श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय पंचविसावा
नळराजा आणि दमयंती
श्रीगणेशाय नम:
बृहदश्वा म्हणे धर्मराजा ॥ सोमवंशविजयध्यजा ॥
पुण्यश्लोक भूभुजां- ॥ माजी नल प्रथमची ॥ १ ॥
नैषधदेश परम पावन ॥ तेथील नराधिप वीरसेन ॥
चतुःषष्टिकलाप्रवीण ॥ नल नामा पुत्र त्याचा ॥ २ ॥
चतुर्दशविद्यापारंगत ॥ बोलका जैसा अंगिरासुत ॥
स्वरूपास तुलितां यथार्थ ॥ शंबरारि सरी न पावे ॥ ३ ॥
धनुर्वेदीं परम निपुण ॥ जाणे अश्वशिक्षापरीक्षालक्षण ॥
सर्व रायांत मुकुटरत्न ॥ शचीरमण पृथ्वीवरी ॥ ४ ॥
नवग्रहांत वासरमणि देख ॥ कीं द्विजांत श्रेष्ठ विनायक ॥
कीं दंदशूकांत अधिक ॥ सहस्त्रशीर्ष प्रतापी ॥ ५ ॥
धनुर्धरांमाजी श्रेष्ठ ॥ भूमिजावर कीं भृगुकुलवरिष्ठ ॥
समरांगणीं परम धीट ॥ जैसा ध्रुव न हाले ॥ ६ ॥
विदर्भदेशींचा राजेंद्र ॥ भीमकनामा परम चतुर ॥
उदरीं नाहीं त्यास पुत्र ॥ जाहलें विचित्र पूर्वदत्तें ॥ ७ ॥
घरा आला ऋषि दमन ॥ रायें पूजिला आदरेंकरून ॥
तेणें दिलें वरदान ॥ पुत्र तीन तुज होती ॥ ८ ॥
एक कन्या चारुगात्री ॥ जैशी इंदिरा इंदीवरनेत्री ॥
मित्रतुल्य पुत्र उदरीं ॥ सवेंचि जाहले तयातें ॥ ९ ॥
दम दांत दमन ॥ दमयंती कन्या दिव्यरत्न ॥
लावण्यभूमीचें निधान ॥ आकर्णनयन विराजती ॥ १० ॥
जाहली स्वरूपाची सीमा ॥ ते मृडानीची अपर प्रतिमा ॥
तिचें स्वरूप कमलजन्मा ॥ दुसरें निर्मूं न शकेची ॥ ११ ॥
ते शतक्रतूची प्रिया ॥ कीं अवतरली अब्जतनया ॥
बहुत वर्णिती वरारोहा ॥ इची प्रतिमा नसेची ॥ १२ ॥
देवगंधर्वकन्या नागिणी ॥ इच्या दासी शोभती पद्मिणी ॥
अत्रिस्नुषा लावण्यखाणी ॥ स्वरूप पाहोनि लज्जित ॥ १३ ॥
चक्षुश्रव्याची कुमारी ॥ वृत्रारिशत्रुची अंतुरी ॥
द्विदशनेत्राची नारी ॥ न पवे सरी इयेची ॥ १४ ॥
तारकारिजनकशत्रुप्रिया ॥ स्वरूपें वर्णिल्या बहुत स्त्रिया ॥
गुणे स्वरूपें दमयंतीनें तयां ॥ लघुत्वा सर्वां आणिलें ॥ १५ ॥
भाळी आरक्त अक्षय्य रत्नमणी ॥ द्विज जैसे हिर्यांची खाणी ॥
बोलतां प्रकाश पडे धरणी ॥ तटस्थ नयन पाहतां ॥ १६ ॥
शशिकला तेजस्वी षोडश ॥ चिरून केले द्विज बत्तीस ॥
कलंक भरिला संधीस ॥ अति राजस दिसती ते ॥ १७ ॥
सव्यहस्तींची अंगुलिका ॥ सुधारस स्त्रवत देखा ॥
स्पर्शतां कुणपाचिया मुखा ॥ प्राण परते सवेंची ॥ १८ ॥
मृग मीन कल्हार खंजन ॥ ओवाळावे नयनांवरून ॥
विराजे सोगयाचें अंजन ॥ मीनकेतन देखोनि नाचे ॥ १९ ॥
एक कोशपर्यंत ॥ अंगींचा सुवास धांवत ॥
पदमुद्रा उमटता ॥ चालतां आरक्त भूमीवरी ॥ २० ॥
द्विजेंद्र लज्जित देखतां वदन ॥ मृगेंद्र लज्जित कटि पाहून ॥
करींद्र गमनातें देखोन ॥ लज्जायमान सहजची ॥ २१ ॥
कुरलकुंतलीं जिंकिलें मिलिंदचक्र ॥ कामांकुशीं मंदले मयूर ॥
अंगिरातनुजकवींद्र ॥ कर्णभूषणीं राहिले ॥ २२ ॥
विचित्र शक्रसायकासन ॥ त्यासी सिंदूररेखा आणी न्यून ॥
मनसिज आपला प्राण ॥ ओंवाळील देखतां ॥ २३ ॥
ऐशी तिची अंगप्रभा ॥ आणिली लेणियां दिव्यशोभा ॥
चामीकरतत्त्वगाभा ॥ तैशी कांति तियेची ॥ २४ ॥
भोवत्या सख्या रंजविती ॥ श्रृंगाररस एक गाती ॥
सकल नृपांत विशेष वर्णिती ॥ सौंदर्य कीर्ति नलाची ॥ २५ ॥
ऐकतां नलाचें वर्णन ॥ भैमीचें गुंतलें तेथें मन ॥
इकडे नैषधसदनीं अनुदिन ॥ सख्या वर्णिती दमयंतीतें ॥ २६ ॥
ऐकतां वैदर्भीचा श्रृंगार ॥ विरहें व्यापला वीरसेनकुमार ॥
एके दिवशीं तो उपवर ॥ मृगयेलागीं चालिला ॥ २७ ॥
तो देखिल्या हंसपंक्ती ॥ शुद्धश्वेत तयांची अंगकांती ॥
कीं निर्दोश यश निश्चितीं ॥ हंस सर्व लेइले ॥ २८ ॥
शातकुंभप्रभेसमान ॥ पक्ष झळकती विराजमान ॥
चरण आणि नयन ॥ प्रवालमण्यांसारखे ॥ २९ ॥
नलकरपंकजीं मुक्तमाळ ॥ कविगुरूऐशीं मुक्तें तेजाळ ॥
देखोनि एक हंस तत्काळ ॥ नळाचे करीं आरूढला ॥ ३० ॥
मनुष्यवाणी हंस बोलत ॥ नैषधा न करीं माझा घात ॥
दमयंती होईल तुज प्राप्त ॥ ऐसा प्रयत्न करीन मी ॥ ३१ ॥
नळें ऐशी ऐकतां वाणी ॥ म्हणे तूं आवडसी प्राणाहूनी ॥
तरी तूं आतां विलंब टाकूनी ॥ वैदर्भदेशाप्रति जाई गा ॥ ३२ ॥
अवश्य म्हणोनि त्वरित ॥ उडाला सकलहंसांसहित ॥
नगराबाहेर राहिले समस्त ॥ मुख्य तो जात भैमीगृहा ॥ ३३ ॥
दिव्य मराळ देखोनियां ॥ सख्या धांवती धरावया ॥
मग दमयंतीनें जाऊनियां ॥ प्रार्थूनि जवळी आणिला ॥ ३४ ॥
कोमल हस्तें कुरवाळित ॥ पंडिताएसा हंस बोलत ॥
म्हणे मृगशावाक्षी ऐक मात ॥ मी आहें हिंडत त्रिभुवनीं ॥ ३५ ॥
उदंड देखिले भूभुज ॥ परि नळाऐसा नाहीं तेजःपुंज ॥
ज्याचें विलोकितां वदनांबुज ॥ मीनध्वज खालीं पाहे ॥ ३६ ॥
क्षीराब्धीत कलंक धुऊन ॥ बाहेर निघाला रोहिणीरमण ॥
तैसें नैषधाचे वदन ॥ पाहतां मन उल्हासे ॥ ३७ ॥
कोंदणावरी बैसे हिरा ॥ तैशी तूं होई त्याची दारा ॥
जैसा श्रीरंग आणि इंदिरा ॥ तैशी शोभा दिसेल ॥ ३८ ॥
मग ते विदर्भराजबाळी ॥ श्रृंगारसरोवरमराळी ॥
म्हणे हंसोत्तमा ये काळीं ॥ मनोवेगें जाई कां ॥ ३९ ॥
नैषधराज वर होय पूर्ण ॥ ऐसें करीं त्वरें जाऊन ॥
कीर्ति ऐकोन तृप्त जाहले कर्ण ॥ परि उदित मन पहावया ॥ ४० ॥
गगनमार्गे हंस सत्वरा ॥ आला तत्काल नैषधमंदिरा ॥
नल हृदयीं धरून मित्रा ॥ समाचार पुसतसे ॥ ४१ ॥
हंस म्हणे जलाविण ॥ तळमळत जैसा मीन ॥
तैशी विरहज्वरेंकरून ॥ विदर्भकन्या जाहली ॥ ४२ ॥
रतिवरशत्रुभूषणकुमारी ॥ सखिया देती न अंगीकारी ॥
लोकप्राणेशवनजातसुंदरी ॥ त्यागिली दूरी विरहज्वरें ॥ ४३ ॥
त्रयोदश करून चतुर्गुण ॥ भोगिवेष्टित जो तरु जाण ॥
तुझ्या विरहेंकरून ॥ पंक त्याचा न शिवेची ॥ ४४ ॥
आसन शयन भोजन ॥ विषतुल्य मानी तुजविण ॥
सुमनहार पावकासमान ॥ तैसे भासती तियेतें ॥ ४५ ॥
जलजवदन आरक्त ओंठ ॥ जलजवत् शोभे कंठ ॥
जलजमाला अविट ॥ तोडून टाकी तव विरहें ॥ ४६ ॥
जलाविरहित दिव्यान्न ॥ तैशी ते जाहली तुजविण ॥
अनलवत् भोग पूर्ण ॥ नलावीण मानी ते ॥ ४७ ॥
इकडे भैमीच्या सख्या जाण ॥ भीमकासी सांगती वर्तमान ॥
तुझे कन्येसी ध्यान ॥ नैषधाचें लागलें ॥ ४८ ॥
राये आरंभिलें स्वयंवर ॥ भूभुजांस पत्रे लिहिलीं सत्वर ॥
छप्पन्न देशींचे नृपवर ॥ येते जाहले तेधवां ॥ ४९ ॥
आपलाले पृतनेसहित ॥ नृप आले असंख्यात ॥
द्वादशगांवपर्यंत ॥ नगराभोंवतीं उतरले ॥ ५० ॥
यथाकुल यथाशील ॥ रायें नृप पूजिले सकल ॥
तो नारद अमरावतींत तत्काल ॥ सहस्राक्षा जाणवित ॥ ५१ ॥
महीरत्नांमाजी निर्दोष ॥ वैदर्भराज अति विशेष ॥
त्याची कन्या बहुत रूपस ॥ ते प्रत्यक्ष इंदिरा दुजी ॥ ५२ ॥
नलनृपति परम सुंदर ॥ मानसीं इच्छित भ्रतार ॥
भीमकें मांडिलें स्वयंवर ॥ भूभुज अपार मिळाले ॥ ५३ ॥
तिच्या स्वरूपाची दुजी प्रती ॥ नाहीं नाहीं त्रिजगतीं ॥
ऐशी साक्ष देत सरस्वती ॥ विश्वतोमुखीं शचीवरा ॥ ५४ ॥
भाळी रत्नमणितिलकविशेष ॥ सव्यकराग्रीं वसे सुधारस ॥
ऐकतां शक्राचें मानस ॥ पाहों इच्छित तियेतें ॥ ५५ ॥
पुरंदर यम कृशान वरुण ॥ वैदर्भनगरा आले चौघे जण ॥
तो त्याच मार्गेकरून ॥ नैषधराजा येतसे ॥ ५६ ॥
किरणचक्रीं विराजे मित्र ॥ तैसा चमूसहित राजेंद्र ॥
पंचवदनारीहूनि सुंदर ॥ देखोनि शक्रादि पुसताती ॥ ५७ ॥
म्हणती पुण्यश्लोका तूं कोण ॥ तो म्हणे मी नळ वीरसेननंदन ॥
मम स्वरूपीं वेधले भैमीचें मन ॥ म्हणोनि जातों स्वयंवरा ॥ ५८ ॥
शक्र म्हणे तूं पुण्यशील ॥ ऐसें लोक वर्णिती सकल ॥
तरी आमुचें दूतत्व निर्मल ॥ निष्कपट तुवां करावें ॥ ५९ ॥
इंद्र अग्नि यम वरुण ॥ आम्ही दिक्पाल चौथे जण ॥
तरी ते दमयंती बोधून ॥ वश करीं आम्हांते ॥ ६० ॥
चौघांत एकासी घालील माळ ॥ ऐसें करीं तूं पुण्यशीळ ॥
आपुला स्वार्थ सांडोनि सकळ ॥ कार्य साधीं एवढें ॥ ६१ ॥
नळ म्हणे अंतःपुरांत ॥ मी कैसा जाऊं तेथ ॥
मग वर देत अमरनाथ ॥ न दिससी सत्य कोणा तूं ॥ ६२ ॥
एक भैमी वेगळी करून ॥ होईल समस्तां दृष्टिबंधन ॥
मग एकलाच नळ तेधून ॥ आला वैदर्भमंदिरा ॥ ६३ ॥
तो अनंतशक्तींसमवेत ॥ त्रिपुरसुंदरी विराजत ॥
स्वरूपीं ओतिले कोटि मन्मथ ॥ तैशी शोभत दमयंती ॥ ६४ ॥
शरत्कालींचा चंद्र देख ॥ पाहतां पाहतां वाटे सुख ॥
तैसें तिचें पाहतां श्रीमुख ॥ अति आल्हाद नळातें ॥ ६५ ॥
तो मुखमृगांक देखोन ॥ चकोर जाहले नैषधनयन ॥
तयास वैदर्भीने पाहून ॥ कामानलें आहाळली ॥ ६६ ॥
म्हणे लावण्यगुणनिधाना ॥ मम हृदयानंदवर्धना ॥
वेध लाविला मम नयनां ॥ बोल वचना कोण तूं ॥ ६७ ॥
भैमीच्या सख्या सकळ ॥ तन्मय जाहल्या पाहतां नळ ॥
म्हणती धन्य माउली वेल्हाळ ॥ ऐसा पुत्र प्रसवली ॥ ६८ ॥
किती तपें आचरली साचार ॥ कीं अर्चिले रमावर उमावर ॥
कीं दिव्य रत्नी वसुधामर ॥ तोषविले पूजोनियां ॥ ६९ ॥
कीं यथोक्त व्रतें केलीं विचित्र ॥ तरी पावली ऐसा दिव्य पुत्र ॥
याचे पाटीं जे बैसेल पवित्र ॥ तेही धन्य त्रिभुवनीं ॥ ७० ॥
यावरी तो गुणाढ्य विशेष ॥ भैमीप्रति बोले सुरस ॥
वरुण कृशान यम देवेश ॥ त्यांचा दूत मी असें ॥ ७१ ॥
मी नलनामा वीरसेनसुत ॥ परि लोकपालांचें केलें दूतत्व ॥
ऐकोन तुझें सुंदरत्व॥ वरुं इच्छिती शुभानने ॥ ७२ ॥
त्यांच्या वरेंकरून सत्य ॥ कोणी न देखतां आलों गुप्त ॥
तरी त्या चौघांत त्वरित ॥ एकास वरीं गुणसरिते ॥ ७३ ॥
यावरी वैदर्भी बोले वचन ॥ जेणें निवती नैषधकर्ण ॥
तनुमनधनांशीं शरण ॥ तुज निघालें नृपश्रेष्ठा ॥ ७४ ॥
चापाहून सुटे बाण ॥ तो केविं परते मागुतेन ॥
तैसें तुज समर्पिलें मन ॥ जैसें लवण सागरीं ॥ ७५ ॥
नळावांचोनि पुरुषमात्र ॥ पिता बंधु किंवा पुत्र ॥
आणिक इच्छीन दुजा वर ॥ तरी हे रसना झडेल ॥ ७६ ॥
हंस परम सज्ञान ॥ तेणें सांगितलें वर्तमान ॥
हे स्वयंवर आरंभिलें पूर्ण ॥ तुजलागून वरावया ॥ ७७ ॥
नैषधा सुंदरा चारुगात्रा ॥ लावण्यकोशा आकर्णनेत्रा ॥
चामीकरवर्णा सुहास्यवक्त्रा ॥ माझ्या अंतरा शोधिसी काय ॥ ७८ ॥
तूं न वरिसी मजलागून ॥ तरी आतांच त्यागीन मी प्राण ॥
स्वर्गींच्या देवांशीं कारण ॥ मज नाहीं वृपवरा ॥ ७९ ॥
मीनास पाहिजे जल उत्तम ॥ धृतसिंधूचें काय काम ॥
दधिमधुसुसरोवरें उत्तम ॥ वर्णितां त्यासी न मानती ॥ ८० ॥
वैदर्भी बोले कर जोडून ॥ मी त्या लोकपालांस करीन नमन ॥
परी कायावाचामनें जाण ॥ जाया तुझी जाहले ॥ ८१ ॥
आतां विनंती हेचि निश्चित ॥ आपण बैसावें लोकपालांत ॥
त्यांदेखतां त्वरित ॥ तुज वरीन नृपवर्या ॥ ८२ ॥
ऐसें ऐकतां वेगेंशीं ॥ नळ आला देवांपाशीं ॥
होऊन निष्कपट मानसीं ॥ जाहलें तेंच कथियेलें ॥ ८३ ॥
म्यां तुमचें केलें वर्णन ॥ भैमी म्हणे तुजचि वरीन ॥
लोकपाळांस बैसवून ॥ स्वयंवरसभेंत तत्त्वतां ॥ ८४ ॥
तुमचे वंदोनि चरण ॥ म्हणते मजलाचि माळ घालीन ॥
निष्कपट नैषध पूर्ण ॥ इंद्रादिकांसी समजलें ॥ ८५ ॥
इकडे पृथ्वीचे भूभुज ॥ सभेसी बैसले तेजःपुंज ॥
बहुत बैसले तपस्वी द्विज ॥ शापानुग्रहसमर्थ जे ॥ ८६ ॥
अनर्घ्य रत्न पहावया जवळी ॥ मिळे जैशी परीक्षकमंडळी ॥
कीं सिद्धांभोवतीं पाळी ॥ साधकांची विराजे ॥ ८७ ॥
तो नैषधासमवेत तत्काळ ॥ सभेस बैसती लोकपाळ ॥
परि चौघेहि जाहले नळ ॥ पूर्वरूप पालटूनि ॥ ८८ ॥
कीं उगवले पंचादित्य ॥ एकरूप तेजाद्भुत ॥
तो लावण्यहरिणी अकस्मात ॥ माळ घेऊन पातली ॥ ८९ ॥
ते लावण्यामृताची पुतळी ॥ कीं सौदामिनी दिव्य प्रकटली ॥
मृगशावाक्षी सभा न्याहाळी ॥ तो पंच नल देखिले ॥ ९० ॥
परम दचकली मनांत ॥ म्हणे पांचही नैषध बैसले येथ ॥
मुख्य यांत वीरसेनसुत ॥ कैसा कळेल मज आतां ॥ ९१ ॥
कमलाधवा कमलासना ॥ मी अनन्यशरण तुझिया चरणा ॥
मुख्य वीरसेननंदना ॥ मज दाखवीं ये वेळे ॥ ९२ ॥
यम वरुणाग्ने सहस्रनयना ॥ मी तुमची असें कन्या ॥
मज नैषधाहातीं देऊनियां ॥ नळ जामात करा आपुला ॥ ९३ ॥
नलचरणीं असेल माझें मन ॥ तरी देवचिन्हांचें होय ज्ञान ॥
पाहे चौघांकडे विलोकून ॥ तंव नेत्रपातीं न हालती ॥ ९४ ॥
अंतरिक्ष आसनें असती ॥ छाया नाहीं पडली जगतीं ॥
भूमीवरी बैसला नैषधपती ॥ लक्षी दमयंती निश्चये ॥ ९५ ॥
ते सौंदर्यकासारमराळीं ॥ सौभाग्यगंगा वैदर्भबाळी ॥
गजगमना नळ न्याहाळी ॥ मग माळ घाली वेगेंशी ॥ ९६ ॥
एकसरें वाजती वाद्यें नाना ॥ भेरी ठोकिल्या चंद्रानना ॥
प्रतिशब्द न माये गगना ॥ सोहळा कोणा न वर्णवे ॥ ९७ ॥
राजे तळमळती मनांत ॥ गेली हातींची अनर्ध्य वस्त ॥
वोहरें उठोनि त्वरित ॥ नमन करिती लोकपाळां ॥ ९८ ॥
लोकपाळ संतोषले सत्वर ॥ नळासी देती अष्ट वर ॥
गुप्त व्हावें प्रकट व्हावें गति अपार ॥ स्मरतां अग्नि प्रकटावा ॥ ९९ ॥
सत्त्व धैर्य पराक्रम पूर्ण ॥ रिक्तकुंभीं प्रकटावे जीवन ॥
हे अष्टवर देऊन ॥ अंतर्धान पावले ॥ १०० ॥
वर्णिती नळाचे भाग्य अपार ॥ स्वस्थाना पावले नृपवर ॥
मग यथासांग सविस्तर ॥ चार दिवस लग्न जाहलें ॥ १०१ ॥
आंदण दिधलें अपार ॥ गज रथ तुरंग यानें सुंदर ॥
दास दासी अलंकार ॥ वस्त्राभरणां न गणती ॥ १०२ ॥
दमयंती घेऊन सांगातें ॥ नळ गेला स्वनगरातें ॥
राज्य केलें भूभुजनाथें ॥ भैमीकांते तैसेंची ॥ १०३ ॥
दमयंतीसह क्रीडतां काल ॥ संवत्सर मानी जैसें पळ ॥
जाहला इंद्रसेन कुमार वेल्हाळ ॥ कन्या जाहली इंद्रसेनी ॥ १०४ ॥
इकडे लोकपाळ जातो स्वर्गवाटे ॥ द्वापार कलि भेटती त्यां वाटे ॥
देव म्हणती बहु नेटें ॥ जातां कोठे सांगा हो ॥ १०५ ॥
कलि म्हणे अवधारा ॥ जातो दमयंतीच्या स्वयंवरा ॥
देव म्हणती वीरसेनकुमारा ॥ वरिले तिनें प्रीतीनें ॥ १०६ ॥
ऐकतां कलि कोपला सबळ ॥ सांडून सुधापानी लोकपाळ ॥
मृत्युलोकींचा मानव नळ ॥ त्यास माळ घातली ॥ १०७ ॥
त्या नळास दंड करून ॥ हिडवीन मी रानोरान ॥
एक वस्त्र दोघां लावीन ॥ नेमे आणीन अवदशा ॥ १०८ ॥
कलि म्हणे द्वापारास ॥ तूं होई कपटपाश ॥
खेळतां जिंकोनि नळास ॥ राज्यभ्रष्ट करावें ॥ १०९ ॥
मग द्वापार आणि कली ॥ गुप्त राहती नळाजवळी ॥
न्यून पाहती सदाकाळीं ॥ द्वादश वर्षेंपर्यंत ॥ ११० ॥
राजा नैषध पुण्यशीळ ॥ प्रजाप्रतिपालक दयाळ ॥
महायज्ञ करून सकळ ॥ देवद्विज तृप्त करी ॥ १११ ॥
निर्दोष यश अक्षय्यकीर्ती ॥ सदा करी याचकांची तृप्ती ॥
निर्दयत्व अनाचार निश्चितीं ॥ सहसा नावडे नळातें ॥ ११२ ॥
भगवदभजनीं परमादर ॥ सत्यवंत सदय अत्युदार ॥
दंडाविषयीं सूर्यकुमार ॥ वैश्वानर पवित्र तैसा ॥ ११३ ॥
कलि जपतां बहुत काळ ॥ लघुशंका करून आला नळ ॥
पादक्षालन न करितां उतावेळ ॥ संध्यावंदना बैसला ॥ ११४ ॥
इतुकें उणें देखतां जाण ॥ कलीनें मांडिलें विंदाण ॥
दायाद एक आला दुरोन ॥ पुष्कर नाम तयाचें ॥ ११५ ॥
तयासी कलि म्हणत ॥ नळाशीं तूं खेळे द्यूत ॥
द्वापार कपटअक्ष सत्य ॥ वृषभ तेथें होईन मी ॥ ११६ ॥
पुष्कर म्हणे वित्त नाहीं मज ॥ केविं नळाशीं खेळूं पैज ॥
कलि म्हणे तूं होय सतेज ॥ पाठ तुझी राखितों मी ॥ ११७ ॥
पन्नास वृषभ उभे करीं तत्त्वतां ॥ सर्व राज्य येईल तुझ्या हाता ॥
नैषधास दवडोनि दिगंता ॥ दरिद्रव्यथा पाववूं ॥ ११८ ॥
कक्षेस अक्ष घेऊन सत्वर ॥ नलरायास भेटला पुष्कर ॥
म्हणे माझीं ही पन्नास ढोर ॥ उभीं करितों खेळ तूं ॥ ११९ ॥
मज हारी येतां ढोरे घेई ॥ तुज म्यां जिकिल्या राज्य देईं ॥
मग राज्य पदार्थ सर्वही ॥ हिरोनि नेले पुष्करें ॥ १२० ॥
वाजी वारण पदाति रथ ॥ कोश देश गड दुर्ग अमित ॥
पुष्करें जिंकिले समस्त ॥ चिंताग्रस्त लोक जाहले ॥ १२१ ॥
समस्त प्रजा मिळोन ॥ नळास विनविती कर जोडून ॥
कपटद्यूत हें माजवून ॥ सर्वथाही खेळों नको ॥ १२२ ॥
कलीनें व्यापिलें नळाचे मन ॥ प्रजांस नेदी प्रतिवचन ॥
दमयंती समीप येऊन ॥ नृपालागीं विनवित ॥ १२३ ॥
म्हणे सकलनृपचक्रचूडामणी ॥ अमात्य विनविती कर जोडूनी ॥
पौरलोक व्याकुल मनीं ॥ न पाहसी कां नृपोत्तमा ॥ १२४ ॥
सर्वथा न बोले नृपनाथ ॥ पणामागें पण हरत ॥
मग वार्ष्णेय सारथि सत्य ॥ बोलावित दमयंती ॥ १२५ ॥
म्हणे वेगें सिद्ध करीं स्यंदन ॥ इंद्रसेनी आणि इंद्रसेन ॥
दोन्हीं बालकें नेऊन ॥ भीमकापाशीं घालावीं ॥ १२६ ॥
नैषधें हरविलें सर्व ॥ आम्हांस जगती नेदी ठाव ॥
बुडालें राज्यवैभव ॥ घोर कर्म ओढवलें ॥ १२७ ॥
तें वार्ष्णेयें ऐकोन ॥ दोन्हीं बाळकें रथीं बैसवून ॥
विदर्भदेशासी नेऊन ॥ घालविलीं अति त्वरें ॥ १२८ ॥
वर्तमान ऐकोन सर्व ॥ शोकाकुलित भीमकराव ॥
म्हणे विनाशकालीं बुद्धीचें वैभव ॥ विपरीत जाहलें नळाचें ॥ १२९ ॥
यावरी वार्ष्णेय सारथी ॥ ऋतुपर्ण अयोध्येचा नृपती ॥
सेवा अंगीकारूनि निश्चिती ॥ राहिला तो प्रस्तुत तेथें ॥ १३० ॥
इकडे पुष्कर सर्व हिरोन ॥ नैषधाप्रति बोले वचन ॥
घालीं दमयंतीचा पण ॥ नळ ऐकोनि उगाची ॥ १३१ ॥
मग दोघांचीं भूषणें वस्त्रें ॥ हिरोनि घेतलीं पुष्करें ॥
म्हणे राज्यातून त्वरें ॥ उठा जा तुम्ही आताची ॥ १३२ ॥
पुष्करें धांडोरा पिटोन ॥ आज्ञापिले नगरजन ॥
जो नळाशीं करील भाषण ॥ त्यास दंडीन क्षणार्धें ॥ १३३ ॥
नगराबाहेर तीन दिन ॥ राहती निराहार दीनवदन ॥
द्वारीं उभे राहूं न देती जन ॥ बोलूं वचन न शकती ॥ १३४ ॥
एक एक वसनवेष्टित ॥ अंग उघडें केश मुक्त ॥
प्राण क्षुधेने व्याकुल होत ॥ वनांतरीं प्रवेशती ॥ १३५ ॥
तो देखिले शकुंत ॥ नैषध त्यांसी धरू धांवत ॥
तंव ते दूर दूर पळत ॥ नैषध टाकित वस्त्र वरी ॥ १३६ ॥
अर्ध टाकिलें वसन ॥ पक्षी अवघे उडाले घेऊन ॥
नैषध जाहला तेव्हां दीनवदन ॥ पक्षी वचन बोलती ॥ १३७ ॥
आम्ही पुष्कराचे अक्ष जाण ॥ घेऊन जातों तुझें वसन ॥
एवं नळास नारायण ॥ पाठमोरा जाहला ॥ १३८ ॥
असो नैषधराज नग्न ॥ क्षुधातुर अत्यंत दीन ॥
तो कलि होऊनि मीन ॥ जलाबाहेर पडियेला ॥ १३९ ॥
तो मत्स्य मारूनि त्वरित ॥ वैदर्भीपाशीं नळ देत ॥
म्हणे हा मत्स्य पचवूनि त्वरित ॥ पाक करीं वरानने ॥ १४० ॥
क्षुधेनें जाताती प्राण ॥ दमयंतीनें भाजिला मीन ॥
जलासमीप धुवावया लागून ॥ मृगशावाक्षी बैसली ॥ १४१ ॥
मत्स्यमुखीं घालोनि अंगुळी ॥ दुर्गंधि धूत वैदर्भबाळी ॥
अमृत स्रवतां तत्काळीं ॥ मीन सजीव जाहला ॥ १४२ ॥
न लागतां एक क्षण ॥ अगाध जीवनीं पळाला मीन ॥
देखोनि वीरसेननंदन ॥ परम क्षोभ पावला ॥ १४३ ॥
म्हणे क्षुधेनें जाती माझे प्राण ॥ नष्टे कैसा हरविला मीन ॥
मग म्हणे हा विंध्याद्रि ओलांडून ॥ जाईं आपुल्या माहेरा ॥ १४४ ॥
वैदर्भी बोले वचना ॥ म्हणे राजेंद्रचक्रमुकुटरत्ना ॥
चारुगात्रा विशालनयना ॥ गुणनिधाना मम प्रिया ॥ १४५ ॥
हें शरीर आणि प्राण ॥ ओवाळीन तुजवरून ॥
तव वदनसरोजीं माझे नयन ॥ मिलिंद होऊन लुब्धले ॥ १४६ ॥
तुज दुःखसमुद्रीं लोटून ॥ जरी जाऊं इच्छी माझें मन ॥
तरी हे रसना झडोन ॥ कीटक पडोत आतांची ॥ १४७ ॥
पाहतां तव वदनसुधाकर ॥ नृत्य करी मम मानसचकोर ॥
क्षणभरी न देखतां वक्त्र ॥ वाटे नेत्र उन्मळती ॥ १४८ ॥
प्राणपतीचें भाग्य पाहूनी ॥ प्रीति करिती सर्व नितंबिनी ॥
भ्रतार दुःखी दृष्टीं देखोनी ॥ जाती पापिणी टाकूनियां ॥ १४९ ॥
मी वैदर्भराजनंदिनी ॥ मज प्रसवली नाहीं ऐशी जननी ॥
तुज सांडोनि घोर विपिनीं ॥ मी न जाई जनकगृहा ॥ १५० ॥
अवंचक स्त्री मुख्यप्रधान ॥ होय मित्रांमाजी चूडारत्न ॥
सुखदुःखांची भागीण ॥ सांगातीण अंतकाळीं ॥ १५१ ॥
ऐकोनि पद्माक्षीच्या निर्धारा ॥ नलनेत्रीं आल्या अश्रुधारा ॥
परि कलीच्या गति विचित्रा ॥ वियोग पाडिला क्षणार्धें ॥ १५२ ॥
वैदर्भी म्हणे कमलेक्षणा ॥ मज मार्ग कां दाविसी क्षणक्षणां ॥
तरी जाऊं चला वैदर्भदर्शना ॥ राज्य सर्व ओपील तूतें ॥ १५३ ॥
नैषध म्हणे अवदशा घेऊन ॥ केविं तव जनका दाऊं वदन ॥
हें न घडे मजपासून ॥ कल्पांतींही सुलक्षणे ॥ १५४ ॥
क्षुधें उष्णें कष्टलों बहुत ॥ जलीं मत्स्य भाजला गेला सत्य ॥
पवन पक्षी वस्त्र हिरोनि नेत ॥ अर्घ दिधलें नेसावया ॥ १५५ ॥
अस्ता गेला वासरमणी ॥ पुढें शून्यमाळा देखिली नयनीं ॥
दोघें पहुडलीं तये स्थानीं ॥ अंगास धरणी खुपतसे ॥ १५६ ॥
दुःखें निद्रा आली दमयंतीप्रती ॥ नैषध जागा विचारी चित्तीं ॥
पाहुनियां वैदर्भीप्रती ॥ म्हणे मरण मज कां नये ॥ १५७ ॥
हे सकल प्रमदाची ईश्वरी ॥ इची प्रतिमा नाहीं उर्वीवरी ॥
अहा वैदर्भराजकुमारी ॥ धरणीवरी पडियेली ॥ १५८ ॥
जिचे अंगींचा परम सुवास ॥ तिचे धुळींत लोळती केश ॥
हे हृषीकेश व्योमकेश ॥ काय दुःख पाहतां हें ॥ १५९ ॥
मनीं विचारी वीरसेननंदन ॥ जाऊं इचा त्याग करून ॥
इचें दुःख माझे नयन ॥ शक्य न होती देखावया ॥ १६० ॥
हे पतिव्रतांत शिरोरत्न ॥ कोणी पुरुष करितां प्रयत्न ॥
दृष्टीनें टाकील भक्ष्य करून ॥ नलगे रक्षण दुजें कांहीं ॥ १६१ ॥
तों कलीनें ते अवसरीं ॥ नळापुढें टाकिली सुरी ॥
अर्धवस्त्र छेदोनि निर्धारीं ॥ नळ तेथूनि निघाला ॥ १६२ ॥
शतपदे गेला ते अवसरीं ॥ गहिंवर दाटला अंतरीं ॥
परतोन पाहे राजकुमारी ॥ अनाथापरी पडलीसे ॥ १६३ ॥
क्षणक्षणां येत परतोनी ॥ अश्रुजीवनीं भिजे धरणी ॥
म्हणे अन्याय नसतां ये वनीं ॥ कैशी त्यागूं इयेतें ॥ १६४ ॥
जिच्या अंगुष्ठावरून ॥ सांडणे करावा मीनकेतन ॥
जिचें वदनांबुज पाहोन ॥ रंभा उर्वशी लज्जित ॥ १६५ ॥
स्वप्नांतही हे नसे त्याज्य ॥ देखिला नाहीं तसा अन्याय ॥
जागृत जाहल्या करील काय ॥ प्राण देईल मजलागीं ॥ १६६ ॥
पृथ्वी आप अनल अनिल गगन ॥ यांस नळ प्रार्थी कर जोडोन ॥
वृकव्याघ्रादि प्राणी दारुण ॥ करा रक्षण इयेचें ॥ १६७ ॥
मग कठिण करून मन ॥ प्रवेशला घोर विपिन ॥
आठवूनि वैदर्भीचे गुण ॥ करी रोदन राव तो ॥ १६८ ॥
दमयंती जागी होत ॥ घाबरेपणें पाहे कांत ॥
तो अर्धवस्त्र छेदून त्वरित ॥ टाकून गेला घोरवना ॥ १६९ ॥
वक्षःस्थल बडवून ॥ भूमीस पडे मूर्च्छा येऊन ॥
नैषधा नैषधा म्हणोन ॥ रानोरान हिंडतसे ॥ १७० ॥
लोभियांचें जैसें धन ॥ तस्करीं नेले हिरोन ॥
तैशी वैदर्भी नाम घेऊन ॥ रजनीमाजी वनीं धांवे ॥ १७१ ॥
अहा पुण्यश्लोका नलराया ॥ मी मुक्तकेशीं झाडीन तुझे पायां ॥
तुजवरून माझी काया ॥ कुरवंडी करीन आतांची ॥ १७२ ॥
हे नैषधा गुणसमुद्रा ॥ कीं विनोद करिसी राजेंद्रा ॥
जवळी असोन अति उदार ॥ प्रत्युत्तर न देसी ॥ १७३ ॥
चरणीं चालतां श्रमली बहुत ॥ मूर्च्छना येऊन वाटे पडत ॥
म्हणे हा नाथ हा नाथ ॥ म्हणोन धांवत चहूंकडे ॥ १७४ ॥
आंधळें सोडोनि वनांतरीं ॥ सांगाती गेला दुरीच्या दूरी ॥
तीच दमयंतीची परी ॥ अंत नाहीं शोकातें ॥ १७५ ॥
तिचे सुकुमार चरण ॥ रुतती खडे कंटक तीक्ष्ण ॥
वैदर्भीची करुणा देखोन ॥ वृक्ष पक्षी गहिंरती ॥ १७६ ॥
वैरभाव टाकोनी ॥ सकल श्वापदें रडती ते क्षणीं ॥
सव्यापसव्य जाय घोरकाननीं ॥ मार्ग कोठे दिसेना ॥ १७७ ॥
वनीं हिंडतां वैदर्भबाळी ॥ अजगरें अकस्मात गिळिली ॥
नलराया धांव धांव ये वेळीं ॥ अजगरें ग्रासिलीं तव प्रिया ॥ १७८ ॥
कर्णीं ऐकतां करुणास्वर ॥ व्याध एक धांवला सत्वर ॥
तेणें शस्त्रे फाडोनि अजगर ॥ लावण्यगंगा सोडविली ॥ १७९ ॥
व्याधें प्रक्षालून केलें सावधान ॥ म्हणे पद्याक्षी तूं आहेस कोण ॥
भैमीनें सांगितलें वर्तमान ॥ पूर्वीहून वर्तलें जें ॥ १८० ॥
देखोनि सौंदर्य अपार ॥ व्याध जाहला कामातुर ॥
आलिंगन द्यावयास सत्वर ॥ सरसावला पापी तो ॥ १८१ ॥
मरण विसरून पतंग ॥ दीपास चुंबुं धांवे सवेग ॥
कीं राजहंसास काग ॥ स्पर्शावया धावला ॥ १८२ ॥
असो वैदर्भीने क्षोभून परम ॥ व्याल तत्काल केला भस्म ॥
जैसा पंचाननापुढें काम ॥ गेला दग्ध होऊनि ॥ १८३ ॥
असो त्या घोर अरण्यांत ॥ दमयंती नल नाम घेत जात ॥
श्वापदें होती भयभीत ॥ स्वरूप देखतां भैमीचें ॥ १८४ ॥
अर्धवस्त्र जात नेसोनी ॥ मुक्तकेशा पद्यनयनी ॥
श्वापदांप्रति पुसे वनीं ॥ नळ देखिला काय सांगा ॥ १८५ ॥
मज कां नयेचि मरण ॥ श्वापद हो भक्षा मजलागून ॥
हे विंध्याचल बोल वचन ॥ नलराव कोठे आहे पां ॥ १८६ ॥
उत्तरपंथें जात दमयंती ॥ तो देखिल्या तापसपंक्ती ॥
जितेद्रिय तपश्चर्या करिती ॥ पुसे त्यांप्रति कोमलांगी ॥ १८७ ॥
तापसी म्हणती हे कोण मंगळा ॥ आमची तपश्चर्या आली फळा ॥
कीं प्रणवरूपिणी वेल्हाळा ॥ महामाया आदिशक्ती ॥ १८८ ॥
कीं हे साक्षात् अपर्णा ॥ कीं पद्यजातजनकाची ललना ॥
कीं प्रत्यक्ष हे मित्रकन्या ॥ प्रसन्न व्हावया उतरली ॥ १८९ ॥
कीं नळाची दमयंती ॥ जीस बहु काव्यकर्ते वर्णिती ॥
तो समीप येऊन जाहली पुसती ॥ देखिला नृपति नळ काय ॥ १९० ॥
कष्टी देखोनि अपार ॥ गहिंवरें दाटले वसुधामर ॥
म्हणती सौभाग्यसरिते तुझा प्राणेश्वर ॥ तुज सत्वर भेटेल हो ॥ १९१ ॥
बालपद्मदलनयनी ॥ गेली विंध्याद्रि ओलांडूनी ॥
पुढें नदीतीरीं देखिले ते क्षणीं ॥ सौदागर उतरले ॥ १९२ ॥
वणिक्पति मुख्य देख ॥ त्याचें नाम सार्थवाहक ॥
तो सर्व वस्तुंचा रक्षक ॥ गज तुरंग रथादि ॥ १९३ ॥
त्यांची धरून संगती ॥ रजनी क्रमीत दमयंती ॥
तो वनींचे निरंकुशहस्ती ॥ उदकप्राशना तेथें आले ॥ १ ए ४ ॥
मत्तइभ नाटोपती कोणा ॥ मारीत चालिले वणिक्सेना ॥
अंधारी व्यक्त न दिसती कोणा ॥ महाप्रलय वर्तला ॥ १९५ ॥
ठाव नेदी कोठें क्षिती ॥ महावनीं प्रवेशे दमयंती ॥
असो उगवला गभस्ती ॥ वणिक् किंचित उरले पैं ॥ १९६ ॥
त्यांचे संगतीं सुंदरी ॥ पावली चैद्यवसूची पुरी ॥
नगरांत जातां झडकरी ॥ लोक अपार मिळाले ॥ १९७ ॥
तेथें राजा सुबाहु थोर ॥ त्याचे मातेनें लक्षिली सुंदर ॥
धात्री पाठवूनि सत्वर ॥ उपरीवरी नेली ते ॥ १९८ ॥
राजमाता पुसे प्रीतीनें ॥ तूं कोणाची सांग मृगलोचने ॥
अमरप्रभे सुहास्यवदने ॥ जाहलें येणें कोठोनि ॥ १९९ ॥
मग वैदर्भी तेव्हां बोलत ॥ असंख्यलक्षणी माझा कांत ॥
कर्मभोगें जाहलें विपरीत ॥ आलें हिंडत अर्धवस्त्रीं ॥ २०० ॥
मग बोले राजमाता ॥ मी शोधून आणीन तुझ्या कांता ॥
अथवा तोचि येईल तत्त्वतां ॥ तुजकारणें शोधित ॥ २०१ ॥
तुज देखोनि माये ॥ मज बहु स्नेह उपजला आहे ॥
तूं मजपाशीं सदा राहें ॥ कन्या माझी होय तूं ॥ २०२ ॥
दमयंती बोले वचन ॥ न करीं मी कोणाचें उच्छिष्टभोजन ॥
अथवा पादप्रक्षालन ॥ न करीं भाषण कोणाशी ॥ २०३ ॥
पति आणिशी शोधून ॥ तरी मी तुजपाशी राहीन ॥
राजमातेनें भाक देऊन ॥ कन्या म्हणोनि ठेविली ॥ २०४ ॥
सुनंदानामें कन्या जाण ॥ भैमी जाहली तिची सांगातीण ॥
असो इकडे नळ घोरकानन ॥ हिंडतसे अति शोकें ॥ २०५ ॥
तो अद्भुत देखिला दावानळ ॥ आकाशपंथें चालली ज्वाळ ॥
नळा धांव धांव तत्काळ ॥ कर्णी ध्वनि ऐकिली ॥ २०६ ॥
नळ जवळी आला धांवत ॥ तों कर्कोटक बैसला कुंडलवत ॥
म्हणे राया वणवा अद्भुत ॥ काढीं मज येथोनि ॥ २०७ ॥
मी पूर्वी बहुत उन्मत्त ॥ सर्वथा मी निंदीं साधुभक्त ॥
नारदें शापिलें यथार्थ ॥ कर्कोटकदेह पावसी ॥ २०८ ॥
मग मीं करोनि म्लानवदन ॥ धरिले नारदस्वामीचे चरण ॥
नारदासी स्नेह दाटला पूर्ण ॥ काय वचन बोलत ॥ २०९ ॥
मग उःशाप बोलिला तत्काल ॥ तुज वनीं उद्धरील नल ॥
तरी माझेनें न घालवे पाऊल ॥ काढून घेईं मज आतां ॥ २१० ॥
कर्कोटक जाहला लहान ॥ नळे खांदां घेतला उचलोन ॥
वणव्याबाहेर नेऊन ॥ ठेविता जाहला तेधवां ॥ २११ ॥
तो कर्कोटकें हस्तास दंश केला ॥ विषानलें नळ काळा जाहला ॥
कर्कोटक म्हणे राजा नला ॥ चिंता कांहीं करूं नको ॥ २१२ ॥
म्यां तुझें रूप झांकिलें निःशेष ॥ तुज न बाधी दुसरें विष ॥
कार्य जाहलिया निःशेष ॥ पूर्ववत् होशील तूं ॥ २१३ ॥
कर्कोटकें दिधलें दिव्य वसन ॥ हें नैषधा करीं जतन ॥
माझें करून स्मरण ॥ शेवटीं हें पांघुरें ॥ २१४ ॥
तेणें पूर्वस्वरूप होशील ॥ भेटेल दमयंती वेल्हाळ ॥
स्वराज्यास पावशील ॥ पुण्यश्लोका नलराया ॥ २१५ ॥
ऐसें तो नाग बोलोन ॥ तत्काल पावला अंतर्धान ॥
मग नलराय अयोध्येस जाऊन ॥ ऋतुपर्णरायासी भेटला ॥ २१६ ॥
ऋतुपर्ण पुसे तूं कोण ॥ येरू म्हणे मी बाहुकाभिधान ॥
अश्वसारथ्यगतिलक्षण ॥ जाणतसें सर्वही ॥ २१७ ॥
ठाऊक आहे सूपशास्त्र ॥ अन्ने करीन चित्रविचित्र ॥
ऋतुपर्णे संतोषोनि अपार ॥ अश्वशिक्षे ठेविला ॥ २१८ ॥
वार्ष्णेय सारथि आहे ॥ परी तूं सर्वांहूनि श्रेष्ठ होये ॥
असो बाहुक राहिला पाहें ॥ सेवा करून रायाची ॥ २१९ ॥
विकले होऊन रजनीमाझारी ॥ दमयंतीलागीं विलाप करी ॥
अहा प्राणवल्लभे सुंदरी ॥ कोणीकडे गेलीस ॥ २२० ॥
तो जीवलनामें राजसेवक जाण ॥ बाहुकास पुसे वर्तमान ॥
रात्रीं विलाप करिसी दारुण ॥ तें कारण सांग पां ॥ २२१ ॥
बाहुक म्हणे ते क्षणीं ॥ कोणीएक मंदबुद्धि प्राणी ॥
दिव्यस्त्री सांडोनि वनीं ॥ आतां मनीं झुरतसे ॥ २२२ ॥
निरपराध स्त्री निर्मल ॥ सौंदर्यसमुद्रींचें मुक्ताफल ॥
श्रृंगारवैरागरीचें तेजाळ ॥ दिव्यरत्न त्यागिलें ॥ २२३ ॥
ऐशी सांडोनि सुंदरी ॥ आतां मूर्ख तो शोक करी ॥
त्याची रीति ये अवसरीं ॥ मी सहज दावितों ॥ २२४ ॥
इकडे वैदर्भींची बाळे पाहून ॥ भीमकराजा शोकें क्षीण ॥
शोधावया ब्राह्मण ॥ पृथ्वीवरी पाठविले ॥ २२५ ॥
जामात आणि कन्यारत्न ॥ ठायीं पाडील जो ब्राह्मण ॥
त्यासी अलंकार सहस्त्रगोदान ॥ देईन जाण मागेल तें ॥ २२६ ॥
छप्पन्न देशांमाजी जाण ॥ साक्षेपें शोधिती ब्राह्मण ॥
त्यांत सुदेव ज्याचे अभिधान ॥ चैद्यवसुपुरीं आला तो ॥ २२७ ॥
तेणें दमयंती देखिली ॥ जैसी राहूनें चंद्रप्रभा ग्रासिली ॥
कीं दिव्यप्रवालवल्ली ॥ दग्ध जाहली अग्नींत ॥ २२८ ॥
पंकें माखिलें मुक्ताफळ ॥ तैशी झांकिली ते वेल्हाळ ॥
तो सुदेव देखतां तत्काळ ॥ रडों लागली वैदर्भी ॥ २२९ ॥
शोकार्णवीं भैमी पडली ॥ देखोन सुनंदा सद्गद जाहली ॥
राजमाता जवळी आली ॥ पुसों लागली विप्रातें ॥ २३० ॥
सुदेव सांगत तिजप्रती ॥ तुझे भगिनीची कन्या हे दमयंती ॥
वनीं सांडोनि गेला पती ॥ इची गति हे जाहली ॥ २३१ ॥
ही सकल प्रमदांची स्वामिणी ॥ कपाळी अक्षय्य रत्नमणी ॥
सुनंदा कपाळ धुवोनी ॥ पाहती जाहली तेधवां ॥ २३२ ॥
तो भाळी रत्नमणि झळाळी ॥ राजमाता कंठीं मिठी घाली ॥
म्हणे म्यां नाहीं ओळखिली ॥ भगिनीकन्या माझी हे ॥ २३३ ॥
अहा अन्याय जाहला प्रबळ ॥ नोळखे भगिनीकन्या वेल्हाळ ॥
जैसें जवळी असोनि मुक्ताफळ ॥ अंधाप्रति दिसेना ॥ २३४ ॥
दमयंती बोले वचन ॥ माते मी पितृगृहास जाईन ॥
संगे देऊन अपार सैन्य ॥ वैदर्भपुरा पाठविली ॥ २३५ ॥
दृष्टीं न पडता भ्रतार ॥ नेघेचि वस्त्रें अलंकार ॥
वहनीं बैसवूनि सुंदर ॥ निजमाहेरा पाठविली ॥ २३६ ॥
दृष्टीं देखतां दमयंती ॥ माता पिता वेगें भेटती ॥
बाळे येऊन गळां पडती ॥ नाहीं अंत शोकातें ॥ २३७ ॥
सुदेव शांतवी समस्तां ॥ आतां कां शोक करितां वृथा ॥
नळ शोधावा तत्त्वतां ॥ अवनीमाजी यावरी ॥ २३८ ॥
मग सुदेवास सहस्त्रगोदान ॥ पूजिला अलंकार देऊन ॥
वैदर्भ म्हणे वीरसेननंदन ॥ शोधी आतां सत्वर ॥ २३९ ॥
माझें वनीं हरपलें दिव्यरत्न‘ ॥ जो कोणी देईल आणून ॥
त्यास मी दिव्यवस्त्रालंकारीं पूजीन ॥ सुरभि देईन सहस्रवरी ॥ २४० ॥
असो ग्राम घोषपुरें पट्टणें ॥ द्विज शोधिती नळाकारणें ॥
देश दुर्गें कठिण स्थानें ॥ पाहती बहुत कुशलत्वें ॥ २४१ ॥
त्यांत पर्णादनामा ब्राह्मण ॥ तो आला अयोध्येहून ॥
दमयंतीतें वर्तमान ॥ सांगता जाहला तेथींचें ॥ २४२ ॥
अयोध्यानगर परम पवित्र ॥ घेतला घरोघरीं समाचार ॥
अहो दमयंती तुझें चरित्र ॥ जाहलें तें सर्व कथियेलें ॥ २४३ ॥
सर्व पुरुषां ऐकविलें कर्णीं ॥ प्रत्युत्तर न देती कोणी ॥
परी राजसारथि ऐकोनी ॥ साक्षेपें जवळी पातला ॥ २४४ ॥
तयाचें नाम बाहुक ॥ तेणें तुझ्या गोष्टी ऐकोनि देख ॥
करिता जाहला अपार शोक ॥ न कळत कोणातें ॥ २४५ ॥
म्हणे अहा दमयंती राणी ॥ निरपराध त्यागिली कामिनी ॥
प्राणवल्लभा कोणे वनीं ॥ रडत फिरत असेल ॥ २४६ ॥
अहा प्रिये गुणभरिते ॥ गुणगंभीरे सौभाग्यसरिते ॥
पतिमानसकल्पलते ॥ पतिव्रते धन्य तूं ॥ २४७ ॥
कुलवंत कामिनी शुद्ध ॥ जरी जाहला पतीचा अपराध ॥
तरी न धरिती हृदयीं खेद ॥ कांहीं शब्द न ठेविती ॥ २४८ ॥
पर्णादें सांगतां वर्तमान ॥ भैमीनें त्यास गौरवून ॥
मग पाठविला सुदेव ब्राह्मण ॥ अयोध्येसी तेधवां ॥ २४९ ॥
विप्र ज्ञानी परम चतुर ॥ ऋतुपर्णास भेटला सत्वर ॥
दमयंतीने सांगितला विचार ॥ तोचि त्यासी कथियेला ॥ २५० ॥
म्हणे दमयंतीचें स्वयंवर पूर्ण ॥ पुनः मांडिलें दुसरेन ॥
उदयीक प्रातःकालीं आहे लग्न ॥ नेम हाच केला असे ॥ २५१ ॥
प्रातःकालीं येईल जो भूपाळ ॥ त्यास ते घालील माळ ॥
ऋतुपर्णें तत्काळ ॥ बाहुका वर्तमान सांगितले ॥ २५२ ॥
दमयंतीचे उदयीक लग्न ॥ नैषध मनांत भावी पूर्ण ॥
मजकारणें करिते प्रयत्न ॥ गुणनिधान दमयंती ॥ २५३ ॥
बाहुक रायास बोले वचन ॥ सूर्योदय न होतो पूर्ण ॥
पांचशत योजन ॥ रथा चालवीन जाणपां ॥ २५४ ॥
मग पवनासमान तुरंग ॥ बाहुकें काढिलें सवेग ॥
रोडके देखोनि क्षीणांग ॥ ऋतुपर्ण बोलतसे ॥ २५५ ॥
म्हणे उत्तम अश्वरत्नें टाकून ॥ हे रोडके आणिले निवडून ॥
तो बाहुक बोले वचन ॥ यांची परीक्षा मी जाणें ॥ २५६ ॥
केतकीचें लघुपत्र जाण ॥ धाकटा दिसे पंचानन ॥
थोरपणासी नाहीं कारण ॥ ऐकतां ऋतुपर्ण तोषला ॥ २५७ ॥
या अश्वांचें अंतर सवेग ॥ राया कळेल क्रमितां मार्ग ॥
चिमणें रत्न सुरंग ॥ थोर पाषाण कासया ॥ २५८ ॥
मग रथीं ऋतुपर्ण बैसला ॥ घोडे जुंपिले ते वेळां ॥
वार्ष्णेयें सारथ्य केलें नळा ॥ पूर्वी जाण नेमाचें ॥ २५९ ॥
तुरंग जाती जैसे पवन ॥ परम संतोषला ऋतुपर्ण ॥
म्हणे अश्वज्ञानी निपुण ॥ मातलि किंवा नळ एक ॥ २६० ॥
मातली ऐसे याचे गुण ॥ परि शरीर दिसे विवर्ण ॥
तों उत्तरीय वस्त्र पडलें गळोन ॥ घे घे म्हणोन राव बोले ॥ २६१ ॥
तों बाहुक बोले वचन ॥ द्वादश योजनीं राहिलें वसन ॥
तो बिभीतकवृक्ष देखोन ॥ ऋतुपर्ण बोलत ॥ २६२ ॥
या वृक्षास फळें पर्णे किती ॥ बाहुका तुज सांगेन गणती ॥
स्थिर करून रथगती ॥ कौतुकें नृप बोलतसे ॥ २६३ ॥
बाहुकें उतरून रथातळीं ॥ फळें पर्णे सर्व मोजिलीं ॥
सांगितलीं तितुकींच भरलीं ॥ परमाश्चर्य करीत तो ॥ २६४ ॥
मग संख्येची विद्या संपूर्ण ॥ दुसरें अक्षहृदयज्ञान ॥
दोन विद्या ऋतुपर्ण ॥ बाहुकास समर्पी ॥ २६५ ॥
अश्वशिक्षापरीक्षाज्ञान ॥ बाहुकापाशीं शिके ऋतुपर्ण ॥
विद्येनें विद्या संपूर्ण ॥ सफळ जाहली दोघांतें ॥ २६६ ॥
बाहुकें अक्षविद्या जाणतां ॥ हृदयांतून कलि निघाला अवचिता ॥
नळाचे चरणीं ठेविा माथा ॥ बोलता जाहला मूर्तिमंत ॥ २६७ ॥
म्हणे म्यां तुज छळिलें बहुत ॥ हें जो चरित्र श्रवण करित ॥
त्यास मी पीडीना यथार्थ ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥ २६८ ॥
मग बिभीतकाच्या वृक्षांत तत्काल ॥ प्रवेशला तो कलि खल ॥
म्हणोनि बिभीतकवृक्ष अमंगळ ॥ छायेसमीप न बैसावें ॥ २६९ ॥
ऐसे वार्ष्णेय बाहुक ऋतुपर्ण ॥ तिघे रथारूढ होऊन ॥
वैदर्भपुरीं पाहती येऊन ॥ तों तेथें कांहीं दिसेना ॥ २७० ॥
न दिसे कांहीं स्वयंवराची स्थिती ॥ कोणी नाहींत भूपती ॥
ऋतुपर्ण तेव्हां चित्तीं ॥ परम लज्जित जाहला ॥ २७१ ॥
तो भैमीप्रति शकुन ॥ जाणविती शुभचिन्ह ॥
मग उपरीवरी चढोन ॥ रथगति परीक्षी ॥ २७२ ॥
म्हणे हे रथगति जाणा ॥ नळाविण न ये कोणा ॥
असो भीमक ऋतुपर्णा ॥ भेटता जाहला येऊनि ॥ २७३ ॥
भीमकें गृहास नेऊन ॥ आदरें पूजिला ऋतुपर्ण ॥
म्हणे कां जाहलें आगमन ॥ काय कारण कल्पिलें ॥ २७४ ॥
मग अयोध्यापति बोले वचना ॥ सहज आलों तुमच्या दर्शना ॥
राये देऊन उत्तम सदना ॥ उपचार सर्व पाठविले ॥ २७५ ॥
रथशाळेस बाहुक जाण ॥ राहता जाहला जाऊन ॥
तुरंग सेवा करून ॥ यथोपचारें तोषविले ॥ २७६ ॥
मग यावरी दमयंती ॥ पाठवी केशिनीनामें दूती ॥
म्हणे परीक्षा करून बहुरीतीं ॥ येई पाहून कोण तो ॥ २७७ ॥
तो केशिनी चतुर येऊनी ॥ पुसत बाहुकालागूनी ॥
काय कारण कल्पुनी ॥ तुम्ही येथें पातलां ॥ २७८ ॥
तो म्हणे दमयंतीचें स्वयंवर ॥ बोलिला येऊन सुदेव विप्र ॥
म्हणोनि अयोध्येचा नृपवर ॥ ऋतुपर्ण येथें पातला ॥ २७९ ॥
मी त्याचा सारथि बाहुक ॥ वार्ष्णेय नलसारथि देख ॥
केशिनी पुसे नैषध सम्यक ॥ कोठे आहे सांग पां ॥ २८० ॥
बाहुक म्हणे नेणवे कांहीं ॥ गुप्त राहिला कोणे ठायीं ॥
काया पालटोनि महीं ॥ कोठे हिंडतो कळेना ॥ २८१ ॥
केशिनी माघारीं येऊन ॥ दमयंतीस सांगे वर्तमान ॥
नेसला आहे अर्धवसन ॥ परी काय जाण ते नव्हे ॥ २८२ ॥
त्याची पाहतां वर्तणूक ॥ नळाऐशी दिसे सम्यक ॥
सत्कर्माचरण सद्विवेक ॥ नैषधाऐसा दिसतो पैं ॥ २८३ ॥
वैदर्भी म्हणे जाऊन ॥ आणीक पाहें सर्व चिन्ह ॥
देऊं नको उदक अग्न ॥ लेकरें घेऊन जाई तेथें ॥ २८४ ॥
मग दोन्हीं बाळें घेऊनी ॥ त्यापाशी गेली ते क्षणीं ॥
बाळें दृष्टीं देखोनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥ २८५ ॥
दोघें आलिंगूनि हृदयीं ॥ खेद करी त्या मिति नाहीं ॥
मग तीं बाळे ठेवूनि महीं ॥ केशिनीशीं बोलत ॥ २८६ ॥
माझीं बाळें ऐशीच घरीं ॥ मज अंतरलीं बहु दूरी ॥
यांस देखोनि अंतरीं ॥ गहिवर मज दाटला ॥ २८७ ॥
यावरी केशिनी पाहे चिन्ह ॥ येतां जातां द्वारांतून ॥
खालतीं न करी मान ॥ होऊन वामन जातसे ॥ २८८ ॥
रिता कुंभ ठेविला ॥ तो दृष्टीनें पाहतांच भरला ॥
तृण फुंकितां ते वेळां ॥ अग्नि प्रकटला तत्काळ ॥ २८९ ॥
अग्नीवरी पडतां वस्त्र ॥ न जळेचि कांहीं अणुमात्र ॥
सुमनें चोळिलीं विचित्र ॥ सवेंचि मागुति टवटवती ॥ २९० ॥
केशिनीनें येऊन ॥ सर्व कथिलें वर्तमान ॥
भैमी म्हणे वीरसेन- ॥ सुत होय निश्चयेशी ॥ २९१ ॥
मातापितयांस पाठवी सांगोनी ॥ मी बाहुकास पाहूं काय नयनीं ॥
राये बाहुकास बोलावूनी ॥ भैमीकडे पाठविला ॥ २९२ ॥
मुक्तकेशा अर्धवस्त्रीं ॥ बाहुकें भैमी देखिली नेत्रीं ॥
खालीं पाहोनि शोक करी ॥ शब्द बाहेर फुटेना ॥ २९३ ॥
नेत्रांस वस्त्र लावून ॥ दमयंती करी रोदन ॥
म्हणे हे उमारमण रमारमण ॥ नल रूप प्रकटवो ॥ २९४ ॥
तो अंतरिक्षवाणी बोलत ॥ नलराया पाहूं नको अंत ॥
आपुलें स्वरूप पुण्यवंत ॥ प्रकट करीं एधवां ॥ २९५ ॥
करून कर्कोटकस्मरण ॥ नळ पांघुरला प्रसादवसन ॥
बालसूर्यासमान ॥ पूर्वरूप प्रकटलें ॥ २९६ ॥
मग दमयंती धांवोन ॥ दृढ धरी नळाचे चरण ॥
कंठीं मिठी घालून ॥ पूर्वदुःख आठवलें ॥ २९७ ॥
वृंदारक पुष्यसंभार ॥ वर्षती तेव्हां वारंवार ॥
भीमक धावला सत्वर ॥ वाद्यगजर जाहले ॥ २९८ ॥
भीमक आणि नैषधपती ॥ सप्रेम एकमेकांस आलिंगिती ॥
ऋतुपर्णे धांवूनि प्रीतीं ॥ नैषधास वंदिलें ॥ २९९ ॥
जोडोनियां दोन्ही कर ॥ म्हणे माझे अपराध थोर ॥
नेणोनि घडले साचार ॥ ते समग्र क्षमा करीं ॥ ३०० ॥
नळ आणि दमयंती ॥ वस्त्रालंकारें सप्रेम पूजिती ॥
देशोदेशींचे राजे धांवती ॥ करभार घेऊनियां ॥ ३०१ ॥
आज्ञा घेऊन ऋतुपर्ण ॥ अयोध्येस गेला तेथून ॥
नैषध अपार सेना घेऊन ॥ निषधदेशाप्रति आला ॥ ३०२ ॥
पुष्करास बोलावून त्वरित ॥ म्हणे आतां खेळें द्यूत ॥
अथवा युद्ध करीं अद्भुत ॥ महानिष्ठुरा पापिष्ठा ॥ ३०३ ॥
मग नळे द्यूत खेळोन ॥ राज्य घेतलें सर्व जिंकोन ॥
पुष्करास एक ग्राम देऊन ॥ कृपा करून रक्षिला ॥ ३०४ ॥
नळ दमयंतीसमवेत ॥ सुखरूप स्वराज्यीं नांदत ॥
यथाकालीं मेघ वर्षत ॥ प्रजा समस्त सुखी बहु ॥ ३०५ ॥
हें ऐकतां नलाख्यान ॥ कलिनाशक सुखवर्धन ॥
श्रोते वक्ते कल्याण ॥ सुखरूप नांदती ॥ ३०६ ॥
बृहदश्वानामक ऋषि ॥ तेणें ही कथा सांगितली धर्मासी ॥
म्हणे तूं स्वराज्य पावसी ॥ नैषधाऐसें मागुत्यान ॥ ३०७ ॥
बृहदश्व्यानें अक्षहृदय पाहीं ॥ धर्मास शिकविलें सर्वही ॥
म्हणे आतां गजपुरा जाई ॥ जिंकून घेई राज्य सर्व ॥ ३०८ ॥
पांडवप्रताप ग्रंथ विशेष ॥ त्यांत हें नलोपाख्यान सुरस ॥
ऐकतां संतुष्ट होय मानस ॥ आसमास पुण्य जोडे ॥ ३०९ ॥
ब्रह्मानंद श्रीधर ॥ पंडितांस विनवी जोडूनि करा ॥
नलोपाख्यान वारंवार ॥ श्रवण करा आदरें ॥ ३१० ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ पंचविसाव्यांत कथियेला ॥ ११ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्वटीका श्रीधरकृत ॥
बृहदश्व्यानें धर्माप्रत ॥ नलोपाख्यान कथियेलें ॥ ३१२ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि पंचविंशोऽध्याय ॥ २५ ॥
अध्याय पंचविसावा समाप्त
GO TOP
|