श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बारावा


द्रौपदी - स्वंयवर


॥ श्रीगणेशाय नमः ॥
करितां धर्माचें वर्णन । स्वधर्म होय वर्धमान ।
सकल पापें जळती जाण । भीमसेना वर्णितां ॥ १ ॥
पार्थकीर्ति वर्णितां विशेष । दुर्जनपराजय शत्रुनाश ।
वर्णितां नकुल सहदेवांस । सकल रोगां क्षय होय ॥ २ ॥
कृष्णकृपेचें बल अद्‍भुत । दुःख न पावती कदा भक्त ।
लाक्षागृहांतूनि मुक्त । पांडव जाहले पूर्वींच ॥ ३ ॥
हिडिंब बक मारुन । विजयी जाहला भीमसेन ।
पंथें जातां कृष्णद्वैपायन । भेटोनि गुज सांगितलें ॥ ४ ॥
वल्कलवेष्टित जटाधारी । दिव्यविभूति चर्चिली शरीरीं ।
जैसे शशी मित्र अंबरीं । जलदजालें झांकिले ॥ ५ ॥
कीं अवतरले पंचदेव । पांचालपुरा आले पांडव ।
तों छप्पन्नदेशींचे राव । स्वयंवरा तेथें पातले ॥ ६ ॥
पांचालपुराभोंवतें पाहत । तों द्वादशयोजनेंपर्यंत ।
राजांच्या पृतना अद्‌बुत । सैरावैरा उतरल्या ॥ ७ ॥
तगटीकनकांबरशिबिरें । उभविलीं झळकती अपारें ।
यावेगळीं दिव्य चंदनागारें । द्रुपदें दिधलीं भूभुजां ॥ ८ ॥
लक्षावधि कळस झळकती । चपलेऐसे ध्वज तळपती ।
बंधूंसहित दुर्योधन नृपती । स्वंयवरासी आलासे ॥ ९ ॥
यादवांसहित यादवेंद्र । भक्तवत्सल करुणासमुद्र ।
पश्चिमेस उतरला रुक्मिणीवर । दलभार न वर्णवे ॥ १० ॥
सप्तपुर्‍या सप्तद्वीपांहून । नवखंडांचे आले ब्राह्मण ।
असो द्रुपदसभेसी अवघे जन । राजे ऋषि मिळाले ॥ ११ ॥
कुंतीस कुलालशाळे ठेवून । सभेसी पातले पांच जण ।
वेष पालटोन पंच पंचानन । विप्रसभेंत बैसती ॥ १२ ॥
मग मनांत भाविती पांडव । आजि शल्य आणि कौरव ।
यांचे उतरुनियां गर्व । निस्तेज करुं निर्धारे ॥ १३ ॥
रायें उभविलें यंत्र पूर्ण । आजि कोण भेदितो पाहूं बाण ।
कर्णाचे कर्ण उघडून । टाळें मोकळें करुं आजी ॥ १४ ॥
पांडवीं वल्कलें वेष्टून । केलें असे भस्मोद्धारण ।
परि तीं दिव्यस्वरुपें पूर्ण । पंचादित्य जैसे कीं ॥ १५ ॥
द्रुपद म्हणे निजपुत्रांसी । आतां द्रौपदी आणावी सभेसी ।
जो भेदील यंत्रासी । तो द्रौपदीसी वरील ॥ १६ ॥
म्यां पूर्वीं इच्छिला अर्जुन जामात । परि पांडव लाक्षागृहीं जाहले गुप्त ।
किंवा आहेत पृथ्वींत । न कळे कोठें विचरती ते ॥ १७ ॥
असो करिणीवरी बैसवूनी । द्रौपदी लावण्यरत्‍नखाणी ।
सभेसी आणिली तये क्षणीं । आकर्णनयनी श्यामांगी ॥ १८ ॥
कृष्णासारिखी श्यामवर्ण । म्हणोन कृष्णा नामाभिधान ।
अंगींचा सुवास पूर्ण । एक कोश धांवतसे ॥ १९ ॥
सभेसी राजे बैसले समस्त । धृष्टद्युम्न द्रौपदीस दावित ।
नामाभिधानें बल अद्‍भुत । यथाक्रमें सांगतसे ॥ २० ॥
मग धृष्टद्युम्न बोले गर्जोन । चक्ररंध्रें भेदोनि बाण ।
जो उडवील मत्स्यनयन । त्यास हें रत्‍न प्राप्त होय ॥ २१ ॥
ऐशी परिसतां मात । समस्त राजे भयभीत ।
म्हणती धनुष्य हें अद्‍भुत । प्रथम न उचले कोणासी ॥ २२ ॥
मग हें यंत्र भेदील कोण । परी त्यांत उठला वीर कर्ण ।
जैसा जनकसभेस रावण । गर्वें करुन सरसावला ॥ २३ ॥
तैसा कर्ण बोले ते क्षणीं । द्रौपदी माझीच पट्टराणी ।
पण भेदितों पहा नयनीं । समस्त नृप हो आतांचि ॥ २४ ॥
शिवकोदंडातुल्य चाप पूर्ण । उचलावया गेला कर्ण ।
जानूपर्यंत उचलितां जाण । कासावीस जाहला ॥ २५ ॥
धांपा दाटल्या अपार । निस्तेज जाहलें शरीर ।
उलथे जैसा तरुवर । तैसा पडला भूमीवरी ॥ २६ ॥
मुकुट उसळून पडला क्षितीं । पदकें रत्‍नहार तुटती ।
हाहाकार कौरव करिती । तों द्रौपदी बोले तेधवां ॥ २७ ॥
जरी येणें यंत्र भेदिलें आतां । तरी मी यास न वरीं तत्वतां ।
हा अवर्ण कुलहीन पाहतां । माळ न घालीं सहसाही ॥ २८ ॥
परम अपमानला कर्ण । स्वस्थलीं बैसला जाऊन ।
तों द्रुपद बोले गर्जोन । पृथ्वी निःक्षत्रिय जाहली कीं ॥ २९ ॥
मग विप्रसभेमधून । उठिले तेव्हां भीमार्जुन ।
कीं गिरिदरीमधून पंचानन । दोघे तैसे ऊठती ॥ ३० ॥
कीं जैसे चंद्र आणि सूर्य । पावले एकदांचि उदय ।
द्रुपद चकित होऊन पाहे । सकलरायांसमवेत ॥ ३१ ॥
एक म्हणती हे ब्राह्मण । कैसा भेदितील न कळे पण ।
कोणी म्हणती ईश्वरकरणी विचित्र पूर्ण । न कळे कांहीं कोणासी ॥ ३२ ॥
एकला ब्राह्मण परशुधर । तेणें निःक्षत्रिय केली धरा समग्र ।
कीं बलीचे येथें वामन विप्र । पदें त्रिभुवन आटित ॥ ३३ ॥
घटोद्‍भवाची तनु धाकुटी । परी तेणें समुद्र सांठविला पोटीं ।
एकला सूर्य सर्व सृष्टीं । उजेड पाडी प्रतापें ॥ ३४ ॥
धनुष्याजवळी आला अर्जुन । पाठीं उभा भीमसेन ।
कर्ण शल्य दुर्योधन । देखतां बलहीन जाहले ॥ ३५ ॥
तंव तो महावीर पार्थ । धनुष्यास प्रदक्षिणा करित ।
क्षण न लागतां चढवित । कार्मुका गुण हेलामात्रें ॥ ३६ ॥
स्मरुनियां रुक्मिणीरमण । वेगें घेतले पंच बाण ।
प्रथमशरें यंत्र भेदून । मत्स्यनयन उडविला ॥ ३७ ॥
जाहला एकचि जयजयकार । विमानामधूनि पुरंदर ।
वर्षत सुमनसंभार । होत गजर दुंदुभींचा ॥ ३८ ॥
तंव द्रौपदी पद्मनयनी । करिणीखालीं उतरोनी ।
पार्थाचे गळां नेऊनी । दिव्यमाला घालित ॥ ३९ ॥
द्रुपद परिवारास आज्ञा करी । ब्राह्मण रक्षा रे बरव्यापरी ।
राजे उठतील झुंझारीं । अनर्थ पुढें दिसतसे ॥ ४० ॥
मग पार्थ म्हणे धर्मासी । द्रौपदीस न्यावें कुंतीपाशीं ।
नकुल सहदेव घरासी । याज्ञसेनीस नेते जाहले ॥ ४१ ॥
तों उठावले अवघे नृपवर । म्हणती छेदा द्रुपदाचें शिर ।
अपमानून राजकुमार । नवरी दिधली भणंगातें ॥ ४२ ॥
अवचित यंत्रीं भेदला बाण । आम्ही न म्हणों हें शरसंधान ।
आतां झुंजोनि निर्वाण । हिरोनि घ्यावी नोवरी ॥ ४३ ॥
कौरवांस क्रोध फार । सोडिती शरांचे पूर ।
म्हणती राजकन्या नेती विप्र । लाज गेली आमुची ॥ ४४ ॥
द्रुपदराज भयभीत । ब्राह्मणसभेमाजी लपत ।
विप्र थरथरां कांपत । वाट नाहीं पळावया ॥ ४५ ॥
मग हांसून बोले भीमसेन । स्वस्थ असा सकल ब्राह्मण ।
सुखें करा वेदाध्ययन । निश्चिंत मन करुनियां ॥ ४६ ॥
विशालवृक्षातळीं बैसले ब्राह्मण । तोच वृक्ष भीमें उपडोन ।
कल्पांतक हाक फोडून । झाडून घेतला खांद्यावरी ॥ ४७ ॥
मनांत म्हणे पांचाल । हा केवळ दिसतो काळ ।
भीम किंवा वाटे सबल । हनुमंतचि प्रकटला ॥ ४८ ॥
पांडव वांचले लाक्षासदनीं । किंचित ध्वनि ऐकिली कर्णीं ।
ब्राह्मण म्हणती मौन धरुनी । उगाच पहावें नावेक ॥ ४९ ॥
धनुष्यास बाण लावून । वैरियांस पाचारी अर्जुन ।
तों बलरामास श्रीकृष्ण । संकेतें खूण दाखवित ॥ ५० ॥
म्हणे हा पार्थापाठीं भीमसेन । पहिले धर्म नकुल सहदेव जाण ।
हे देखिले मागुत्यान । धन्य धन्य आजि जाहलों ॥ ५१ ॥
आतां या पांडवांहातीं । निष्कंटक करवीन क्षिती ।
येथें आल्या निश्चितीं । लाभ हाचि आम्हांसी ॥ ५२ ॥
यास एकांतीं भेटावें जाऊन । तों येथें मांडलें घोर रण ।
मुकुंद आणि रेवतीरमण । कौतुक पाहती दुरुनियां ॥ ५३ ॥
तों क्रोधें बोले दुर्योधन । जीवें मारा हे दोघे ब्राह्मण ।
द्रुपद आणि धृष्टद्युम्न । शिरें छेदा यांचीं रे ॥ ५४ ॥
भोंवतीं वेढिले भीमार्जुन । सोडिती शक्ति शस्त्रें बाण ।
चतुरंग दल लोटोन । आले तेव्हां दोघांवरी ॥ ५५ ॥
वृक्ष घेऊनि वृकोदर । करीत उठला सर्वसंहार ।
कोट्यनुकोटि अश्वकुंजर । वृक्षघायें मारिले ॥ ५६ ॥
पायदळ आणि रथ । वृक्षघायें चूर्ण करित ।
हाहाकार जाहला तेथ । म्हणती कृतांत क्षोभला ॥ ५७ ॥
कौरवभार गेले संहारुन । तंव शर सोडीत धांवला कर्ण ।
देखोनि पार्थें मांडिलें ठाण । वर्षे पर्जन्य बाणांचा ॥ ५८ ॥
म्हणती एक काल एक कृतांत । कीं एक विष्णु एक उमाकांत ।
आमुचे गर्व हरावया समस्त । येणें रुपें अवतरलें ॥ ५९ ॥
तों बाणत्रय सोडून । हृदयीं खिळिला वीर कर्ण ।
पार्थाचें संधान देखोन । गर्व हरला कौरवांचा ॥ ६० ॥
मग बोलला वीर कर्ण । ब्राह्मणा तुझा गुरु कोण ।
भार्गव किंवा जानकीजीवन । द्रोण कीं अर्जुन सांग पां ॥ ६१ ॥
तुम्ही कृत्रिमवेष घेऊन । फिरतां होऊन ब्राह्मण ।
सत्य बोलावें वचन । ऐकतां अर्जुन हांसत ॥ ६२ ॥
म्हणे रे युद्ध सांडोनि गोष्टी । मांडिली या रणतळवटीं ।
गुरुप्रसादें हे अखिल सृष्टी । निष्कंटक करीन मी ॥ ६३ ॥
भार्गवें तुज विद्या दिधली पाहीं । तो आजि झाडा दे लवलाहीं ।
ऐसें उत्तर ऐकतां हृदयीं । कर्ण बहुत दचकला ॥ ६४ ॥
प्रेतकळा ते अवसरीं । आली कौरवांचे मुखावरी ।
रथ मुरडिले झडकरी । शिबिराकडे तेधवां ॥ ६५ ॥
तों येरीकडे ते अवसरीं । शल्य धांवला भीमावरी ।
शूल टाकिला झडाकरी । तो हृदयावरी आदळला ॥ ६६ ॥
भीमें तरुवर भोवंडिला । शल्याचे पृष्ठावरी मोडिला ।
मग मल्लयुद्ध ते वेळां । चार घटिका जाहलें ॥ ६७ ॥
मग भीमे अद्‍भुत केलें । शल्यासी बळे उचलिलें ।
गगनीं नेऊनि टाकिलें । पृथ्वीवरी तयासी ॥ ६८ ॥
भूमीवरी उताणा पडत । भीमे वक्षःस्थलीं दिधली लात ।
मागुती उचलोनि पुसत । ब्राह्मणासी वृकोदर ॥ ६९ ॥
याचा घेऊं आजि प्राण । किंवा देऊं जीवदान ।
विप्र म्हणती दे सोडून । धर्म मारेल पुढें यासी ॥ ७० ॥
मग लात देउन पृष्ठावरी । भीमें सोडिला ते अवसरीं ।
पाठ देऊन शल्य झडकरी । कौरवभारांत मिसळला ॥ ७१ ॥
पांचालपुर दूर सोडून । एकयोजनावरी राहिले जाऊन ।
म्हणती ब्राह्मण आहेत कोण । मना आणूनि मग जाऊं ॥ ७२ ॥
वरकड आले होते जे नृपती । ते आपापल्या देशीं जाती ।
म्हणती पांडवचि हे होती । एवढी शक्ति आणिकां कोणां ॥ ७३ ॥
असो पांडव घेऊनी द्रौपदीसी । येते जाहले कुंतीपाशीं ।
म्हणती उत्तम भिक्षा आम्हांसी । माते मिळाली जाण पां ॥ ७४ ॥
माता म्हणे वांटून । पांच जण घ्या समान ।
बाहेरी पाहे जंव येऊन । तंव ज्ञानसेनी देखिली ॥ ७५ ॥
म्हणे न कळतां बोलिल्यें वचन । मग म्हणे पुत्रांलागून ।
माझें वचन न मानावें प्रमाण । द्रौपदीअर्जुन वधूवरें ॥ ७६ ॥
अर्जुन म्हणे मातेप्रती । तुझी असत्य नव्हे वचनोक्ती ।
यावरी व्यासदेव तेथें येती । ते करती प्रमाण तें ॥ ७७ ॥
तंव संकर्षण आणि श्रीपती । उभे ठाकले येऊन एकांतीं ।
पितृभगिनीसी वंदिती । आलिंगती पांचां जणां ॥ ७८ ॥
धर्मास म्हणे द्वारकाधीश । तुम्हीं भोगले बहुत क्लेश ।
तरी दुर्जन पावतील नाश । तुम्ही स्वस्थानास जाल सुखें ॥ ७९ ॥
ऐसें बोलोनि यादवराणा । गुप्तरुपें गेला स्वस्थाना ।
पांडवीं करुन भिक्षाटना । भोजन केलें ते दिवशीं ॥ ८० ॥
तों रात्रीमाजीं गुप्तहेर । धृष्टद्युम्नें ठेविले सत्वर ।
ते घेऊन आले समाचार । जें जें बोलिले रजनींत पैं ॥ ८१ ॥
म्हणती ते नव्हती ब्राह्मण । ते महाक्षत्रिय प्रलयाग्न ।
चार्‍ही प्रहर युद्धावांचून । गोष्टी नाहीं ऐकिल्या ॥ ८२ ॥
द्रुपद शोक करी बहुत । म्हणे भणंगीं कन्या नेली अकस्मात ।
त्यांचा वर्णही न कळे सत्य । चार्‍ही वर्णांत कोण तो ॥ ८३ ॥
द्रौपदीऐसें दिव्य रत्‍न । कोण भिकारी गेले घेऊन ।
लोकांमाजी निंद्य पूर्ण । शोक दारुण राव करी ॥ ८४ ॥
पुत्र म्हणे ताता अवधारीं । म्यां हेर पाठविले होते रात्रीं ।
ते आहेत महाक्षत्री । निर्धार आम्हीं केला हा ॥ ८५ ॥
त्यांचें संगतीं आहे माता । मज वाटतें पांडवचि तत्त्वतां ।
तों द्रुपद म्हणे रे सुता । मजही गमतें तैसेंचि ॥ ८६ ॥
मग धृष्टद्युम्न आणि पुरोहित । सवें घेऊन अश्व गज रथ ।
कुलालशालेपर्यंत । महोत्साह करित आले ॥ ८७ ॥
पृथेसहित पांचही जण । वंदूनि तेव्हां धृष्ट्द्युम्न ।
म्हणे राव पाहूं इच्छी चरण । तेथवरी आपण चलावें ॥ ८८ ॥
पांचही जण अवश्य म्हणती । एके रथीं बैसे द्रौपदी कुंती ।
पांचही जण आरुढती । रथावरी वेगळाले ॥ ८९ ॥
इकडे राजद्वारापर्यंत । अपार ठेविलें वस्तुजात ।
नाना उदमी बैसत । वस्तु अद्‍भुत दाविती ॥ ९० ॥
सकल अव्हेरुन पंडुकुमार । जेथें रचिले होते शस्त्रभार ।
तेथें नावेक राहिले स्थिर । शस्त्रपरीक्षा करावया ॥ ९१ ॥
धृष्टद्युम्न म्हणे हे क्षत्रिय सत्य । ब्राम्हण नव्हती यथार्थ ।
असो पावले राजमंदिरांत । भद्रीं बैसत धर्मराव ॥ ९२ ॥
मर्यादा अत्यंत धरुन । बंधू पाठीशीं चौघे जण ।
शोक भय विस्मय पूर्ण । किंचित नाहीं तयांलागीं ॥ ९३ ॥
द्रुपदाची संपदा अपार । त्यांचे दृष्टींत नाहीं साचार ।
गुप्तरुपें पाहे नृपवर । म्हणे राजे निर्धारे हे होती ॥ ९४ ॥
यावरी द्रुपदाची राणी । मस्तक ठेवी कुंतीचे चरणीं ।
द्रौपदीसहित गृहांत नेऊनी । वस्त्राभरणीं पूजित ॥ ९५ ॥
मग द्रुपदराज येऊन । पांडवांस भेटे प्रीतींकरुन ।
देऊनियां क्षेमलिंगन । पांचही जणां संतोषविलें ॥ ९६ ॥
द्रुपदें सुहृद मेळवून । पांडवांसहित केलें भोजन ।
एके पंक्तीं सारिलें पूर्ण । षड्रसान्नें न वर्णविती ॥ ९७ ॥
भोजन जाहलिया त्रयोदशगुणी । विडे बैसली घेऊनी ।
मग द्रुपद कर जोडूनी । धर्मरायासी विनवित ॥ ९८ ॥
म्हणे कवण याति कवण कुल । कवण देश कवण स्थल ।
सांगोनियां वृत्त सकल । मज मेळवा आपणांत ॥ ९९ ॥
मग हांसोनि धर्म बोलत । हस्तिनापुरींचा पंडुनृपनाथ ।
तयाचा हा जेष्ठ सुत । धर्मराज जाण मी ॥ १०० ॥
हे भीमार्जुन नकुल सहदेव । परम पुरुषार्थी बलार्णव ।
ज्यांशीं समरांगणी हांव । कालही धरुं शकेना ॥ १०१ ॥
धनुर्धरांमाजी निपुण । पूर्वीं भार्गव किंवा रघुनंदन ।
त्यावरी भीष्म द्रोण । पांचवा अर्जुन हा एक ॥ १०२ ॥
श्रीकृष्णकृपेचें बल पूर्ण । आणि पितृव्य विदुराचा प्रयत्‍न ।
तेणें काढिलें जोहरांतून । कृपा पूर्ण बालकांवरी ॥ १०३ ॥
त्या विदुराचे उपकार । बहुत जन्में न पडे विसर ।
महाराज कृष्ण कृपापात्र । त्रिकालज्ञानी तो होय ॥ १०४ ॥
कुंती निजमाता हे जाण । आम्हीं हिंडविली वनोपवन ।
असो तुम्हां पुण्यपुरुषांचें दर्शन । पुण्येंकरुनि जाहलें ॥ १०५ ॥
ऐसें ऐकतां उत्तर । जाहला एकचि जयजयकार ।
द्रुपद धांवोन चरण सत्वर । धरिता जाहला धर्माचे ॥ १०६ ॥
प्रेमें दिधलें अलिंगन । नेत्रीं वाहे अश्रुजीवन ।
म्हणे कौरव परम दुर्जन । कापट्य्सागर दुरात्मे ॥ १०७ ॥
आतां तुमचे निमित्तेंकरुन । जीतचि कौरव आणीन धरुन ।
क्रोधें बोले धृष्टद्युम्न । शिरें छेदीन तयांचीं ॥ १०८ ॥
देखोनि पांडव जामात । द्रुपदाचा हर्ष न मावे गगनांत ।
मग पाहूनियां सुमुहूर्त । लग्न तेव्हां धरियेलें ॥ १०९ ॥
धर्म म्हणे द्रुपदराया । आम्हां पांचांची एक जाया ।
द्रुपद शंका ऐकोनियां । म्हणे अघटित केविं घडे हें ॥ ११० ॥
संकट पडलें द्रुपदालागून । तों कृष्ण आणि कृष्णद्वैपायन ।
कृष्णा पांचांसी द्यावया पूर्ण । निश्चय करुं पातले ॥ १११ ॥
पांडव आनंदें पूर्ण । धांवोनि वंदिती व्यासचरण ।
श्रीकृष्णचरण नमून । आलिंगिती अतिप्रीतीं ॥ ११२ ॥
द्रुपद वंदूनि चरण । म्हणे आज्ञा करा मजलागून ।
द्रौपदीस भ्रतार पांच जण । किंवा एक सांगा तें ॥ ११३ ॥
बोले सत्यवतीहृदयरत्‍न । इणें भ्रतार पांच वेळ दे म्हणोन ।
आराधोनियां त्रिनयन । पूर्वीं बोलली तप करितां ॥ ११४ ॥
प्रसन्न जाहला जाश्वनीळ । घे घे वदेपांच वेळ ।
यालागीं हे वेल्हाळ । पांचां जणा अर्पावी ॥ ११५ ॥
व्यास ऐसी आज्ञा करुन । तत्काल पावले अंतर्धान ।
द्रुपदें मूळ पाठवून । ब्राम्हण राजे पाचारिले ॥ ११६ ॥
द्रुपदें जाऊन सत्वर । यादवांसहित यादवेंद्र ।
बहुत करुनि आदर । राहविला लग्नासी ॥ ११७ ॥
मग अनुक्रमेंकरुन । पांचांसीं लाविलें लग्न ।
चार दिवस संपूर्ण । उत्साह जाहला अद्‍भुत ॥ ११८ ॥
साडे जाहल्या नृपवर । आंदण देत पांडवांस अपार ।
म्हणे हें राज्य तुमचें साचार । मजसहित सर्वही ॥ ११९ ॥
गज उष्ट्र भरोनि यदुवीर । उत्तमवस्त्रें अलंकार ।
पांडवांस अहेर । प्रेमभावें अर्पितसे ॥ १२० ॥
पांचां जणांस पांच सदनें । अर्पिलीं तेव्हां द्रुपदानें ।
कृष्णार्जुन प्रसन्न मनें । प्रीतीनें राहती एके गृहीं ॥ १२१ ॥
पांडव जोहरापासून वांचले । द्रुपदाचे जामात जाहले ।
गुप्त हेर सांगों गेले । कौरवांसी तेधवा ॥ १२२ ॥
जेणें यंत्र भेदिलें पूर्ण । तो महाराज वीर अर्जुन ।
वृक्षघायें भेदिलें सैन्य । तोचि भीम ओळखावा ॥ १२३ ॥
ऐकतांचि ऐसी मात । कर्ण दुर्योधन हृदय पिटित ।
शकुनि म्हणे झाला अंत । आतां मरण आलें आम्हां ॥ १२४ ॥
दुःशासन रडे धाय मोकलून । म्हणे गळाले करचरण ।
आतां विचार एक पूर्ण । करा आधीं सत्वर ॥ १२५ ॥
छप्पनकोटि यादवांसहित । कृष्ण राम त्यांची पाठी राखित ।
सत्रा वेळ धरिला मगधनाथ । तो बाळिया अद्‍भुत बळिभद्र ॥ १२६ ॥
भूरिश्रवा म्हणे ऐका वचन । आतां स्नेह वाढवावा पूर्ण ।
पांडवांस भेटावें जाऊन । द्रुपदासहित कृष्णासीं ॥ १२७ ॥
पुढें वाढवाल स्नेहादर । तरी मागील विसरतील सर्व वैर ।
स्तुति करितां निंदा अपार । नासे मागील सर्वही ॥ १२८ ॥
पांडवांसी हातीं धरुन । न्यावें हस्तिनापुरालागून ।
राज्यविभाग देऊन । सुखरुप नांदवावें ॥ १२९ ॥
ऐकोनि ऐसें वचन । क्रोधावला परम कर्ण ।
म्हणे गेलियाही प्राण । ऐशी गोष्ट घडेना ॥ १३० ॥
पांडवांची शिरें छेदिल्याविण । आम्ही न जाऊं कदा येथून ।
ज्यांसी भय वाटेल जाण । त्यांणीं रहावें शिबिरांत ॥ १३१ ॥
कर्णवचनें दुर्योधन । म्हणे सिद्ध करा सकल सैन्य ।
मग अवघे रथावरी बैसोन । निजभारांशीं धांविन्नले ॥ १३२ ॥
वाजती रणतुरें भेरी । गजबजली पांचालनगरी ।
कौरव पातले दलभारीं । द्रुपदासी हें कळों आलें ॥ १३३ ॥
द्रुपद म्हणे धृष्टद्युम्ना । शालक पावले तया दर्शना ।
शस्त्रघायें पृष्ठ गौरवूनि जाणा । कुंजरपुरा बोळवावें ॥ १३४ ॥
पांडवांसहित पांचाल । बाहेर निघाला तत्काल ।
रणतुरें वाजतां सकल । कौरव ऐकोन दचकले ॥ १३५ ॥
दिन्हीं सैन्यां जाहली भेटी । पांडव असती द्रुपदाचे पाठीं ।
क्षण एक अवलोकिती दृष्टीं । संग्रामकौतुक कैसें तें ॥ १३६ ॥
दोन्हीं दळें सिद्ध जाहलीं । संग्रमिकांची झुंज लागली ।
पांचालाचीं दळें दाबिलीं । कौरवीं तेव्हां निजबळें ॥ १३७ ॥
ऐसें देखतां तेव्हां न्यून । मनोवेगें धांवले पांच जण ।
किंवा पंच प्रलयाग्न । ब्रह्माडं जाळूं पातले ॥ १३८ ॥
कीं ते पंचादित्य उगवत । जाहले तेजहीन कौरवखद्योत ।
कीं पंडित देखोनि अद्‍भुत । मूढ जैसे दचकती ॥ १३९ ॥
प्रत्यक्ष पांडव देखोन । कौरवांचा मद गेला गळोन ।
परि जयद्रथ आणि कर्ण । पार्थावरी धांवले ॥ १४० ॥
त्या दोघांचे कुमार दोनी । तेही पुढें धांवले ते क्षणीं ।
अर्जुनें दोन बाण सोडूनी । शिरें त्यांचीं छेदिलीं ॥ १४१ ॥
देखोनि पुत्राचे मरण । क्रोधें झेंपावला वीर कर्ण ।
अर्जुनें सोडिले निर्वाणबाण । भेदिलें हृदय कर्णांचें ॥ १४२ ॥
तेणें आली गिरगिरी । ध्वजस्तंभीं टेंकला क्षणभरी ।
वीरश्रीमद ते अवसरी । गेला सर्व दिगंतरा ॥ १४३ ॥
रथ माघारां काढिला । तों भीमें दुर्योधन देखिला ।
लाक्षागृह आठवूनि ते वेळां । दांत करकरां चावित ॥ १४४ ॥
क्रोधें वटारुनियां नेत्र । वेगे उपडिला महातरुवर ।
द्विजपंक्तीनें अधर । रगडोनियां धांवला ॥ १४५ ॥
पाठी देऊनियां कौरव । पळों लागले तेव्हां सर्व ।
भीम परतला जेथें धर्मराव । पांचाल श्वशुर हांसत ॥ १४६ ॥
पांडवप्रताप पुरुष थोर । रणमदें जाहला कामातुर ।
कौरवसेना नववधू साचार । श्रृंगारोनि पातली ॥ १४७ ॥
न तगतां युद्धसुरतीं जाण । पळाली अभिमानवस्त्रें टाकून ।
असो हस्ती वाजी शिबिरें सांडून । कौरव सर्व पळाले ॥ १४८ ॥
पांचाळें सर्व लुटिलें । आपल्या नगरा पाठविलें ।
सर्व पांडव द्रुपद पातले । येऊन भेटले रामकृष्णां ॥ १४९ ॥
नगरीं जाहला जयजयकार । आनंदलें नगर समग्र ।
इकडे दीनवदनें कौरवभार । हस्तनापुरा पातले ॥ १५० ॥
म्हणती मर मर रे पुरोचना । काय कार्य साधिलें बुद्धिहीना ।
आपण मरोनि अपयश जाणा । दिधलें आम्हां सर्वांतें ॥ १५१ ॥
ऐसें दुर्योधन बोलत । कर्ण शकुनि यथार्थ म्हणत ।
असो विदुरास समस्त । कळला वृत्तांत झाला तो ॥ १५२ ॥
धृतराष्ट्र सांगे येऊन । तुमची स्नुषा झाली द्रौपदी पूर्ण ।
अंध आनंदला ऐकोन । म्हणे दुर्योधन भाग्याचा ॥ १५३ ॥
ऋषींनीं आशीर्वाद दिधले । ते दुर्योधनास सफल जाहले ।
विदुर म्हणे ऐक वहिलें । वर्तमान पूर्वींचें ॥ १५४ ॥
लाक्षागृहापासून । पांडव वांचले पाच जण ।
तिही पांचालपुरी प्रकटोन । द्रौपदी जिंकिली प्रतापें ॥ १५५ ॥
मुहुर्त एक तटस्थ । अंध राहिलासे निवांत ।
मग म्हणे भाग्य अद्‍भुत । पांडव माझे वाचले ॥ १५६ ॥
आतां यांचें त्यांचें सख्य गोड । विदुरा तूं करीं एवढें सुघढ ।
येरु म्हणे बुद्धि सुदृढ । हेचि तुझी असों दे ॥ १५७ ॥
कृष्णकृपेच्या बळें जाण । शत्रूंचीं कृष्णानने करुन ।
कृष्णा वरिली हें कथन । ऐकतां दग्ध दोष होती ॥ १५८ ॥
विदुर नसतां सुयोधन । जनकापाशी एकांती येऊन ।
म्हणे विदुराचे विचारीं मन । न घालीं तूं सहसाही ॥ १५९ ॥
द्यावा राज्यविभाग धन । क्षणाक्षणां बोधील विदुर येऊन ।
तुवां आश्रय न द्यावा पूर्ण । महाकपटी असे तो ॥ १६० ॥
जोहरांत वांचले पंडुनंदन । ते आम्हां लावितील अग्न ।
त्यांच्या वधालागीं प्रयत्‍न । करुं आतां अनेक ॥ १६१ ॥
दुर्योधनास अंध म्हणत । हेंचि आहे माझ्या मनांत ।
मी विदुरादेखतां सत्य । लटिकेंचि स्तवितों पांडवां ॥ १६२ ॥
दुर्योधन म्हणे मंत्री धाडावे । द्रुपदयाज्ञसेनांस बोधावें ।
पांडव तेथेंच ठेवावे । कदा न आणावे गजपुरा ॥ १६३ ॥
येथें आणितां अपाय निस्चितीं । ऐसा धाक घालावा चित्तीं ।
राज्यविभाग न मागिती । ऐसें करुन ठेवावें ॥ १६४ ॥
हळूच फोडावा याज्ञसेन । एके स्त्रीस भ्रतार पांच जण ।
तेथें कलह उपजे पूर्ण । भोगनिमित्तें भिडतां ॥ १६५ ॥
दावूनि विभागवैभव । फोडावे नकुल सहदेव ।
नाना यत्‍न दावूनि भाव । घात करावा तिघांचा ॥ १६६ ॥
धर्म बापुडें नपुंसक । त्याचा आम्हांस नाहीं धाक ।
ते भीमाचे बळें देख । तृणप्राय आम्हां करिताती ॥ १६७ ॥
एक मरतां भीमसेन । कर्णास मग तृणप्राय अर्जुन ।
कृष्णाचें कपटें आर्जव करुन । त्यागवावे पांडव ॥ १६८ ॥
मग बोलला वीर कर्ण । मागें तुम्हीं केले बहुत यत्‍न ।
ते सर्वही निष्फल होऊन । वैर वाढलें शतगुणें ॥ १६९ ॥
द्रौपदी आणि पंडुनंदन । कृष्णास आवडती प्राणांहून ।
पांचाल आणि याज्ञसेन । सर्वस्वेंही तयांचे ॥ १७० ॥
युद्ध करावें बळेंकरुन । हे राज्य रक्षावें संपूर्ण ।
आपला क्षत्रियधर्म सोडून । अन्य कार्य न साधावें ॥ १७१ ॥
बोलावूनि भीष्म द्रोण । त्यांस पुसे अंबिकानंदन ।
ते म्हणती विरोध टाकून । पंडुनंदन आणावे ॥ १७२ ॥
स्वार्थ सारिखाचि देख । तुम्ही भोगितां ऐश्वर्यसुख ।
पांडवीं मागावी भीक । बरवा विवेक मांडिला ॥ १७३ ॥
आतां तरी समजावूनी । पांडव आणा मानेंकरुनीं ।
अर्धे राज्य त्यांसी देऊनी । सुखें नांदा समस्त ॥ १७४ ॥
पाठवा चतुर प्रधानाप्रती । द्रुपदराज घेऊनि हातीं ।
मुख्य गोष्ट रुक्मिणीपती । सखा करावा सर्वस्वें ॥ १७५ ॥
कर्ण म्हणे हें बरवें ज्ञान । गृहांत सोडावे सर्प आणून ।
सदनासी लावून कृशान । मग सुखी कैसें निजावें ॥ १७६ ॥
व्याघ्र पाळावे धेनूंत । भुजंग सोडावे मूषकांत ।
तैसे पांडव आणूनि येथ । कौरव पाताळीं घालावे ॥ १७७ ॥
न्यायनिष्ठुर बोले विदुर । म्हणे कुटिलाचे तर्क फार ।
राया ऐकसी याचा विचार । तरी अनर्थ पुढें असे ॥ १७८ ॥
पंडुसुत येथें आणितां । क्षेमकल्याण तुझिया सुतां ।
तुझी निर्मल कीर्ति तत्त्वतां । दिगंतरी जाईल ॥ १७९ ॥
वृकोदरे वधिला हिडिंबासुर । एकचक्रीं मारिला बकासुर ।
स्वयंवरीं राजे विभांडिले समग्र । देशिकाचे प्रतापबलें ॥ १८० ॥
युद्धा सांडोनि बाळियांपुढें । कां पळोनि आलेती इकडे ।
अंधा तुजभोंवतीं कोडें । गोष्टी सांगोन रिझविती ॥ १८१ ॥
युद्ध करिते पांडवांसीं । तरी मृत्यें आवंतिलें होतें सर्वांसी ।
मग धृतराष्ट्र म्हणे विदुरासी । रथीं बैसावें सत्वर ॥ १८२ ॥
भेटोन पांचालनृपती । धृष्टद्युम्नासहित निशितीं ।
अहेर अलंकार सर्वांप्रती । देऊनियां गौरवावें ॥ १८३ ॥
दिव्यवस्त्रीं दिव्याभरणीं । श्रृंगारावी याज्ञसेनी ।
सकलस्नुषांहित द्रुपदराणी । गौरवावी आदरें ॥ १८४ ॥
नमस्कारुन कुंतीस । स्नेहशब्दें पूजावी तीस ।
माझें आशीर्वचन पांडवांस । अत्यादरें सांगिजे ॥ १८५ ॥
श्रीकृष्णास भेटोन । साष्टांग सांगे माझें नमन ।
पांडव आणीं बुझावून । येथवरी दयाळा ॥ १८६ ॥
आज्ञा होतांचि विदुर । रथीं बैसला जाऊन सत्वर ।
पांचालपुर महानगर । वेगें केलें जवळी पैं ॥ १८७ ॥
दूत सांगती पांडवांप्रती । विदुर येतो बैसुन रथीं ।
ऐकतां सप्रेमचित्तीं । पांडव धांवती सामोरे ॥ १८८ ॥
दुरुन देखतां विदुर । रथावरुनि उतरले पंचवीर ।
घालिती भूमीवरी नमस्कार । नयनीं नीर लोटलें ॥ १८९ ॥
रथाखालीं उतरे विदुर । उचंबळे स्नेहसमुद्र ।
आलिंगिले पांच पुत्र । पंडुरायाचे प्रीतीनें ॥ १९० ॥
धर्म म्हणे विदुरासी । किती आठवूं उपकारांसी ।
ठायीं ठायीं रक्षिलेंसी । बालकांसी स्नेहाळा ॥ १९१ ॥
पांचाल येऊन सामोरा । ग्रामांत घेऊन गेला विदुरा ।
तों दृष्टीं देखिलें यादवेंद्रा । जगदगुरु जगदात्मया ॥ १९२ ॥
लोटांगण घाली विदुर । उचंबळला कृपासमुद्र ।
हृदयीं धरिला प्रियकर । वाटे सहसा न सोडावा ॥ १९३ ॥
मग एकांतगृहीं बैसोन । विदुरें सांगितलें वर्तमान ।
चला स्वस्थानास येथून । मनीं अनमान न धरावा ॥ १९४ ॥
धर्म म्हणे स्वामी जगज्जीवन । तो करील तेंचि आम्हां प्रमाण ।
आणि विदुरा तुझेंही वचन । शिरीं वंदीन वदाऐसें ॥ १९५ ॥
कुंतीस नमस्कारुन विदुर । सांगे सर्व समाचार ।
धृतराष्ट्रें प्राथिलें फार । घेऊनि कुमार तेथें यावें ॥ १९६ ॥
कुटुंबासहित द्रुपद नृपवर । वस्त्राभरणीं गौरवी विदुर ।
द्रौपदी श्रृंगारिली सत्वर । करी नमस्कार वडिलांतें ॥ १९७ ॥
द्रुपद आणि याज्ञसेन । यांसी विदुर सांगे वर्तमान ।
चला पांडवांसी घेऊन । स्थापूं नेऊन निजपदीं ॥ १९८ ॥
मग बोले जगज्जीवन । निघावें सुमुहूर्त पाहून ।
मीही समागमें येईन । विदुर ऐकोनि आनंदला ॥ १९९ ॥
स्थला आपुल्या जाती पांडव । ते कथा आहे अभिनव ।
परिसोत पंडित चतुर सर्व । ब्रह्मानंदेंकरुनियां ॥ २०० ॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंदा । पांडुरंगा पुंडलीकवरदा ।
रुक्मिणीहृदयकमलमिलिंदा । स्वानंदकंदा अभंगा ॥ २०१ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । द्वादशाध्यायीं कथियेला ॥ २०२ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटिका श्रीधरकृत ।
द्रौपदीस्वयंवर युद्ध बहुत । विदुर पांडव भेटले ॥ २०३ ॥
॥ इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अध्याय बारावा समाप्तGO TOP