५ ॥
मग उत्तर खालीं उतरून ॥ अर्जुनास करी साष्टांग नमन ॥
आसुवें भरले नयन ॥ देत आलिंगन सप्रेम ॥ १३६ ॥
उत्तर म्हणे दुष्ट वचनें ॥ बोलिलों असेन नेणतपणें ॥
ती क्षमा करावीं दयाघनें ॥ दीनालागीं सर्वदा ॥ १३७ ॥
उत्तर म्हणे ते वेळां ॥ आतां न भी मी कळिकाळा ॥
आता करिसी जी दयाळा ॥ ती मी मस्तकीं वंदीन ॥ १३८ ॥
अर्जुन म्हणे भय न धरीं ॥ पुढें बैसोनि सारथ्य करीं ॥
उत्तर म्हणे ते अवसरीं ॥ आज्ञा अवश्य करीन हे ॥ १३९ ॥
मग शमीस करोनि प्रदक्षिण ॥ स्तवीत तेव्हां श्वेतवाहन ॥
शमी तुझें घेतां दर्शन ॥ शमे पाप सर्वही ॥ १४० ॥
शमीदर्शनें शत्रू शमती ॥ शमी वंदितां रोग हरती ॥
शमीदर्शनें जयप्राप्ती ॥ रघुवीरासी जाण पां ॥ १४१ ॥
शमीपत्रें शिरीं वंदून ॥ गांडीव तूणीर प्रेमें नमून ॥
उत्तर आणि अर्जुन ॥ रथावरी चढियेले ॥ १४२ ॥
श्रीरंगसारथी दारुक ॥ कीं निर्जरेश्वराचा मातली देखा ॥
तैसा उत्तर सुहास्यमुख ॥ सारथी तेव्हां जाहला ॥ १४३ ॥
अर्जुने वरुणास्त्रशरा ॥ सोडून फोडिलें पृथ्वीचें उदर ॥
तेथेंच केलें सरोवर ॥ पार्थ उत्तर स्नान करिती ॥ १४४ ॥
पार्थें नित्यनेम सारून ॥ केलें मानसीं कृष्णाचें ध्यान ॥
जयप्राप्तीसी कारण ॥ कृष्णनाम जपे सदा ॥ १४५ ॥
मग उभा राहिला पार्थ ॥ हदयीं चिंतिला विजयरथ ॥
तों आकाशपंथें अकस्मात ॥ अमरनाथें धाडिला ॥ १४६ ॥
ध्वज फडकतसे थोर ॥ वरी बैसला अंजनीकुमर ॥
अस्त्रें स्मरे पार्थवीर ॥ तीं मूर्तिमंत पातलीं ॥ १४७ ॥
अस्त्रें म्हणती अर्जुना ॥ सांग आम्हांस कांहीं आज्ञा ॥
धनंजय करी प्रार्थना ॥ माझिया मनामाजी रहावे ॥ १४८ ॥
दिव्य वस्त्रें दिव्य भूषणें ॥ शक्रे धाडिलीं पार्थाकारणें ॥
तीं घेतलीं अर्जुने ॥ जी कां मनुष्यां दुर्लभ ॥ १४९ ॥
वेणी उकलून ते वेळां ॥ किरीटीनें किरीट घातला ॥
कौरवभार दचकला ॥ तटस्थ पाहती दुरून ॥ १५० ॥
उदयाचलावरी सूर्यनारायण ॥ कीं सुपर्णावरी इंदिरारमण ॥
हंसावरी चतुरानन ॥ कीं सहस्रनयन गजावरी ॥ १५१ ॥
गांडीवचापाची गवसणी ॥ अर्जुने काढिली तये क्षणीं ॥
वाटे कल्पांतविद्युल्लता कडकडोनी ॥ चापामाजी प्रवेशली ॥ १५२ ॥
याज्ञिकें कुंडांतून ॥ प्रदीप्त केला जैसा अग्न ॥
तैसा तूणीर उघडोन ॥ बांधी झाडून पाठीसी ॥ १५३ ॥
तों अवचिह्नें अद्‌भुत ॥ उठलीं कौरवसेनेत ॥
सुटतां झंझामारुत ॥ धुळीने झोकत सैन्य तेव्हां ॥ १५४ ॥
गृध आणोन प्रेतखंडें ॥ टाकिती सकळांचे पुढें ॥
मंद चालती चपळ घोडे ॥ अश्रू नयनीं वाहती ॥ १५५ ॥
ऐसें देखोनि दुर्योधन ॥ म्हणे कां उदेलें दुश्चिह्न ॥
भयें व्याप्त परिपूर्ण ॥ उद्विग्न मन जाहले ॥ १५६ ॥
इकडे उत्तर म्हणे तये क्षणीं ॥ धनुर्धरांमाजी चूडामणी ॥
तूं एकला कीं आजि रणीं ॥ शत्रू बहुत दिसती ॥ १५७ ॥
अर्जुन म्हणे साह्य श्रीकृष्ण ॥ कासया पाहिजे बहुत सैन्य ॥
अग्नीसी दिधलें खांडववन ॥ दुसरें कोण तेथें होतें ॥ १५८ ॥
गंधर्व रात्रीं जिंकिले ॥ निवातकवच संहारिले ॥
द्रौपदीस्वयंवरीं युद्ध जाहलें ॥ सेना कैंची तेधवां ॥ १५९ ॥
उत्तराचा रथ पहिला ॥ तों शमीपाशींच ठेविला ॥
प्रदक्षिणा करून बैसला ॥ रथावरी धनंजय ॥ १६० ॥
सकल रथांचा राव ॥ रचना त्याची अभिवन ॥
दिव्य अचलांचा समूह ॥ तैसा ध्वज झळकतसे ॥ १६१ ॥
उचंबळले मेघडंबरा ॥ कीं ग्रीष्मकाळींचा दिनकर ॥
कीं गरुडाचा पक्ष सतेज थोर ॥ तैसा फडके नभोमंडळीं ॥ १६२ ॥
रत्‍नजडित वज्रचाकें ॥ स्वकरें घडिली शश्यर्कें ॥
रथकळसाचीं रत्‍नें सुरेखें ॥ भगणांतें हिणाविती ॥ १६३ ॥
क्षीरसागरांत धुतले ॥ कीं रविलोकींहून उतरले ॥
कीं शशिकिरण आटून घडिले ॥ चार्‍ही घोडे रथाचे ॥ १६४ ॥
गोधांगुलित्राण ॥ हस्तीं घालीत अर्जुन ॥
धनुष्याप्रति शर चढवून ॥ ओढी आकर्ण कौंतेय ॥ १६५ ॥
गांडीव टणत्‍कारिलें ते क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघुकिंकिणीं ॥
सप्तद्वीपें आणि धरणी ॥ डळमळली अतिभयें ॥ १६६ ॥
भोगींद्र दचकला अंतरीं ॥ पाताळीं कूर्म पृष्ठी सांवरी ॥
आदिवराह धरित्री ॥ उचलून देत दाढेनें ॥ १६७ ॥
घडघडला विजयस्यंदन ॥ ध्वजीं गर्जे वायुनंदन ॥
त्याभोंवतीं भूतें दारुण ॥ हाकें गगन गाजविती ॥ १६८ ॥
जाहली एकचि हांक ॥ बैसे काळाचे मनीं दचक ॥
तों वाजविला कंबुनायक ॥ देवदत्त अर्जुनें ॥ १६९ ॥
कौरवदळ भयभीत ॥ वाटे मांडला कल्पांत ॥
चापापासून बाण सुटत ॥ तैसा रथ येत पार्थाचा ॥ १७० ॥
वायूस मागें टाकून ॥ मनोगतीं जाय स्यंदन ॥
तों उत्तर रथावरून ॥ उसळोन खालीं पडियेला ॥ १७१ ॥
तैसें या वायुवेगांत ॥ कृष्णे देऊनियां हात ॥
उत्तर उचलोनि अकस्मात ॥ रथावरी बैसविला ॥ १७२ ॥
पाठी थोपटोनि तयासी ॥ म्हणे भिऊं नको मानसीं ॥
विराटपुत्रा क्षत्रिय होसी ॥ कैसें करिसी राज्य पुढें ॥ १७३ ॥
बृहस्पतीऐसा वक्ता ॥ तया मतिमंद मिळे श्रोता ॥
तैसा तूं विजयरथा ॥ सारथी प्राप्त जाहलासी ॥ १७४ ॥
कौरववाद्यांचा कल्लोळ ॥ आतां होईल एकरोळ ॥
डळमळेल ब्रह्मांडगोळ ॥ तेव्हां मग काय करिसी ॥ १७५ ॥
उत्तर प्रत्युत्तर देत ॥ म्या देखिले बहुत रथ ॥
ध्वजही पाहिले अमित ॥ रथनायक देखिले बहू ॥ १७६ ॥
चापेंही देखिलीं असंख्यात ॥ परी हे प्रतिमा नाहीं त्रिभुवनात ॥
हा भूतासहित गर्जतां हनुमंत ॥ मज कल्पांत वाटतो ॥ १७७ ॥
तुझा वाजता देवदत्त ॥ माझें काळिज थरथरां कांपत ॥
बहु न बोलावें म्हणे पार्थ ॥ वाग्दोरे दृढ धरीं कां ॥ १७८ ॥
येथें काळ आलिया समरांगणीं ॥ मी उभाच फोडीन निजबाणीं ॥
तूं भय न धरीं अंतःकरणीं ॥ देवदत्त वाजवितों ॥ १७९ ॥
मग शंख वाजविला अद्‌भुत ॥ तेणें अवनीतल उलथूं पाहत ॥
खळखळां खालीं रिचवत ॥ भगणें आणि विद्युल्‍लता ॥ १८० ॥
वाटे अंबर आसुडत ॥ मार्ग नाहीं कोंडला वात ॥
सृष्टि गेली रे गेली म्हणत ॥ महावीर ते काळीं ॥ १८१ ॥
इकडे महाराज द्रोण ॥ आपल्यांस म्हणे सावधान ॥
होय कीं नव्हे अर्जुन ॥ नयन उघडून ओळखा ॥ १८२ ॥
मायारूप धरी आदिपुरुष ॥ तैसा अर्जुनें धरिला स्त्रीवेष ॥
संपलिया अज्ञातवास ॥ महावीर प्रकटला ॥ १८३ ॥
आमुचें सैन्य तेजहीन ॥ क्षणक्षणां होती अपशकुन ॥
ध्वजस्तंभीं बैसोन ॥ करकरती वायस ॥ १८४ ॥
शिवा सेनेसमोर ॥ रोदन करिती वारंवार ॥
वृक व्याघ्र भूतें समग्र ॥ सेनेभोवतीं हिंडती ॥ १८५ ॥
दुर्योधन म्हणेते वेळे ॥ सकल भय एकवटलें ॥
तें गुरूचे ठायीं स्थिरावले ॥ एकदांच येऊनी ॥ १८६ ॥
अर्जुनाचें करितां स्तवन ॥ पुरे न म्हणे द्रोणाचें मन ॥
यास भय वाटतें दारुण ॥ ग्रामपंथें जाऊं द्या ॥ १८७ ॥
द्रोणाचार्याचे वचन ॥ कोणी धरू नका प्रमाण ॥
सहज होती अपशकुन ॥ यांचें भय कोण मानी ॥ १८८ ॥
द्रोण केवळ ब्राह्मण ॥ येणें करावें वेदाध्ययन ॥
सांगोन असावें शास्त्रपुराण ॥ युद्धकंदन यास काय ॥ १८९ ॥
यागं आणि योग ॥ याणें आचरावा सांग ॥
नानाशास्त्रींचे प्रसंग ॥ निवडूनियां कथावे ॥ १९० ॥
कृपाचार्य समीप घेऊनी ॥ दुर्योधनास म्हणे ते क्षणीं ॥
आचार्य बोलिला जे वाणी ॥ असत्य नव्हे सर्वथा ॥ १९१ ॥
सृष्टीवरी प्रतिशक्र ॥ तों हा कुंतीचा तृतीयपुत्र ॥
एकला परी सर्वत्र ॥ सेना जर्जर करील हा ॥ १९२ ॥
एकलाच सूर्यनारायण ॥ स्वतेजें उर्वीस घाली पालाण ॥
कीं घटोद्भव एकला जाऊन ॥ केलें आचमन सागराचें ॥ १९३ ॥
बलिद्वारीं एकला वामन ॥ ढेंगेंत्‌ आटिले त्रिभुवन ॥
कीं सेनेविरहित भृगुनंदन ॥ निर्वैर करी पृथ्वी हे ॥ १९४ ॥
आजपर्यंत अर्जुन अग्न ॥ झांकला होता अज्ञातभस्मेंकरून ॥
प्रकट जाहला आजि पूर्ण ॥ वीरकानन जाळील हें ॥ १९५ ॥
ऐसें बोलतां गुरूनंदन ॥ तें न साहेचि कदा कर्ण ॥
वर्णितां साधूचे गुण ॥ दुर्जन जैसे चरफडती ॥ १९६ ॥
म्हणे गरुसुता ब्राह्मणा ॥ तुझी छेदूनि टाकावी रसना ॥
किती वार्णीसी अर्जुना ॥ बंदिजनासारिखा ॥ १९७ ॥
कर्ण खड्‌ग घेऊनि ते वेळां ॥ गुरुसुतावरी धांवला ॥
म्हणे ब्राह्मणा अधमा तुजला ॥ मारीन आतां येथेंचि ॥ १९८ ॥
आतांच अर्जुन जिंकून ॥ तुझें टाकीन शिर छेदून ॥
तंव तों महावीर गुरुनंदन ॥ खड्‍ग घेऊन धांवला ॥ १९९ ॥
म्हणे रे कर्णा सूतपुत्रा ॥ तुझें शिर छेदीन अपवित्रा ॥
गुरूनिंदका कुपुत्रा ॥ कुटिला खळा मलिना ॥ २०० ॥
पार्थसिंहाची निंदा देखा ॥ करितोसी मागें जंबुका ॥
अलिका म्हणे विनायका ॥ धरोनि आणीन क्षणार्धें ॥ २०१ ॥
तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानलास धरूं म्हणत ॥
हृदयीं भावी खद्योत ॥ पाडीन आदित्य खालता ॥ २०२ ॥
शलभ बहुत मिळोनी ॥ विजेसी घालूं पाहती वदनीं ॥
लवणाचा गज धांवोनी ॥ सागर शोषूं भावित ॥ २०३ ॥
यशोधैर्यादि सद्‌गुण ॥ सभाग्याचे कर्णी ऐकोन ॥
परम खेद मानिती दुर्जन ॥ नसतें दूषण लाविती ॥ २०४ ॥
परम कुमती जो बलहीन ॥ मागें निंदा करी रात्रंदिन ॥
समरभूमीहून पळे उठोन ॥ हें लक्षण ग्रामसिंहाचे ॥ २०५ ॥
मशक क्रोधें संतप्त ॥ गिळू पाहे सगळा पर्वत ॥
परी तों केवि मावेल वदनांत ॥ मिथ्या जल्प तेविं तुझा ॥ २०६ ॥
अश्वत्यामा घेऊन खड्‌ग ॥ कर्णावरी उठला सवेग ॥
तों रथाखालता उतरून सवेग ॥ दुर्योधन धावला ॥ २०७ ॥
म्हणे गुरुसुता क्षमा करीं ॥ पार्थ उभा ठाकला वैरी ॥
समय ओळखोनि चतुरीं ॥ आपुले शब्द वेंचावे ॥ २०८ ॥
ऐसें बोलोन गुरुनंदन ॥ रथीं बैसविला नेऊन ॥
तैसाच प्रार्थूनियां कर्ण ॥ स्थंदनावरी चढविला ॥ २०९ ॥
द्रोण म्हणे रे कर्णा ॥ आजि पुरुषार्थ दावीं नयनां ॥
जिंकिल्याविण अर्जुना ॥ जाऊं नको माघारा ॥ २१० ॥
आम्ही शूर आणि ब्राह्मण ॥ मुखीं चहूं वेदांचें अध्ययन ॥
पाठीस सदा धनुष्यबाण ॥ वरे शरें समर्थ पैं ॥ २११ ॥
शास्त्र आणि शस्त्र ॥ दोन्ही रक्षितों आम्ही विप्र ॥
निःक्षत्रिय केली धरा समग्र ॥ एका ब्राम्हणें जाण पां ॥ २१२ ॥
शापादपि शरादपि ॥ ब्राह्मण तपस्वी तेजोरूपी ॥
जमदग्नि गौतम वसिष्ठ तपी ॥ शास्त्रें शस्त्रें समर्थ पैं ॥ २१३ ॥
बृहस्पति आणि शुक्र ॥ शापें शरें परम तीव्र ॥
गुरूनिंदेचें फल समग्र ॥ भोगाल तुम्ही आतांचि ॥ २१४ ॥
कर्ण आणि द्रोण यांत ॥ कलह व्हावा जो बहुत ॥
तों द्रोणास प्रार्थोनि गंगासुत ॥ बैसवी स्वस्थ स्वस्थळीं ॥ २१५ ॥
भीष्म म्हणे गुरुद्रोणा ॥ तुझा महिमा न वर्णवे कोणा ॥
आम्ही शिष्य तुझे सुजाणा ॥ तव वचनें प्राण देऊं ॥ २१६ ॥
चालतां सूर्याचा रथ ॥ तूं खोळंबविशील क्षणांत ॥
प्रतिसृष्टि करशील यथार्थ ॥ ब्रह्मदेवा दटावूनी ॥ २१७ ॥
असो यावरी शंतनुसुत ॥ पांडवांचे दिवस गणित ॥
अधिकमास वेगळे करित ॥ तेरा वर्षें परिपूर्ण ॥ २१८ ॥
तेरा वर्षें चांद्र मास ॥ अधिक जाहले बारा दिवस ॥
सत्यप्रतिज्ञ पांडव विशेष ॥ अधर्मपंथें न जाती ॥ २१९ ॥
ऐकें सुयोधना वचन ॥ अर्धराज्य दे त्यांलागून ॥
न मानिसी तरी युद्ध करून ॥ सर्वही हिरोन घेतील ॥ २२० ॥
यावरी सुयोधन म्हणे ऐका ॥ सुईचे अग्री लागली मृत्तिका ॥
इतुकेंही नेदीं त्यांस देखा ॥ युद्धाविण वीर मी ॥ २२१ ॥
भीष्म म्हणे खेळून द्यूत ॥ कपटें राज्य घेतलें समस्त ॥
तें न चले आतां अनर्थ ॥ पुढें युद्ध आरंभिल्या ॥ २२२ ॥
आतां असो हे मात ॥ सैन्य चार भाग करा त्वरित ॥
एका भागें गायी समस्त ॥ हस्तनापुरा पाठवाव्या ॥ २२३ ॥
एक भाग सैन्य घेऊन ॥ दुर्योधना जाई तूं येथून ॥
गायी अवघ्या सांभाळून ॥ नगरपंथें जाई कां ॥ २२४ ॥
उरली जे अर्धपृतना ॥ तिणें आम्ही आटोपू अर्जुना ॥
तें मानलें सुयोधना ॥ घेऊन सेना निघाला ॥ २२५ ॥
गायीसमवेत सुयोधन ॥ चालिला तेव्हां न लागता क्षण ॥
मग भीष्म द्रोण आणि कर्ण ॥ इहीं चक्रव्यूह रचियेला ॥ २२६ ॥
नगरपंथें जाय सुयोधन ॥ तें धनंजयें लक्षिलें दुरून ॥
आतां उठेल पार्थपंचानन ॥ दुर्योधनगजावरी ॥ २२७ ॥
ते कथा अति रसाळ ॥ ऐकोत पंडित कुशळ ॥
विराटपर्व सुरस निर्मळ ॥ सुमंगल परिसतां ॥ २२८ ॥
श्रीमद्भीमातटविहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥
श्रीधरवरदा अत्युदारा ॥ बोलें पुढारां कथारस ॥ २२९ ॥
पांडवप्रताप अन्नसत्र ॥ निर्दोषान्न परम पवित्र ॥
श्रोते जेवोत क्षुधातुर ॥ कर्णद्वारेंकरोनी ॥ २३० ॥
स्वस्ति श्री पांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यास भारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ चौतिसाव्यात कथियेला ॥ २३१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे विराटपर्वणि चतुस्त्रिंशोध्यायः ॥ ३४ ॥
अध्याय चौतिसावा समाप्त


GO TOP