श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बाविसावा


पांडव वनवासात जातात


श्रीगणेशाय नम: ॥
संपदा राज्यसुख अपार ॥ देऊनि बोळविले पंडुकुमार ॥
हें देखोनि कौरव थोर ॥ संतापले मानसीं ॥ १ ॥
भयभीत जाहले मनीं ॥ सकल दुर्जन मिळोनी ॥
म्हणती महासर्प दुखवोनी ॥ हृदयीं कंठीं धरियेले ॥ २ ॥
तैसें वृद्धें केलें निश्चित ॥ राज्य सेना शस्त्रांसहित ॥
पांडव सोडिले जीवें जित ॥ केला अनर्थ अंधाने ॥ ३ ॥
सुयोथन दुःशासन कर्ण शकुनी ॥ वृद्धाप्रति सांगती येऊनी ॥
त्वां हे काय केली करणी ॥ कुलहानि मांडिली ॥ ४ ॥
दोन डाव उरले असती ॥ तेणें धाडूं तयां वनाप्रती ॥
अज्ञातवास मागुती ॥ तेरावे वर्ष नेमावा ॥ ५ ॥
प्रकट जाहलिया किंचित ॥ मागुती तेरा वर्षेंपर्यंत ॥
नष्टचर्य भोगिती यथार्थ ॥ पुन: पुन: तैसेची ॥ ६ ॥
आतां पांडव आणितां येथ ॥ धृतराष्ट्र म्हणे दिसतो अनर्थ ॥
गांधारी म्हणे यथार्थ ॥ बुडविलें दुर्योधनें ॥ ७ ॥
सोमदत्त बाल्हिक द्रोण ॥ भीष्म विदुर गुरुनंदन ॥
कृपाचार्य भूरिश्रवा विकर्ण ॥ म्हणती अनर्थ पुढतीं हा ॥ ८ ॥
दुर्योधन म्हणे ऐशी नीती ॥ वैरी वधावे नानायुक्तीं ॥
अपाय योजोनि पुढती ॥ वनवासासी धाडावे ॥ ९ ॥
अंध म्हणे जें होणार ॥ तें कालत्रयीं चुकेना साचार ॥
मग प्रतिकामी सारथिपुत्र ॥ धाडी सत्वर बोलावूं ॥ १० ॥
तो धांवोनि पांडवां सांगत ॥ फिरा मागुती खेळा द्यूत ॥
आपुली आण निश्चित ॥ अंबिकासुते घातली ॥ ११ ॥
तुम्हांस पितृवचन प्रमाण ॥ घ्यावें पितयाचें दर्शन ॥
मग बोलती भीमार्जुन ॥ कां हो दुर्जन फिरविती ॥ १२ ॥
काय योजिला अनर्थ ॥ कीं करूं पाहती प्राणांत ॥
धर्म म्हणे हे अद्‌भत ॥ श्रीकृष्णमाया नेणवेचि ॥ १३ ॥
उतरावया भूभार ॥ अवतरला हो यादवेंद्र ॥
पांडव करूनि निमित्तमात्र ॥ दुष्ट संहारूं इच्छितो ॥ १४ ॥
कपटद्यूत जें तुटलें ॥ तें पुन: सांधावया बोलाविलें ॥
न घे म्हणतां न सुटे वहिलें ॥ जें कां लिहिले विधीनें ॥ १५ ॥
अधर्मसभेसी परतोन ॥ पांडव आले पांचही जण ॥
उभे ठाकले दुर्जन ॥ देऊन मान बहुवस ॥ १६ ॥
धर्मास म्हणे शकुनी ॥ चला डाव खेळू मागुत्यानी ॥
आम्हांस हारी आली ये क्षणीं ॥ नेमवाणी ऐक पां ॥ १७ ॥
वल्कले मृगचर्मे वेष्टून ॥ द्वादशवर्षे वनवास सेवून ॥
तेरावे वर्षी जाण ॥ अज्ञातवास निर्धारे ॥ १८ ॥
प्रकट झालिया अवधारा ॥ पुढती वनवास वर्षें बारा ॥
मग यावें आपुल्या नगरा ॥ हाचि निर्धार तुम्हां आम्हां ॥ १९ ॥
धर्मराज विचारी मनीं ॥ जरी माघार घ्यावी ये क्षणीं ॥
तरी पुरुषार्था होय हानी ॥ आणि हे करणी ईश्वराची ॥ २० ॥
धर्म दोन वेळां फांसे ढाळित ॥ शकुनि जिंकिलें रे धर्मा म्हणत ॥
दुर्योधन गदगदां हांसत ॥ एकचि टाळी पिटियेली ॥ २१ ॥
कर्णास सुख अपार ॥ म्हणे ध्वज उभारा सत्वर ॥
जयवाद्यांचा गजर ॥ राजभेरी ठोकिल्या ॥ २२ ॥
कौरव गर्जती जयजयकारीं ॥ राज्य जाहले एकछत्री ॥
दीनवदन ते अवसरीं ॥ पांडव दिसों लागले ॥ २३ ॥
काळवंडला आदित्य ॥ सुटला क्रोधें प्रलयवात ॥
थरथरां उर्वी कांपत ॥ उल्कापात जाहला ॥ २४ ॥
आकाशांतूनि अवधारा ॥ पडती तेव्हां रक्तधारा ॥
वृद्ध वृद्ध म्हणती घरा ॥ निर्वीर होईल यावरी ॥ २५ ॥
पांडवांस म्हणे दुःशासन ॥ आतां करा वनासी प्रयाण ॥
अवदशा आली तुम्हां पूर्ण ॥ काय कारण नगरांत ॥ २६ ॥
फेडा वस्त्रें अलंकार ॥ वल्कले वेष्टावीं सत्वर ॥
काळीं वदनें करून साचार ॥ रक्षा लावा सर्वांगीं ॥ २७ ॥
नपुंसकें तुम्ही निर्बळें ॥ जैशीं तिळांचीं शुष्क कोळें ॥
कीं व्याघचर्मे विशाळें ॥ प्राणहीन पसरलीं ॥ २८ ॥
अर्कतूल विगतधवा वंध्या विधुर ॥ भग्नभाजन वृक्षा खाकर ॥
श्मशानभूमि अकालमेघ निर्धार ॥ तैसेचि व्यर्थ तुम्हीही ॥ २९ ॥
जैसें अजाचें गललांगूल ॥ तैसे तुम्ही दिसतां केवळ ॥
कीं नपुंसक निष्फळ ॥ वनीं दरिद्रिप्रेत पडियेलें ॥ ३० ॥
द्रौपदीस म्हणे दुःशासन ॥ वनवास परम कठिण ॥
दुर्योधनाची स्त्री होऊन ॥ शरीर अर्पी तयातें ॥ ३१ ॥
आम्ही बंधू एकशत ॥ मना आवडे तो वरीं त्वरित ॥
नपुंसक दरिद्री समस्त ॥ पांडव दूरी करीं पैं ॥ ३२ ॥
हें ऐकोनि भीमसेन ॥ सिंहाऐसा बोले गर्जोन ॥
हा बोलविषतरूचीं फळें जाण ॥ प्राप्त तुम्हां होतील पैं ॥ ३३ ॥
मर्यादा सांडोनि येथ ॥ बोलसी दुष्टा विपरीत ॥
तूं माजलासी बहुत बस्त ॥ शरीर पुष्ट जाहले तुझें ॥ ३४ ॥
द्वारावतीची भवानी ॥ चतुर्भुज श्रीकृष्णरूपिणी ॥
तीस नवस केला आजपासोनी ॥ वनींहून आलिया ॥ ३५ ॥
द्वेषाग्नि प्रज्वळेल प्रचंड ॥ रणमंडल तें होमकुंड ॥
तूं तेथें बस्त खंडविखंड ॥ गात्रें तुझीं करीन मी ॥ ३६ ॥
प्रथम तुझें अवदान ॥ मग एकापाठीं एकशत जाण ॥
शेवटीं हा बस्त दुर्योधन ॥ समर्पीन पूर्णाहुती ॥ ३७ ॥
पक्षपाती जे तुमचे संपूर्ण ॥ ते गदाघाये करीन चूर्ण ॥
सूर्यसुताचें सदन ॥ पाहूं धाडीन समस्तां ॥ ३८ ॥
तुम्ही शब्दशस्त्रें करा ताडण ॥ लोहशस्त्रें आम्ही फेडू उसण ॥
जिव्हा छेदूनि उपडीन ॥ हस्त तुझे रणांगणीं ॥ ३९ ॥
या शब्दांची आठवण ॥ देऊन घेईन तुमचे प्राण ॥
हें हृदयपत्रीं लिहून ॥ ठेवा तुम्ही रासभ हो ॥ ४० ॥
असो यावरी वेष्टूनि वल्कले ॥ वना जावया उदित जाहले ॥
नगरदुर्गावरी चढले ॥ कौरव कौतुक पाहावया ॥ ४१ ॥
पांडव पायीं चालत ॥ गाय द्रौपदी कौरव म्हणत ॥
पांच पोळ हे धांवत ॥ गायीपाठीं एकसरां ॥ ४२ ॥
मोकळे केश सोडूनी ॥ रडत जाय याज्ञसेनी ॥
भीम वारंवार परतोनी ॥ कौरवांकडे पहातसे ॥ ४३ ॥
सिंहावलोकनेंकरून ॥ परतोनि पाहतां भीमसेन ॥
दुर्योधन वांकडे पाय करून ॥ उपहासित वृकोदरा ॥ ४४ ॥
सुयोधनास म्हणे भीमसेन ॥ तुझे शिराचा कंदुक करून ॥
चेंडूफळी मी खेळोन ॥ निववीन मन अंधाचें ॥ ४५ ॥
मी व्याघ्र भीमसेन ॥ दुःशासनाचा कंठ फोडून ॥
आधीं करीन रक्तपान ॥ मग उटी घेईन सर्वांगीं ॥ ४६ ॥
तें रक्त चर्चूनि हस्तीं ॥ पांचाळीचे केश मोकळे रुळती ॥
मग देऊन तयांसी ग्रंथी ॥ वीरगुंठी बांधीन ॥ ४७ ॥
सूर्य मार्ग चुकेल करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावेल अग्न ॥
मशकाची धडक लागून ॥ जरी मेरु पडेल पैं ॥ ४८ ॥
पाषाणप्रहार लागून ॥ वायु पडेल मोडोनि चरण ॥
पिपीलिका शोषील सिंधुजीवन ॥ कीं विजेस जाऊन मशक धरी ॥ ४९ ॥
भडभडित अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होईल शीतळ ॥
हेंही घडेल एक वेळ ॥ परि वचना चळ नव्हे माझे ॥ ५० ॥
यावरी आवेशें बोले पार्थ ॥ करीन कर्णाचा निःपात ॥
शिर भोंवंडीन आकांशांत ॥ तरीच सुत पंडूचा ॥ ५१ ॥
मागें निंदा बोलती तोंडें ॥ त्यांचीं करीन शतखंडे ॥
कौरवांचीं उडवीन मुंडे ॥ कंदुकाऐशीं आकाशीं ॥ ५२ ॥
मृगेंद्राची निंदा देख ॥ करिती मागें जंबुक ॥
अलिका म्हणे विनायक ॥ धरून आणीन क्षणार्धें ॥ ५३ ॥
तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानलास धरूं म्हणत ॥
हृदयीं भावी खद्योत ॥ आसडोनि आदित्य पाडूं खालीं ॥ ५४ ॥
शलभ बहुत मिळोनी ॥ वीज घालूं म्हणती वदनीं ॥
मृत्तिकेचा गज धांवोनी ॥ सागर शोषूं भावित ॥ ५५ ॥
परम कुमती जो बलहीन ॥ मागें निंदा जल्पे रात्रंदिन ॥
समरभूमीस पळे उठोन ॥ हें तो लक्षण श्वानाचें ॥ ५६ ॥
सहदेव बाहू पिटून ॥ म्हणे रे शकुनि सावधान ॥
मीच ग्राहक असें जाण ॥ प्राणांसी तुझ्या निर्धारे ॥ ५७ ॥
बहुत फांसे ढाळिले जाण ॥ तितके अंगीं भेदीन बाण ॥
सुयोधनासहित सर्वहीजण ॥ समरीं संहारीन निर्धारे ॥ ५८ ॥
शकुनि मी तुझा काळ ॥ जरी छेदीना तुझें शिरकमळ ॥
तरी ते माद्री वेल्हाळ ॥ जन्मोनि व्यर्थ श्रमविली ॥ ५९ ॥
हिमाचल चळेल आसनीं ॥ तेज सांडील वासरमणी ॥
शीतलत्व टाकील रोहिणी- ॥ रमण जरी तत्वतां ॥ ६० ॥
शेष सांडील भूभार ॥ विष जरी वमील कर्पूरगौर ॥
हेंही घडेल परि निर्धार ॥ नेम माझा टळेना ॥ ६१ ॥
भुजा पिटोन नकुल बोलत ॥ कौरवकुल संहारीन समस्त ॥
धान्यक्षेत्राचें निर्मूल करित ॥ कृषीवल जैसा एकसरें ॥ ६२ ॥
ऐशी प्रतापप्रतिज्ञा बोलोन ॥ करिते जाहले वनीं प्रयाण ॥
धौम्य अग्निहोत्रपात्रें घेऊन ॥ सहकृशानु चालिला ॥ ६३ ॥
धर्म दर्भपवित्रें हातीं घालित ॥ पितृसूक्त जपत जात ॥
कौरवांचा होईल अंत ॥ चिन्ह पुढील दावितसे ॥ ६४ ॥
अजातशत्रु सुज्ञ धर्म ॥ समस्तांस पुसे सप्रेम ॥
म्हणे वडील हो परम ॥ कृपा बहुत असों द्या ॥ ६५ ॥
तुमच्या आशीर्वादेंकरून ॥ पुढतीं पाहूं तुमचे चरण ॥
समस्त कौरवांस पुसोन ॥ धर्मराज चालिला ॥ ६६ ॥
भीष्म द्रोण विदुर ॥ यांच्या नेत्रीं वाहे नीर ॥
धन्य महाराज युधिष्ठिर ॥ अजातशत्रु नाम साजे ॥ ६७ ॥
धर्मास म्हणे विदुर ॥ कुंती वृद्ध आणि सकुमार ॥
ज्येष्ठ बंधूची पत्‍नी निर्धार ॥ माता माझी असों दे ॥ ६८ ॥
माझिये घरीं ठेवून ॥ बा रे वनवासा करीं तूं प्रयाण ॥
मग वंदिले कुंतीचे चरण ॥ साष्टांगेंशीं धर्मराजें ॥ ६९ ॥
विदुर म्हणे धर्मराजा ॥ सोमवंशविजयध्वजा ॥
श्रीकृष्णस्मरणध्यानपूजा ॥ प्राणांतींही न विसंबें ॥ ७० ॥
हृदयीं ध्याता कंसारी ॥ कदा भय नाहीं कांतारीं ॥
तोचि रक्षील नानापरी ॥ दुःख तिळभरी झगटेना ॥ ७१ ॥
धर्म म्हणे विदुरासी ॥ तूं गुरु पिता देव आम्हांसी ॥
तुझी आता वंदूनि शीर्षीं ॥ अहर्निश वर्तेन ॥ ७२ ॥
ऐसें बोलतां युधिष्ठिर ॥ धांवोनि आलिंगी त्यास विदुर ॥
अश्रुधारा स्रवती नेत्र ॥ प्रेमसागर उचंबळला ॥ ७३ ॥
कुंतीस निरवून बहुत ॥ पांचही विदुरास नमित ॥
लक्षोनियां अरण्यपंथ ॥ जाते जाहले तेधवां ॥ ७४ ॥
पांच पांडव राजहंस ॥ हंसिनी द्रौपदी डोळस ॥
जिचे अंगींचा सुवास ॥ वनामाजी फांकतसे ॥ ७५ ॥
एके वस्त्रें द्रौपदी जात ॥ पांडव मागें वल्कलवेष्ठित ॥
कुंती देखोनि आक्रंदत ॥ हृदय पिटित स्वहस्तें ॥ ७६ ॥
अंग टाकित धरणीं ॥ अगे वेल्हाळे याज्ञसेनी ॥
पतिसमवेत नयनीं ॥ केव्हां तूतें देखेना ॥ ७७ ॥
अहा द्वारकानगरविलासिया ॥ कोठे गुंतलासी विसांविया ॥
पांडवां व्यसनीं पडलिया ॥ नेणसी तूं व्यापका ॥ ७८ ॥
कुरुकुलमुकुटावतंस ॥ पंडुराज तूं पवित्र पुरुष ॥
तुज कैसा स्वर्गवास ॥ गोड वाटे एधवां ॥ ७९ ॥
वना गेलिया श्रीरामचंद्र ॥ पाठी धांवे कौसल्या सुंदर ॥
तैसी गजपुराबाहेर ॥ कुंती धांवे पुत्रांमागे ॥ ८० ॥
अगे पांचालि मायबहिणी ॥ प्राणसखें सांगातिणी ॥
वदन दावीं गे परतोनी ॥ मज टाकूनि जातेसी ॥ ८१ ॥
सहदेव आणि नकुळ ॥ तान्हीं बाळें केवळ ॥
मज निरवूनि वेल्हाळ ॥ माद्री गेली स्वर्गातें ॥ ८२ ॥
नकुलसहदेवांच्या गळां ॥ कुंती मिठी घाली ते वेळां ॥
कौरवांच्या नारी सकळा ॥ देखोनि रडती तेधवां ॥ ८३ ॥
म्हणती वैधव्य आम्हांस आलें ॥ भूलले कौरव कां हें न कळे ॥
नगरवासी लोक ते वेळे ॥ शोक करिती अपार ॥ ८४ ॥
मथुरे जातां यादवेंद्र ॥ यशोदा नंद गौळी समग्र ॥
गोपी शोक करिती उग्र ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥ ८५ ॥
कुंतीस सांवरूनि विदुर ॥ गृहास नेत सत्वर ॥
सुभद्रा आणि सौभद्र ॥ द्वारकेसी पाठविलीं ॥ ८६ ॥
पांडवांस बोळवित विदुर ॥ अरण्यांत गेला दूर ॥
नीति सांगोनि अपार ॥ मागुती येत स्वस्थलीं ॥ ८७ ॥
इतर पांडवस्त्रिया सुंदरा ॥ कुंती पाठवित माहेरा ॥
वनवास सरल्या सकुमारा ॥ मागुती यावें भेटीतें ॥ ८८ ॥
द्रौपदीचे पंचकुमारां ॥ विदुर पाठवी पांचालपुरा ॥
धुष्टद्युम्न द्रुपद अवधारा ॥ प्राणांपरी प्रिय करिती ॥ ८९ ॥
धृतराष्ट्र पुसे विदुरा ॥ पांडव गेले वनांतरा ॥
विषाद धरिला अंतरा ॥ किंवा सुखरूप गेले पैं ॥ ९० ॥
विदुर म्हणे झांकून वदन ॥ धर्में केलें वनप्रयाण ॥
मुखें धरिलें दृढमौना ॥ न बोलत कोणाशीं ॥ ९१ ॥
भुजा उभारोनि भीमसेन ॥ कल्पांतरुद्रसा क्रोधायमान ॥
गर्जत जैसा पंचानन ॥ हुंकारत तेविं गेला ॥ ९२ ॥
वाममुष्टीं सिकता घेऊनी ॥ सव्यभागें विखरी मेदिनीं ॥
शिर तुकावीत विपिनीं ॥ पार्थवीर प्रवेशला ॥ ९३ ॥
कर्दमें लेपूनियां वदन ॥ गेला सहदेव माद्रीनंदन ॥
जैसा आच्छादिला अभ्रेंकरून ॥ वासरमणि निराळीं ॥ ९४ ॥
सर्वांगीं मृत्तिका चर्चून ॥ नकुल गेला बलसंपन्न ॥
जेविं संसारमाया टाकून ॥ योगी जाय तपोवना ॥ ९५ ॥
मोकळे केश हस्ते झाडित ॥ हृदयीं पेटला क्रोधानल बहुत ॥
नेत्रोदकें तो विझवित ॥ द्रौपदी गेली वनांतरा ॥ ९६ ॥
धौम्य दर्भां धरूनि मुष्टीं॥ पढत गेला अंत्येष्टी ॥
ज्येष्ठकनिष्ठनामें अलोटी ॥ तर्पण पुढें करावया ॥ ९७ ॥
विदुरास धृतराष्ट्र म्हणत ॥ पांडवीं काय सुचविला अर्थ ॥
ही लक्षणें विपरीत ॥ काय कारण दावावया ॥ ९८ ॥
विदुर म्हणे तो अर्थ ॥ कासया पुससी तूं व्यर्थ ॥
पुत्रलोभें तुझें चित्त ॥ भ्रमीभूत जाहलें ॥ ९९ ॥
समरांगणीं जीवनाश अपार ॥ होईल ब्रह्मसृष्टीचा संहार ॥
म्हणवूनि धर्मराज वक्त्र ॥ झांकोनि गेला न पाहे ॥ १०० ॥
तेरा वरुषांउपरी ॥ कौरवप्रेतें पडतील समरी ॥
तीं न पहावया दृष्टीभरी ॥ मुख झांकिलें म्हणूनियां ॥ १०१ ॥
भुजा विलोकी भीमसेन ॥ मनांत संकल्पिलें हेंचि पूर्ण ॥
दोर्दंडबलेकरून ॥ कौरवप्रेतें पाडीन मी ॥ १०२ ॥
सागरींची वाळू न गणवे जाण ॥ तैसे असंख्य सोडीन बाण ॥
घेईन कौरवांचे प्राण ॥ हेंचि अर्जुन चिंतित ॥ १०३ ॥
फाल्गुनें दाविलें हेंचि पूर्ण ॥ फाल्गुनमासीचे मंत्र जाण ॥
जपतील तुझे नंदन ॥ येतां मरण शेवटीं ॥ १०४ ॥
रक्तपंक माजेल रणीं ॥ कौरवप्रेतें पडतील मेदिनी ॥
चिखले मुखें जातील भरूनी ॥ गृध बैसोनि टोंचिती ॥ १०५ ॥
हें चिन्ह सहदेवें दाविलें ॥ धूळीने अंग भरिलें नकुलें ॥
स्वरूप त्याचें तेजागळें ॥ कामिनी भुलती पाहतां ॥ १०६ ॥
यालागीं मृत्तिकामलें ॥ शरीर झांकिलें नकुलें ॥
चिन्ह द्रौपदीनें दाविलें ॥ अर्थ ऐक तयाचा ॥ १०७ ॥
चवदा वर्षांउपरी जाणा ॥ हृदय पिटितील तुझ्या सुना ॥
मुक्तकेशा येतील स्वाना ॥ अंत्येष्टिविधि पहावया ॥ १०८ ॥
धौम्य हेंचि जाणवित ॥ कौरवांची क्रिया समस्त ॥
करावयासी जपत ॥ अंत्येष्टिविधि आधींच पैं ॥ १०९ ॥
पांडव प्रवेशतां वनांतरी ॥ दुश्चिन्हें उदेलीं कुंजरपुरीं ॥
स्वप्नें देखती कौरवनारी ॥ दुष्ट दुःखदायक जीं ॥ ११० ॥
विगतधवा कामिनी ॥ ओटी भरिती मृत्तिका घेऊनी ॥
मंगलसूत्रें तोडोनी ॥ कालपुरुष नेतसे ॥ १११ ॥
कृष्णवस्त्रवेष्टित नारी ॥ कौरवांचिया शिरावरी ॥
तैल सिंदूर घालिती झडकरी ॥ आरक्त पुष्यें तुरंबोनियां ॥ ११२ ॥
पृथ्वी तप्त जाहली बहुत ॥ सूर्य वह्निवृष्टि करित ॥
मेघ रक्तधारा वर्षत ॥ प्रलयवात सुटला ॥ ११३ ॥
भयभीत दुर्योधन ॥ विपरीत चिन्हे ऐकोन ॥
द्रोणास म्हणे करीं जतन ॥ गुरुवर्या येथूनि ॥ ११४ ॥
सुयोधनास म्हणे द्रोण ॥ तुझिया काजीं वेंचीन प्राण ॥
सर्वां ठायीं यश साधीन ॥ एका पांडवांवांचूनि ॥ ११५ ॥
कृष्णकृपेचा वज्रपंजर ॥ पांच पांडव त्यांत कीर ॥
सुखरूप खेळती अहोरात्र ॥ निर्भय निःशंक सर्वदा ॥ ११६ ॥
माझीं शस्त्रें त्यांस समरी ॥ न रुपतीच गा निर्धारीं ॥
जैसा मेघ वर्षतां पर्वत अंतरीं ॥ दुःख कांहीं मानीना ॥ ११७ ॥
द्रुपदाचा केला अपमान ॥ तेणें तें वैर स्मरोन ॥
पुत्र जन्मविला धृष्टद्युम्न ॥ अग्निसंभव मजलागीं ॥ ११८ ॥
त्याचे हातें मज मृत्य ॥ होणार न चुके बलवंत ॥
तरी मी एक सांगेन हित ॥ धरिसी जरी मानसीं ॥ ११९ ॥
तरी वैरभाव सांडोनी ॥ पांडव आणावे परतोनी ॥
शक्रप्रस्थीं तयां स्थापूनी ॥ सुखरूप नांदावे ॥ १२० ॥
धृतराष्ट्र म्हणे विदुरासी ॥ जाऊनि आणीं पांडवांसी ॥
समजावूनि तयांसी ॥ शक्रप्रस्था पाठवूं ॥ १२१ ॥
जरी ते न येती वनाहूनी ॥ तरी वस्त्रभूषणें वाजीवारणी ॥
अपार संपत्ति नेऊनी ॥ द्यावी त्यांसी वनांतरीं ॥ १२२ ॥
मग बोले विदुर वचन ॥ ते सर्वथा न येती परतोन ॥
तुझा कुलक्षय केल्याविण ॥ समाधान नव्हेचि ॥ १२३ ॥
वचन विदुराचें परम तीव्र ॥ ऐकतां खोंचलें अंतर ॥
अंध व्याकुल अहोरात्र ॥ चिंतार्णवीं बुडाला ॥ १२४ ॥
संजय म्हणे अंबिकानंदना ॥ पांडव दवडिले दूरी वना ॥
एकछत्र राज्यासना ॥ दृढ नांदे पुत्रपौत्रीं ॥ १२५ ॥
लक्ष्मी आणि यश ॥ तिहीं तुम्हांस दिधली भाष ॥
ईश्वरी कळा आसमास ॥ काळें तुम्हांस दिधली ॥ १२६ ॥
तुम्हांस हा भरंवसा निश्चित ॥ आतां कां वाटतें दुश्चित्त ॥
भाग्य भोगीं बहुत ॥ दिवसेंदिवस चढतेंचि ॥ १२७ ॥
अंध खोंचला मानसीं ॥ म्हणे कां काळिजीं सुरी घालिसी ॥
विपरीत व्हावें पांडवांसी ॥ माझे मानसीं नसे हें ॥ १२८ ॥
मी चक्षुहीन वृद्ध गलित ॥ पुत्र न मानिती वचनार्थ ॥
ऐश्वर्यमदें जाहले मत्त ॥ न गणिती हें त्रिभुवन ॥ १२९ ॥
पांडव माझे शत्रू केले ॥ चिंताग्नींत मज लोटिलें ॥
काले पाश बांधिले ॥ कंठीं माझे संजया ॥ १३० ॥
शूळावरी रोंविला प्राणी ॥ त्यास उपभोग काय देऊनी ॥
कड्यावरून लोटिला धरणीं ॥ सुमनशेज काय त्या ॥ १३१ ॥
तैसें पांडवांशी वैर पडिलें ॥ आतां सुख कासयाचें बोलिलें ॥
कुलक्षय होईल बळे ॥ हे मज कळले संजया ॥ १३२ ॥
संजय म्हणे ते वेळां ॥ कुलक्षय हा तुवांच केला ॥
पुत्राचिया बोला- ॥ माजी वर्तसी ॥ १३३ ॥
सभेसी आणिली पांचाळी ॥ पुत्रांसी न वारिसी ते वेळीं ॥
वस्त्रें फेडितां हृदयकमलीं ॥ सुख तुज वाटलें ॥ १३४ ॥
दुर्योधन दुरूक्ति बोलत ॥ कर्ण शकुनि अनुमोदित ॥
ते दंतभग्न करूनि समस्त ॥ वर्जिले नाहींत तुवां कीं ॥ १३५ ॥
पंचही भ्रतार टाकूनी ॥ रिघे तूं आमुचे सदनीं ॥
तुझा पुत्र बोलिला वाणी ॥ उगाच ऐकूनि होतासी ॥ १३६ ॥
भीष्में आणि विदुरें नीती ॥ तुज सांगितली बहुत रीतीं ॥
परी न भरेचि तुझे चित्तीं ॥ वाउग्या गोष्टी काय आतां ॥ १३७ ॥
आपल्या हस्तें घेऊनि शस्त्र ॥ काळ नाहीं छेदित शिर ॥
बुद्धि विपरीत होतां निर्धार ॥ कालक्षोभ जाणिजे ॥ १३८ ॥
केल्या अन्यायाच्या राशी ॥ व्यर्थ कासया गोष्टी बोलसी ॥
केलें तें फल भोगिसी ॥ अल्पकाळेंचि तत्वतां ॥ १३९ ॥
महासती ते पांचाली ॥ जिचा कैवारी वनमाली ॥
अपार वस्त्रें पुरविलीं ॥ देखिली सकळीं सभेंत ॥ १४० ॥
धृतराष्ट्र म्हणे संजयासी ॥ जितक्या गोष्टी तूं बोलसी ॥
आल्या मज प्रत्ययासी ॥ सत्य सत्य सुजाणा ॥ १४१ ॥
पांडवांचा रक्षक ॥ पूर्ण असे द्वारकानायक ॥
हें जाणतां मूर्ख ॥ कैसा जाहलों संजया ॥ १४२ ॥
माझें प्रारब्ध घोर गहन ॥ न कळे तयाचें निदान ॥
दुःख भोगवील संपूर्ण ॥ हें मीं बरवें जाणिलें ॥ १४३ ॥
द्रौपदी क्षोभविली परम ॥ कौरव होती अवघे भस्म ॥
ईश्वरी मायेचें दुर्गम ॥ विंदाण वाटे मजलागीं ॥ १४४ ॥
पांडव गेले बाहेरी ॥ एकचि आकांत जाहला नगरीं ॥
आक्रंदल्या सकल नारी ॥ जाहली बोहरी वंशाची ॥ १४५ ॥
द्रौपदीस कुशब्द बोलिले ॥ ते श्रीधरें सकल ऐकिले ॥
तेणें मनांत ऐसें भाविलें ॥ ते शब्द लागले देवकीतें ॥ १४६ ॥
द्रौपदी नव्हे हे देवकी माउली ॥ दुर्जनीं सभेंत गांजिली ॥
सुदर्शन सोडोनि ते वेळीं ॥ शिरें छेदावीं कौरवांचीं ॥ १४७ ॥
परि सत्वधीर जगन्नाथ ॥ क्षमा केली तेव्हां बहुत ॥
द्रौपदीचे करूनि निमित्त ॥ कुलक्षय करील तो ॥ १४८ ॥
संजय म्हणे धृतराष्ट्रासी ॥ आतां गोष्टी आल्या प्रत्ययासी ॥
वैशंपायन जनमेजयासी ॥ कथा सांगे रसाळ ॥ १४९ ॥
सभापर्व संपलें येथ ॥ पुढें वनपर्व अद्‌भुत ॥
जें ऐकतां पापपर्वत ॥ भस्म होती क्षणार्धें ॥ १५० ॥
भारत सरोवर निर्मल ॥ सभापर्व त्यांत कमल ॥
सज्जनमिलिंद सकल ॥ आमोद सेवूं धांवती ॥ १५१ ॥
कीं भारत हा ब्रह्मगिरी ॥ सभापर्व निघाली गोदावरी ॥
प्रेमसिंहस्थीं नरनारी ॥ स्नानालागीं धांवती ॥ १५२ ॥
भारत हा क्षीरसागर ॥ असंभाव्य भरला थोर ॥
तेथें ब्रह्मानंद श्रीधर ॥ तृषाक्रांत धावला ॥ १५३ ॥
त्यांतील अंजलीनें किंचित ॥ घेतलें तृष्णानिवारणार्थ ॥
तैसा सारभाग यथार्थ ॥ भारतांत निवडिला ॥ १५४ ॥
पाल्हाळ बोलतां अपार ॥ ग्रंथ होईल जैसा समुद्र ॥
बोलतां ध्वनित अणुमात्र ॥ कथा विचित्र दिसेना ॥ १५५ ॥
संकोच पाल्हाळ टाकूनि समस्त ॥ मित रसाळ प्रकटला ग्रंथ ॥
रचनासाहित्य पंढरीनाथ ॥ कर्ता येथें जाणिजे ॥ १५६ ॥
पांडवप्रतापग्रंथ गहन ॥ पांडुरंग हें अभिधान ॥
नाम ठेविलें असेल पूर्ण ॥ प्रीतींकरून सत्य पै ॥ १५७ ॥
पुढें वनपर्व वसंतवन ॥ दृष्टांतवृक्ष दाटले सघन ॥
साहित्यवनश्री पूर्ण ॥ विराजमान टवटवित ॥ १५८ ॥
ते छायेसी पंडित सुमती ॥ सदाकाल घेती विश्रांती ॥
श्रीधर तेथें अहोरात्रीं ॥ चरण तळहातीं तयांचे ॥ १५९ ॥
श्रीमद्‌भीमातटविलासा ॥ दिगंबरा पंढरीशा ॥
श्रीधरवरदा अविनाशा ॥ ब्रह्मानंदा दयाब्धे ॥ १६० ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बाविसाव्यांत कथियेला ॥ १६१ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्रीधरकृत ॥
पांडव गेले वनवासाप्रत ॥ सभापर्व संपविलें ॥ १६२ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे सभापर्वणि द्वाविंशोऽध्यायः
अध्याय बाविसावा समाप्तGO TOP