श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सत्ताविसावा


जनक आणि याज्ञवल्क्य


श्रीगणेशाय नम:
अष्टावक्राचें आख्यान ॥ मागें संपलें संपूर्ण ॥
यावरी लोमशाप्रति पंडुनंदन ॥ धर्मराज बोलत ॥ १ ॥
याज्ञवल्क्यानें ज्ञान ॥ उपदेशिलें जनकालागून ॥
ती पुण्यकथा सांग पूर्ण ॥ करूं श्रवण सर्वही ॥ २ ॥
मार्गें जातां क्रमेल वेळ ॥ मुनि बोले ती कथा रसाळ ॥
यावरी लोमाश पुण्यशीळ ॥ सुरस इतिहास सांगतसे
दत्तात्रेय शुक कपिलमुनी ॥ चौथा याज्ञवल्क्य निर्वाणज्ञानी ॥
ज्यांचा महिमा वेदपुराणीं ॥ वर्णिजेतो अत्यादरें ॥ ४ ॥
योगभ्रष्ट उपजतज्ञानी ॥ याज्ञवल्क्य महामुनी ॥
वेदविद्येलागूनी ॥ ऊर्ध्यरेता गुरु केला ॥ ५ ॥
तेथें केलें वेदपठण ॥ विधियुक्त अर्थ पाहिला संपूर्ण ॥
परी जाहलें नाहीं समाधान ॥ ब्रह्मविद्येवांचूनियां ॥ ६ ॥
सकल विद्यांमाजी मुकुटमणी ॥ अध्यात्मविद्या ज्ञानखाणी ॥
त्या विद्येलागीं दिवसरजनीं ॥ गुरुसेवा करी बहु ॥ ७ ॥
जो ब्रह्मविद्येचा दाता ॥ तो गुरु नव्हेचि तत्वतां ॥
कर्मकांडीं कुशल जाणता ॥ मीमांसक पुरता गुरू तो ॥ ८ ॥
तो जनकराव परम सज्ञान ॥ पोटीं नाहीं पुत्रसंतान ॥
बहुत यज्ञ अनुष्ठान ॥ करितां कदा न होय पैं ॥ ९ ॥
तों घरास आला एक द्विज ॥ तेणें जनकासी सांगितलें गुज ॥
त्या याज्ञवल्क्याच्या अक्षता सतेज ॥ जरी मस्तकीं पडती तुझ्या ॥ १० ॥
तरी होईल तत्काल सुत ॥ ऐकतां तोषला नृपनाथ ॥
मग ऊर्ध्वरेता ऋषि समर्थ ॥ गेला दर्शना त्याचिया ॥ ११ ॥
ऋषिस साष्टांगे नमून ॥ जनक विनवी कर जोडून ॥
तुमचा याज्ञवल्क्य शिष्य सुजाण ॥ धाडा भोजना आमचे येथें ॥ १२ ॥
ऋषि म्हणे तो व्रतस्थ ॥ येईल कीं न येईल तेथ ॥
तरी एक सांगतों मुख्यार्थ ॥ तोच करीं निर्धारे ॥ १३ ॥
सप्तशत शिष्य परियेसीं ॥ एकएक बोलावीं प्रतिदिवसीं ॥
ज्येष्ठापासून अनुक्रमेशी ॥ शेवटवरी पूजीं कां ॥ १४ ॥
याज्ञवल्क्याचा येतां दिवस ॥ आपणचि येईल तो नेमास ॥
ऐकतां तोषला मिथिलाधीशा ॥ म्हणे अवश्य ऋषिवर्या ॥ १५ ॥
प्रथम दिवशीं पट्टशिष्य ॥ पूजी भोजन देऊन नरेश ॥
त्याच्या मंत्राक्षता विशेष ॥ मस्तकीं धरी आदरें ॥ १६ ॥
ऐसेंचि नित्यकाळ होत ॥ एक शिष्य भोजन करून जात ॥
परी याज्ञवल्क्याचा दिवस सत्य ॥ न कळे कोणता निश्चयें ॥ १७ ॥
त्याहीमाजी एकादे दिवशीं ॥ राव गुंते राज्यकार्यासी ॥
किंवा जात मृगयेसी ॥ न साधें पंक्तीसी दिवस तया ॥ १८ ॥
जनक सांगे पट्टराणीसी ॥ याज्ञवल्क्य येईल कोणे दिवशीं ॥
बहुत सावधान मानसीं ॥ अक्षता मस्तकीं घेई तूं ॥ १९ ॥
प्रत्यहीं येत ब्राह्मण ॥ अक्षता देत मंत्रून ॥
समीप नसतां यजमान ॥ नृपपत्‍नीस देती मग ॥ २० ॥
तीही समीप नसतां जाण ॥ राजमंचकीं टाकिती नेऊन ॥
तों आपुला दिवस लक्षून ॥ याज्ञवल्क्य आला भोजना ॥ २१ ॥
तों अदृष्टरेखा विपरीत ॥ मृगयेस गेला मिथिलानाथ ॥
राणी जाहली ऋतुस्नात ॥ तो जेवून पुसत याज्ञवल्क्य ॥ २२ ॥
म्हणे अक्षता घ्यावया कोणी ॥ आहे कीं नाहीं नृपराणी ॥
याज्ञवल्याचें स्वरूप नोळखोनी ॥ राजसेवक बोलती ॥ २३ ॥
राजमंचकीं अक्षता टाकोनी ॥ द्विजा जाईं आश्रमा लागूनी ॥
परि तो महाराज केवळ तरणी ॥ स्वरूप कोणी ओळखेना ॥ २४ ॥
समीप असतां निधान ॥ अभाग्यास न फळे पूर्ण ॥
कीं पुढें पडलें दिव्य रत्‍न ॥ अंध जैसा नेणेचि ॥ २५ ॥
असो शयनशाळेंत ॥ याज्ञवल्क्य अक्षता टाकित ॥
मंचकस्तंभी जाऊन पडत ॥ महिमा अद्‌भुत कोणी नेणे ॥ २६ ॥
शयनशाळा घेतली झांकून ॥ याज्ञवल्क्य गेला आश्रमालागून ॥
नृप आला मृगाया करून ॥ शयनस्थानीं प्रवेशला ॥ २७ ॥
तो मंचकस्तंभासी अभिनव ॥ कोमल फुटले पल्लव ॥
आश्चर्य करी जनकराव ॥ निकट सेवक बोलाविले ॥ २८ ॥
शयनशाळेंत आला होता कोण ॥ सेवक बोलती कर जोडून ॥
नित्यावळीचा ब्राह्मण ॥ अक्षता टाकून गेला जी ॥ २९ ॥
जनक शोक करीत पाहे ॥ म्हणे याज्ञवल्क्य पूर्ण होये ॥
कारण कोरडे काष्ठी लवलाहें ॥ नवपल्लव फुटले कीं ॥ ३० ॥
गहन कर्मगति विचित्र ॥ मज कैंचा आतां पुत्र ॥
महाराज तो पुण्यपवित्र ॥ दर्शनही मज नव्हेचि ॥ ३१ ॥
अहा वाउगी गोष्ट जाहली ॥ कामधेनु सदनाप्रति आली ॥
ते काष्ठप्रहारें मारून पिटिली ॥ परी केली तैशीच ॥ ३२ ॥
धुवण म्हणोनि अमृत ॥ अभागी उकरडां ओतित ॥
चिंतामणि गोफणींत ॥ दरिद्री जैसा घालवी ॥ ३३ ॥
गृहास पातला सुपर्ण ॥ काग म्हणोनि मारिला पाषाण ॥
कीं परिस जैसा फोडून ॥ पायरीसी घातला ॥ ३४ ॥
कल्पवृक्ष दैवें भेटला ॥ कुडा म्हणोनि तो तोडिला ॥
तैसा याज्ञवल्क्य न ओळखिला ॥ हतदैवे कोणींही ॥ ३५ ॥
मागुती ऋषीजवळी जाऊन ॥ जनक घाली लोटांगण ॥
म्हणे एकदां मागुत्यान ॥ याज्ञवल्क्य धाडिजे ॥ ३६ ॥
ऋषि म्हणे तो परम हट्टी होये ॥ सर्वथाही भोजना नये ॥
जनक श्रमोनि पाहें ॥ मिथिलेप्रति गेला हो ॥ ३७ ॥
ऐक धर्मा सावधान ॥ गुरु कर्मकांडीं परमनिपुण ॥
याज्ञवल्क्य वेदांतज्ञान ॥ पुसे त्यात क्षणक्षणां ॥ ३८ ॥
तें अध्यात्म न कळे त्यासी ॥ गुरु क्षोभे परम मानसीं ॥
कर्मकांड आचरतां दिननिशीं ॥ संशय उपजे चित्तातें ॥ ३९ ॥
विधिनिषेध पाहतां अपार ॥ व्याकुळ होय परम विप्र ॥
विधियुक्त परम प्रकार ॥ घडला नाहीं वाटे मज ॥ ४० ॥
मन व्याकुळ अत्यंत ॥ गुरूनें आरंभिलें प्रायश्चित्त ॥
परी वृद्ध आपण अशक्त ॥ प्रायश्चित्त नाचरवे ॥ ४१ ॥
आणीक होते शिष्य बहुत ॥ त्यांस म्हणे आचरा प्रायश्चित्त ॥
मज श्रेय द्या समस्त ॥ विधि युक्त करोनी ॥ ४२ ॥
तो याज्ञवल्क्य बोलत ॥ हीं तो बालके समस्त ॥
मी हे आचरीन प्रायश्चित ॥ आज्ञा त्वरित करणें जी ॥ ४३ ॥
अभिमान सांडून ॥ करूं नेणें बोलिलें वचन ॥
तों गुरु क्षोभला दारुण ॥ म्हणे अभिमान तुज जाहला ॥ ४४ ॥
तुज दंड करीन यथार्थ ॥ माझी वेदविद्या टाकीं समस्त ॥
ऐसा त्याचा गुरु बोलत ॥ क्रोधें संतप्त कांपतसे ॥ ४५ ॥
मग याज्ञवल्क्य विद्या वमिता ॥ जैसा खदिरांगार धगधगित ॥
ऋषि तित्तिरपक्षी होता ॥ विद्या प्राशित आपुली ॥ ४६ ॥
वमिला वेद प्राशित ॥ तो तैत्तिरीयशाखाभेद होत ॥
अद्यापि तित्तिरपक्षी भक्षित ॥ विंगळ्यांच्या आहारातें ॥ ४७ ॥
गुरूस करून नमन ॥ याज्ञवल्क्य निघाला तेधून ॥
मग आचरोनि अनुष्ठान ॥ निघे शरण सूर्यासी ॥ ४८ ॥
देवतात्रयस्वरूप पूर्ण ॥ प्रत्यक्ष दैवत सूर्यनारायण ॥
याज्ञवल्क्यस होऊन प्रसन्न ॥ ब्रह्मविद्या उपदेशिली ॥ ४९ ॥
विदेह पढला अद्‌भुता ॥ अनुच्छिष्ट मात्र सांगत ॥
अपरोक्षज्ञान झालें प्राप्त ॥ होय विख्यात तिहीं लोकीं ॥ ५० ॥
अध्ययन तप ज्ञान ॥ सर्वविषयीं याज्ञवल्क्य पूर्ण ॥
कीर्तींनें भरलें त्रिभुवन ॥ धन्य धन्य सर्व म्हणती ॥ ५१ ॥
असो ऐकतां पूर्व कीर्तींतें ॥ अल्पज्ञानी ऋषि जे होते ॥
ते प्रवर्तोनि निंदेतें ॥ नाना दूषणे लाविती ॥ ५२ ॥
जैशी मृगेंद्राची निंदा देख ॥ करिती मागें जंबुक ॥
अळिका म्हणती विनायक ॥ धरून आणूं क्षणमात्रें ॥ ५३ ॥
यश धैर्य सद्‌गुण ॥ सभाग्याचे कर्णीं ऐकोन ॥
परम खेद मानिती कुजन ॥ नसतेंचि दूषण लाविती ॥ ५४ ॥
एव निंदेस प्रवर्तले ऋषि ॥ म्हणती सूर्ये कैसें उपदेशिलें यासी ॥
आदित्य जाळी सकळांसी ॥ हा तेथें कैसा वांचला ॥ ५५ ॥
देहधारी होऊन सूर्यनारायण ॥ यास कैसें उपदेशिलें ज्ञान ॥
मीमांसक हें न मानिती वचन ॥ असत्य पूर्ण याज्ञवल्क्य ॥ ५६ ॥
यासी गुरु कैंचा सूर्यनारायण ॥ याणेंच स्वरवर्ण भिन्न करून ॥
वेद केला जनरंजन ॥ जैसें भाषण नटाचें ॥ ५७ ॥
वेद वमूनि गुरु त्यागिला ॥ सूर्यास कधीं शरण गेला ॥
ऐसा ऋषिजन निंदेस प्रवर्तला ॥ समाचार ऐकिला याज्ञवल्क्ये ॥ ५८ ॥
परि समाधानी ऋषीचें चित्त ॥ विषाद नुपजे मनांत ॥
निंदकाशीं प्रीति वाढवित ॥ भावित परम मित्र हे ॥ ५९ ॥
दुर्जनाशीं प्रीतिभाषण ॥ हें संतांचें मुख्य लक्षण ॥
आणि दुसर्‍याचे दोषगुण ॥ गेलियाही प्राण न बोलती ॥ ६० ॥
जनक इच्छिता जाहला मानसीं ॥ कीं शरण रिघावें सद्‌गुरूसी ॥
तरी सर्वज्ञ दयाळू निश्चयेंशी ॥ गुरु तोचि करावा ॥ ६१ ॥
यालागीं पूर्ण आत्मज्ञानी ॥ जनकराव इच्छी मनीं ॥
सद्‌गुरू भेटावा म्हणोनी ॥ याग तेणें आरंभिला ॥ ६२ ॥
परम सन्मानेंकरून ॥ बोलाविले समस्त ऋषिजन ॥
याज्ञवल्क्य बोलावून ॥ यागालागीं आणिला ॥ ६३ ॥
नवग्रहांमाजी मित्र ॥ कीं त्रिदशांमाजी इंदिरावर ॥
कीं तपियांमाजी पिनाकधर ॥ तैसा ऋषींत याज्ञवल्क्य ॥ ६४ ॥
यागाचें करून मिषा ॥ याज्ञवल्क्य आणिला घरास ॥
शरण रिघावें तयास ॥ अनुताप बहु वसे अंतरीं ॥ ६५ ॥
जन्म मरण गर्भवास ॥ संसारदुःखें असोस ॥
यालागीं शरण रिघावें गुरूस ॥ ऐसें मिथिलेश भावित ॥ ६६ ॥
याज्ञवल्यास बहुत वंदित ॥ निंदिती कोणी दुष्ट किंचित ॥
परी महाराज खेदरहित ॥ शरण यास रिघावें ॥ ६७ ॥
याज्ञवल्क्यस रिघोन शरण ॥ पुसूं जरी आत्मज्ञान ॥
तरी बहुत ऋषि मिळोन ॥ गलबला येथें करितील ॥ ६८ ॥
याज्ञवल्क्याचें थोरपण ॥ प्रकटावया तेथें संपूर्ण ॥
जनके मांडिलें विंदाण ॥ सावधान परिसावें ॥ ६९ ॥
सुवर्णाच्या सहस्त्रगायी ॥ वत्सांसहित केल्या ते समयीं ॥
श्रृंगारून सकलही ॥ दक्षिणेसहित ठेविल्या ॥ ७० ॥
दानशाळेस नृपनाथ ॥ दानोदकझारी करीं घेत ॥
ऋषी बोलावून समस्त ॥ काय बोलता जाहला ॥ ७१ ॥
जो ब्रह्मवेत्ता संपूर्ण ॥ निस्पृह आणि सर्वज्ञ ॥
तेणेंच यावें उठोन ॥ गायी देईन सर्व त्यासी ॥ ७२ ॥
हें ऐकोनि भूसुर ॥ करिती आपुले ठायीं विचार ॥
आम्ही वक्ते निस्पृह साचार ॥ केविं उत्तर बोलावें ॥ ७३ ॥
मी ब्रह्मवेत्ता म्हणवणें ॥ हेंच आधीं लाजिरवाणें ॥
त्यावरी निस्पृहता मिरवणें ॥ गायीं घेणें कासया ॥ ७४ ॥
ऐशिया गोष्टी कठिन ॥ कोण घेईल गायी दान ॥
त्याशीं वाद अत्यंत करून ॥ टाकू जिंकून क्षणार्धें ॥ ७५ ॥
जनक म्हणे तत्त्वतां ॥ कां कोणी न उठे ब्रह्मवेत्ता ॥
सर्व प्रत्युत्तर न देतां ॥ अधोवदन पाहती ॥ ७६ ॥
करावया भवचापभंजन ॥ उठिला जैसा मित्रकुलभूषण ॥
तैसा याज्ञवल्क्य उठोन ॥ उभा राहिला ते वेळे ॥ ७७ ॥
शिष्यांलागीं आज्ञापित ॥ गायी गृहा न्याव्या समस्त ॥
अलंकारदक्षिणेसहित ॥ उचला येथून तत्त्वतां ॥ ७८ ॥
याज्ञवल्क्य म्हणे जनकासी ॥ ब्रह्मवेत्ता तूं पुससी ॥
जो सर्वभूतनिवासी ॥ ब्रह्मवेत्ता तो एक ॥ ७९ ॥
सांडून समस्त अहंकृति ॥ सत्यज्ञानानंत स्वयंज्योति ॥
सर्वसाक्षी तो निश्चितीं ॥ शुद्धबुद्ध वेगळा जो ॥ ८० ॥
एकमेव द्वितीयं नास्ति ॥ ऐसें बोले वेदश्रृति ॥
एकावांचून वसति ॥ नाहीं दुजयाची सर्वथा ॥ ८१ ॥
एको देव: सर्वभूतेषु गूढ: ॥ श्रुतीने भेदावरी वाहिला मेंढा ॥
करून दृश्याचा रगडा ॥ मतवादी विभांडिले ॥ ८२ ॥
अणोरणीयान्महतो महीयान्‌ ॥ ऐसें श्रृति बोले गर्जोनियां ॥
हा अनुभव आंगीं जयां ॥ उरवूनियां जाण पां ॥ ८३ ॥
स्वप्रत्ययें बोले वेदश्रुती ॥ तो आत्मा मी पूर्ण निश्चिती ॥
तंव तो अच्युतोहमनंतोहं म्हणती ॥ जे वेदांती महंत ॥ ८४ ॥
नायं देहो नैवेंद्रियाणि ॥ सर्वातीत मी श्रुति वाखाणी ॥
केवळ ब्रह्मसुखाची खाणी ॥ क्षराक्षरातीत मीच ॥ ८५ ॥
अज अव्यय सर्वज्ञ ॥ अवस्था त्रय निरसोन ॥
जीवशिवांचा साक्षी पूर्ण ॥ आद्य अचल अमल मी ॥ ८६ ॥
मज येणें जाणें नाहीं ॥ तेथें जिणें मरणें कायी ॥
इंद्रियसुखविमुख पाहीं ॥ विदेही साक्षी वेगळा मी ॥ ८७ ॥
न जायते म्रियते वा पहा हो ॥ स्वयें बोले रमानाहो ॥
तो अज नित्य शाश्वत आनंदडोहो ॥ निजसुखभरित मी ॥ ८८ ॥
उपनिषदोद्यानीं ॥ विहारकर्ता मी चिन्मयखाणी ॥
दृश्यसागराचें आचमन करूनी ॥ विदेही विलसे कलशोद्‌भव ॥ ८९ ॥
स्वानुभव पांचांचें सुरसारविंद ॥ अखंड भोगीं मी मुक्त मिलिंद ॥
मी उदयास्तादि अर्कविशद ॥ दृश्य भगणें ग्रासक जो ॥ ९० ॥
तमद्विरदविदारक मृगेंद्र ॥ भेदधराधरच्छेदक वज्रध्रर ॥
शंबररिपुजालविकृतिसंहार ॥ कर्ता परात्पर शिव मी ॥ ९१ ॥
दुर्धर मायावन सकळी ॥ दहनकर्ता मी ज्वालामाळी ॥
भयवल्लीविध्वंसक बळी ॥ निरंकुश इभ मी ॥ ९२ ॥
पंचकोशाहून वेगळा ॥ षड्‌विकाररहित निराळा ॥
त्रिविध अहंकार कलुष जाहला ॥ छेदक मी जितेंद्रिय ॥ ९३ ॥
दोषत्रयविरहित ॥ देहत्रयवर्जित ॥
स्वानुभवें वर्तत ॥ ब्रह्मानंदे अद्वय मी ॥ ९४ ॥
ऐसें ऐकतां निरूपण ॥ जनकें धरिले दृढ चरण ॥
म्हणे मी तनमनधनांशीं शरण ॥ तुजप्रति महाराजा ॥ ९५ ॥
अष्टभावें सद्‌गदित ॥ अलंकारदक्षिणासहित ॥
गोधने अर्पिलीं समस्त ॥ अनन्यभावेंकरूनियां ॥ ९६ ॥
ऐसें देखोनि ते वेळीं ॥ क्षोभली समस्त ऋषिमंडळी ॥
सकल सभा गडबडली ॥ निंदेस सर्व प्रवर्तले ॥ ९७ ॥
कोणी उठोनि उभे ठाकती ॥ कोणी बैसलेठायींच बोलती ॥
एक क्रोधें थरथरां कांपती ॥ प्रवर्तती वादासी ॥ ९८ ॥
निर्भर्त्सिती अवघे जण ॥ उच्चारिती दोष गुण ॥
परी याज्ञवल्क्य आनंदघन ॥ संतापें मन पोळेना ॥ ९९ ॥
ब्राह्मण म्हणती देख ॥ तूं ज्ञाता कैसेनि अधिक ॥
शिष्याहातीं गोधनें सकळिक ॥ न्यावया येथें कोण तूं ॥ १०० ॥
मी ब्रह्मवेत्ता म्हणविसी ॥ आशा धरून गोधनें नेसी ॥
निस्पृहताही वागविसी ॥ अपमानून आम्हांतें ॥ १०१ ॥
येरू म्हणे शिष्य सद्‌विवेक ॥ वृत्तिगायी वळविल्या देख ॥
गोरक्षण करावें सम्यक ॥ श्रृत्यर्थ हा निर्धारे ॥ १०२ ॥
चरमवृत्ति जोंवरी बाणे ॥ तोंवरी गायी दृढ रक्षणें ॥
पैलपारा आहे जाणें ॥ तोंवरी जतन करीं नौकेसी ॥ १०३ ॥
चरम म्हणिजे शेवटील स्थिती ॥ जीहून थोर नाहीं परती ॥
चंचलता नसे निश्चितीं ॥ चरमवृत्ति जे म्हणिजे ॥ १०४ ॥
गोरक्षण न करितां ॥ चरमवृत्ति नये हातां ॥
अलंकारसमवेत तत्त्वतां ॥ गोधनें बरीं रक्षावीं ॥ १०५ ॥
तुम्ही म्हणाल कोणते अलंकार ॥ श्रवणमननादि नऊ प्रकार ॥
दया क्षमा शांति निरंतर ॥ श्रृंगारसहित रक्षाव्या ॥ १०६ ॥
निजानुसंधान गोकंठपाश ॥ त्याविण गायी नावरती निःशेष ॥
निरंजन सावकाश ॥ गायी न्याव्या चरावया ॥ १०७ ॥
वेदमर्यादाकाठी घेऊनी ॥ गायी वळाव्या क्षणोक्षणीं ॥
परी विषयक्षेत्रीं जाऊनी ॥ भरों न द्याव्या सर्वथा ॥ १०८ ॥
ऐसें करितां गोरक्षण ॥ सप्तभूमिका ओलांडून ॥
चरमवृत्ति बाणे पूर्ण ॥ शेवटील जीस म्हणती ॥ १०९ ॥
ऐसें याज्ञवल्य बोलिला ॥ परी तें न मानेच तयांला ॥
आश्वलायन अर्थभाग ते वेळां ॥ वाद केला तिहीं बहु ॥ ११० ॥
श्वेतकेतु अजमीढ जरत्कारादिक ॥ अवघे याज्ञवल्यानें जिंकिले देख ॥
निरुत्तर केलिया अधोमुख ॥ सर्वही खालीं पाहती ॥ १११ ॥
तों तेथें गार्गेयीनामें योगीण ॥ ब्रह्मवेत्ती सदा नग्न ॥
अकस्मात उभी ठाकली येऊन ॥ म्हणे कां रे भांडण करितसां ॥ ११२ ॥
जाहला जो पूर्ववृत्तांत ॥ जनक गार्गेयीप्रति सांगत ॥
ते म्हणे ऋषी हो ऐका समस्त ॥ निवडितें येथें वाद हा ॥ ११३ ॥
सावधान ऐका सर्वही ॥ जो सजीव करील अवघ्या गायी ॥
तेणेंचि न्याव्या लवलाहीं ॥ निश्चय पूर्ण जाणिजे ॥ ११४ ॥
समस्त ऋषी तेव्हां बोलती ॥ सजीव गायी केवि होती ॥
नैयायिक तेथें म्हणती ॥ आम्ही न जीववूं यथार्थ ॥ ११५ ॥
निर्जीवास आणावा प्राण ॥ हें ईश्वराचें कर्तृत्व पूर्ण ॥
आम्ही होऊं ईश्वरासमान ॥ कल्पांतींही घडेना ॥ ११६ ॥
समस्तांच्या खुंटल्या युक्ती ॥ मग तो याज्ञवल्क्य केवळ गभस्ती ॥
म्हणे एक ईश्वर सर्वांभूती ॥ जडाजडीं व्यापक ॥ ११७ ॥
जल स्थल काष्ठ पाषाण ॥ अष्ट धातु औषधी जाण ॥
सर्वत्र ईश्वर व्यापला पूर्ण ॥ हें तों सत्य श्रुत्यर्थीं ॥ ११८ ॥
ते प्रतिमा प्रत्यक्ष होऊन ॥ भक्तांशीं अर्चाभाव टाकून ॥
साक्षात्‌ बोलों लागे वचन ॥ निष्ठा देखोनि भाविकांची ॥ ११९ ॥
धातूची करावी जे मूर्ती ॥ तेथें द्विज प्राणप्रतिष्ठा करिती ॥
आवाहन करितां दैवतें येती ॥ करिती वस्ती धातूंमाजी ॥ १२० ॥
तरी सुवर्णगायींमाजी तत्त्वतां ॥ ईश्वर वास्तव्य करील आतां ॥
याज्ञवल्यानें संकल्प करितां ॥ गायी जाहल्या सजीव ॥ १२१ ॥
वत्स करिती स्तनपान ॥ अद्‌भुत वर्तलें येथें पूर्ण ॥
जनक घाली लोटांगण ॥ म्हणे धन्य ऋषिरावो ॥ १२२ ॥
तो बोलती समस्त ब्राह्मण ॥ येणें कौटल्य केलें पूर्ण ॥
किंवा केलें दृष्टिबंधन ॥ आम्ही न मागूं सर्वथा ॥ १२३ ॥
आम्ही यास नेदूं गोधन ॥ मग गार्गेयी बोले वचन ॥
म्हणे विप्र हो ऐका एक खूण ॥ निर्वाणप्रश्न दोन असती ॥ १२४ ॥
ते प्रश्न याणें सांगितले ॥ तरी मग सर्वांसी जिकिलें ॥
तुमचें सामर्थ्य खुंटले ॥ बोलणें न चाले सहसाही ॥ १२५ ॥
सूर्यापुढें जैसा धुरंधर ॥ विनायकापुढें पादोदर ॥
कीं महामण्यापुढें गारा ॥ मांडेल कोठे सांग पां ॥ १२६ ॥
तुम्ही गलबला सांडून ॥ स्वस्थचित्तें करावें श्रवण ॥
मग याज्ञवल्क्याप्रति वचन ॥ गार्गेयी बोलत ऐका तें ॥ १२७ ॥
मी हिंडतें नग्न निःशेष ॥ दृष्टीस न दिसे पुरूष ॥
स्त्री नपुंसक पदार्थ दृश्य ॥ नेणें कांहीं सर्वथा ॥ १२८ ॥
कित्येक मज देखोन ॥ मूर्खें भ्याडें झांकिती नयन ॥
कोणी खालीं मुख करून ॥ मजशी गोष्टी सांगती ॥ १२९ ॥
कोणी आणिकांकडे पाहती ॥ मग गोष्टी मजशी बोलती ॥
कोणी उठोन पळती ॥ समोर न ठाकती कदाही ॥ १३० ॥
परी विकाररहित पुरुष ॥ आजि मीं देखिला तूं विशेष ॥
इकडे तिकडे न पाहसी निःशेष ॥ समदृष्टि तुझी असे ॥ १३१ ॥
जैसे नग्न पशु हिंडती ॥ तेथें विकार न उठे चित्तीं ॥
कीं वृक्ष पाषाण दिसती ॥ तैसें भाविसी मजला तूं ॥ १३२ ॥
तुझी केवळ ब्रह्मस्थिति ॥ वादीं जिकिलें सकलांप्रति ॥
तरी माझे प्रश्न सांग निश्चितीं ॥ याज्ञवल्क्य यावरी बोले ॥ १३३ ॥
तुझ्या प्रश्नाचे करीन निरसन ॥ तू आडवे घेशी जाणोन ॥
तरी तुझें शिर पडेल तुटोन ॥ जाण खूण हेचि पैं ॥ १३४ ॥
अंतरीं जाणोन यथार्थ ॥ अन्यथा बळें प्रतिपादित ॥
तरी होईल अनर्थ ॥ शरीर पडेल खालतें ॥ १३५ ॥
यावरी करीं तूं आतां प्रश्न ॥ मग गार्गेयी काय बोले वचन ॥
संतीं परिसावें सावधान ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥ १३६ ॥
गार्गेयी म्हणे याज्ञवल्क्यास ॥ म्यां घेतलें संदेहधनुष्य ॥
दोन्ही प्रश्नबाण निःशेष ॥ लावून सोडितें तुजवरी ॥ १३७ ॥
अविलंबें सोडीं दोन्ही शरा ॥ याज्ञवल्क्य बोले उत्तर ॥
सद्‌गुरु माझा भास्कर ॥ प्रत्युत्तर देईल तो ॥ १३८ ॥
काय आहे एकवीस स्वर्गांवरी ॥ सप्तपाताळांखालीं काय निर्धारीं ॥
ओतप्रोत मध्ये अवधारीं ॥ काय आहे सांग पां ॥ १३९ ॥
वस्तु व्यापक सर्वांतरीं ॥ हेंही सांग कोणें परी ॥
व्यापून वेगळेपणे सर्वत्रीं ॥ कोणे रीतीं सांग पां ॥ १४० ॥
हे स्त्री करिते प्रश्न ॥ म्हणोन न करीं हेळण ॥
सांगतो तूं न होई भिन्न ॥ अभेदपणें सांगावें ॥ १४१ ॥
मग याज्ञवल्क्य मांडी धैर्यठाण ॥ काढी वेदांतींचे दिव्य बाण ॥
आतां प्रश्नशर घेऊन ॥ विदारील आशंका ते ॥ १४२ ॥
तटस्थ पाहे ऋषिमंडळ ॥ सावधान ऐके जनकभूपाळ ॥
ज्ञानी अंतर्लीन निर्मळ ॥ सर्वद्रष्टा याज्ञवल्क्य ॥ १४३ ॥
पुससी तूं स्वर्गावरतें ॥ आणिपाताळांखालतें ॥
बोलतां त्या मर्यादेतें ॥ सांगतां जाय विरोन ॥ १४४ ॥
तरी वरी खालीं मध्ये जाण ॥ ओतप्रोत संपूर्ण ॥
अवघें चिन्मात्र आनंदघन ॥ अद्वय निरंजन सर्वही ॥ १४५ ॥
जळी बुडाली जळगार ॥ तीस अंतर्बाह्य अवघें नीर ॥
स्वयें तें सलिल साचार ॥ द्वैतविचार नसेची ॥ १४६ ॥
कीं समुद्रीं पडलें सामुद्रिक ॥ तें स्वयेंचि होय सागर एक ॥
कीं आर्द्रघट भूमीशीं ऐक्य ॥ न मेळवितां मिळाला ॥ १४७ ॥
कीं खग जाय ऊर्ध्वपंथें ॥ त्यास खालीं आणि वरतें ॥
आकाशापासून रितें ॥ अणुमात्र नसेची ॥ १४८ ॥
मेदिनीवसनाचें पैलतीर ॥ दृश्य जरी नव्हे समग्र ॥
परी अवघा एक साचार ॥ सरितानाथ सत्य कीं ॥ १४९ ॥
तैसें वरी खालीं मध्ये संपूर्ण ॥ अवघें चिन्मात्र निरंजन ॥
जेथें सच्चिदानंदघन ॥ हाही संशय ओसरे ॥ १५० ॥
एक कोरून धराधर ॥ देवळें केलीं अपार ॥
आकृतीहून विकार ॥ परी अचल एकची ॥ १५१ ॥
लहरी कल्लोळ तरंग नानाविधि ॥ परि अवघा एकचि जलनिधि ॥
कीं एकीं अनेक उपाधि ॥ चंचलत्वें दिसताती ॥ १५२ ॥
जैशा जळगारा विशाळ ॥ अरण्यांत पडल्या पुष्कळ ॥
लेकरे आनंदोनि सकळ ॥ खेळावया तेथें गेलीं ॥ १५३ ॥
कोणी म्हणती करूं भरती ॥ कोणी पात्रामाजी धरिती ॥
कोणी शेवटीं जलचि प्राशिती ॥ निवविती तृषेतें ॥ १५४ ॥
म्हणती जल काय शीतळ ॥ जैशी गारची केवळ ॥
तेथें जाणते बोलती सकळ ॥ गार वा जळ एकची ॥ १५५ ॥
एक म्हणती गारेचा गुण ॥ एक बोलती शीतळ जीवन ॥
घट्ट पृथ्व्यंश कठिण ॥ एक ऐसें स्थापिती ॥ १५६ ॥
गार घट्ट विरतां पूर्ण ॥ कोठे पृथ्वीचें कठिणपण ॥
अवघें एकची जीवन ॥ रूपाभिधानें विरालीं ॥ १५७ ॥
शेल्याचे दोरे उकलून ॥ मागुती चिवट केले जाण ॥
तेथें पट हें अभिधान ॥ सहज मग राहिलें ॥ १५८ ॥
तैसें व्यापकत्व सारून ॥ उरलें अनाम निरंजन ॥
पूर्णब्रह्म सनातन ॥ दुजे कांहीं दिसेना ॥ १५९ ॥
ब्रह्मीं अन्यथा भास दिसत ॥ त्याचें नांव दृश्य सत्य ॥
दोरावरी पादोदर भासत ॥ भ्रमेंकरूनि तत्वतां ॥ १६० ॥
स्थाणु असतां चोर दिसत ॥ कीं शुक्तीवरी रजत भासत ॥
कीं मृगजलतीर मिथ्याभूत ॥ भ्रांतालागीं सत्य गमे ॥ १६१ ॥
तैशी निरसितां भ्रांति ॥ मग सहजचि वस्तुप्राप्ति ॥
यालागीं देशिकाप्रति ॥ शरण जावें अनन्य ॥ १६२ ॥
प्रकाशलिया अर्क ॥ मग कोण पुसे हो दीपक ॥
कीं रत्‍नपरीक्षा करितां देखा ॥ गार देती भिरकावूनि ॥ १६३ ॥
कीं सुधारस करितां पान ॥ मग इतर रसां पुसे कोण ॥
प्राप्त होतां नृपासन ॥ मग कोरान्न कासया ॥ १६४ ॥
तैसें आचार्यकृपें तत्त्वतां ॥ सुखरूप अंगें होतां ॥
मग दृश्यजाल पाहतां ॥ शोधितांही न सांपडे ॥ १६५ ॥
क्रियेसहित ज्ञान शुद्ध ॥ तोचि जाणिजे ब्रह्मविद ॥
त्याचा महिमा वेद ॥ वाणी स्वयें निजमुखें ॥ १६६ ॥
ऐसें दिव्य निरूपण ॥ वर्षे याज्ञवल्क्य कृपाघन ॥
गार्गेयी आनंदली पूर्ण ॥ प्रेमें नेत्र लाविले ॥ १६७ ॥
परी याज्ञवल्याचें थोरपण ॥ प्रकटावया समस्तांत जाण ॥
दाटून घेतले आडवे प्रश्न ॥ चमत्कार दावावया ॥ १६८ ॥
तो अकस्मात गार्गेयीचें शिर ॥ पृथ्वीवरी पडिलें सत्वर ॥
हाहाकार करिती ऋषीश्वर ॥ जनकराव घाबरला ॥ १६९ ॥
याज्ञवल्क्य बोले वचन ॥ गार्गेयीस कोणी आणा प्राण ॥
तोचि गायी जाईल घेऊन ॥ वस्त्रालंकारांसमवेत ॥ १७० ॥
या जडपदार्थ गायी ॥ यांची आम्हांस चाड नाहीं ॥
विवेकशिष्यांहातीं पाहीं ॥ वृत्तिगायी वळियेल्या ॥ १७१ ॥
वत्सांसमवेत गायी ते वेळां ॥ याज्ञवल्यें ब्राह्मणांस वांटिल्या ॥
दक्षिणा अलंकार समर्पवी सकळां ॥ आपण निराळा उदास ॥ १७२ ॥
जनक म्हणे ऋषि समस्त ॥ उठवा गार्गेयीचें प्रेत ॥
ते म्हणती मृत्युलोकीं अघटित ॥ केवि घडे मनुष्यां ॥ १७३ ॥
आमचे हातीं काय आहे अमृत ॥ मग उठवावे गार्गेयीचें प्रेत ॥
मग याज्ञवल्क्ये बहुत ॥ सामर्थ्य प्रकट केलें तेव्हां ॥ १७४ ॥
उदक शिंपितां ते वेळीं ॥ गार्गेयी उठोन उभी ठाकली ॥
याज्ञवल्क्याचे चरणीं लागली ॥ म्हणे त्वां जिकिले त्रैलोक्य ॥ १७५ ॥
गार्गेयी म्हणे समस्तां द्विजवरां ॥ यास तुम्ही नमस्कार करा ॥
शरण रिघोन सत्वरा ॥ आत्महित साधा तुम्ही ॥ १७६ ॥
तेथें कित्येक आनंदती ॥ कोणी येऊन नमस्कार करिती ॥
कोणी मनामाजी तळमळती ॥ प्रवर्तती निंदेसी ॥ १७७ ॥
त्यांमध्यें विदग्धऋषीश्वर ॥ तेणें निंदा केली अपार ॥
म्हणे हा कुटिल थोर ॥ प्रेते उठवी कापट्यें ॥ १७८ ॥
तेणें निंदा केली बहुत ॥ कासया लिहावी समस्त ॥
मुख्य येथींचा हा अर्थ ॥ ब्रह्मनिष्ठ याज्ञवल्क्य ॥ १७९ ॥
निंदा ऐकतां कानीं ॥ वाटे प्राण द्यावा ते क्षणीं ॥
अथवा रागें उठोनी ॥ त्याग करून जावें पैं ॥ १८० ॥
तैसा नव्हे याज्ञवल्क्यी ॥ निंदा ऐकतां सर्वदा सुखी ॥
बोलतो चालतां लोकीं ॥ समाधि त्याची मोडेना ॥ १८१ ॥
मेहुणे विनोद करिती ॥ त्यांत वर्मे निंदोत्तर बोलती ॥
परंतु विषाद नुपजे चित्तीं ॥ कौतुकें हांसती गदगदां ॥ १८२ ॥
तैसें याज्ञवल्क्यास निदितां ॥ कौतुक वाटे त्याच्या चित्ता ॥
एवं सर्वलक्षणीं पुरता ॥ जनकास कळलें हें ॥ १८३ ॥
तो ज्ञानगंगेचा लोट ॥ कीं विवेकरत्‍नांचा मुकुट ॥
कीं विज्ञानवैरागरींचा सुभट ॥ महामणि प्रकटला ॥ १८४ ॥
तारावया जगत्‌ समग्र ॥ त्याच्या रूपें अवतरला ईश्वर ॥
असो गौरवून समस्त ऋषीश्वरा ॥ जनकें तेव्हां बोळविले ॥ १८५ ॥
जैशी चपला लवोन जात ॥ तैशी गार्गेयी जाहली गुप्त ॥
राव जनक आश्चर्य करित ॥ म्हणे धन्य सामर्थ्य सद्‌गुरूचें ॥ १८६ ॥
मग याज्ञवल्क्यास शरण ॥ भूपति रिघे प्रेमेंकरून ॥
यावरी जनकाचें लक्षण ॥ पाहे लक्षून याज्ञवल्क्य ॥ १८७ ॥
तूं तनुमनधनाशीं शरण ॥ तरी हें राज्य समस्त देई दान ॥
तत्काल उदक घेऊन ॥ जनकें सोडिलें ऋषीपुढें ॥ १८८ ॥
शरीर आणि मन ॥ येरें केलें समर्पण ॥
पहावया जनकाचें शिष्यपण ॥ याज्ञवल्क्य तेथून ऊठिला ॥ १८९ ॥
महाघोर अरण्यांत ॥ ऋषि तेव्हां प्रवेशत ॥
जेथें उदक फळ न मिळे किंचित ॥ गेला तेथें महाराज तो ॥ १९० ॥
जनकास म्हणे ऐक ॥ तूं येथें उभा राहें नावेक ॥
मी एका ऋषीचे दर्शन देख ॥ घेऊन येतों मागुतीं ॥ १९१ ॥
जनक तेथें उभा ठाकला ॥ महाऋषि तेथोनि गेला ॥
द्वादश वर्षें नाहीं आला ॥ अंत पाहिला शिष्याचा ॥ १९२ ॥
तो इकडे जनक वनीं ॥ उभा असे तेच स्थानीं ॥
सद्‌गुरू गेला ती दिशा लक्षूनी ॥ कर जोडून वाट पाहे ॥ १९३ ॥
केव्हां येईल स्वामी दयाळ ॥ कैं वदन देखेन निर्मळ ॥
त्याचे चरणकमळीं भाळ ॥ मी ठेवीन केधवां ॥ १९४ ॥
स्वामीच्या मुखेंकरून ॥ कैं ऐकेन दिव्य निरूपण ॥
जेणें गोधनांस आणिले प्राण ॥ प्रेत उठविलें गार्गेयीचें ॥ १९५ ॥
ज्याच्या अक्षता पडतां अपूर्व ॥ शुष्ककाष्ठीं फुटले नवपल्लव ॥
ज्ञान ज्याचें अभिनव ॥ ऋषी सर्व जिंकिले ॥ १९६ ॥
चवदा वर्षें तप करून ॥ भरत इच्छी श्रीरामागमन ॥
तैसे पहावया गुरुचरण ॥ जनकरावो आर्तभूत ॥ १९७ ॥
शरीर गेलें वाळोना ॥ कंठीं ठेवूनियां प्राण ॥
वाट पाहे रात्रंदिन ॥ उदकें नयन भरूनियां ॥ १९८ ॥
माता गेली बाहेरी ॥ तान्हे वाट पाहे घरीं ॥
तैसा जनकराव अंतरीं ॥ आठवित गुरुचरण ॥ १९९ ॥
असो द्वादश वर्षें होतो पूर्ण ॥ याज्ञवल्क्य उभा टाकला येऊन ॥
तो डोळां उरलासे प्राण ॥ गुरु देखोन सद्‌गद जाहला ॥ २०० ॥
हृदयीं आलिंगिला प्रेमेंकरून ॥ तेणें शरीर जाहले दिव्य पूर्ण ॥
मग जनक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून स्फुंदतसे ॥ २०१ ॥
ब्रह्मविद्या ते संपूर्ण ॥ उपदेशिली जनकालागून ॥
तत्त्वमसिमहावाक्यविवरण ॥ सांग श्रवण करविलें ॥ २०२ ॥
जैशी याज्ञवल्क्याची स्थिती ॥ तैसा जाहला जनकनृपती ॥
मग विदेही जनक म्हणती ॥ समस्त ज्ञानी तयातें ॥ २०३ ॥
गेलियाची खंती न करी ॥ असतांही आस्था न धरी ॥
ब्रह्मानंदे निर्धारीं ॥ बुद्धि बोधिली सर्वदा ॥ २०४ ॥
मग याज्ञवल्क्यानें जनकासी ॥ मागुती आणिलें मिथिलेसी ॥
म्हणे राज्य करीं निश्चयेशी ॥ विदेहस्थिति न सांडितां ॥ २०५ ॥
आत्मस्वरूपसदनीं ॥ सुखरूप राहें समाधानी ॥
विश्वाभास कौतुक पाहोनी ॥ स्वानंदधनीं प्रवर्तावें ॥ २०६ ॥
द्वेष प्रीति न करितां ॥ निश्चल राहावें तत्त्वतां ॥
गृहस्थानी सकल संतां ॥ सर्वदाही भजावें ॥ २०७ ॥
आणिक याज्ञवल्क्य बोले वचन ॥ बा रे ऐक सावधान ॥
नानाशास्त्रें करावीं श्रवण ॥ हेंही व्यसन कामा नये ॥ २०८ ॥
नानाशास्त्रमतवादश्रवण ॥ ऐकतां चित्त होईल मलिन ॥
अद्वैतसाधन श्रवण मनन ॥ संतांच्या मुखें करीं कां ॥ २०९ ॥
एकचि अहोरात्र पठनव्यसन ॥ तें तो परमार्थास करी मलिन ॥
घोकितां काळ गेला पूर्ण ॥ विश्रांति नव्हे चित्तासी ॥ २१० ॥
तैत्तिरीयशाखेंत ॥ भारद्वाजें वर्णिले यथार्थ ॥
ऋषि एक नामें त्रिवर्त ॥ तेणें पठन श्रवण धरियेले ॥ २११ ॥
पांचशत संवत्सर ॥ वेद पढला समग्र ॥
वाद करून जिंकिला इंद्र ॥ विद्या अपार तयाची ॥ २१२ ॥
वादविवादें तप्त शरीर ॥ ब्रह्मद्रोह घडला अपार ॥
तळमळ नवजाय अहोरात्र ॥ वादविवाद करितां बहु ॥ २१३ ॥
मग गुरूजवळ करितां वेदांतश्रवण ॥ समूळ टाकिलें वादव्यसन ॥
तैसेंच अहोरात्र अनुष्ठान ॥ क्षुद्व साधनीं अनर्थ हा ॥ २१४ ॥
एतदर्थ ऐक सावधान ॥ ऋभुनामा ऋषि प्रवीण ॥
तेणें निदाघ शिष्य करून ॥ वेदांतज्ञान उपदेशिलें ॥ २१५ ॥
ऋभु सहज तेथून विचरत ॥ गेला द्वादश वर्षेंपर्यंत ॥
निदाघ आठवला मनांत ॥ परतोन येत शिष्यापाशीं ॥ २१६ ॥
तंव तो श्रीगुरूस विसरोन ॥ अद्वैतज्ञान सांडून ॥
करूं लागला अनुष्ठान ॥ क्षुद्रसाधन दैवतांचें ॥ २१७ ॥
ऋभुगुरु आला आश्रमासी ॥ परि निदाघ नोळखे तयासी ॥
म्हणे तुम्ही कोण कोठील ऋषि ॥ काय मानसीं इच्छा असे ॥ २१८ ॥
गुरु बोले हांसून ॥ आम्हांस देई मिष्टान्नभोजन ॥
जें अविनाश न विटे मन ॥ क्षुधा दुसर्‍याने न लागेची ॥ २१९ ॥
तूंमीरहित मिष्टान्न ॥ कच्चेपण दूर करून ॥
अथवा गेलें कर्पोन ॥ हठयोगेंकरूनियां ॥ २२० ॥
तें मी न जेवीं तत्वतां ॥ मी असें हातापायांपरता ॥
मुख जिव्हा आणि दंतां ॥ विरहित मी वर्ततसें ॥ २२१ ॥
सकल इंद्रियांस चोरून ॥ मज तें घालीं भोजन ॥
निदाघें शब्दावरून ॥ गुरुनिधान ओळखिले ॥ २२२ ॥
मग घातलें लोटांगण ॥ एक मास गुरु राहोन ॥
पुन: त्यासी अद्वैतज्ञान ॥ यथासांग निरोपिलें ॥ २२३ ॥
गुरु गेला तीर्थाप्रती ॥ बारा वर्षें भरलीं निश्चितीं ॥
पहावया शिष्य मागुती ॥ येता जाहला आदरें ॥ २२४ ॥
तो समिधा कुशं घेऊन ॥ निदाघ परतला वनाहूना ॥
तो राजाही मृगया करून ॥ नगरद्वारासमीप आला ॥ २२५ ॥
वेशींत दाटी जाहली बहुत ॥ निदाघ उभा राहिला तेथ ॥
तो ऋभगुरू अकस्मात ॥ तोही तेथें पातला ॥ २२६ ॥
दृष्टादृष्टि जाहली ॥ निदाघें ओळख सांडिली ॥
अनुष्ठानीं वृत्ति गुंतली ॥ गुरुमाउली नोळखेचि ॥ २२७ ॥
गुरु म्हणे निदाघासी ॥ कां येथें उभा आहेसी ॥
येरु म्हणे काय न दिसे दृष्टीसी ॥ राजभार पुढें जातो ॥ २२८ ॥
गुरु म्हणे आम्ही निरंजनी ॥ वसत असों दिनरजनीं ॥
तेथें दुजे न देखों नयनीं ॥ आपणावांचूनि तत्वतां ॥ २२९ ॥
तरी सांग येथें राजा कोण ॥ वरकड कैसेन लहान ॥
कोण मूर्ख सुजाण ॥ बद्ध मुक्त कोण ते ॥ २३० ॥
मीही निजदृष्टीं पाहीन ॥ मज न दिसे थोर लहान ॥
येरू म्हणे काय गेले नयन ॥ पुढें तुज दिसेना ॥ २३१ ॥
गजारूढ नृपवर ॥ भोंवता न देखसी परिवार ॥
येरू म्हणे हें क्षणभंगुर ॥ मज डोळा दिसेना ॥ २३२ ॥
येरू म्हणे खालता हस्ती ॥ वरता बैसला आहे नृपती ॥
गुरु म्हणे खालीं वर निश्चितीं ॥ दृष्टि माझी न बैसे ॥ २३३ ॥
एक व्यापक चैतन्य ॥ दुजे न दिसे मजलागून ॥
गज राजा थोर लहान ॥ कोणी येथें न दिसेचि ॥ २३४ ॥
निदाघ म्हणे तूं वेडा ॥ तुज कांहीं न दिसे मूढा ॥
गुरु म्हणे रे दगडा ॥ व्यर्थ श्रम गेला माझा ॥ २३५ ॥
तू केवळ पाषाण ॥ अंतर्दृष्टि नाहीं तुज पूर्ण ॥
राजपरिवार दाविसी मजलागूना ॥ नेणसी खूण शतमूर्खा ॥ २३६ ॥
राजा मज दाविसी ॥ राव म्हणावा तरी कोणासी ॥
जो साक्षी वर्तवी सर्वांसी ॥ तोचि नेमेशी राजेंद्र ॥ २३७ ॥
निदाघें गुरु बोलाविला ॥ म्हणे थोर अन्याय केला ॥
साष्टांगें लागला चरणकमलां ॥ स्फुंदतसे स्वापराधें ॥ २३८ ॥
मग गुरूनें धरिला हृदयीं ॥ बा रे भेद न करीं कांहीं ॥
अनुष्ठानें सर्वदाही ॥ चित्त तुझें भ्रष्टलेंसे ॥ २३९ ॥
अनुष्ठानाचा तूं कर्ता ॥ सर्वव्यापक अससी तत्वतां ॥
तेथें दृष्टि घालितां ॥ साधन सहज ओसरलें ॥ २४० ॥
असा दृढ बोध करून ॥ ऋभु गेला आश्रमालागून ॥
यालागीं अनुष्ठानव्यसन ॥ मलिन करी ज्ञानासी ॥ २४१ ॥
त्याचा दासनामें दुसरा शिष्य ॥ तोही प्रवर्तला अनुष्ठानास ॥
जें तें अपवित्र दिसे त्यास ॥ बैसावयास ठाव न दिसे ॥ २४२ ॥
म्हणावी मी सोवळा पवित्र ॥ ही पृथ्वी आहे अपवित्र ॥
मग वृक्षाग्रीं निरंतर ॥ आश्रम करून राहिला ॥ २४३ ॥
मेघोदकें स्नानपान ॥ ऐसा कर्मींच गेला भुलोन ॥
तेथें ऋभु आला धांवोन ॥ तंव तो वृक्षाग्रीं बैसला ॥ २४४ ॥
म्हणे वृक्षाखालीं उतरा ॥ येरू म्हणे मेदिर्नी अपवित्र ॥
हांसत ऐकोन ऋभुवरा ॥ म्हणे मूर्ख साचार अविवेकी तूं ॥ २४५ ॥
पंचभूतात्मक तुझें शरीर ॥ विटाळाचें परम अपवित्र ॥
तूं कर्मठ परम पवित्रा ॥ त्याचा संग कां धरियेला ॥ २४६ ॥
तुझी शुद्धि तुज नाहीं ॥ वृक्षाग्रीं बैसोन फळ कायी ॥
मग तेणें उतरोन लवलाहीं ॥ चरण धरिले गुरूचे ॥ २४७ ॥
असो तो गुरूनें बोधून ॥ ब्रह्मनिष्ठ केला पूर्ण ॥
मग तो सत्कर्म करून ब्रह्मार्पण ॥ ब्रह्मानंदे विचरत ॥ २४८ ॥
दुर्वास शास्त्राभ्यास करून ॥ पुस्तकभार संग्रहून ॥
तीन शतें अश्व भरून ॥ कैलासाप्रति चालिला ॥ २४९ ॥
नारद म्हणे कैलासनाथा ॥ हा भारवाही रासभ तत्वतां ॥
दुर्वास क्षोभला ऐकतां ॥ मग शांत केला शंकरे ॥ २५० ॥
म्हणे कासया हें पुस्तकओझें ॥ याणें निवेना अंतर तुझें ॥
स्वानुभवसदनीं विराजेचे ॥ निजीं निज सर्वदा ॥ २५१ ॥
शंकरे बोधिला तो विशेष ॥ मग सुखी जाहला दुर्वास ॥
पुस्तकभार निःशेष ॥ समुद्रांत टाकिले ॥ २५२ ॥
याज्ञवल्क्य म्हणे जनकालागून ॥ तूं न धरीं भलतें व्यसन ॥
सांगितलें जें अद्वैतज्ञान ॥ निजसुखें भोगीं तें ॥ २५३ ॥
ऐसें जनकास सांगून ॥ याज्ञवल्क्य गेला तेथून ॥
ही कथा करितां श्रवण ॥ होती ज्ञानी साधक ॥ २५४ ॥
लोमशऋषि परम प्रवीण ॥ करितां तीर्थयात्रा पर्यटन ॥
हें याज्ञवल्क्याचें आख्यान ॥ पुण्यपावन कथियेलें ॥ २५५ ॥
वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ लावण्यचंद्रा नरवैडूर्यां ॥
तुझ्या पूर्वजाची पवित्र चर्या ॥ वर्णितां न सरे कदापि ॥ २५६ ॥
अरण्यपर्व गोड बहुत ॥ शौनकाप्रति सांगे सूत ॥
पुढें चालिले पंडुसुत ॥ पहात पहात तीर्थमहिमा ॥ २५७ ॥
वनपर्व सुरस बहुत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥
करून श्रीधरमुख निमित्त ॥ पंढरीनाथ बोलतसे ॥ २५८ ॥
पांडुरंगा ब्रह्मानंदा ॥ जगदंकुरा मूलकंदा ॥
श्रीधरवरदा अनादिसिद्धा ॥ अव्यंगा अभंगा अक्षय्या ॥ २५९ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्ताविसाव्यांत कथियेला ॥ २६० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्वटीका श्रीधरकृत ॥
याज्ञवल्क्यानें जनकास वेदांत ॥ सांगितला तें आख्यान संपविलें ॥ २६१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
अध्याय सत्ताविसावा समाप्तGO TOP