श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सव्विसावा


अष्टावक्राची कथा


श्रीगणेशाय नम:
जनमेजयास म्हणे वैशंपायन ॥ ऐक वनपर्वीचें रहस्य पूर्ण ॥
जाहलिया नलोपाख्यान ॥ पुढें कथन ऐक पां ॥ १ ॥
सिंहावलोकनेंकरून ॥ मागील ऐका अनुसंधान ॥
अमरावती ये अर्जुन ॥ शक्रें राहविला अति प्रीतीं ॥ २ ॥
राहिला पांच संवत्सर ॥ पार्थास आठवूनि युधिष्ठिर ॥
खंती करीत अपार ॥ स्नेहसमुद्र उचंबळला ॥ ३ ॥
भीम नकुल सहदेव जाण ॥ पांचाळी खंती करी रात्रंदिन ॥
केधवां धनंजयाचे वदन ॥ दृष्टीं आम्ही विलोकू ॥ ४ ॥
दीपाविण जैसें सदन ॥ कीं नासिकावांचूनि जैसें वदन ॥
प्राणाविण कलेवर पूर्ण ॥ पार्थाविण तैसे आम्ही ॥ ५ ॥
तो इंद्रपदाहूनि ऋषि लोमश ॥ येऊन भेटला धर्मास ॥
म्हणे किरीटी आहे अमरावतीस ॥ सुखें सत्वर येईल ॥ ६ ॥
परी धर्मा ऐक वचन ॥ फाल्गुनें सांगितलें तुजलागून ॥
तप आणि तीर्थाटन ॥ अत्यादरें करावें ॥ ७ ॥
समुद्रवलयांकित तीर्थ ॥ म्यां दोन वेळां केलीं समस्तें ॥
तूं येसी मजसांगातें ॥ तरी करवीन यथाविधि ॥ ८ ॥
ऐकोनि संतोषला धर्म ॥ म्हणे माझें भाग्य परम ॥
तुझे संगतीं सुगम ॥ तीर्थयात्रा सर्व करूं ॥ ९ ॥
पाहून उत्तम सुमुहूर्त ॥ बंधुद्रौपदींसमवेत ॥
धर्म तीर्थयात्रेस निघत ॥ लोमश ऋषि सांगातें ॥ १० ॥
प्रजा आणि ब्राह्मण ॥ सहवासी धर्माचे पूर्ण ॥
त्यांप्रति पंडुनंदन ॥ विनविता जाहला ते वेळे ॥ ११ ॥
तुम्हीं जावें गजपुराप्रती ॥ अथवा रहावें शक्रप्रस्थीं ॥
कीं पांचालपुरीं करावी वस्ती ॥ कीं द्वारकेस रहावे सुखें पैं ॥ १२ ॥
जरी असेल पुण्य गांठीस अद्‌भुत ॥ आणि शरीरीं शक्ति बहुत ॥
तरी तितुके तीर्थयात्रे चला त्वरित ॥ वासना मुक्त करोनिया ॥ १३ ॥
लोक धर्माज्ञेंकरून ॥ स्थळीं स्थळीं राहिले जाऊन ॥
त्यांमध्यें बहुत ब्राह्मण ॥ समागमें चालिले ॥ १४ ॥
धरामर म्हणती धर्मासी ॥ तुम्ही शक्तिमंत तेजोराशी ॥
सांभाळूनि न्यावे आम्हांसी ॥ कठिणस्थळीं रक्षूनियां ॥ १५ ॥
भीम म्हणे मी तुमचा दास ॥ असतां भय नाहीं तुम्हांस ॥
तुमची सेवा निर्दोष ॥ याहूनि यश कोणतें ॥ १६ ॥
समागमें ऋषि लोमश ॥ तीर्थ दाखवीत जात धर्मास ॥
वनपर्वी स्वामी वेदव्यास ॥ तीर्थें अपार बोलिला ॥ १७ ॥
अजातशत्रु धर्मराज ॥ तीर्थें करीत जात तेजःपुंज ॥
सवें वृकोदर माद्रीतनुज ॥ महावीर प्रतापी ॥ १८ ॥
सकलप्रमदांची स्वामिनी ॥ पद्मजातजनकाची भगिनी ॥
ते सवें हंसगामिनी ॥ चरणचाली चमकत ॥ १९ ॥
सवें धौम्य पुरोहित ॥ लोमश सकल तीर्थें दावित ॥
समागमें विप्र असंख्यात ॥ शापानुग्रहसमर्थ जे ॥ २० ॥
तो समंगानामें नदी तेथ ॥ वाटेस लागली अकस्मात ॥
लोमश धर्मास सांगत ॥ तीर्थविधि करा येथें ॥ २१ ॥
पूर्वीं इचें नाम मधुबिला जाण ॥ आतां समंगा म्हणती ऋषिजन ॥
धर्म म्हणे काय कारण ॥ समंगा नाम पडावया ॥ २२ ॥
लोमश म्हणे ऐक कथा पवित्र ॥ जनकनृपें मांडिलें दीर्घ सत्र ॥
तेथें ऋषि मिळाले अपार ॥ अपरसूर्य शास्त्रद्रष्ट्रे ॥ २३ ॥
तों बंदी वरुणसूतपुत्र ॥ गौतमशिष्य पढला न्यायशास्त्र ॥
त्यास रसनायकें पाठविलें सत्वर ॥ विप्र आणीं यागातें ॥ २४ ॥
तो परमवादक दुष्ट दुर्जन ॥ जनकासी भेटला येऊन ॥
त्याची विद्या देखोनि तीक्ष्ण ॥ मिथिलाधिप संतोषला ॥ २५ ॥
म्हणे तूं करिसी तें प्रमाण ॥ आमचा याग जाहला संपूर्ण ॥
वादीं जिंकोन हे ब्राह्मण ॥ जाईं घेऊन वरुणसत्रा ॥ २६ ॥
आधींच वादक सबळ ॥ त्यावरी पाठिराखा भूपाळ ॥
तेणें वादीं विप्र जिंकून सकळ ॥ समुद्रांत बुडविले ॥ २७ ॥
रसाधिपतीचे दूत अपार ॥ वरुणगृहास नेती सत्वर ॥
ऐसे ब्राह्मण चवदा सहस्त्र ॥ बंदी पाठविता जाहला ॥ २८ ॥
राजा दूत पाठवून ॥ शोधून आणवी सकल ब्राह्मण ॥
वादीं निरुत्तर करून ॥ बुडवी नेऊन समुद्रांत ॥ २९ ॥
बंदीच्या भयें ब्राह्मण ॥ पळती आडमार्गें घेती रान ॥
वरुणगृहीं नेऊन ॥ बंदी घालितो म्हणूनियां ॥ ३० ॥
बंदीस वादीं जिंकोन ॥ सोडवी सकल ब्राह्मण ॥
ऐसा कोणी नाहीं निपुण ॥ तों नवल अपूर्व जाहलें ॥ ३१ ॥
उद्दालककन्या सुमती ॥ ते दिधली कहोळऋषीप्रती ॥
ते गर्भिणी असतां सती ॥ करीत पति वेदाध्ययन ॥ ३२ ॥
तिचे गर्भांत पुरुष अभिनव ॥ महाज्ञानी जेविं शुक वामदेव ॥
योगभ्रष्ट निपुण सर्व ॥ वेदशास्त्रसंपन्न जो ॥ ३३ ॥
पिता करितां अध्ययन ॥ अबद्ध म्हणतां बोले आतून ॥
ठायीं ठायीं पडतां न्यून ॥ क्षणक्षणां सांगे त्यातें ॥ ३४ ॥
कहोळ चहूंकडे पाहत ॥ म्हणे कोण पुरुष बोलतो येथ ॥
ऋषिपत्‍नी म्हणे माझ्या गर्भांत ॥ महापंडित वदतसे ॥ ३५ ॥
क्षणक्षणां काढितो न्यून ॥ कहोळ क्षोभला बोले वचन ॥
म्हणे तुज नसतां द्विजत्व पूर्ण ॥ नरकीं राहून गोष्टी वदसी ॥ ३६ ॥
शाप दिला परम तीव्र ॥ होई आठां ठायीं अंगवक्र ॥
यावरी तो कहोळ विप्र ॥ जात पृथ्वीपर्यटना ॥ ३७ ॥
तो बंदीने धरून अकस्मात ॥ वादीं निरुत्तर करित ॥
समुद्रांत नेऊन बुडवित ॥ दूत नेत वरुणापाशीं ॥ ३८ ॥
पाप वर्तलें बहुत ॥ ऋषिपत्‍न्या पतिवियोगे आहाळत ॥
संतती खुंटल्या समस्त ॥ थोर अनर्थ प्रवर्तला ॥ ३९ ॥
बंदीच्या संगे झाल्या पापराशी ॥ तें नेणवेचि जनकासी ॥
अहो इकडे कहोळस्त्रियेसी ॥ पुत्र मागें जन्मला ॥ ४० ॥
तेथें उद्दालकें येऊन ॥ केलें जातकर्मादि संपूर्ण ॥
अष्टावक्र नाम ठेवून ॥ लालन पालन करी त्याचें ॥ ४१ ॥
उद्दालकपुत्र श्वेतकेत ॥ तोही त्यासमागमें खेळत ॥
दोघेही अंकी बैसत ॥ तात तात म्हणती तया ॥ ४२ ॥
अष्टावक्राचें उपनयन ॥ उद्दालकें केलें आपण ॥
त्यावरी वेदाध्ययन ॥ आरंभिलें तयासी ॥ ४३ ॥
श्रवणमात्रेंचि सत्य ॥ चार वेद होती मुखोद्‌गत ॥
षट्‌शास्त्रीं पारंगत ॥ नाहीं अंत विद्येसी ॥ ४४ ॥
दशग्रंथ करतलामल ॥ पुराणें मुखोद्‌गत सकल ॥
चतुर्दश विद्येत कुशल ॥ निपुण किती सांगावा ॥ ४५ ॥
परी पितृशापेंकरून ॥ हीन अष्टांगे परी न दिसे न्यून ॥
प्रतापें चित्सूर्य पूर्ण ॥ अष्टावक्र जाहला ॥ ४६ ॥
योगभष्ट महाज्ञानी ॥ कीं चिदंबरींचा वासरमणी ॥
मघवाकविगुरूंहूनी ॥ विद्या विशेष तयाची ॥ ४७ ॥
एकदा उद्दालकाचे अंकीं येऊनी ॥ अष्टावक्र बैसला प्रीतींकरूनी ॥
तों मातुल श्वेतकेतें ते क्षणीं ॥ अंकाहूनि ढकलिला ॥ ४८ ॥
म्हणे माझ्या पितयाचा अंक जाण ॥ तेथें तूं बैसावया कोण ॥
अष्टावक्र खेद पावोन ॥ जननीलागीं पुसतसे ॥ ४९ ॥
म्हणे श्वेतकेतें लोटिलें मजलागून ॥ माझा तात सांग कवण ॥
तों जननी करी रोदन ॥ कहोळपति आठवूनि ॥ ५० ॥
म्हणे तुझा पिता पाहीं ॥ बंदीनें बंदीं घातला वरुणगृहीं ॥
पृर्ववृत्तांत सकलही ॥ वर्तला सांगे पुत्रातें ॥ ५१ ॥
ऐकतां सर्व वृत्तांत ॥ अष्टावक्र जाहला संतप्त ॥
जननीस नमूनि त्वरित ॥ मिथिलेप्रति चालिला ॥ ५२ ॥
ऐकतां माता म्हणे ते वेळीं ॥ तुजही बंदी कोंडील पाताळी ॥
मग द्यावया तिळांजळी ॥ वंशीं कोणी नाहीं पां ॥ ५३ ॥
अष्टावक्र बोले वचन ॥ कहोळ पडला बंदीं जाऊन ॥
धिक्‌ माझें पुत्रपण ॥ कासया प्राण ठेवूं हा ॥ ५४ ॥
अंबे तूं न करीं चिंता ॥ बंदीस जिकोनि तत्त्वतां ॥
घेऊन येईन कहोळपिता ॥ तरीच पुत्र तुझा मी ॥ ५५ ॥
यावरी तो अष्टावक्र ॥ पावला वेगें मिथिलानगर ॥
लक्षूनियां राजद्वार ॥ बैसे चौबारां जाऊनि ॥ ५६ ॥
आठां ठायीं वांकुडा देखोन ॥ पहावया मिळती बहुत जन ॥
शोभे कौपीन मौंजी मृगाजिन ॥ सर्वांगीं भस्म चर्चिलें ॥ ५७ ॥
तों मृगयेलागीं जनक निघत ॥ सवें पृतना चालली बहुत ॥
जे ते पाहतां होती विस्मित ॥ कहोळसुत बैसला त्या ॥ ५८ ॥
तों बंदी सुखासनीं बैसोन ॥ पुढें येत वेगेंकरून ॥
म्हणे हा बैसला कोण ॥ उठवा येधून एकीकडे ॥ ५९ ॥
दूत येऊन तेथ ॥ म्हणती बंदी आला सोडीं पथ ॥
बाळ म्हणे येऊं द्या येथ ॥ पुसेन सत्य मी त्यासी ॥ ६० ॥
तों बंदी आला जवळी ॥ अष्टावक्र क्रोधें न्याहाळी ॥
म्हणे महामूढा ये वेळीं ॥ पंथ सोडावा कोणीं कोणा ॥ ६१ ॥
मनुष्य अथवा नृपनाथ ॥ यांणीं अंधांसी सोडावा पथ ॥
मूक बधिर पंगु यथार्थ ॥ यांसही मार्ग सोडावा ॥ ६२ ॥
स्त्री आणि वृद्ध बहुत ॥ गायी आणि भारवाहक सत्य ॥
राजा देखोन ब्राह्मणसंयुक्त ॥ त्यांसी पथ सोडावा ॥ ६३ ॥
मुख्य ब्राह्मणांचा पथ ॥ त्याहीवरी मी अंगवक्र अशक्त ॥
तरी तूं बंदी मूढ सत्य ॥ मज पंथ सोड म्हणसी ॥ ६४ ॥
रायास सांगती सेवक ॥ पुढें बैसला विप्रबालक ॥
तो बंदीस म्हणे तूं शतमूर्ख ॥ तृणप्राय मानूनि ॥ ६५ ॥
तें पहावया कौतुक ॥ पुढें आला राजा जनक ॥
त्यास देखोन कहोळबालक ॥ क्रोधें संतप्त बोलतसे ॥ ६६ ॥
म्हणे विप्र मी असें मेदिनी ॥ तूं क्षत्रिय कैसा बैसलास वहनीं ॥
भयभीत जनक मनीं ॥ शिबिकेखालीं उतरला ॥ ६७ ॥
कल्पांतरूद्राऐसा तेथ ॥ अष्टावक्र दिसे क्रोधयुक्त ॥
राव थरथर कांपत ॥ भयें लागत चरणासी ॥ ६८ ॥
वहनांत बैसवून अष्टावक्र ॥ बंदीसहवर्तमान नृपवर ॥
परत गेला वेगें सत्वर ॥ सभा करून बैसला ॥ ६९ ॥
घालूनियां श्रेष्ठासन ॥ राये पूजिला कहोळनंदन ॥
यावरी नृपाप्रति परम तीक्ष्ण ॥ अष्टावक्र बोलतसे ॥ ७० ॥
म्हणे तुवा बंदीची पाठ राखोना ॥ बुडविले चतुर्दशसहस्त्र ब्राह्मण ॥
पापें घडलीं तुज दारुण ॥ तीं सूर्यनंदन पुसेल पुढें ॥ ७१ ॥
आधींच राज्यांतीं नरक ॥ त्यावरी हें घडलें महत्पातक ॥
ऋषींची संतति बुडाली सकळिक ॥ तळमळती स्त्रिया त्यांच्या ॥ ७२ ॥
जाहले द्वादश संवत्सर ॥ विप्रांस होते बहुत पुत्र ॥
त्या बालहत्या समग्र ॥ तुझ्या माथां पडियेल्या ॥ ७३ ॥
हा बंदी अपवित्र ॥ महावादक सूतपुत्र ॥
हा मनुष्यरूपें रासभ साचार ॥ किंवा श्वान पिसाळलें ॥ ७४ ॥
आधळें हत्तिरूं माजलें ॥ कीं डुकर वनीं खळीस आलें ॥
कीं बस्त धांवे बळें ॥ थडका द्यावया भलत्याशीं ॥ ७५ ॥
कीं लेंडियेस दाटे पूर ॥ कीं मद्यपानें माजलें वानर ॥
कीं नीचास भाग्य आलें अपार ॥ मग तो न मानी कोणातें ॥ ७६ ॥
अंत्यजासी राज्य येत ॥ कीं वेश्या पतिव्रता म्हणवित ॥
कीं विप्रवेष धरून गुप्त ॥ मैंद हिंडे यात्रेमध्यें ॥ ७७ ॥
कोल्हाटी असिलता घेऊनी ॥ तळपे परि न तगे रणीं ॥
याणें विप्र निरुत्तर करूनी ॥ पाताळीं बंदीं घातले ॥ ७८ ॥
अष्टवक्राचे बोल रसाळ ॥ त्यावरी बालभाषण कोमळ ॥
जनकासी आनंद प्रबळ ॥ परमादर ऐकावया ॥ ७९ ॥
म्हणे या बंदीस विशेष ॥ होता विद्येचा उत्कर्ष ॥
तो गर्व सांडवावया निःशेष ॥ अष्टावक्र बरा आला ॥ ८० ॥
उघडोनि श्रवणाचे श्रवण ॥ सभा बैसली सावधाना ॥
यावरी बंदीप्रति तीक्ष्ण ॥ अष्टावक्र बोलतसे ॥ ८१ ॥
म्हणे तूं पढलासी रे काये ॥ त्यांचीं नांवें घे लवलाहें ॥
बंदी म्हणे षट्‌शास्त्रें पाहें ॥ मुखोद्‌गत मज असती ॥ ८२ ॥
अष्टावक्र म्हणे न्यायशास्त्र ॥ पूर्वीच गौतम बोलिला पवित्र ॥
मीमांसाही अपार ॥ जैमिनीमुनि बोलिलासे ॥ ८३ ॥
सांख्यशास्त्र कपिलमुनी ॥ पूर्वीच गेलासे बोलूनी ॥
पातंजल दुर्वास करूनी ॥ गेला असे पहिलेंची ॥ ८४ ॥
पाणिनि वदला व्याकरण ॥ वेदांत वदला सत्यवतीनंदन ॥
ही तो सिद्ध आहेत पूर्वीहून ॥ तूं पैं काय बोलसी ॥ ८५ ॥
तरी तूं एक स्थापीं परिपूर्ण ॥ ज्यावरी दुसरें न चाले वचन ॥
मग मी दोन स्थापीन ॥ ज्यावरी तिसरें चालेना ॥ ८६ ॥
ऐसा तूं कोठवरी चालसी सत्य ॥ तें ऐकोन नृप आणि सभासंत ॥
यावरी एक बंदी स्थापित ॥ तें सावचित्त परिस धर्मा ॥ ८७ ॥
सूर्य आकाश समुद्र धरणी ॥ अग्नि इंद्र काल आदिकरूनी ॥
हे एकचि त्रिभुवनीं ॥ दुसरी प्रति नाहींच ॥ ८८ ॥
अष्टावक्र म्हणे ते समयीं ॥ दोन स्थापितों ऐक लवलाहीं ॥
प्रकृति पुरुष दोघें पाहीं ॥ अश्विनीकुमार दोघेचि ॥ ८९ ॥
नारद पर्वत दोघे जण ॥ दोन पक्ष अयनें दोन ॥
पूर्वोत्तरमीमांसा जाण ॥ सगुण निर्गुण दोघेंचि ॥ ९० ॥
बंदी बोले सरसावोन ॥ सत्त्व रज तम तिघे जण ॥
त्रिताप त्रिविध भेद पूर्ण ॥ त्रिकांड संपूर्ण वेद कीं ॥ ९१ ॥
त्रिदोष लक्षणें तीन ॥ आदि मध्य आणि अवसान ॥
चवथें काय तें संपूर्ण ॥ बोल आतां यावरी ॥ ९२ ॥
अष्टावक्र बोले उत्तम ॥ चार वर्ण चार आश्रम ॥
देहावस्था चार परम ॥ तत्त्ववेत्ते बोलती ॥ ९३ ॥
खाणी चार्‍ही वाणी वेद ॥ स्थानें अभिमान भोग प्रसिद्ध ॥
चार्‍ही वाद्यें अन्नें चतुर्विध ॥ चार मुक्ति चार युगें ॥ ९४ ॥
यावरी बोले बंदी वाणी ॥ सभ्य आवसथ्य गार्हपत्य आहवनी ॥
दक्षिणाग्निसहित पंचाग्नी ॥ पूर्वीहून स्थापिले ॥ ९५ ॥
पंच यज्ञ पंच भूतें जाण ॥ एक एक भूती पांच पांच गुण ॥
पंच प्रलय पंच कोश पूर्ण ॥ पंच मुद्रा पंच नाद ॥ ९६ ॥
यावरी अष्टावक्र बोलत ॥ सहा कृत्तिका सहा क्रतु ॥
षडूर्मी षड्‍रिपु सत्य ॥ षड्‍रस षड्‌विकार ॥ ९७ ॥
षट्‍चक्रें षट्‌कर्म ॥ षड्‍गुणैश्वर्य निरुपम ॥
षड्‍भार्यासहित उत्तम ॥ सहा राग जाण पां ॥ ९८ ॥
सहा याग सहा दक्षिणा ॥ सहा अवधानें अनुक्रमें जाणा ॥
आतां सात बोलें विचक्षणा ॥ सूतपुत्रा वादका ॥ ९९ ॥
बंदी म्हणे सप्तर्षि सप्त धातु सप्त स्वर ॥ सप्त रंग सप्त द्वीप सुंदर ॥
सप्त पाताळें सप्त समुद्र ॥ सप्त भूमिका चिरंजीव पैं ॥ १०० ॥
सभा सप्तांगलक्षण ॥ सप्त चक्रवर्ती सप्त पुर्‍या जाण ॥
सप्त संस्थानें सप्त ग्रामपशु जाण ॥ अरण्यपशु सप्तही ॥ १०१ ॥
अष्टावक्र म्हणे अष्टपाश ॥ अष्टवसु दिक्पालविशेष ॥
अष्टनायिका अष्टभोग सुरस ॥ अष्ट मद अष्ट भाव ॥ १०२ ॥
अष्ट महासिद्धि अष्ट भैरव ॥ अष्टधा प्रकृति अष्ट गुणभाव ॥
अष्ट दिग्गज अष्टांगयोग अपूर्व ॥ अष्ट नायिका अष्टभोग सुरस ॥ अष्ट पदें शरभासीं ॥ १०३ ॥
मुक्तें निपजती अष्ट स्थानीं ॥ अष्टकोणमंडप अष्टवर्ग लग्नीं ॥
यावरी बंदी ते क्षणीं ॥ नवम प्रकार वर्णित ॥ १०४ ॥
समिधा नवप्रकार ॥ नवविध रत्‍नें नवरस साचार ॥
नवविधा भक्ति नव लग्नप्रकार ॥ नव नारायण नव खंडे ॥ १०५ ॥
नवांक नवनिधि जाण ॥ नव भद्रपूजा नव सप्तगुण ॥
यावरी दशम लक्षण ॥ अष्टावक्र बोलतसे ॥ १०६ ॥
दश लक्षणें दशावतार ॥ दशा दिशा दशेद्रियें साचार ॥
दशा दर्भ दशचिन्हीं मंडित विप्र ॥ क्षत्रिय निर्धार दशलक्षणी ॥ १०७ ॥
दशनामें मंडित नमस्कारी ॥ दशधा भेद शरीरीं ॥
यावरी अकरावे निर्धारीं ॥ बंदी काय बोलत ॥ १०८ ॥
यागीं पशु एकादश ॥ मनासहित करणें विशेष ॥
एकादश रुद्र एकादश रूपें निःशेष ॥ अवतरलासे जाण पां ॥ १०९ ॥
एकादश धारा सतेज ॥ यावरी तो अष्टावक्र महाराज ॥
काय बोलत तेजःपुंज ॥ बारा प्रकार ऐका ते ॥ ११० ॥
द्वादश राशी गुरूचिन्हें द्वादश ॥ द्वादश मित्र द्वादश मास ॥
भुजंगप्रयात छंद अक्षरें द्वादश ॥ द्वादश प्रकार बोलिले ॥ १११ ॥
यमाचीं द्वादश लक्षणें ॥ नियमाचीं द्वादश जाणणें ॥
यावरी अष्टावक्र म्हणे ॥ बंदी बोल त्रयोदश तूं ॥ ११२ ॥
बंदी उगाच अधोवदन ॥ वरतें न पाहे न बोले वचन ॥
अष्टावक्र आनंदघन ॥ सभा संपूर्ण संतोषलीं ॥ ११३ ॥
अष्टावक्र म्हणे बंदीसी ॥ कां रे प्रत्युत्तर न देसी ॥
तेरा स्त्रिया कश्यपासी ॥ कां रे नेणसी शतमूर्खा ॥ ११४ ॥
जगतीछंद विशेष ॥ त्याचीं अक्षरें त्रयोदश ॥
केशिदैत्ययुद्ध तेरा दिवस ॥ द्विपही तेरा जातींचे ॥ ११५ ॥
तेरावी तिथि श्रेष्ठ ॥ तेरा रूपें वायुचीं वरिष्ठ ॥
त्रयोदशगुणी अवीट ॥ महापुरुष जाण पैं ॥ ११६ ॥
बंदी नेदी प्रत्युत्तर ॥ रायास म्हणे अष्टावक्र ॥
याचे हातीं आणवीं विप्र ॥ किंवा समुद्रीं बुडवी हा ॥ ११७ ॥
बंदी अभाग्य तूं देख ॥ जन्मूनि काय केलें सार्थक ॥
विद्याभ्यासें नरक ॥ साधन केलें तुवां कीं ॥ ११८ ॥
या पापाचे झाडे ॥ यम पुसेल कीं तुज पुढें ॥
तेव्हां मग होशील वेडें ॥ चहूंकडे विलोकिसी ॥ ११९ ॥
बंदी होऊन सद्‌गदित ॥ अष्टावक्राचे चरण धरित ॥
म्हणे मीं अन्यायी यथार्थ ॥ विप्र बहुत छळियेले ॥ १२० ॥
वरुणाचा याग जाहला पूर्ण ॥ येतील समस्त ब्राह्मण ॥
मीं मारिले नाहींत द्विजजन ॥ आतां येऊन भेटती ॥ १२१ ॥
तो पाताळाहून विप्रमेळा ॥ मिथिलानगराप्रति आला ॥
अष्टावक्रें बंदी जिंकिला ॥ कळलें सर्व विप्रांसी ॥ १२२ ॥
म्हणती धन्य धन्य अष्टावक्र ॥ धन्य महाराज विद्यापात्र ॥
धन्य माउलीची कुशी पवित्र ॥ ऐसा पुत्र प्रसवली ॥ १२३ ॥
धन्य धन्य त्याचें ज्ञान ॥ धन्य त्याचें अनुष्ठान ॥
बंदी वादी जिंकोन ॥ सोडविलें जेणें आम्हां पै ॥ १२४ ॥
अष्टावक्राचें दर्शन घेऊन ॥ वंदू त्याचे आधीं चरण ॥
धाकुटा बाळ परी परम सुगुण ॥ अगाधपण विद्येचे ॥ १२५ ॥
चिमणाचि दिसे वासरमणी ॥ परि प्रकाशें भरली धरणी ॥
वामन धाकुटा बलिसदनीं ॥ त्रिभुवन आटिलें तीन पदीं ॥ १२६ ॥
धाकटेंचि दिसे वज्र ॥ परी महानग केले चूर ॥
धाकुटाचि कलशोद्‌भव विप्र ॥ परी सागर सर्व प्राशिला ॥ १२७ ॥
धाकटेंचि परी उत्तम रत्‍न ॥ काय करावे थोर पाषाण ॥
केतकीचे लघुपत्र जाण ॥ काय कारण थोराशीं ॥ १२८ ॥
ऐसें धरमर बोलत ॥ जनकमंडपा आले समस्त ॥
अष्टावक्र आज्ञापित ॥ जनकरायास ते काळीं ॥ १२९ ॥
साष्टांगें नमून सर्व ब्राह्मण ॥ षोडशोपचारे करावें पूजन ॥
अपेक्षित देऊन धनधान्य ॥ आशीर्वाद घेई यांचे ॥ १३० ॥
जनकें तैसेंचि करून ॥ तोषविले समस्त ब्राह्मण ॥
विप्र तेव्हां बहुत स्तवन ॥ अष्टावक्राचें करिते जाहले ॥ १३१ ॥
विप्र नमिती अष्टावक्रासी ॥ येरू साष्टांगें नमी तयांसी ॥
परि नामाभिधानें सर्वांसी ॥ पुसे आधीं अष्टावक्र ॥ १३२ ॥
पिता नमील आपणा ॥ म्हणोनि पुसे नामाभिधाना ॥
तो कहोळ आला दर्शना ॥ अष्टावक्राचे ते काळीं ॥ १३३ ॥
अष्टावक्र म्हणे नाम काय ॥ येरू म्हणे मी कहोळ होय ॥
ऐसें ऐकतां लवलाहें ॥ बाळ घाली लोटांगण ॥ १३४ ॥
उभा ठाकला कर जोडून ॥ म्हणे तुम्ही नका करूं नमन ॥
कहोळ म्हणे तूं कोणाचा नंदन ॥ धन्य निधान जन्मलासी ॥ १३५ ॥
येरू म्हणे मी तुझाचि पुत्र ॥ शरीर तव शापें अष्टवक्र ॥
पूर्व स्मरोन कहोळविप्र ॥ शोकें व्याकुळ जाहला ॥ १३६ ॥
अष्टावक्रास हृदयीं धरून ॥ कहोळ करी दीर्घ रोदन ॥
म्हणे म्यां ऐसें निधान ॥ मतिमंदे काय शापिलें ॥ १३७ ॥
गर्भीच ज्याची एवढी स्फूर्ति ॥ महाज्ञानी अगाध कीर्ति ॥
जळो क्रोध महापापमति ॥ बाळ म्यां कैसा शापिला ॥ १३८ ॥
असो निजांकीं घेऊन बाळ ॥ मस्तक अवघ्राणूनि कहोळ ॥
भोंवते विप्र सकळ ॥ आनंदमय पाहती ॥ १३९ ॥
मग पित्याचें समाधान ॥ अष्टावक्र करी सुजाण ॥
म्हणे शरीर प्राक्तनाधीन ॥ त्याचें सुखदुःख कायसें ॥ १४० ॥
शरीर वक्र किंवा सरळ ॥ कृश किंवा हें स्थूळ ॥
एव मृत्तिका केवळ ॥ आत्मा निर्मळ अविनाश ॥ १४१ ॥
येणें जाणें जिणें मरण ॥ आत्म्यास नाहीं शरीरालागून ॥
जैसें घटमठसंगें गगन ॥ व्यापून वेगळें असे पै ॥ १४२ ॥
अष्टावक्राचिये चरणीं ॥ जनक लागे तये क्षणीं ॥
महाराज तूं पूर्ण मुनी ॥ दिव्यज्ञान बोलका ॥ १४३ ॥
बंदीच्या संगेकरून ॥ तप्त जाहलें माझें मन ॥
वादविवाद ऐकोन ॥ परम श्रम पावलों ॥ १४४ ॥
तरी बोल दिव्य आत्मज्ञान ॥ स्वामी करीन श्रवण ॥
संसारदुःख परम गहन ॥ सोडवीं आतां यापासूनि ॥ १४५ ॥
बंदी वंदूनि सर्वांसी ॥ गेला तेव्हां वरुणापाशीं ॥
यावरी राजा जनकासी ॥ अष्टावक्र बोलत ॥ १४६ ॥
चतुर्दशसहस्र ब्राह्मण ॥ ऐकती तेव्हां सावधान ॥
अष्टावक्र पीयूषघन ॥ वर्षता जाहला उदारत्वे ॥ १४७ ॥
म्हणे सकलनृपचक्रचूडामणी ॥ वेदांतज्ञान ऐक श्रवणीं ॥
मनन करिती निदिध्यासेकरूनी ॥ साक्षात्कारी समरसें ॥ १४८ ॥
मुक्ति इच्छिसी जरी मनीं ॥ तरी विषय विषवत्‌ सर्व मानीं ॥
किंवा वमन देखोनी ॥ विटे जैसें मानस ॥ १४९ ॥
कीं उरग धुसधुसीत ॥ त्यावरी जैसा न घालवे हात ॥
कीं व्याघ्राचिया गृहांत ॥ वस्ती जैशी न करवे ॥ १५० ॥
कीं कांचरस न करवे प्राशन ॥ तैसें विषयीं विटेल मन ॥
मग स्वरूपीं समाधान ॥ पावशील तत्त्वतां ॥ १५१ ॥
ऐक राया सार्वभौमा ॥ ज्ञानाचें आभरण क्षमा ॥
जैशी भ्रताराविण रामा ॥ व्यर्थ सुंदर कासया ॥ १५२ ॥
क्षमेविण वैराग्य ॥ जेविं नटें घेतलें वरिवरि सोंग ॥
कीं प्रेतास भोगविले भोग ॥ उपहास व्यर्थची ॥ १५३ ॥
सर्व भूतांचें आर्जव ॥ कोणाशीं न करावा विपरीत भाव ॥
हें चराचर सर्व ॥ आपणची होइजे ॥ १५४ ॥
सर्वभूतीं दया ॥ ज्ञानाचें सर्व लक्षण राया ॥
सत्य बोलणें सत्य क्रिया ॥ कायावाचामानसें ॥ १५५ ॥
जेथें परिपूर्ण ज्ञान ॥ ज्ञान तेथेंचि विज्ञान ॥
विज्ञानींच समाधान ॥ संतोषरूप सर्वदा ॥ १५६ ॥
संतोष तेथें शांति ॥ शांति तेथें अभेद भक्ति ॥
भक्ति तेथें विरक्ति ॥ आनंदेची क्रीडत ॥ १५७ ॥
आनंद तेथें सदा बोध ॥ बोध तेथें समाधि शुद्ध ॥
समाधि तेथें ब्रह्मानंद ॥ सुख आलें हातासी ॥ १५८ ॥
जैसा जीवां सुधारस दुर्लभ दृष्टी ॥ दैवे देखिल्या घालीत मिठी ॥
तैशी अद्वैतीं आवडी मोठी ॥ न आणीं पोटीं दूसरी ॥ १५९ ॥
निरपेक्ष व्हावें मानस ॥ नांदे हृदयीं उल्हास ॥
प्रपंच आहे किंवा बुडाला निःशेष ॥ नाहीं स्मरण तयाचें ॥ १६० ॥
दशेंद्रियें पंचप्राण ॥ अष्टधा प्रकृतीचें नाहीं स्मरण ॥
ब्रह्मानंदें आनंदघन ॥ नसे भान दुसरें पैं ॥ १६१ ॥
हा मूर्ख हा चतुर ॥ हा द्विजन्मा हा शूद्र ॥
हा देही हा विदेही थोर ॥ नाठवेच तयातें ॥ १६२ ॥
घटमठीं व्यापूनि उत्तम ॥ अखंड अद्वैत जैसें व्योम ॥
तैसें स्वस्वरूप सम ॥ आपणासहित पाहती ॥ १६३ ॥
तो भेदाभेदरहित ॥ पुण्यपापविवर्जित ॥
निःसंदेह गुणातीत ॥ अमूर्तमूर्त पुरुष तो ॥ १६४ ॥
मुसेंत आटिले अलंकार ॥ तेथें न दिसे द्वैतविकार ॥
कीं घटमठत्यागें अंबर ॥ मुळींच अभेद जैसें कां ॥ १६५ ॥
जैशा नानावर्णगायी ॥ परि दुग्धीं पालट नाहीं ॥
कीं नाना सलिले मेळवितांही ॥ ऐक्य होत अभेदत्वें ॥ १६६ ॥
जैसें सैंधवं मिळालें सागरीं ॥ शब्द निमाला अंबरीं ॥
तैसा तो स्वस्वरूपीं निर्धारीं ॥ विश्वासहित विराला ॥ १६७ ॥
हें करणें हें न करणें ॥ कांहींच नेणती त्याचीं करणें ॥
हार कीं विखार पाहणें ॥ निद्रिता जेविं घडेना ॥ १६८ ॥
मन बुद्धि अहंकार ॥ मावळले तयाचे विकार ॥
कर्ता क्रिया कर्म समग्र ॥ त्रिपुट्या तेथें निमाल्या ॥ १६९ ॥
बाल्य तारुण्य वृद्धपण ॥ हें त्यास नाहीं मूळींहून ॥
जीव शिव हें मायाभान ॥ मूळाहूनं विराले ॥ १७० ॥
जागृति स्वप्न सुषुप्ति ग्रासून ॥ समशेजे निजला पूर्ण ॥
तुर्या उन्मनी ओलांडून ॥ पूर्णानंद अभेद तो ॥ १७१ ॥
स्थूल सूक्ष्म कारण ॥ स्थावर जंगम निरसून ॥
पावला स्वरूपीं समाधान ॥ साध्य साधन आटलें ॥ १७२ ॥
रूप रेखा स्थान मान ॥ वर्णावर्ण आश्रम जाण ॥
धारणा ध्यान मनन ॥ विरोन गेलीं तयांचीं ॥ १७३ ॥
दृश्य द्रष्टा दर्शन ॥ श्वेत पीत आरक्त पूर्ण ॥
वेद शास्त्र पुराण ॥ पाहतां पाहणें विराले ॥ १७४ ॥
मंत्र जप तप यज्ञ ॥ गेलें सर्वही गळून ॥
अधोध्व ओतप्रोत भान ॥ गेलें विरोन सर्वही ॥ १७५ ॥
जनक करितसे प्रश्न ॥ हे निर्वाणदीक्षा परिपूर्ण ॥
अंगीं ठसावया कारण ॥ सांगावें तें दयार्णवा ॥ १७६ ॥
त्यास प्रथम पायरी कोण ॥ तो अनुक्रम सांगावा परिपूर्ण ॥
यावरी अष्टावक्र कृपाघन॥ बोलता जाहला ऐका तें ॥ १७७ ॥
सप्तभूमिका वेदांत पूर्ण ॥ सांगितल्या ऐका सावधान ॥
शुभेच्छा प्रथम जाण ॥ विचारणा नाम दुसरी पैं ॥ १७८ ॥
तनुमानसा तिजी निश्चितीं ॥ चवथी जाण सत्त्वापत्ती ॥
पांचवी ते असंसक्ती॥ पदार्थाभाविनी सहावी ते ॥ १७९ ॥
तुर्या गा सातवी पूर्ण ॥ आतां ऐक पहिलीचें लक्षण ॥
शुभेच्छा म्हणती जियेलागून ॥ ऐक विवरण तियेचें ॥ १८० ॥
माझें मूढत्व कैं जाईल समस्त ॥ केव्हां भेटती साधुसंत ॥
कैं मज होईल ज्ञान प्राप्त ॥ तळमळ मनांत वाटतसे ॥ १८१ ॥
अंगीं वैराग्य आसमास ॥ सर्व पदार्थांवरी जो उदास ॥
शरण रिघे सद्‍गुरूस ॥ शुभेच्छा यास म्हणावें ॥ १८२ ॥
आचार्यमुखेंकरून ॥ करी वेदशास्त्राचें श्रवण ॥
तदनुसार करी साधन ॥ विचारणा जाण दुसरी हे ॥ १८३ ॥
मन विषयीं होय विरक्त ॥ प्रवृत्तिशास्त्रीं नुपजे हेत ॥
श्रवणीं आवडी बहुत ॥ तनुमानसा नामें तिसरी हे ॥ १८४ ॥
मुख्य करीं आधीं श्रवण ॥ मग श्रवणासहित मनन ॥
श्रवणमनन बिंबतां पूर्ण ॥ निदिध्यास मग जडे ॥ १८५ ॥
ही तिन्ही चढतां हातासी ॥ तोचि पावला साक्षात्कारासी ॥
महावाक्य तत्त्वमसि ॥ विचारासी पावे तो ॥ १८६ ॥
ज्ञानें निरसिलें अज्ञान ॥ विश्रांतीस पावलें मन ॥
सत्त्वापत्ति हे पूर्ण ॥ चवथी भूमिका जाणिजे ॥ १८७ ॥
सर्व पदार्थ देखत ॥ परि कोठेही न गुंते चित्त ॥
आनंदरूप सर्वदा वर्तत ॥ असंसक्ति हे पांचवी ॥ १८८ ॥
पंचभूमिकाभ्यासेकरून ॥ पुढें विसरला पदार्थज्ञान ॥
सर्व चिन्मात्रचि भासे पूर्ण ॥ पदार्थाभाविनी सहावी पै ॥ १८९ ॥
साही भूमिकांचा होतां बोध ॥ निरसले सर्व भेदाभेद ॥
स्वस्वरूप देखे प्रसिद्ध ॥ तुर्या भूमिका सातवी हे ॥ १९० ॥
या भूमिका सांगितल्या सप्त ॥ कोणता कोणे भूमीस राहत ॥
कोण किती भूमी ओलांडित ॥ हें जाणती तत्त्ववेत्ते ॥ १९१ ॥
या भूमिका साधितां सत्वर ॥ जाहला नसतां साक्षात्कार ॥
तो मावळला आयुष्यदिनकर ॥ देहपतन जाहले ॥ १९२ ॥
साधू देहांतकाळी भावी पूर्ण ॥ म्हणे राहिलें माझें आत्मसाधन ॥
मग करून भगवत्स्मरण ॥ देह त्यागी साधक तो ॥ १९३ ॥
सत्यलोक वैकुंठ कैलास ॥ तेथें वास करी बहु दिवस ॥
तुझें सुकृत सरले त्यास ॥ कोणी न म्हणे कल्पांती ॥ १९४ ॥
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ॥ हे इतर जीवांची गति ॥
तैसा साधक नव्हे निश्चितीं ॥ सदा वंदिती देव त्यातें ॥ १९५ ॥
मरीचिं सहस्त्राक्ष मृगवाहन ॥ हरिहरादिपदें स्वेच्छे पावोन ॥
तेथेंही त्याचें विटे मन ॥ म्हणे राहोन काय येथें ॥ १९६ ॥
मग तो कर्मभूमीस उतरून ॥ त्यास योगिकुलीं होय जन्म ॥
माता पिता योगी पूर्ण ॥ असती पावन दोन वंश ॥ १९७ ॥
प्रारब्धे होय ऐश्वर्यवंत ॥ भोग भोगितां विराग बहुत ॥
उरल्या भूमिकांस तो झटत ॥ साक्षात्कार व्हावयासी ॥ १९८ ॥
त्यास प्रतिष्ठा देखोन ॥ वाटे सकल विष्ठेसमान ॥
वांति देखोन विटे मन ॥ विषयीं जाण तैसा तो ॥ १९९ ॥
मग आचार्यवाक्ये सत्वर ॥ वेगें पावे तो साक्षात्कार ॥
दग्धपटवत्‌ शरीर ॥ भासमात्र उरलासे ॥ २०० ॥
तो योगभष्ट अद्‌भुत ॥ सप्तभूमींस झेपावत ॥
जैसें पळें पळें चढत ॥ मित्रमंडल त्वरेनें ॥ २०१ ॥
कीं बीजेपासून रोहिणीपती ॥ कला विशेष वाढती ॥
कीं अभ्यासेंकरून वाढे मती ॥ पंडिताची विशेष ॥ २०२ ॥
कीं वटबीजापासून अंकुर ॥ भेदित जेविं अंबर ॥
कीं गोमती धांवे सत्वर ॥ सागरासी भेटावया ॥ २०३ ॥
कीं अग्रापासून मूळापर्यंत ॥ इक्षुदंड गोड लागत ॥
कीं तप आचरतां शुचिष्मंत ॥ वाढे अद्‌भुत पुण्य पै ॥ २०४ ॥
कीं स्नेह धरितां आदरें बहुत ॥ मित्रत्व अत्यंत वाढत ॥
कीं परोपकारें अद्‌भुत ॥ यश वाढे त्रिलोकीं ॥ २०५ ॥
तैसा योगभ्रष्ट जाण ॥ सदा ब्रह्माभ्यासेंकरून ॥
दया क्षमा शांति पूर्ण ॥ दिवसेंदिवस वाढती ॥ २०६ ॥
सप्तभूमिका जिंकून ॥ तो निर्द्वंद्व विजयी अनुदिन ॥
संचित आणि क्रियमाण ॥ दग्ध जाहलीं तयाचीं ॥ २०७ ॥
तो देहींच विदेही पूर्ण ॥ देह मिथ्यात्वें गेला निरसून ॥
तरी प्रारब्ध कोठोन ॥ उरलें त्यासी सांग पां ॥ २०८ ॥
तो स्वसुखें विचरत ॥ जेविं सागरीं लहरी अभेद क्रीडत ॥
कीं सुवर्णमूर्ति सत्त्वास येत ॥ तैसा वर्तत योगी तो ॥ २०९ ॥
मग त्याचा देह पडे तीर्थी ॥ अथवा श्वान श्रृगाल भक्षिती ॥
परी योगियास गर्भस्थिती ॥ कल्पांतींही नव्हेचि ॥ २१० ॥
जैसें उदकीं मिळे लवण ॥ कीं जळगारा जाय जळी विरोन ॥
कीं सागरामाजी येऊन ॥ मेघधारा मिसळती ॥ २११ ॥
कीं नाद विरे निराळी ॥ कीं कर्पूरज्योति एक जाहलीं ॥
कीं झांकिलिये घटीं विराली ॥ दीपकलिका जैशी कां ॥ २१२ ॥
ऐसा तो महाराज ॥ पावला निर्वाण स्वतेज ॥
हें जनकराया तुज ॥ दिव्य ज्ञान कथियेलें ॥ २१३ ॥
हेचि दीक्षा मनीं धरीं ॥ वादप्रतिवाद कदा न करीं ॥
याच बोधे अंतरीं ॥ ब्रह्मानंदे तृप्त होय ॥ २१४ ॥
तुज पंचशीर्षाचे होईल दर्शन ॥ याज्ञवल्क्य कथील ज्ञान ॥
तेचि तूं हृदयीं धरून ॥ विदेहत्वें विचरे कां ॥ २१५ ॥
जनके दृढ धरिले चरण ॥ केलें अष्टावक्राचें पूजन ॥
चतुर्दशसहस्त्र ब्राह्मण ॥ स्वस्थानाप्रति पावले ॥ २१६ ॥
सवें श्वेतकेतु मातुल ॥ महाराज तो पिता कहोळ ॥
अष्टावक्र निघाला तत्काळ ॥ स्वस्थानासी आपुल्या ॥ २१७ ॥
कहोळ पुत्राकडे पाहून ॥ कळवळले त्याचें अंतःकरण ॥
म्हणे याचें वक्रपणा ॥ दूर करूं यावरी ॥ २१८ ॥
अष्टावक्रास म्हणे कहोळ ॥ हे मधुबिला नदी निर्मळ ॥
स्नान करितां सकळ ॥ सम अंगें तुझीं होती ॥ २१९ ॥
लोमश म्हणे धर्मराया ॥ अष्टावक्रें पित्यास नमूनियां ॥
स्नान करितां दिव्य काया ॥ अंगें सम जाहलीं ॥ २२० ॥
कहोळ परम संतोषोन ॥ हृदयीं आलिंगिला नंदन ॥
यावरी निजाश्रम पावोन ॥ सुखरूप राहिले ॥ २२१ ॥
अष्टावक्राचें गेलें वक्रपण ॥ समंगानदी हे तेथपासून ॥
सकुटुंब करीं स्नान ॥ धर्मराजा येथें आतां ॥ २२२ ॥
मग बंधूंसहित युधिष्ठिर ॥ स्नान करी तेथ सत्वर ॥
कृष्णाभगिनी कृष्णा पवित्र ॥ स्नान करी यथाविधि ॥ २२३ ॥
तीर्थविधि सारून ॥ पुढें चालिले पृथानंदन ॥
हें अष्टावक्रोपाख्यान ॥ लोमशानें कथियेलें ॥ २२४ ॥
ब्रह्मानंदा गुणगंभीरा ॥ श्रीधरवरदा रुक्मिणीवरा ॥
श्रीमद्‌भीमातटविहारा ॥ आनंदनेत्रा अभंगा ॥ २२५ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ सव्विसाव्यांत कथियेला ॥ २२६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्वटीका श्रीधरकृत ॥
अष्टावक्राख्यान समस्त ॥ लोमश सांगे धर्मासी ॥ २२७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
अध्याय सव्विसावा समाप्त



GO TOP