श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय अकरावा
भीमाने बकासुराचा वध केला
॥ श्रीगणेशायनमः ॥
स्कंधीं वाहूनि वसुदेवभगिनी । कडिये जावळे बंधु घेऊनी ।
धर्मार्जुनांतें क्षणीं । मार्ग दावीत जातसे ॥ १ ॥
निबिड वृक्ष वनीं लागले । कीं भूमीवरी आलीं मेघमंडलें ।
तीं भीम भेदीत चाले बळें । महासमर्थ म्हणोनि ॥ २ ॥
माजी न दिसती सूर्यकिरण । भयंकर विचरती श्वापदगण ।
सरिता माळ ओलांडून । महापर्वतीं जातसे ॥ ३ ॥
विसांवा नाहीं क्षणैक । न सेवितां फल मूल उदक ।
सप्तप्रहरपर्यंत देख । मार्ग अपार चालती ॥ ४ ॥
एक याम उरली यामिनी । तों तृषाक्रांत जाहली जननी ।
म्हणे भीमा उदक आणीं ये क्षणीं । विसांवा घेईं एकदा ॥ ५ ॥
तो न्यग्रोधवृक्ष तेथें देखा । भूमीपर्यंत लवल्या शाखा ।
विशाल पारंबिया सुरेखा । गगनचुंबित दिसती पैं ॥ ६ ॥
पक्वफलें विखुरलीं धरणीं । जैसे पसरले प्रवालमणी ।
पक्षी करिती नानाध्वनी । वटीं जे कां राहती त्या ॥ ७ ॥
तेथें माता बंधु निजवूनी । उदक शोधूं गेला काननीं ।
वनकर्दलींचा द्रोण करुनी । तडागजीवनीं भरियेला ॥ ८ ॥
जवळी कैचें पंचपात्र । भिजवूनि घेतलें उत्तरीयवस्त्र ।
परतोनि आला सत्वर । तवं तीं भूतळीं लोळती ॥ ९ ॥
तें देखोनि भीमसेन । शोकसमुद्रीं गेला बुडोंन ।
म्हणे रे चतुरानन । काय संसारीं घातलें ॥ १० ॥
त्रैलोक्यनाथ चक्रपाणी । त्याचिया जनकाचि भगिनी ।
महाराज पंडुराजाची पत्नी । स्नुषा विचित्रवीर्याची ॥ ११ ॥
आम्हां दरिद्रयांची जननी । प्रेतवत पडली धरणीं ।
अजातशत्रु पुण्यखाणी । धर्मराज धर्मात्मा ॥ १२ ॥
अनाथ भणंग दीन । तैसें भूमीवर केलें शयन ।
शोधितां ब्रह्मांड संपूर्ण । उपमा ज्यांसी दुजी नसे ॥ १३ ॥
विद्यासागर अर्जुन । उपमे भार्गव कीं जानकीजीवन ।
अहा कर्मा दीनवदन । सव्यासाची पडिलासे ॥ १४ ॥
दिव्यरुप पाहून । सुरललना जाती भुलोन ।
ज्याचें चातुर्य देखोन । सरस्वती तटस्थ पैं ॥ १५ ॥
ते हे नकुल सहदेव निश्चित । जैसे कौस्तुभ आणि स्यमंत ।
अहा ते धुळींत लोळत । भीम करीत शोक ऐसा ॥ १६ ॥
ऐसा भीम खेद करित । तों हिडिंबी राक्षसी आली तेथ ।
साही जणां देखोन बोलत । वृक्षीं बसून हिडिंब ॥ १७ ॥
हीं साही जणें मारुनी । शीघ्र भक्षावया आणीं ।
हिडिंबी धांवली ते क्षणीं । तों भीमसेन देखिला ॥ १८ ॥
देखून स्वरुप सुंदर । मदनें व्यापिलें तिचें शरीर ।
म्हणे याचे पाडें रतिवर । तुलने उणा वाटतसे ॥ १९ ॥
यास भ्रतार करीन । चिरकाल सुखा भोगीन ।
व्यर्थ काय कायेस मारुन । मांस भक्षण न करीं मी ॥ २० ॥
ऐसा विचार करुन । राक्षसीरुप पालटून ।
रंभेऐसी जाहली कामिन । मधुर वचन बोलतसे ॥ २१ ॥
तुम्ही कोण कोठील सुकुमार । दिसतां सभाग्य राजकुमार ।
नगर त्यागून वन घोर । काय निमित्तें सेविलें ॥ २२ ॥
परमदुर्घट हिडिंबवन । देवांस येथें न घडे आगमन ।
येथें तुम्ही मनुष्यें होऊन । निर्भय निःशंक पहुडलां ॥ २३ ॥
हिडिंबराक्षस महादारुण । तुम्हांस भक्षील न लागतां क्षण ।
तुज मी स्वबळें वांचवीन । भ्रतार होई माझा तूं ॥ २४ ॥
तुज मी पृष्ठीं वाहून । द्वीपांतरा सुखें नेईन ।
या पांचांसी भक्षून । हिडिंब तृप्त होईल कीं ॥ २५ ॥
मी राक्षसाची बहिण । परि निष्कपट तुज शरण ।
या पाचाची आस्था सोडून । वरीं मज सुंदरा ॥ २६ ॥
यावरी बोले भीमसेन । हिडिंबास क्षणें मारीन ।
जैसा रगडिजे मत्कुण । तेवीं मर्दीन क्षणार्धें ॥ २७ ॥
सांडून बंधु जननी । तुज वरुं काय राक्षसिणी ।
कोट्यवधि राक्षस अर्धक्षणीं । हिडिंबाऐसे मारीन ॥ २८ ॥
ऐसीं उभयतांची वचनें ते काळीं । वृक्षावरुन हिडिंबें ऐकिलीं ।
दांत खाऊन ते वेळीं । हाक फोडिली कृतांतवत ॥ २९ ॥
मग उडी घातली सत्वर । खदिरांगारवत केले नेत्र ।
विक्राळ वदन विशाळ शरीर । भाळीं सिंदूर चर्चिला ॥ ३० ॥
कज्जलपर्वताऐसा थोर । बाहेर दाढा विक्राळ शुभ्र ।
ऐसा धांवतां तो असुर । हिडिंबी म्हणे भीमातें ॥ ३१ ॥
उठवी बंधु आणि जननी । गगना नेईन स्कंधीं वाहूनी ।
भीम म्हणे पहुडलीं श्रमोनी । न उठवींच सर्वथा ॥ ३२ ॥
यांची निद्रा न मोडतां जाण । हिडिंब मारुन करीन चूर्ण ।
तों राक्षस क्रोधायमान । भगिनीप्रति बोलत ॥ ३३ ॥
दैवें आहार दिधला पाठवून । त्यास तूं पापिणि केलें विघ्न ।
तूं केवळ आहेस जारिण । कैंचा भ्रतार मेळविला ॥ ३४ ॥
आतां साही जणें मारुन । शेवटीं तुझा घेईन प्राण ।
वृक्ष विशाल उपटून । भीमावरी धांविन्नला ॥ ३५ ॥
बळें वृक्ष भोवंडून । भीमावरी घाली उचलून ।
तेणें प्रचंड घेऊन पाषाण । हृदयावरी ताडिला ॥ ३६ ॥
राक्षस खवळला अद्भुत । भीमाचे कंठीं मिठी घालित ।
मग मल्लयुद्ध अत्यद्भुत । घटिका एक जाहलें ॥ ३७ ॥
मुष्ठिप्रहार हाणिती । तेणें दणाणित भयें क्षिती ।
लत्ताप्रहारें ताडिती । थडका देती परस्परें ॥ ३८ ॥
राक्षस धांवे मुख पसरुन । म्हणे कंठ फोडीन रोंवून दशन ।
भीमें हाणोनि चडकण । दंतपंक्ति पाडिल्या ॥ ३९ ॥
हिडिंबास भीम म्हणत । चांडाला शब्द न करीं बहुत ।
मम माता बंधु समस्त । श्रमें निद्रिस्त जाहलीं ॥ ४० ॥
दोघे भिडले अतुलबळी । परी भीमाची शक्ती आगळी ।
हुणमिया हाणोनि वक्षःस्थलीं । शब्द करी राक्षस ॥ ४१ ॥
दणदणाट ऐकतां कानें । जागीं जाहलीं पांचही जणें ।
सिंहनाद करितां तेणें । गेले प्राणें पशुपक्षी ॥ ४२ ॥
झगडती दोघे ऐरावत । कीं पडती पर्वतावरी पर्वत ।
तों चापासी बाण लावून पार्थ । असुरावरी धांविन्नला ॥ ४३ ॥
नकुल सहदेव घेऊन खड्गें । राक्षसावरी चालिले वेगें ।
हिडिंब चहूंकडे रागें । पर्वत पाषाण भिरकावी ॥ ४४ ॥
भीम बंधूस वारित । तुम्हीं असावे स्वस्थचित्त ।
धर्मापाशीं बसून कौतुकार्थ । पहा आतां क्षणभरी ॥ ४५ ॥
बंधु थोपवून क्षणभरी । भीम असुराचे चरण धरी ।
मग उचलूनियां अंबरीं । भूमीवरी आपटिला ॥ ४६ ॥
सवेंच हस्तचरण गोंवून । मोट केली गळा बांधून ।
बळें आकाशीं नेऊन । शिळेवरी आपटिला ॥ ४७ ॥
भरला मृदघट पडतां निश्चिती । बहुत तुकडे जैसे होती ।
तैसा हिडिंब पडतां क्षिती । गतप्राण जाहला ॥ ४८ ॥
जयजयकार करुन । सुमनें वर्षती सुरगण ।
कुंती माता भीमार्जुन । नकुल सहदेव आनंदती ॥ ४९ ॥
मातेस नमस्कारी भीम । बंधु आनंदे देती क्षेम ।
तों हिडिंबी पुढें सकाम । उतावळी वरावया ॥ ५० ॥
भीम म्हणे तूं असुरी । मी कदाही तुज न वरीं ।
बंधुचें वैर अंतरी । स्मरुन करशील घात तूं ॥ ५१ ॥
कुंतीचे चरणी माथा ठेवून । हिडिंबी बोले निश्चयवचन ।
मी राक्षसी म्हणून । उपेक्षा माझी करुं नका ॥ ५२ ॥
साही जणांस पृष्ठीं वाहून । नेईन दुस्तरवनें ओलांडून ।
महाविघ्नें निवटून । सुख देईन समस्तां ॥ ५३ ॥
माझे पोटीं होईल सुत । तो शत्रु संहारील समस्त ।
साक्ष ठेऊन रुक्मिणीकांत । प्राण रक्षिल अर्जुनाचा ॥ ५४ ॥
आज आपले हस्तेंकरुन । माझें भीमाशीं लावीं लग्न ।
कुंती म्हणे धर्मालागून । विचार मानसी आणिजे ॥ ५५ ॥
कापट्य किंवा शुद्ध मन । हें धर्मारायें जाणून ।
पुढील भविष्यार्थ संपूर्ण । विदित केला सर्वांतें ॥ ५६ ॥
भीमास म्हणे सर्वज्ञ । इजपासून अपाय नव्हे पूर्ण ।
अवश्य लावीं इशीं लग्न । मनांत आन न धरावें ॥ ५७ ॥
धर्म म्हणे हिडिंबे पाहीं । तूं दिवसा सुखें भीम नेई ।
रात्र होतांच आणून देईं । रक्षावया आम्हांतें ॥ ५८ ॥
तों भीम बोले उत्तर । एक जाहलिया तुज कुमार ।
मग संबंध साचार । पुनः तुजशीं घडेना ॥ ५९ ॥
येरी अवश्य म्हणोन तत्काल । भीमाचे गळां घाली माळ ।
भीम पृष्ठीं घेऊन सबळ । क्रीडावनाप्रति गेली ॥ ६० ॥
पर्वतमौलीं गंगाजलीं । रमणिकोद्यानीं एकांतस्थलीं ।
सुखें सदा सुरतमेळीं । भीमाशीं क्रीडा करितसे ॥ ६१ ॥
मानससरोवरीं मैनाकपाठारीं । हिमाचलीं सोमकांतकासारीं ।
द्रोणाचलीं चंद्राचलीं झडकरी । नेऊन सुखें क्रीडत ॥ ६२ ॥
षड्रसान्नभोजन । नानापरी रस कामवर्धन ।
आमृतासमान फळें भक्षून । मग सुखशयनीं पहुडती ॥ ६३ ॥
लोटतां एक संवत्सर । जन्मला घटोत्कच कुमार ।
पितयातुल्य सबलशरीर । महावीर भैमी तो ॥ ६४ ॥
उपजतांचि शस्त्रास्त्रीं प्रवीण । भेटला धर्मास येऊन ।
कुंती पितृजननी धर्मार्जुन । नकुल सहदेव वंदिले ॥ ६५ ॥
म्हणे संकट पडतां पूर्ण । माझें तुम्ही करितां स्मरण ।
राक्षसदळ असंख्य घेउन । शत्रु निवटीन संग्रामीं ॥ ६६ ॥
हिडिंबी सर्वांतें प्रार्थित । संकटी येईन पुत्रासहित ।
क्षोभलिया तुम्हांवरी कृतांत । पायें लोटीन माघारां ॥ ६७ ॥
ऐसें बोलोन घेतली आज्ञा । नमस्कारुन साही जणां ।
पुत्रासहित महावना । उत्तरपंथें ती गेली ॥ ६८ ॥
कर्ण प्रेरील शक्रशक्ती । अर्जुनास रक्षावया अमरपती ।
भैमी जन्मविला निश्चिती । भविष्यार्थ जाणूनियां ॥ ६९ ॥
धर्म म्हणे आतां येथूनी । निघावें हें वन त्यागूनी ।
भीम कुंतीस स्कंधीं घेऊनी । निघता जाहला तात्काल ॥ ७० ॥
जटा वल्कलवेष्टित । अजिनांबरें पांघरत ।
नाना वनें विलोकित । दर्शनें घेत संतांचीं ॥ ७१ ॥
ऋष्याश्रमीं राहती । वेदशास्त्रें अभ्यासिती ।
चौसष्टकलाप्रवीण होती । आकळिती चौदा विद्या ॥ ७२ ॥
रात्रंदिवस कृष्णस्मरण । सदा करिती कृष्णकीर्तन ।
रुक्मिणीवल्लभांचें पूजन । येणेंकरुन काल क्रमिती ॥ ७३ ॥
पुढें जाती वेगेंकरुन । तों अकस्मात कृष्णद्वैपायन ।
त्या दयासिधूंचें दर्शन । महदभाग्यें जाहलें ॥ ७४ ॥
साही जणें नमस्कार । साष्टांग घालूनि जोडिती कर ।
जय जय सद्गुरो जगदोद्धार । करावया जन्मलासी ॥ ७५ ॥
एकानन तूं सत्यलोकेश । द्विभुज परि रमविलास ।
अभाललोचन व्योमकेश । आम्हां दीनां रक्षिसी ॥ ७६ ॥
मग बोले वेदव्यास । यावत शत्रु पावती नाश ।
कल्याण आहे तुम्हांस । भाग्य विशेष प्रकटेल पैं ॥ ७७ ॥
विजयश्री घालील माळ । पाठ राखील श्रीघननीळ ।
ऐसें बोलून तत्काल । व्यास गुप्त जाहले ॥ ७८ ॥
एकचक्रनामें नगरीं । साही जणें ते अवसरीं ।
एका ब्राह्मणाचे घरीं । गुप्तरुपें राहती ॥ ७९ ॥
बोलणें कोमल विनयता । स्नेहेंकरुन केली आप्तता ।
सत्य प्रिय भाषण नम्रता । तया वश्य सर्व प्राणी ॥ ८० ॥
सहनशील आणि सत्य । तेणें विश्व जिंकिलें समस्त ।
एवं पांडव सर्वगुणभरित । म्हणून वंद्य विश्वातें ॥ ८१ ॥
जया सर्वभूतीं दया समान । देवही वंदिती त्याचे चरण ।
वृत्ति जाहली निरभिमान । तरी तो मान्य हरिहरां ॥ ८२ ॥
पांचही भिक्षा करुनी । कुंतीपाशीं देती आणूनी ।
त्यांत ती अर्ध ओपी भीमालागूनी । आहार फार म्हणोनियां ॥ ८३ ॥
उरल्यांत आपण आणि चौघे सुत । क्षुधानल करिती शांत ।
तों ब्राम्हणगृहीं अकस्मात । शोकध्वनि ऐकिली ॥ ८४ ॥
गृहस्वामी भार्या कन्या सुत । एकाच्या गळां एक पडत ।
दीर्घस्वरें रोदन करिती अद्भुत । तों कुंती पुसत तयांसी ॥ ८५ ॥
तुमचें दुःख असेल जें दारुण । तें क्षणांत टाकीन परिहारुन ।
तुमचे गृहीं बसलों बहुत दिन । होईं उत्तीर्ण उपकारा ॥ ८६ ॥
गृहस्थ शोकें व्याकुल पूर्ण । म्हणे मी बकारण्या जाईन ।
कन्या आणि पुत्रसंतान । करीं पालन ययांचें ॥ ८७ ॥
स्त्री म्हणे मीच जाईन । कन्या म्हणे मी देह समर्पीन ।
तों कुमार बोले वचन । देईन पूर्ण देह माझा ॥ ८८ ॥
कळवळलें कुंतीचें मन । मग म्हणे त्या गृहस्थालागून ।
तुम्हां काय संकट सांगा पूर्ण । तें परिहारीन क्षणार्धें ॥ ८९ ॥
द्विज म्हणे पृथेलागून । आमचें संकट परम दारुण ।
जें प्रत्यक्ष हरिहरांचेन । न टळे माये आलें तें ॥ ९० ॥
नगराबाहेर दों कोसांआंत । बकराक्षस आहे वसत ।
त्यास नगरलोकीं समस्त । भक्ष्यभागनेमिला ॥ ९१ ॥
एक रथभरी दिव्यान्न । वरी एक पुरुष बैसवून ।
महिषमहिषी लावून । रथालागीं चालविती ॥ ९२ ॥
साठ खंड्यांचें अन्न नित्य । दहा खंड्या वरी पिशित ।
शतांचीं शतें अजाबस्त । पुरुष एक त्यावरी ॥ ९३ ॥
ज्या दिवशीं चुकेल हा नेम । तेव्हां तो भक्षिल सर्व ग्राम ।
आमुचे घरीं पाळी दुर्गम । आली प्राण घ्यावया ॥ ९४ ॥
गृहाप्रमाणें आली पाळी । ती न चुके कदाकाळीं ।
कुमारास बालदशा कोंवळीं । कैसा देऊं तयातें ॥ ९५ ॥
जरी आतां मीच जाईन । तरी तिघेंही मरतील अन्नाविण ।
स्नेहभरित माउली तूं पूर्ण । सांगें कैसें करुं आतां ॥ ९६ ॥
कुंती म्हणे खेद टाकीं समस्त । माझा द्वितीय सुत बलाद्भुत ।
त्यास देतें मी यथार्थ । मारील सत्य बकातें ॥ ९७ ॥
सर्वारिष्टांची करुन शांती । विजयरुप येईल मागुती ।
ब्राह्मणांस भरंवसा चित्तीं । सहसाही न वाटे ॥ ९८ ॥
कुंती सांगे एकांतीं नेऊन । बकासुराहून बल गहन ।
सहस्त्र राक्षस मर्दून । पुत्र माझा येईल कीं ॥ ९९ ॥
लोकांत प्रगट न करीं मात । विप्र कुंतीचे चरण धरित ।
तों भिक्षा करुन अकस्मात । पांचही आले गृहातें ॥ १०० ॥
ब्राह्मण म्हणे मनांत । हे साच केवीं मानूं मात ।
परि न कळे नवखंड मही समस्त । होईल साह्य दिसतें पैं ॥ १०१ ॥
तों कुंती सांगे गुप्त रहस्य । भीम म्हणे जातों अवश्य ।
धर्म वदे पुण्य विशेष । परोपकार करावा ॥ १०२ ॥
असो अन्नें भरिला रथ । सामग्री घेऊन त्वरित ।
भीम त्यावरी बैसत । हर्षयुक्त निर्भय पैं ॥ १०३ ॥
लोक आश्चर्य करित । हा निर्भय बैसला आनंदभरित ।
भीम आपले हस्तें रथ पिटित । गेला तेव्हां बकारण्या ॥ १०४ ॥
रथ सोडिला बकारण्यांत । महिष महिषी अजाबस्त ।
ग्रामपंथें पिटिलीं समस्त । आलीं पळत नगरासी ॥ १०५ ॥
मनीं काळासी बैसे दचक । ऐशी भीमें फोडिली हांक ।
म्हणे कोण आहे बक । दावीं मुख काळें तुझें ॥ १०६ ॥
हें अन्न प्राप्त नाहीं तुजप्रती । तुझे मुखांत पडली माती ।
ग्रासही न लाभे निश्चितीं । पावसी हातें मृत्यु माझ्या ॥ १०७ ॥
पहिलेंच जाहलें संध्यास्नान । भीम जेवूं लागला अन्न ।
परम स्वादिष्ट रुचि घेऊन । उपचारेंसीं सेवितसे ॥ १०८ ॥
ऐकतां भीमाची थोर हाक । क्रोधें धांवे असुर बक ।
तों अन्न भक्षितो निःशंक । मागें पुढें न पाहे ॥ १०९ ॥
म्हणे महिष पशु दवडून । माझें भक्षितोसी सर्व अन्न ।
आतां मी तुजला ग्रासीन । शिर छेदीन क्षणार्धें ॥ ११० ॥
म्हणे तूं आहेस कोण । प्रत्युत्तर नेदी भीमसेन ।
उगाच जेवी धरलें मौन । परतोन पाहेना त्याकडे ॥ १११ ॥
जैसे निंदक निंदिती अपार । परि न चळे साधूंचें अंतर ।
तैसे बडबडे बकासुर । परि वृकोदर न गणी तें ॥ ११२ ॥
बकशरीर पर्वताकार । विक्राळ तोंड भाळीं शेंदूर ।
हाक देऊन परम क्रूर । दांत खाऊन धांवला ॥ ११३ ॥
वज्रमुष्टि नेटें वळोन । पृष्ठीवरी ताडिला भीमसेन ।
जैसा पंचाननाप्रति धांवून । ताडी कुंजर शुंडेनें ॥ ११४ ॥
चूर होती महापर्वत । ऐसे मारी मुष्टिघात ।
रुचि घेऊन जेवित । भीमसेन अन्नातें ॥ ११५ ॥
विशाल वृक्ष बळें घेतला । पृष्ठावरी भीमाचे मोडिला ।
परि न बोलेचि उगला । ग्रास घेतां न राहे ॥ ११६ ॥
मग घेऊन चंड पाषाण । बहुत घाली उचलून ।
कोंपरखिळ्या गुडघे जाण । मारितांही हालेना ॥ ११७ ॥
माझें भक्षिसी अवघें अन्न । चांडाळा तूं आहेस कोण ।
शंख केलिया भीमसेन । सहसाही न बोले ॥ ११८ ॥
मग भीमाचे दोन्ही हस्त । बक धरावया धांवत ।
येरें पसरुनियां कर अद्बुत । दोन्ही कर धरी त्याचे ॥ ११९ ॥
सव्यहस्तें जेवित । उरों नेदी अन्न किंचित ।
म्हणे भोक्ता रुक्मिणीकांत । ऐसें स्मरत वारंवार ॥ १२० ॥
भोजन जाहलें संपूर्ण । मग उभा ठाकला भीमसेन ।
म्हणे तुझें सामर्थ्य गहन । दावीं कैसें राक्षसा ॥ १२१ ॥
नागरिक भक्षिले त्वां बहुत । त्याचें उसणें घेईन येथ ।
राक्षसें थडक अद्भुत । दिधली तेव्हां भीमसेना ॥ १२२ ॥
म्हणे माझें अन्न भक्षिलें बहु । यावरी मी काय मृत्तिका खाऊं ।
राक्षस पसरुन बाहू । भीमास कवळूं पाहत ॥ १२३ ॥
भीमें लाथ हाणून जाणा । बक पडिला उताणा ।
मग पाषाण घेऊन त्या क्षणां । असंख्य टाकी राक्षसा ॥ १२४ ॥
सहस्त्र वृक्ष उपडिले । राक्षसें भीमावरी टाकिले ।
परी जैसे ऐरावतें न गणिले । पुष्पभार टाकितां ॥ १२५ ॥
मग वामहस्तें केश धरुनी । कटिप्रदेशीं सव्य हस्त देऊनी ।
माज मोडितां ते क्षणीं । हाका मारी बकासुरा ॥ १२६ ॥
विनायकें खंडिला दंदशूक । कीं गज मोडी इक्षुदंड देख ।
तैसा द्विखंड केला बक । प्राण गेला निघोनियां ॥ १२७ ॥
अस्थिजाल जाहलें चूर्ण । बाहेर पडले उभय नयन ।
बकसेना प्राणदान । भीमापाशीं मागे तेधवां ॥ १२८ ॥
भीम म्हणे मनुष्यें भक्षितां । बकाऐसे मारीन तत्त्वतां ।
तों ते म्हणती यावरी आतां । सर्वथाही न भक्षूं ॥ १२९ ॥
करुनि क्रिया प्रमाण । व्रत धरिती भयेंकरुन ।
मनुष्यांची मैत्री साधून । नगरांत हिंडूं लागले ॥ १३० ॥
बकासुराचे नवद्वारीं । रक्त वाहत पृथ्वीवरी ।
प्रेत ओढून एकचक्रनगरीं । महाद्वारीं टाकिलें ॥ १३१ ॥
भीमें करपाद प्रक्षालून । त्रिपदेचा जप करुन ।
येऊन वंदी मातृचरण । बंधुवर्गा भेटला ॥ १३२ ॥
घरच्या गृहस्थासी सांगत । कोठें स्वामी प्रकटों नेदीं मात ।
तों जाहला प्रभात । नारी नर ऊठती ॥ १३३ ॥
नगरद्वारीं पडिलें प्रेत । लोक धांवत असंख्यात ।
समस्त जाहले आनंदभरित । म्हणे अद्भुत वर्तलें ॥ १३४ ॥
कोणें मारिला निशाचर । बोले एकचक्रींचा नृपवर ।
ज्याची पाळी त्यास विचार । कैसा जाहला पुसावा ॥ १३५ ॥
बोलावून पुसती ब्राह्मणा । येरु म्हणे मी घेऊन अन्ना ।
तो एक तपस्वी बलाढ्य जाणा । अवचित तेथें प्रकटला ॥ १३६ ॥
तेणें प्रोक्षून उदक । क्षणमात्रें मारिला बक ।
सवेंच गुप्त जाहला देख । मज देखतां राया तो ॥ १३७ ॥
तुम्हीं सुखी नांदावें सर्वत्रीं । राक्षस मारुनियां रात्रीं ।
प्रेत टाकिलें नगरद्वारीं । कळावया तुम्हांतें ॥ १३८ ॥
राजा म्हणे अत्यद्भुत । न कळे ईश्वराचें कर्तुत्व ।
असो ब्राह्मणास राव पूजित । विप्र विजयी म्हणोनियां ॥ १३९ ॥
द्विज परतोनि सदना जात । हर्षयुक्त जाहला बहुत ।
मग वैशंपायन म्हणत । परमाद्भुत चरित्र हें ॥ १४० ॥
ऐकतां वाचितां बकाख्यान । कुलीं राक्षसपीडा न होय पूर्ण ।
भूत पिशाच जाण । सर्वथाही न बाधिती ॥ १४१ ॥
पुढें कथा ऐका गहन । कोणी एक आला ब्राह्मण ।
कुंतीस रहावयालागून । ठाव मागे वस्तीसी ॥ १४२ ॥
मग धर्मराजें सन्मानून । राहविला तो ब्राम्हण ।
निशीमाजीं चरण । चुरित पार्थ तयाचे ॥ १४३ ॥
विप्रास पुसे अर्जुन । इकडे कोठवरी आहे गमन ।
तो म्हणे पृषदपुत्र द्रुपद जाण । अहिक्षेत्रीं राज्य करी ॥ १४४ ॥
द्रुपदराजयाची कुमारी । याज्ञसेनी परम सुंदरी ।
जन्मली अग्निमाझारीं । अयोनिजा सुलक्षणा ॥ १४५ ॥
कुमार आणि कुमारी । प्रकटलीं होमामाझारीं ।
धर्म म्हणे ते अवसरीं । समूळ कथा सांगा हे ॥ १४६ ॥
विप्र म्हणे ऐका सादर । द्रोणें गांजिला द्रुपदवीर ।
पांडवीं हरिलें राज्य समग्र । त्याच दुःखें आरंबळला ॥ १४७ ॥
राज्य सांडून लज्जित । वनीं हिंडतां नृपनाथ ।
गंगातीरीं अकस्मात । ऋषिमंडळी देखिली ॥ १४८ ॥
त्याहीमाजीं श्रेष्ठ द्विज । दोघे बंधु याज उपयाज ।
ज्यांचें अगाध तपस्तेज । महाराज तपस्वी ॥ १४९ ॥
ब्रह्मांड जाळील ज्यांचा विषाद । कृपालुत्वें देती सुरेशपद ।
ऋद्धिसिद्धी अगाध । दासी तिष्ठती जवळी पैं ॥ १५० ॥
वडील याज वसे वनांत । उपयाज आश्रमीं राहत ।
त्यासी द्रुपद लोटांगण घालित । बद्धहस्तें उभा पुढें ॥ १५१ ॥
उपयाज म्हणे पृषदनंदना । काय सांग तुझी वासना ।
म्हणे समरीं संहारील द्रोणा । ऐसा पुत्र देईं मज ॥ १५२ ॥
इंदिरा किंवा गौरी । जिच्या उपमेस न तुले निर्धारीं ।
ऐसी देईं एक कुमारी । पार्थास अंतुरी होईल ते ॥ १५३ ॥
पूर्ण होतां ऐशी वासना । अर्बुदसंख्या देईन धना ।
यावरी आवडेल जें मना । ते वासना पुरवीन तुझी ॥ १५४ ॥
एकवर्षपर्यंत । सेवा करी द्रुपद अत्यंत ।
याज उपयाज प्रसन्न होत । म्हणती इच्छित दिधलें ॥ १५५ ॥
सर्वसामग्री घेऊनी । वना आली द्रुपदपत्नी ।
हवनद्रव्य ते क्षणीं । उपयाजें मंत्रविलें ॥ १५६ ॥
याज ऋषि करित हवन । पूर्णाहुती होतां जाण ।
कुमार निघाला धृष्टद्युम्न । हेमकवचमंडित ॥ १५७ ॥
किरीटकुंडलांसहित । जैसा उगवला बालादित्य ।
दिव्य खड्गें हस्त मंडित । रथासहित निघाला ॥ १५८ ॥
तों वेदीमधून ते अवसरीं । निघाली अकस्मात कुमारी ।
पुरंदरवनिता न पावे सरी । प्रत्यक्ष निर्धारीं अपर्णा ते ॥ १५९ ॥
ते नीलोत्पलदलवर्णी । ओतिली इंद्रनील गाळूनी ।
अंगाचा सुवास धांवे वनीं । क्रोश एक निर्धारे ॥ १६० ॥
दिव्य हिरे झळकती । तैशा लखलखती दंतपंक्ती ।
सुवासाकारणें धांवती । मिलिंदचक्रें त्या ठायां ॥ १६१ ॥
ऐसी प्रकटतां याज्ञसेनी । गर्जली तेथें आकाशवाणी ।
सकल स्त्रियांची स्वामिणी । मनुष्यलोकीं अवतरली ॥ १६२ ॥
इच्या योगे क्षत्रियांस अंत । हे भूभार उतरील समस्त ।
साह्य हीस श्रीभगवंत । प्रज्ञावंत पुरुष इचे ॥ १६३ ॥
पुत्र जाहला जो तुजलागूनी । तो द्रोणास मारील समरांगणी ।
ऐसें ऐकतां द्रुपदाचे मनीं । परमानंद जाहला ॥ १६४ ॥
बोलिल्याहूनि चतुर्गुणीं । याज उपयाज गौरविले दोन्ही ।
कुमार कुमारी सवें घेऊनी । राजा आला स्वनगरा ॥ १६५ ॥
उपवर जाहली पांचाली । द्रुपद सचिंत हृदयकमलीं ।
मग अर्जुनासी द्यावी ते बाळी । नेम केला राजेंद्रें ॥ १६६ ॥
पांडव जोहरांत दग्ध जाहले । द्रुपदें जेव्हां कर्णीं ऐकिलें ।
शोकसमुद्रीं पेणेम केलें । श्वासोच्छ्वास टाकोनि ॥ १६७ ॥
पांचाली देखोन सुंदर । मागो येती बहुत नृपवर ।
परि अर्जुनावीण वर । मना नये नृपाच्या ॥ १६८ ॥
पुरोहित सांगती मात । पांडव वांचले जोहरांत ।
ऐसें ऋषि बोलती ध्वनित । सत्य मिथ्या नेणवे ॥ १६९ ॥
संशयी पडला नृपनाथ । मग विचार करी मनांत ।
घोषें मही गाजवूं समस्त । स्वयंवर आहे म्हणोनियां ॥ १७० ॥
जरी पांडव असती निर्धारीं । तरी प्रकटतील स्वयंवरी ।
पार्थास हे नोवरी । द्यावी हा कृतनिश्चय ॥ १७१ ॥
श्रृंगारिलें पांचालनगर । अमरावतीहूनि सुंदर ।
मिळाले पृथ्वीचे नृपवर । सकल ऋषीश्वर चालिले ॥ १७२ ॥
छप्पन्नकोटि यादवांसहित । आला तेथे रुक्मिणीकांत ।
कौरव पातले समस्त । दुर्योधनकर्णासहित पैं ॥ १७३ ॥
पांडव आहेत कीं मृत्यु पावले । हें ईश्वरी कर्तृत्व न कळे ।
द्रुपदाचें चित्त व्याकुल जाहलें । तयां कारणें तत्वतां ॥ १७४ ॥
द्रौपदीचे पाठीं कोण बसेल । कोणा सभाग्यास माळ घालील ।
तो महोत्साह पहावया उतावीळ । मी जतसें त्वरेनें ॥ १७५ ॥
राजा वांटील बहुत धन । दरिद्र माझें होईल विच्छिन्न ।
तुम्ही पांचही बंधु सहस्त्रकिरण । केवळ मज दिसतसां ॥ १७६ ॥
मज वाटतें मनांत । तुम्ही स्वयंवरा यावें तेथ ।
न कळे ईश्वरी घटित । तेथें काय वर्तेल तें ॥ १७७ ॥
शुद्धसप्तमी फाल्गुनमास । आजपासून सप्त दिवस ।
अर्जुन कळावया विशेष । पण केला पांचाळें ॥ १७८ ॥
लोहधनुष्य चढवून । मत्स्ययंत्रीं भेदावा बाण ।
नलिकायंत्रामधून । लक्ष्यसंधान योजावें ॥ १७९ ॥
कुंतीस म्हणे गृहींची ब्राह्मणी । तुझिया तिसर्या पुत्रालागूनी ।
मज वाटतें वरील याज्ञसेनी । सकल रायांदेखतां ॥ १८० ॥
उदयाद्रीवरी आलें रविचक्र । बोलतां निशा सरली समग्र ।
आज्ञा मागोनि तो विप्र । पांचालपुराप्रति गेला ॥ १८१ ॥
पांडवांसी म्हणे वसुदेवभगिनी । आता निगावें येथूनी ।
बक मारिला ये स्थानीं । बहुत दिवस न रहावें ॥ १८२ ॥
शत्रूंलागीं प्रकटेल मात । पांचालनगरा जावें त्वरित ।
मग गृहस्वामीसी पुसोनि प्रेमयुक्त । साही जणें निघालीं ॥ १८३ ॥
परम निर्भय मनांत । रात्रंदिवस पंथ चालत ।
भीमस्कंधीं पृथा विराजत । जेवी नंदीवरी अपर्णा ॥ १८४ ॥
सायंकालीं चालिले संध्या सारुन । तों उगवला रोहिणीरमण ।
अर्धरात्री होतां जाण । शीतकिरण मावळला ॥ १८५ ॥
काळपुरुषें कृष्णकांबळी । ब्रह्मांडावरी घातली ।
की नक्षत्रमुक्ताजाळी लेइली । आकाशदेवी नावेक ॥ १८६ ॥
ब्रह्मांडकरंडीं भरलें काजळ । तें विश्वलोचनीं लेऊनि उरलें पुष्कळ ।
कीं मायामोहें सबळ । अंध केलें जननेत्रां ॥ १८७ ॥
तैलकाष्ठीं दीपिका तेथ । पुढें पाजळोन चाले पार्थ ।
त्या प्रकाशें सर्व चालत । तों जाह्नवी वाटे लागली ॥ १८८ ॥
अंगारपर्ण गंधर्वपती । स्त्रियांसमवेत नग्न रात्रीं ।
स्वेच्छें जलक्रीडा खेळती । शब्द करिती कौतुकें ॥ १८९ ॥
मार्गीं जातां पांडव । तों उग्र वचन बोले गंधर्व ।
सरा माघारे सर्व । नातरी दंडीन स्वहस्तें ॥ १९० ॥
दिवसा मनुष्यांचा संचार । रात्री यक्ष गंधर्व निशाचर ।
आपले प्राण रक्षूनि व्यग्र । पळा आतां माघारे ॥ १९१ ॥
पार्थ देत प्रतिवचन । पामरा भूमीवरी मनुष्यगमन ।
यक्षराक्षसांसी गगन । शून्यपंथ नेमिला ॥ १९२ ॥
सुरगंगा भागीरथी । सव्यगमनार्ह अहोरात्रीं ।
तूं तस्कर बैसलास पंथीं । सोडीं मार्ग जाऊं दे ॥ १९३ ॥
गंधर्व रथीं बैसोन । पार्थावरी टाकिले सहस्त्र बाण ।
मग अग्न्यस्त्र श्वेतवाहन । सोडिता झाला ते वेळे ॥ १९४ ॥
रथ अश्व गेले जळोन । खालीं पडला अंगारपर्ण ।
अर्जुनें केशीं धरुन । खड्ग ओढिलें वधावया ॥ १९५ ॥
गंधर्वस्त्री मुख्य कुंभिनी । धांवोनि लागे धर्माचे चरणीं ।
म्हणे पवित्र शिरोमणी । पतिदान देईं आम्हांतें ॥ १९६ ॥
धर्मे अर्जुनास बोधून । सोडविला अंगारपर्ण ।
तो स्त्रियांसमवेत कर जोडून । स्तुतिवादें गर्जतसे ॥ १९७ ॥
मी कुबेरमित्र जाण । हें वन माझें क्रीडास्थान ।
अंतर पडलें मजपासून । रात्रीमाजी न कळतां ॥ १९८ ॥
आतां मज स्वरुप कळलें । नारदें मज पूर्वीं सांगितलें ।
कुरुकुलीं अवतरले । पंचावतार देवांचे ॥ १९९ ॥
आजपासोनि अंगारपर्ण । सोडून दिधलें हें अभिधान ।
चित्ररथ हें येथून । लोकत्रयीं प्रकटेल ॥ २०० ॥
तरी हें अग्न्यस्त्र देईं मज । मी चाक्षुषी विद्या समर्पीन तुज ।
नर ऋषि सुरराज । त्यांसी विद्या दुर्लभ हे ॥ २०१ ॥
जें जें कौतुक जेथें पाहीं । तें तें विलोकावें बैसले ठायीं ।
हे विद्या द्वादशवर्षें पढतांही । शिष्या सहसा नाकळे ॥ २०२ ॥
पार्था तुझी बुद्धि तीक्ष्ण । आतांचि तुज शिकवीन ।
चंद्रें विश्वावसूलागून । विद्या दिधली पूर्वीं ही ॥ २०३ ॥
विश्वावसूनें मज । उपदेशिली सतेज ।
पार्थ म्हणे अग्न्यस्त्र तेजःपुंज । बृहस्पति सांगे भारद्वाजा ॥ २०४ ॥
भारद्वाज अग्निवेशा देत । अग्निवेश द्रोणास सांगत ।
द्रोणाचार्य कृपावंत । तेणें मज हें दिधलें ॥ २०५ ॥
अग्न्यस्त्र गंधर्व आकळी । चाक्षुषी विद्या पार्थ कवळी ।
आणिक गंधर्व ते वेळीं । उचित देत पांडवां ॥ २०६ ॥
वृत्रासुराचा हस्ती । वज्रें छेदितां अमरपती ।
वज्रधारेचीं खंडें निश्चिती । परमतेजाळ उडालीं ॥ २०७ ॥
त्याचे वज्रपाय तुरंग । मनोवेगी जाहले अभंग ।
इंद्रें मज दिधले सुरंग । पांचशत तेजस्वी ॥ २०८ ॥
ते मी तुम्हांस देईन । संतोष पावले पंडुनंदन ।
म्हणती आम्ही पावल्या स्वस्थान । मग धाडून देईजे ॥ २०९ ॥
आतां आम्ही गुप्त वनीं । नष्टचर्य भोगितो ये क्षणीं ।
स्वराज्यास गेलिया पुण्यखाणी । अश्व मागों पाठवूं ॥ २१० ॥
मग चित्ररथ गेला आज्ञा घेऊन । पुढें चालिले पंडुनंदन ।
लंघितां वनें गहन । तों वेदव्यास भेटला ॥ २११ ॥
साही जणें साष्टांग नमिती । वृक्षतलीं एकांतीं बैसती ।
वनपुष्पें फलें आणून प्रीतीं । जगदगुरु पूजिला ॥ २१२ ॥
मग बोले कृष्णद्वैपायन । पांचालपुरा तुम्ही जाऊन ।
द्रुपदसभेसी बैसोन । साधा कारण सर्वही ॥ २१३ ॥
पांचालीनें पंचभ्रतारां । पुर्वींच मागितलें पचंवक्त्रा ।
ते सती परमपवित्रा । भार्या होईल पांचांची ॥ २१४ ॥
मीही तेथें प्रकटेन । साधून देईन हें कारण ।
ऐसे बोलोन कृष्णद्वैपायन । अंतर्धान पावला ॥ २१५ ॥
पुढें आतां द्रौपदीस्वयंवर । कथा रसाळ सुरस फार ।
ऐकतां महापापांचा संहार । शत्रु समग्र नासती ॥ २१६ ॥
महाराज भारत ग्रंथ । प्रयाग तीर्थराज यथार्थ ।
भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । वाहे निश्चित त्रिवेणी ॥ २१७ ॥
प्रेम हाचि माघमास । मुमुक्षु स्नाना लोटती तापस ।
दोषियां आणि अभाविकांस । बिंदु येथींचा स्पर्शेना ॥ २१८ ॥
पांडुरंगपुरविलासिया । ब्रह्मानंदा यतिवर्या ।
जगदगुरो पंढरीराया । पांडवजनपालका ॥ २१९ ॥
ब्रह्मानंद श्रीधरवरद । ठेविलें नांव सांभाळीं ब्रीद ।
पांडवप्रताप ग्रंथ विशद । शेवटासी पावविजे ॥ २२० ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । एकादशाध्यायीं कथियेला ॥ २२१ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
हिडिंबवध घटोत्कचजन्मसहित । बकासुरवध कथियेला ॥ २२२ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
अध्याय अकरावा समाप्त
GO TOP
|