श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय तेविसावा
वनवासातील सुरूवातींचे दिवस
श्रीगणेशाय नम: ॥
भव पंकजोद्भव पाकशासन ॥ सदा वंदिती ज्याचे चरण ॥
चार सहा अष्टादश गुण ॥ ज्याचे वर्णिती सर्वदा ॥ १ ॥
जो यदुकुलतिलकावतंस ॥ आनकदुंदुभिमानसहंस ॥
लीलाविग्रही आदिपुरुष ॥ देवकीतनय जगदात्मा ॥ २ ॥
नंदहृदयारविंदमिलिंद ॥ निजभक्तचित्तचातकजलद ॥
भैमीनयनाब्जानंद ॥ प्रकाशक मित्र जो ॥ ३ ॥
भवगजविदारक कंठीरव ॥ मुचुकुंदोद्धारक रमाधव ॥
कंसचाणूरमर्दक करुणार्णव॥ अभिनव जलदवर्ण जो ॥ ४ ॥
उग्रसेनमानसविषादहरण ॥ शिशुपालांतक वृष्णिकुलभूषण ॥
अनंतकल्याणदायक पीतवसन ॥ शरणागतकुलिशपंजर जो ॥ ५ ॥
जननमरणविपिनकृशान ॥ दानवकुलराशिनिकृंतन ॥
नखमुकुरी ज्याचे मीनकेतन ॥ कोट्यनुकोटि बिंबले ॥ ६ ॥
मायाचक्रचालक पुराणपुरुष ॥ लावण्यामृतसागर मनोहरवेष ॥
सच्चिदानंद पंढरीश ॥ मधुमुरनरकभंजन जो ॥ ७ ॥
जो दशावतारचरित्रचालक ॥ तो हा पांडुरंग पांडवपालक ॥
पंडुस्नुषालज्जारक्षक ॥ लीलाकौतुक दावीतसे ॥ ८ ॥
भूवैकुंठ पांडुरंगनगर ॥ चंद्रभागा मानससरोवर ॥
राजहंस तूं श्रीधर ॥ अनुदार जगदात्मा ॥ ९ ॥
जो सत्यवतीहृदयरत्न ॥ वेदाब्जविकासक चंडकिरण ॥
साठ लक्ष श्लोक जाण ॥ जेणें निर्मिले अवलीलें ॥ १० ॥
जेथें लेखक परम चतुर ॥ जाहला महाराज नरकुंजर ॥
तेथील साहित्यरस अपार ॥ मानव केवीं वर्णूं शके ॥ ११ ॥
व्यासमति महारजतपर्वत ॥ वैशंपायना लाधला किंचित ॥
त्यांतील सारांश साहित्य ॥ अलंकार प्राकृत हें ॥ १२ ॥
आदिपर्व सभापर्व पूर्ण ॥ श्रीधरमुख निमित्त करून ॥
पांडुरंग रुक्मिणीजीवन ॥ ब्रह्मानंदें वदला हो ॥ १३ ॥
मागें सभापर्व संपलें ॥ पुढें वनपर्व आरंभिलें ॥
महापापें शूद्र सकळें ॥ श्रवणमात्रें दग्ध होती ॥ १४ ॥
कीं हें वनपर्व वसंतवन ॥ सप्रेम श्रोते वृक्ष सधन ॥
नवपल्लवीं विराजमान ॥ नवविध भजनें सफलित ॥ १५ ॥
सभापर्व संपतां ॥ शेवटीं वर्णिली सुरस कथा ॥
द्रौपदी सभेसी विटंबितां ॥ जगन्निवास पावला ॥ १६ ॥
पुढें अन्योन्य खूत खेळोन ॥ वना निघाले पृथानंदन ॥
विदुर कुंतीस घेऊन ॥ गजपुराप्रति पावला ॥ १७ ॥
यावरी कैशी कथेची रचना ॥ परीक्षितिसुत पुसे वैशंपायन ॥
माझे पूर्वज गेले वना ॥ ज्ञानसंपन्ना सांग कैसे ॥ १८ ॥
वैशंपायन म्हणे कुंभिनीनायका ॥ अष्टादशपर्वांची हे नौका ॥
व्यासवंशाची सुरेखा ॥ सर्वजनां आश्रय ॥ १९ ॥
हे यष्टि धरोनि हातीं ॥ सर्वदा जे मुक्त विचरती ॥
ते अडखळोनि न पडती ॥ भवगर्तेंत तत्त्वतां ॥ २० ॥
दोषपशू श्रृंगें उभारून ॥ सर्वथा न येती चवताळोन ॥
अज्ञानरजनींत रक्षी जाण ॥ अष्टादशपर्वयष्टि हे ॥ २१ ॥
असो वना निघाले पांडुनंदन ॥ सवें कृष्णभगिनी गुणनिधान ॥
मागून आला इंद्रसेन ॥ रथ घेऊन पांचही ॥ २२ ॥
इंद्रसेनासमवेत पूर्ण ॥ सेवक आले चौदा जण ॥
स्यंदनीं आरूढले पंडुनंदन ॥ तो प्रजा धांवोनियां येती ॥ २३ ॥
गजपुरांतून प्रजांचे भार ॥ निघाले तेव्हां अपार ॥
कीं प्रजासरितांचे पूर ॥ धर्मसमुद्राप्रति पावती ॥ २४ ॥
विचार करिती प्रजा समस्त ॥ कदा न राहवे गजपुरांत ॥
अरे हे भीष्म द्रोण वृद्ध बहुत ॥ अधर्मरत सर्वही ॥ २५ ॥
कपटद्यूत निर्मून ॥ लटिकेच जिकिले पंडुनंदन ॥
दुर्योधन दुर्जन अग्न ॥ वंशकानन जाळील ॥ २६ ॥
शकुनि दुःशासन कर्ण ॥ दुर्योधनाचे दुष्ट प्रधान ॥
त्यास दुष्टबुद्धि शिकवून ॥ अधिकाधिक खवळविती ॥ २७ ॥
धर्मसमागमेंकरून ॥ सुखें सेवू आम्ही कानन ॥
ऐसें बोलत प्रजाजन ॥ धर्माकडे धांवती ॥ २८ ॥
चार्ही वर्णांच्या प्रजा ॥ येऊन नमिती धर्मराजा ॥
आम्ही तुजसवें पंडुतनुजा ॥ वनवासालागीं येऊं ॥ २९ ॥
शिल्पशास्त्रीं जे परम सुजाण ॥ सूत्रधार लोहकर्मीं निपुण ॥
कनकालंकारीं निःसीम सुज्ञान ॥ ऐसे अपार पातले ॥ ३० ॥
ताम्र घडणार चतुर ॥ पाषाणमूर्ति कोरणार ॥
रत्नपरीक्षा करणारा ॥ आले सत्वर धर्मा पाशीं ॥ ३१ ॥
वणिज नाना वस्तुरक्षक ॥ कुंभकर्ते तैलकारक ॥
रजक रंगारी गौळी सकळिक ॥ धर्मदर्शना पातले ॥ ३२ ॥
साळी माळी सोनी चतुर ॥ दुसीभुसी नापिक अपार ॥
सुगंध तैल मृगमद केशर ॥ विक्रयकार धांवती ॥ ३३ ॥
व्यापारी धनधान्यरक्षक ॥ तडिदंबरे विणते परीक्षक ॥
किरात गुरव चिकित्सक ॥ धनिक व्यवहारी धांवती ॥ ३४ ॥
कृषिकारक खनक चित्रकार ॥ मातंग चर्मक अतिशूद्र ॥
धर्मदर्शनीं प्रेमा अपार ॥ धरूनि त्वरें धांवती ॥ ३५ ॥
असो सर्व प्रजा मिळोन ॥ धर्मापुढें करिती रोदन ॥
गजपुरीं राजा दुर्योधन ॥ वास आमुचेनि न करवे ॥ ३६ ॥
वना निघतां भूमिजारमण ॥ दुःखें व्याप्त पौरजन पूर्ण ॥
कीं आनकदुंदुभीचें हृदयरत्न ॥ जातां गौळी चरफडती ॥ ३७ ॥
तैसे पांडव निघतां वनांतरीं ॥ प्रजा बुडाल्या शोकसागरीं ॥
म्हणती धर्मात्मजा अवधारीं ॥ आम्ही गजपुरीं न राहों ॥ ३८ ॥
राजा केवळ रजनीचर ॥ प्रधान ते प्रत्यक्ष व्याघ्र ॥
ग्रामसिंह सेवक समग्र ॥ तरी प्रजा केंवि नांदती ॥ ३९ ॥
प्रजा रंजवी निरंतर ॥ तोचि म्हणावा राजेश्वर ॥
अनीतिदासीचा पदर ॥ ज्यासी न लागे कालत्रयीं ॥ ४० ॥
सत्कीर्तिधर्मपत्नीशीं रत ॥ निजप्राण ऐशा प्रजा पालित ॥
अधर्मपंकें ज्याचें चित्त ॥ न मळे निर्दोष सर्वदा ॥ ४१ ॥
सुहद प्रजा आणि भूसुर ॥ ज्याचें कल्याण चिंतिती अहोरात्र ॥
उभारिला यशध्वज जेवि चंद्र ॥ शरत्कालींचा निर्मल पै ॥ ४२ ॥
जो निश्चयांबरींचा ध्रुव पूर्ण ॥ अचल न चळे सत्यवचन ॥
जेणें स्वसत्तापट्टकूल नेसवून ॥ श्रृंगारिली कुंभिनी हे ॥ ४३ ॥
साधुसंग्रह दुष्टनिग्रह साचार ॥ शरणागतां कुलिशपंजर ॥
दानशस्त्रें दुःखदरिद्र ॥ निवटी सर्व याचकांचे ॥ ४४ ॥
दानधर्माचीं ओझीं फार ॥ नेता कंटाळती याचक विप्र ॥
दानमेघवृष्टीनें निर्धार ॥ याचकधूली आर्द्र झाली ॥ ४५ ॥
हर्षांकुरें पिकली अवनी ॥ प्रजेचा आनंद न माये गगनीं ॥
राजघनवाणी ऐकतां श्रवणीं ॥ मनमयूर नाचतसे ॥ ४६ ॥
या लक्षणीं मंडित तूं पंडुनंदन ॥ आम्हांस चिंतार्णवी लोटून ॥
त्वां सेवूं आदरिलें तपोवन ॥ आम्ही तुजविण दीन दिसों ॥ ४७ ॥
कपटद्यूतमेघें थोर ॥ तूं दृष्टी न पडसी धर्मचंद्र ॥
आम्ही प्रजा आर्त चकोर ॥ चिंताग्नींत पडियेलों ॥ ४८ ॥
निष्कलंक तूं शशांक शीतल ॥ वियोगराहूमध्यें सबळ ॥
त्रयोदशवर्षी शुद्ध मंडल ॥ वदनेंदु कधीं विलोकूं ॥ ४९ ॥
कपटद्यूतकेतूनें पूर्ण ॥ धर्म झांकला चंडकिरण ॥
तेरावे वर्षी मुक्तिस्नान ॥ तोंवरि उपोषण पडियेलें ॥ ५० ॥
त्रयोदश वर्षें क्रमोनि रजनी ॥ कईं उगवेल धर्मदिनमणी ॥
पौरजनवदनकमलिनी ॥ विकासती एकदांची ॥ ५१ ॥
मेघ ओळले पंडुनंदन ॥ कपटद्यूत हा प्रभंजन ॥
दूरी नेलें झडपोन ॥ जीवनेंविण सुकलों आम्ही ॥ ५२ ॥
पांचही पांडव राजहंस ॥ सांडवूनि गजपुर सरोवरमानस ॥
पाठविले कंटकवनास ॥ द्रौपदीसहित दुष्टांनीं ॥ ५३ ॥
असो ऐसा प्रजांचा प्रेमा ॥ ऐकतो स्नेह दाटला धर्मा ॥
म्हणे घोर विपिना जाणें आम्हां ॥ येणें तुम्हां नव्हे तेथें ॥ ५४ ॥
भीष्म द्रोण विदुर ॥ वडील प्रज्ञाचक्षु राजेंद्र ॥
ग्रामांत असतां साचार ॥ तुम्हां दुःख नव्हेचि ॥ ५५ ॥
मजवरी कृपा करूनी ॥ सुखें नांदा निजसदनीं ॥
त्रयोदश वर्षें क्रमोनी ॥ तुम्हांपाशीं मी येतों ॥ ५६ ॥
भीड धर्माची गहन ॥ प्रजा न देती प्रतिवचन ॥
धर्माचे धरूनियां चरण ॥ अधोवदन स्फुंदती ॥ ५७ ॥
दीनवदन अत्यंत ॥ प्रजा प्रवेशल्या गजपुरांत ॥
शक्रप्रस्थींचे जन समस्त ॥ शोक करितचि परतले ॥ ५८ ॥
इकडे भीष्मजननीचे तीर ॥ पांडव पावले सत्वर ॥
विशाल न्यग्रोधतरुवर ॥ तयातळीं रजनी क्रमियेली ॥ ५९ ॥
साही जणीं जलाहार ॥ ते दिवशीं केला निर्धार ॥
भूमीवरी शयन साचार ॥ वरी अंबर पांघरावया ॥ ६० ॥
उदयासी आलें रविचक्र ॥ तो शकप्रस्थ आणि वारणापुर ॥
तेथींचे आले भूसुर ॥ धर्माजवळी सर्वही ॥ ६१ ॥
अग्निहोत्री याज्ञिक ॥ चहूं वेदांचे पाठक ॥
षट्शास्त्रवेत्ते देख ॥ मुखोद्गत पुराणें ॥ ६२ ॥
पुरश्चरणी अधिक ॥ सामर्थ्यें खोळंबवितील अर्क ॥
शापानुग्रहसमर्थ देख ॥ असंख्यात मिळाले ॥ ६३ ॥
सुर आणि भूसुर ॥ यांशीं भेद नाहीं अणुमात्र ॥
धर्मास विनविती विप्र ॥ आम्ही येऊं तुजसमागमें ॥ ६४ ॥
तुझे संगतीं कंठू काळ ॥ धर्मा तूं पुण्यशीळ ॥
तुजवरी भार न घालूं सकळ ॥ अन्न आच्छादन न मागों ॥ ६५ ॥
कंदमूलें भक्षून ॥ करूं सर्वदा अनुष्ठान ॥
चिंतूं तुझें कल्याण ॥ नाहीं कारण दुसरें पैं ॥ ६६ ॥
वेद शास्त्र पुराण ॥ नाना इतिहास पुण्यपावन ॥
धर्मा तुज करवूं श्रवण ॥ जयकल्याणप्रासीसी ॥ ६७ ॥
धर्म म्हणे घोर वनवास ॥ ब्राह्मण हो तुम्ही पावाल क्लेश ॥
तें मज न पाहवे निःशेष ॥ निर्दोष यश न जोडे ॥ ६८ ॥
त्यांमाजी शौनकनामा विप्र ॥ म्हणे युधिष्ठिरा ऐक साचार ॥
तुवां पूर्वी पूजिले धरामर ॥ तेणें निर्भर जाहलों आम्ही ॥ ६९ ॥
धर्मा तूं न करीं शोक ॥ सर्व पुरवील जगन्नायक ॥
तूं गोब्राह्मणप्रतिपालक ॥ अजातशत्रु धर्मात्मा ॥ ७० ॥
धन धान्य असोनि गांठीं ॥ जो कृपणता धरी पोटीं ॥
ही नव्हे अवंचक हातवटी ॥ महाकपट तो जाण ॥ ७१ ॥
जयापाशीं नाहीं धन ॥ तरी तया इतुकेंचि भजन ॥
द्यावें ब्राह्मणांस अभ्युत्थान ॥ स्थूलासन आदरें ॥ ७२ ॥
उदकदान प्रिय भाषण ॥ नमन आणि विप्रस्तवन ॥
इतुकेनें होय सर्व कल्याण ॥ सकल पूजन पावलें ॥ ७३ ॥
मग धौम्य बोले वचन ॥ धर्मा तूं करीं पुरश्चरण ॥
प्रत्यक्षदैवत सूर्यनारायण ॥ अमित अन्न पुरवील ॥ ७४ ॥
विप्रपालना यथार्थ ॥ हाचि उपाय जाण सत्य ॥
ऐकतां आनंदला कुंतीसुत ॥ तप अद्भुत मांडिलें ॥ ७५ ॥
जितेंद्रिय निराहार ॥ साधूनि सप्तमी रविवार ॥
प्राणायाम करूनि युधिष्ठिर ॥ पूजाप्रकार समर्पीं ॥ ७६ ॥
नाभिपद्यपर्यंत ॥ सलिलीं धर्म उभा राहत ॥
त्रिपादऋचा मंत्र जपत ॥ न्यासयुक्त यथाविधि ॥ ७७ ॥
एक मंडलपर्यंत ॥ धर्मराव तप करित ॥
स्तवन मांडिलें अद्भुत ॥ ऊर्ध्ववदनें ते काळीं ॥ ७८ ॥
सूर्यभजन सूर्यस्तवन ॥ पांचाली करी प्रीतींकरून ॥
जेणें प्रसन्न होय नारायण ॥ सहस्त्रकिरण तमांतक ॥ ७९ ॥
जय तमनाशका सहस्त्रकिरणा ॥ अंबरचूडामणे सूर्यनारायणा ॥
जीवमिलिंदबंधच्छेदना ॥ हृदयकमलविकासका ॥ ८० ॥
सर्वमंगला कल्याणकारणा ॥ रोगप्रशमना आयुर्वर्धना ॥
नमो मार्तंडा दुष्टदमना ॥ हाटकवर्णां वासरमणे ॥ ८१ ॥
मित्र रवि सूर्य भानु दिवाकरा ॥ खग पूष हिरण्यगर्भा तमोहरा ॥
मरीच्यादित्य सवित्रर्क भास्करा ॥ अमिततेजा नमो तुज ॥ ८२ ॥
आदिपुरुषा निर्विकारा ॥ हरिहरविरिंचिस्वरूपधरा ॥
काश्यपेया सहस्रकरा ॥ वसुधामरां प्रिय तूंचि ॥ ८३ ॥
जन्ममृत्युजराव्याधिहरणा ॥ भयदरिद्रदुःखविध्वंसना ॥
कालात्मया सर्वकारणा ॥ विश्वनयनप्रकाशका ॥ ८४ ॥
एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख हय वेग बहुत ॥
निमिषार्धांमध्यें अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥ ८५ ॥
मुख्य दैवत सूर्यनारायण ॥ सूर्यानुष्ठानें श्रेष्ठ ब्राह्मण ॥
वरकड दैवतें कल्पित पूर्ण ॥ चंडकिरण प्रत्यक्ष ॥ ८६ ॥
सूर्यमंडल विलोकून ॥ नित्य जो कां न करी नमन ॥
तो अभाग्य परम अज्ञान ॥ अल्पायुषी जाणावा ॥ ८७ ॥
व्यास वाल्मीक सुर भूपाल ॥ वर्णिती अद्भुत सूर्यमंडल ॥
सूर्योपासक सदा सुशील ॥ यम काल वंदी तया ॥ ८८ ॥
देखोनि धर्माचें तप तीव्र ॥ मूर्तिमंत उतरला दिनकर ॥
कर्णजनक तो सत्वर ॥ थाली देत धर्माप्रति ॥ ८९ ॥
द्वादश वर्षेंपर्यंत ॥ उत्तमान्न जें जें इच्छित ॥
षड्रस चतुर्विध रसभरित ॥ उत्पन्न होईल यांतूनि ॥ ९० ॥
कोट्यवधि जेवितां ब्राह्मण ॥ परी न सरे कदा अन्न ॥
शेवटीं तुम्ही द्रौपदी जेवून ॥ मग धुवून ठेविजे हे ॥ ९१ ॥
पांचाली जेविलिया जाण ॥ मग ते दिवशीं न निघे अन्न ॥
माझें उदयिक करून स्मरण ॥ करा पूजन थालीचें ॥ ९२ ॥
सुष्टीचा उद्भव होय किती ॥ हे नव्हे कदा गणती ॥
तैशी थालीच्या अन्नाची मिती ॥ सहस्त्राक्षा न करवे ॥ ९३ ॥
ऐसें बोलोनि पद्यिनीनाथ ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥
पुढें काम्यकवन प्रवेशत ॥ पांडव विप्रांसमवेत पैं ॥ ९४ ॥
नित्य पांडव पार्थ उठोन ॥ करिती तमांतकाचें स्तवन ॥
थाली प्रसवे इच्छित अन्न ॥ अपार ब्राह्मण जेविती ॥ ९५ ॥
विप्रभोजन पंचमहायज्ञ ॥ तेणें कौंतेय आनंदघन ॥
रात्रंदिवस पुराणश्रवण ॥ वेदाध्ययन शास्त्रचर्चा ॥ ९६ ॥
न्याय मीमांसा सांख्य अद्भुत ॥ पातंजल व्याकरण वेदांत ॥
पंडितमुखें पंडुसुत ॥ श्रवण मनन करी सदा ॥ ९७ ॥
महद्भाग्य हेंचि उत्तम ॥ अखंड ज्यासी सत्समागम ॥
तीर्थाटन व्रतें तप परम ॥ मग कासया करावें ॥ ९८ ॥
सत्समागम ज्यास ॥ त्यास नित्य वैकुंठवास ॥
तरी पांडवभाग्य विशेष ॥ वनीं समागम संतांचा ॥ ९९ ॥
अद्भुत पुण्य ज्याचे पदरीं ॥ त्याचीं चिन्हें ऐक चारी ॥
उदार सत्पात्रीं दान करी ॥ कदाकाळीं विटेना ॥ १०० ॥
सर्वदा बोले मधुरा ॥ न वदे कदा वचन निष्टुर ॥
श्रीकृष्णीं बहुत आदर ॥ कायावाचामानसें ॥ १०१ ॥
परमादरें ब्राह्मणपूजन ॥ देत धन धान्य आसन वसन ॥
या चहूं चिन्हीं मंडित पूर्ण ॥ तोचि अंश श्रीहरीचा ॥ १०२ ॥
म्हणोनि धन्य पंडुनंदन ॥ सर्वलक्षणीं मंडित पूर्ण ॥
यावरी गजपुरींचें वर्तमान ॥ सावधान ऐक राया ॥ १०३ ॥
प्रज्ञाचक्षु म्हणे क्षत्त्या ॥ तुझे ठायीं असे ममता ॥
तरी मज कांहीं सांगें हिता ॥ कैसें आतां करावें ॥ १०४ ॥
चिंतेचिया कूपांत ॥ पडिलों सर्वज्ञा देई हात ॥
आधि हा वणवा जाळित ॥ विवेकमेघ वर्षें तूं ॥ १०५ ॥
हृदयकुंडीं क्रोधाग्न ॥ प्रदीप्त करूनि पंडुनंदन ॥
वना गेले प्रतिज्ञा करून ॥ जी अलोट हरिहरां ॥ १०६ ॥
त्यांच्या दुःखें प्रजालोक ॥ अहोरात्र करिती शोक ॥
दारुण त्यांचा शापपावक ॥ कौरववंशकानन जाळील ॥ १०७ ॥
तरी प्रजा भजती प्रेमेंकरून ॥ पांडवस्नेह होय वर्धमान ॥
विदुरा ऐसें बोलें वचन ॥ तूं सर्वज्ञ सर्वविषयीं ॥ १०८ ॥
विदुर म्हणे पुढतपुढती ॥ किती सांगों आतां तुज नीती ॥
आपले कुमार धरूनि हातीं ॥ धर्मचरणांवरी घालीं पैं ॥ १०९ ॥
करुणा भाकोन क्षमा मागावी ॥ तुम्हीं मागें निंदा केली आघवी ॥
आतां स्तुति करूनि बरवी ॥ ते विरवावी शुद्धमनें ॥ ११० ॥
दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ यांस धर्माचे करीं देऊन ॥
पदर पसरूनि प्राणदान ॥ घ्यावें मागोन सत्वर ॥ १११ ॥
भीमाचे पोटांत डोई घालून ॥ देई हातीं दुःशासन ॥
दुर्योधनाचे मस्तकीं हस्त सुखघना ॥ धर्मरायाचा ठेववीं ॥ ११२ ॥
पार्थाचीं पदाब्जें निर्मल ॥ तेथें स्पर्शवीं कर्णाचे भाल ॥
शकुनि हा कुटिल खल ॥ सहदेवचरणांवरी घालीं गा ॥ ११३ ॥
तूं आपल्या नेत्रोदकें देख ॥ धर्मास करीं अभिषेक ॥
ऐसें ऐकतां अक्षय्य सुख ॥ ब्रह्मांडभरी तुज होय ॥ ११४ ॥
तुझें न ऐकती पुत्र वचन ॥ तरी गारुडी सर्पास करी दीन ॥
तेविं भीष्मद्रोणांस सांगोन ॥ आकळोनि घालीं बंदींत ॥ ११५ ॥
नासिकद्वारें गुण ओवून ॥ महावृषभ करिती दीन ॥
कीं मत्त द्विरद आकळोन ॥ आकर्षूनि ठेविती ॥ ११६ ॥
कुपुत्र पोटांतील रोग ॥ छेदोनि काढावा सवेग ॥
हनन रक्षण त्याग ॥ यांतील एक करीं वेगें ॥ ११७ ॥
ऐशीं वचनें ऐकोन ॥ क्रोधें संतप्त अंबिकानंदनं ॥
म्हणे तुझें समताज्ञान ॥ सर्वही मज समजलें ॥ ११८ ॥
पांडवांचें करितां स्तवन ॥ कधींच न धाये तुझें मन ॥
जेव्हां तुज पुसावें जाण ॥ वारंवार हेंचि वदसी ॥ ११९ ॥
तिहीं हरवूनियां पण ॥ कानना गेले उठोन ॥
आम्हीच शतमूर्ख पूर्ण ॥ तुज पुसतसों विचार ॥ १२० ॥
तूं हितशत्रु पाहतां ॥ तुजपाशी नाहीं आप्तता ॥
आमचें अनहित तत्वतां ॥ पुनःपुनः तेचि कथिसी ॥ १२१ ॥
दुर्योधनास धरूनि आधीं ॥ घालिसी पांडवांचिये बंदी ॥
कळों आली तुझी बुद्धी ॥ घात त्रिशुद्धि करणार ॥ १२२ ॥
तुझें पांडवांकडे मन ॥ मत्पुत्रांचें पाहसी न्यून ॥
तूं नलगेस मजलागून ॥ जाई येथून आतांचि ॥ १२३ ॥
अवश्य म्हणोनि विदुर ॥ रथारूढ जाहला सत्वर ॥
काम्यकवनाप्रति चतुर ॥ परमवेगें पातला ॥ १२४ ॥
दूरी देखोनि विदुर ॥ बंधूसी बोले युथिष्ठिर ॥
क्षत्ता कां येतो सत्वर ॥ काय विचार कल्पूनि ॥ १२५ ॥
कीं शकुनि आणि सुयोधन ॥ तिहीं दिधला पाठवून ॥
कपटद्यूत दुसरेन ॥ खेळावयालागीं पैं ॥ १२६ ॥
तरी मी यावरी अवधारा ॥ नच जाई कौरवांचे मंदिरा ॥
क्षत्ता समीप देखतां त्वरा ॥ पांचही पांडव उठिले ॥ १२७ ॥
सर्वही विदुरास नमून ॥ आदरें देती आलिंगन ॥
मग बैसवूनि वर्तमान ॥ क्षत्ता सांगे गजपुरींचे ॥ १२८ ॥
म्यां बहुतप्रकारें अत्यंत ॥ अंधास सांगितलें स्वहित ॥
परी तो मनीं न धरी यथार्थ ॥ नानापरी बोधितां ॥ १२९ ॥
शुद्धमार्ग टाकून ॥ आडमार्गे जो करी गमन ॥
त्यास अपाय येतील दारुण ॥ नेघे म्हणतां न चुकती ॥ १३० ॥
सर्वांशीं द्वेष करित ॥ आपलें क्षेम कल्याण चिंतित ॥
तरी त्यास अनर्थ येती शोधित ॥ नेघे म्हणतां न चुकती ॥ १३१ ॥
जें कर्म निंदिती विद्वज्जन ॥ तेथें हटेंचि घाली मन ॥
तरी अरिष्टें येती चालून ॥ मेघे म्हणतां न चुकती ॥ १३२ ॥
महासतीचा अभिलाष धरित ॥ बळेंच क्षोभवित संतभक्त ॥
बलवंताशीं वैर लावित ॥ येतील अनर्थ न प्रार्थितां ॥ १३३ ॥
उसां धुसधुसीत उरग ॥ सुखें निद्रा केविं ये मग ॥
शूलावरी बळेंचि टाकी अंग ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥ १३४ ॥
परवित्ताचा अभिलाष धरित ॥ परकांतेशीं इच्छी सुरत ॥
छत्रपतीशीं द्वेष धरित ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥ १३५ ॥
समर्थाचीं वर्मे देख ॥ लोकांत बोले जो शतमूर्ख ॥
तपस्वियांस छळून पाहे कौतुक ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥ १३६ ॥
सद्विवेक मित्र करून ॥ विहितपंथें करावें गमन ॥
सुधारसाहूनि गहन ॥ संतांचीं वचनें मानावीं ॥ १३७ ॥
परयोषिता परवित्त ॥ तृणाहूनि नीच मानित ॥
चतुराशीं वाढवी मित्रत्व ॥ शास्त्र म्हणत धन्य त्यासी ॥ १३८ ॥
असो विदुरावांचून तत्काल ॥ धृतराष्ट्र जाहला व्याकुल ॥
म्हणे मज न गमे वेळ ॥ तयावीण क्षणभरी ॥ १३९ ॥
मी अंध नेत्रांविण ॥ अंतरीं अंध बुद्धिहीन ॥
विदुराविण समजवी कोण ॥ आश्रय आहे पाहतां ॥ १४० ॥
संजयास म्हणे प्रज्ञानयन ॥ काम्यकवनाप्रति जाऊन ॥
विदुरास येई घेऊन ॥ समजावून आतांची ॥ १४१ ॥
संजय तत्काल निघाला ॥ काम्यकवनाप्रति पावला ॥
तो धर्म तापसवेष देखिला ॥ विद्वज्जनवेष्टित ॥ १४२ ॥
वल्कलें अजिने शोभत ॥ भस्म सर्वांगीं विराजत ॥
जैसा व्योमकेश मिरवत ॥ तापसमंडळीमाझारी ॥ १४३ ॥
देवीं वेष्टिला सहस्रनेत्र ॥ कीं किरणचक्रांत विराजे मित्र. ॥
कीं दिव्यरत्नाभोंवते अपार ॥ जोहरी जैसे मिळती पैं ॥ १४४ ॥
तैसा शोभला पंडुनंदन ॥ तो संजय उभा ठाकला येऊन ॥
पांडव नमिती धांवोन ॥ क्षेमालिंगन देती प्रेमें ॥ १४५ ॥
संजय म्हणे विदुरालागून ॥ कंठीं धरिला राये प्राण ॥
जीवनाविण जैसा मीन ॥ तेविं तुजवांचून व्याकुल ॥ १४६ ॥
विदुरासी समजावून ॥ तत्कालचि गेला घेऊन ॥
प्रज्ञाचक्षु भेटला उठोन ॥ समाधान करी बहु तेव्हां ॥ १४७ ॥
विदुर गेला रुसोन ॥ माघारां आणिला समजावून ॥
हें ऐकोन दुर्योधन ॥ परम क्षोभ पावला ॥ १४८ ॥
आमचा घातकर्ता क्षत्ता ॥ कां वृद्धे आणिला मागुता ॥
तो नाना उपाय करूनि आतां ॥ पांडव येथें आणील ॥ १४९ ॥
मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ किंवा करीन महाविषपान ॥
शकुनि मी त्यागीन प्राण ॥ पांडव दृष्टीं देखतां ॥ १५० ॥
ऐसा उपाय करा उठाउठीं ॥ पांडव पुन: न पडती दृष्टीं ॥
कर्ण शकुनि म्हणे कष्टी ॥ होऊं नको दुर्योधना ॥ १५१ ॥
जरी येथें आले पांडुनंदन ॥ पुन: कपटद्यूत खेळोन ॥
तत्काल टाकूं जिंकून ॥ एक क्षण न लागतां ॥ १५२ ॥
शकुनि म्हणे असा सावधान ॥ दूरी आहेत जो पांचाल श्रीकृष्ण ॥
तो त्वरित घाला घालावा जाऊन ॥ टाकावे वधून पांचही ॥ १५३ ॥
सिद्ध केलें सकल सैन्य ॥ तो एकांतीं सत्यवतीनंदन ॥
अंधा सांगे येऊन ॥ अनर्थ पूर्ण पुढें दिसे ॥ १५४ ॥
घाला घालूं इच्छित ॥ तरी हे पडतील अनर्थांत ॥
पांडवांस श्रीरंग रक्षित ॥ अंतर्बाह्य सर्वदा ॥ १५५ ॥
अंध पाय शिवे हातें ॥ म्यां प्रेरिलें नाहीं त्यांतें ॥
ते जाती घाला घालावयातें ॥ तरी मी प्राण देईन ॥ १५६ ॥
हेरमुखें वार्ता ऐकोना ॥ मग उगेचि राहिले दुर्जन ॥
म्हणती विसर पाडून ॥ गुप्तरूपें पुढें जाऊं ॥ १५७ ॥
असो धृतराष्ट बोले वचन ॥ स्वामी तूंचि बोधीं दुर्योधन ॥
व्यास म्हणे मैत्रेय जाण ॥ येईल येथें शीघ्रचि ॥ १५८ ॥
तो बोधील तुझिया सुता ॥ परि हा नायकेचि शिकवितां ॥
तो शापशस्त्रें तत्वतां ॥ ताडील यासी क्षणार्धें ॥ १५९ ॥
ऐसें बोलोनि पराशरसुत ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥
दुर्योधन पित्याजवळी येत ॥ तों मैत्रेय पातला ॥ १६० ॥
दैदीप्यमान भानु मूर्तिमंत ॥ तैसा देखिला अकस्मात ॥
सुतांसहित अंबिकासुत ॥ सन्मानीत तयासी ॥ १६१ ॥
सुयोधन पुसे वर्तमान ॥ कोठोनि जाहलें आगमन ॥
मैत्रेय म्हणे तीर्थ संपूर्ण ॥ करीत आलों काम्यकवना ॥ १६२ ॥
तो पांडव देखिले अकस्मात ॥ जटाधर वल्कलवेष्टित ॥
तृणशेजेवरी निजत ॥ उष्णवात बहु तेथे ॥ १६३ ॥
परम सुकुमार पांचाली ॥ चंपककलिका श्रृंगारशाली ॥
वातोष्णें कोमाइली ॥ आपाद देखिली समग्र म्यां ॥ १६४ ॥
कपटद्यूत खेळोन ॥ बाहेर घातले पंडुनंदन ॥
अद्यापि तरी ऐक वचन ॥ आण बोलावून जाऊनि तूं ॥ १६५ ॥
महासाधु विदुर भक्त ॥ विख्यात वीर बलवंत ॥
हिडिंब किर्मीर अद्भुत ॥ राक्षस मारिले भीमसेनें ॥ १६६ ॥
खांडववन देऊनि वैश्वानरा ॥ जर्जर केलें निर्जरेश्वरा ॥
अरे त्या कपिवरध्वजमहावीरा ॥ समरीं कोण जिंकील ॥ १६७ ॥
सोमवंशविजयध्वज ॥ सर्वलक्षणयुक्त धर्मराज ॥
तरी त्यासी देई राज्य ॥ यथाविभाग समत्वें ॥ १६८ ॥
द्रोह सांडीं सुयोधना ॥ वांचविणें आहे आपुल्या प्राणा ॥
तरी तूं जाऊनि काम्यकवना ॥ पृथानंदना आणवेगीं ॥ १६९ ॥
ऐसें ऐकतां दुर्योधन ॥ परम क्षोभला जैसा कृशान ॥
श्मश्रु हातें पिळून ॥ अंक हातें थापटित ॥ १७० ॥
सव्यपद घांसी मेदिनीं ॥ गर्वे न बोलेचि पापखाणी ॥
सक्रोधें हुंकार देऊनी ॥ अधर दशनें रगडित ॥ १७१ ॥
ऐसें देखतांचि जाण ॥ प्रलयीं क्षोभे मृडानीरमण ॥
तैसा शाप वदे मैत्रेय दारुण ॥ जो कां अलोट हरिहरां ॥ १७२ ॥
म्हणे चांडाळ तूं दुर्योधन ॥ द्वेषी हिंसक कुटिल पूर्ण ॥
करिसी तपस्वियांचा अपमान ॥ गर्वेंकरून बोलसी ॥ १७३ ॥
न धरिसी ब्राह्मणांची मर्यादा ॥ दुष्टा मलिना मतिमंदा ॥
तुझे अंकीं भीमाची गदा ॥ विद्युल्लतेऐशी पडेल ॥ १७४ ॥
तेणेंच अंक चूर्ण होऊन ॥ तळमळून सोडिशील प्राण ॥
माझें असत्य शापवचन ॥ जलजासनाचेनं पैं नोहे ॥ १७५ ॥
मदें माजला जेविं बस्त ॥ कीं पिसाळले श्वान यथार्थ ॥
कीं डुकर माजलें वनांत ॥ हाणी दांत भलत्यासी ॥ १७६ ॥
तैसा तूं माजलासी पूर्ण ॥ पक्क फणस जेविं होय चूर्ण ॥
तेविं भीमगदेंकरून ॥ छिन्नभिन्न अंक हो कां ॥ १७७ ॥
ऐसें मैत्रेय बोलोन ॥ सवेंच पावला अंतर्धान ॥
जैसा कायेंतूनि जाय प्राण ॥ तो नेणवे कोणासी ॥ १७८ ॥
भयभीत दुर्योधन ॥ चिंतार्णवीं गेला बुडोन ॥
शोकें तळमळे अंबिकानंदन ॥ म्हणे वर्तमान बरें न दिसे ॥ १७९ ॥
यावरी विदुरास बोलावून ॥ धृतराष्ट्र पुसे परम उद्विग्न ॥
तुवां देखिलें काम्यकवन ॥ तरी वर्तमान एक सांगें ॥ १८० ॥
भीमे मारिला किर्मीर ॥ ते कथा मज सांगें समग्र ॥
मग बोले चतुर विदुर ॥ ऋषिमुखें ऐकिलें म्यां ॥ १८१ ॥
गजपुरांतूनि निघाले पंडुनंदन ॥ तीन दिवसां पावले काम्यकवन ॥
रजनींत जातां मार्ग क्रमून ॥ तो किर्मीर राक्षस धावला ॥ १८२ ॥
महाविशाल रजनीचर ॥ कज्जलवर्ण पर्वताकार ॥
भाळी चर्चिला सिंदूर ॥ दाढा शुभ्र भयानक ॥ १८३ ॥
त्याच्या भयेंकरूनी ॥ कोणी तेथें न वसे प्राणी ॥
तो पांडवांस आडवा येऊनी ॥ कवण म्हणोनि पुसतसे ॥ १८४ ॥
त्यास देखोनि द्रौपदी भयभीत ॥ नेत्र झांकी होय कंपित ॥
अर्जुन तियेस सांवरित ॥ म्हणे कांहीं मनांत भिऊं नको ॥ १८५ ॥
राक्षसासी पांडुनंदन ॥ पुसती तूं आहेस कोण ॥
येरू म्हणे मी किर्मीर जाण ॥ बकासुराचा बंधु पै ॥ १८६ ॥
पुरुषमात्र धरून ॥ मी भक्षितों न लागतां क्षण ॥
तुम्ही पांच जण आहां कोण ॥ नेतां कामिनी कोणाची ॥ १८७ ॥
धर्म म्हणे आम्ही पंडुकुमार ॥ हस्तनापुरींचे राज्यधर ॥
मग बोले किर्मीर ॥ दावा वृकोदर कोणता तो ॥ १८८ ॥
त्या भीमाच्या रक्तेंकरून ॥ करीन बकासुराचें तर्पण ॥
मग त्यास सगळाच ग्रासीन ॥ करीन चूर्ण दंतांखालीं ॥ १८९ ॥
माझा बकासुर बलगहन ॥ तेणें मारिला कपटेंकरून ॥
बहुत दिवस भीमालागून ॥ शोधितां आजि सांपडला ॥ १९० ॥
ऐसे बोलतो किर्मीरा ॥ हांक फोडी वृकोदरा ॥
पर्वताकार तरुवर ॥ उपडून हातीं घेतला ॥ १९१ ॥
अर्जुनें न लागतो क्षण ॥ गांडीवासी चढविला गुण ॥
तो किर्मीर वृक्ष घेऊन ॥ भीमावरी धांवला ॥ १९२ ॥
भीम म्हणे रे कीटका ॥ बकदर्शना तुज मशका ॥
पाठवितों यमलोका ॥ अर्ध क्षण न लागतां ॥ १९३ ॥
एक काल एक कृतांत ॥ एक अखया एक हनुमंत ॥
एक एकाचे पृष्ठीवरी मोडित ॥ झाडें सर्व उपडोनि ॥ १९४ ॥
द्वादश योजनेंपर्यंत ॥ महीवृक्ष भंगले समस्त ॥
मग शिला आणि पर्वत ॥ परस्परें टाकिती ॥ १९५ ॥
मल्लयुद्ध अद्भुत ॥ जाहले घटिका चारपर्यंत ॥
मग भीमे अलातचक्रवत ॥ चरणीं धरूनि भोवंडिला ॥ १९६ ॥
तैसाचि आपटिला झडकरी ॥ मग पाय देऊनि पृष्ठीवरी ॥
धरूनि शिर पादाग्रीं ॥ मध्यभागी मोडिला ॥ १९७ ॥
दुंदुभी फुटतां ध्यनि उमटत ॥ तैसा राक्षस देहांतीं आरडत ॥
कुंजरास होय पर्वतपात ॥ भूमीवरी तेविं पडियेला ॥ १९८ ॥
ऐसा पुरूषार्थ करून पंडुनंदन ॥ गेले द्वैतवनालागून ॥
द्रौपदी परम आनंदोन॥ म्हणे धन्य वृकोदरा ॥ १९९ ॥
ऐशी कथा सांगतां विदुर ॥ श्वासोच्छास टाकी धृतराष्ट्र ॥
म्हणे मैत्रेयाचा शाप क्रूर ॥ कालत्रयी टळेना ॥ २०० ॥
असो यावरी कष्टी वनवासी पांडव ॥ भेटावयास आले राजे सर्व ॥
छप्पन्न कोटी यादव ॥ यादवेंद्रासमवेत पैं ॥ २०१ ॥
वसुदेव आणि उद्धव अकूर ॥ उग्रसेन रेवतीवर ॥
दळासहित सत्वर ॥ द्वैतवना पातले ॥ २०२ ॥
शिखंडी आणि धृष्टद्युम्न ॥ आले द्रौपदीचे बंधु धांवोन ॥
कौरवांसी निंदिती पूर्ण ॥ क्रोधेंकरून सर्वही ॥ २०३ ॥
श्रीरंगासी देखोन ॥ पांडव घालिती लोटांगण ॥
द्रौपदी धांवूनि धरी चरण ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥ २०४ ॥
द्रौपदीस म्हणे यादवेंद्र ॥ माये तुवां कष्ट देखिले अपार ॥
तरी कौरवरक्तें समग्र ॥ धरातल भिजवीन ॥ २०५ ॥
देखोनि कौरवांचा अंतकाल ॥ त्यांच्या स्त्रिया रडतील सकळ ॥
तो तूं देखसी कोल्हाळ ॥ अल्पकाळेंचि यावरी ॥ २०६ ॥
उतरून पृथ्वीचा भार ॥ धर्मावरी धरीन छत्र ॥
यावरी त्रयोदश वर्षानंतर ॥ सोहळा देखसी कृष्णे तूं ॥ २०७ ॥
वस्त्रहरणाचे दुःख अद्भुत ॥ आठवूनि कृष्णा शोक करित ॥
म्हणे पांचही पति बलवंत ॥ उगेच होते तये वेळीं ॥ २०८ ॥
कैवारिया भक्तवत्सला ॥ वस्त्रें पुरविलीं ते वेळां ॥
करुणाकरा दयाळा ॥ लाज माझी रक्षिली ॥ २०९ ॥
धर्म म्हणे उपकार ॥ किती आठवावे अपार ॥
कुंभिनीचें करून पत्र ॥ लिहितां चरित्र सरेना ॥ २१० ॥
पांचालीचे पंच पुत्र ॥ महायोद्धे वयकिशोर ॥
द्रौपदीपांडवासी सत्वर ॥ धृष्टद्युम्ने भेटविले ॥ २११ ॥
प्रतिविंध्य श्रुतसोम शतानीक ॥ श्रुतसेन श्रुतकर्मा देख ॥
पितयातुल्य ते बालक ॥ परम पुरुषार्थी पांचही ॥ २१२ ॥
सुभद्रा आणि अभिमन्य ॥ कृष्णासंगें आले द्वारकेहून ॥
सौभद्रें पांडवांस वंदून ॥ केलें नमन द्रौपदीसी ॥ २१३ ॥
यावरी देशोदेशींचे राव ॥ स्तविती द्वादश जातींचे यादव ॥
वसुदेव बलभद्र उद्धव ॥ समयोचित बोलती ॥ २१४ ॥
धृष्टद्युम्न प्रतिज्ञा करित ॥ द्रोणास मारीन क्षणांत ॥
शिखंडी म्हणे मी करीन अंत ॥ वृद्ध भीष्माचा यावरी ॥ २१५ ॥
सुयोधन दुःशासन ॥ भीमहस्तें सोडितील प्राण ॥
कर्णाचा काळ अर्जुन ॥ शल्यास मरण धर्महस्तें ॥ २१६ ॥
माद्रीनंदन प्राण ॥ शकुनीचा घेतील न लागतां क्षण ॥
असो सर्वही कौरवसैन्य ॥ पांचही मिळोनि आटितील ॥ २१७ ॥
यावरी यादवांसहित यादवेंद्र ॥ सुभद्रा आणि सौभद्र ॥
द्वारकेसी गेले सत्वर ॥ आज्ञा घेऊनि पांडवांची ॥ २१८ ॥
घेऊनि द्रौपदीचे नंदन ॥ पांचालपुरा गेला धृष्टद्युम्न ॥
सकल राजे प्रजाजन ॥ निजदेशाप्रति जाती ॥ २१९ ॥
यावरी द्वैतवनीं पंडुकुमार ॥ राहिले घेऊन अपार विप्र ॥
तेथें द्वादश संवत्सर ॥ क्रमिते जाहले सत्समागमें ॥ २२० ॥
नित्य नैमित्तिक कर्म ॥ व्रतें हवनें पितृश्राद्धें उत्तम ॥
अग्निसेवा त्रिकाल होम ॥ देत धर्म आदरेंशीं ॥ २२१ ॥
पक्षेष्टि मासेष्टी ॥ नक्षत्रेष्टि प्रियपरमेष्टी ॥
चातुर्मास्य पर्वें पोटीं ॥ आचरतां आनंद धर्मातें ॥ २२२ ॥
यागसदनीं वेदघोष ॥ ओंकारवषट्कारध्वनि सुरस ॥
ते ते महाऋषी निर्दोष ॥ येच रीतीं आचरती ॥ २२३ ॥
यथासुखें राहिले ब्राह्मण ॥ कुंड वेदिका शास्त्रप्रमाण ॥
सायंकालीं दैदीप्यमान ॥ तिन्ही अग्नि शोभती ॥ २२४ ॥
चहूं वेदांचें अध्ययन ॥ शास्त्रचर्चा पुराणश्रवण ॥
पांडवांजवळी हरिकीर्तन ॥ रात्रीं करिती कित्येक ॥ २२५ ॥
मार्कंडेय महाऋषी ॥ येऊनि भेटला पांडवांसी ॥
म्हणे धर्मा तूं वनवासी ॥ सुखी आहेस वाटतें ॥ २२६ ॥
प्रत्यक्ष परब्रह्म रामचंद्र ॥ चौदा वर्षें सेविलें तेणें वन घोर ॥
मग रामकथा समग्र ॥ धर्मराया सांगितली ॥ २२७ ॥
ते रामकथा वर्णावी समस्त ॥ तरी समुद्राऐसा वाढेल ग्रंथ ॥
वाल्मीकिकृत्य सत्य यथार्थ ॥ सप्तही कांडे कथियेलीं ॥ २२८ ॥
पांडुरंगकृपें यथार्थ ॥ चाळीस अध्याय रामविजय ग्रंथ ॥
ती श्रोतीं पहावी तेथ ॥ अत्यादरें करूनियां ॥ २२९ ॥
द्वैतवन परम सुंदर ॥ नाना जातींचे तरुवर ॥
भेदीत गेले अंबर ॥ मनोहर सदाफल जे ॥ २३० ॥
छाया शीतल सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥
नारळी केळी पोफळी रातांजन ॥ सुवासचंदन मलयागर ॥ २३१ ॥
अशोकवृक्ष उतोतिया ॥ रायआवळे आंबे खिरणिया ॥
निंबे कवट वाढोनियां ॥ सुंदर डाहळिया डोलती ॥ २३२ ॥
दाळिंबी रायकेळी मंदार ॥ चंदनवृक्ष मोहो अंजीर ॥
चंपक जाई जुई परिकर ॥ बकुल मोगरी सेवंतिया ॥ २३३ ॥
शतपत्र जपावृक्ष परिकर ॥ तुलसी करवीर कोविदार ॥
कनकवेली नागवेर्ली सुंदर ॥ पवळवेली आरक्त ॥ २३४ ॥
मयुरें चातकें बदकें ॥ कस्तुरीमृग जवादी बिडालकें ॥
राजहंस नकुलें चक्रवाकें ॥ कोकिला कौतुकें बाहती ॥ २३५ ॥
धन्य धन्य धर्मराज नृपती ॥ श्वापदें निर्वैर विचरती ॥
योगसाधनें ऋषी आचरती ॥ गायक गर्जती आलापें ॥ २३६ ॥
रसाळ आणि परमपावन ॥ अरण्यपर्व गोड गहन ॥
स्वधर्मनिष्ठ धर्मपरायण ॥ त्यासीच जाण रुचे हें ॥ २३७ ॥
वनपर्व कमल सुरस ॥ पंडितमिलिंद घेती सुवास ॥
कुटिलनिंदकदर्दुरांस ॥ कुतर्कपंक प्राप्त सदा ॥ २३८ ॥
दर्दुरीं निंदिला कमलपराग ॥ परी सदा राहती सज्जनभृंग ॥
ज्यांचे हृदयीं श्रीपांडुरंग ॥ सर्वकाळ वसतसे ॥ २३९ ॥
ब्रह्मानंदा पंढरीराया ॥ श्रीधरवरदा कैवारिया ॥
अभंगा निर्विकारा करुणालया ॥ ठेवीं पायांजवळची ॥ २४० ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ तेविसाव्यांत कथियेला ॥ २४१ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्वटीका श्रीधरकृत ॥
काम्यकवनांतून द्वैतवनांत ॥ पांडवगमन कथियेलें ॥ २४२ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥
अध्याय तेविसावा समाप्त
GO TOP
|